॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥

अध्याय चवथा
समास पहिला


समर्थानुयायी तुकाराम सिद्ध । जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ।
तया प्रार्थुनी राममंत्रासि घेती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४ ॥

नमो सद्‌गुरु योगेश्वरा । करुणाकरा परमोदारा ।
भवभीतासी थारा । आत्मरूपा ॥ १ ॥
बहुत जन्मीं जाहलो कष्टी । कामक्रोधें घातली मिठी ।
दुष्ट वासना पाठींपोटीं । लुबाडीतसे ॥ २ ॥
तेणें जाहलो भिकारी । चौर्यांशी लक्ष गेलों घरी ।
परि शांति नसे अणुभरी । कासावीस झालो ॥ ३ ॥
तंव अवचटें इये सदनीं । पावलो, तेथें श्रीमंत धनी ।
भेटला, करितो विनवणी । तळमळ निववा दातारा ॥ ४ ॥
वेदशास्त्रें वर्णिली कीर्ति । दया क्षमा बोध शांति ।
अनन्यभक्तीची संपत्ति । वसते येथ ॥ ५ ॥
कर्ण नाशिवंतदाता । सद्‌गुरु देई शाश्वता ।
पुनरपि मागण्याची आस्था । अल्पही उरेना ॥ ६ ॥
ऐसी कीर्ती परिसिली । तेव्हां धांव घेतली ।
परि द्वारीं आड पडलीं । थोर थोर ॥ ७ ॥
अविश्वासें ढकलोनि दिलें । देहलोभ पडळ आलें ।
अहंतेनें पांगुळें केलें । मजलागीं दयाळा ॥ ८ ॥
निद्रा आळस चंचल मन । आड कांटेरी कुंपण ।
अज्ञानतिमिर फिरफिरोन । अभक्तिकूपीं लोटतसे ॥ ९ ॥
पापपुण्यांच्या भगदाडी । मतांमतांच्या दरडी ।
ढकलोनी देवविती बुडी । स्वर्गनरकी ॥ १० ॥
बहुत केल्या येरझारा । अद्यापि न ये शिसारा ।
दयासिंधो सद्‌गुरुवरा । दीनाकडे पाहावें ॥ ११ ॥
दीपाजवळील पांखरें । तैसें मज जाहलें खरे ।
भाजते परि तें बरवें । मोहयोगें भासतसे ॥ १२ ॥
ऐसे मोहाचें पडळ । विवेक वैराग्य नसे बळ ।
तेणें जाहलो विकळ । दीर्घस्वरें बाहतो ॥ १३ ॥
तूं बा दीनांचा कनवाळू । धांव घेईं न करी वेळू ।
विझवी हा मायाजाळू । कृपामृत वर्षोनी ॥ १४ ॥
काकुळती वाट पाहे । काळ पाठीसी उभा आहे ।
क्षण न लागतां घालील घाये । उपेक्षा कासया मांडिली ॥ १५ ॥
भक्त थोर तेजोराशी । मी दीन म्हणोनि अव्हेरिसी ।
तरी दीनदास कां म्हणविसी । दीनानाथा गुरुराया ॥ १६ ॥
श्रवणीं मम स्वर न पडे । ऐसें म्हणता सर्वज्ञता मोडे ।
तुम्हांसी अज्ञेय मागें पुढें । कोठेंही असेना ॥ १७ ॥
जरी म्हणाल साधनबळें । दवडावीं सर्व किडाळें ।
तरी मायामोहें मज आंधळें । केलें असे जी दयाळा ॥ १८ ॥
आंधळ्या- पांगळ्यांचा । आधार तूं एक साचा ।
यास्तव दीनवाचा तुजसी आहीं बाहतो ॥ १९ ॥
धांव धांव गुरुराया । मायेनें आणिले आया ।
आठविलें तव पाया । आतां उपेक्षा न करावी ॥ २० ॥
स्वामी जरी उपेक्षिती । मग आधार नसे त्रिजगतीं ।
म्हणोनि येतों काकुळती । कृपादृष्टीं विलोकावें ॥ २१ ॥
जरी म्हणाल पोपट । मुमुक्षुत्व नसेल धीट ।
तरी हा दारींचा भाट । ब्रीद राखा आपुलें ॥ २२ ॥
मायेनें त्यजिलें बाळासी । कोणी भेटेल मावशी ।
रायें त्यजितां प्रजेसी । देव साह्य करील ॥ २३ ॥
परि तुम्ही टाकिल्यावरी । थारा न मिळे अवनीवरी ।
म्हणोनि विनवणी आदरीं । मायबापा गुरुराया ॥ २४ ॥
आठवावे तुझे पाय । अन्य न जाणें उपाय ।
जाणोनि देईं सोय । चरणांवरी ॥ २५ ॥
मागील अध्यायी कथा । सद्‌गुरु निघाले सांडोनि ममता ।
दामू वामन संगती असतां । पावले करवीरनगरीं ॥ २६ ॥
अयाचित भोजन करिती । परस्परें साह्य होती ।
सतेज दिसे गणपती । मोहवी मन जनाचें ॥ २७ ॥
कोणी पक्वान्नें ओपिती । कोणी येऊन दर्शन घेती ।
कोणी पाहोन आश्चर्य करिती । तपस्तेज म्हणती हे ॥ २८ ॥
देखोनि गणपतीचे गुण । दत्तक घेऊं आपण ।
म्हणोनि गुरुजी कोणी भावसंपन्न । अत्याग्रह मांडिला ॥ २९ ॥
सद्‌गुरु सत्वर निघाले तेथुनी । इकडे जगदंबाभेट घेउनी ।
दामू आला परतोनि । गृहीं वृत्तांत निवेदिला ॥ ३० ॥
वामनबुवा म्हासुर्णेकर । पुढें कांही दिवस बरोबर ।
होते तेही माघार । घेऊन आले गृहासी ॥ ३१ ॥
इकडें काय झालें गोंदावलीं । दोन प्रहर वाट पाहिली ।
मग माउली सचिंत झाली । बाळ कोठे दिसेना ॥ ३२ ॥
रावजी झाले चिंताक्रांत । ग्राम समस्त धुंडाळित ।
नदीतीरीं जावोनि पाहात । बैसला असेल एकांतीं ॥ ३३ ॥
रानोमाळीं शोधिती । गांवोगांवी दूत प्रेषिती ।
परि कोठें न दिसे गणपती । दुःख करिती अनिवार ॥ ३४ ॥
अज्ञान सान बालक । सोडोनि गेला गृहसुख ।
कोण करील त्याचे कौतुक । खाऊं जेवूं घालील ॥ ३५ ॥
ऊन पाऊस थंडी वारा । कोण देईल निवारा ।
नयनीं लोटती अश्रुधारा । पुत्रस्नेहें ॥ ३६ ॥
कोणी नाही मारिलें । अथवा रागें भरिले ।
कोण्याकारणें रुसोनि गेलें । सोडोनि आम्हां पाडस ॥ ३७ ॥
आमुचे जीवींचे जीवन । सद्गुणी चातुर्याची खाण ।
भगवद्भजनी अनन्य । कोठें गेला कळेना ॥ ३८ ॥
देवानें दृष्टांत दिला । सिद्धपुरुष होईल भला ।
साधन साधावया गेला । गृहत्याग करूनी ॥ ३९ ॥
कांही तर्क चालेना । गुण आठविती नाना ।
कोणी शोधूनि सांगा ना । पुत्रवार्ता ॥ ४० ॥
ऐसे दुःख बहुपरी । करूं लागले ते अवसरीं ।
जमोनि बोधिती शेजारी । भेटी येईल मागुता ॥ ४१ ॥
तो सद्वर्तनी चतुर । कदा न करी अविचार ।
भेटेल तुम्हांसी सत्वर । चिंता न करावी ॥ ४२ ॥
माता पिता मित्रगण । समस्त होती उद्विग्न ।
पाडस चुकतां जैसी जाण । धेनू फोडी हंबरडा ॥ ४३ ॥
तव दामू परतोनि आला । गृहीं वृत्तांत निवेदिला ।
सद्‌गुरु शोधासी गेला । तुमचा सुत ॥ ४४ ॥
परिसोनि ऐसी वार्ता । शोधूं धावले सद्गुणी सुता ।
मार्गीं अवचित भेटतां । घेवोनि आले गृहासी ॥ ४५ ॥
कांही दिवस राहोनि । पुनरपि गेला निघोनि ।
शोक करिती जनक जननी । हातीं न लागे पुत्र हा ॥ ४६ ॥
दामू वामन शांतविती । त्यासी कोठेंही नसे कमती ।
बहुत जन दर्शन घेती । आयती पुरविती अनेक ॥ ४७ ॥
तो ज्ञानी वैराग्ययुक्त । श्रीगुरूसी शोधित ।
येईल पुरल्यावरी हेत । तुम्ही चिंता न करावी ॥ ४८ ॥
सद्‌गुरुभेटीवांचून । गणपती न ये परतोन ।
निश्चय मनीं धरून । समाधान मानिती ॥ ४९ ॥
इकडे गणपती बाळ । फिरतसे रानोमाळ ।
कोठें सद्‌गुरु दयाळ । भेटतील कीं ॥ ५० ॥
नाना तीर्थे नाना देश । गिरिगव्हरे विशेष ।
नदीतटाकीं बहुवस । शोधित फिरे ॥ ५१ ॥
शास्त्री पंडित वैदिक । अध्यात्मवादी पुराणिक ।
भजनी गोसावी भाविक । योगी आणि हठयोगी ॥ ५२ ॥
मठपती फडपती हरिदास । संन्यासी आणि परमहंस ।
गृहधर्मी परि उदास । संतचरणीं सादर जे ॥ ५३ ॥
तैसे गुरुपरंपरागत । गुरुभक्त हरिहरभक्त ।
ब्रह्मचारी कर्मठ शाक्त । शुद्ध ज्ञानी वैरागी ॥ ५४ ॥
बाह्य वेडे अंतरी शाहाणे । राजयोगी अलिप्तपणे ।
करिती जे तीर्थाटनें । सिद्धि चमत्कार दाविते ॥ ५५ ॥
ऐसियांचिया घेती भेटी । करिती तयांसवे गोष्टी ।
न्याहाळिती सूक्ष्मदृष्टी । सत्यासत्य ॥ ५६ ॥
कोणी मानाचे भुकेले । कोणा धनानें भुलविलें ।
किती स्त्रीसंगें भ्रष्टले । सोंग राहिलें केवळ ॥ ५७ ॥
कित्येक बोलती जैसे भाट । अनुभवहीन धीट पाठ ।
मधुर गायनीं लाविती चट । भाविकांसी ॥ ५८ ॥
कित्येक सिद्धि उपभोगिती । तेणेंचि समाधान मानिती ।
कित्येक धर्म उच्छेदिती । म्हणती आम्ही अद्वैती ॥ ५९ ॥
साधुत्वाचें नांवाखाली । दुष्कर्में कोणी झांकिली ।
वरी दिसलीं भलींभलीं । कवंडळासारिखी ॥ ६० ॥
योगभ्रष्ट कोणी झाले । उपासनेविण ज्ञान बोले ।
वैराग्य नाहीं देखिले । देहासक्त ॥ ६१ ॥
कांहीं ते उदरदास । म्हणती आम्ही हरिदास ।
मोलें ज्ञान विक्रयास । मांडिती बाजारीं ॥ ६२ ॥
जें मोलें विकतां न ये । कोणी कोणा देतां न ये ।
वासना जिंकोन जो जाये । तयासीच प्राप्त ॥ ६३ ॥
कित्येक वडिलोपार्जित साधु । वैराग्योपासना ना बोधु ।
अहंकारी स्वयंसिद्धु । म्हणती आम्ही ॥ ६४ ॥
गायनाचे भोक्ते कोणी । लक्ष वेधिलें सुरांनी ।
दुरी राहिला चक्रपाणी । नाठवें जया ॥ ६५ ॥
कित्येक अत्यंत कर्मठ । संशयें ग्रासिले सगट ।
दयेची झाली ताटातूट । कर्मही सांग घडेना ॥ ६६ ॥
कोणी संपत्तिचे बळें । साधुत्वाचे करिती चाळे ।
अंतरीं भाव ते वेगळे । बाजारी दिसती ॥ ६७ ॥
असो ऐसे बहुत प्रकार सांगतां न ये अनिवार ।
भोळ्या भाबड्यां चमत्कार । दावोनि नादीं लाविती ॥ ६८ ॥
बाह्य सोंग संपादिती । अंतरें मलिन राखिती ।
पुढें आतां ऐसीचि स्थिती । होणार आहे ॥ ६९ ॥
क्वचित् स्थळी भगवद्भक्त । हरि जयांचा अंकित ।
भक्तिज्ञानवैराग्ययुक्त । त्यांचीं लक्षणें अवधारा ॥ ७० ॥
नित्य तृप्त ज्यांचे चित्त । जे पूर्ण ज्ञानी विरक्त ।
निःसंदेही गुणातीत । ब्रह्मानंदीं अनन्य ॥ ७१ ॥
आशासूत्र जळोनि गेले । चित्त चैतन्यचि झालें ।
लोकेषणेसी न वंचले । निरहंकृती ॥ ७२ ॥
देही असोनी विदेही । द्वेष मत्सर मुळीं नाहीं ।
भूतीं भगवद्रूप पाही । सहज समाधी भोगिती ॥ ७३ ॥
जाणोनि निर्गुणाची खूण । सगुणभक्ति करी गहन ।
निरालस्य निर्विकार मन । स्थिरबुद्धी जयाची ॥ ७४ ॥
दया-शांतीचा पुतळा । चौदा विद्या चौसष्ट कळा ।
जाणोनि राहे वेगळा । प्राकृताऐसा ॥ ७५ ॥
चौंदेहाचा केला अंत । प्रारब्धें देह वर्तत ।
ऊर्मि निमाल्या समस्त । हर्ष ना विषाद ॥ ७६ ॥
ताप न होई इतरांसी । इतरांपासोन जयासी ।
शांति नांदे अहर्निशी । अंतर्बाह्य ॥ ७७ ॥
ऐसेही भेटती कोणी । तेथें तेथें जावोनि ।
हस्तद्वय जोडोनि । म्हणे विवेकी बाळ । ७९ ॥
प्रश्न पाहोनि चकित होती । कांही वर्म जाणती ।
कांही उगेच उपहासिती । बालबुद्धि म्हणोनी ॥ ८० ॥
जे कां ज्ञानी भगवद्भक्त । ते म्हणती सद्‌गुरुपदांकित ।
होतां येतील समस्त । विद्या तुज ॥ ८१ ॥
पहा हो याची विरक्ती । शमदमादि संपत्ती ।
ज्ञान पाहतां वेडावती । थोर थोर ॥ ८२ ॥
कामक्रोधादि जिंकिले । गृहपाशही तोडिले ।
देहदंडण बहु केलें । अल्पवयीं ॥ ८३ ॥
दिसती तरी वज्रदेही । उन्मत्तपणा मुळीं नाही ।
बाल फिरे सकल मही । सद्‌गुरुपद शोधित ॥ ८४ ॥
काशीपासोन रामेश्वर । बहुत केली येरझार ।
तीर्थें क्षेत्रें समग्र । शोधिलीं गुरुकारणें ॥ ८५ ॥
रामेश्वरा अर्पिली गंगा । सेतु नेला प्रयागा ।
सप्तपुर्या ज्योतिर्लिंगा । चहूं धाम शोधिले ॥ ८६ ॥
मार्गीं फलाहार करावा । सिद्ध साधक धुंडावा ।
मुखीं रघुवीर गावा । ऐसा क्रम चालिला ॥ ८७ ॥
मार्गीं भेटले बहुत । मुमुक्षु साधक संत ।
कांहीं भेटींचे वर्णन येथ । करूं विशद ॥ ८८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय चवथा
समास दुसरा



ॐ नमो जी गुरुराया । अर्पितो तुझे चरणी काया ।
निरसावें या भवभया । ठाव देईं चरणांचा ॥ १ ॥
हृदयस्था आत्मयारामा । वर्णावयाची झाली सीमा ।
शेष थकला गातां महिमा । एक मुखें काय वर्णूं ॥ २ ॥
असो कृष्णा-वारणा संगमासी । हरिपूर क्षेत्र परियेसीं ।
तेथें राधाबाई नाम जिसी । भोळी भाविक सत्त्वस्थ ॥ ३ ॥
भजन जियेचें प्रेमळ । अन्नदानाचा सुकाळ ।
भक्तिभाव तो निर्मळ । संतसेवनीं सादर ॥ ४ ॥
मिरजग्रामीं आण्णाबुवा । लोकीं वेडा म्हणावा ।
अंतर्निष्ठांनी ओळखावा । सिद्धपुरुष ॥ ५ ॥
अनेक चमत्कारांसी दाखवी । लोककार्यें करावीं ।
पिशाचवृत्ती धरावी । वरिवरी ॥ ६ ॥
नाशिकप्रांतीं सटाणें गांव । तेथें मामलेदार देव ।
गृहस्थाश्रमी शुद्ध भाव । ज्ञानी असोनि विरक्त ॥ ७ ॥
भार्या जयाची सती । पतिव्रता गुणवती ।
उभयतां बहु प्रेम करिती । गणपतीवरी ॥ ८ ॥
जातां येतां काशीहूनि । सद्‌गुरु जाती नेमेंकरोनि ।
थोडे दिवस राहोनि । पुढें होती मार्गस्थ ॥ ९ ॥
जाणोनि हनुमदंश । मानिती भजती विशेष ।
प्रश्नोत्तरें दिवस दिवस । संवाद होत स्वानंदें ॥ १० ॥
जातीसी मिळतां जात । प्रेमें प्रेम दुणावत ।
सहजसमाधी येत । अनुभवासी ॥ ११ ॥
माणिकप्रभु हुमणाबादकर । ज्ञानी विरक्त योगेश्वर ।
शिष्यसमुदाय थोर । असे जयांचा ॥ १२ ॥
कांही दिवस केली वसति । प्रेमसंवाद चालती ।
रामभक्त जाणोनि चित्तीं । वंदन करिती समसाम्यें ॥ १३ ॥
सद्‌गुरु अक्कलकोटनिवासी । दत्तमहाराज म्हणती जयांसी ।
तेथें जाती दर्शनासी । दत्तअवतार मूर्तिमंत ॥ १४ ॥
कथिती ते रामोपासना । सद्‌गुरु भेटतील जाणा ।
अंतर्भाव जाणोनि खुणा । येरयेरां भेटले ॥ १५ ॥
आणिक बहु असती । जे गिरिगुहेमाजीं बसती ।
मनुष्यवाराही न घेती । ऐसे राहती अलिप्त ॥ १६ ॥
प्रसंगें श्रीगुरूंनी कथिलें । ते येथें विशद केलें ।
मार्गीं बहुत भेटले । सिद्ध आणि साधक ॥ १७ ॥
बहुत केल्या येरझारा । काशीहूनि रामेश्वरा ।
भरतखंड शोधिला सारा । सद्‌गुरुकारणें ॥ १८ ॥
कोणी म्हणती आम्हांसी । अधिकार नसे निश्चयेंसी ।
तुम्ही ज्ञानी गुणराशी । आम्हां गुरुसारिखे ॥ १९ ॥
कोणी ज्ञानी तपोबल । भूत भविष्य जाणोनि सकल ।
अवतारिक पुरुष हा केवळ । गुरु व्हावा कासया ॥ २० ॥
कोठें कांही कोठें कांही । मिळोनि समाधान नाहीं ।
तळमळ वाटे अंतर्बाही । विचरती भूमंडळी ॥ २१ ॥
सद्‌गुरुपद तें दुर्लभ । सहसा नव्हे प्राप्य लाभ ।
सुटतां संसृतीचा लोभ । ठायीं पडे ॥ २२ ॥
रुका अडका खर्चिला । सद्‌गुरु खरेदी केला ।
तरि बोध तैसाचि झाला । इह ना परत्र ॥ २३ ॥
धूर्त तार्किक विचक्षण । युक्तिप्रयुक्ती वेधिती मन ।
भोळे भाविक सज्जन । भुलविती अनेक ॥ २४ ॥
कामक्रोधा बळी पडले । अहंकारीं वैभवीं गुंतले ।
सिद्धिसाह्यें सुख मानिले । तेंही सद्‌गुरु म्हणविती ॥ २५ ॥
शाक्तमार्गें भरी भरती । भूतदयेतें नेणती ।
कोणी पिशाच भजती । भुलविती शब्दज्ञानें ॥ २६ ॥
वैभव पाहोनि भुलले । शब्दज्ञानें चकित झाले ।
आडमार्गीं जावोनि पडले । असंख्य नर ॥ २७ ॥
देवाहोनि आम्ही श्रेष्ठ । सेवा करा एकनिष्ठ ।
व्यसनी विषयीं झाले भ्रष्ट । भोंदिती जगा ॥ २८ ॥
नाही भक्ति नाहीं ज्ञान । नाहीं उपासना अनुसंधान ।
वैराग्य क्षमा समाधान । नाहीं भूतदया ॥ २९ ॥
समबुद्धि ना स्थिरत्व । नैष्कर्म्य ना जनप्रियत्व ।
निरहंकृति ना निस्पृहत्व । वंचकवृत्ती ॥ ३० ॥
नाहीं संदेह गेला । भूतीं भगवंत न देखिला ।
आशातंतु नसे तुटला । महंती प्रिय ॥ ३१ ॥
अंगी भरला ज्ञानताठा । यमनियमा दिधला फांटा ।
स्तुतिप्रिय झाला मोठा । अनुभवहीन ॥ ३२ ॥
ऐसे गुरु बहुत असती । बिकट प्रश्नें चडफडती ।
महंती जाईल म्हणोनि भिती । शिष्यगुंती काढिती ना ॥ ३३ ॥
ऐशियांचेनि सार्थक । होणार नाहीं निःशंक ।
स्वयें बुडोनि लोक । बुडविती निश्चयेंसी ॥ ३४ ॥
ऐसे बहुत शोधिले । फिरत वाराणसीं आले ।
देखोनि तेथें शास्त्री भले । प्रश्न करिती नेमस्त ॥ ३५ ॥
शास्त्री वदती बाळा । गुरुविणें ज्ञानजिव्हाळा ।
न ये विद्या आणि कळा । यथासांग ॥ ३६ ॥
दक्षिणेसी मोगलाई । तेथें सद्‌गुरु तुकाई ।
शरण जाईं लवलाही । अनन्यभावें ॥ ३७ ॥
परिसोनि वचनासी । संतुष्ट झाले मानसीं ।
फिरले त्वरित दक्षिणेसी । विचार मानसीं दृढ केला ॥ ३८ ॥
तुकाराम साधु भले । येहळेगांवी ऐसें कथिलें ।
परिसतांची समाधान झालें । गणपतीचे ॥ ३९ ॥
बहुत पुरुष आजवरी । पाहतां फिरले पादचारी ।
परि समाधान ऐसेपरी । कधीं न झाले ॥ ४० ॥
आत्मा आत्मपणें एक । उपाधीनें दिसे अनेक ।
परि अनेक नव्हे एक । सर्वां भूतीं ॥ ४१ ॥
तोचि देतसे साक्ष । सूक्ष्मपणे देतां लक्ष ।
सत्यासत्य दावी पक्ष । विवेकीजना ॥ ४२ ॥
या अनुभवाच्या गोष्टी । विवेकी पाहती दृष्टी ।
इतर करिती चावटी । वितंडवादें ॥ ४३ ॥
असो झालें समाधान । चित्तासी बाणली खूण ।
त्वरित निघाले तेथोन । गुरुपदीं लीन व्हावया ॥ ४४ ॥
उतावीळ झाले चित्त । सद्‌गुरुभेटीची आर्त ।
वाटे वाट दुणावत । सत्वरीं ओसरेना ॥ ४५ ॥
धेनू आली वनांतोनि । धारेसी निघाला घरधनी ।
वत्सें धांव धरिली मनीं । परि बिरडें सुटेना ॥ ४६ ॥
ग्रामाहून आला पती । सासुरवासी भार्या सती ।
भेटी उतावीळ चितीं । वाटे गभस्ति मंद चाले ॥ ४७ ॥
तैसे श्रीसद्‌गुरुदर्शन । घ्यावया उतावीळ मन ।
जानव्हीचें स्नान करून । विश्वेश्वरदर्शन घेतलें ॥ ४८ ॥
तेथूनि निघे गुरुमाऊली । सद्‌गुरुभेटीसी चालिली ।
वय लहान असोन केली । करणी हे अघटित ॥ ४९ ॥
सद्‌गुरुभेटीची आयती । केली कैसी पाहावी ती ।
चित्तशुद्धि अनुतापस्थिति । वैराग्ययुक्त ॥ ५० ॥
मायमोह पितृमोह । खेळगडी यांचा मोह ।
आप्तइष्ट-गृहमोह । शरीरमोह सांडिला ॥ ५१ ॥
अयाचित उदरभरण । फलाहार उपोषण ।
रसनेंद्रिय जिंकले संपूर्ण । अजिंक्य जें ॥ ५२ ॥
कोठेंही करावी वसती । ग्रामीं अथवा वनाप्रति ।
प्रावरणाविण वागविती । देह आपुला ॥ ५३ ॥
शीतोष्ण वारा पाऊस । सोसतां न मानी त्रास ।
वैराग्यस्थिति जयास । पूर्णत्वें बाणली ॥ ५४ ॥
आशा ममता देहबेडी । लोभ मोह वासना कुडी ।
भय अहंकार वर्हाडी । घालविले सकळ ॥ ५५ ॥
मुखीं अखंड रामनाम । तेणें चित्तशुद्धि होय परम ।
ध्यानी एक श्रीराम । भोग्य वस्तू टाकिल्या ॥ ५६ ॥
माझें घर माझा संसार । माझीं मायबापें चतुर ।
माझी जन्मभूमि थोर । शहाणा एक मीच मी ॥ ५७ ॥
माझें धन माझें शेत । माझे खेळगडी बहुत ।
आप्तइष्ट गणगोत । सर्वही माझें ॥ ५८ ॥
माझें हे ओझें समस्त । विवेकें विवरी सतत ।
असत्य मानोनि शोधी सत्य । सद्‌गुरुपाशीं ॥ ५९ ॥
न इच्छी विषयभोगांसी । विषसम जाणोनि त्यांसी ।
अलिप्त राहे उदासी । आवडी एक नामाची ॥ ६० ॥
परि रामदर्शन करवी । ऐसा न मिळे गोसावी ।
अखंड तळमळ लागली जीवीं । वैराग्ययुक्त ॥ ६१ ॥
अनुतापेंहोवोनि विरक्त । विवेक जागविला सतत ।
नामस्मरणानें होत । चित्तशुद्धि ॥ ६२ ॥
मुमुक्षुस्थिति अनुभविली । साधकवृत्ति अंगीकारिली ।
सद्‌गुरुभेटीसी चालली । माय माझी ॥ ६३ ॥
जे उपजत ज्ञानघन । आदिमध्यांत अविच्छिन्न ।
जनांसी लावावया वळण । जनरूढी चालती ॥ ६४ ॥
असो गणपति बाळ । ओलांडोनि रानोमाळ ।
पाहावया सद्‌गुरु दयाळ । सत्वर चालिले ॥ ६५ ॥
पावले मोगलाईंत । येहळेगांव कोठें पुसत ।
संकेतें पावले जेथ । तुकाराम नांदत ॥ ६६ ॥
बाळ चातक ज्ञानाधिकारी । स्वानंदमेघ वरुषेल वरी ।
सद्‌गुरुकृपेचिया सरी । तन्निमित्तें सेवन करूं ॥ ६७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय चवथा
समास तिसरा



येहळेगांवी पावले । ग्रामस्थांसी पुसिलें ।
तुकाराम साधु भले । कोठें भेटतील मजलागीं ॥ १ ॥
कोणी म्हणती नसे ठावा । कोणी म्हणती रानीं पहावा ।
वेडा तुका कासया हवा । म्हणती कोणी ॥ २ ॥
कोणी म्हणती साधु भले । तुमचें भाग्य उदेलें ।
दर्शना चित्त वेधलें । वय दिसतसे कोमल ॥ ३ ॥
कोठेंतरी आडरानीं । अथवा ओढ्याचे ठिकाणीं ।
बैसले असतील, शोधोनि । काढीं बापा ॥ ४ ॥
असतील कंकणें हातांत । श्वान बालकांसवे खेळत ।
चिलीम करीं वागवीत । असतील पहा ॥ ५ ॥
भूमीची शेज तयांसी । आकाश प्रावरण परिधानासी ।
मस्तकीं टोपडे घालिती हर्षीं । बालकाऐसें ॥ ६ ॥
सर्वज्ञ परि बाह्य वेडा । दिसेल तुम्हांसी तुसडा ।
देह मलिन उघडा । वागवित नित्य ॥ ७ ॥
खूणगांठ बांधोनि । बाळ निघाला तेथोनि ।
सत्वर काढिले शोधोनि । परमहंस ॥ ८ ॥
दुरूनि ध्यान पाहिलें । तंव अष्टभाव दाटले ।
मग देहासी लोटिलें । सद्‌गुरुचरणी ॥ ९ ॥
कंठ सद्‌गदित झाला । प्रेमपान्हा नयनी आला ।
सर्वांगीं रोम थरारला । कृपाकटाक्षें ॥ १० ॥
सहस्रबाण सोडिले जरी । न मरे वासना आसुरी ।
कृपाकटाक्षें एके शरीं । सहकुटुंबे निमालीं ॥ ११ ॥
दशेंद्रियांसहित मन । सोडोनि बाह्य विषयस्फुरण ।
सद्‌गुरुपदांसी आकलन । कराया धांवले ॥ १२ ॥
परि झालें विपरित । गुरुपदींच लीन होत ।
आपलेपण विसरोनि जात । ऊर्मीची धांव खुंटली ॥ १३ ॥
जैसे मीन चहूं दिशीं । ग्रासूं धांवती गळासी ।
तंव ते गळचि गुंतविती तयांसी । बाह्यगति रोधोनि ॥ १४ ॥
तैशीं इंद्रियें लीन झालीं । गुरुपदें गुंतोनि गेलीं ।
विषयग्रहणीं खुंटली । गति ज्यांची ॥ १५ ॥
चंचलत्व मनाचें गेलें । अनन्यत्वें चरण वंदिले ।
हस्त जोडोनि उभे ठेले । दृष्टी नम्र जाहली ॥ १६ ॥
तुकाराम आनंदमूर्ति . ज्ञानदृष्टीं पाहती ।
जाणोनि अंतर्बाह्यस्थिति । कार्यकर्ता सिद्धपुरुष ॥ १७ ॥
लोकव्यवहार कारण । ध्यानीं आणोनिया जाण ।
मौन धरिलें आपण । तुकाईनें ॥ १८ ॥
बाळ बोले जी महाराज । शिकावें वेदशास्त्राचें बीज ।
ऐसे कथिलें मज । कुलगुरूंनीं ॥ १९ ॥
वेदशास्त्रें तीं अपार । अल्पायुषीं न पडे पार ।
भवसिंधु दुर्गम थोर । उतरावा कैसा ॥ २० ॥
सप्रेम बोले तुकाई । गुरुकृपा होतां पाही ।
अज्ञेय नुरे स्वल्पही । ज्ञानरूप होशील ॥ २१ ॥
सहज बोलोनि उत्तरा । चटका लाविला अंतरा ।
सिद्धांच्या लीला अवधारा । कशा असती ॥ २२ ॥
गणपति करी विनवणी । अनुग्रहप्रसाद द्यावा झणीं ।
जेणें भेटेल चक्रपाणी । भवगजपंचानन ॥ २३ ॥
अधिकारी ऐसे जाणोनि । राममंत्र दिधला त्यांनी ।
गुरुपरंपरा कथोनि । समाधान केलें ॥ २४ ॥
ती परंपरा ऐसी । आदिनारायण मूळाशीं ।
तो उपदेशी श्रीविष्णूसी । विष्णु उपदेशी हंसातें ॥ २५ ॥
हंसाचा शिष्य ब्रह्मदेव । वसिष्ठ ब्रह्मापासाव ।
ते उपदेशिती रामराव । एकपत्नी एकबाणी ॥ २६ ॥
रामें उपदेशिले रामदास । रामदास उपदेशिले कल्याणास ।
कल्याणें बाळकृष्णास । कृपाप्रसाद अर्पिला ॥ २७ ॥
चिंतामणि जाहले तेथूनि । रामकृष्णही वदती कोणी ।
तुकारामा भगवद्भजनीं । रामकृष्णें लाविलें ॥ २८ ॥
तयापासोनि ब्रह्मचैतन्य । सद्‌गुरु बोधिले आनंदघन ।
परंपरा करितां श्रवण । रामभक्ति जडतसे ॥ २९ ॥
रामदास सामर्थ्यें समर्थ । होवोनि ठेले विख्यात ।
समर्थसंप्रदाय ऐसें वदत । तैंपासोनी ॥ ३० ॥
त्रयोदशाक्षरी रामनाम । वेदशास्त्राहूनि परम ।
जेणें पावती विश्राम । साधकजन ॥ ३१ ॥
जें वंदिलें शिवांनी । तेथें मानावा कोण गणी ।
सद्‌भावें ठेवितां ध्यानीं । रामभेटी होतसे ॥ ३२ ॥
साह्य करी हनुमंत । दुष्टांनिंदकां निवारित ।
भजनीं सदा प्रेम देत । आशीर्वाद संतांचा ॥ ३३ ॥
अनंतजन्मींचें भाग्य । असेल तरीच घडे हा योग ।
ना तरी संसृतीचा भोग । सुटेना कीं ॥ ३४ ॥
असो ऐसा अनुग्रह झाला । गणपतिहृदयीं बिंबला ।
बहुतांचे उपयोगा आला । भवसिंधु तराया ॥ ३५ ॥
पुन्हां धरिलें मौन । रानींवनीं करिती भ्रमण ।
गणपति सोडीना चरण । सदा सन्निध वास करी ॥ ३६ ॥
देहाची कींव सांडिली । गुरुसेवा आदरिली ।
चरणीं वृत्ति लिगडली । लोहचुंबकासारखी ॥ ३७ ॥
गुरुसेवा अति गहन । गहन तितुकी सधन ।
देहाचें करोनि उपकरण । मन मुरडिलें सेवेकडे ॥ ३८ ॥
एके दिनीं मिळे अन्न । एके दिनीं उपोषण ।
तृष्णा क्षुधा हें बंधन । तोडिलें मर्त्यलोकींचें ॥ ३९ ॥
वस्त्रप्रावरण आकाश । तृण भूमि शय्येस ।
ज्ञानज्योतीचा प्रकाश । तेणें कष्ट न वाटे ॥ ४० ॥
जिकडे गुरु धांवती । तिकडे धांवावे शीघ्रगती ।
झाडोनि ठेविती क्षिती । बैसावयाकारणें ॥ ४१ ॥
गुरु बैसलियावरी । प्रेमभरें चरण चुरी ।
मौन धरिलें बाहेरीं । अंतरीं ध्यान श्रीगुरूंचें ॥ ४२ ॥
श्रीगुरु हेचि प्रंचप्राण । गुरुआज्ञा वेदवचन ।
तयावांचोन आन स्थान । न देखे तिळभरी ॥ ४३ ॥
गुरुहूनि आन दैवत । न देखे त्रिभुवनांत ।
धन्य धन्य गुरुपूत । देव धांवती दर्शना ॥ ४४ ॥
सोडोनिया विषयगुंती । इंद्रियें गुरुसेवेकडे धांवती ।
सेवेवांचोनि अन्यप्रवृत्ति । गोड न वाटे ॥ ४५ ॥
कमल एक भुंगे अनेक । सर्वत्र धांवती तात्कालिक ।
इंद्रियभ्रमर वेगें अधिक । धांवती गुरुपदाब्जीं ॥ ४६ ॥
मन चंचल अनिवार । परि रिघालें सद्‌गुरुघर ।
चंचलस्थिति गेली दूर । ठायींच उन्मन झालें ॥ ४७ ॥
चित्त चिंती गुरुवर । बुद्धि स्थिर झाली चतुर ।
गेला समूळ अहंकार । परम लीनता बाणली । ४८ ॥
वासना इच्छी चरणरज । तृष्णा धरी सद्‌गुरुकाज ।
अनन्यपण सहजीं सहज । गुरुपदीं जाहलें ॥ ४९ ॥
क्वचित्काळीं सेवा घेती । क्वचित् झिडकारोनि देती ।
दुरुत्तरें बोलोनि पाहती । निष्ठा सच्छिष्याची ॥ ५० ॥
क्वचित् गुणां वानावें । क्वचित् तृणतुल्य करावें ।
हर्षविषादाचे गोवे । घालिती अनेक ॥ ५१ ॥
परि मान ना अपमान । लोभग्रस्त नोहे मन ।
गुरुपदीं गेले रंगोन । रिघाया दुजा ठाव नाहीं ॥ ५२ ॥
धक्के चपेटे मारिती । अहंभूता निवारिती ।
सद्‌गुरु सच्छिष्याप्रति । स्थापिती निजपदावरी ॥ ५३ ॥
अनंत सुकृतांची ठेव । असतांचि गुरुपदें भाव ।
दुर्लभ दुर्लभ, आड माव । ठायीं ठायीं पडतसे ॥ ५४ ॥
सद्‌गुरुवचनी अढळ विश्वास । तोचि साक्षात ब्रह्मरस ।
गुरुपूत म्हणावें तयास । त्रैलोक्यवंद्य ॥ ५५ ॥
गुरुवचनी विकल्प धरी । तो जाण अनधिकारी ।
चौर्यांशी लक्ष फेरी । चुकणार नाही ॥ ५६ ॥
असो सद्‌गुरुसेवा गहन । गणपति करी रात्रंदिन ।
देवादिकां दुर्लभस्थान । उपभोगी जो ॥ ५७ ॥
तुकाराम परमहंस । दुर्गमस्थळीं वनीं वास ।
सेवा कठिण बहुवस । विचारा मनीं ॥ ५८ ॥
ऐसे तुकाराम संत । परमहंस विरक्त ।
अनन्यपणे भगवद्भक्त । निःसंदेही ॥ ५९ ॥
लोकीं वागती वेड्यापरी । 'वेडा तुका' म्हणती सारीं ।
भाविकां नवसा सत्वरी । पावती नित्य ॥ ६० ॥
बहुत लोक दर्शना येती । कोणासवें न बोलती ।
बोलिल्या अर्थव्युत्पत्ति । प्राकृता न कळेचि ॥ ६१ ॥
कोठेंही फिरत असावे । श्वान-बालकासींच खेळावें ।
कोठेंही खावें जेवावें । बंधन नाही ॥ ६२ ॥
नानापरींचे नवस । नागरिक बोलती तुकयास ।
शीघ्र पावे तयांस । संकटकाळीं ॥ ६३ ॥
पुत्रप्राप्तीची हांव जया । त्या नवस करिती बाया ।
म्हणती मजला पुत्र झालिया । तुक्याकरवीं कान टोचूं ॥ ६४ ॥
कोणाची मुलें न वांचती । ते नाककान टोंचविती ।
काकुळतीनें शरण येती । पुत्र वाचूं दे आमुचा ॥ ६५ ॥
व्याधिग्रस्त कितीएक । मानसिक कामना अनेक ।
पुरवोनि दाविती कौतुक । चमत्कृति जगामाजीं ॥ ६६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय चवथा
समास चवथा



सद्‌गुरु श्रीतुकाराम । उपदेशिती भक्त परम ।
अनंत पावती विश्राम । तुकाईपाशी ॥ १ ॥
शाहाण्यासी अंतर न देत । भाविकांसी सफल होत ।
अनन्यासी तारित । भवसिंधुपासोनि ॥ २ ॥
विकल्पी विकल्प करिती । मूर्ख लोक वेड्या भजती ।
मत्सर निंदा आपुले मतीं । करिती कितीएक ॥ ३ ॥
एकदां एक चमत्कार । झाला तो करूं विस्तार ।
गोचरस्वामी उंबरखेडकर । गुरुबंधु तुकाईचे ॥ ४ ॥
गोचर म्हणाया कारण । धेनूपरि अन्नग्रहण ।
हस्तस्पर्श न करिती जाण । मुखानें आहार करिती ते ॥ ५ ॥
परम विरक्त संन्यासी । परि सगुणोपासना आनंदेसीं ।
मठीं राहती सुखेंसी । मुमुक्षुजनां बोधाया ॥ ६ ॥
एके समयीं ऐसें झाले । मठीं ब्राह्मण भोजना बैसले ।
कर्मठपणें भरीं भरले । अंतरस्थिति नेणती ॥ ७ ॥
गोचरस्वामी भक्त परम । प्रसाद देवादिकां दुर्गम ।
तंव पावले तुकाराम । अकस्मात त्या ठायीं ॥ ८ ॥
स्वामींस झाला आनंद । धांवोनि धरिले पद ।
विनविती सेवावा प्रसाद । परमानंदें ॥ ९ ॥
उभयतांही गुरुभक्त । विवेकीं ज्ञानी विरक्त ।
भेटीचा आनंद येथ । वर्णितांही पुरेना ॥ १० ॥
एखादा विदेशी नर । पाहे भिन्न आचार ।
देशबंधु मिळतां निर्धार । औदासिन्य मावळे ॥ ११ ॥
तैसे जगीं संत वर्तती । परि अंतर कोणी नोळखती ।
ओळखीऐसी भेटतां जाति । सहज प्रेम उफाळे ॥ १२ ॥
बैसविले अत्याग्रहें । वाढावयाची चालली घाई ।
विप्र म्हणती हें काई । स्वामी आरंभिलें ॥ १३ ॥
येर येरांकडे पाहती । हळूंच नेत्रें खुणाविती ।
भ्रष्ट तुका आला विप्र म्हणती । नाकें मोडूं लागले ॥ १४ ॥
स्वामींचे भिडे बोलवेना । आणि धीरही धरवेना ।
द्विज तामसी जाणा । मनीं जाहले संतप्त ॥ १५ ॥
म्हणती हा वेडा तुका । आचारभ्रष्ट असे निका ।
भटकतो रानीं वनीं देखा । कर्महीन ॥ १६ ॥
केवळ जातीचा ब्राह्मण । न करी संध्यावंदन ।
स्वामी जाणते ज्ञानघन । परि आजीं वेडावले ॥ १७ ॥
ऐसा मनीं विकल्प आला । नोळखिती ब्रह्मपदाला ।
श्रींनी भाव जाणिला । उठोनि गेले ॥ १८ ॥
तुका गेला बरें झालें । औषधाविना नायटे गेले ।
आतां सुग्रास अन्न वहिलें । जेवूं आकंठपर्यंत ॥ १९ ॥
आनंद मनीं मानिती । स्वामी सकळही जाणती ।
अनुभव येईल तयांप्रति । साधुनिंदेचा ॥ २० ॥
तंव झाला चमत्कार । पक्वान्नासी सुटलें नीर ।
किडे बुजबुजले फार । पात्रांमाजी ॥ २१ ॥
आश्चर्य करिती सारे । आजि आमुचें दैव न बरें ।
स्वामींसी कथिती त्वरें । अशुभवार्ता ॥ २२ ॥
स्वामी वदती तयांप्रती । तुम्ही विकल्प आणिला चित्तीं ।
तोचि फळा आला निश्चितीं । करावे तैसें भरावें ॥ २३ ॥
तुकाराम साधु भला । परमहंसपद पावला ।
त्याचा तुम्हां वीट आला । म्हणोनि ऐसें जाहलें ॥ २४ ॥
ज्यानें स्वधर्म जाणला । जाणोनि स्वस्वरूपाला ।
तदाकार होवोनि ठेला । त्यासी म्हणतां अपवित्र ॥ २५ ॥
ब्रह्म जाणे तो ब्राह्मण । ऐसें वेदश्रुतीचें वचन ।
तुम्ही सांगा कांही खूण । अल्पस्वल्प ॥ २६ ॥
जो ब्रह्मानंदी निमग्न । भूतीं भाव नसे भिन्न ।
तयासि लावितां दूषण । विरक्त निःसंदेही ॥ २७ ॥
जें अगोचर वेदांसी । तेंचि गोचर जयासी ।
कर्मबंधन नसे त्यासी । सत्य सत्य ॥ २८ ॥
जो ब्रह्मानंदी तल्लीन । त्याचीं कर्में करायालागोन ।
ऋषि ठेविले स्थापोन । भगवंतांनी ॥ २९ ॥
जो श्रेष्ठ समबुद्धि । आपपर भाव नसे कधीं ।
देह चाले सहजसमाधीं । मध्यें जयाचा ॥ ३० ॥
ऐसा जो भगवद्भक्त । परमहंस परम विरक्त ।
तुमचे मनीं विकल्प प्राप्त । अज्ञानें जाहला ॥ ३१ ॥
जया अज्ञेय नसे कांहीं । अंतर्भाव जाणोनि जिहीं ।
चमत्कृति दावाया पाहीं । उठोनि गेले ॥ ३२ ॥
तुम्ही जावोनि सत्वरी । विनवोनि आणा पात्रावरी ।
मग सुखें भोजनें बरीं । सुग्रासेंसी करावी ॥ ३३ ॥
विकल्प आणिला मनांत । म्हणोनि मानूं नका किंत ।
साधु क्षमा मूर्तिमंत । जगाची माय ॥ ३४ ॥
स्वामींचे वचन प्रमाण । मानोनिया विप्रगण ।
धुंडिती सकळही वन । सत्वरेंसी ॥ ३५ ॥
तंव पाहिले अकस्मात । धांवोनि चरण धरित ।
अन्याय झाला बहुत । क्षमा करीं महाराजा ॥ ३६ ॥
अल्पबुद्धि जन आम्ही । विकल्प आला जी स्वामी ।
क्षमा करोनि चला धामीं । भोजन आम्हां घालावें ॥ ३७ ॥
उठते झाले हास्यवदनीं । तुकाराम सिद्ध ज्ञानी ।
बैसले मठीं जाऊनि । आनंदी आनंद बहु केला ॥ ३८ ॥
गोचरस्वामी आणि शेवाळकर । दोघे गुरुबंधु साचार ।
भक्त अनेक किंकर । लागती श्रीचरणीं ॥ ३९ ॥
दत्त उपास्य दैवत । संप्रदाय श्रीएकनाथ ।
ऐक्यरूप होवोनि वर्तत । असती जगामाजीं ॥ ४० ॥
आशंका घेतील कोणी । नाथसंप्रदाय म्हणोनि ।
तरी परिसावी कहाणी । झाली कैसी ॥ ४१ ॥
चिंतामणिबुवा संत । होते पूर्वीं दत्तभक्त ।
विठ्ठलचैतन्य तयां वदत । होते पूर्वीं गृहस्थाश्रमीं ॥ ४२ ॥
संन्यासग्रहणाचे वेळी । भेटली बाळकृष्ण माऊली ।
रामउपासना तेव्हां दिली । चिंतामणि गुरुनाम ॥ ४३ ॥
तैंपासोनि उपासना । दोनी चालविल्या जाणा ।
तुकारामें दत्तउपासना । बहुतांस दिली ॥ ४४ ॥
सद्‌गुरुकारणें केवळ । ठेव होती जी जवळ ।
रामभक्त जाणूनि निश्चळ । हातीं दिली ॥ ४५ ॥
तिघे गुरुबंधु जे कां । वडील मानिती त्यांतील तुका ।
गोचरस्वामी दुजे देखा । तिजे रावसाहेब शेवाळकर ॥ ४६ ॥
तिघांसी मानिती देवांश । ब्रह्मा विष्णु महेश ।
तुकाराम वैराग्यें उदास । श्मशानवासी म्हणती तया ॥ ४७ ॥
तुकाराम परमहंस विरक्त । गोचरस्वामी संन्यासव्रत ।
रावसाहेब शेवाळकरपंत । गृहस्थाश्रमी ॥ ४८ ॥
तयांची ऐसी साधनपद्धती । विप्रगृहीं पाणी भरिती ।
भगवद्रूप मानोनि अतिथी । भोजन देती अत्यादरें ॥ ४९ ॥
गोचरस्वामी संन्यासी । मठीं राहती नेमेंसी ।
तुकाराम अरण्यवासी । परमहंस म्हणती तयां ॥ ५० ॥
ऐसे तुकाराम संत । गणपति पदें लागत ।
रात्रंदिन सेवा करित । देहासक्ति सांडोनी ॥ ५१ ॥
जें देतील तें खावें । सांगतील तें ऐकावें ।
सदा सन्निध असावें । अनन्यरूप ॥ ५२ ॥
गुरुसेवेची महिमा । वर्णूं न शकेचि ब्रह्मा ।
आड येती अणिमा गरिमा । अष्ट महासिद्धी ॥ ५३ ॥
कामना वासना कल्पना । लोभ मोह लोकेषणा ।
चंचल मन कामेषणा । वित्तेषणा आडवी ॥ ५४ ॥
कुलअहंता ज्ञानअहंता । साधकां नाडिती क्षण न लागतां ।
इतुकियासी मारोनि लाथा । गुरुपदीं रमतसे ॥ ५५ ॥
सालंकार बालकासी । तस्कर देती खावयासी ।
भुलोनि जातां तयांसरसी । सर्वस्व हरतील ॥ ५६ ॥
पारधी अमिषा दाखवित । फसतां पाशीं गोंवित ।
सच्छिष्य गुरुपदांकित । आन नेणें ॥ ५७ ॥
इंद्रराज्य आलें हातां । अथवा हरि होय प्रार्थिता ।
तरी सद्‌गुरुवांचोनि तत्वतां । आवड नसे लोकत्रयीं ॥ ५८ ॥
हीनाहून हीन व्हावें । तैं गुरुभक्ति दुणावे ।
मन चित्सुखे भोगावें । सर्वकाळ ॥ ५९ ॥
नीच सेवा गुरुगृहीं । निरहंकार करितां पाहीं ।
जगीं दुर्लभ नसे कांही । जगद्वंद्य ॥ ६० ॥
पूर्वपुण्याची असे ग्रंथी । तरीच घडे गुरुभक्ति ।
गुरुभक्तीची महती । वर्णिली न वचे ॥ ६१ ॥
गुरुवचन तो वेदांत । गुरुसेवा हा धादांत ।
गुरुकृपा तोचि सिद्धांत । गुरुपुत्रासी ॥ ६२ ॥
प्रस्तुत गुरुशिष्यांचे बंड । वाढलें बहुत पाखांड ।
ज्ञान नीति श्रद्धा जाड । एक उणें एक पुरें ॥ ६३ ॥
संदेहरहित सद्‌गुरु । निरहंकारी शिष्यवरु ।
वेदप्रणीत साधनाचारु । त्रिवेणीसंगम अपूर्व हा ॥ ६४ ॥
समुद्रामाजीं लवणोदक । धात्रीफळ पर्वतीं देख ।
चतुरें करितां एक । गोडी होत अपूर्व ॥ ६५ ॥
परि सद्‌गुरु भेटे विरळा । मिळतां शिष्य गोंवळा ।
मग सर्वही घोटाळा । अनेक जन भांबावती ॥ ६६ ॥
अर्धहळकुंडे पिवळे झाले । साधन सांडून गुरु बनले ।
मग आल्या संचितासी मुकले । महंतीमुळें ॥ ६७ ॥
अज्ञानी जीव स्तुति करिती । साधकां त्वरें नाडिती ।
जोंवरी नसे आत्मप्रचीति । तोंवरी महंती न धरावी ॥ ६८ ॥
महंतीनें सुख वाटे । वर्म काढितां दुःख मोठें ।
अंतरीं असमाधान कांटे । अहंतेचे टोंचती ॥ ६९ ॥
ऐसी महंतांची दशा । पाहतां येतसे हंशा ।
प्रेमतंतूचा वळसा । तुटोनि गेला ॥ ७० ॥
याकारणें निःसंदेह स्थिति । जोंवरी न ये आत्मप्रचीति ।
तों न धरावी महंती । वाटमारू ॥ ७१ ॥
सिद्धि महंती अहंता । साधकां नाडिती जातां येतां ।
अधोगतीस तत्वतां । नेऊनि घालिती ॥ ७२ ॥
याकारणें अंतरी । सावध असावें चतुरीं ।
स्वयें चुकवावी फेरी । जन्ममृत्युची ॥ ७३ ॥
अज्ञजनीं स्तोत्र केलें । तेथें काय हातां आलें ।
तेचि निंदतील भले । सावध असावें ॥ ७४ ॥
असो गणपति अति दक्ष । गुरुपदीं सदा लक्ष ।
गुरुकृपेवांचून पक्ष । दुजा नाहीं ॥ ७५ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ७६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते चतुर्थाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


GO TOP