॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय तेरावा ॥

यांत श्रीरामांनी मुक्तिलक्षणे विचारली आहेत. आतापर्यंत मुख्य ज्ञान आणि ज्ञान साधन, वैराग्याचे आणि उपरमाचे लक्षण, निर्गुणोपासनेचा अभ्यास मंदप्रज्ञांसाठी सांगितला गेला. विचारवंतांना विचार ज्ञान, मध्यमांना निर्गुणोपासन आणि मंदप्रज्ञांना लीलाविग्रहाचे सगुणाचे उपासन सांगितले गेले.

प्रवृत्तीचे लोक मुक्तीचे अनेक प्रकारे वर्णन करतात म्हणून वास्तविक स्वरूपलक्षण एकच निश्चयात्मक सांगावे. प्रवृत्तीचे जन सत्य-मिथ्या एकच करतात. अज्ञान निरसन ही एक मुक्ति असून सालोक्यादिंचे वर्णन करतात. दूध पाणी एकत्र केले की हंस निवडून घेतात, तसे उत्तम अधिकारी फक्त जाणतात. इतर पक्ष्यांना हे जमत नाही तसे अनाधिकार्‍यांना कळत नाही. सालोक्यता, सारूप्यता, सार्ष्टी, सायुज्यता आणि कैवल्य असे मुक्तीचे पाच प्रकार आहेत. १) सालोक्यता - शिव, विष्णु, ब्रह्मा इत्यादिंचे लोकांत जाऊन राहणे; २) सारूप्यता - त्यांच्या समान रूप प्राप्त होणे; ३) सार्ष्टी - त्यांच्याप्रमाणे रूप पावून त्यांच्याप्रमाणे भोगप्राप्ती; ४) सायुज्य - हिरण्यगर्भात मिळून जाणे किंवा प्रथम आवडेल तसा देह धरून व त्याप्रमाणे भोग भोगून नंतर हिरण्यगर्भात मिळून जाणे. हे चार प्रकार उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत पण ही नाममात्र मुक्ति होय. खरी मुक्ती एकविध असते. अज्ञान नासून दृढ अपरोक्ष बोध होतो तेथे देहाचा संबंध अहंकारासहित असतच नाही. "द्वैतेवीण केवळ स्वरूपस्थिति । तेचि एक जाणावी कैवल्यमुक्ती ॥" अज्ञान शिल्लक असेल तर देह त्यागून हिरण्यगर्भी मिळाले तरी ती खरी मुक्ती नव्हे. स्वस्वरूपाचे अज्ञान न सरता आणि ईश्वराचे खरे स्वरूप न जाणतां जे निष्काम भावनेने लिंग अथवा प्रतिमापूजनादि सगुण उपासना दृढ निष्ठेने आवडीने करतात, त्यांना अंतकाळी कैलास, वैकुंठादि प्राप्त होतात पण भगवद्‌दर्शन होत नाही. विमानादि सुखे भोगतात व पुण्यक्षय झाल्यावर परत मृत्यूलोकी येतात. माझ्या साकाररूपाला जाणून पूजतात व अन्य इच्छा कामना काही नसते ते मजसारखे रूप प्राप्त होऊन माझ्या लोकी राहतात. पण अज्ञान सरले नसल्याने तेही पुण्य सरले की मृत्यूलोकी येतात. इष्टापूर्तीची कर्मे, जपतपादि, दान, अनुष्ठान वगैरे सर्व केवळ भगवत्‌प्रीत्यर्थ अन्य कामनारहित करतात. त्याने सरूपता व त्या देवतेसमान भोगही मिळतात (सार्ष्टीमुक्ति). फलाशारहित, ईश्वरार्पण बुद्धीने देवतेसमान रूप व भोग प्राप्त झाले तरी अज्ञान सरत नाही तोपर्यंत पुण्यक्षय झाला की पृथ्वीवर जन्मास येतात. हे असो. सगुण सायुज्य जिला म्हणतात ती ही मुक्ति नव्हे. ज्याने विचाराने आत्मा अनात्मा निवडला, आत्मा चिद्‌रूप हेही जाणले पण आत्माच ब्रह्म हा निश्चय बाणला नाही आणि साकार त्यागून सविशेष ईश्वर हाच ब्रह्म सच्चिदानंद निर्विकार सर्वज्ञ सर्वशक्तिमान हे जाणतो पण ब्रह्म मायारहित आणि सर्वज्ञादि लक्षणे ही मायाजनित यांची सरमिसळ करतो. थोडक्यांत जो सांख्य सिद्धान्त प्रमाण मानतो, या सिद्धान्तानुसार ईश्वर सत्य झाला आणि मायेला प्राधान्य आले; आत्मा ब्रह्म अभिन्नत्व यांत ग्राह्य नसल्याने हा वेदान्त पक्ष नाही. हा पक्ष देव वेगळा, मी भक्त दुसरा, तो भज्य मी भजक, तो सेव्य मी सेवक असा भेदच श्रेयस्कर मानतो, आणि अभेदांत सुख कैचे अशी त्याची धारणा असते. ईश्वर भजनाने अपार सुख मिळते अशी त्याची निष्ठा असते.

प्रपंच वृक्षावर दोन पक्षी बसले आहेत. एक प्रपंच फळेच खातो, दुसरा निवांत बसतो. म्हणून जीव व शिव समान आहेत. फक्त प्रपंच फळाची इच्छा त्यागून अनुदिन ईश्वरास तो माझ्यासारखाच जाणून भजावे. मीही चिद्‌रूपच आहे पण किंचिदज्ञ तोही चिद्‌रूपच आहे. पण सर्वज्ञ आहे असे दोन्ही चिद्‌रूप जाणून स्वात्मत्वे भजन न करता तो या भजनाच्या बळाने अंती हिरण्यगर्भांत मिळतो. याप्रमाणे हिरण्यगर्भांत मिळून जाणे ह्यास सायुज्य म्हणतात. कां तर पुन्हा जन्मत नाही म्हणून. पण कल्पांपर्यंत हिरण्यगर्भांत राहतो आणि कल्पांती मायेसह ब्रह्मी मिळतो. परत उत्पत्तीकाली देवत्व पावून जन्म पावतो. पण अद्वैत बोधाशिवाय अज्ञाननाश होत नाही तर तो स्वरूपी अभिन्न कसा होणार ? हिरण्यगर्भांत मिळून जातो म्हणून स्वयंज्योती होऊन ब्रह्मांत मिळाली असे म्हणतात. पण स्वामी म्हणतात की त्यास कैवल्य मुक्ति म्हणता येणार नाही. पायांत बेडी असतां वस्त्रालंकार त्यागून हिंडणारास कोणी मोकळा म्हणत नाहीत. कारण साकार देहाचा त्याग झाला तरी हिरण्यगर्भांत मिळून राहतो व अज्ञान कायमच असते.

द्वैतावीण जे एकपण तीच खरी कैवल्यमुक्ती होय. आत्मरूपावस्थान म्हणजेच खरी मुक्ती. ’ब्रह्म केवळ सत्य आनंदघन । अनंत परिपूर्ण जैसे तैसे’ (१३०) ’सत्यज्ञान अनंत आनंद । ब्रह्म केवळ परिपूर्ण विशद । ज्ञाताचि तद्‌रूपचि झाला अभेद । अज्ञान निरसतां’ (१३५) ’स्वरूपीं स्वरूपाचे अवस्थान । हेंचि कैवल्यमुक्ति’ (१३९)

यानंतर त्रिविध भेदाचे स्पष्टीकरण केले. शरीर व अवयव हा स्वगत भेद. मनुष्य मनुष्यास सजाति किंवा जंगम जंगमास सजाती. पक्ष्यादि किंवा वृक्षादि जंगम मनुष्यास विजातीय. वस्तु ही देश, काल, वस्तु परिच्छेद रहित, त्रिविधभेद रहित आहे. पूर्वी अज्ञानाने जग काहीसे दिसत होते. ज्ञानाने सर्व नाहीसे झाले. मायेसह सर्व बुडाले. ’सर्व ब्रह्म नामरूपा परते । आतां जग असे कोणते ? ॥१५१॥’ अंतर्बाह्य अविनाश तत्त्व हे विवेकाने ओळखले की नामरूपे धर्माधर्म सर्व फोल ठरते. ज्ञेय ज्ञानासहित द्वैतवृत्ति मावळते.

ब्रह्माची अनिर्वचनीयता - ’कैसे असे ते सांगतांचि नये । द्यावे घ्यावे तरी काय तेथे । म्हणोन समजावे मौनचि’ (१७१) ते अनुभवूं जावे तर त्रिपुटी उपजते. ’न अनुभवतां ते स्वयेंचि असिजे’. ध्यान करूं लागले की भिन्नत्व पडते. ’आप‍आपणां जाणवेना’ (१७७); ’आहे तैसाचि आहे स्वतंत्र । इतुका निश्चय असावा मात्र । याचि नांवे वस्तुतंत्र । दृढतर अपरोक्ष ॥’ (१८१) दृढ विज्ञान मनीं ठसावले की त्याला कोणत्याही अवस्थेत उत्थान असत नाही. यांस दृढ समाधि अथवा एकनाथमहाराज म्हणतात ती सहज समाधि म्हणावे. ’पुन्हां असत्यासी सत्यत्व न यावे । सत्यासी असत्यत्व कदा न संभवे । विसर्जिले ते मी कधी न वाटावे ॥’ स्वयें निजांगे ते भिन्न असे वाटू नये.

यानंतर उत्थान म्हणजे काय, याचे उत्तर दिले आहे. माझ्या (शिवगुरूंच्या) ठिकाणींच विश्व भासत आहे. वास्तविक ते नाहींच. ज्ञानाने विश्वभास मावळतो. पूर्वी जे दिसत होते त्याचे कारण अज्ञान, अविद्या. ज्ञानाने आत्मस्थिति कळते. ज्ञानाने नवीन काही साध्य झाले नाही. ब्रह्मत्व पूर्वीच सिद्ध आहे. मिथ्या आज दवडले. खरे तर जग जन्मलेंच नाही अशी दृढ बुद्धि अवीट ज्याची होते तेथे समाधि आणि उत्थान हे बोलणेंच फोल ठरते. असा प्रत्यय दृढ बाणला की अखंड दृढ समाधिच राहते. जराही भिन्नत्व अथवा मीपणा सत्यत्व, मिथ्यात्व विचार मनांत आला तर ते उत्थानच समजावे. तसे होत नसेल तर समाधि जाणावी. उत्थान गुप्तत्वें होते ते ज्याचे त्यासही कळत नाही.

आपण ब्रह्मात्मा अखंडैकरसे सहजी असता उत्थान कसे होते ? जगांत कुठल्याही प्रकारची उच्चनीचता बोलून दाखविली नाहीं पण अंतरात जरी वृत्ती उठली तरी ते उत्थानच ! मी सदा ध्यान धरीन, अखंडैकरसी बुडी मारीन. मला ज्ञानच स्फुरते. अज्ञान आहेच कोठे असे वाटणे हेही उत्थान. उत्थानाचे मुख्य रूप हेच कीं वृत्तीने किंचित जरी चांगुलपणा घ्यावे, बरेवाईटपण स्फुरले - उमजले की मिथ्यास सत्यत्व येते आणि न बोलतांच, सत्यत्वास मिथ्यात्व येते. देहबुद्धीपासून ब्रह्मवृत्तीपर्यंत आणि मधील कर्तृत्वादि समस्त ’हेंचि कीं मीपण असे स्फुरत । तेव्हां स्वरूपीं भिन्न पडे ।’ (२४१)

म्हणून साधकाने ही उत्थाने त्यागून निजांगेचि वृत्तिवीण व्हावे हीच समाधि होय. तिची लक्षणे - एकरूप अखंड समाधानी असणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही अवस्थेत दुजी ऊर्मीच नसणे हीच समाधि. द्वैताचा पूर्ण अभाव, समूळ द्वैतबुद्धि जाणणे महत्त्वाचे. श्रुति किंवा गुरुंनी या विरुद्ध काही सांगितले तर त्यांचेही वचन ज्ञाता मानीत नाही अथवा प्रत्युत्तरही देत नाही. ज्ञाता ज्ञातेपणा त्यागून निजांगे जगदधिष्ठान होऊन आपल्या देहासहित सर्व जग हे त्यावरील तरंग आहेत असे मानतो. तरंग उद्‌भवले की निमाले ह्याची सागरास खंती नसते; तसा हा विज्ञानीं जगाचा लय वा उद्‌भुती नाठवू जाणे. असा स्वतः स्वरूप झाला हीच कैवल्यमुक्ति देह असतांनाच पावतो.

प्रश्न - असे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून काय करावे ? म्यां तरावे असा ज्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाला असेल त्याच्याकडून त्रिविध ईषणांचा त्याग सहज घडतो. इहलोकीचे पुत्रमित्रादि भोग आणि परलोकीचे ब्रह्मपदाचे भोग इत्यादिंचा काकविष्ठेप्रमाणे त्याग करावा. वमका ऐशी त्यांची चिळस उपजली पाहिजे म्हणून दोषदर्शन आवश्यक आहे. मुक्तिविषयक ज्ञानाने युक्त वेदान्ती गुरुविषयी, गुरु ब्रह्मविदाविषयी अत्यंत श्रद्धा ठेवावी. ज्ञान व्हावे म्हणून अनन्यभावे हात जोडून लीनतेने त्यास शरण जावे व त्यांच्याकडून वेदान्त श्रवण करावे. साधक साधन चतुष्टय संपन्न असावा.

वेदान्त संमत ग्रंथात उपक्रम, उपसंहार, अर्थवाद, फलश्रुति, अभ्यास आणि उपपत्ति ही सहा लक्षणे असतात. अन्य शास्त्रांची भीड न धरतां वेदान्तशास्त्राच्या ठायीं दृढ श्रद्धा ठेवावी. ब्रह्मविद गुरूलाच शरण जावे. गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ मानावे. ’अंतरी स्वानुभवें तृप्त । बाहेर वेदान्त पारंगत । या नांवे शब्दब्रह्मीं परब्रह्मीं निष्णात । येणेशी युक्त तो सद्‌गुरू ॥’ सर्व अर्पणाचा संकल्प असावा. कायावाचा मनें शरण जावे. मन अर्पण करणे म्हणजे सदैव सद्‌गुरूचे ध्यान असावे. कायेने सद्‌गुरु सेवा घडावी. देवास शरण जाऊन उपयोग नाही, गुरूवीण गति नाही. देव मोत्याप्रमाणे तर गुरू गारेप्रमाणे आहेत. मोती मीठ एकत्र ठेवले तरी कल्पांती पाझरत नाही. गारा मीठ तात्काळ एकत्र मिळतात. तशी गुरुशिष्यास बोधमात्रे अद्वयता येते. म्हणून गुरूलाच शरण जावे आणि आपले मनोवांछित सांगावे. गुरुगृही राहून त्रिविध सेवा करावी. गुरु प्रसन्न होईपर्यंत सेवा करावी. ’सर्व इंद्रियांची क्रिया सर्वदा व्हावी तत्पर गुरुपाया ।’ जशी सेवा घडेल तसे प्रसन्न होतील व आपणहून कृपा करतील. विश्वासाने गुरुवचन ग्रहण केले की परोक्ष ज्ञान होते. त्याचाच विचारद्वारे अनुभव घेतला की अपरोक्षता बाणते. दृढ अपरोक्ष तोच साक्षात्कार.

प्रश्न - श्रवण कसे करावे ? उत्तर - तत्त्वमसि हे वेदांतवचन सद्‌गुरु सांगतात. अहं ब्रह्मास्मि असा निश्चय करावा. हेच खरे श्रवण. श्रवण झाल्यावर मनन करावे. मी आत्मा असंग हा निश्चय होईपर्यंत मनन करावे. नंतर अनुसंधान मनानें धरले पाहिजे. मी निर्मम, निरहंकारी, असंग, सदा शांत, समसंगविवर्जित, सर्वत्र आत्मत्त्वी देखावे. निदिध्यासाने अपरोक्ष साक्षात्कार होतो. कुणाला शीघ्र होईल, कुणाला चिरकालाने होईल. सर्व कर्मक्षय झाल्याखेरीज साक्षात्कार होत नाही म्हणून दृढ अभ्यास असावा. दृढ साक्षात्काराचे लक्षण की कधी उत्थान होत नाही.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ही कर्में ज्ञानानेच दग्ध होतात. संचित, क्रियमाण जळाले, प्रारब्ध असंगास स्पर्श करेनासे झाले की सर्व कर्म क्षय होऊन साक्षात्कार होईल. साक्षात्कार होणारच नाही असे मनांतही आणूं नये. अवश्यमेव होईल यांत संशय नाही असे श्रीहंसराज सांगतात. मात्र ध्यान, अभ्यास, अनुसंधान करणे सोडूं नये, म्हणजे कर्मक्षय होऊन आपोआप साक्षात्कार होईल.

अनेक जन्मींची सांठलेली कर्मे त्यास संचित नाम आहे. या जन्मांत जे भोगावे लागणार ते प्रारब्ध होय. प्रारब्धाने देह वाचतो व येथे अनेक कर्मे करतो, त्यांना क्रियमाण नांव ठेवले. संचित कर्म अज्ञानात गुप्त असते. अपरोक्ष ज्ञान होतांच ते तत्क्षणी जळते. गवताची गंज कितीही जुनी असली तरी तिच्यावर अग्नीची ठिणगी जरी पडली तरी ती तिच्यांतील मूषकांदिसह तात्काळ जळते. कर्माने कर्मे नष्ट होत नाहीत. ज्ञानाशिवाय अज्ञान आणि कर्मे जळत नाहीत. ज्ञानानंतरची कर्मे बाधत नाहीत. ज्ञानानंतर कर्मे होतात ती केवळ प्रारब्धाने शरिरीक होतात. असंगत्वाचा निश्चय झाल्याने कर्में बाधत नाहीत. कोणी म्हणतील की ज्ञात्याकडून पुण्यच घडेल, पाप कसे घडेल ? त्याचे उत्तर पूज्य स्वामी देतात की देह पापपुण्यात्मक असतो. त्यामुळे त्याच्याकडून काळाप्रमाणे आवश्यक ते घडणारच. चाक केव्हां डावीकडे फिरेल की उजवीकडे फिरेल हे कसे कळणार ? पण जे घडते त्याविषयी श्रुतीने असा नियम केला आहे की जे ज्ञात्याची सेवा, स्तवन, भजन, पूजन करतात, त्यांना त्याचे पुण्य प्राप्त होते व निंदक, छळक यांना पापाचे फळ भोगावे लागते. ज्ञाता निर्लेपच असतो. प्रारब्ध मात्र भोगावेच लागते.

या अध्यायास कलशाध्याय म्हटले असून तो समाधानास समाधान देणारा असून ऐकून ज्ञातेही लाळ घोटतील असे श्रीहंसराज म्हणतात. याचा श्रवणमननाने उत्तम अधिकारी तात्काळ मुक्त होईल. पण अनधिकार्‍याने किंवा मंदप्रज्ञाने हा अध्याय वाचूं नये. त्यांना हा विषरूप म्हटले आहे. ज्ञाता वाटेल तसा वागला तर ज्ञान जाऊन परत अज्ञानांत पडेल का ? यावर दृष्टांत देतात कीं एकदां लोणी वेगळे काढले की मग ते दुधात किंवा ताकांत ठेवले तरी कधींही एकत्र कालवत नाही तसाच ज्ञानी संसारी पडत नाही. मूळांत बंधन नव्हतेच, मानले होते हे कळले व दृढ झाले की मग परत बंधन कसे येईल ? एकदां असंगत्व जडले की देह जावो अथवा राहो, फरक पडत नाही.

ज्ञात्यालाही प्रारब्ध भोगावे लागते म्हणून येथे प्रारब्धाचे तीन प्रकार सांगितले आहेत. १) परेच्छा प्रारब्ध, २) अनिच्छा प्रारब्ध आणि ३) स्वेच्छा प्रारब्ध. अज्ञानी इच्छा करतो त्यांत वासना गुप्त असते. ज्ञाता इच्छा करतो त्यांत वासनेचा गंधही नसतो. ज्ञान्यास ग्रंथीभेदानंतरही अनुराग असूं शकतो. अज्ञानाची प्रीति इच्छारूप असते. सर्व कर्माची समाप्ति ज्ञानाने होते तर ज्ञात्यास प्रारब्ध भोग कसे ? याचे उत्तर देतात की ज्ञाता हा निर्विकारच असतो. त्याचे दृष्टीने देहच नसतो मग देहाचे भोग ज्ञात्यास कसे उरतील ? म्हणून ज्ञात्याला प्रारब्ध नाही. ज्ञानोत्तर जगणे हीच जीवन्मुक्ती होय.

तीन प्रकारचे जन असतात. प्रिय, उपेक्ष्य आणि द्वेष्य. प्रीति, द्वेष आणि भिती त्यागून सर्व मीच म्हणून ज्ञाता शांत असतो. मूळ तुटले तरी हिरवेपण तृणाच्या ठिकाणी क्षणभर राहते. पण ज्ञाता कधीं कधीं बहुकाळ राहतो. त्याचा दृष्टीने कल्पसुद्धा क्षणासारखा असतो. ’ज्ञानादेव मुक्ती’ ’तरी तो सर्वात्मा मुक्त’ या चरणांची पुनरावृत्ती करून मुद्दा ठसविण्याचा प्रयत्‍न केला आहे. ज्ञात्याने कसे वर्तावे हे सांगण्याचा अधिकार वेदांनाही नाही. ’तयासी तो आग्रहोचि नाही । प्रारब्धा ऐसा वर्ते पाही ॥’ असे म्हटले असून ज्ञात्यांचा भिन्न प्रकार कां दिसतो याचे उत्तर देतात की, प्रत्येकाचे प्रारब्ध भिन्न म्हणून भिन्न प्रकार दिसतात पण ज्ञान सर्वांचे एकच असते. याप्रमाणे या महत्त्वाच्या अध्यायांतील महत्त्वाच्या बाबी थोडक्यांत देण्याचा प्रयत्‍न ईशप्रेरणेने यथामति केला आहे.

GO TOP