|
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय अकरावा ॥ ॥ श्रीशिवराम गुरवे नमः ॥ सूत म्हणे ही हे शौनका ॥ दहावा अध्याय जाहला निका ॥ रामें प्रश्न केला जितुका ॥ तितुका श्रीशिवें फेडिला ॥ १ ॥ की जीवाचें जें निजरूप ॥ तें मीच की सच्चिद्रूप ॥ त्याचा आभास प्रतिबिंबत्वें अल्प ॥ जीव हा मिथ्या ॥ २ ॥ तस्मात् मी जैसा आपुल्या रूपातें ॥ जाणत असें त्यागून मिथ्यातें ॥ तेवींच पहा जीवीं समस्ते ॥ अहं ब्रह्म स्वानुभवें ॥ ३ ॥ आणि या जगीं मी एकला ॥ ठाव नाहीं नामरूपाला ॥ हा जगडंबर मजपासून झाला ॥ रज्जूवरी सर्प जैसा ॥ ४ ॥ परी सत्यमिथ्या कळल्यावीण ॥ होय कसें अभिन्नज्ञान ॥ यास्तव आभास कूटस्थाचे लक्षण ॥ निवडूनिया निरूपिलें ॥ ५ ॥ त्या निरूपणें राम घालो ॥ म्हणे म्यां जो होता छंद घेतला ॥ तो शिवगुरूने सर्व पुरविला ॥ केला जगदोद्धार ॥ ६ ॥ जीव ब्रह्म ऐक्य लक्षण ॥ ज्यासी वेदान्त हे अभिधान ॥ तोचि जीवाचिये हितालागून ॥ प्रगटविला स्वमुखें ॥ ७ ॥ त्याहीवरी मुमुक्षूस गुरु मिळावा ॥ तरीच सच्छिष्य पावे स्वानुभवा ॥ यास्तव वरूही दिधला बरवा ॥ जिवाच्या कणवें ॥ ८ ॥ की जया जीवास येतांच अधिकार ॥ आणि मज गुरूसी आठवितां सत्वर ॥ मी गुरुरूपें प्रगटून अज्ञान अंधकार ॥ फेडीन तयाचा ॥ ९ ॥ आतां कोणतें शेष असे उरलें ॥ अदेय तें सर्वही शिवें दिधलें ॥ माझें वांछित मज पावलें ॥ झाले समाधान ॥ १० ॥ म्हणून तेणें निवांत बैसला ॥ पुढे प्रश्नही करूं विसरला ॥ आणि पुसि होतें त्यांतून उरला ॥ प्रश्न कोणता न स्मरे तो ॥ ११ ॥ परी शिवगुरूसी असे स्मरण ॥ की जीवाचें गतागंतीचे लक्षण ॥ पुसिलें होतें जें का येणें ॥ तें निरूपण नाहीं झालें ॥ १२ ॥ तस्मात् तेंचि आतां स्वयें आपण ॥ सांगावे जीवाच्या हिताकारणें ॥ कोणी म्हणेल याचें काय प्रयोजन ॥ मुख्य रूप कळल्यावरी ॥ १३ ॥ ऐशी कल्पना जरी कोणाची ॥ तरी सिद्धि व्हावी दृढापरोक्षाची ॥ साकल्यता सर्व कळावी जीवाची ॥ मिथ्या परी त्यागार्थ ॥ १४ ॥ जैसा जैसा त्याग उपजे ॥ तैशी तैशी दृढता लाहिजे ॥ जो जो अभिन्नता दृढ विराजे ॥ तों तो नासे देहबुद्धि ॥ १५ ॥ मिथ्याचि परी जाणिल्यावीण ॥ निरसेना हे भवबंधन ॥ तस्मात् गतागतीचें लक्षण ॥ अशेषत्वे कळावें ॥ १६ ॥ म्हणूनि रामाप्रति सदाशिव ॥ म्हणती ऐक बापा हे राघव ॥ तुज जरी प्रयोजनाचा अभाव ॥ परी जीवाचे हिता सांगतों ॥ १७ ॥ ऐसें ऐकतांचि वचन ॥ शिवासन्मुख केले मन कान ॥ आतां बोलेल में शिव निरूपण ॥ तें श्रोती अवधारावें ॥ १८ ॥ श्री भगवानुवाच - देहांतरगतिं तस्य परलोकगति तथा ॥ वक्ष्यामि नृपशार्दूल मत्तः श्रुणु समाहितः ॥ १ ॥ जीवाची देहांतर गति ॥ आणि तशीच परलोक प्राप्ति ॥ हे बोलेन शार्दूला एकाग्रचित्तीं ॥ मजपासून ऐकें ते ॥ १९ ॥ एक देह त्यागून दुसरा ॥ पावे कोण कैशिया शरीरा ॥ तैशाचि स्वर्गादि येरझारा ॥ कैशा कोण भोगी ॥ २० ॥ मागा जीवाचे रूप बोलिलें ॥ कूटस्थ चिदाभासत्व निवाडिलें ॥ त्यांत आभासासीच सर्व धर्म लागले ॥ गतागतीचे ॥ २१ ॥ कितेक मूढ ऐसें भाविती ॥ की आत्माच भोगितो यातायाती ॥ कारण की सत्यमिथ्याचनेणती ॥ निवडून बुद्धी ॥ २२ ॥ आत्मा भिन्न जीव निराळा ॥ कीं ऐकिला ना पाहिला डोळां ॥ उगाचि एकत्र सर्व तत्त्वांचा मेळा ॥ भावून दृढ बैसले ॥ २३ ॥ देहीं कोणी एक जीव आहे ॥ तो देहाहून अन्य देहा जाताहे ॥ स्वर्गादि गतिही पुण्ये लाहे ॥ पापें यमयातना ॥ २४ ॥ जयासी जीव आत्मा हे दोन्ही ॥ कळलेचि नाहींत सहसा मनीं ॥ ते मानिती सर्व संघालागूनि ॥ गतागती असे ॥ २५ ॥ जरी ऐकूनि जाणितलें ॥ की आत्मा जीव असती वेगळाले ॥ परी गतागती हे मानिते झाले ॥ मुख्य आत्मयासी ॥ २६ ॥ मेघगतीने चंद्रचि पळे ॥ मानिती जैसी मूढबाळें ॥ तेवीं बांधिले जे अज्ञान सांकळे ॥ ते म्हणती मुख्य आत्मया ॥ २७ ॥ हे यथार्थ साधकांसी कळावें ॥ यास्तव पूर्वी निवडिलें बरवें ॥ आतां कवणासी गतागती संभवे ॥ ती स्पष्ट करूं कळे ऐशी ॥ २८ ॥ घटीं जें आकाश पूर्ण व्यापलें ॥ तया गमन नाही हे पूर्वीच बोलिलें ॥ त्यांत पाणी असतां जें आकाश बिंबलें ॥ तेचि जात घटासवें ॥ २९ ॥ तेंही गेलियापरी वाटे चित्तीं ॥ तैसेचि जाणे येणे जीवाप्रति ॥ तस्मात् आभासही न जातां आरोपिती ॥ मा मुख्य आत्मा जाय कैसा ॥ ३० ॥ ऐसें नेणून बापुडे अज्ञान ॥ आत्मयासीच करिती आरोपण ॥ त्या आरोपाचें व्हावें निरसन ॥ म्हणोनिया बोलिजे ॥ ३१ ॥ जो या जीवें तिहीं अवस्थेचा ॥ मीच ऐसा अभिमान घेतला साचा ॥ तोचि भोक्ता झाला सुखदुःखाचा ॥ आणि पापपुण्याचाही कर्ता ॥ ३२ ॥ तोचि गतागतीतें पावे ॥ तेणेंचि देहांतर की परलोक भोगावे ॥ अज्ञाने आत्मयासी भिन्न पडावें ॥ यास्तव व्हावे नाना कष्ट ॥ ३३ ॥ आत्मा सर्वांहून सर्वसाक्षी ॥ भिन्न असूनि अवस्था लक्षी ॥ जो स्वानुभवें त्रिपुटीशीही उपेक्षी ॥ तो अभिमान घे कैसा ॥ ३४ ॥ असो सर्व संघामाजीं असूनी ॥ नातळेचि सर्व कर्मालागूनी ॥ घटी गगन जेवीं पूर्णपणी ॥ तेवीं सहज अलेप ॥ ३५ ॥ पूर्वाध्यायीं दृष्टान्त दिधला ॥ दीप जैसा अक्षयी संचला ॥ तैसा आत्मा सर्वत्री व्यापला ॥ तो आला गेला नाहीं कधीं ॥ ३६ ॥ तरी देहाभिमान घेतला जेणें ॥ त्यासीच संभवे जाणे येणें ॥ हे सत्य सत्य त्रिवाचा कोणें ॥ अन्यथा न मानावें ॥ ३७ ॥ तया जीवाची जे गतागति ॥ कैशी ते बोलिजे हे रघुपति ॥ नृपामाजी शार्दूल तूं भूपति ॥ श्रेष्ठ विष्णु म्हणूनि ॥ ३८ ॥ तूंचि सावधान ऐके म्हणितलें ॥ येणें मुमुक्षूप्रति सुचविलें ॥ की जीवगति त्यागून आत्मत्व लाधलें ॥ पाहिजे स्वानुभवें ॥ ३९ ॥ आत्म्याहून जीव वेगळा ॥ जो पडिला अज्ञान सांकळां ॥ तोचि पावतसे गती सकळा ॥ देहांतर की परलोकींच्या ॥ ४० ॥ ऐसेंचि समजून मिथ्या स्वभावें ॥ मिथ्याचे कर्म मिथ्यात्वे भोगावें ॥ आपण आत्मरूप निजांगें व्हावें ॥ अभिमान त्रय त्यागें ॥ ४१ ॥ असो आतां गतागति जीवासी ॥ देहांतरी की परलोकींची होय कैशी ॥ परलोकगति पुढे बोलिजे वाचेंसी ॥ आधीं देहांतरगति ऐक ॥ ४२ ॥ परी आरंभी या देहाचा त्याग ॥ होय तेव्हां देहांतर पावे मग ॥ तरी मरे कैसा काय होय वियोग ॥ आणि तया निमित्तकाय ॥ ४३ ॥ भुक्तं पीतं तदस्त्यत्र तद्रसादामबन्धनम् ॥ स्थूलदेहस्य लिंगस्य तेन जीवनधारणम् ॥ २ ॥ अन्नभक्षण उदकपान ॥ तेणें पिंडाचे होय पोषण ॥ तैसेंचि स्थूळाचें लिंगाचे दृढबंधन ॥ होय परस्परें ॥ ४४ ॥ पिण्ड पाटवता अन्नरसें ॥ तेणें प्राण संचरती देहासरिसे ॥ प्राणयोगें देह दृढ असें ॥ देह दृढत्वे प्राणासत्व ॥ ४५ ॥ तया प्राणामाजी इंद्रियांसहित ॥ लिंगदेह असे वावरत ॥ तया सूक्ष्मामुळे देह विचरत ॥ देहास्तव सूक्ष्म वसे ॥ ४६ ॥ देहासी अन्नपान अशन ॥ प्राणसंचारे होतमें पचन ॥ तो अन्नरस व्यापी शरीरी येऊन ॥ तेणें पोषण उभयांचें ॥ ४७ ॥ तस्मात् देहपाटवें प्राण वावरे ॥ प्राणसंचारें देहा पटुत्व खरें ॥ या रीती स्थूळ सूक्ष्म परस्परें ॥ धरिती एकमेकां ॥ ४८ ॥ या उभयांचें जें दृढबंधन ॥ येणेंचि होय जीवत्व धारण ॥ त्या बंधनासी अन्नपान प्रयोजन ॥ तस्मात अन्नचि वांचती ॥ ४९ ॥ तें अन्नचि जरी न खातां ॥ अथवा भक्षिलें तें न जिरतां ॥ सूक्ष्म त्यागू पाहे देहममता ॥ आणि स्थूळही क्षीण होय ॥ ५० ॥ व्याधिना जरया वापि पीड्यते जाठरो नलः ॥ श्लेष्मणा तेन भुक्तानं पीतं वाऽन पचत्यलम् ॥ ३ ॥ तरुण पणी नाना व्याधी ॥ वृद्धपणीं तो जरा बाधी ॥ तेणें अन्नचि न खाववे आधीं ॥ अरुचीमुळे ॥ ५१ ॥ तथापि बळेंचि खादलें ॥ परी ते पचेना अजीर्ण झालें ॥ तेणें अधिकाचि दुःख दुणावलें ॥ शरीर क्षीणत्वें ॥ ५२ ॥ शरीर सारे होतां क्षीण ॥ मंद पडतसे जठराग्न ॥ मंदाग्नीने नव्हे अन्नपचन ॥ शरीर क्षीण अन्न न जिरतां ॥ ५३ ॥ उभययोगें नाडीची दारें ॥ श्लेष्में दाटती अपार ॥ तेणें प्राण मोकळेपणे न वावरे ॥ तेव्हां रोग अधिक होती ॥ ५४ ॥ तस्मात् रोगें अन्न खाववेना ॥ खादलें तें सहसा पचेना ॥ तैसेचि रसपान करितां नाना ॥ पचतां विसर्ग होय ॥ ५५ ॥ भुक्तपीतरसेनैव देहं लिंपन्ति वायवः ॥ समीकरोति यस्मात्तत्समानो वायुरुच्यते ॥ ४ ॥ अन्नांचे न पचे जरी पोटीं ॥ तरी रस कैसा उद्भवे नेटीं ॥ रसाभावी शरीराची पुष्टि होईल कैशी ॥ ५६ ॥ तेणें मांसादि धातू शोषति ॥ रक्त रेतादि आटून जाती ॥ मांसेवीण त्वचा लोंवे निगुती ॥ चिरगुटापरी ॥ ५७ ॥ शिरा हाडे दिसती वरी ॥ शक्ति जाय कांप सुटे शरीरीं ॥ तस्मात् अन्नरसाचि शरीरा करी ॥ दृढत्वें पटुता ॥ ५८ ॥ अन्नरसेंचि देह लिंपत ॥ तेणें देहप्राणही टवटवीत ॥ शरीर पाटवें अन्न पचत ॥ प्राण देत पुष्टी देहा ॥ ५९ ॥ समीकरोति यस्मात्तत्समानो वायुरुच्यते ॥ तदानीं तद्रसाभावादामबन्धनहानितः ॥ ५ ॥ समानचि करितो म्हणूनी ॥ समान नाम प्राणालागूनी ॥ असो स्थळ लिंगाचें परस्परें कडूनीं ॥ बंधन जें होतें ॥ ६० ॥ तयाचे अन्नरसा वांचून ॥ बंधन होय निःशेष हनन ॥ तेणें लिंगदेह सहप्राण गमन करी ॥ ६१ ॥ परिपक्वरसत्वेन यथा गौरवतः फलम् ॥ स्वयमेव पतत्याशु तथा लिंगं तनोर्व्रजेत ॥ ६ ॥ जैनें फलासी गुरुत्व येतां ॥ परिपक्व अवघा रस होतां ॥ देठापासून पडे अवचिता ॥ तैसा लिंगदेह तनु सोडी ॥ ६२ ॥ जातें समयीं काय जातें ॥ आणि कोण कोणा घेऊन जाते ॥ तेंचि ऐकावी समस्ते ॥ मरणावस्था ॥ ६३ ॥ तत्तस्थानादपाकृष्य हृषीकाणां च वासनाः ॥ आध्यात्मिकाधिभूतानि हृत्पद्मे चैकतां गतः ॥ ७ ॥ वासना ज्या ज्या सर्व इंद्रियांच्या ॥ ज्या ज्या स्थानी असती साच्या ॥ त्या त्या स्थानापासून समयीं मरणाच्या ॥ एकत्र होती हृदयीं ॥ ६४ ॥ अध्यात्मिक म्हणावें इंद्रियां ॥ आधिभूत म्हणजे त्या त्याची क्रिया ॥ सर्वही येती कमळी हृदया ॥ वासनेसह ॥ ६५ ॥ अथवा त्रिधा शक्तीसी अध्यात्म नाम | आधिभूत पापपुण्यादि कर्म ॥ ते सर्व,मीनती वासनाग्राम ॥ एकत्र हृदयपद्मी॥ ६६ ॥ ततोध्वर्गः प्राणवायुः संयुक्तो नववायुभिः ॥ उर्ध्वोच्छ्वासी भवत्येष तथा तेनैकतां गतः ॥ ८ ॥ ते सर्व एकत्र झाले असतां ॥ हा जीवही मिळे त्या अतौता ॥ जैसे विहिरीचे पाणी अल्पसे उरतां ॥ प्रतिबिंबही त्या माजींच ये ॥ ६७ ॥ ऐसें एकत्र झालियावरी ॥ प्राण वायूत मिळती सारीं ॥ तोही उर्ध्वमार्गाने धरी ॥ नवही वायूंसहित ॥ ६८ ॥ तेव्हां प्राणियासी उर्ध्वश्वास लागे ॥ नाडीगत वायूंनी सोडिले जागे ॥ कंठापर्यंत येतांचि वेगें ॥ निघे नेत्रादि द्वारां ॥ ६९ ॥ चक्षुषो वाथ मूर्ध्नो वा नाडीमार्ग समाश्रितः ॥ विद्याकर्मसमायुक्तो वासनाभिश्च संयुतः ॥ ९ ॥ चक्षु आदि द्वारा की मूर्ध्नीद्वारीं ॥ नाडीमार्गाचा आश्रय धरी ॥ विद्याकर्मही मिळती सारीं ॥ वासनेसहित ॥ ७० ॥ चक्षु कर्ण मुख आदिकरून ॥ होय जरी प्राणाचें गमन ॥ तरी होईल नाना योनीस पावन ॥ मध्यम गती हे ॥ ७१ ॥ स्वर्गादिकांसही लागवेगें ॥ जाणे घडे चक्षुरादि मार्गे ॥ परी कर्मा ऐसें फळ पावे अंगें ॥ अन्यथा नव्हे ॥ ७२ ॥ अधोद्वारी गमन जरी होतां ॥ अधोगति होय नरकादि व्यवस्था ॥ अथवा कीटकादि नाना वृक्ष लता ॥ जीव होय चिरकाळ ॥ ७३ ॥ सुषुम्ना नाडीमार्गे मूर्ध्नी भेदून ॥ होय जरी अभ्यासें प्राणगमन ॥ उपासका तरी तो सत्यलोकासी पावोन ॥ ब्रह्मदेवासह सुटे ॥ ७४ ॥ हा क्रममुक्तीचा प्रकार ॥ पुढें निरूपिजेल सविस्तर ॥ असो पूर्वकर्मा ऐसें फळ अणुमात्र ॥ अन्यथा नव्हे ॥ ७५ ॥ कर्म म्हणिजेता हे कृतीसी ॥ विद्या म्हणिजेता हे जाणण्यासी ॥ त्रिधा भाग असती या उभयांसी ॥ उत्तमाधम मध्यम ॥ ७६ ॥ पापक्रिया तेचि अधम ॥ जाणोन अन्यथा करी कर्म ॥ तेणें पावे नरकादि धाम ॥ हीन बुद्धीस्तव ॥ ७७ ॥ यज्ञादि करणे या नांव कर्म ॥ विधान जाणणे त्या विद्या नाम ॥ अथवा देवता उपासन परम ॥ अग्नीत होमणे ते विद्या ॥ ७८ ॥ ऐसें कर्म विद्या दोनी ॥ जयाचे तो पावे स्वर्गभुवनीं ॥ आतां उत्तमगति होय जयाचेनी ॥ ते कर्म विद्या बोलूं॥ ७९ ॥ विद्या तेचि एकाग्र उपासन ॥ कर्म तेंचि योगाभ्यसन ॥ येणें सत्यलोकीं होय गमन ॥ क्रममुक्ति नाम जयेसी ॥ ८० ॥ असो विद्या कर्म ही प्रयाणकाळीं ॥ असती जीवसंघाचे मेळीं ॥ वासनाही सदृढ असे मुळीं ॥ त्यासह गमन जीवा ॥ ८१ ॥ येथे कोणी करील कल्पना ॥ कीं इतुक्या संघासह वासना ॥ राहे कैशी माजी प्राणा ॥ पाहतां तरी कांहीं न दिसे ॥ ८२ ॥ तरी याचे उत्तर ऐकावें ॥ मागें शुभाशुभ झालें बरवें ॥ किंवा घोकून जें पाठ करावें ॥ वेद काव्यादि ॥ ८३ ॥ तयाचा उच्चार न होतां ॥ तें राहतसें कोठे स्मरणही नसतां ॥ राहिलेंचि नाही म्हणों जरी आतां ॥ तरी उच्चारितां येतसें ॥ ८४ ॥ तैसे जें जें करणे असे अनुभूत ॥ तें तें मरणकाली वासनेत गुप्त ॥ असे म्हणून जन्मतांचि प्रगटत ॥ तो पूर्वाध्यास ॥ ८५ ॥ पहा पहा जन्म होतां क्षणीं ॥ चोखावें ऐसे सांगितले कोणीं ॥ तस्मात् वासना गुप्त राहे अवसानी ॥ प्राणामाजीं ॥ ८६ ॥ असो इतुके एकत्र मिळाले ॥ ते एक स्मरणांत सांठवले ॥ त्या स्मरणाचे विस्मरण झालें ॥ तेचि मरण ॥ ८७ ॥ प्रज्ञात्मानं समाश्रित्य विज्ञानात्मोपसर्पति ॥ यथा कुंभो नीयमानो देशाद्देशान्तरं प्रति ॥ १० ॥ प्रज्ञानात्म्याचा आश्रय करून ॥ विज्ञानात्मा करीतसे गमन ॥ जैसा कुंभ जाय देशांतरा देशाहून ॥ नेला असतां गगनहीं ॥ ८८ ॥ विज्ञानात्मा म्हणजे जीव ॥ प्रज्ञानात्मा ईश्वर स्वभाव ॥ ईश्वर पिण्डी कैसा स्वयमेव ॥ म्हणसी तरी बोलिजे ॥ ८९ ॥ बुद्धिवृत्तींत जें बिंबलें ॥ विषयमात्रांसी स्फूरवू लागलें ॥ तया जीवासी प्रेरीतसे वहिलें ॥ तें ईशचैतन्य ॥ ९० ॥ बरे अथवा वाईट कर्मी ॥ जीवाची स्फूर्तिरूप उठतां ऊर्मि ॥ त्या त्या ऐसाचि प्रेरणेने नेमी ॥ तें ईश्वरत्व ॥ ९१ ॥ येथे ही कल्पना होय कवणा ॥ की सर्व कर्मा ईश्वराची प्रेरणा ॥ तरी जीवाचिया पुरुष प्रयत्ना ॥ व्यर्थता आली ॥ ९२ ॥ तरी ऐकावें सावधान ॥ जो जीवें आरंभिला प्रयत्न ॥ त्या त्या प्रयत्नासी अनुकूल ईशान ॥ तस्मात् पुरुष प्रयत्नसिद्ध ॥ ९३ ॥ बुद्धीच हे कर्मानुसारिणी ॥ प्रवर्तत धर्म अधर्मा लागूनी ॥ त्या रीतीं योजी जीवातें अनुदिनीं ॥ ईश्वर अलिप्तत्वे ॥ ९४ ॥ तोचि ईश्वर प्रज्ञानात्मा ॥ त्याच्या आश्रयें जीव विज्ञानात्मा ॥ लिंग देहासवें सोडी देहधामा ॥ प्राणोत्क्रमण होतां ॥ ९५ ॥ जैसा देशाहून देशांतरा ॥ घट नेला असतां कोणें त्वरा ॥ लिंगदेह तैसा जात कर्मानुसारा ॥ अन्य देहाप्रति ॥ ९६ ॥ संपूर्ण एव सर्वत्र स आकाशोऽपि तत्र तु ॥ घटकाशाख्यतां याति तद्वलिंग परात्मनः ॥ ११ ॥ गगन सर्वत्री पूर्ण असून ॥ घटासवें घटांकाश करी गमन ॥ तैसा परमात्मा सर्वत्री असतां व्यापून ॥ जीव प्रतिबिंबा गमन लिंगासह ॥ ९७ ॥ गगनासि जाणे येणे नसतां ॥ गगनाभास भासे जो घटा अंतौता ॥ तयासी जाणे जिकडे घट जातां ॥ तैसा लिंगासवें जीव ॥ ९८ ॥ मुख्य आत्मा सर्वत्रीं संचला ॥ गमनागमन नसेचि तयाला ॥ जीव जो लिंगदेहीं बिंबला ॥ तो जाय त्यासवें ॥ ९९ ॥ तोचि वासनेसहित जीव ॥ लिंगदेहासह समुदाव ॥ गेला हा कैसा मानावा भास ॥ म्हणसी तरी बोलिजे ॥ १०० ॥ पुनर्देहांतरं याति यथा कर्मानुसारतः ॥ आमोक्षात्सचरत्येवं मत्स्यः कूलद्वयं यथा ॥ १२ ॥ पुनः दुसरिया देहा येतसे ॥ बोलिल्या रीती कर्म जैसे ॥ तस्मात् आमोक्षांत जीव संचरतसें ॥ जैसा दोहींकडे मत्स्य ॥ १ ॥ जोवरी अज्ञान निरसलें नाहीं ॥ अपरोक्षज्ञान नसे निःसंदेहीं ॥ तोंवरी मोक्षवार्ता सहसाही ॥ बोलूच नये ॥ २ ॥ ऐसा मोक्ष यावत् नाहीं झाला ॥ तो काल फिरणेंचि असे जीवाला ॥ अधोर्ध्व मध्यम गति तयाला ॥ न चुकेचि केल्या कर्माची ॥ ३ ॥ नदी प्रवाहींचा मासा ॥ यावज्जीव संचरे प्रवाहा ऐसा ॥ केव्हां ऊर्ध्व कधी खाली जाय तैसा ॥ जीवही संचरे ॥ ४ ॥ प्रवृत्ति ओघामाजी पडला ॥ तयास जाणेच अधोर्ध्व गतीला ॥ पुण्यकर्म तरी स्वर्गी चढला ॥ पाप तरी नीच योनि ॥ ५ ॥ मध्यम कर्में मनुष्यादि होत ॥ परी जीव हा वासनेसहित भ्रमत ॥ म्हणून देहांती मुक्ति जो प्रतिपादीत ॥ तो मंदमति जाणावा ॥ ६ ॥ जरी दुसऱ्या देहासी नच येता ॥ तरी पूर्वकर्मे आला कोण म्हणता ॥ हा पूर्वजन्मीं अमूक होता ॥ समंधादि प्रत्यक्ष बोलती ॥ ७ ॥ येणें माझें ऋण घेतले मागें ॥ यास्तव मी पीडा करीतसे अंगें ॥ आतां अमुक करितां मी सोडीन वेगें ॥ नातरी मी यास मारीन ॥ ८ ॥ ऐसें पूर्वजन्मीचें अद्भुत ॥ केलें तें होत असे अनुभूत ॥ तस्मात् मोक्ष जोवरी नव्हे प्राप्त ॥ तोंवरी योनि चुकती ना ॥ ९ ॥ हा देह तरी निःशेष निमाला ॥ दुसरा जंव नाहीं प्राप्त झाला ॥ तंव जीव हा कोठे राहिला ॥ म्हणसी तरी बोलिजे ॥ १० ॥ मध्य संधीसी मूर्छित असत ॥ जेवीं प्रतिदिनीं सुषुप्तीत ॥ अथवा स्वप्नापरी यमयातना भोगित ॥ एवं संधींत भास की मूर्छा ॥ ११ ॥ जीवसंघ जरी संघींत नसता ॥ तरी यमयातना भोग प्रत्यया न येता ॥ तस्मात् उभय देही संधींत पाहतां ॥ जीव असे सलिंग ॥ १२ ॥ वर्तमान देहीं जैसे कर्म केलें ॥ तें भोगावया अधोर्ध्व जाणे पडलें ॥ तेंचि पाहिजे आतां ऐकिलें ॥ अल्पसें बोलूं ॥ १३ ॥ पापभोगाय चेद्गच्छेद्यमदूतैराधिष्ठितः ॥ यातनादेहमाश्रित्य नरकानेव केवलम् ॥ १३ ॥ पापचि कर्म असे जयासी ॥ ते भोगावया जात यमपुरीसी ॥ मागेंचि यमदूत ताडीत तयासी ॥ नेती नरका ॥ १४ ॥ भासरूप लिंगदेहाचा ॥ आश्रय करून भोग हा पापाचा ॥ जीव भोगीतसे भास नरकाचा ॥ जैसें पाप तैसा ॥ १५ ॥ उर्ध्व गति ही स्वर्गाकडे ॥ पुण्य तरी भोगार्थ पवाडे ॥ तेही सारून पुनः पडे ॥ योनि भोगार्थ ॥ १६ ॥ इष्टपूर्तादिकर्माणि योऽनुतिष्ठति सर्वदा ॥ पितृलोकं व्रजत्येष धूममाश्रित्य बर्हिषः ॥ १४ ॥ वर्तमान शरीरी मनुष्ययोनि ॥ सर्वदां पुण्यकर्माची करणी ॥ इष्ट म्हणजे हुत नित्य नैमित्तिकपणीं ॥ पूर्त वापी तडागादिक ॥ १७ ॥ ऐशया कर्मे कामुकासी ॥ पितृलोकी गमन तयासी ॥ धूर्ममार्ग आश्रय जीवासी ॥ सांपडे का ऐसा ॥ १८ ॥ अथवा बर्हिष म्हणजे अग्नि ॥ पूजिला असे निशिदिनीं ॥ श्रौत स्मार्त रूप तें पुण्य सहगमनीं ॥ असे जीवाच्या ॥ १९ ॥ तेणें इंद्रलोकादि करून ॥ पुण्य भोगावया होय गमन ॥ कश्चित् पितृलोकीही होय वसन ॥ धूममार्गे जातां ॥ १२० ॥ तया धूममार्गाचे लक्षण ॥ कांहीं एक कीजे कथन ॥ जेणें पितृलोकींचे भोग भोगून ॥ क्षीण पुण्यें पडती ॥ २१ ॥ धूमाद्रात्रिं ततः कृष्णपक्षं तस्माच्च दक्षिणम् ॥ अयनं च ततो लोकं पितृणां च ततः परम् ॥ १५ ॥ पुण्यकर्म जो जीव आचरला ॥ तो जरी कृष्णपक्ष दक्षिणायनीं मेला ॥ रात्रीमाजी आणि धूम दाटला ॥ विस्मरण रूप ॥ २२ ॥ तरी तो पितृलोकींचा भोगून सोहळा ॥ अल्पकाळोंच जाय अन्य स्थळां ॥ तें पुढे बोलू परी धूम कैसा डोळां ॥ दाटे तो निरोपूं ॥ २३ ॥ मरणकाळी अंतरा आंत ॥ स्मरणरूप स्फूर्ति मावळत ॥ पुण्याभिमानही मिळे नेणपणांत ॥ नुसधा भ्रमचि होय ॥ २४ ॥ अंतरीं अंधकार दाटला ॥ बाहेर अंधदशा दृष्टीला ॥ ऐशिया रात्रीमाजी प्राण गेला ॥ कृष्णपक्षी दक्षिणायनीं ॥ २५ ॥ परी पूर्वकर्माचिये बळें ॥ पुण्यमार्गी ऊर्ध्व उफाळे ॥ पितृलोकीं जाऊन मिळे ॥ तेथील भोग घ्यावया ॥ २६ ॥ तेणें तरी इंद्रलोकी जावें ॥ परि दक्षिणायनामुळे त्या मुकावें ॥ पितृलोकी अल्पकाळ राहावें ॥ पुढे जावें अन्य स्थळां ॥ २७ ॥ चंद्रलोके दिव्यदेहं प्राप्य भुंक्ते परां श्रियम् ॥ तत्र चन्द्रमसा सोऽसौ यावत्कर्मफलं वसेत् ॥ १६ ॥ याहून ऊर्ध्व चंद्रलोक ॥ तेथें दिव्यदेह पावनि निष्टंक ॥ चंद्रलोकींची लक्ष्मी अनेक ॥ भोगीत असे ॥ २८ ॥ म्हणजे चंद्रासमान भोग घडती ॥ अमृतपानादिक जीवाप्रति ॥ यांवत् कर्मफल तोवरी वसती ॥ तया चंद्रलोकीं ॥ २९ ॥ तथैव कर्मशेषेण यथेतं पुनराव्रजेत् ॥ वपुर्विहाय जीवत्वमासाद्याकाशमेति सः ॥ १७ ॥ पुण्यकर्म अवघेचि सरलें ॥ किंचित् शेषमात्र असतां उरलें ॥ जैसे होते स्वर्गा गेले ॥ तैसे पुनः उतरत ॥ १३० ॥ चंद्रलोकी दिव्यदेह होता ॥ त्यासह भोगा झाला विसर्जिता ॥ जीवत्व पावून गगना अतौता ॥ आकाशरूप होऊनि राहे ॥ ३१ ॥ आकाशाद्वायुमाश्रित्य वायोरंभो व्रजत्यथ ॥ अद्भ्यो मेघं समासाद्य ततो वृष्टिर्भवेदसौ ॥ १८ ॥ आकाशापासून वायूचा आश्रय ॥ तेव्हां करी जीव वायूमय ॥ वायूपासून आपोमय होय ॥ तेथून पावे मेघदशा ॥ ३२ ॥ मेघापासून वृष्टी होतां ॥ वृष्टीरूपत्व जीव होय पावता ॥ पुढे पृथिवीवरी धारा पडतां ॥ सस्यादिकांवरी पडे ॥ ३३ ॥ ततो धान्यानि भक्ष्याणि जायते कर्मचोदितः ॥ योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः ॥ १९ ॥ पुढे मग होऊनि धान्य ॥ त्यापुढे भक्ष्यरूप होय अन्न ॥ परी तें कर्माचें जैसे प्रेरण ॥ मनुष्य की अन्य योनींचें ॥ ३४ ॥ तृणादिकी पडतां पशु भक्षिती ॥ सस्यादिकी तरी पुरुषदेहा येती ॥ अथवा स्थावरचि होऊन राहती ॥ कर्मा ऐसे उंच नीच ॥ ३५ ॥ स्थाणुमन्येऽनुसंयान्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥ ततोऽन्नत्वं समासाद्य पितृभ्यां भुज्यते परम् ॥ २० ॥ स्थाणु म्हणजे स्थावर झाले ॥ जैसे कर्म तैसें सुख पावलें ॥ अथवा स्थावरत्व होणे कर्में चुकले ॥ अन्न झाले जंगमाचें ॥ ३६ ॥ तेही अन्न पश्वादिकां चकवूनी ॥ आलिया मनुष्याचिये भोजनी ॥ ययाचे रक्त रेत होतां मैथुनीं ॥ गर्भास पावे ॥ ३७ ॥ ततः शुक्रं रजश्चैव भूत्वा गर्भोऽभिजायते ॥ ततः कर्मानुसारेण भवेत्स्त्रीपुन्नपुंसकः ॥ २१ ॥ स्त्री पुरुषीं तें अन्न भक्षितां ॥ जीव पावे रक्तरेतता ॥ ते उभयगर्भी एक मीनतां ॥ गर्भाकार होय ॥ ३८ ॥ तेथेही कर्माऐसे घडावें ॥ स्त्री पुरुष की नपुंसक व्हावें ॥ हे अष्टमी बोलिलें आघवें ॥ यास्तव येथे आटोपिलें ॥ ३९ ॥ एवं जीवगतिःप्रोक्ता मुक्तिं तस्य वदामि ते ॥ रामा अससी की सावधान ॥ इहपर जीवगति केली कथन ॥ आतांक्रममुक्ति होय जीवालागून ॥ तो अर्चिरा मार्ग बोलूं ॥ १४० ॥ हे गतागति ही जरी बोलिली ॥ अज्ञान जीवासी भ्रांतीस्तव झाली ॥ जया साधके मिथ्यात्वे ओळखिली ॥ आपुलिया स्वानुभवें ॥ ४१ ॥ तयाची ग्रंथि ऐक्यत्वे तुटली ॥ तरी मरणाचीही सीमा ओलांडिली ॥ त्याची गतागति तो निःशेष मावळली ॥ परलोक गतीही त्या नसे ॥ ४२ ॥ दक्षिणायन की उत्तरायण ॥ शक्ल कृष्णपक्ष की रात्रदिन ॥ स्मरणीं की विस्मरणी होय अवसान ॥ तरी तया काज नाहीं ॥ ४३ ॥ तो देशी अथवा विदेशीं ॥ कुग्रामी की मरो काशीसी ॥ हें पुढें बोलिलें असे या समयासी ॥ अल्पसे निवेदिलें ॥ ४४ ॥ असो पुढे बोलावयाचा ॥ प्रसंग असे क्रममुक्तीचा ॥ तोचि प्रकार अज्ञ कर्मयोगियाचा ॥ साधके येथे त्या विश्वासूं नये ॥ ४५ ॥ असो रामा ईश्वरोपासकाची ॥ कथा बोलिजे क्रममुक्तीची ॥ अवधानता असावी श्रोतयांची ॥ विचारद्वारा ॥ ४६ ॥ यस्तु शान्त्यादियुक्तः सन्सदा विद्यारतो भवेत् ॥ २२ ॥ जो पुरुष शांतयुक्त होत्सातां ॥ अनन्य भावें विद्यारत चित्ता ॥ तोचि पावेल क्रममुक्तता ॥ न यज्ञादि कर्मे ॥ ४७ ॥ काम्य म्हणजे फलाशेचें ॥ निषिद्ध तें करणें अन्यअन्याचें ॥ ही दोनीही त्यागून विहित कर्माचें ॥ आचरण जया ॥ ४८ ॥ स्वर्गादि फलेच्छा त्यागून ॥ शांत केलें अंतःकरण ॥ नित्य नैमित्तिक स्वधर्मा चरण ॥ लोकरीतीं संरक्षी ॥ ४९ ॥ मन मात्र स्थिर व्हावया ॥ हटयोगादि करीतसे क्रिया ॥ वायुजय करूनि वृत्तीसीया ॥ शांतापरी केलें ॥ १५० ॥ शांतापरी कां म्हणितलें ॥ तरी यथार्थ शांत नाही झाले ॥ उगोंच बलात्कारें आंवरिलें ॥ हटें निग्रहिले मन ॥ ५१ ॥ ते यथार्थ शांति व्हावया ॥ अभेदज्ञान पाहिजे रामराया ॥ ते मागें बोलिली प्रसंगे पुढाचिया ॥ बोलेन प्रकर्षे ॥ ५२ ॥ परी हे कर्मयोगियाची शांति ॥ दांत खावून उपरम करिती ॥ विषय त्यागून दमही साधिती ॥ अविवेकयुक्त वैराग्यें ॥ ५३ ॥ ऐसें ज्ञान नसतां उपरम विरक्ति ॥ जे का हटयोग बळें साधिती ॥ ते कर्मयोगी क्रममुक्तिस पावती ॥ परी विघ्ने असतीं बहु तया ॥ ५४ ॥ विद्यारतही जे बोलिले ॥ तिहीं उपासनेसी दृढ साधिलें ॥ ध्यान भजनीं तत्पर झाले ॥ सगुणाच्या ठायीं ॥ ५५ ॥ इहलोक भोग विसर्जिला ॥ लोकवांच्छा ठेवून बैसला ॥ एकाग्रशांत जरी राहिला ॥ आमरण वरी ॥ ५६ ॥ ऐशी शांति आणि उपासना ॥ जरी योषाजारापरी सदृढ मना ॥ तरीही मरणकाळी असावें स्मरणा ॥ नातरी अन्यथा होय ॥ ५७ ॥ आणिकही उत्तरायणादि प्रकार ॥ पुढे बोलावयाचा असे विस्तार ॥ इतुका साधे उणे नसतां अणुमात्र ॥ तोचि पावे क्रममुक्ति ॥ ५८ ॥ स याति देवयानेन ब्रह्मलोकावधि नरः ॥ अर्चिर्भूत्वा दिनं प्राप्य शुक्लपक्षमथो व्रजेत् ॥ २३ ॥ तो योगी उपासनारत ॥ निग्रहित शांत जयाचें चित्त ॥ तो अंतसमयीं दिव्यदेह पावत ॥ देह विमानारूढ होय ॥ ५९ ॥ पुढे अनुक्रमें सूर्यादि लोक ॥ तेथें वसावें दिन अमुक अमुक ॥ ते ते ओलांडून एक एक ॥ शेवटीं ब्रह्मलोकी नर जाय ॥ १६० ॥ आतां मरणकाळी काय काय असावें ॥ आधी सूर्यरश्मीसी हृदय संलग्न व्हावें ॥ तें अर्चिरूंप सहज स्वभावें ॥ वरुती विशेष स्मरण ॥ ६१ ॥ ध्यानाचा तरी पहिलाचे अभ्यास ॥ स्मरणरूप राहे निदिध्यास ॥ संतुष्टरूप असे मानव ॥ वैराग्योपरमें ॥ ६२ ॥ म्हणोन स्मरण अंतकाळी उठतसें ॥ ज्योतिर्मयेंचि वृत्ति प्रकाशे ॥ तेणें अंधारे नव्हेचि अल्पसें ॥ उपासना बळें ॥ ६३ ॥ त्याहीवरी जरी अभ्यास योगाचा ॥ तरी प्राणवायु मार्ग धरी सुषुम्नेचा ॥ बलात्कारें कपालत्रयाचा ॥ भेद करून निघे ॥ ६४ ॥ उपासकांसी योगाभ्यासही नसतां ॥ अन्यथा गती नव्हे तत्त्वतां ॥ अयन पक्ष दिनादिकांच्या देवता ॥ ज्या अतिवाहक देवयान मार्गी ॥ ६५ ॥ त्या तयासी होतां प्राणोत्क्रमण ॥ स्व स्व स्थळी नेती क्रमकडून ॥ रात्र्यादि देवतांचे न पाहतां वदन ॥ तो ब्रह्मलोकास जाय ॥ ६६ ॥ उत्तरायणमासाद्य संवत्सरमथो व्रजेत् ॥ आदित्यचंद्रलोको तु विद्युल्लोकमतः परम् ॥ २४ ॥ दिन शुक्लपक्ष आणि मास ॥ यांच्या देवता पोचविती त्यास ॥ क्रमें उत्तरायण आणि संवत्सर देवतेस ॥ तेथून आदित्य चंद्र विद्युल्लोका पावे ॥ ६७ ॥ अर्चिरूप तो स्वयेंचि असून ॥ दिनादिकांच्या देवतांप्रति पावून ॥ संवत्सर देवतेसीही उल्लंघून ॥ आदित्यादि लोकी जाय ॥ ६८ ॥ तेथून जातसे ब्रह्मलोका ॥ गोलिया ज्योतिरूप देह पावे निका ॥ दिव्य विमानारूढ होय परी ऐका ॥ कालक्रम गतीचा ॥ ६९ ॥ एका मासे सूर्यलोका जातसे ॥ तेथील दिव्यभोग भोगीतसे ॥ तेथून क्रमांचे पावतसे ॥ विद्युल्लोकासी ॥ १७० ॥ विद्युल्लोकीचे भोग भोगून ॥ काही काळ तेथे राहून ॥ उपासक करीतसें गमन ॥ पुढील लोकीं ॥ ७१ ॥ म्हणजे तपोलोका जात ॥ पुढे क्रमेंचि अव्याहत ॥ ब्रह्मलोक पावे सतत ॥ जेथून अपुनरावृत्ति ॥ ७२ ॥ अथ दिव्यः पुमान्कश्चिब्द्रह्मलोकादिहैति सः ॥ दिव्ये वपुषि संधाय जीवमेवं नयत्यसौ ॥ २५ ॥ ब्रह्मलोकासी गलियावरी ॥ पुरुष दिव्यदेह पावे निर्धारीं ॥ तो मानवदेह पावून माघारी ॥ मृत्युलोका न येचि ॥ ७३ ॥ पंचाग्नि विद्योपासक की कर्मयोगी ॥ परतोन शुचि श्रीमान की योगिकुळी जगीं ॥ जन्मोनि अपरोक्ष ज्ञान लाहती अंगीं ॥ जेणें जीवन्मुक्ति सुख होय ॥ ७४ ॥ असो जे पुनरावृत्तीस नाही आले ॥ त्यासी चतुरानन मुखें ज्ञान लाधलें ॥ परी यावत् ब्रह्मा तो काल राहणे पडिलें ॥ दिव्य देह धरूनी ॥ ७५ ॥ ब्रह्मलोके दिव्यदेहे भुक्त्वा भोगान्यथेप्सितान् ॥ तत्रोषित्वा चिरं कालं ब्रह्मणा सह मुच्यते ॥ २६ ॥ ब्रह्मलोकी दिव्य देह असतां ॥ भोगा भोगी जे जे इच्छिता ॥ चिरकाल तेथें वसत होत्सातां ॥ ब्रह्मदेवासह सुटे ॥ ७६ ॥ दिव्य देह तीन प्रकारी ॥ पावतसे सत्यलोका माझारीं ॥ लोकीं राहणे ते सलोकता निर्धारी ॥ समीप राहणे ते समीपता ॥ ७७ ॥ तिसरा ब्रह्मदेवाचे समान ॥ देह पावे जैसा दुजा चतुरानन ॥ तया देहे ईप्सित भोग आदि विमान ॥ भोगून आकल्प रहावें ॥ ७८ ॥ परी या राहण्याशी मुक्ति म्हणूं नये ॥ कारण की अज्ञानाचा नव्हे क्षय ॥ अपरोक्ष ज्ञान जेधवां होय ॥ तेव्हांच मुक्ति ॥ ७९ ॥ तें अपरोक्ष ज्ञान ब्रह्मदेवामुखें ॥ होतां समरस अद्वैताचेनि सुखें ॥ म्हणून क्रममुक्ति बोलिली मुखें ॥ परंपरा द्वारा श्रतिही ॥ १८० ॥ ब्रह्मदेव जेव्हां देह विसर्जी ॥ तेव्हांचि याची उपाधि सहजीं ॥ हरतसे सरेना सध्या आजी ॥ म्हणून क्रममुक्ति बोलावी ॥ ८१ ॥ ध्यानयोगें ज्ञान पावावें ॥ ज्ञान होतांचि मुक्त व्हावें ॥ केवळ क्रियायोगें सुटिका संभवे ॥ हे घडेचिना ॥ ८२ ॥ तस्मात् ऐशिया क्रममुक्तीशी ॥ मुमुझें विश्वासू नये मनासी ॥ सध्याचि शरण जाऊनि गुरूसी ॥ ऐक्यज्ञाना संपादावें ॥ ८३ ॥ पहा पहा या क्रममुक्तीतें ॥ आधीं कालांतर केवढे पहा तें ॥ आणि यास विघ्नहीं होती बहुते ॥ म्हणोन हे अतिकष्ट ॥ ८४ ॥ त्यापुढे कामादिकांचे तरंग ॥ तयांचा विवेकेवीण नव्हे भंग ॥ वैराग्य उपरमें तुटला वाटे संग ॥ परी निःशेष हानि नव्हे ॥ ८५ ॥ तथापि हटें उपरम साधिला ॥ आणि अंतकाळी जरी विसरला ॥ तरी मग तो पावे अन्य योनीला ॥ हेही विघ्नचि ॥ ८६ ॥ अथवा स्मरणही अभ्यासें राहिले ॥ दिन उत्तरायणादि जरी चुकलें ॥ तरी ते क्रममुक्तिफळ अंतरले ॥ अव्हांटा पडले जाऊनी ॥ ८७ ॥ कदाचित् इतुकेंही साधूनी ॥ पावला जरी सत्यलोका लागूनी ॥ तरी पुनरावृत्ति होय तेथूनी ॥ मग योगीकुळी जन्म ॥ ८८ ॥ पुढे अपरोक्षज्ञान व्हावें ॥ इतुकें फिरून पुनः येथेचि यावें ॥ तरी आतांचि कां न संपादावें ॥ जीवन्मुक्तिसुख येच देहीं ॥ ८९ ॥ आतां सत्यलोकींच राहून ॥ ज्यास होय अपरोक्षज्ञान ॥ परी जीवन्मुक्तीसुख न होय पूर्ण ॥ अज्ञानामुळे ॥ ९० ॥ कल्पांत काळी ब्रह्मी मिळे ॥ तेव्हां तें सुख कोणाचे देखती डोळे ॥ तस्मात् याचि देहीं जीवन्मुक्ति सोहळे ॥ पावावे हे उत्तम ॥ ९१ ॥ उपासना योगें अंतःकरण स्थिर ॥ होतां येतसे ज्ञानाधिकार ॥ तें सांडून मंदप्रज्ञ पामर ॥ कालांतरा इच्छून मरती ॥ ९२ ॥ मुमुक्षे ऐसें न करावें ॥ लोकेषणेसी अगत्य त्यागावें ॥ येचि देहीं अपरोक्ष साधावें ॥ गुरुमुखें कडूनी ॥ ९३ ॥ येचि देहीं येणेंचि डोळां ॥ न भोगिजे मुक्तीचा सोहळा ॥ तरी वैराग्य उपरमाचे मेळा ॥ कासया पडावें ॥ ९४ ॥ एक अपरोक्ष ज्ञान झालिया ॥ उपरम शांति आदि करूनिया ॥ न जातीच जरी दवडिलिया ॥ जीवन्मुक्ति सुखासह ॥ ९५ ॥ तस्मात् क्रममुक्तीचाही प्रकार ॥ त्यागार्थ बोलिला सविस्तर ॥ यासी मुमुक्षूचा नव्हे अधिकार ॥ येर जावोत बापुडे ॥ ९६ ॥ अगा रामराया जीवाची गति ॥ कर्मानुसार सांगितली तुजप्रति ॥ कर्मेकडून पितृलोकादि प्राप्ति ॥ क्रममुक्ति विद्यायोगें ॥ ९७ ॥ येथे कोणी विरोध मानिती ॥ की मागां बोलिली उत्तमाधम गति ॥ तिन्ही गुणांसीही कर्मविद्या साह्य असती ॥ आतां भिन्नत्वं निरूपितां ॥ ९८ ॥ तरी ऐकावें सावधान ॥ अन्यथा जें जें क्रियाचरण ॥ तया अकर्मास सत्कर्म म्हणून ॥ मुळीच नांव नाहीं ॥ ९९ ॥ आणि निष्कर्मपणे जो वावरे ॥ तदाचरणाही कर्म न म्हणावें बारे ॥ तस्मात् यज्ञादि नित्य नैमित्तिका उत्तरें ॥ कर्म म्हणूनि असती ॥ २०० ॥ तैसेंचि जाणिल्यावीण कांहीं नव्हे ॥ परी अन्यथा ज्ञाना विद्या न म्हणावें ॥ आणि ऐक्यविज्ञानाही न संभवे ॥ विद्या हे नाम ॥ १ ॥ तस्मात् उपासनेसीच विद्या नाम ॥ यज्ञादिकां म्हणावें कर्म ॥ मागां बोलिले भाव उत्तमाधम ॥ परी ते विवक्षा वेगळी ॥ २ ॥ क्रियामात्र तें कर्म बोलिजे ॥ जाणनियासी विद्या नाम साजे ॥ परी तारतम्य पाहतां होय सहजें ॥ निवाडा भिन्नभिन्न ॥ ३ ॥ असो विरोध नाहीं तारतम्यासी ॥ निरूपणाची विवक्षा जैसी ॥ तैसें बोलणे लागे त्या समयासी ॥ हे विचारें पहावें ॥ ४ ॥ यज्ञादि कर्मे स्वर्गादि प्राप्ति ॥ परी कर्मक्षीणे पुनरावृत्ति ॥ तें सांगितली जीवाची गति ॥ मध्यम प्रकारें ॥ ५ ॥ त्यावरी विद्यारूप उपासनेनें ॥ क्रममुक्ति जीवें पावणें ॥ ही सांगितली उत्तमगतीची लक्षणे ॥ अर्चिरा मार्गींची ॥ ६ ॥ हे उत्तमगति जरी बोलिली ॥ परी हे प्रवृत्तीची पाहिजे कळली ॥ निवृत्तीची गोष्ट नाही केली ॥ या तिहीहून ते विलक्षण ॥ ७ ॥ असो कर्मविद्येचे प्रकार दोन ॥ त्यांचे फळ सांगितले भिन्नभिन्न ॥ परी तिसरें जें उभयविहीन ॥ केवळ अकर्मी अविद्य ॥ ८ ॥ ते प्रयाणकाळी यमलोका जाती ॥ ऐसें बोलिलें परी त्याची पुढे काय गति ॥ तें निरूपण राहिले जे निगुती ॥ तें अल्पसे सांगू ॥ ९ ॥ विद्याकर्मविहीनो यस्तृतीयं स्थानमेति सः ॥ भुक्त्वाऽत्र नरकान्घोरान्महारौरवरौरवान् ॥ २७ ॥ विद्याकर्म विहीन जे नर ॥ ते पावती यमलोक मंदिर ॥ तेथें रौरव नर्कादिक घोर ॥ कर्मा ऐसे भोगिती ॥ २१० ॥ विद्या म्हणजे नाही उपासन ॥ कर्म म्हणजे नाहीत केले यज्ञ ॥ ते पितृलोकादि सत्यलोकाहून ॥ यमलोकी तिजे स्थाना जाती ॥ ११ ॥ तेथील कुंभपाकादि भोग भोगून ॥ यमदूतीं ढकलितां पावती पतन ॥ शेष पातक नीच योनीशी जनन ॥ होत असे मागूतीं ॥ १२ ॥ पश्चात्प्राक्तनशेषेण क्षुद्रजन्तुर्भवेदसौ ॥ यूकामशकदंशादि जन्मासौ लभते भुवि ॥ २८ ॥ नरक भोगिल्या नंतर ॥ शेष प्रारब्ध भोगार्थ नर ॥ अलिका मशक दशादि योनि क्षुद्र ॥ तेथें तो जन्म पावे भुवि ॥ १३ ॥ आतां रामा गतित्रयाहून ॥ ज्ञानी जीवाची गति जे विलक्षण ॥ तिचें करूं तुजलागीं कथन ॥ अल्प वचनीं संकेतें ॥ १४ ॥ शुद्धब्रह्मरतो यस्तु न स यात्येव कुत्रचित् ॥ तस्य प्राणा विलीयन्ते जले सैन्धवखिल्यवत् ॥ २९ ॥ शुद्धब्रह्मरत जो होय ॥ तो तिहीं स्थळांतून कोठेही न जाय ॥ तरी ज्याचे प्राणचि जेथील तेथें लय ॥ पावती सैंधव पिंडापरी जळीं ॥ १५ ॥ ऐक शुद्ध ब्रह्माचे लक्षण ॥ जे का सच्चिद्घनानंद अनंत पूर्ण ॥ देश काल वस्तु परिच्छेदविहीन ॥ आणि त्रिविध भेदातीतही ॥ १६ ॥ जेथें मायेचा नसे विकार ॥ म्हणोन ज्यास शुद्ध बोलिजे साचार ॥ तेवीं जग देहादिकांचा स्पर्श अणुमात्र ॥ जयास नाहींच नाहीं ॥ १७ ॥ ऐसें में शुद्ध परब्रह्म ॥ तेंचि जीवाचें निजरूप परम ॥ जयास अस्ति भाती प्रिय हे नाम ॥ पर्यायाने बोलिती ॥ १८ ॥ तेथें जो का रत जाहला ॥ म्हणजे दुजेपणेंवीण ब्रह्मात्मा संचला ॥ तयाची गति सांगू तुजला ॥ कीं तो कोठे जाय ॥ १९ ॥ तरी तयासी नाही जाणे येणें ॥ जैसे घटाकाश घटींच राहणें ॥ घट फुटतां जेथील तेथें असणे ॥ महदाकाशरूपें ॥ २० ॥ तेणेंचिरीती जयाचे प्राण ॥ जेथील तेथे होऊन लीन ॥ ब्रह्मरूपी होतसें मेलेन||आयासरहित सहज ॥ २१ ॥ जैसें लवण सिंधूंतून निघालें ॥ पुनः सिंधूमाजी समावलें ॥ सिंधुरूपचि होऊन ठेलें ॥ तेवींच हा ही ब्रह्मरूप ॥ २२ ॥ असो यावत् काळ देहामाजी प्राण ॥ तोवरी तया सृष्टीचें केवी दर्शन ॥ होत असे तयाचें निरूपण ॥ अवधारी अल्प ॥ २३ ॥ स्वप्नदृष्टा यथा सृष्टिःप्रबुद्धस्य विलीयते ॥ ब्रह्मज्ञानवतस्तददिलीयन्ते तदैव ते ॥ ३० ॥ जैसी स्वप्नीं कल्पित सृष्टिदिसे ॥ ते जागेपणी समूळ नासे ॥ ब्रह्मात्मज्ञानियाजगताचे पिसें ॥ तेणेंचि परी वाव ॥ २४ ॥ एवं जीवगतिः प्रोक्ता किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ या प्रकारेंकडून रघुपति ॥ यथाविधि सांगितली जीवगति ॥ आतां काय काय ऐकू इच्छिसी चित्तीं ॥ कोणते रीती आणिक ॥ २५ ॥ दशमाचिया आरंभासी ॥ त्वां पुसिलें होतें जें मजसी ॥ तें तें सांगितले निश्चयेंसी ॥ कांही संशय नुरतां ॥ २६ ॥ जीव हा मजहून नव्हे भिन्न ॥ मुख्यरूप जो मी सच्चित्घन ॥ त्या माझें प्रतिबिंब पडले वृत्तींत जाण ॥ तया आभास नाम जीव ॥ २७ ॥ तो जो आभासचि मी म्हणूनि ॥ ग्रहण करी मुख्य आत्मया नेणूनि ॥ त्या अज्ञानेंचि पडिलें बंधनी ॥ जन्ममृत्यूच्या सारे ॥ २८ ॥ तरी या जीवाने सुटावें कैसें ॥ तें सांगितले की मी ब्रह्म धरावें मानसें ॥ त्याहून अन्य जें जें द्वैत पिसें ॥ मिथ्या म्हणन त्यागावें ॥ २९ ॥ ईश्वर जैसा या जगांत ॥ आपणामाजी जगातें पहात ॥ तेवींच जीवेंही पहावें निश्चित ॥ आत्म्यांत जग जगी आत्मा ॥ २३० ॥ परी आधीं विवेचन घडावें ॥ निवडिल्यावीण कोणा मी धरावें ॥ यास्तव सांगितले असे अघवें ॥ तत्त्वझाडा करूनि ॥ ३१ ॥ पुढे जीव आत्मा एकत्र जे झाले ॥ तेही सविशेष निर्विशेष निवडले ॥ जीवत्व मिथ्या दाऊन आणिलें ॥ शुद्ध आत्मत्व प्रत्यया ॥ ३२ ॥ येणे रीती साधकजनीं ॥ ब्रह्म होणे निजांगेंकडूनि ॥ हे दशमी मी बोलिलें निर्वाणवचनीं ॥ गूढ तेंही प्रगटविलें ॥ ३३ ॥ नंतर अज्ञान जीवाची कैशी गति ॥ देह त्यागितां कोठें जाती ॥ ते सर्व सांगितली या अध्यायाप्रति ॥ गति उत्तमाधममध्यम ॥ ३४ ॥ कोणी ऐसें जें होतें मानिलें ॥ की देह मरतां पुनः नाहीं जन्मलें ॥ फुटलें तें फुटोनिच गेलें ॥ मडके जैसें ॥ ३५ ॥ याचेही दिधलें प्रसंगें उत्तर ॥ की वासनात्मकें गुंतलें जीव अपार ॥ मडक्यांत वासना नाही अणुमात्र ॥ म्हणोन तें पुनः जन्मेना ॥ ३६ ॥ तैसें येथें जीवा असे कोठे ॥ वासनेने मी धरिलें नेटें ॥ तें अनंत जन्म होतां न सुटे ॥ सुषुप्ती परी मेलियाही ॥ ३७ ॥ पापाभिमाने नरका जाती ॥ पुण्ये स्वर्गी चढून पडती ॥ उपासना योगें पावती क्रममुक्ति ॥ एवं हे गति त्रिप्रकारें ॥ ३८ ॥ तस्मात् मोक्ष नाहीं ज्ञानवीण ॥ हे सत्य सत्य सत्य गा प्रमाण ॥ तरी जीवें साधावें ऐक्यज्ञान ॥ सुटिका व्हावी जरी वाटे ॥ ३९ ॥ असो येणें प्रकारे तुजला ॥ जीवाचा वृत्तान्त सांगितला ॥ आतां काय अपेक्षा असे चित्ताला ॥ श्रवण करण्याची ॥ २४० ॥ ऐसें ऐकतांचि राम अंतरीं ॥ आदि अंत पाहून विचार करी ॥ आतां कोणती उरली असे उरी ॥ यया निरूपणीं ॥ ४१ ॥ या निरूपणाचें जो श्रवण ॥ स्वानुभवें करील आपण ॥ वरूती खाली अभ्यासेकडून ॥ तरी निश्चयें अभिन्न होय ॥ ४२ ॥ सत्य मिथ्याही निवडलें ॥ आत्मत्व तरी पूर्ण संचलें ॥ ऐसें जाणती ते सहज जाती सुटले ॥ तरी आतां सरले पुसणें ॥ ४३ ॥ मागुती विचार करी रघुपति ॥ की संशयाची रूपें बहुत असतीं ॥ तितुकीं सांगितल्यावीण मंदमति ॥ संशय त्यागिती ना ॥ ४४ ॥ अनेक ग्रंथांचे अनेकधा कथन ॥ अनेकधा जनाचेही भाषण ॥ तितुकीयाचे व्हावें खण्डन ॥ तस्मात् पुसों गुरुदेवा ॥ ४५ ॥ कामधेनु सदनीं आलिया ॥ कामनेची वाणी कासया ॥ तेवीं गुरुमाय आली ओळोनिया ॥ तरी इच्छित कां न पुसावें ॥ ४६ ॥ येथन चवदावे अध्याया पर्यंत ॥ संशय छेदार्थ प्रश्न समस्त ॥ राम करील त्याची उत्तरें उमाकांत ॥ देईल स्वमुखें ॥ ४७ ॥ परी आतां प्रस्तुत अवधारा ॥ राम काय प्रश्न करील गिरा ॥ त्या प्रश्नोत्तरांचा अर्थ सांठवून अंतरां ॥ निःसंदेह व्हावें साधकें ॥ ४८ ॥ श्रीराम उवाच - भगवन्यत्त्वयाप्रोक्तं फलं तज्ज्ञान कर्मणोः ॥ ३१ ॥ ब्रह्मलोके चंद्रलोके भुंक्त भोगानिति प्रभो ॥ हे भगवन तुम्ही बोलिलां वाचें ॥ फळ जें विद्या आणि कर्म उभयांचें ॥ कर्मे चन्द्रलोका जाणे ब्रह्मलोकाचें ॥ स्थान उपासना विद्येनें ॥ ४९ ॥ चन्द्रलोकी भोग भोगूनी ॥ पावती जन्म मृत्युलोकी कर्मक्षीणीं ॥ ब्रह्मलोकीं भोग भोगीत असूनी ॥ ज्ञान पावूनी मुक्त होती ॥ २५० ॥ येणे प्रमाणे कर्मविद्येकडूनी ॥ हे प्रभो जीवगति सांगितली वचनीं ॥ केवळ त्यागार्थ बोलिलें साधकालागनी ॥ की सद्यमुक्ति वरावी ॥ ५१ ॥ तरी येणे रीती आचरतील ॥ साधक गुरुवचनें निवतील ॥ येचि देहीं मुक्तता पावतील ॥ जया अत्यंत चाड ॥ ५२ ॥ परी आता असे एक विनंती ॥ ते करीन ऐकोन प्रश्नोक्ति ॥ उत्तर द्यावें जी तैसें मजप्राति ॥ जेणें संशय नुरे जीवा ॥ ५३ ॥ गंधर्वादिषु लोकेषु कथं भोगः समीरितः ॥ ३२ ॥ गंधर्वादि लोकांच्या ठायीं ॥ कैशी कैशी भोगाची नवाई ॥ ते सांगावी मज आतां ये समयीं ॥ जीवाचिये हिता ॥ ५४ ॥ गंधर्वादि लोकांचे भोग ऐकतां ॥ काय होतसे जीवाचे हिता ॥ ऐसें जरी कोणी कल्पील चित्ता ॥ तरी बोलिजे ॥ ५५ ॥ सगट भोग समान असती ॥ किंवा एकाहून एक आधिक स्थिती ॥ हे तारतम्य कळतां जीवापात ॥ नापेक्षिती तया सुखा ॥ ५६ ॥ श्रोत्री ज्ञानियांचे सुख केवढें ॥ न जाणतीच हे जीव बापुडे ॥ ही इतर सुखें जया सुखापुढे ॥ तृणतुच्छ होती ॥ ५७ ॥ मानुषानंदापासून ॥ आधिकाधिक शतशतगुण ॥ ब्रह्मया पर्यंत असतीं सखें संपूर्ण ॥ परी श्रोत्री सुखांत अंतर्भूत ॥ ५८ ॥ ही सुखें सातिशय एकाहून एकें ॥ पाहतां एकाचें एक होय फिकें ॥ मुळी देवादिकाच शंकती पराधिकें ॥ तेथें कामका सुख कैचें ॥ ५९ ॥ ऐसें असून जे इच्छा करिती ॥ कृत्रिम सुखाची ते मंदैमती ॥ तयाचे वृत्तीस व्हावी विरक्ति ॥ ऐसें बोलावें गुरुदेवा ॥ २६० ॥ आपुलें स्वसुख में अति वाड ॥ तेथेंचि जीवांचा व्हावा पंवाड ॥ येर ही सुखें निकृष्ट द्वाड ॥ नाशिवन्त कळावीं ॥ ६१ ॥ आणिकही असा प्रश्न असे माझा ॥ तोही ऐकूानियां समजा ॥ मग तयाचे उत्तर महाराजा ॥ जैसें असें तैसें द्यावें ॥ ६३ ॥ देवत्वं प्राप्नुया कश्चित्कश्चिदिन्द्रत्वमेति च ॥ एतत्कर्म फलंवास्तु विद्याफलमथापि वा ॥ ३३ ॥ कोणी देव होऊन बैसले ॥ कोणी इंद्रचि अंगें झाले ॥ तें फळ कर्माचें की विद्येचें कळलें ॥ पाहिजे जीवा ॥ ६३ ॥ कित्येक मूर्ख यज्ञाचें म्हणती ॥ कित्येक उपासनेचे भाविती ॥ उभयांचेही कित्येक कल्पिती ॥ परी म्हणविती आपणा साधु ॥ ६४ ॥ कर्मैं अथवा उपासनेनें ॥ अंगेंचि जरी इंद्रादि होणें ॥ तरी मग सुखासी काय उणें ॥ ऐसें म्हणोन साधाया जाती ॥ ६५ ॥ सिद्धसुख आपुलें त्यागनी ॥ कृत्रिम सुखार्थ कारती ग्लानी ॥ ऐसी हे अज्ञानाची करणी ॥ तरी कळावें सुख ज्याचे त्या ॥ ६६ ॥ जयाचें सुख तयासी कळलें ॥ तरी अन्य सुखा जाती विटले ॥ तस्मात् ज्ञात्याचें केवढे तें सांगितलें ॥ पाहिजे उमाणूनी ॥ ६७ ॥ त्यापुढे ब्रह्मदेवादि सुखें सातिशय ॥ आपेआप पावती पराजय ॥ हे वेदही बोले परी संशय ॥ न जायचि जीवाचा ॥ ६८ ॥ तद्ब्रूहि गिरिजाकान्त तत्रमे संशयो महान् ॥ हे सद्गुरुमुखें ऐकिल्यावीण ॥ न होतीच कदां संशयभग्न ॥ तस्मात् तूंचि सांगें स्वमुखेंकडून ॥ हे गिरिजाकांता सद्गुरु ॥ ६९ ॥ जीवाच्या हितार्थ प्रश्न म्यां केला ॥ तो मीच जीवरूप जाणून वहिला ॥ हा महान संशय मजचि झाला ॥ तरी तूं फेडी गुरुराया ॥ २७० ॥ गंधर्वादि भोग कैसे कैसे ॥ आणि इंद्रादि झाले कर्मविद्यावशें ॥ सुखाहून न सुखसातिश जैसें ॥ तैसें सांगावें जीवाहिता ॥ ७१ ॥ मुख्य हेतू माझिये अंतरीचा ॥ निवाडा व्हावा ज्ञात्याचा सुखाचा ॥ जेणे इतर कृत्रिम सुखाभासाचा ॥ उबंगोन जीवा वीट यावा ॥ ७२ ॥ प्रश्न रामाचा ऐकून ऐसा ॥ सदाशिव तुष्टला अति मानसा ॥ बोलता झाला परम आवेशा ॥ श्रुतियुक्ति अनुभवें ॥ ७३ ॥ प्रथम इंद्रादि रूपत्व जे पावले ॥ तें फळ विद्या की कर्माचे सांगतो वहिले ॥ नंतर अन्य जें जें त्वां पुसिलें ॥ तें अनुक्रमें बोलू ॥ ७४ ॥ श्रीभगवानुवाच ॥ तद्विद्याकर्मणोरेवानुसारेण फलं भवेत् ॥ ३४ ॥ कर्मविद्येचिया अनुसारें ॥ इंद्रादि देव होती खरें ॥ तेचि कैसें ऐकिजे उत्तरें ॥ बोलिजेताहे ॥ ७५ ॥ शत अश्वमेध जेणे करावे ॥ तेणेंचि एक स्वर्गी इंद्र व्हावें ॥ म्हणून मुख्य फल कर्माचे जाणावें ॥ परी साह्य उपासना पाहिजे ॥ ७६ ॥ मी एक ईश्वरचि यज्ञभोक्ता ॥ ऐसें न कळून यज्ञही करितां ॥ तो इंद्र नव्हेचि तत्त्वतां ॥ मी क्षोभतां विघ्न करीं ॥ ७७ ॥ म्हणोन यज्ञभोक्ताची एकी ॥ ऐसें जाणोन स्वाहाकार टाकी ॥ त्याचा यज्ञ होऊन इंद्रलोकीं ॥ निर्विघ्नपणे इंद्र होय ॥ ७८ ॥ तस्मात् उपासनाही पाहिजे ॥ तेणें स्वर्गी देवत्व लााहिजे ॥ यास्तव कर्म उपासना फळ सहजें ॥ असे इंद्रत्व व्हावया ॥ ७९ ॥ उपासनेवीण जरी यज्ञ सिद्धी जाय ॥ तरी तो कामुक स्वर्गवासी होय ॥ पुढे तयाच्या कर्माचा होतां क्षय ॥ जन्मे पूर्वरीती ॥ २८० ॥ जरी उपासना कर्म उभययोगें ॥ अश्वमेध करी लागवेगें ॥ शत होतां इंद्र होय अंगें ॥ उणे असतां अन्य देव ॥ ८१ ॥ त्याहून जरी उणें उणें ॥ तरी पितर गंधर्वादि होणें ॥ असो हे फळ उभयांच्या गुणें ॥ होतसे जीवा ॥ ८२ ॥ परी याचि कल्पी नव्हे देव ॥ पुढील कल्पी होईल स्वयमेव ॥ आतां झाला तरी मनुष्य गंधर्व ॥ देवगंधर्वही नव्हे ॥ ८३ ॥ या कल्पी येणें देव व्हावें ॥ तरी पहिल्या देवी कोठे जावें ॥ उपदेवादि जरी होय स्वभावें ॥ तरी मत्सर परााधिकें ॥ ८४ ॥ ब्रह्मदेवाचे दिनांती ॥ चौदा इंद्र जरी होती ॥ परी ते सर्व नेमिलेचि असती ॥ आतां नवा नव्हे सहसा ॥ ८५ ॥ तथापि जरी आतांचि झाला ॥ इंद्रपदीं जाऊन बैसला ॥ तरी तो नाश पावेल वहिला ॥ नहुषा ऐसा ॥ ८६ ॥ तस्मात् या कल्पी शतमख कर्त्तिया ॥ पुढिले कल्पी इंद्रत्व ये तया ॥ असो जरी इंद्रत्वही आलिया ॥ पराधिकत्वें सुख नव्हे ॥ ८७ ॥ एकाहून एक सुखें आधिक ॥ ती पुढे बोलिजेती निश्चयात्मक ॥ तस्मात् ऐशयासी साधावया प्रवर्तक ॥ होती ते पढतमूर्ख ॥ ८८ ॥ एकाचें इंद्रत्व जाऊनियां ॥ पुढे येत असे दुसरिया ॥ तरी नाशवंत कां न म्हणावें तया ॥ आणि पुढे होणार तें उधार ॥ ८९ ॥ पुढिलें कल्पी होय म्हणनी ॥ जाणावें शास्त्रप्रतीती कडूनी ॥ हा कल्प केव्हां जाईल सरूनी ॥ आणि पुढे दुजा येणार कधीं ॥ २९० ॥ कल्पान्त होण्यास बहुत अवधी ॥ अनेक कर्मे घडणार मधीं ॥ मख जे झाले शतावधि ॥ ते क्षीण होती अन्य भोगें ॥ ९१ ॥ तथापि यज्ञ होणेचि आधी दुर्लभ ॥ यदाकदाचित् झाला जरी लाभ ॥ तरी नाश पावेल पुढे अशुभ ॥ पूर्ववत् आहे ते आहे ॥ ९२ ॥ एवं नाशवंत आणि उधार ॥ इच्छिती ते पढतमूर्ख नर ॥ निजसुख पावावया पडिलें अंतर ॥ येऊनिया नरदेहा ॥ ९३ ॥ असो इतरांसी काज नाहीं ॥ परी साधकां सांगणे उभवून बाही ॥ कीं न पडावे अन्य प्रवृत्ति प्रवाहीं ॥ एका ज्ञानेंवीन ॥ ९४ ॥ ज्ञानेंकडून में सुख पाविजे ॥ तें ब्रह्मयानेही न लाहिजे ॥ तेंचि आतां कैसें बोलिजे ॥ श्रोत्रियानंदासी ॥ ९५ ॥ सर्व सुखाचे शत शत गुणें ॥ गणित ब्रह्मयापर्यंत होणे ॥ परि श्रोत्रिय सुख में पूर्णपणे ॥ तें वर्णितां न ये ॥ ९६ ॥ तें सुख जाणे ज्याचें तोचि ॥ येरांसी कळेना कधींचि ॥ असो वर्णना कीजे त्या सुखाची ॥ परी येर सुखें अवधारा ॥ ९७ ॥ प्रथम मानुषानंद चक्रवर्तीचा ॥ कैसा तोचि बोलिजे वाचा ॥ येर मनुष्याहून तयाचा ॥ आनंद थोर शतगुणें ॥ ९८ ॥ परी चक्रवर्ती जरी असिला ॥ सर्व लक्षणीं तरीच सुख होय तयाला ॥ एक उणे असतां राजाचेही सुखाला ॥ उणीवता असे ॥ ९९ ॥ श्रोत्रिय सुखासी इतुकें न लगे ॥ तें सुख लक्ष्यरूपचि झाला अंगें ॥ आतां राजियाची लक्षणे ती प्रसंगें ॥ बोलूं कोणकोणती ॥ ३०० ॥ युवा च सुन्दरः शूरो नीरोगो बलवान् भवेत् ॥ सप्तद्वीपां वसुमती भुक्ते निष्कंटकं यदि ॥ ३५ ॥ तरुण आणि अति सुंदर ॥ बळवान निरोगी आणि शूर ॥ सप्तद्वीप भूमीचें राज्य एकछत्र ॥ निष्कंटक भोगी जरी ॥ १ ॥ तरीच सुख राजिया असे ॥ एक उणें तरी सुख नसे ॥ श्रोत्रियाच्या देहा होवो भलतैसें ॥ परी सुखाचा लेश उणा नव्हे ॥ २ ॥ तरुण असतां राजिया सुख ॥ नातरी वृद्धपणी नव्हे देख ॥ जरी विरूप असल्या अतिदुःख ॥ तस्मात् युवा आणि सुंदर असावा ॥ ३ ॥ युवा संदरही जरी असिला ॥ तरी रोग होतां वाया गेला ॥ म्हणून आरोग्यता असावी देहाला ॥ तरीच सुख ॥ ४ ॥ युवा सुंदर आरोग्यता ॥ असतां निर्बळां सुख नव्हे तत्त्वतां ॥ तरी शरीर दृढ आणि सैन्य असंख्याता ॥ असे तरी सुख ॥ ५ ॥ सैन्यही जरी असतां वाडीपरी ॥ स्वतः राजा पडिला भ्याड ॥ तरी तो सुखी होईल काय द्वाड ॥ तस्मात् शूरत्व असावें ॥ ६ ॥ इतुक्यांही लक्षणसी पूर्ण जाहला ॥ तरी सर्व सुखासी नाहीं पावला ॥ सप्तद्वीपांतून एक देश जरी उरला ॥ तरी तळमळ असे ॥ ७ ॥ तस्मात् सप्तही द्वीप वसुमतीचें ॥ राज्य असावें स्वाधीन साचें ॥ इतुके असतांही सुख तें न वचें ॥ कोणी शत्रू जन्मतां ॥ ८ ॥ शत्रूही कोठे कोणी नाहीं ॥ दुजा राजा नसे सहसाही ॥ त्यासीच निष्कंटक म्हणावें पाहीं ॥ तरीच होय सुख ॥ ९ ॥ स प्रोक्तो मानुषानन्दस्तस्माच्छतगुणोमतः ॥ लक्षणेसी अलंकृत ॥ तोचि राजा आनंदभरित ॥ येर मनुष्याहूनि शतगुणित ॥ असे तयाचा ॥ ३१० ॥ इतुकें न लगे ज्ञानियासी ॥ तो उपाधीरहित सुखाचा राशी ॥ विसर्जिले देहादि प्रपंचासी ॥ स्वप्नसुखापरी ॥ ११ ॥ देह तरुण की वृद्ध बाळ ॥ बलवान असे किंवा निर्बळ ॥ रोगी की आरोग्यता पुष्कळ ॥ तया संबंध नाहीं ॥ १२ ॥ तया देहाचे शूरत्व काय करावें ॥ अथवा चांगुले तरी काय वाळवून ठेवावें ॥ राज्य नसतांही सर्व तादात्म्य असावें ॥ जग मीच म्हणूनी ॥ १३ ॥ तयाचिये सुखाची मर्यादा ॥ कधीही झालीच नाहीं वेदा ॥ तो कासया पडेल विषयछंदा ॥ कृत्रिम सुखाचे ॥ १४ ॥ तयाचे सुखांत सर्व सुखें असतां ॥ तया कोणती राहे उणीवता ॥ चक्रवर्तियें इंद्राचे वैभव ऐकतां ॥ निजराज्य तुच्छ करी ॥ १५ ॥ तेव्हां इंद्रत्व इच्छी आपणा व्हावें ॥ तें जरी स्वतः प्राप्त नव्हे ॥ तरी वांछी गंधर्वत्व तरी यावें ॥ अधिक असे म्हणूनि ॥ १६ ॥ मनुष्यस्तपसा युक्तो गंधर्वो जायते स्यतु ॥ ३६ ॥ तस्माच्छतगुणो देवगंधर्वास्य न संशयः ॥ प्रस्तुत तपाने जे गंधर्वत्व पावले ॥ ते मनुष्यगंधर्व बोलिले ॥ त्यांचे सुख जरी अनुमानिलें ॥ तरी शतगुण राजियाहून ॥ १७ ॥ देह आरोग्य अमृतपान ॥ दिव्य स्त्री आरुढावया विमान ॥ सदां विचरे अकुंठितं गमन ॥ म्हणून रायाहून शतगुणें ॥ १८ ॥ परी देवगंधर्वासी पाहतां ॥ निज वैभवा ये उणिवता ॥ तस्मात् शतगुणें आनंद तत्त्वतां ॥ देवगंधर्वाचा ॥ १९ ॥ जे पूर्वकल्पी साधनें करूनी ॥ पावलेती गंधर्वयोनि ॥ ते देवगंधर्व आगंतुक म्हणूनी ॥ मनुष्यगंधर्वा तुच्छ करीती ॥ ३२० ॥ परी ते देवगंधर्वही आर्यमादिकां ॥ पाहतां तुच्छ करिती आपुल्या सुखा ॥ म्हणती कव्याचा विभाग यांसी निका ॥ तो आम्हां कोठें ॥ २१ ॥ एवं पितरांपासून ब्रह्मदेवावरी ॥ सुखें अधिक उत्तरोत्तरीं ॥ तेंचि अल्पसे बोलिजे वैखरी ॥ परी ज्ञात्याची सरी न येचि त्या ॥ २२ ॥ एवं शतगुणानंद उत्तरोत्तरतो भवेत् ॥ ३७ ॥ पितृणां चिरलोकानामाजानसुरसंपदां ॥ राजा मनुष्यगंधर्व देवगंधर्व ॥ यांचे एकाहून एक थोर वैभव ॥ तैसीच उत्तरोत्तर ऐश्वर्ये सर्व ॥ शत शत गुणे असतीं ॥ २३ ॥ पितृगण चिरलोकवासी ॥ त्याहून सुख आजानदेवांसी ॥ परी तें तुच्छ असे ज्ञानियासी ॥ कांकविष्टे सम ॥ २४ ॥ देवगंधर्वाच्याही परीस ॥ सुख असे आर्यमादि पितरांस ॥ परी तयांचाही होय विरस ॥ चिरलोकवासियापुढें ॥ २५ ॥ कल्पारंभापासून नाशापर्यंत ॥ राहती ते चिरलोकवासी समस्त ॥ आणि भोगही पितरांहूनि शतगुणित ॥ तेव्हां सुख थोर चिरवासियांचें ॥ २६ ॥ पितरांसी कोणी मृत्युलोकीं ॥ कव्य आर्पिता ते होती सुखी ॥ तस्मात् परतंत्रता पितरांची तैशी निकी ॥ चिरलोकवासिया नव्हे ॥ २७ ॥ असो पितरांहून सुख अधिकं ॥ चिरलोकवासिया शतगुणें निकें ॥ परी आजानदेवापुढे फिकें ॥ होय पाहतांचि ॥ २८ ॥ आजानदेव म्हणजे उपदेव ॥ तयांचा देवसभेसी थोर गौरव ॥ म्हणोन चिरलोकांहून त्यांचे वैभव ॥ शतगुणें अधिक ॥ २९ ॥ तेणेही सूर्यादिकां पाहतां ॥ त्यांचे वैभवा ये उणीवता ॥ तस्मात् सुखी असती सर्व देवता ॥ आजान देवांहूनी ॥ ३३० ॥ देवतानामथेन्द्रस्य गुरोस्तद्वत्प्रजापतेः ॥ ३८ ॥ ब्रह्मणश्चैवमानन्दः पुरस्तादुत्तरोत्तरः ॥ सर्व देवता इंद्र बृहस्पती ॥ तयांच्याही पुढे कर्दमादि प्रजापति ॥ इतुक्यांचे आनंद उत्तरोत्तर अधिक असती ॥ ब्रह्मदेवासहित ॥ ३१ ॥ वसुरुद्रादित्य देवता ॥ आजान देवांहून समस्ता ॥ सुखरूप असती शतगुणिता ॥ परी इंद्राच्या आज्ञाधार ॥ ३२ ॥ इंद्रही गुरूच्या आज्ञेत चाले ॥ तरीच त्याचें इंद्रपद राहिलें ॥ म्हणोन इंद्रानंदाहून आगळे अथिलें ॥ सुख तें बृहस्पतीचें ॥ ३३ ॥ कर्दम दक्षादि प्रजापति ॥ ते तरी सृष्टिकर्ते म्हणविती ॥ तयांस आदिकरून बृहस्पति ॥ होती तृणतुच्छ ॥ ३४ ॥ म्हणोन बृहस्पतीच्या शतगुणीं ॥ आनंद प्रजापतीचा श्रुति वर्णी ॥ एवं ह्या दहा आनंदाच्या श्रेणी ॥ ब्रह्मदेवाच्या पोटीं ॥ ३५ ॥ तो तरी स्वयंभू म्हणवीत ॥ एकदांचि सर्वां उत्पन्न करीत ॥ तयाच्या आनंदाचें पहातां गणित ॥ शतगुणें प्रजापतीच्या ॥ ३६ ॥ या प्रवृत्ति मार्गाच्या प्रवाहीं ॥ ब्रह्मया परता दुसरा नाहीं ॥ सर्वदां सुखभरित पाहीं ॥ इंद्रादि आज्ञाधार ज्याचे ॥ ३७ ॥ येथे कोणी भावील चित्ता ॥ की सुखाची असावी एकरूपता ॥ कारण की कर्म उपासनेचे संपादिता ॥ भिन्नता नसावी तरी ऐकें ॥ ३८ ॥ ज्ञानाधिक्यात्सुखाधिक्यं नान्यदस्ति सुरालये ॥ ३९ ॥ जैसे जैसें कर्म अधिक ॥ आणि उपासनाही न्युनाधिक ॥ त्या रीती प्रवृत्ति ज्ञान विवेक ॥ आणि सुखही तैसें असे ॥ ३९ ॥ जयाची कर्मउपासना थोडी ॥ तयास तितुकीच ज्ञानप्रौढी ॥ सुखही तैसेंच होतसे परवडी ॥ अधिक होय कैसें ॥ ३४० ॥ जयाची कर्मउपासना बहुत ॥ तयासी प्रवृत्तिज्ञानही अदभुत ॥ सुखही होतसे अत्यंत ॥ अधिकार भेदें ॥ ४१ ॥ जैसे सर्वही पापपुण्ये कडूनी ॥ समानत्वे पावती मनुष्ययोनी ॥ परी जयाचे पापपुण्य थोडें दोनी ॥ तयासी सुख अल्पसें ॥ ४२ ॥ जयाचें पापपुण्य बहुत ॥ तयासी सुख असे अद्भुत ॥ तैसें देवांसी तारतम्य असत ॥ कर्मज्ञान तैसें सुख ॥ ४३ ॥ मनुष्याशी पापपुण्य योगें ॥ जैसें सुख तैसें दुःखही भोगे ॥ तेणेंचि परी देवांसी भोगणे लागे ॥ सुखदुःख दोन्ही की सुखचि ॥ ४४ ॥ ऐसें कवणे असतां पुशिलें ॥ याचे उत्तर पाहिजे ऐकिलें ॥ जेथें सुख तेथे असे ठेविलें ॥ दुःखही वाढूनी ॥ ४५ ॥ जेथे सुखाची उणिवता ॥ तेथें दुःखही तेतुलेंचि तत्त्वतां ॥ जेथे सुखाची आधिकता ॥ तेथें अधिक दुःख ॥ ४६ ॥ कारण की देहाचें सुख मानिलें ॥ तेव्हां दुःखही न जाय दवाडिलें ॥ अरे कर्माचे देह घडले ॥ सुखदुःख भोग घ्यावया ॥ ४७ ॥ सुखदुःखें दोन्हीही असती ॥ म्हणोनीच यांचें नांव प्रवृत्ति ॥ या उभयांवीन केवळ सुखमूर्ति ॥ निवृत्तिरूप ज्ञाता ॥ ४८ ॥ जें आधिष्ठान या भ्रमाप्रति ॥ तेथून सर्व सुखें उमटतीं ॥ ते एक परब्रह्मचि निश्चिती ॥ आदि मध्य अवसानीं ॥ ४९ ॥ ऐसें परब्रह्म ज्ञानेंकडून ॥ ज्ञाता अंगें झाला सच्चिद्घन ॥ तयाचे सुखाची मर्यादा कवण ॥ करूं शकेल ॥ ३५० ॥ तेव्हां महत्सुख श्रोतियाचें ॥ श्रुति बोलून मौन धरी वाचें ॥ तेथे या अन्य विषय सुखदुःखाचे ॥ लेशही स्पर्शतीना ॥ ५१ ॥ तयासी एवढे सुख कासयाने ॥ प्राप्त झाले पुसतां कवणें ॥ तरी ऐकोत वचन सावधपणें ॥ श्लोकार्थीचें ॥ ५२ ॥ श्रोतियोऽवृजिनो कामहतोयश्चाद्विजो भवेत् ॥ तस्यापेवं समाख्याता आनंदाश्चोत्तरोत्तरं ॥ ४० ॥ श्रोत्रिय जो का ज्ञाता पूर्ण ॥ अकामहत पापपुण्य विहीन ॥ ऐसा जो ब्रह्मविद् ब्राह्मण ॥ त्याच्या सुखा अंत नाहीं ॥ ५३ ॥ जी उत्तरोत्तर असतीं वर्णिलीं ॥ सुखें तयाची गणना केली ॥ परी इतुकीही लोपन गेलीं ॥ श्रोत्रिय सुखाच्या लेशीं ॥ ५४ ॥ लेश म्हणजे म्हणावें कणासी ॥ जैशी सागरामाजी खसखशी ॥ तैसी श्रोत्रियसुखाच्या लेशी ॥ अंतर्भूतता सर्व सुखां ॥ ५५ ॥ मी कैलासवासी महाविष प्रगटतां ॥ निज सामर्थ्य झालों प्रा्शितां ॥ त्यांतील अणु गळून पडिला खालुता ॥ त्याची सर्व विषें झाली ॥ ५६ ॥ तैसा श्रोत्रियाचे सुखांतून ॥ एक कण पडला गळून ॥ त्यांची ही विषयसुखें संपूर्ण ॥ ब्रह्मयासहित अक्राही ॥ ५७ ॥ असोआतांतें केवढें कैसे ॥ अनुमानून पहा मानसें ॥ जें सुख अकृत्रिम सदा असे ॥ श्रोत्रियाच्या ठायीं ॥ ५८ ॥ एका कामाचिये हननें ॥ केवढीया सुखास पावणें ॥ नातरी प्रवृत्ती प्रवाही पडणें ॥ केवळ कामासाठीं ॥ ५९ ॥ मी देह एक बळकट केलें ॥ यास्तव माझें माझें करूं लागले ॥ स्त्री पुत्र धन कृषि राज्यादि वहिलें ॥ इच्छितां मेले कितेक ॥ ३६० ॥ कवणासी कर्मयोगें मिळे ॥ कवणासी इच्छितां लेंशही न मिळे ॥ परी हे जन कैसे हो आंधळे ॥ नेणती असार ॥ ६१ ॥ एक ते स्वर्गभोग इच्छूनी ॥ कर्मे करिती अतिसायासें कडूनी ॥ एक ते इंद्रादि व्हावे म्हणूनी ॥ शतमखादि करिती ॥ ६२ ॥ त्यांतही कोणी कोणी पावती ॥ स्वर्गस्थ देवादिकही होती ॥ कोणी कोणी तो करूनि मुकती ॥ क्षीण होतां अन्य भोगें ॥ ६३ ॥ तथापि जरी ते पद पावले ॥ तरी तें सुख असे केतुले ॥ आपुलें महत् सुखा मात्र अंतरले ॥ पडिले जन्म मृत्यू मुखीं ॥ ६४ ॥ असो जे शूर तेहीं मिथ्या जाणोनी ॥ इच्छचि टाकिली जाळनी ॥ अक्राही आनंदाच्या श्रेणी ॥ काकविष्ठेसम केल्या ॥ ६५ ॥ आधी मीपणासीच त्यागिलें ॥ तेथें माझें म्हणून कोठे उरलें ॥ तस्मात् इच्छेचे निसंतान केलें ॥ स्वात्मबोधेकडूनी ॥ ६६ ॥ मी कर्ताचि नव्हे भोक्ता कवण ॥ ऐसा निश्चय गेला बाणून ॥ तेव्हां पापपुण्याचे निसंतान ॥ सहजचि झालें ॥ ६७ ॥ पापपुण्य दोहीशी नाम पाप ॥ या विरहित तोचि निष्पाप ॥ ऐसा निष्पाप अकामहत ज्याचे रूप ॥ ब्रह्म तेंचि तो पावतसे ॥ ६८ ॥ ब्रह्मसुखासी पावतो म्हणून ॥ नं पवे तया वेगळा असून ॥ तो अंगोंच झाला जाणणे त्यागून ॥ ब्राह्मणश्रेष्ठ ॥ ६९ ॥ तस्मात् ऐशिया सुखाची प्राप्ति व्हावी ॥ ऐसें वाटेल जयाचे जीवीं ॥ तेणें ब्रह्मादि तृणांत पदें त्यागावीं ॥ ओकिल्या ओकापरी ॥ ३७० ॥ ब्रह्मयासी जें सुख नाहीं ॥ तें सुख ज्ञानियां सर्वदांही ॥ येथे कोणी संशय करी पाही ॥ की ब्रह्मदेवही ज्ञाता ॥ ७१ ॥ तोही ब्रह्मानंदींच मग्न असे ॥ आणि सत्यलोकवासिया ज्ञान देतसे ॥ तरी श्रोत्रियाचे सुख ब्रह्मया नसे ॥ हा वाटे विरोध ॥ ७२ ॥ तरी अवधारा प्रवृत्ति सुखासी ॥ साम्यता कल्पू नये निवृत्तीसी ॥ निवृत्ति सुख असे अविनाश जयासी ॥ तें प्रवृत्तींत तुळूं नये ॥ ७३ ॥ ब्रह्मया प्रवृत्तीचा अभिमान ॥ तेधवां मुके ब्रह्मसुखालागून ॥ अभिमान त्यागें होय जरी अभिन्न ॥ तरी तेंचि सुख श्रोत्रियाचें ॥ ७४ ॥ तया श्रोत्रिय सुखापुढें ॥ विरिंची पदाचें सुख केवढें ॥ तया प्रवृतिसुखी किंचित् न जोडे ॥ श्रोत्रियाचे सुख ॥ ७५ ॥ निवृत्ति सुख केवढे कैसें ॥ साधका अनुमानावें मानसें ॥ म्हणोन प्रवृत्तिसुखाचें कांहींसें ॥ तारतम्य सांगितलें ॥ ७६ ॥ येर्हवीं निवृत्तीसी तुळना ॥ प्रवृत्तीसी सहसा असेना ॥ या सुखाची सातिशयें होय गणना ॥ तें सुख निरतिशय ॥ ७७ ॥ कर्मविद्येच्या अधिकपणें ॥ सुखप्रवृतीचे अधिक उणें ॥ येथेही कोणी कल्पील मनें ॥ कीं श्रोत्रिय सुखा तारतम्य असे ॥ ७८ ॥ उणें ज्ञान तरी उणे असे सुख ॥ ज्ञानाधिक्ये सुख अधिक ॥ तरी ऐसे कल्पू नये निश्चयात्मक ॥ तेथे न्यूनाधिक नाहीं ॥ ७९ ॥ त्रिपुटी खंडून अभिन्न झालें ॥ तें अपरोक्षज्ञान एकच संचलें ॥ ज्ञानचि न्यूनाधिक नसतां वहिले ॥ सुख न्यूनाधिक कोठूनी ॥ ३८० ॥ संशयात्मक जें का ज्ञान ॥ तया ज्ञानासी ज्ञान म्हणे कोण ॥ अभिन्न पूर्णपणे जें समाधान ॥ तें सर्वांचे एकचि ॥ ८१ ॥ माझें आणि तुज विष्णूचें ॥ ब्रह्मयाचे आणि सनत्कुमाराचें ॥ भूत भावी की वर्तमान ज्ञात्याचें ॥ ज्ञान दुजें नाहीं ॥ ८२ ॥ देहसंबंधाकडे पाहिलें ॥ तरी दिसती थोर धाकुले ॥ परी अभिन्नस्वरूप जे अंगें झाले ॥ तेथें भेद नाहीं ॥ ८३ ॥ एक श्रोत्रिय म्हणनि श्रुति बोलिली ॥ हे सर्वांची ज्ञानस्थिति पाहिजे कळली ॥ हे किल्ली जयास प्राप्त झाली ॥ तो सर्वसुखाचा कंद ॥ ८४ ॥ तयाहून परता सुखी कवण ॥ दुजा नाहीच जन्मला अझून ॥ मी ईश्वर जरी घे प्रवृत्तीचा अभिमान ॥ तरी मुकें तया सुखा ॥ ८५ ॥ आत्मज्ञानात्परं नास्ति तस्माद्दशरथात्मज ॥ ब्राह्मणः कर्मभिर्नेववर्धतेनैवहीयते ॥ ४१ ॥ तस्मात् हे दशरथात्मजा ॥ आत्मज्ञानाहून अपरं कोण दुजा ॥ नाहीं नाहीं हे बोलणे समजा ॥ अति निष्कर्षाचें ॥ ८६ ॥ सुख तया ब्रह्मानंदाचें ॥ जें वाणी मना अगम्य साचें ॥ कोणत्या कर्मे कधीही न वेचे ॥ अथवा वृद्धीही न पवे ॥ ८७ ॥ आत्मज्ञाना परतें कांहीं ॥ दुजें श्रेष्ठ त्रैलोकी नाहीं ॥ यासी वेद साधू असती ग्वाही ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥ ८८ ॥ उपासकांहीं तें प्राप्त नव्हे ॥ तें कर्मे कैसेनि प्राप्त व्हावें ॥ योगाभ्यासा तो दुरी दुरावे ॥ मा अन्य क्रिया बापुडी ॥ ८९ ॥ हे असो इंद्रादिक देव ॥ तेणेंचि परी ब्रह्मा स्वयमेव ॥ तया सुखाचा नेणती लव ॥ आत्मज्ञानावांचूनी ॥ ९० ॥ तें अभिन्नसुख एकदां दृढ झालें ॥ म्हणजे कधीही नवजाय नासलें ॥ अथवा कवणे कर्मे वृद्धीस पावलें ॥ हेही घडेना ॥ ९१ ॥ ज्ञान झालिया देहाकारें ॥ पूर्ववचि ज्ञाता उरे ॥ तयाचा देह तरी सदां वावरे ॥ पूर्वील परीच ॥ ९२ ॥ तेणें यज्ञादिक कर्मे जरी केलीं ॥ तरी त्या सुखा वृद्धि नाही झाली ॥ अथवा अनंत पातकें देहा घडलीं ॥ तरी क्षीण नव्हे सुख ॥ ९३ ॥ जें सुख साधनें संपादावें ॥ तोंच साधनवृद्धीने दुणावें ॥ साधनेंवीण क्षीणही व्हावें ॥ तैसें सुख हे नसे ॥ ९४ ॥ ऐताचि जो ब्रह्मानंद ॥ सुखदुःखावीण स्वानंदकंद ॥ ज्ञानविचारें झाला अभेद ॥ ब्रह्मविद् ब्रह्मचि ॥ ९५ ॥ तें सुख देहाच्या क्रियेनें ॥ कधी नव्हे अधिक उणें ॥ देहचि त्यागिला असे जेणें ॥ मी असे म्हणून स्वप्नवत् ॥ ९६ ॥ ऐसा अकर्ता झाला देहीं असून ॥ करीत होत्सातां देहाचरण ॥ तयासी न स्पर्शती शुभाशुभे दोन ॥ पुण्य किंवा पाप ॥ ९७ ॥ न लिप्यते पापकेन कर्मणा ज्ञानवान्यादि ॥ तस्मात्सर्वाधिको विप्रो ज्ञानवानेवजामते ॥ ४२ ॥ पातक कर्माचिये कडून ॥ न लिंपे जयाचें अपरोक्ष ज्ञान ॥ तस्मात् अन्यत्र या सर्वांहून ॥ अधिकपणे एक ज्ञाता ॥ ९८ ॥ कर्म करितां दोन निपजती ॥ पुण्यपातकें सहजगति ॥ मी कर्ता म्हणतां अभिमाने पावती ॥ अज्ञानी सुखदुःख ॥ ९९ ॥ तें कर्तेपण ज्ञानिया असेना ॥ जयासी देहबुद्धि नुठे स्वप्ना ॥ तेणें पापपुण्यासी दिलें दाना ॥ तिळपात्र पूर्ण ॥ ४०० ॥ स्वप्नींची कर्मे अनेक ॥ होतां नातळतीं जागरी लोक ॥ तैसें देहाचे कर्म सकळिक ॥ विसरलाच ज्ञाता ॥ १ ॥ अहो हे म्यां काय पाप केलें ॥ कांहींही मज पुण्य नाहीं घडलें ॥ हे खर्खरेचि मनाचे तुटले ॥ देहबुद्धि त्यागें ॥ २ ॥ अथवा मज कधी पाप नाहीं घडलें ॥ जें केलें तें पुण्यरूप केलें ॥ याही अभिमाना नाहीं स्पर्शलें ॥ चित्त ज्ञानियाचें ॥ ३ ॥ तरी तयासी कवाणये रीतीं ॥ पापपुण्ये ही संभवतीं ॥ तस्मात् ज्ञानियासी न स्पर्शती ॥ देहाची कर्मे ॥ ४ ॥ बहुत कासया बोलावें ॥ त्याचें जितुकें वर्तणे अघवें ॥ तें कधींच तया न स्पर्शावें ॥ ज्ञानवान म्हणुनि ॥ ५ ॥ तस्मात् सर्वांमाजी ज्ञाता श्रेष्ठ ॥ त्यासम दुजा नाहीं कोणी वरिष्ठ ॥ तो जरी शास्त्रिय लौकिकांसी भ्रष्ट ॥ अथवा शास्त्रलौकिकें यथायुक्त ॥ ६ ॥ तरी तो देवांहूनही अधिक ॥ आदि करूनि ब्रह्मादिक ॥ मी ईश्वरही तयाचा पाईक ॥ वेदबंदीजन ॥ ७ ॥ ऐसें ज्ञानियाचे महात्म्य जाणोनि ॥ जे परतती सर्व कर्माहूनी ॥ आणि सेवा करिती काया वाचा मनीं ॥ तें ज्ञाना अधिकारी ॥ ८ ॥ अथवा कर्म आणि उपासना ॥ यथारीती करी धर्माचरणा ॥ वरी ज्ञातयाचे शरण चरणा त्याचें सफळ होय करणें ॥ ९ ॥ ज्ञात्वाय कुरुते कर्म तस्याक्षय्य फलं लभेत् ॥ जो कोणी ज्ञानियाचे चरणीं ॥ लक्ष ठेवून प्रवर्ते कर्माचरणीं ॥ तयासि अक्षयी फळ होय ज्ञान पावूनी ॥ येथे संशय नाहीं ॥ ४१० ॥ कर्म करीत असतां ज्ञाता ईश्वर ॥ ऐंसा भाव अंतरीं दृढतर ॥ तयासी त्वरित ये ज्ञानाधिकार ॥ कर्मी अंतर पडतांही ॥ ११ ॥ अंतःकरण शद्धि होतांक्षणीं ॥ तया एकवेळ उपदेशे कडूनी ॥ अपरोक्षता ठसावे अभिन्नपणीं ॥ जेणे सहज मोक्षरूप होय ॥ १२ ॥ या परतें अक्षयी फळ कोणते ॥ करणेंचि नाही उरलें जयातें ॥ पावावयाचें नुरले तयातें ॥ यारीतीं पूर्ण झाला ॥ १३ ॥ आतां कल्प जरी होऊन गेला ॥ तरी अन्यथात्व नाही पावला ॥ ऐसा अक्षयी फळाचा लाभ झाला ॥ ज्ञातयाचें प्रसादें ॥ १४ ॥ अथवा उपासना जो करी ॥ भाव ज्ञानियाचे चरणावरी ॥ तयासीही ज्ञान होऊन झडकरी ॥ अक्षयीं फळ तें लाभे ॥ १५ ॥ इतुकेंही न घडेचि जयासी ॥ नुसता भाव ठेवी ज्ञानियाचे चरणासी ॥ तयाचा सफळ होय पुण्यराशी ॥ पाप तरी न बाधी ॥ १६ ॥ भाव ही नसतां जयाला ॥ आणि ज्ञाता सदनी जेवून गेला ॥ तरी तयासी फळलाभ काय झाला ॥ तोचि सांगू ऐकें ॥ १७ ॥ यत्फलं लभते मर्त्यः कोटिब्राह्मण भौजनैः ॥ ४३ ॥ तत्फलं समवाप्नोति ज्ञानिनं यस्तु भोजयेत् ॥ कोटि ब्राह्मणाचे संतर्पण | होतां जें फळ मनुष्यालागून ॥ ते फळ अवश्य होय जरी भोजन ॥ ज्ञाता सहज करून गेला ॥ १८ ॥ मग आदरें जो जेववी ॥ ईश्वरभाव ठेवून जीवीं ॥ तो तरी सर्व सांडून उठाठेवी ॥ मोक्षमार्गी लागे ॥ १९ ॥ ज्ञाता ईश्वर म्हणती कैसा ॥ तरी निजांगें ब्रह्म जरी अपैसा ॥ तरी कां ईश्वर नव्हेल सहसा ॥ जो तया अधिष्ठान ॥ ४२० ॥ ज्ञानियाची सहसा बरोबरी ॥ हा मायिक ईश्वर ना करी ॥ त्याची सेवा करी ॥ अहोरात्री ॥ २१ ॥ ज्ञानिभ्योदीयतेयच्च तत्कोटिगुणितं भवेत् ॥ ४४ ॥ कारण ज्ञानियासी जें दिधलें ॥ खान पान वस्त्र धन वहिले ॥ ते पुण्य कोटिगुणित बोले ॥ ईश्वरचि स्वयें ॥ २२ ॥ ऐसें असून जे पापी सदा ॥ ज्ञानिया द्वेषिती करिती निंदा ॥ तयाच्या पापा नाही मर्यादा ॥ जरी महा पुण्यवान् ॥ २३ ॥ ज्ञानवंतं द्विजं यस्तु द्विषते च नराधमः ॥ सश्रुष्यमाणो म्रियते यस्मादीश्वर एवसः ॥ ४५ ॥ ज्ञानी ब्रह्मविद् ब्राह्मणासी ॥ जो नराधम सदां निंदी द्वेषी ॥ तो शुष्क होऊन मरे अंध तमासी ॥ जाय यास्तव की ज्ञाता ईश्वर ॥ २४ ॥ जो ज्ञानियासी देखों न शके ॥ म्हणे हे कर्मभ्रष्ट निश्चयात्मकें ॥ यांचे तोंड न पहावें कौतुकें ॥ उपासकें की कर्मियानें ॥ २५ ॥ यांसी सत्कर्म ना उपासना ॥ ना प्रवर्तेचि भजन पूजना ॥ उगा शब्दज्ञानें करी वल्गना ॥ सर्व मिथ्या म्हणूनि ॥ २६ ॥ यासी साधुत्व तरी असे कैचें ॥ उगें ढोंग वाढविलें फुकाचें ॥ या रीती छळण करी जो ज्ञान्याचें ॥ तो नर नव्हे अधमाधम ॥ २७ ॥ जरी कदाचित् बोलोन न दाखवी ॥ परी अंतरी द्वेषाची ग्रंथी पडावी ॥ ऐशिया चांडाळा कोणती पदवी ॥ प्राप्त होय तें बोलूं ॥ २८ ॥ तयाचें पुण्य काहीही असतां ॥ तें शुष्क होऊन मावळून जाय तत्त्वतां ॥ पुढे मरणांती यातना भोगून समस्ता ॥ पाषाण कोरडा होय ॥ २९ ॥ तेणें इंद्रपद यावया जोगें ॥ कर्म केले असेल निजांगें ॥ परी जरी ज्ञानिया द्वेषू लागे ॥ तरी शून्य पडे त्यावरी ॥ ४३० ॥ उपासना ही दृढ ऐशी ॥ मी आणि विष्णु समान जयासी ॥ परी निंदी जो का ज्ञानियासी ॥ तरी शून्य पडे त्यावरी ॥ ३१ ॥ जरी स्वरूपता मुक्ति पावला ॥ अथवा सगुण सायुज्ये वरिला ॥ परी जो द्वेषील ज्ञानियाला ॥ तरी शून्य पडे त्यावरी ॥ ३२ ॥ बहुत काय योगसिद्धि पाऊनी ॥ जरी जावू पाहे सत्यलोक स्थानीं ॥ परी जरी ज्ञानियासी द्वेषी मनीं ॥ तरी शून्य पडे त्यावरी ॥ ३३ ॥ हे महान पुण्यवंता ऐसी गति ॥ मा येर अल्पाचे पुण्य तें किती ॥ शून्य पडोन समस्ताप्रति ॥ शुष्क होऊन मरे ॥ ३४ ॥ तया यमयातनेचे भोग नाना ॥ किती म्हणोन नव्हे गणना ॥ शेवटी स्थावरत्वाचें पावे जनना ॥ अंधतमरूप ॥ ३५ ॥ परी स्थावर वृक्षही नव्हे ॥ कारण तेथें ओलावा राहताहे ॥ हा कोरडे पाषाणत्व लाहे ॥ जे न झिजे कल्पवरी ॥ ३६ ॥ उपेगा पडे ऐसा ही सुपाषाण ॥ कदापि नव्हे नव्हे जाण ॥ तरी जयाचें नित्य वसतीस्थान ॥ शौचस्थळीं की त्या कर्मी ॥ ३७ ॥ लय काळी सृष्टीही जळतां ॥ तो जळून जाईल अवचिता ॥ पुनः दुसरे कल्पी सृष्टि उद्भवतां ॥ कीटक होय नरकीं ॥ ३८ ॥ असो रामा हे किती सांगावें ॥ ज्ञानिया द्वेषणे नव्हे बरवें ॥ तस्मात् तोचि ईश्वर येथें न ध्यावे ॥ कुतर्क कवणेही ॥ ३९ ॥ बाह्या उभारूनि सांगे शंकर ॥ कवणाचीच निंदा न करो कोणी नर ॥ त्या मध्ये ज्ञाता तरी परमात्मा ईश्वर ॥ त्याची सुतरां न करावी ॥ ४४० ॥ असो रामा तुवां होतें पुसिलें ॥ की सर्वांसी ज्ञात्याचें माहात्म्य पाहिजे कळलें ॥ तें तुजलागी सविस्तर असे बोलिलें ॥ निषेधून ब्रह्मदेवानंदादि ॥ ४१ ॥ ऐसें अभिन्नज्ञान वस्तुतंत्र ॥ कोण वर्णील होऊन स्वतंत्र ॥ इहलोक की सत्यलोकादि परत्र ॥ मुक्तीसहित तृणतुच्छ ॥ ४२ ॥ ऐसें ज्ञान हे प्राप्त जया ॥ त्याचे वर्णन नव्हे वेदराया ॥ परी साधक जे कर्तृतंत्र उपाया ॥ प्रवर्तले त्यांचेही माहात्म्य नेणवे ॥ ४३ ॥ वस्तुतंत्रता या नांव ज्ञान ॥ कर्तृतंत्रता तें उपासन ॥ जयासी सदां ध्येय ध्यातृ ध्यान ॥ निर्गुणोपास्तिरूप ॥ ४४ ॥ सूर्यापूर्वी जेवीं अरुणोदय ॥ तेवीं निर्गुणोपासन सन्निध होय ॥ ज्ञानापूर्वी जरी प्राप्त हा उदय ॥ तरी ज्ञानसूर्य तत्क्षणी प्रगटे ॥ ४५ ॥ हेही असो निर्गुणोपासना ॥ परी अंतरंगें ध्यायील सगुणा ॥ तोही माघारा कदां परतेना ॥ सत्संग असतां ॥ ४६ ॥ येथे शिवाचें अंतरींचा हेतु ॥ रामें पुसावी उपासनेची मातु ॥ अभ्यासेंवीण ज्ञान में निवांतु ॥ तें सदृढ नव्हे ॥ ४७ ॥ म्हणोन उपासनेचें करी वर्णन ॥ कारण घडावें मुख्य निर्गुणोपासन ॥ तेंहीं जया अलभ्य तरी ध्यान ॥ सगुणाचे घडावें ॥ ४८ ॥ उपासको नयात्येव यस्मात्पुनरधोगतिम् ॥ उपासनरतो भूत्वा तस्मादास्वसुखी नृप ॥ ४६ ॥ जो का उपासनापर नर ॥ तो न पडेचि प्रवृत्तिओघीं साचार ॥ तस्मात् हे नृपा नर होवोत उपासना तत्पर ॥ आणि तुज ऐसें सुखरूप ॥ ४९ ॥ जो ज्ञाता जे पावला पदवी ॥ तेचि निर्गुणोपासके पावावी ॥ हे कधीच वाणी अन्यथा न व्हावी ॥ विचारें तेंचि अभ्यासें ॥ ४५० ॥ जो अभिन्नता पावला ॥ विचारें खंडूनियां त्रिपुटीला ॥ त्या त्रिपुटीचा भाव जेथें उरला ॥ तेचि कर्तृतंत्रता ॥ ५१ ॥ ध्येय मात्र गोचर असूनी ॥ अनुसंधान अतूट एकतानी ॥ तेंचि ध्यान आणि तया लागूनी ॥ उपासनाही नाम ॥ ५२ ॥ ऐशिया ध्यानी जो सदां रत ॥ तो सध्यांचि अपरोक्षा पावत ॥ ज्ञानी ध्यानी हा मात्र नामसंकेत ॥ परी ते एकरूप ॥ ५३ ॥ अज्ञानासीही ओलांडूनी ॥ त्रिपुटीरूप राहिला ध्यानीं ॥ तो कासया येईल परतूनी ॥ प्रवृतीकडे ॥ ५४ ॥ निर्गुणोपासक तरी न फिरे ॥ परी सगुणोपासकही न ये माघारें ॥ जयासी अंतर्ध्यान साचोकारें ॥ बहिरंगता सांडूनी ॥ ५५ ॥ तयाचेही स्थिर होऊनि अंतर ॥ निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार ॥ तया होय ध्यानीं होतांचि तत्पर ॥ जया नाम अपरोक्ष ज्ञान ॥ ५६ ॥ तस्मात् सगुणोपासनही जयासी ॥ तो न फिरे माघारा प्रवृत्तीसी ॥ परंपरासाधन द्वारेंशी ॥ वस्तुतंत्रता पावे ॥ ५७ ॥ जो क्रममुक्तीसी गेला ॥ ज्याचा प्रकार मागें बोलिला ॥ तोहि अधोगतीस नाही आला ॥ पावला ब्रह्मयासह कैवल्य ॥ ५८ ॥ हेही उपासनायोगें झालें ॥ याहून पर ते या मार्गा नाही गेले ॥ खावे लागती बहुत झोले ॥ म्हणोनिया ॥ ५९ ॥ सगुणद्वारा निर्गुण होइजे ॥ यास्तव हे परंपरा साधन बोलिजे ॥ निर्गुणोपासन तें तरी सहजें ॥ ज्ञानांगचि असे ॥ ४६० ॥ शुद्ध ज्ञानासी थोर अधिकार ॥ पाहिजे तेव्हांचि होइजे वस्तुतंत्र ॥ ऐसा कवण असे जन्मला नर ॥ तो असो मध्यमें ध्यान करावें ॥ ६१ ॥ ध्यानानुसंधान दृढ जयासी ॥ तोचि एक सुखी आणि पुण्यराशी ॥ जें सुख ज्ञानिया असें अविनाशी ॥ तेंचि हा भोगी वृत्तीने ॥ ६२ ॥ महान् श्रोत्रियसुख में बोलिलें ॥ तेंचि या उपासकाचे भोग्य झालें ॥ तस्मात् हे नृपा जीवास घडलें ॥ पाहिजे उपासन ॥ ६३ ॥ हे न घडे बापा जो काळ ॥ तोंवरी सगुणध्यान करावें निर्मळ ॥ परी बहिरंगाचा न व्हावा विटाळ ॥ साधकां सहसा ॥ ६४ ॥ इतुकें बोलोन सदाशिव ॥ मौनें उगा वैसला स्वयमेव ॥ आतां पुढील अध्यायीं रामराव ॥ प्रश्न करील उपासनेचा ॥ ६५ ॥ शिव सांगेल दोनी निवडूनी ॥ सगुणोपास्ती आणि कैसा भाव निर्गुणी ॥ साधकें तें एकाग्रभावें ऐकुनी ॥ ध्याने ज्ञाना पावावें ॥ ६६ ॥ इति श्रीपद्मपुराणे शिवगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे जीवगत्यादि निरूपणं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥ इति श्रीमद्वेदेश्वरी ॥ शिवगीता पद्मपुराणांतरीं ॥ जीवगति निरूपणानकारी ॥ एकादशोध्यायः ॥ श्रीसद्गुरुर्जयति ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॥ श्रीमद्वेदेश्वरी एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ |