श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १ ला - अन्वयार्थ

वैवस्तव मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा -

त्वया उक्तानि सर्वाणि मन्वन्तराणि - तू सांगितलेली सर्व मन्वंतरे - तत्र च कॄतानि अनन्तवीर्यस्य हरेः वीर्याणि - आणि त्या मन्वतरामध्ये अनंत पराक्रमी श्रीविष्णूने केलेली पराक्रमाची कॄत्ये - मे श्रुतानि - मी ऐकली. ॥ १ ॥

यः असौ सत्यव्रतः नाम द्रविडेश्वर राजर्षिः - जो हा सत्यव्रत नावाचा द्रविडाधिपति राजर्षि - यः अतीतकल्पान्ते पुरुषसेवया ज्ञानं लेभे - जो गेल्या कल्पाच्या शेवटी परमेश्वराच्या सेवेने ज्ञान मिळविता झाला. ॥ २ ॥

सः वै विवस्वतः पुत्रः मनुः आसीत - तो खरोखरच सूर्याचा पुत्र वैवस्तव मनु होता - इति त्वत्तः श्रुतं - असे तुझ्या तोंडून ऐकले आहे - तस्य सुताः च इक्ष्वाकुप्रमुखाः नॄपाः(त्वया) उक्ताः - आणि त्याचे मुलगे इक्ष्वाकु आदि करुन राजे तू सांगितलेस. ॥ ३ ॥

महाभाग ब्रह्मन - हे महाभाग्यवान शुकमुने - तेषां पॄथक वंशं - त्यांचे निरनिराळे वंशं - वंश्यानुचरितानि च - आणि वंशात उत्पन्न झालेल्या पराक्रमी पुरुषांची चरित्रे - नित्यं हि शुश्रूषतां नः कीर्तयस्व - खरोखर नेहमी ऐकण्याची इच्छा करणार्‍या आम्हाला सांग. ॥ ४ ॥

ये भूताः - जे झालेले - ये च भविष्याः - आणि जे होणारे - ये च अदयतनाः भवन्ति - आणि जे आजच्या काळी आहेत - तेषां सर्वेषां पुण्यकीर्तीनां विक्रमान नः वद - त्या सर्व पुण्यकीर्ती पुरुषाचें पराक्रम आम्हाला सांग. ॥ ५ ॥

एवं परीक्षिता राज्ञा- - याप्रमाणे परीक्षित राजाने - ब्रह्मवादिनां सदसि पॄष्टः - ब्रह्मवेत्त्यांच्या सभेत विचारलेला - परमधर्मवित भगवान शुकः प्रोवाच- अत्यंत धर्म जाणणारा सर्वैश्वर्यसंपन्न शुकाचार्य म्हणाला. ॥ ६ ॥

परंतप - हे शत्रुतापना परीक्षित राजा - मानवः वंशं प्राचुर्येण श्रूयतां - मनूचा वंश ठोकळमानाने ऐक - वर्षशतैःअपि विस्तरतः वक्तुं न शक्यते - शेकडो वर्षानी सुद्धा त्याचे विस्तॄत वर्णन करणे शक्य नाही. ॥ ७ ॥

यः परावरेषां भूतानां आत्मा परः पुरुषः - जो उच्चनीच प्राण्यांचा आत्मा व श्रेष्ठ पुरुष - सः एव कल्पान्ते इदं विश्वं आसित - तो कल्पाच्या शेवटी हया जगात अवशिष्ट राहिला होता - अन्यत किंचन न - दुसरे काहीही नव्हते. ॥ ८ ॥

महाराज - हे परीक्षित राजा - तस्य नाभेः हिरण्मयः पद्मकोशः समभवत - त्याच्या नाभिस्थानापासून सुवर्णाचा कमळाचा कळा उत्पन्न झाला - तस्मिन चतुराननः स्वयंभू जज्ञे - त्यामध्ये चार मुखांचा ब्रह्म्देव स्वतः उत्पन्न झाला. ॥ ९ ॥

तस्य मनसः मरीचिः जज्ञे - त्या ब्रह्मदेवाच्या मनापासून मरीचि ऋषि उत्पन्न झाला - तस्य अपि कश्यपः (जातः) - त्या मरीचीपासूनच कश्यप झाला - ततः दाक्षायण्यां अदित्यां विवस्वान सुतः अभवत - त्या कश्यपापासूनच दक्षाच्या अदितिनामक कन्येच्या पोटी विवस्वान नावाचा मुलगा झाला. ॥ १० ॥

भारत - हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा - ततः - त्या विवस्वानापासून - संज्ञायां श्राद्धदेवः मनुः आस - संज्ञेच्या ठिकाणी श्राद्धदेव नावाचा मनु झाला - आत्मवान सः - -आत्मज्ञानी असा तो मनु - श्रद्धायां दश पुत्रान जनयामास - श्रद्धेच्या ठिकाणी दहा पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥ ११ ॥

इक्ष्वाकु नॄगशयीतिदिष्ट्धॄष्टकरुषकान् - इक्ष्वाकु,नॄग,शर्यति,दिष्ट, करुषक यांना - नरिष्यन्तं पॄषध्रं नभगं च कवि - नरिष्यंत,पॄषध,नभग आणि कवि यानां - विभुः (जनयामास) - वभवशाली मनु उत्पन्न करिता झाला. ॥ १२ ॥

प्रभुः भगवान वसिष्ठः - समर्थ व ऐश्वर्यसंपन्न वसिष्ठ मुनि - पूर्व अप्रजस्य मनोः प्रजार्थ - प्रथम निपुत्रिक अशा मनूला संतति व्हावी म्ह्णून - मित्रावरुणयोः इष्टिं किल अकरोत - मित्र व वरुण ह्या देवांना उद्देशून खरोखर हवन करिता झाला ॥ १३ ॥

तत्र पयोव्रता मनोः पत्नी श्रद्धा - त्या ठिकाणी दूध पिऊनच रहाणारी मनूत्री पत्नी श्रद्धा - होताराम उपागम्य - होत्याजवळ जाऊन - प्रणिपत्य दुहित्रर्थ समयाचत - नमस्कार करुन कन्येसाठी याचना करिती झाली. ॥ १४ ॥

अध्वर्युणा प्रेषितः सुसमाहितः होता द्विजः - अध्वर्यूने प्रेरिलेला व स्वस्थ अंतःकरणाचा होता नामक ऋत्विज - तेन हविषि (गॄहीते) - त्याने हविर्भाग घेतला असता - वषट्कारं गॄणन - वषट्काराचा उच्चार करणारा - तत ध्यायन व्यचरत - श्रद्धेच्या याचनेचे चिंतन करीतच स्तुती करिता झाला. ॥ १५ ॥

होतुः तद्व्य भिचारेण - होत्याच्या त्या प्रमादामुळे - सा इला नाम कन्या अभवत् - ती इलानामक कन्या झाली - मनुः तां विलोक्य - वैवस्वत मनु त्या कन्येला पाहून - नातिहृष्टमनाः गुरुं प्राह - अंतःकरणाला फारसा उल्हास न वाटता गुरुला म्हणाला. ॥ १६ ॥

भगवन - हे ऐश्वर्यसंपन्न गुरो - इदं किं जातं - हे काय झाल - ब्रह्मवादिनां वः कर्म विपर्ययं (यातम) - ब्रह्मवेत्ते अशा तुमचे कर्म विरुद्ध फळ देणारे झाले - अहो कष्टं - कितीहो ही दुःखाची गोष्ट - एवं ब्रह्मविक्रिया मा स्यात - याप्रमाणे मंत्रापासून विपरित फळ न होवो. ॥ १७ ॥

यूयं मन्त्रविदः युक्ताः तपसा दग्धकिल्बिषाः (स्थ) - तुम्ही मंत्र जाणणारे, योगयुक्त व तपश्चर्येने ज्यांची पापे जळून गेली आहेत असे आहा - विबुधेष अनॄतं इव (युष्मासु) सकंल्पवैष्म्यं कुतः (भूतम) - देवाच्यां ठिकाणी जसे मिथ्यात्व तसे तुमच्या ठिकाणी संकल्पविरुद्ध फळ कसे झाले. ॥ १८ ॥

भगवान प्रपितामहः - सर्वैश्व्रर्यसंपन्न पणजा वसिष्ठ मुनि - तस्य तत वचः निशम्य - त्या श्राद्धदेवाचे भाषण ऐकुन - होतुः व्यतिक्रमं ज्ञात्वा - होत्याची चूक जाणून - रविनन्दनं बभाषे - सुर्यपूत्र श्राद्धदेवाला बोलला ॥ १९ ॥

एतत सडल्पवैष - हे संकल्पाचे विपरीत फळ - ते होतुः व्यभिचारतः(जातं) - तुझ्या हात्याच्या प्रमादामुळे झाले - तथा अपि स्वतेजसा ते सुप्रजास्त्वं साधयिष्ये - तरीसुद्धा आपल्या तेजाने तुला चांगली संतति मी मिळ्वून देईन ॥ २० ॥

राजन - हे परीक्षित राजा - एवं व्यवसितः महायशाः भगवान सः - याप्रमाणे निश्चय केलेला तो महाकीर्तिवान सर्वेश्वर्यसंपन्न वसिष्ठ मुनि - इलातयाः पुस्त्वकाम्यया - इलेला पुरुषत्व प्राप्त व्हावे या इच्छेने - आदिपुरुषं अस्तौषीत - आदिपुरुष विष्णुला स्तविता झाला. ॥ २१ ॥

तुष्टः भगवान हरिः ईश्वरः - संतुष्ट झालेला सर्वैश्वर्यसंपन्न परमेश्वर विष्णु - तस्मै कामवरं ददौ - त्याला इष्ट वर देता झाला - तेन इला सुद्युम्नः पुरुषर्षभः अभवत- - त्या वराने इला ही सुदयुम्न नावाचा श्रेष्ठ पुरुष झाली. ॥ २२ ॥

महाराज - हे परीक्षित राजा - एकदा वने मॄगयां विचरन दंशितः वीरः सः - एके दिवशी अरण्यात मॄगया करणारा तो कवचधारी पराक्रमी सुदयुम्न - सैधवं अश्वं आरुह्य - सिंधु देशातील घोडयावर बसून - रुचिरं चापं परमाद्‌भुतान् शरान् च प्रगॄह्य - सुंदर धनुष्य आणि अत्यंत आश्चर्यजनक बाण घेऊन - कतिपयामात्यैः वॄतः - कित्येक प्रधानांनी वेष्टिलेला - अनुमॄगं उत्तरां दिशं जगाम - मॄगांचा पाठलाग करीत उत्तर दिशेला गेला. ॥ २३-२४ ॥

सःकुमारः - तो राजपुत्र - मेरोः अधस्तात - मेरुपर्वताच्या पायथ्याशी - वने प्रविवेश ह - अरण्यात शिरला - यत्र ह भगवान शर्वः - जेथे सर्वैश्वर्यसंपन्न शंकर - उमयासह रममाणः - पार्वती सह क्रीडा करणारा असा - आस्ते - रहतो. ॥ २५ ॥

नॄप - हे परीक्षित राजा - परवीरहा असौ सुद्युग्नः - शत्रूंना जिंकिणारा हा सुद्युग्न - -तस्मिन प्रविष्टे एव - तेथे शिरताक्षणीच - आत्मानं स्त्रियं - स्वतःला स्त्रीरुप - -अश्वं च वडवां - आणि आपल्या घोडयाला घोडीच्या रुपात - अपश्यत - पाहता झाला. ॥ २६ ॥

तथा सर्वे तदनुगाः - त्याचप्रमाणे त्याचे सर्व सेवक - आत्मलिड्गविपर्ययं दॄष्ट्वा - स्वतःच्या पुरुषत्व धर्माच्या विरुद्ध स्त्रीत्वाला पाहून - परस्परं वीक्षमाणाः - एकमेकांकडे पाहत - विमनसः अभूवन - खिन्न झाले. ॥ २७ ॥

भगवन - हे शुकाचार्य - एवंगुणः देशः - याप्रकारचा प्रदेश - कथं केन वा कॄतः - कसा व कोणी निर्माण केला - एनं प्रश्नं - ह्या प्रश्नाचे उत्तर दया - हि नः पर कौतूहलं (अस्ति) - कारण ह्याबद्दल आम्हाला फारच कौतुक वाटत आहे. ॥ २८ ॥

एकदा सुव्रताःऋषयः - एके दिवशी चांगली व्रते आचरणारे ऋषी - -तत्र गिरिशं द्रष्टुं - त्या वनांत शंकराला पाहण्याकरिता - दिशः वितिमिराभासाः कुर्वन्तः - दिशा प्रकाशाने तेजस्वी करणारे असे - समुपागमन - प्राप्त झाले. ॥ २९ ॥

अथ - तेव्हा - विवासा अम्बिका देवी - नग्न पार्वती देवी - तान विलोक्य - त्यांना पाहून - भॄशंव्रीडिता - अत्यंत लाजली - भर्तुः अंकात समुत्थाय - पतीच्या मांडीवरुन उठून - आशू नीवीं पर्यघात - तात्काळ वस्त्र नेसली. ॥ ३० ॥

ऋषयः अपि - ऋषि सुद्धां - रममाणयोयः तयोः प्रसड्गं वीक्ष्य - क्रीडा करणार्‍या त्या दोघांचा रतिप्रसंग पाहून - तस्मात निवॄत्‍ताः- - तेथून परत फिरले - नरनारायणाश्रमं प्रययुः- नरनारायणाच्या आश्रमाला गेले. ॥ ३१ ॥

तत - त्या कारणास्तव - प्रियायाः प्रियकाम्यया - प्रिय पत्नीचे प्रिय करण्याच्या इच्छेने - भगवान इदम आह - षडगुणैश्वर्यसंपन्न शंकर हे बोलला - यः एतत स्थानं प्रविशेत सः वै योषित भवेत इति - जो ह्या जागी प्रवेश करील तो खरोखर स्री होईल असे. ॥ ३२ ॥

ततः ऊर्ध्व - नंतर पुढे - पुरुषाः वै तत वनं वर्जयन्ति हि - पुरुष खरोखर ते अरण्य टाळितात - सा च अनुचरसंयुक्ता वनात वंन विचचार - आणि ती सुद्युन्माची बनलेली स्री सेवकांसह ह्या अरण्यातून त्या अरण्यात संचार करिती झाली. ॥ ३३ ॥

अथ भगवान बुधः - इतक्यात ऐश्वर्यसंपन्न बुध - आश्रमाभ्याशे चरन्तीम - आश्रमाच्या आसपास फिरणार्‍या - स्रीभिः परिवॄतां तां प्रमोदोत्तमां वीक्ष्य - स्रियांनी वेष्टिलेल्या त्या सुंदर स्रीला पाहून - (तां) चकमे - तिची इच्छा करिता झाला. ॥ ३४ ॥

सुभ्रुः सा अपि - सुंदर भुवयांची ती स्री सुद्धा - तं सोमराजसुतं पतिं चकमे - त्या चंद्रपुत्र बुधाला पति म्ह्णून इच्छिती झाली - सः तस्यां पुरुरवसं आत्मजं जनयामास - तो बुध त्या स्रीच्या ठिकाणी पुरुरवा नावाचा पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥ ३५ ॥

एवं स्रीत्वम अनुप्राप्तः सुद्युन्मः मानवः नॄपः - ह्याप्रमाणे स्रीपणाला प्राप्त झालेला सुद्युम्ननामक मनुवंशातील राजा - स्वकुलाचार्यं वसिष्ठं सस्मारं - आपल्या कुलातील श्रेष्ठ आचार्य अशा वशिष्ठ ऋषीला स्मरता झाला - इति शुश्रुम - असे आम्ही ऐकिले आहे. ॥ ३६ ॥

तस्य तां दशां दॄष्टवा - त्याची ती अवस्था पाहून - कॄपया भॄशपीडितःसः - कॄपेने अत्यंत पीडिलेला तो वसिष्ठ - सुद्युन्मस्य पुंस्त्वं आशयन - सुद्युन्माला पुरुषत्व इच्छिणारा असा- शड्करं उपाधावत - शंकरला स्तविता झाला. ॥ ३७ ॥

विशांपते - हे परिक्षित राजा - तस्मै तुष्टः सः भगवान - वसिष्ठावर संतुष्ट झालेला तो भगवान शंकर - ऋषये प्रियं आवहन - ऋषीचे प्रिय करणारा असा - -स्वां च वां ऋतां कुर्वन - आणि आपली वाणी खरी करणार असा - इदं आह - असे म्हणाला. ॥ ३८ ॥

तव गोत्रजः सः - तुझ्या कु्ळात उत्पन्न झालेला तो सुद्युन्म - -मासं पुमान मासं स्री भविता - एक महिना पुरुष व एक महिना स्री होइल - इत्थं व्यवस्थया - अशारीतीच्या व्यवस्थेने - सुद्युन्मः मेदिनीं कामं अवतु - सुद्युन्म पॄथ्वीचे खरोखर रक्षण करो. ॥ ३९ ॥

सः आचार्यानुग्रहात - तो सद्युन्म आचार्याच्या अनुग्रहामुळे - कामं पुंस्त्वं लब्ध्वा - इच्छित पुरुषत्वाला मिळ्वून - व्यवस्थया जगतीं पालयामास - योजनेप्रमाणे पॄथ्वीचे रक्षण करिता झाला - प्रजाः तं न अभ्यनंदन स्म- प्रजा त्याचे अभिनंदन करित्या झाल्या नाहीत. ॥ ४० ॥

राजन - हे परीक्षित राजा - तस्य उत्कलः गयः च विमलः (इति) त्रयः सुताः - त्या सुद्युन्माचे उत्कल,गय आणि विमल असे तीन मुलगे - धर्मवत्सलाः दक्षिणापथाः राजानः बभूवुः- - धर्मावर प्रेम करणारे दक्षिण देशाचे राजे झाले. ॥ ४१ ॥

ततः परिणतेकाले(प्राप्ते) - नंतर वॄद्धावस्था प्राप्त झाली असता - प्रतिष्ठानपतिः प्रभुः - प्रतिष्ठित नगराचा अधिपति सुद्युन्म - पुरुरवसे पुत्राय गां उत्सॄज्य - पुरुरवा नावाच्या पुत्राला पॄथ्वीचे राज्य देऊन - वनं गतः - अरण्यात गेला. ॥ ४२ ॥

नवमः स्कन्धः - अध्याय पहिला समाप्त

GO TOP