|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(७७)
शब्द, स्पर्श इत्यादी विषयांत आसक्त होऊन जीव कर्मे करतात आणि त्या कर्माअंती ते जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात.
य एष मूढा विषयेषु बद्धा रागोरु-पाशेन सुदुर्दमेन ।
आयांति निर्यांत्यध ऊर्घमुच्चैः स्व-कर्म-दूतेन जवेन नीताः ॥ ७७ ॥
जे मूढ/अज्ञानी लोक हे नियंत्रण ठेवण्यास अत्यंत कठीण अशा रागरूपी/आसक्तिरूपी जबरदस्त/दीर्घ पाशाने बद्ध झालेले असतात, ते लोक स्वतःच्या कर्मरूपी दूतांकडून वेगाने नीच अगर उच्च ठिकाणी जात-येत असतात.
माणसांची इंद्रिये स्वभावतः बहिर्मुख, बाह्य विषयांकडे धावणारी आहेत. त्यामुळे विषयांकडे लक्ष जाऊन माणसे विषयांत आसक्त होतात. साहजिकच ते आसक्तिरूपी पाशाने विषयामध्ये बद्ध होऊन बसतात. विषयासक्तीने ते नानाप्रकारची बरीवाईट कर्मे करीत असतातात. मग मेल्यावर ते पुण्य कर्मांनी स्वर्गलोक इत्यादी उच्च लोकांत-स्थानात जातात अथवा पापकर्मांनी पाताल इत्यादी खालच्या लोकांत जातात. आणि या दोन्ही लोकांत त्यांना नेण्यास त्यांची कर्मे हेच दूत बनतात. पुण्य-पापाचा भोग संपताच ते पुनः इहलोकी येतात व कर्मे करतात. अशाप्रकारे कर्मामुळे त्यांचे अध-ऊर्ध्व गमन, जन्ममरण चालूच राहते. ते संसारातच अडकून राहतात.
(७८)
विषयांत आसक्त आणि बद्ध झालेले लोक हे स्वतःचे नुकसान करून घेतात. हे काही प्राण्यांची उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्वमापुः स्व-गुणेन बद्धाः ।
कुरंग-मातंग-पतंग-मीन-भृंगा नरः पंचभिरंचितः किम् ॥ ७८ ॥
स्वतःच्या आसक्तीरूपी दोरीने (गुण) बद्ध झालेले हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि भुंगा हे पाच (प्राणी) शब्द इत्यादी पाच विषयांतील (एकेकातील आसक्तीमुळे) मरण पावतात. मग पाचही विषयांत आसक्त झालेल्या (अंचित) पुरुषाबद्दल काय सांगावे ?
एकेका विषयात अडकल्याने नष्ट होणारे प्राणी असे - हरिण हा शब्द विषयात, हत्ती हा स्पर्श विषयात, पतंग (एक कीटक) रूप या विषयात, मासा हा रस आणि भुंगा हा गंध विषयात, आसक्त होतात. व्याधाचे सुंदर गाणे किंवा मुरली-वादन याला भुलून हरिण व्याधाच्या तावडीत सापडतो. पाळीव हत्तीणीच्या स्पर्शाला पुसून जंगली हत्ती माणसाकडून पकडला जातो. दिव्याचे/ज्योतीचे प्रकाश युक्त रूप पाहून पतंग तेथे उडी टाकतो आणि जळून जातो. लोखंडी गळाला लावलेले भक्ष्य खाताना मासा मरतो अथवा पाण्यात टाकलेले चुरमुरे खाताना मासे जाळ्यात पकडले जातात. हत्तीच्या मदस्रावाच्या गंधाला भुललेले भुंगे हत्तीच्या सोंडेचा प्रहार सोसतात आणि मरून जातात. हे पाच प्राणी मरण पावतात असा शब्दशः अर्थ येथे सर्व प्राण्यांना लागू पडत नाही हे लक्षात घ्यावे. पकडलेले हरिण अथवा हत्ती पाळला जाईल. नक्की नाश पावणारा मात्र पतंग आहे. तेव्हा मरण पावतात म्हणजे नुकसान सोसतात असा गौण अर्थ घेण्यास हरकत नाही. एकेका विषयाला भुललेल्या प्राण्याची वाईट दशा होते. तर मग शब्द इत्यादी पाच विषयांना भुललेला मनुष्यप्राणी किती नुकसान/त्रास/कष्ट सोसेल याची कल्पना करता येईल. विषय हे विषापेक्षा घातक आहेत. (७९)
दोषेण तीव्रो विषयः कृष्ण-सर्प-विषादपि ।
विषं निहंति भोक्तारं द्रष्टारं चक्षुषाप्ययम् ॥ ७९ ॥
कृष्णसर्पाच्या विषापेक्षासद्धा रूप हा विषय अधिक जहाल/घातक तीव्र आहे. कारण विष हे खाणाऱ्याचा नाश करते. परंतु (रूप) हा (अयम) विषय पहाणाऱ्यालासुद्धा ठार करतो.
रूप हा विषय 'ठार करतो' याचा अर्थ रूपात गुंगलेल्या माणसाचे पारलौकिक आध्यात्मिक भवितव्य/कल्याण तो विषय नष्ट करतो असा घ्यावयास हवा. कारण रूप हा विषय केवळ पाहून कुणी मरत नाही.
(८०)
विषय घातक आहेत (श्लोक ७८). साहजिकच त्या विषयांची आशा हीसुद्धा घातक आहे. म्हणून विषयाशा धरू नये.
विषयाशा - महापाशाद् यो विमुक्तः सुदुस्त्यजात् ।
स एव कल्पते मुल्त्यै नान्यः षट्-शास्त्र-वेद्यपि ॥ ८० ॥
टाकावयास अत्यंत कठीण अशा विषयाची आशा हा एक मोठा फास आहे; त्यांतून जो कोणी सुटलेला आहे तोच मुक्ती प्राप्तीला योग्य ठरतो; त्याच्याखेरीज अन्य कोणीही जरी सहा शास्त्रे जाणणारा असला तरीसुद्धा तो मोक्षप्राप्तीसाठी पात्र ठरत नाही.
विषयांच्या आशेतून सुटलेला माणूस म्हणजे वैराग्याने संपन्न असा माणूस. तोच मोक्षासाठी पात्र ठरतो (श्लोक ३० पहा). इतर कुणी कितीही विद्वान असला आणि विषयांत आसक्त असला तर तो मोक्षप्राप्तीसाठी पात्र ठरत नाही. भिन्न भिन्न दृष्टिकोनातून सहा शास्त्रे ही पुढीप्रमाणे भिन्न दिली जातात - (१) छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा, कल्प. (२) धर्मशास्त्र, सांख्यशास्त्र, वेदांतशास्त्र, न्यायशास्त्र, कामशास्त्र, योगशास्त्र. (३) कापालिक, लोकायतिक, दिगंबर, शून्यवाद, निरीश्वरवाद, चार्वाक. (४) पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक. ८१
वरवरचे वैराग्य असणाऱ्याला विषयांची आशा मोहातच पाडते.
आपात-वैराग्यवतो मुमुक्षून् भवाब्धिपारं प्रति यातुमुद्यतान् ।
आशा-ग्रहो मज्जयतेऽन्तराले निगृह्य कंठे विनिवर्त्य वेगात् ॥ ८१ ॥
वरवरचे/दिखाऊ वैराग्य असणाऱ्या आणि संसार सागराच्या पलीकडे जाण्यास उद्युक्त झालेल्या मुमुक्षूंना विषयांची आशारूपी मगर ही वेगाने त्यांचा गळा पकडून व त्यांना मागे/उलटे फिरवून, संसार-सागराच्या मध्येच (अंतराले) बुडविते.
फारसे वैराग्य नसणारा मुमुक्षू हा संसारसागराच्या पलीकडे जाण्यास निघाला पण त्याच्या मनात अद्यापि विषयांची आशा आहे. ही आशा मगरीप्रमाणे त्याला पकडते आणि संसारसागरातच त्याला बुडवून टाकते म्हणजे तो पुनः संसारातच रमून जातो. (ग्रह म्हणजे पिशाच असाही अर्थ आहे.)
(८२)
वैराग्याने ज्याने विषयांची आशा नष्ट केली आहे तो संसारसागर तरून जातो.
विषयाशा-ग्रहो येन सु-विरक्त्त्यसिना हतः ।
स गच्छति भवांभोधेः पारं प्रत्यूह-वर्जितः ॥ ८२ ॥
जो कोणी मुमुक्षू विषय-आशारूपी मगरीला (पिशाचिणीला) तीक्ष्ण विरक्ती-रूपी तलवारीने ठार करतो, तोच अन्य अडथळे मध्ये न येता, भवसागराच्या पार जातो.
विषयांची आशा ही वैराग्याच्या द्वारा जो कोणी नष्ट करतो, तोच संसारसागर पार करून जाऊ शकतो.
(८३)
म्हणून विषयांत गुंतून न पडता, अंगी वैराग्य बाणवून घेऊन, गुरूपदिष्ट मार्गाने जाणे आवश्यक आहे.
विषम-विषय-मार्गेर्गच्छतोऽनच्छ-बुद्धेः
प्रतिपदमधियातो मृत्युरप्येष विद्धि । हित-सुजन-गुरूक्त्या गच्छतः स्वस्य युक्ता प्रभवति फल-सिद्धिः सत्यमित्येव विद्धि ॥ ८३ ॥
मलिन बुद्धी असणारा जो माणूस विषयांच्या खडतर मार्गांनी जातो, त्याच्यावर पावलोपावली हा मृत्यू चाल करून येतो, असे हे शिष्या तू जाणून घे. याउलट हितकर आणि सज्जन अशा गुरूच्या वचनानुसार (आणि त्याला धरून) स्वतःच्या तर्काने जो वाटचाल करतो/वागतो, त्याच्या बाबतीत फलाची सिद्धी प्राप्त होते, हे सत्यच आहे, असे हे शिष्या तू जाण.
विषयाच्या मागे लागण्याने नाश, नुकसान, तोटा आहे. (श्लोक ७८) म्हणून तो मार्ग सोडून द्यावा आणि गुरूपदिष्ट मार्गाने गेल्यास मोक्षरूपी फळाची सिद्धी प्राप्त होते.
(८४)
तेव्हा विषयाशा सोडून, संतोष इत्यादी सद्गुण अंगी बाणवून घ्यावेत.
मोक्षस्य कांक्षा यदि वै तवास्ति त्यजातिदूराद् विषयान् विषं यथा ।
पीयूषवत् तोष-दया-क्षमार्जव-प्रशांति-दांतीर्भज नित्यमादरात् ॥ ८४ ॥
हे शिष्या, जर तुला मोक्षाची इच्छा असेल, तर तू विषाप्रमाणे विषयांना खूप लांब टाकून दे. आणि सतत आदरपूर्वक संतोष, दया, क्षमा, आर्जव, प्रशम आणि दम यांचा अमृताप्रमाणे स्वीकार कर.
विषय टाकणे याचा अर्थ नीट समजून घ्यावयास हवा. काही विषय हे तर जगण्यासाठी आवश्यकच आहेत. ते टाकून कसे चालेल ? म्हणून विषय टाकणे याचा अर्थ विषयातील आसक्ती टाकणे असा घ्यावा लागतो. विषयासक्ती दूर करण्यास उपयोगी पडणारे काही गुण येथे सांगितले आहेत. तोष म्हणजे आहे त्यात समाधान मानणे. इतरांच्या बाबतीत दया, क्षमा आणि सरळपणा बाळगावयास हवेत. प्रशांति म्हणजे मनाचा शम आणि दांति म्हणजे इंद्रियांचे दमन हे गुण अंगी बाणवण्यास प्रयत्न आवश्यक आहे. अमृतप्राप्तीसाठी देवांनी ज्याप्रमाणे यत्न केले तसे मुमुक्षूने प्रयत्न करावयास हवेत.
(८५)
विषयासक्तीप्रमाणे देहासक्तीही टाकावयास हवी.
अनुरूपं यत् परिहृत्य कृत्यमनाद्यविद्या-कृत-बंध-मोक्षणम् ।
देहः परार्थोऽयममुष्य पोषणे यः सज्जते स स्वमनेन हंति ॥ ८५ ॥
अनादी अविद्येने केलेल्या बंधनातून सुटका करून घेणे हे आपले योग्य/आवश्यक (अनुरूप) कर्तव्य आहे. दुसऱ्यासाठी असणाऱ्या (परार्थ) देहाच्या पुष्टीकरणात जो कोणी आसक्त होतो, तो या देहाच्या योगाने स्वतःलाच नष्ट करतो.
अनादी अज्ञानामुळे आलेले संसाराचे बंधन तोडणे हे माणसाचे प्राथमिक मूलभूत कर्तव्य आहे. ते टाळून जर कोणी देहाचे चोचले पुरवतो तो स्वतःचे नुकसान करून घेतो. कारण देह हा परार्थ आहे. याचे दोन अर्थ होतात - (१) जिवंत किंवा मृत देह हा सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांचे भक्ष्य होऊ शकत असल्याने तो परार्थ आहे. (२) देह हा पर असणाऱ्या आत्म्यासाठी आहे. देह असेल तर पर अशा आत्म्याचा साक्षात्कार होईल. ''स्वं हंति'' याचेही दोन अर्थ असे - (१) माणूस स्वतःचा नाश करून घेतो म्हणजे स्वतःला दुःखात ढकलतो. (२) माणूस स्वतःला म्हणजे आत्म्याला - कारण स्व म्हणजे आत्मा असा अर्थ आहे - मारतो म्हणजे आत्महत्यारा होतो. म्हणून विषयासक्तीप्रमाणे देहावरील आसक्तीही दूर टाकावयास हवी.
(८६) देहाचे लाड करणे हे मूर्खपणाचे आहे.
शरीर-पोषणार्थी सन् य आत्मानं दिदृक्षति ।
ग्राहं दारु-धिया धृत्वा नदीं तर्तुं स गच्छति ॥ ८६ ॥
शरीराचे पोषण/लाड करीत जो कोणी आत्म्याला पाहू/जाणू इच्छितो, तो माणूस लाकूड म्हणजे मगर असे समजून व तिला धरून नदी तरून जाण्यास निघतो.
शरीर हे परमार्थाला आवश्यक आहे हे खरे. परंतु त्याला अतिशय महत्त्व देऊन त्याचे चोचले पुरविणे हे मात्र घातक आहे. कारण त्यामुळे आत्मज्ञान या साध्यावरून लक्ष कमी होईल. लाकडाचा ओंडका नदी तरून जाण्यास उपयोगी हे खरे. पण मगरीलाच ओंडका समजून नदी पार करता येणार नाही. म्हणून शरीरावरची आसक्ती टाकून आत्म्याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
(८७)
विषय, देह या विषयांची आसक्ती, मोह घातक आहे. या मोहाबद्दल श्लोक ८७-८८ मध्ये सांगितले आहे.
मोह एव महामृत्युर्मुमुक्षोर्वपुरादिषु ।
मोहो विनिर्जितो येन स मुक्ति-पदमर्हति ॥ ८७ ॥
शरीर इत्यादीवर असणारा मोह हा मुमुक्षूचा महामृत्यू आहे. ज्याने मोह जिंकला तो मोक्ष-पद पावण्यास पात्र ठरतो.
मोह म्हणजे अतिशय आवड आणि त्याअंती येणारी आसक्ती. निद्रा हा माणसाचा दैनंदिन मृत्यू आहे. अंतिम मृत्यु हा महामृत्यु होय. मोह हा महामृत्यु आहे. म्हणजे मोहामुळे माणसाचा सर्वप्रकारे नाश होतो. 'शरीर इत्यादी' म्हणजे शरीर, इंद्रिये, बाह्य शब्द, स्पर्श, इत्यादी सर्व अनात्म पदार्थ. मोह आणि मोक्ष हे एकाच वेळी मिळविता येत नाहीत. जो मोहाला जिंकतो तो मोक्षप्राप्तीला पात्र ठरतो.
(८८)
मोहं जहि महामृत्युं देह-दार-सुतादिषु ।
यं जित्वा मुनयो याति तद् विष्णोः परमं पदम् ॥ ८८ ॥
देह, पत्नी, पुत्र इत्यादीविषयी असणारा महामृत्युरूपी मोह, हे शिष्या तू टाकून दे. त्याला जिंकल्यावर मगच संयमी (मुनि) पुरुष हे विष्णूच्या त्या प्रसिद्ध श्रेष्ठ स्थानी जातात.
मोह असेल तर मोक्ष नाही. म्हणून मोक्षासाठी मोह टाकावयास हवा. ''विष्णूचे ते प्रसिद्ध श्रेष्ठ पद'' म्हणजे मोक्षपद. विष्णू शब्दाने सर्वव्यापक ब्रह्म/आत्मा अभिप्रेत आहे. मोक्ष म्हणजे संसारापेक्षा वेगळे असणारे असे एक विशिष्ट स्थान अशी मोक्षाची एक संकल्पना भगवद्गीतेने दिलेली आहे.
(८९) ज्या स्थूल देहाविषयी माणसाला मोह, ममत्व, आसक्ती वाटते, तो अत्यंत घाणेरडा आहे.
त्वङ्-मांस-रुधिर-स्नायु-मेदो-मज्जास्थि-संकुलम् ।
पूर्णं पूत्र-पुरीषाभ्या स्थूल निंद्यमिदं वपुः ॥ ८९ ॥
त्वचा, मांस, रक्त, स्नायु, मेद, मज्जा आणि हाडे यांनी भरलेले आणि मलमूत्रांनी युक्त (पूर्ण) असे हे स्थूल शरीर निंदेस पात्र आहे.
वर चामडी आहे तोपर्यंत स्थूल शरीर गोंडस वाटते. चामडी बाजूला काढली की आत हाडे इत्यादी घाण पदार्थ आहेत. घाणेरड्या मल आणि मूत्र यांनी ते युक्त आहे. संक्षेपाने स्थूल शरीर हे घाण वस्तूंचे आगर आहे.
(९०) या स्थूल शरीराविषयी अधिक माहिती अशी आहे -
पंचीकृतेभ्यो भूतेभ्यः स्थूलेभ्यः पूर्व-कर्मणा ।
समुत्पन्नमिदं स्थूलं भोगायतनमात्मनः । अवस्था जागरस्तस्य स्थूलार्थानुभवो यतः ॥ ९० ॥
पंचीकरण प्रक्रियेने बनलेल्या स्थूल अशा पाच महाभूतांपासून हे स्थूल शरीर पूर्वीच्या कर्मानुसार बनलेले आहे. ते जीवात्म्याच्या भोगाचे आश्रयस्थान आहे. जागृती ही त्या स्थूल देहाची अवस्था आहे. कारण त्याच अवस्थेत माणसाला जगातील पदार्थांचे ज्ञान व अनुभव येतो.
आत्तापर्यंतच्या १-८९ श्लोकात पंचीकरणाची माहिती कुठेच आलेली नाही. ती शिष्याला माहीत आहे असे येथे गृहीत धरलेले दिसते. पंचीकरणाची माहिती प्रस्तावनेत पहा. आकाश इत्यादी पाच सूक्ष्म भूतांपासून पंचीकरणाने आकाश इत्यादी स्थूल महाभूते बनतात आणि त्या स्थूल महाभूतांच्या विशिष्ट मिश्रणाने स्थूल शरीर बनते. त्यासाठी माणसाच्या पूर्व कर्मांची प्रेरणा असते. स्थूलदेह कार्यरत असतानाच माणसाला जगातील पदार्थांचे ज्ञान होते आणि अनुभव येतो. त्याअंती त्याला सुखदुःखाचा भोग घेता येतो. म्हणून स्थूल देह हा भोगांचे आश्रयस्थान असे म्हटले आहे. स्वप्न आणि निद्रा या अवस्थांत स्थूल देह निष्किय असतो. तो जेव्हा कार्यप्रवण असतो, त्या स्थितीला जागर/जागृती असे म्हणतात. येथे आत्मन् म्हणजे माणूस असा अर्थ घेतला आहे. तोच अर्थ पुढील श्लोक ९१ मध्ये आहे. (९१)
बाह्येंद्रियैः स्थूल-पदार्थ-सेवां स्रक्-चंदन-स्र्यादि-विचित्र-रुपाम् ।
करोति जीवः स्वयमेतदात्मना तस्मात् प्रशस्तिर्वपुषोऽस्य जागरे ॥ ९१ ॥
(डोळा इत्यादी) बाह्य इंद्रियांच्या द्वारा माळ, चंदन, स्त्री इत्यादी नाना प्रकारच्या (विचित्र) स्वरूपांच्या स्थूल पदार्थांचा भोग (सेवा) जीव स्वतः (आत्मना) घेत असतो. म्हणून जागृतीमध्ये स्थूल शरीराला महत्च (प्रशस्ति) दिले जाते.
स्थूल शरीर जेव्हा कार्यप्रवण असते तेव्हा डोळा इत्यादी बाह्य इंद्रिये बाह्य विषयांकडे धावतात, मग त्यांचे ज्ञान होते; त्यानंतर सुखदुःख होते. सुखदुःखांचा अनुभव हाच भोग.
खरे म्हणजे सर्व इंद्रिये ही सूक्ष्म देहात असतात (श्लोक ९८ पहा). तथापि, त्यातील डोळा इत्यादी इंद्रिये स्थूल देहावर दिसतात. ती बाह्य विषयांच्या संपर्कात येतात म्हणून त्यांना बाह्य इंद्रिये म्हणतात. मन, चित्त, बुद्धी व अहंकार या चार वृत्तींद्वारा प्रगट होणारे अंतःकरण हे मात्र आंतर इंद्रिय होय. (९२) माणसाचा जगातील सर्व व्यवहार हा स्थूल देहावर अवलंबून असतो.
सर्वोऽपि बाह्य-ससार पुरुषस्य यदाश्रयः ।
विद्धि देहमिदं स्थूल गूहवद् गृहमेधिनः ॥ ९२ ॥
माणसाचा सर्व बाह्य संसार म्हणजे व्यवहार हा स्थूल देहाच्या आश्रयाने/आधाराने चालतो. म्हणून गृहस्थाश्रमातीला गृहस्थाच्या घराप्रमाणे हे स्थूल शरीर आहे, असे (हे शिष्या) तू जाण. वैवाहिक जीवन जगणारा तो गृहमेधिन् तो आपल्या घरातच राहून सर्व व्यवहार करीत असतो. (९३) स्थूल देहाची आधिक माहिती श्लोक ९३ मध्ये आहे -
स्थूलस्य संभव-जरा-मरणानि धर्माः
स्थौल्यादयो बहुविधाः शिशुताद्यवस्था । वर्णश्रमादि-नियमाः बहुधामयाः स्युः पूजावमान-बहुमान-प्रमुखा विशेषाः ॥ ९३ ॥
उत्पत्ती, म्हातारपण आणि नाश हे धर्म, स्थूलपणा इत्यादी पुष्कळ प्रकारचे आकार, बालपण इत्यादी अवस्था, वर्ण आणि आश्रम इत्यादींना लागू पडणारे नाना नियम अनेक प्रकारचे (बहुधा) रोग, आणि सन्मान (पूजा), अपमान, बहुमान हे मुख्य असणारे विशेष, हे सर्व स्थूल देहाला असतात.
धर्म म्हणजे अंगभूत गुण. उदा., जन्म, मरण, इत्यादी. लठ्ठपणा इत्यादी शरीराचे विविध आकार आहेत. बालपण इत्यादी स्थूल शरीराच्या विभिन्न अवस्था आहेत. येथे वर्ण म्हणजे रंग नव्हे, तर आर्य समाजातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांपैकी एखादा वर्ण. यातील पहिल्या तीन वर्णांतील लोकांसाठी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम सांगितले होते. वर्ण व आश्रम यांचे नियंत्रण करण्यासाठी 'मनुस्मृती 'इत्यादीसारख्या धर्मशास्त्रांनी काही नियम घालून दिले होते. ''वर्णाश्रमादि'' मधील ''आदि'' पदाने राजा इत्यादींनी केलेले आचाराचे नियम सूचित होतात. स्थूल शरीरालाच ताप, क्षय इत्यादी रोग होतात. मान, अपमान इत्यादीही स्थूल शरीरालाच धरून होतात. यातील कशाचाही स्थूल देहाच्या उपाधीत असणाऱ्या अंतरात्म्याकडे संबंध जात नाही.
(९४) श्लोक ९१ मध्ये सांगितलेल्या बाह्य इंद्रियांचे परिगणन आता दिले आहे.
बुद्धीन्द्रियाणि श्रवणं त्वगक्षि घ्राणं च जिह्वा विषयावबोधनात् ।
वाक्-पाणि-पादं गुदमप्युपस्थः कर्मेंद्रियाणि प्रवणेन कर्मसु ॥ ९४ ॥
शब्द, स्पर्श, इत्यादी बाह्य विषयांचे ज्ञान करून देत असल्यामुळे, श्रोत्र, त्वचा, डोळा, नाक आणि जीभ ही ज्ञानेंद्रिये होत. कर्माचे ठिकाणी माणूस प्रवृत्त होत असताना (प्रवणेन) त्याला उपयोगी पडणारी वाणी, हात, पाय, गुद आणि शिश्न ही कर्मेंद्रिये आहेत.
ज्ञान करून देणारी ती ज्ञानेंद्रिये (बुद्धीन्द्रिये) आणि कर्म करणारी ती कमेंद्रिये. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या बाह्य विषयांचे ज्ञान माणसाला अनुक्रमे श्रोत्र, त्वचा, डोळा, जिव्हा आणि नाक या इंद्रियांमार्फत होते. देणे-घेणे हे कर्म हात करतात; चालणे, पळणे हे पायामुळे; बोलताना वाणी कार्य करते. मल उत्सर्जन गुद इंद्रिय करते. मूत्र-उत्सर्जन आणि संभोगानंद हा उपस्थ इंद्रियाचे द्वारा होतो.
(९५-९६) बाह्य इंद्रियांच्या अपेक्षेने आता आंतर इंद्रिये सांगितली आहेत. खरे म्हणजे आंतर इंद्रिय 'अंतःकरण' हे एकच आहे. पण वृत्तीला अनुसरून ते मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार असे चार स्वरूपाचे होते. ही चार आंतर इंद्रिये व त्यांचे स्पष्टीकरण यापुढे दिलेले आहे.
निगद्यते अनःकरणं मनो-धीरहंकृतिश्चित्तमिति स्व-वृत्तिभिः ।
मनस्तु सकल्प-विकल्पनादिभिर्बुद्धिः पदार्थाध्यवसाय-धर्मतः ॥ ९५ ॥ अत्राभिमानादहमित्यहंकृतिः स्वार्थानुसंधान - गुणेन चित्तम् ॥ ९६ ॥
अंतःकरणाला आपल्या भिन्न वृत्तींमुळे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे म्हटले जाते. संकल्प, विकल्प इत्यादी वृत्तीमुळे अंतःकरण हे मन होते. हा पदार्थ अमुक आहे असा निश्चय करण्याच्या धर्मा-(वृत्ती)मुळे अंतःकरण हेच बुद्धी होते. येथे शरीर, इंद्रिये इत्यादीवर अभिमान बाळगल्याने ''मी'' असे म्हणणारा अहंकार आहे. स्वतःच्या विषयावर (स्व-अर्थ) अनुसंधान ठेवणे या वृत्तीमुळे (अंतःकरण) चित्त होते.
अंतःकरण म्हणजे आतील (देहाचे आतील) इंद्रिय (करण) होय. ते वृत्तिमय आहे. वृत्ती म्हणजे एक विशिष्ट अवस्था. अंतःकरणात ज्या ज्या वृत्ती प्रबळ असतील त्या वृत्तींना अनुसरून भिन्न नावे दिली जातात. उदा., संकल्प-विकल्प करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे मन. एखाद्या विषयाबद्दल/विचाराबद्दल निश्चय झाला की ती अंतःकरणाची वृत्ती ही बुद्धीच्या नावाने ओळखली जाते. आपल्या विषयाचे अनुसंधान/चिंतन करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे चित्त. शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त म्हणजे 'मी' असा अभिमान बाळगणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अहंकार. अशाप्रकारे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या स्वरूपात अंतःकरण चतुर्विध आहे.
(९७) कार्यप्रवण होण्यास स्थूल शरीराला शक्ती लागते. ही शक्ती प्राणरूप आहे. हा प्राण शरीरात पाच प्रकारांनी कार्य करतो.
प्राणापान-व्यानोदान-समाना भवत्यसौ प्राणः ।
स्वयमेव वृत्ति-भेदाद् विकृतिर्भेदात् सुवर्ण-सलिलवत् ॥ ९७ ॥
तो (एकच) प्राण हा स्वतःच प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असा कार्य-भेदामुळे (वृत्ति-भेदात्) पाच प्रकारचा होतो. जसे - विकारभेदांमुळे सोने अगर पाणी हे भिन्न नावांनी ओळखले जातात .
प्राणशक्ती ही मूलतः एकच आहे. पण ती स्थूल शरीरात पाच प्रकारांनी कार्य करते. म्हणून तिला प्राण इत्यादी भिन्न नावे दिली जातात. उदा., एकाच सोन्याला अंगठी, बांगडी, पाटली अशी नावे मिळतात किंवा एकाच पाण्याला वाफ, बर्फ, पाणी, तरंग इत्यादी नावे दिली जातात.
(९८) स्थूल शरीरानंतर आता सूक्ष्म शरीर आणि पुर्यष्टक यांची माहिती येते.
वागादि पंच श्रवणादि पंच प्राणादि पंचाश्च-मुखानि पंच ।
बुद्ध्याद्यविद्यापि च काम-कर्मणी पुर्यष्टकं सूक्ष्मशरीरमाहुः ॥ ९८ ॥
वाणी इत्यादी पाच (कर्मेंद्रिये) श्रोत्र इत्यादी पाच ज्ञानेंद्रिय, प्राण इत्यादी पाच (प्राण), आकाश (खं) इत्यादी पाच सूक्ष्म भूते, बुद्धी इत्यादी आणि अविद्या, काम आणि कर्म यांना पुर्यष्टक आणि सूक्ष्म शरीर म्हणतात.
सूक्ष्म शरीरात पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, बुद्धी आणि मन असे सतरा घटक असतात. पुर्यष्टक ही कल्पना वेगळी आहे. पुर्यष्टक (पुरी+अष्टक) म्हणजे आठनगरींचा समूह. येथे पुरी शब्दाने समूह ही संकल्पना अभिप्रेत आहे. त्यानुसार - पाच ज्ञानेंद्रियांचा समूह, पाच कर्मेंद्रियांचा समूह, पाच प्राणांचा समूह; आकाश इत्यादी पाच सूक्ष्म भूतांचा समूह; बुद्धी, चित्त, मन आणि अहंकार हा समूह, असे पाच समूह होतात. यांमध्ये अविद्या, काम आणि कर्म यांचे तीन समूह मिसळले, की आठ समूह होतात. ईश्वराची उपाधी अविद्या आणि जीवांची उपाधी अविद्या असा एक समूह. काम म्हणजे इच्छा; इच्छा अनेक असल्याने त्यांचा एक समूह होतो किंवा श्लोक ११४ मध्ये म्हटल्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, दंभ, असूया, ईर्ष्या, अहंकार आणि मत्सर यांचा समूह. कर्मे ही पाप पुण्यात्मक, नित्य-नैमित्तिक, प्रारब्ध-क्रियमाण-संचित अशा समूहांत असतात.
(९९) सूक्ष्म शरीराची अधिक माहिती अशी -
इदं शरीर शृणु सूक्ष्म-संज्ञिनं लिंगं त्वपंचीकृत-भूत-संभवम् ।
स-वासनं कर्म-फलानुभावकं स्वाज्ञानतोऽनादिरुपाधिरात्मनः ॥ ९९ ॥
(हे शिष्या) ऐक. सूक्ष्म ही संज्ञा असणारे हे लिंगशरीर अपंचीकृत अशा सूक्ष्म भूतांपासून निर्माण होते. ते वासनेने युक्त आणि कर्मफळांचा भोग अनुभव-देणारे असते. स्वतःच्या =प्रत्यगात्म्याच्या अज्ञानामुळे ते आत्म्याची अनादि उपाधी आहे.
स्थूल शरीर हे अंतरात्म्याची/प्रत्यगात्म्याची उपाधी बनते. त्याप्रमाणे सूक्ष्म शरीर हे सुद्धा प्रत्यगात्म्याची उपाधी बनते. या सूक्ष्म शरीराला येथे 'अनादि' असे म्हटले आहे. याचे कारण असे - माणसाच्या बाबतीत कर्म-जन्म-कर्म-पुनर्जन्म असे रहाटगाडगे चालू आहे. हे केव्हापासून आहे हे ज्ञात नाही. प्रत्येक जन्मात स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म शरीर असतेच म्हणून ते संसाराप्रमाणे अनादि आहे. मरणाने स्थूल देहाचा नाश होतो; पण सूक्ष्म शरीर नष्ट होत नाही; माणसाला मोक्ष मिळेपर्यंत हे सूक्ष्म शरीर टिकून असते. म्हणून ते जरी अनादि आहे तरी ते अनंत-नाशरहित-नाही. मोक्षाने त्याचा नाश होतो. सूक्ष्म शरीर हे माणसाच्या कर्मफळभोगाचे म्हणजे सुखदुःखांच्या भोगांचे म्हणजे अनुभवांचे साधन आहे. कारण मनाला सुखदुःख होते आणि मन हे सूक्ष्म शरीराचा घटक आहे. म्हणून सूक्ष्म हे भोगाचे साधन असे म्हटले आहे. अनादि अविद्या ही परमात्म्याला उपाधी येते. (प्रस्तावनेतील अध्यारोप पहा.) त्यामुळे आत्म्यावर जगाचा अध्यास होतो. अध्यस्त जगात स्थूल व सूक्ष्म शरीरे निर्माण होतात आणि ती आत्म्याची उपाधी बनतात. म्हणून येथे स्वतःच्या म्हणजे आत्म्याच्या अज्ञानाने आत्म्याला सूक्ष्म शरीराची उपाधी येते असे म्हटले आहे. मन हा सूक्ष्म शरीराचा घटक आहे. नाना प्रकारच्या वासना/संस्कार मनात घर करून असतात. म्हणून सूक्ष्म शरीर हे वासनांनी युक्त असते (स-वासन) असे येथे म्हटले आहे. प्रस्तावनेत अध्यारोप प्रक्रियेत पाहिल्याप्रमाणे अपंचीकृत अशा आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांपासून सूक्ष्म शरीराचे सतरा घटक उत्पन्न होतात. अपंचीकृत म्हणजे ज्यात पंचीकरण प्रक्रिया झालेली नाही. म्हणून अपंचीकृत भूते म्हणजे सूक्ष्म भूते. सूक्ष्म शरीरालाच लिंग शरीर असे म्हणतात. याचे कारण असे - जे गुप्त अथवा दडलेल्या गोष्टींचे ज्ञान करून देते ते (लीनं अर्थं गमयति इति व्युत्पत्त्या लिंगं इति उच्यते । (आत्मानात्मविवेक ५४) प्रत्यगात्मा (ब्रह्म) देहात गूढ रूपाने आहे. त्याचे ज्ञान सूक्ष्म शरीर करून देते. कसे याचे उत्तर असे - श्रवण, मनन, निदिध्यासन यांचे द्वारा गूढ आत्मा प्रत्ययाला येतो. श्रवण, मनन, निदिध्यासन यासाठी मन आवश्यक आहे. आणि ते सूक्ष्म देहात आहे. म्हणून गूढ आत्म्याचे ज्ञान करून देण्याचे साधन लिंग शरीर आहे. (श्रवण-मननादिना गमयति ज्ञापयति । आत्मानात्मविवेक, ५४) (१००) स्थूल शरीराची अवस्था जागृती असे श्लोक ९० मध्ये म्हटले होते. म्हणजे स्थूल शरीर हे जागृतिअवस्थेत कार्यप्रवण असते. सूक्ष्मशरीराची अवस्था स्वप्न आहे म्हणजे सूक्ष्म शरीर स्वप्नात कार्य करते इत्यादी भाग आता सांगितला आहे.
स्वप्नो भवत्यस्य विभक्त्यवस्था स्व-मात्र-शेषेन विभाति यत्र ।
स्वप्ने तु बुद्धिः स्वयमेव जाग्रत्-कालीन-नानाविध-वासनाभिः ॥ १०० ॥ धी-मात्रकोपाधिरशेष-साक्षी न लिप्यते तत्कृत-कर्म-लेशैः । यस्मादसंगस्तत एव कर्मभिर्न लिप्यते किंचिदुपाधिना कृतैः ॥ १०१ ॥
स्वप्न ही या सूक्ष्म शरीराची वेगळी/स्वतंत्र अवस्था आहे. कारण येथे (यत्र) फक्त स्वतः (सूक्ष्म शरीर) इतकेच उरलेले असते. (श. - प्रकाशत असते, कार्यप्रवण असते). तथापि, स्वप्नात जागृतीच्या काळातील नानाप्रकारच्या वासनांच्याद्वारा बुद्धी (मन) ही कर्ता इत्यादी रूपे धारण करून स्वतःच कार्यप्रवण असते (श. -प्रकाशत-राजते). या स्वप्नअवस्थेत (यत्र) हा परमात्मा (प्रत्यगात्मा) स्वतःच प्रकाशत असतो (भाति). फक्त बुद्धी ही उपाधी असणारा आणि सर्वांचा साक्षी असा तो परमात्मा मात्र त्या बुद्धीने केलेल्या कर्मांच्या लेशांनीसुद्धा लिप्त होत नाही; कारण (यतः) तो परमात्मा स्वतः असंग आहे. म्हणूनच (अतएव) उपाधीने केलेल्या कर्मांनी तो जरासुद्धा लिप्त होत नाही.
सूक्ष्म शरीराची अवस्था स्वप्न आहे म्हणजे सूक्ष्म शरीर हे स्वप्नामध्ये कार्यप्रवण असते. स्वप्न ही अवस्था जागृती आणि निद्रा या अवस्थांपेक्षा वेगळी आहे. स्वप्नावस्थेत लिंगशरीरातील बुद्धी (मन) ही जागृतीत प्राप्त झालेल्या वासनांमुळे कर्ता, कर्म इत्यादी रूपे धारण करून कार्यप्रवण होते. स्वप्न या अवस्थेत द्रष्टा/साक्षी या नात्याने परमात्मा म्हणजे प्रत्यगात्मा अथवा अंतरात्मा हा स्वतः असतोच. पण तो स्वतः असंग असल्यामुळे, बुद्धीचा किंवा बुद्धीच्या कर्मांचा लेप त्याला लागत नाही. स्वप्नात बुद्धी ही परमात्म्याची उपाधी आहे; त्या बुद्धी या उपाधीने केलेल्या कर्मांचा लेप परमात्म्याला/प्रत्यगात्म्याला लागत नाही. |