शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(१२६) श्लोक १२६ पासून आत्म्याचे/परमात्म्याचे स्वरूप सांगितले आहे.

अथ ते संप्रवक्ष्यामि स्वरूपं परमात्मनः ।
यद् विज्ञाय नरो बंधान्मुक्तः कैवल्यमश्नुते ॥ १२६ ॥
हे शिष्या आता मी तुला परमात्म्याचे स्वरूप स्पष्ट करून सांगेन की जे कळल्यावर माणूस संसाराच्या बंधनातून सुटून, कैवल्य / मोक्ष प्राप्त करून घेतो. केवलाद्वैत वेदांतात आत्मा/परमात्मा, ब्रह्म परब्रह्म हे शब्द समानार्थी आहेत. अनेकदा या शब्दांनी देहाच्या उपाधीत सापडलेला प्रत्यगात्मा/अंतरात्मा अभिप्रेत असतो हेही लक्षात ठेवावे.


आत्म्याच्या अज्ञानाने आत्म्यावर विश्वाचा आरोप होतो. त्या भासमान विश्वात आसक्ती व अहंकार बाळगून माणूस बरीवाईट कर्मे करतो. त्या कर्मामुळे तो जन्ममरणाच्या चक्रात- संसारात - अडकतो, बद्ध होतो. या अज्ञानाचे आत्म्याच्या ज्ञानाने निराकरण होते. अज्ञान संपले की संसाराचा बंध संपला. माणस बंधमुक्त होतो. म्हणजे त्याला स्वतःचे मूळचे अद्वितीय स्वरूप- कैवल्य- प्राप्त होते. कैवल्य म्हणजेच मोक्ष. एक उपनिषद् सांगते 'ज्ञानादेव तु कैवल्यम् । '


(१२७)

अस्ति कश्चित् स्वयं नित्यमहं-प्रत्यय-लंबनः
अवस्था-वय-साक्षी च पंच-कोश-विलक्षणः ॥ १२७ ॥
'अहं' (=मी) या प्रत्ययाला आधारभूत आणि स्वतः नित्य असणारा, असा कोणी एक अद्‌भुत प्रत्यगात्मा शरीरांच्या उपाधीत आहे. तो (मानवाच्या) तीन अवस्थांचा साक्षी असून तो पाच कोशांपेक्षा वेगळा आहे.


माणूस नेहमी 'मी', 'मी' असे म्हणत असतो. पण हा 'मी' कोण याचा शोध घेतला तर असे दिसते की देह, इंद्रिये इत्यादी 'मी' नसून शरीरातील प्रत्यगात्मा/ अंतरात्मा म्हणजेच मी आहे. आणि या प्रत्यगात्म्याच्या अधिष्ठानावरच माणस 'मी' 'मी' असे म्हणत असतो. प्रत्यगात्मा देहात नसेल म्हणजे माणूस मृत असेल तर तो 'मी' 'मी' असे म्हणूच शकत नाही. आणि हा प्रत्यगात्मा म्हणजेच आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म हे अंतिम तत्त्व आहे. प्रत्यगात्मा फक्त देहांच्या उपाधीत आहे.

माणसाला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशी तीन शरीरे आहेत आणि त्या शरीराअंती माणूस जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती यातील अवस्थांतून जात असतो. या तीनही अवस्थांत प्रत्यगात्मा हा साक्षी/ द्रष्टा असतो. ही गोष्ट यापुढे श्लोक १२८-१३७ मध्ये सांगितली आहे. मानवी शरीरात पाच कोश मानलेले आहेत; त्या पाच कोशांपेक्षा प्रत्यागात्मा वेगळा आहे (श्लोक २१३) . या पाच कोशांची माहिती श्लोक १५६ पासून दिलेली आहे.


(१२८) प्रत्यगात्मा/आत्मा हा तीन अवस्थांचा साक्षी कसा आहे, ते आता श्लोक १२८ पासून सांगितले आहे.

यो विजानानि सकलं जाग्रत्-स्वप्न-सुषुप्तिषु ।
बुद्धि-तवृत्ति- सद्‌भावमभावमहमित्ययम् ॥ १२८ ॥
'अहं' (- मी) (या स्वरूपात प्रगट होणारा) हा (अयं) प्रत्यगात्मा हा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थामध्ये सर्वकाही जाणत असतो. तसेच तो बुद्धी, तिचे कार्य, त्या कार्याचे अस्तित्व आणि नास्तित्व तो जाणत असतो.


जागृती अवस्थेत इंद्रियांच्या द्वारा बाह्य विषय /पदार्थ जाणणारा मी-प्रत्यगात्माआहे. स्वप्नातील पदार्थांनाही जाणणारा मी/प्रत्यगात्मा आहे. सुषुप्तीमध्ये जागृती आणि स्वप्न या अवस्थांतील पदार्थांचे भान नसते; तेथे अज्ञान असते. झोपेतील हे अज्ञान जाणणारा प्रत्यगात्मा आहे. कारण झोपेंतून जागे झाल्यावर 'मला झोपेंत काही कळले नाही', या स्वरूपाची त्या ज्ञानाची स्मृती जागेपणी येत असते.

येथे 'बुद्धि' शब्दाने अंतःकरण सूचित होते. अंतःकरण हे मूलतः अचेतन आहे. त्यातील संकल्प-विकल्प, काम, क्रोध इत्यादी वृत्तींचे अस्तित्व आणि नास्तित्व जाणणाराही प्रत्यगात्मा आहे; कारण तो नित्य चेतन आहे. म्हणूनच त्याला श्लोक १२७ मध्ये तीन अवस्थांचा साक्षी असे म्हटले आहे.


(१२९)

यः पश्यति स्वयं सर्वं यं न पश्यति कश्चन ।
यश्चेतयति बुद्ध्यादि न तद् यं चेतयत्ययम् ॥ १२९ ॥
जो प्रत्यगात्मा स्वत:च सर्व पाहतो/ जाणतो त्याला कोणीही पाहू जाणू शकत नाही. जो प्रत्यगात्मा बुद्धी इत्यादींना चेतना देतो; त्याला (यम्) ते बुद्धी इत्यादी चेतना देत नाहीत; असा हा प्रत्यगात्मा आहे.


माणसाच्या जागृती इत्यादी तीन अवस्थांत प्रत्यगात्मा हा ज्ञाता आहे. (श्लोक १२८) . बुद्धीत चैतन्यरूप प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडले की बुद्धी इत्यादींना त्याची प्रतिबिंबित चेतना मिळते आणि ते कार्यप्रवण होतात. प्रत्यगात्मा हा निराकार, निर्गुण असल्याने त्याला इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी कोणीही जाणू शकत नाही ; तो स्वतःच चेतनरूप असल्याने त्याला चेतना देणारा दुसरा कोणीही नाही; कारण तो एकमेव चैतन्यरूप आहे. (व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यगात्मा दिसत नाही पारमार्थिकदृष्ट्या योग्य त्या उपायांनी तो दिसू शकतो, त्याचा साक्षात्कार होतो हे येथे लक्षात ठेवावे) .


(१३०)

येन विश्वमिंद व्याप्तं यन्न व्याप्नोनि किंचन ।
आभा-रूपमिदं सर्वं यं भांतमनुभात्ययम् ॥ १३० ॥
हे विश्व त्याने व्यापलेले आहे पण त्याला व्यापणारे काहीही नाही. जो प्रकाशित झाला असता हे सर्व (विश्व) त्याच्या मागोमाग आभासरूप (प्रकाशितरूप) होते; असा हा प्रत्यगात्मा आहे.


आत्म्याच्या अधिष्ठानावर विश्व भासते (प्रस्तावना पाहा.) साहजिक हा आत्मा सर्व विश्व व्यापून टाकतो, विश्वाच्या बुडाशी तोच आहे. त्याच्याखेरीज दुसरे अन्य काहीही नसल्याने तो अन्य कुणाकडूनही व्यापला जात नाही. आत्मा हा चिद्रूप / प्रकाशरूप आहे. त्याच्यावर जे जग दिसते ते भासमान आहे (आभारूप) . आत्म्याचा प्रकाश आहे म्हणून त्याच्यावर जगाचा आभास आहे. मुंडक उपनिषद् (२.२.११) सांगते : - तमेव भांतं अनुभाति सर्वं । तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥


(१३१)

यस्य संनिधि-मात्रेण देहेंद्रिय- मनो-धियः ।
विषयेषु स्वकीयेषु वर्तते प्रेरिता इव ॥ १३१ ॥
त्या आत्म्याने जणू प्रेरणा दिल्याने देह, इंद्रिये, मन, बुद्धी हे केवळ त्याच्या सांनिध्याने आपापल्या विषयांत कार्य करतात. देहात प्रत्यगात्मा आहे. तो स्वतः कुणालाही क्रिया करण्याची प्रेरणा देत नाही. पण जणू त्याने प्रेरणा केल्याप्रमाणे देह इत्यादी आपापली कार्ये करतात.


याचे कारण केवळ त्याचे सांनिध्य, ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या सांनिध्याने लोखंडाच्या किसात हालचाल होते, त्याप्रमाणे इंद्रिये, मन, बुद्धी यांचे स्वरूप, विषय आणि कार्य हे पुढे यथावकाश सांगितले आहेत.


(१३२)

अहंकारादि-देहांता विषयाश्च सुखादयः ।
वेद्यंते घटवद् येन नित्य-बोध-स्वरूपिणा ॥ १३२ ॥
हा प्रत्यगात्मा नित्य ज्ञान (बोध) स्वरूपाचा आहे. घट हा ज्याप्रमाणे (ज्ञानाचा) विषय या स्वरूपात जाणला जातो, त्याप्रमाणे अहंकारापासून ते देहापर्यंतचे पदार्थ आणि सुख इत्यादी विषय त्याच्याकडून जाणले जातात.


या जगात घट हा ज्ञानाचा विषय होतो. त्याचप्रमाणे पट, घट इत्यादी वस्तू ज्ञानाचा विषय होतात. त्याप्रमाणे देह इत्यादींना ज्ञानाचा विषय या स्वरूपात जाणणारा आत्मा आहे. घट इत्यादी पदार्थ हे विनाशी आहेत; देह इत्यादी पदार्थही विनाशी आहेत. आत्मा अविनाशी आहे. माणसाचे ज्ञान अनित्य असते पण आत्म्याचे ज्ञान नित्य असते; तेच त्याचे स्वरूप आहे.

अहंकार, बुद्धी, मन, देह, इंद्रिये इत्यादी सर्व अनात्मा असल्याने, ते जड अचेतन आहेत. सुख इत्यादी विषय म्हणजे सुख इत्यादी देणारे विषय/पदार्थ हेही जड आहेत. ते सर्व आत्म्याच्या ज्ञानामुळेच जाणले जातात. म्हणजे असे - बुद्धीत प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडते. त्या प्रतिबिंबित आत्मज्ञानाने सर्व काही जाणले जाते. जसे - आरशावर सूर्याचा प्रकाश पडला. आरशावरील परावर्तित प्रकाशाने घरातील वस्तू दिसतात आणि जाणल्या जातात.


(१३३)

एषोऽन्तरात्मा पुरुषः पुराणो निरंतराखंड- सुखानुभूतिः ।
सदेक-रूपः प्रतिबोध-मात्रो येनोषिता वागसवश्चरन्ति ॥ १३३ ॥
शरीररूपी नगरात राहणारा पुरुष हा अंतरात्मा हा पुराण/पुरातन नित्य आहे. तो सततचे अखंड सुख आणि अनुभव हे स्वरूप असणारा आहे. तो नेहमी (सदा) एकाच स्वरूपाचा असतो; तो केवळ ज्ञानरूप आहे आणि त्याच्या अधिष्ठानावरच (ऊषित) वाणी इत्यादी इंद्रिये आणि प्राण (असव:) हे आपापल्या क्रिया करण्यास प्रवृत्त होतात.


उपनिषदे, भगवद्‌गीता इत्यादी ग्रंथ अनेकदा पुरुष हा शब्द आत्मा/अंतरात्मा यासाठी वापरतात. पुराणपुरुष म्हणजे सनातन नित्य आत्मा. हा अंतरात्मा नेहमी एकरूपाचा असतो म्हणजे त्यात कोणतेही फेरबदल / विकार होत नाहीत. तो सदैव सचिदानंद या एकाच रूपात असतो. जेव्हा तो शरीरात असतो तेव्हा त्याच्या अधिष्ठानामुळे अथवा सांनिध्यामुळे देह, इंद्रिये, प्राण हे आपापली कामे करीत असतात (मागे श्लोक १३१ पहा).


(१३४)

अत्रैव सत्त्वात्मनि धी-गुहायामव्याकृताकाश उशन्-प्रकाशः ।
आकाश उचै रविवत् प्रकाशते स्वतेजसा विश्वमिदं प्रकाशयन् ॥ १३४ ॥
या सर्व विश्वाला प्रकाशित करीत सूर्य ज्याप्रमाणे उंच आकाशात प्रकाशतो त्याप्रमाणे सात्त्विक स्वरूपाच्या (सत्त्वात्मनि) बुद्धिरूपी गुहेत सूक्ष्म/अविकारी (अव्याकृत) आकाशात (हा अंतरात्मा) अतिशय प्रकाशत असतो (उशत्-प्रकाश) .


कठोपनिषद् सांगते - आत्मास्य जंतोर्निहितो गुहायाम् १.२.२०. ही गुहा म्हणजे पंचकोश असे म्हटले जाते. येथे बुद्धिरूपी गुहा असे म्हटले आहे. आत्मा हृदयात आहे असे छांदोग्य उपनिषद् (३-१४.३) सांगते - 'एष मे आत्मा अंतर्हृदये.' तर छांदोग्य अंतराकाशात आत्मा आहे असेही सांगते - 'अंतराकाशः तस्मिन्.' (८.१.१-३) . तर येथे बुद्धिरूपी गुहेतील अव्याकृत आकाशात आत्मा असतो असे म्हटले आहे. गुहेत आकाश असते. अव्याकृत आकाश म्हणजे अपंचीकृत सूक्ष्म आकाश असा अर्थ होईल. सात्त्विक (सत्त्वात्मनि) बुद्धीत आत्मा प्रकाशतो म्हणजे सात्त्विक बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडते आणि ते प्रतिबिंब प्रकाशत असते.


(१३५)

ज्ञाता मनोऽहंकृति-विक्रियाणां देहेंद्रिय-प्राण-कृत-क्रियाणाम् ।
अयोऽग्निवत् ताननुवर्तमानो न चेष्टते नो विकरोति किंचित् ॥ १३५ ॥
मन (अंतःकरण) , आणि अहंकार याचे विकार जाणणारा, देह, इंद्रिये आणि प्राण यांनी केलेल्या क्रिया जाणणारा, आणि लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे होणाऱ्या अग्नीसारखा असणारा तो (अंतरात्मा) (त्या त्या) क्रियांचे अनुसरण करतो; पण तो हा (अंतरात्मा हा मात्र प्रत्यक्ष) कोणतीही क्रिया करीत नाही तसेच तो कोणताही विकार पावत नाही.


शरीरात असणारा आत्मा हा ज्ञाता आहे. मन हा शब्द उपलक्षणेने बुद्धी, चित्त दाखवितो. अंत:करण, अहंकार, देह, इंद्रिये आणि प्राण यांचे द्वारा होणाऱ्या सर्व क्रिया तो जाणतो. गमतीची गोष्ट अशी की, तो आत्मा त्या त्या क्रिया करतो असे वाटते, ते असे - समजा एक लोखंडाचा गोळा आहे. तो अग्नीत तापून लालबुंद झाला. त्या स्थितीत अग्नी हा त्या लोखंडी गोळ्यांशी एकरूप होऊन, तो अग्नी (इतरांना) भाजतो. प्रकाश देतो, असे वाटते. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही; त्या लोखंडी गोळ्यापेक्षा अग्नी हा वेगळाच राहतो. सर्व काही लोखंडी गोळाच करीत असतो, पण त्याचा आरोप अग्नीवर होत असतो. तसे बुद्धीतील आत्म्याच्या प्रतिबिंबाच्या आधारे देह, इंद्रिये इत्यादी कार्ये करतात. पण बिंबरूप आत्मा मात्र काहीही करीत नसतो.


(१३६)

न जायते म्रियते न बर्धते न क्षीयते नो विकरोति नित्यः ।
विलीयमानेऽपि वपुष्यमुष्मिन् न लीयते कुंभ इबांबरं स्वयम् ॥ १३६ ॥
(अंतरात्मा) नित्य आहे. तो जन्माला येत नाही, मरत नाही, वाढत नाही. क्षीण होत नाही आणि विकार पावत नाही. (घट फुटला तरी) घटातील आकाश हे स्वतः नष्ट होत नाही, त्याप्रमाणे हे (स्थूल) शरीर नाश पावले तरीसुद्धा (आत्मा) स्वतः नष्ट होत नाही.


स्थूल देहाच्या उपाधीत आत्मा राहतो. स्थूल देहाला जन्म, मरण, वृद्धी, क्षय इत्यादी विकार होतात; एक दिवस तो नष्ट होऊन जातो. शरीरापेक्षा आत्मा वेगळा असल्याने त्याला शरीराचे कोणतेही विकार होत नाहीत. जसे - मातीचा घडा निर्माण झाला; त्यात आकाश सामावले; त्याला घटाकाश नाव मिळाले. पण त्या घटाचे काही झाले तरी घटकाशाला काही होत नाही. घट फुटला तरी घटाकाश फुटत नाही, नष्ट होत नाही. त्याप्रमाणे स्थूल शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. आत्मा हा विकाररहित आणि नित्य आहे.


(१३७)

प्रकृति- विकृति-भिन्नः शुद्ध-बोध-स्वभावः
   सदसदिदमशेष भासयनिर्विशेषः ।
लसति परमात्मा जाग्रतादिष्ववस्था -
   स्वहमिति साक्षात् साक्षि-रूपेण बुद्धेः ॥ १३७ ॥
प्रकृती आणि विकृती यांपेक्षा भिन्न असणारा, शुद्ध ज्ञान हे स्वरूप असणारा, सत् आणि असत् असणारे हे सर्व काही प्रकाशित करणारा, (स्वतः गुण इत्यादी) विशेषांनी युक्त नसणारा, असा परमात्मा / अंतरात्मा हा माणसाच्या जागृती इत्यादी अवस्थांमध्ये 'मी मी' अशा स्वरूपात बुद्धीच्या साक्षीरूपाने साक्षात्/प्रत्यक्ष असतोच.


प्रकृती म्हणजे विश्वाचे अज्ञानरूप कारण आणि विकृती म्हणजे विश्वरूपी कार्य. त्यापेक्षा परमात्मा/अंतरात्मा भिन्न आहेच, येथे देहाचा संबंध असल्याने शरीर, अंत:करण इत्यादीतील कारणे आणि कार्ये असा अर्थ घ्यावयास हवा. शरीर इत्यादीतील कार्य-कारणापेक्षा अंतरात्मा भिन्न आहे. शुद्ध म्हणजे विषयरहित असे ज्ञान हेच त्याचे स्वरूप आहे. जेव्हा आपण 'काही आहे आणि काही नाही' असे म्हणतो, अथवा 'अमुक चांगले, अमुक वाईट' असे म्हणतो, त्या सर्वांना प्रकाशित करणारा/स्पष्ट करणारा अंतरात्मा आहे. या आत्म्याचे ठिकाणी कोणतेही गुण, क्रिया इत्यादी विशेष नाहीत; म्हणून तो निर्विशेष आहे. देहाच्या जागृती इत्यादी सर्व अवस्थांत 'मी' या स्वरूपात तो बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा साक्षी आहे. बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडल्यावर उद्धृत झालेला अहंकार हा 'मी मी' या स्वरूपात प्रगट होतो. अशाप्रकारे आत्मा हा सर्व अवस्थांत साक्षी आहे.


(१३८) ज्या परमात्म्याचे वर्णन श्लोक १२७-१३७ मध्ये झाले तोच परमात्मा जीव आहे -तत्त्वमसि - असे गुरू आता शिष्याला सांगतात.

नियमित-मनसाऽमुं त्वं स्वमात्मानमात्म-
   न्ययमहमिति साक्षाद् विद्धि बुद्धि-प्रसादात् ।
जनि-मरण-तरंगापार-संसार-सिंधुं
   प्रतर भव कृतार्थो ब्रह्मरूपेण संस्थः ॥ १३८ ॥
(अरे शिष्या) नियंत्रित केलेल्या मनाने, बुद्धीच्या प्रसन्नतेमुळे, आपल्या देहात (आत्मनि) , तू स्वतःच्या (प्रत्यग्) आत्म्याला 'हा मी आहे' या स्वरूपात प्रत्यक्ष जाणून घे. मग जन्म आणि मरणरूपी लाटा ज्यात आहेत असा अपरंपार संसाररूपी सागर तरून जा, आणि नंतर ब्रह्माशी एकरूप झालेल्या अवस्थेत कृतार्थ होऊन राहा.


ब्रह्म परमात्मा म्हणजेच प्रत्यगात्मा आहे. तो या देहाच्या उपाधीत आहे. माणूस जिवंत असतानाच त्याने प्रत्यगात्म्याला म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाला जाणून घ्यावयाचे आहे. म्हणून गुरू शिष्याला सांगतो, "हा परमात्मा मी आहे" असे तू जाणून घे. हे ज्ञान होण्यापूर्वी बुद्धी सात्त्विक व्हावी लागते आणि मनावर नियंत्रण मिळावयास हवे. प्रत्यगात्म्याचे ज्ञान झाले की शिष्य संसार सागर तरून जाईल. परमात्मा /ब्रह्म कळले की जीव ब्रह्मरूप होऊन जातो. ब्रह्मरूप होऊन जाण्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे. ब्रह्मरूप होणे हे मानवी जीवनाचे ध्येय असल्याने ते प्राप्त करून घेणारा माणूस कृतार्थ/कृतकृत्य होतो.


(१३९) 'आत्मा म्हणजे 'मी' हे न कळल्याने माणूस देहाला मी मानतो आणि मग त्या देहाचे पोषण इत्यादी करण्यात तो वेळ गमावतो.

अत्रानात्मन्यहमिति मतिबंध एषोऽस्य पुंसः
प्राज्ञोऽज्ञानाजनन- मरण-क्लेश-संपात-हेतुः ।
येनेवायं वपुरिदमसत् सत्यमित्यात्म-बुद्ध्या
पुष्यत्युक्षत्यवति विषयस्तंतुभिः कोशकृद्वत् ॥ १३९ ॥
येथे (म्हणजे या) अनात्म वस्तूंच्या ठायी 'मी' (= आत्मा) अशी जी बुद्धी हाच या माणसाला (= जीवाला) बंध अज्ञानामुळे प्राप्त झाला आहे. आणि तो जन्म, मरण आणि क्लेश यांच्या कोसळण्याला (संपात) कारण आहे. या अज्ञानाच्या बंधामुळे या असत् शरीराला सत्य आत्मा असे मानून माणूस विषयांमार्फत त्या शरीराचे पोषण करतो, त्याला स्नान घालतो आणि त्याचे रक्षण करतो. जसे - आपल्या तंतूंनी कोळी हा स्वत:ला बद्ध करतो, त्याप्रमाणे जीव आपल्या कर्मांनी स्वतःला बंधनात पाडून घेतो).


ब्रह्माच्या/ आत्म्याच्या अज्ञानामुळे जीव हा शरीर इत्यादी अनात्म पदार्थाना 'मी' म्हणजे आत्मा मानतो. त्यामुळे तो मुळात आत्म्याप्रमाणे मुक्त असला तरी तो बंधनात सापडतो, हा बंधच जीवावर कोसळणाऱ्या जन्म, मरण आणि क्लेश यांचे कारण आहे. या अज्ञानामुळेच माणूस हा असत्/मिथ्या/भासमान शरीराला सत्य आत्मा आहे असे मानतो आणि त्या शरीराचे पोषण इत्यादी करतो. देहाला आत्मा मानणे हाच खरा माणसाचा बंध आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच तंतूंनी आपणास बद्ध करतो त्याप्रमाणे माणूस आपल्या अज्ञानजन्य कर्मानी स्वतःला जन्म-मरणाच्या बंधनात अडकवून घेतो.


(१४०) आत्म्याच्या अज्ञानामुळे हे सर्व पुढीलप्रमाणे घडते -

अतस्मिंस्तबुद्धिः प्रभवति विमूढस्य तमसा
   विवेकाभावाद् वै स्फुरति भुजगे रज्जु-धिषणा ।
ततोऽनर्थ व्रातो निपतति समादातुरधिक -
   स्ततो योऽसद्‌ग्राहः स हि भवति बंधः शृणु सखे ॥ १४० ॥
अंधाराने मूढ झालेल्या पुरुषाचे ठिकाणी 'जे जसे नाही ते तसे आहे' असे मानण्याची बुद्धी विवेक सुटल्यामुळे येते आणि त्याला सापाच्या ठिकाणी 'रज्जू' असे ज्ञान होते (स्फुरति) आणि मग सापाला दोरी समजणाऱ्या माणसावर संकटांचा समूह अधिकच कोसळतो. याचप्रमाणे अज्ञानाने मूढ झालेल्या पुरुषाचा 'देह इत्यादी अनात्म वस्तु म्हणजे आत्मा' असा जो चुकीचा समज (असद्-ग्राह) होतो, तोच त्याचा बंध होतो. ते कसे घडते ते हे शिष्या, ते तू आता ऐक.


'अतस्मिन् तद्-बुद्धिः' हे अध्यासाचे लक्षण शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावरील प्रारंभीच्या अध्यासभाष्यात दिले आहे. अंधूक प्रकाशात जमिनीवरील सर्प न कळल्याने तेथे दोरी आहे असे वाटले. दोरी नसणाऱ्या सापाला दोरी मानणे हा अध्यास. सर्प न कळल्याने हा अध्यास झाला किंवा जमिनीवर पडलेली दोरी न कळल्याने तेथे साप भासला, हाही अध्यासच. अध्यासामध्ये अध्यस्त पदार्थ हा मिथ्या/खोटा असतो.

अज्ञानाने सापाला दोरी समजून जर उचलले तर तो उचलणाऱ्याच्या हाताला वेढे घालील, शेपटाचे फटकारे देईल आणि चावेल असे हे अनर्थ कोसळतील. असाच प्रकार आत्म्यावर अध्यास झाल्यास होतो. अनात्मा म्हणजे आत्मा नव्हे आणि मग देह इत्यादी अनात्म पदार्थांना आत्मा मानल्याने जन्म, मरण, दुःख, शोक इत्यादी गोष्टी माणसाला भोगाव्या लागतात. अज्ञानाने अनात्म्याला आत्मा मानले तर माणसाला जन्ममरणाचा बंध येतो (श्लोक १८१ पहा) .


(१४१) अनात्म्यावर आत्म्याचा अध्यास असा होतो -

अखंड-नित्याद्वय-बोध-शक्त्या
   स्फुरन्तमात्मानमनंत-वैभवम् ।
समावृणोत्यावृति-शक्तिरेषा
   तमोमयी राहुरिवार्कबिंबम् ॥ १४१ ॥
ज्याप्रमाणे राहू सूर्याच्या बिंबाला झाकतो त्याप्रमाणे तमोगुणाने युक्त अशी ही (अज्ञानाची) आवरणशक्ती ही अखंड, नित्य, अद्वय, आणि अनंत वैभवाने युक्त आणि ज्ञानशक्तीने चमकणाऱ्या आत्म्याला झाकते.


आत्मा हा अखंड / निरवयव, नित्य, एकमेव एक आणि अनंत वैभवाने संपन्न आहे. तो स्वत:च्या ज्ञानशक्तीने तळपत असतो. त्याला अज्ञानाची आवरणशक्ती झाकून टाकते; अज्ञानाच्या तमोगुणाजवळ आवरणशक्ती आहे. (श्लोक ११५-११६) . यासाठी येथे राहू व सूर्य यांचे उदाहरण दिले आहे. (केतू हा दानव सूर्याला झाकतो असे पुराणे सांगतात) राह/केत हे दानव तमोगुण-प्रधान असतात, अज्ञानातील तमोगुणाची आवरणशक्ती आत्म्याला झाकते. त्यामुळे माणसाला आत्मा कळत नाही. त्यामुळे आत्म्यावर अनात्मा भासू लागतो. मग माणूस अनात्मा अशा देहालाच आत्मा मानू लागतो.


(१४२)

तिरोभूते स्वात्मन्यमल-नर-तेजोवति पुमा-
   नजात्मानं मोहादहमिति शरीरं कलयति ।
ततः काम-क्रोध-प्रभृतिभिरमुं बंधन-गुणैः
   परं विक्षेपाख्या रजस उरु-शक्तिर्व्यथयति ॥ १४२ ॥
अतिशय शुद्ध अशा तेजाने युक्त असणारा स्वतःचा आत्मा हा अज्ञानाच्या आवरणशक्तीने झाकला गेला असता, माणूस मोहामुळे/ अज्ञानामुळे अनात्मा असणाऱ्या देहाला 'मी' (- आत्मा) असे मान लागतो. त्यानंतर (अज्ञानातील) रजोगुणापासून निर्माण झालेली जी 'विक्षेप' नावाची बलवान शक्ती आहे ती बंधनात पाडणाऱ्या काम, क्रोध, इत्यादी दोऱ्यांनी (गुणैः) म्हणजे विकारांनी त्या माणसाला भरपूर त्रास देऊ लागते.


अज्ञानाच्या तमोगुणात्मक शक्तीने आत्म्याला आच्छादन घातल्यावर, रजोगुणाची विक्षेपशक्ती काही भ्रामक गोष्टींचा भास निर्माण करते. (श्लोक ११३) . ही विक्षेपशक्ती 'देह म्हणजे आत्मा' असे चुकीचे ज्ञान करवू लागते आणि या रजोगुणाच्या प्रभावामुळे मनात काम, क्रोध इत्यादी विकार उद्‌भूत होतात (श्लोक ११३) . हे काम, क्रोध माणसाकडून आसक्ती व अहंकार यांनी युक्त कर्मे करावयास लावतात. साहजिकच माणूस त्या कर्माअंती जन्ममरणाच्या आणि सुखदुःखांच्या बंधनात पडतो. अशाप्रकारे रजोगुण हा माणसाला व्यथा/दुःख/त्रास देणारा ठरतो.


(१४३) मग माणूस कर्मजन्य संसारात गटांगळ्या खात रहातो.

महा-मोह-ग्राह-ग्रसन-गलितात्मावगमनो
   धियो नानावस्थास्वयमभिनयंस्तद्‌गुणतया ।
अपारे संसारे विषय-विष-पूरे जलनिधी
   निमज्योन्मज्यायं भ्रमति कुमतिः कुत्सित-गतिः ॥ १४३ ॥
महामोहरूपी मगरीने गिळल्यावर /पकडल्यावर माणसाचे आत्म्याचे ज्ञान गळून मग बुद्धीच्या नाना अवस्था या आपल्या स्वत:च्या असे माणूस मानू लागतो. मग त्या बुद्धीच्या गुणांना वश होऊन, त्यांना अनुसरून वागणारा, असा चुकीची बुद्धी झालेला (कुमति) तो पुरुष विषयरूपी विषाने भरलेल्या संसाररूपी अफाट/अथांग सागरात बुडत आणि वर येत म्हणजे गटांगळ्या खात तेथेच त्या संसारात इकडेतिकडे फिरत राहतो.


मानवी शरीरात बुद्धीमध्ये आत्मचैतन्याचे प्रतिबिंब पडले की बुद्धीमध्ये अहंकार कार्यप्रवण होतो. त्यामुळे माणूस 'देह म्हणजे मी' असा अभिमान धारण करतो. त्यामुळे त्याला स्वतःचे अंतरात्म स्वरूप दिसेनासे होते. हाच त्याचा महामोह, त्यामुळे बुद्धीच्या सर्व अवस्था म्हणजे मी, त्या माझ्या अवस्था, असे त्याला वाटू लागते. परिणामतः बुद्धीतील/मनातील विकाराप्रमाणे तो वागू लागतो. त्याच्या बऱ्या-वाईट कर्मांना, विषयांना वश होऊन, तो संसारसागरात पडतो. संसारसागराचे पाणी विषयरूपी विषाने युक्त आहे. त्या पाण्यामध्ये तो गटांगळ्या खात संसारातच इकडे तिकडे म्हणजे निरनिराळ्या योनीत फिरत राहतो.


(१४४) आत्म्याला झाकून अहंकार शिरजोर होऊन प्रौढी मिरवितो.

भानु-प्रभा-संजनिताभ्र-पंक्तिर्भानुं तिरोधाय विजृभते यथा ।
आत्मोदिताहंकृतिरात्म-तत्त्वं तथा तिरोधाय विजृम्भते स्वयम् ॥ १४४ ॥
सूर्याच्या प्रभेने म्हणजे उष्णतेने निर्माण झालेल्या ढगांचा समूह हा सूर्याला झाकून स्वतःच स्पष्टपणे मोठा म्हणून दृश्य होतो (विजृम्भते) , त्याप्रमाणे आत्म्यापासून उत्पन्न झालेला अहंकार हा आत्म-तत्त्वाला झाकून टाकून स्वतःच (मी मोठा म्हणून) मिरवू लागतो.


बुद्धीत अंतरात्म्याचे प्रतिबिंब पडताच अहंकार कार्यशील होतो. म्हणून येथे अहंकार हा आत्म्यापासून उत्पन्न होतो असे (गौणपणे) म्हटले आहे. हा अहंकार आत्मतत्त्वाला झाकून 'मी म्हणजेच आत्मा' असा डौल आणतो. जसे - सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन निर्माण झालेले ढग सूर्याला झाकून, ढग या स्वरूपात लोकांपुढे मिरवितात.


(१४५) आत्मा झाकला गेल्यावर विक्षेपशक्ती ही माणसाला त्रासदायक ठरते.

कवलित-दिन-नाथे दुर्दिने सांद्र-मेघैः
   व्यथयति हिम-झंझा-बायुरुग्यो यथैतान् ।
अविरत-तमसात्मन्यावृते मूढ-बुद्धिं
   क्षपयति बहु-दुःखैस्तीव-विक्षेप-शक्तिः ॥ १४५ ॥
पावसाळ्यातील दिवशी घनदाट मेघांनी सूर्य गिळून /झाकून टाकला असता, थंडगार असा (हिम) सोसाट्याचा वादळी वारा हा पृथ्वीवरील या लोकांना त्रासदायक ठरतो. त्याप्रमाणे तमोगुणाने आत्म्याला सतत झाकून टाकले असता, निर्माण होणारी तीव्र अशी रजोगुणाची विक्षेप-शक्ती ही मूढबुद्धी अशा माणसाला पुष्कळ दुःख देऊन क्षीण करून टाकते.


पावसाळ्याच्या दिवशी घनदाट मेघांनी सूर्याला झाकले आहे आणि पावसाच्या वर्षावाने पृथ्वीवर गारवा निर्माण केला आहे. त्यातच जर वादळी वारा सुटला तर तो माणसांच्या अंगाला झोंबू लागतो. त्याप्रमाणे अज्ञानाच्या तमोगुणाने आत्मा झाकला गेल्यावर, अज्ञानात असणाऱ्या रजोगुणाची विक्षेपशक्ती कार्यशील होते. ती आत्म्यावर जग, देह, मन, बुद्धी इत्यादीचा भास निर्माण करते. आणि मग अहंकारामुळे त्यांची दुःखे ती आपली दुःखे असे मोहात पडलेल्या माणसाला वाटू लागते. कारण अहंकारानेच देह म्हणजे मी अशाप्रकारची त्याची समजूत झालेली असते.


(१४६) अशाप्रकारे अज्ञानाच्या आवरणशक्ती आणि विक्षेपशक्ती यांच्या योगाने देह इत्यादींना आत्मा मानून माणूस संसाराच्या बंधनात अडकतो.

एताभ्यामेव शक्तिभ्यां बंधः पुंसः समागतः ।
याभ्यां विमोहितो देहं मत्वात्मानं भवत्ययम् ॥ १४६ ॥
(आवरण आणि विक्षेप या) दोन शक्तींमुळे माणसाला बंध येतो. या दोहोंनी मोहित झालेला पुरुष देह म्हणजे मी आत्मा असे मानीत राहतो.


देहालाच मी असे मानल्याने देह इत्यादीच्या कर्मांनी माणूस जन्ममरणाच्या चक्रात म्हणजे बंधनात अडकतो. देहाला आत्मा मानण्याची ही समजूत आवरण आणि विक्षेप या दोन शक्तींमुळे होते. म्हणजे अज्ञानाच्या आवरण आणि विक्षेप शक्तीमुळे माणसाला संसार-बंध येतो.


(१४७) आवरण आणि विक्षेपशक्तीमुळे आत्म्यावर संसाराचा अध्यास होतो. वृक्षाचे रूपकाद्वारे या संसाराचे वर्णन असे -

बीजं संसृति-भूमिजस्य तु तमो देहात्म-धीरंकुरो
रागः पल्लवमंबु कर्म तु वपुः स्कंधोऽसवः शाखिकाः ।
अग्राणींद्रिय-संहतिश्च विषयाः पुष्पाणि दुःखं फलं
नाना-कर्म-समुद्‌भवं बहुविधं भोक्तात्र जीवः खगः ॥ १४७ ॥
देह-संसाररूपी वृक्षाचे बीज तम आहे. देहाला आत्मा मानणे हा त्या बीजाचा अंकुर आहे. विषयांची आवड/आसक्ती ही त्याची पालवी. कर्म हे त्याला पाणी आहे. शरीर हे त्याचे खोड (स्कंध) आहे. प्राण या त्याच्या फांद्या आहेत. इंद्रियांचा समूह ही त्याची टोके (अग्राणि) आहेत. विषय हे फुले आहेत. नानाप्रकारच्या कर्मांनी उत्पन्न होणारी विविध प्रकारची दुःखे ही त्याची फळे आहेत. येथे त्या वृक्षावर जीव हा भोग घेणारा पक्षी आहे.


येथे देहरूपी संसारावर वृक्षाचे रूपक करून त्यातील सदृश भाग येथे सांगितला आहे, तम म्हणजे तमोगुणजन्य आवरणशक्ती असा अर्थ आहे. कर्माला पाणी म्हटले आहे; पाण्याने वृक्ष वाढतो; त्याप्रमाणे कर्मांनी देह वाढतो व पुनः पुनः देहाची प्राप्ती होते. कर्मरूपी पाणी न घातल्यास हा वृक्ष कोसळून जाईल. वृक्षावर फळे खाणारे पक्षी असतात. देहात जीव हा फळांचा भोक्ता आहे. या देहात अंतरात्मा आहे पण तो फळे भोगणारा नाही; तो केवळ द्रष्टा/साक्षी आहे.


(१४८) देह हा अनात्मा आहे. या अनात्म्यामुळे येणारा बंध हा अनादी आहे.

अज्ञान-मूलोऽयमनात्म-बंधो नैसर्गिकोऽनादिरनंत ईरितः ।
जन्माप्यय-व्याधि-जरादि-दुःख-प्रवाह-पातं जनयत्यमुष्य ॥ १४८ ॥
हा देहरूपी अनात्म्याचा बंध, हा अज्ञान या मुळापासून निर्माण झालेला आहे. तो नैसर्गिक, अनादी आणि अनंत आहे, असे सांगितले गेले आहे आणि तो बंध या जीवाचे (अमुष्य) बाबतीत जन्म, मरण, व्याधी इत्यादींच्या दुःखरूपी प्रवाहात (प्राण्याचे) पतन उत्पन्न करीत असतो.


देह हा अनात्मा आहे. अनात्मा म्हणजे काय हे पुढे श्लोक १५६ पासून सांगितले आहे. अज्ञान हेच अध्यस्त जगाचे आणि देहाचे मूळ कारण आहे. कारण अज्ञानाच्या आवरण आणि विक्षेपशक्तींनी (श्लोक १४६) हा अनात्मदेहाचा बंध जीवाला आला आहे. हा बंध नैसर्गिक आहे म्हणजे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हा सहजपणे चालत राहणारा आहे. हे अज्ञान केव्हापासून आहे हे कुणालाच माहीत नसल्याने ते अनादी आहे; साहजिकच अज्ञान-जन्य बंध सुद्धा अनादी आहे. हा बंध अनंत आहे याचा अर्थ असा - अज्ञान आहे तोवर तो टिकणारा आहे. पण अज्ञानाचा नाश आत्मज्ञानाने झाला की हा बंध नष्ट होणारा आहे, हे मात्र लक्षात ठेवावे. जोपर्यंत अनात्मदेहाचा बंध जीवाला आहे तोपर्यंत जीव हा जन्म, मरण, रोग, जरा इत्यादीमुळे निर्माण होणाऱ्या दुःखांच्या प्रवाहात सातत्याने पडलेला असतो म्हणजे त्याचे दुःख चुकत नाही.


(१४९) हा अनात्मबंध पुढीलप्रमाणे नष्ट होतो.

नास्त्रैर्न शस्त्रैरनिलेन वह्निना
   छेत्तुं न शक्यो न कर्म-कोटिभिः ।
विवेक-विज्ञान-महासिना विना
   धातुः प्रसादेन सितेन मंजुना ॥ १४९ ॥
(हा अनात्म-बंध) अस्त्रे, शस्त्रे, वारा, आनी तसेच कोट्यवधी कर्मे यांनी तोडता येणे शक्य नाही. (फक्त) ईश्वराच्या (धातुः) कृपाप्रसादाने प्राप्त झालेल्या धारदार (शित) आणि प्रचंड अशा विवेक-विज्ञानरूपी सुबक (मंजु) खड्गाविना तो तोडता येणे शक्य नाही.


अनात्म-बंध हा लौकिक जगातील बंधाप्रमाणे/गाठीप्रमाणे नाही. म्हणून तो अस्त्र इत्यादींनी तसेच कोट्यवधी कर्मांनीही तुटणारा नाही. हा बंध अज्ञानामुळे आहे. अनात्मा आणि आत्मा यांच्याविषयीच्या अज्ञानामुळे तो उत्पन्न झाला आहे. साहजिकच हा बंध तुटण्यास आत्मा आणि अनात्मा यातील फरकाचे ज्ञान आवश्यक आहे. या ज्ञानावर येथे तलवारीचे रूपक केलेले आहे. शंकराचार्य व्यावहारिक पातळीवर ईश्वर मानतात. म्हणून त्यांनी येथे ईश्वरी कृपाप्रसादाचा उल्लेख केला आहे.

श्लोकात 'सितेन' या पदाचे स्थानी शितेन' असा पाठभेद आहे. 'शित' म्हणजे तीक्ष्ण म्हणून भाषांतरात 'शित' पाठभेद घेऊन अर्थ केला आहे. 'सित' म्हणजे चमकणारी (तलवार) असा अर्थ होईल.


(१५०) विवेक ज्ञान होण्यास मन शुद्ध हवे. ते शुद्ध कसे होते ते आता सांगितले आहे.

श्रुति-प्रमाणैक-मतेः स्वधर्म-निष्ठा तथैवात्म-विशुद्धिरस्य ।
विशुद्ध-बुद्धेः परमात्म-वेदनं तेनैव संसार-समूल-नाशः ॥ १५० ॥
श्रुति/वेद हे मुख्य (एक) प्रमाण मानणाऱ्या माणसाची स्वधर्मावर निष्ठा असते. त्या स्वधर्म निष्ठेनेच त्या माणसाच्या मनाची शुद्धी होते. (आत्म-विशुद्धी). ज्याचे मन (बुद्धी) शुद्ध झाले आहे त्याला परमात्म्याचे/अंतरात्म्याचे ज्ञान होते. त्या परमात्म-ज्ञानानेच संसाराचा मुळासकट नाश होतो.


परमात्म्याच्या अज्ञानामुळे संसार-बंध आलेला आहे. ते अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले की संसार समूळ नष्ट होतो. परमात्म्याचे ज्ञान शुद्ध मनाला होते. म्हणून 'मनसा एव द्रष्टव्यः' असे एक उपनिषद् सांगते. मन शुद्ध होण्याला स्वधर्माचरण उपयोगी आहे. हा स्वधर्म कोणता हे श्रुतीवरून कळते. येथे 'श्रुति' हा शब्द उपलक्षणेने स्मृति/धर्मशास्त्र हा अर्थ सांगतो. श्रुतीने आणि धर्मशास्त्रांनी माणसांची निरनिराळी कर्तव्ये (धर्म) सांगितली आहेत. ती कर्तव्ये निरपेक्षपणे करीत राहिल्यास काम, क्रोध इत्यादी विकार कमीकमी होऊन मन शुद्ध होते आणि मग शुद्ध मनात आत्मज्ञान प्रगटते. या आत्मज्ञानाने आत्म्याविषयीचे अज्ञान नष्ट होऊन, अज्ञान-जन्य संसार अज्ञानासकट नष्ट होऊन जातो.


GO TOP