श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ

मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन -

एवं - याप्रमाणे - दैत्यसुतैः - दैत्यपुत्रांनी - पुष्टः - प्रश्न केलेला - महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त - असुरः - प्रल्हाद - मदनुभाषितं - माझे भाषण - स्मरन् - स्मरणारा - तान् - त्या - स्मयमानान् (दैत्यपुत्रान्) - जिज्ञासा उत्पन्न झालेल्या दैत्यपुत्रांना - उवाच - बोलला ॥ १ ॥

अस्माक्ं - आमचे - पितरि - वडील - तपसे - तपश्चर्येकरिता - मंदराचलं - मंदरपर्वतावर - प्रस्थिते - गेले असता - वासवादयः - इंद्रादि - विबुधाः - देव - पिपीलिकैः - मुंग्यांनी - अहिः इव - जसा साप तसा - लोकोपतापनः - लोकांना दुःख देणारा - पापः - पापी हिरण्यकशिपु - पापेन - स्वतःच्या पापाने - अभक्षि - भक्षिला गेला - दिष्टया - ही आनंदाची गोष्ट आहे - इति - असे - वादिनः - बोलणारे - दानवान् प्रति - दैत्यांबरोबर - परं - मोठा - युध्दोद्यमं - युध्याचा उद्योग - चक्रुः - करिते झाले ॥ २-३ ॥

सुरैः - देवांनी - वध्यमानाः - मारपीट केलेले - असुरयूथपाः - दैत्यांचे सेनापती - तेषां - त्या देवांच्या - अतिबलोद्योगं - अत्यंत प्रबल उद्योगाला - निशम्य - श्रवण करून - भीताः - घाबरलेले - सर्वतोदिशं - दाही दिशांना - दुद्रुवुः - पळाले. ॥ ४ ॥

प्राणपरीप्सवः - प्राणरक्षणाची इच्छा करणारे - सर्वे - सर्व दैत्य - कलत्रपुत्रमित्राप्तान् - स्त्री, पुत्र, मित्र व इष्ट यांना - गृहान् - घरांना - पशुपरिच्छदान् - पशु आणि संसारसामग्री यांना - न अवेक्षमाणाः - न पाहणारे - त्वरितः - त्वरेने पळून गेले. ॥ ५ ॥

जयकांक्षिणः - जयाची इच्छा करणारे - अमराः - देव - राजशिबिरं - राजवाडयाला - व्यलुंपन् - लुटते झाले - च - आणि - इंद्रः - इंद्र - तु - तर - राजमहिषीं - राजाच्या राणीला - मम - माझ्या - मातरं - आईला - अग्रहीत् - पकडता झाला. ॥ ६ ॥

नीयमानां - नेल्या जाणार्‍या - भयोद्विनां - भयाने गांगरून गेलेल्या - कुररीं इव - टिटवीप्रमाणे - रुदतीं (मम मातरं) - रडत असणार्‍या त्या माझ्या आईला - तत्र पथि - त्या मार्गात - यदृच्छया - सहजगत्या - आगतः - आलेला - देवर्षिः - नारद ऋषि - ददृशे - पाहता झाला. ॥ ७ ॥

प्राह - म्हणाला - सुरपते - हे इंद्रा - अनागसं - निरपराधी अशा - एनां - हिला - नेतुं - नेण्याला - मा अर्हसि - तू योग्य नाहीस - महाभाग - हे भाग्यवंता - परपरिग्रहम् - परस्त्री अशा - सतीं - पतिव्रतेला - मुंच मुंच - सोड सोड. ॥ ८ ॥

अस्याः - हिच्या - जठरे - उदरात - सुरद्विषः - देवशत्रूचे - अविषह्यं - दुःसह असे - वीर्यं - वीर्य - आस्ते - आहे - यावत्प्रसवं - प्रसूतीपर्यंत - आस्यतां - हिने येथे राहावे - अर्थपदवीं - कार्याच्या पूर्णत्वाला - गतः अहं - प्राप्त झालेला मी - (इमां) मोक्ष्ये - हिला सोडीन. ॥ ९ ॥

त्वया - तुझ्या हातून - अयं - हा - निष्किल्बिषः - पापरहित - अनंतानुचरः - परमेश्वराचा सेवक - साक्षात् - प्रत्यक्ष - महान् - मोठा - बली - प्रतापवान - महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त - संस्थां - मरणाला - न प्राप्स्यते - पोचविला जाणार नाही. ॥ १० ॥

इति - याप्रमाणे - उक्तः - सांगितला गेलेला - इंद्रः - इंद्र - देवर्षेः - नारदाच्या - वचः - भाषणाला - मानयन् - मान देणारा - तां - तिला - विहाय - सोडून - अनंतप्रियभक्त्या - ईश्वराच्या भक्तावरील प्रेमामुळे - एनां - हिला - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - दिवं - स्वर्गाला - ययौ - गेला. ॥ ११ ॥

ततः - नंतर - ऋषिः - नारद - नः मातरं - आमच्या आईला - निजाश्रमं - आपल्या घरी - समानीय - आणून - आश्वास्य (उवाच) - आश्वासन देऊन म्हणाला - वत्से - हे मुली - यावत् - जेव्हा - ते - तुझ्या - भर्तुः - पतीचे - आगमः (भवति तावत्) - आगमन होईल तेथपर्यंत - इह - येथे - (त्वया) उष्यतां - त्वा राहावे. ॥ १२ ॥

सा अपि - तीहि - अकुतोभया - सर्वथा निर्भय झालेली - तथा इति - बरे आहे असे म्हणून - देवर्षेः - नारदाच्या - अंति - जवळ - यावत् - जोपर्यंत - दैत्यपतिः - दैत्यराज - घोरात् तपसः - घोर तपश्चर्येहून - न न्यवर्तत (तावत्) - परत आला नाही तोपर्यंत - अवात्सीत् - राहिली ॥ १३ ॥

सा अन्तर्वत्नी - ती गर्भिणी - सती - पतिव्रता - तत्र - त्याठिकाणी - परमया भक्त्या - मोठया भक्तीने - स्वगर्भस्य क्षेमाय - आपल्या गर्भाच्या कल्याणाकरिता - इच्छाप्रसूतये (च) - आणि आपल्याला इच्छा होईल तेव्हा प्रसूत होता यावे याकरिता - ऋषिं पर्यचरत् - नारदाची सेवा करिती झाली ॥ १४ ॥

कारूणिकः - दयाळू - ईश्वरः - समर्थ - ऋषिः - नारद - मां अपि - मलाहि - उद्दिश्य - उद्देशून - तस्य - तिला - धर्मस्य - धर्माचे - तत्त्वं - तत्त्व - च - आणि - निर्मलं - निर्मळ - ज्ञानं - ज्ञान - उभयं - अशी दोन्ही - प्रादात् - देता झाला ॥ १५ ॥

मातुः - आईचे - तत् - ते धर्माचे तत्त्वज्ञान - तु - तर - कालस्य - काळाच्या - दीर्घत्वात् - दीर्घपणामुळे - स्त्रीत्वात् (च) - आणि स्त्रीस्वभावामुळे - तिरोदधे - नाहीसे झाले - ऋषिणा - नारदाने - अनुगृहीतं मां - कृपा केलेल्या मला - स्मृतिः - आठवण - अधुना अपि - अजूनही - न अजहात् - सोडून गेली नाही ॥ १६ ॥

यदि - जर - मे वचः - माझ्या भाषणावर - (भवन्तः) श्रद्दधते (तर्हि) - तुम्ही विश्वास ठेवाल तर - भवतां अपि धीः - तुमचीही बुध्दि - श्रध्दातः - श्रध्देने - वैशारदी भूयात् - निपुण होईल - यथा - जशी - स्त्रीबालानां - बायकामुलांची - मे च (अभवत) - आणि माझी झाली ॥ १७ ॥

जन्माद्यां - जन्म आदिकरुन - इमे - हे - षट् - सहा - भावाः - विकार - ईश्वरमूर्तिना कालेन - ईश्वररूपी काळाच्या योगे - वृक्षस्य फलानां इव - झाडाच्या फळांप्रमाणे - देहस्य - देहाला - दृष्टाः- दिसून येतात - आत्मनः - आत्म्याला - न (दृष्टाः) - दिसून येत नाहीत ॥ १८ ॥

आत्मा - आत्मा - नित्यः - नित्य - अव्ययः - नाशरहित - शुध्दः - शुध्द - एकः - अद्वितीय - क्षेत्रज्ञः - शरीरसाक्षी - आश्रयः - आधार - अविक्रियः - विकाररहित - स्वदृक - स्वयंप्रकाश - हेतुः - उत्पत्त्यादिकांना कारण - व्यापकः - व्यापक - असंगी - संगरहित - अनावृतः (च अस्ति) - व आवरणशून्य आहे ॥ १९ ॥

एतैः - ह्या - परैः - श्रेष्ठ अशा - द्वादशभिः - बारा - आत्मनः लक्षणैः - आत्म्याच्या लक्षणांनी - तं विद्वान् - त्याला जाणणार्‍या मनुष्याने - मोहजं - मोहापासून उत्पन्न होणार्‍या - अहं मम - मी आणि माझे - इति - अशा - देहादौ - देहादिकांच्या ठिकाणी होणार्‍या - असद्‌भावं - दुराभिमानाला - त्यजेत् - सोडून द्यावे ॥ २० ॥

यथा - ज्याप्रमाणे - तदभिज्ञः - ते काम जाणणारा - हेमकारः - सोनार - क्षेत्रेषु - खाणीतील - ग्रावसु - दगडातून - योगैः - प्रयोगांनी - स्वर्ण - सोने - आप्नुयात् - मिळवितो - तथा - त्याप्रमाणे - अध्यात्मवित् - अध्यात्मविषय जाणणारा मनुष्य - क्षेत्रेषु - क्षेत्ररूप - देहेषु - देहांच्या ठिकाणी - आत्मयोगैः - आत्मप्राप्तिमूलक साधनांनी - ब्रह्मगतिं - ब्रह्मगतीला - लभेत - प्राप्त होतो ॥ २१ ॥

आचार्यैः - आचार्यांनी - अष्टौ - आठ - प्रकृतयः - प्रकृति - त्रयः एव हि - तीनच - तग्दुणाः - त्या प्रकृतीचे सत्त्वादि गुण - षोडश - सोळा - विकाराः - विकार - प्रोक्ताः - सांगितले आहेत - समन्वयात् - सर्वत्र साक्षित्वाने असल्यामुळे - पुमान् - आत्मा - एकः (प्रोक्तः) - एक सांगितला आहे ॥ २२ ॥

देहः - देह - तु - तर - सर्वसंघातः - सर्वांचा समुदायरूप - जगत् - जंगम - तस्थुः - स्थावर - इति - असा - द्विधा (अस्ति) - दोन प्रकारचा होय - अन्वयव्यतिरेकेण - आत्मा सर्वत्र व्यापूनहि पुनः सर्वांपासून अलिप्त आहे अशा - विवेकेन - विवेकाने - उशता - निर्मल अशा - आत्मना - मनाने - सर्गस्थानसमाम्नायैः - सृष्टि, स्थिति व लय ही आपल्यापसून होतात या अर्थाच्या वेदवचनांनी - विमृशद्‌भिः - मनन करणार्‍या - असत्वरैः - गंभीर पुरुषांनी - अत्र एव - या संघातरूप देहांतच - न इति न इति - हे आत्मा नव्हे हे आत्मा नव्हे - इति - अशा परीक्षेने - अतत् - जे जे आत्मा नव्हे ते ते सर्व - त्यजन् - टाकीत - पुरुषः - आत्मा - मृग्यः - शोधिला जावा ॥ २३-२४ ॥

जागरणं - जागेपण - स्वप्नः - स्वप्नस्थिति - सुषुप्तिः - गाढ झोप - इति - असा - बुध्देः - बुध्दिच्या - वृत्तयः (सन्ति) - तीन वृत्ती आहेत - ताः - त्या - येन एव - ज्याच्या योगानेच - अनुभूयंते - अनुभविल्या जातात - सः - तो - अध्यक्षः - मुख्य - परः - श्रेष्ठ - पुरुषः (अस्ति) - पुरुष होय ॥ २५ ॥

पर्यस्तैः - चोहोकडे टाकलेल्या - क्रियाद्‌भवैः - कर्मापासून उद्‌भवणार्‍या - एभिः - ह्या - त्रिवर्णैः बुध्दिभेदैः - तीन प्रकारच्या वृत्तींनी - अन्वयात् - व्याप्यव्यापक संबंधाच्या ज्ञानाने - गंधैः - गंधाच्या योगाने - वायुं इच - जसा वायु तसा - आत्मनः - आत्म्याचे - स्वरुपं - स्वरुप - बुध्येत् - जाणावे ॥ २६ ॥

संसारः - संसार - हि - खरोखर - एतद्‍द्वारः अस्ति - बुध्दि हेच ज्याचे द्वार आहे असा होय - गुणकर्मनिबंधनः - गुण व कर्मे यांनी जखडलेला - अज्ञानमूलः - अज्ञानमूलक - अपार्थः अपि - मिथ्था असाही - पुंसः - पुरुषाला - स्वप्नः इव - स्वप्नाप्रमाणे - इष्यते - कल्पिला जातो ॥ २७ ॥

तस्मात् - म्हणून - भवद्‌भिः - तुम्हाकडून - विगुणात्मनां - सत्त्व, रज, तमोगुणात्मक - कर्मणां - कर्माच्या - बीजनिर्हरणं - बीजाचे दहन - कर्तव्यं - केले जावे ॥ २८ ॥

तत्र - त्या - उपायसहस्त्राणां - ज्ञानप्राप्तीच्या हजारो उपायांमध्ये - भगवता - नारदाने - अयं - हा - उदितः - सांगितला - यत् - की - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - ईश्वरे - ईश्वराच्या ठिकाणी - यथा यैः - जेणे करून ज्या साधनांनी - अञ्जसा - त्वरित - रतिः स्यात् - रति जडेल ॥ २९ ॥

गुरुशुश्रूषया - गुरुच्या सेवेने - भक्त्या - ईश्वराच्या भक्तीने - च - आणि - सर्वलब्धार्पणेन - मिळालेले सर्व परमेश्वराला अर्पण करण्याने - साधुभक्तांनां संगेन - साधु व भक्त यांच्या संगतीने - च - आणि - ईश्वराराधनेन - ईश्वराच्या पूजेने ॥ ३० ॥

तत्कथायां - परमेश्वराच्या कथेवर - श्रद्धया - श्रद्धा ठेवण्याने - गुणकर्मणां - परमेश्वराचे गुण व कर्मे यांच्या - कीर्तनैः - कीर्तनाने - तत्पादाम्बुरुहध्यानात् - परमेश्वराच्या चरणकमलांच्या ध्यानाने - तल्लिंगेक्षार्हणादिभिः (रतिः संपाद्या) - परमेश्वराच्या मूर्तीचे दर्शन व पूजन इत्यादिकांच्या योगे प्रीती संपादन करावी ॥ ३१ ॥

भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - ईश्वरः - समर्थ असा - हरिः - हरि - सर्वेषु - सर्व - भूतेषु - प्राणीमात्रांच्या ठिकाणी - आस्ते - आहे - इति - अशा - मनसा - भावनेने - भूतानि - प्राण्यांना - तैः कामैः - त्या कामना पुरवून - साधु - चांगला - मानयेत् - मान द्यावा ॥ ३२ ॥

एवं - याप्रमाणे - निर्जितषड्‍वर्गैः - षड्रिपूंचा समुदाय जिंकलेल्या पुरुषांकडून - ईश्वरे - ईश्वराच्या ठिकाणी - भक्तिः - भक्ती - क्रियते - केली जाते - यया - जिच्या योगाने - भगवति- षड्‍गुणैश्वर्यसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीकृष्णाच्याठिकाणी - रतिं - प्रीती - (नरः) संलभते - मनुष्य प्राप्त करुन घेतो ॥ ३३ ॥

यदा - जेव्हा - कर्माणि - परमेश्वराच्या चरित्रांना - अतुल्यान् - अनुपम अशा - गुणान् - श्रीहरीच्या गुणांना - लीलातनुभिः - लीलेसाठी घेतलेल्या अवतारांनी - कृतानि - केलेल्या - वीर्याणी - पराक्रमांना - निशम्य - श्रवण करुन - अतिहर्षोत्पुलकाश्रुगद्‍गदं - अत्यंत हर्षाने अंगावर रोमांच उभे राहिले आहेत व नेत्रांतून अश्रू वहात आहेत अशा सद्‍गदित स्थितीत - प्रोत्कंठः - ज्याचा कंठ भरुन आला आहे असा - (भक्तः) उद्‍गायति - भक्त मोठयाने गातो - नृत्यति - नाचतो - रौति - रडतो ॥ ३४ ॥

यदा - जेव्हा - ग्रहग्रस्तः इव - पिशाचाने घेरल्याप्रमाणे - क्वचित् - कधी - हसति - हसतो - आक्रंदते - ओरडतो - ध्यायति - ध्यान करीत बसतो - जनं - लोकांना - वंदते - नमस्कार करितो - मुहुः - वारंवार - आत्ममतिः - आत्म्याकडे चित्त गेले आहे ज्याचे असा - गतत्रपः - निर्लज्ज झालेला - श्वसन् - दीर्घश्वास सोडीत - हरे - हे हरे - जगत्पते - हे जगत्पते - नारायण - हे नारायणा - इति - असे - वक्ति - बोलतो ॥ ३५ ॥

तदा - तेव्हा - पुमान् - पुरूष - मुक्तसमस्तबंधनः - संपूर्ण बंधनापासून मुक्त झालेला - तद्‌भावभावानुकृताशया कृतिः - ज्याचे चित्त व शरीर परमेश्वराच्या चरित्रांचे अनुकरण करितात असा - निर्दग्धबीजानुशयः - ज्याचे संसाराचे बीजरूपी अज्ञान व वासना जळून गेली आहे असा - महीयसा - अत्यंत बलवान अशा - भक्तिप्रयोगेण - भक्तीच्या साधनाने - अधोक्षजं - परमेश्वरस्वरूपाला - समेति - जाऊन मिळतो ॥ ३६ ॥

इह - इहलोकी - अघोक्षजालंभं - परमेश्वराला मनाने केलेला स्पर्श - अशुभात्मनः - अनेक दोषयुक्त अंतःकरण असलेल्या - शरीरिणः - प्राण्याला - संसृतिचक्रशातनं (अस्ति) - संसाररूपी चक्र तोडून टाकणारा होतो - तत् - ती स्थिती - बुधाः - ज्ञानी लोक - ब्रह्मनिर्वाणसुखं - ब्रह्मरूपी मोक्षसुख - विदुः - समजतात - ततः - म्हणून - हृदये - हृदयात असणार्‍या - हृदीश्वरं - अंतर्यामी परमेश्वराचे - भजध्वं - भजन करा ॥ ३७ ॥

आसुरबालकाः - हे दैत्यपुत्रानो - स्वे हृदि - आपल्या हृदयात - छिद्रवत् - आकाशाप्रमाणे - सतः - असणार्‍या - स्वस्य - स्वतःचा - आत्मनः - आत्मारूप अशा - सख्युः - मित्ररूप अशा - हरेः - हरीच्या - उपासने - उपासनेमध्ये - (कः) अतिप्रयासः (अस्ति) - कोणता मोठा आयास आहे - सर्वदेहिनां - सर्व प्राण्यांना - सामान्यतः - समान असल्यामुळे - विषयोपपादनैः - विषयांच्या प्राप्तीने - किं (स्यात्) - काय कार्य होणार ॥ ३८ ॥

रायः - धन - कलत्रं - स्त्री - पशवः - पशु - सुतादयः - पुत्र इत्यादि - गृहाः - घरे - मही - पृथ्वी - अथ - तसेच - कुंजरकोशभूतयः - हत्ती, भांडार व दुसरी ऐश्वर्ये - सर्वे - हे सर्व - चलाः - चंचल - कामाः - भोग - क्षणभंगुरायुषः - क्षणभंगुर आयुष्य असणार्‍या - मर्त्यस्य - मनुष्याचे - कियत् - कोणते - प्रियं - प्रिय - कुर्वेति - करितील ॥ ३९ ॥

एवं - याप्रमाणे - हि - आणखी - क्रतुभिः - यज्ञांनी - कृताः - संपादन केलेले - अमी - हे - लोकाः - स्वर्गादि लोक - क्षयिष्णवः - नाशवंत - (तारतम्येन) सातिशयाः (सन्ति) - आणि परस्परांच्या मानाने श्रेष्ठ होत - निर्मलाः - स्वच्छ - न (सन्ति) - नव्हेत - तस्मात् - याकरिता - आत्मलब्धये - आत्मप्राप्तीकरिता - अदृष्टश्रुतदूषणं - ज्याच्या ठिकाणी दोष कोणी पाहिले नाहीत व ऐकिले नाहीत अशा - परं - श्रेष्ठ - ईशं - ईश्वराला - एकया - अनन्य अशा - भक्त्या - भक्तीने - भजत - भजा ॥ ४० ॥

विद्वन्मानी - स्वतःला पंडित मानणारा - नरः - मनुष्य - इह - इहलोकी - यत् - जे - अध्यर्थ्य - इच्छून - असकृत् - वारंवार - कर्माणि - कर्मे - करोति - करितो - अतः - त्याच्या - विपर्यासं - उलटे - फलं - फळ - अमोघं - मिळवितो ॥ ४१ ॥

इह - इहलोकी - कर्मिणः संकल्पः - कर्मे करण्याची इच्छा - सुखाय - सुखाकरिता - दुःखमोक्षाय च (अस्ति) - आणि दुःखापासून मुक्त होण्याकरिता असते - ईहया - इच्छेमुळे - सदा - सदा - दुखं - दुःखाला - आप्नोति - प्राप्त होतो - अनीहायाः - निरिच्छपणापासून - सुखावृतः भवति - सुखात निमग्न होतो ॥ ४२ ॥

पुरुषः - पुरुष - इह - इहलोकी - यदर्थं - ज्याकरिता - काम्यैः - काम्यकर्मांनी - कामान् - भोग - कामयते - इच्छितो - सः - तो - भंगुरः - नष्ट होणारा - पारक्यः - परक्यांचा - देहः - देह - तु - तर - वै - खरोखर - याति - जातो - च - आणि - उपैति - प्राप्त होतो ॥ ४३ ॥

ममतास्पदाः - माझेपणाची स्थळे अशी - व्यवहितापत्यदारागारधनादयः - देह, अपत्ये, स्त्री, घर, द्रव्य इत्यादि - राज्यं - राज्य - कोशगजामात्यभृत्याप्ताः - भांडार, हत्ती, प्रधान, चाकर व आप्त - (यान्ति इति) किम् उ (वक्तव्यम्) - जातील हे काय सांगितले पाहिजे ॥ ४४ ॥

नित्यानंदमहोदधेः - नित्य आनंदाचा मोठा समुद्र अशा - आत्मनः - आत्म्याला - देहेन सह - देहासह - एतैः - ह्या - तुच्छैः - तुच्छ - नश्वरैः - नाशिवंत - अर्थसंकाशैः - हितकर्त्याप्रमाणे भासणार्‍या अशा - अनर्थैः - अनर्थकारी पदार्थांशी - किं (प्रयोजनम्) - काय करावयाचे आहे ॥ ४५ ॥

असुराः - दैत्य हो - निषेकादिषु - गर्भवासादि - अवस्थासु - अवस्थांमध्ये - क्लिश्यमानस्य - क्लेश पावणार्‍या - देहभृतः - शरीरधारी प्राण्याला - इह - इहलोकी - कर्मभिः - कर्मानी - कियान् - कोणता - स्वार्थः - स्वार्थ आहे तो - निरूप्यतां - सांगावा. ॥ ४६ ॥

देही - शरीरधारी प्राणी - आत्मानुवर्तिनां - मनाच्या धोरणाने वागणार्‍या - देहेन - देहाने - कर्माणि - कर्मे - आरभते - आरंभितो - कर्मभिः - कर्मानी - देहं - देहाला - तनुते - निर्माण करितो - उभयं तु - पण दोन्ही - अविवेकतः (तनुते) - अविवेकानेच करितो. ॥ ४७ ॥

तस्मात् - याकरिता - अर्थाः - अर्थ - च - आणि - धर्माः - धर्म - यदपाश्रयाः (सन्ति) - ज्याच्या आश्रयाने असतात अशा - (तं) आत्मानं - त्या आत्मस्वरूप - अनीहं - निरिच्छ - च - आणि - ईश्वरं - समर्थ अशा श्रीहरीला - अनीहया - निष्कामपणाने - भजत - भजा. ॥ ४८ ॥

ईश्वरः - ईश्वर - हरिः - हरि - स्वकृतैः - स्वतः उत्पन्न केलेल्या - महद्‌भिः भूतैः - पंचमहाभूतांनी - कृतानां - निर्मिलेल्या - सर्वेषां अपि - सगळ्याही - भूतानां - प्राण्यांचा - जीवसंज्ञितः - जीवसंज्ञक - प्रियः - आवडता - आत्मा - आत्मा - ईश्वरः - ईश्वर - हरिः (अस्ति) - हरि होय. ॥ ४९ ॥

देवः - देव - असुरः - असुर - मनुष्यः - मनुष्य - वा - किंवा - यक्षः - यक्ष - च - आणि - गंधर्वः - गंधर्व - एव - सुद्धा - मुकुंदचरणं - परमेश्वराच्या चरणाला - भजन् - भजणारा - स्वस्तिमान् - कल्याण भोगणारा - स्यात् - होतो - यथा वयम् (आस्म) - जसे आम्ही झालो. ॥ ५० ॥

असुरात्मजाः - दैत्यपुत्र हो - मुकुंदस्य - ईश्वराच्या - प्रीणनाय - संतोषाकरिता - द्विजत्वं - ब्राह्मणपणा - देवत्वं - देवपणा - ऋषित्वं - ऋषिपणा - न अलं भवति - पुरा होत नाही - वा - किंवा - वृत्तं - चांगले शील - न (अलम्) - पुरे होत नाही - बहुज्ञता - बहुश्रुतपणा - न (अलम्) - पुरा होत नाही. ॥ ५१ ॥

दानं - दान - न (अलम्) - पुरे होत नाही - तपः - तपश्चर्या - न - नाही - इज्या - यज्ञ - न - नाही - शौचं - पवित्रपणा - न - नाही - च - आणि - व्रतानि - व्रतेही - अमलया - निर्मळ अशा - भक्त्या - भक्तीने - हरिः - परमेश्वर - प्रीयते - संतुष्ट होतो - अन्यत् - दुसर्‍या गोष्टी - विडंबनम् (अस्ति) - सोंगे होत. ॥ ५२ ॥

ततः - म्हणून - दानवाः - दैत्य हो - सर्वभूतात्मनि - सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी अशा - ईश्वरे - समर्थ - भगवति - ऐश्वर्यसंपन्न अशा - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - सर्वत्र - सर्व ठिकाणी - आत्म्यौपम्येन - आत्म्यासारख्या भावनेने - भक्तिं - भक्ति - कुरुत - करा. ॥ ५३ ॥

हि - कारण - दैतेयाः - दैत्य - यक्षरक्षांसि - यक्ष व राक्षस - स्त्रियः - स्त्रिया - शूद्राः - शूद्र - व्रजौकसः - गवळी - खगाः - पक्षी - मृगाः - पशु - पापजीवाः - अनेक पापी जीव - अच्युततां - परमेश्वरस्वरूपाला - गताः - मिळालेले - संति - आहेत. ॥ ५४ ॥

यत् - जी - गोविंदे - परमेश्वराच्या ठिकाणी - एकान्तभक्तिः - अचल भक्ति - सर्वत्र - सर्व ठिकाणी - तदीक्षणं - ईश्वर आहे असे पाहणे - एतावान् एव - हाच - अस्मिन् - ह्या - लोके - लोकी - पुंसः - पुरुषाचा - परः - श्रेष्ठ - स्वार्थः - स्वार्थ - स्मृतः - सांगितला आहे. ॥ ५५ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त

GO TOP