|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ
भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन - महाराज - हे परीक्षित राजा - खट्वाङ्गात च दीर्घबाहु: (अभ्वत) - आणि खट्वाङ्गापासून दीर्घबाहु झाला - तस्मात पृथुश्रवा: रघु: - त्यापासून मोठा कीर्तिमान रघु - तत: अज: - त्यापासून अज - तस्मात दशरथ: अभवत - त्यापासून दशरथ झाला. ॥१॥ तस्य अपि - त्या दशरथालाच - साक्षात एष: भगवान ब्रह्ममय: हरि: - प्रत्यक्ष हा षड्गुणैश्वर्यसंपन्न ब्रह्मरुपी श्रीविष्णु - सुरै: प्रार्थित: - देवांनी प्रार्थिला असता - रामलक्ष्मणभरतशत्रुघ्ना: इति संज्ञया - रम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या नावांनी - अंशांशेन चतुर्धा: पुत्रत्वे अगात - अंशा अंशाने चार पुत्रांच्या रुपाने प्राप्त झाला. ॥२॥ राजन - हे परीक्षित राजा - तत्त्वदर्शिभि: ऋषिभि: भुरि वर्णितं - ज्ञानी अशा ऋषींनी पुष्कळ वर्णिलेले - तस्य सीतापते: अनुचरितं - त्या रामचंद्राचे चरित्र - त्वया मुहु: श्रुतं हि - तू वारंवार ऐकीलेच आहेस. ॥३॥ गुर्वर्थे त्यक्तराज्य: य: - पित्यासाठी केला आहे राज्यत्याग ज्याने असा जो - प्रियाया: (अपि) पाणिस्पर्शाक्षमाभ्यां पद्मपद्भ्यां अनुवनं व्यचरत - प्रिय पत्नीच्याहि हातांचा स्पर्श ज्यांना सोसवत नव्हता अशा कमळासारख्या मृदु पायांनी वनोवनी फ़िरला - हरींद्रानुजाभ्यां मृजितपथरुज: - मारुती व लक्ष्मण यांनी ज्याच्या मार्गातील श्रम दूर केले आहेत असा - शुर्पणख्या: वैरुप्यात - शुर्पणखेला विरुप केल्यामुळे झालेल्या पत्नीविरहाने उत्पन्न झालेल्या रागाने चढविलेल्या भुवयांनी घाबरवून टाकिला आहे समुद्र ज्याने असा - (सागरे) बद्धसेतु: - समुद्रावर पूल बांधिला आहे ज्याने असा - खलदवहन: - दुष्ट राक्षसरुपी अरण्याचा वणवा असा - (स:) कोशलेन्द्र: न: अवतात - तो अयोध्याधिपति रामचंद्र आमचे रक्षण करो. ॥ ४ ॥ येन - ज्याने - विश्वामित्राध्वरे - विश्वामित्राच्या यज्ञामध्ये - लक्ष्मण्स्य पश्यत: एव - लक्ष्मणाच्या समक्षच - मारीचाद्या: निशाचरा: नैऋतपुङ्गवा: (च) - मारीच आदिकरुन रात्रौ भटकणारे मोठमोठे राक्षस - हता: - मारिले. ॥५॥ नृप - हे राजा - बालगजलील: य: - हत्तीच्या छाव्याप्रमाणे क्रीडा करणारा राजा रामचंद्र - सीतास्वयंवरगृहे - सीतेच्या स्वयंवरासाठी उभारलेल्या मंडपात - लोकवीरसमितौ - पराक्रमी लोकांच्या सभेत - त्रिशतोपनीतं उग्रं ऐशं धनु: - तीनेशे सेवकांनी आणिलेले शंकराचे भयंकर धनुष्य - इक्षुयष्टिम इव आदाय - उसाच्या कांडाप्रमाणे घेऊन - सज्जीकृतं विकृष्य च - सज्ज करुन व ओढून - मध्ये बभंज - मध्ये मोडून टाकिता झाला. ॥६॥ अनुरुपगुणशीलवयो ङरुपां - साजेसे आहेत गुण, स्वभाव, वय, अवयव व स्वरुप ही जिची अशा - उरासि आभिलब्धमानां सीताभिघां श्रियं जित्वा - वक्षस्थलाच्या ठिकाणी जिला मान मिळाला आहे अशा सीता नावाच्या लक्ष्मीला जिंकुन - मार्गे व्रजन - मार्गाने चालत - भृगुपते: प्ररुढं दर्प व्यनयत - परशुरामाचा वाढलेला गर्व दूर करिता झाला - य: महीं त्रि: (सप्तकृत्व:) अराजवीजां अकृत - जो परशुराम एकवीस वेळा पृथ्वीला नि:क्षत्रिय करिता झाला. ॥७॥ य: च - आणि जो रामचंद्र - स्त्रैणस्य अपि सत्यपाशपरिवीतपितु: निदेशं - सत्याच्या पाशाने जखडून गेलेल्या स्त्रीलंपट अशाहि पित्याच्या आज्ञेला - शिरसा जगृहे - मस्तकाने स्वीकारिता झाला - मुक्तसङ्ग: असून इव - सर्वसंगपरित्याग केलेला मुमुक्षु जसा प्राणही तसा - राज्यं श्रियं प्रणयिन: सुह्रद: निवासं (च) त्यक्त्वा - राज्य, संपत्ति, प्रेमी पुरुष, मित्र आणि राजवाडा सोडून देऊन - सभार्य: वनं ययौ - पत्नीसह अरण्यात गेला. ॥८॥ अशद्धबुद्धे: रक्ष:स्वसु: रुपं - पापबुद्धीच्या शूर्पणखेच्या स्वरुपाला - व्यकृत - कुरुपता आणिता झाला - तस्या: चतुर्दशसहस्त्रं खरत्रिशिरदूषणमुख्यबन्धून जघ्ने - तिच्या चौदा ह्जार खर, त्रिशिर व दूषण इत्यादी बंधूंना मारिता झाला - अपारणीयकोदण्डपाणि: अटमान: कृच्छं उवास - दुसर्या कोणालाही उचलता येणार नाही असे धनुष्य धारण करुन संचार करणारा राजा रामचंद्र अरण्यात हलापेष्टा सोशीत राहिला. ॥ ९॥ नृपते - हे राजा - सीताकथाश्रवणदीपितह्रच्छ्येन दशकन्धरे - सीतेच्या गोष्टी ऐकून ज्याच्या मनात कामवासना प्रदीप्त झाली आहे,अशा रावणाने - सृष्टं मारीचं - पाठविलेल्या मारीचाला - अद्भुतैणवपुषा विलोक्य - आश्चर्यजनक अशा हरिणाच्या रुपाने पाहून - आश्रमत: अपकृष्ट: (स:) - आश्रमांतून दूर नेलेला तो - यथा उग्र : कं (तथा) विशिखेन (मारीचं) आशु जघ्ने - जसा शंकर दक्षाला तसा बाणाने मारीचाला तत्काळ मारिता झाला. ॥१०॥ विपिने रक्षोधमेन वृकवत् वैदेहराजदुहितरि असमक्षं अपयापितायां - अरण्यात दुष्ट राक्षसाने लांडग्याप्रमाणे ती जनकराजकन्या सीता आपल्या मागे पळवून नेली असता - प्रियया वियुक्त: - स्त्रीपासून विरह पावलेला - स्त्रीसंगिनां गतिं इति प्रथयन - स्त्रीलंपट पुरुषांची अशी स्थिती होते असे दाखवीत - भ्रात्रा (सह) कृपणवत वने चचार - भावासह दीनपणे अरण्यात फ़िरता झाला. ॥११॥ अजभवार्चि ताङघ्रि: स: मनुज: - ब्रह्मदेव व शंकर यांनी पुजिले आहेत चरण ज्याचे असा तो मनुष्यवेषधरी रामचंद्र - आत्मकृत्यहतकृत्यं दग्ध्वा - आपल्यासाठी युद्ध केल्यामुळे दहनादि कृत्य नष्ट झाले आहे ज्याचे अशा जटायूला दहन करुन - कबन्धं अहन - कबंधाचा वध केला - अथ कपिभि: सख्यं विधाय - नंतर वानरांबरोबर मैत्री करुन - वालिनि हते - वाली वध पावला असता - प्लवगेन्द्र्सैन्ये: दयितागतिं बुधद्वा - त्या हनुमंतादि श्रेष्ठ वानसैन्यांच्या योगे सीतेचा शोध लावून - वेलाम अगात - समुद्रतीरावर प्राप्त झाला. ॥१२॥ यद्रोषविभ्रमविवृत्त कटाक्षपातसंभ्रान्तनक्रमकर: - क्रोधाच्या अवेशाने वक्र झालेल्या कटाक्षपातांमुळे सुसरी व मगर क्षुब्ध झाले आहेत ज्यामधील असा - भयगीर्णघोष: सिन्धु: - भीतीने गिळून टाकिली आहे गर्जना ज्याची असा समुद्र - रुपी (सन) - शरीर धारण करुन - शिरसि अर्हणं परिगृह्य - मस्तकावर पूजा साहित्य घेऊन - (यस्य) पादारविन्दं उपगम्य एतत बभाषे - ज्याच्या चरणकमळाजवळ येऊन हे बोलला. ॥१३॥ भूमन - हॆ सर्वव्यापका - जडधिय: वयं - जडबुद्धीचे आम्ही - कूटस्थं आदिपुरुषं जगतां अधीशं त्वां - अविकारी मूळपुरुष व त्रैलोक्याचा अधिपति अशा तुला - नु न विदाम - खरोखरच जाणत नाही - यत्सत्त्वत: सुरगणा: (जाता:) - ज्याच्या सत्त्वगुणापासून देवसंग झाले - रजस: प्रजेशा: (जाता:) - रजोगुणापासून प्रजापति झाले - मन्यो: भूतपतय: (जाता:) - आणि क्रोधापासून भूतपति झाले - स: भवान गुणेश: अस्ति - तो तू गुणांचा स्वामी आहेस. ॥१४॥ वीर - हे वीरा - कामं प्रयाहि - तू खुशाल जा - विश्रवस: अवमेहं त्रैलोक्यरावणं जहि - विश्रव्याचा मळच की काय अशा त्रैलोक्याला रडविणार्या रावणाला मार - पत्नी (च) अवाप्नुहि - आणि आपली पत्नी परत मिळव - इह ते यशह: वितत्यै सेतुं बन्धीहि - येथी आपल्या कीर्त्त्च्या प्रसारार्थ पूल बांध - दिग्विजयिन: भूपा: यं उपेत्य (ते यश:) - गायन्ति दिग्विजय करणारे राजे ज्याच्याजवळ येऊन तुझे यशोगान करतील. ॥१५॥ रघुपती: - रामचंद्र - उदधौ कपीन्द्रकरकंपितभूरुहाङ्गै: - सेतुं बधद्वा समुद्रावर मोठमोठया वानरांच्या हातांनी कापविले आहेत वृक्षांचे अवयव ज्यांवरील अशा अनेक पर्वतशिखरांनी पूल बांधून - सुग्रीवनीलहनुमत्प्रमुखै: अनीकै: - सुग्रीव,नील व हनुमान इत्यादि आहेत प्रमुख ज्यात अशा सैन्यांसह - अग्रदग्धां लंकां - पूर्वीच जाळून टाकिलेल्या लंकेत - बिभीषणदृशा आविशत - विभीषणाच्या सांगण्याने शिरला. ॥१६॥ वानरेंद्रबलरुद्ध विहारकोष्ठ श्रीद्वारगोपुरसदोवलभीविटङ्का - मोठमोठया वानरांच्या सैन्यांनी रोधून टकिली आहेत क्रीडास्थाने, धान्यांची कोठारे, द्रव्य भांडारे,वेशीसभा,गच्च्या व खुराडी जिच्यातील अशी - निर्भज्यमानधिषणध्वजहेमकुम्भशृङ्गाटका - फ़ोडून टाकिले आहेत चवथरे, ध्वज, सुवर्णकुंभ व चव्हाटे जिच्यातील अशी - सा - ती लंकापुरी - गजकुलै: ह्र्दिनी इव घुर्ना (बभूव ) - हत्तीच्या कळपांनी जशी नदी खवळते तशी खवळून गेली. ॥१७॥ रक्ष:पति: - राक्षसांचा राजा रावण - तत अवलोक्य - ते पाहून - निकुंभकुंभधूम्राक्षदुर्मुखसुरान्तनरान्तकादीन - निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मुख, सुरांत व नरांतक इत्यादिकाना - पुत्रं - पुत्राला - प्रहस्तं - प्रहस्ताला - अतिकायविकंपनादीन सर्वानुगान - अतिकाय, विकंपन इत्यादि सर्व सेवकांना - अथकुंभकर्ण समहिनोत - आणि कुंभकर्णाला पाठविता झाला. ॥१८ ॥ सुग्रीव लक्षमण मरुत्सुत गंधमाद नीलांगद र्क्षपनसादिभि: अन्वित: (राम: ) - सुग्रीव, लक्ष्मण, मारुती, गंधमाद, नील, अंगद, जांबवान व पनस इत्यादिकांनी युक्त असा रामचंद्र - असिशूलचापप्रासर्ष्टिशक्तिशरतोमरखङ्गदुर्गां तां यातुधानपृतनां अगात - तरवार, शूळ, धनुष्य,प्रास, ऋष्टि, शक्ति, बाण, तोमर,खङ्ग इत्यादी शस्त्रास्त्रांमुळे दुर्भेगद्य झालेल्या त्या राक्षससेनेवर चालून गेला. ॥१९॥ ते सर्वे रघुपते: अङ्गदाद्या: अनीकपा: - रामचंद्राचे ते सर्व अंगदादि सेनापती - इभपत्तिरथाश्वयोघै: (युक्तं रावणस्य) वरुथं - हत्ती, पायदळ, रथ व अश्व ह्यांनी युक्त अशा रावणाच्या सैन्यावर - द्वंद्वं अभिपत्य - द्वंद्वंयुद्धाने चाल करुन - द्रुमै: गिरिगदेषुभि: - वृक्षांनी, पर्वतांनी, गदांनी आणि बाणांनी - सीताभिमर्शहतमंगलरावणेशान (राक्षसान ) - सीतेचा छळ केल्यामुळे ज्याचे पुण्य नष्ट झाले आहे असा रावण आहे राजा ज्यांचा अशा त्या राक्षसांना - जघ्नु: - मारिते झाले. ॥२०॥ अथ - मग - स्वबलनष्टिं अवेक्ष्य रुष्ट: रक्ष:पति: - आपले सैन्य नष्ट झाले आहे असे पाहून - यानकं आरुह्य रामं अभिससार - विमानात बसून रामावर तीक्ष्ण बाणांचा मारा केला. ॥२१॥ राम: तं आह - राम त्या रावणाला म्हणाला - पुरुषादपुरीष - राक्षसांचा मळ अशा हे रावणा - यत असता (त्वया) श्ववत न: कांता (अस्माकं ) असमक्षं अपह्रता - ज्या अर्थी तू दुष्टाने एखाद्या कुत्र्याप्रमाणे आमच्या नकळत आमची पत्नी पळवून नेलीस - अलङ्घ्यवीर्य: काल: इव (अहं) - ज्याचा पराक्रम कोणालाही सहन करवणार नाही अशा काळाप्रमाणे मी - त्यक्तत्रपस्य जुगुप्सितस्य कर्तु: ते अद्य फ़लं यच्छामि - निर्लज्ज व निंद्य कर्म करणार्या तुला आज त्या दुष्कृत्याचे फ़ळ देतो. ॥२२॥ एवं क्षिपन स: - याप्रमाणे त्याचा धिक्कार करणारा रामचंद्र - धनुषि संधितं बाणं उत्ससर्ज - धनुष्यावर जोडिलेला बाण सोडिता झाला - स: - तो बाण - वज्रम इव तदह्र्दयं बिभेद - वज्राप्रमाणे त्याचे ह्रदय फ़ोडिता झाला - स: दशमुखै: असृक वमन - तो रावण दहा तोंडांनी रक्त ओकीत - जने ‘हा हा’ इति जल्पति - लोक ‘हय हाय’ असा शब्द करीत असता - रिक्त: सुकृती इव - क्षीणपुण्य झालेल्या एखाद्या पुण्यवान पुरुषाप्रमाणे - विमानात न्यपतत - विमानातून खाली पडला. ॥२३॥ तत: सहत्रश: यातुधान्य: - नंतर हजारो राक्षसिणी - मंदोदर्या समं - मंदोदरीसह - लंकाया: निष्क्रम्य - लंकेतून बाहेर पडून - प्ररुदत्य: तस्मिन (रणे) उपाद्रवन - रुदन करीत त्या रणभूमीवर धावत आल्या. ॥२४॥ आत्मना आत्मानं घ्नन्त्य: - आपल्या हाताने आपले ह्रदय पिटणार्या - दीना: (ता:) - दीनवाण्या त्या राक्षसस्त्रिया - लक्ष्मणेषुभि: अर्दितान स्वान स्वान बन्धून परिष्वज्य - लक्ष्मणाच्या बाणांनी पीडिलेल्या आपापल्या बंधूंना आलिंगन देऊन - सुस्वरं रुरुदु: - मोठमोठयाने रडू लागल्या. ॥२५॥ नाथ लोकरावण रावण - हे स्वामी, हे लोकांना रडविणार्या रावणा - हा वयं हता: स्म: - अरेरे आमचा घात झाला - त्वद्विहीना परार्दिता (इयं ) लङ्का - तुझ्यापासून वियुक्त होऊन शत्रूंनी पीडिलेली ही लंका - कं शरणं यायात - कोणाला शरण जाईल. ॥२६॥ महाभाग - हे भाग्यवंता रावणा - कामवशं गत: भवान - कामाच्या कचाट्यात सापडलेला तू - सीताया: एवं तेजोनुभावं न वेद - सीतेचे अशा प्रकारचे तेज:सामर्थ्य जाणिले नाहीस - येन इमां दशां नीत: - ज्यामुळे अशा वाईट अवस्थेला प्राप्त झाला. ॥२७॥ कुलनन्दन - हे कुलनंदना रावणा - (त्वया) एषां लंका विधवा कृता - तू ही लंका पतिरहित केली आहेस - वयं च विधवा: (कृता:) - आणि आम्हासही विधवा केलेस - (तव एष:) देह: गृध्रणां अन्नं कृत: - तुझा हा देह गिधाडांचे अन्न केलास - आत्मा (च) नरकहेतवे (कृत:) - आणि स्वत:च्या आत्म्याला नरक भोगावयाला लाविलेस. ॥२८॥ कोशलेन्द्रानुमोदित: बिभीषण: - रामाने अनुमोदन दिलेला बिभीषण - स्वानां यत उक्तं सांपरायिकं - स्वकीयांचे जे शास्त्रोक्त और्ध्वदेहिक कृत्य - (तत) पितृमेधविधानेन चक्रे - ते श्राद्धविधीला अनुसरुन करिता झाला. ॥२९॥ तत: भगवान - नंतर षङ्गुणैश्वर्यसंपन्न रामचंद्र - अशोकवनिकाश्रमे शिंशपामूलं आस्थितां - आशोकवनातील आश्रमामध्ये शिसवीच्या झाडाच्या बुंधाशी बसलेल्या - स्वविरहव्याधिं क्षामां (सीतां) ददर्श - स्वत:चा विरह हाच आहे रोग जिचा अशा कृश झालेल्या सीतेला पाहता झाला. ॥३०॥ राम: प्रियतमां भार्यां दीनां वीक्ष्य अन्वकम्पत - राम अत्यंत प्रिय अशा भार्येला दीन झालेली पाहून कळवळला - आत्मसंदर्शनाह्रादविकसन्मुखपङ्कजाम (तां) - स्वत:च्या दर्शनामुळे आनंदित होऊन जिचे मुखकमळ प्रफ़ुल्लित झाले आहे अशा तिला - यानं आरोप्य - विमानात बसवून - भ्रातृभ्यां सह हनुमद्युत: आरुरुहे - भावांसह मारुतीला बरोबर घेऊन स्वत: विमानावर चढला - विभीषणाय रक्षोगणेशतांलंकाकल्पान्तं आयु: च दत्वा - विभीषणाला राक्षसांचे आधिपत्य, लंकानगरी व कल्पपर्यंत आयुष्य देऊन - चीर्णव्रत: भ्गवान पथि लोकपालार्पितै: कुसुमै: अवकीर्यमाण: पुरीं ययौ - व्रताचरण करणारा असा भगवान रामचंद्र मार्गात लोकपालांनी आर्पिलेल्या पुष्पांनी आच्छादिलेला असा अयोध्यानगरीला गेला. ॥३१-३३॥ शतधृत्यदिभि: मुदा उपगीयमानचरित: - ब्रह्मादि देव आनंदाने ज्याचे चरित्र गात आहेत असा - महाकारुणिक: (राम:) - अत्यंत दयाळू रामचंद्र - भ्रातरं गोमुत्रयावकं वल्कलाम्बरं जटिलं स्थंडिलेशयं श्रुत्वा - आपला भाऊ गोमूत्रात शिजविलेले यवान्न खाऊन,वल्कले नेसून आणि जटा धारण करुन जमिनीवर निजत आहे असे ऐकून - पौरामात्यपुरोहितै: - नागरिक, प्रधान व पुरोहित यांसह - पादुके शिरसि न्यस्य - पादुका मस्तकावर धारण करुन - गीतवादित्रनि: स्वनै: - गाणी व वाद्ये यांच्या गजरात - नंदिग्रामात स्वशिबिरात अग्रजं रामं प्रत्युद्यत: - नंदिग्रामातील आपल्या शिबिरांतून वडीलभाऊ जो राम त्याला सामोरा गेला. ॥३४-३६॥ मुहु: ब्रह्मघोषेण पठद्भि: ब्रह्मवादिभि: - सारखा वेदघोष करणार्या वेदवेत्त्या ब्राह्मणांसह - स्वर्णकक्षपताकाभि: हैमै: चित्रध्वजै: सदश्वै: रुक्मसन्नाहै: रथै: - ज्यावर जरीकाठी पताका व सुवर्णाचे चित्रविचित्र ध्वज लाविले आहेत,ज्यांना चांगले घोडे जोडले जात आहेत आणि ज्यांत सुवर्णकवचादि साहित्ये भरपूर आहेत अशा रथांतून - पुरटवर्मभि: भटै: - सोन्याची कवचे धारण करणार्या योद्ध्यांसह - श्रेणीभि: वारमुख्याभि:पदानुगै: भृत्यै: च एव - व्यापार्यांचे तांडें, मुख्य वारांगना,पादचारी सेवक यांसह - पारमेष्ठयानि उच्चावचानि पण्यानि उपादाय - राजाला योग्य अशा लहान मोठया वस्तु घेऊन - पुरत: पादुके न्यस्य - पुढे पादुका ठेऊन - प्रेम्णा प्रक्लिन्नह्रदयेक्षण: - प्रेमाने उचंबळून आले आहे ह्रदय ज्याचे असा - प्राज्जलि: बाष्पलोचन: पादयो: न्यपतत - हात जोडून नेत्रात अश्रू आलेला असा रामाच्या पाया पडला - तं चिरं दोर्भ्यां आश्लिष्य - पुष्कळ्स वेळपर्यंत बाहूंनी त्याला आलिंगन देऊन - नेत्रजै: जलै: स्नापयन - नेत्रातील उदकानी स्नान घालणारा - राम: - रामचंद्र - लक्ष्मणसीताभ्यां (सह) - ल्क्ष्मण व सीता यांसह - ये अर्ह सत्तमा: तेभ्य: विप्रेभ्य: स्वयं नम: चक्रे - जे अत्यंत पूज्य होते त्या ब्राह्मणांना स्वत: नमस्कार करिता झाला - प्रजाभि:च नमस्कृत: - आणि प्रजेकडून वंदिला गेला. ॥३७-४१॥ चिरागतं पतिं वीक्ष्य - पुष्कळ वर्षांनी आलेल्या आपल्या राजाला पाहून - उत्तरासंगान धुन्वन्त: - अंगावरील वस्त्रे हलविणारे - उत्तरा:कोशला: - उत्तरकोशल देशातील लोक - माल्यै: किरन्त: - पुष्पांनी वृष्टि करणारे - मुदा ननृतु: - आनंदाने नाचू लागले. ॥४२॥ भरत: पादुके अगृहणात् - भरत पादुका घेता झाला - ससुग्रीव:बिभीषण: चामरव्यजने - सुग्रीवासह बीभीषण चवरी व पंखा घेता झाला - मरुत्सुत: श्वेत:च्छत्रं (अगृहणात) - मारुती पांढरे छत्र घेता झाला. ॥४३॥ नृप: - हे राजा - शत्रुघ्न: धनुर्निषङ्गान् (अबिभ्रत) - शत्रुघ्न धनुष्य व भाते घेता झाला - सीता तीर्थकमण्डलुं - सीता तीर्थाचा कमंडलु घेती झाली - अंगद: खड्ग - अंगद तलवार - ऋक्षराट हैमं चर्म - जांबवान सोन्याने मढविलेली ढाल - अबिभ्रत - धारण करिता झाला. ॥४४॥ राजन - हे परीक्षित राजा - पुष्पकस्थ: स्त्रीभि: अन्वित: बन्दिभि: यमान: भगवान - स्त्रियांसह पुष्पक विमानात बसलेला व स्तुतिपाठकांनी स्तविलेला गुणैर्यसंपन्न राजा रामचंद्र - ग्रहै: उदित: चंद्र: इव - ग्रहांसह उगवलेल्या चंद्राप्रमाणे - विरेजे - शोभला. ॥४५॥ भ्रातृभि: नंदित: स: अपि - भांवानी आनंदविलेली तो रामचंद्र सुद्धा - सोत्सवांपुरी प्राविशत - उत्सवयुक्त नगरात शिरला - राजभवनं विश्य - राजमंदिरात गेल्यावर - गुरुपत्नी: स्वमातरं - गुरुच्या स्त्रियांना व आपल्यातेला - गुरुन वयस्यावरजान (च) - आणि गुरु,मित्र व लहान मुले यांना - (स्वयं) पूजित: प्रत्यपूजयत - स्वत: पुजिलेला असा सत्कारिता झाला - वैदेही लक्ष्मण: (च) एव यथावत समुपेयतु: - सीता आणि लक्ष्मण सुद्धा योग्य रीतीने सर्वांना भेटले. ॥४६-४७॥ उत्थिता: तन्व: प्राणान इव - उठलेली शरीरे प्राणांना जशी तशी - माता: मातर: पुत्रान अंके आरोप्य - त्या माता मुलांना मांडीवर घेऊन - बाष्पौघै: भिषिंचन्त्य: शुच: विजहु: - अश्रूंच्या प्रवाहांनी अभिषेक घालणार्या अशा शोककित्या झाल्या. ॥४८॥ विधिवत जटा: निर्मुच्य - यथाविधि जटा सोडवून - कुलवृद्धै: समं - कुलातील वृद्ध मनुष्यांसह - गुरु: - वसिष्ठ गुरु - चतु:सिंधुजलादिभि: यथा इंद्रं (तथा) एव (तं) अभ्यषिंचत - चारी समुद्रांतील उदकांनी जसा इंद्राला अभिषेक घालितात, तशाच रीतीने रामाला अभिषेक घालिता झाला. ॥४९॥ एवं - याप्रमाणे - कृतशिरस्नान: सुवासा:स्त्रग्वी अलंकृत: (राम:) - मस्तकावरुन स्नान केलेला, सुंदर वस्त्र परिधान केलेला,पुष्पमाला व अलंकार घातलेला रामचंद्र - स्वलंकृतै: सुवासोभि: भ्रातृभि: भार्यया (च) - अलंकार घातलेल्या व सुंदर वस्त्रे परिधान केलेल्या भावासह व स्त्रीसह - बभौ - शोभला. ॥५०॥ भ्रात्रा प्रणिपत्य प्रसादित: राम: - भावाने नमस्कार करुन संतोषविलेला रामचंद्र - आसनं अग्रहीत - राज्यासनावर बसला - स्वधर्मनिरता: वर्णाश्रमगुणान्विता: प्रजा:पितृवत जुगोप - स्वधर्मावर प्रेम करणार्या व वर्ण,आश्रम आणि गुण यांनी युक्त अशा प्रजांना पित्याप्रमाणे रक्षिता झाला - (ता:) च तं पितरं मेनिरे - आणि त्या प्रजाही त्याला आपल्या पित्याप्रमाणे मानित्या झाल्या. ॥५१॥ धर्मज्ञे सर्वभूतसुखावहे रामे राजनि - सर्व धर्म जाणणारा व सर्व प्राण्यांना सुख देणारा राम राजा झाला असता - त्रेतायांर्तमानायां - त्रेतायुग चालले असता - कृतसम: काल: अभवत - कृतयुगासारखा काळ झाला. ॥५२॥ भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा - वनानि नद्य: गिरय: खर्षाणि द्वीपसिंधव: - वने, नद्या पर्वत,खंडे, द्वीपे, व समुद्र - सर्वे प्रजानां कामदुघा:प्रासन - सर्व प्रजांना अभीष्ट वस्तू देणारे झाले. ॥५३॥ अधोक्षजे रामे राजनि - जितेन्द्रिय राम राजा झाला असता - आधिव्याधिजराग्लानिदु:खशोकभयक्लमा: न (आसन) - चिंता, रोग, वार्धक्य, ग्लानि,दु:ख, शोक, भय व श्रम होत नसत - अनिच्छ्तां मृत्यु: च न आसीत - आणि इच्छा नसणार्यांना मृत्यू येत नसे. ॥५४॥ एकपत्नीव्रतधर: राजर्षिचरित: शुचि: - एकपत्नीव्रत स्वीकारणारा,राजर्षीप्रमाणे आचरण करणारा व शुद्ध अंत:करणाचा रामचंद्र - गृहमेधीयं स्वधर्म शिक्षयन स्वयं आचरन (आसीत) - गृहस्थाश्रमातील स्वधर्माचे शिक्षण देणारा व स्वत: आचरणकरणारा झाला. ॥५५॥ प्रश्रयावनता सती भावज्ञा सीता - नम्रपणाने लीन असलेली व रामचंद्राच्या मनातील अबिप्राय जाणणारी साध्वी सीता - प्रेम्णा अनुवृत्त्या शीलेन धिया ह्रिया च - प्रेमाने,सेवेने,सुस्वभावाने,अंत:करणाने व नम्रतेने - भर्तु: मन: अहरत - पतीचे अंत:करण हरण करिता झाली. ॥५६॥ नवमः स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त |