॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय चौथा ॥

या अध्यायात विरजा दीक्षेचे मिषेंकरून गुरुभक्तीचे लक्षण सांगितले आहे की जेणेकरून अनधिकारी जनांस अधिकार प्राप्त होईल. श्रीहंसराज स्वामी म्हणतात की, मुमुक्षु आणि साधकांना हा गुरुभक्तीचा प्रसंग आवडेलच, पण संसारी लोकांनाही माझी विनंति आहे की त्यांनी हा अतिसुगम मार्ग जाणून घ्यावा. कारण याच्या आचरणाने शिवसद्‌गुरूची त्वरित भेट होते. अभ्यासाशिवाय नुसते श्रवण करून शिवसद्‌‌गुरूचे दर्शन होणार नाही. जरी तुमच्या मनास वाटत असेल की आपण पावन व्हावे. तरी अभ्यास करावा.

कायेने सेवा, वाणीने भजन आणि मनाने धारणा आणि ध्यान असे गुरूभक्तीचे त्रिविध लक्षण आहे. या गुरुभक्ती सारखे सार नाही. या साधनाने सुलभ आणि रोकडा साक्षात्कार होतो. पण अनंतजन्मीचे पुण्य असेल तरच आवड उत्पन्न होते.

’रामा, जीवांच्या कणवेने तू स्वतः विरजा दीक्षेचे अनुष्ठान करावे, असे सांगून अगस्ति ऋषि आपल्या आश्रमाकडे निघून गेले. त्यानंतर गोदावरी तीरापासून तीन कोसावर रामगिरी पर्वत आहे, ज्याला रामशेज म्हणतात. तेथे लक्ष्मणासह राम आले आणि त्यांनी अनुष्ठानास आरंभ केला. तेथे त्यांनी शिवलिंग प्रतिष्ठिले आणि सर्वांगी विभूतिलेपन करून रुद्राक्षादि धारण करून विरजादीक्षेचे यथाविधी अनुष्ठान केले. कायेने पूजन घडावे म्हणून स्थूळलिंगाची स्थापना केली. येथे तीन प्रकारे शिवलिंग स्थापना कशी केली जाते ते वर्णन केले आहे. सच्चिदानंद निर्गुण हेच जगांत नामरूपाचे अधिष्ठान होय हा निश्चय हे उत्तम शिवलिंग-स्थापन होय. पण हे ज्ञानी असेल त्यालाच जमते. सर्व ब्रह्मांड हे शिवलिंग हा मध्यम स्थापनेचा प्रकार. लिंग प्रतिष्ठा प्रतिमा पूजा यांचे कायिक सेवेसाठी स्थापना हा कनिष्ठ प्रकार होय. रामाने या तिन्ही प्रकारे शिवलिंग स्थापले.

श्रीहंसराज स्वामी आता हे जीवाने कसे करावे हे सांगतात. याप्रकारे श्रीसद्‌गुरूचे तिन्ही प्रकारें सेवन घडेल. गुरूचा देह हेच शिवलिंग, त्यांची कायेने सेवा हेच गुरुभक्तीचे अर्चन होय. श्रीसद्‌गुरूचे जे माहात्म्य वर्णन केले आहे त्यास अनुसरून करुणा वचनाने त्यांची स्तुति प्रार्थना करावी. हे वाचिक भजन होय. आता ध्यान कसे करावे हे सांगतात. त्याचेही तीन प्रकार आहेत. निर्गुण निर्विकाराचे ध्यान हा उत्तम प्रकार होय. सर्वांभूती एक सद्‌गुरूंनाच पाहणे, अन्य नामरूप न साहणे हा मध्यम प्रकार आहे. गुरूमूर्तीचे आनख अवयवांचे ध्यान करून मानसपूजा करणे हा सामान्य प्रकार असला तरी गुरुभक्तांनी अवश्य करावा. आता भस्मलेपनाचेही तीन प्रकार सांगतात. अखण्डैकरसपूर्ण मी अनंत आहे या वृत्तीरूपी सागरांत मनास मीन करावे. म्हणजेच सतत असे चिंतन करावे. ते चिंतन जे करतात ते निवृत्तिक होऊन जातात. जीवब्रह्मैक्यरूपी पूर्ण विज्ञान हे उत्तम अधिकारी भक्तांचे भस्मलेपन होय. दृश्यात्मक या जगतातील नामरूपात्मक सर्व आत्मविभूतीच आहेत अशी दृढबुद्धि हे मध्यम भस्मलेपन. अग्निहोत्राचे उत्तम भस्म धारण करणे हा सामान्य प्रकार होय.

नंतर रुद्राक्ष धारणेचेही तीन प्रकार सांगितले आहेत. सर्व इंद्रियांच्या वृत्तींचे ब्रह्माकारेच स्फुरण व सर्वत्र रुद्र व्याप्त आहे अशी धारणा हे उत्तम रुद्राक्षधारण. वाणीने रुद्राचेंच नित्य स्मरण हा मध्यम प्रकार आणि शरीरावर रुद्राक्ष बांधावे हा सामान्य प्रकार होय. नंतर अर्चनाचेही प्रकार वर्णिले आहेत. गौतमीजलाने शिवलिंगास अभिषेक करून, वन्य पुष्प, फळे आणून यथाविधी पूजा केली हा सामान्य अर्थ मूळात आहे. श्रीहंसराजांना वृत्तिरूप जलाने निर्गुण लिंगरूपास अभिन्नत्वे अभिषेक करावा, चंचळतेची दिव्य सुमने आणि समस्त कर्मफळेंरूप फळे निष्कर्मत्वाने वाहावी असा अर्थ केला आहे.

यानंतर लक्ष्मणास सावध राहून विघ्न आल्यास निवारण कर अशी आज्ञा देऊन रामांनी रामगिरीवर अनुष्ठानास आरंभ केला. अंगाला भस्म लावून भस्मीच निजावे, व्याघ्रचर्मासनी बसून रात्रंदिवस अखण्ड शिवसहस्रनाम जपूं लागले. येथेही मनास विज्ञानरूप भस्म, सर्व विभूतिस्तवन हे वाचेस व दृश्य भस्म अंगास लावावे असे म्हटले असून त्या व्याघ्रांबराचेही द्वैतभयरूप व्याघ्र मारून ऐक्यबोधरूपी चर्म काढावे व तेथे वृत्ति समरस करावी. हा प्रकार व सामान्य व्याघ्रांबर असे दोन अर्थ काढले आहेत. नंतर रामांनी शिवाची कशी करुणा भाकली तशीच जीवाने भाकावी म्हणजे सद्‌गुरूरूपाने ते कृपा करतात. फक्त अनन्य निष्ठेने धैर्य धरून प्राणांतीही साधन सोडूं नये असे म्हटले आहे. नंतर एक मास फलभक्षण, दुसर्‍या महिन्यांत पर्ण खाऊन, तिसर्‍या महिन्यांत केवळ जलपान व चवथ्या महिन्यांत केवळ वायु आहार याप्रमाणे रामांनी अत्यंत आनंदाने अनुष्ठान केले.

यानंतर मानसिक ध्यान दोन प्रकारचे असते, मूर्त आणि अमूर्त, असे सांगून मूळ शिवगीतेस अनुसरून चतुर्भुज, त्रिनयन, विद्युत्प्राय, पिंगट वर्णाच्या जटाधर, कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी, कोटी चंद्राप्रमाणे शीतल, सर्वालंकारयुक्त, नागाचे यज्ञोपवीत धारण केलेल्या, व्याघ्रांबर धारण केलेल्या, भक्तांना अभय देणार्‍या, व्याघ्रांबराचेच उत्तरीय परिधान केलेल्या, मस्तकी ज्याने चंद्र धारण केला आहे अशा, त्रिशूल डमरूधारी पंचकवच शिवाचे, की ज्यास सर्व सुरासुर नमस्कार करीत आहे, असे फार सुंदर वर्णन केले आहे. याचप्रमाणे साधकांनीही मूर्तिमंत सद्‌गुरूध्यान करावे असे सांगून प्रथम एकदां नखशिखान्त मूर्ति न्याहाळून नंतर प्रथम चरणकमलांवर मन एकाग्र करीत मुखावर दृष्टी ठेऊन चित्त एकाग्र करावे. नंतर नुसत्या हास्यावर मन एकाग्र करून त्यांतील आनंदावर एकाग्र करावे. याप्रमाणे मूर्तीकडून अमूर्त ध्यानाकडे कसे वळावे याचे श्रीहंसराजांनी मूळांत नसतां साधकांस उपयुक्त जाणून सविस्तर वर्णन केले आहे, व रामास जसे सद्‌गुरू शिव भेटले तसे तुम्हांलाही भेटतील; फक्त साधन कठीण असे समजून सोडूं नका असे कळकळीने सांगितले आहे.

यानंतर शिवरामभेटीचे मूळांस अनुसरून पण अत्यंत भक्ति रसपूर्ण वर्णन श्रीहंसराजांनी केले आहे. प्रथम महानाद अंबरात उमटला व नंतर दशदिशांत थोर प्रकाश दाटला तेव्हां रामास ही राक्षसी माया असे वाटले. तेव्हां विविध शस्त्रास्त्रें रामांनी सोडली पण ती त्या तेजांत लीन झाली. एवढेच नव्हे तर रामाच्या हातांतील धनुष्य, बाण, भाता गळून पडली व अंगुलीचे वेष्टण जळून गेले. हे पाहून लक्ष्मण मूर्च्छित झाला. मग रामांना वाटले की शिवगुरू प्रगट होण्याचा समय आला असतां मी दैत्य समजून शस्त्रास्त्रें सोडली हा फार मोठा अपराध झाला, म्हणून दंडवत प्रणाम करून अपराधाची क्षमा मागू लागला. तेव्हां परत महानाद उठला म्हणून रामांनी प्रार्थना केली की, हे भयंकर रूप आवरा आणि अतिशीतल सौम्यरूप धरा. त्यानंतर नंदीवर बसून आलेल्या शिवपार्वतीचे व त्यांच्या समवेत प्रगट झालेल्या त्या देवसभेचे फार मनोहर वर्णन आले आहे. (विस्तार भयास्तव देतां येत नाही.) येथे श्रीहंसराज सांगतात की श्रीरामाप्रमाणे कायिक, वाचिक, मानसिक अनुष्ठान करून जे साधन-चतुष्टय संपन्न होतील त्यांना प्रबोध करण्यासाठी शिवगुरू द्विनेत्र द्विभुजरूपे निश्चित प्रगटेल.

GO TOP