शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(३५१) सत् ब्रह्म/आत्मा आणि असत्/मिथ्या विश्व इत्यादी यांचा संपर्क घडला असता प्रमाता या रूपात बुद्धी कार्य करते -

अयोऽग्नि-योगादिव सत्-समन्वयान्मात्रादि-रूपेण विजृंभते धीः ।
तत्कार्यमेतद् द्वितयं यतो मृषा दृष्टं भ्रम-स्वप्न-मनोरथेषु ॥ ३५१ ॥
अग्नीशी संबंध झाल्यामुळे लोखंड हे (अग्नी बनते, त्याप्रमाणे) सत् (अशा ब्रह्मा) शी संबंध आल्यामुळे, बुद्धी ही ज्ञाता इत्यादी रूपांत प्रगट होते. त्या (बुद्धी) चे हे द्वैतरूप(द्वितय) कार्य हे मिथ्या आहे. (आणि ते मिथ्यात्व हे) श्रम, स्वप्न आणि मनोरथ यांमध्ये दिसून येते.


अग्नीशी संयोग झाल्यामुळे लोखंड हे ठिणगी इत्यादी रूपात प्रगट होते. त्याप्रमाणे सत् अशा ब्रह्माशी/आत्माशी संबंध आल्यावर बुद्धी ही दोन रूपांत प्रगट होते. तिचे हे कार्य श्रम, स्वप्न व मनोरथ यांमध्ये मिथ्या असलेले दिसून येते. 'द्वितयं 'शब्दाऐवजी 'त्रितयं 'असा पाठभेद आहे. त्रितय म्हणजे येथे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान या तीन गोष्टी.

आत्म्याचा बुद्धीशी संयोग म्हणजे आत्म्याचे बुद्धीत प्रतिबिंब पडणे होय. तसे झाले की अहंकार प्रगट होतो. तो लाता होतो म्हणून बुद्धी ही ज्ञाता या रूपात प्रगट होते असे येथे म्हटले आहे. अहंकार ज्ञाता झाला की त्याला देह, बाह्य विषय इत्यादी ज्ञेय होतात. म्हणजे बुद्धीच अहंकाराचे द्वारा ज्ञाता आणि ज्ञेय या स्वरूपात प्रगट होते. पण बुद्धीचे हे कार्य मिथ्या आहे. प्रत्यक्षात अहंकार हा ज्ञाताही नाही आणि देह इत्यादी हे ज्ञेयही नाहीत, ते खोटे आहेत. भ्रमामध्ये ज्ञाता व ज्ञेय (उदा., दिग्र- श्रम), स्वप्नातील ज्ञाता व ज्ञेय, आणि कल्पनेतील (मनोरथ) ज्ञाता आणि ज्ञेय हे मिथ्याच असतात.

येथे 'धी' म्हणजे मन म्हणजे अविद्या (श्लोक १७१ पहा) असा अर्थ घ्यावयास हवा. अविद्या ही विश्वाचा आभास करते आणि बुद्धीतील अहंकार ज्ञाता बनतो आणि विश्व हे ज्ञेय आणि अहंकार हा ज्ञाता असे द्वैत चिर्माण होते; ते सर्व मिथ्या आहे.


(३५२) विश्व इत्यादी मिथ्या आहेत; कारण ते क्षणिक आहेत -

तो विकाराः प्रकृतेरहंमुखा देहावसाना विषयाश्च सर्वे ।
क्षणेऽन्यथा-भावितया ह्यमीषामसत्त्वमात्मा तु कदापि नान्यथा ॥ ३५२ ॥
म्हणून अहंकारापासून देहापर्यंतचे सर्व पदार्थ तसेच सर्व विषय हे प्रकृतीचे विकार क्षणोक्षणी बदलत असल्यामुळे मिथ्या आहेत (असत्त्व); आत्मा त्यापेक्षा वेगळा (अन्यथा) असल्याने तो कधीही असते होत नाही.


येथे 'प्रकृति 'म्हणजे अविद्या. अविद्येपासून होणारे विश्वातील सर्व विषय, देहापासून अहंकारापर्यंतचे सर्व विकार हे मिथ्या आहेत. याचे एक कारण येथे सांगितले आहे. हे विकार क्षणोक्षणी बदलत असतात आणि जे बदलते ते सत्य नसते, ते असत् असते, मिथ्या असते. शंकराचार्यांनी अन्यत्र सत् आणि असत् यांची व्याख्या अशी दिली आहे - यद् व्यभिचरति तद् असत्य, यद् न व्यभिचरति तत् सत्यम् । (जे बदलते ते असत्य/खोटे असते; जे बदलत नाही, ते सत्याखरे असते.) सर्व विश्व बदलणारे आहे; म्हणून ते असत्/खोटे आहे. आत्मा तसा बदलत नाही; म्हणून तो असत् नसून सत् आहे.


(३५३) जो आत्मा सत्/सत्य आहे, त्याचे स्वरूप असे आहे -

नित्याद्वयाखंड-विवेक-रूपो बुद्ध्यादि-साक्षी सदसद्-विलक्षणः ।
अहं-पद-प्रत्यय-लक्षितार्थः प्रत्यक् सदानंद-घनः परात्मा ॥ ३५३ ॥
परमात्मा हा नित्य, अद्वय (अथवा – नित्य अद्वय), अखंड, चैतन्य हे एकच स्वरूप असणारा, बुद्धी इत्यादींचा साक्षी, सत् आणि असत् यांपेक्षा वेगळा, अहं या शब्दाच्या ज्ञानाने लक्षित होणारा, प्रत्यक् सदा आनंदघन (किंवा सत् आणि आनंदधन) असा आहे.


अविद्या विक्षेपित प्रपंच हा अनित्य आहे. आत्मा मात्र नित्य आहे; म्हणजे तो तीनही काळांत असतो. त्याच्या जोडीने दुसरे सत्य तत्त्व नसल्याने तो अद्वय, अद्वितीय, एकमेव एक आहे. तो अखंड म्हणजे निरवयव आहे अथवा अखंड म्हणजे त्रिविध भेदरहित असे चैतन्य हे त्याचे एकच स्वरूप आहे. परमात्माच देहात प्रत्यगात्मा आहे; तेथे तो बुद्धी मन इत्यादींचा साक्षी आहे. तो सदसद्विलक्षण आहे म्हणजे तो अविद्येप्रमाणे सदसद्-विलक्षण नाही, तर या जगात आपण जे सत् आणि असत् असे म्हणतो, त्यापेक्षा तो वेगळा आहे किंवा - सत् म्हणजे चांगले, असत् म्हणजे बाईट, त्या दोहोंपेक्षा वेगळा असणारा अथवा - सत् म्हणजे स्थूल आणि असत् म्हणजे सूक्ष्म, आत्मा हा स्थूल व सूक्ष्म यापेक्षा निराळा आहे. सत् म्हणजे कारण आणि असत् म्हणजे कार्य; आत्मा हा कार्य व कारण यांपेक्षा) भिन्न आहे.

जेव्हा जेव्हा आपण 'मी' (अहं) असे म्हणतो तेव्हा तेव्हा हा 'मी' देह इत्यादीपेक्षा भिन्न आहे असे कळते, पण ते वाच्यार्थाने कळत नाही, तर लक्ष्यार्थाने कळते. म्हणून आत्मा हा 'मी' या पदाच्या वाच्यार्थानंतर कळणाऱ्या लक्ष्यार्थाने कळून येणारा आहे. हा परमात्मा देह या उपाधीत असल्याने तो प्रत्यक् म्हणजे आंतर म्हणजे प्रत्यगात्मा/अंतरात्मा आहे.

आत्मा हा नेहमी (सदा) आनंदरूप आहे. येथे सत्+आनंद असे घेतले तर आत्मा हा सत् (= अस्तित्वरूप) आणि आनंदघन आहे.


(३५४) ब्रह्म साक्षात्कार होण्यास निर्विकल्प समाधी साधणे आवश्यक आहे. तिचे वर्णन यापुढे श्लोक ३५४-३६७ मध्ये आहे.

इत्थं विपश्चित् सदसद् विभज्य निश्चित्य तत्त्वं निज-बोध-दृष्ट्या ।
ज्ञात्वा स्वमात्मानमखंडबोधं तेभ्यो विमुक्तः स्वयमेव शाम्यति ॥३५४॥
अशाप्रकारे सत् आणि असत् वस्तू वेगळेपणाने जाणून, स्वतःला झालेल्या (गुरु -) बोधाच्या दृष्टीने (आत्मा हे एकमेव सत्य) तत्त्व आहे असा निश्चय करून, आपण स्वतःच प्रत्यग आत्मा आहे आणि तो अखंड ज्ञानस्वरूप आहे. हे जाणल्यावर, आणि मग त्या पदार्थ मधून संपूर्णपणे मुक्त झालेला असा शहाणा मुमुक्षू स्वतःच शांत होतो.


आत्मा सत् आहे आणि अनात्मा असत्/मिथ्या आहे, असा त्या दोहोंतील भेद प्रथम जाणून घ्यावयास हवा. मग गुरूच्या उपदेशाप्रमाणे फक्त आत्मा हे एकच सत्यतत्त्व आहे असा निश्चय व्हावयास हवा. याचा अर्थ असा की, आपण स्वतःच अखंड ज्ञानस्वरूप प्रत्यगात्मा आहोत, हे जाणून घ्यावयास हवे. हे सर्व करणारा शहाणा मुमुक्षू असत्/मिथ्या/अनात्म पदार्थांतून बाजूला होऊन, तो स्वतःच मनाने शांत होतो. म्हणजे सर्व तत्त्वज्ञान कळल्याने आता त्याचे मन शांत होते. म्हणजे अनात्म पदार्थामुळे होणारे सुख-दुःख त्याला जाणवत नसल्यामुळे तो मनात शांत होतो.


(३५५) निर्विकल्प समाधीने सर्व अज्ञान व त्याचे कार्य यांचा नाश होतो -

अज्ञान-हृदय-ग्रथेर्निःशेष-विलयस्तदा ।
समाधिना विकल्पेन यदाद्वैतात्म-दर्शनम् ॥ ३५५ ॥
निर्विकल्प समाधीच्या योगाने जेव्हा अद्वैत आत्म्याचे दर्शन (साक्षात्कार) होते, तेव्हा हृदयातील अज्ञानरूपी ग्रंथीचा संपूर्ण लय होतो.


अज्ञानामुळे विश्वाचा अध्यास झाला. मनात संकल्पविकल्प उत् लागले आणि त्यामुळे मोहात पडून माणूस संसार-सागरात बुडाला. आत्मा हा अद्वैत आहे; तेथे संकल्प-विकल्प नाहीत. मनातले हे संकल्पविकल्प संपून मन हे आत्म्याप्रमाणे संकल्पविकल्परहित झाले आणि ते निर्विकल्प ब्रह्माशी एकरूप झाले की तीच निर्विकल्प समाधी म्हणजे आत्म्याशी एकरूपता. ही निर्विकल्प स्थिती साधणे म्हणजे निर्विकल्प समाधी साधणे होय. या समाधीत आत्म्याचा साक्षात्कार होतो. प्रत्यगात्मा हा परमात्म्यात मिळून गेला. हे साधले की अज्ञानाने निर्माण झालेली चिदचिद्-ग्रंथी म्हणजे आत्मा आणि अनात्मा यांचा संपर्क तुटून जातो आणि तो मुमुक्षू संपूर्णपणे अज्ञानरहित होतो.


(३५६) निर्विकल्प समाधीत काय होते, ते आता सांगितले आहे -

त्वमहमिदमितीयं कल्पना बुद्धि-दोषात् प्रभवति परमात्मन्यद्वये निर्विशेषे ।
प्रबिलयति समाधावस्य सर्वो विकल्पो विलयनमुपगच्छेद् बस्तु-तत्त्वावधृत्या ॥ ३५६ ॥
अद्वय आणि निर्विशेष अशा परमात्म्याचे ठायी बुद्धीच्या दोषामुळे 'तू', 'मी' आणि 'हे' अशाप्रकारची कल्पना उत्पन्न होते. जेव्हा (निर्विकल्प) समाधी ही (आत्म्यामुळे) विलसू लागते, तेव्हा (आत्मा / ब्रह्म या) वस्तूच्या सत्य स्वरूपाचा निश्चय झाल्यामुळे (अवधृत्या), या (मुमुक्षाचे सर्व विकल्प लयाला जातात.


अविद्येमुळे विश्वाचा अध्यास होतो. या अध्यासात मन, बुद्धी इत्यादी निर्माण होतात. नेहमीच्या व्यवहारात आत्मा या तत्त्वाचे ज्ञान बुद्धीला होत नाही. मग अहंकारामुळे 'मी' ची जाणीव, मीच्या जाणीवेमुळे 'तू' ची जाणीव असे मुळात नसलेले द्वैत उत्पन्न होते. तसेच बाह्य विश्वाचा जो पसारा सभोवती दिसतो त्याला ती बुद्धी 'हे' (= विश्व) असे म्हणू लागते आणि हे सर्व काही अद्वैत परमात्म्यावर अज्ञानाने होणाऱ्या अध्यासामुळे घडते. पण नंतर 'आत्मा/ब्रह्म' ही एकच सत्य वस्तू/तत्त्व आहे आणि बाकी भासणारे सर्व काही मिथ्या आहे हे कळून आले की निर्विकल्प समाधीत मुमुक्षूचे सर्व विकल्प लयाला जातात. त्या समाधीत 'मी', 'तू', 'हे जग' यातील कशाचेही भान उरत नाही.


(३५७) निर्विकल्प समाधी साधणारा मुमुक्षू असा असतो --

शांतो दांतो परमुपरतः क्षांति-युक्तः समाधिं
कुर्वन्नित्यं कलयति यतिः स्वस्य सर्वात्म-भावम् ।
तेनाविद्या-तिमिर-जनितान् साधु दग्ध्वा विकल्पान्
ब्रह्माकृत्या निवसति सुखं निष्क्रियो निर्विकल्पः ॥ ३५७ ॥
शांत (= शमयुक्त), इंद्रिय संयमी (दांत), अतिशय उपरती असणारा, क्षमेने युक्त (-द्वंद्वे सहन करणारा), नित्य समाधी साधणारा, असा संयमी (यति) मुमुक्षू हा आपल्या स्वतःच्या सर्वात्मभाव स्वरूपाचा अनुभव घेतो- (कलयति) आणि त्या अनुभवाच्या ज्ञानाच्या योगाने (तेन) अविद्यारूपी अंधकारातून उत्पन्न झालेले (सर्व) विकल्प जाळून टाकून आणि स्वतः क्रियारहित आणि विकल्परहित होऊन तो ब्रह्मस्वरूपाने सुखात राहतो.


शमयुक्त (शांत), दांत (इंद्रिय-संयमी) इत्यादी शमादि-षट्कोनयुक्त असणारा मुमुक्षू हाच निर्विकल्प समाधी साधण्याचा प्रयत्न करू शकतो. निर्विकल्प समाधीत तो त्या त्या गुणांनी युक्त असतोच, या समाधीत त्याला कळते की आपले स्वरूप हेच आत्म्याचे स्वरूप आहे आणि ते सर्व-व्यापक आहे; आणि त्याचा अनुभव त्याला येतो. हा अनुभव त्याला आला की त्याच्या मनातील अज्ञान जन्य असे सर्व संकल्प-विकल्प जळून जातात म्हणजे नष्ट होतात. तसे झाले की तो निर्विकल्प आणि क्रियारहित होतो आणि मग तो त्या ब्रह्माशी/आत्म्याशी एकरूप झालेल्या स्थितीत सुखाने राहतो.


(३५८) जो कोणी सर्वांचा लय आत्म्यामध्ये करतो तोच संसाराच्या बंधनातून मुक्त होतो.

समाहिता ये प्रतिलाप्य बाह्यं श्रोत्रादि चेतः स्वमहं चिदात्मनि ।
त एव मुक्ता भव-पाशबंधर्नान्ये तु पारोक्ष्य-कथाभिधायिनः ॥ ३५८ ॥
श्रोत्र इत्यादी इंद्रिये, मन, अहंकार या बाह्य वस्तूंचा चिदात्म्यात लय करून जे निर्विकल्प समाधी साधतात तेच संसाराच्या पाशाच्या बंधातून मुक्त होतात. परोक्षपणे गोष्टी सांगणारे इतर लोक हे मुक्त होत नाहीत.


निर्विकल्प समाधीत इंद्रिये, मन इत्यादींचा लय झालेला असतो. मुमुक्ष हा चैतन्यरूप आत्माच झालेला असतो; तोच संसाराच्या बंधातून सुटतो. जे कोणी स्वतः आत्मसाक्षात्कारी नसतात पण तोंडाने फक्त म्हणतात की सर्व काही आत्मा आहे, ते मात्र मुक्त होत नाहीत.


(३५९) उपाधी आली की भेद निर्माण होतो. उपाधी बाजूला गेली की केवळ आपण स्वतः म्हणजे केवळ आत्मा उरतो. म्हणून उपाधीच्या निरसनासाठी निर्विकल्प समाधी साधणे आवश्यक आहे.

उपाधि-भेदात् स्वयमेव भिद्यते चोपाध्यपोहे स्वयमेव केवलः ।
तस्मादुपाधेर्विलयाय विद्वान् वसेत् सदाकल्प-समाधि निष्ठया ॥ ३५९ ॥
उपाधींच्या भेदांमुळे आत्मा हा स्वतःच भिन्न भिन्न रूपांनी भासू लागतो. उपाधी दूर झाल्या की तो स्वतःच एकटा उरतो, म्हणून उपाधींचा निरास करण्यासाठी शहाण्या ममक्षने नेहमी निर्विकल्प समाधीत ठाण मांडून बसावयास हवे.


'अविद्या समष्टी' आणि 'अज्ञान-व्यष्टी' या उपाधींनी एकच आत्मा हा ईश्वर, सूत्रात्मा, विराट, विश्व, तेजस, प्राज्ञ इत्यादी भिन्न स्वरूपात भास लागतो. (प्रस्तावना पहा) पण उपाधींचा निरास झाल्यावर एकमेव आत्मा उरतो आणि निर्विकल्प समाधीत त्याच्याशी एकरूप व्हावयाचे असते. म्हणून उपाधींचा नाश करण्यासाठी मुमुक्षूने सतत निर्विकल्प समाधीत रहावयास हवे.


(३६०) निर्विकल्प समाधीत ब्रह्मभाव प्राप्त होतो यासाठी उदाहरण -

सति सक्तो नरो याति सद्-भावं ह्येक-निष्ठया ।
कीटको भ्रमरं ध्यायन् भ्रमरत्वाय कल्पते ॥ ३६० ॥
(निर्विकल्प समाधीत) सत् (ब्रह्मा) चे ठायी आसक्त झालेला पुरुष सत् ब्रह्माच्या निष्ठेमुळे सत् (ब्रह्मा) चा भाव प्राप्त करून घेतो, जसेः - भ्रमराचे ध्यान करणारा कीटक शेवटी भ्रमर होण्यास पात्र ठरतो (भ्रमर होऊन जातो).


निर्विकल्प समाधीत फक्त ब्रह्माचा ध्यास आहे. त्यामुळे मुमुक्षू ब्रह्मरूप होऊन जातो. याला उदाहरण भंगी-कीटक आहे. एखादा भ्रमर किड्याला पकडून आणतो. पण त्याला लगेच खात नाही. मधल्या काळात त्या किड्याला फक्त भ्रमराचा ध्यास लागतो. परिणामतः त्याचा कीटक-भाव संपून जातो आणि तो स्वतःच भ्रमर होऊन जातो.


(३६१) वरील भ्रमर-कीटक दृष्टांताचा अधिक खुलासा असा -

क्रियांतरासक्तिमपास्य कीटको ध्यायनलित्वं ह्यलिभावमृच्छति ।
तथैव योगी परमात्म-तत्त्वं ध्यात्वा समायाति तदेकनिष्ठया ॥ ३६१ ॥
(भ्रमराचे ध्यान करण्याखेरीज) इतर क्रियांत रममाण न होता, फक्त (भ्रमराचेच) ध्यान करणारा कीटक भ्रमराचा भाव प्राप्त करून घेतो. त्याप्रमाणेच परमात्म-तत्त्वाचे ध्यान/ध्यास करून आणि त्या ध्यानातच एकनिष्ठ राहून, (ज्ञान-) योगी हा परमात्मरूप होऊन जातो.


(३६२) निर्विकल्प समाधीतील सूक्ष्म वृत्तीने परमात्मा अनुभवाला येतो -

अतीव सूक्ष्मं परमात्म-तत्त्वं न स्थूल-दृष्टया प्रतिपत्तुमर्हति ।
समाधिनात्यंत-सुसूक्ष्म-वृत्त्या ज्ञातव्यमार्यैरतिशुद्ध-बुद्धिभिः ॥ ३६२ ॥
अत्यंत सूक्ष्म असणारे परमात्मतत्त्व हे स्थूल दृष्टीने ग्रहण करता येणे शक्य नाही, म्हणून अतिशय शुद्ध बुद्धी झालेल्या सदाचारी मुमुक्षूनी (निर्विकल्प) समाधीत प्राप्त झालेल्या अत्यंत सूक्ष्म वृत्तीने (परमात्म-तत्त्व हे) जाणून घ्यावयाचे आहे.


'अणोरणीयान्' असणारे परमात्म-तत्त्व हे अत्यंत सूक्ष्म आहे. ते स्थूल दृष्टीला दिसणे शक्यच नाही. त्याला पाहण्यास समाधी साधन मनाची अत्यंत सूक्ष्म वृत्ती होणे आवश्यक आहे; त्या वृत्तीनेच परमात्मतत्त्व जाणता येते. संकल्प आणि विकल्प यांनी रहित झाल्यावर मनाची वृत्ती सूक्ष्म होते आणि तिलाच परमात्मा दिसतो. म्हणून 'मनसा एष द्रष्टव्यः' असे एक उपनिषद् सांगते.


(३६३) मन सूक्ष्म कसे होते ते असे सांगितले आहे -

यथा सुवर्णं पटु-पाक-शोधितं त्यक्त्वामलं स्वात्म-गुणं समृच्छति ।
तथा मनः सत्त्वरजस्तमोमलं ध्यानेन संत्यज्य समेति तत्त्वम् ॥ ३६३ ॥
ज्याप्रमाणे कडक उष्णता देऊन शुद्ध केलेले सोने (आपल्यावरील) मळ/घाण टाकून देऊन, स्वतःच्या (खऱ्या) गुणास धारण करते, त्याप्रमाणे सत्त्व, रज आणि तम (या तीन गुणां)चा मळ ध्यानाने टाकून देऊन मन (आत्म -) तत्त्वास प्राप्त होते.


दागिने करताना सोन्यात भेसळ केली जाते अथवा सोन्याला काही मळ चिकटून बसतो. ते सोने मुशीत घालून तप्त केल्यावर मळ नष्ट होतो आणि सोने स्वत:च्या मूळ रूपात चकाकू लागते. मन हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी अशुद्ध बनते. परमात्म्याचे ध्यान मनाने केल्यावर मनाची अशुद्धी नष्ट होते. मग शुद्ध झालेले मन परमात्म्याला प्राप्त करून घेते.


(३६४) शुद्ध झालेले मन परमात्म्यात लीन होणे हीच निर्विकल्प समाधी -

निरंतराभ्यास-वशात् तदित्थं पक्वं मनो ब्रह्मणि लीयते यदा ।
तदा समाधिः स विकल्प-वर्जितः स्वतोऽद्वयानंद-रसानुभावकः ॥ ३६४ ॥
अशाप्रकारे निरंतर केलेल्या अभ्यासाच्या प्रभावाने पक्क झालेले मन जेव्हा ब्रह्मात / परमात्म्यात लीन होते, तेव्हा ती निर्विकल्प समाधी होय. ही समाधी स्वतःच अद्वैत-रसाचा अनुभव (मुमुक्षूला) प्राप्त करून देते.


पक्व मन म्हणजे सत्त्व, रज इत्यादी तीन गुण आणि संकल्प-विकल्परहित झालेले मन, अशा मनाला 'उन्मन' म्हणतात. हेच मन ब्रह्मरूप/परमात्मरूप होऊन जाते.


(३६५) निर्विकल्प समाधीने असे होते -

समाधिनानेन समस्त-वासना-ग्रंथेविनाशोऽखिल-कर्म-नाशः ।
अंतर्बहिः सर्वत एव सर्वदा स्वरूप-बिस्फूर्तिरयत्नतः ॥ ३६५ ॥
या (निर्विकल्प) समाधीमुळे सर्व वासनारूपी ग्रंथींचा नाश होतो आणि सर्व कर्मांचा नाश होतो आणि कोणताही प्रयत्न न करता आत-बाहेर सर्वच ठिकाणी सर्वकाळी (सर्वदा) (ब्रह्म) स्वरूपाचे स्फुरण होत राहते.


निर्विकल्प समाधीत मनातील सर्व वासनांचा नाश होतो आणि प्रारब्ध कर्म सोडून उरलेल्या संचित आणि क्रियमाण कर्माचा नाश होतो म्हणजे ती कर्मे बंधनकारक होत नाहीत आणि मुख्य म्हणजे त्या माणसाला सर्वस्थळी आणि सर्व काळी सर्वत्र परमात्म-स्वरूपाची प्रचीती येत राहते.


(३६६) परमात्म साक्षात्कारासाठी आवश्यक असणाऱ्या श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांपेक्षा निर्विकल्प समाधी अनंत पटीने चांगली आहे:

श्रुतेः शतगुणं विद्यान्मननं मननादपि ।
निदिष्यासं लक्षगुणमनंतं निर्विकल्पकम् ॥ ३६६ ॥
श्रवणापेक्षा (श्रुतेः) मनन हे शंभरपट चांगले आहे. मननापेक्षा निदिध्यास हा लाख पटीने चांगला आहे. तर निर्विकल्प समाधी ही अनंत पटीने चांगली आहे.


श्रवण, मनन आणि निदिध्यास/निदिध्यासन यांचे स्पष्टीकरण मागे येऊन गेले आहे.


(३६७) निर्विकल्प समाधीनेच ब्रह्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार होतो -

निर्विकल्पकसमाधिना स्फुटं ब्रह्म-तत्त्वमवगम्यते ध्रुवम् ।
नान्यथा चलतया मनोगतेः प्रत्ययांतर-विमिश्रितं भवेत् ॥ ३६७ ॥
निर्विकल्प समाधीने स्पष्टपणे ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार निश्चितपणे होतो; दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने तसे होत नाही. (कारण) मनाच्या वृत्ती (गती) या चंचल असल्यामुळे ते मन निरनिराळ्या (दृश्य पदार्थांच्या) ज्ञानांनी मिश्रित म्हणजे भरलेले असते.


मन हे चंचल आहे. ते विकार, विचार, पदार्थ-ज्ञाने यांनी भरलेले असते. फक्त निर्विकल्प समाधीत ते वृत्तिरहित स्थिर निश्चल असते.


(३६८) निर्विकल्प समाधी महत्त्वाची असल्याने गुरू शिष्याला सांगतो -

अतः समाधत्स्व यतेंद्रियः सन् निरंतर शांत-मनाः प्रतीचि ।
विध्वंसय ध्वांनमनायविद्यया कृतं सदेकत्व-विलोकनेन ॥ ३६८ ॥
म्हणून (हे शिष्या) तू शांत मनाचा आणि इंद्रिय-संयमी होऊन, प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी (प्रतीचि) (निर्विकल्प) समाधी साध आणि सप (ब्रह्मा)च्या एकत्वाचे अवलोकन करून अविद्येने निर्माण केलेल्या (अज्ञानरूपी) अंधाराचा नाश कर.


प्रथम इंद्रिय-संयम आवश्यक आहे. त्यानंतर मन शांत म्हणजे निश्चल संकल्पविकल्परहित व्हावयास हवे. हे निर्विकल्प मन प्रत्यगात्म्याच्या ठिकाणी लावावयास हवे. निर्विकल्पं समाधीत प्रत्यगात्मा आणि ब्रह्म/आत्मा हे एकच आहेत हा साक्षात्कार झाला की अविद्याजन्य अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो.


(३६९) - (३७०) भारतात प्राचीन काळापासून योगदर्शन लोकप्रिय होते. त्यांतील 'योग म्हणजे चित्तवृत्ति-निरोध' एवढाच भाग शंकराचार्य घेतात. चित्तवृत्तींच्या निरोधासाठी केवलाद्वैत वेदांत वेगळ्या गोष्टी सांगतो (पहा - शंकराचार्यकृत सर्व वेदांत-सिद्धांत -सार-संग्रह), त्यातील काहींचा निर्देश पुढील ३६९-३७० या श्लोकांत आहे.

योगस्य प्रथमं द्वारं वाङ्-निरोधोऽपरिग्रहः ।
निराशा च निरीहा च नित्यमेकांत-शीलता ॥ ३६९ ॥
एकांत-स्थितिरिंद्रियोपरमणे हेतुर्दमश्चेतसः
संरोधे करणं शमेन बिलयं यायादहं-वासना ।
तेनानंद-रसानुभूतिरचला ब्राह्मी सदा योगिन -
स्तस्माचित्त-निरोध एव सततं कार्यः प्रयत्‍नान्मुने ॥ ३७० ॥
वाणीचा निरोध, अपरिग्रह, निराशा, निरीहा आणि नेहमी एकांतस्थानी राहण्याची सवय हे (निर्विकल्प समाधी साधण्याच्या) योगाचे पहिले द्वार आहे.


एकांतातील वास हा इंद्रियांना (विषयांपासून) परावृत्त करण्याचे कारण आहे. इंद्रियोपरमण (इंद्रियांचे दमन) हे मनाच्या निरोधाचे (शमाचे) कारण आहे. मनाच्या निरोधाने अहंकाराची वासना लयाला जाते त्या (अहंकाराच्या नाशा) मुळे ब्रह्माशी संबंधित असा आनंदरसाचा निश्चल अनुभव (कबलाद्वैती) योग्याला प्राप्त होतो. म्हणून हे संयमी शिष्या, चित्ताचा निरोध करण्याचा प्रयत्न सतत करावयास हवा.

माणूस हा बोलणारा प्राणी आहे. तो बरवाईट काहीही बोलतो. त्याचे बरेवाईट परिणाम होतात. ते टाळण्यासाठी बाणीचा संयम हया. अगदी मीन नसले तरी चांगले आणि मोजके बोलणे हा वाणीचा संयम आहे.

माणसाला वस्तू गोळा करण्याचा नाद असतो. त्या नादाने तो भरकटतो. म्हणून अनावश्यक गोष्टी गोळा करणे टाळावे. हाच अपरिग्रह, परिग्रह म्हणजे परिवार, कुटुंबपरिवार असाही अर्थ आहे. मग तो अर्थ घेतल्यास अपरिग्रह म्हणजे संन्यास असाही अर्थ होईल, केवलाद्वैत वेदांताच्या मते, मोक्षासाठी सर्व-कर्म-संन्यास आवश्यक मानलेला आहे.

आशा ही शृंखला आहे, घातक आहे. म्हणून माणसाने आशारहित होणे आवश्यक आहे. निरीहा म्हणजे फालतू आशांचा त्याग अथवा आशेमुळे होणाऱ्या क्रियांचा त्याग, एकांतशीलता म्हणजे एकांतात राहण्याची सवय. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आणि लोकांत राहिले की बाणीचा उपयोग, परिग्रह इत्यादी सहजपणे येतात, म्हणून एकांतात-एकटे राहण्याची - सवय लावून घ्यावयास हवी.

एकांतात राहिले की लोकांची आणि विषयांची संगती कमी होते. त्यामुळे इंद्रियांना बाहेर पाहण्याची संधी कमी होते. म्हणून एकांतवासाने इंद्रियांचे दमन करणे सोपे होते. इंद्रियांच्या मागोमाग मन विषयांकडे धावत असते. इंद्रियांची बाहेर जाण्याची प्रवृत्ती थंडावली की मनाचा निग्रह करणे सोपे होते. मन शांत झाले की अहंकाराची वासना उठत नाही, ती लयाला जाते आणि एकदा का अहंकार लयाला गेला की निर्विकल्प स्थितीत मन ब्रह्माशी एकरूप होते आणि त्याला ब्रह्मानंदाचा रस अनुभवण्यास मिळतो. अशाप्रकारे ब्रह्मानंद प्राप्त होण्यास चित्तवृत्तींचा निरोध सतत करून मनाची निर्विकल्प स्थिती साधण्याचा प्रयत्न सतत करावयास हवा.


(३७१) निर्विकल्प स्थिती क्रमाने अशी येते -

वाचं नियच्छात्मनितं नियच्छ बुद्धौ धियं यच्छ च बुद्धि-साक्षिणि ।
तं चापि पूर्णात्मनि निर्विकल्पे विलाप्य शांति परमां भजस्व ॥ ३७१ ॥
(हे शिष्या), बाणी मनाला (आत्मनि) अर्पण कर, ते मन बुद्धीला अर्पण कर, बुद्धी ही बुद्धीचा साक्षी असणाऱ्या (आत्म्या) ला अर्पण कर, आणि तो (आत्मा) निर्विकल्प अशा पूर्ण म्हणजे परम आत्म्यात विलीन करून, तू श्रेष्ठ शांती प्राप्त करून घे.


श्लोक ३७० मध्ये सांगितलेला भागच येथे वेगळ्या शब्दांत सांगितला आहे. वाणी हा शब्द उपलक्षणेने सर्व इंद्रिये सूचित करतो. इंद्रिय वृत्तींचा लय मनाच्या वृत्तीत करावयाचा. मनाचा लय बुद्धीत करायचा. बुद्धीला बुद्धीचा साक्षी असणाऱ्या आत्म्याकडे वळवावयाचे, नंतर उपाधीत असणाऱ्या या अंतरात्म्याला, उपाधिनिरसनाने पूर्ण परमात्म्यात लीन करावयाचे, मग निर्विकल्प परमात्याचा आनंद अनुभवाला येतो. भग तेथे श्रेष्ठ शांती/समाधान आहे.


(३७२) - (३७३) उपाधींचा लय होत गेल्यावर -

देह-प्राणेंद्रिय-मनो-बुद्ध्यादिभिरुपाधिभिः ।
यैयैवृत्तेः समायोगस्तत्तद्-भावोऽस्य योगिनः ॥ ३७२ ॥
तन्निवृत्त्या मुनेः सम्यक् सर्वोपदमपं सुखम् ।
संदृश्यते सदानंदरसानुभव-विप्लवः ॥ ३७३ ॥
देह, प्राण, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी उपाधीपैकी ज्या ज्या उपाधीशी (ज्ञान-) योगी पुरुषाच्या वृत्तीचा संयोग होतो, तो तो भाव (= त्याच्याशी तन्मयता) (योग्याला) प्राप्त होतो.


ती तन्मयता दूर झाल्यावर संयमी पुरुषाला संपूर्णपणे सवीपासूनच्या निवृत्तीचे सुख प्राप्त होते आणि मग नेहमी आनंद-रसाच्या अनुभवाचा विशेष लय प्राप्त होतो.

निर्विकल्प समाधी प्राप्त होण्यापूर्वी ज्ञानयोग्याच्या मनाची वृत्तीही देह इत्यादी उपाधींशी संयुक्त होत असते. पण जसजशी त्या त्या उपाधीची आणि योग्याच्या वृत्तीची निवृत्ती होत जाते, तसतसे शेवटी योगी सर्ववृत्तीतून-उपाधीतून निवृत्त होतो. म्हणजे योगी सर्व विकल्पांतून दूर होतो. सर्व विकल्प दूर झाले की तो ब्रह्माशी एकरूप होतो, त्याला ब्रह्मानंद-रसाचा अनुभव येतो आणि तो त्या विशिष्ट आनंदात लीन होऊन जातो.


(३७४) - (३७५) ही निवृत्ती, हा त्याग ब्रह्मनिष्ठ मुमुक्षू पुरुषच करू शकतो : -

अंतस्त्यागो बहिस्त्यगो विरक्तस्यैव युज्यते ।
त्यज त्वंतर्बहिः संग बिरक्तस्तु मुमुक्षुया ॥ ३७४ ॥
बहिस्तु विषयैः संगं तथांतरहमादिभिः ।
विरक्त एव शक्नोति त्यक्तुं ब्रह्मणि निष्ठितः ॥ ३७५ ॥
विरक्त पुरुषच आतील त्याग आणि बाहेरील त्याग करण्यास योग्य आहे. मोक्षाच्या इच्छेच्या जोरावर विरक्त पुरुष हा अंतस्त्याग आणि बहिस्त्याग करतो (३७४). ब्रह्मनिष्ठ असा जो कोणी विरक्त पुरुष असतो तोच विषयांबरोबरचा म्हणजे बाहेरचा संग आणि अहंकार इत्यादीबरोबरचा आंतर-संग सोडून देऊ शकतो.


मोक्षाच्या इच्छेने ब्रह्मनिष्ठ असा विरक्त पुरुषचं विषयांचा बाह्य-संग आणि अहंकार इत्यादींचा आंतर-संग टाकू शकतो. मग त्याचे मन निर्विकल्प झाल्यावर त्याला ब्रह्मानंद मिळतो.


GO TOP