॥ श्री तुकाराम गाथा ॥
अभंग ०००१ ते ०१००


१. समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथे माझी हरि वृत्ति राहो ॥ १ ॥
आणिक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा ॥ २ ॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित्त झणीं जडो देसी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचे कळलें आम्हा वर्म । जें जें कर्मधर्म नाशवंत ॥ ४ ॥
हे हरी, समान चरण आणि समान दृष्टी असलेली जी तुझी विटेवर सुंदर मूर्ती आहे तेथे माझी अंतःकरणवृत्ती अखंड राहो. या अभंगात समचरण आणि समदृष्टी या दोन पदांनी विठ्ठलाचे तटस्थ लक्षण सांगितले आहे. 'स भूमि विश्वतोवृत्वात्यतिष्ठदशांगुम्' (पु. सू. १).तो विठ्ठल पृथिव्यादिकांना अंतर्बाह्य व्यापून दशांगुलपरिमित असलेल्या विटेवर, भक्तानुग्रहार्थ पाय जोडून अतिशय उत्कर्षाने उभा आहे. या श्रुतीतील वर्णनावरून 'समचरण' हे विठ्ठलाचे सगुण साकार रूप आहे हे सिद्ध होते. 'समदृष्टी' याचा अर्थ सर्व भक्तांवर ज्याची समान कृपादृष्टी आहे. किंवा ज्याच्या नेत्रकमलांतील दृष्टी, योग्याच्या ध्यानमुद्रेप्रमाणे किंचित अर्धोन्मीलित आणि इतर दिशांकडे न पाहता समोरच्या भक्तावरच केन्द्रित झालेली आहे. सारांश, समचरण आणि समदृष्टी या दोन पदांनी विटेवर विराजमान असलेल्या सुंदर अशा मूर्तीचे वर्णन करून विठ्ठलाचे तटस्थलक्षण सांगितले आहे. अथवा समदृष्टी या पदाने स्वरूपलक्षण सांगितले आहे. 'दृश्' धातूवरून 'स्त्रियां क्तिन' (३ । ३ । ९४) या सूत्राने भावे क्तिन् प्रत्यय होऊन दृष्टी हे रूप झाले आहे. ही दृष्टी परमार्थतः द्रष्टादृश्यभावरहित आहे. तरीपण कल्पित द्रष्ट्यात आणि दृश्यात अधिष्ठानरूपाने समान आहे म्हणून दृष्टिपदाचा अर्थ आश्रयविषयरहित केवळ दृक् म्हणजे स्वरूपभूतज्ञान असा आहे. 'प्रज्ञानधन एव' (बृ. ४/५/१३) या श्रुतीत विठ्ठल केवळ ज्ञानस्वरूप असल्याचे सांगितले आहे. आणि विठ्ठल ज्ञानरूप आहे म्हणूनच तो अबाधित सत्यरूप व निरतिशय आनंदरूपही आहे. कारण, 'सत्यं ज्ञानं' (तै. ३ । १ । १), 'विज्ञानमानंदं' (बृ. ३ । ९ । २९) या दोन श्रुतींत ज्ञान, सत्य आणि आनंद यांचे सामानाधिकरण्य दर्शविले आहे. यावरून ही 'दृष्टी' सत्य व आनंद यांचे उपलक्षण असल्यामुळे हा विठ्ठल सच्चिदानंदरूप आहे हे सिद्ध होते. सारांश, ‘दृष्टी' हे पद विठ्ठलाच्या निर्गुणरूपाचे बोधक असल्यामुळे या पदाने विठ्ठलाचे स्वरूपलक्षण सांगितले आहे. अशा उभयलक्षणात्मक सगुण-निर्गुणरूपाच्या ठिकाणी वृत्ती राहो अशी प्रार्थना केली आहे. 'यो विज्ञाने तिष्ठन् विज्ञानमन्तरो यमयति । '. (बृ. ३१७/२२) हा विठ्ठल प्रत्येकाच्या अंतःकरणात राहून त्याचे तो नियमन करीत असतो. मायिक पदार्थापासून अन्तःकरणवृत्तीचे हरण करून, सगुणनिर्गुणरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचे सामर्थ्य त्याचे एकट्याचेच आहे म्हणून विठ्ठलाला 'हरी' असे साभिप्राय संबोधन दिले आहे. जीवाने मनुष्यजन्माला आल्यानंतर विठ्ठलाच्या ठिकाणी वृत्ती ठेवावी तरच त्याला आत्यन्तिक सुखाची प्राप्ती होते म्हणूनच 'तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत'(बृ. ४ । ४ । २१) प्रथम परोक्षत्वाने विठ्ठलाला जाणून त्याच्या ठिकाणी वृत्ती ठेवावी असे श्रुती सांगते. 'मय्येव मन आधत्स्व' (भ. गी. १२१८) माझ्या ठिकाणी मन ठेव असे श्रीभगवान सांगतात. वृत्तीची प्रयोजने दोन आहेतः एक भक्ती आणि दुसरे अविद्यानिवृत्ती. केवळ शरीराने केलेल्या श्रवण-कीर्तनादी क्रियेला भक्ती म्हणू नये. विठ्ठलाचे ठिकाणी प्रेमलक्षण वृत्ती ठेवून जी क्रिया केली जाते तिला भक्ती म्हणावे. म्हणून सगुणभक्तीकरिता प्रेमलक्षणवृत्तीची आवश्यकता आहे आणि विठ्ठलाच्या निर्गुणरूपाविषयी जे अनादी अविद्येचे आवरण आहे ते नष्ट होण्याकरिता ज्ञानलक्षण अखंडाकार वृत्तीची आवश्यकता आहे. म्हणून ह्या दोन प्रयोजनांच्या दृष्टीने 'वृत्ति राहो' अशी प्रार्थना केली आहे. ||१|| आता भक्ती आणि अविद्यानिवृत्ती होण्याकरिता वृत्तीची जशी आवश्यकता आहे तशी ती शुद्ध आणि विवेकवैराग्यसंपन्नही असावी लागते म्हणून दुसऱ्या चरणात म्हणतात--- देवा, तुझ्यावाचून इतर कोणतेही मायिक पदार्थ मला नको आहेत. येवढेच काय, पण त्याविषयी माझ्या मनात इच्छादेखील निर्माण होणे नको आहे. विठ्ठलापेक्षा संसारातील पदार्थांचा भेद दाखविण्याकरिता 'मायिक' हे विशेषण दिले आहे. विठ्ठल, परमार्थतः मायानिवृत्त असल्यामुळे तो अमायिक अर्थात् सत्य आहे, आणि संसारातील पदार्थ 'मायिक' म्हणजे मिथ्या आहेत. हा विवेक येथे स्पष्ट झाला आहे. तसेच मायिक हे विशेषण हेतुगर्भ आहे. 'मला संसारातील पदार्थ नको आहेत, कारण ते मायिक आहेत म्हणून', सारांश, मायिक हे पद हेत्वर्थी असल्यामुळे या पदाने संसारातील पदार्थाविषयी मिथ्यात्वज्ञानमूलक तीव्र वैराग्य ध्वनित केले आहे. ॥ २ ॥ आता ही विवेक-वैराग्ये मर्यादित पदार्थाविषयी नसन ब्रह्मलोकापर्यन्त आहेत हे पढील चरणात सांगतात. ब्रह्मलोक इत्यादी स्थाने दुःखाची पराकाष्ठा आहेत. 'अतोऽन्यदार्तम्' (बृ. ३ । ४ । २), 'नाल्येसुखमस्ति', (छां. ७ । २३ । १) विठ्ठलावाचून सर्व दुःखरूप आहे. विठ्ठलावाचून सर्व परिच्छिन्न असल्यामुळे त्यात सुख नाही असे श्रुती सांगते म्हणून माझे कामक्रोधादिकांनी दष्ट झालेले अंतःकरण तेथे कदाचित् सक्त होईल, पण तसेही करू नकोस. ॥ ३ ॥ देवा, संसारातील कोणत्याही पदार्थाचे वर्णन ऐकून आमचे अंतःकरण विक्षिप्त आणि अनिश्चयात्मक होणे शक्य नाही. कारण तु. म. म्ह. त्या पदार्थाचे खरे स्वरूप आम्हास कळले आहे. ते असे की, जे जे कर्म-धर्मजन्य असते ते ते विनाशी असते. 'परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायात्'. ऐहिक, पारलौकिक भोग लौकिक आणि वैदिक क्रियाजन्य असल्यामुळे त्यांचा नाश होतो हे पूर्णपणे जाणून साधक वैराग्याला प्राप्त होतो असे श्रुतीत म्हटले आहे. त्याप्रमाणे महाराजही म्हणतात-जगातील सर्वभोग, कर्म-धर्मजन्य असल्यामुळे त्यांचा नाश होतो; हे वर्म आम्हाला कळले आहे. सारांश, आम्हाला सगुण विठ्ठलाची भक्ती व त्याच्या निर्गुणरूपाचे ज्ञान हवे आहे. त्यावाचून मायिक, दुःखरूप व विनाशी असलेले भोग नको आहेत. अशी स्वतःची इच्छा देवाजवळ व्यक्त करून ती सफल करण्याविषयी देवालाच प्रार्थना केली आहे. हा पहिला अभंग सूत्ररूप असून पुढील सर्व गाथेला आधारभूत आहे. कारण, या अभंगात जो श्रुतिप्रणीत सिद्धान्त थोडक्यात सांगितला आहे त्याचाच वेगवेगळ्या रीतीने पुढील अभंगांत विस्तार केला आहे.

२. नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवें ॥ १ ॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥
देवापाशी मागे आवडीची भक्ति । विश्वासेशी प्रीति भावबळें ॥ ३ ॥
तुका म्हणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥ ४ ॥
तुला जरी मधुर बोलणे येत नसले आणि देवाने गोड स्वर दिला नसला तरी ॥ १ ॥ त्यासाठी विठ्ठल भुकेला नाही. तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण' म्हण ॥ २ ॥ तू आपल्या श्रद्धेने, निष्ठेच्या बलाने व प्रेमाने देवाजवळ देवाच्या आवडीची प्रेमलक्षणा भक्ती माग. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मी माझ्या मनाला हाच विचार सांगतो की, हे मना, तू प्रत्येक दिवशी प्रेमाने 'रामकृष्ण' म्हणण्याचाच निश्चय कर ॥ ४ ॥

३. सावध झालों सावध झालों । हरिच्या आलों जागरणा ॥ १ ॥
जेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ २ ॥
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥ ३ ॥
तुका म्हणे तया ठाया । वोल छाया कृपेची ॥ ४ ॥
तो मी विचाराने निश्चित जागा झालो म्हणून हरीच्या भजनजागरास आलो. ॥ १ ॥ ज्या हरिजागरात वैष्णवांचे समुदाय हरिनामाचा घोष करीत होते ॥ २ ॥ त्या नामघोषाने माझी झोप पळून गेली आणि जे पाप भजनास आड आले होते तेही पळून गेले ॥ ३ ॥ तु. म.म्ह. जेथे वैष्णवांचा हरिजागर चालतो त्या ठिकाणी देवाच्या कृपेची सुखद साऊली असते ॥ ४ ॥

४. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य मातापिता तयाचिये ॥ १ ॥
कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥
गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचें ॥ ३ ॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥ ४ ॥
जो आपल्या कल्याणाविषयी जागरूक असतो त्याचे आईबाप धन्य आहेत. ॥ १ ॥ कुळामध्ये जे सत्त्वगुणी जन्माला येतात, त्यांचा देवाला आनंद वाटतो ॥ २ ॥ जे गीता व भागवत श्रवण करतात आणि विठोबाचे नित्य चिंतन करतात ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मला त्यांची जर सेवा घडेल तर माझ्या भाग्याला सीमा नाही ॥ ४ ॥

५. अंतरीची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १ ॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २ ॥
आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळें ॥ ३ ॥
तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचे ॥ ४ ॥
देव, भक्तांच्या अंतःकरणात आपल्याविषयी असलेले प्रेम स्वीकारतो आणि भक्तापासून प्रेमाचा लाभ आपल्यास होईल काय ? हे तो पाहतो. ॥ १ ॥ देव, भक्तांचा प्रेमी आहे हे निश्चित. ॥ २ ॥ आपल्या शुद्ध ऐश्वर्यादी गुणांनी भक्तांना सुशोभित करतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. देव भक्ताबरोबर जेवतो व भक्तांना खरे प्रेम देतो किंवा स्वतःच्या प्रेमाविषयी प्रेम देतो. ॥ ४ ॥

६. पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥ १ ॥
जेथे जेथें देखें तुझींच पाउलें । त्रिभुवन -संचलें विठ्ठला गा ॥ २ ॥
भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥ ३ ॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहुनि पाहीं वाड आहे ॥ ४ ॥
-
देवा, आम्हाला तुझे भक्ति-ज्ञानादी सर्व काही प्राप्त झाले. आता आमच्या ठिकाणी द्वैतभाव निर्माण होऊ देऊ नकोस. ॥ १ ॥ हे विठ्ठला, मी जेथे जेथे पाहतो तेथे तेथे तुझेच व्यापक स्वरूप आहे. कारण तुझ्या स्वरूपाने हे त्रिभुवन व्यापले आहे. ॥ २|| भेदवादी, अभेदवादी व भेदाभेदवादी यांची मते आणि खंडन-मंडनात्मक संवाद हे सर्व तुझ्या तात्त्विक स्वरूपाच्या अज्ञानामुळे आहेत, त्यामुळे आम्हास त्यांच्याशी वाद करण्याचा प्रसंग येऊ देऊ नकोस. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. हे देवा, असे पाहा की, ज्यात तू नाहीस असा एक परमाणूदेखील नाही कारण तुझे स्वरूप आकाशापेक्षाही मोठे आहे. मग तुझ्या अस्तित्वाविषयी वादविवाद करण्याची आवश्यकताच काय आहे ? ॥ ४ ॥

७. सुखें वोळंबा दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥ १ ॥
आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ २ ॥
अखंड मज पोटाची व्यथा । दूधभात साकर तूप पथ्या ॥ ३ ॥
दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपत्ती ॥ ४ ॥
नीज नये खाली घाली फुलें । जवळी न साहती मुलें ॥ ५ ॥
अंगीं चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥ ६ ॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥ ७ ॥
गेले वारी तुम्ही आणिली साकर । सात दिवस गेली साडेदाहा शेर ॥ ८ ॥
हाड गळोनि आलें मांस । माझें दुःख नेणवे कैसें ॥ ९ ॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥ १० ॥
एक स्त्री सर्व प्रकारची सुखे असताना नवऱ्याला ढोंगाने म्हणते तुम्ही माझ्या दुःखाकडे लक्ष देत नाही. पण विचार करा हो ॥ १ ॥ असे बायकोने म्हटल्यानंतर बायकोच्या प्रेमाने भारलेला तो वेडा नवरा तिच्या भिडेने 'होय, होय, खरे आहे तुझे म्हणणे' असे म्हणू लागला. ॥ २ ॥ नंतर ती आपले एक एक दुःख (दुःख कसले दुःखाभास) नवऱ्यापुढे सांगू लागली. ती म्हणाली मला नेहमीच पोटदुखी आहे. म्हणून मला दूध, भात, साखर, तूप हे पथ्याला लागते. ||३|| दुपारी मला लहरी (चक्कर) येतात आणि शुद्धी राहत नाही. त्यामुळे मी झोपते. ॥ ४ ॥ पण नीट लागत नाही. म्हणन मी अंगाखाली फले घालते आणि जवळ मुले असली म्हणजे मला ते सहन होत नाही. म्हणून मी तुमच्याजवळ देते. ॥ ५ ॥ मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते, कारण मला नेहमी माथाशूळ आहे. ॥ ६ ॥ मला अगदीच अन्न (जात नाही). मला फक्त तीनसांजा (तीन वेळा) पायलीभर गहू लागतात, किंवा तीन पायल्या गव्हाचा सांजा लागतो. ॥ ७ ॥ गेल्या बाजारी तुम्ही दहा शेर साखर आणली ती मला सातच दिवस गेली. ॥ ८ ॥ माझे हाड आत जाऊन वर मास आले आहे हे माझे दुःख तुम्हास कसे बरे कळत नाही. ॥ ९ ॥ तु. म. म्ह. याप्रमाणे खोटे सांगून तिने नवऱ्याला जिवंतपणी गाढव केले आणि मेल्यावर तो नरकास तर जाणारच. ॥ १० ॥ (प्रीतीचे प्रेम कसे असते हे कळण्यासाठी हा दृष्टान्त आहे.) ८.

८. पुढे गेले त्याचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आम्ही ॥ १ ॥
वंदूंचरणरज सेऊं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करूनियां ॥ २ ॥
अमुप हें गांठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ॥ ३ ॥
अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥ ४ ॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥ ५ ॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥ ६ ॥
जे संत पुढे गेले त्यांच्या मार्गाचा शोध करीत व त्यांचा कित्ता घेत तुम्ही आम्ही जाऊ ॥ १ ॥ त्या संतांच्या चरणरजांना वंदन करू व त्यांचे उच्छिष्ट सेवन करू, त्यामुळे आपल्या संचित कर्माची होळी करू ॥ २ ॥ आम्हा अनाथांना योग्य असलेले विठ्ठलरूपी, भांडवल पदरी बांधू ॥ ३ ॥ गोविंदाच्या एकमेव चिंतनाने व नामसंकीर्तनाने सर्व लाभ होतात. ॥ ४ ॥ आणि जन्ममरणाच्या येरझारा संपतात. असा हा संतांचा मार्ग सुलभ व सफल आहे. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. या मार्गाने आपण जाऊ आणि जीवपणा नष्ट करू आपल्या माहेरी जाऊ व ब्रह्मरूप होऊ. ॥ ६||

९. जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥ १ ॥
सोंवळ्या ओवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळां अवघ्या दुरी ॥ २ ॥
परें परतें मज न लगे सांगावें । हें तो बरें देवें शिकविलें ॥ ३ ॥
दुसऱ्याने आम्ही नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥ ४ ॥
येथे कांहीं कोणी न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥ ५ ॥
लाचावला तुका मारीतसे झड । पुरविलें कोड नारायणे ॥ ६ ॥
संत जेवल्यानंतर त्यांचे जे उच्छिष्ट राहिले असेल त्याची मी अपेक्षा करीत आहे. ॥ १ ॥ मी सोवळ्याओवळ्याहून निराळा आहे. (एवढेच नव्हे तर) मी सर्वांपासूनच दूर आहे. ॥ २ ॥ परावाणीच्या पलीकडे असलेले तत्त्व मला अन्य कोणीही सांगण्याची आवश्यकता नाही. कारण ते तर देवाने मला चांगले शिकविले आहे. । ।३ । । आम्ही दुसऱ्याच्या अंकित होत नाही, हे आमचे मनोगत जाणूनच देव आमच्या पाठीशी उभा आहे. । ।४ । । यासंबंधी कोणीही कसलीही शंका धरू नये. मला उच्छिष्ट भोजनाची एकमेव इच्छा आहे. । ।५ । । उच्छिष्ट भोजनाला लाचावलेला तुका, भोजनासाठी हट्ट धरून बसला असता नारायणाने (त्याची) इच्छा पुरविली. ॥ ६ ॥

१०. देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥ १ ॥
ब्रह्मादिकांसि हे दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं ॥ २ ॥
अवघियांपुरतें वोसंडले पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥ ३ ॥
इच्छादानी येथे वोळला समर्थ । अवघेचि आर्त पुरवितो ॥ ४ ॥
सरे येथे ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळी घ्यावें ऐसें ॥ ५ ॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारी सांगातें निरुपम ॥ ६ ॥
तुम्हापैकी जे कोणी आवडीचे अधिकारी असतील ते सर्व तुम्ही देवाच्या (भक्तिरूप) प्रसादाचे म्हणजे आनंदाचे सेवन करा. ॥ १ ॥ हे (भक्तिरूप) उच्छिष्ट ब्रह्मादिकांनाही दुर्लभ आहे. याकरिता या आनंदाला विटू नका व याची उपेक्षा करू नका. ॥ २ ॥ सर्वांना पुरण्याइतका हा भक्तिरस पुष्कळ असून पावांतून ओसंडून जात आहे. या भक्तिरसाचे सेवन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. ॥ ३ । । या भक्तिमार्गात भक्तांच्या इच्छेप्रमाणे देणारा समर्थ असा पांडुरंग सर्वकाळ प्रसन्न असून तो सर्वांची सर्व प्रकारची इच्छा पूर्ण करतो. ॥ ४ । । या भक्तिमार्गात कधीतरी संपेल असा विनाशी आनंद नाही व त्या आनंदाचे पुनःपुन्हा घास घ्यावेत असेच वाटते. ॥ ५ । । तु. म. म्ह. हा भक्तिरूप स्वयंपाक पुन्हा देवाच्या नित्य सन्निध असलेली निरुपम दासी लक्ष्मी करते. तिच्या हाताने तो घ्यावा. ॥ ६ ॥

११. अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजीती ॥ १ ॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिके गोड ॥ २ ॥
विष तांन्या वाटी । भरली लाऊं नये होटीं ॥ ३ ॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥ ४ ॥
मनुष्याच्या अंगी अवगुण असले म्हणजे त्याची व्यवहारात पुष्कळच फजिती होते. ॥ १ ॥ कोणतेही पात्र चांगले आहे किंवा वाईट आहे हे पाहण्याची गरज नसते, तर त्या पात्रातील रस फिका आहे का गोड आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. ॥ २ ॥ तांब्याच्या वाटीत विष भरले असेल तर (केवळ पात्र चांगले म्हणून) ते पिऊ नये. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. देवाविषयीचा शुद्ध भाव ज्याच्या मनात आहे तो चांगला आहे. केवळ भक्तपणाचे सोंग घेणे व्यर्थ आहे. ॥ ४ ॥

१२. हरिच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥ १ ॥
कोठे पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाठीं ॥ २ ॥
ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥ ३ ॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥ ४ ॥
अरे जना, हरीच्या जागराला जाण्याचे तुझ्या मनात का येत नाही. ॥ १ ॥ तुझे आयुष्य संसार करण्यात फुकट खर्ची पडत आहे तरी हे नकसान त दसरीकडे कोठे भरून काढशील ? ॥ २ ॥ ज्यांच्यात त गंतला आहेस ते (स्त्रीपत्रादी) अंतकाळी तुला सोडून देतील. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. याकरिता श्रेष्ठ लाभ कशात आहे याचा तू विचार कर. ॥ ४ ॥

१३. धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हाती ॥ १ ॥
मज सोडवी दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ २ ॥
करिसी अंगीकार । तर काय माझा भार ॥ ३ ॥
जिवीच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥
देवा, तू धर्माची मूर्ती आहेस म्हणून मनुष्याकडून पापपुण्य करविणे तुझ्या आधीन आहे. ॥ १ ॥ यासाठी हे दातारा, मला दुस्तर अशा कर्मापासून सोडवा. ॥ २ ॥ माझा अंगीकार केलास तर तुला माझे फार ओझे होणार आहे काय ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जीवाला जीवन देणाऱ्या नारायणा, मला कर्मापासून सोडवा. ॥ ४ ॥

१४. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥ १ ॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ २ ॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठी कौस्तुभमणि विराजित ॥ ३ ॥
तुका म्हणे माझें हेचि सर्वसुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥ ४ ॥
जे कंबरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे ते ध्यान, ते रूप अतिशय सुंदर आहे. ॥ १ ॥ गळ्यात तुळशीचे हार, कंबरेला पीतांबर असलेले हेच ध्यान मला अखंड आवडते. ॥ २ ॥ ज्याच्या कानात मकराकार केडले झळकतात व गळ्यात कौस्तुभमणी शोभतो ॥ ३ । । तु. म. म्ह. प्रेमाने श्रीमुख पाहणे हेच माझे सर्व सुख आहे ॥ ४ ॥

१५. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥
गोड तुझें रूप गोड तुझें - नाम । देईं मज प्रेम सर्वकाळ ॥ २ ॥
विठो माउलिये हाचि वर देईं । संचरोनि राही हृदयामाजीं ॥ ३ ॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणिक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥
हे जिवलगा रुक्मिणीकाता, तुझ्या मूर्तीचे ठिकाणी माझे डोळे अखंड राहोत. ॥ १ ॥ तुझे रूप गोड असून नामही गोड आहे. मला सर्वकाळ तुझ्या रूप-नामाविषयी प्रेम दे. ॥ २ ॥ हे विठू माऊली, हाच मला वर दे, आणि माझ्या हृदयात येऊन राहा. ॥ ३ ॥ तु.म. म्ह. यावाचून दुसरे काही मागत नाही, कारण तुझ्या पायाचे ठिकाणी सर्व सुख आहे. ॥ ४ ॥

१६. राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रवि शशिकळा लोपलिया ॥ १ ॥
कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ २ ॥
मुगुट कुंडलें श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळहीं ॥ ३ ॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥ ४ ॥
सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥ ५ ॥
मेघाच्या नीलवर्णाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे असा सावळा देव सुंदर, सुकोमल आणि जणू मदनाचा पुतळा आहे. ज्याच्या तेजात सूर्यचंद्रांचे तेज लुस झाले आहे. ॥ १ ॥ कपाळावर कस्तुरीचा मळवट, अंगाला, चंदनाची उटी व ज्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभते. ॥ २ ॥ मुकुट-कुंडलांनी श्रीमुख शोभत असून जणू हे देवाचे रूप सुखाचेच ओतलेले आहे. ॥ ३ ॥ ज्याच्या कंबरेला भरजरी पीतांबर आहे व ज्याने भरजरी शेला पांघरला आहे. हे बायांनो, असा तो मेघांप्रमाणे निळा सावळा देव आहे. ॥ ४ ॥ तु. म. म्ह. तुम्ही सर्वजणी एका बाजूला व्हा. कारण देवाला पाहण्याविषयी माझ्या जीवाला धीर राहिला नाही. ॥ ५ ॥

१७. कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावी हरि ॥ १ ॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरि दावी डोळां ॥ २ ॥
कटी पितांबर कास मिरवली । दाखवी वहिली ऐसी मूर्ती ॥ ३ ॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसीं तेंचि रूप ॥ ४ ॥
झुरोनि पांझरा होऊ पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥ ५ ॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंति उदास करूं नये ॥ ६ ॥
हे हरी, कंबरेवर हात ठेवलेले व गळ्यात तुळशीच्या माळा असलेले तुझे सुंदर रूप माझ्या डोळ्यांना दाखव. ॥ १ ॥ हे हरी, दोन्ही चरण विटेवर ठेवलेले तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखव. ॥ २ ॥ कंबरेला पीतांबर असून (त्याचे) दोन कासोटे त्याच पीतांबरात खोवले आहेत असे तुझे सुंदर रूप मला दाखव. ॥ ३ ॥ देवा, तू गरुडाच्या पारावर उभा राहिला आहेस, तेच तुझे रूप माझ्या चित्तात आठवत आहे. ॥ ४ ॥ देवा, तुम्ही आपले रूप नाही दाखविले तर झुरणी लागून माझा देह केवळ हाडांचा सापळा होण्याच्या मार्गात आहे. यासाठी हे पंढरीनाथा, मला भेटावयास ये ॥ ५ ॥ तु. म. म्ह. माझी ही आशा पूर्ण करावी. माझ्या या विनंतीची उपेक्षा करू नये ॥ ६ ॥

१८. गरुडाचे वारिकें कांसे पितांबर । सांवळे मनोहर कै देखेन ॥ १ ॥
बरविया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥ २ ॥
मुगुट माथां कोटि सूर्याचा झल्लाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे ..कंठीं ॥ ३ ॥
वोतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥ ४ ॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ ५ ॥
तुका म्हणे नव्हे आणिकां सारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥ ६ ॥
गरुडावर बसलेले व ज्याच्या कंबरेस पीतांबर शोभत आहे असे सावळे सुंदर रूप मी डोळ्याने केव्हा पाहीन ? ॥ १ ॥ उत्तमातील उत्तम, सजल मेघाप्रमाणे सावळे आणि ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाळ शोभत आहे, ॥ २ ॥ आणि ज्याच्या मस्तकावर कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी मुकुट व कंठात निर्मळ कौस्तुभमणी शोभत आहे. ॥३ ॥ सर्वसुख जणू ओतून तयार झालेले ज्याचे श्रीमुख असून डाव्या भागास सुंदर अशी रुक्मिणी देवी उभी आहे. ॥४ ॥ उद्धव आणि अक्रूर हे दोघे दोहीकडे उभे असून ज्याच्यापुढे गुणवर्णन करीत आहेत. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. जो इतरांसारखा सामान्य नाही, तो पांडुरंगच माझा आवडता देव आहे. ॥ ६ ॥

१९. ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणें । बळिये आम्ही भले शरणागत ॥ १ ॥
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । झाला पद्मनाभ सेवाकणी ॥ २ ॥
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावें ॥ ३ ॥
बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥ ४ ॥
हारि नाही आम्हां विष्णुदासा जगीं । नारायण अंगी विसावला ॥ ५ ॥
तुका म्हणे बहु लाठे हे भोजन । नाहीं रिता कोण रहात राहो ॥ ६ ॥
जो भक्तीचा लाभ मिळविण्याविषयी ब्रह्मादिक देवांचादेखील अधिकार कमी पडतो. तो लाभ आम्ही देवाला शरण जाऊन मिळविला आहे म्हणून आम्ही बलवान आणि धन्य आहोत. ॥ १ ॥ केवळ भोगवासनेच्या त्यागाने आम्हास हा भजनाचा लाभ झाला असून आमच्या एकनिष्ठ सेवेने पद्मनाभ आमचा ऋणी झाला आहे. ॥ २ ॥ कामधेनूच्या द्धाला मोजमाप नाही, कारण ती याचकाच्या इच्छेप्रमाणे दुधाचा सारखा वर्षाव करते. त्याप्रमाणे देव आम्हाला इच्छिले ते देतो. ॥ ३ ॥ त्रिपुटीचा भेद करून जाता येईल असे आम्हाला बसल्या ठिकाणी (ज्ञानाचे) भरते आले आहे. ॥ ४ ॥ आम्हा विष्णुदासांचा जगात कोठेही पराजय होत नाही, कारण आमच्या अंगी नारायण स्थिर झाला आहे. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. हे भक्तिरूप अन्न फारच महत्त्वाचे आहे. कोणीही विचारी मनुष्य या भक्तिरूप अन्नाचे सेवन केल्यावाचून उपाशी राहात नाही पण एखादा अविचारी उपाशी राहात असेल तर राहो. ॥ ६ ॥

२०. दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणा बाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥ १ ॥
इतुलें जाणावया जाणा । कोड तरी मनें मना । पारधीच्या कुणा । जाणतेणेचि साधान्या ॥ २ ॥
देह आधी काय खरा । देहसंबंध पसारा । बुजगावणे चोरा । रक्षणसें भासतें ॥ ३ ॥
तुका करी जागा । नको वासपूं वाउगा । आहेसि तूं अंगा । अंगी डोळे उघडी ॥ ४ ॥
ज्ञानाने द्वैताचा निरास झाला असता जे काही अवशिष्ट राहते तो एक हरीच होय. आपल्या आत्म्याहून अन्यत्र त्या हरीला शोधावे लागत नाही. ॥ १ ॥ हरीला आत्म्याशी अभेदाने जाणावयाची तुमच्या मनास इच्छा असेल तर निष्काम कर्माचे व निष्काम भक्तीचे संस्कार असलेल्या मनाने जाणा. जसे शिकाऱ्याच्या युक्त्या त्यातल्या तज्ज्ञ शिकाऱ्यानेच उपयोगात आणाव्या, तसे हरीला जाणण्यास मनच चतुर आहे. ॥ २ ॥ हरीला न जाणता मनुष्याने, विषयात गुंतू नये. कारण प्रथम हा विचार करावा की, विषयांचा भोग घेणारा हा देह तरी खरा आहे काय ? नसेल तर देहसंबंधी परिवार तरी खरा कोठून असणार ? चोराला जसे बुजगावणे पिकाचे रक्षक आहे असे वाटते, पण वस्तुतः तो जसा भ्रम आहे तसे देह आणि संबंधित परिवार सत्य वाटतो पण तो शुद्ध भ्रम आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मी अविद्यानिद्रितास जागा करीत आहे की नरा, तू निष्कारण दःखी होऊ नकोस, कारण तू स्वतः हरीच आहेस. तू आपल्या स्वरूपाविषयी ज्ञानदृष्टी उघडून पाहा ॥ ४ ॥

२१. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ १ ॥
आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ २ ॥
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥ ३ ॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदुःख जीव भोग पावे ॥ ४ ॥
हे जग विष्णुस्वरूप आहे व भेद आणि तत्सापेक्ष अभेद सत्य वाटणे हा एक ओंगळ भ्रम आहे असे ज्याला निश्चित ज्ञान झाले असेल त्यालाच वैष्णव म्हणावे. तोच वैष्णवांचा धर्म म्हणजे वैष्णवांचे लक्षण आहे. ॥ १ ॥ हे साधक भागवत भक्त हो, तुम्हीही वैष्णवाचे लक्षण ऐका व जे तुम्ही स्वतःचे हित कराल ते खरे हित साधा. ॥ २ ॥ आपल्याकडून कोण्याही जीवाचा मत्सर घडू देऊ नये, कारण हेच सर्वव्यापक ईश्वराच्या पूजनाचे वर्म आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जसे देहाच्या कोणत्याही एका अवयवाला सुख-दुःखे झाली असता, ती देहात असणाऱ्या जीवाला प्राप्त होतात तसे सर्व जग विष्णुमय असल्यामुळे जगातील कोण्याही जीवाला सुख-दुःखे दिल्यास ती ईश्वराला प्राप्त होतात. म्हणून साधक भक्तांनी 'जग विष्णुमय आहे' असा भाव ठेवून निर्मत्सर वैष्णव व्हावे ॥ ४ ॥

२२. आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥ १ ॥
आतां कोण भय धरी । पुढे मरणाचें हरि ॥ २ ॥
भलते ठायीं पडो । देह तुरंगी हां चडो ॥ ३ ॥
तुमचे तुम्हापाशीं । आम्ही आहों जैसी तैसीं ॥ ४ ॥
गेले मानामान । सुखदुःखांचे खंडन ॥ ५ ॥
तुका म्हणे चित्ती । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥
आम्ही सर्व आशा टाकून (संसाराविषयी) उदास झालो आहोत. ॥ १ ॥ हे हरी, आता यापुढे मरणाचे कोण बरे भय धरणार आहे ? ॥ २ ॥ आमचा देह घोड्यावर बसून ऐश्वर्य भोगो अथवा वाटेल तेथे पडो आम्हाला त्याची खंत नाही. ॥ ३ ॥ आम्हाला व्यवहारात सुख मिळो अथवा दुःख मिळो आम्ही तुमचे दास होऊन तुमच्या जवळच राहू ॥ ४ ॥ आमचे मान-अपमान आणि सुखदुःखे खंडित झाली आहेत. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. मी माझ्या चित्तात यासंबंधी मुळीच चिंता करीत नाही. ॥ ६ ॥

२३. निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥
मज हेंही नाही तेंही नाही । वेगळा दोहींपासुनी ॥ २ ॥
देहभोग भोगें घडे । जें जें जोडें तें तें बरें ॥ ३ ॥
अवघे पावे नारायणीं । जनार्दनीं तुकयाचें ॥ ४ ॥
या जगात माझी कोणी निंदा करतो, तर कोणी वंदन करतो, कोणी मारतो तर कोणी एखादा पूजाही करतो. ॥ १ ॥ पण मला त्याचे दुःखही वाटत नाही आणि सुखही वाटत नाही, कारण मी दोघांपासून अलिप्त आहे. ॥ २ ॥ प्रारब्धानुसार दुःखाचे भोग प्राप्त होतात ते ते सर्व ठीकच आहेत. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मला होणारी दुखदुःखे माझी आहेत असे न मानता ती सर्वव्यापक जनार्दन नारायणाला प्राप्त होतात असे मी मानतो. ॥ ४ ॥

२४. जन विजन झाले आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणः ॥ १ ॥
पाहे तिकडे मायबाप । विठ्ठल आहे रखुमाई ॥ २ ॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥ ३ ॥
ठाव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥ ४ ॥
नामसंकीर्तन ह्या एकाच साधनाने जन व वन विठ्ठलरूप झाले आहेत. ॥ १ ॥ जिकडे पाहावे तिकडे मायबाप विठ्ठलरखुमाई आहेत असेच माझ्या अनुभवाला येत आहे. ॥ २ ॥ त्यामुळे अरण्य आणि नगर यांना एकरूपता आली आहे. एवढेच काय पण सर्व स्थाने आम्हाला पूज्य झाली आहेत. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. आता माझ्या चित्तात संसारातील सुखदुःखांना वाव नाही म्हणून मी नामसंकीर्तनाच्या आनंदाने नाचतो उडतो. ॥ ४ ॥

२५. हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥ १ ॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ २ ॥
मोहरा तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥ ३ ॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥ ४ ॥
ऐरणीवर ठेवून घणाने मारले असता जो फुटत नाही तोच खरा हिरा होय. ॥ १ ॥ त्याचीच मोठी किंमत होते. कृत्रिम असेल तर त्याचा चुरा होतो. ॥ २ ॥ तोच जातिवंत मोहरा (मणी) होय की, ज्याच्या संगतीने सूत जळत नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. तोच संत होय की, जो जगाने केलेल्या निंदा-स्तुतीचे आघात सोसतो. ॥ ४ ॥

२६. आलिंगन घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥ १ ॥
ऐसा संतांचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ २ ॥
तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ । ३ ॥ तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥ ४ ॥
संतांना आलिंगन देण्याचा योग आल्यास सायुज्यमोक्ष प्राप्त होतो ॥ १ ॥ असा संतांचा महिमा आहे. त्यांचा महिमा वर्णिताच येत नाही कारण तेथे शब्दांची मर्यादा संपते. ॥ २ ॥ तीर्थे आणि पर्वकाळ हे सर्व त्यांच्या पायाजवळ आहेत. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. त्यांची सेवा केली असता ती देवाला पावते. ॥ ४ ॥

२७. माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥ १ ॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्याने वसविलें अंग ॥ २ ॥
टाळिलें निमित्त । फार थोडे घात हित ॥ ३ ॥
यावें कामावरी । तुका म्हणे नाही उरी ॥ ४ ॥
संतांची सेवा केल्यामुळे, माझ्या देहाभिमानाचा निरास झाला आहे. ॥ १ ॥ आता विषय भोगणारा व त्यांचा त्याग करणारा हृदयनिवासी पांडुरंग आहे. कारण त्यानेच आमचा देह निर्माण केला आहे. ॥ २ ॥ देहाला थोडेफार होणाऱ्या हितघातांचे किंवा सुखदुःखांचे निमित्तकारण देहाभिमान आहे. तोच आम्ही टाकून दिला आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. त्यामुळे आम्हाला काही कर्तव्य करण्याचे उरले नाही. ॥ ४ ॥

२८. सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार समूळ आशा । निंदा हिसा नाही कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ १ ॥
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासी अवधे जन । तीर्थासी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनं ॥ २ ॥
मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी । हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥ ३ ॥
तन मन धन दिले पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची । तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णां त्याची ॥ ४ ॥
हे शरीर सकळ कामना पूर्ण करणारे चिंतामणीसारखे आहे. पण जर अविद्येसह अहंकार, आशा, निंदा, हिंसा, कपट आणि देहाभिमान गेला व चित्त स्फटिकाप्रमाणे शुद्ध झाले तर हे शरीर चिंतामणी आहे यात वादच नाही. ॥ १ ॥ मोक्ष देणारे पवित्र क्षेत्र वाराणसी आहे, पण ज्याचे शरीर चिंतामणी झाले असेल त्याला त्या मोक्षाची गरज नाही. उलट सर्व लोक (मोक्षप्राप्तीकरिता) त्याच्याजवळ येतात. गंगादी तीर्थांनाही तीर्थत्व आणणारा तोच एक जगात पवित्र आहे. म्हणून त्याच्या दर्शनाने देखील मोक्ष प्राप्त होतो. ॥ २ ॥ अरे जना, ज्यांचे मन शुद्ध आहे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असली-नसली तरी त्या नुसत्या माळेला घेऊन काय करतोस ? कारण तो, वैराग्य, भक्ती व ज्ञान या भूषणांनीच मंडित आहे. हरीच्या गुणानुवादाचा तो नेहमीच घोष करतो. त्याच्या मनात सर्वकाळ आनंद असतो. ॥ ३ ॥ त्याने श्रीपांडुरंगाला तन, मन व धन अर्पिलेले असते. त्याला स्त्री-पुत्रादिकांची आशा नसते. तु. म. म्ह. तो पुरुष परिसाहून श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा मी काय वर्णन करू शकेन. ॥ ४ ॥

२९. आहे तें सकळ कृष्णासि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥ १ ॥
म्हणउनी पाठी लागतील भूतें । येती गिवसीत पांच जणे ॥ २ ॥
ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणे हा ॥ ३ ॥
तुका म्हणे काळें चेपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥ ४ ॥
जगात जे जे काही आहे ते कृष्णाचेच असल्यामुळे ते सर्व सहजच कृष्णाला अर्पण आहे. पण हे सर्व कृष्णाचेच आहे असे न समजल्यामुळे मनुष्याचे मन 'मी' व 'माझे' अशी कल्पना करते. ॥ १ ॥ म्हणून (अहममतेच्या भ्रमामुळे) भूते, जीवास शोधीत येतात व देहाच्या रूपाने कायमची त्याच्या पाठीशी लागतात. त्यास पुनःपुनः देह प्राप्त करून देतात. ॥ २ ॥ हे सर्व ज्या कृष्णाचे आहे त्याची आठवण नसल्यामुळे मूर्ख जीव, त्या कृष्णाला हे सर्व अर्पण करीत नाही. त्या कारणाने ही जन्म-मृत्यूची शिक्षा जीवास भोगावी लागते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. काळाने गळा दाबला असताही पुनःपुनः हा जीव, 'मी व माझे' करीतच असतो. ॥ ४ ॥

३०. महारासी शिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥ १ ॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाही ॥ २ ॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥ ३ ॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो ते याती ॥ ४ ॥
जो महारास बुद्धिपुरस्सर स्पर्श करतो आणि निष्कारण एखाद्यावर रागावतो तो जातीने ब्राह्मण असला तरी आचाराने ब्राह्मण नाही. ॥ १ ॥ याप्रमाणे ज्याची स्थूल-सूक्ष्म शरीरे क्रमाने महाराच्या स्पर्शाने व क्रोधाच्या स्पर्शाने विटाळलेली आहेत. त्याने देहत्याग केला तरीपण ते प्रायश्चित्त होत नसल्यामुळे त्याच्या पापाची निवृत्ती होत नाही. ॥ २ ॥ ज्याला अंत्यजदेखील स्पर्श करू शकत नाही त्या अंतःकरणाला क्रोधाचा विटाळ होतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्याच्या चित्तात ज्याला स्पर्श करण्याची विशेष आसक्ती असते तो कालांतराने त्याच जातीचा होतो. ॥ ४ ॥

३१. तेलणीशीं रुसला वेडा । रागें कोरडे खातो भिडा ॥ १ ॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ २ ॥
नाडिलें लोकां टाकिला गोहो । बोडिलें डोकें सांडिला मोहो ॥ ३ ॥
शेजारणीच्या गेली रागें । कुतऱ्यांनी घर भरिलें मागें ॥ ४ ॥
पिसारागें भाजिलें घर । नागवली ते नेणे फार ॥ ५ ॥
तुका म्हणे वाच्या रागें । फेडिलें सावलें देखिले जगें ॥ ६ ॥
एक वेडा मनुष्य तेलणीवर रुसला पण जर तो तेलणीच्या घरी तेल आणण्यास जाईनासा झाला तर तो जसा विनाफोडणीचे कोरडे खातो. ॥ १ ॥ त्याप्रमाणे ज्याने वेडेपणाने हरिभक्ती व संतसेवा केली नाही तर त्याचेच अनहित होते याकरिता आपल्या हिताचा आपण विचार करावा आणि (हरिभक्ती व संतसेवा करण्यात काहीही संकोच मनात धरू नये) ॥ २ ॥ लोकांनी त्रास दिला म्हणून एका बाईने नवरा सोडून दिला, डोके बोडले व स्वतःच्या मुलामुलींचाही मोह न धरता त्यांनाही सोडून दिले, तर त्या बाईचेच दैन्य होते. ॥ ३ ॥ एखादी मूर्ख बाई शेजारणीच्या रागाने (घर सोडन) निघून गेली तर तिच्या पश्चात ते घर कुत्र्यांनी भरले जाते व ती कुत्री घरातील पीठकूट खाऊन टाकतात. (असे करण्यात त्या बाईचेच नुकसान होते.) ॥ ४ ॥ एकाच्या घरात पिसा झाल्या म्हणून त्यांच्या रागाने त्याने घर जाळले पण त्यामुळे त्याचेच मोठे नुकसान झाले हे त्यास कळले नाही. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. एखाद्या बाईने उव झाल्या म्हणून त्या रागाने नेसलेले लुगडे फेडले तर जग तिला नागवे पाहते. त्यामुळे तिचीच फजिती होते. ॥ ६ ॥

३२. मज दास करी त्याचा । संतदासाच्या दासाचा ॥ १ ॥
मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ २ ॥
नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥ ३ ॥
तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥ ४ ॥
हे हरी, जे कोणी संतांचे दास्य करतात त्यांच्या दासाचा दास मला कर. ॥ १ ॥ हे हरी, मग मला कल्पपर्यंत गर्भवास प्राप्त झाले तरी पण ते खुशाल होऊ देत. मला त्यात सुखच आहे. ॥ २ ॥ नीच कामे करून उपजीविका चालविण्याचा प्रसंग आला तरी पण माझ्या मुखात तुझे नाम असेल तर मला त्यात समाधान आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. नेहमी माझ्या चित्तात तुझ्या सेवेचीच इच्छा असावी हीच तुला प्रार्थना आहे. ॥ ४ ॥

३३. सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ १ ॥
त्याचे दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवें ॥ २ ॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥ ३ ॥
नेणे शब्दपर । तुका म्हणे पर उपकार ॥ ४ ॥
ज्याचे चित्त विषयप्राप्तीकरिता नेहमी तळमळते व विषयनाश झाल्यास हळहळते, ॥ ११ ॥ अशाचे दर्शन होऊ नये. कारण तो जिवंत असताही प्रेतच होयः ॥ २ ॥ ज्याने वाईट शब्दांच्या घाणीने स्वतःची वाणी अपवित्र केली आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जो दुसऱ्यास कसे चांगले बोलावे हे जाणत नाही, व दुसऱ्यावर चुकूनसुद्धा उपकार करीत नाही. ॥ ४ ॥

३४. जया नाही नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ॥ १ ॥
त्याचे वय नित्य काळ लेखिताहे । रागें दांत खाय करकरा ॥ २ ॥
जयाजिये द्वारी तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणा ॥ ३ ॥
जये कुळी नाही एकही वैष्णव । त्याचा बुडे भवनदी ताफा ॥ ४ ॥
विठोबाचें नांव नुचारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचे ॥ ५ ॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥ ६ ॥
ज्याला एकादशी व्रत करण्याचा नियम नाही तो मनुष्य त्रैलोक्यात प्रेत आहे असे जाणावे. ॥ १ ॥ 'काळ' त्याचे आयुष्य नित्य मोजीत असतो व रागाने त्याच्यावर करकरा दात खात असतो. ॥ २ ॥ ज्याच्या दारात तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशान आहे असे जाणावे. ॥ ३ ॥ ॥ ज्याच्या कुळात एकही हरिभक्त जन्माला आला नाही. किंवा एकही मनुष्य हरिभक्ती करणारा नाही त्याच्या कुळाची नावं भवनदीत बुडते. ॥ ४ ॥ जे तोंड विठोबाचे नाव उच्चारीत नाही ते चांभाराचे कातडे भिजविण्याचे प्रत्यक्ष कुंड आहे. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. जो हरीच्या कीर्तनाला जात नाही (व टाळी वाजवीत नाही) त्याचे हातपाय काष्ठ आहेत. ॥ ६ ॥

३५. आम्ही सदैव सुडके । जवळी येतां चोर धाके । जाऊ पुढे भिके । कुतरी घर राखती ॥ १ ॥
नांदणूक ऐसें सांगा । नाहीं तरी वायां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसे आणावें ॥ २ ॥
अक्षई साचार । केलें सायासांनी घर । एरंडासी हार । दुजा भार न साहती ॥ ३ ॥
धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन ती करी । कोण गुरे वासरें ॥ ४ ॥
जाली सकळ निश्चिती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥ ५ ॥
तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥ ६ ॥
आम्ही दरिद्री असलो तरी मोठे भाग्यवान आहोत. चोरसुद्धा आमच्या घराजवळ येताच भितो, कारण आम्ही घर सोडून भिक्षा मागण्यास जातो तेव्हा कुत्री आमच्या घराचे रक्षण करतात. ॥ १ ॥ जगात अशी कोणाची नांदणूक आहे सांगा ? दरिद्री संसारात समाधान नाही मानले तर, व्यर्थ शीणभाग होतो. अंगी मोठेपणा आणावयाचा असेल तर अशाच रीतीने आणावा लागतो. ॥ २ ॥ आम्ही मजबूत आणि चांगले घर मोठ्या कष्टाने तयार केले आहे. की ज्या घराला एरंडालाही हार खावी लागेल अशी नाजूक लाकडे वापरली असून, जी दुसऱ्या लाकडांचा भार सहन करीत नाहीत. ॥ ३ ॥ आमचे धन-धान्य लोकांच्या घरी आहे. आमचे पोट भिकेवर भरते. त्यामुळे धन, धान्य, गुरेवासरे यांचे रक्षण करण्याचे कष्ट कोण करीत बसतो ? सर्व बाबतीत आम्ही निष्काळजी आहोत. आमच्या घरी शेण, माती हेच भांडवल आहे, ज्या भांडवलामुळे आमच्या घराच्या भिंती आणि तुळशीची वृंदावने अगदी स्वच्छ दिसतात. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. देवाने आम्हाला दरिद्री केल्यामुळे (आमचा उत्कर्ष बघून) दुसऱ्याला जो हेवा वाटावयाचा तो संपूर्ण नाहीसा केला आहे. आमच्या कुटुंबाचा योगक्षेम तोच (देवच) वाहतो. सारांश, व्यवहारदृष्ट्या आम्ही दरिद्री असलो तरी परमार्थतः देव आमच्या कुटुंबाची सेवा करीत असल्यामुळे मोठे भाग्यवान आहोत. ॥ ६ ॥

३६. पराविया नारी माऊली समान । मानिलिया धन काय वेंचे ॥ १ ॥
न करितां परनिंदा परद्रव्य अभिळास । काय तुमचे यास वेंचे सांगा ॥ २ ॥
बैसलिये ठायीं म्हणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥ ३ ॥
संतांचे वचनी मानिता विश्वास । काय तुमचे यास वेंचे सांगा ॥ ४ ॥
खरे बोलतां कोण लागती सायास | काय वेंचे यास ऐसें सांगा ॥ ५ ॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे काहीं ॥ ६ ॥
बाबांनो, परस्त्री मातेसमान मानली तर तुमचे त्यात धन जाणार आहे काय ? ॥ १ ॥ परनिंदा नाही केली, परद्रव्याची इच्छा नाही केली तर त्यात तुमचे कोणते नुकसान आहे सांगा ? ॥ २ ॥ बसल्या ठिकाणी 'राम राम' म्हटले तर, तुम्हास कोणते श्रम होणार आहेत ? ॥ ३ ॥ संतांच्या वचनावर विश्वास ठेवला तर, त्याकरिता तुमचा कोणता खर्च होणार आहे ? ॥ ४ ॥ सत्य भाषण केले असता कोणते कष्ट लागणार आहेत व त्यात नुकसान तरी कोणते आहे ? ॥ ५ ॥ तु. म. म्ह. धर्म-नीतींच्या आचरणानेच देवाची प्राप्ती होते, इतर साधनांचा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही ॥ ६ ॥

३७. शुद्ध बीजा पोटीं । फळे रसाळ गोमटीं ॥ १ ॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ २ ॥
सर्वांग निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥ ३ ॥
तुका म्हणे जाती । तप दर्शनं विश्रांती ॥ ४ ॥
शुद्ध बीजाच्या पोटी चांगली रसाळ फळे (जशी) असतात ॥ १ ॥ (त्याप्रमाणे) ज्याच्या मुखात अमृतासारखी मधुर वाणी आहे व ज्याचा देह देवाच्या कारणी सेवेत आहे ॥ २ ॥ जो पुरुष सर्वांगाने निर्मळ आणि ज्याचे चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अशा पुरुषाच्या दर्शनाने त्रिविध ताप जातात व जीवाला विश्रांती प्राप्त होते. ॥ ४ ॥

३८. चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥ १ ॥
बहू खोटा अतिशय । जाणा भले सांगों काय ॥ २ ॥
मनाच्या तळमळें । चंदनेंही अंग पोळे ॥ ३ ॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥ ४ ॥
चित्त जर विषयनिरपेक्ष संतष्ट असेल तर सोनेसदा विषाप्रमाणे त्याज्य वाटते. ॥ शा हे भले जन हो. विषयांचा अतिशय भोग घेणे फार वाईट आहे, हे तुम्ही विचाराने जाणा. मी तुम्हाला अधिक काय सांगू ? ॥ २ ॥ मन जर विशिष्ट विषयाच्या भोगाकरिता तळमळत असेल तर चंदनानेही अंग भाजते (चंदनही शांत करू शकत नाही), ॥ ३ ॥ तु. म. म्ह. असंतुष्ट मनाच्या पुरुषाचा केवढाही सत्कार केला व कितीही त्याला भोग दिलेतरीसुद्धा त्यास असमाधानामुळे दुःख होतेच. ॥ ४ ॥

३९. परिमळ म्हणुन चोळू नये फूल । खाऊ नये मूल आवडते ॥ १ ॥
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥ २ ॥
कर्मफळ म्हणुनी इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोकां ॥ ३ ॥
फुलांत सुगंध आहे म्हणून, तो बघण्याकरिता फूल चोळू नये. मूल फार आवडते म्हणून (त्याची गोडी पाहाण्याकरिता ते) खाऊ नये. ॥ १ ॥ मोत्याचे पाणी (गोड आहे का ? हे) बघण्याकरिता मोती चाटू नयेत. वीणा इत्यादी वाद्यांचा नाद (कानाला मधर लागतो म्हणून तो नाद कसा असतो हे पाहण्याकरिता) वीणादी वाद्य फोडून कधी पाह नये ॥ २ ॥ तसे प्रारब्ध कमांचे फळ (स्त्रीपुत्रधनादी प्राप्त होणार आहेतच) म्हणून त्यांच्या भोगाची इच्छा करू नये. तु. म. म्ह. हेच वर्म लोकांना आम्ही आमच्या अवतारकार्यात दाखवू. ॥ ३ ॥

४०. माया तेंचि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया जयापरी ॥ १ ॥
तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगण तळीं हारपती ॥ २ ॥
दुजे नाही तेथे बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥ ३ ॥
तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणी लवणे जैसी तैसीं ॥ ४ ॥
ब्रह्माचे ठिकाणी माया अध्यस्त असल्यामुळे मायेला ब्रह्मापेक्षा वेगळी सत्ता नाही म्हणून ती ब्रह्मरूप आहे तसेच मायेला अधिष्ठान ब्रह्म आहे आणि अधिष्ठानच अध्यध्यास्ताच्या रूपाने भासत असते म्हणून ब्रह्मच माया आहे. किंवा जगाला उपादानकारण असलेली माया ब्रह्माशी अभिन्न आहे आणि निमित्तकारण असलेले ब्रह्म मायेशी अभिन्न आहे. जसे देह आणि त्याची छाया यांच्यात अभेद आहे त्याप्रमाणे माया आणि ब्रह्म यांच्यात अभेद आहे. ॥ १ ॥ छायेला शस्त्राने तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटत नाही. हाताने दूर सारण्याचा प्रयत्न केला तरीही ती देहाहून वेगळी होत नाही. पण लोटांगण घातले म्हणजे ती देहाखाली नाहीशी होते. ॥ २ ॥ त्याप्रमाणे ब्रह्मापेक्ष भिन्न नाही तर मग बळाचा वापर कोणासाठी करावयाचा ? व तिच्या नाशार्थ विचारादी साधनांचा तरी खटाटोप कशाला पाहिजे ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह. देह उंच वाढला म्हणजे छाया उंच वाढते व देह ठेंगणा केला म्हणजे छायाही ठेंगणी होते, म्हणून ती देहाशी अभिन्न आहे. त्यामुळेच ती कोणत्याही प्रयत्नाने देहाहून वेगळी करता येत नाही. पण देहाच्या लोटांगणामुळे मात्र ती नाहीशी होते. त्याप्रमाणे ही माया ब्रह्माशी अभिन्न असल्यामुळे मनुष्याच्या इतर कोणत्याही प्रयत्नाने नष्ट होत नाही. तरी पण ब्रह्मज्ञानाने नष्ट होते. ॥ ४ ॥

४१. दुर्जनासी करी साहे । तोही लाहे दंड हे ॥ १ ॥
शिंदळीचा कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ २ ॥
येरयेरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥ ३ ॥
तुका म्हणे कापूं नाके । पुढे आणिके शिकविती ॥ ४ ॥
दुर्जनाला दुष्ट कृत्य करण्याविषयी जो साह्य करतो तोही दुर्जनांप्रमाणेच शिक्षेला पात्र आहे. ॥ १ ॥ कोणत्याही स्त्रीचा शिंदळकी करण्याचा मार्ग म्हणजे वेश्येचा सहवास होय. ती वेश्याच त्या स्त्रीला शिंदळकी कशी करावी याचा मार्ग शिकविते. कारण वाईटाचा संग वाईटच असतो. ॥ २ ॥ जसे दोन लाकडांच्या घर्षणापासून अग्नी निर्माण होतो त्याप्रमाणे (दोन दुष्ट जर एकत्र आले तर) दोघांनाही भयंकर दुःख प्राप्त होते ॥ ३ ॥ तु. म. म्ह. आम्ही दुष्टकृत्यांत साहाय्य करणारांची नाके कापू. (त्यांना दंड-शिक्षा करू) त्यामुळे ती इतरांना दुष्ट कृत्य करण्याविषयी शिकविणार नाहीत. ॥ ४ ॥

४२. वृत्ति भूमिराज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चिती देव नाहीं ॥ १ ॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरीचें सार लाभ नाहीं ॥ २ ॥
देवपुजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभे ॥ ३ ॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदर । लाघव हे चार शिंदळीचे ॥ ४ ॥
जो देवाची भक्ती करून एखादी वतनदारी, भूमी, राज्य व द्रव्य मिळवितो त्यास देवाची प्राप्ती कधीच होत नाही असे समजावे. ॥ १ ॥ एखादा हमाल पाठीवर धान्याच्या किंवा साखरेच्या पोत्यांचा भार वाहतो, पण त्यास मजुरीव्यतिरिक्त पोत्यांतील सार जे धान्य वा साखर याचा लाभ होत नाही ॥ २ ॥ (त्याप्रमाणे वृत्ती, भूमी, राज्य व द्रव्य मिळविण्याचे देवपूजा हे साधन आहे अशा लोभाने) देवपूजेवर मन ठेवून (जो देवपूजा करतो) तो देवाला 'देव' मानून पूजा करीत नाही तर तो आपल्या समजुतीने देवाला पाषाण समजतो, आणि देवदेखील त्या पूजकाला अंतःकरणात प्रेम-श्रद्धा नसल्यामुळे पाषाणच मानतो. अशा रीतीने पाषाणच पाषाणाची पूजा करतो असे म्हणावे लागते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. भक्तीचे फळ (आपण जगात फार मोठे भक्त आहोत असा) लोकांत आदर निर्माण होणे हेच आहे असे जे चिंतितात त्यांची ती ढोंगी भक्ती म्हणजे व्यभिचारिणी स्त्रीच्या वागण्यातील कौशल्य होय. ॥ ४ ॥

४३. पवित्र सोवळीं । एक तीच भूमंडळीं ॥ १ ॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥
तींच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धन वित्तें ॥ ४ ॥
तुका म्हणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥ ४ ॥
या जगात तीच एक परमार्थतः पवित्र आणि सोवळी आहेत ॥ १ ॥ की, ज्यांचा आवडता देव असून देवाचे ठिकाणीच ज्यांचा निरंतर प्रेमभाव आहे ॥ २ ॥ तीच भाग्यवान आहेत व तीच वृत्ती, भूमी, राज्यादी धनाने व द्रव्याने समृद्ध व परिपूर्ण आहेत. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अशा भक्तांची सेवा केली असता ती देवाला पावते. ॥ ४ ॥

४४. आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥
भ्रमले चावळे । तैसें उचित न कळे ॥ ३ ॥
तुका म्हणे विषे । अन्न नाशियेलें जैसें ॥ ४ ॥
जो मनुष्य आशाबद्ध आहे तो नारायणाला काय जाणू शकणार ? ॥ १ ॥ इंद्रियांची जो सेवा करतो व इंद्रियांच्या आवडीचे विषयच ज्याला हवेसे वाटतात, ॥ २ ॥ जो भ्रमिष्ट झाला आहे व झोपेत बरळतो त्याला योग्यायोग्य जसे कळत नाही, तसे इंद्रियांची सेवा करणाऱ्याला योग्यायोग्य कळत नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. विषाने अन्न जसे नासले जाते त्याप्रमाणे आशाबद्ध मनुष्य इंद्रियांच्या सेवेने नासतो, वाया जातो. ॥ ४ ॥

४५. ढेकरें जेवण दिसें साचें । नाहीं तरि का, कुंथाकुंथी ॥ १ ॥
हेही बोल तेंही बोल । कोरडे फोल रुचीवीण ॥ २ ॥
गव्हाचिया होती परी । फके वरी खाऊ नये ॥ ३ ॥
तुका म्हणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥ ४ ॥
आपोआप ढेकर आली म्हणजे त्यावरून खरेच तृप्ती होईपर्यंत जेवण झाले आहे असे दिसते. नाहीतर कुंथून कुंथून जी ढेकर दिली जाते ती कच्ची असते. तृप्ती होईपर्यंत जेवण झाल्याचा पक्केपणा त्यात नसतो. ॥ १ ॥ जेवण होऊन 'जेवण झाले' असे म्हणणे हेही बोलणेच आहे व जेवण न होता 'जेवण झाले' असे जो म्हणतो तेही बोलणेच आहे. पण दुसरे बोलणे जेवणाच्या अनुभवावाचून असल्यामुळे दांभिकपणाचे व व्यर्थ आहे. ॥ २ ॥ गव्हापासून अनेक प्रकारची पक्वान्ने करता येत असली तरी कोरडे गहू खाणे योग्य नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. हातात काकण आहे आणि ते पाहण्यास आरसा आणणे हे जसे व्यर्थ; त्याप्रमाणे दांभिक भक्त कोणता, अदांभिक भक्त कोणता हे त्याच्या आचारावरून स्पष्ट कळून येते. ॥ ४ ॥

४६. करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचे काम काय असें ॥ १ ॥
कळावें तयासी कळें अंतरीचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ २ ॥
अतिशया अंती लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणें राहें समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥ ४ ॥
देवाची पूजा करणे असेल तर ती मनोभावाने करावी व तीच उत्तम पूजा होय. लौकिक गंध, पुष्प, धूप, दीप, वस्त्र, प्रावरण, नाना वाघे यांची काय गरज आहे. ॥ १ ॥ बरे, बाह्योपचारावाचून केलेली पूजा लोकांना कळत नसली तरी ज्याला कळणे आवश्यक आहे त्याला (देवाला) कळतेच. कारण त्याला पूजकाच्या मनातील भाव कळत असतो. कोणत्याही फलाचे तेच कारण खरे असते की, जे स्वरूपतः सत्य असते. (भक्ती स्वरूपतः खरी असेल तरच ती देवाच्या आवडीला कारण होते.) ॥ २ ॥ चित्तामध्ये जसे बीज असेल त्याप्रमाणे ते फळ देत असते. चित्तामध्ये सद्वासनारूपी बीजाचा अधिकपणा असेल तर त्यामुळे लाभही अधिक होतो, आणि असद्वासनारूपी बीजाचा अधिकपणा असेल तर हानीदेखील मोठीच होते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्या भजनाने देवाला व आपल्याला समाधान होईल असे भजनच भवसागराच्या पैलतीराला पोचवीत असते. ॥ ४ ॥ .

४७. नव्हे आराणूक संसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हाचि धंदा ॥ १ ॥
देवधर्म सांदी पडिले सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ २ ॥
रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥ ३ ॥
तुका म्हणे आत्महत्यारे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥ ४ ॥
संसारात समाधान नाही, याचे कारण, (हे करावे, ते करावे) असे उद्योग-धंद्यासंबंधी विचार सर्वकाळ मनात असतात. ॥ १ ॥ संसाराच्या अविरत उद्योगामुळे देव-धर्म सांदीला पडतात, आणि केवळ विषयांचाच गोंधळ घरात गाजत असतो. (विषयांचेच महत्त्व वाढत असते) ॥ २ ॥ संसाराचा उद्योग करण्यास रात्र आणि दिवस पुरे होत नाहीत व इतके करूनही स्त्री-पुत्रादिकांचे समाधान होत नाही. आणि स्त्री-पुत्रांचे समाधान करण्यातच वेळ जात असल्यामुळे देवाचे दर्शनसुद्धा घडत नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. असे संसारासक्त जीव स्वहिताचा घात करतात, कारण देवाची भक्ती न करण्यात त्यांची मोठी चूक होते. ॥ ४ ॥

४८. श्मशान ते भूमी प्रेतरूप जन । सेवाभक्ति हीन ग्रामवासी ॥ १ ॥
भरतील पोटें श्वानाचिया परी । वस्ति दिली घरी यमदूतां ॥ २ ॥
अपूज्य लिंग तेथें अतित ने घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥ ३ ॥
तुका म्हणे नाही ठावी तीथ मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥ ४ ॥
ती भूमी स्मशान आहे, ते लोक प्रेतरूप आहेत की, ज्या गावातील रहिवासी अतिथीसेवा आणि ईश्वरभक्ती करीत नाहीत. ॥ १ ॥ हे लोक काही तरी उद्योग करून श्वानाप्रमाणे पोट भरतील पण पुढे त्यांनी आपल्या घरी यमदूतांना स्थान दिलेले असते ॥ २ ॥ ज्या गावात पूजेला योग्य असे शिवलिंग किंवा विष्णुप्रतिमा नसते व कोणताही अतिथी आश्रयाला येत नाही तेथे चोरांची व दुर्जनांची वस्ती असते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह, कोणत्या तिथीला कोणते धर्मकृत्य करावे हे ज्यांना कळत नाही ती माणसे यमाची कुळे असतात यात शंका नाही. ॥ ४ ॥

४९. एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥ १ ॥
काय करूं बहु वाटें तळमळ । आंधळी सकळ बहिर्मुख ॥ २ ॥
हरिहरासी नाहीं बोटभर वाती । कोण त्यांची गति होईल नेणो ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं नारायणी प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणो ॥ ४ ॥
एकादशी आणि सोमवार ही दोन व्रते जो करीत नाही त्यांना कोणती गती प्राप्त होईल कळत नाहीं ॥ १ ॥ सर्व लोक भक्तीविषयी आंधळे व भोगाविषयी बहिर्मुख असलेले बघून त्यांच्याविषयी तळमळ वाटते (त्यांची कीव येते) पण काय करू ? ॥ २ ॥ हरिहराच्या मंदिरात दिवा लावण्याकरिता बोटभर वात देखील जे देत नाहीत त्यांना कोणती गती प्राप्त होईल ते कळत नाही ! ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्यांचे नारायणावर प्रेम नाही त्यांना कोणती गती प्राप्त होईल . कळत नाही ! ॥ ४ ॥ .

५०. आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला ॥ १ ॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ २ ॥
परपीडे परद्वारी सावधान । सादरचि मन अभाग्याचें ॥ ३ ॥
न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहावे दोष सकळही ॥ ४ ॥
पर उपकार पुण्य त्या वावडे । विषाचे ते किडे दुग्धीं मरे ॥ ५ ॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥ ६ ॥
जे धर्म-भक्तीचे आचरण करीत नाहीत त्याचे पितर 'आपल्या वंशात दुराचारी पुत्र झाला' म्हणून आक्रोश करतात. ॥ १ ॥ हा दुराचारी, गर्भात असतानाच गळून का पडला नाही ? जिने याला जन्म दिला ती पापिणी, कुळाला लज्जा उत्पन्न करविणारी आई वांझ का झाली नाही ॥ २२ ॥ ज्या दुराचारी अभाग्याचे मन, दुसऱ्याची हिंसा करण्याविषयी दक्ष आहे आणि परस्त्रीगमन करण्याविषयी तत्पर आहे. ॥ ३ ॥ एखादे वेळी दुसऱ्याची निंदा व चहाडी करावयास नाही मिळाली तर त्या दिवशी उपाशी राहिल्यासारखे ज्याला वाटते व सर्व दोषांचा संग्रह करणे जो स्वतःचे कर्तव्य समजतो ॥ ४ ॥ पुण्य, परोपकार यांचे ज्याला वावडे असते, नेहमी विषात राहणारे किडे दुधांत टाकल्याबरोबर जसे मरतात. (तसे नेहमी पाप करण्याची ज्याला सवय लागली आहे त्याला पुण्य करणे मरणच वाटते) ॥ ५ ॥ तु. म. म्ह. तो दुराचारी विटाळाचीच मूर्ती होय. म्हणून दया, क्षमा, शती हे चांगले गुण त्याला स्पर्शदेखील करीत नाहीत. ॥ ६ ॥

५१. श्वान शीघ्र कोपी । आपणा घातकर पापी ॥ १ ॥
नाहीं भीड आणिक धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ २ ॥
माणसासि भुंके । विजातीने घ्यावे थुके ॥ ३ ॥
तुका म्हणे चित्त । मळिण करा ते फजित ॥ १ ॥
जो क्षुद्र कारणावरून रागावतो तो श्वान आहे. तो पापी आत्मघात करीत असतो. ॥ १ ॥ ज्याला कोणाची पर्वा वाटत नाही व ज्याच्या अंगी धैर्य नसते, ज्याला उपदेशरूपी दूध पचत नाही ॥ २ ॥ जो माणसाला भुंकतो (कोणालाही काहीही बोलत सुटतो) अशा कुत्र्याच्या जातीच्या माणसावर विजातीय सज्जनांनी थुकावे. ॥ शा तु. म. म्ह. ज्यांचे चित्त पापोन्मुख, मलिन आहे त्याची फजिती करा. ॥ ४ ॥

५२. देखोनि हरखली अंड । पुत्र झाला म्हणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥ १ ॥
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुका । थोर झाला चुका । वर का नाही घातलीं ॥ २ ॥
भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाची शरीरें । बोले निष्ठुर उत्तरे । पाप दृष्टि मळिण चित्त ॥ ३ ॥
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगाते विटाळ । तुका म्हणे खळ । म्हणोनिया निषिद्ध तो ॥ ४ ॥
बरेच दिवसांपासून संतती नसलेल्या बाईने प्रसूत होताक्षणीच मुलाची अंडुकली बघितली आणि आनंदित झाली, व 'पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला' अशी ती रांड म्हणू लागली. पुढे तिचा मुलगा भांडखोर, चहाडखोर, चोर आणि शिंदळकी करणारा निघाला. ॥ १ ॥ जिकडे जाईल तिकडे लोकांना त्रास देऊ लागला. 'वाईट कृत्याबद्दल लोकांकडून शिव्या खाणे' हेच भांडवल जोडू लागला. अशा मुलाच्या बाबतीत त्याच्या आईची फार मोठी चूक तिने जन्मताक्षणीच त्याच्या तोंडात 'वर' का घातली नाही व का मारून टाकले नाही ॥ २ ॥ त्याच्या भाराने भूमी कापते. त्याला मरणांती कुंभीपाक नरकातील शरीरे प्राप्त होतात. प्रत्येकास निष्ठुर बोलतो, वाईट दृष्टीने बघतो, त्याचे चित्त पापविचाराने मलिन झालेले असते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. तो इतका दुराचारी, पापी, चांडाळ आहे की, त्याची संगती केली असता विटाळ होतो म्हणून तो 'खळ' निषिद्ध आहे. संगतीला योग्य नाही. ॥ ४ ॥

५३. नेणे गाणे कंठ नाही हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥ १ ॥
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझें पायीं चित्त ठेवीं देवा ॥ २ ॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणावांचूनिया ॥ ३ ॥
गाणे काय असते ते ठाऊकही नाही. गाण्याकरिता सुस्वर असा गळाही नाही. त्यामुळे पांडुरंगा, माझ्या उद्धाराचा भार तुझ्यावरच घातला आहे ॥ १ ॥ रागाचे स्वरूप, तो आळविण्याची वेळ, समेवर येण्याचा काळ व तालाचे स्वरूप हे मी काही जाणत नाही. देवा, मी तुझ्या पायावर चित्त ठेवले आहे. ॥ २ ॥ तु. म. म्ह. हे नारायणा, मला तुझ्यावाचून इतर लौकिकाची इच्छाही नाही. ॥ ३ ॥

५४. माझी पाठ करा कवी । उठ लावी दारोदार ॥ १ ॥
तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ २ ॥
उष्टावळी करुनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥ ३ ॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदी न सरती ॥ ४ ॥
माझे काव्य पाठ करा, गावात कोठे तरी माझा कीर्तनसप्ताह करा' असे दारोदार फिरून लोकांच्या पाठीमागे इटहट लावतो ॥ ११ ॥ अशा कवीला देवाची सीमा पारखी होते. त्याला देवाचे स्वरूप कळत नाही. परंतु इतका अज्ञानी असूनही लोकांत आपली असलेली प्रतिष्ठा सोडून देण्यास लाजतो. ॥ २ ॥ दुसऱ्यांनी केलेल्या काव्यांतील उष्टे शब्द गोळा करून काव्य करतो व ते काव्य गाताना देवाविषयी कुंथून प्रेम आणतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जे वरवर भक्तीचा देखावा दाखवितात ते चार लोकांचे रंजन करीत असले तरीपण गोविंदाला मान्य होत नाहीत. ॥ ४ ॥

५५. उपाधीच्या नांवें घेतला शिंतोडा । नेदं आतां पीडा आतळों ते ॥ १ ॥
कशासाठी हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ २ ॥
कांहीं नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥ ४ ॥
परिग्रहरूपी उपाधीचा स्पर्श झाला म्हणून मी त्याच्या नावाने शिंतोडा घेतला व पवित्र झालो. पुनश्च आता ती परिग्रहाची पीडा मी माझ्या अंगाला शिवू देणार नाही. ॥ १ ॥ प्रथम चिखलात हात भरवून नंतर ते का धूत बसावे. कारण सरळ मागनि चालत असता, ती एक निष्कारण अडचण निर्माण होते. ॥ २ ॥ देवाने आपल्याकरिता काय बरे करून ठेवले नाही ? ज्या ज्या ठिकाणी जे जे असते ते ते सर्व आपलेच असते. मग परिग्रहाची आवश्यकता काय आहे ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जेव्हा माझा अहंकार गेला त्याच वेळी 'माझे' आणि 'तुझे' या भेदाची बोळवण झाली. ॥ ४ ॥

५६. योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रिये ॥ १ ॥
अवघीं भान्ये येती घरा । देव सोयरा जालिया ॥ २ ॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥
तुका म्हणे उचित जाणा । उगी सिणा काशाला ॥ ४ ॥
अष्टांगयोगाचे भाग्य क्षमा आहे. पण त्याकरिता सुरुवातीला इंद्रियांचे दमन करावे लागते. ॥ १ ॥ पण देव सखा झाला तर क्षमा इत्यादी सर्व भाग्ये आपणहून घरी येतात ॥ २ ॥ आपल्या मालकीचे शेत आहे म्हणून मशागत आणि पेरणी न करता आपोआप पीक देत नाही ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्या वेळी जे उचित असेल ते तुम्ही जाणा. निष्कारण कशाला कष्ट करता ? ॥ ४ ॥

५७. नये नेत्रां जळ । नाहीं अंतरी कळवळ ॥ १ ॥
तो हे चावटीचे बोल । जन रंजवणे फोल ॥ २ ॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामी जो सादर ॥ ३ ॥
तुका म्हणे भेटी । जंव नाही दृष्टादृष्टी ॥ ४ ॥
डोळ्यांत पाणी येत नाही आणि अंतरात हरीविषयी प्रेम नाही ॥ १ ॥ ते चावटपणाचे वक्तृत्व जनांची करमणूक करण्याकरिता आहे. पण फलाच्या दृष्टीने फोल आहे. ॥ २ ॥ ज्याला हरी-गुरूविषयी श्रद्धा, भक्ती नाही, त्याने केलेला उपदेश सफल होत नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जोपर्यंत खऱ्या ज्ञानीभक्तीची दृष्टादृष्ट होऊन भेट होत नाही तोपर्यंत असे दांभिक लोक जगामध्ये उपदेशक म्हणून मिरवितात. ॥ ४ ॥

५८. बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥ १ ॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ २ ॥
विषयांचे चर्वणीं । केली आयुष्याची गाळणी ॥ ३ ॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥ ४ ॥
एका कृपणाने आईच्या श्राद्धदिनी बायकोला सुवासीण म्हणून बसविले व बापाच्या श्राद्धदिनी स्वतः पितृस्थानी बसला ॥ १ ॥ अरे धर्मनष्टा, असे करण्यात सुद्धा तुझा फार खर्च झाला बरे ! अरे, ह्या तुझ्या सगळ्या क्रिया अत्यंत शास्त्रविरुद्ध आहेत. ॥ २ ॥ विषयसेवनात सर्व आयुष्याची गाळणी केलीस ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अशा धर्मलंडाला देव, धर्म काही नाही. म्हणून तो मनुष्य असूनही धोंडा आहे. ॥ ४ ॥

५९. दानें कांपे हात । नावडे तेविशी मात ॥ १ ॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीर मिथ्या फोल ॥ २ ॥
नव जाती पाय । तीर्था म्हणे वेचूं काय ॥ ३ ॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥ ४ ॥
कृपण मनुष्य एखादे वेळी उदार झालाच तर, दान करतेवेळी त्याचा हात थरथर कापतो. त्याला ती वस्तु हातातून सोडवत नाही. 'दानधर्म करा' असे कोणी सांगितले तरी त्यास ती गोष्ट रुचत नाही ॥ १ ॥ धर्मलंड मनुष्य हरिकथेला प्रथम जात नाही आणि गेलाच तर कथेमध्ये बसून चावटपणाचे भाषण करतो. ते त्याचे भाषण, दुधात हिंग टाकल्याप्रमाणे वाईट आणि व्यर्थ आहे. ॥ २ ॥ तीर्थयात्रेला त्याचे पाय जात नाहीत. 'तुम्ही तीर्थयात्रेला का जात नाही ?' असे कोणी विचारले तर मजजवळ पैसाच नाही तर मग खर्च कसा करू ? असे म्हणतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्याच्या मनात जी गोष्ट नसते ती त्याच्या हातून कधीच घडत नाही. ॥ ४ ॥

६०. वळितें जे गाई । त्यासी फार लागे काई ॥ १ ॥
निवे भावाचे उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ २ ॥
न लगती प्रकार । कांही मनाचा आदर ॥ ३ ॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥ ४ ॥
गाई वळणाऱ्या गोपाळांना, देवाला प्रसन्न करून घेण्यात पुष्कळ साधने करावी लागली काय ? ॥ १ ॥ त्यांनी प्रेमपूर्वक वेड्यावाकड्या उच्चारलेल्या शब्दाने देखील देव संतुष्ट झाला. ॥ २ ॥ देवाकरिता काही प्रकार करावे लागत नाहीत. मनात देवाविषयी प्रेम असले म्हणजे झाले. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. देव, प्रेमळ व दीनभक्तासाठी आपला थोरपणा टाकतो. ॥ ४ ॥

६१. मैत्र केला महाबळी । कामा न ये अंतकाळीं ॥ १ ॥
आधीं घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम । नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ २ ॥
धन मिळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥ ३ ॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥ ४ ॥
तंववरी तुमचे बळ । जंव आला नाही काळ ॥ ५ ॥
तुका म्हणे बापा । चुकवी चौऱ्याशींच्या खेपा ॥ ६ ॥
महान पराक्रमी माणसाशी मित्रत्व केले तरी ते अंतकाळी उपयोगी पडत नाही. ॥ १ ॥ याकरिता मरण येण्याच्या पूर्वीच रामनाम घेण्याने यमाशी सलोखा होत असल्यामुळे रामनामाचा सामोपचाराचा उत्तम उपाय यमाजवळ दाखल कर. नाहीतर यम तुझ्यावर रागाने करकरा दात खाईल. ॥ २ ॥ कोट्यवधी धन मिळविले तरी ते हरण केल्यावाचून काळ तुला कधीही सोडणार नाही. ॥ ३ ॥ त्या वेळी स्त्रीपुत्रादी परिवार, पराक्रमी सैन्य, असंख्य आप्तइष्ट, हे कामाला येत नाहीत. ॥ ४ ॥ तोवरच तुझे बळ आहे की, जोवर काळ आला नाही. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. याकरिता बाबा, चौऱ्यांशी लक्ष योनींची येरझार चुकव. ॥ ६ ॥

६२. सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वताएवढें ॥ १ ॥
धरी धरी आठवण । मानीं संतांचे वचन ॥ २ ॥
नेलें रात्रीनें तें अर्थे । बाळपण जरा व्याधे ॥ ३ ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंतीजसी मूढा ॥ ४ ॥
विचार करून पाहिले असता संसारात जवाएवढे थोडे सुख आहे, आणि दुःख मात्र पर्वताएवढे मोठे आहे. ॥ १ ॥ याची सदैव आठवण ठेव व याविषयी संतांची वचने प्रमाण मान ॥ २ ॥ शंभर वर्षांच्या आयुष्यापैकी अर्धे आयुष्य रात्रीने नेलेले असते. उरलेल्या पन्नास वर्षांत बाळपण, म्हातारपण व अनेक रोग आहेत. मग केव्हा संतवचनांचा आदर करणार आणि हरिभजन करणार ? ॥ ३ ॥ तु.म.म्ह. अरे मूर्खा, एकदा का आयुष्य संपले म्हणजे पुढे जन्म-मरणरूपी घाण्याला जुंपला जाशील. ॥ ४ ॥

६३. कानडीने केला महाटा भ्रतार । एकाचे उत्तर एका न ये ॥ १ ॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ २ ॥
तिने पाचरिलें इलबा म्हणोन । येरु पळे आण झाली आतां ॥ ३ ॥
तुका म्हणे येरा येरा में विच्छिन्न । तेथे वाढे सीण सुखापोटीं ॥ ४ ॥
एका कर्नाटकी बाईने महाराष्ट्रीय नवरा केला त्यामुळे एकमेकांचे बोलणे एकमेकाला समजत नव्हते. ॥ १ ॥ हे कमळापती, तसे मला करू नकोस. अशी विसंगती मला देऊ नकोस, तर सज्जनांची संगती दे. ॥ २ ॥ त्या कर्नाटकी बाईने आपल्या नवऱ्याला कर्नाटकी भाषेत 'इल बा' म्हणजे 'माझ्याकडे या' असे म्हणून बोलाविले. पण 'बा' चा 'बाबा' असा भलताच अर्थ त्याला वाटला व ही आपल्याला बाप समजते अर्थात् ही तिची आपल्याविषयी 'बाप' मानण्याची शपथ झाली आहे असे समजून तिच्यापासून तो दर पळून जाऊ लागला. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. जे एकमेकांशी अगदीच विसंगत असतात, तेथे सुखाच्याऐवजी दुःखाच वाढते. ॥ ४ ॥

६४. बोलायाचा त्यासी । नको संबंध मानसीं ॥ १ ॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ २ ॥
जळो त्याचे तोंड । नको दृष्टीपुढे भांड ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥ ४ ॥
जो दर्जन आहे त्याच्याशी बोलण्याचा प्रसंग माझ्या मनात सुद्धा नको. ॥ १ ॥ हे गोविंदा, तुझ्या स्वरूपाला विसरून जे संतांची निंदा करतात ॥ २ ॥ त्यांच्या तोंडाला आग लागो. तो भांडखोर माझ्या दृष्टीपुढे देखील नको. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. देवा, त्या दुर्जनापासून मला दूर ठेवा. ॥ ४ ॥

६५. तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोध तैसेचि खळ ॥ १ ॥
कारे सिणलासी वाउगा । न भजता पांडुरंगा ॥ २ ॥
मान दंभ पोटासाठीं । केली अक्षरांची आटी ॥ ३ ॥
तप करूनि तीर्थाटण । वाढविला अभिमान ॥ ४ ॥
वांटिलें तेंधन । केली अहंता जतन ॥ ५ ॥
तुका म्हणे चुकले वर्म । केला अवघाचि अधर्म ॥ ६ ॥
अरे तू मोठा यज्ञ करून अग्नीत तीळ तांदूळ जाळलेस पण अंतरातील कामक्रोधरूपी शत्रू तसेच राहून गेले ॥ १ ॥ पांडुरंगाचे भजन न करता यज्ञ-यागादिकांचा शीण निष्कारण कारे केलास ? ॥ २मानाकरिता, कीर्तीकरिता ग्रंथाच्या अध्ययन-पठनाचे का येवढे श्रम केलेस ? ॥ ३ ॥ तप, तीर्थाटन करून अभिमान वाढविला, ॥ ४ ॥ दान-धर्मांत लोकांना धन वाटले पण अहंता जतन केली. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. हे सर्व करण्यात खरी वर्माची गोष्ट चुकली. त्यामुळे सर्व अधर्म केला ॥ ६ ॥

६६. संसाराच्या तापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥ १ ॥
म्हणउनि तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ २ ॥
बहुतां जन्मींचा जालो भारवाही । सुटिजें हें नाहीं वर्म ठावें ॥ ३ ॥
वेढियेलों चोरी अंतर्बाह्यात्कारी । कणव न करी कोणी माझी ॥ ४ ॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दीस झालों कासाविस ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां धाव घाली वेगी । ब्रीद तुझें जगी दीनानाथा ॥ ६ ॥
देवा, या बायका-पोरांची सेवा करता करता संसारतापाने मी तापलो आहे ॥ १ ॥ म्हणून मी तुझ्या पायांची आठवण केली, तरी हे माझे आई पांडुरंगे ये हो. ॥ २ ॥ पुष्कळ जन्मापासून मी संसाराचे ओझे वाहात आहे. यातून सुटका कशी होईल याची युक्ती मला कळली नाही. ॥ ३ ॥ अंतरांतील काम-क्रोधांनी आणि बाहेरच्या स्त्री-पुत्रादी चोरांनी मला वेढले आहे. कोणीही माझी कीव करीत नाही ॥ ४ ॥ या संसारामुळे मी फार पराधीन झालो आणि सर्वस्वाला मुकलो, व पुष्कळ दिवस तळमळ करीत राहिलो. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. देवा, तू लवकर धावून ये. कारण जगात 'दीननाथ' असे तुझे ब्रीद प्रसिद्ध आहे. ॥ ६ ॥

६७. भक्त ऋणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच खरी ॥ १ ॥
मागे काय जाणों आइकिली वार्ता । कबिरा सातें जातां घड्या वांटी ॥ २ ॥
माघारिया धन आणिलें घरासी । ने घे केला त्यासी त्याग तेणें ॥ ३ ॥
नामदेवाचिया घरासी आणिलें । तेणें लुटियेलें द्विजांहातीं ॥ ४ ॥
प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । येकोबाचें ऋण फेडियलें ॥ ५ ॥
बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥ ६ ॥
तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार । नाडेल साचार तोचि एक ॥ ७ ॥
देव भक्तांचा ऋणी आहे असे पुराणे म्हणतात. ती पुराणांची वचने निश्चयाने अगदी खरी आहेत. ॥ १ ॥ मागे काय घडले हे कसे कळेल ? पण अलीकडची वार्ता मात्र अशी ऐकिली आहे की, श्रीकबीरमहाराज, कापड विकण्यास बाजारात जात असता काही वस्त्रहीन दरिद्री लोकांची करुणा येऊन सर्वांभूती भगवद्भाव पाहणाऱ्या कबीरमहाराजांनी ते कापड कृष्णार्पणबुद्धीने त्यांना वाटले. ॥ २ ॥ अर्थात् देवाला ते कापड दिल्यामुळे देवाने त्या कापडाची किंमत कबीरमहाराजांच्या घरी आणली. पण त्यांनी त्या धनाचा त्याग केला. ते घेतले नाही. म्हणून भक्तांचे ऋण देवाकडे राहिले. ॥ ३ ॥ श्रीनामदेवमहाराजांनी भक्ती केली म्हणून ते ऋण फेडण्याकरिता नामदेवमहाराजांचे दारिद्रय बघून त्यांचे घरी देवाने धन आणले. पण नामदेवांनी ते न घेता ब्राह्मणाकडून लुटविले. ॥ ४ ॥ प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याला दुसरे प्रमाण काय द्यावे ? श्रीएकनाथमहाराजांच्या भक्तीचे ऋण फेडण्याकरिता त्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने देवाने सर्व कामे केली. ॥ ५ ॥ श्रीभानुदास महाराजांनी शेतात पेरावयासाठी ठेवलेले बी दळून, घरी आलेल्या अतिथी-संतांना जेवू घातले, व त्यांना संतुष्ट केले, या त्यांच्या अतिथिसेवेचे ऋण फेडण्याकरिता देवाला त्यांच्या शेतात पेरणी करावी लागली. ॥ ६ ॥ तु. म. म्ह. देव, भक्तऋणी आहे असा ज्याला विश्वास नाही तो खरोखरच स्वहिताविषयी फसला असे जाणावे. ॥ ७ ॥

६८. भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥ १ ॥
ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगींच अधर्म ॥ २ ॥
देव अंतरें तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥ ३ ॥
तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचाराचे पोटीं ॥ ४ ॥
विधीने विषयांचा भोग घेतला असता तो त्यागच होतो व अविधीने विषयांचा त्याग केला असता, तो त्याग न घडता अंगाला भोगच घडतो. ॥ १ ॥ असे हे उलट सुलट धर्माधर्माचे स्वरूप आहे. म्हणून एखादेवेळी वरवर दिसण्यास धर्म असला तरी त्याच्या पोटी अधर्म असतो व वरवर दिसण्यास अधर्म असला तरी त्याच्या पोटी धर्म असतो. ॥ २ ॥ ज्यामुळे देव अंतरतो ते पाप आहे याकरिता देवाला अंतरविणाऱ्या खोट्या संकल्पाचा नाश करा. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अविधीने केलेल्या कोणत्याही कर्माची भीड धरणे वाईट असते. याकरिता चांगले कोणते, वाईट कोणते या विचाराच्या पोटीच लाभ असतो. ॥ ४ ॥

६९. भोरप्याने सोंग पालटिलें वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे ॥ १ ॥
टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखो नेदी जगीं फांसे जैसे ॥ २ ॥
ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळो नेदी ॥ ३ ॥
खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तयासाठीं ॥ ४ ॥
तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परि तूं कृपावंत पांडुरंगा ॥ ५ ॥
बहुरूप्याने वरवर शिव-विष्णूचे सोंग घेऊन स्वतःचा देह बदलून टाकला असला तरी त्याचे ते सोंग आहे. जसे बगळ्याचे ध्यान मासे धरण्याकरिता असते ॥ १ ॥ त्याप्रमाणे एखादा ढोंगी भक्त, द्वादश टिळे लावतो. तुळसी-रुद्राक्षांच्या माळा घालतो. अंगावर मुद्रालावतो. पण जगालालुटण्याचे मनातील फासेमात्र दिसू देत नाही. ॥ २ ॥ जसा (मासे धरणारा) कोळी, गळाला लावलेल्या आमिषाचा चारा मत्स्याला खाऊ घालतो. पण त्या आमिषात असलेला गळफास त्याला कळू देत नाही. ॥ ३ ॥ जसा खाटिक प्रेमळ शब्दाने पशुंचे पालन करतो. पण त्याचे ते प्रेम पशुंच्या मानेची नळी कापण्याकरिता असते. ॥ ४ ॥ तु. म. म्ह. देवा, वरील दृष्टान्ताप्रमाणे मी लोकांत ढोंगाने पूज्य झालो आहे. पण पांडुरंगा, मी ढोंगी असलो तरी तू कृपाळू आहेस. ॥ ५ ॥

७०. गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥ १ ॥
मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ २ ॥
भंगलिया चित्ता । न ये काशाने सांधितां ॥ ३ ॥
तुका म्हणे धीर । भंगलिया पाठी कीर ॥ ४ ॥
योद्ध्याच्या अंगातील वीरश्री निघून गेली तर त्याला एखादी क्षुद्र रांडसुद्धा मारू शकते ॥ १ ॥ एखाद्या राजाच्या हातातून सत्ता गेली, तर त्याला परत आणता येत नाही. ॥ २ ॥ दोन मित्रांच्या मनाचा भंग झाला असेल, तर ती दोन मने कशानेही जोडली जात नाहीत. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. एकदा धैर्य खचल्यावर पुनः ते आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते खरे परत येत नाही. ॥ ४ ॥

७१. युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणे दाखविलें ॥ १ ॥
कलियुगामाजीं करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ २ ॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥ ३ ॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंवीण ॥ ४ ॥
ज्यात परिमित आहारविहार आहेत अशी अष्टांगयोगासारखी अवघड साधने करावयास नको. नारायणराने (गीतेत) फार सोपे साधन सांगितले आहे. ॥ १ ॥ ते असे की, 'कलियुगात नामसंकीर्तन करावे' एवढ्या एकाच साधनाने नारायण भेट देईल. ॥ २ ॥ नामसंकीर्तनाकरिता लौकिक व्यवहार टाकावा लागत नाही व वनात जाण्याची आणि भस्म-दंड घेण्याची (म्हणजे आश्रमांतर करण्याची आवश्यकता नाही. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मला नामसंकीर्तनावाचून इतर उपाय व्यर्थ वाटतात. ॥ ४ ॥

७२. कंठी कृष्णमणि । नाहीं अशुभ ते वाणी ॥ १ ॥
हो कां नर अथवा नारी । रांड तयें नांवें खरीं ॥ २ ॥
नाही हाती दान । शूरपणाचें कांकण ॥ ३ ॥
वाळियेलीं संतीं । केली बोडोनि फजिती ॥ ४ ॥
तुका म्हणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥ ५ ॥
ज्यांच्या कंठात कृष्णनामाचे भूषण नाही त्यांच्या कंठातून निघालेली वाणी अमंगळ होय ॥ १ ॥ मग ते पुरुष असोत अथवा स्त्रिया असोत. कृष्णनामाचे भूषण नसलेल्या स्त्रीला (लग्न झालेली असली तरी) परमार्थतः तिला 'रांड' व पुरुषाला 'रंडका' हीच नावे आहेत. ॥ २ ॥ ज्याच्या हाताला दानशूरपणाचे कांकण (हस्तभूषण) नाही ॥ ३ ॥ अशांना संतांनी वाळीत टाकलेले असते. आणि तीव्र शब्दाने बोडणी करून फजिती केलेली असते ॥ ४ ॥ तु. म. म्ह. ज्यांचे वागण्यात ताळमेळ नसतो त्यांची नेहमी फजितीच होते. ॥ ५ ॥

७३. माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक । आपणासारिसे लोक नागविले ॥ १ ॥
विषयी लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होउनि फिरे ॥ २ ॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥ ३ ॥
औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढे ॥ ४ ॥
तरावया आधी शोधा वेदवाणी । वांझट बोलणी वारा त्याची ॥ ५ ॥
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण । न घडे नारायण भेट तया ॥ ६ ॥
प्रवृत्ती-निवृत्ती धर्माविषयी लोकांची दिशाभूल करणारे धर्मठक देह-स्त्री-पुत्र-रूपाने असलेल्या कार्यरूप मायेलाच 'ब्रह्म' म्हणतात. चार्वाकाचे मत शिकवितात व आपणाबरोबर लोकांनाही धर्मापासून भ्रष्ट करतात ॥ १ ॥ जो स्वतः विषयासक्त आहे, तो दुसऱ्यासही कुविद्या शिकवितो व मनाच्या मागे नंदीबैल होऊन फिरतो (मनाला येईल तसे वागतो) ॥ २ ॥ धर्मठकाचे ऐकून लोकांनी अविचाराने वागू नये याकरिता दृष्टान्त देतात. सुरण आणि मोहरी (भाजी आणि फोडणीच्या रूपाने) खाल्ली असता पचत असतात, नसता दुःख देतात. त्याप्रमाणे अविचाराने धर्माधर्माचे आचरण केले असता दुःख प्राप्त होते ॥ २ ॥ धर्माविषयी वेद प्रमाण आहेत. पण वेदामध्ये विषयप्राप्तीकरिता जी सकाम कर्मे सांगितली आहेत ती आई जशी मुलाला कडू औषध देण्याकरिता, त्याच्या पुढे गूळ दाखविते, त्याप्रमाणे विषयापासून परावृत्त होण्याकरिता सांगितली आहेत ॥ ४ ॥ भवसागरातून तरावयाचे असेल तर, धर्मठकाचे न ऐकता वेदवाणीचा प्रथम विचार करा आणि त्याप्रमाणे वागा. परंतवेदांची सकामकर्माविषयींची व्यर्थ बोलणी बाजलासारा. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. जो (देहाला ब्रह्म समजून) देहाचेच पालन, पोषण करतो, त्यास नारायणाची भेट होत नाही ॥ ६ ॥

७४. मृगजळ दिसे साचपणा ऐसे । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥ १ ॥
जाणोनि कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ २ ॥
संचित सांगती बोळवण सवें । आचरले द्यावें फळ तेणें ॥ ३ ॥
तुका म्हणे स्मशान तें वरी । संबंध गोवरी आगीसवें ॥ ४ ॥
मृगजळ खोटे असूनही खऱ्यासारखे दिसते व त्या खोट्याच्या वेडाने धावणाऱ्या हरिणांचे ऊर फोडीत असते. ॥ १ ॥ मृगजळाप्रमाणे देहादी प्रपंच मिथ्या आहे असे तुम्ही जाणत असूनही (त्यात गुंतून) स्वतःची हानी का करता ? अरे, आपल्या हिताचा विचार करा. ॥ २ ॥ मनुष्य मेल्यानंतर त्याची बोळवण त्याच्या संचिताबरोबर होत असते व पुढील जन्मात, जसे संचित कर्म केले तसे फळ देते ॥ ३ ॥ तु. म. म्ह. प्रपंचासक्त माणूस शेवटी (नाइलाजाने) स्मशानात जातो, व त्याचा गोवऱ्या आणि अग्नी यांच्याशी संबंध येतो ॥ ४ ॥

७५. गौळियांची ताकपिरे । कोण पोरें चांगलीं ॥ १ ॥
येवढा त्याचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ २ ॥
काय उपास पडिले होते । कण्या भोवते विदुराच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे कुब्जा दासी । रूपरासी हीन कळा ॥ ४ ॥
ताक पिणारी (गोकुळातील) गवळ्यांची पोरे फार चांगली होती काय ? ॥ १ ॥ पण देवाला त्यांचा येवढा छंद होता की, (विचारता सोय नाही) केवढी त्यांची सेवा आणि केवढी त्यांची भक्ती की, देवाला देखील त्यांचा छंद लागावा. ॥ २ ॥ देवाला काय उपास पडले होते ? (कोणास ठाऊक) पण देव, विदुराच्या कण्याभोवती (मोठ्या आतुरतेने) घुटमळत होते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. कुब्जादासी रूपाची खाण होती काय ? नाही. ती अत्यंत कळाहीन आणि कुरूप होती. पण तीदेखील देवाला आवडली ॥ ४ ॥

७६. आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥ १ ॥
सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ॥ २ ॥
हित तें करावें देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥ ३ ॥
तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥ ४ ॥
लोकहो, आता तुम्हाला हाच उपदेश करीत आहे की, यापुढे तरी तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा व्यर्थ नाश करू नका. ॥ १ ॥ सर्वांच्या पायाला माझा दंडवत (नमस्कार) आहे व माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की, तुम्ही आपआपले चित्त निर्दोष करा. ॥ २ ॥ मन शुद्ध करून प्रेमाने देवाचे चिंतन करणे हेच हित तुम्ही करा ॥ ३ ॥ तु. म. म्ह. तुम्हास फार काय शिकवावे ? ज्या योगाने तुमचे हित होईल ते साधन करा ॥ ४ ॥

७७. भक्ताविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥ १ ॥
शोभविलें येर येरां । सोनें एकठायीं हिरा ॥ २ ॥
देवाविण भक्ता । कोण देते निष्कामता ॥ ३ ॥
तुका म्हणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥ ४ ॥
भक्तावाचून देवाला साकारपणा कसा प्राप्त होईल आणि साकार देवावाचून भक्तांना त्याची सेवा तरी कशी करता येईल ? ॥ १ ॥ म्हणून देवाने साकार होऊन व भक्तांनी सेवा करून परस्परांनी परस्परांना भूषविले. जसे सोने. आणि हिरा एकत्र आली असता परस्परांना भूषवितात त्याप्रमाणे देव आणि भक्त परस्परांना भूषवितात. ॥ २ ॥ देवावाचून भक्तांना भक्तीतील निष्काम प्रेम किंवा मोक्षातील निष्काम अवस्था कोण देणार आहे ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह. आई आणि मूल. यांच्यात जसा प्रेमसंबंध असतो त्याप्रमाणे देव-भक्तांमध्ये परस्पर प्रेमसंबंध असतो. ॥ ४ ॥

७८. विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसी माता ॥ १ ॥
ऐसा भक्ताचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ २ ॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥ ३ ॥
तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥ ४ ॥
अखिल विश्वाला उत्पन्न करणारा देव, यशोदेला 'आई' म्हणतो ॥ १ ॥ असा तो भक्तांच्या आधीन आहे. भक्तांनी जशा प्रकारचे प्रेम देवाला समर्पिले असेल तशा प्रकारचे प्रेम तो त्यांना समर्पण करीत असतो ॥ २ ॥ देव, निष्काम व निरुपाधिक असूनही गोपीना आपल्याकडे आकृष्ट करतो व आपला छंद लावतो ॥ ३ ॥ तु. म. म्ह. मूळचा निराकार असूनही भक्तांकरिता सुंदर आकार धारण करतो. ॥ ४ ॥

७९. काय दिनकरा । कोंबड्याने केला खरा ॥ १ ॥
कांहो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ २ ॥
आडविले दासी । तरी कां मरती उपवासी ॥ ३ ॥
तुका म्हणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥ ४ ॥
कोंबड्याने सूर्याला खरा केला काय ? कोंबडा आरवला तरच सूर्याचा खरा उदय झाला असे समजावयाचे ॥ तसे (तुकाराम महाराज स्वतःला उद्देशन म्हणतात) देवा, आमच्यासारख्या भक्तांनी भक्ती केली तरच तुम्ही साकार होता असे नाही. कारण स्वेच्छेनेही आकार धारण करू शकता. त्यामुळे देवा, माझ्या डोक्यावर तुम्हाला आकाराला आणल्याबद्दल संतपणाचा भार का बरे ठेवता ? ॥ २ ॥ घरी नोकरीला असलेल्या आचाऱ्याने 'आज मी स्वयंपाक करीत नाही' असे म्हणून अडविले तर तो घरधनी घरातील लोक उपाशी राहतात काय ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अनंताच्या हातात सर्व कळा आहेत, त्यामुळे तो स्वेच्छेनेही आकार धारण करतो. ॥ ४ ॥

८०. जेवितांही धरी । नाक हागतियेपरी ॥ १ ॥
ऐसियाचा करी चाळा । आपुलीच अवकळा ॥ २ ॥
सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥ ३ ॥
तुका म्हणे करी । ताक दुधा एकीसरी ॥ ४ ॥
शौचाच्या वेळेप्रमाणे जो जेवतानाही नाक धरतो, ॥ १ ॥ आणि जो अशा प्रकारचा आचरटपणा करतो तो आपलाच मूर्खपणा प्रकट करीत असतो. ॥ २ ॥ कोणत्या वेळी काय करावे आणि करू नये हे ज्यास ठाऊक नाही, ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अशी अव्यवस्थित माणसे ताक आणि दूध एकाच योग्यतेचे मानतात. ॥ ४ ॥

८१. हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥ १ ॥
कळो आलें खट्याळसें । शिवो नये लिंपो दोषे ॥ २ ॥
फोडावें मडकें । मेले लेखी घायें एके ॥ ३ ॥
तुका म्हणे त्यागे । विण चुकीजेना भोगें ॥ ४ ॥
पुत्र, पत्नी व बंधू कोणीही असोत त्यांचा संबंध तोडावा ॥ १ ॥ जर ते दुराचारी आहेत असे आपल्याला कळले तर त्यांना स्पर्श देखील करू नये. कारण स्पर्शामुळे त्यांच्या अंगातील पापाने आपण लिस होतो. ॥ २ ॥ त्यांच्या नावाने मडके फोडावे व एका घावात ती सारी मेली असा निश्चय करावा. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. त्यांचा त्याग केल्यावाचून दुःखाचे भोग चुकणार नाहीत. ॥ ४ ॥

८२. व्यालाविण करी शोभन तांतडी । चार ते गधडी करीतसे ॥ १ ॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगता नव्हे सुखी साखरेसी ॥ २ ॥
कुंथाच्या टेंकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥ ३ । तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेविण नका वाव घेऊ. ॥ ४ ॥
एखादी वांझ स्त्री बाळंतीण न होता (बाज, शेगडी, औषधे इत्यादी वस्तूंची) तातडीने जमवाजमव करून बाळंतिणीचा डौल मिरवीत असेल तर ती गधडी काहीसरी वेडेपणा करते असे जाणावे. ॥ १ ॥ दुसऱ्या स्त्रीचे बाळंतपण बघून वांझेने तसा खटाटोप का करावा ? कारण अनुभवावाचून सर्व व्यर्थ आहे. 'साखर गोड असते' असे नुसते सांगणारा (गोडीचा अनुभव नसल्यामुळे) सुखी नसतो. ॥ २ ॥ न जेवता कुंथून दिलेल्या ढेकराने शरीराला पुष्टी येत नाही. न जेवता वारंवार कथन ढेकर देणारा मनुष्य स्वतःचा चेहरा म्लान व दःखी असल्याचे लोकांच्या नजरेला आणीत असतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. अरे वाचाळ हो, ऐका, परमात्मसुखाच्या अनुभवावाचून व्यर्थ वाचाळपणा करू नका. ॥ ४ ॥

८३. जेणें घडे नारायणी अंतराय । होत बाप माय वर्जावी ती ॥ १ ॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती ती दुःखा पात्र शत्रू ॥ २ ॥
प्रल्हादें जनक बिभीषणे बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥ ३ ॥
तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणिक उपाय दुःखमूळ ॥ ४ ॥
ज्या ज्या कारणाने नारायणाचा वियोग घडतो त्या त्या कारणांपैकी आपले आई, बाप जरी असले तरी त्यांचाही त्याग करावा. ॥ १ ॥ मग इतर स्त्री, पुत्र, धन इत्यादी क्षुद्र विषयांना कोण जुमानतो ? कारण हे सर्व मनुष्याला दुःख भोगण्याला पात्र ठरतात. त्यामुळे ते शत्रू आहेत. (अर्थात यांचा तर अवश्य त्याग करावा) ॥ २ ॥ प्रल्हादाने पिता आणि बिभीषणाने बंधू टाकला व भरताने राज्य आणि आई यांना निंद्य ठरविले. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. हरीच्या पायाजवळ सर्व धर्म असल्यामुळे त्याच्या प्राप्तीवाचून इतर सारे उपाय दुःखाला कारण आहेत. ॥ ४ ॥

८४. मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥ १ ॥
हेंचि देवाचे दर्शन । सदा राहे समाधान ॥ २ ॥
शांतीची वसती । तेथें खुटे काळगती ॥ ३ ॥
आली ऊर्मी साहे । तुका म्हणे थोडे आहे ॥ ४ ॥
देहाभिमानमूलक असलेले मानापमानाचे बंधन गुंडाळून ठेवावे. ॥ १ ॥ हेच देवाचे दर्शन आहे मानापमान घालविल्याने चित्ताला नेहमी समाधान प्राप्त होते. ॥ २ ॥ जेथे शांती राहते तेथे काळाची गती कुंठित होते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. चित्तात आलेली कामक्रोधाची ऊर्मी सहन करीत राहावे, म्हणजे देवाचे दर्शन होणे सोपे आहे. ॥ ४ ॥

८५. थोडें आहे थोडे आहे । चित्त साह्य झालिया ॥ १ ॥
हर्षामर्ष पाही अंगीं । पांडुरंगी सरले ते ॥ २ ॥
अवघ्या साधनांचें सार । न लगे फार शोधावें ॥ ३ ॥
तुका म्हणे लटिके पाहे । सांडी देह अभिमान ॥ ४ ॥
(आपल्या परमार्थाला आपले) चित्त अनुकूल झाले तर, खरोखर परमार्थ फार सोपा आहे. ॥ १ ॥ ज्यांच्या चित्तात कोणत्याही विषयापासून सुख किंवा दु:ख निर्माण होत नाही ते पांडुरंगाच्या स्वरूपाचे ठिकाणी प्राप्त होऊन धन्य झाले. ॥ २ ॥ चित्त अनुकूल असणे व सर्व द्वंद्वांचा त्याग करणे हेच सर्व साधनांचे सार आहे. यावाचून अधिक साधने शोधावी लागत नाहीत. ॥ ३ ॥ त. म. म्ह. हा सारा प्रपंच मिथ्या आहे असे जाण व देहाविषय टाकून दे. ॥ ४ ॥

८६. आतां उघडी डोळे । जरी अद्यापि न कळे । तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥ १ ॥
मनुष्यदेह ऐसा निध । साधील तें साधे सिद्ध । करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ २ ॥
नाव चंद्रभागेतीरीं । उभी पुंडलिकाचे द्वारीं । कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥ ३ ॥
तुका म्हणे फुकासाठीं । पायीं घातलिया मिठी । होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥ ४ ॥
अरे, तुझ्या मरणाचे दिवस जवळ आले आहेत. आता तरी डोळे उघड. संसार वाईट कसा व परमार्थ चांगला याचा विचार करून परमार्थाला लाग. जर (साधुसंतांनी इतके सांगून व तू स्वत: संसारदु:खाचा अनुभव घेऊन) अद्यापि तुला कळत नसेल तर, आईच्या पोटी मनुष्यदेहाची खोळ पांघरलेला दगड जन्माला आला आहेस असे म्हणावे लागते. ॥ १ ॥ अरे, मनुष्यदेह हा एक असा ठेवा आहे की, ह्या योगाने जे साध्य केले ते सिद्ध होते. या मनुष्यदेहातच अनेक संत जगाला बोध करून स्वत: देखील संसाराच्या पार झाले. ॥ २ ॥ संसाराच्या पार होण्याकरिता चंद्रभागेच्या तीरी एक नाव आहे. ती पुंडलिकाचे दारी कंबरेवर हात ठेवून उभी आहे, आणि उभ्याउभ्याच ती सर्वांनाच आपल्याकडे संसार पार करण्याकरिता बोलाविते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. एकही पैसा न देता अगदी फुकट, ज्याने या (पांडुरंगाच्या) पायाला मिठी घातली असेल त्याला फारच लवकर संसाराचा उतार होतो. ॥ ४ ॥

८७. न करी रे संग राहे रे निश्चळ । लागो नेदी मळ ममतेचा ॥ १ ॥
या नांवें अद्वैत खरें ब्रह्मज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ २ ॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पाही न ये वरी मन ॥ ३ ॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥ ४ ॥
देहादी अनात्म पदार्थांशी तादात्म्य करू नकोस, आत्मस्वरूपी स्थिर राहा, आणि ममतेचा दोष अंगाला लागू देऊ नकोस. ॥ १ ॥ या स्थितीलाच खरे अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणतात. अनुभवांवाचून अद्वैत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणे म्हणजे ती शुद्ध बडबड होय. ॥ २ ॥ इंद्रियांचा निग्रह, वासनेचा अत्यंत नाश आणि मन संसारविषयक संकल्पावर कधीच न येणे. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्याच्या अंत:करणात 'मी ब्रह्म आहे' अशी वृत्तीही राहिली नाही, आणि ब्रह्मानंदाला स्थान प्राप्त झाले आहे त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान म्हणावे, असा ध्रुवपदातील पहिल्या चरणार्धाशी संबंध आहे. किंवा ज्याच्या अंत:करणात ब्रह्माचे अपरोक्षज्ञान नाही व आनंद प्राप्त झाला नाही त्याने ज्ञानाच्या गोष्टी सांगणे म्हणजे बडबड आहे, असा ध्रुवपदातील दुसऱ्या चरणार्धाशी संबंध आहे. ॥ ४ ॥ ८७ ॥

८८. पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥ १ ॥
ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ २ ॥
आहेति सकळ । तीर्थे काळें देतीं फळ ॥ ३ ॥
तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥ ४ ॥
पंढरीच्या महत्त्वाला दुसरी उपमा देत असता ॥ १ ॥ यासारखे दुसरे स्थान त्रैलोक्यात कोठेही नाही. (म्हणून उपमा देता येत नाही.) कारण पंढरीत तात्काळ देव भेटतो. ॥ २ ॥ त्रैलोक्यात तीर्थे पुष्कळ आहेत पण ती दीर्घकालाने फळ देतात. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ही पंढरी पेठ, पृथ्वीवरील, साक्षात वैकुंठ आहे. ॥ ४ ॥

८९. तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सजनीं ॥ १ ॥
मिळालिया संतसंगें । समर्पितां भलें अंग ॥ २ ॥
तीर्थी भाव फळे । येथे अनाड तें वळे ॥ ३ ॥
तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥ ४ ॥
प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये गंगादी नद्यांच्या रूपाने व मंदिरात विधिपूर्वक बसविलेल्या पाषाणमूर्तीच्या रूपाने देव आहे. पण संतांजवळ मात्र प्रत्यक्ष देव असतो. ॥ १ ॥ याकरिता संतसंग लाभल्यावर त्यांना शरीरसमर्पण करणे ***णकारक आहे. ॥ २ ॥ तीथोचे ठिकाणी श्रद्धा असेल तर ते तीर्थ फलद्रूप होते, पण संताजवळ एखादानास्तिक-मूर्ख आला तरी तो सन्मार्गाला लागतो. ॥ ३ ॥ तु. म.म्ह. संतांना शरण गेल्यावर (देव रोकडा भेटत असल्यामुळे) पाप आणि ताप गेल्याचे अनुभवास येते. ॥ ४ ॥

९०. घेऊनियां चक्र गदा । हाचि धंदा करीतो ॥ १ ॥
भक्ता राखे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ २ ॥
अव्यक्त तें आकारलें । रूपा आलें गुणवंत ॥ ३ ॥
तुका म्हणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥ ४ ॥
देव, चक्र आणि गदा हातात घेऊन हाच धंदा करीत असतो. ॥ १ ॥ तो असा की, भक्तांना पायाजवळ ठेवून रक्षण करतो व दुर्जनांचा नाश करतो. ॥ २ ॥ मूळचे ते ब्रह्म निराकार असूनही भक्ताकरिता सगुण, साकार होते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. हा विठ्ठल भक्ताची जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण करतो आणि ज्याचा जसा भाव असेल तसा तो होतो. ॥ ४ ॥

९१. देखोनि पुराणिकाची दाढी । रडे स्फुदे नाक ओढी ॥ १ ॥
प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरी भावना ॥ २ ॥
आवरितां नावरे । खूर आठवी नेवरे ॥ ३ ॥
बोलो नये मुखा वाटां । म्हणे होता ज्याचा तोटा ॥ ४ ॥
दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी म्हणे होय ॥ ५ ॥
मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥ ६ ॥
होता भाव पोटीं । मुखा आलासे शेवटीं ॥ ७ ॥
तुका म्हणे कुडे । कळो येतें तें रोकडें ॥ ८ ॥
एक धनगर एका देवळात पुराण ऐकण्याकरिता जात असे. पुराण सांगताना त्या वृद्ध पुराणिकाची दाढी हलत असलेली बघून तो रडू लागे, हुंदके देऊ लागे आणि दु:खाने नाकावाटे पाणी आले म्हणजे ते पुन: पुन्हा नाक ओढून पुशीत असे. ॥ १ ॥ इतर श्रोतृजनांना त्याचे ते प्रेम खरे वाटे. पण त्याच्या अंत:करणातील भावना वेगळी होती. कारण त्याचे एक आवडते बोकड मेले होते, व पुराणिकाची दाढी बघून, त्यास त्या बोकडाची आठवण होत असे. त्यामुळे तो रडू लागे. ॥ २ ॥ त्याचे ते रडणे त्याने कितीही आवरले तरी आवरेना व त्या बोकडाची खुरे व नखे पुन: पुन्हा मनात आठवू लागला. ॥ ३ ॥ गहिवर येऊन त्याच्या तोंडावाटे शब्द फुटेना व तो मनात म्हणूलागला-माझ्या शेळ्यांच्या कळपात अगोदरच बोकडाचा तोटा होता, एकुलता एक बोकड होता तोही गेला. ॥ ४ ॥ पुराणिकबुवांनी पुराण सांगण्याच्या अभिनयाने दोन बोटे पुढे केली किंवा चार बोटे पुढे केली म्हणजे धनगराला वाटे, हा पुराणिक बोकडाची लक्षणे दाखवीत आहे. आणि तसे समजून तो त्या पुराणिकास म्हणे-'खरेच हो माझ्या बोकडाला तम्ही दाखविली तशी दोन शिंगे व चार पाय होते.' ॥ ५ ॥ सारांश, बोकड मनात येताच तो धनगर त्याच्याविषयी तळमळ करीत असे. ॥ ६ ॥ मनात जो भाव होता तोच शेवटी त्या धनगराच्या मुखावाटे बाहेर आला. ॥ ७ ॥ तु., म. म्ह. अंत:करणातील कोणतीही वाईट गोष्ट केव्हातरी प्रत्यक्ष कळून येते. ॥ ८ ॥ (श्रोत्यांनी अंतरी संसाराचा भाव ठेवून श्रवण करू नये हे सांगण्यात या अभंगाचे तात्पर्य आहे.)

९२. दुर्जनाची गंधी विष्ठेचिये परी । देखोनिया दूरी व्हावें तया ॥ १ ॥
आइका हो तुम्ही मात हे सजन । करूं संघष्टन नये बोलों ॥ २ ॥
दुर्जनाचे अंगी अखंड विटाळ । वाणी रजस्वला सवे तैसी ॥ ३ ॥
दुर्जनाचे भय धरावें त्यापरी । पिसाळल्यावरी धांवे श्वान ॥ ४ ॥
दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देश त्याचा ॥ ५ ॥
तुका म्हणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥ ६ ॥
विष्ठेप्रमाणे दुर्जनाची (दुर्गुणरूपी) दुर्गंधी येते. याकरिता त्याला बघितल्याबरोबर सज्जनांनी त्याच्यापासून दूर . व्हावे. ॥ १ ॥ सज्जनहो, तुम्ही ही गोष्ट ऐका की, दुर्जनाशी संघटन करू नका. किंबहुना त्याला बोलूही नका. ॥ २ ॥ दुर्जनाच्या अंगी अखंड विटाळ असतो, जशी रजस्वला स्त्री अशुद्ध रजाला स्त्रवत असते; त्याप्रमाणे त्याची वाणी नेहमी अशुद्ध बोलत असते. ॥ ३ ॥ कुत्रे पिसाळल्यावर कोणाच्याही पाठीमागेचावण्याकरिता धावते. त्याप्रमाणे दुर्जनाचा स्वभाव असल्यामुळे त्याचे भय धरावे. ॥ ४ ॥ दुर्जनाचा अंगस्पर्शदेखील चांगला नाही. एवढेच काय पण तो ज्या देशात असेल त्या देशाचाही त्याग करावा असे शास्त्रात सांगितले आहे. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. त्या दुर्जनासंबंधी किती म्हणून वेगवेगळे सांगावे. आता एकच गोष्ट सांगतो की, दुर्जनाचे शरीर प्रत्यक्ष नरक आहे. ॥ ६ ॥

९३. अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥ १ ॥
वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठींचे वचन न मानी जो ॥ २ ॥
तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥ ३ ॥
अतितार्किक हा शुद्ध बीजाचा नाही. तो जातीचा अंत्यज आहे, असे ओळखा. ॥ १ ॥ वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणग्रंथ ज्यास प्रमाण वाटत नाहीत (श्रद्धेय वाटत नाहीत) व जो श्रेष्ठाचे वचन मानीत नाही तो जातीचा अंत्यज आहे. ॥ २ ॥ तु. म. म्ह. जसे दारू पिणाऱ्याच्या घरी मिष्टान्न असले तरी सेवन करू नये. त्याप्रमाणे वेदादी प्रमाण नसणाऱ्या दुर्जनाला शिवू नये ॥ ३ ॥

९४. शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥ १ ॥
त्याचें न व्हावें दर्शन । खळा पंगती भोजन ॥ २ ॥
संतांसी जो निंदी । अधम लोभासाठी वंदी ॥ ३ ॥
तुका म्हणे पोटीं । भाव आणीक जया ओठीं ॥ ४ ॥
ज्याच्या शब्दाला धीर नाही (म्हणजे जो आपले बोलणे प्रत्येक वेळी बदलतो.) व ज्याची बुद्धी एखाद्या तत्त्वाविषयी स्थिर नाही. ।१ ॥ त्या खल पुरुषाचे दर्शन होऊ नये, व त्याच्या पंक्तीला बसून मोजनही करू नये. ॥ २ ॥ जो संतांची निंदा करतो व स्वार्थासाठी नीचाच्या पाया पडतो. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. ज्याच्या ओठात एक भाव आणि पोटात मात्र दुसराच (भाव) आहे, अशाचे दर्शनदेखील घडू नये. ॥ ४ ॥

९५. चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥ १ ॥
शिंदळीच्या मागे वेचितां पाऊलें । होईल आपुले तिच्या ऐसें ॥ २ ॥
तुका म्हणे भितो पुढिलिया दत्ता । म्हणऊनि चिंता उपजली ॥ ३ ॥
चोराने चोराला उपदेश करावा, पण कोणता ? ज्या चोरीच्या विषयात आपला अभ्यास झाला असेल तोच. ॥ १ ॥ शिंदळीच्या मागे साध्वी स्त्रीने पाऊले टाकली (शिंदळीचे अनुसरण केले) तर त्याचा परिणाम असा होतो की, त्या साध्वीचे आचरण शिंदळीसारखे होते. ॥ २ ॥ तु. म. म्ह. आपल्या वाईट आचरणाने प्राप्त होणाऱ्या दुष्परिणामाला मी फार भितो म्हणून मी 'दुर्जनाची संगती घडू नये' या विषयी काळजी घेतो. ॥ ३ ॥

९६. मांडवाच्या दारा । पुढे आणिला म्हातारा ॥ १ ॥
म्हणे नवरी आणा रांड । जाळा नवऱ्याचे तोंड ॥ २ ॥
समय न कळे । काय उपयोगी ये वेळे ॥ ३ ॥
तुका म्हणे खरा । येथूनियां दूर करा ॥ ४ ॥
एका विवाहप्रसंगी ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात 'वधूवर' आले नाहीत, व विवाह मुहूर्त निष्कारण टळत असलेला बघून एकाने विवाहकार्यातील मुख्य कारभारी असलेल्या एका म्हाताऱ्याला लग्नमंडपाच्या दाराशी आणले व वधूवरांना लवकर आणण्याविषयी त्यास सांगितले. ॥ १ ॥ पण तो मूर्ख असल्यामुळे रागावून म्हणाला, 'अरे ती नवरी ‘रांड' कोठे आहे ? तिला आणा आणि तो नवरा अद्यापि कां येत नाही. या नवऱ्याचे तोंड जाळा' ॥ २ ॥ ज्याला कोणता प्रसंग आहे हे कळत नाही त्याचा अशा मंगलप्रसंगी काय उपयोग आहे ? ॥ ३ ॥ तु. म. म्ह, अशा गाढवाला या प्रसंगातून दूर करावे. ॥ ४ ॥

९७. काही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान । वायां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥ १ ॥
त्याचा होय भूमी भार । नेणे जातीचा आचार । जाला दावेदार । भोगवी,अघोर पितरांसी ॥ २ ॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं । पापी तयाहुनी । नाहीं आणिक दुसरा ॥ ३ ॥
पोट पोसी एकला । भूती दया नाहीं ज्याला । पाठी लागे आल्या । अतिथाचे द्वारेशीं ॥ ४ ॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांने भ्रमण । यमाचा आंदण । सीण थोर पावला ॥ ५ ॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हाणी । देवा विसरूनि । गेली म्हणती मी माझे ॥ ६ ॥
प्रातःस्मरण, गंगास्नान, संध्या, देवपूजा, तुळशीप्रदक्षिणा यांपैकी कोणत्याही नित्यनियमावाचून जो अन्न खातो तो कुत्रा आहे. त्याचा मनुष्यपणा व्यर्थ आहे. जो केवळ संसाराचाच भार वाहतो तो बैल आहे. ॥ १ ॥ अशा मनुष्याचा भूमीला भार होतो. जो स्वजातीचा आचार पाळीत नाही तो पितरांचा शत्रू झाला असून त्यांना अघोर नरक भोगावयास लावतो. ॥ २ ॥ जो नेहमी अभद्र बोलतो, आणि स्वप्नातसुद्धा खरे बोलत नाही त्याच्यापेक्षा अधिक पापी (जगात) दुसरा नाही. ॥ ३ ॥ जो एकटाच स्वतःचे पोट भरतो, ज्याला गरीब प्राण्याविषयी दया येत नाही, अतिथी दाराशी आला तर त्याला घालविण्याकरिता जो त्याच्या पाठीशी लागतो. ॥ ४ ॥ आयुष्यात कधीही संतांचे पूजन व तीर्थयात्रा ज्याला घडली नाही असा मनुष्य, यमाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे त्यास यमाकडून फार दुःख प्राप्त होईल. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. जी माणसे देवाला विसरून गेली आणि देहाला 'मी' व स्त्री-पुत्रादिकांना 'माझे' असे म्हणतात, त्यांनी आपल्या मनुष्यपणाची हानी केली. ॥ ६ ॥

९८. कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥ १ ॥
गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशी कारण नाहीं देवा ॥ २ ॥
आशाबद्ध नये करूं ते करिती । तुका म्हणे जाती नरकामधीं ॥ ३ ॥
जो कन्या, गाय आणि हरिकथा यांची विक्री करतो त्यास 'खरा चांडाळ' असे संबोधावे. ॥ १ ॥ हे देवा, मनुष्याचा चांगलेपणा व वाईटपणा ओळखण्याला गुण आणि अवगुण ही दोन प्रमाणे आहेत. त्याची जाती (प्रमाण) नाही. ॥ २ ॥ तु. म. म्ह. आशाबद्ध माणसे जे करू नये ते करतात. त्यामुळे ते नरकास जातात. ॥ ३ ॥

९९. हरिहरा भेद । नाहीं करूं नये वाद ॥ १ ॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ २ ॥
भेदकासी नाड । एक वेलांटीच आड ॥ ३ ॥
उजवे वाम भाग । तुका म्हणे एकचि अंग ॥ ४ ॥
हरी आणि हर यांच्यात तत्त्वतः भेद नाही. त्यामुळे हरि-हरांच्या उपासकांनी त्यांच्या भेदाविषयी वाद करू नये. ॥ १ ॥ कारण हरी आणि हर हे एकमेकांच्या हृदयात आहेत. जशी गोडीत साखर व साखरेत गोडी असते त्याप्रमाणे. ॥ २ ॥ हरिहरांत भेद आहे असे म्हणणाऱ्याला अभेद सिद्ध करताना प्रतिबंध कोणता वाटत असेल तर तो हा की 'हरि' या शब्दांतील एक वेलांटीच त्यांच्या पुढे येते. ॥ ३ ॥ तु. म. म्ह. विचार करून पाहिले तर उजव्या आणि डाव्या बाजूचे अवयव मिळून जसे एकच शरीर असते त्याप्रमाणे हरि-हरांत एकच परमात्मतत्त्व आहे. ॥ ४ ॥

१००. वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाही उचित ॥ १ ॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचे पाळण । सकळी सत्य करावें ॥ २ ॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥ ३ ॥
वरासनी पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणे । सोनियाची परी नीच ॥ ४ ॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचे कारण । तया ठायीं अळंकार ॥ ५ ॥
सेवका स्वामीसाठी मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाणं । तुम्ही संत यदर्थी ॥ ६ ॥
परमार्थाच्या वक्त्याला सर्वांच्या आधी गंध, अक्षतादी पूजनाचा मान द्यावा. श्रोतृवर्गात एखादा 'यति' जरी श्रोता असला तरी त्यास गंध-अक्षतादी पूजनाचा मान देणे योग्य नाही असे जाणावे. ॥ १ ॥ शरीराच्या सर्व अवयवांमध्ये मनुष्याचे मस्तक श्रेष्ठ आहे. त्यानंतर हात-पायांना यथायोग्य श्रेष्ठता आहे. या दृष्टान्ताप्रमाणे सर्वांनी यथाविधि धर्माचे पालन विश्वासाने करावे. ॥ २ ॥ राज्यसिंहासनावर असलेला मुलगा राज्याचा सांभाळ करीत असेल तर त्याचा बापदेखील त्याची आज्ञा पाळतो. या दृष्टान्ताप्रमाणे संतांना मान्य असलेली वक्त्याची मर्यादा सर्वांनी सांभाळावी. ॥ ३ ॥ श्रेष्ठ आसनावर एखादा दगड, यथाविधि (देव म्हणून) बसविलेला असेल तर त्यास सामान्य दगड मानू नये. कारण तो देव असतो. त्या देवाच्या पूजेची उपकरणे सोन्याची असली तरी ती त्या देवापेक्षा कमी दर्जाची आहेत. ॥ ४ ॥ वरील सिद्धान्ताला दृष्टान्त देतात. एखाद्या राजाने (पायातील) पैंजण सोन्याचे केले व मुकुटातील मुख्य मणी, एखाद्या गारेसारख्या हीन, पण चमकदार खड्याला केले तर, ज्याच्या उद्देशाने जे केले असेल तेच त्या ठिकाणी शोभा देत असते. ॥ ५ ॥ तु. म. म्ह. एखाद्या नोकराला त्याच्या मालकामुळे मान मिळतो. मालकाचे नाव सांगितले की, त्याचे काम होत असल्यामुळे त्या मालकाचे नाव हेच त्या नोकराचे धन असते. सारांश, या जगात उचित-अनुचित किंवा धर्म-अधर्म याविषयी 'संत' हेच प्रमाण आहेत. (निर्णय देण्यास समर्थ आहेत) असे तुम्ही जाणा. ॥ ६ ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु.


GO TOP