॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय चौदावा ॥
या अध्यायांत प्रारंभी गीतारूप देवळाचे रूपक केले आहे. व्यास हे कामाठी असून उपनिषद भाग या खाणीतून श्रुति चिर निवडले. मनोमय तर्क हा चुना संधीत बसविला व ओतप्रोत अर्थ रसरूपे भरला. पाया सुदृढ पाहिजे म्हणून पहिल्या तीन अध्यायांत अगस्ति-राघव संवाद वर्णिला असून ब्रह्म प्रत्यगात्मा हेच या देऊळांतील अक्षयी लिंग होय. चतुर्थ अध्यायांतील निरूपण हीच तळसरी घातली. पंचमांत आंखणी मांडली व सहाव्यात अध्यायरूपी चौथरा निर्मिला. सप्तम अध्यायांत विश्वरूप गारुडाचे वर्णन याच चार भिंती बांधल्या. अष्टम अध्याय म्हणजे पायर्या आणि नवम अध्याय म्हणजे देवळाचे दरवाजे आहेत. दशम अध्याय म्हणजे गलथे व पान सर्व मिळून आले असून एकादश अध्याय म्हणजे मुंदेरी व बारावा अध्याय म्हणजे गळती लागूं नये म्हणून केलेली गच्च ठोकणी होय. तेरावा अध्याय हा कलश असून चौदावा अध्याय म्हणजे मंदिरापुढील मंडप असून पंधरावा आणि सोळावा या दोन साधकांना विश्राम करतां यावा म्हणून बांधलेल्या दिव्य शाळाच आहेत, जेथे संतसंगती विश्रांति घेतात.
आपण आपणास जाणणे हेच खरे तप असे उपनिषदे म्हणतात. ब्रह्म हे अपरोक्ष ज्ञान आणि न जाणतां आपण तेचि होणे हे अपरोक्ष ज्ञान होय. ही स्थिति विचारवंतांना प्राप्त होते. आपणही आपणा न जाणे कारण एक आहोत असे म्हणून जे जाणले म्हणतात, ती नेणीव होय. अंगे होऊन जाणवेना म्हणतात त्यांनीच ब्रह्म जाणले. अदृश्य, अग्राह्य, निजरूप ते ग्राह्य कसे होईल ? अंगे होणे हाच उपाय आहे. घेऊं जाणे हा अपाय आहे असे श्रीहंसराज सांगतात.
या अध्यायांत पंचकोशाचे विवरण केले असून भृगुवल्लीच्या निरूपणामुळे भोक्ता कोण, सत्य की मिथ्या हे कळेल. स्थूल सौरभिक न्याय म्हणजे काय हेही सांगितले आहे.
बाराव्या अध्यायांत अंतरंग उपासनेचे दोन प्रकार सांगितले. १) स्फुरणामाजी साक्षी अनुसंधान रूपें ध्यावा २) सगुण साकार कल्पून मानसपूजेद्वारा पूजावा हाच होय. पहिला प्रकार विवेचनाशिवाय अनुभवास येत नाही म्हणून आरंभी सगुण साकार चिंतावा त्यायोगें चित्त एकाग्रता होऊन अंतरंगत्वे अनुसंधान लागते व मग चित्त हळूहळू योजावे हे १२ व्या अध्यायांत सांगितले. अंतर्मुखतेचा अधिकार यावा म्हणून काय करावे ते येथे सांगतात. शिवगुरूची मूर्ती कल्पून अंतर्दृष्टीने नेमाने अनुसंधान इतके करावे कीं सर्वांभूतीं पदार्थमात्रीं शिवरूप दिसावे. नेत्र उघडून पाहिले तरी हेच अनुसंधान राहावे अशा ध्यानानें रजतरूपी मळ झडून चित्तशुद्धी होते. असे चित्तस्थैर्य झाले की वृत्ती सगुण साक्षित्वाकडे वळते.
असत्याच्या अनुसंधानाने स्वयें सत्यत्व पावणे यास सौरभिक न्याय म्हणतात. अथवा संवादी भ्रमही म्हणतात. मृगजलास पाहून मृग धावला असतां त्यास खरेच जललाभ व्हावा हा संवादी भ्रम होय. तसे मिथ्या साकाराचे ध्यान करीत असतां अनुदिन चित्तांत साक्षिज्ञान आपोआप स्फुरूं लागते. ते ज्ञानही वृत्त्यात्मक असून सविशेषत्वें मायिकच असते. तेही त्यागिले की निश्चयात्मक निर्विशेष ब्रह्मच उरते. तेच आपण अशी सतत आठवण ठेवणे ही निर्गुणोपासना हाही संवादी भ्रमच आहे. स्वतः असून चिंतू लागणे हा भ्रमच. स्वतः अंगे होणे म्हणजे वस्तुतंत्र ब्रह्म ! याप्रमाणे प्रथम साकाराचा अभ्यास, त्यायोगे साक्षित्व, मग सगूण साक्षित्व त्यागून स्वयेंपरिपूर्ण ब्रह्म व्हावे. आधी आपुला आपण शोध घ्यावा. स्थूलादि त्यागून साक्षी ओळखावा हाच सौराभिक न्याय होय. पंचकोश एकेक त्यागून आनंदमय कोशांत साक्षित्व पहावे आणि अखेत निजवस्तू व्हावे असे सांगितले आहे.
अन्नमय पिंड हा स्थूल असून लिंगदेह राहण्याचे स्थळ आहे. त्यांत जीवासह सतरा तत्त्वांचा लिंगदेह प्राणादिसह राहतो. अनेक चंचळ तत्त्वे असतां स्थूलाचा मीपणा घेतो. जन्म, जरा, व्याधि, मरण हे देहाचे. तो देहच मी असा अहंकार धारण करतो. तिन्ही अवस्थांमध्ये देहाध्यास सोडत नाही. आत्मा कधी जन्मत नाही, मरत नाही. देह जन्मतो, मरतो हे विवेकाने जाणावे. षड्विकार देहास असतात. आत्मा नभाप्रमाणे निर्विकार आहे. याप्रमाणे आत्मा व देह यांची लक्षणे भिन्न भिन्न आहेत असे अनुसंधान करावे.
नंतर स्थूलशरीरास प्राण व्यापून असतो तो मी नव्हे, हाही विवेक करावा. पंचकर्मेंद्रियांसह पंचप्राण असा दहाप्रकारें प्राणमय कोश आहे. चंचल क्रियात्मक असल्याने तो मी आत्मा नव्हे. आत्मा निश्चळ, अक्रिय, एकरूप आहे. क्षुधातृषा हे धर्म आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. झोपेतील नेणीवेस एक आत्माच स्वयंप्रकाश जाणतो. म्हणून प्राणमय कोशही त्यागावा.
प्राणमय कोशाच्या आंत मनोमय कोश आहे. मन जाणते असे वाटते पण ते परप्रकाशाने. मनोमय कोश ज्ञानेंद्रिय समुदायासह मन असा असून मन हे संकल्पविकल्पात्मक आहे. प्राणाच्या आंत म्हणजे सूक्ष्मत्वे आहे. प्राण कळतो, दिसतो तसे मन दिसत नाही. पण चंचलपणा फार असतो आणि कामक्रोधादि विकार आहेत म्हणजे विकारी आहेत म्हणून आत्मा नव्हे.
मनोमयाचे अंतरी बुद्धि वास करते. मनाचे संशय दूर करून एक निश्चय करते. वेदशास्त्रसंमत वेदार्थ लक्षांत घेऊन निश्चय करते. मोक्ष की बंधन हे बुद्धिच दृढ धरते. असा हा विज्ञानमय कोश आत्मा नव्हे. ज्ञानेंद्रियद्वारा निघून मन पदार्थ पाहून संशयापन्न होते तशी बुद्धि इंद्रियद्वारा निघून एक निश्चय करते म्हणून मनास जी साह्य करतात ती ज्ञानेंद्रिय आणि बुद्धि अशी सहा मिळून विज्ञानमय कोश आहे. बंधमोक्षास बुद्धिच कारण पण ती आत्म्याहून भिन्न आहे. बुद्धित जे चैतन्य बिंबते त्यायोगे वृत्तीचा कार्यभाग चालतो. म्हणून बुद्धिही परप्रकाशी आहे म्हणून आत्मा नव्हे. जीवाला आत्मा म्हणावे तर जोवर बुद्धि आहे तोंवरच जीवत्व असते. अशा प्रतिबिंबरूप जीवाला कर्मासारखी गति घडते. जीवालाच बंधमोक्षादि असतात. आत्मा ठायींच निर्विकार असतो म्हणून साधकांनी मी आत्मा, ब्रह्म हाच अभिमान घ्यावा.
प्राण, मन, विज्ञानमय कोश मिळून सूक्ष्म देह आहे. पाच प्राण, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धि या सतरा तत्त्वांचा लिंगदेह असून अग्नीने लोखंड तापावे तसे साक्षिचैतन्याने हे लिंगशरीर व्यापलेले असते. परस्पराध्यासाने आत्मस्वरूपाचे सत्यत्व सूक्ष्मास येते. आत्म्याची चिद्रूपता बुद्धिच्या ठिकाणी आली. आत्माच लोपून सूक्ष्मदेह दिसून आला. हा जो आभास लिंगदेही उमटला त्यालाच चिदाभास जीव म्हणतात. बुद्धीस चेतनत्व जीवामुळे येते आणि बुद्धिस्तव जीवत्व उफाळते. असा हा जीव स्थूलदेही राहून स्थूल सदनालाच मी म्हणूं लागला हेच मोठे नवल आहे.
जागृतीत क्रियेचा अभिमान धरते तसा स्वप्नांतही विषयभास बुद्धिच कल्पते तेव्हां कर्तेपणाचा ध्यास उणा नसतो. सूक्ष्मदेही कर्तेपणा आला कीं त्या ध्यासाने आनंदमय भोक्ता होतो. विज्ञानमय कोशांत जे कर्तृत्व आले ते अज्ञानामुळेंच व तेच आनंदमय कोषांत ठसावल्याने कर्तृत्वध्यासानें भोक्तृत्व आले की मग भोगणे सुटत नाही. थोडक्यांत अज्ञान असेतो फळभोग सुटत नाहीत. आनंदांत वासना गुप्त असते. निजानंदरूप आपण अंगे असतां मी असंग हे ज्ञान नसते त्यालाच मूळ अज्ञान म्हणतात व सूक्ष्म स्थूलदेह, त्यायोगेच होतात. अंतःकरणाचा अभाव असला तरी गुप्त वासनेचा अभाव नसतो. भोक्तृत्व आनंदमयास प्रपादत्व आहे. सुखदुःखादि वृत्ति आनंदमयापासून उद्भवतात. सुषुप्तिकाळी या वृत्ति नसतात. ’ब्रह्म आत्मा एकरूप अभिन्न । मायादि तृणान्त मिथ्या संपूर्ण । या निरूपणासीच म्हणावे ज्ञान । या गीतेत विस्तार तरी हाचि’ (४६५) ’कर्मीं गोविले कर्माभिमाने । योगी गोविले सिद्धीबंधने । येरजन विषय लालुचीने । गोंविले असती ॥’ माया ही अशीच अतिदुरत्ययी आहे. तिचा हा स्वभावच आहे. श्रवण कर्त्यास विक्षेप करते. विश्वासु मननशीलास संशय उभारते. विवेचकास भ्रमाच्या पुरांत पाडते व अंतर्मुखता येऊ देत नाही. साक्षीचे ज्ञान झाले तरी कल्पनेने ’मी माझे’ उभारते. ते मावळल्यावर कर्तृत्वभोक्तृत्व लावते. एकदा निश्चयानें ध्यान करूं लागला की अपार सुख दाखवते आणि त्या अभावी अंधःकार आणि सुखाभावी साधकाची वृत्ति शून्याकार होते. ’मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ।’ शिव सद्गुरूस अनन्य होऊन शरण जावे तरच मायेपासून सुटका होते.
GO TOP
|