॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीशिवलीलामृत ॥

॥ अध्याय पाचवा ॥

श्रीगणेशाय नमः ॥
सदाशिव अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी ।
जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुता जीवा ॥ १ ॥
बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार ।
परी जे शिवनामे शुद्ध साचार । कासया इतर साधने त्या ॥ २ ॥
नामाचा महिमा परमाद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।
त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ३ ॥
तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान ।
पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावे ॥ ४ ॥
प्रदोषव्रत भावे आचरता । या जन्मी प्रचीत पहावी तत्त्वता ।
दारिद्रय आणि महद्‌व्यथा । निःशेष पळती षण्मासांत ॥ ५ ॥
एक संवत्सरे होय ज्ञान । द्वादशवर्षी महद्‌भाग्य पूर्ण ।
हे जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥ ६ ॥
त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेच ज्ञान ।
उमावल्लभचरणी ज्याचे मन । त्याहून पावन कोणी नाही ॥ ७ ॥
मृत्यु गंडांतरे दारुण । प्रदोषव्रते जाती निरसोन ।
येविषयी इतिहास जाण । सूत सांगे शौनकादिका ॥ ८ ॥
विदर्भदेशीचा भूभुज । सत्यरथनामे तेजःपुंज ।
सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥ ९ ॥
बहुत दिवस राज्य करीत । परी शिवभजनी नाही रत ।
त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ । बळे आला चालूनिया ॥ १० ॥
आणिक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत ।
सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहले ॥ ११ ॥
हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ ।
धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरात प्रवेशले ॥ १२ ॥
राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास ।
एकलीच पायी पळता वनवास । थोर अनर्थ ओढवला ॥ १३ ॥
परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक-सराटे रुतती चरणी ।
मूर्च्छना येऊनि पडे धरणी । उठोनि पाहे मागेपुढे ॥ १४ ॥
शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत ।
किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥ १५ ॥
वस्त्रे अलंकार-मंडित । हिर्‍यांऐसे दंत झळकत ।
जिचा मुखेंदु देखता रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥ १६ ॥
पाहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ।
ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥ १७ ॥
वनी हिंडे महासती । जेवी नैषधरायाची दमयंती ।
की भिल्लीरूपे हैमवती । दुस्तरवनी तैसी हिंडे ॥ १८ ॥
कर्म-नदीच्या प्रवाही जाण । पडली तीस काढील कोण ।
असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥ १९ ॥
शतांची शते दासी । ओठंगती सदैव जियेपासी ।
इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥ २० ॥
चहुंकडे पाहे दीनवदनी । जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी ।
तो प्रसूत झाली तेच क्षणी । दिव्य पुत्र जन्मला ॥ २१ ॥
तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ ।
बाळ टाकून उठत बसत । गेली एका सरोवरा ॥ २२ ॥
उदकात प्रवेशली तेच क्षणी । अंजुळी भरोनि घेतले पाणी ।
तव ग्राहे नेली ओढोनी । विदारुनी भक्षिली ॥ २३ ॥
घोर कर्माचे विंदान । वनी एकला रडे राजनंदन ।
तव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥ २४ ॥
माता पिता बंधु पाही । तियेलागी कोणी नाही ।
एक वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथे ॥ २५ ॥
तो नाही केले नालच्छेदन । ऐसे बाळ उमा देखोन ।
म्हणे आहा रे ऐसे पुत्ररत्न । कोणी टाकिले दुस्तर वनी ॥ २६ ॥
म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसे नेऊ उचलून ।
जावे जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील की ॥ २७ ॥
स्तनी दाटून फुटला पान्हा । नेत्री ढाळीत अश्रुजीवना ।
बाळ पुढे घेऊनि ते ललना । मुखकमळी स्तन लावी ॥ २८ ॥
संशयसमुद्री पडली वेल्हाळ । म्हणे नेऊ की नको बाळ ।
तव तो कृपाळू पयःफेनधवल । यतिरूप धरूनि पातला ॥ २९ ॥
उमेलागी म्हणे त्रिपुरारी । बाळ नेई संशय न धरी ।
महद्‌भाग्य तुझे सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सापडला ॥ ३० ॥
कोणासी न सांगे हे मात । समान पाळी दोघे सुत ।
भणंगासी परीस होय प्राप्त । तैसे तुज जाहले ॥ ३१ ॥
अकस्मात निधि जोडत । की चिंतामणि पुढे येऊनि पडत ।
की मृताच्या मुखात । पडे अमृत पूर्वदत्ते ॥ ३२ ॥
ऐसे बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरी ।
मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरी हिंडत ॥ ३३ ॥
ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत । राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त ।
घरोघरी भिक्षा मागत । कडिये खांदी घेऊनिया ॥ ३४ ॥
लोक पुसता उमा सांगत । माझे पोटीचे दोघे सुत ।
ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥ ३५ ॥
घरोघरी भिक्षा मागत । तो शिवालय देखिले अकस्मात ।
आत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यात मुख्य ऋषि ॥ ३६ ॥
शिवाराधना करिती विधियुक्त । तो उमा आली शिवालयात ।
क्षण एक पूजा विलोकीत । तो शांडिल्य ऋषि बोलिला ॥ ३७ ॥
अहा कर्म कैसे गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ।
कैसे विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ॥ ३८ ॥
ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ।
त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हा ॥ ३९ ॥
याची मातापिता कोण । आहेत की पावली मरण ।
यावरी शांडिल्य सांगे बर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥ ४० ॥
तो पूर्वी होता नृप जाण । प्रदोषसमयी करी शिवार्चन ।
तो शत्रु आले चहूकडोन । नगर त्याचे बेढिले ॥ ४१ ॥
शत्रूची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन ।
तव प्रधान आला पुढे धावोन । शत्रू धरोनि आणिले ॥ ४२ ॥
त्यांचा शिरच्छेद करून । पूजा पूर्ण न करिता उन्मत्तपणे ।
तैसाच जाऊनि करी भोजन । नाही स्मरण विषयांधा ॥ ४३ ॥
त्याकरिता या जन्मी जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन ।
अल्पवयात गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावे ॥ ४४ ॥
याच्या मातेने सवत मारिली । ती जळी विवशी झाली ।
पूर्व वैरे वोढोनि नेली । क्रोधे भक्षिली विदारुनी ॥ ४५ ॥
हा राजपुत्र धर्मगुप्त । याणे काहीच केले नाही शिवव्रत ।
म्हणोनि मातापितारहित । अरण्यात पडियेला ॥ ४६ ॥
याकरिता प्रदोषकाळी । अव्यग्र पूजावा इंदुमौळी ।
पूजन सांडूनि कदाकाळी । सर्वथाही न उठावे ॥ ४७ ॥
भवानीस बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत ।
वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥ ४८ ॥
अंबुजसंभव ताल सावरी । भार्गवी गातसे मधुरस्वरी ।
मृदंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनिया ॥ ४९ ॥
यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर ।
यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥ ५० ॥
ऐसा प्रदोषकाळीचा महिमा । अगोचर निगमांगमां ।
मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री का झाला ॥ ५१ ॥
तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत । पूर्वी घेतले दुष्ट अमित ।
दान केले नाही किंचित । शिवार्चन न करी कदा ॥ ५२ ॥
परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त ।
स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैचे ॥ ५३ ॥
मग उमेने पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणी ।
तेणे पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिले ॥ ५४ ॥
पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष ।
निराहार असावे त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावे ॥ ५५ ॥
तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ।
गोमये भूमि सारवूनी । दिव्य मंडप उभारिजे ॥ ५६ ॥
चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून ।
मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥ ५७ ॥
शुभ वस्त्र नेसावे आपण । शुभ्र गंधं सुवाससुमन ।
मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥ ५८ ॥
प्राणायाम करून देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका ।
दक्षिणभागी पूजावे मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ॥ ५९ ॥
वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण ।
अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणी शिवपूजा ॥ ६० ॥
यथासांग शिवध्यान । मग करावे पूजन ।
राजोपचारे सर्व समर्पून । करावे स्तवन शिवाचे ॥ ६१ ॥
जय जय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ ।
सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥ ६२ ॥
ऐसे प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण ।
मग ते एकमनेकरून । राहते झाले एकचक्री ॥ ६३ ॥
चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत ।
गुरुवचने यथार्थ । शिवपूजन करिती पै ॥ ६४ ॥
शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावे प्रसादतीर्था ।
शत ब्रह्महत्यांचे पाप माथा । होय सांगता शांडिल्य ॥ ६५ ॥
सर्व पापाहून पाप थोर । शिवपूजेचा अपहार ।
असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनी ॥ ६६ ॥
ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरी क्रीडत ।
दरडी ढासळता अकस्मात । द्रव्यघट सापडला ॥ ६७ ॥
घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन ।
म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्वर्य चढत चालिले ॥ ६८ ॥
राजपुत्रास म्हणे ते समयी । अर्ध द्रव्यविभाग घेई ।
येरू म्हणे सहसाही । विभाग न घेई अग्रजा ॥ ६९ ॥
या अवनीतील धन । आमुचेच आहे संपूर्ण ।
असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥ ७० ॥
यावरी एकदा दोघे जण । गेले वनविहारालागून ।
तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडता दृष्टी देखिल्या ॥ ७१ ॥
दोघे पाहती दुरूनी । परम सुंदर लावण्यखाणी ।
शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागोनी । परदारा नयनी न पहाव्या ॥ ७२ ॥
दर्शने हरती चित्त । स्पर्शने बळ वीर्य हरीत ।
कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥ ७३ ॥
ब्रह्मसुतास तेथे ठेवून । राजपुत्र चालिला सुलक्षण ।
स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥ ७४ ॥
जवळी येवोनि पाहात । तव मुख्य नायिका विराजित ।
अंशुमती नामे विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥ ७५ ॥
कोद्रविणनामा गंधर्वपति । त्याची कन्या अंशुमती ।
पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणाते ॥ ७६ ॥
मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ।
तो माझा परम भक्त । त्यासी देई अंशुमती ॥ ७७ ॥
हे पूर्वीचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ।
न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥ ७८ ॥
क्षीरसिंधूत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन ।
तैसे राजपुत्राचे वदन । अंशुमती न्याहाळी ॥ ९ ॥
बत्तीसलक्षणसंयुक्त । आजानुबाहू चापशरमंडित ।
विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥ ८० ॥
ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत ।
तुम्ही दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमने आणावी सुवासे ॥ ८१ ॥
अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना ।
अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥ ८२ ॥
भूरुहपल्लव पसरून । एकांती घातले आसन ।
वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥ ८३ ॥
असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन ।
विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥ ८४ ॥
मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणी । विंधिली ते लावण्यहरिणी ।
मनोज मूर्च्छना सांवरूनी । वर्तमान पुसे तयाते ॥ ८५ ॥
श्रृंगारसरोवरा तुजपासी । मी वास करीन राजहंसी ।
देखता तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥ ८६ ॥
तब मुखाब्ज़ देखता आनंद । झेपावती मम नेत्रमिलिंद ।
की तब वचन गर्जता अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥ ८७ ॥
कविगुरूहूनी तेज विशाळ । आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ।
कंठी सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ॥ ८८ ॥
म्हणे मी कायावाचामनेकरून । तुझी ललना झाले पूर्ण ।
यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥ ८९ ॥
मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ।
तव पित्यासी कळता मात । घडे कैसे वरानने ॥ ९० ॥
यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसा येईन या स्थळाप्रती ।
तुम्ही यावे शीघ्रगती । लग्नसिद्धि साधावया ॥ ९१ ॥
ऐसे बोलून ते चातुर्यराशी । वेगे आली पितयापाशी ।
झाले वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसी संतोषला ॥ ९२ ॥
राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान ।
शांडिल्यगुरूचे वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥ ९३ ॥
गुरुचरणी ज्याचे मन । त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ।
काळमृत्यूभयापासून । सर्वदा रक्षी देशिक तो ॥ ९४ ॥
यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान ।
येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ॥ ९५ ॥
यावरी तिसरे दिवशी । दोघेही गेले त्या वनासी ।
गंधर्वराज सहपरिवारेसी । सर्व सामग्री घेऊन आला ॥ ९६ ॥
दृष्टी देखता जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत ।
छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥ ९७ ॥
यावरी यथासांग लग्न । चारी दिवस झाले पूर्ण ।
काही एक पदार्थ न्यून । पडिला नाही तेधवा ॥ ९८ ॥
स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज ।
लक्ष रथ दहा सहस्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥ ९९ ॥
एक लक्ष दासदासी । अक्षय कोश रत्नराशी ।
अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥ १०० ॥
अपार सेना संगे देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत ।
उमा दोघा पुत्रांसमवेत । मान देवोनि बोळविली ॥ १ ॥
सुखासनारूढ अंशुमती । पतीसवे चालिली शीघ्रगती ।
कनकवेत्रपाणी पुढे धावती । वाहनासवे जियेच्या ॥ २ ॥
चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार ।
येऊन वेढिले विदर्भनगर । सत्यरथपितयाचे ॥ ३ ॥
नगरदुर्गावरून अपार । उल्हाटयंत्रांचा होत भडिमार ।
परी गंधर्वांचे बळ फार । घेतले नगर क्षणार्धे ॥ ४ ॥
जेणे पूर्वी पिता मारिला जाण । त्याचे नाम दुर्मर्षण ।
तो जिताचि धरूनि जाण । आपला करून सोडिला ॥ ५ ॥
देशोदेशीचे प्रजाजन । धावती करभार घेऊन ।
उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ॥ ६ ॥
माता उमा बंधु शुचिव्रत । त्यासमवेत राज्य करीत ।
दहा सहस्र वर्षेपर्यंत । यशवंत राज्य केले ॥ ७ ॥
शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन ।
रत्नाभिषेक करून । अलंकार वस्त्र दीधली ॥ ८ ॥
दौर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैधव्य मरण ।
दुःख शोक कलह विघ्न । राज्यातून पळाली ॥ ९ ॥
प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशीर्वाद ।
कोणासही नाही खेद । सदा आनंद घरोघरी ॥ ११० ॥
ऐसा अंशुमतीसमवेत । धर्मगुप्त राज्य करीत ।
यौवराज्य शुचिव्रताते देत । पारिपत्य सर्व करी ॥ ११ ॥
ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ।
चिंतिता मनी उमाधवचरण । दिव्य विमान धाडिले ॥ १२ ॥
दिव्य देह पावोनि नृपती । माता-बंधूंसमवेत अंशुमती ।
शिवविमानी बैसती । करीत स्तुति शिवाची ॥ १३ ॥
कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून ।
जयजयकार करून । लोटांगणे घालिती ॥ १४ ॥
दीनबंधु जगन्नाथ । पतित पावन कृपावंत ।
हृदयी धरूनि समस्त । अक्षयपदी स्थापिली ॥ १५ ॥
हे धर्मगुप्ताचे आख्यान । करिती जे श्रवण पठण ।
लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तया ॥ १६ ॥
सकळ पापांचा होय क्षय । जेथे जाय तेथे विजय ।
धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसूनी ॥ १७ ॥
प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ ।
तेथे कैचे दारिद्रय मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १८ ॥
ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत ।
सदा हिंडे उमाकांत । अंती शिवपद प्राप्त तया ॥ १९ ॥
हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्यरचनाफळे आली पाडास ।
कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यास नावडे ॥ १२० ॥
जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा । श्रीधरवरदा सर्वसाक्षा ।
दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमां ॥ २१ ॥
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । पंचमाध्याय गोड हा ॥ १२२ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


सत्यरथ, धर्मगुप्त व शुचिव्रत कथा

श्रीगणेशाय नमः॥ "सदाशिव" ही चार अक्षरे जो मुखाने सतत उच्चारीत असतो आणि नेहमी शंकराची पूजा करीत असतो, तो अनेक जीवांचा उद्धार करतो. शास्त्र जाणणारे अनेक प्रकारची प्रायश्चित्ते सांगतात, परंतु जो शिवनामाने शुद्ध होतो त्याला इतर साधनांची जरूरी पडत नाही. या नामाचा महिमा अद्भुत आहे. त्याचबरोबर जो प्रदोषव्रताचे आचरण करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. हे त्रिवार सत्य होय. संतोष, पुष्टी, धैर्य, दीर्घ आयुष्य, संतती, संपत्ती, दिव्य ज्ञान, हे ज्यांना इष्ट असेल त्यांनी यथासांग प्रदोष व्रत करावे.. या व्रताची प्रचीती याच जन्मी येते. सहा महिन्यातच दारिद्रय आणि मोठी व्यथा निःशेष होते. एक वर्ष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते, बारा वर्षे व्रत केले तर भाग्योदय होतो. व्यासांचे हे वचन आहे. हे असत्य मानील तो कल्पांतीही मुक्त होणार नाही. त्याचा गुरू खोटा आणि भक्ती दांभिक, तसेच त्याचे ज्ञान खोटे. ज्याचे मन शंकराच्या ध्यानात नित्य असते त्यापेक्षा पवित्र दसरा कोणी नाही. प्रदोष व्रत केले असता मृत्यूही टळतो, गंडांतरही टळते.

सूत शौनकादिकांस म्हणाले - प्रदोषव्रताचा महिमा सांगायचा तर एक जुनी कथा सांगायला हवी.

विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा होऊन गेला. तो पराक्रमी होता. सद्गुणी होता. धर्मशील होता, पण तो शंकराची मात्र भक्ती करीत नसे. त्याने पुष्कळ वर्षे राज्य केले. त्याचे ऐश्वर्य काही राजांना सहन झाले नाही. त्यांनी एकत्र होऊन त्याच्या राज्यावर स्वारी केली. सात दिवस तुंबळ युद्ध झाले. तो सत्यरथ किती शूर असला तरी त्या एकट्याचे अनेक शत्रूंपुढे काही चालले नाही. तो रणांगणात मरण पावला ! शत्रूंनी त्याच्या नगरात शिरून लुटालूट केली.

त्याची पत्नी त्यावेळी गरोदर होती. ती नगर सोडून पळून गेली. ती अरण्यात शिरली. त्या गरोदर राणीच्या पायात रानात काटेकुटे रुतले. ती थकून खाली बसली. पण शत्रूच्या भयाने ती पुन्हा उठून कशीबशी पुढे चालली. ती सुंदर होती, सुकुमार होती, दात तर हिऱ्यासारखे होते, तिची वस्त्रे उंची होती, तिने भूषणे घातली होती. पण रानात ती असहायपणे, अत्यंत दीनपणे चालली होती. एका वृक्षाखाली ती दमून बसली. इथे तिला एकही दासी मदत करायला नव्हती ! ती प्रसूतिवेदनांनी व्याकुळ होऊन गडबडा लोळू लागली. त्याच ठिकाणी तिला पुत्र झाला ! कोणाचेही साहाय्य तिला मिळाले नाही ! बाळाला भूमीवर सोडून ती बसत बसत जवळच सरोवरापाशी स्नान करावे म्हणून गेली ! आणि दुर्दैव असे की तिने थोड्याशा पाण्यात पाय टाकून ओंजळीत पाणी घेतले तोच एका सुसरीने तिला पकडले आणि पाण्यात ओढीत नेऊन खाऊन टाकले !

काय कर्मगती पहा ! तो राजपुत्र अरण्यात एकटा पडलेला आक्रंदत होता ! ट्याहां ! ट्याहां ! कोण ऐकणार त्याचे रुदन ! पशुपक्षी ? होय. त्यांनी रुदन ऐकले, वृक्षवेलींनी ऐकले, वायूने ऐकले, वनदेवतांनी ऐकले आणि देवाने ऐकले ! योगायोग असा की उमा नावाची एक विधवा ब्राह्मणी त्या रानातून आपल्या एक वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन चालली होती. तिने "ट्याहां ट्याहां" असा आवाज ऐकला. आवाजाच्या दिशेने ती पुढे आली तेव्हा तिला नाळही न कापलेला नवजात मुलगा रडत आहे असे दिसले. त्या विधवा स्त्रीचे मन एकदम द्रवले. ती विचार करू लागली, "अग बाई ! कुणी बरे हा सुंदर बाळ या दुर्गम अरण्यात टाकला असेल ! अरेरे ! याचा सांभाळ कोण करील ? याची जात कोणती, हा कोणाचा कोण ? मी उचलून घेऊ का ? न घेऊन कसे चालेल ? इथे आत्ता कुणीतरी श्वापद येईल आणि याला खाऊन टाकील !"

कडेवरच्या आपल्या मुलाकडे तिने एकदा पाहिले. पुन्हा अर्भकाकडे पाहिले. तिला कोणी नातेवाईक नव्हते. एकुलता एक मुलगा होता. पाहता पाहता, त्या नवजात अर्भकासाठी तिच्या स्तनी पान्हा फुटला. डोळ्यात करुणा व वात्सल्य यांनी अश्रू दाटले. तिने मुलाला जवळ ठेवले व त्या अर्भकाला मांडीवर घेतले. त्याला ती स्तनपान देऊ लागली ! "हा बाळ आपण न्यावा ! पण नको ! याचे कोणी जवळ असतील ते रडतील ! पण कोणी नसले तर ? याची आई कोण ?मग ती कुठे गेली ? कोणी पशूने तिला खाऊन तर टाकले नसेल ! हे मूल असेच कसे टाकून जाऊ ?" ती विचार करू लागली.

ती स्त्री असा विचार करीत होती तेव्हा श्रीशंकर एका यतीचे रूप घेऊन तेथे आला व तिला म्हणाला, "ह्या मुलाला तू घरी ने. हा राजपुत्र आहे. क्षत्रिय आहे. कोणालाही ही गोष्ट सांगू नको. तुझ्या मुलाबरोबरच तू याचा प्रतिपाळ कर. हा मोठा बहुमूल्य ठेवाच तुला सापडला आहे." असे सांगून शंकर अंतर्धान पावला.

ती स्त्री दोन्ही मुलांना घेऊन अरण्यातून पुढे दुसऱ्या देशात गेली. अनेक गावांतून हिंडत ती भिक्षा मागत असे. तिने स्वतःच्या मुलाचे नाव शुचिव्रत असे ठेवले व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. ते दोघे स्वतःचेच मुलगे आहेत असे ती, कोणी विचारले तर, सांगत असे आणि लोकांना ते पटत असे.

हिंडता हिंडता काही काळाने ती एकचक्र नावाच्या नगरात गेली. घरोघरी भिक्षा मागत ती चालली असता तिला एक शिवमंदिर दिसले. मंदिरात पुष्कळ गर्दी होती. तेथे शांडिल्य ऋषी शंकराची पूजा करीत होते. पुष्कळ ब्रह्मवृंद जमला होता. "उमा" ही ब्राह्मण विधवा स्त्री हळूहळू दोन्ही मुलांना घेऊन मंदिरात गेली. डोळे भरून ती पूजाच पाहात बसली. तिला व मुलांना पाहून शांडिल्य ऋषी म्हणाले, "कर्मगती किती गहन असते ! हा राजपुत्र ! पण याचे दुर्दैव असे की आज तो दैन्यावस्था भोगीत आहे !"

उमेने हे ऐकले. पटकन पुढे होऊन तिने ऋषींचे पाय धरले ! "ऋषिवर्य ! आपण त्रिकाल ज्ञानी आहात ! समर्थ आहात ! भूतभविष्य जाणता ! ह्या लहान मुलाचा इतिहास काय आहे ? याचा पिता कोण ? माता कोण ? ती जिवंत आहेत का ?" तिने विचारले.

शांडिल्य म्हणाले, "या मुलाचा पिता सत्यरथ हा राजा. पूर्वजन्मी प्रदोषसमयी शिवपूजा करीत असे. एकदा शत्रूनी चारी बाजूनी त्याच्या नगराला वेढा दिला व युद्ध केले. पूजा सोडून तो रणांगणात धावला ! त्याचा रक्षणकर्ता शंकरच ! पण त्याला अव्हेरून तो रणात गेला. तोच प्रधानाने शत्रूचा पराभव करून त्यांना पकडून आणले. राजाने त्यांचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. नंतर राहिलेली पूजा पूर्ण न करताच तो भोजनाला बसला. यामुळे या जन्मी तो राजा अल्पायुषी होऊन शत्रूकडून मारला गेला. शिवपूजा अर्धवट सोडली त्याचा हा परिणाम. म्हणून शिवपूजा अर्धवट सोडू नये. या मुलाच्या मातेने गेल्या जन्मी आपल्या सवतीचा जीव घेतला होता.

त्याचा परिणाम म्हणजे सुसरीच्या रूपाने त्या सवतीने तिचा बळी घेतला. राजपुत्र धर्मगुप्त ! याने गेल्या जन्मी काहीही शिवव्रत केले नाही. त्यामुळे या जन्मी हा पोरका झाला, असहाय झाला, अरण्यात एकाकी पडला. म्हणूनच प्रदोषकाळी एकाग्रचित्ताने शंकराची पूजा करावी. त्यावेळी अनेक देवता शंकरासह येत असतात. भवानीला प्रतिष्ठित करून त्यावेळी शंकर तिच्यापुढे नृत्य करतो. वाग्देवी वीणा वाजविते, इंद्र वेणू वाजवितो, ब्रह्मदेव ताल धरतो, लक्ष्मी गायन करते, विष्णू मृदंग वाजवितो व नृत्यगतीला साथ देतो. कुबेर समोर हात जोडून उभा राहतो आणि यक्ष, गंधर्व, किन्नर, सुर आणि असुर सन्मुख उभे राहतात. प्रदोषकाळाचा महिमा असा वेदशास्त्रांसही न कळणारा आहे."

शांडिल्यांनी एवढे सांगितले तेव्हा उमेने विचारले, "ऋषिवर्य ! माझा मुलगा शुचिव्रत याला या जन्मी दारिद्र्य का आहे ?"

ते म्हणाले, "गतजन्मी या मुलाने लोकांकडून अन्न, धन आदी जी दाने घेतली ती दूषित होती; आणि स्वतः याने काहीच दान केले नाही. शिवपूजन तर मुळीच केले नाही. दुषित दानाने हस्तदोष निर्माण होतात व परस्त्रीच्या अभिलाषेने नेत्रदोष निर्माण होतात."

उमेने त्यावेळी ऋषींच्या चरणांवर आपला पुत्र व राजपुत्र या दोघांसही ठेवले व कृपेची याचना केली. ऋषींनी "नमः शिवाय" हा मंत्र त्या मुलांना दिला आणि प्रदोषव्रत कसे करावे ते उमेला समजावून सांगितले. ते म्हणाले, "त्रयोदशीस निराहार राहावे. त्या दिवशी सत्कार्यात वेळ घालवावा. सूर्यास्तानंतर तीन घटका समय झाला की त्यावेळी प्रदोषपूजेला भक्तिभावाने प्रारंभ करावा. त्यासाठी आधी भूमी गोमयाने लिंपून घ्यावी. मंडप उभारावा. अनेक प्रकारच्या रांगोळ्या घालाव्या. मंडपाला केळीचे खांब, पताका, छत, माळा, यांनी शोभा आणावी. स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे. शुभ्र गंध लावावे, सुगंधी पुष्पे धारण करावी, शिवलिंग स्थापून त्याची पूजा करावी. प्रथम आचमन, प्राणायामादी प्रारंभिक विधी करावे. अंतास व बाह्य न्यास, मातृकांसह करावेत. पिंडीच्या दक्षिणभागी विष्णूची पूजा करावी. सव्य भागी अग्नीची पूजा करावी. वीरभद्र, गजानन, अष्ट महासिद्धी, अष्ट भैरव, अष्ट दिक्पाल व सप्तावरण पूजा करावी. यथासांग शिवध्यान करावे. राजोपचारासहित सर्व उपचार यथाक्रम अर्पण करावे नंतर शिवाचे पूजन करावे. जयजय गौरीनाथा ! कोटिचंद्रांप्रमाणे तू शीतल आहेस ! तू मलरहित आहेस. तू स्थाणू, अचल, सत्चित् आनंद, पूर्ण सनातन ब्रह्म आहेस ! अशी स्तुती करावी व पूजाविधी यथाक्रम समाप्त करावा."

शांडिल्य ऋषींनी मुलांना प्रदोषव्रत करायला सांगितले व उमेला ते मुलांकडून करवून घेण्यासाठी उपदेश केला.

आईने ऋषींचा आशीर्वाद घेऊन मुलांसह एकचक्र नगरात वस्ती केली. त्यांनी चार मास प्रदोषव्रत केले. मुले आनंदाने शंकराची पूजा, यथाशक्ती जी सामग्री मिळेल तिने, करीत होती. शांडिल्य ऋषींनी सांगितले होते, "शिवपूजेचे तीर्थ व प्रसाद कोणालाही देऊ नये. त्यात मोठा दोष माथी येतो. शिवपूजेचे साहित्य व सामग्री कधीही पळवून नेऊ नये. ते फार मोठे पाप आहे. कारण त्या तीर्थावर, नैवेद्यावर देवासुरांचा अधिकार असतो. शिव हा त्यागमय आहे; स्वतःला स्वार्थाने पूजेतील साहित्य किंवा द्रव्य घेऊ नये.

ते मुलगे अगदी आनंदाने शंकराची भक्ती करीत होते. पुढे काही वर्षांनी अचानक एक अशी घटना घडली की त्यांचे दारिद्रयच दूर झाले. शुचिव्रत हा मुलगा एकदा नदीतीरी हिंडत होता. तेथे जवळच एक दरड होती ती पडली आणि पुष्कळ धन भरून ठेवलेला एक घट बाहेर पडला. शुचिव्रताने तो घट उचलला, उघडून पाहिला व द्रव्य पाहून तो घट घरी घेऊन आला. आईला त्याने ते द्रव्य दिले. आई म्हणाली, "बाळा ! प्रदोषव्रताचाच हा प्रभाव आहे ! आता आपल्याला चांगले दिवस येतील. शुचिव्रताने राजपुत्राला अर्धे द्रव्य देऊ केले पण ते त्याने घेतले नाही. तो राजपुत्र असल्यामुळे असे म्हणाला की "अरे दादा ! या पृथ्वीतील सर्व संपत्ती आम्हा राजवंशीयांचीच असते ! मला तुझ्यातले अर्धे धन घेऊन काय करायचे आहे ?" त्यामुळे शुचिव्रत काहीच बोलला नाही.

पुढे एकदा दोघे वनविहारासाठी गेले. तेथे त्यांनी गंधर्वकन्या आलेल्या पाहिल्या. त्या खेळत होत्या. दोघांना त्यांचे सौंदर्य पाहून आश्चर्य वाटले. शुचिव्रत भानावर आला आणि राजपुत्राला म्हणाला, "अरे ! परक्याच्या स्त्रियांकडे अभिलाषेने पाहू नये. स्त्रिया या दर्शनाने चित्त हरण करतात, स्पर्शाने आपली शक्ती हरण करतात. त्या स्वभावतः कुटिल असतात, दांभिक असतात, त्या मोठा अनर्थ करतात."

राजपुत्र म्हणाला, "तुला यायचे नसले तर तू येथेच थांब. मी त्यांच्या जवळ जातो." असे म्हणून तो मदनासारखा सुंदर राजपुत्र त्या गंधर्वकन्यांच्या जवळ गेला. शुचिव्रत मागेच थांबला.

त्या मुलींपैकी मुख्य जी होती तिचे नाव होते "अंशुमती". "कोद्रविण" नावाच्या गंधर्वराजाची ती कन्या. त्याने पूर्वी साक्षात् शंकराला प्रसन्न करून घेतले होते. शंकराला त्याने विचारले होते, "शंभो ! ही अंशुमती कोणत्या पुरुषश्रेष्ठाची भार्या होईल ?" तेव्हा शंकराने त्याला सांगितले होते "सत्यरथाचा मुलगा धर्मगुप्त याला तुझी ही कन्या तू दे." .

पूर्वीच शंकराने असे ठरविलेले होते. ती अंशुमती योगायोगाने धर्मगुप्ताच्या दृष्टीस आज पडली आणि तिनेही दुरूनच त्याला पाहिले. तिला तो मदनाहून सुंदर भासला. चंद्राने जणू काही क्षीरसागरात स्नान केले व स्वतःचा कलंक धुवून टाकला, तोच धर्मगुप्ताच्या रूपाने आला होता ! तो आजानु-बाहू, बत्तीस लक्षणी राजपुत्र हत्तीप्रमाणे धीरगंभीरपणे चालत येत होता.

त्या गुणाढ्य राजपुत्राला पाहताच तिचे मन हरवून गेले तिने आपल्या सख्यांना दूर पाठविण्यासाठी युक्ती केली, कारण तिला त्याच्याशी एकांतात बोलायचे होते. "सख्यांनो, तुम्ही दुसरीकडे जाऊन सुगंधी पुष्पे जमवून आणाल का ? आपण नंतर त्यांचे हार करू." सख्या काय ते समजल्या पण मनाशी हसत त्या निघून गेल्या.

अंशुमती एकटी राहिली. तिने धिटाईने राजपुत्राला जवळ येण्याची खूण केली. झाडाची पाने पसरून तिने शीतल आसन तयार केले. डहाळ्या पसरून ते मऊ केले. राजपुत्र तेथे येऊन बसला. त्याच्या सुंदर मुखाकडे ती लाजून पाहातच राहिली. तोही तिजवर मुग्ध झाला होता. ती धीर करून म्हणाली, "महाराज ! आपण शृंगाराचे सरोवर आहात. मी राजहंसी होऊन तेथे विहार करू का ? आपले सुंदर वदन हे तेजस्वी चंद्रासारखे आहे, माझे मन चकोराप्रमाणे त्याच्यासाठी आतुर झाले आहे. आपल्या मुखकमलाकडे माझा मनोरूपी भ्रमर झेपावतो ! अहो ! आपण मेघ आहात आणि माझे मन मयूर झाले आहे. आपण शुक्रताऱ्याहून तेजस्वी आहात ! मी आपल्याला मनाने वरिले आहे !"

तिने राजपुत्राच्या गळ्यात आपल्याजवळची सुंदर मोत्यांची माळ घातली, आणि त्याच्या चरणी वंदन केले. "मी कायावाचामनाने आपलीच स्त्री आहे." ती म्हणाली.

धर्मगुप्त म्हणाला, "तू सुंदर, सदगुणी, उदार मनाची आहेस ! पण मला आई नाही, वडील नाहीत ! मी राज्यभ्रष्ट पित्याचा मुलगा ! तुझ्या वडिलांना जामात म्हणून मी पसंत कसा पडणार ? तू हे काहीतरीच करतेस !"

अंशुमती म्हणाली, "मी आजपासून तीन दिवसांनी याच ठिकाणी याचवेळी येईन. पित्याची संमती घेऊन येईन. आपण त्यावेळी यावे म्हणजे आपला विवाह होईल."

राजपुत्राने ते मान्य केले. तेव्हा ती त्याचा निरोप घेऊन निघाली. राजपुत्र परत मागे गेला व शुचिव्रताला सर्व सांगून ते घरी गेले. तीन दिवसांनी त्याच ठिकाणी त्याच वेळी यायचे असे त्यांनी ठरविले.

अंशुमती सख्यांसह वन सोडून घरी गेली व तिने पित्याला सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला. शंकराने सांगितलेलीच घटना घडणार हे लक्षात येताच तो गंधर्वराज अंतरी सुखावला.

शांडिल्यांचे वचन धर्मगुप्त व शचिव्रत यांना आठवत होते. प्रदोषव्रत करण्यामुळेच हे योग घडून येत आहेत हे त्यांच्या लक्षात आले. ज्यावेळी उमेला त्यांनी सारे सांगितले तेव्हा ती म्हणाली, "शिवभक्तीचे केवढे शुभ फल आहे हे. गुरुचरणी ज्याची श्रद्धा असेल त्याला काही कमी पडत नाही. तो मृत्युभयापासूनही रक्षण करणारा आहे."

तीन दिवसांनी ते दोघे पुन्हा त्या ठिकाणी वनात गेले. गंधर्वराज कोद्रविण परिवारासह आपल्या कन्येला घेऊन तेथे आला. त्याने जामाताला पाहिले. त्याला फार आनंद झाला. त्याने उमेला मोठ्या सन्मानाने तेथे बोलावून आणले. यथासांग विवाहसोहळा साजरा केला. स्वर्गातील अमूल्य वस्तू गंधर्वराजाने उमेला व आपल्या जामाताला दिल्या. भरपूर वैभव दिले. राजपुत्राजवळ आता मोठी सेना जमली. धनकोषही फार मोठा जमला. गंधर्वाने एक सेनापतीही राजपुत्राबरोबर दिला. मोठ्या शोभिवंत रथात बसून पतीसवे अंशुमती जात होती.

राजपुत्राने नंतर आपल्या पित्याचे गेलेले विदर्भ राज्य दुर्मर्षण नावाच्या शत्रूकडून मोठे युद्ध करून परत जिंकून घेतले. दुर्मर्षणाला आपला अंकित केला. त्यानंतर त्याने अंशुमतीसह पुष्कळ वर्षे राज्य केले. शांडिल्य गुरूंना त्याने दक्षिणा म्हणून पुष्कळ धन दिले, अलंकार व वस्त्रे दिली. शुचिव्रत आणि उमा यांना त्याने सुखात ठेवले. त्याच्या सगुणांमुळे त्याच्या राज्यात सर्वत्र आनंदीआनंद झाला. रोग, संकटे, अवर्षण इत्यादी नाहीसे झाले. प्रजा सुखी झाली.

काही काळानंतर त्याने सुदत्त ह्या आपल्या पुत्राला युवराज केले आणि तो तप करून शिवलोकात गेला. त्याच्याबरोबर अंशुमती, उमा आणि शुचिव्रतही शिवलोकी गेले. शंकराचे दर्शन घेऊन त्यांनी त्याला साष्टांग नमन केले. त्या पतितपावनाने त्या सर्वांवर कृपा केली व अक्षय पदी त्यांची स्थापना केली.

हे धर्मगुप्ताचे आख्यान जे पठण करतील, श्रवण करतील, लिहितील, रक्षण करून ठेवतील किंवा याला अनुमोदन देतील, त्यांचे रक्षण शिव करील. त्यांचे सर्व पाप नष्ट होईल, त्यांचा सर्वत्र विजय होईल, त्यांना सर्व समृद्धी प्राप्त होतील, " ते ऋणमुक्त होतील !

प्रदोषव्रताचा महिमा फार अद्भत आहे. हे वाचून व्रताचे ज्ञान करून घेऊन जे आचरण करतील, त्यांना दारिद्रय व अपमृत्यू यांचे भय राहणार नाही. ज्याच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ असेल त्याचा पाठीराखा शंकर त्याच्या मागोमाग सतत राहील, आणि अंती त्याला शिवपद लाभेल. हा ग्रंथ आम्रवृक्ष आहे, पद्यरचना ही फळे परिपक्व आहेत, कुतर्क करणाऱ्या कावळ्यांना ती कशी आवडणार ? हे ब्रह्मानंदा ! विरूपाक्षा ! तू दुष्टकर्मातून मुक्त करतोस ! वेदशास्त्रांना तुझा महिमा कळत नाही ! हा स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला शिवलीलामृताचा पाचवा अध्याय श्रोते नित्य श्रवण करोत.

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु।


GO TOP