॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय पाचवा ॥
श्रीशंकरच सद्गुरु असून ते इतर देवांपेक्षा श्रेष्ठ कसे हे पटवून दिले आहे. अज्ञानी जीवांना कळत नाही. त्यांना प्रवृत्तीच श्रेष्ठ वाटते; निवृत्तिचे महत्त्व ते जाणत नाहीत. शंकरांनी विषप्राशन केले, त्रिपुरासुरांना मारले, तेव्हां इतर देव कोठे गेले होते ? साधकाचे भवरूप विष सद्गुरुरूपाने शिवच प्राशन करतात. देहत्रयरूप गहन त्रिपुरांचा नाश फक्त शिवगुरुच करू शकतात. म्हणून अन्य देव उपेक्षून फक्त एका सद्गुरुलाच शरण जावे आणि अन्य शास्त्रे उपेक्षून एक वेदान्तच पहावा, सद्विचारास प्रवर्तावे. गुरुशास्त्रविचार ठसावला की ज्ञानद्वारा मोक्षप्राप्ति होते हे साधक आणि मुमुक्षूंना श्रीहंसराज हात जोडून सांगतात.
श्रीरामांना पाशुपतास्त्ररूपी विज्ञान देण्यासाठी शिव प्रगटले. शिवाचे फार सुंदर वर्णन केले आहे. नंतर नंदीवरून उतरून शिव दिव्य रथांत बसले हे पाहून रामांनी साष्टांग नमस्कार केला तेव्हां त्यास उचलून घेऊन रथात आणून आलिंगन देऊन जवळ बसविले; आणि चार महिने अनुष्ठान केले त्याने श्रम झाले हे जाणून आपल्या कमंडलूतील जलाने आचमन करवून आपल्या मांडीवर बसविले; असे वात्सल्यपूर्ण वर्णन केले आहे. आचमन म्हणजे नामरूपाचा त्याग करणे आणि जलपान करणे म्हणजे ब्रह्म होणे असा अर्थ पू. स्वामी देतात.
पाशुपतास्त्ररूपाने अभिन्न ज्ञान दिले. यांत दिव्य धनु म्हणजे ध्येय, ध्यानरूप, अनुसंधान ही त्रिपुटी हेच धनुष्य होय. अक्षय भाता = सद्बुद्धीच्या ठायी लक्ष बाण असणारा दिव्य भाता दिला. पाशुपतास्त्र म्हणजे अभिन्न ज्ञान जे वस्तुतंत्र ते होय. मुमुक्षु साधकांकरिता शिवसगुरु हे अभिन्नज्ञान देतात. अन्य साधनांनी अहंकार रावण-शत्रु मरत नाही. बुद्धि धनुष्यांतून हे अभिन्नज्ञान विज्ञानास्त्र सुटले की कोणी त्याचे निवारण करू शकत नाही. ते तत्क्षणी नामरूपात्मक जगताचे दहन करते. ज्ञानाभिमानाचा नाश करून ते ब्रह्मवेत्त्यांना स्वरूपीं मिळविते. पाखंडी आणि अनधिआरी यांना हे देऊ नये.
जो गुरुसेवेसी किंवा निरूपणीं प्राण वेचला तरी ग्लानी करीत नाही त्यास, तसेच गुरूंच्या मुखांतून अमुक कर म्हणून शब्द निघाला की लगेच जीवावर उदार होऊन ती आज्ञा पाळतो तो अधिकारी होय. सद्गुरु सेवून जे श्रवणमनन करूं लागतात त्यांच्या परमार्थास इंद्रिय देवताही सद्गुरुकृपेने सानुकूल होतात. जसे शिवगुरु प्रसन्न झाल्यावर इतर देवांनीही आपापली अस्त्रे त्यांना दिली. त्या अस्त्रांचाही वेदान्तपर अर्थ श्रीहंसराज स्वामी लावतात. उदा० नारायणास्त्र म्हणजे ब्रह्माकार अनुसंधान, ऐंद्रास्त्र = हाताने गुरुसेवा संवाहन घडावे, ब्रह्मास्त्र = बुद्धि अधीन श्रवण मनन ते घडावे, अग्निअस्त्र = वैखरीने स्तवनादि घडावे, वारुणास्त्र = जिव्हेने गुरुतीर्थ सेवावे, ब्रह्मामृत पान घडावे, वायवास्त्र = जडज्ञान वितळून जावे, अश्विनीकुमार, कुबेर कौबेरास्त्र = ब्रह्मामोदसेवन घडावे, यमनिर्ऋति = अविद्या मळाचे क्षालन व्हावे इत्यादि.
त्यानंतर मध्येच लोकरीतीचे वर्णन आले आहे. यथार्थ हित कोणी जाणत नाही. प्रत्येकजण म्हणतो आमचा मार्ग उत्तम. उदा० वेदाध्ययनी, पाषाण पूजनी लागणारे शिवभक्त इत्यादि. कोणी मनास मोकाट सोडतात पण बहिरींद्रिय निग्रह करतात ते मिथ्यावादी होत. कुणी स्वतःस जितेंद्रिय म्हणवितात, कुणी अग्निगोत्री, कुणी बुद्धिमंत आम्ही त्रिजगती श्रेष्ठ मानतात. ही परमेश्वराची माया फार प्रबल आहे. तिला मिथ्या कसे म्हणावे ? काही स्वधर्मकर्म त्याग करतात. मायेला मिथ्या म्हणतात, स्वतः ज्ञाते म्हणवितात, पण मैथुन आहारादि चुकत नाही. अंतरांत कामक्रोधादि दैत्य बसलेले असतात, वरपांगी मात्र आचात दाखवितात.
यानंतर राम म्हणतात की, मी एकटा, साह्यकारी फक्त बंधु लक्ष्मण, मग दैत्यास कसे जिंकणार ? शिवगुरु म्हणतात की, रावणाचा काळ जवळ आला आहे. मी शिवगुरु साह्य असतां तू कशाला चिंता करतोस ? अहंकार वध तुला अशक्य वाटतो तर ऐक. गुरुमुखे वेदान्तश्रवण जो मननासह करील, त्याचा अहंकार आपोआप मरण पावेल. तो वेदान्त कसा ते ऐक. कूटस्थ प्रत्यगात्मा आणि शिवब्रह्म परमात्मा, हे उपाधिमुळे अंतर्यामी भिन्न भासतात. जीवास अविद्या उपाधि असते तर ईश्वरास विद्यामाया उपाधि असते. या उपाधीही भ्रमानेच कल्पिलेल्या असतात. वास्तविक त्या स्पर्शच करीत नाहीत. देहत्रय, तीन अवस्था, तीन गुण, तिन्ही अभिमान, हे सर्व अविद्येचे लक्षण आहे. हेही वाच्यच आहे. या उपाधिमुळे ते जीव किंचितज्ञ असतात. अभेदनिश्चय दृढ असावा लागतो. थोडक्यात वेदान्त विषय इतकाच आहे की ब्रह्म प्रत्यगात्मा यात भेद नाही. हेच अभेदज्ञान होय. उत्तम अधिकारी असेल त्याच्या श्रवणी हे पडले की अभेदज्ञान स्फूर्ती उदयास येऊन अहंकार जळून जातो.
काही लोक स्वतःस धर्मशील म्हणवितात पण अधर्मीच प्रकृति असते. कळत असताही डोळे झांकतात. ’सकल धर्मामध्ये धर्म । स्वरूपी राहणे हा स्वधर्म । हे नेणोनि बापुडे अधर्म । न करणें तेंचि करिती ॥’ (२५५) श्रवण मनन करीत नाहीत. सत्संग करीत नाहीत. मनास हवे तसे वागतात. ’सकामें करिती गुरुसेवा । सकामें भजती भूतीं सर्वां । सकामें भजतीं देवदेवां । तेही अधर्मी खळ ॥’ (२६५) सत्यास असत्य मानतात, असत्यास सत्य कल्पितात. ’हेंचि मुख्य अधर्माचि स्थिति । तरी हेंचि केले बळकट ॥’ (२६७)
ब्रह्मविद कोणास म्हणावे ? असत्य त्यागें सत्य जीवी धरले । ब्रह्म अभिन्न स्वानुभवे झाले । ऐसे सत्य मिथ्या निवडिले । ब्रह्मविद ते ब्राह्मण ॥’ (२७०) याउलट ’एका देवा वरपांगे भजावे । सवेंचि अन्यासे निंदावे । ते का अधर्मी न म्हणावे । भक्तिभावही दाविता ॥ (२७४) निजधर्म ब्रह्मानुभव सांडूनि । घेतला देहबुद्धि भाव । करितांही वर्णाश्रमाचार त्या नांव । अधर्म निश्चयेंशी ॥’ (३०१) असे परखडपणे सांगतात.
यानंतर अध्यात्मरामायणच वर्णिले आहे. किष्किंधा म्हणजे योगारूढता ज्या साधकाच्या चित्तात उद्भवते तेथे गुरुआज्ञेने सर्व देवता प्रगट होतात. ’नरतनु सारखे स्थूळ, जेथे गुरुशास्त्र विचार आतुडे’ मिळाले आणि वाली = अभाव याचा नाश होऊन सुग्रीव = सद्भाव राजा झाला तर इंद्रिय देवता परमार्थाकडे वळतात. ’साधकासी देहबुद्धिमुळे । स्वानुभूति हे स्वयें मावळे । ते अहंकार निमतांचि मिळे । आत्मशक्ति आत्मया ॥’ (३५४) शिवगुरु श्रीरामास सांगतात की, ’मम वक्त्रगताः सर्वे, राक्षसा युद्धदुर्मदा । निमित्तमात्रे त्वं भूयात्, कीर्तिमाप्स्यसि संगरे ॥४१॥’ भगवद् गीतेंत श्रीकृष्णांनी अर्जुनास असेच म्हटले आहे - ’तू फक्त निमित्तमात्र हो.’
श्रीहंसरज सांगतात की, शिष्यभूमि हे रणांगण, तेथे अहंकारादि दुष्ट दुर्जन निरूपणीं ठाण मांडून बसतात. त्यांना अभेदज्ञान अस्त्राने मारावे. पाण्यावर तरंग तसे ब्रह्मावर जग भासते. ’ज्ञानियासी जग हे सारे । स्वप्नजागरी होऊन दिसे खरे ॥’ ज्ञान्यालाही क्रियमाण नाही तर ईश्वरास कोठले ? राम सूर्यवंशी असला तसा जीव नरदेहीं येतो. रामानें पित्राज्ञा पाळली, तशी जीवाने वेदाज्ञा मनावी. रामाने ताटका मारली, जीवाने आशा मारावी. राम ऋषिसंघात राहिला तसा जीवाने सत्संग करावा. रामाने राज्य त्यागले, तसे जीवाने प्रपंच त्यागावा. रामाने भरतास राज्य दिले, जीवाने प्रारब्धावर सोडावे. राम वनांत गेला, जीवाने एकान्त सेवावा. सीतहरण = अहंकाराने स्वानुभूति नेली, रामासारखी तळमळ जीवास असावी. असे अध्यात्म रामायणच वर्णन केले आहे.
श्रीहंसराज म्हणतात, भरत म्हणजे पूर्ण विज्ञान व पाशुपतास्त्र म्हणजे अभेद ज्ञान असे जे मी बोलत आहे ते श्रुति, अनुभूति आणि युक्ति याप्रमाणेच बोलत आहे. तर भिती कसली ? नुसत्या भस्मचर्चनाने मोक्ष मिळतो का ? ’ज्ञानात् एव तु केवलम्’ ’ज्ञानात् एव सर्व पाशान् भिनत्ति’ अशा अनंत श्रुति आहेत, महणून ज्ञानानेच मोक्ष मिळतो हे समजून घावे. अध्यात्म म्हणजे ’आपुले कथन । आत्मरूपाचे ॥’
GO TOP
|