श्रीमद् भागवत महापुराण

षष्ठ स्कंध - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

नारायण कवचाचा उपदेश -

यया गुप्तः सहस्राक्षः सवाहान् रिपुसैनिकान् क्रीडन् इव विनिजिंत्य त्रिलोक्याः श्रियं बुभुजे ज्या नारायणकवचात्मक वैष्णवी विद्येने रक्षिलेला इंद्र वाहनांसह शत्रुसैन्यांना जणू काय लीलेने जिंकून त्रैलोक्याच्या ऐश्वर्याला सेविता झाला ॥ १ ॥

भगवन् येन गुप्तः आततायिनः शत्रून् मृधे यथा अजयत् तत् नारायणात्मकं वर्म मम आख्याहि हे शुकाचार्या ज्या कवचाने रक्षिलेला इंद्र शस्त्र धारण केलेल्या शत्रूंना युद्धात ज्या रीतीने जिंकिता झाला ते नारायणस्वरुपी कवच मला सांग ॥ २ ॥

त्वाष्ट्रं पुरोहितः वृतः अनुपृच्छते महेन्द्राय नारायणाख्यं वर्म आह तत् इह एकमनाः शॄणु त्वष्ट्याचा पुत्र विश्वरुप उपाध्याय वरलेला असा एकामागून एक असे अनेक प्रश्‍न विचारणार्‍या इंद्राला नारायणनामक कवच सांगता झाला ते याठिकाणी सावधानपणाने ऐक ॥ ३ ॥

भये आगते धौताङ्‌घ्रिपाणिः आचम्य सपवित्रः उदङ्मुखः मंत्राभ्यां कृतस्वाङ्‍गकरन्यासः वाग्यतः शुचिः नारायणमयं वर्म सन्‍नह्येत् ओम् नमो नारायणाय इति ओम् कारादीनि पादयोः जानुनोः ऊर्वोः उदरे ह्रदि अथ उरसि मुखे शिरसि आनुपूर्व्यात् विन्यसेत् अथवा विपर्ययम् अपि भय प्राप्त झाले असता पाय व हात धुतले आहेत ज्याने असा आचमन करुन दर्भाचे पवित्रक करंगळीजवळच्या बोटात आहे ज्याच्या असा उत्तरेकडे तोंड आहे ज्याचे असा अष्टाक्षरी व द्वादशाक्षरी अशा दोन मंत्रांनी अंगन्यास व करन्यास केला आहे ज्याने असा मौन धारण केलेला शुद्ध असा नारायणस्वरुपी कवच बांधावे ‘ओम् नमो नारायणाय’अशा मंत्राची ओमकार आदिकरुन आठ अक्षरे दोन पायांच्या ठिकाणी दोन गुडघ्यांच्या ठिकाणी दोन मांड्यांच्या ठिकाणी उदराच्या ठिकाणी ह्रदयाच्या ठिकाणी नंतर वक्षःस्थलाच्या ठिकाणी मुखाच्या ठिकाणी मस्तकाच्या ठिकाणी एकामागून एक अशा क्रमाने स्थापावी किंवा ह्याच्या उलट म्हणजे मस्तकापासून पायापर्यंत सुद्धा न्यास केला तरी चालेल ॥ ४-६ ॥

ततः द्वादशाक्षरविद्यया अङ्गुल्यङ्गुष्ठपर्वसु प्रणवादि यकारान्तम् करन्यासं कुर्यात् नंतर द्वादशाक्षरी मंत्राच्या विद्येने बोटे व अंगठ्यांची पेरे याठिकाणी ओम् ह्या प्रणवापासून शेवटच्या य ह्या अक्षरापर्यंतच्या प्रत्येक अक्षराने करन्यास करावा ॥ ७ ॥

ओम् विष्णवे नमः इति ओम्‌कारं ह्रदयेन्यसेत् अनु विकारं मूर्धनि षकारं भ्रुवोर्मध्ये णकारं शिखया दिशेत् वेकारं नेत्रयोः नकारं सर्वसन्धिषु युञ्‍ज्यात् सविसर्गं फडन्तं तत् मकारं अस्त्रं उद्‍दिश्य सर्वदिक्षु विनिर्दिशेत् बुधः मंत्रमूर्तिः भवेत् ‘ओम् विष्णवे नमः’ह्या मंत्रातील ‘ओम्’ह्या अक्षराच्या ह्रदयाच्या ठिकाणी न्यास करावा त्यानंतर ‘वि’ह्या अक्षराचा मस्तकाच्याठिकाणी ‘ष’ह्या अक्षराचा दोन भुवयांच्या मध्यभागी ‘ण’ह्या अक्षराला शेंडीने दाखवावे ‘वे’ह्या अक्षराला दोन नेत्रांचेठिकाणी ‘न’ह्या अक्षराला सर्व सांध्यांच्याठिकाणी ठेवावे विसर्गासह ज्याच्या शेवटी ‘फट्’हे अक्षर आहे अशा त्या ‘म’ह्या अक्षररुप अस्‍त्राला उद्‍देशून सगळ्या दाही दिशांच्याठिकाणी स्थान दाखवावे ज्ञानी पुरुष मंत्रस्वरुपी होईल ॥ ८-१० ॥

ध्येय षट्शक्तिभिः युतम् परमम् आत्मानम् विद्यातेजस्तपोमूर्तिम् ध्यायेत् इमं मंत्र उदाहरेत् ध्यान करण्यास योग्य सहा शक्तींनी युक्त परमात्मस्वरुपी विद्या, तेज व तप ही ज्याची मूर्ति आहे अशा ध्यान करावे ह्या मंत्राचा पाठ करावा ॥ ११ ॥

ओम् पतगेन्द्रपृष्ठे न्यस्ताङ्घ्रिपद्मः दरारिचर्मासिगदेषुचापपाशान् दधान: अष्टगुणः अष्टबाहुः हरिः मम सर्वरक्षां विदध्यात् प्रणवस्वरुपी गरुडाच्या पाठीवर ज्याने आपले पादकमळ ठेविले असा शंख, चक्र, ढाल, तलवार, गदा, बाण, धनुष्य आणि पाश यांना धारण करणारा अणिमादि आठ गुणांनी युक्त आठ भुजा असणारा नारायण माझे सर्वप्रकारे रक्षण करो ॥ १२ ॥

मत्स्यमूर्तिः यादोगणेभ्यः वरुणस्य पाशात् मां जलेषु रक्षतु मायाबटुवामनः स्थलेषु अव्यात् विश्वरुपः त्रिविक्रमः खे अवतु मत्स्यावतार धारण करणारा भगवान् जलात वावरणार्‍या मत्स्यादि प्राणिसमूहांपासून वरुणाच्या पाशापासून माझे उदकांमध्ये रक्षण करो मायेने बटुवेष घेणारा वामनावतारी परमेश्वर जमिनीवर रक्षण करो सर्व जगात व्यापक स्वरुपाने रहाणारा त्रैलोक्यात पराक्रम गाजविणारा नारायण आकाशांत रक्षण करो ॥ १३ ॥

असुरयूथपारिः प्रभुः नृसिंहः अटव्याजिमुखादिषु दुर्गेषु पायात् यस्य महाट्‍टाहासं विमुञ्‍चतः दिशः विनेदुः च गर्भाः न्यपतन् दैत्याधिपति हिरण्यकशिपूचा शत्रु समर्थ नारसिंहावतारी नारायण अरण्य व युद्धप्रसंग इत्यादि संकटस्थानी रक्षण करो जो नारसिंह मोठा अट्‍टाहास करीत असता दाही दिशा दुमदुमून गेल्या आणि गर्भ पडले ॥ १४ ॥

असौ यज्ञकल्पः स्वदंष्ट्र्या उन्‍नीतधरः वराहः मा अध्वनि रक्षतु रामः अद्रिकूटेषु अथ भरताग्रजः सलक्ष्मणः विप्रवासे अस्मान् अव्यात् हा यज्ञ ज्याच्या अवयवांनी कल्पितात असा आपल्या दाढेने ज्याने पृथ्वीला उचलून धरिले आहे असा वराहावतारी परमेश्वर मला मार्गामध्ये रक्षो परशुराम पर्वतशिखरावर त्याचप्रमाणे भरताचा वडील भाऊ रामचंद्र लक्ष्म्णासह प्रवासामध्ये आमचे रक्षण करो ॥ १५ ॥

नारायणः माम् उग्रधर्मात् अखिलात् प्रमादात् च नरः हासात् पातु योगनाथः दत्तः तु अयोगात् अथ गुणेशः कपिलः कर्मबंधात् पायात् नारायण माझे जारणमारणादि भयंकर धर्मापासून संपूर्ण प्रमादापासून आणि नर गर्वापासून रक्षण करो योगाधिपति दत्त तर योगापासून भ्रष्ट होण्यापासून त्याचप्रमाणे सर्वगुणांचा अधिपति कपिलमहामुनि कर्मबंधनापासून रक्षण करो ॥ १६ ॥

सनत्कुमारः कामदेवात् हयशीर्षा पथि देवहेलनात् मां अवतु देवर्षिवर्यः पुरुषार्चनान्तरात् कूर्मः हरिः अशेषात् निरयात् मां सनत्कुमार मदनापासून हयग्रीव मार्गामध्ये होणार्‍या देवांच्या अवज्ञेपासून माझे रक्षण करो देवर्षिश्रेष्ठ नारद देवपूजेमध्ये उत्पन्‍न होणार्‍या दोषांपासून कूर्मावतारी नारायण संपूर्ण नरकापासून माझे ॥ १७ ॥

भगवान् धन्वन्तरिः अपथ्यात् निजिंतात्मा ऋषभः द्वंद्वात् भयात् पातु च यज्ञः लोकात् बलः जनान्तात् अहींद्रः क्रोधवशात् गणात् अवतात् सवैश्वर्यसंपन्‍न धन्वंतरि कुपथ्यापासून इंद्रियनिग्रही ऋषभ देव शीतोष्णादि द्वंद्वांमुळे होणार्‍या भीतीपासून रक्षण करो आणि यज्ञावतारी नारायण लोकापवादापासून बलराम लोकांपासून होणार्‍या उपाधातापासून शेष क्रोधाच्या स्वाधीन असणार्‍या सर्पसमूहापासून रक्षण करो ॥ १८ ॥

भगवान् द्वैपायनः अप्रबोधात् बुद्धः तु पाखण्डगणात् च प्रमादात् धर्मावनाय उरुकृतावतारः कल्किः कालमलात् कलेः प्रपातु सर्वगुणसंपन्‍न व्यास अज्ञानापासून बुद्ध तर पाखंडी लोकांच्या समूहापासून आणि प्रमादापासून धर्मरक्षणाकरिता ज्याने अवतार घेतला आहे असा कल्किनावाने प्रसिद्ध असणारा नारायण काळाचा मळच की काय अशा कलीपासून रक्षण करो ॥ १९ ॥

केशवः गदया प्रातः आत्तवेणुः गोविंदः आसंगवम् उदात्तशक्तिः नारायणः ग्राहणे अरींद्रपाणिः विष्णुः मध्यांदिने मां अव्यात् केशव गदेने प्रातःकाळी ज्याने वेणूवाद्य स्वीकारिले आहे असा गोविंद आसंगवकाळी मोठी शक्ति धारण करणारा असा नारायण प्राहणकाळामध्ये हातात श्रेष्ठ चक्र धरणारा विष्णु मध्यान्‌हकाळी माझे रक्षण करो ॥ २० ॥

उग्रधन्वा मधुह्य देवः अपराहणे त्रिधामा माधवः सायं मां अवतु हृषीकेशः दोषे उत एकः पद्मनाभः निशीथे अर्धरात्रे अवतु भयंकर धनुष्य धारण करणारा मधुदैत्याला मारणारा देव अपराहणकाळी ब्रह्मादि तीन मूर्ति धारण करणारा लक्ष्मीपति नारायण संध्याकाळी माझे रक्षण करो जितेंद्रिय ईश्वर प्रदोषकाळी आणि एकटा ज्याच्या नाभिस्थानी कमळ आहे असा नारायण आवशीस मध्यरात्री रक्षण करो ॥ २१ ॥

श्रीवत्सधामा ईशः अपररात्रे असिधरः ईशः जनार्दनः प्रत्यूषे दामोदरः प्रभाते भगवान् कालमूर्तिः विश्वेश्वरः अनुसंध्य अव्यात् श्रीवत्सलांछन धारण करणारा परमेश्वर अपररात्री तलवार धरणारा परमेश्वर जनार्दन प्रत्यूषकाळी दामोदर प्रभातकाळी सर्वगुणसंपन्‍न काळरुपी जगत्पति नारायण प्रत्येक संधिकाळामध्ये रक्षण करो ॥ २२ ॥

युगान्तानलतिग्मनेमि भगवत्प्रयुक्तं समन्तात् भ्रमत् चक्रं यथा वातसखः हुताशः कक्षं (दहति तथा) आशु अरिसैन्यं दन्दग्धि दन्दग्धि प्रलयकाळाच्या अग्‍नीप्रमाणे प्रखर धावा असणारे भगवंताने प्रेरिले असता सभोवार फिरत रहाणारे सुदर्शन चक्र ज्याप्रमाणे वायूने प्रज्वलित झालेला अग्‍नि गवताला जाळतो त्याप्रमाणे लवकर शत्रुसैन्याला अत्यंत जाळून टाकिते ॥ २३ ॥

अशनिस्पर्शन विस्फुलिङ्‍गे गदे अजितप्रिया असि कूष्माण्डवैनायकयक्षर क्षोभूतग्रहान् निष्पिण्डि निष्पिण्डि च अरीन् चूर्णय चूर्णय जिच्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राच्या स्पर्शाप्रमाणे आहे अशा हे गदे भगवंताला आवडणारी अशी तू आहेस कूष्मांड, वैनायक, यक्ष, राक्षस, भूत आणि ग्रह यांचे अगदी लवकर चूर्ण कर चूर्ण कर आणि शत्रूंचे चूर्ण कर चूर्ण कर ॥ २४ ॥

दरेन्द्र कृष्णपूरितः भीमस्वनः त्वं अरेः ह्रदयानि कंपयन् यातुधानप्रमथप्रेतमातृपिशाचविप्रग्रहघोरदृष्टीन् विद्रावय हे श्रेष्ठ शंखा भगवंताने वायुपुराण करुन वाजविलेला भयंकर शब्द करणारा तू शत्रूंच्या ह्रदयांना कंपित करीत यातुधान, प्रमथ, प्रेत, मातृगण, पिशाच, ब्रह्मराक्षस व भयंकर दृष्टीचे प्राणि यांना पळवून लाव ॥ २५ ॥

तिग्मधार असिवर ईशाप्रयुक्तः त्वं मम अरिसैन्यम् छिन्धि छिन्धि शतचन्द्र चर्मन् अघोनां द्विषां चक्षूषि छादय पापचक्षुषां हर तीक्ष्ण धार असणार्‍या हे श्रेष्ठ खड्गा नारायणाने प्रेरिलेला तू माझ्या शत्रुसैन्याचा लवकर छेद कर छेद कर ज्याच्यावर चंद्राकृति शंभर मंडले आहेत अशा हे ढाले पापी शत्रूंच्या नेत्रांना आच्छादून टाक पापदृष्टि पुरुषांना हरण कर ॥ २६ ॥

यत् ग्रहेभ्यः केतुभ्यः च नृभ्यः एव सरीसृपेभ्यः दंष्ट्रिभ्यः भूतेभ्यः वा अहोभ्यः एव नः भयं अभूत् ज्या ग्रहांपासून केतूपासून आणि मनुष्यांपासूनसुद्धा सापांपासून दाढा असणार्‍या व्याघ्रादि क्रूर प्राण्यांपासून भूतांपासून किंवा पापी पुरुषांपासूनहि आम्हाला भीति उत्पन्‍न झाली आहे ॥ २७ ॥

ये नः श्रेयः प्रतीपकाः सर्वाणि एतानि भगवन्‍नामरुपास्त्रकीर्तनात् सद्यः संक्षयं प्रयान्तु जे आमच्या कल्याणाचा नाश करणारे सर्व जे घातुक प्राणी ते भगवंताची नावे, रुपे व शस्‍त्रात्रे यांच्या कीर्तनाने तत्काळ नाशाला प्राप्त होवोत ॥ २८ ॥

भगवान् स्तोत्रस्तोभः छंदोमयः प्रभुः गरुडः विष्वक्सेनः स्वनामभिः अशेषकृच्छ्रेभ्यः रक्षतु सर्वगुणसंपन्‍न स्तोत्राने स्तविलेला वेदमूर्ति समर्थ गरुड विष्वक्सेननामक मुख्य पार्षदासह आपल्या नावानी सर्व संकटांपासून रक्षण करो ॥ २९ ॥

हरेः नामरुपयानायुधानि पार्षदभूषणाः नः बुद्धीन्द्रियमनः प्राणान् सर्वापद्‍भ्यः पान्तु भगवंताची नावे, स्वरुपे, वाहने व आयुधे मुख्यमुख्य सेवकगण आमच्या बुद्धि, इंद्रिये, मन व प्राण ह्यांना संपूर्ण आपत्तीपासून रक्षण करोत ॥ ३० ॥

यथा हि यत् सत् च असत् (तत्) सर्व वस्तुतः भगवान् एव अनेन सत्येन नः सर्वे उपद्रवाः नाशं यान्तु ज्याअर्थी खरोखर जे सद्रूप आणि असद्रूप ते सर्व काही वास्तविक परमेश्वरच होय ह्या सत्याने आमचे सर्व उपद्रव नाश पावोत ॥ ३१ ॥

यथा ऐकात्म्यानुभावानां स्वयं विकल्परहितः स्वमायया भूषणा युधलिङ्‍गाख्याः शक्तीः धत्ते ज्याप्रमाणे एकरुप आत्मस्वरुपाचे चिंतन करणार्‍या पुरुषांना स्वतः ईश्वर भेदभावरहित असा आपल्या मायेने भूषणे, आयुधे, मूर्ति व नावे ह्या शक्तीना धारण करितो ॥ ३२ ॥

तेन एव सत्यमानेन सर्वज्ञः भगवान् हरिः सदा सर्वत्र सर्वगः सर्वैः स्वरुपैः नः पातु त्याच सत्यभूत प्रमाणाने सर्व काही जाणणारा सर्वैश्वर्यसंपन्‍न नारायण नेहमी सर्वठिकाणी सर्वप्रकारे गमन करणारा असा सर्व स्वरुपांनी आमचे रक्षण करो ॥ ३३ ॥

भगवान् नारसिंहः स्वतेजसा ग्रस्तसमस्ततेजाः स्वनेन दिक्षु विदिक्षु उर्ध्वं अधः समन्तात् अंतः बहिः लोकभयं प्रह्यपयन् सर्वगुणसंपन्‍न नारसिंह आपल्या तेजाने ज्याने संपूर्ण तेजे गिळून टाकिली आहेत असा आपल्या गर्जनेने दिशांच्या ठिकाणी उपदिशांच्या ठिकाणी वरती खाली सभोवती आत बाहेर लोकांच्या भीतीला नष्ट करणारा ॥ ३४ ॥

मघवन् इदं नारायणात्मकम् वर्म आख्यात येन दंशितः (त्वम्) असुरयूथपान् अजसा विजेष्यसि हे इंद्रा हे नारायणस्वरुपी कवच सांगितले आहे ज्याने कवचयुक्त झालेला तू दैत्याधिपती अश शत्रूंना तत्काळ जिंकशील ॥ ३५ ॥

एतत् धारयमाणः तु चक्षुषा यं यं पश्यति वा पदा संस्पृशेत् सः सद्यः साध्वसात् विमुच्यते ह्या कवचाला धारण करणारा पुरुष तर नेत्राने ज्या ज्या पुरुषाकडे पाहतो अथवा पायाने स्पर्श करितो तो पुरुष तत्काळ भयापासून मुक्त होतो ॥ ३६ ॥

विद्यां धारयतः तस्य राजदस्युग्रहादिभ्यः च व्याघ्रादिभ्यः कुतश्‍चित् कहिंचित् भयं न भवेत् ह्या नारायणकवचात्मक विद्येला धारण करणार्‍या त्या पुरुषाला राजे, चोर व ग्रह इत्यादिकांपासून आणि व्याघ्रादि क्रूर प्राण्यांपासून कोठूनहि कधीहि भिती होणार नाही ॥ ३७ ॥

पुरा कश्‍चित् कौशिकः सः द्विजः इमां विद्यां धारवन् योगधारणया मरुधन्वनि स्वाङ्‍गं जहौ पूर्वी कोणी एक कौशिकनावाचा तो ब्राह्मण ह्या नारायणकवचात्मक विद्येला धारण करुन योगधारणेने निर्जल प्रदेशामध्ये स्वतःच्या शरीराला टाकिता झाला ॥ ३८ ॥

एकदा गंधर्वपतिः चित्ररथः स्‍त्रीभिः वृतः यत्र द्विजक्षयः (अभवत्) तस्य उपरि विमानेन ययौ एके दिवशी गंधर्वाचा राजा चित्ररथ स्‍त्रियांसह ज्याठिकाणी कौशिक ब्राह्मणाचा देहत्याग झाला त्याच्यावरील आकाशातून विमानात बसून प्राप्त झाला ॥ ३९ ॥

सद्यः सः सविमानः अवाक्शिराः गगनात् हि न्यपतत् विस्मितः वालखिल्यवचनात् अस्थीनि आदाय प्राचीसरस्वत्यां प्रास्य स्‍नात्वा अनु स्वं धाम अगात् तत्काळ तो चित्ररथ गंधर्व विमानासह खाली मस्तक करुन आकाशातून खरोखर पडला आश्‍चर्यचकित होऊन वालखिल्यांच्या भाषणावरुन कौशिकब्राह्मणाच्या अस्थींना घेऊन पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये टाकून स्‍नान करुन नंतर स्वतःच्या गंधर्वलोकाला गेला ॥ ४० ॥

यः काले इअदं शॄणुयात् च यः आदृतः धारयति तं भूतानि नमस्यन्ति सर्वतः भयात् (सः) मुच्यते जो योग्यकाळी ह्या नारायणकवचाला श्रवण करील आणि जो सत्कारपूर्वक धारण करील त्याला सर्व लोक वंदन करितील संपूर्ण भयापासून तो मुक्त होईल ॥ ४१ ॥

शतक्रतुः विश्वरुपात् एतां विद्यां अधिगतः असुरान् मृधे विनिजिंत्य त्रैलोक्यलक्ष्मी बुभुजे इंद्र विश्वरुपापासून ह्या नारायणकवचात्मक विद्येला मिळवून दैत्यांना युद्धात जिंकून त्रैलोक्यातील ऐश्वर्याला उपभोगिता झाला ॥ ४२ ॥

षष्ठ स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त

GO TOP