॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय सातवा ॥
उत्तम अधिकारी असेल त्यास श्रवणमननाने तात्काळ मुक्ति मिळते, पण मंदप्रज्ञ भावार्थी साधक असेल तर त्याने श्रवणमननाची झोड उठवली पाहिजे. वारंवार श्रवणमनन, वारंवार निरूपण झाले की बाणत बाणत अपरोक्ष ज्ञान दृढ बाणेल. लहान तोंडाच्या भांड्यातून वाकडे बोट केल्याशिवाय तूप निघत नाही तसे अज्ञान घेतल्यावाचून निरूपण प्रकटत नाही. म्हणून अज्ञान पांघरून राम शिवगुरुंना विचारतात की, पूर्वी आपले १) निर्विशेष २) सविशेष आणि ३) लीलाविग्रह असे तीन प्रकारचे रूप सांगितले. निर्विशेष रूप निर्विकारी आहे, मग त्यापासून जगाची उत्पत्ति कशी झाली ? झाली असेल तर ते निर्विकार कसे ? कारणाचे एक लक्षण तर कार्याचे भिन्न कसे ? गहू पेरून उडीद कसे उद्भवतील ? अग्नीला वाळवी कशी लागेल ? आणि मणिस्तंभास कीड कशी लागेल ? हे शक्य असेल तर कदाचित् परब्रह्मापासून विश्वोत्पत्ति म्हणता येईल ? सविशेषाहून झाले असेही म्हणता येत नाही. अव्यक्तापासून व्यक्त कसे प्रकटेल ? मग जळापासून धान्य कसे पिकेल ? स्फुरणामध्ये कोणती सामग्री आहे ? बरं तुझ्यापासून उद्भवले म्हणावे तर तुझा देह तर परिच्छिन्न, साडेतीन हात प्रमाण आहे. मग तुझ्यापासून हे सर्व उद्भवले हे कसे ?
शिवगुरु याचे उत्तर देतात की, वटबीजापासून वटवृक्ष होतो, पाण्यांत काहीच नसतां गारा मीठ कसे होतात ? सूर्यकिरणांत् जल नसतां मृगजल कसे भासते ? मग मायावश सविशेषापासून या संपूर्ण जगाचा ईश या अव्यक्त मेघजलापासून जगरूपी भास कां होणार नाही ? माझे लीलाविग्रहरूपी वटबीजापासून वृक्षरूपी हे समग्र जग गारुडाप्रमाणे का भासणार नाही ? निर्विश्ष, सविशेष आणि साकार या माझ्या तीन तनूपासून हे सारे जग उत्पन्न होते. पहिला प्रश्न आहे निर्विकारी निर्विशेषाठायीं सविशेष कसे संभवेल ? याचे उत्तर रज्जूवर सर्प, अथवा शिंपीवर रजत आणि स्थाणू (स्तंभ) वर पुरुष भासतो तर हे कां असंभव वाटावे ? १) आरंभात्मक कार्य - जसे मातीपासून घट. २) परिणामात्मक कार्य - दुधापासून दही - दुधासारखे दहीही श्वेत असते. सत्यत्वें विकार झाला तसे जगत् कार्य नाही. माया कारण नसून कार्य आहे. तिलाही उत्पत्ति अधिष्ठान ब्रह्मच आहे. कार्यालाच कारण कसे म्हणतां येईल ? बीज कारण फळास आणि फळ कारण बीजास या प्रमाणे दोन्हींस कारणत्व मानले तर कार्यच नाही असे ठरते. दह्याचे परत दूध होत नाही. ब्रह्म ब्रह्मच असते, जगरूपें भासते, जग लयास गेले तरी शुद्ध ब्रह्मच उरते. हे जगकार्य सत्य नव्हे असे वेदान्तशास्त्र सांगते. स्वानुभवी ज्ञातेही तेच म्हणतात. हे न मानले तर गुरु, शास्त्र, श्रवण, मनन सर्वच मिथ्या होईल. म्हणून ’ब्रह्मी विवर्तात्मक जगाचा उभारा हेच स्वीकार्य मत आहे. ३) विवर्तात्मक कार्य - हे न होऊन झाले असे भासते. अज्ञानाने कल्पिलेले असते. तसेच ब्रह्मीं जग कल्पिले जाते. रज्जूच्या ठिकाणी भ्याडास सर्प भासतो. तसे जग झालेच नसतां अज्ञानाने भासते. ’दोरांचे दिसणे वाकुडे । तसे जगाचे अस्ति भाति रूपडे ॥ दोरीच्या दिसण्या म्हणावे अज्ञान । तेवी स्वरूपाच्या आठवा माया अभिधान ॥ दिसणेंच जैसे न दिसणे । ज्ञानचि अज्ञान तेवी ॥’ सर्प भासता तेव्हां आधी कोण झाले ? अज्ञान की भ्याड कीं सर्प ? तसे जग जेधवां झाले तेव्हां आधी कोण झाले ? माया की कल्पिता जीव कीं जग ? निर्णय करतां येत नाही. विवर्तात्मक सुद्धां नसून वेदान्तपक्षी अज्ञाने करून विवर्तवाद स्वीकारतात. म्हणून निर्विकल्पी ब्रह्मीं जगाची उत्पत्ति असंभव न कल्पावी. ’एकोऽहं बहुस्याम्’ इच्छा झाली तीच ईश्वर. इच्छेसरशी तीन शक्ति निर्माण झाल्या. त्रिपुटीरूप कार्य चालते. कर्ता-भोक्ता ही ज्ञानशक्ति, कार्य, भोग्य ही द्रव्यशक्ति, भोगणे, करणे ही क्रियाशक्ति. या विषय ग्रहणास कारण असतात. ज्ञानशक्ति = अंतःकरण, क्रियाशक्ति = इंद्रिये, प्राण, द्रव्यशक्ति = संपूर्ण विषय हे सर्व कल्पून ईश्वराने त्रिविधरूप जग उभारले, जीवाने स्वप्न उभारावे तसे. उत्पत्तिकाळी व्यक्त होते परत लय झाल्यावर अव्यक्त होते. मिठाचा खडा पाण्यांत टाकला की विरतो मग आकार दिसत नाही. पाणी आटले की परत मीठ दिसते.
सर्व देव वगैरे अंतर्बाह्य मीच आहे. सूर्य उगवला की विविध क्रियाकर्मे होतात, तसे माझ्या इच्छेने जग होऊन स्थिति असते, परत लय पावते. हा माझा जो लीलाविग्रह तो मी सर्व कल्पून उभवतो व शेवटी संहारतो. साधी सामान्य माणसेही गारुड दाखवितात. विश्वामित्राने दुसरी सृष्टि उभारली तर मग मज ईश्वरापाशी सामर्थ्य का असणार नाही ? माझ्या ठिकाणी समष्टि तादात्म्य अनादि अकृत्रिम आहे. तेव्हां माझ्या ठायीं जग पहावे आणि जगीं मी एकला (२१२) उगीचच मिथ्या म्हणतात अशी अज्ञान्याची समजून आहे असे म्हटले.
नंतर शिवगुरुंनी रामास दिव्यचक्षू दिले आणि भिती सोडून माझे रूप पहा असे म्हटले व विराट रूप दाखविले. अनंतमुखे, त्यांत अनंत ब्रह्मांडे महातेजांत दिसली. सर्व देव देवांचे अवतार, त्यांचे संग्राम, भूत, भविष्य, वर्तमान दिसले. त्यांतील काही ब्रह्मांडे गिळली. काही जिभेने वेटाळली. काही दातांनी रगडली, हे सर्व होणार पाहून अज्ञानी जीवाचा नाश झाला तर त्यांचा उद्धार कसा होणार या विचाराने राम भयभीत झाले आणि वारंवार नमस्कार करून अपराध क्षमापन, स्तुति करू लागले. ’तुज सर्वात्मकास पाहून सर्व तूंच कसा असशील हा संशय फिटला’ असे सांगितल्यावर शिवगुरूंनी परत सौम्य रूप धारण केले. येथे हा विश्वरूप दर्शन नांवाचा सप्तम अध्याय समाप्त झाला.
GO TOP
|