श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय तिसावा
हरिश्चंद्राची कथा
श्रीगणेशाय नम:
लोमश म्हणे राया धर्मां ॥ ऐक हरिश्चंद्राचा महिमा ॥
ज्याचे सत्त्वधीरपणाची सीमा ॥ जाहली ब्रह्मांडमंडपीं ॥ १ ॥
जो अयोध्येचा नृपती ॥ पुराणी महिमा जयाचा वर्णिती ॥
सूर्यवंशीचा चक्रवर्ती ॥ हरिश्चंद्र राजेंद्र ॥ २ ॥
पृथ्वीचे सकल नृपवर ॥ हरिश्चंद्रास देती करभार ॥
दानशील सत्त्वसमुद्र ॥ सेना अपार तयाची ॥ ३ ॥
दुःख दरिद्र दुष्काळ पाहीं ॥ अयोध्येत नसे कांहीं ॥
लोक सभाग्य सकळी ॥ द्रव्या नाहीं मिति तेथें ॥ ४ ॥
अयोध्येचें सुंदरपण ॥ पाहून लाजे शक्रभुवन ॥
सदा सफल दिव्य वन ॥ वसंत देखोन सुखावे ॥ ५ ॥
जो व्यासवाल्यीकींचा गुरु ॥ जो सर्वसिद्धांमाजी मेरु ॥
तो नारद मुनीश्वरु ॥ अयोध्येस पातला ॥ ६ ॥
राये साष्टांग केलें नमन ॥ करी नारदाचें पूजन ॥
ऋषि म्हणे राया तूं धन्य ॥ पूर्ण निधान पृथ्वीवरी ॥ ७ ॥
नारद तेधून निघाला ॥ वेगें इंद्रसभेसी पातला ॥
सभा घनवटली ते वेळां ॥ नारदे वर्णिला हरिश्चंद्र ॥ ८ ॥
आजि पृथ्वीवरी हरिश्चंद्र ॥ परमसत्त्वधीर नृपवर ॥
ज्याची कीर्ति पवित्र ॥ त्रिलोकामाजी विस्तारली ॥ ९ ॥
नारदे हरिश्चंद्रास वर्णितां ॥ वसिष्ठें डोलविला माथा ॥
म्हणे सत्त्वराशि पुरता ॥ हरिश्चंद्राऐसा नसेचि ॥ १० ॥
विश्वामित्र क्रोधावला ॥ म्हणे आपुला शिष्य वर्णिला ॥
करीन सत्त्वहीन तयाला ॥ क्षणमात्र न लागतां ॥ ११ ॥
कीं महिषापुढें मशक ॥ राजेंद्रापुढें जैसा रंक ॥
कीं सूर्यापुढें दीपक ॥ मंडन कोठें पैं त्याचें ॥ १२ ॥
सत्त्वीं ढाळीन हरिश्चंद्र ॥ तरीच हा ऋषि विश्वामित्र ॥
तूं गुरु म्हणोनियां थोर ॥ अभिमान धरिसी तयाचा ॥ १३ ॥
मग बोले वसिष्ठऋषी ॥ जरी हरिश्चंद्र टळेल नेमासी ॥
तरी मी मद्यपानी निश्चयेशीं ॥ कल्पवरी जाहलों ॥ १४ ॥
हरिश्चंद्र सत्त्व टाकील पूर्ण ॥ तरी मी ब्राह्मण्यावेगळा होईन ॥
विधवा जारकर्मी जाण ॥ तें गर्भस्थान मी पावेन ॥ १५ ॥
मग विश्वामित्र बोले ॥ कोटिवर्षे तप केलें ॥
लोहपिष्ट भक्षिलें ॥ पंचाग्निसाधन बहुकाळ ॥ १६ ॥
सत्वा न टळे हरिश्चंद्र ॥ तरी हें तप देईन तया समग्र ॥
वसिष्ठ म्हणे ईश्वर ॥ ऐसेंच करो निश्चये ॥ १७ ॥
विश्वामित्र म्हणे वसिष्ठासी ॥ त्वां श्रुत हें न करावें रायासी ॥
येरू म्हणे निश्चयेंसीं ॥ कळूं राया नेदींच ॥ १८ ॥
दोघे आश्रमा गेले ॥ वसिष्ठें तप आरंभिलें ॥
अपयश न यावें वहिलें ॥ हरिश्चंद्रा म्हणूनि ॥ १९ ॥
कापट्यानुष्ठान घोर ॥ द्वेषें करीत विश्वामित्र ॥
पराजय पावे हरिश्चंद्र ॥ ऐसा प्रकार मांडिला ॥ २० ॥
अकरा कोटि महाव्याघ्र ॥ वनांत सोडी विश्वामित्र ॥
मनुष्ये भक्षिती समग्र ॥ वाट अणुमात्र चालेना ॥ २१ ॥
वनीं न वागे मनुष्य ॥ कच्चीं पिके पडलीं ओस ॥
समाचार हा रायास ॥ सांगती लोक नगरींचे ॥ २२ ॥
राजा म्हणे प्रजा पीडती ॥ मग मी कासया नृपती ॥
लेकराऐशा प्रीतीं ॥ प्रजा निश्चये पाळीन मी ॥ २३ ॥
सिद्ध करून चतुरंग सेना ॥ हरिश्चंद्र चालिला वना ॥
सवें तारामती अंगना ॥ निघती जाहली कौतुकें ॥ २४ ॥
वनोवनीं धांवे हरिश्चंद्र ॥ करीत व्याघ्रांचा संहार ॥
अनेक श्वापदे पीडाकर ॥ मारी नृपवर तेधवां ॥ २५ ॥
सिद्धाश्रमीं वसे विश्वामित्र ॥ कळला त्यास समाचार ॥
क्रोधावला ऋषिश्वर ॥ कपट थोर मांडिलें ॥ २६ ॥
मायेचे मृग दोन करूनी ॥ पाठविले तये वनीं ॥
हरिश्चंद्रे ते देखोनी ॥ तुरंग वेगें लोटिला ॥ २७ ॥
दोघेही मृग पळत ॥ आले सिद्धाश्रमीं धांवत ॥
हरिश्चंद्र पावला तेथ ॥ अपूर्व देखे सिद्धाश्रम ॥ २८ ॥
गायी आणि व्याघ ॥ तेथें चरती निर्वैर ॥
सर्प आणि मुंगूस मित्र ॥ द्वेष अणुमात्र नसेचि ॥ २९ ॥
पक्षी करिती वेदाध्ययन ॥ वाखाणिती शास्त्रपुराण ॥
हरिश्चंद्रे तें देखोन ॥ आश्चर्य पूर्ण मानिलें ॥ ३० ॥
तो तारामती आणि प्रधान ॥ मागें सेना येत संपूर्ण ॥
ऐकोन पक्ष्यांचे भाषण ॥ मन संतोषले सर्वांचे ॥ ३१ ॥
तो देखिलें शिवस्थान ॥ काश्मीराचें देऊळ जाण ॥
लिंग मणिमये प्रभाघन ॥ देखतां मन निवाले ॥ ३२ ॥
परिवार तेथें राहिला ॥ राये नित्यनेम सारिला ॥
शिव षोडशोपचारे पूजिला ॥ श्रम गेला समस्त ॥ ३३ ॥
विश्वामित्रें ते क्षणीं ॥ दोघी पाठविल्या मातंगिणी ॥
उत्तम गायन करूनी ॥ राव भुलवून मोहिला ॥ ३४ ॥
रंभेऐसें सुंदर ॥ गायन करिती त्या सुस्वर ॥
प्रसन्न जाहला हरिश्चंद्र ॥ म्हणे कांहीं वर मागा ॥ ३५ ॥
त्या म्हणती ऐक राया ॥ आम्ही होऊं तुझ्या भार्या ॥
तारामती दूर करूनियां ॥ भोग आम्हां देइंजे ॥ ३६ ॥
तो सत्कीर्तिप्रधान ॥ क्रोधावला ऐकून ॥
दूतांस सांगे निग्रहेंकरून ॥ यांस बाहेर घालवावें ॥ ३७ ॥
या दोघी चांडाळिणी ॥ आहेत केवळ मातंगिणी ॥
दूतीं बाहेर घातल्या ढकलूनी ॥ गेल्या ते क्षणीं ऋषीपाशीं ॥ ३८ ॥
सांगती सर्व वर्तमान ॥ आम्हां बाहेर घातलें ढकलून ॥
विश्वामित्र क्रोधेंकरून ॥ संगे शिष्य घेऊन चालिला ॥ ३९ ॥
कोपें कांपे थरथरां ॥ देवळांत आला सत्वरा ॥
म्हणे चांडालकुमारा ॥ मज विश्वामित्रा नेणसी ॥ ४० ॥
माझा महिमा न फळे तुला ॥ तुझा त्रिशंकु पिता म्यां उद्धरिला ॥
इंद्रपदा पाठविला ॥ याग करून स्वहस्तें ॥ ४१ ॥
पितृगुरुद्रोह गोहत्या ॥ घडल्या होत्या तुझिया पित्या ॥
केवळ चांडाळ जाहला होता ॥ तो म्यां तत्त्वतां उद्धरिला ॥ ४२ ॥
तें अवघें विसरून ॥ केला माझे दासींचा अपमान ॥
माझीं श्वापदे संपूर्ण ॥ तुज काय कारण वधावया ॥ ४३ ॥
श्वापदे माझीं बाळें सत्य ॥ क्रीडत होतीं वनांत ॥
तूं कोण वधावया येथ ॥ सांगें त्वरित दुर्जना ॥ ४४ ॥
तुझ्या गुरूचे शंभर पुत्र ॥ मीं वधिले न लागतां क्षणमात्र ॥
तो मी ऋषि विश्वामित्र ॥ माझें चरित्र कळे तूतें ॥ ४५ ॥
म्यां ब्रह्म्याशी वाद करून ॥ प्रतिसृष्टि केली निर्माण ॥
तूं वैभव मजलागून ॥ दाखवावया आलासी ॥ ४६ ॥
तो सत्कीर्तिप्रधनासमवेत ॥ राव घाली दंडवत ॥
तारामती चरण धरित ॥ आम्ही सत्य अपराधी ॥ ४७ ॥
क्षमा करणें तुम्हीं ऋषिराया ॥ म्हणून मागुती लागती पायां ॥
ऋषि म्हणे श्वापदे वधावया ॥ कां या ठाया आलासी ॥ ४८ ॥
ऐसें विश्वामित्र बोलोन ॥ गेला आश्रमा कोपून ॥
राव परम श्रमून ॥ शिवभुवनीं प्रवेशला ॥ ४९ ॥
राव परम चिंताक्रांत ॥ निद्रा करी एक मुहूर्त ॥
तारामती मांडी देत ॥ उसा रायाचें तेधवां ॥ ५० ॥
राये देखिलें स्वप्न ॥ एक आला ब्राह्मण ॥
त्याचे पाय धुऊन ॥ राज्य दान दिधलें पैं ॥ ५१ ॥
ब्राह्मण म्हणे ते क्षणीं ॥ अंकुश लगाम लेखनी ॥
राया दे मजलागूनी ॥ येरें ते क्षणीं दिधलीं ॥ ५२ ॥
सर्वच एक विवशी ॥ येऊन झोंबे रायासी ॥
राव गजबजून मानसीं ॥ जागा जाहला तेधवां ॥ ५३ ॥
करूनियां हरिस्मरण ॥ तारामतीस सांगे स्वप्न ॥
समुद्रवलयांकित संपूर्ण ॥ राज्य ब्राह्मणा दिधलें पैं ॥ ५४ ॥
तो विश्वामित्र वेष पालटून ॥ होऊन आला ब्राह्मण ॥
राया दिधलें आशीर्वचन ॥ नृपें पूजन पैं केलें ॥ ५५ ॥
रायास म्हणे ब्राह्मण ॥ मज औटभार दे सुवर्ण ॥
राजा बोले प्रीतीकरून ॥ अवश्य घेऊन जाइंजे ॥ ५६ ॥
राव म्हणे ब्राह्मणासी ॥ चलावें आतां अयोध्येसी ॥
दक्षिणा देईन निश्चयेशीं ॥ म्हणोनि भाक दिधली ॥ ५७ ॥
वारूवरी बसला ब्राह्मण ॥ राव चालिला अयोध्येलागून ॥
सुखासनीं आरूढोन ॥ तारामती चालिली ॥ ५८ ॥
पुढें वेत्रधार जाती धांवोन ॥ अयोध्या श्रृंगारिली संपूर्ण ॥
मंदिरीं प्रवेशतां विघ्न ॥ विश्वामित्रें मांडिलें ॥ ५९ ॥
सुखासनीं तारामती ॥ मंदिरामाजी जात होती ॥
द्वेषें लोटून परती ॥ पाडिली क्षितीं तियेसीं ॥ ६० ॥
कोठे गे तूं जातेसी ॥ म्हणोनि ओढिली धरोनि केशीं ॥
दंड हातीं घेऊनि तियेसी ॥ मारिता जाहला द्वेषाने ॥ ६१ ॥
घाय उमटे जेथें ॥ चळचळा रक्त वाहे तेथें ॥
थरथरां कांपे चंडवाते ॥ केळी जैशी सुकुमार ॥ ६२ ॥
धांवून आला नृपनाथ ॥ ब्राह्मणाचे चरण धरित ॥
येरू थरथरां कांपत ॥ क्रोधें बोलत तयासी ॥ ६३ ॥
म्हणे माझें औटभार सुवर्ण ॥ दे रे आधीं आणून ॥
तूं घरांत बैससी जाऊन ॥ माझें स्मरण तुज कैंचें ॥ ६४ ॥
मी आतां द्रव्य घेईन ॥ तुज करूं नेदीं उदकपान ॥
राये आणविलें सुवर्ण ॥ भांडारिया सांगोनियां ॥ ६५ ॥
पुढें केली सुवर्णराशी ॥ हें आमुचें आम्हांस म्हणे देसी ॥
हे धन माझें तूं कां घेसी ॥ पडली कैशी भ्रांती तूतें ॥ ६६ ॥
आमुचे आम्हास देऊन ॥ काय करिसी मूर्खादान ॥
गुरु वसिष्ठें शिकवण ॥ हेंच शिकविलें तुजलागीं ॥ ६७ ॥
तुवां सकल राज्य दान ॥ दिधलें मजला पाय धुऊन ॥
अंकुश लगाम लेखनी जाण ॥ तुवां दान दीधली ॥ ६८ ॥
राये चरणीं ठेविला माथा ॥ म्हणे मज धन्य केलें आतां ॥
राज्यांतीं नरक तत्त्वतां ॥ कोणीं भोगावा स्वामिया ॥ ६९ ॥
माझें ओझें उतरले ॥ कृपाळुवा पावन केलें ॥
विप्र म्हणे बहुत न बोलें ॥ माझी दक्षिणा दे आधीं ॥ ७० ॥
मग प्रधानादि सकल जनां ॥ राजा सांगे करोनि प्रार्थना ॥
राज्य दिधलें ब्राह्मणा ॥ याची आता पाळिजे ॥ ७१ ॥
माझी दक्षिणा दे मजलागूनी ॥ दोघें बांधिलीं तये क्षणीं ॥
तारामतीचे केश धरोनी ॥ क्रोधेंकरूनि ताडित ॥ ७२ ॥
जिचा मुखप्रकाश देखोनी ॥ चंद्र लाजे अधोवदनीं ॥
तिचे हात बांधिले आवळोनी ॥ सर्वजनांचे देखतां ॥ ७३ ॥
विश्वामित्रास लोक शिव्या देती ॥ नगरा कैंचा आणिला म्हणती ॥
नरनारी प्रजा रडती ॥ तारामतीस पाहोनी ॥ ७४ ॥
तोंडावरी दोघांस मारित ॥ अशुद्ध भडभडां वाहत ॥
लोक सद्गद होती समस्त ॥ पीडा देखोन तयांची ॥ ७५ ॥
नगरव्यवहारी धांवती ॥ म्हणती सोडवूया नृपती ॥
आम्हां द्रव्या नाहीं मिती ॥ मेळवू निश्चितीं आणिक ॥ ७६ ॥
मग बोले हरिश्चंद्र ॥ प्रजाद्रव्य घेती जे नृपवर ॥
ते परम चांडाळ दुराचार ॥ भोगिती थोर रौरव ते ॥ ७७ ॥
विश्वामित्र म्हणे तयांचें द्रव्य घेसी ॥ परी मी देऊं नेदींच तयांसी ॥
सकल पृथ्वीचे धनासी ॥ स्वामी मीच निर्धारे ॥ ७८ ॥
मागुती तारामतीतें ॥ विप्र मारी कठिणहस्तें ॥
येरी धांवोन धरी पायांतें ॥ गहिवर लोकांते न धरवे ॥ ७९ ॥
तंव रोहिदास पुत्र येऊन ॥ धरी विश्वामित्राचे चरण ॥
स्वामी मी गहाण राहीन ॥ फेडीन द्रव्य तुमचें पैं ॥ ८० ॥
विश्वामित्र म्हणे ते वेळे ॥ कोणाचें पोर हें मध्यें आलें ॥
बडबड करी आगळे ॥ म्हणोन मारिलें तोंडावरी ॥ ८१ ॥
राव म्हणे माझा कुमार ॥ असे तुमचा जी किंकर ॥
विप्र म्हणे दावेदार ॥ पुढती राज्य घेईल हा ॥ ८२ ॥
म्हणोन फडफडां मारिता ॥ बालक भूमीवर लोळत ॥
मी हें राज्य न घे सत्य ॥ बापे तुम्हां दिधलें तें ॥ ८३ ॥
विप्र म्हणे तिघें जणें ॥ माझे राज्यांतून आतां जाणें ॥
माझी दक्षिणा आणून देणें ॥ वेगेकरून आतांची ॥ ८४ ॥
राव म्हणे नवखंडाबाहेरी ॥ जाईन वाराणसीनगरी ॥
तुमची दक्षिणा निर्धारी ॥ भलतेपरी फेडीन ॥ ८५ ॥
सातवे दिवशी फेडीन ऋण ॥ म्हणोन दिधलें भाषदान ॥
मग त्याची आता घेऊन ॥ तिघें चालिलीं काशीस ॥ ८६ ॥
तो विश्वामित्र धांवत ॥ तारामतीचे केश धरित ॥
माझे वस्त्रालंकार समस्त ॥ फेडून जावें वनांतरा ॥ ८७ ॥
तिघांचीं वस्त्रें अलंकार ॥ घेऊन उघडीं करी समग्र ॥
वल्कले वेसून सत्वर ॥ निघतीं जाहलीं तेधवां ॥ ८८ ॥
नगरांतून उघडीं चालिली ॥ तेव्हां एकचि हाक जाहली ॥
सकळ प्रजांनीं ते वेळीं ॥ शिरें आपटिलीं धरणीसी ॥ ८९ ॥
म्हणती सर्वेशा नारायणा ॥ हें कां दुःख दाविशी नयना ॥
वना जातो हरिश्चंद्रराणा ॥ चरणचालीं चालत ॥ ९० ॥
हरिश्चंद्राऐसा नृपती ॥ न देखों आम्ही पुढतपुढती ॥
लोक रडत पाठीं धांवती ॥ करिती खंती फार तेव्हां ॥ ९१ ॥
जन रडती धाय मोकलून ॥ पशुपक्षी करिती रोदन ॥
आकांत जाहला दारुण ॥ कोणा अन्नपान नाठवे ॥ ९२ ॥
विश्वामित्र म्हणे रायाप्रती ॥ लोक कां तुजमागें येती ॥
मग काय करावें निश्चितीं ॥ ओस नगर सांग पां ॥ ९३ ॥
तो राये सकळ लोक ॥ फिरविले जोडून हस्तक ॥
तिघें चालिलीं नैष्ठिक ॥ चरणचालीं कृती ॥ ९४ ॥
पुढें हरिश्चंद्र नृपवर ॥ मागें तारामती सुंदर ॥
हळूहळू रोहिदास कुमार ॥ चरणीं जात वनातें ॥ ९५ ॥
सूर्यास म्हणे विश्वामित्र ॥ आतां उघडीं द्वादशं नेत्र ॥
तो तपों लागला दिनकर ॥ विश्वामित्राज्ञेने तैं वेळे ॥ ९६ ॥
तीव्र तपे वासरमणी ॥ पाषाण उलती उष्ण धरणी ॥
वृक्ष गेले सर्व करपोनी ॥ उदक मेदिनीं असेना ॥ ९७ ॥
वरुणास सांगे विश्वामित्र ॥ उदक ठेवू नको अणुमात्र ॥
समीरा तूं होई स्थिर ॥ नको येऊं यांवरी ॥ ९८ ॥
वृक्षास फळ नाहीं ॥ सूर्य तीव्र तपे पाहीं ॥
सरांटे पसरले महीं ॥ वाट कांहीं दिसेना ॥ ९९ ॥
उष्णें तापली मही अत्यंत ॥ शेषाचाही माथा पोळत ॥
तळव्याची आग माथां येत ॥ तृषेनें जात प्राण त्यांचे ॥ १०० ॥
तिघें तापलीं उष्णेकरून ॥ तोंडीं खरस आली दाटून ॥
उदकाविण जाती प्राण ॥ तिघांचेही तेधवा ॥ १०१ ॥
तिघें जणे मार्गी जात ॥ उष्णे तयांचें आग करपत ॥
माते पाणी पाणी म्हणत ॥ रोहिदास तेधवां ॥ १०२ ॥
कोरड तोंडास पडत ॥ बाळ जाहला मूर्च्छागत ॥
वर्तला थोर आकांत ॥ मायबापांस ते वेळीं ॥ १०३ ॥
बा रे पाणी नाहीं येथें ॥ अश्रुपात आले रायातें ॥
कडे घेतलें रोहिदासातें ॥ पायीं रक्ते वाहती ॥ १०४ ॥
उदकाकारणें हरिश्चंद्र ॥ धांवे शोधित गिरिकंदर ॥
आड सरोवरे विहीर ॥ गंगा समग्र कोरड्या ॥ १०५ ॥
उदक न मिळे कोठे जाण ॥ आला मागें परतोन ॥
रोहिदास उदकाविण ॥ प्राण सांडू पाहत ॥ १०६ ॥
जवळ बैसोन नृपनाथ ॥ वदन पुत्राचें न्यहाळित ॥
वारा घाली पुढें घेत ॥ हृदयीं धरित तयासी ॥ १०७ ॥
ऐशीं पुढें पुढें चालत ॥ सावली न दिसे किंचित ॥
जाहला थोर आकांत ॥ पक्षी रडती देखोनि ॥ १०८ ॥
विश्वामित्र तंव काय करित ॥ वृद्ध ब्राह्मण होऊनि येत ॥
राये केलें दंडवत ॥ मग पुसत आलां कोठूनि ॥ १०९ ॥
तो म्हणे माझी स्त्री गर्भिणी ॥ एक पुत्र आहे मजलागूनी ॥
तिघें अनवाणी ये वनीं ॥ पादरक्षा दे आम्हां ॥ ११० ॥
पादरक्षा देशील दाना ॥ तरी चुकतील यमयातना ॥
ऐकतां ऐशा वचना ॥ तिघीं दिधल्या पादरक्षा ॥ १११ ॥
ब्राह्मण गुप जाहला तेथें ॥ तिघें अनवाणीं चालती पंथें ॥
उष्णाने आग करपतें ॥ कैंची तेथें सावली ॥ ११२ ॥
पायांचे भोकसे निघाले ॥ जेथें जेथें पडती पाउले ॥
तेथें तेथें रुधिर पडलें ॥ प्राण जाहले कासाविस ॥ ११३ ॥
बाळ खांद्यावरी घेतलेंसे ॥ मान टाकिली रोहिदासें ॥
माते पाणी पाजीं म्हणतसे ॥ दोघें श्रमती ऐकतां ॥ ११४ ॥
वारा नयेच अणुमात्र ॥ करपोन गेलें शरीर ॥
कढों लागलें अंबर ॥ अत्यंत उष्णेंकरोनि ॥ ११५ ॥
मग विश्वामित्रे ते वेळीं ॥ पोई उदकाची वाटे घातली ॥
भोंवती वृक्षांची सावली ॥ सुगंध वायु वाहतसे ॥ ११६ ॥
तेथें कुसुमांच्या शेजा ॥ रचिल्या असती नानाओजा ॥
भोगांगना सतेजा ॥ रंभेतुल्य असती ॥ ११७ ॥
सत्त्व टाळावया तयांचें ॥ उपाय करी नानापरींचे ॥
परि धन्य सत्त्व हरिशचंद्राचे ॥ न टळे साचें सर्वथा ॥ ११८ ॥
उदक घेऊन त्वरित ॥ विश्वामित्र समोर जात ॥
म्हणे श्रमलां बहुत ॥ उदकपान करा हें ॥ ११९ ॥
चला पोय आश्रमांत ॥ विश्रांति पावाल तेथ ॥
हरिश्चंद्र म्हणे यथार्थ ॥ तुम्ही बोलतां द्विजवरा ॥ १२० ॥
जेणें पोईचें उदक घेतलें ॥ त्याचें पुण्य सर्व गेलें ॥
जे अन्नसत्रीं जेविले ॥ त्यांचें सरले सुकृत ॥ १२१ ॥
ऐसें बोलून हरिश्चंद्र ॥ पुढें जात सत्त्वसमुद्र ॥
उदक न घे अणुमात्र ॥ शांत धीर महाराज तो ॥ १२२ ॥
तो मागून आली तारामती ॥ ब्राह्मण म्हणे वो महासती ॥
तूं श्रमलीस आश्रमाप्रती ॥ चाल माते माझिया ॥ १२३ ॥
मग ती बोलत वाणी ॥ मी राया हरिश्चंद्राची राणी ॥
पोईचें पिईन पाणी ॥ हें तंव स्वप्नींही घडेना ॥ १२४ ॥
जाईल तरी जावो प्राण ॥ परी मी न करीं उदकप्राशन ॥
मग मायेचा हरिश्चंद्र करून ॥ आश्रमीं ब्राम्हणे बैसविला ॥ १२५ ॥
नानापरीचे उपचार ॥ भोगीतसे हरिश्चंद्र ॥
तारामतीस म्हणे विप्र ॥ पैल तुझा भ्रतार पाहें पां ॥ १२६ ॥
पाचारितो तुज पाहीं ॥ चाल आश्रमा लवलाहीं ॥
येरी म्हणे ऐसें कधींही ॥ न घडे रायापासोनि ॥ १२७ ॥
शेष सांडील पृथ्वीभार ॥ मर्यादा सोडील समुद्र ॥
परी सत्त्व न सांडी हरिश्चंद्र ॥ पोईचें द्वार प्रवेशेना ॥ १२८ ॥
तारामती पुढें जात ॥ ब्राह्मण म्हणे मनांत ॥
धन्य माउली अद्भुत ॥ सत्त्व इचें पैं असे ॥ १२९ ॥
तो येतां देखिला रोहिदास ॥ विश्वामित्र म्हणे त्यास ॥
उदक घेई सावकाश ॥ भागीरथीचें बाळका ॥ १३० ॥
तो म्हणे अन्नसत्रीं भोजन ॥ पोईस केलें उदकपान ॥
हें सूर्यवंशी पूर्ण ॥ घडलेच पैं नाहीं ॥ १३१ ॥
तैसाच बाळ पुढें जात ॥ ब्राह्मण म्हणे धन्य याचें सत्त्व ॥
मातेमागे श्रमत ॥ बाळ जात तैसाची ॥ १३२ ॥
विश्वामित्रें पुढें जाऊन ॥ वणवा लाविला चहूंकडून ॥
श्वापदे जाती जळोन ॥ वनीं आकांत वर्तला ॥ १३३ ॥
पक्षी तडफडोनि मरती ॥ ज्वाळा अंतराळीं कवळिती ॥
धूर दाटे दिशांप्रती ॥ न दिसे कोणी एकमेकां ॥ १३४ ॥
वणवा आगास झोंबत ॥ बाळ कंठीं मिठी घालित ॥
तुज घालूं पोटांत ॥ कोठे लपवू सांग पां ॥ १३५ ॥
तारामती म्हणे रोहिदास ॥ आतां तूं वांचसी कैसा ॥
मनीं स्मरे लक्ष्मीविलासा ॥ कृष्णा गोविंदा धावे कां ॥ १३६ ॥
हरिश्चंद्र बोले वचन ॥ आम्हां तिघांस आलें मरण ॥
त्या ब्राह्मणाचे ऋण ॥ माथां पूर्ण बैसलें ॥ १३७ ॥
राजा म्हणे तारामती ॥ हृदयीं चिंतावा श्रीपती ॥
ज्याचें नाम घेतां हरती ॥ सकळही संकटे ॥ १३८ ॥
बारे पुत्रा रोहिदासा ॥ अंतीं स्मरावे जगन्निवासा ॥
वैकुंठपति आदिपुरुषा ॥ ब्रह्मानंदा दयाब्धे ॥ १३९ ॥
रोहिदासास घेऊन कडेवरी ॥ राव पुढें जात झडकरी ॥
चुकली तारामती सुंदरी ॥ पडली दूरी आडमार्गे ॥ १४० ॥
तिणें सभोंवतें पाहिलें ॥ म्हणे पति पुत्र जळोन गेले ॥
आतां माझें शरीर उरलें ॥ प्रेतवत कासया ॥ १४१ ॥
पति पुत्र गेले जळोनी ॥ मी काय करावें वांचोनी ॥
मग म्हणे बा रे अग्नी ॥ ठाव देई पोटांत ॥ १४२ ॥
पति माझा बहुत भुकेला ॥ स्नानसंध्येची होईल वेळा ॥
भूक लागेल बाळा ॥ स्वर्गपंथें जातां पैं ॥ १४३ ॥
केला सूर्यास नमस्कार ॥ हृदयीं चितिला रमावरा ॥
जवळी केला वैश्वानर ॥ प्राण द्यावया सतीने ॥ १४४ ॥
हें देखोनि विश्वामित्र ॥ वेगें विझवी वैश्वानर ॥
ते वेळे होवोनि विप्र ॥ सतीपाशीं पातला ॥ १४५ ॥
म्हणे हे पतिव्रते ॥ कोठे जातेस या पंथें ॥
येरी म्हणे ताता तुम्हांतें ॥ विचारित्यें तें सांगा ॥ १४६ ॥
एक बाळ आणि पुरुष तत्त्वतां ॥ देखिले काय मार्गी जातां ॥
येरू म्हणे पैल पुत्र आणि पिता ॥ जळूनियां पडियेले ॥ १४७ ॥
त्यांवरून गेला अग्न ॥ मेले दोघेही भाजून ॥
तो दाखवी नेऊन ॥ कोणा कापट्य न कळेचि ॥ १४८ ॥
कपटाचीं प्रेते केलीं ॥ परि सतीस तीं खरीं वाटलीं ॥
मग धरणीवरी अंग घाली ॥ हृदयीं कवळी दोघांतें ॥ १४९ ॥
सती म्हणे ते अवसरीं ॥ मज टाकोनि वनांतरीं ॥
जाणें केलें बहुत दूरी ॥ दोघांजणीं एकदांचि ॥ १५० ॥
अयोध्येचा राजेंद्र ॥ परमोदार गुणगंभीर ॥
सत्त्वशील हरिश्चंद्र ॥ महाशूर छत्रपति ॥ १५१ ॥
सकल पृथ्वीचे भूपती ॥ तुझिया पायां लागती ॥
त्रैलोक्यांत तुझी कीर्ती ॥ हे गति तुजला जाहली ॥ १५२ ॥
रोहिदासा गुणनिधाना ॥ तुवां माझे केलें स्तनपाना ॥
मज सांडून सगुणा ॥ वडिलांसवें गेलासी ॥ १५३ ॥
पाणी पाणी करितां गेला प्राण ॥ बा रे पीडलास अन्नाविण ॥
तुजंवरून काया जाण ॥ ओवाळीन पुत्रराया ॥ १५४ ॥
अयोध्यापति पुत्रासमवेत ॥ जळून पडला वनांत ॥
पशु पक्षी रोदन करित ॥ शोक ऐकोन तियेचा ॥ १५५ ॥
उठा उठा हो प्राणपती ॥ क्षुधाक्रांत श्रमलेती ॥
माझे कुरळकेशें निश्चितीं ॥ चरण तुमचे झाडीन ॥ १५६ ॥
मग तो विप्र म्हणे तारामतीस ॥ सूर्य गेला अस्तमानास ॥
तूं किती शोक करितेस ॥ चाल घरास माझिया ॥ १५७ ॥
म्हणे ऐक ताता उत्तर ॥ वनीं सांडोनि पुत्र भ्रतार ॥
काय करूं हें शरीर ॥ व्यर्थ आतां ठेवूनियां ॥ १५८ ॥
म्हणे मीच ये क्षणीं ॥ भ्रतारासवें घेईन अग्नी ॥
येरू म्हणे ऐकिलें श्रवणीं ॥ पति तुझा ऋणी असे ॥ १५९ ॥
आपुल्या पतीचें ऋण फेडशील ॥ तरी तो स्वर्गी मुक्त होईल ॥
व्यर्थ प्राण वेंचूनि कल ॥ काय असे सांग पां ॥ १६० ॥
येरी म्हणे सत्य ब्राह्मणा ॥ देणें आहे ब्राह्मणऋणदक्षिणा ॥
द्वितीयजन्मीं फेडीन जाणा ॥ अंतर यासी नसेचि ॥ १६१ ॥
तो ब्राह्मण तेथून गेला ॥ घोर अंधकार पडला ॥
तो विश्वामित्रें व्याघ्र पाठविला ॥ करोनियां मायेचा ॥ १६२ ॥
व्याघें दोन्ही प्रेते ओढूनी ॥ घेऊन गेला सतीपासोनी ॥
येरी आरडे एकली वनीं ॥ नसे कोणी दुसरें पैं ॥ १६३ ॥
सती तळमळे ते वेळां ॥ तो अकस्मात सूर्य उगवला ॥
रोहिदासासह हरिश्चंद्र आला ॥ अवचितां तेचि वाटे ॥ १६४ ॥
तारामती पतीचे पाय धरी ॥ वर्तमान सांगे ते अवसरीं ॥
म्हणे ईश्वर सूत्रधारी ॥ त्याची करणी अगाध ॥ १६५ ॥
गिरिगव्हरें अरण्यें ॥ क्रमीत जाती तिघें जणें ॥
ओस नगर भ्यासुरवाणें ॥ लंघोनि जाती पुढेंचि ॥ १६६ ॥
ऐशीं जो तिघें जात ॥ तो वाराणसी देखिली अकस्मात ॥
जी अवलोकितां समस्त ॥ पापें जाती जळोनि ॥ १६७ ॥
वाराणसीची रचना ॥ न वर्णवेचि सहस्रवदना ॥
ते विश्वनाथनगरी जाणा ॥ हरिश्चंद्रे देखिली ॥ १६८ ॥
देखिली नेत्रीं भागीरथी ॥ अवलोकनें महापापें जाती ॥
पावन करावया त्रिजगती ॥ वाहे क्षिती सर्वदा ॥ १६९ ॥
मग त्रिवर्गी ते वेळीं ॥ साष्टांग वाराणसी नमिली ॥
स्नान करितां भागीरथीजळी ॥ सुखावलीं सर्वांगें ॥ १७० ॥
घेतलें विश्वनाथाचें दर्शन ॥ बिंदुमाधवास घालित लोटांगण ॥
तो विश्वामित्र येऊन ॥ उभा ठाके तेधवां ॥ १७ ॥
तुम्हांमागें किती हिंडावे ॥ ऐसें दान कासया द्यावें ॥
ब्राह्मणासी चाळवावे ॥ कोणत्या गुरूनें शिकविलें ॥ १७२ ॥
म्हणे मर्यादेचा दिवस आजि जाणा ॥ सूर्य जो जाय अस्तमाना ॥
तो सत्वर द्यावी माझी दक्षिणा ॥ म्हणोनि त्यांसी आडविलें ॥ १७३ ॥
हरिश्चंद्र म्हणे ते क्षणीं ॥ आजि देईन तुम्हांलागूनी ॥
स्वामि कष्टलेति वनीं ॥ चरणचाली चालतां ॥ १७४ ॥
त्रिशंकूची मुद्रिका ॥ नृपहस्तीं होती देखा ॥
ती विकूनियां एका ॥ तृणपेंढी घेतलें ॥ १७५ ॥
तृण बांधोनि माथां ॥ राव म्हणे आम्हांस कोणी घेतां ॥
जनसमुदाय त्यांभोंवता ॥ पहावया मिळाला ॥ १७६ ॥
म्हणती हा राजा चक्रवर्ती ॥ काय जाहली याची संपत्ती ॥
तो रायास म्हणे तारामती ॥ मजला आधीं विकावे ॥ १७७ ॥
सतीच्या माथां तृण बांधोनियां ॥ उभी केली विकावया ॥
तें विश्वजन देखोनियां ॥ रोदन करिती गहिंवरें ॥ १७८ ॥
यात्रा मिळाली वाराणसी ॥ नानापरींचे तापसी ॥
म्हणती ऐशा माउलीसी ॥ कोण विकी दुरात्मा ॥ १७९ ॥
जिच्या नखांवरून ॥ मदन सांडावे ओवाळून ॥
पाहतो जिचें कमलवदन ॥ चंद्र लाजोनि अधोमुख ॥ १८० ॥
तो ग्राहिकें पातलीं बहुत ॥ वृद्ध कुंटिणी आल्या तेथ ॥
देखोन सौंदर्य अद्भुत ॥ सुवर्ण देती कुंटिणी ॥ १८१ ॥
तो विश्वामित्र म्हणे ॥ इचें एकभार सुवर्ण देणें ॥
तंव ती कुंटिणी अवश्य म्हणे ॥ आतांच देते आणून ॥ १८२ ॥
तारामती करी रोदन ॥ धरी विश्वामित्राचे चरण ॥
न विकावे कुंटिणीलागून ॥ पदर पसरोनि मागतें ॥ १८३ ॥
तो कालकौशिक ब्राह्मण ॥ पुसे विश्वामित्रालागून ॥
तो म्हणे एकभार सुवर्ण ॥ इचें घेईन ये वेळीं ॥ १८४ ॥
तेणें तत्काल सुवर्णराशी ॥ केली विश्वामित्रापाशीं ॥
हातीं धरिलें तारामतीसी ॥ चाल घरासी म्हणोनि ॥ १८५ ॥
तो जाहला हाहाकार ॥ लोक रडती समग्र ॥
म्हणती परम चांडाळ विश्वामित्र ॥ सती पवित्र विकली हे ॥ १८६ ॥
विप्रें तारामती नेली ते क्षणीं ॥ रोहिदासाकडे पाहोनी ॥
अश्रु आले राजाचे नयनीं ॥ अधोवदनें स्फुंदत ॥ १८७ ॥
तारामती परतोन ॥ पाहे रायाचें वदन ॥
हे आतां दुर्लभ चरण ॥ अंतरले कीं मजलागीं ॥ १८८ ॥
कौशिक म्हणे चल बहिणी ॥ येरी गजबजली जेविं हरिणी ॥
लागली रायाचे चरणीं ॥ आसवीं मही भिजतसे ॥ १८९ ॥
बाळ म्हणे हरिश्चंद्रालागून ॥ मी पाहीन मातेचें वदन ॥
येरू म्हणे बा रे संपूर्ण ॥ तुटला जाण ऋणानुबंध ॥ १९० ॥
रोहिदास म्हणे ताता ॥ मी पाहून येतो मागुता ॥
राजा म्हणे तत्त्वतां ॥ भेटून येई लवकरी ॥ १९१ ॥
मग बाळ धांवला लवलाहें ॥ मातेस म्हणे उभी राहे ॥
मज सोडून जननिये ॥ कोठे जातेस सांग पां ॥ १९२ ॥
तारामती ब्राह्मणास म्हणत ॥ माझा बाळ येतो धांवत ॥
पान्हा स्तनीं दाटत ॥ कंठीं घालित मिठी तेव्हां ॥ १९३ ॥
स्तन घातला वदनकमळीं ॥ करें मुख तयाचें कुरवाळी ॥
ब्राह्मणास म्हणे ते वेळीं ॥ ताता एक ऐकावे ॥ १९४ ॥
याचें काय तें द्रव्य देई ॥ एवढें बाळ विकत घेई ॥
म्हणोनि लागली पायीं ॥ कालकौशिकाचे तेधवां ॥ १९५ ॥
वत्स आणि गायी ॥ मेळवावी एके ठायीं ॥
कुरंगिणीपाडसा पाहीं ॥ विघड न करीं महाराजा ॥ १९६ ॥
कृपा उपजली ब्राह्मणासी ॥ परतोन आला रायापाशीं ॥
म्हणे या लेकरासी ॥ मीच विकत घेतों पैं ॥ १९७ ॥
त्याचें अर्धभार सुवर्ण ॥ ब्राम्हणें तत्काळ देऊन ॥
दोघांस चालिला घेऊन ॥ आपुलिया आश्रमा ॥ १९८ ॥
हरिश्चंद्र म्हणे नारायणा ॥ आतां भेट कैंची दोघां जणां ॥
म्हणोन करी रोदना ॥ हरिश्चंद्रराणा सत्त्वधीर ॥ १९९ ॥
मग अयोध्येचा नाथ ॥ आपुले माथां तृण बांधित ॥
लोक सद्गदित समस्त ॥ कैसें अघटित वर्ततसे ॥ २०० ॥
अरे हा हरिश्चंद्र सत्त्वधीर ॥ अयोध्येचा नृपवर ॥
जय विश्वनाथ हरहर ॥ कैसें दुस्तर ओढवलें ॥ २०१ ॥
मेरूहूनि ज्याचे धैर्य थोर ॥ समुद्रापरीस गंभीर ॥
दया क्षमा अपार ॥ शांत धीर महाराज तो ॥ २०२ ॥
माथा डोलविती सकल जन ॥ म्हणती याचें मोल करील कोण ॥
कांटां घातलें त्रिभुवन ॥ तरी न्यून हरिश्चंद्राशी ॥ २०३ ॥
घेतो हरिशचंद्राचे नाम ॥ सकल पातके होती भस्म ॥
कैंचा ब्राह्मण अधम ॥ छळी ऐशा महाराजा ॥ २०४ ॥
तेथींचा वीरबाहु महार ॥ त्यापाशीं द्रव्य असे अपार ॥
तेणें सुवर्ण देऊन दोन भार ॥ हरिश्चंद्र घेतला ॥ २०५ ॥
प्रेतांचें द्रव्य बहुत ॥ त्यापाशीं असे अमित ॥
द्रव्याविण निश्चित ॥ प्रेते जाळू देईना ॥ २०६ ॥
राव म्हणे डोंबालागूना ॥ तुम्ही सांगाल तें काम करीन ॥
परी न घे तुमचें अन्न ॥ कोरडें धान्य मज द्यावें ॥ २०७ ॥
दोन भार सुवर्ण ॥ विश्वामित्रासी अर्पून ॥
राये धरिले चरण ॥ म्हणे म्यां श्रमविलें स्वामीसी ॥ २०८ ॥
जावें आतां अयोध्येस ॥ राज्य करावें सावकाश ॥
मग डोंबासंगें नरेश ॥ जाता जाहला गृहा त्याचे ॥ २०९ ॥
तो मांसाची दुर्गंधि येत ॥ प्रेते पडलीं असंख्यात ॥
अस्थींचे पर्वत ॥ घराभोंवते तयाच्या ॥ २१० ॥
राव मनीं कंटाळत ॥ म्हणे बाप रे कर्म बळिवंत ॥
तो महारीण आली त्वरित ॥ पत्नी वीरबाहूची ॥ २११ ॥
म्हणे हाचि काय आणिला विकत ॥ हा तो सुकुमार श्रीमंत ॥
रक्तोत्पलाऐसे हात ॥ काय पूजिसी देव्हारां ॥ २१२ ॥
तुम्हां कोणीं बुद्धि दिधली सांगा ॥ हा सेवक नाहीं आम्हा जोगा ॥
राव म्हणे कर्म भोगा ॥ काय मागुती टाकील ॥ १३ ॥
मग म्हणे डोंबालागून ॥ मी सांगितले काम करीन ॥
दोन भार सुवर्ण ॥ वेंचिलें कीं मजलागीं ॥ २१४ ॥
पांघरावयापटकुर ॥ हरिश्चंद्रास देत महार ॥
झाडी आंगण समग्र ॥ केर बाहेर टाकीतसे ॥ २१५ ॥
रायाहातीं महारीण दळवित ॥ तरतरां फोड हातास येत ॥
रक्त असे वाहत ॥ परी न दावी तयांसी ॥ २१६ ॥
ज्या हातें करोनि दान ॥ केले सुखी पृथ्वीचे ब्राह्मण ॥
त्याच हातेंकरून ॥ करी दळण डोंबाघरीं ॥ २१७ ॥
रायांचे मुकुट समस्त ॥ ज्याचे चरणीं लोळत ॥
तो शिरीं घागर घेत ॥ पाणी वाहत डोंबाघरीं ॥ २१८ ॥
तेज फांके दशदिशांतरीं ॥ ऐसा किरीट ज्याचे शिरीं ॥
पाणी भरून घेई घागरी ॥ रात्रंदिवस सर्वदा ॥ २१९ ॥
विश्वामित्र ते अवसरीं ॥ गुप्तरूपें फोडी घागरी ॥
दुजा घट देत महारी ॥ म्हणे हा तरी सांभाळीं ॥ २२० ॥
तोही फोडून टाकित ॥ राजा थरथरां कांपत ॥
महारीण येऊन लात ॥ मारी राया हरिश्चंद्रा ॥ २२१ ॥
तिसरी दिली तेही फोडिली ॥ डोंबाने आणिक दिधली ॥
चुंबळ शिरींची नीट केली ॥ मनीं ते वेळीं भीतसे ॥ २२२ ॥
शिव्या देत महारी ॥ कैंचा हा आणिला घरीं ॥
व्यर्थ द्रव्य निर्धारीं ॥ बुडोन गेलें आमुचें ॥ २२३ ॥
चवथी घागर दिधली ॥ ते मेल्यानें दारवंटां फोडिली ॥
मग महारीण कोपली ॥ मारी ते वेळीं काष्ठदंडें ॥ २२४ ॥
आणिक घट दिले ते क्षणीं ॥ मग पाणी भरित रांजणीं ॥
विश्वामित्रें ते क्षणीं ॥ रांजणा छिद्र पाडिलें ॥ २२५ ॥
अवघा वेळ पाणी भरिलें ॥ रांजणांत कांहीं नसे उरलें ॥
डोंब जेवावयाचे वेळे ॥ आला घरास तेधवां ॥ २२६ ॥
डोंब पाणी मागत ॥ तो रिता रांजण खडबडित ॥
केशीं धरोनि नृपनाथ ॥ तांब्या हाणित डोंब तेव्हां ॥ २२७ ॥
वेळ सारा पाणी भरिले ॥ कांहीं नाहीं उरलें ॥
लांकूड मोळीचे घेतलें ॥ पुढती मारिलें डोंबाने ॥ २२८ ॥
म्हणती मांस रांधीं वहिला ॥ राव चुलीपुढे बैसला ॥
अग्नि फुंकितां ते वेळां ॥ जळून गेल्या दाढीमिशा ॥ २२९ ॥
सूर्य अस्तमाना गेला ॥ कोरडे धान्य देती त्याजला ॥
तें दळून घेऊन आला ॥ भागीरथीतीरातें ॥ २३० ॥
स्नानसंध्यादि कर्म जाहलें ॥ पिठाचे पानगे भाजले ॥
तयाचे भाग दोन केले ॥ अतिथीचा आणि आपुला ॥ २३१ ॥
वेष पालटून विश्वामित्र ॥ म्हणे यजमाना भूक फार ॥
ते समयीं अन्न समग्र ॥ जेवी विप्र क्षणमात्रें ॥ २३२ ॥
ब्राह्मण म्हणे ते वेळां ॥ उपवास कालचा मजला ॥
अवघें अन्न जेविला ॥ मिटक्या देत तेधवां ॥ २३३ ॥
ब्राह्मण सवेंच गुप्त जाहला ॥ ऐसा एक संवत्सर लोटला ॥
राव पोट बांधून ते वेळां ॥ डोंबाघरीं काम करी ॥ २३४ ॥
हरिश्चंद्र बहुत रोडला ॥ पंजर अस्थींचा उरला ॥
महारी म्हणे रोग याला ॥ लागलासे निर्धारे ॥ २३५ ॥
येणें आम्हांस नागविलें ॥ दोन भार सुवर्ण व्यर्थ गेलें ॥
मसण राखावया वहिलें ॥ डोबें ठेविलें हरिश्चंद्रा ॥ २३६ ॥
म्हणे तुवां मसण राखावे ॥ द्रव्याविण प्रेत जाळू न द्यावें ॥
राव म्हणे बरवें ॥ आज्ञा प्रमाण मजलागीं ॥ २३७ ॥
सूर्योदयीं करोनि स्नान ॥ हृदयीं आठवी वसिष्ठाचे चरण ॥
राखीत बसे स्मशान ॥ रात्रंदिवस नृपवर ॥ २३८ ॥
हरिश्चंद्र काशीस गेला ॥ मृत्यु नगरींचा खुंटला ॥
महारीण म्हणे आणिला ॥ निर्दैव कैंचा घरासी ॥ २३९ ॥
यासी घरास आणिलें ॥ माणूस मरायाचें राहिलें ॥
दुखण्यास कोणी न पडे वहिलें ॥ व्याधि दुःख गेलें गांवांतून ॥ २४० ॥
आमचे हातींचें द्रव्य गेलें ॥ कारटे ब्राह्मण उपवासी मेले ॥
याचें ऋण द्यायाचें होतें भले ॥ दोन भार सुवर्ण ॥ २४१ ॥
इकडे काळकौशिकाचे घरीं ॥ तारामती भावें काम करी ॥
उसंत नसे दिवसरात्रीं ॥ नानापरी कष्ट करी ॥ २४२ ॥
कालकौशिकाचे मुख्य शिष्य ॥ त्यांत असे रोहिदास ॥
ब्राह्मण म्हणे समस्तांस ॥ जावें तुळशी आणावया ॥ २४३ ॥
दर्भ समिधा कमळे ॥ आणावया पूजेचे वेळे ॥
वनास अवघे निघाले ॥ रोहिदासासमवेता ॥ २४४ ॥
पुष्पे तुळशी तोडिती ॥ समिधा दर्भ खुडिती ॥
तो सरोवरीं कमळांप्रती ॥ रोहिदासें देखिलें ॥ २४५ ॥
विश्वामित्रें तक्षक पाठविला ॥ तो कमळी जाऊन बैसला ॥
रोहिदास ते वेळां ॥ कमलें तोडी तांतडी ॥ २४६ ॥
तो अकस्मात दंशला हातास ॥ भयें हाक फोडी रोहिदास ॥
बत्तीसलक्षणी बाळ डोळस ॥ मूर्छित पडला भूमीवरी ॥ २४७ ॥
सकल शिष्य आले धांवोनी ॥ तो रोहिदास पडला धरणीं ॥
बाळे रडती आक्रंदोनी ॥ बा तुझे जननीस काय सांगूं ॥ २४८ ॥
रोहिदास म्हणे बाळांसी ॥ माता राहवीत होती भोजनासी ॥
मी तैसाच आलों वनासी ॥ सत्वर येतों म्हणोनियां ॥ २४९ ॥
तुम्ही जाल आतां घरास ॥ माता पुसेल कोठे रोहिदास ॥
तरी माझा नमस्कार मातेस ॥ जाऊनियां सांगा हो ॥ २५० ॥
तीस शोक करूं न द्यावा कांहीं ॥ म्यां तिची सेवा केली नाहीं ॥
तो झेंडू आला ते समयीं ॥ प्राण सोडिला रोहिदासें ॥ २५१ ॥
बाळे रडत आलीं घरासी ॥ समाचार सांगती मातेसी ॥
येरी मूर्छित धरणीसी ॥ पडली कल्पांत ओढवला ॥ २५२ ॥
उठोनि आक्रंदे तारामती ॥ पहा कैशी कर्माची गती ॥
माझें एक बाळ निश्चिती ॥ काळें गेलें हिरोनियां ॥ २५३ ॥
माझी आंधळयाची काठी ॥ अडकली जाऊन कवणे बेटीं ॥
मज दरिद्र्याची गांठी ॥ कोणें सोडिली निर्दयें ॥ २५४ ॥
मज दुबळीचे अन्न किंचित ॥ कोणीं नेले हातोहात ॥
माझा कल्पवृक्ष निश्चित ॥ कोण्या निर्दयें उपटिला ॥ २५५ ॥
राजहंस माझा रोहिदास ॥ काळें त्यावरी घातला पाश ॥
मग म्हणे त्या बाळकांस ॥ कोठे रोहिदास टाकिला रे ॥ २५६ ॥
त्यास स्नानास उदक ठेविलें ॥ बाळक माझें असेल भुकेलें ॥
कोणे वनीं टाकिलें ॥ काय बोलिलें तें सांगा ॥ २५७ ॥
मी काम करितां आसमास ॥ म्हणे माते तूं भागलीस ॥
मज क्षणभरी म्हणे बैस ॥ रगडितों पाय तुझे मी ॥ २५८ ॥
उठती पोटीं उमाळे प्रबळ ॥ भळभळां नेत्रीं वाहे जळ ॥
म्हणे मज पापिणीस ऐसा बाळ ॥ जिरेल कोठून सांग पां ॥ २५९ ॥
म्यां पूर्वी ईश्वर पूजिला ॥ व्रत जप तप नेम चालविला ॥
पूर्ण न करितां मध्येंच टाकिला ॥ म्हणोनि गेला रोहिदास ॥ २६० ॥
मीं केला पंक्तिभेद ॥ कीं केला हरिकथेचा उच्छेद ॥
किंवा साधुसंतांसी कुशब्द ॥ नेणतपणें बोलिलें मी ॥ २६१ ॥
कीं केला परद्रव्याभिलाष ॥ कीं भजलें नाहीं हरिहरांस ॥
कीं कोणाचे मुखींचा ग्रास ॥ काढूनियां म्यां नेला ॥ २६२ ॥
कीं गुरुद्रोह केला सबळ ॥ कीं हें गुरुनिंदेचें फळ ॥
कीं पात्रावरूनि ब्राह्मण तत्काळ ॥ उठवूनियां दवडिला ॥ २६३ ॥
कीं यतीश्वर आला ॥ भिक्षा न देतो दवडिला ॥
कीं म्यां विघड पाडिला ॥ कुरंगिणीपाडसांत ॥ २६४ ॥
कीं हरिहरचरित्रें उच्छेदिलीं ॥ कीं वेदशास्त्रपुराणें निंदिली ॥
मातापुत्रां तुटी पाडिली ॥ विघ्न केलें परांलॉ ॥ २६५ ॥
जळत हृदयाभीतरीं ॥ परी विप्र कोपेल घरीं ॥
म्हणोन पुढती काम करी ॥ मध्यरात्र जाहली ॥ २६६ ॥
समस्तांची भोजनें जाहलीं ॥ घरींचीं अवघीं निजेलीं ॥
हांक फोडित चालिली ॥ रोहिदासा म्हणोनियां ॥ २६७ ॥
राजसा कोठे पडलासी ॥ कां रे पाडसा ओ न देसी ॥
मज माते म्हणोन न बोलसी ॥ गति कैशी तुज जाहली ॥ २६८ ॥
बा रे तूं भेट मजला ॥ मी येऊन चुंबीन तुजला ॥
पक्षांस वृक्षीं गहिंवर आला ॥ शोक ऐकोन तियेचा ॥ २६९ ॥
बा रे माझिया डोळसा ॥ सख्या ओ दे रे पाडसा ॥
कोठे आहेस राजहंसा ॥ रोहिदासा सुकुमारा ॥ २७० ॥
बा रे तूं निष्ठावंत बालक ॥ न पिशी पोईचें उदक ॥
अंतरला अयोध्यानायक ॥ हरिश्चंद्र तुजलागीं ॥ २७१ ॥
चहूंकडे वनीं धांवत ॥ झाडें कपाळा आदळत ॥
घडिघडी अडखळोन पडत ॥ अशुद्ध वाहत न कळे तीतें ॥ २७२ ॥
सरोवरीं जें होतें प्रेत ॥ तें विश्वामित्र पुढें टाकित ॥
सतीचे पायां लागत ॥ येरी पाहे चांचपून ॥ २७३ ॥
पुत्राचें शव ओळखिले ॥ मग निढळा निढळ मेळविलें ॥
म्हणे बा रे मज नाहीं पुसले ॥ केलें तुवां गमन परदेशीं ॥ २७४ ॥
सूर्यवंशमुकुटमणी ॥ बोल कांहीं मजशीं वाणी ॥
तूं अयोध्यापतीचा पुत्र वनीं ॥ परदेशी होऊन पडलासी ॥ २७५ ॥
मग आडवे घेतलें प्रेत ॥ पान्हा स्तनीं दरदरां फुटत ॥
मुखीं तयाचे स्तन घालित ॥ हृदयीं धरित दृढ त्यासी ॥ २७६ ॥
मग आणिक रूप पालटोनी ॥ विश्वामित्र पुढें घेऊनी ॥
म्हणे तूं कोण या वनीं ॥ रडतेस आक्रोशें ॥ २७७ ॥
ती म्हणे ऐक द्विजा ॥ सर्पें दंशिला पुत्र माझा ॥
जो हरिश्चंद्र महाराजा ॥ त्याचा पुत्र असे हा ॥ २७८ ॥
ब्राह्मण म्हणे आतांच रात्रीं ॥ लौकर जाळीं याप्रती ॥
सूर्योदयीं डोंब येती ॥ जाळूं न देती तुजलागीं ॥ २७९ ॥
प्रेत उचलोन त्या अवसरा ॥ येता जाहला जाह्नवीतीरा ॥
काष्ठें अग्नि सत्वरा ॥ घेऊन आला आपण ॥ २८० ॥
पुत्र घातला सरणांत ॥ म्हणे तूं रोदन न करीं येथ ॥
पैल तो मसण रक्षित ॥ आलिया जाळूं न देचि ॥ २८१ ॥
ब्राह्मण तेथें गुप्त जाहला ॥ तारामतीनें आकांत मांडिला ॥
कोल्हाळ हरिश्चंद्रे ऐकिला ॥ जाळ देखिला मसणांत ॥ २८२ ॥
धांवोन आला तिजपाशीं ॥ केशी धरोन ओढिलें तिजसी ॥
मज न पुसतां जाळिसी ॥ कां गे न देशी द्रव्य तें ॥ २८३ ॥
तीस रागें दिधली लात ॥ उदक घालून सरण विझवित ॥
काष्टे चहूंकडे टाकित ॥ बाहेर प्रेत काढिलें ॥ २८४ ॥
सतीपुढें प्रेत टाकिलें ॥ केश जळोन अंग भाजले ॥
सर्वांगास फोड आले ॥ बीभत्स पडलें लेकरू ॥ २८५ ॥
मग म्हणे तारामती ॥ पहा कर्माची कैशी गती ॥
सर्पदंशें मरण अवगती ॥ अन्ययाति स्पर्शला कीं ॥ २८६ ॥
अग्निसंस्कार न होतां पुरता ॥ बाहेर ओढून काढिलें प्रेता ॥
या हरिश्चंद्राच्या सुता ॥ गति तत्त्वतां ऐशी हे ॥ २८७ ॥
सूर्यवंश मावळला ॥ राव हरिश्चंद्र काय जाहला ॥
माझा प्राण कां उरला ॥ काय डोळां पहावें हें ॥ २८८ ॥
हें ऐकतां उत्तर ॥ येऊन पुसे हरिश्चंद्र ॥
सांग तूं कोणाची सुकुमार ॥ जाळिशी पुत्र कवणाचा ॥ २८९ ॥
येरी म्हणे कां पुसशी व्यर्थ ॥ माझें कर्म बळिवंत ॥
अग्निसंस्कार निश्चित ॥ पुरता नाहीं बाळकासी ॥ २९० ॥
मग तो बोले राजेंद्र ॥ तुझा कोण गे भ्रतार ॥
सत्य सांग तुज आण साचार ॥ श्रीविश्वेश्वराची ॥ २९१ ॥
तारामती बोले ते क्षणीं ॥ मी राया हरिश्चंद्राची राणी ॥
सर्पे पुत्र दंशिला वनीं ॥ अग्नि देऊं त्यास आलें ॥ २९२ ॥
ऐसें हरिश्चंद्रे ऐकूनी ॥ वक्षस्थल घेत बडवूनी ॥
मूर्च्छागत पडे धरणीं ॥ मस्तक अवनीं आपटित ॥ २९३ ॥
मग म्हणे तारामती ॥ तूं कोण सांग मजप्रती ॥
येरू म्हणे मी चक्रवर्ती ॥ अयोध्येचा हरिश्चंद्र ॥ २९४ ॥
मग म्हणे महासती ॥ त्याची सरी इंद्र चंद्र न पावती ॥
तो केवळ मदनमूर्ती ॥ तेजें गभस्ति तैसा तो ॥ २९५ ॥
त्याचें नाम घेतां प्रातःकाळी ॥ सकळ पापां होय धुळी ॥
येरू म्हणे तोचि मी ये स्थळी ॥ दास्य करितों डोंबाचें ॥ २९६ ॥
कालकौशिकें तुज घेतलें ॥ म्यां डोंबाघरीं दास्य केलें ॥
एक वर्ष लोटले ॥ अन्न नाहीं मजलागीं ॥ २९७ ॥
ऐकतां ऐशी खूण ॥ एकमेकांचे गळां पडोन ॥
शोक केला दारुण ॥ तो सांगतां हृदय फुटे ॥ २९८ ॥
घेऊनि रोहिदासाचें मडें ॥ हरिश्चंद्र आक्रोशें रडे ॥
अहा बाळ माझें बापुडें ॥ होऊन पडले ये स्थळी ॥ २९९ ॥
अरे सूर्यवंशीं पडिला अंधकार ॥ गेला रोहिदासाऐसा कुमार ॥
उचंबळला शोकसागर ॥ नसे पार तयासी ॥ ३०० ॥
हरिश्चंद्र म्हणे तारामतीसी ॥ मी पुसोन येतों आपुल्या धन्यासी ॥
आज्ञा घेऊन यासी ॥ दहन करूं मग येथें ॥ ३०१ ॥
राजा गेला डोंबाचे घरासी ॥ विश्वामित्र आला तिजपाशीं ॥
तुजला ग्राशील विवर्शी ॥ जाई वेगें येधूनि ॥ ३०२ ॥
तुझा भ्रतार ये तोंवरी ॥ बैस या देवळाभीतरी ॥
मग प्रेत घेऊन सुंदरी ॥ देवलयांत बैसत ॥ ३०३ ॥
तीस दुखनिद्रेनें व्यापिलें ॥ विप्रें प्रेताचें पोट फोडिलें ॥
आतडी काढून ते वेळे ॥ मुखीं लावी सतीच्या ॥ ३०४ ॥
देवलयांत मांस विखुरलें ॥ हात पाय चहूंकडे टाकिले ॥
रक्त तिच्या मुखास माखिलें ॥ बाहेर आला आपण ॥ ३०५ ॥
विप्र करी शंखध्वनी ॥ लाव बाळ खाते म्हणोनि ॥
तो सरली रजनी ॥ लोक धांवोनि आले तेथें ॥ ३०६ ॥
वेशींत होते महार ॥ त्यांस हांक फोडी विश्वामित्र ॥
अरे तुम्हांस लाव खाईल निर्धार ॥ कुळ तुमचें उरेना ॥ ३०७ ॥
माझे पाठीस होती लागली ॥ म्यां भयानें हांक फोडिली ॥
पळोन आलों तुम्हांजवळी ॥ मग ती गेली देवळांत ॥ ३०८ ॥
देवलयांत ती जो आहे ॥ तो मारावी लवलाहें ॥
मग पुढें हाता नये ॥ बाहेर गेल्या कोणासी ॥ ३०९ ॥
तुम्हां देखून आंत गेली ॥ दिवटी नेऊन धरा वहिली ॥
मज ग्रासिती ये काळीं ॥ परी वांचलों तुमचेनें ॥ ३१० ॥
मग महार तेथें आले ॥ बळकट ते आत गेले ॥
तीस केशी धरोनी ओढिले ॥ प्रेत बांधिलें तिचेगळां ॥ ३११ ॥
माघारें हात बांधोनी ॥ सोटे मारिती ते क्षणीं ॥
तें दुःख सांगतां धरणी ॥ उकलू पाहे सत्वर ॥ ३१२ ॥
डोळे तियेचे बांधिले ॥ राजद्वारीं घेऊनि आले ॥
लोक बिदोबिदीं पळू लागले ॥ लांव आली म्हणोनि ॥ ३१३ ॥
लेकरे घेऊन घरांत पळती ॥ कित्येक कपाटें ढांकिती ॥
धीट ते जवळ जाती ॥ पहावया लांवेसी ॥ ३१४ ॥
एक म्हणती कौशिकगूहीं ॥ ही होती कळलें नाहीं ॥
आतां खाईल सर्वही ॥ मनुष्यमात्र उरेना ॥ ३१५ ॥
परवां दोघे ब्राह्मण मेले ॥ ते इणेंच खादले ॥
ईस ठेवितां नोहे भले ॥ जिवे मारा आतांचि ॥ ३१६ ॥
मग वीरबाहु महार ॥ पाचारिला सत्वर ॥
म्हणे या लांवेचा संहार ॥ करीं बाहेर नेऊनि ॥ ३१७ ॥
मग डोंबाने केशीं धरोनी ॥ बाहेर आणिली ओढूनी ॥
हरिश्चंद्रास बोलावूनी ॥ म्हणे मारून टाकीं इयेतें ॥ ३१८ ॥
येरू म्हणे आज्ञा प्रमाण ॥ ओळखिले तारामतीनिधान ॥
तिचे हातीं करविलें स्नान ॥ भागीरथीचें ते वेळीं ॥ ३१९ ॥
स्नान करून बाहेर आली ॥ हृदयीं चिंतिला वनमाळी ॥
मान नीट करी वहिली ॥ येरें पुशिली शस्त्रधारा ॥ ३२० ॥
तारामती म्हणे तेधवा ॥ जय जय विश्वनाथा सदाशिवा ॥
हरिश्चंद्राऐसा पति व्हावा ॥ जन्मोजन्मीं मजलागीं ॥ ३२१ ॥
रोहिदासाऐसा सुत ॥ वसिष्ठाऐसा गुरुनाथ ॥
विश्वामित्राऐसा मागता सत्य ॥ असो पैं जन्मोजन्मीं ॥ ३२२ ॥
जय जगन्निवास नारायण ॥ म्हणोन नीट केली मान ॥
म्हणें आतां वेगें हाणा ॥ एका घायेंकरोनी ॥ ३२३ ॥
घायास उचलिला करा ॥ तो भक्तकृपाळू सर्वेश्वरा ॥
वैकुंठाहूनि श्रीधर ॥ एकाएकीं धांवला ॥ ३२४ ॥
हो हो रे म्हणोनि ते वेळां ॥ जगन्निवासें करें धरिला ॥
चहूं भूजांनी आलिंगिला ॥ हरिश्चंद्र भगवंतें ॥ ३२५ ॥
चार्ही भुजा दिव्य सरळ ॥ वदन सुहास्य तमालनीळ ॥
वैजयंती आपादमाळ ॥ हृदयीं कौस्तुभ झळकतसे ॥ ३२६ ॥
हरिश्चंद्रराजाचे कंठीं ॥ जगन्निवासें घातली मिठी ॥
रोहिदास अमृतदृष्टीं ॥ उठविला भगवंतें ॥ ३२७ ॥
तारामतीस हृदयीं धरित ॥ म्हणे पतिव्रताशिरोमणि तूं सत्य ॥
विमानीं सुर समस्त ॥ पाहों आले तेधवां ॥ ३२८ ॥
शिव भवानीसमवेत ॥ इंद्र आला शचीसहित ॥
सत्यलोकेश सावित्री त्वरित ॥ पाहों आले तयांसी ॥ ३२९ ॥
आले सकल ऋषीश्वर ॥ वाराणसीचे नारी नर ॥
पूर्णज्ञानाचा सागर ॥ वसिष्ठ सत्वर धांवला ॥ ३३० ॥
विश्वामित्रें रूप प्रगट केलें ॥ हरिश्चंद्रास हृदयीं धरिलें ॥
तारामतीस आलिंगिलें ॥ कडे घेतलें रोहिदासा ॥ ३३१ ॥
धन्य तुमचें सत्व पूर्ण ॥ केलें सूर्यवंशाचें उद्धरण ॥
शोधितां हें त्रिभुवन ॥ उपमा नसे तुम्हांतें ॥ ३३२ ॥
विश्वामित्रें कोटिवर्षे तप केलें ॥ तें श्रेय हरिश्चंद्रा दिधलें ॥
म्हणे तुझ्या पित्यास उद्धरिलें ॥ तुज अर्पिलें तें पुण्य ॥ ३३३ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ धडकत वाद्यांचा गजर ॥
पुष्पवृष्टि सुरवर ॥ वारंवार करिताती ॥ ३३४ ॥
लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ तारामतीस भेटती ॥
अक्षय वरदान देती ॥ संतोषोनि तयांसी ॥ ३३५ ॥
वसिष्ठास देखोन ॥ हरिश्चंद्रे केलें साष्टांग नमन ॥
वसिष्ठ दाटला प्रेमेंकरून ॥ म्हणे धन्य राजेंद्रा ॥ ३३६ ॥
आला वीरबाहु महार ॥ केला तयाचा उद्धार ॥
पावोन दिव्य शरीर ॥ स्वर्गाप्रति तो गेला ॥ ३३७ ॥
कालकौशिक ब्राह्मण ॥ धरी तारामतीचे चरण ॥
म्हणे माते तुझें दर्शन ॥ घेतां पाप नुरेचि ॥ ३३८ ॥
विश्वामित्रें हरिश्चंद्रासी ॥ गजरें आणिलें अयोध्येसी ॥
लोक धांवती भेटावयासी ॥ आनंद आकाशीं न समाये ॥ ३३९ ॥
दोघें स्थापून सिंहासनीं ॥ आपले हातें शेंस भरोनी ॥
रोहिदासास पुढें बैसवूनी ॥ अभिषेकिलें रायातें ॥ ३४० ॥
हरिश्चंद्रावरी धरिलें छत्र ॥ आज्ञा मागोन विश्वामित्र ॥
बद्रिकाश्रमीं सत्वर ॥ गेला तेव्हां तपातें ॥ ३४१ ॥
साठसहस्त्र वर्षेवरी ॥ हरिश्चंद्र अयोध्येचें राज्य करी ॥
मग रोहिदास त्यावरी ॥ सिंहासनीं स्थापिला ॥ ३४२ ॥
सकळ अयोध्यानगर ॥ विमानीं बैसवी हरिश्चंद्र ॥
करून सकळांचा उद्धार ॥ घेऊनि गेला वैकुंठी ॥ ३४३ ॥
यापरी अयोध्या उद्धरिली ॥ क्षणें वैकुंठासी नेली ॥
हरिश्चंद्रे कीर्ति केली ॥ ऐकतां जळती सकल पापें ॥ ३४४ ॥
ही कथा करितां श्रवण ॥ त्यांस जय कल्याण ॥
अंतीं पावती वैकुंठभुवन ॥ सत्य वचन व्यासाचें ॥ ३४५ ॥
हे कथा अति सुरस ॥ धर्मास सांगें लोमश ॥
युधिष्ठिरा तूंही विशेष ॥ सत्वधीर तैसाचि ॥ ३४६ ॥
पुढें कथा गोड गहन ॥ घोषयात्रे जाती कौरव दुर्जन ॥
तेथें गंधर्व नेतील धरून ॥ पाकशासनाचे आज्ञेनें ॥ ३४७ ॥
पांडवप्रताप नंदनवन ॥ कल्पवृक्ष हरिश्चंद्रोपाख्यान ॥
सप्रेम भक्त पंडितजन ॥ श्रवण करोत सर्वदा ॥ ३४८ ॥
संतश्रोतयांस नमस्कार ॥ साष्टांगे घाली श्रीधर ॥
ब्रह्मानंदे होऊनि निर्भर ॥ हें चरित्र परिसावें ॥ ३४९ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ तिसाव्यांत कथियेला ॥ ३५० ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि त्रिंशत्तमोऽध्याय: ॥ ३० ॥
अध्याय तिसावा समाप्त
GO TOP
|