श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय चौसष्टावा
धृतराष्ट, गांधारी, कुंती वगैरेंचा शेवट
श्रीगणेशाय नम: ॥
आदिपुरुषा दत्तात्रेया ॥ श्रीमद्धीमातटविलासिया ॥
ब्रह्मानंदा यतिवर्या ॥ सद्गुरुराया सुखाब्धे ॥ १ ॥
सच्चिदानंदा नीलगात्रा ॥ कमलोद्भवजनका शतपत्रनेत्रा ॥
सनकादिवंद्या त्रिनेत्रमित्रा ॥ सुत्रामा सदा ध्यातसे ॥ २ ॥
स्वर्धुनी उद्भवली चरणीं ॥ आम्नाय गाती दिनरजनीं ॥
हृदयमांदुसेंत विद्वजनीं ॥ ठेविला अससी प्रेमभरें ॥ ३ ॥
मत्स्यरूपिया वेदोद्धारका ॥ कमठरूपा सृष्टिपालका ॥
द्विजांवरी क्षमा धरिली देखा ॥ प्रर्हादरक्षका नरहरे ॥ ४ ॥
दानवमोहना बलिबंधना ॥ क्षत्रियांतका जामदग्न्या ॥
अयोध्यापति दशमुखमर्दना ॥ कंसांतका मुरारे ॥ ५ ॥
कारुण्यवेषधारका ॥ कुतर्कयवनसंहारका ॥
पुरुषोत्तमा द्वारकानायका ॥ पंढरीशा परात्परा ॥ ६ ॥
धरणिजोद्भव आत्मजजात ॥ त्यांत उत्पन्न त्यांत राहात ॥
त्याचे तनयेचा कांत ॥ प्रसन्न हो कां सर्वदा ॥ ७ ॥
तव कृपेच्या बळें यथार्थ ॥ संपला हा पांडवप्रताप ग्रंथ ॥
आश्रमवासिक पर्व येथ ॥ कळसाध्यायीं कथियेलें ॥ ८ ॥
अश्वमेध जाहला संपूर्ण ॥ जनमेजयास म्हणे वैशंपायन ॥
धर्में न्यायनीतींकरून ॥ चौपन्न वर्षें राज्य केलें ॥ ९ ॥
यावरी अहोरात्रीं ॥ भीम धृतराष्ट्राचा द्वेष करी ॥
पूर्व वैर आठवून अंतरीं ॥ कौरवीं जें जें केलें तें ॥ १० ॥
म्हणे हा वृद्ध तत्त्वतां ॥ मज मारावया जपत होता ॥
तें समजले द्वारकानाथा ॥ तेणें तेव्हां वाचविले ॥ ११ ॥
लोहप्रतिमा निर्मिली ॥ ते या वृद्धास भेटविली ॥
येणें रगडून चूर्ण केली ॥ मग अनुताप उपजला ॥ १२ ॥
म्यां या भुजबळेंकरून ॥ याचे पुत्र मारिले आपटून ॥
येणेच आम्हांस जाचिलें पूर्ण ॥ जाहला दीन आतां हा ॥ १३ ॥
धृतराष्ट्र गांधारी जाण ॥ ऐकोन भीमाचीं वचनें तीक्ष्ण ॥
म्हणती आतां द्यावा प्राण ॥ परी हें आमुचेन सोसवेना ॥ १४ ॥
आंतचेआंत चडफडती ॥ धर्मासी कदा न सांगती ॥
दोघेंही अन्न त्यजिती ॥ उपवास करिती सर्वदा ॥ १५ ॥
दिलें सर्व सुख सोडून ॥ तृणासनीं करिती शयन ॥
पुत्रांचे दुःख आठवून ॥ क्षणक्षणां आरंबळती ॥ १६ ॥
दर्शना आला धर्मराज देख ॥ उभयांचे चरणीं ठेवी मस्तक ॥
इच्छिले पदार्थ सकळिक ॥ क्षणक्षणां पुरवीतसे ॥ १७ ॥
धृतराष्ट्र होऊनि दीन ॥ धर्माप्रति बोले वचन ॥
मी सेवितों आतां तपोवन ॥ समाधान तेणें मज ॥ १८ ॥
धर्म म्हणे पितया जाण ॥ तूं जाशील जरी सदनांतून ॥
तरी मी देईन आपुला प्राण ॥ किंवा येईन तुझ्या संगे ॥ १९ ॥
तूं जातां वनाप्रती ॥ मज परत्रींचे लोक हांसती ॥
मी राज्य नेघें निश्चितीं ॥ सेवक सांगातीं होईन ॥ २० ॥
सत्यवतीहृदयरत्न ॥ धर्मास सांगे येऊन ॥
तपा जाऊं दे अंबिकानंदन ॥ तेणेंकरून उद्धार तयाचा ॥ २१ ॥
संग्रामीं पडावा क्षत्री ॥ किंवा तप आचरोन अहोरात्रीं ॥
देह ठेवावा धरित्रीं ॥ स्वर्धुनीचे तीरीं जाण ॥ २२ ॥
मग सर्व प्रजा आणोन ॥ धृतराष्ट्रें तयांस पुसोन ॥
धर्माचें करी समाधान ॥ नीति सांगितली बहुतचि ॥ २३ ॥
अपार दानें ते वेळां ॥ धृतराष्ट्रें दिधलीं याचकांला ॥
द्रव्य गज घोडे गायी सकलां ॥ ब्राह्मणांस देतसे ॥ २४ ॥
आपुल्या ज्या सर्व संपत्ती ॥ त्या वेंचिल्या विप्रांहातीं ॥
भीष्मश्राद्ध करून प्रीतीं ॥ आणीकही तिथी वडिलांच्या ॥ २५ ॥
धृतराष्ट्र जातो जाणोन ॥ कौरवस्त्रिया आल्या धांवोन ॥
पांडवललना मिळोन ॥ खेद करिती त्यालागीं ॥ २६ ॥
यावरी वसुदेवभगिनी ॥ कुंतीही निघाली तये क्षणीं ॥
धर्मास सांगे प्रीतीकरूनी ॥ नकुळसहदेवां पाळिजे ॥ २७ ॥
हे घेतील जे जे आळी ॥ ते ते त्वां वडिलें पुरविजे सकळी ॥
कर्णवीराचीं श्राद्धें सकळीं ॥ करीत जाई धर्मा तूं ॥ २८ ॥
वृषकेत नेणते बाळ ॥ याचा करीं बरवा सांभाळ ॥
कष्टी जाहली द्रौपदी वेल्हाळ ॥ पुत्रशोकेंकरोनियां ॥ २९ ॥
धर्मा इचें मन समाधान ॥ रक्षीत जाई अनुदिन ॥
मी वडिलासांगातीं जात्यें जाण ॥ सेवा वनीं करावया ॥ ३० ॥
पांचही कुमार सद्गद होउनी ॥ लागती तेव्हां पृथेचे चरणीं ॥
हें राज्य तुझें टाकूनी ॥ कां हो जननि जातेस ॥ ३१ ॥
तुझे मनीं ऐसें होतें ॥ तरी कां वनाहूनी आणिलें आम्हांतें ॥
सुभद्रा द्रौपदी रडत तेथें ॥ कुंती त्यांतें सांवरित ॥ ३२ ॥
धृतराष्ट्र म्हणे कुंति अवधारीं ॥ तूं राहें आपुले मंदिरीं ॥
परी ते नायके निर्धारीं ॥ निश्चय न सोडी सर्वथा ॥ ३३ ॥
धृतराष्ट्र कुंती गांधारी ॥ विदुर निघाला झडकरी ॥
आकांत करिती सकल नारी ॥ देह गेह नाठवे तयां ॥ ३४ ॥
गायीविण वत्सें दीन ॥ तैसे दिसती पंडुनंदन ॥
कौरवपांडवस्त्रिया परतोन ॥ शोक करित सदना गेल्या ॥ ३५ ॥
ते दिवशीं भागीरथी ॥ तीरीं जाऊन सर्व राहती ॥
संजय आणि ब्राह्मण निघती ॥ घेऊन राजअग्निहोत्र ॥ ३६ ॥
धर्मास आशीर्वाद देऊन ॥ परतविला घालोनि आण ॥
अंध म्हणे पुत्रा तूं पुण्यपरायण ॥ राज्य चालवीं नीतीनें ॥ ३७ ॥
यावरी वृद्धांस नमून ॥ पांडव घालिती प्रदक्षिण ॥
खेद करीत परतती तेथोन ॥ स्फुंदत जाती गजपुरा ॥ ३८ ॥
विरस दिसे हस्तनापुर ॥ सभा भणभणित समग्र ॥
कौरवांचीं मंदिरे सुंदर ॥ ओस सर्व पडियेलीं ॥ ३९ ॥
उत्तरपंथें वृद्धें जाती ॥ ऋषींचे आश्रम पाहती ॥
तप करीत शतायु नरपती ॥ तेथें राहती दिवस कांहीं ॥ ४० ॥
वल्कले नेसून समस्तीं ॥ सर्वांगीं चर्चिल्या विभूती ॥
मग व्यासाश्रमाप्रति जाती ॥ शरीरे कृश चौघांची ॥ ४१ ॥
विदुर आणि धृतराष्ट्र ॥ मस्तकीं धरिती जटाभार ॥
उरले अस्थींचे पंजर ॥ कलेवर मात्र दिसतसे ॥ ४२ ॥
धृतराष्ट्राच्या भेटीसी ॥ येती नारदादि सर्व ऋषी ॥
अंबिकासुत पूजी तयांसी ॥ तोयपुष्पफलांनी ॥ ४३ ॥
धृतराष्ट्राचे आयुष्य साचार ॥ उरलें तीन संवत्सर ॥
वृद्धाकारणें युधिष्ठिर ॥ खंती करी गजपुरीं ॥ ४४ ॥
धर्म सर्वदा उदास ॥ राज्य करावया नेघे मानस ॥
जैसा धरिला वेंठीस ॥ तैसें राज्य चालवी तो ॥ ४५ ॥
कीं पाहुणा बैसला घरांत ॥ तो कोठे न घाली चित्त ॥
कीं छायेस बैसला मार्गस्थ ॥ क्षणभरी उगाचि ॥ ४६ ॥
वारिजपत्र असोनि जळीं ॥ कोरडे न भिजे कदाकाळीं ॥
तैसा धर्म हृदयकमळीं ॥ उदास आणि अलिप्त ॥ ४७ ॥
खंती वाटे धर्मालागून ॥ पाहावया वडिलांचे चरण ॥
सेनेसहित पंडुनंदन ॥ निघते जाहले तेधवां ॥ ४८ ॥
सेना चालावया वाट ॥ खणून करिती नीट ॥
वापी कूप तडागें अवीट ॥ करिती उदकप्राशना ॥ ४९ ॥
कौरवपांडवललना ॥ द्रौपदी सुभद्रा त्या क्षणा ॥
नरयानी आरूढोनि जाणा ॥ चालिल्या दर्शना वडिलांच्या ॥ ५० ॥
अठरा जाती व्रजजन ॥ निघाले तेव्हा गाडे करून ॥
कृपाचार्य रथीं बैसोन ॥ निघता जाहला धर्मासवें ॥ ५१ ॥
धर्मावरी धरिलें छत्र ॥ आतपत्र मेघडंबर ॥
मकरबिरुदें अतिसुंदर ॥ पुढें चालती तेजस्वी ॥ ५२ ॥
युयुत्सु धृतराष्ट्रनंदन ॥ गजपुरीं ठेविला रक्षण ॥
धौम्य पुरोहित जाण ॥ तोही ठेविला त्याजवळी ॥ ५३ ॥
द्रौपदी पुढें आधीं देख ॥ तिचे मागें ललना सकळिक ॥
जाती वेत्रपाणी गर्जत सुरेख ॥ सहस्रावधि त्यांपुढें ॥ ५४ ॥
धृतराष्ट्राचा आश्रम जाण ॥ जवळी उरला देखोन ॥
पांडवीं सांडोनि स्यंदन ॥ जाती चरणचालीनें ॥ ५५ ॥
पांचाळीआदि सकळ युवती ॥ चरणीं हंसगती चमकती ॥
सहदेव नकुल पुढें धांवती ॥ पहावया कुंती माउलीतें ॥ ५६ ॥
अत्यंत कृश देखोन ॥ रडती गळां मिठी घालून ॥
धृतराष्ट्रगांधारींचे चरण ॥ धर्मराजें वंदिले ॥ ५७ ॥
कुंतीचे वंदूनि पाय ॥ विदुरास पाहती लवलाहें ॥
तंव तो तपास गेला पाहें ॥ आणिके स्थळी एकांतीं ॥ ५८ ॥
कुंती घट उदकें भरून ॥ येत होती आश्रमालागून ॥
पांडवीं तियेस वंदून ॥ घट आपण घेतला ॥ ५९ ॥
तिघांसी बैसवून ॥ हस्तनापुरींचे सर्व जन ॥
धर्में भेटविले आणून ॥ नाम कर्म सांगोनियां ॥ ६० ॥
धर्मरायास भेटावया ॥ सर्व ऋषी आले धांवोनियां ॥
धर्म शिबिरें उभारोनियां ॥ भोजन देत ऋषींतें ॥ ६१ ॥
न्यून नाहीं तेथें कांहीं ॥ रायाराणीचे सोहळे पाहीं ॥
मग स्त्रियांस लवलाहीं ॥ संजय भेटवी वृद्धांतें ॥ ६२ ॥
नांवें घेऊनि सांगे ते क्षणीं ॥ हे द्रौपदी सुभद्रा श्रीकृष्णभगिनी ॥
हे बभ्रुवाहनाची जननी ॥ चित्रांगी नामें जाणिजे ॥ ६३ ॥
हे उलूपी शेषतनया ॥ हे प्रमिला पार्थभार्या ॥
हे उत्तरा अभिमन्यू जाया ॥ परीक्षितीची माता जे ॥ ६४ ॥
या धृतराष्ट्रा तुझ्या सुना ॥ आल्या सर्व कौरवललना ॥
वृद्धाचिया चरणा ॥ सकळ नमून बैसती ॥ ६५ ॥
सद्गद होऊन पुसे युधिष्ठिर ॥ कोठे आहे वडील विदुर ॥
त्रिकालज्ञानी हरिकृपापात्र ॥ अति चतुर महाराज तो ॥ ६६ ॥
संजय बोले वचन ॥ पैल वृक्षातळीं उदास नग्न ॥
तप करी वायु आकर्घून ॥ जाहला निमग्न निजरूपीं ॥ ६७ ॥
तेथें एकला युधिष्ठिर ॥ पहावया गेला सत्वर ॥
तो जटामंडित नग्न दिगंबर ॥ नेत्र झांकून बैसला ॥ ६८ ॥
देहावरी नाहीं विदुर ॥ धर्में घातला नमस्कार ॥
चरमवृत्ति बाणली साचार ॥ चलनवलन राहिलें ॥ ६९ ॥
धर्म पाहे निरखून ॥ तो विदुर जाहला श्रीकृष्ण ॥
परब्रह्मरूप होऊन ॥ ब्रह्मानंदीं मिळाला ॥ ७० ॥
सद्गदित होऊन युधिष्ठिर ॥ नमून परतला सत्वर ॥
गांधारी कुंती धृतराष्ट्र ॥ तयांजवळी बैसला ॥ ७१ ॥
फलें मूलें भक्षून ॥ पांडव भूमीसी करिती शयन ॥
मृगया दिधली टाकून ॥ पांचही जणीं तेधवां ॥ ७२ ॥
श्वापदे तेथें निर्वैर ॥ रम्य उद्यानी तरुवर ॥
वस्त्रें पादुका कमंडलू अपार ॥ धर्मराज देत ऋषींतें ॥ ७३ ॥
धृतराष्ट्र व माता दोघी जणी ॥ तप करिती कैशीं बैसोनी ॥
पांडव पाहती दुरोनी ॥ तंव वेदव्यास पातला ॥ ७४ ॥
पांडवीं केलें पूजन ॥ व्यास पुसे अंधालागून ॥
पुत्रशोकें तुझें मन ॥ दुःख पावत नाहीं कीं ॥ ७५ ॥
रज आणि तम जाण ॥ केलीं दूर कीं मनांतून ॥
ज्ञानचिन्हें संपूर्ण ॥ सत्त्वबुद्धि असे कीं ॥ ७६ ॥
एक मासपर्यंत ॥ धर्मराज राहिला तेथ ॥
तो ऋषी आले समस्त ॥ व्यासधर्मांस भेटावया ॥ ७७ ॥
तितुकियांचेही पूजन ॥ धर्म करी प्रीतीकरून ॥
यावरी सत्यवतीनंदन ॥ धृतराष्ट्राप्रति बोलत ॥ ७८ ॥
इच्छित असेल माग कांहीं ॥ अंबिकात्मज बोले ते समयीं ॥
पांडवांचा अन्याय नाहीं ॥ किंचितही पाहतां ॥ ७९ ॥
परम कपटी माझे कुमार ॥ पृथ्वी आटून गेले दुराचार ॥
तो गांधारी बोले जोडूनि कर ॥ एक इच्छा पूर्ण कीजे ॥ ८० ॥
मज सकळ सुत आठवती ॥ सुना अवघ्या दुःख करिती ॥
सुभद्रा उत्तरा सती ॥ सदा चिंतिती अभिमन्या ॥ ८१ ॥
द्रौपदी चिंती पंचपुत्र ॥ कुंती पाहूं इच्छी कर्ण वीर ॥
द्रोणभीष्मादि महाशूर ॥ सकळ दाखवीं एकदा ॥ ८२ ॥
व्यास म्हणे अवश्य ॥ मग नेलीं स्वर्धुनीतीरास ॥
व्यासें स्नान करूनि त्यांस ॥ आव्हानिलें तेधवां ॥ ८३ ॥
अठरा अक्षौहिणी पृतना ॥ बाहेर निघाली तये क्षणा ॥
आपुलाले वहनीं जाणा ॥ शतही कौरव आरूढले ॥ ८४ ॥
कर्ण द्रौण गंगाकुमारं ॥ भगदत्त सोमदत्त बाल्हीक वीर ॥
वस्त्रालंकारमंडित समग्र ॥ घवघवित विराजती ॥ ८५ ॥
पुत्रांसह द्रुपद ॥ विराट पुत्रांसह विशद ॥
द्रौपदीचे पंचपुत्र अभिमन्यू सिद्ध ॥ सेनारथसमवेत उभे ॥ ८६ ॥
वाद्यें वाजती अपार ॥ ऐशी सेना निघाली समग्र ॥
धृतराष्ट्रासही दिव्य नेत्र ॥ व्यासें दिधले तेधवां ॥ ८७ ॥
होत अप्सरांचे गायन ॥ रंभा उर्वशी करिती नर्तन ॥
रजनीमाजी संपूर्ण ॥ व्यासें रचना दाखविली ॥ ८८ ॥
दृष्टी उघडून धृतराष्ट्र ॥ प्रीतीनें पाहे पुत्रपौत्र ॥
झळकत असे दिवट्यांचा भार ॥ आणि अपार चंद्रज्योती ॥ ८९ ॥
अठरा अक्षौहिणी दळ पाहीं ॥ निर्वैर उभें एके ठायीं ॥
मग परस्परें सर्वही ॥ भेटते जाहले आदरें ॥ ९० ॥
कर्णाचे तेव्हां चरण ॥ धर्मराज धरी धांवोन ॥
कौरवांसी आलिंगन ॥ पांचही देती आदरें ॥ ९१ ॥
अभिमन्यादि पंचकुमार ॥ सर्वांस भेटती मनोहर ॥
माता आलिंगी कुमार ॥ एकी भ्रतारा वंदिती ॥ ९२ ॥
बंधूस बंधू अति प्रीतीं ॥ विराट द्रुपद भेटती ॥
भीष्म द्रोण आलिगिती ॥ पांडवांस आदरें ॥ ९३ ॥
कुंती भेटत कर्णा ॥ गांधारी आलिंगी शंतनुनंदना ॥
अरुणोदयपर्यंत रचना ॥ व्यासें अद्भुत दाविली ॥ ९४ ॥
सवेंच भागीरथीजीवनीं ॥ सेनाभार गुप्त जाहला ते क्षणीं ॥
बाहेर आला व्यासमुनी ॥ म्हणे सर्वांस पाहिलें का ॥ ९५ ॥
धृतराष्ट्र म्हणे गुरुराया ॥ कां सेना नेली जी विलया ॥
जैसें स्वप्न दावूनियां ॥ जागे जाहलिया मिथ्या तें ॥ ९६ ॥
मग जगद्गुरू बोले हास्यमुख ॥ हें ऐसेंच आहे क्षणिक ॥
आतां सोडीं माया भोगीं सुख ॥ कैवल्यधामा जाउनी ॥ ९७ ॥
सकल स्त्रियांस सांगे व्यास ॥ जरी भ्रतारापाशी असेल मानस ॥
तरी करा गंगाप्रवेश ॥ पावा परत्रास परलोकी ॥ ९८ ॥
मग कौरवस्त्रिया सर्वही ॥ गंगाप्रवेश करिती ते समयीं ॥
दिव्यरूपें लवलाहीं ॥ परत्रीं पतीस पावल्या ॥ ९९ ॥
इकडे जनमेजयास हे कथा ॥ वैशंपायन सांगे तत्त्वतां ॥
व्यासदेव समर्थ आतां ॥ सर्पसत्रा आला असे ॥ १०० ॥
जनमेजय वंदोनि व्यासचरण ॥ म्हणे तुझा महिमा ऐकिला पूर्ण ॥
मृत्यु पावले जे जे जाण ॥ ते ते सर्वदाखविले ॥ १०१ ॥
तरी माझा पिता परीक्षिती ॥ तो दाखवीं स्वामी मजप्रती ॥
व्यासें आव्हानून चित्तीं ॥ जनमेजयास भेटविला ॥ १०२ ॥
जाहलियावरी एक मुहूर्त ॥ सवेंच जाहला परीक्षिति गुप्त ॥
आस्तिकऋषि स्तवन करित ॥ जनेमजयाचें तेधवां ॥ १०३ ॥
धन्य धन्य नृपनाथ ॥ धन्य धन्य पराशरसुत ॥
परीक्षिति पावला जो मृत्य ॥ तो आणून तुज भेटविला ॥ १०४ ॥
जनमेजय म्हणे वैशंपायना ॥ पुढें सांग कथेची रचना ॥
व्यासाश्रमीं अबिकानंदना ॥ सर्वही मृत भेटविले ॥ १०५ ॥
वैशंपायन म्हणे कुरुकुलावतंसा ॥ सर्पसंहारका पुण्यपुरुषा ॥
पुसोनियां वेदव्यासा ॥ ऋषी गेले स्वस्थाना ॥ १०६ ॥
धृतराष्ट्र म्हणे पंडुनंदना ॥ अजातशत्रु सद्गुणनिधाना ॥
तुजपासून मी सर्वज्ञा ॥ सुख पावलों अपार ॥ १०७ ॥
तूं ज्ञानगंगेचा लोट ॥ तूं परमार्थाचा क्षेममुकुट ॥
स्वानंदवैरागरींचा अवीट ॥ दिव्य हिरा धर्मा तूं ॥ १०८ ॥
तूं शांतीचें उद्यान थोर ॥ तूं औदार्यसत्त्वसरोवर ॥
सोमवंशाचा साचार ॥ विजयध्वज धर्मा तूं ॥ १०९ ॥
माझा क्रोध गेला पूर्ण ॥ धर्मा तुझें हो कल्याण ॥
आतां तुम्हीं जावें येथून ॥ सहपरिवारे गजपुरा ॥ ११० ॥
तुम्ही असतां येथ ॥ तप वृद्धि न पावे यथार्थ ॥
माझी मनकामना सर्व तृप्त ॥ तुवां केली पुत्रराया ॥ १११ ॥
धर्म म्हणे मी तुझी सेवा करीन ॥ येथेंच सदा राहीन ॥
सेना सर्व देतों धाडून ॥ तप करीन तुजपाशीं ॥ ११२ ॥
धृतराष्ट्र तेव्हां म्हणत ॥ तरी राज्य बुडेल क्षणांत ॥
तैसेंच कुंती सांगत ॥ धर्मा येथें राहों नको ॥ ११३ ॥
सहदेव बोले वचन ॥ मी कुंतीमातेची सेवा करीन ॥
तंव ती म्हणे पुत्रा जाई येथोन ॥ नाहीं कारण तुझें येथें ॥ ११४ ॥
तपास क्षय न करीं येथ ॥ आमुचें आयुष्य उरलें किंचित ॥
पांचही पुत्रांस आलिंगित ॥ धृतराष्ट्र कुंती गांधारी ॥ ११५ ॥
पांचही पांडव सद्गदित ॥ नयनीं टपटपां अश्रु ढाळित ॥
वडिलांची मुखें न्यहाळित ॥ काय बोलत तेधवां ॥ ११६ ॥
तुमचें दर्शन यावरी ॥ दुर्लभ वाटतें अंतरीं ॥
मग चरण वंदोनि झडकरी ॥ गजपुरास परतले ॥ ११७ ॥
पांचाळी सुभद्रा कामिनी ॥ वडिलांस वंदूनि ते क्षणीं ॥
सुखासनीं आरूढोनी ॥ जात्या जाहल्या तेधवां ॥ ११८ ॥
धर्म पावला स्वस्थाना ॥ चित्तास स्वस्थता वाटेना ॥
हेंच सदा आवडे मना ॥ जावें वना वडिलांपाशीं ॥ ११९ ॥
ऐसा लोटला एक संवत्सर ॥ तीं आला नारद मुनीश्वर ॥
तयास पुसे युधिष्ठिर ॥ वडिलें आमुचीं सुखी कीं ॥ १२० ॥
नारदमुनी सांगत ॥ गंगाद्वारीं तप करित ॥
दोघी माता आणि अंबिकासुत ॥ शुष्क बहुत जाहलीं ॥ १२१ ॥
अस्थींवरी त्वचा जाण ॥ उरली असे जाहलीं क्षीण ॥
डोळा उरले त्यांचे प्राण ॥ हिमाचल कठिण बहु ॥ १२२ ॥
योगबळेंकरोनि विदुर ॥ निजधामा गेला साचार ॥
ब्रह्मानंदीं निरंतर ॥ सुखरूप राहिला ॥ १२३ ॥
इकडे गंगाद्वारीं निराहारी सकळें ॥ मासांतीं एकदां भक्षिती फळें ॥
तेणें शरीरीं क्षीणत्व आलें ॥ जातां पाउले नुचलती ॥ १२४ ॥
एकदां गंगेत स्नान करून ॥ कुंती गांधारी अंबिकानंदन ॥
आश्रमास येतां जाण ॥ मंद प्राण जाहले ॥ १२५ ॥
तंव तो उष्णकाळ दारुण ॥ वनीं चेतला थोर अग्न ॥
मोठे वृक्ष जाती जळोन ॥ प्रभंजनही सूटला ॥ १२६ ॥
निराहार कृश बहुत ॥ पळवेना पायांस तिडी पडत ॥
अग्नि संनिध देखोन म्हणत ॥ संजया त्वरें जा आतां ॥ १२७ ॥
आम्हा येथें आलें मरण ॥ आतां तूं जाई वेगेकरून ॥
मग तो तत्काळ तेथून ॥ ऋषिमंडळींत पातला ॥ १२८ ॥
तंव तीं वृद्धे तिघें ते काळीं ॥ पूर्वमुख उभी ठाकलीं ॥
कृष्णा गोविंदा हरि वनमाळी ॥ उच्चारिती तेधवां ॥ १२९ ॥
योगबळें अवरोधून ॥ तिघांनीं तेथें सोडिला प्राण ॥
तो इतक्यांत पातला अग्न ॥ तिघें जणें जळाली ॥ १३० ॥
धृतराष्ट्राचे अग्निहोत्र ॥ आश्रमांत होतीं कुंडे पवित्र ॥
तोच हा अग्नि चेतला सत्वर ॥ समीरगति करोनियां ॥ १३१ ॥
शरीरे गेली दग्ध होऊन ॥ नारद म्हणे मी आलों पाहून ॥
धर्मराया तूं सर्वज्ञ ॥ सर्वथा शोक करूं नको ॥ १३२ ॥
तीं उत्तम गतीस पावलीं ॥ धर्में ऐकोन हांक फोडिली ॥
बंधूंसहित तये वेळीं ॥ शोकार्णवीं पडियेला ॥ १३३ ॥
अंतःपुरांत हांक गाजली ॥ स्त्रियासहित पांचाळी ॥
शोकाग्नीनें आहाळली ॥ पृथादेवी आठवूनियां ॥ १३४ ॥
धर्म म्हणे राज्य जावो जळोन ॥ वृद्धे वनीं गेलीं दग्ध होऊन ॥
अनाथ अत्यंत दीन ॥ समयीं कोणी नाहीं तेथें ॥ १३५ ॥
म्हणे हा अग्नि कृतघ्न ॥ पार्थें दिधलें खांडववन ॥
अश्वमेध राजसूय यज्ञ ॥ करोनि अग्नि तोषविला ॥ १३६ ॥
धिग् मैत्री धिग् अग्नी ॥ माझी वृद्धे मारिलीं जाळोनी ॥
नकुळ सहदेव हांक फोडूनी ॥ कुंतीलागीं बाहती ॥ १३७ ॥
अहा पृथा माउली ॥ माद्री नाहीं आठवू दिली ॥
अहा वनीं जळोन गेली ॥ धिग् पुत्रधर्म आमुचा ॥ १३८ ॥
धर्माचे गळां मिठी घालून ॥ शोक करिती माद्रीनंदन ॥
नारद करी समाधान ॥ लौकिकाग्नि नव्हे तो ॥ १३९ ॥
इष्टि जाहलियावरी तोच अग्न ॥ गेला जाळितचि कानन ॥
उत्तम त्यांस जाहलें मरण ॥ सोडिले प्राण योगबळें ॥ १४० ॥
आपुल्या अग्नीने मरण पावलीं ॥ उत्तम गति त्यांस जाहली ॥
ऐसे बोलली ऋषिमंडळी ॥ तें म्यां सर्व ऐकिलें ॥ १४१ ॥
मग उत्तरक्रिया समस्त ॥ धर्मराज तिघांची करित ॥
त्रयोदश दिवसपर्यंत ॥ गंगातीरीं राहिला ॥ १४२ ॥
बहुत दानें देऊन ॥ सुखी केले सर्व ब्राह्मण ॥
कौरवमेलियावर अंबिकानंदन ॥ अष्टादशवर्षे होता ॥ १४३ ॥
धर्में गंगाद्वारापर्यंत ॥ विप्र पाठवून त्वरित ॥
तिघांच्या अस्थि भागीरथींत ॥ सोडूनियां दिधल्या ॥ १४४ ॥
कौरव निमाल्या समस्त ॥ चौपन्न वर्षेंपर्यंत ॥
धर्मराज राज्य करीत ॥ हस्तनापुरीचें नीतीनें ॥ १४५ ॥
श्रोते पंडित भक्तजन ॥ श्रीधरे तयां करोनि नमन ॥
म्हणे आश्रमवासिक पर्व जाण ॥ सत्रावें हें संपविलें ॥ १४६ ॥
यावरी कथानुसंधान ॥ निजधामा गेले श्रीकृष्ण ॥
यादव संहारिले संपूर्ण ॥ तें माझेनें वदवेना ॥ १४७ ॥
तें स्वर्गारोहण पर्व ॥ निजधामा गेले पांडव ॥
तें निरूपण अभिनव ॥ पंढरीनाथ लिहों नेदी ॥ १४८ ॥
क्षणक्षणां कानीं सांगत ॥ पांडवप्रताप सुरस ग्रंथ ॥
निजधाम न वर्णी यथार्थ ॥ करीं समाप्त येधूनी ॥ १४९ ॥
तुझा ग्रंथ पाहतां सप्रेम ॥ पंढरीस उभा मी पुरुषोत्तम ॥
तरी न वर्णी तूं निजधाम ॥ अज अक्षय मी असें ॥ १५० ॥
न जायते म्रियते वा हें वचन ॥ गीतेमाजी बोलिलों मी जाण ॥
क्षराक्षरातीत पूर्ण ॥ उत्तमपुरुष अक्षय मी ॥ १५१ ॥
ऐसें सांगतां पंढरीनाथ ॥ कोणी एक बोलिला पंडित ॥
परी पूर्ण जाहले नाहीं भारत ॥ अपुरता ग्रंथ दिसे कीं ॥ १५२ ॥
तरी लिही तूं स्वर्गारोहण ॥ तेच दिवशीं रुक्मिणीजीवन ॥
स्वप्नामाजी सांगे येऊन ॥ सर्वथाही लिहूं नको ॥ १५३ ॥
हरिविजय रामविजय ग्रंथ ॥ तिसरा हा पांडवप्रताप अद्भुत ॥
तिहींत निजधाम यथार्थ ॥ वर्णूं देत नाहीं मी ॥ १५४ ॥
तथापि करिशी अतिशय ॥ तरी लिहितां वाचितां होईल प्रलय ॥
तुझी स्फूर्ति पावेल लय ॥ ग्रीष्मकाळीचें तोय जैसें ॥ १५५ ॥
ऐशी आज्ञा होतां सत्वर ॥ श्रीधरे घातला नमस्कार ॥
करोनियां जयजयकार ॥ पांडवप्रताप संपविला ॥ १५६ ॥
चौसष्ट अध्याय समस्त ॥ अवघा वर्णिला हा ग्रंथ ॥
चौदा अध्यायपर्यंत ॥ आदिपर्व जाणिजे ॥ १५७ ॥
आठ अध्याय सभापर्व ॥ वनपर्व अध्याय नव ॥
चार अध्याय अभिनव ॥ विराटपर्व जाणिजे ॥ १५८ ॥
उद्योगपर्व पांच अध्याय जाण ॥ भीष्मपर्व अध्याय तीन ॥
तीन अध्यायचि द्रोण- ॥ पर्व असे वर्णिले ॥ १५९ ॥
कर्णपर्व अध्याय तीन ॥ एक अध्याय शल्यपर्व पूर्ण ॥
गदापर्वही जाण ॥ एका अध्यायीं वर्णिलें ॥ १६० ॥
एक अध्याय सौप्तिक ॥ एकचि अध्याय ऐषिक ॥
तैसेंच जाणावें विशोक ॥ एक अध्यायें वर्णिलें ॥ १६१ ॥
एकच अध्यायीं स्त्रीपर्व ॥ दोन अध्याय शांतिपर्व अभिनव ॥
सहा अध्याय अश्वमेध अपूर्व ॥ अतिसुरस वर्णिला ॥ १६२ ॥
शेवटीं आश्रमवासिक ॥ एकाच अध्यायीं वर्णिले देख ॥
एकून चौसष्ट अध्याय अमोलिक ॥ आदिपर्वापासोनी ॥ १६३ ॥
सवालक्ष मूळभारत ॥ तितक्याचा जो मथितार्थ ॥
आला चौसष्ट अध्यायांत ॥ कथा सर्व आकर्षूनी ॥ १६४ ॥
पाल्हाळ केला नाहीं बहुत ॥ अथवा नसे संकलित ॥
नेमस्त धरोनि मथितार्थ ॥ पांडवप्रताप संपविला ॥ १६५ ॥
शुद्धभावार्थेकरून ॥ परम शुचिर्भूत होऊन ॥
श्रवण करितां एक आवर्तन ॥ धनधान्यवृद्धि होय पैं ॥ १६६ ॥
आवर्तनें करितां तीन ॥ रोग जाय मुळींहून ॥
आणि कोणीएक विघ्न ॥ बाधू न शके तयातें ॥ १६७ ॥
गृहीं संग्रहितां हा ग्रंथ ॥ आधि व्याधि न होय तेथ ॥
संसार सुखरूप होय समस्त ॥ आनंदभरित सर्वदा ॥ १६८ ॥
पांच आवर्तनें करितां समूळीं ॥ परम सुपुत्र होय कुळी ॥
शत्रुक्षय तत्काळीं ॥ एक आवर्तनें होय पां ॥ १६९ ॥
गंडांतर अपमृत्य ॥ येणें दूर होईल यथार्थ ॥
ज्ञानविचारी अद्भुत ॥ होईल पंडित अर्थ पाहतां ॥ १७० ॥
ब्राह्मणांस विद्यावर्धन ॥ क्षत्रियांस प्राप्त राज्य धन ॥
कनक धान्य पदार्थ पूर्ण ॥ वैश्यांप्रति होय पां ॥ १७१ ॥
कृषि वृक्ष सुफळ ॥ श्रेय शुद्रास होय तत्काळ ॥
जितांचि मुक्तिसुख प्रबळ ॥ अंतीं हरिपद पावे तो ॥ १७२ ॥
भक्त मुमुक्षु साधक संत ॥ तेही तेथें निवती समस्त ॥
नवरसीं भरला ग्रंथ ॥ पाहोत पंडित सर्वदा ॥ १७३ ॥
भक्ति ज्ञान वैराग्य जाण ॥ ठायीं ठायीं निरूपण ॥
चातुर्य नीति तर्कविवरण ॥ करावें श्रवण राजयांनीं ॥ १७४ ॥
श्रवणें पुण्याचे पर्वत ॥ असो हा जेथें असेल ग्रंथ ॥
जे तीर्थ व्रतें तेथें शिणत ॥ तेही तेथें निवतील पैं ॥ १७५ ॥
गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ ॥ संन्यासी निवतील समस्त ॥
एवं समस्तां इच्छिलें प्राप्त ॥ श्रीकृष्ण लक्ष्मी वसो तेथें ॥ १७६ ॥
वंध्या होय पुत्रवती ॥ बंधु पिता हो कां पती ॥
दूरी अंतरले ते भेटती ॥ ऋण फिटे श्रवणें पां ॥ १७७ ॥
संसारीं नव्हे आपदा ॥ अंतीं पावतील विष्णुपदा ॥
व्यास वैशंपायनें सर्वदा ॥ फळश्रुति कथियेली ॥ १७८ ॥
आणिक हा वरद ग्रंथ ॥ पंढरीनाथें कथियेला यथार्थ ॥
श्रीधर नाम निमित्त ॥ पुढें केलें लौकिकीं ॥ १७९ ॥
ज्या मूळभारतीं कथा ॥ त्याच येथें लिहिल्या तत्त्वतां ॥
प्राकृत कवींचे समता ॥ नाहीं कदा धरियेलें ॥ १८० ॥
चौसष्ट अध्याय हा ग्रंथ ॥ कीं हे महत्पुण्याचे पर्वत ॥
नातरी चौसष्ट कलांची अद्भुत ॥ माळा सुंदर गुंफिली ॥ १८१ ॥
कीं हें चौसष्ट खणांचे गोपुर ॥ यावरी निजती सभाग्य नर ॥
कीं चौसष्ट कोहळी द्रव्य अपार ॥ भवदरिद्रनाशकें ॥ १८२ ॥
कीं हे चौसष्ट कलांचे भार ॥ कीं हें चौसष्ट योगिनींचें मंदिर ॥
कीं हें चौसष्ट हिर्यांचें पदक सुंदर ॥ सभाग्य भक्त घालिती ॥ १८३ ॥
कीं भक्ति ज्ञान वैराग्ययुक्त ॥ प्रयागतीर्थ हें यथार्थ ॥
कीं चौसष्ट गंगा अद्भुत ॥ ह्यास येऊन मिळाल्या ॥ १८४ ॥
कीं पांडवप्रताप ग्रंथ राजेंद्र ॥ चौसष्ट अध्याय प्रचंड वीर ॥
कीं चौसष्ट कोठड्या परिकर ॥ संतभक्तां पहुडावया ॥ १८५ ॥
कीं हीं चौसष्ट तीर्थें ॥ पापहारकें अद्भुतें ॥
शैव अथवा वैष्णवांतें ॥ वंद्य होती सर्वदा ॥ १८६ ॥
गाणपत्य सौर शाक्त ॥ सर्वांस वंद्य होय ग्रंथ ॥
ब्रह्मानंदें पंढरीनाथ ॥ वर देत ऐसा हा ॥ १८७ ॥
श्रीधर म्हणे माझा जनिता यथार्थ ॥ श्रीब्रह्मानंद अतिविख्यात ॥
सावित्री माता गुणभरित ॥ पतिव्रता तपस्विनी ॥ १८८ ॥
पंढरीहून चार योजनें दूरी ॥ नैर्क्रत्यकोणीं नाझरे नगरीं ॥
तेथील देशलेखक अवधारीं ॥ ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥ १८९ ॥
पंढरीस संन्यास घेऊन ॥ समाधिस्थ तेथेंचि पूर्ण ॥
वाळवंटामध्ये वृंदावन ॥ विश्वजन पाहती ॥ १९० ॥
क्षीरसागरीं नारायण ॥ त्याचा शिष्य चतुरानन ॥
तेथून अत्रि जाहला निर्माण ॥ दत्तात्रेय त्यापासोनी ॥ १९१ ॥
त्रिदेवात्मक शरीर शुद्ध ॥ त्यापासाव यति सदानंद ॥
तेथून रामानंद प्रसिद्ध ॥ समाधिस्थ वाराणसीं ॥ १९२ ॥
तेथून अमलानंद यति ॥ पुढें गंभीरानंद महामति ॥
तेथून ब्रह्मानंद सुमति ॥ सहजानंद तेथोनियां ॥ १९३ ॥
कल्याणीं जयाची वस्ति ॥ तेथोन पूर्णानंद महामति ॥
तेथून दत्तानंद सुमति ॥ नाझरे नगरीं समाधिस्थ ॥ १९४ ॥
तो पितामह आमुचा सत्य ॥ तेथोन ब्रह्मानंद यति अद्भुत ॥
पिता गुरु तोचि समर्थ ॥ जो कां विख्यात महाराज ॥ १९५ ॥
विजय नाम संवत्सरीं ॥ ग्रंथ जाहला पंढरपुरी ॥
शके सोळाशे चौतीस निर्धारीं ॥ ग्रंथ आकारा तैं आला ॥ १९६ ॥
चौसष्ट अध्याय ग्रंथ तत्त्वतां ॥ तुजप्रीत्यर्थ पंढरीनाथा ॥
वाचकां श्रोतयां समस्तां ॥ करीं कल्याण सर्वदा ॥ १९७ ॥
लेखक पाठक रक्षक निर्धारीं ॥ त्यांस रक्षीं अंतरीं बाहेरीं ॥
यावत् चंद्रार्कवरी ॥ तावत् ग्रंथ जतन करीं हा ॥ १९८ ॥
माघमास विजयसंवत्सरीं ॥ शुद्ध दशमी बुधवारीं ॥
श्रीपांडुरंगनगरीं ॥ ग्रंथ ते दिवशीं संपविला ॥ १९९ ॥
आदिपुरूषा दिगंबरा ॥ श्रीमद्भीमातीरविहारा ॥
श्रीधरवरदा निर्विकारा ॥ ब्रह्मानंदा सुखाब्धे ॥ २०० ॥
हेंचि प्रार्थितों वारंवार ॥ नमस्कारूनि जोडितों कर ॥
जेथें हा ग्रंथ असे सुंदर ॥ तेथें निरंतर तिष्ठे तूं ॥ २०१ ॥
ऐकोनि ऐसें उत्तर ॥ धांवूनि आला रुक्मिणीवर ॥
आलिंगूनि म्हणे वर ॥ ऐकें श्रीधरा सखया तूं ॥ २०२ ॥
जेथें असे हा ग्रंथेंद्र ॥ तेथें वसे मी निरंतर ॥
तूं बोलिलासी तें समग्र ॥ सिद्धिनेता मी असें ॥ २०३ ॥
ऐसें बोलोनि जगज्जीवन ॥ ग्रंथ दिधला उचलोन ॥
श्रीधरें ऐसें पाहोन ॥ जयजयकार पैं केला ॥ २०४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रतापग्रंथ ॥ चौसष्टाध्यायपर्यंत ॥
ग्रंथ जाहला समाप्त ॥ तुजप्रीत्यर्थ पावो का ॥ २०५ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे आश्रमवासिकपर्वणि चतुःषष्टितमोऽध्यायः ॥ ६४ ॥
अध्याय चौसष्टावा समाप्त
GO TOP
|