॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय पहिला ॥

श्रीमंगलमूर्तिर्जयति ॥ श्रीशिवराम गुरवे नमः ॥
जयजय शिवराम सद्‌गुरु । अखण्डैकरस निर्विकारु ।
अनंत परिपूर्ण अपारु । सच्चिदानन्द ॥ १ ॥
सृष्टि स्थिति अवसानीं । एकरूप अद्वैतपणीं ।
अस्ति नास्ति हें निरसोनि । जें असें तें सद्‌रूप ॥ २ ॥
उत्पत्ति स्थिति अवलोकित । आणि सर्वांचा अंतही जाणत ।
हेंचि चिद्‍रूप निश्चित । लक्षण दुसरें ॥ ३ ॥
सर्वचि जेथें उद्‍भवेना । तरी सर्व सुखाची कोण गणना ।
एवं सर्व सुखदुःखाविना । आनंद जेथें ॥ ४ ॥
ऐसा सच्चिदानंदघन । अनंत आणि परिपूर्ण ।
हें जयाचें स्वरूप लक्षण । जें न्यूनाधिक नव्हे ॥ ५ ॥
जें सर्वकाळ न राहे । आणि एकदेशी दिसों लाहे ।
तें आगंतुक लक्षण आहे । शिवराम गुरूचें ॥ ६ ॥
जगादि सकार्य उद्‍भवले । होऊन तेथेंचि वर्तूं लागलें ।
लयकाळीं पुन्हा आटलें । जेथील तेथेंचि ॥ ७ ॥
यासी तरी भ्रमचि कारण । परी पाहिजे सत्य अधिष्ठान ।
तेंचि शिवरूप आपण । या भ्रमासी आधारु ॥ ८ ॥
दोरी आधार सर्पासी । तेवीं शिव अधिष्ठान सर्वांसी ।
राहणें सदा नव्हे उरगासी । तेवीं जग उद्‌भवे नासे ॥ ९ ॥
दोरी सर्पाभावीं आहे । तेवीं जगाभावीं शिव राहे ।
हेंचि स्वरूपलक्षण पाहे । सच्चिदानंदादि ॥ १० ॥
सर्प भ्रमासी रज्जु आधार । तेवीं जगतासी शिव थार ।
हा आगंतुक लक्षणाचा प्रकार । कारणरूपें ॥ ११ ॥
असो स्वभाव किंवा आगंतुक । या उभयलक्षणीं वस्तु एक ।
हा साधकां कळावा विवेक । यास्तव लागे बोलावें ॥ १२ ॥
जैशी पुरुषाची व्हावया ओळखण । तेथेंही असती दोन चिन्हें ।
तोचि पहा कीं गौरवर्ण । वस्त्रालंकारी ॥ १३ ॥
वर्ण व्यक्ति हे स्वाभाविक । वस्त्रालंकार आगंतुक ।
या दोन्हीं लक्षणीं पुरुष एक । विचक्षण ओळखिती ॥ १४ ॥
तैसाचि या जगासी कारण । हें जयाचें आगंतुक लक्षण ।
स्वाभाविक सच्चिद्‌घन । या उभयचिन्हीं शिव एक ॥ १५ ॥
शिव राम सद्‍गुरु तीन नावें । ठेवितां त्रिविध न कल्पावें ।
हे पर्याय शब्द ओळखावे । परी एकरूप ॥ १६ ॥
जैसे द्विज आणि विप्र ब्राह्मण । एकाशीच तिन्ही अभिधान ।
तैसे शिव राम गुरु पूर्ण । तिहीं नांवीं ब्रह्म एक ॥ १७ ॥
शिव तोचि परमात्मा । रामनामें प्रत्यगात्मा ।
सद्‍गुरु जाणिजे विमळात्मा । ऐक्यरूप उभयां ॥ १८ ॥
राम तोचि त्वंपद लक्ष्य । शिव तोचि तत्पद लक्ष्य ।
सद्‍गुरु तोचि लक्ष्य‍अलक्ष्य । असिपद रूपें ॥ १९ ॥
संवाद नातुडें एकपणीं । यास्तव धरिल्या व्यक्ती दोनी ।
गुरुशिष्य रूपें प्रकटोनी । संवादसुख घेती ॥ २० ॥
येथें कोणी करील आक्षेप । तेथें मुळीं नाहीं दुखःरूप ।
तरी संवाद सुखाचें माप । कासया कोणा ॥ २१ ॥
ऐसें जरी कल्पाल । तरी जगदोद्धार नव्हेल ।
मग अतिप्रसंग होईल । ज्ञान लोपतां ॥ २२ ॥
राम शिवरूप निजांगें । कीं शिवनाम धरिलें रामयोगें ।
तथापि दोघेही राहिले उगे । तरी ज्ञान प्रगटे कैसें ॥ २३ ॥
राम स्वसुखें निवांत राहता । तरी शिव कासया प्रगटता ।
मग जगदोद्धार संभवता । कवणें प्रकारें ॥ २४ ॥
राम शिवरामीं पूर्ण असोनि । प्रार्थिता झाला दंडकारण्यीं ।
तेथें शिव निजांगें भेटोनी । शिवगीता प्रकटविली ॥ २५ ॥
शिवगिरीपासून उद्‍भवली । रामसमुद्रा जाऊन मिळाली ।
गीतागोदावरी चालिली । जगदोद्धार करीत ॥ २६ ॥
गोदा एकदेशीं वाहत । शिवगीता भूमंडळीं व्याप्त ।
गंगेसी पूर येतां ओहटत । हे परिपूर्ण सदां ॥ २७ ॥
गोदेसी जातां जन कष्टती । गीतेच्या श्रवणें पावन होती ।
गोदेनें शीत‍उष्ण संभवती । हे द्वंद्वातीत करी ॥ २८ ॥
तस्मात् अधिक गोदेहूनी । शिवगीता असे कोटिगुणी ।
जे साधक प्रवर्तती श्रवणीं । गुरुमुखें तया मोक्ष ॥ २९ ॥
आतां श्रोतयांसी प्रार्थना । तुम्ही अवधाराल जरी एकाग्र मना ।
तरी बोलेन शिवोच्छिष्टवचना । प्राकृत भाषेनें ॥ ३० ॥
तुम्ही ब्रह्मानंदें नित्यतृप्त । पूर्ण बोधे सबराभरीत ।
तेथें माझीं वचनें प्राकृत । समावतीं कैशीं हें न म्हणा ॥ ३१ ॥
सागर पूर्णपणें असतां । माघारा पिटीना सरिता ।
आणि पर्जन्यधाराही अनंता । त्यांसही नको न म्हणे ॥ ३२ ॥
तैसेचि तुम्ही गुणग्राहक । अवधान द्यालच अवश्यक ।
परी हें सलगीचें कौतुक । भाषण करितों ॥ ३३ ॥
गुणग्राहक ऐसें म्हणावें । तरी अवगुणत्याग अवश्य संभवे ।
यास्तव हेंही ऐसें कदा नव्हे । म्हणोनि दृष्टांत ऐका ॥ ३४ ॥
सर्वभक्षक हुताशन । तैसे तुम्ही श्रोते सज्जन ।
माझे गुण अथवा अवगुण । न पहा कणवें ॥ ३५ ॥
मज व्युत्पत्ती ना कळातर्क । विभक्ति ना नवरसिक ।
यास्तव प्रार्थितों सकौतुक । न्यूनाधिक न पहा ॥ ३६ ॥
बाळकाचें बोलणें बोबडें । कांहीं नीट कांहीं वांकुडें ।
परी ते ऐकती अति कोडें । सर्वही लडिवाळपणें ॥ ३७ ॥
तैशी माझी आर्ष वाणी । स्वीकारावी श्रोते सज्जनीं ।
गीतार्थ बोलूं महाराष्ट्रवचनीं । तुम्हां संतांच्या प्रसादें ॥ ३८ ॥
श्रोते म्हणती हें कासया । उपरोधिक बोलसी वांया ।
गीतार्थ प्रकटवीं या समया । वेदांत संमत ॥ ३९ ॥
आम्हां अन्य शास्त्राची नसे चाड । जेथें मायिकाची आजि भीड ।
आणि भेदबुद्धि हे द्वाड । गेलीच नाहीं ॥ ४० ॥
ऐसा श्रोतयांचा आदरु । देखोनि वक्तां होय सादरु ।
जय जय शिवराम सद्‍गुरु । गर्जोनि बोलता झाला ॥ ४१ ॥
समुच्चय ही जरी असतां । मी बोलेन वेदांत सम्मता ।
जेथें परोक्षत्वाची वार्ता । लागोंचि नेदीं ॥ ४३ ॥
परी अधिकारा कारणें । पूर्वपक्षातें लागे बोलणें ।
परंतु त्याचें तात्पर्य पाहणें । बहुधा ज्ञानकांडीं ॥ ४४ ॥
आतां असावें सावधान । सकळ उपनिषद्‌भाग मथून ।
काढिलें व्यासें गीतारत्‍न । शिवराघव संवादमिषें ॥ ४५ ॥
पद्मपुराण जें प्रसिद्ध । त्या माजी हे गीता विशुद्ध ।
षोडशोऽद्याय बालबोध । ज्ञान विशद बोलिलें ॥ ४६ ॥
नैमिषारण्यीं व्यासशिष्य सूत । शौनकादिकांप्रति सांगत ।
अनेक इतिहास सभारत । अष्टादश पुराणें ॥ ४७ ॥
मनाची निमि झाली स्थिर । यास्तव नाम नैमिषकांतार ।
तेथें ऋषि करोनि सत्र । कथा सुंदर ऐकती ॥ ४८ ॥
सूत वक्ता पंडित चतुर । शौनकादि श्रोते तत्पर ।
चर्चा करिती अहोरात्र । बहुत काळ ॥ ४९ ॥
एकदां शौनकादिकीं सूतासी । प्रार्थूनिया अतिसायासीं ।
जी वेदांत प्रकटवावा आम्हांसी । इच्छा असे बहुत ॥ ५० ॥
बहुबरें म्हणोनि सूत । शिवगीतेसी आरंभ करित ।
षोडशोध्यायामाजीं विख्यात । प्रथमाध्याय आरंभिला ॥ ५१ ॥
प्रथमाध्यायीं प्रयोजन । पुरःसर चतुष्टयाचें लक्षण ।
कारण कीं हें वेदांत कथन । येथें अनुबंध असावा ॥ ५२ ॥
अनुबंधचतुष्टय जेथें असती । तोचि ग्रंथ वेदांत संमती ।
तेचि कोण कोण ऐकावें श्रोतीं । संक्षेपें बोलूं ॥ ५३ ॥
विषय संबंध प्रयोजन । चौथें अधिकाराचें लक्षण ।
हेंचि बोलिजे निरूपण । प्रथमाध्यायीं ॥ ५४ ॥
प्रथम श्लोकीं प्रतिज्ञापूर्वक । सूत म्हणे बोलेन अवश्यक ।
जें शुद्धकैवल्यदायक । आणि भवदुःख नाशी ॥ ५५ ॥


सूत उवाच :
अथातः संप्रवक्ष्यामि शुद्धं कैवल्यमुक्तिदम् ।
अनुग्रहान्महेशस्य भवदुःखस्य भेषजम् ॥ १ ॥


शौनकादिकीं प्रश्न केलिया । नंतर सूत बोले उपाया ।
महेश उपदेशें कडोनियां । बोलेन अतिप्रकर्षें ॥ ५६ ॥
जेथें भेदाची समाप्ति । शुद्धकैवल्य जयेतें म्हणती ।
तये नांव सायुज्यमुक्ति । आणि भवदुःखनाशक ॥ ५७ ॥
सालोक्य सामिप्य स्वरूपता । या तिहीं मुक्तींची लोकवार्ता ।
येणें कैवल्य नव्हे तत्त्वतां । आणि भवदुःख न नासे ॥ ५८ ॥
जेथें अज्ञान ज्ञानें नासे । भेद अवघाचि निरसे ।
पैठा होय अखंडैकरसें । तेंचि शुद्ध कैवल्य ॥ ५९ ॥
यास्तव सायुज्यमुक्ति प्रसिद्ध । या तिन्ही मुक्ति अशुद्ध ।
त्यागून कैवल्यमुक्तिप्रद । बोलेन सद्‍गुरुकृपें ॥ ६० ॥
आणी अज्ञानकार्य भयानक । नाथिलेपणें जें भवदुःख ।
तया दुःखाचें निवर्तक । परम औषध हें ॥ ६१ ॥
अनंत रोग प्राणिया होती । तेथें औषधें ही उदण्ड असतीं ।
तीं तीं घेतां वैद्याहातीं आरोग्य होती सपथ्य ॥ ६२ ॥
तैसा हा नव्हे रोग । कीं नाना औषधें होय भंग ।
अज्ञानें झाला जो वियोग । तो ज्ञानेंचि नासे ॥ ६३ ॥
मदांधकारें रज्जु देखतां । सर्पदंश मानिला चित्ता ।
तेथें मंत्रौतारादि यत्‍न करितां । तेणें निर्विष नव्हे ॥ ६४ ॥
दीप लावूनि रज्जु ओळखावी । तरीच लहरीची भ्रांती जावी ।
ऐसें नसतां मरणाची पदवी । अवश्य पावती ॥ ६५ ॥
तैसें ब्रह्म न जाणतां । भवभय उठिलें अवचितां ।
तेणें सुखाची वार्ता । बुडोन गेली ॥ ६६ ॥
तेथें अन्य औषधांचा उपचार । करितां रोग न जाय अणुमात्र ।
येथें ब्रह्म जें निरंतर । ओळखिलेंचि पाहिजे ॥ ६७ ॥
यथार्थ ब्रह्मज्ञान झालिया । भवदुःख नासे अपसया ।
सुखरूप पावती ध्येया । साधक साधनीं ॥ ६८ ॥
यास्तव अज्ञानदाहक । ज्ञान हेंचि निश्चयात्मक ।
अज्ञान गेलिया भवदुःख । उरे कोठोनी ॥ ६९ ॥
म्हणोनि भवरोगासी औषध । ज्ञान जें जीवेश अभेद ।
तया ज्ञानाचा विशद । विस्तार पुढें ॥ ७० ॥
दुःख जाणें हे अनिष्टनिवृत्ती । कैवल्य पावणें हे इष्ट प्राप्ति ।
हें दोन्ही रूपें प्रयोजन निश्चितीं । यया संवादाचें ॥ ७१ ॥
विषयसंबंध अधिकारी । अनुक्रमें दाविजे याची परी ।
आतां पुढील श्लोकीं निर्द्धारीं । अन्य साधनें निषेधिजे ॥ ७२ ॥


न कर्मणामनुष्ठानैर्न दानैस्तपसापि वा ।
कैवल्यं लभते मर्त्यः किंतु ज्ञानेन केवलम् ॥ २ ॥


कर्म आणि अनुष्ठान । तप अथवा नाना दान ।
मनुष्या न लभे कैवल्य पूर्ण । एका ज्ञानें पाविजे ॥ ७३ ॥
कामादि हें अज्ञानकार्य । तेणें अज्ञानाचा नव्हे क्षय ।
तरी भवदुःख नासोनि जाय । कोणेपरी ॥ ७४ ॥
रज्जुसर्पा दीपेवीण । अन्यसाधनें होय निरसन ।
जरी तरी सकार्य अज्ञान । कर्मादिकीं नासेल ॥ ७५ ॥
कर्मासि पाहिजे अभिमान । आणि सकारकादि हवन ।
ऐशिया क्रियेचें जरी हनन । तरीच निवृत्ति ॥ ७६ ॥
तस्मात् कर्मेंकडून मोक्ष नव्हे । तैसाचि अनुष्ठानेंही न संभवे ।
वाउगे शरीर कष्टें शिणावें । नाना निग्रहें ॥ ७७ ॥
भलतैसा जप जपिजे । आणि नाना तपें आचरिजें ।
येणें मोक्ष सहसा न लाहिजे । केवळ क्रियारूपें ॥ ७८ ॥
नाना तीर्थें नाना दानें । व्रतें उपोषणें पारणें ।
जन्मासीच लागे येणें । क्रियेनें ऐशिया ॥ ७९ ॥
तस्मात् मरणधर्मीं जे मर्त्य । येहीं साह्य करावा ज्ञानादित्य ।
अज्ञान आणि अज्ञानकृत्य । नासे तत्क्षणीं ॥ ८० ॥
निरसावया अंधारराशी । साह्य कांहीं न लगे दीपासी ।
तेवीं अज्ञान नासावया ज्ञानासी । अन्य अपेक्षा नको ॥ ८१ ॥
केवळ शब्दें एकलें ज्ञान । सकार्य नाशी अज्ञान ।
तत्क्षणीं मोक्षासी पावन । होती साधक ॥ ८२ ॥
असो ज्ञानरूपें ही शिवगीता । पूर्वीं कोण कोणास होय दाता ।
तेंचि अवधारावें तत्त्वता । पुढील श्लोकीं ॥ ८३ ॥


रामाय दण्डकारण्ये पार्वतीपतिनापुरा ।
या प्रोक्ता शिवगीताख्या गुह्याद्‍गुह्यतमा हि सा ॥ ३ ॥


गुह्याहून गुह्य अति । शिवगीता हे पार्वतीपती ।
सांगता झाला रामाप्रति । पूर्वी दण्डकारण्यीं ॥ ८४ ॥
शिव रामाप्रति बोलिला । हा उगाचि गौरव केला ।
परंतु सद्‌गुरू सच्छिष्याला । बोधित असे ॥ ८५ ॥
हे गुह्याहून गुह्य कैशी । श्लोकार्धें बोलिजेल तुम्हांसी ।
जिचें स्मरण भवदुःख नाशी । आणि मुक्ति लाहे ॥ ८६ ॥


यस्याः श्रवणमात्रेण नृणां मुक्तिर्दृढं भवेत् ॥ ४.१ ॥


स्मरणें नर मुक्ति लाहती । परि समजावी स्मरणाची रीती ।
गीतार्थाचें अनुसंधान धरिती । तेचि पावती निजमोक्ष ॥ ८७ ॥
अनुसंधानरूप ध्यान । हेंचि कर्तृतंत्र उपासन ।
येणेंही होईजे पावन । मा वस्तुतंत्रज्ञानें कां न पावती ॥ ८८ ॥
याहीवरी या गीतारत्‍ना । बोलिलें असे कोणें कोणा ।
तेंचि सांगिजेल वचना । दिडा श्लोकें ॥ ८९ ॥


पुरा सनत्कुमाराय स्कंदेनाभिहिता हि सा ॥ ४ ॥
सनत्कुमारः प्रोवाच व्यासाय मुनिसत्तमाः ।
मह्यं कृपातिरेकेण प्रददौ बादरायणः ॥ ५ ॥


शिवपुत्र षडानन । सनत्कुमारा करी व्याख्यान ।
तेही व्यासश्रेष्ठापाशीं येऊन । बोलते झाले ॥ ९० ॥
त्या व्यासाची मजवर । कृपा असे कीं थोर ।
यास्तव गीतेचा विचार । मजप्रति दीधला ॥ ९१ ॥
आणि व्यासमुख कुरवाळूनी । सांगता झाला माझे कर्णीं ।
हेंचि ऐका सावध होऊनी । पुढील श्लोकीं ॥ ९२ ॥


उक्तं च तेन कस्मैचिन्न दातव्यमिदं त्यया ।
सूतपुत्रान्यथा देवा क्षुभ्यन्ति च शपन्ति च ॥ ६ ॥


सूतपुत्रा हे शिवगीता । अनधिकारिया न द्यावी तत्त्वतां ।
जरी देशी तरी देवता । क्षोभती आणि शापिती ॥ ९३ ॥
मग म्यां व्यासासी विनविलें प्रश्नें । त्या देवांचें काय पडतें उणें ।
यास्तव क्षोभून शापिती दारुणें । काय म्हणोन यया श्लोकीं ॥ ९४ ॥


अथ पृष्टो मया विप्रा भगवान्बादरायणः ।
भगवन्देवताः सर्वाः किं क्ष्युभ्यन्ति शपन्ति च ॥ ७ ॥
तासामत्रास्ति का हानिर्यया कुप्यन्ति देवताः ।


भगवन् ह्या सर्व देवता । येथें हानि कोणती तत्त्वतां ।
कां क्षोभती ऐसें पुसतां । व्यास बोलती अर्धश्लोकीं ॥ ९५ ॥


पाराशर्योऽथ मामाह यत्पृष्टं श्रृणु वत्स तत् ॥ ८ ॥


अगा हे सूता तुजप्रति । जगाचा कळवळा असें चित्तीं ।
सर्व देवता कां क्षोभती । तें ऐकें साकल्य ॥ ९६ ॥
येथून साडेतीन श्लोकें कडूनी । बोलिजे त्यांची काय हानि ।
क्षोभोनि शापिती वचनीं । तें बोलूं पुढें ॥ ९७ ॥


नित्याग्निहोत्रिणो विप्राः संति ये गृहमेधिनः ।
त एव सर्वफलदाः सुराणां कामधेनवः ॥ ९ ॥


विप्र जे गृहस्थाश्रमीं असती । प्रतिदिनीं अग्नीसी हवन देती ।
तेचि देवांसी फलद होती । जेवि कामुका कामधेनु ॥ ९८ ॥


भक्ष्यं भोज्यं च पेयं च यद्यदिष्टं सुपर्वणाम् ।
अग्नौ हुतेन हविषा सत्सर्वं लभ्यते दिवि ॥ १० ॥


भक्ष्य भोज्यादि अग्नींत । इष्ट आज्यादि जें होमित ।
तें तें स्वर्गीं देवा पावत । तेणें तृप्त देवता ॥ ९९ ॥


नान्यदस्ति सुरेशानामिष्टसिद्धिप्रदं दिवि ।
दोग्ध्री धेनुर्यथा नीता दुःखदा गृहमेधिनाम् ॥ ११ ॥
तथैव ज्ञानवान्विप्रो देवानां दुःखदो भवेत् ।


या विरहित दुसरें अन्न । इष्ट नसे स्वर्गीं देवांलागून ।
यास्तव दुःखद होती ब्राह्मण । जे नित्यकर्म त्यागिती ॥ १०० ॥
जेवीं गृहस्थासी दुभती धेनु । कोणी हरितां होय शिणु ।
तैसाचि विप्र ज्ञानवानु । देवां दुःखद होय ॥ १ ॥
अगा सूता देवासी । ज्ञानवान् दुःखद होय त्यासी ।
तरी मग ज्ञानाचे अभ्यासीं । कोणें पडावें म्हणसी ॥ २ ॥
तरी हें नव्हें कीं उचित । येथें बोलिजे कांहीं ध्वनित ।
जे अनधिकारी ज्ञान संपादित । तेचि देवां दुःखद होती ॥ ३ ॥
येर जे का अधिकारी । ज्यांची अनंत जन्मींची सामग्री ।
ते देवांसी दुःखकारी । न होती कदां ॥ ४ ॥
देव जरी परोक्षप्रिय । अनधिकारिया करिती अपाय ।
जो स्वरूपीं समरस होय । तेथें देव भिन्न कैचे ॥ ५ ॥
हें असो मुख्य ज्ञाता । देवां दुःखद नव्हे तत्वतां ।
जरी चतुष्टय संपन्न युक्ता । देवद्रोहो न घडे ॥ ६ ॥
तया अधिकारीयाचें लक्षण । संक्षेपे कीजे कथन ।
सत्यासत्य निवडिलें जेणें । हा नित्यानित्य विवेक ॥ ७ ॥
इहलोक परलोक भोगाची । इच्छा नाहीं स्वप्नीं साची ।
हेचि अवधि वैराग्याची । दुसरे साधन ॥ ८ ॥
अंतर्निग्रह तो शम । बाह्येंद्रियनिग्रह तो दम ।
विषयाहून परतणें उपरम । सर्व सहाणें तितिक्षा ॥ ९ ॥
सद्‌गुरु वेदांतवचनीं । आवडी ते श्रद्धा बोलिजे वाणी ।
सर्व पदार्थां समता मानी । समाधान या नांवें ॥ ११० ॥
हे सहा मिळून साधन एक । ऐका मुमुक्षुत्वाचें कौतुक ।
मोक्षचि इच्छितसे एक । अन्य सर्व त्यागुनी ॥ ११ ॥
एवं ऐशीं साधनें चारीं । वर्तती जयाचें अंतरीं ।
तोचि जाणिजे अधिकारी । चतुष्टयसंपन्न ॥ १२ ॥
ऐशियासी या गीतार्थाचें । श्रवण मनन होय साचे ।
निदिध्यासें साक्षात्काराचें । फल पावती तत्क्षणीं ॥ १३ ॥
प्रथम श्लोकीं प्रयोजन बोलिलें । येथें अधिकारियाचें लक्षण केलें ।
विषय संबंध दोनी उरले । ते बोलिजेतील पुढें ॥ १४ ॥
असो ऐशिया अधिकारावीण । क्षत्रिय वैश्य अथवा ब्राह्मण ।
जे जे करिती गीतार्थयत्नक । ते ते देवां दुःखकारी ॥ १५ ॥
तयांसी देव विघ्न करिती । तेंचि बोलिजे यथामति ।
श्लोकार्धीं तयांची स्थिति । वर्णिजेल ॥ १६ ॥


त्रिदशास्तेन विघ्नंति प्रविष्टा विषयं नृणाम् ॥ १२ ॥


आपुला स्वधर्म त्यागून । जे करिती गीतार्थ श्रवण ।
त्यांसी देव मृत्युलोकीं येऊन । छळण करिती ॥ १७ ॥
बळें जाऊन श्रवण करितां । तेथें ओढिती इंद्रियदेवता ।
तेणें विषयाकार होतां । ऐकिलें तें व्यर्थ जाय ॥ १८ ॥
तथापि इंद्रियनिग्रह केला । श्रवणीं सादत बैसला ।
तेथें देवीं घातला घाला । स्त्रीपुत्र रूपें कडोनी ॥ १९ ॥
स्त्री पुत्र संसार त्यागितां । तरी लोक हंसती तत्त्वतां ।
आप्त स्वजन म्हणती ताता । वडिलांचें नांव राखी ॥ १२० ॥
तथापि लौकिकही सांडूनी । प्रवर्तता होय श्रवणीं ।
तरी स्वर्गेच्छा उठे मनीं । तेव्हां कर्माकडे धांवे ॥ २१ ॥
तस्मात् अनधिकारी जे नर । त्यांसी गीतार्थ अतिदुष्कर ।
यास्तव येथील ज्ञाविचार । न सांगें त्याप्रति ॥ २२ ॥
जे अधिकारी श्रवण करिती । तयां लाहेजे निजभक्ति ।
ते नलभे अनधिकारियाप्रति । हेंचि श्लोकार्धीं बोलिजे ॥ २३ ॥


ततो न जायते भक्तिः शिवे कस्यापि देहिनः ॥ १३.१ ॥


ऐसें देवीं विघ्न केलिया । शिवभक्ति न लभे तया ।
परी भक्तीचें लक्षण उपाया । बोलिजे आधीं ॥ २४ ॥
शिवरूप जें सच्चिद्‍घन । अखण्डैकरस परिपूर्ण ।
जेथें जीवशिवाचें भेदभान । नसे किमपि ॥ २५ ॥
ऐशी ऐक्यभक्ती परम । जे जीवन्मुक्ताची स्थिति चरम ।
ते उत्तमाधिकारी सांडूनि भ्रम । पावती गुरूकृपें ॥ २६ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा अद्वय । हाचि या गीतार्थाचा विषय ।
हा अनधिकारिया काय होय । मर्कटा नारिकेल जैसें ॥ २७ ॥
हे असो अभेदभक्ति । तयासी नव्हे निश्चिती ।
परी शिवाची जे सगुणमूर्ति । तेथें ही आवडी नव्हे ॥ २८ ॥


तस्मादविदुषां नैव जायते शूलपाणिनः ॥ १३ ॥
यथाकथंचिज्जातापि मध्ये विच्छिद्यते नृणाम् ॥ १४.१ ॥


तस्मात् अविदुष अनधिकारी । तथा शिवभक्ति असे दुरी ।
बळें प्रीती धरितां अंतरीं । विषयाकडे ओढी ॥ २९ ॥
तथापि प्रीति झाली उत्पन्न । तरी मध्येंचि होय विच्छिन्न ।
कांहीं घडलें भजन पूजन । तेंही सांडोन विषय चिंतीं ॥ १३० ॥
ऐसें व्हावया असे कारण । जें यथार्थ शिवाचें नसे ज्ञान ।
तेंचि बोलिजे श्लोकार्धें कडून । ध्वनितार्थें कांहींसें ॥ ३१ ॥


जातं वापि शिवज्ञानं न विश्वासं भजत्यलम् ॥ १४ ॥


शिव सच्चिद्‍घन निर्गुण । तोचि मायावशें झाला सगुण ।
ऐसें उत्पन्न झालें जरी ज्ञान । तरी अविश्वासें न भजे ॥ ३२ ॥
कारण कीं मी ब्रह्म नव्हे प्रतीति । शिवरूप कळलें परोक्षरीति ।
तेणें अविश्वास उद्‍भवला चित्तीं । तेव्हां भजनादि कैचें ॥ ३३ ॥
जय भजनें अंतःकरण स्थिर । होऊन ज्ञानासी होय पात्र ।
तें सांडोनिया अपवित्र । भवदुःखीं पडती ॥ ३४ ॥
तस्मात् सूता हे जे बोलिले । गीतेविषयीं अनधिकारी त्यागिले ।
ऐसें बोलोन व्यास गेले । नित्यकर्मासी ॥ ३५ ॥
तस्मात् शौनकहो ऐका । गीतार्था अधिकारी पाहिजे निका ।
हें ऐकोनि शौनक प्रश्न कौतुका । दिढा श्लोकें करिती ॥ ३६ ॥


ऋषय ऊचुः ।
यद्येवं देवता विघ्नमाचरन्ति तनूभृताम् ।
पौरुषं तत्र कस्यास्ति येन मुक्तिर्भविष्यति ॥ १५ ॥
सत्यं सूतात्मज ब्रूहि तत्रोपायोऽस्ति वा न वा ।


जरी देव करिती ऐसे विघ्न । तरी नरा कोणता पुरुषप्रयत्‍न ।
जेणें अनधिकारी पावन । मुक्तीसी होती ॥ ३७ ॥
हें ऐसें गा सूतात्मजा । आम्हांसी सांगावे ओजा ।
येथें तरणोपाय दुजा । आहे कीं नाहीं ॥ ३८ ॥
ऐसा हा प्रश्न ऐकिला । तेणें सूत अति संकोचला ।
म्हणे कायहो पडलें तुम्हांला । यया अनधिकारियावीण ॥ ३९ ॥
तथापि तुमचा कळवळा असे । तरी बोलिजे तें कांहींसें ।
ज्याची स्वर्गकामीं बुद्धि वसे । तेणें कर्में आचरावीं ॥ १४० ॥
सत्यलोक वैकुंठी कैलासीं । रहावें वाटे जयासी ।
तेणें आरंभावें उपासनेसी । कर्मभक्ति योगें ॥ ४१ ॥
तया उपासनेच्या योगें । निष्कर्म कर्में करी वेगें ।
तेणें चित्त शुद्ध होऊं लागे । ज्ञानाधिकारी होय ॥ ४२ ॥
मग गुरुमुखें श्रवण करी । मनन निदिध्यासन अंतरीं ।
तेणें जीवन्मुक्ती सांक्षात्कारीं । पावे ऐक्य भक्तीसी ॥ ४३ ॥
ऐसें जे परंपरा साधन । येणेंही होतील पावन ।
हें वर्म अंतरीं ठेवून । सूत बोलता झाला ॥ ४४ ॥


कोटिजन्मार्जितैः पुण्यैः शिवे भक्तिः प्रजायते ॥ १६ ॥


कोटी जन्माचें पूर्वसंचित । तोचि शिवभक्तीसी होय रत ।
अर्चन ध्यान भजन करीत । संसारीं उद्विग्न होऊनि ॥ ४५ ॥
तेचि पूर्वपुण्यें कैसी । एका श्लोकीं बोलिजे तुम्हांसी ।
जेणें चित्तशुद्धि होय आपैसी । आणि ज्ञानाधिकार ॥ ४६ ॥


इष्टापूर्तादिकर्माणि तेनाचरति मानवः ।
शिवार्पणधिया कामान्परित्यज्य यथाविधि ॥ १७ ॥


काम्यनिषिद्धा त्यागून । इष्टापूर्तादि कर्माचरण ।
आचरती बुद्ध्या शिवार्पण । जैसा जैसा विधि ॥ ४७ ॥
इष्ट म्हणजे यज्ञादिक । पूर्त्त वापी सरोवरादिक ।
करी परी मनासी एक । फलाशा नाहीं ॥ ४८ ॥
तरी सहज होय शिवार्पण । ऐसें निष्कर्म कर्माचरण ।
करितां शिवहि आपण । गुरूरूपें अनुग्रह करी ॥ ४९ ॥


अनुग्रहात्तेन शंभोर्जायते सुदृढो नरः ।
ततो भीताः पलायन्ते विघ्नं हित्वा सुरेश्वराः ॥ १८ ॥


शिवगुरूच्या अनुग्रहेंकडून । तो नर सदृढ करी श्रवण ।
मग देव भिवोन पलायन । करिती विघ्नें त्यागुनी ॥ १५० ॥
सक्रिय आणि प्रबोधशक्ति । ऐसे गुरु जेव्हां उपदेशिती ।
तेव्हां संशय तुटोनि जाती । सच्छास्त्रप्रामाण्यें ॥ ५१ ॥
मग अविश्वास उडोनि जाय । वेदांत श्रवणीं श्रद्धा होय ।
तेव्हां ज्ञानेवीण जो जो उपाय । तृणतुच्छ करी ॥ ५२ ॥
ऐशी भावना होतां बळकट । देव सांडिती विघ्नाची खटपट ।
भीती घेवोन पळती पटपट । नीट स्वर्गाकडे ॥ ५३ ॥


जायते तेन शुश्रूषा चरिते चन्द्रमौलिनः ।
श्रृण्वतो जायते ज्ञानं ज्ञानादेव विमुच्यते ॥ १९ ॥


सर्व देव गेलियावरी । श्रवणेच्छा होय अति अंतरीं ।
ऐकतां तत्त्वज्ञान होय झडकरी । मग ज्ञानादेव मोक्ष ॥ ५४ ॥
मनचंद्र जयाचे मौलीं । या नांव जाणिजे चंद्रमौली ।
त्याचें चरित्रतत्त्वें उद्‌भवलीं । आणि त्याचा लय कैसा ॥ ५५ ॥
चित्सागरीं जैशीया लहरी । तत्त्वें उद्‌भवून निमतीं सारीं ।
ऐशीया श्रवणाची चाड धरी । सदृढ विश्वासें ॥ ५६ ॥
ऐसें श्रवण गुरुमुखें करितां । ऐक्यज्ञान उपजे तत्त्वतां ।
तेणें ज्ञानें जीवन्मुक्तता । येणेंचि देहें भोगी ॥ ५७ ॥
देह पडलिया होय मोक्षसुख । ऐसें मानिती ते केवळ मूर्ख ।
हें निरूपिती ते पढतमूर्ख । म्हणावे न लगती ॥ ५८ ॥
एकदां झालिया अपरोक्षज्ञान । तया पुन्हा न होय अज्ञान ।
अज्ञान जातां भवबंधन । वार्ता ही नुरे ॥ ५९ ॥


बहुनात्र किमुक्तेन यस्य भक्तिः शिवे दृढा ।
महापापोपपापौघ-कोटिग्रस्तोऽपि मुच्यते ॥ २० ॥


बहु कासया बोलावें । जेणें शिवीं अभिन्न व्हावें ।
पुढें पापकोटि जरी संभवे । तरी अलिप्तत्वें मोकळा ॥ १६० ॥
आत्मनिवेदन झालियावीण । ऐक्यभक्ति नव्हे अभिन्न ।
त्या निवेदनाचे प्रकार तीन । जड चंचल निश्चल ॥ ६१ ॥
तिहीं प्रकारें एक मीपण । त्याची हानि झालियाविण ।
ऐक्यभक्तीचें लक्षण । अंगीं न बाणें ॥ ६२ ॥
मी माझें दोनी गेलिया । विश्वाभिमान गळे आपसया ।
जड आत्मनिवेदन यया । प्रकारें बोलिजे ॥ ६३ ॥
कर्ता भोक्ता निमे जेव्हां । तैजस अभिमानी मरे तेव्हां ।
चंचळ निवेदन प्रकार जाणावा । ऐशियापरी ॥ ६४ ॥
चंचळ त्रिपुटी जैं ओसरे । कर्तृतंत्रत्वें द्वैत विरे ।
वस्तु निश्चळरूपें उरे । हें निश्चळ आत्मनिवेदन ॥ ६५ ॥
ती प्रकारें निवेदन झालीया । हेचि गा ऐक्यभक्ति अद्वया ।
यावीण बोलती ते वांया । कर्मभक्ति ॥ ६६ ॥
तूं एक मी एक । हें कर्मभक्तीचें कौतुक ।
प्रीति धरिलिया आवश्यक । व्यभिचार घडे ॥ ६७ ॥
यास्तव शिवभिन्न दृढभक्ति । जया घडे पुरुषाप्रति ।
त्याची अनंत जन्मींची संचितें असतीं । तीं जळतीं तत्क्षणीं ॥ ६८ ॥
निजांगें शिवरूपची असतां । अज्ञानें आली जीवत्वता ।
तेणें गुणें मीच कर्ता भोक्ता । सदृढ झालें ॥ ६९ ॥
म्यां ही अमुक पापें केलीं । अमुक हीं भोगितसें वहिलीं ।
येथून कोटि कोटि जरी झालीं । तीं तीं भोगणें अवश्य ॥ १७० ॥
ऐसा अकर्ताचि परी अभिमानें । पापपुण्यें घेतलीं अज्ञानें ।
तें अज्ञान निपटून निवेदनें । गेलीं समुळींहुनि ॥ ७१ ॥
आतां कर्त्ता असे कोण । कीं संभवेल पापपुण्य ।
यास्तव कोटि पापांचें निसंतान । झालें आत्मबोधें ॥ ७२ ॥
जैसें स्वप्नामाजी कवणाते । कोटि ब्राह्मणादिकांचे झाले घात ।
जागा झालिया प्रायश्चित्त । शास्त्रींही नसे लिहिलें ॥ ७३ ॥


अनादरेण शाठ्येन परिहासेन मायया ।
शिवभक्तिरतश्चेत्स्यादन्त्यजोऽपि विमुच्यते ॥ २१ ॥


मग तो अनादरें कीं शठपणें । शिवासी हांसून मायिक म्हणे ।
परी ऐक्यभक्ति पावे अपरोक्षज्ञानें । तो चांडाल तरी मुक्त होय ॥ ७४ ॥
असो पूर्व संचित जरी जळालें । पुढें क्रियमाणही नाहीं स्पर्शलें ।
तेणें त्रैलोक्य हनन जरी केलें । कोणी मरेना हा मारी ॥ ७५ ॥


एवं भक्तिश्च सर्वेषां सर्वदा सर्वतोमुखी ।
तस्यां तु विद्यमानायां यस्तु मर्त्यो न मुच्यते ॥ २२ ॥


ऐशिया ऐक्यरूप भक्तीचा । सर्वां अधिकार असे साचा ।
आणि हे विद्यमान ठायीं जयाच्या । तो मर्त्य मुक्त नव्हे केवी ॥ ७६ ॥
ऐशी शिवभक्ति घडलिया । कोण उरेल गा पापिया ।
ऐसा पापात्मा भूमंडळींया । जन्मला नाहीं ॥ ७७ ॥


संसारबंधनात्तस्मादन्यः को वास्ति मूढधीः ।
नियमाद्यस्तु कुर्वीत भक्तिं वा द्रोहमेव वा ॥ २३ ॥


ऐसा संसारीं कोण मूढ । कीं शिवाऐक्यभक्तीनें न तरे जड ।
प्रीतीनें अथवा द्रोहें वाड । ज्ञाननियमें सारिखा ॥ ७८ ॥
शिवभिन्नज्ञान झालिया । वेगळा कोण उरे पापिया ।
ऐसें असतां जीवा यया । कैसें अज्ञान ॥ ७९ ॥
पहा शिव दयाळु कैसा । प्रिय द्वेषी न म्हणे सहसा ।
लागतांचि अंतर्ध्यासी । फळ उभयां समान दे ॥ १८० ॥
प्रियरूप भक्तीनें जे भजती । त्यांचे प्रकार चार असती ।
आणि द्रोय करणारही होती । चौ प्रकारेंचि ॥ ८१ ॥
अपरोक्ष तो ज्ञाता उत्तम । परोक्षज्ञानी तो मध्यम ।
ज्ञानहीन तो अधम । विपरीतज्ञाता तो निकृष्ट ॥ ८२ ॥
उत्तमा भजन अथवा द्रोह घडे । तेंचि कैसें ऐका उघडें ।
स्वरूपीं ऐक्यभक्ति आतुडे । मीपण त्यागितां अभिन्न ॥ ८३ ॥
मग तो पूर्वील ध्यासें भजन करी । परी प्रिया प्रिय सांडिलें दुरी ।
शिवरूप हें चराचरी । कीं शिवीं जग ॥ ८४ ॥
या नांवे शिवभक्त उत्तम । जो सदाशिवा आवडे परम ।
आतां द्रोह करणार याचें वर्म । ऐका कांहींसें ॥ ८५ ॥
न होतां नामरूप निषेध । स्वरूपीं कैसा होईल बोध ।
यास्तव सर्वज्ञत्वादि धर्म विशुद्ध । निरसावे लागती ॥ ८६ ॥
मायिक मिथत्वें त्यागावें । ऐश्वर्यादि धर्म आघवे ।
हे त्यागितां द्रोह संभवे । परी आवडे तो शिवासी ॥ ८७ ॥
आतां मध्यम परोक्षज्ञानी । प्रवर्ते कैसा द्रोह भजनीं ।
जयाची आवडी ध्येयध्यानीं । तिहींही काळीं ॥ ८८ ॥
जें जें दिसेल आणि भासेल तया । तें तें शिवरूप आणी प्रत्यया ।
ऐसें प्रीतीचें भजन यया । नांवीं बोलिजे ॥ ८९ ॥
नामरूप जेव्हां सांडीं । अस्तिभातित्वें मारी बुडी ।
तेव्हां द्रोहरूपता परवडी । परी तो आवडे शिवा ॥ १९० ॥
आतां तिसरा अज्ञान । तोही भक्तिद्रोह करी जाण ।
तयाचेंहीं कांही लक्षण । ऐका करूं ॥ ९१ ॥
शिवमूर्ति शास्त्रीं ऐकिली । तेंचि मानसपूजेनें प्रतिष्ठिली ।
अत्यंत धारणा लागली । हे प्रियरूप भक्ति ॥ ९२ ॥
कोणी एकें ऐकिली वचनोक्ति । कीं तुझा मृत्यु शिवाचे हातीं ।
तेणें भयद्‍रूपें ध्यास चित्तीं । सदृढ झाला द्रोहें ॥ ९३ ॥
एवं द्रोहें अथवा प्रीतिकरून । निदिध्यासें घडे ध्यान ।
तयां उभयांप्रति समान । शिव तो सारिखा ॥ ९४ ॥
चक्रवाकें प्रीतीनें भजती । तेही तादात्म्य लाहती ।
आणि भयद्‍रूपें अलिकेप्रति । भ्रमरित्व येतसे ॥ ९५ ॥
निकृष्ट द्रोही भजक । तयाचे कैसें रूपक ।
संक्षेपें बोलूं कांहीं एक । तेंचि अवधारा ॥ ९६ ॥
शिवरूप नेणोनि अंतर्यामा । धातु पाषाणाच्या करिती प्रतिमा ।
पूजिती भजती धरूनि प्रेमा । ही आवडीरूप भक्ति ॥ ९७ ॥
व्याघ्रें धरितां गाय घाबरली । ती सोडावी ऐशी बुद्धि झाली ।
पाय देऊनियां उडी घाली । शिवलिंगावरूनी ॥ ९८ ॥
तो द्रोहचि परी अति प्रिय झाला । देखोनि शंकर अति संतोषला ।
म्हणे काय द्यावें ययाला । हा उपकारी थोर ॥ ९९ ॥
एवं उत्तम मध्यम कनिष्ठ । चौथा अधिकारी निकृष्ट ।
भक्त आणि द्रोही स्पष्ट । भिन्नभिन्न सांगितले ॥ २०० ॥
भक्त अथवा द्रोही उभय । परी शिवासी आवडती निश्चय ।
तया लागीं प्रसन्न होय । आणि इच्छित फल दे ॥ १ ॥


तस्यापि चेत्प्रसन्नोऽसौ फलं यच्छति वांछितम् ।


मग तयां उभयाप्रति । प्रसन्न होवोनि उमापति ।
जें जें जया वांछित चित्तीं । तें तें फल दे तयां ॥ २ ॥
शिव तरी सर्वां समान । परी इच्छा सर्वांची भिन्नभिन्न ।
तैसीं फळें पावतीं आपण । चौघे चौ प्रकारें ॥ ३ ॥
अपरोक्षज्ञानियां आपुलें । अदेय गुरुत्वचि समर्पिलें ।
येणें सच्छिष्य बोधावे वहिले । ज्या बोधें शिवरूप होय ॥ ४ ॥
आणि पाठी थापटुनी । नांव ठेविलें मोक्षपाणि ।
कैवल्य इच्छितील जे जे मनीं । ते ते पावती प्रसादें ॥ ५ ॥
कर्तृतंत्र परोक्षज्ञानी । फळ काय दे तया लागोनी ।
द्वैत त्रिपुटी सर्व हरूनी । अपरोक्ष होय ॥ ६ ॥
कनिष्ठ जो भाविक । तया वांच्छित दे शिवलोक ।
आणि निकृष्ट जे का भजक । त्यां दारा पुत्र धनादि ॥ ७ ॥
प्रतिमा पूजन जे करिती । दारापुत्रादि न इच्छिती ।
तेही गीतार्थ पात्र होती । चित्तशुद्धी झालिया ॥ ८ ॥
भावार्थीं जो मानसभजक । तेणें वांच्छूं नये शिवलोक ।
तो अधिकारी होय निश्चयात्मक । गीतार्था मध्यम ॥ ९ ॥
कर्तृतंत्र तो उत्तम अधिकारी । प्रबोधमात्रें ऐक्यता वरी ।
वस्तुतंत्र होय झडकरी । जया नांव ऐक्य भक्ति ॥ २१० ॥
वस्तुतंत्र अपरोक्ष ज्ञानिया । अधिकार कल्पणेंचि वांया ।
अद्वितीय समाधान जया । सदृढ झालें ॥ ११ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा अद्वय । ऐक्यभक्ति जे निश्चय ।
हाचि गीतार्थाचा विषय । स्पष्ट असे ॥ १२ ॥
उत्तम मध्यम कनिष्ठ । हे अधिकारी सांगितले स्पष्ट ।
संबंध तोचि जाणिजे अविट । साध्यसाधक भाव ॥ १३ ॥
एवं विषयसंबंध प्रयोजन । अधिकारादि चतुष्टय कथन ।
जेथें तोचि वेदांत पूर्ण । प्रसिद्ध असे ॥ १४ ।
अनधिकारिया उपाय कांहीं । पुसिला होता आहे कीं नाहीं ।
तो परंपरा साधनद्वारां पाहीं । सांगितला तुम्हां ॥ १५ ॥
शौनकादि म्हणती सूतासी । प्रीति द्रोहानें भजती शिवासी ।
ते ते आवडती जरी निश्चयेंशीं । तरी अनधिकारी कोणता ॥ १६ ॥
शिवगीता न द्यावी अनधिकारिया । हें बोलणेंचि वाटे वांया ।
मुख्य कीं परंपरा उपाया । अधिकारी सर्व होती ॥ १७ ॥
तंव सूत म्हणे ऐका निश्चिती । भक्त द्रोही जरी एक रीति ।
परि याही माजी निगुती । तारतम्य असे ॥ १८ ॥
तें तें यथामति बोलिलें । परी तुम्हां नाहीं अनुमानिलें ।
तरी मागुती बोलूं वहिलें । मागील निरूपण ॥ १९ ॥
भजन पूजन जे जे करिती । त्यांतही शिवासी अप्रिय होती ।
मग द्रोह वसे ज्याचें चित्तीं । तें अप्रिय म्हणणें नको ॥ २२० ॥
यथार्थ शिवरूप हें नेणतां । भजती पूजिती दांभिकता ।
अन्याची स्तुति ऐकतां । कलह मात्र करिती ॥ २१ ॥
आमुचा देव तो महाथोर । तुमचा देव काय पामर ।
ऐसें बोलती परस्पर । निष्कारण आग्रहें ॥ २२ ॥
शिवद्रोही जो वैष्णव । आणि विष्णुद्रोही शैव ।
हे भजनचि परी ठाव । द्रोहासी केला ॥ २३ ॥
ऐका शिवरूप आहे कैसें । यथामती बोलिजे कांहींसें ।
तें नेणोनि बापुडे पिसें । एकदेशी भाविती ॥ २४ ॥
अस्ति भाति प्रियरूप । हें शिवाचें मुख्य स्वरूप ।
आणि मायिक जें भासरूप । तेंही एकदेशी नव्हे ॥ २५ ॥
मायेपासूनि तृणापर्यंत । दृश्य भासें हें हें समस्त ।
तें तें शिवरूप सदोदित । अलंकारीं सुवर्ण जेवीं ॥ २६ ॥
विराट ज्याचें स्थूल शरीर । सूक्ष्म तें हिरण्यगर्भ साचार ।
अव्याकृत उभयां बिढार । कारणरूपत्वें ॥ २७ ॥
एवं हें जें चराचर । दिसतें भासतें समग्र ।
तें तें सर्वही पृथकाकार । अवयव शिवाचे ॥ २८ ॥
सप्तपाताळ चरण । जेथें त्रिविक्रमाचें अधिष्ठान ।
सप्तविध तयाचें लक्षण । विभागलें असे ॥ २९ ॥
पाताळ तें पादतळ । प्रपद तें रसातळ ।
गुल्फद्वय महातळ । तळातळ जंघा ॥ २३० ॥
जानुद्वय तें सुतळ । उरू अतळ आणि वितळ ।
जघनदेश महीतळ । विराट पुरुषाचें ॥ ३१ ॥
नभ नाभी हृदय नक्षत्रगण । ग्रीवा ते महर्लोक जाण ।
जनोलोक तो वदन । तपोलोक ललाट ॥ ३२ ॥
सत्यलोक तो मस्तक । हस्त जाणावा इंद्रलोक ।
अश्विनीदेव नासिक । कर्णरंध्र दिशा ॥ ३३ ॥
सूर्यलोक तो नयन । यमलोक दाढा कठीण ।
स्नेहकळा दंततीक्ष्ण । हास्य ते माया ॥ ३४ ॥
वडवानळ तें जठर । कुक्षी ते सप्तसमुद्र ।
पर्वत ते अस्थिमात्र । नाडी नद्या ॥ ३५ ॥
केश वृक्ष वायु श्वसन । रेत ते वृष्टी संपूर्ण ।
धर्म तो जाणिजे स्तन । अधर्म पृष्टी ॥ ३६ ॥
वृषण ते मित्रावरुण । प्रजापति ते शिश्न ।
लज्जा लोभ हे दोन । ओठ कोमळ ॥ ३७ ॥
मुख्य अंतःकरण तो विष्णु । चंद्रमा तो जाणिजे मनु ।
बुद्धि हें कमळासनु । साकार शिवाची ॥ ३८ ॥
जयाचें चित्त नारायण । अहंकार हा रुद्र आपण ।
एवं झाले हें अंतःकरण । आतां इंद्रियें ऐका ॥ ३९ ॥
वाचा अग्नि हे प्रसिद्ध । ते चौप्रकारें चारी वेद ।
परा पश्यंति मध्यमा विशुद्ध । वैखरी चौथी ॥ २४० ॥
पाणि तोचि जाणिजे इंद्र । पाद तो वामन उपेंद्र ।
प्रजापति तोचि मेढ्र । जया शिवाचें ॥ ४१ ॥
गुद तोचि सूर्यनंदन । श्रोत्र हे अष्टदिशा पूर्ण ।
त्वचा वायु सूर्य नयन । जया देवाचे ॥ ४२ ॥
जिव्हा जयाची वरुण । अश्विनीदेव जयाचें घ्राण ।
एवं एकलाचि परीपूर्ण । सर्वदेवीं देव ॥ ४३ ॥
एवं पंचभूतें चारी खाणी । त्रैलोक्य हें दृश्यपणीं ।
आणि चंचलरूप देव मिळोनी । एकलें शिवत्व विलसे ॥ ४४ ॥
ऐसें असतां अल्पज्ञ जीव । बळें धरिती एकदेशी भाव ।
लहान थोर ठेवोनि नांव । भजती वेगळाले ॥ ४५ ॥
शैव म्हणती पशुपति । वैष्णव म्हणती विष्णुमूर्ति ।
गाणपत्य म्हणे गणपति । सौर ते सूर्य ॥ ४६ ॥
शाक्त म्हणती शक्ति । अन्य मल्लारादि म्हणती ।
भक्तमात्र भिन्नभिन्न भाविती । परी देव भिन्न नव्हे ॥ ४७ ॥
जैसा सर्व अवयवेंसी पुरुष । कोणी स्तवितां पावे संतोष ।
त्यांत एक हीन एक विशेष । वर्णितां संकोचे ॥ ४८ ॥
तुमचे नेत्र बहु चांगुले । परी नासिक ओखटें बैसलें ।
ऐसें बोलतां मन तुष्टलें । कीं क्षोभे पहा ॥ ४९ ॥
तैसाचि शिव थोर विष्णु सान । कीं विष्णु विशेष शिव हीन ।
ऐसें भावून करिती जे भजन । ते उभयही द्रोही शिवाचे ॥ २५० ॥
असो तया मंदमतियांचें । लक्षण पुढे बोलिजे वाचे ।
तस्मात् सर्व अधिकारी कैंचे । भक्त अथवा द्रोही ॥ ५१ ॥
असो ऐसा शिव जगद्‌गुरु । त्याचें रूपाचा सांगितला विस्तारु ।
आतां भजन पूजनाचा प्रकारु । बोलिजेल ॥ ५२ ॥
सहज देव परिपूर्ण । सहज पूजा होतसे आपण ।
भावनेनें करी जो समर्पण । तोचि लाहे फळाशीं ॥ ५३ ॥
पृथिवी अवघी लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ।
पूजासाहित्य प्रकार । शिवावेगळा कैंचा ॥ ५४ ॥
आपण भक्तही तयामाजी । जेवी लहरी समुद्रीं नसे दुजी ।
तेथें पूज्य पूजक ना पूजी । कोणी कवणा ॥ ५५ ॥
जळीं स्थळीं पाषाणीं । जनीं विजनीं कीं स्मशानीं ।
सर्वही स्थानें व्यापूनि । राहिला असे ॥॥ ५६ ॥
तेथें भक्त भावना करी । कीं अवघा शिव चराचरी ।
पदही ठेवितां भूमीवरी । शिवलिंगी पडे ॥ ५७ ॥
हातें जरी सारावें । तरी तें आंत बाहेर आघवें ।
तोंड जरी चुकवावें । तरी सन्मुखचि शिव ॥ ५८ ॥
आतां कोठें ठेवावा पाय । कोठें करूं मलसर्ग उपाय ।
तळीं उपरी देवराय । दाटला असे ॥ ५९ ॥
मग जाजावून भक्त । अवघा देहचि समर्पित ।
भिन्नपणाची मोडली मात । तेव्हां सुखी झाला ॥ २६० ॥
उत्तम अधम हें त्यागिलें । वंद्य निंद्य समूळीं गेलें ।
पापपुण्यावरी पडिलें । बिंदुलें सहज ॥ ६१ ॥
घट जैसा आकाशीं फिरे । तया आंत बाहेर गगन सारें ।
तेवी शिवभक्त वावरे । शिवामाजीं ॥ ६२ ॥
स्नान भोजन व्यापार । अथवा इंद्रियांचे व्यवहार ।
शिवविषयी शिव घेणार । विषयांलागीं ॥ ६३ ॥
शब्दविषयीं श्रोत्रीं ऐकतां । स्पर्शविषयीं त्वचेनें घेतां ।
रूपामाजी असोन देखता । नेत्रें शिवचि ॥ ६४ ॥
रसगंध शिव परिपूर्ण । रस आणि सुवास घे आपण ।
ऐसा शिवरूपीं शिव होऊन । भजे पूजी आप‌आपणा ॥ ६५ ॥
ऐसा सर्व व्यापार जागृतीचा । होतांही भेद नसे साचा ।
तेवीं स्वप्नींही स्वप्नभासाचा । वेगळा भाव नाहीं ॥ ६६ ॥
सुषुप्ति काळीं तो परिपूर्ण । देव भक्त असती अभिन्न ।
एवं तिहीं काळीं समाधान । याहून समाधि कोणता ॥ ६७ ॥
एवं जगामध्यें आपण । कीं आपणामध्यें जग संपूर्ण ।
तूं मी नुद्‌भवतां एकपण । शिवरूप शिवीं ॥ ६८ ॥
समष्टि तादात्म्य हे पूजा । सांगितली अहो हे द्विजा ।
आतां पिण्ड तादात्म्य लोजा । ऐका कैशी ॥ ६९ ॥
आत्मा साक्षि शिवमूर्ति । आणि बुद्धि हेचि पार्वती ।
सेवाधारक प्राण असती । शरीर हें देऊळ ॥ २७० ॥
नैवेद्यादि पूजाविषय । निद्रा तोचि समाधि होय ।
प्रदक्षिणा तेचि चालती पाय । स्तोत्रें तें सर्व बोलणें ॥ ७१ ॥
एवं जें जें कर्म निपजे । तें तें शिवार्पणचि साजे ।
येणें रीति अखण्ड कीजे । शिवपूजा ऐशी ॥ ७२ ॥
शास्त्रीय अथवा लौकिक । जें जें कर्म घडे निःशंक ।
तें तें शिवरूपीं अचूक । प्राप्त होय ॥ ७३ ॥
घृत अग्निमाजीं पडिलें । कीं विप्रमुखीं समर्पिलें ।
तैसेंचि भूमीवरी जरी सांडलें । तरी अन्यथा नव्हे ॥ ७४ ॥
तस्मात् सांडलें कीं गाहाळलें । वस्तुजात आलें कीं गेलें ।
कवण दिधलें कीं घेतलें । परी तें शिवामाजी ॥ ७५ ॥
ऐशी भावना तो दृढ आहे । परी या माजींही तारतम्य पाहे ।
द्विजमुखेंच घालूं लाहें । अग्निमुखाहूनि ॥ ७६ ॥
सर्व समान हें तो खरें । परी सांगातीं घेऊं नये तीं माहरें ।
गायीचा चारा जो निर्द्धारें । तो गाढवा घालों नये ॥ ७७ ॥
गायीपुढें ठेविलें पक्वान्न । आणि ब्राह्मणा समर्पिलें तृण ।
श्वानासी दिधलें आसन । साधूशी थारोळा ॥ ७८ ॥
ऐशी नव्हे समान दृष्टी । तरी तारतम्य असावें लोकधाटी ।
जेणें संतोष होय जयासाठीं । तेंचि केलें पाहिजे ॥ ७९ ॥
भावनेनें होय भावाद्वैत । परी नव्हेल द्रव्याद्वैत ।
आणि तैशी क्रिया अद्वैत । नव्हे सहसा ॥ २८० ॥
एवं भावनेनें एकत्व पहावें । परी क्रियेनें तारतम्यें आचरावें ।
अन्न ब्राह्मणा मुखींच घालावें । आणि गायीसी चारा ॥ ८१ ॥
तेवींच साधुसंत महानुभाव । हेंचि शिवपूजनाचे ठाव ।
इतर यथाशक्ति गौरव । ज्याचा त्यापरी राखावा ॥ ८२ ॥
अतीत अभ्यागत पूजन । तयासी यथानुशक्ति दान ।
तें तें होतसें शिवार्पण । अन्यथा नव्हे ॥ ८३ ॥
पदार्थ उंचनीच दिसती । परी भावनेनें समान होती ।
मुख्य शिवासी उपजे प्रीति । भावार्थ करितां ॥ ८४ ॥


ऋद्धं किंचित्समादाय क्षुल्लकं जलमेव वा ।
यो दत्ते नियमेनासौ तस्मै दत्ते जगत्त्रयम् ॥ २४ ॥


रत्‍न माणिक्यादि उंच वस्तु । अथवा क्षुल्लक जलवस्तु ।
नियमें देतां शिव हा समस्तु । तया त्रैलोक्य देतसें ॥ ८५ ॥
त्यांतही उत्तम मध्यम कनिष्ठ । प्रकार असती ते ऐका स्पष्ट ।
तैसेंचि फलही उत्तम निकृष्ट । अधिकारासारिखें ॥ ८६ ॥
उत्तमाचा कैसा प्रकार । तोचि ऐकाहो तत्पर ।
शिवरूपामाजीं चराचर । कीं चराचरी शिव ॥ ८७ ॥
ऐसें हें ऐतेंचि असतां । मीपणाची तो मिथ्या वार्ता ।
तेथें कोण दाता कोण घेता । मीपणें वीण ॥ ८८ ॥
ऐशि बुद्धि हे दृढ असे । हातां पडलें तें देतसें ।
कोणी देतांही घेतसें । परी अभिमानें नाहीं ॥ ८९ ॥
हा उंच हा पदार्थ सान । ऐसें कदा न कल्पी मन ।
अदेय अग्राह्य पदार्थ कवण । कीं हें द्यावें न द्यावें ॥ २९० ॥
त्रैलोक्यींची संपत्ति जरी प्राप्त । तरी हर्षेना ज्याचें चित्त ।
कोणी बलात्कारें हरून नेत । तरी खेदची नाहीं ॥ ९१ ॥
अथवा सत्पात्रीं दान दिधलें । परी कल्पीना म्यां पुण्य केलें ।
मग आलें अथवा गेलें । शिवामाजीं ॥ ९२ ॥
जैसे पात्र भागीरथीचें । एखादें स्थळी उदक सांचे ।
तें ओहटूनि जातां ढीग वाळूचे । पडती आपोआप ॥ ९३ ॥
भागीरथीसी खंती नसे । तेवीं जीवन्मुक्ताची क्रीडा होतसे ।
हे देखोनि शिवही देतसे । समष्टि तादात्म्य दृढ ॥ ९४ ॥
आतां मध्यमाचें समर्पण । कांहीं एक बोलिजे लक्षण ।
आणि तयाप्रति त्रैलोक्य दान । शिव कैसा करी ॥ ९५ ॥
अवघा शिवचि हा बोध झाला । मग जो जो पदार्थ दृष्टीस आला ।
तो तो अर्पण करूं लागला । शिवामाजी ॥ ९६ ॥
छत्रें चामरें सिंहासनें । गज तुरंग सुखासनें ।
अथवा सुवर्णादि नाना रत्‍नें । दृष्टी पडतांचि समर्पी ॥ ९७ ॥
अथवा क्षुल्लक जल फूल । फळें शुष्क कीं रसाळ ।
नियमेंचि अर्पी सकळ । न्यूनाधिक भाव न होतां ॥ ९८ ॥
तयावरी शिव संतोषोनी । प्रवर्ततसे त्रैलोक्यदानीं ।
तो आवडता होय सर्वांलागुनी । कीं प्राणची हा त्रैलोक्याचा ॥ ९९ ॥
आतां कनिष्ट अधिकारी । तोहि अदेय परी दान करी ।
परी सर्वदां स्मरतसे अंतरीं । अमूक दिधलें म्हणोनि ॥ ३०० ॥
अमूल्य रत्‍नांदिक अर्पी । अथवा क्षुल्लक जलही समर्पी ।
आणि मनीं भावही कल्पी । कीं शरीर तेंही देईन ॥ १ ॥
स्त्री पुत्र आणि राज्यादि । कोणी न मागतां न म्हणे नेदी ।
दिधल्यावरी प्रवर्ते खेदीं । ऐसेंही नव्हे ॥ २ ॥
परी पुण्याभिमान उरला । तेणें मागुती जन्मासि आला ।
तो त्रैलोक्यपदींचा राजा झाला । शिवप्रसादें करूनी ॥ ३ ॥
तेथें कोणी करील कल्पना । कीं सानुकूल असतां प्रवर्ते दाना ।
तरी शिवभक्ति दैवहीना । घडे कैशी ॥ ४ ॥
राजयानें राज्य दिधलें । कीं कंगालानें सुडकें समर्पिलें ।
परी दोन्ही समान झालें । शिवालागीं ॥ ५ ॥
दृष्टी न पडे कदां रत्नां । आणि जळही द्यावया मिळेना ।
तेणें कैसें प्रवतावें पूजना । तेंचि एका श्लोकीं ॥ ६ ॥


तत्राप्यशाक्तो नियमान्नमस्कारं प्रदक्षिणम् ॥ २५ ॥
यः करोति महेशस्य तस्मै तुष्टो भवेच्छिवः ।


दानासीही अशक्त जरी । मौनें नमस्कार प्रदक्षिणा करी ।
तयावरीही मदनारी । संतोष पावे ॥ ७ ॥
देव दानव मानव । पशु पक्ष्यादि गो अश्व ।
स्थावर जंगमादि सर्व । शिवरूपें वंदी ॥ ८ ॥
कन्या पुत्र कलत्र पाहे । उत्तमाधम म्हणोन लाहे ।
म्हणे हें तो शिवरूप आहे । यास्तव लोळे चरणीं ॥ ९ ॥
तैसाचि प्रदक्षिणा करी । शिवरूप पाहे चराचरीं ।
वंदनभक्ति हे निर्धारी । बोलिली असे ॥ ३१० ॥
वंद्य तेंचे वंदावें । निंद्य तें परतें सारावें ।
तयासी कैसे रीतीनें संभवे । अन्य भक्ति तें ऐका ॥ ११ ॥


प्रदक्षिणास्वशक्तोऽपि यः स्वांते चिन्तयेच्छिवम् ॥ २६ ॥
गच्छन्समुपविष्टो वा तस्याभिष्टं प्रयच्छति ।


नमन प्रदक्षिणा जरी न करी । चालतां बैसतां निर्धारी ।
शिवरूप जो चिंती अंतरीं । तया इच्छीत शिव दे तो ॥ १२ ॥
जें जें दिसे तो तो शिव । तेथें न कल्पी रूपनांव ।
हा मनीं आवडीचा स्वभाव । देखिल्या ठायां सोंकें ॥ १३ ॥
बैसतां कीं चालतां । पदार्थमात्र नुद्‌भवे चित्ता ।
शिवरूपेंचि होय आठवितां । निदिध्यासरूपें ॥ १४ ॥
अभीष्ट तेंचि ज्ञानेंकडून । व्हावें चित्ताचें समाधान ।
जेथें समाधि उत्थान । नसे कदा ॥ १५ ॥
शिव होऊनि कृपावंत । ऐसें अभीष्ट तयां देत ।
मुख्य भावार्थाची असे प्रीत । सदाशिवासी ॥ १६ ॥


चंदनं बिल्वकाष्ठस्य पुष्पाणि वनजान्यपि ॥ २७ ॥
फलानि तादृशान्येव यस्य प्रीतिकराणि वै ।


पदार्थ न म्हणे मोठा सान । बिल्वकाष्ठ पुष्पें चंदन ।
वनांतील फळमूळ जाण । शिवा प्रतिकर होती ॥ १७ ॥
जे आपुले आपण उगवले । वृक्ष फळ मूळ दाटले ।
तें अन्यज ऐसें बोलिलें । ईशसृष्टरूपीं ॥ १८ ॥
पृथिवी अवघी लिंगाकार । सकळ वृक्षादि पूजाप्रकार ।
मनीं कल्पून शिव सुंदर । पूजिला ऐसा पाहतसे ॥ १९ ॥
ऐशी मानसपूजा जे होणें । शिवासी आवडता होय तेणें ।
तरी हें अति सुलभ करणें । असे साधकां ॥ ३२० ॥


दुष्करं तस्य सेवायां किमस्ति भुवनत्रये ॥ २८ ॥


ऐशी सहज सेवा शिवाची । भुवनत्रयीं दुष्करता कैंची ।
एक भावना मात्र मनाची । सदृढ पाहिजे ॥ २१ ॥
दिसेल तें कल्पून वाहावें । आवडे तें आठवून समर्पावें ।
येथें दुःसंपाद्य असावें । पदार्थमात्र कवण ॥ २२ ॥
येथें न लगे कीं बहुधन । अथवा नको शरीराचा शीण ।
सहजपूजा घडे ध्यान । जें प्रीतिकर शिवा ॥ २३ ॥
सहज भावार्थें जे आवडती । तैसी सायासें नुपजें प्रीति ।
हेंचि बोलिजे यथा निगुती । एक श्लोकें कडोनी ॥ २४ ॥


वन्येषु यादृशी प्रीतिर्वर्तते परमेशितुः ।
उत्तमेष्वपि नास्त्येव तादृशी ग्रामजेष्वपि ॥ २९ ॥


पूर्णकाम शिवाप्रति । वनफळ मुळादि जैसे आवडती ।
तेवीं ग्रामज उत्तम नावडती । जीवें केलें तें ॥ २५ ॥
सदाशिवा प्रिय आदर । भावार्थे न म्हणे अल्प फार ।
वन्यज ग्रामज पदार्थ मात्र । भावेवीण अप्रिय ॥ २६ ॥
नाना रत्‍नें अर्पिली । अथवा अन्नदानें समर्पिली ।
आणि मनीं फलाशा कल्पिली । तरी तेंही व्यर्थ ॥ २७ ॥
फलाशेवीण कवणासी । करणेंचि नाहीं सायासी ।
जें जें करणें तें लौकिकासी । रक्षून करणें दांभिकत्वें ॥ २८ ॥
व्याही जांवई पाहुणे आले । त्यासवें ग्रामस्थ बोलाविले ।
त्यामध्यें पारणें फेडिलें । वेंकटेशाचें ॥ २९ ॥
कांहीं देवाचा होता नवस । त्यांत पोराचें केलें बारसें ।
ऐसें असोन बोले सायासें । म्हणे म्यां संतर्पण केलें ॥ ३३० ॥
तयामध्यें एखादा अतिथ । भोजन करूनियां जात ।
तेणें संतोषेना चित्त । तेव्हां फल तें कैचें ॥ ३१ ॥
तस्मात् कांहीं समर्पितां । अनादरें होय अप्रियता ।
अथवा भावेंविण आदरही करिता । व्यर्थचि जाय ॥ ३२ ॥
मैंदें जैसें सत्र घातलें । आलियासी आदरें पूजिलें ।
शेवटीं लुटोनियां घेतलें । जैशिया परी ॥ ३३ ॥
तेवीं तारतम्य करी सांग । संपादी जो आला प्रसंग ।
परी फलाशेचा अंतरीं रोग । तेणें शिव संतोषेना ॥ ३४ ॥
यास्तव ग्रामज विषय नावडती । आवडे तरी तैशी नुपजे प्रीति ।
जेवीं भावार्थे वनफळें अर्पितीं । तीं होतीं अतिप्रिय ॥ ३५ ॥
दिवस पंध्रा वनफलां वेंचिलें । पारणें सोडावें हें मनीं धरिलें ।
इतुक्यामध्यें अतिती आले । म्हणती आम्हां अन्न देईं ॥ ३६ ॥
आपण तरी उपवासी मरे । म्हणे आश्रमा येणें केलें शंकरें ।
यास्तव धांवोनिया सामोरें । चरणीं लोळे गडबडा ॥॥ ३७
म्हणोन बैसवी आदरें । पूजा करी हर्षोन अंतरें ।
फळमूळें अर्पोनि समग्रें । अतिथी तृप्त करी ॥ ३८ ॥
ऐशिया आदरें जें समर्पण । तेणें संतोषे उमारमण ।
म्हणें यादिया उपकारा उत्तीर्ण । मी कैसा होऊं ॥ ३९ ॥
या उपकाराचें ओझें मजला । न सोसवे बहु भार झाला ।
यास्तव निजकैवल्य तयाला । ज्ञानद्वारां देतसे ॥ ३४० ॥
तस्मात् पूर्वील अनधिकारी । तेही भावार्थें होती अधिकारी ।
तयां गीतार्थ होय झडकरी । गुरुमुखें सुलभ ॥ ४१ ॥
एवं झालें जें निरूपण । ध्वनितें शिवरूपाचें केलें कथन ।
त्यांत पूजा प्रकार विधान । तें हीं सांगितलें ॥ ४२ ॥
आणि कैसें शिवाचें कृपाळुत्व । कीं भक्तासी अर्पी आपलें निजत्व ।
शेखीं अदेय जें गुरुत्व । तेंही समर्पी ॥ ४३ ॥
ऐसा देव दूजा कोण । कीं निजपद दे दासां लागून ।
हें गुरुत्वाचें भूषण । गुरुसीच साजे ॥ ४४ ॥
ऐसा देव हा अव्हेरिती । अन्य देवां जे भजों जाती ।
तयां मंदमतियांची खंती । अंतरी थोर वाटे ॥ ४५ ॥


तं त्यक्त्वा तादृशं देवं यः सेवेतान्यदेवताम् ।
स हि भागीरथीं त्यक्त्वा काङ्क्षेद मृगतृष्णिकाम् ॥ ३० ॥


ऐसा थोरला देव हा टाकून । जे सेविती अन्य देवांलागून ।
जैसें भागीरथीतें अव्हेरून । मृगजळ इच्छिती ॥ ४६ ॥
मुख्य या वेदान्त विषयासी । गुरुचि देव सच्छिष्यासी ।
तोचि शिव हा निश्चयेसी । सांकार निराकार रूपें ॥ ४७ ॥
सर्व देव ज्याचे अंगभूत । आणि भूतभौतिक समस्त ।
एवं सर्वपणेंसी विराजत । शिवगुरुत्व एकलें ॥ ४८ ॥
ऐसा एकपणा हा सांडिती । भिन्नभिन्न देवासी कल्पिती ।
हा इतुका देव म्हणोनि भजती । किंचिज्ञ जीव ॥ ४९ ॥
एक म्हणती विष्णु थोर । तोचि पूज्य अपूज्य येर ।
एक रुद्ररूपें शंकर । अन्य त्यागें भजती ॥ ३५० ॥
एक पूजिती चतुरानना । एक सेविती गजवदना ।
एक ते सूर्यनारायणा । प्रत्यक्ष भाविती ॥ ५१ ॥
एक म्हणती जलधर । स्वाधीन ज्याचे तो पूजावा इंद्र ।
एज म्हणती शीतलकर तो चंद्र । सर्व जनांसी ॥ ५२ ॥
एक म्हणती अंतीं दंडकर्ता । तो यमधर्म भजावा तत्त्वतां ।
एक म्हणती कुबेर पूजितां । बहु धन देईल ॥ ५३ ॥
एक म्हणती पूजितां वरुणा । सर्व रस देईल आपणा ।
एक म्हणती प्रसन्न करावें वामना । इंद्रपद त्या आधीन ॥ ५४ ॥
एक म्हणती वायु मुख्य प्राण । एक म्हणती साह्य करावा अग्न ।
एक म्हणती अवतार कृष्ण । एक रामासी भजती ॥ ५५ ॥
मत्स्य कूर्म वराहमूर्ति । नृसिंह भार्गव बौद्धा भजती ।
एक म्हणती कलंकी जीमूती । पुढें होणार तो भजावा ॥ ५६ ॥
हें असो एक म्हणती । पृथ्वीसी जे एकभावें पूजिती ।
ते सर्व फळांसी लाहती । यश कीर्ती प्रताप ॥ ५७ ॥
ऐसें अन्य देवांचे भजन । जैसें मृगजलांचें पान ।
तेणें कधींही तृष्णाहरण । नव्हे कवणा ॥ ५८ ॥
तेवीं अन्य देव अन्यत्वें भजतां । कैवल्यमुक्ति नव्हे तत्त्वतां ।
ऐसें ऐकून शौनक सूता । प्रश्न करिते झाले ॥ ५९ ॥
कोण्याही देवासी नमस्कारिलें । तें एक शंकरासी पावलें ।
आकाशातून पाणी जें पडलें । तें समुद्रीं मिळे ॥ ३६० ॥


संमति श्लोक :
आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।
सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥ १ ॥


वाक्य हें ऐसें असतां । येथें कां दिसे विषमता ।
अन्य देवासी भजतां । मुख्य देवा न पवे कां ॥ ६१ ॥
ऐशा आशंकेचे उत्तर । सूत देता झाला सुंदर ।
येथें साधकें निरुत्तर । होऊन ऐकावें ॥ ६२ ॥
हा सर्वपणा कोणावरी उठिला । तो देव पाहिजे ओळखिला ।
मग तो तृणासी जरी भजिन्नला । ते मुख्य देवा पावे ॥ ६३ ॥
विष्णु अथवा शंकर । अथवा अन्य देवांचे प्रकार ।
परी भावनेसी सर्वेश्वर । एकचि ऐसें पाहिजे ॥ ६४ ॥
ऐसें नसतां भिन्नभिन्न । उगेंचि कल्पिती थोर सान ।
एकदेशी भजतां जाण । तेणें सर्व सिद्धि कैंची ॥ ६५ ॥
उष्ण न लागावें अणुमात्र । यास्तव जन करिती मंदिर ।
त्यांतील किलच घेतां शिरावर । छायासुख कैचें ॥ ६६ ॥
तैसें समष्टिरूप देवा सांडूनी । एकदेशी देवा भजती मनीं ।
कैवल्यमुक्तीचें फळ त्या लागूनी । नव्हे कदां ॥ ६७ ॥
येथें ही शंका करितील थोर । कीं धाकुटे देव असोत येर ।
परी मोठे विष्णु शंकर । त्यांचें भजनें फळ लाहिजे ॥ ६८ ॥
सान म्हणोनि किलच सांडिली । मोठी लग शिरीं घेतली ।
तेणें छायेची विश्रांती झाली । हें तो न घडे ॥ ६९ ॥
तस्मात् अवघा एक देव न कळतां । एकदेशी विष्णु शिवातें भजतां ।
मुक्तीचें फळ न ये हातां । हें सत्य सत्य जाणावें ॥ ३७० ॥
यास्तवे मुमुक्षूसी निरवणें । कीं सर्व एकात्मवें पाहणें ।
जैसें सर्वालंकारामाजीं सोनें । एकचि असे ॥ ७२ ॥
एकदेशित्वें जे भजती । ते तिन्ही मुक्ती जरी लाहती ।
परी ते मुख्य फला आंचवती । हें विचारोत साधक ॥ ७१ ॥
जया ऐक्यभक्तीची चाड । तेणें अन्याची न धरावी भीड ।
एकला शिवगुरू घबाड । सर्वीं सर्वपणीं ॥ ७३ ॥
ऐसें असतां जे करंटे । सत्य मानिती असतां खोटें ।
पडती जाऊन कडकडाटें । संसृतीमाजी ॥ ७४ ॥
हें असो अन्य देवां भजती । ते कांही विषयफळें लाहती ।
याही हून जे मंदमति । भजति कैसे ऐका ॥ ७५ ॥
नाना क्षेत्रीं नाना प्रतिमा । तेथील थोर ऐकोनि महिमा ।
जाऊन पूजिती धरून प्रेमा । मुख्य शिवरूप नेणोनी ॥ ७६ ॥
बदरीनारायण बदरीकेदार । काशीमाजी विश्वेश्वर ।
उज्जयिनीचा महाकालेश्वर । घृष्णेश्वर वेरुळी ॥ ७७ ॥
गंगाउगमीं त्र्यंबकेश्वर । वैद्यनाथ भीमाशंकरा ।
नागनाथ ॐकारेश्वर । श्रीशैल मलिकार्जुन ॥ ७८ ॥
अयोध्या द्वारका मथुरापुरी । तेथेंही देव शिलाधारी ।
ऐशीं उदण्ड क्षेत्रें पृथिवीवरी । बोले ऐसा कवण ॥ ७९ ॥
व्यंकटेश मल्लार भैरव । ओंढ्या जगन्नाथ विठोबा देव ।
झोटिंग वेताळ देवी देव । नवचे बोलिलें ॥ ३८० ॥
हे प्रत्यक्ष घडोनि केले । ब्राह्मणीं वेदमंत्रें प्रतिष्ठिले ।
ऐसें जाणुनही भजों लागले । म्हणती चुकतां देव कोपती ॥ ८१ ॥
जो अनंत ब्रह्माण्डॆं भरोनि उरला । तो एके संबळींत सांठविला ।
बळेंचि बांधोनियां ठेविला । गांठी देवोनि ॥ ८२ ॥
सर्व पृथिवी असतां लिंगाकार । मातीची लिंगें करिती साचार ।
बाण शालिग्राम अपार । देव्हारियां पूजिती ॥ ८३ ॥
एक गुंडे वेंचूनि आणिती । चिरगुटांत घालूनि दंडीं बांधिती ।
कोणाच्या दृष्टी पडतां म्हणती । आम्हां प्रायश्चित्त पडे ॥ ८४ ॥
कवणें काळीं देव हरपला । आतां अन्न घेणें नाहीं मजला ।
निग्रह करूनि प्राण दिधला । तरी तेथें देव कैंचा ॥ ८५ ॥
एक दोरासी गांठी देउनी । पूजिताती दंडी बांधूनी ।
एक शालिग्राम मुखीं ठेवूनी । पूजिती आदरें ॥ ८६ ॥
एक गाद्याचा चांदवे आंथरिती । पक्ष्याचीं अंडीं वरतीं बांधिती ।
हाचि देव आमुचा म्हणती । अवयवहीन निराकार ॥ ८७ ॥
असो जितुके देव तितुक्या मूर्ती । अचळ चंचलत्वें स्थापिती ।
ऐसें सांगावें तें किती । अंत नलगे ॥ ८८ ॥
एक देव अन्न खातो । एक देव सुखें डोलतो ।
एक म्हणती देव बोंबलतो । कांहीं संकट पडतां ॥ ८९ ॥
एके देवे दरवडा पीटिला । एक म्हणती देव हरपला ।
उपोषण करितां माघारां आला । भक्तांसाठीं ॥ ३९० ॥
असो जयासी करणें हित । तेणें त्यागावें हें समस्त ।
धरुनि साधूची संगत । मुख्य देव तो शोधावा ॥ ९१ ॥
मृगजळ पानें तृषा न हरे । तैसे देव हे पूजितां सारे ।
एक देव साचोकारें । संतांवीण सांपडेना ॥ ९२ ॥
हें असो अवघा हा देव । जरी ऐकून ठेविला भाव ।
परी आपुली असतां वेगळीव । भक्ति न घडे ॥ ९३ ॥
तेणेंही भागीरथी त्यागून । मृगजळाचें केलें पान ।
मा पाषाण देवाचें पूजन । निरर्थक कां न म्हणावें ॥ ९४ ॥
अस्ति भाति प्रिय नोळखितां । शिवरूप पाहे जगा समस्ता ।
मुख्य फळ तयाचेही हातां । न ये कल्पान्तीं ॥ ९५ ॥
तेंचि असो सच्चिद्‌रूप । त्याहुन भिन्न उरे आपण अल्प ।
तेणेंही मृगजळाचें माप । पदरीं घेतलें ॥ ९६ ॥
मग अन्य अन्यत्वें जे पाहती । तयां मृगजल म्हणतां काय भीति ।
असो तया मंदमतियांची खंती । एक श्लोकें बोलिजे ॥ ९७ ॥


किंतु ययास्ति दुरितं कोटिजन्मसु संचितम् ।
तस्य प्रकाशते नायमर्थो मोहान्धचेतसः ॥ ३१ ॥


हा उघड अपरोक्ष अर्थ ऐसा । मोह अंधाशी न कळे कैसा ।
कोटि जन्माचे पापाचा फांसा । पडिला असे जयासी ॥ ९८ ॥
अर्थ म्हणिजे मागें बोलिलें । जें प्रत्यक्ष शिवाचें रूप केलें ।
दुजेवीण एकलें संचलें । अस्ति भाति प्रियात्मक ॥ ९९ ॥
जीवही त्याहून नसे भिन्न । तस्मात् शिवरूपचि आपण ।
हें पुढें असे बोलणें । प्रसंगानुसार ॥ ४०० ॥
तस्मात् प्रत्यक्ष ऐसा अर्थ । कीं आपणचि अंगें शिव समर्थ ।
आपणावीण दुजा पदार्थ । किमपि नाहीं ॥ १ ॥
ऐसें असतां या जनांसी । झांपडी नेत्रां पडली कैशी ।
मोहांधकार चित्तासी । सदृढ झाला ॥ २ ॥
तस्मात् अनंत कोटीचें जन्मार्जित । पापाचें झालें संचित ।
यास्तव प्रगटार्थ न प्रकाशत । शास्त्रें सांगत असतांही ॥ ३ ॥
तया पापाचें वर्णन । कांहीं एक करूं गणन ।
जें जीवा नवचे उल्लंघन । कल्पांतींही ॥ ४ ॥
जीव हा शिवरूपचि असतां । अज्ञानें आली जीवत्वता ।
तेणें लागली देह अहंता । मी देह किंचिज्ञ ॥ ५ ॥
आहे तें शिवत्व गेलें । नाहें तें जीवत्व उद्‌भवलें ।
ऐसें अज्ञान मायेनें केलें । एकाचे एक ॥ ६ ॥
असो मी देहस्फूर्ति होतां । क्षणें ब्रह्महत्या कोटिशता ।
आणि गोहत्यादि अनंता । सर्वही पापें घडतीं ॥ ७ ॥
ऐसे अनंत जन्म गेले । मी देह म्हणतांचि मेले ।
तया पापाचे ढीग झाले । किती हे न कळती ॥ ८ ॥
येणें रीतीं मागील संचित । पुढें मी देह म्हणोनि वर्तत ।
ऐसें जे मोहांधकारें व्याप्त । त्यासी अर्थ प्रकाशे कैसा ॥ ९ ॥
आपण अपरोक्ष शिव नेणती । अथवा परोक्षत्वेंही न जाणती ।
उगेचि पाषाणादि पुजों जाती । देव देव म्हणोनि ॥ ४१० ॥
रज्जूवरी सर्प भाविला । तो जैसा दुःखद झाला ।
अथवा हार जरी कल्पिला । तोचि सुख दे कोठोनि ॥ ११ ॥
मुळीं असज्जड दुःखात्मक । नामरूप हें निश्चयात्मक ।
येथें सुखही कल्पितां अवश्यक । दुःखची होईल ॥ १२ ॥
असो आम्हां अज्ञानासी । काज नसे बोलावयासी ।
जे जे कर्में करिती जैशीं । फळेंही पावती तैशीं ॥ १३ ॥
परी मुमुक्षु अथवा साधक । जे मोक्षमार्गींचे पाईक ।
तयांसी प्रार्थितों अवश्यक । महानेटें गर्जोनि ॥ १४ ॥
कीं नामरूप अवघें सांडावें । जें का मायिक स्वभावें ।
शिवत्त्व शिवरूपें पहावें । अभिन्नपणें ॥ १५ ॥
जीवेश ऐक्य अर्थाप्रति । गर्जत असती अनंत श्रुती ।
तस्मात् माझी कल्पित युक्ति । न माना सहसा ॥ १६ ॥
येथें जो अविश्वास मानी । तया चुकेना जन्मयोनि ।
विश्वास धरी जो अर्थालागुनी । तो येचि देहीं मुक्त ॥ १७ ॥
येथें कोणता गा सायास । कांहीं दुर्घट नव्हे अभ्यास ।
एक सदृढ निदिध्यास । लागला पाहिजे ॥ १८ ॥


न कालनियमो यत्र न देशस्य स्थलस्य च ।
यत्रास्य चित्तं रमते तस्य ध्यानेन केवलम् ॥ ३२ ॥


न लगे काल देश आसन । नियम अथवा एकाग्रमन ।
जैसें जैसें चित्ताचें रंजन । तेवी केवल ध्यान करावें ॥ १९ ॥
स्नान संध्या अनुष्ठान । जप अथवा यज्ञ हवन ।
येथें पाहिजे नियमन । कालदेशादि ॥ ४२० ॥
अमुक कार्यासी अमुक काल । अमुक देश अमुक स्थळ ।
पूर्वोत्तर दिशाही केवळ । तेथें एकांतीं बैसावें ॥ २१ ॥
तैसें ध्यानासी न लगे । बैसे कीं व्यवहारी वागे ।
ध्येयीं मनाचें अनुसंधान लागे । या नांव ध्यान ॥ २२ ॥
प्रातःकाळींच करावें । आणि सर्वदा कां विस्मरण पडावें ।
यास्तव काळनेम न संभवे । सहज ध्यानासी ॥ २३ ॥
अमुक देशीं अमुक स्थळीं असतां । तेथें स्थिरत्व करावें चित्ता ।
ऐसा निर्बंध नको तत्त्वतां । अनुसंधान मात्र रहावें ॥ २४ ॥
येथें सामुग्री तरी कासया । कीं अमुक पाहिजे ध्यान उपाया ।
नातरी समान असावी काया । अथवा नेत्र झांकणें नको ॥ २५ ॥
दृष्टीस पडेल तें पहावें । उठती शब्द ऐकावे ।
परंतु नामरूप जाणोन त्यागावें । घ्यावें अस्ति भाति प्रियत्व ॥ २६ ॥
जागृति झालियापासून । झोप येईल परतोन ।
तावत्काल राखावें स्मरण । निदिध्यास रूपें ॥ २७ ॥
यावत्काल शारीरीं प्राण । तों काल न सोडी ध्यान ।
ऐसा निश्चय मनीं करून । योषाजारापरी ध्यावें ॥ २८ ॥
जार स्त्रीचा घर धंदा । यथायुक्त होय सदा ।
मन लागे जाराचे छंदा । रतिसुख रूपें ॥ २९ ॥
तैसें सर्व व्यवहार करितां । शिवरूप आठवे चित्ता ।
येथें श्रम तो केउतां । साधकासी होय ॥ ४३० ॥
आतां शिवरूप मानसें । स्वात्मत्वें घ्यावें कैसें ।
तेंचि निरूपण कांहींसें । श्लोकार्धें करूं ॥ ३१ ॥


आत्मत्वेन शिवस्यासौ शिवसायुज्यमाप्नुयात् ।


सच्चिदानंद शिव ब्रह्म । तो मी निजांगें आत्माराम ।
ऐसिया ध्यासें पुरुषोत्तम । पावेल अढळु ॥ ३२ ॥
शिवरूपीं अज्ञानवशें । जगादि हें उद्‌भवलें असे ।
मी देह हेंही धरिलें मानसें । ब्रह्म निजांगें असोनि ॥ ३३ ॥
कोणी एक पुरुष निजेला । दिव्य पलंगी एकला ।
तो स्वप्नीं अत्यंज झाला । भीक मागूं लागे ॥ ३४ ॥
तैसा ब्रह्मचि हा असोन । विस्मरणें होय हें अज्ञान ।
तेंचि जाहले कारण । देहद्वयासी ॥ ३५ ॥
निद्रिस्था विसरोन अंतरीं । भीक मागे दारोदारीं ।
तेथें सुखदुःखें शिणे भारी । आणि भावी मी करंटा ॥ ३६ ॥
तैसा मी ब्रह्म तरी नव्हें । तरी मी कोण गा ऐसें पाहे ।
तंव पुढें देखिला देह । त्याशींच मी म्हणो लागे ॥ ३७ ॥
मी म्हणतां उठली स्फूर्ती । सप्तदश प्रकार तयेचे होती ।
तयासी सूक्ष्मदेह म्हणती । जेणें स्थूल निर्मिला ॥ ३८ ॥
एक चंचलत्व विभागलें । तेंचि पंचधा प्राण नांव पावले ।
त्यांत जाणतेपण स्फुरलें । तेंही दो प्रकारीं ॥ ३९ ॥
होय नव्हे संशयात्मक । हेंचि मनाचें रूपक ।
निश्चयचि हा करी अमुक । तेचि बुद्धि ॥ ४४० ॥
अंतरीं मी मी जें स्फुरे । तेचि बुद्धि जाणावी विचारें ।
हें हें म्हणावया ये बाहेरें । हेंचि रूप मनाचें ॥ ४१ ॥
पंच प्राणाच्या सहवासें । मनोवृत्ति बाहेर येतसे ।
तयाचीं द्वारें असतीं दशें । तेचि दशेंद्रियें ॥ ४२ ॥
शब्दादि विषयां जाणती । तयांसीं ज्ञानेंद्रियें म्हणती ।
वचनादि क्रिया जी करिती । तींच कर्मेंद्रियें ॥ ४३ ॥
एवं प्राण आणि दशेंद्रियें । आणीक मन बुद्धि द्वय ।
या सत्रा तत्त्वांचा समुदाय । लिंगदेह बोलिजे ॥ ४४ ॥
लिंगदेह हाचि किडा । तेणें स्थूल निर्मिला कवडा ।
त्यांत राहूनिया कोडा । व्यापार करी ॥ ४५ ॥
मंदिर करूं हें मनीं धरितां । आकारु अंतरीं जो होता ।
तोचि प्रगटे हातें करितां । स्पष्ट विषय दृष्टीचा ॥ ४६ ॥
तेंवीच हेतु सूक्ष्म देहाचा । गुप्त होता भास आभासाचा ।
प्रगटतां आकारु स्थूलाचा । स्पष्ट दिसूं लागे ॥ ४७ ॥
तस्मात् हें कल्पनेचें निर्मित । भिन्न देहद्वय दिसूं लागत ।
या दोहींचें बीज विख्यात । जें निजरूप न कळणें ॥ ४८ ॥
तया नेणिवेचा जो अभिमान । धर्त्यासि नांव आलें प्राज्ञ ।
तोचि जीव चंचलीं व्यापून । तादात्म्य पावे ॥ ४९ ॥
चंचल अहंतेची स्फूर्ति । तोचि तैजस नामें विख्याती ।
पुढें मी देह धरितां प्रतीति । विश्व नाम पावला ॥ ४५० ॥
असो पिंड तादात्म्यामुळें । शुद्धचि जीवत्वासी पावलें ।
तेंवीच ब्रह्माण्ड तादात्म्यामुळें कल्पिलें । शिव हे अभिध्नान ॥ ५१ ॥
भिन्न भिन्न कारणें समस्त । तेंचि समष्टि रूपीं अव्याकृत ।
तयाचें अभिमानें पावत । रुद्र नाम ऐसें ॥ ५२ ॥
सर्वांचे सूक्ष्म देह मेळविजे । तयासी हिरण्यगर्भ बोलिजे ।
तया अभिमानें नांव पाविजे । विष्णु ऐसें ॥ ५३ ॥
भिन्न भिन्न जितुके पिण्ड । एकत्र करितां नाम ब्रह्माण्ड ।
तयाचा अभिमान धरी वाड । तो चतुराननु ॥ ५४ ॥
ऐसें पिण्ड ब्रह्माण्ड कल्पिलें । एकचि असतां भिन्न भाविलें ।
मी इतुकाचि मजसी लागले । जन्ममरण धर्म ॥ ५५ ॥
मी नियम्य तो नियंता । मी भ्राम्य तो भ्रमविता ।
मी पापपुण्याचा असें कर्ता । तो प्रेरक कर्माचा ॥ ५६ ॥
मजसी दुखदुःखाचे असती भोग । तो तरी सदां असे असंग ।
एवं कल्पोनिया केले विभाग । जीव शिव रूपें दोन ॥ ५७ ॥
एवं न कळणें निजरूपाचें । हेंचि कारण जन्म मृत्यूचें ।
यासी झालें पाहिजे साचें । यथार्थ ज्ञान ॥ ५८ ॥
स्वप्नामाजी जो अंत्यज झाला । तेणें स्मरावें मी तो निजेला ।
तेंवी शिवोहं आपणाला । जीवें स्मरावें ॥ ५९ ॥
निजेलिया स्मरतांच क्षणीं । अंत्यजपणाची हानि ।
तेंवी स्वात्मत्वें धरितां ध्यानीं । जीव शिवरूप होय ॥ ४६० ॥
पिण्ड हे अस्थिमांसाचे । तेंवी ब्रह्माण्ड पंचभूतांचे ।
या उभयांसी अस्तित्व जयाचें । शिवोहं शिवोहं ॥ ६१ ॥
पिंडीं अवस्था जागृती । ब्रह्माण्डीं अवस्था उत्पत्ति ।
उभय साक्षी स्वयंज्योति । शिवोहं शिवोहं ॥ ६२ ॥
जागृतीचा विश्वाभिमान । तोचि ब्रह्माण्डीं चतुरानन ।
साक्षी उभयां विलक्षण । शिवोहं शिवोहं ॥ ६३ ॥
स्थूल भोग असे स्थूलासी । भ्रांतीनें धरिलें होतें त्यासी ।
भ्रांति जातांचि अविनाशी । शिवोहं शिवोहं ॥ ६४ ॥
पायु इंद्रिय हें पिण्डीं । तोचि यमधर्म ब्रह्माण्डीं ।
या क्रियेसी ज्याची प्रौढी । शिवोहं शिवोहं ॥ ६५ ॥
पिण्डीं उपस्थ भोगी रति । उत्पत्तीकर्ता प्रजापति ।
उभयां जयाची शक्ति । शिवोहं शिवोहं ॥ ६६ ॥
पादेंद्रिय क्रियागमन । तोचि ब्रह्माण्डीं वामन ।
हे जयाचेनि भासमान । शिवोहं शिवोहं ॥ ६७ ॥
ग्रहण दानात्मक पाणि । तोचिं ब्रह्माण्डीं वज्रपाणि ।
यासी सत्ता स्फुरद्‌रूपता जयाचेनि । शिवोहं शिवोहं ॥ ६८ ॥
परादिका वाचा चारी । तो ब्रह्माण्डीं अग्नि निर्धारी ।
या शब्दार्थरूपें जो उभारी । शिवोहं शिवोहं ॥ ६९ ॥
घ्राण सुगंधातें निवडी । अश्विनीदेव तो ब्रह्माण्डीं ।
सत्ता स्फुरता ज्याची प्रौढी । शिवोहं शिवोहं ॥ ४७० ॥
जिव्हा रसस्वाद घेतसे । ब्रह्माण्डीं वरुणनामा असे ।
जयाचे चिद्रू पें हें भासे । शिवोहं शिवोहं ॥ ७१ ॥
चक्षु इंद्रिय हेंचि पिण्डीं । तोचि प्रसिद्ध सूर्य ब्रह्माण्डीं ।
उभय प्रकाशक जो परवडी । शिवोहं शिवोहं ॥ ७२ ॥
त्वगेंद्रिय स्पर्शानुकारें । ब्रह्माण्डीं वायु हा वावरे ।
या उभयां ज्याचेनि ज्ञान स्फुरे । शिवोहं शिवोहं ॥ ७३ ॥
श्रोत्रें शब्दासी ऐकणें । तेंचि ब्रह्माण्डीं दिशा होणें ।
हें जयाचेनि भासमाने । शिवोहं शिवोहं ॥ ७४ ॥
प्राणापान उदान । व्यान चौथा पांचवा समान ।
हे व्यवहार चालती जेणें । शिवोहं शिवोहं ॥ ७५ ॥
संकल्प विकल्प मनाचें रूप । क्षय वृद्धयात्मक तोचि उडुप ।
ज्याचें प्रकाशें हे प्रकाश रूप । शिवोहं शिवोहं ॥ ७६ ॥
बुद्धि निश्चया अति चतुर । तो ब्रह्माण्डीं सवित्रीवर ।
यया साक्षी जो चिन्मात्र । शिवोहं शिवोहं ॥ ७७ ॥
एवं सत्रा कलात्मक लिंग । तेणेंचि हिरण्यगर्भ सांग ।
यासी अधिष्ठान जो असंग । शिवोहं शिवोहं ॥ ७८ ॥
स्वप्नावस्था पिण्डीं उमसे । तेंचि ब्रह्माण्डीं पालन असे ।
हा जयावरि भ्रम भासे । शिवोहं शिवोहं ॥ ७९ ॥
स्वप्नाचा तैजस अभिमानी । तोचि विष्णु चक्रपाणी ।
हे जयावरी दिसती दोन्ही । शिवोहं शिवोहं ॥ ४८० ॥
अज्ञानवशें कर्ता भोक्ता । तेंवीच ईश प्रेरक नियंता ।
याभ्रमा अधिष्ठान तत्त्वतां । शिवोहं शिवोहं ॥ ८१ ॥
न कळणें जें अज्ञान । तयासी बोलिजे कारण ।
जेथें अव्याकृत भासमान । शिवोहं शिवोहं ॥ ८२ ॥
बुद्धीचा लय ते सुषुप्ति । ब्रह्माण्डीं संहार तयासी म्हणती ।
लय साक्षी जे उरे ज्ञप्ति । शिवोहं शिवोहं ॥ ८३ ॥
तेणे अभिमान तोचि प्राज्ञ । ब्रह्माण्डीं रुद्र हा आपण ।
यासी अस्ति भाति प्रिय पूर्ण । शिवोहं शिवोहं ॥ ८४ ॥
एवं नामरूप मिथ्या भासे । पिण्ड ब्रह्माण्ड दोन्ही ऐसें ।
यांत सच्चिद्‌रूप जें असें । शिवोहं शिवोहं ॥ ८५ ॥
सर्पा अधिष्ठान दोरी । रजता आधार शिंप सारी ।
तेवीं अधिष्ठानरूप निर्धारी । शिवोहं शिवोहं ॥ ८६ ॥
एवं स्वात्मत्वें ध्यान ऐसें । यथामती बोलिलें कांहींसें ।
मुमुक्षु साधक धरितील मानसें । ते शिवसायुज्य पावती ॥ ८७ ॥
हेंचि तत्त्वाचें विवेचन । विवेकें आत्मत्व निवडणें ।
हेंचि मनन निदिध्यासन । ध्यानही हेंचि ॥ ८८ ॥
एवं अहं स्फूर्ती मुळीं उठली । तेचि देहाकारें परिणमली ।
तेणेंचि सत्यत्वें बाणली । प्रतीति जगाची ॥ ८९ ॥
जेवीं बहुत शून्यें घालितां । जमेसी न येती तत्त्वतां ।
पहिल्या शून्याशी फांटा फोडेतां । सर्व जमेस आली ॥ ४९० ॥
तैसें जग नामरूपात्मक । उद्‌भवलेंचि नाहीं सकळिक ।
मी देह स्फुरतांचि एक । सर्वही सत्य झालें ॥ ९१ ॥
शून्यासी फांटा जो फुटला । तो मागुती शून्यांत मेळविला ।
येर सर्व शून्यें असतां जमेला । ठाव नाहीं ॥ ९२ ॥
तेवीं अहंकाराची स्फूर्ती । जेथून होय उमटती ।
तेथेंचि घालावी मागुती । शिवोहं म्हणोनि ॥ ९३ ॥
अज्ञानें मी देह वाटलें । तोंच ज्ञानें मी ब्रह्म स्फुरलें ।
हेंचि जाणावें मागुतीं गेलें । जेथील तेथें ॥ ९४ ॥
मग पूर्ववत जग असतां । अथवा व्यवहार चालतां ।
पिण्ड ब्रह्माण्डा न ये सत्यता । कवणेंही काळीं ॥ ९५ ॥
अहं ब्रह्म जे स्फूर्ती । हे ही लया जाय निवृत्ति ।
एकट उरे स्वयंज्योति । शिवचि शिवरूपीं ॥ ९६ ॥
एक घट मातीचा कळला । तेव्हां सर्व घटांचा प्रत्यय आला ।
एक पिंडींचा कळतां मासला । सर्व ब्रह्माण्ड कळलें ॥ ९७ ॥
मृत्तिकेवीण घटांत । काय हो असे किंचित ।
तेवीं भौतिकादि पंचभूत । यांत चिद्‌रूप सारें ॥ ९८ ॥
भ्रमें नामरूपें मात्र दिसती । ते विवेकज्ञानें निरसती ।
पुढें उरे जें का निश्चिती । तें केवळ ब्रह्म ॥ ९९ ॥


चिदेव पंचताभूतानि चिदेव भुवनत्रयं ॥ ३३ ॥


चिद्‍रूपचि पंचभूत । चिद्‌रूप ब्रह्माण्ड त्याचें निर्मित ।
उत्तम ज्या समयीं होय विज्ञात । तेव्हां चिद्‌रूप मीही ॥ ५०० ॥
अस्ति भाति प्रिय रूप ब्रह्मीचें । नामरूप जगादि मायेचें ।
विवेचन होतां उभयाचें । सारासार कळे ॥ १ ॥
तिहीं कालीं जें न नासे । तें सद्रूजप जाणिजे ऐसें ।
अलंकारीं सुवर्ण जैसें । असे व्यापून ॥ २ ॥
तेवीं भूतादि जड संपूर्ण । यासी रूप काय सत्यावीण ।
सत्याशींच ठेविलें नामाभिधान । आकाशादिक ॥ ३ ॥
तिहीं काली जो देखणा । तेंचि चिद्‌रूप ओळखिजे मना ।
हें चंचळीं येत अनुमाना । साक्षिरूपत्वें ॥ ४ ॥
सुख दुःखावीण आनंद । जो सुषुप्तीमाजी असे शुद्ध ।
विकारी सुखदुःखें उठे खेद । तेव्हां लोपला वाटे ॥ ५ ॥
एवं जडीं असे सद्‌रूप । चंचळीं दोन्ही सच्चिद्‌रूप ।
सुषुप्तीमाजीं जातां विक्षेप । सच्चिदानंद तिन्ही ॥ ६ ॥
जडत्वीं सद्‌रूप कैसें । विवेचनें बोलिले कांहींसे ।
तेणें रीतीं घेईं जे विश्वासें । नामरूप टाकोनी ॥ ७ ॥
प्रथम विकार आकाश । रूप तेंचि जाणिजे अवकाश ।
नाम ठेविलें ओळखीस । अस्तित्वालागीं ॥ ८ ॥
आकाशा आहेसें वाटलें । तेंचि सद्‌रूप दाटलें ।
येर तें नामरूप फोलें । निस्तत्त्व रूपें ॥ ९ ॥
रज्जूवरी सर्प नसतां । अज्ञानेंचि आणिली सत्यता ।
तेवीं सत्यरूप न जाणतां । आकाश नाम ठेविलें ॥ ५१० ॥
रज्जुवेगळा सर्प न निघे । तेवीं नामरूपात्मक अंगें ।
आकाश काढितां येईल वेगें । सत्यत्वाहून कैसें ॥ ११ ॥
तस्मात् भ्रमेंचि भासलें । भ्रम जातां नामरूप फोलें ।
पुढें पूर्ववत जरी दिसलें । तरी तें सद्‌रूप ॥ १२ ॥
तैसेचि वायु तेज पाणी । पांचवी तेही धरणी ।
आणि भौतिकें चारी खाणी । पिण्ड ब्रह्माण्डासहित ॥ १३ ॥
स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । हें इतुकें जडरूप सकळ ।
यांतील विवेकें केवळ । आहेपणा निवडावा ॥ १४ ॥
आतां चंचळतत्त्व जितुकें । यांतील सच्चिद्‌रूप निकें ।
विवेचून काढिजे साधकें । जीवीं धरावया ॥ १५ ॥
अहंस्फूर्ती हें चंचलपण । यांत साक्षित्वें वर्ते ज्ञान ।
जें जें होईल तया ईक्षण । करितचि असे ॥ १६ ॥
शब्दादि विषयही उमटतां । मिळाला वाटे त्या त्या अतौतां ।
परी साक्षी रूपें जाणता । तो वेगळा असे ॥ १७ ॥
पाणियांतून गोडी । रसरूपें जेवीं निवडी ।
तेवीं चंचळांतून परवडी । शुद्ध जाणीव घेईजे ॥ १८ ॥
चंचळीं जाणिव तें चिद्रूप । आणि आहेपणा तेंचि सद्रूप ।
एवं ब्रह्मींचें हें उभयरूप । स्फूर्तीमाजीं असे ॥ १९ ॥
मन बुद्धि चित्त अहंकार । आणि इंद्रियादि प्रकार ।
जितुकें चंचळ समग्र । तेथें व्याप्ति उभयांची ॥ ५२० ॥
सुषुप्तीमाजी तो स्पष्ट । सच्चिदानंद घनदाट ।
जेथें व्यवहाराचा शेवट । असे म्हणोनि ॥ २१ ॥
अंधारांत जरी निजेला । परीं मी नाहीं न वाटे कोणाला ।
हाचि आहेपणा संचला । निस्तत्त्वेंवीण ॥ २२ ॥
मी अमुकवेळ निजलों होतों । हा उत्थानकालीं अनुभव घेतो ।
एवं नेणिवेशी जो जाणतो । हा चिद्रूप आत्मा ॥ २३ ॥
वृत्ति जेथें लीन होय । सहज सुखदुःखासी अपाय ।
तेव्हां आनंद हा निश्चय । झोंपेमाजी ॥ २४ ॥
एवं ब्रह्म सच्चिदानंद रूप । हेंचि आत्मयाचें स्वरूप ।
ऐसें यथार्थ जाणून नामरूप । सर्वही त्यागावें ॥ २५ ॥
रज्जु यथार्थ जरी कळतां । सर्प नाहीं नाहीं तत्वतां ।
तेंवीं वास्तविक ब्रह्म जाणतां । सर्व हें नाहीं ॥ २६ ॥
आतां हीं जड पंचभूतें । आणि भौतिकादि समस्तें ।
त्रिलोक्यीं नामरूपात्मक जें तें । सच्चिद्‌रूप ब्रह्म ॥ २७ ॥
जड चंचळ हें आटलें । शून्य तेंही लया गेलें ।
उपरी ओतप्रोत संचलें । सच्चिदानंद ब्रह्म ॥ २८ ॥
एवं देहबुद्धी जातां । आपण ब्रह्मचि तत्त्वतां ।
जगही सर्व पाहों जातां । ब्रह्मरूपची ॥ २९ ॥
आतां हें सर्व दिसो । कीं एकदाचि सर्व नासो ।
आपणाविण अतिसो । दुजा नाहीं ॥ ५३० ॥
ऐसा याचि देहीं साधक । झाला शिवरूप निश्चयात्मक ।
नामरूप गेलें अनेक । आत्मत्वज्ञानें कडोनी ॥ ३१ ॥
ऐसें हें शिवाचें ध्यान । भवबाधा जाय निपटून ।
कारण कीं मुळीच असती अभिन्न । जीवशिव एकरूपें ॥ ३२॥
मुळीं भिन्न जरी असते । ते एक कदांही न होते ।
हें यथामती बोलिजेतें । पुढील श्लोकीं ॥ ३३ ॥


अतिस्व्ल्पतरायुः श्रीर्भूतेशांशाधिपोऽपियः ॥ ३४ ॥
स तु राजाहमस्मीति वादिनं हन्ति सान्वयम् ।


आयुष्य लक्ष्मी ही अतिअल्प । शिवांशें वर्तती जे भूप ।
अन्यें मी राजा म्हणतां विक्षेप । त्याचा वंशही उरों न देती ॥ ३४ ॥
शिवांशावीण पृथ्वीपति । नव्हेचि ऐशी लोकरीती ।
तयाची पाहतां संपत्ति । अल्पप्राय आहे ॥ ३५ ॥
तेवींच आयुष्य हें क्षणभंगुर । उगेचि मानिती मी मी थोर ।
माझेंचि वैभव हें अपार । वंशपरंपरा राज्य माझें ॥ ३६ ॥
कोणी एक पुरुष वचनीं । कीं मी राजा बोलतां वाणी ।
तें मुख्य रायें ऐकतां श्रवणीं । त्याचा घातचि करी ॥ ३७ ॥
त्याचा वंशस्थ गर्भ जरी । किमपि उरों नेदी उरीं ।
एवं भिन्न भिन्नाचें ध्यान करी । तो नाशचि पावे ॥ ३८ ॥


कर्तापि सर्वलोकानामक्षयैश्वर्यवानपि ॥ ३५ ॥
शिवं शिवोऽहमस्मीति वादिनं यं च कंचन ।
आत्मना सह तादात्म्य भागिनं कुरुते भृशम् ॥ ३६ ॥


अकर्ताचि परी मायावशें । सर्वलोककर्ता होतसे ।
आणि अक्षयी ऐश्वर्य वसे । जयापाशी ॥ ५४० ॥
परी जीवें मी शिव म्हणतां । आत्मतादात्म्य दे तत्त्वतां ।
कीं पुन्हां कदांही मागुतां । जीवत्वा न ये ॥ ४१ ॥
स्वरूपें सत्‌चित्‌घन तत्त्वतां । जेथें द्वैताची नसे वार्ता ।
तोचि लोकदृष्टि होय कर्ता । सर्व जगाचा ॥ ४२ ॥
तैसेंचि यश कीर्ति औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
जो काल माया तों काल अक्षय । माये अभावीं नासती ॥ ४३ ॥
तस्मात् महाकल्पा पर्यंत । ऐश्वर्यादि हें शाश्वत ।
ऐसें असतां ध्यान जो करीत । शिवोहं म्हणौनी ॥ ४४ ॥
हें मागील श्लोकीं निरूपण । जें चिंतनरूपें करितां ध्यान ।
शिवसायुज्या होय पावन । जीव हा अविद्यात्यागें ॥ ४५ ॥
येथें कोणी कल्पना करिती । कीं अविद्या त्यागें विद्याप्राप्ति ।
तरी ऐश्वर्यादि धर्म उमटती । आणि पंचवदनत्त्वादि ॥ ४६ ॥
तरी हें ऐसें कदा न घडे । कदाचित् घडतां पुन्हां विघडे ।
विद्या अविद्यात्मक द्वैत मोडे । तरेच जोडे ऐक्यत्व ॥ ४७ ॥
अविद्या प्रतिबिंब जीवत्व । विद्या प्रतिबिंब ईश्वरत्व ।
उपाधी असतां अविनाशत्व । होय कैसेनि ॥ ४८ ॥
उभय उपाधीशीं अज्ञान कारण । अज्ञानें जाहले जीव शिव दोन ।
तें अज्ञान जावया ज्ञान । मुख्य बिंबाचें व्हावें ॥ ४९ ॥
घटीं अथवा सरोवरीं । प्रतिबिंबें दिसतीं सूर्यापरी ।
परी ते मित्याचि निर्धारी । वास्तविक तें मुख्य बिंब ॥ ५५० ॥
तैसे अज्ञानें दोन्ही झाले । उपाधीनें भिन्न भिन्न दिसूं लागले ।
परी उभयांचें रूप मुख्य संचलें । सच्चिदानंद ब्रह्म ॥ ५१ ॥
तस्मात् असज्जड दुःखात्मक । विद्या अविद्या ह्या मायिक ।
त्यांसी निरसून निश्चयात्मक । उभयांचे लक्ष्य घ्यावें ॥ ५२ ॥
मुळींच असून अभिन्नता । जीव शिवरूपें पावला द्वैतता ।
तो मायिक तत्त्वझाडा करितां । जीवेश ऐक्य ॥ ५३ ॥
देहद्वयाकार जे स्फूर्ति । ते ब्रह्माकार व्हावी निश्चिती ।
द्वैतरूप मायिक भ्रांति । जातां निजरूप उरे ॥ ५४ ॥
हा वृत्तीचा स्वभाव । निजध्यासें होय जो आठव ।
तेंचि होय स्वयमेव । जीव हा निजांगीं ॥ ५५ ॥
मायिकही निजध्यास लागतां । जीव हा पावे तादात्म्यता ।
मा निजांगें ब्रह्म असतां । ध्यानें कां नव्हे ॥ ५६ ॥
तस्मात् सांडूनिया नामरूप । ध्यानीं धरावें स्वस्वरूप ।
हाचि समाधि सविकल्प । वृत्त्यात्मकत्वें ॥ ५७ ॥
याचि नांवें कर्तृतंत्रध्यान । येणेंचि होय वस्तुतंत्र ज्ञान ।
मग सहजचि अभिन्न । द्वैताद्वैत सांडूनि ॥ ५८ ॥
शौनकांदिकां म्हणे सूत । निरूपणीं असा कीं दत्तवित्त ।
उत्तम अधिकारी पावत । श्रवनमात्रें ॥ ५९ ॥
आणि मध्यमही अधिकारी । निदिध्यासें सायुज्यता वरी ।
तिसरा कनिष्ठ अनधिकारी । परंपरा साधनें पावें ॥ ५६० ॥
ऐसे वेगळाले तुम्हांप्रति । सांगितले हे यथामती ।
आतां साधारण साधन निश्चितीं । अति सुगम बोलूं ॥ ६१ ॥


धर्मार्थकाममोक्षाणां पारं यस्याथ येन वै ।
मुनस्यस्तत्प्रवक्ष्यामि व्रतं पाशुपताभिधम् ॥ ३७ ॥


पाशुपत नामें हें व्रत । तेंचि ऐका बोलेन युक्त ।
जेणें मुनीहो परपार पावा त्वरित । धर्मार्थ काम मोक्षाच्या ॥ ६२ ॥
धर्म म्हणजे विहित कर्म । जो जो ज्या वर्णाचा नियम ।
फलाशा त्यागितां होय परम । निकी हृदय शुद्धि ॥ ६३ ॥
नातरी फलाशेनें । जन्मासीच लागे येणें ।
यास्तव कर्मातीत होणें । साधकाविहित ॥ ६४ ॥
अर्थ म्हणिजे तो धनासी । काम म्हणिजे तो इच्छेसी ।
येणे जीवन देहबुद्धीसी । तेचि वाढे अधिक ॥ ६५ ॥
तस्मात् त्रैविद्य हें त्यागूनी । साधकें लागावें गुरुभजनीं ।
बंधमोक्षाची मनींहूनी । वार्ताही सांडावी ॥ ६६ ॥
बंधास्तव मोक्ष बोलिजे । येर्‍हवीं स्वरूपीं काय असे दुजें ।
तेंचि अंगें ब्रह्मत्व लाहिजे । अनायासें साधनीं ॥ ६७ ॥
पाशुपतव्रत जया म्हणावें । हें कर्म धर्मात्मक नव्हे ।
तरी तें सत् गुरुभजन जाणावें । जें श्रेष्ठ सर्व साधना ॥ ६८ ॥
वेदांत संमतीं मुमुक्षूतें । गुरुवीण दुजें नसे दैवत ।
कारण कीं मायिक अशाश्वत । इतर देव असती ॥ ६९ ॥
अन्य साधनें कांहीं न करितां । जया गुरुभक्ती आवडे चित्ता ।
तरी तो वावेल अकृत्रिमता । निज परब्रह्मीं ॥ ५७० ॥
मागें चतुष्टय संपन्न । मुमुक्षुत्वाचें बोलिलें चिन्ह ।
हें नसतांही आवडे गुरुभजन । तरी अधिकारी ये तया ॥ ७१ ॥
कायिक वाचिक मानसिक । गुरुवीण नेणेंचि अनेक ।
तयापुढें साधनें सकळिक । हात जोडोनि तिष्ठती ॥ ७२ ॥
बहु कासया बोलणें । ब्रह्मानंदें घर पुसत येणें ।
मा विवेक वैराग्यादि लक्षणें । याशी कोण पुसे ॥ ७३ ॥
तरी ऐका सावधान । तया गुरुभक्तीचें लक्षण ।
ध्वनितार्थें बोलिजे गहन । एका श्लोकें ॥ ७४ ॥


कृत्वा तु विरजां दीक्षां भूतिरुद्राक्ष धारिणः ।
जपन्तो वेदसाराख्य शिवनामसहस्रकम् ॥ ३८ ॥


विरजादीक्षा हें अंतरीं । विभूति रुद्राक्ष धारण करी ।
शिवसहस्रनाम जपे वैखरी । वेदसाराख्य नामें ॥ ७५ ॥
ऐका विरजा दीक्षा ते कैशी । रजोगुण कार्य नुद्‌भवे मानसीं ।
काम क्रोध लोभादिकांसी । तिळपात्र दिधलें ॥ ७६ ॥
काम हाचि अति खाणोरी । महा पापात्मा दुराचारी ।
हा किंचितही असतां अंतरीं । विघ्न करी परमार्था ॥ ७७ ॥
एक काम त्यागें वना जाती । एक क्रोधामुखीं सांपडती ।
थित्या परमार्था आंचवती । आणि इहपर सुखा ॥ ७८ ॥
आणि लोभ तो नष्ट मोठा । देहबुद्धीचा शेलका वांटा ।
येणें परमार्थाच्या वाटा । बुजोन टाकिल्या ॥ ७९ ॥
तस्मात् काम क्रोध लोभ । हेचि रजोगुणाचे गर्भ ।
यांसी त्यागितां सुलभ । मोक्षमार्ग होय ॥ ५८० ॥
काम क्रोधादिक मळ झडतां । सहज होय विरजता ।
हेचि दीक्षा बोलिजे तत्वतां । अंतर्बाह्य शुद्ध ॥ ८१ ॥
विभूति लावणें धर्म शरीराचा । हा प्रकार कायिक सेवेचा ।
संत साधु सद्‌गुरूचा । देह हा दास कीजे ॥ ८२ ॥
संत साधु आणि सज्जन । ह्याचि शिवाच्या विभूति पूर्ण ।
यांचें शरीरें कीजे सेवन । हेंचि लेपन भस्माचें ॥ ८३ ॥
अक्ष म्हणिजे इंद्रियगण । अथवा चतुष्टय अंतःकरण ।
हें करिती रुद्राचें ईक्षण । पदार्थमात्रीं ॥ ८४ ॥
रुद्र म्हणिजे दृश्यामाजीं । अस्ति भाति प्रियत्व सहजीं ।
नामरूपेंचि न देखे दुजीं । हेंचि रुद्राक्ष धारण ॥ ८५ ॥
शिवगुरूचें सहस्रनाम । वेदसाराख्य जें परम ।
वचनीं कारुण्याचा नेम । गुरुस्तवन रूपें ॥ ८६ ॥
एवं विभूति हे सेवा कायिक । रुद्राक्षप्रीती मानसीक ।
शिवसहस्रनाम वाचिक । त्रिधापरी गुरुभक्ति ॥ ८७ ॥
ऐशी गुरुभक्ति उठतां अंतरीं । विरजादीक्षा अपैशी वरी ।
ते विरजादीक्षा होतां झडकरी । गुरुभक्ती घडे ॥ ८८ ॥
एवं अंतरीं हें न घडतां । विभूति रुद्राक्ष धारण करितां ।
अथवा सहस्रनाम जपतां । गीतार्थ अधिकारी नव्हे ॥ ८९ ॥
विरजादीक्षा गुरुभक्ती अंतरीं । तरी मग दाखवो बाहेरी ।
विभूति रुद्राक्ष सहस्रनाम वैखरी । लौकिकीं शोभा पावे ॥ ५९० ॥
परी अंतरीं नसतां जें करणें । कांहीं स्वहित न घडे येणें ।
स्वहित करावें वाटे तेणें । गुरुभक्ति करावी ॥ ९१ ॥
कायेनें गुरुसेवाच करावी । अखंड दास्यत्वा लावावी ।
नित्य चौगुणी आवडी असावी । अंतरापासूनी ॥ ९२ ॥
प्रपंच अवघाचि त्यागावा । गुरुसेवे देह विकावा ।
मी माझेपणाचा गोंवा । न द्यावा पडूं ॥ ९३ ॥
जितुकें गुरुसेवेचें लक्षण । तें तें कीजे अभिमान त्यागून ।
जेणें सद्‌गुरु होय प्रसन्न । कळवळून बोध करी ॥ ९४ ॥
सद्‌गुरु जोंवरीं न होतां प्राप्त । तों काल अंतरीं असावा हेत ।
मानसीं भजन अखंडित । स्मरण ध्यान रूपें ॥ ९५ ॥
सद्‍गुरु मज कैं भेटती । केधवां भवापासून सोडविती ।
दारापुत्रादि प्रपंच प्रहस्ती । मज किमपि सुख नाहीं ॥ ९६ ॥
ऐसें अंतर्ध्यान जेव्हां लागलें । तेव्हां विष्णवादि देव जरी आले ।
सालोक्यादि मुक्ति देऊं लागले । तरी साधकें अपेक्षूं नये ॥९७ ॥
तयांसी इतुकेंचि मागावें । कीं मज सद्‌गुरुसी भेटवावें ।
मग तेही कृपाळू स्वभावें । इच्छिलें पुरविती ॥ ९८ ॥
एवं गुरुभक्ति हे मानसिक । आतां ऐका कैशी वाचिक ।
सर्वही व्यवहार लौकिक । त्यागून वाणी गुरुनामीं ॥ ९९ ॥
अहो शिव शिवा सद्‌गुरु । सदाशिव शंकर करुणाकरु ।
मज दीनासी परपारु । प्रबोधमात्रें पाववावें ॥ ६०० ॥
मज वत्साची तूं गाय । मज लेंकुराची तूं माय ।
कृपाघन तूं ओळू नये । मज चातकाशी ॥ १ ॥
कृपामृतरूपें तूं चंद्र । मी मुमुक्षु जेवी चकोर ।
तूं पयोनिधि क्षीरसागर । मी मत्स्य क्रीडें तुजमाजी ॥ २ ॥
एवं वाणी प्रवर्ते भजनीं । अति उत्कंठा लागली मनीं ।
तेणें पूर्वचिन्हें पालटोनी । दैवी संपत्ति प्राप्त ॥ ३ ॥
शौनकहो निश्चय अवधारा । ऐशी गुरुभक्ति उपजे अंतरा ।
तरी गीतार्थाचे अधिकारा । प्राप्त व्हाल सहज ॥ ४ ॥


संत्यज्य तेन मर्त्यत्वं शैवीं तनुमवप्स्यथ ।


ऐशिया विरजा दीक्षेंकडून । मर्त्यत्व बुद्धि हे त्यागून ।
शैवी तनु अधिकारचिन्ह । पावाल ये क्षणीं ॥ ५ ॥
दीक्षा गुरुभक्ति झालिया । पूर्व चिन्हें पालटती अपसया ।
असुरी संपत्ती म्हणणें जया । दंभ दर्पादि ॥ ६ ॥
विवेक वैराग्य आदिकरून । शमदमादि मुमुक्षुत्व चिन्ह ।
हें दैवी संपत्तीचें लक्षण । शैवी तनु हे ऐशी ॥ ७ ॥
त्रिविधा गुरुभक्तीचें योगें । अधिकार संपत्ति पावाल अंगें ।
शिवगुरु प्रसन्न होऊन वेगें । समर्पील इच्छिलें ॥ ८ ॥


ततः प्रसन्नो भगवाञ्छंकरो लोकशंकरः ॥ ३९ ॥
भवतां दृश्यतामेत्य कैवल्यं वः प्रदास्यति ।


नंतर भगवान् श्रीशंकर । प्रसन्न होऊन लोक सुखकर ।
तुम्हांसी तो दृश्य प्राप्ताधिकार । कैवल्यमुक्ति देईल ॥ ९ ॥
नंतर म्हणजे गुरुभक्ति झालिया । शिव हा गुरुरूपें प्रगटे तया ।
प्रसन्न होऊन श्रवनादि उपाया । लावी निजांगें ॥ ६१० ॥
भगवान् शब्दें षड्गुण । ज्ञानादि हें प्रखर चिन्ह ।
सद्‌गुरुपाशीं अनुदिन । वर्तत असे ॥ ११ ॥
सर्व लोकांशी सुखकर । दर्शन ज्याचें मनोहर ।
या हेतु नामें शंकर । सद्‌गुरुनाथु ॥ १२ ॥
अथवा निजसुख आपुलें । द्यावया सत्रचि घातलें ।
मुमुक्षु साधक जे भुकेले । निजतृप्ती पावती ॥ १३ ॥
ऐसा श्रीशिवसद्‌गुरु । प्रसन्न होऊन करुणाकरु ।
आणि तुम्हीहा प्राप्ताधिकारु । तरी कैवल्य तुम्हां देईल ॥ १४ ॥
मीं देह ऐसा अज्ञानभ्रम । वाउगाचि वाढला असे संभ्रम ।
याचे निरसनार्थ त्वं ब्रह्म । असशी म्हणोनि उपदेशिती ॥ १५ ॥
स्वानुभवें उठतां ब्रह्मस्फूर्ति । निःशेष अज्ञान जाय भ्रांती ।
सहजची कैवल्याची प्राप्ती । जीवेश ऐक्यरूपें ॥ १६ ॥
ऐसा शिवगुरु हा समर्थ । कैवल्यरूप देतसे परमार्थ ।
हाचि या शिवगीतेचा अर्थ । विषयरूपें ऐक्यभक्ति ॥ १७ ॥
कैवल्यप्राप्ति हें प्रयोजन । संबंध साध्य साधक दोन ।
आणि अधिकाराचेंही चिन्ह । या अध्यायीं बोलिलें ॥ १८ ॥
अनधिकारिया कैसा अधिकार । यास्तव बोलिला गुरुभक्ति प्रकार ।
शिवदीक्षारूप सविस्तर । यथामती तुम्हांसी ॥ १९ ॥
हेंचि विरजादीक्षेचें रूप पुढें । बोलिजेल तुम्हांसी उघडें ।
तें मुमुक्षुजन अति चाडें । ऐकोत निरूपण ॥ ६२० ॥


रामाय दण्डकारण्ये यत् प्रादात् कुंभसंभवः ॥ ४० ॥
तत्सर्वं वः प्रवक्ष्यामि श्रृणुध्वम् भक्तियोगिनः ।
इति श्रीशिवगीतायां सूतऋषि संवादे प्रथमोध्यायः ॥ १ ॥


कुंभसंभव जो अगस्ति । दण्डकारण्यीं रामाप्रती ।
जें देता झाला ऐका भक्ती । तें सर्व बोलेन तुम्हांसी ॥ २१ ॥
कैशी रामें दीक्षा घेतली । जे अगस्तीनें प्रबोधिली ।
तेथें फलप्राप्ति काय झाली । तें तें बोलेन सर्व ॥ २२ ॥
आणि शिव कैसा प्रगटला । रामाशी काय बोधिता झाला ।
तें तें सांगेन तुम्हांला । जरी असे अत्यंत चाड ॥ २३ ॥
श्रद्धारूप आवडी वीण । व्यर्थचि जाय निरूपण ।
तस्मात् एकाग्र करोनि मन । श्रवण करावें ॥ २४ ॥
येथें शौनकादिकांचे पंक्ति । तत्पर असावें साधक श्रोतीं ।
शिवराघव संवादउक्ति । प्रगटेल पुढें ॥ २५ ॥
वेदउक्त हे शिवगीता । व्यासें निरूपिली तत्त्वतां ।
तोचि गीर्वाण् अर्थ प्राकृता । माजीं काढिला असे ॥ २६ ॥
विद म्हणजे जें जाणणें । परा वाचा जयेतें म्हणणें ।
जेथून ॐकारासहित येणें । मात्रा वैखरीसी ॥ २७ ॥
परा पश्यंति मध्यमा वैखरी । ह्या अनादीच वाणी चारी ।
त्यांचे प्रकार होती अनेकापरी । संस्कृत प्राकृत रूपें ॥ २८ ॥
तस्मात् शब्द जे जे उठती । मातृकाक्षरें उमटतीं ।
ते ते वेद त्रिमात्मक निश्चितीं । अन्यथा नव्हे ॥ २९ ॥
यास्तव हें वेदोक्त सारें । निरूपण असे साचोकारें ।
भाविक धरितील जे आदरें । ते अर्थरूप फळ लाहती ॥ ६३० ॥
इति श्रीमद् वेदेश्वरी । शिवगीता पद्म पुराणांतरी ।
शिवराघवसंवादानुकारीं । प्रथमोध्यायः ॥ १ ॥
ओंवी संख्या ६३० ॥ श्लोक ४० ॥