॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय सोळावा ॥
यांत मुख्यतः गुरुभक्तियोग वर्णन केला आहे. उत्तम अधिकारी उपदेशमात्रें माया निरसून, संशय फिटून अभिन्न वस्तुतंत्र होतो. मध्यम अधिकारी जे सलक्षण असतील, त्यांना अनेकवेळा श्रवण मनन घडले की तेही सद्गुरुप्रसादे ब्रह्माभिन्न होतात. मंदप्रज्ञ भावार्थी अधिकारसंपन्न व विरक्त असतील तर साधनाभ्यास घडला की तेही अभिन्नज्ञानयुक्त होतात. अधिकार नसतां गुरुभक्ति घडली की साधनसंपन्न होऊन ज्ञानास पात्र होतात. सर्वांना गुरुभक्ती घडावी. गुरु ज्ञानप्रद असावा. नुसता मंत्र घेऊन मंद-मूढ लोक म्हणतात की आम्ही गुरु केला. गुरुसंबंधी नाना लोककल्पना असतात. येथे श्रीरामांनी शिवगुरुंना प्रश्न केले आहेत की सर्व त्यागून गुरूला शरण जाणे सामान्यास कसे जमावे ? एखाद्यालाच जमेल. आपल्या घरी आणून गुरूस सेवावे तर निस्पृह ज्ञाता घरी कसा येणार ? एक मंत्र घेतला, पुढे भेटही नाही तर गुरुसेवा कशी करावी ? त्यांना काही गति आहे की नाही ? त्यांनी घरी जप, तप, नवविधा भजन वगैरे करावे की नाही ? गुरुभक्तीस अधिकारी कोण ?
ब्राह्मणादि चारी वर्ण, ब्रह्मचर्यादि चार आश्रम, स्त्रिया, उपनीत, अनुपनीत इत्यादि सर्वांनाच गुरुभक्तीचा अधिकार आहे. स्त्रियांना पती गुरु असला तरी त्यांनाही मोक्षगुरू पाहिजेच. मानसिक गुरुभजन घडले की त्याही ज्ञानाने मुक्त होतात. श्रवण-मननी अखंड रति असेल तो निष्काम कर्मयोगीच खरा संन्यासी होय. पाशुपतव्रतादि आचरणार्यानेही इतक्यावरच समाधान मानू नये. मोक्षप्राप्तीसाठी गुरुभक्ति अवश्य पाहिजे. गुरुवीण गति नाही. अंत्यजही भावार्थी असेल तर तेही अधिकारी होत. मग अनधिकारी कोण ? सर्व इंद्रिययुक्त शरीर, पाटवही अद्भुत, पण सदा द्रव्यदारा यांत आसक्त तो अनधिकारी. ’सदा व्यासंग प्रपंचाचा । लेश नाही परमार्थाचा । उगाच बोले आच्याबाच्या । तो अनधिकारी ॥’ धन संपत्तिच प्राप्त व्हावी, ते सदा असावी, गर्व, ताठा, अन्याय दावी तो अनधिकारी. ’सर्वे जगी मीच मोठा, न जाऊं कदा परमार्थ्याच्या वाटा, विषयभोगाचा सदा ताठा’ असणारा अनधिकारी. काम्य कर्मे करतो, दानधर्माची फार आवड आहे, नाना निग्रह शरीरी करतो, पण तोही अनधिकारी. गुरूवीण देव मोठा वाटतो, नाना कल्पना करतो, द्रव्याचा फाटा फुटतो, तोही अनधिकारी. वेदशास्त्रसंपन्न पण गर्विष्ठ, दुसर्याचे ऐकून न घेणारा तो अनधिकरी. आपल्या करणीचा अभिमान, इतरांना निकृष्ट मानून माझ्या सारखा ज्ञानी कोण म्हणतो, तो अनधिकारी. शिव-विष्णू भेद करणारा, एका देवास श्रेष्ठ, इतरांस कनिष्ठ मानणारा, हठयोगी असून चमत्कार करून दाखविणारा, ज्ञात्यांची निंदा करणारा स्वतः उत्तमाचरणी असला तरी अनधिकारीच होय. उपासनेचा साक्षात्कार झाल्याने परमार्थ वाढला आहे असे दिसते पण जो शब्दज्ञानच थोर असे म्हणणारा आणि स्वतः पुण्यात्मा असूनही वेदान्तशास्त्र सिद्धज्ञानी निंदणारा, तसेच गुरुशास्त्रविमुख हे सर्व अनधिकारी आहेत. मूळी ब्रह्म असून अज्ञान घेऊन बसतात आणि स्वतः अभक्त असून ज्ञानी लोकांचा आणि शिवोपासकांचा जे निंदा-द्वेष करतात ते ही अनधिकारी आहेत.
स्वरूप, चैतन्य, प्रकाश आणि आनंद हे चार संप्रदाय प्रसिद्ध आहेत. उदासीनता हे मुख्य चिन्ह आहे. अंतरी असून हे चिन्ह बाहेर वागवले तर भूषण आहे, पण अंतरी नसून बाहेर वागवले तर विटंबना होय. लोकांचे छिद्र पाहून विदारणारे काकदृष्टीचे लोक, तसेच शिव, विष्णु, गुरू आणि पाशुपतव्रतींचा द्वेष करणारे ते कधीही मुक्त होत नाहीत हे त्रिवार सत्य आहे, असे स्वामी सांगतात.
शिवगुरु सांगतात की लोकरीतीचा दंडक आहे की काशी, द्वारका, श्रीशैल्य, पुष्कर यांत मरणारास ईश्वरानुग्रहाने मोक्ष मिळतो. शिव उजव्या कर्णांत प्रणवाचा उपदेश करून ज्ञानोपदेश करतात असे म्हणतात. पण स्वामी म्हणतात की श्रुतीचा अर्थ भिन्न आहे. "काशी म्हणजे काश प्रकाश करी । म्हणजे चिद्रूप ब्रह्म निर्धारी । तेथे स्थित होतां क्षणभरी । कर्तृतंत्रत्वे ॥" तसेच अंतकाल म्हणजे स्थिती. देहाचा अंतःकाल अभिमान निमणे, म्हणजे ग्रंथीभेद आणि स्वरूपस्थिति. त्या स्थिति होण्याचे संधीत शिव गुरुरूपाने स्फूर्ति देतात की नामरूपाचे संकेत प्रणवरूप असतात. तेथे नामरूप कल्पू नये. काशीत मरून जे फळ मिळते ते गुरुभक्त उत्तम अधिकार्यास, एवढेच नव्हे तर स्त्री शूद्रादि मंद प्रज्ञांनाही गुरुभक्तीने प्राप्त होते.
प्रश्न : सांसारिकास गुरुभक्ती कशी घडेल ? याचे उत्तर देतात, जर त्याने सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये संयत करून गुरुभजनी लावली तर घडेल. हस्तसंयत म्हणजे सर्व क्रिया गुरूपायी अर्पण करणे. मनाची संयतता - कर्मफल रुची नसणे, गुरुमूर्ती ध्यानाचीच आवड असणे आणि फलाशेवीण केलेली कर्मे गुरुचरणी अर्पण करणे ही होय.
अनन्य गुरुभक्त शास्त्रीय अथवा लौकिक कुठल्याही कर्मी वर्तत असला तरी वाणी आणि मनावर कोणाची सत्ता असते ? विरक्त गुरु-भक्तासारखेच ते होतात. त्यांच्या हातून सत्क्रियाच घडतात. शरीरी अन्य क्रिया झाल्या तरी ते कायिक तपच आहे. या योगे असूया हिंसादि सर्व नष्ट होतात. गुरुभक्त कोणास उद्विग्न करीत नाही, सत्यप्रिय मधुरच बोलतो किंवा वेद-वेदान्ताची चर्चा करतो. हे वाणीचे तप होय. मनाचा वेग सदा एकतानतेने गुरुपदीच लीन असतां विषयचिंतन सुटते, ते मानसिक तप. याप्रमाणे त्याचेकडून त्रिविध तप घडते. ज्या कर्मांचा भक्तीस विरोध असेल ती करू नयेत. उपनीत, अनुपनीत, स्त्री, शूद्र - सर्वांनी गुरुभक्तीच आदरावी. ज्यांना त्याग घडत नसेल त्यांनी ईश्वरार्पण करावे. त्याग करणेच श्रेयस्कर म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यागच करावा. ग्रहण विधियुक्त झाले असेल तर त्यागही विधियुक्त करावा.
प्रारब्धाने सद्गुरूंचा वियोग झाला तरी वाणी मनाने विसरूं नये. वाणी मनास आवड असली की कायिक सेवा आपोआपच घडते. ज्यांना वेदाधिकार नाही त्यांनी ध्यानीं किंवा नामी रत व्हावे. शिवगुरु तादात्म्य भावाने, निःसंशय ज्ञानाने गुरुभक्त मुक्त होतो तसा दुसर्या कुठल्याही उपायाने होत नाही. संयत विद्या म्हणजे विद्याशास्त्र संपन्न असून अभिमान, द्वेष अणुमात्र नसणे व उत्तम करणी करतो पण कुणास कळू देत नाही, आणि जनांत कीर्ति होऊ देत नाही. गुप्त धनाप्रमाणेंच याचे नांव संयत कीर्ति असे म्हटले आहे.
ध्यानाचे महत्त्व : ध्यानास जाति, आश्रम, अंगे, देशकाल, आसनादि कशाचीही अपेक्षा नसते. शयनीं, चालता, बैसतां अथवा अनेकधा कर्मे करता अथवा पापकर्मासी रत असतांही ध्यान केल्याने सुटका होते. कांहीही करताना ध्यान विसरूं नये. पापपुण्य कांहीही करतांना ध्यान केले असतां पापपुण्याचा विसर पडतो; बर्या-वाईटास मन विसरते म्हणून तो ध्यानामुळे निर्लेप असंग राहतो. त्याक्षणीही तो त्या कर्माशी तादात्म्य पावत नाही तर ते पुढे कसे बाधेल ? ध्यानानुसंधानाने तो सदा मुक्तच असतो. एकदा ध्यान आरंभिले ते निश्चयाने दृढ केले की कधी ते नासले जात नाही, दिवसेंदिवस द्विगुणीत होते. अन्य कर्मत्याग केला तरी बाधा येत नाही. लोक नांवे ठेवतात पण ते एका दृष्टीने इष्टच असते. गुरुभजनास तो मोकळा होतो. ’मुख्य धर्मामध्यें धर्म । गुरुपदीं व्हावा उपरम ।’ ध्यानादेव ज्ञान ध्यानानेंच होते. गुरुभक्त आश्चर्य, भय, शोक, क्षुधा, तृषा, धालेपण, काहीही असो, अत्यंत तळमळीने जो गुरुनाम उच्चारितों तो परमगति पावतो. आश्चर्य दो प्रकारें - एक गुरूनें स्वीकारले म्हणून किंवा अजून कां कृपा करीत नाहीत म्हणून ! मनी निश्चयच केलेला असतो की मी ध्यान सोडणार नाही. एका जन्मांत कृपा नाही तर शतजन्माने करतील पण मी ध्यान सोडणार नाही.
मूढांना वाटते की अंती नाम घेऊन आपण उद्धरून जाऊं; पण पूर्वीचा जसा अभ्यास असेल तशीच स्मृति अंतकाळी होणार. दृढ ध्यानाभ्यास असेल तर अंतरी ध्यान आणि बाहेर उच्चार होईल. अथवा अंतरी ध्यान असून बाहेर उच्चार होणारही नाही, पण तो पुढले जन्मी गुरुमुखें ज्ञान पावून मुक्त होईल. मरतांच मुक्त झाला नाही तरी क्रमें ऐक्यता पावेल हे ध्यानाचे सामर्थ्य होय. केवळ वाणीच्या उच्चाराने मुक्ति होत नाही हे मूढांना कळतच नाही. अंतकाळीच काय, ’शिवायनमो’ हे अखंड स्मरत असतो म्हणून शिवगुरूस सुदृढ वरले की दर्शनाआधी किंवा दर्शन साक्षात्कारानंतर ध्यास दृढ असला की तो या देहीच मुक्त होतो.
शिवगुरुभक्ति दृढ करावी, मग भले भस्म, रुद्राक्षधारणयुक्त असो वा नसो. मुख्य अंतर्वृत्ति गुरुरंगी रंगली म्हणजे बाह्य चिन्हे असोत वा नसोत. श्रीहंसराज म्हणतात की बहिरंग क्रियेची शास्त्रवचनेही त्यागावी. नर्यभस्म म्हणजे चिताभस्म लावून वर रुद्राक्ष बांधतो तो महापापी असला तरी निःसंशय मुक्त होतो हे वचन प्रवृत्तिचे लोकास रुचकर वाटते. पण शुद्ध साधकास उपयोगाचे नाही. मूढ जन खुशाल त्यावर विश्वास ठेवोत. जो अंतरंग भक्त असेल तो अन्य शैव कर्म करो न करो, फरक पडत नाही. ज्याच्या वदनांत सदा शिवगुरूचे नाम असते, अंतरी गुरुमूर्तीचे ध्यान, जे अखंड एकाकार स्मरण, ते असून ज्याची वाणीही रंगून शिवनामोच्चार करते (वाणी एक उपलक्षण आहे), सर्वेंद्रियी ज्याचे शिवतादात्म्य झालेले असेल, तो बाह्य उपासना करो न करो, अंतरंगी मात्र गुरुभक्ति व्हावी हाच तरणोपाय आहे.
रुद्राक्षधारण, भस्म, वा बिल्ववृक्षातळीची माती लावूं मग यमकिंकर स्पर्शणार नाहीत, असे मूढ म्हणतात. श्रीहंसराज स्वामी स्पष्ट सांगतात की मुमुक्षुंनी ही वचने मानूं नयेत. देह पाटव असे तोंवरच गुरुभक्ति करा. ’सद्गुरु राणा अंतरी सांठावा ।’ (३१०) अंतःकरण गुरुमूर्तीच्या ठायी निःसंशय जडून जावे. गुरुमूर्तीवीण अन्याचे ठायी दुजा भावच नसावा. संस्कृत अथवा प्राकृत शिवसहस्रनामाचा पाठ करून सदैव करुणावचनाने शिवगुरूंना आळवावे. अंतरी सद्गुरुस ध्याऊन बाहेर नामसंकीर्तन केले असतां शिवगुरूंशी तादात्म्य होऊन, त्या भावनेने ज्ञान होऊन जीव निःसंशय मुक्त होतात. तादात्म्य म्हणजे ’आपुले वृत्तीशी । तदाकारत्व शिवगुरुध्यानासी । अवसरचि नेदी त्या अखण्डतेशी । या नांव दृढ ध्यान ॥’ (२१६)
यानंतर परतंत्र जीवांना कसे घडेल याचे उत्तर दिले आहे. ’स्त्रियादि तो निजपतीच्या स्वभावा । अनुसरल्या पाहिजेती ॥’ (२१८) ’तरी ऐक रामा याचे उत्तर । पतीसी विकले हे इतुके शरीर । वाणी मन तो असे स्वतंत्र । भजन ध्यानासी ॥’ (२१९) वाणी प्रसंगोपात पतीच्या स्तवनांत लावली तरी नंतर शिवगुरु भजनास लावावी. ’मन तो कधी नव्हे कोणाचे । ते तत्पर करावे ध्यानीं साचे । मुख्यत्वें लाहणे जे परमार्थाचे । ते मनाधीनचि ॥’ (१२१) मनाला ज्याची आवड असेल तिकडे ते उडी घेते आणि वाणीलाही बळेच ओढते; अन्य व्यापारीं गुंतू देत नाही. (२२२) शरीरही तिकडेच ओढ घेते. पण प्रारब्ध भोगामुळे संसारी वर्तावे लागते. तरी पण कार्यसिद्धि तर मनापाशीच असते. यावर शंका घेतली आहे की ध्यानासाठीं देह स्थिर केला पाहिजे; आसन, माळा, विशिष्ट काळ, कामधंदा सोडून बसावे लागते. तर उत्तर देतात की या ध्यानास हे कांहीच लागत नाही. ’मुख्य म्हणजे मनचि जडले पाहिजे पाया ।’ इतर भजन मध्यमांसाठी आहे. निःसीम गुरुभक्तावर शिवगुरूचेही तसेच प्रेम असते; त्याची उपेक्षा ते कधीच करीत नाहीत. तसे केले तर त्यांचे नाम आणि ब्रीदच व्यर्थ होईल ! सकामांसाठी उपासनेचे अनेक नियम सांगितले आहेत, पण विवेकी गुरुभक्तास सर्वत्र शिवगुरूच असल्याने या नियमांची आवश्यकता नाही.
यानंतर मूढाच्या उपासनेचे सविस्तर वर्णन केले आहे. मृत्तिका, गोमय, भस्म, चंदन, वाळू, पाषाणाची अथवा लोहाची अथवा रंगाने रेखाटलेली कींवा खापराची, सुताची, पितळेची, तांब्याची, सुवर्णाची, रुप्याची अथवा नानाविध रत्नांची, अथवा पारद वा कर्पूराची शुभ्रवर्णी सलक्षण प्रतिमा अथवा लिंग करावे. तेथे वेदमंत्रांनी प्रतिष्ठापना करून गंध, पुष्प, अलंकारांनी नियमाने पूजित जावे. एकापेक्षां एकाचे अधिक कोटिगुण फळ मिळते. गृहस्थ किंव प्रापंचिक जे सदा सकाम असतात त्यांनीच प्रतिमा कराव्यात. गुरुभक्त मोक्षमार्गी असेल त्यानें सहसा करूं नये. जे सकाम यथाविधि भजतील त्यांची ती ती कामना पूर्ण होईल. जो गुरुभक्त खरा साधक असेल तोच खरा परमार्थी जाणावा.
यानंतर सकाम शिवोपासनेचे विस्तृत वर्णन केले आहे. बिल्व वृक्षातळी भजेल तर लक्ष्मी लाभून पुरश्चरणाचे फळ मिळते व मंत्र सिद्धि मिळते. पर्वताशिखरी, नदीतीरी, शिवालयी, अग्निहोत्री किंवा विष्णुमंदिरी जो जपतो, त्यास दानव, यक्ष, राक्षस विघ्नें करीत नाहीत, पापे स्पर्शत नाहीत व अंती शिवसायुज्य पावतो. कंबलासनी सर्व काम पुरतात. कृष्णजिनी मुक्ति, व्याघ्रचर्मी मोक्षलक्ष्मी, कुशासनी ज्ञान आणि पर्णासनी आरोग्य लाभते. यापैकी कुठल्याही आसनावर वस्त्र घालून बसावे. जमिनीवर बसू नये. पाषाणी दुःख प्रवृत्ती आणि काष्ठीं नाना रोग होतात. उत्तर किंवा पूर्वेकडे मुख करून बसावे. तरच फळ मिळते. दक्षिण किंवा पश्चिमेस मुख करू नये. स्फाटक मालेने जप केल्यास साम्राज्य, पुत्रजीवेने उत्कृष्ट लक्ष्मी, दर्भास गांठी मारून केलेल्या माळेने आत्मज्ञान, रुद्राक्ष माळेने सकलकामना पूर्ती, प्रवाळाच्या माळेने सर्वलोकवश होतात. आंवळ्याची माळ मोक्षप्रद असून मोत्यांची माळ सर्वविद्या देते. माणिकाची त्रैलोक्यास वश करते तर नीलाची किंवा मरकताची शत्रूस भय उत्पन्न करते. सुवर्णाची महाऐश्वर्य देते. रुप्याची माळ कन्येची प्राप्ती करून देते, पारदाची सर्व अर्थ प्राप्त करून देते. माळेत सर्वांत उत्तमोत्तम १०८ मण्यांची, १०० मण्यांची उत्तम, ५४ मण्यांची अथवा २५ ची अधम. या शिवाय २८ पासून १०० मण्यांपर्यंत करतात, त्यास आधार नाही असे म्हटले आहे.
गुरुभक्ताची मुख्य पूजा सर्वांभूतीं राम पहावा. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी कोठेही दुसरा भावच नसावा. सर्वत्र शिवच विराजत आहेत असा दृढ निश्चय असावा. सर्व जगच देऊळ आहे. जगांत होणार्या सर्व क्रिया शिवपूजनच होय. मी एक मात्र सेवाधारी इतर सर्व जगदाकार म्हणजे एक शिवसद्गुरु विराजमान आहेत. सर्व देहभोग ही पूजाच होय. एक निमिषभर अशी पूजा घडेल तर सर्व फळे लाभतात मग जो अनुदिन चिरकाळ रत असेल तेथे काय होणार नाही ? आत्मपूजेचा महिमा काय सांगावा ! अशी पूजा करणारा चांडालही शिवसायुज्य पावतो. असा भक्त मला केव्हां हांक मारेल अशी प्रतिक्षाही शिव करीत नाहीत. स्वतः उडी घेऊन वरदहस्ताने त्यास तोषवितात. गुरूंच्या हस्तस्पर्शाने अज्ञान नष्ट होते, नंतर पाठीवर थापटून ’तू ब्रह्म आहेस’ हे सांगतात. या रीतीने जे समाधान पावतात तेच याचे माहात्म्य जाणतात.
नंतर विवेकी पुरुषाने योनिमुद्रासन घालून वर्णमालेने जप करावा असे सांगून अकारादि १६ वर्ण, कादि २५ स्पर्श, यरादि ७ + ह + क्ष असे ५० होतात. अष्टोत्तर शत हवे असल्यास अष्टवर्ग लावावे. ५० मात्रा अनुलोम, प्रतिलोमाने १०० होतात. ॐ मेरू स्थानी ठेवावा. ही माळ कोणास दिसत नाही. जरी स्मरणार्थ लिहून काढले तरी लेख कुणास दाखवूं नये. बहुत लेख झाले की विसर्जित करावे. वर्णमालेचा १ माला जप झाला तरी पुरश्चरण होते. या जपाने अभिन्न ब्रह्मज्ञान होते असे सांगितले आहे.
यानंतर मंत्र जपांतील दोषांचे वर्णन केले असून कांही दोष कर्त्याधीन असतात असे म्हटले आहे. १) छिन्न, २) रुद्ध, ३) स्तंभित, ४) मिलित, ५) मूर्छित, ६) सुप्त, ७) मत्त, ८) हीनवीर्य, ९) दग्ध, १०) त्रस्त, ११) अरिपक्षी, १२) बाल, १३) तरुण, १४) वृद्ध असे चौदा दोष वर्णिले आहेत. विस्तार भयास्तव देता येत नाहीत. या नंतर जप केव्हां करावा हे सांगितले आहे. चातुर्थ यामींचा तिसरा प्रहर, तेथेपासून ब्राह्ममुहूर्त सुरू होतो. तो जपाचा आरंभ समय. तेथपासून मध्यान्हपर्यंत जप करावा. हाच पुरश्चरणाचा काल असून मध्यान्हानंतर केलेला जप व्यर्थ जातो, फळाचा नाश होतो व मंत्रही सिद्ध होत नाही. म्हणून कामुक जप मध्यान्हानंतर करू नये.
श्रीहंसराज सांगतात की निष्काम गुरुभक्तास आसन, दिशा, माळा, काळ, जपसंख्या, मंत्रदोष वगैरे कांहीच नसते. त्याने निष्काम पुरश्चरण केले तर त्यास दोष लागत नाही. गुरुभक्ताने नित्यनेमाने गायत्री किंवा गुरुमंत्र जपला, किंवा पुरश्चरणही चित्तशुद्धीसाठी किंवा तपश्चर्या म्हणून केले आणि फळाशा नसेल तर कुठल्याही वेळी जप केला तरी दोष नाही. फक्त गुरुदर्शन, गुरुकृपेची इच्छा असणारांनी केव्हांही करावा. अंतर गुरुभक्तीने रंगलेले असले, कामनादि विकार नसले, त्यास घडेल तेव्हां घडो, सद्गदित कंठे, गुरुपिसे लागले असतां जपतो त्यास दोष नाही.
यानंतर श्रीहंसराज स्वामी सांगतात की वाराह कल्पीं ब्रह्मदिना माझारी चोविसाव्या पर्यय वैवस्वत मन्वंतरांत त्रेतायुगांत आरंभी शिव राघव संवाद झाला. तो शिवपुत्र षडाननानें ऐकून सनकादिकांना शिवगीता सांगितली. ती व्यासांनी पद्मपुराणी गुंफली.
नंतर श्रीहंसराज सांगतात की मंदप्रज्ञांनी प्रथम १५ वा व १६ वा अध्याय वाचावे. गुरुभक्तीचा घबाड ठेवा श्रवण केल्याने जीवास अंतर्भक्तीचा अधिकार येतो. त्यानंतर ३ रा व ४ था अध्याय पहावा. ज्ञानाविषयीच प्रवृत्ति व्हावी अशी इच्छा असणारांनी, म्हणजे उत्तम अधिकारी असेल त्याने प्रथम पहिला अध्याय पहावा, त्यांत वेदांत विषय, फळ प्रयोजनासह सांगितला आहे. द्वितीय अध्याय वाचून अभिन्नता प्राप्त होते, ती दृढ व्हावी म्हणून ६ व ७ हे दोन अध्याय वाचावे. मध्यम अधिकार्याने ८ वा आणि ९ वा अध्याय पाहून देहबुद्धि त्यागावी व नंतर १० वा व त्यानंतर ११ वा अध्याय पहावा. कनिष्ठांनी आधी १४ व्यांत पंचीकरण पहावे, नंतर १२ व्यांत सगुण-निर्गुणोपासना पहावी, नंतर १४ व्या नंतर १३ वा कलशोध्याय पहावा. हे सोमसूत्री प्रदक्षिणा शिवलिंगास घडावी. येथे १६ व्या अध्यायांतील मुख्य विषय सर्व सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
श्रीसद्गुरुकृपेने श्रीहंसराजांच्या वेदेश्वरीचा सारांश सांगण्याचा यथामति प्रयत्न केला आहे. वाचकांनी गोड मानून घ्यावा.
GO TOP
|