॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण २ रे ॥

॥ स्वानुभवदृतिकरण म्हणजे प्रशंसा कथन ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥



तंव सखी स्वानुभूतीची ॥ तुर्या पातली निजाची ॥
तिया प्रबोधीं लाहे ज्याची ॥ तो योगिराज ॥ १ ॥
श्रीगणेशायनम:- मग स्वानुभूतीची (स्वरूपानुभवाची) मैत्रीण जी निजावस्था - तुर्या ती प्राप्त झाली. त्या आत्मानुभवांत (वर सांगितलेल्या-पूर्वप्रकरणीं सांगितलेल्या) ज्याची अशी अवस्था होते, तो योग्यांचा राणा होय. १
झाले नेत्राचें उन्मीलन ॥ उठिलें अंतःकरण ॥
परी अनुभवाचें अवतरण ॥ तें न वचेचि ॥ २ ॥
नेत्र उन्मीलित झाले; अंतकरणाचीही उठावणी झाली; परंतु ( हृदयांत) जी अनुभवाची जागृति झाली, ती जाईचना. २
इंद्रियें कीं रचियेलीं ॥ परी तयांची धांव मोडिली ॥
पुनरपि बुचकळली ॥ तये आनंदजळीं ॥ ३ ॥
इंद्रियें ठिकाणावर आली खरी, पण त्यांची धांवच मोडली; आणि ती पुन्हां त्या आनंदाच्या पुरांत बुडवली गेली. ३
जैसें भागले ढोर ॥ पावे सुरवाडिक बिढार ॥
तेथूनि उठवितां थोर ॥ अंगचि पाली ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे एखादे थकलेलें गुरूं, चांगली सुखकर अशी जागा पाहून बसतें, आणि तेथून उठवू लागले असतां अगदी घालून द्यावयास लागते, ४
तैसी तापत्रयें तापलीं ॥ इंद्रिये ब्रह्मानंदें निवालीं ॥
स्वविषयीं म- पर्सली ॥ न प्रवर्ततीच ॥ ५ ॥
त्याचप्रमाणे त्रिविधतापानें पोळलेली इंद्रियें ब्रह्मानंदाने शांत झाली; आणि त्यांना आपआपल्या विषयांत प्रवृत्त करूं गेले तरी तीं स्बविषयास प्रवृत्त होईचनात. ५
मग शिष्य वाडवेळ ॥ लाहूनि इंद्रियाचें बळ ॥
गुरुतें वाचा बरळ ॥ विनवीत असे ॥ ६ ॥
नंतर शिष्य बर्‍याच वेळानें इंद्रिये जेमतेम ठिकाणावर आणून-वेड्यावांकड्या भाषेने गुरूस विनंति करूं लागला. ६
उठिला आनंदभरित ॥ गुरूसी प्रदक्षिणा करित ॥
चरणांवरी मस्तक ठेवित ॥ वेळोवेळां ॥ ७ ॥
आनंदाच्या भरांतच उठला, आणि वरचेवर गुरूला प्रदक्षिणा घालू लागला व वारंवार चरणांवर मस्तक ठेवू लागला. ७
मन प्रेमरसे भरले ॥ दोन्ही करसंपुट जोडिले ॥
मग कांहीं एक बोलणे आरंभिले ॥ सिष्यराज ॥ ८ ॥
मन प्रेमरसानें भरून गेलं; दोन्ही करसंपुटें जोडली; आणि त्या शिष्यराजानें थोडथोडी भाषणास सुरवात केली. ८
जयजयाजी अनाथवंधु ॥ जयजयाजी करुणासिंधु ॥
तुमचा महिमा प्रसिद्धु ॥ राजयोगिया ॥ ९ ॥
हे अनाथांच्या बंधो ! हे करुणेच्या समुद्रा ! आपला जयजयकार असो. हे राजयोगिन् ! आपला महिमा प्रसिद्धच आहे. ९
जे अनादि हारवले ॥ मीं मजचि होते चोरिलें ॥
ते माते भेटविले ॥ श्रीगरुरायें ॥ १० ॥
जें अनादिकालापासून हरवलेले, जे माझे मलाच चोरलेले होते, त्याची मला श्रीगुरुराजांनीं भेट करून दिली. १०
तुझिया कृपादृष्टी ॥ जाली मज अपरोक्ष वस्तूसी भेटी ॥
उपमा नाही सृष्टीं ॥ तया महासुखाची ॥ ११ ॥
महाराज ! आपल्या कृपादृष्टीने मला अपरोक्ष वस्तूचे दर्शन क्षाले. त्या महासुखाला त्या वृष्टीमध्ये उपमाच नाही ! ११
तुझिया उपकारा ॥ उत्तीर्ण नव्हेगा दातारा ॥
अर्पिजेति संभूतिसंभारा ॥ नानावस्तु ॥ १२ ॥
हे दातारा ! नाना प्रकारच्या वस्तु - नव्हे सृष्ट वस्तूंचे दीगच्या ढीग जरी आपणांस अर्पण केल तरी आपल्या उपकाराची फेड व्हावयाची नाही. १२
ब्रह्म कालत्रयी अबाधीत ॥ नानावस्तु त्या नाशिवंत ॥
तेणें होय उत्तीर्णत्व ॥ ऐसे केवि घडें ॥ १३ ॥
कारण ब्रह्म (खरी वस्तु) हे तिन्ही काळी अविनाशी - ज्याला कधीही विकार नाहीं - असे आहे. आणि इतर ज्या नानाप्रकारच्या वस्तु आहेत त्या सर्व नाशिवंत आहेत. तेव्हां त्यांनी उपकाराची फेड कशी काय होणार ? १३
एकें दिधला कल्पतरू ॥ तयासी दीजे दर्पणींचा हारू ॥
तेणें तोकाय गव्हारु ॥ उत्तीर्ण होईल ॥ १४ ॥
एकाला एकानें कल्पवृक्ष दिला म्हणून त्याला आरशांतला हार देऊं लागला तर सशाने मूर्ख त्याच्या उपकाराची कशी काय फेड करणार ? १४
चितामणीचियासाठीं ॥ देईजे फुकटी काचवटी ॥
तया उत्तीर्णपणाच्या गोष्टी ॥ काय करू येतील ॥ १५ ॥
कोणी चिंतामणि दिला म्हणून त्याच्या उपकाराच्या फेडीदाखल फुटकी-फुटणारी अशाश्वत कांच देऊं लागले तर ते उतराई होणे काय कामाचे बरे ? १५
अहंतेचें काविरे ॥ जयाचिया दृष्टी उतरे ॥
तया सद्‌गुरूसी उत्तीर्ण चतुरे ॥ कैंचें होइजे ॥ १६ ॥
ज्याच्या दृष्टीस अहंकाराषें पिसे लागलेले आहे, तो शहाणा सद्‌गुरूचा कसा काय उतराई होणार ? १६
पशूसी सिंहाभिधान ॥ रंकाशी राणेपण ॥
जिवासि शिवण ॥ गुरूचेनि प्रसादे ॥ १७ ॥
श्रीगुरूंच्या प्रसादाने पशूला सिंहाचे पद, रंकाला राज्यश्री आणि जीवाला शिंवपण प्राप्त होते. १७
म्हणोनि तनुमनधन ॥ गुरूसी कीजे समर्पण ॥
तरीच होइजे उत्तीर्ण ॥ कांहीं एक ॥ १८ ॥
म्हणून सारे तनमनधनच जेव्हां श्रीगुरूला समर्पण करावें तेव्हांच कांहीं उतराई होतां आलें तर येईल. १८
अहो भक्तिभाव गुरुवर्या ॥ हे नेणोनि जो प्राणिया ॥
गुरूसी न भजे तो ऋणिया ॥ जाय अधोगती ॥ १९ ॥
अहो ! गुरुराजांना भक्तिभावच पाहिजे. परंतु हे न जाणून जो प्राणी गुरूला भजत नाही, तो ऋणकरी अधोगतीलाच जावयाचा ! १९
नाशिवंत हे उपचार ॥ गुरूसी वंचिती जे नर ॥
ते पाहुणे होती अविचार ॥ रवरवाचे ॥ २० ॥
अशा नाशिवंत उपचारांनी जे गुरूला ठकवितात ते मूर्ख पुरुष रौरवाचे पाहुणे होत. २०
आतां असो हे याही अविद्या ॥ हेळाचि फेडिली सद्या ॥
जी भवरोगवैद्या ॥ श्रीगुरुराया ॥ २१ ॥
असो. आतां हे पुरे. परंतु महाराज ! हे श्रीगुरुराया ! हे संसाररूप रोग निवारण करणार्‍या वैद्यराजा ! आपण आतांच्या आतां एका क्षणांत माझी अविद्या - माझे अज्ञान पार नाहीसे केलेत ! (ही गोष्ट खरी) २१
भवरोगे मी वेष्टिलो ॥ देहप्रमाणे रोडेलों ॥
तो तुवां उपचारिलों ॥ निकियापरी ॥ २२ ॥
मी संसाररूप रोगाने अगदी बेजार झालो होतो, देह हेच प्रमाण मानून, किंवा देहाएवढा - रोडेजलो होतो, पण त्या मला आपण फारच उत्तम प्रकारचे उपचार केलेत. २२
अर्धमात्रा ब्रह्मरसें ॥ मातें उपचारिलें कैसें ॥
ब्रह्मगोळ कोंदतु असे ॥ माझेनि पुष्टपणें ॥ २३ ॥
ब्रह्माच्या रसामध्यें अर्धमात्रा देऊन मला जो काय उपचार केलात तो काय सांगावा ? त्यानें मला अशी कांहीं पुष्टता आली की, त्या पुष्टतेनें सारें ब्राह्मांड कोंदून राहिलें आहे. २३
कवण एकाचिया मरणा ॥ आड घालिती साधुजना ॥
तयाचिया उपकारा उत्तीर्णा ॥ तेणें केवीं होइजे ॥ २४ ॥
साधुजन एखाद्याचे मरणच चुकवितात, तेव्हां त्या त्याच्या उपकाराला त्यानें कशाने उतराई व्हावें. २४
जन्ममरणांचिया कोडी ॥ चुकती जयाचिया प्रौढी ॥
तया गुरुदास्याची गोडी ॥ अनुपम्य कीं ॥ २५ ॥
आणि ज्याच्या महिम्याने कोटीच्या कोटी जन्ममरणें चुकतात त्या गुरूच्या दास्याची गोडी काय सांगावी ? केवळ अनुपमच २५
गुरुकृपेचे फळलेपण ॥ हेचि तेथेचि जाणा खूण ॥
जें नीच नवें प्रेमलक्षण ॥ गुरुदास्याविषयीं ॥ २६ ॥
गुरुकृपेची प्राति हीच त्याची खूण समजावी. तेथें गुरुदास्याविषयीं प्रेमलक्षण नित्य नवें असते. २६
मंत्रयंत्रादि उपदेशिते ॥ गुरुघरोघरीं असती आइते ॥
परी संसार महादुःखातें ॥ फेडूं न शकती ॥ २७ ॥
मंत्र यंत्र इत्यादिकांचा उपदेश करणारे गुरु घरोघरीं हवे तितके, आयते तयार आहेत. परंतु संसाररूप महादुःखाचे निवारण कांहीं त्यांच्यानें होणार नाही. २७
म्हणोनि दुलभ श्रीगुरू ॥ जो परब्रह्मेंसी करी साक्षात्कारू ॥
जयाचिये दृष्टिहेळाचि संसारू ॥ निरसोनि जाय ॥ २८ ॥
म्हणून श्रीगुरु हे दुर्लभ होत. ज्यांच्या कृपाकटाक्षानें एका क्षणांत संसाराचा निरास होतो; आणि जे परब्रह्माचा साक्षात्कार करून देतात. २८
आतां कैवल्याचा दानी ॥ तूंचि एक त्रिभुवनीं ॥
संसारदैन्य जयाचेनी ॥ देशधडी होय ॥ २९ ॥
तर महाराज, आपणच एक ह्या सबंध त्रिभुवनात कैवल्याचे दाते आहां कीं ज्याच्या योगाने संसाराचे दारिद्र देशोधडीस लागतें; २९
संसारदुःख विसरलो ॥ मी महासुखें निवालों ॥
तुमचा अनुग्रहो पावलों ॥ म्हणोनी जी ॥ ३० ॥
महाराज, मला आपला अनुग्रह झाला, म्हणूनच मी महासुखानें शांत झालो व मला संसारदुःखाचा विसर पडला. ३०
आतां राउळें ऐसें करावें ॥ तें सुख मागुतें मज द्यावे ॥
तेंचि होवोनि असावें ॥ म्यां निरंतर ॥ ३१ ॥
आतां गुरुमहाराजांनीं एवढे करावें की, ते सुख मला फिरून द्यावे आणि मीं निरंतर तेंच होऊन रहावे ३१
तें सुख किमात्मक ॥ कैसें जाणावे म्यां सम्यक ॥
तरी जी कृपापूर्वक ॥ मज निरूपावे ॥ ३२ ॥
तर महाराज ! ते सुख कशाप्रकारचें आहे ! ते मीं यथाथरीतीनैं कसें जाणावे ! हे मला कृपा करून सांगा. ३२
ऐसी प्रार्थना ऐकोन ॥ श्रीगुरु तोचि कामधेनु ।!
दुभे वोरसे दाटून ॥ शिष्यवत्सासी ॥ । ३३ ॥
ही प्रार्थना ऐकून श्रीगुरु हीच कोणी एक कामधेनु तिला पान्हा दाटला आणि ती शिष्यरूप वत्साला पाजूं लागली. ३३
मग तो काय बोलिला योगींद्रु ॥ बारे तूं पूर्णचंद्रु ॥
तुवां माझा बोधसमुद्रु ॥ कैसा उल्हासविलासी ॥ ३४ ॥
मग ते योगिराज म्हणाले बाबारे ! तूं पूर्णचंद्र आहेस. तूं माझ्या बोधसमुद्राला कशी भरती आणलीस म्हणून सांगू ! ३४
तुझिया गुणगणनेसी ॥ उपमा नाहीं कोणासी ॥
तरी बोलिजेल ते निजमानसीं ॥ दृढ धरावें ॥ ३५ ॥
तुझ्या गुणांच्या गणनेला कोणतीच उपमा नाही. तर आतां सांगण्यांत येईल ते नीटपणे आपल्या ध्यानांत ठेव. ३५
तुज महासुख लाधलें ॥ जे गुरुदास्य फळलें ॥
जें अनुभवासी आले ॥ परब्रह्म ॥ ३६ ॥
तुझे गुरुदास्य फळास आलें म्हणून तुला महासुखाचा लाभ झाला आणि परब्रह्माचा अनुभव घडला. ३६
जेथें मनासी नाहीं सौरसु ॥ वाचेशीं नाहीं प्रवेशु ॥
तो भेटला स्वयंप्रकाशु ॥ ब्रह्मानंदु ॥ ३७ ॥
जेथला रसास्वाद मनाला कधी ठाऊक नाही, वाचेचा जेथे रिघाव होत नाही, जो स्वयंप्रकाश, तो ब्रह्मानंद आज तुला भेटला. ३७
जें स्थूल ना रोड ॥ ठेंगणें ना वाड ॥
तें महासुख गोड ॥ ईश्वररूप ॥ ३८ ॥
जे स्थूळही नाहीं वा बारीकही नाही; ठेंगणेही नाही व उंचही नाही. ते मधुर असे महासुख म्हणजे ईश्वरस्वरूपच होय. ३८
जे परब्रह्म अखंड ॥ बोलतां वेदासि कुवाड ॥
तें अनुभवितां होय काबाड ॥ विषयसुख पैं॥ ३९ ॥
ज्या अखंड परब्रह्माचे वर्णन करतांना चारी वेदांना कोडे पडले, तेंच अनुभवास आल्यावर त्यापुढे विषयसुखाची मातब्बरी ती काय ! ३९
जेथें निद्रा ना जागणें ॥ करणें ना भोगणें ॥
तया सुखासी चाखणें आपणचि ॥ ४० ॥
जेथे झोपही नाही व जागेपणही नाही; करणेंही नाही व भोगणेही नाही; त्या सुखास चाखणार आपला आपणच! ४०
मी तूं हे कडसणी ॥ जेथें नाही काळीं कवणीं ॥
तिये परम निर्वाणीं लीन झालासी तूं ॥ ४१ ॥
जेथे कोणत्याही काळी 'मी' 'तूं' पणा हा भेद नाही, त्या परम निर्वाणाच्या ठिकाणी तूं लीन झालास. ४१
कल्पनेचें आभाळ ॥ जेथें विरालें एकवेळ ॥
ते चिदाकाश निर्मळ ॥ तुज प्रकाजशिलें ॥ ४२ ॥
जेथे एकेच वेळी कल्पनेचें आभाळ पार वितळून गेलें. ते निर्मळ असे चिदाकाश तुजपुढे प्रकाशमान झाले. ४२
हे महावाक्याचे रहस्य ॥ जे जीवेश्वरांचें सामरस्य ॥
जेणें उपजे वैरस्य । संसारसुखाचे ॥ ४३ ॥
हेच महावाक्याचें रहस्य होय, की जे जीव व ईश्वर यांचे सामरस्य किंवा ऐक्य, जेणेंकरून संसारसुखाचा विरसपणा मनांत बाणतो. ४३
हाचि शिवशक्तीचा समयोगू ॥ यातेंच बोलिजे राजयोगू ॥
जेणें फिटे भवरोगू ॥ हेळामात्रे ॥ ४४ ॥
आणि हाच शिवशक्तीचा समयोग होय. ह्यालाच राजयोग असे नांव आहे. जेणेंकरून क्षणमात्रांत संसाराची व्याधि निर्भूळ होते. ४४
हे निर्विकल्पसमाधी ॥ भवरोगा दिव्य औषधी ॥
जेणें तुटे आथिव्याधि ॥ विषयाची पै ॥ ४५ ॥
निर्विकल्प समावि हीच. हीच संसाररूप रोगावरची दिव्य औषधी की जिच्या योगाने विषयाचीही पण आधिव्याधि नाहीशी होते. ४५
हाचि तुज अलभ्य लाभ जाहला ॥ जो परमात्मा भेटला ॥
क्षण एकु सुकाळु जाला ॥ महासुखाचा ॥ ४६ ॥
हाच अलभ्य लाभ तुला झाला, जेणेंकरून तुला परमात्म्याची भेट झाली, आणि क्षणभर महासुखाचा सुकाळ होऊन गेला. ४६
ऐसी हे ब्रह्मस्थिति ॥ येथे मज व्हावी दृढ मती ॥
एसी तुझी चित्तवृत्ति ॥ तरी अवधारिजे ॥ ४७ ॥
अशा प्रकारची जी ही ब्रह्मस्थिति तेथे आपली बुद्धि दृढ व्हावी असा भाव तुझ्या चित्तांत आला आहे, तर ऐक. ४७
ये विषयीं असे उपावो ॥ जेणें होय स्वरूपीं सद्‌भावो ॥
तोचि धरी येरू मांडी वावो ॥ मिथ्याभ्रमु ॥ ४८ ॥
तर ह्याला एकच उपाय आहे. तो हा कीं, स्वरूपाच्या ठिकाणी सद्‌भावना तीच धरावी. इतर मिथ्या भ्रम व्यर्थ आहे, तो टाकून द्यावा. ४८
व्हावी विषयीं विरक्ती ॥ चित्तासी प्रत्यक्‌वृत्ती ॥
करावी ईश्वरभक्ती ॥ अनन्यभावें ॥ ४९ ॥
विषयाच्या ठिकाणी विरक्ति धरावी, चित्ताची प्रत्यक् वृत्ति करावी, आणि अनन्यभावेंकरून ईश्वरभक्ति करावी. ४९
जो श्रीगुरूचा अनुग्रहीत ॥ तेणें सेवावा एकांत ॥
तेथे चिंतावा गुणातीत ॥ परमपुरुप ॥ ५० ॥
ज्याच्यावर श्रीगुरूचा अनुग्रह झाला, त्याने एकांतवास सेवन करावा. आणि तेथे त्या गुणातीत पुरुषाचे चिंतन करावें. ५०
जे जे वृत्ती उठी ॥ ते ते देखिजे वेगळाली दिठी ॥
तरी कल्पना हिंपुटी ॥ होऊनि मुरे ५१ ॥
जी जी वृत्ति उठेल ती ती निराळ्याच दृष्टीने पहावी सणजे कल्पना बापुडवाणी होऊन जिरून जाईल. ५१
मनासरिसें धावता ॥ न तुटे संसारव्यथा ॥
तेणेंसि वेगळें होतां ॥ महासुख ॥५२॥
मनाबरोबर धांवू लागले म्हणजे संसारव्यथा संपावयाची नाही; आपण त्याच्यापासून वेगळें झालो सणजे महासुख ठेवलेले आहे. ५२
जो जो विषय आठवेल ॥ तो तो मिथ्यात्वें विदारिजेल ॥
तरी सहजचि उपजेला ॥ सुलीनता ॥ ५३ ॥
जो जो विषय मनांत येईल तो तो मिथ्या म्हणून जर आपण त्याचा भेद करीत गेला तर आपोआपच सुलीनता प्राप्त होईल. ५३
म्हणोनि जो संकल्प उठी ॥ नव जावें तयापाठी ॥
वळावी मागुती दृष्टी ॥ निरालंबीं ॥ ५४ ॥
म्हणून संकल्प उठला कीं, त्याच्या पाठीमागे न जातां दृष्टि माघारी, निरालंबस्वरूपाकडे वळवावी. ५४
तें निरालंब निर्गुण ॥ जिवाचें जन्मस्थान ॥
म्हणूनि व्हावें लीन ॥ तेथेंचि पै ॥ ५५ ॥
ते निरालंब आणि निर्गुणस्वरूप हेंच जिवाचें जन्मस्थान आहे, म्हणून तेथेच लीन व्हावे. ५५
मी ब्रह्म येणें आकारे ॥ ब्रह्मरूप स्फूर्तिस्फुरे ॥
तें विचारितां तत्त्व निर्धारें ॥ उठे निरालंबीं ॥ ५६ ॥
मी ब्रह्म ह्या भावनेने ब्रह्मरूप स्फुरण होऊं लागते. त्याचा तत्त्वनिश्चयेंकरून विचार केला म्हणजे तें निरालंब स्वरूपामध्येंच उठलेले असते असे कळून येते. ५६
आपुलिये जन्मभूमिके ॥ वस्ती बहुतें पुण्ये ठाके ॥
तेथें निमिजे तरी चुके ॥ अधःपतन ॥ ५७ ॥
आपल्या जन्मस्थानीं बहुत पुण्याईने आपलें वास्तव्य घडते. तेथे आपणास विश्रांति मिळाली म्हणजे अधोगति चुकते. ५७
देहाचे जन्मभूमिकेचें ॥ एवढें महिमान साचें ॥
तरी जन्मस्थान जिवाचें ॥ तें अगाध महिमान कीं ॥ ५८ ॥
देहाच्या जन्मस्थानाचा जर खरोखर एवढा महिना आहे तर जीवाच्या जन्मस्थानाचा महिमा अगाधच असला पाहिजे. ५८
नद्या उगमीं स्थिरावती ॥ तरी तेचि समुद्र होती ॥
आधार कां नव्हती ॥ आणिका नदींसी ॥ ५९ ॥
नद्या उगमाच्या ठिकाणीच जर स्थिर झाल्या असला तर त्याच समुद्र झाल्या असत्या. आणि मग त्या इतर नद्यांनाही आधार झाल्या नसत्या काय ? ५९
तैसा आपुला उगवु ॥ जरी न सोडिता जीवु ॥
तरी अंगासि येता थोरावु ॥ ब्रह्मपणाचा ॥ ६० ॥
त्याचप्रमाणे त्या जीवाने जर आपला उगम सोडला नसता तर ब्रह्मत्वाचा महिमा त्याच्या अंगी सहज आला असता. ६०
म्हणूनि कल्पनेसी मारू ॥ करावा इंद्रियांचा संहारू ॥
तरी जीवब्रह्मासी सिनारू ॥ कैचा उरे ॥ ६१ ॥
म्हणून कल्पना मारली, आणि इंद्रिये होती कां नव्हती अशी करून टाकलीं म्हणजे मग जीव व ब्रह्म ह्यांत भेद कसा उरेल ? ६१
अनुभवाची एक खूण ॥ जेणें प्रपंचासी होय संहारण ॥
तेथींची विवंचना सांगेन ॥ ते ऐक पा तूं ॥ ६२ ॥
जी अनुभवाची खूण, जिच्या योगाने प्रपंचाचें निर्मूळ होते, तेथचा विचार आतां तुला सांगतो. तो तूं ऐक. ६२
स्वरूपोन्मुख स्फुरण ॥ हें मायेचें लक्षण ॥
अविद्या तें जाण ॥ विपरीत कल्पना ॥ ६३ ॥
स्वरूपाविषयी पराङ्‌मुखवृत्ति हेच मायेचे लक्षण होय. आणि विपरीत कल्पना ती अविद्या होय. ६३
मनचक्षुरादिकें ॥ इंद्रियें ही अनेकें ॥
तीं सुखदुःखदायकें ॥ अविद्याजनितें ॥ ६४ ॥
मन, चतु आदिकरून जी ही अनेक इंद्रियें तींच सुख व दुःख देणारी होत. तीच लोकांतली अविद्या होय. ६४
म्हणूनि कल्पनेच्या ग्रासीं ॥ नासे माया अविद्येशीं ॥
तेथें संहार इंद्रियांसी ॥ आपैसें होय ॥ ६५ ॥
म्हणून कल्पनेचाच ग्रास केला कीं अविद्येसहवर्तमान माया आटोपली ! आणि मग इंद्रियांचाही आपोआपच संहार होतो. ६५
जैसें पाणीचोराच्या द्वारी ॥ वरील रंध्र दाटिजे जरी ॥
येरें मोकळीच परी ॥ धरावी न लगती ॥ ६६ ॥
ज्याप्रमाणे पाणीचोरनामक पात्राच्या अनेक द्वारांपैकी फक्त वरचे रंध्र (द्वार) बण्द केले म्हणजे बाकीची जरी मोकळी असली तरी तीं बंद करावा लागत नाहींत. (तीं बंद न करतांच आतील पाणी सोडावयाचे बंद हेते.) ६६
तैसी कल्पना विराली ॥ तेथेंथ संसृति निमाली ॥
येथे आक्षेपीं स्फुरलीं ॥ मज युक्ति एक ॥ ६७ ॥
त्याचप्रमाणें कल्पना नाहींशी झाली कीं, संसारही सुटला म्हणून समजावे. आतां येथे मला एक आक्षेपाची कल्पना मुचली आहे. ६७
सुषुप्तीअवस्थे कल्पना ॥ निःशेष होय लीना ॥
तरी जीवाचे संसारणा ॥ कां न चुके ची ॥ ६८ ॥
( ती ही की,) निद्रावस्थेमध्येही कल्पना अगदि लीन झालेली असते. मग त्याने जिवाचा संसार कां चुकत नाही ? ६८
ऐशा आक्षेपीं उत्तर ॥ बोलिजेल सुंदर ॥
तें ऐक तूं चतुर ॥ जेणे संदेह फिटे ॥ ६९ ॥
त्या आक्षेपावर आतां सुरेख उत्तर देण्यांत येईल. तरी दहे चतुर पुरुषा ! ते तूं श्रवण कर. त्याच्या योगाने तुझा संशय फिटेल. ६९
जीवासी सुषुप्तीदशे ॥ कल्पना कीर नसे ॥
परी अज्ञान न निरसे ॥ तेणे संसृती होय ॥ ७० ॥
निद्रादशेंत जीवाला कल्पना म्हणून खरोखर नसते खरी; पण अज्ञान कांही गेलेले नसते. म्हणून पुन्हां संसार आलाच ! ७०.
सुषुप्ती आत्मा नेणिजे ॥ तैसेचि होऊनी असिजे ॥
तेथेंचि स्वानुभव बोलिजे ॥ कवणेपरी ॥ ७१ ॥
झोपेंमध्ये आत्म्याचें अज्ञान असते तें तसेंच्या तसेच असते. त्यालाच 'स्वानुभव' असे कसे म्हणावे ? ७१
आत्मविषयीं अज्ञान ॥ जंववरी नव्हे क्षीण ॥
तंव न चुके जन्ममरण ॥ जीवासी पैं ॥ ७२ ॥
आत्मविषयक अज्ञान जोपर्यंत क्षीण झाले नाहीं, तोपर्यंत जीवाला जन्ममरण कांहीं चुकावयाचें नाही. ७२
श्रीगुरूचेनि कृपाभरें ॥ फिटे अज्ञान भुररे ॥
मग सच्चिदानंद उरे ॥ परब्रह्म तें ॥ ७३ ॥
परंतु श्रीगुरूंच्या अतुल कृपेने अज्ञानाचे वारे पार निघून जाते; आणि मग केवळ तें सच्चिदानंदस्वरूप परब्रह्मच राहतें. ७३
सुषुप्तीकाळीं कल्पना ॥ अज्ञानामाजी होय लीना ॥
तेणे अज्ञानेशीं जाणा ॥ वर्ते आत्मयासी ॥ ७४ ॥
निद्राकाळी कल्पनाही अज्ञानामध्ये लीन होते; आणि अज्ञानासहवर्तमान ती आत्म्याच्या ठिकाणी असते हें ध्यानांत ठेव. ७४
तेथें अज्ञान न मरे ॥ म्हणूनि संसार न सरे ॥
तरी आक्षेपाची उत्तरे ॥ निरर्थकचि ॥ ७५ ॥
तेथे अज्ञान हे कांही लयांस जात नाही, म्हणून संसारही सुटत नाही. ह्यास्तव आक्षेपाची उत्तरें सुद्धां निरर्थकच होत. ७५
जीवां हक्षजाती ॥ निरंतर वर्ते सुषप्ती ॥
तेथें कल्पनेसी वस्ती ॥ अज्ञानगभीं ॥ ७६ ॥
जीवांस आणि वृक्षजातांससुद्धां झोप ही नेहमीच आहे. आणि तेथें अज्ञानाच्या गर्भांत, पोटांत कल्पनेची वस्ती असते. ७६
अनुभवाची खूण ॥ ते अनारिसी जाण ॥
तेथे अज्ञानसहित कल्पना ॥ विरे स्वस्वरुपीं ॥ ७७ ॥
अनुभवाची खूण ती निराळीच आहे. तेथे कल्पना ही अज्ञानासहवर्तमान स्वरूपामध्ये लीन होते. ७७
श्रीगुरूचें उपदेशें ॥ अज्ञान मरे आपैसें ॥
तेथें परब्रह्म प्रकाशे ॥ कल्पनातीत ॥ ७८ ॥
श्रीगुरूच्या कृपेनें, बोधाने अज्ञान आपोआप नाश पावते, आणि तेथे कल्पनांतीत परब्रह्म प्रकाशमान होतें. ७८
अनुभवाचिया भूम्रिका ॥ चारी गा शिष्य टिळका ॥
सांगिजेती त्या ऐका ॥ एकाग्र होऊनी ॥ ७९ ॥
हे शिष्यतिलका, अनुभवाच्या चारी भूमिका आतां सांगण्यांत येतील, त्या एकाग्र मन करून ऐक. ७९
प्रथम जाण विक्षेपता ॥ दुसरी ते गतायाता ।
तिसरी ते संश्लिष्टता ॥ चौथी सुलीनता प्राप्तदशेची ॥ ८० ॥
पहिली 'विक्षेषता’ हे लक्षांत असू दे. दुसरी 'गतायाता' होय. तिसरी 'संश्विष्टता;' आणि चौथी प्राप्तदशेची 'सुलीनता' होय. ८०
करितां ब्रह्याभ्यासु ॥ चित्तासी होय स्वरूपी सौरसु ॥
ते सांडूनि करी हव्यासु ॥ सांसारिक ॥ ८१ ॥
ब्रह्माचा अभ्यास करूं लागले म्हणजे चित्ताला स्वरूपाची गोडी लागते, ते टाकून देऊन सांसारिक असतो तो मध्येच हव्यासांत पडतो. ८१
मग सावध होईजे ॥ चित्तासी मागुती वळविजे ॥
ब्रह्माभ्यास कीजे ॥ ते विक्षेपता पैं ॥ ८२ ॥
मग सावध होऊन चित्ताला माघारें वळवावयाचे आणि ब्रह्माभ्यास करावयाचा हीच विक्षेपतां होय. ८२
गतायाता ते ऐशी ॥ चित्तस्वरूपीं समरसी ॥
तेथूनि उठे परी आपैसीं ॥ बैसे स्वरूपीं ॥ ८३ ॥
'गतायाता' ती अशी - चित्तस्वरूपाच्या ठिकाणीं समरस, अगदी एकवट लीन करावयाचे, ते तेथून चळतें खरे, पण पुन्हां आपोआपच स्वरूपी रूपी लागते. ८३
मन स्वरूपी लाविजे ॥ तेणें तेथेंचि असिजे ॥
आनंदे फुंजों लागिजे ॥ ते संश्लिष्टता पै ॥ ८४ ॥
मन स्वरूपी लावावयाचे, आणि ते तेथेंच ठेवावयाचे म्हणजे ते आनंदने (स्वरूपानंदाने) उसख्या खाऊ लागते. हीच संश्लिष्टता होय. ८४
ब्रह्मीं चित्त निःशेष मुरे ॥ केवळ ज्ञप्तिचि उरे ॥
सुखाचा फुंज उतरे ॥ ते सुलीनदशा ॥ ८५ ॥
ब्रह्मामध्ये चित्त पूर्णपणे लीन होते केवळ ज्ञप्तिमात्र उरते, आणि त्या सुखाची, आनंदाची उसळ जिरून जाते. तीच सुलीनावस्था. ८५
ऐसा ब्रह्माभ्यासकरितां ॥ भूमिका जाणवती समस्ता ॥
मग अनायासें तत्त्वता ॥ पावे योगिराज ॥ ८६॥
अशाप्रकारे ब्रह्माम्यास करूं लागलें म्हणजे सर्व भूमिकांचे ज्ञान होते. मग योगिराज अनायासेंच तत्त्वाला जाऊन पोंचतो. ८६
अथवा इंद्रियें कां मारावीं ॥ जेथें धांवती तेथेंचि धरावीं ॥
सुलीनता पावावी ॥ रोकडीची ॥ ८७ ॥
अथवा इंद्रिये तरी कां मारावी, ती जेथें जेथें जातील तेथें तेथेंच त्यांस धरून ठेवावीत, म्हणजे तरी रोकडीच सुलीनता प्राप्त होईल. ८७
ना तीं इंद्रियें ना ते विषय सुखें ॥ तेथे कवण कवणाते देखे ॥
चित्त मुरे मग ओळखे ॥ कवणकवणातें ॥ ८८ ॥
तेथें इंद्रियांचेही नांव नाही, व विषयसुखाचेंही नांव नाही, तेथे कोण कोणाला पाहणार ? चित्तच मुळीं मुरून गेल्यावर मग कोणी कोणाला ओळखावयाचें ? ८८
मंदमतीचिया आक्षेपा ॥ हा प्रस्ताव सांगितला बापा ॥
येरासि कायसें पा ॥ सायाम हो ॥ ८९ ॥
बाबा ! मंदबुद्धीच्या आक्षेपासाठी हा एवढा प्रस्ताव करावा लागला. इतरांना येवढे सायास कशाला पाहिजेत ? ८९
आतां असो हा प्रसंगु ॥ तुज निरोपिला राजयोगु ॥
हे स्मरे तो चांगु ॥ बहुतांमध्ये ॥ ९० ॥
असो. आतां हा प्रसंग परे. तुला जो हा राजयोग सांगितला, हा जो ध्यानांत धरील तो बहुत लोकांमध्ये उत्तम म्हणून समजावा. ९०
निमिषोन्मेषाचें अर्ध ॥ चितत्त स्वरूपीं होय सावध ॥
तरी पापराशी होती दग्ध ॥ क्षणमात्रें ॥ ९१ ॥
जर, पात्यास पाते लागते न लाग इतक्या अल्प वेळाइतकी जरी मनाला स्वरूपाचे ठिकाणी जागृति घडली तर क्षणमात्रांत सर्व पापांच्या राशी दग्ध होतात. ९१
जैसे स्वप्नीं घडे दुरित ॥ तें प्रबोधीं होय भस्मभूत ॥
तैसें निजबोधें समस्त ॥ पातक जळे ॥ ९२ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नांत पातक घडले तर- जागृतावस्थेंत ते भस्मीभूत होते, त्याचप्रमाणे आत्मबोधानें सर्व पातक जळून खाक होते. ९२
चित्त अवलंवनेंवीण ॥ जरी न राहे स्थिरपण ॥
तरी देवाचें सगुण ॥ स्वरूप चिंतावें ॥ ९३ ॥
चित्त जर आश्रयाशिवाय स्थिर रहातच नसेल तर देवाच्या सगुण रूपाचे चितन करावें. ९३
तेथें हृदयाच्या शेजारी ॥ षोडशोपचारें पूजा करी ॥
उपासावा श्रीहरी ॥ अनन्यभावें ॥ ९४ ॥
तेथे अंतःकरणाच्या शेजेवर पोडशशोपचारपूर्वक पूजन करून अनन्यभावाने श्रीहरीची उपासना करायी. ९४
रजस्तमीं जें मैळ ॥ तें चित्त वेगें होय निर्मळ ॥
मग निर्गुणीं भक्ती प्रबळ ॥ आपसयां होय ॥ ९५ ॥
रजोगुण आणि तमोगुण जेव्हां धुवून जातील, तेव्हांच चित्त झपाट्यानें निर्मळ होईल. आणि मग निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी आपोआपच प्रबळ भक्ति उत्पन्न होईल. ९५
निर्गुणीं परमपुरुषीं ॥ जीवा ऐक्य होय शेखीं ॥
तये महासुखीं समरसे तो ॥५६॥
शेवटी त्या निर्गुण परम पुरुषाच्या ठिकाणीं जीव ऐक्य पावतो आणि तो त्या महासुखामध्यें समरस, अगदी एकवट होऊन राहतो. ९६
नानरी अष्टांगयोगॅ ॥ कां भक्तिप्रसंगे ॥
जीव परमात्मासंगें ॥ तदात्मता पावें ॥ ९७ ॥
किंवा अष्टांगयोगेंकरून अथवा भक्तीच्या बळाने जीव व परमात्मा ह्यांची भेट होऊन तो तादात्म्य पावतो. ९७
तंव शिष्यें विनविजे ॥ जीवनशब्दें काय बोलिजे ॥
ब्रह्म हें नांव ठेविजे ॥ कवणासी जी ॥ ९८ ॥
तेव्हां शिष्य विनवू लागला की, महाराज ! जीव काय समजावयाचे ! बस कशाला म्हणावयाचे ? ९८
परमात्मा तो कवण ॥ सगुण कीं निर्गुण ॥
तो कैसा किं लक्षण ॥ सांगावे जी ॥ ९९ ॥
परमात्मा तो कोण ? तो सगुण आहे कां निर्गुण आहे ? महाराज ! तो कसा आहे ? व त्याचे लक्षण काय ? ते कथन करावे. ९९
माया ते कवण शक्ति ॥ तियेसी कैसी स्वरूपस्थिती ॥
अविद्येची कैसी रीती ॥ किमाश्रय ते ॥ १०० ॥
माया ही कसली शक्ति आहे ? तिचे स्वरूप व स्थिति कशी आहे ? अविद्या प्रकार काय ? आणि तिला आश्रय कोणाचा ? १००
प्रपंच कवणें निर्मिला ॥ कासयाचा उभारला ॥
जीवासी संसार नाथिला ॥ किं निमित्त जी ॥ १०१ ॥
प्रपंच कोणी केला ? आणि त्याची उभारणी कशी झाली ? तसेच महाराज ! जीवाच्या मागे हा नसताच संसार काय म्हणून ? १०१
जी हे पथ निरूपावे ॥ माझे मनोरथ पुरवावे ॥
मातें सर्वज्ञ करावें ॥ कृपानिधी ॥ १०२ ॥
महाराज ! ह्या प्रश्नांचे निरूपण करून माझे मनोरथ पूर्ण करावे, आणि हे कृपानिधे ! मला सर्वज्ञ करून सोडावे. १०२
ऐसी शिष्याची विनंती ॥ ऐकोनि श्रीगुरू काय बोलती ॥
श्रोतीं अवधारावें चित्ती ॥ म्हणे मुकुदराज ॥ १०३ ॥
मुकुंदराज म्हणतात अशी शिष्याची विनंति ऐकून पुढे श्रीगुरु काय म्हणाले तिकडे श्रोत्यांनी चित्त द्यावे. १०३
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
स्वानुभवादृतिकरणं नाम द्वितीयप्रकरणं समासं ॥

GO TOP