श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय १५ वा - अन्वयार्थ

बळिराजाचा स्वर्गावर विजय -

हरिः - विष्णु - बलेः - बलिराजापासून - भूमेः पदत्रयं - तीन पावले भूमि - कृपणवत् - कृपणाप्रमाणे - कस्मात् अयाचत - काय कारणास्तव मागता झाला - लब्धार्थः ईश्वरः भूत्वा अपि - ज्याला सर्व काही मिळालेले आहे असा सर्वसमर्थ असताही - तं - त्या बलिराजाला - कस्मात् बबन्ध - का बांधिता झाला. ॥१॥

एतत् वेदितुम् इच्छामः - हे जाणण्याची इच्छा आहे - हि - कारण - पूर्णस्य ईश्वरस्य (याचनं) - सर्व इच्छा पूर्ण झालेल्या परमेश्वराची याचना - च - आणि - अनागसः (बलेः) अपि बन्धनं - निरपराधी बलींचेही बंधन - एतत् नः महत् कौतुहलं (अस्ति) - हे आम्हाला फारच आश्चर्यकारक वाटते. ॥२॥

राजन् - हे राजा - इंद्रेण - इंद्राने - पराजितश्रीः - ज्याची संपत्ती जिंकून घेतली आहे असा - च - आणि - असुभिः हापितः - प्राणांशी वियुक्त केलेला - महात्मा शिष्यः सः बलिः - थोर मनाचा तो शिष्य बलिराजा - भृगुमीः जीवितः सन् - भृगूंनी जिवंत केला असता - सर्वात्मना अर्थनिवेदनेन - मनोभावे द्रव्य अर्पण करून - तान् भृगून् हि अभजत् - खरोखर त्या भृगूंची सेवा करिता झाला. ॥३॥

प्रीयमाणाः महानुभावाः भृगवः ब्राह्मणाः - प्रसन्न झालेले थोर मनाचे भृगु कुळात उत्पन्न झालेले ब्राह्मण - त्रिणाकं जिगीषमाणं तं - स्वर्ग जिंकण्याची इच्छा करणार्‍या त्या बलीला - महाभिषेकेण विधिना - मोठया राज्याभिषेकाच्या विधीने - अभिषिच्य - राज्यावर स्थापून - विश्वजिता अयाजयन् - विश्वजितनामक यज्ञाने यजन करविते झाले. ॥४॥

ततः - तेव्हा - हविर्भिः इष्टात् हुताशनात् - हविर्भागांनी आराधिलेल्या अग्नीपासून - काञ्चनपटटनद्धः रथः - सोन्याच्या पत्र्याने आच्छादिलेला रथ - च - आणि - सिंहेन विराजमानः ध्वजः - सिंहाच्या चिन्हाने शोभणारा ध्वज - आस - उत्पन्न झाला - च - आणि - हर्यश्वतुरंगवर्णाः हयाः (बभुवुः) - इंद्राच्या घोडयांच्या वर्णासारखा ज्यांचा वर्ण आहे असे घोडे उत्पन्न झाले. ॥५॥

पुरटोपनद्धं - सुवर्णाने मढविलेले - दिव्यं - तेजस्वी - धनुः - धनुष्य - च - आणि - अरिक्तौ तूणौ - रिकामे न होणारे दोन भाते - च - आणि - दिव्यं कवचं - तेजस्वी चिलखत - पितामहः - आजोबा प्रल्हाद - तस्य - त्या बलीला - अम्लानपुष्पां मालां - न कोमेजणार्‍या फुलांची माळ - च - आणि - शुक्रः - शुक्राचार्य - जलजं - शंख - ददौ - देता झाला. ॥६॥

एवं विप्रार्जितयोधनार्थः - याप्रमाणे ब्राह्मणांनी युद्धसामग्री मिळवून दिली आहे ज्याला असा - तैः कल्पितस्वस्त्ययनः - त्या ब्राह्मणांनी स्वस्तिवाचन केले आहे ज्यांचे असा - सः - तो बलि - अथ - नंतर - विप्रान् प्रदक्षिणीकृत्य - ब्राह्मणांना प्रदक्षिणा घालून - कृतप्रणामः - केला आहे ज्याने नमस्कार असा - प्रह्लादम् आमंत्र्य नमश्चकार - प्रह्लादाचा निरोप घेऊन त्याला नमस्कार करिता झाला. ॥७॥

अथ - नंतर - महारथः सुस्रग्धरः - महारथी व चांगली माळ धारण करणारा तो बलि - सन्नह्य - चिलखत घालून - अथ - नंतर - भृगुदत्तं दिव्य रथम् आरुह्य - भृगुने दिलेल्या तेजस्वी रथात बसून - धन्वीखङ्गी धृतेषुधिः (च आसीत्) - धनुष्य, तलवार, व बाणांनी भरलेले भाते धारण करिता झाला. ॥८॥

हेमाङगदलसद्वाहुः - सोन्याच्या भूषणांनी चमकत आहेत बाहु ज्याचे असा - स्फुरन्मकरकुण्डलः - ज्याच्या कानात तेजस्वी कुंडले आहेत असा तो बलिराजा - रथम् आरूढः - रथात बसलेला - धिष्ण्यस्थः (सन्) - आपल्या स्थानी बसला असता - हव्यवाट् इव रराज - अग्नीप्रमाणे शोभला. ॥९॥

तुल्यैश्वर्यबलश्रीभिः - ज्याची ऐश्वर्य, बळ व संपत्ती ही समान आहेत अशा - दृग्भि खं पिबद्भिः इव - नेत्रांनी आकाश जणू पिऊन टाकणार्‍या अशा - परिधीन् दहद्भिः इव - सर्व दिशांना जाळूनच टाकीत आहेत की काय अशा - स्वयूथैः दैत्ययूथपैः वृतः - आपापल्या सैन्यासह असुर सेनापतींनी वेष्टिलेला - महतीं आसुरीं ध्वजिनीं विकर्षन् - मोठया दैत्यसेनेला बरोबर घेऊन चालणारा - विभुः - बलिराजा - रोदसी कंपयन् इव - स्वर्गाला व पृथ्वीला कांपवीत - स्वृद्धां इंद्रपुरीं ययौ - समृद्ध अशा इंद्राच्या नगरीला गेला. ॥१०-११॥

यत्र - जेथे - हंससारसचक्राह्वकारंडवकुलाकुलाः - हंस, सारस, चक्रवाक, व कारंडव यांच्या समूहांनी भरलेली - नलिन्यः - कमळांची सरोवरे - यत्र च - आणि जेथे - सुरसेविताः प्रमदाः - देवांशी रममाण झालेल्या तरुण स्त्रिया - क्रीडन्ति - क्रीडा करितात - श्रीमद्भिः नन्दनादिभिः उपवनोद्यानैः - शोभायमान अशा नंदनादि बागबगीच्यांनी - कूजद्विहंगमिथुनैः - जेथे पक्ष्यांची जोडपी किलबिल शब्द करितात अशा - गायन्मत्तमधुव्रतैः - जेथे उन्मत्त झालेले भुंगे गुंजारव करीत असतात अशा - प्रवालफलपुष्पोरुभारशाखामरद्रुमैः - कोवळी पाने, फळे व फुले यांच्या भाराने शोभणार्‍या फांद्या आहेत ज्यांच्या अशा देवलोकांतील वृक्षांनी - रम्यां - रमणीय दिसणार्‍या. ॥१२-१३॥

परिखभूतया देव्या आकाशगङगया - खंदकाप्रमाणे झालेल्या तेजस्वी आकाशगंगेने - च अग्निवर्णेन साटटालेन उन्नतेन प्राकारेण - आणि अग्निप्रमाणे तेजस्वी बुरुजांसह उंच कोटाने - वृतां - वेष्टिलेल्या - च - आणि - रुक्मपटटकपाटैः द्वारैः - ज्यांच्या कपाटांना सुवर्णाच्या पटटया लाविल्या आहेत अशा दरवाजांनी - च - आणि - स्फटिकगोपुरैः - स्फटिकाच्या नगरवेशींनी - जुष्टाः - सेविलेल्या - विभक्तप्रपथां - ज्यातील राजमार्ग वेगवेगळे विभागिले आहेत अशा - विश्वकर्मविनिर्मितां - विश्वकर्म्याने निर्माण केलेल्या - सभाचत्वररथ्याढयां - सभास्थाने, चवाठे, लहान रस्ते यांनी भरलेल्या - न्यर्बुदैः विमानैः - दहा कोटी विमानांनी - मणिमयैः - रत्नांनी मढविलेल्या व - वज्रविद्रुमवेदिभिः शृंगाटकैः - हिरे आणि पोवळी यांचे ओटे असलेल्या चवाठयांनी - युतां - युक्त अशा. ॥१४-१६॥

यत्र - जेथे - नित्यवयोरूपाः श्यामाः - नेहमी तारुण्य व सौंदर्य यांनी युक्त - विरजवाससः रूपवन्नार्यः - सोळा वर्षे वयाच्या दिसणार्‍या व स्वच्छ वस्त्र धारण करणार्‍या सुंदर स्त्रिया - अर्चिर्भिः वह्वयः इव - ज्वाळांनी जसे अग्नि तशा - भ्राजन्ते - शोभतात. ॥१७॥

यत्र - जेथे - मारुतः - वायु - सुरस्त्रीकेशविभ्रष्ट - देवस्त्रियांच्या केसांतून गळून पडलेल्या - नवसौगन्धिकस्रजा - ताज्या सुगंधी कमळांच्या माळांचा - आमोदं उपादाय - सुगंध घेऊन - मार्गे आवाति - मार्गामध्ये वाहतो. ॥१८॥ - सुरप्रियाः - देवांच्या प्रिय अप्सरा - अगुरुगन्धिना पाण्डुरेण - अगुरुनामक धूपासारखा आहे सुगंध ज्यांचा अशा - हेमजालाक्षनिर्गच्छद्धूमेन - शुभ्र वर्णाच्या सुवर्णाच्या खिडकीतून बाहेर पडणार्‍या धुराने - प्रतिच्छन्नमार्गे - व्यापिलेल्या मार्गात - यान्ति - फिरतात. ॥१९॥ - मुक्तावितानैः - मोत्यांच्या छतांनी - मणिहेमकेतुभिः - रत्नखचित सुवर्णाच्या ध्वजांनी - नानापताकावलभीभिः - अनेक पताकांनी युक्त अशा विमानांच्या पुढील भागांनी - आवृतां - वेष्टिलेल्या - शिखण्डिपारावतभृङगनादितां - मोर, पारवे आणि भुंगे यांच्या शब्दांनी गजबजून गेलेल्या - वैमानिकस्त्रीकलगीतामंगलाम् - विमानात बसून फिरणार्‍या स्त्रियांच्या मधुर गायनाने मंगल झालेल्या - मृदङगशङ्खानकदुन्दुभिस्वनैः - मृदंग, शंख, नगारे व टिमक्या यांच्या शब्दांनी - सतालवीणामुरजर्ष्टिवेणुभिः - टाळ, वीणा, मुरज, ऋष्ठि व वेणु - सवाद्यैः नृत्यैः - या वाद्यांसह होणार्‍या नृत्यांनी - उपदेवगीतकैः - गंधर्वादिकांच्या गायनांनी - मनोरमां - मनोहर अशा - स्वप्रभया जितप्रभां - आपल्या कांतीने कांतीलाच जिने जिंकिले आहे अशा. ॥२०-२१॥

अधर्मिष्ठाः खलाः भूतद्रुहः शठाः - अधर्माचरण करणारे, दुष्ट, प्राण्यांना पीडा देणारे, लबाड लोक - मानिनः कामिनाः लुब्धाः - अभिमानी, स्त्रीलंपट, व लोभी पुरुष - यां न (व्रजन्ति) - ज्या नगरीला जात नाहीत - एभिः हीनाः यत् (व्रजन्ति) - जेथे ह्या अधर्मादि दुर्गुणांनी रहित असे साधु लोक जातात. ॥२२॥

सः वरूथिनीपतिः - तो सेनाधिपती बली - तां देवधानीं - त्या देवांच्या राजधानीला - बहिः संमंतात् पृतन्यया रुरुधे - बाहेरून सभोवार सैन्याने वेढिता झाला - इंद्रयोषितां भयं प्रयुंजन् - इंद्राच्या स्त्रियांच्या मनात भीति उत्पन्न करून - आचार्यदत्तं महास्वनं - दैत्यगुरु शुक्राचार्यांनी दिलेला मोठया - जलजं दध्मौ - शब्दांचा शंख वाजविता झाला. ॥२३॥

सर्वदेवगणोपेतः मघवान् - सर्व देवसमुदायांनी युक्त असा इंद्र - बलेः तं परमम् उद्यमम् अभिप्रेत्य - बलिराजाच्या त्या श्रेष्ठ उद्योगाला जाणून - गुरुम् एतत् ह उवाच - गुरु बृहस्पतीला खरोखर असे म्हणाला. ॥२४॥

भगवन् - हे सर्वैश्वर्यसंपन्न गुरो - नः पूर्ववैरिणः बलेः - आमचा पूर्वीपासूनचा शत्रु जो बलि त्याचा - भूयान् उद्यमः (वर्तते) - मोठा उद्योग चालला आहे - इमम् अविषह्यं मन्ये - मला हा असह्य वाटतो - केन तेजसा - कोणत्या तेजामुळे - (अयं) ऊर्जितः आसीत् - हा बलि इतका शक्तीमान झाला आहे. ॥२५॥

कश्चित् कुतः वा अपि - कोणीही कोणत्याही साधनाने - एनं प्रतिव्योढुम् न अधीश्वरः - ह्या बलिराजाशी सामना करण्यास समर्थ नाही - मुखेन इदं पिबन् इव - तोंडाने हे सर्व जणू काय गिळीत - दश दिशः लिहन् इव - दाही दिशांना जणू चाटीत - दृग्भिः दिशः दहन् इव - नेत्रांनी दिशांना जणु काय जाळीत - संवर्ताग्निः इव (अयं) उत्थितः - प्रलय काळच्या अग्नीप्रमाणे हा उठला आहे. ॥२६॥ - मद्रिपोः एतस्य दुर्धर्षत्वस्य कारणं ब्रूहि - माझ्या शत्रूच्या बलाढयपणाचे कारण सांगा - यतः (अस्य) ओजः सहः - ज्यामुळे याला मानसिक, शारीरिक, व - बलं तेजः प्राप्तम् - ऐंद्रिय बळ व तेज प्राप्त झाले - (यतः) एतत्समुद्यमः - ह्याचा मोठा उद्योग चालला आहे. ॥२७॥

मघवन् - हे इंद्रा - अस्य शत्रोः उन्नतेः कारणं जानामि - ह्या शत्रूच्या उत्कर्षाचे कारण मी जाणतो - ब्रह्मवादिभिः भृगुभिः - ब्रह्मवेत्त्या भृगूंनी - शिष्याय तेजः उपभृतं - शिष्याला हे सामर्थ्य वाढवून दिले आहे - यथा जनाः कृतान्तस्य (तथा) - लोक जसे यमापुढे तसे - ईश्वरं हरिं वर्जयित्वा - सर्वैश्वर्यसंपन्न विष्णूशिवाय - भवद्विधः वा भवान् अपि - तुझ्यासारखा किंवा प्रत्यक्ष तू सुद्धा - अस्य पुरः स्थातुं न शक्तः - ह्याच्यापुढे उभा राहण्यास समर्थ नाहीस. ॥२८-२९॥

तस्मात् - त्या कारणास्तव - सर्वे यूयं - तुम्ही सर्व - यतः शत्रोः विपर्ययः (भवति) - ज्या काळी शत्रूच्या भरभराटीच्या स्थितीत पालट होईल - (तं) प्रतीक्षन्तः - त्या काळाची वाट पाहा - त्रिविष्टपं उत्सृज्य निलयं यात - स्वर्ग सोडून गुप्त रीतीने लपून बसा. ॥३०॥

विप्रबलोदर्कः - ब्राह्मणाच्या जोरावर भरभराटीस आलेला - संप्रति ऊर्जितविक्रमः - सांप्रत ज्याचा पराक्रम फार वाढला आहे असा - एषः - हा बलिराजा - तेषाम् एव अपमानेन - त्या ब्राह्मणांच्याच अपमानामुळे - सानुबन्धः विनंक्ष्यति - परिवारासह नाश पावेल. ॥३१॥

अर्थानुदर्शिना गुरुणा - अर्थाला दाखविणार्‍या बृहस्पतीने - एवं सुमन्त्रितार्थाः - ह्याप्रमाणे उत्तम रीतीचे कर्तव्यकर्म ज्यांना उपदेशिले आहे असे - कामरूपिणः ते गीर्वाणाः - वाटेल ते रूप धारण करू शकणारे ते देव - त्रिविष्टपं हित्वा जग्मुः - स्वर्गाला सोडून निघून गेले. ॥३२॥

अथ - नंतर - देवेषु निलीनेषु - देव लपून बसले असता - वैरोचनः बलिः - विरोचनाचा पुत्र बलिराजा - देवधानीं पुरीम् अधिष्ठाय - देवांची राजधानी जी अमरावती तेथे गादी स्थापून - जगत्त्रयं वशं निन्ये - त्रैलोक्याला आपल्या ताब्यात आणिता झाला. ॥३३॥

शिष्यवत्सलाः भृगवः - शिष्य जो बलिराजा त्यावर ज्यांचे फारच प्रेम आहे असे भृगुऋषि - विश्वजयिनम् - त्रैलोक्य जिंकणार्‍या व - अनुव्रतं तं शिष्यं - आज्ञेप्रमाणे वागणार्‍या त्या बलिराजाकडून - हयमेधानां शतेन - शंभर अश्वमेध यज्ञांनी - अयोजयन् - पूजा करविते झाले. ॥३४॥

ततः - नंतर - तदनुभावेन - त्या भृगुंच्या सामर्थ्याने - भुवनत्रयविश्रुतां कीर्तिं - त्रैलोक्यात सर्वत्र ऐकू जाणार्‍या कीर्तीला - दिक्षु वितन्वानः - दाही दिशांना पसरविणारा - सः (बलिः) उडुराट् इव रेजे - तो बलि चंद्राप्रमाणे शोभला. ॥३५॥

च - आणि - महामनाः (सः) - थोर मनाचा तो बलिराजा - आत्मानं कृतकृत्यम् इव मन्यमानः - स्वतःला कृतार्थ झाल्याप्रमाणे मानणारा - द्विजदेवोपलम्भितां - श्रेष्ठ ब्राह्मणांनी मिळवून दिलेल्या - स्वृद्धां श्रियं बुभुजे - समृद्ध राज्यलक्ष्मीला उपभोगिता झाला. ॥३६॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP