॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥
॥ श्रीवेदेश्वरी ॥
॥ अध्याय सार - अध्याय दुसरा ॥
या अध्यायात ’अध्यात्म रामायण’ रूपकाचे रूपाने आले आहे. रावणाने सीता हरून नेली. रामांना माहीत आहे की खरी सीता अग्नीत ठेवली आहे. छाया सीतेचे हरण झाले आहे, पण वरवर शोक करीत आहेत. रावण वधार्थच अवतार घेतला होता, म्हणून खरे तर काळजीच नव्हती. शिवाय सीता तर निरंतर सन्निधच होती. येथे अज्ञान = भवसागर, रावण = अहंकार, देह = लंकापुरी, राम = प्रत्यगात्मा ब्रह्म, सीता = स्वात्मनिष्ठ स्वानुभूति, आणि इंद्रजितादि = कामक्रोधादि असे स्पष्टीकरण केले आहे.
श्रीरामांचे सान्त्वन करण्यास अगस्ति आले. त्यांनी उपदेश केला. त्याचे सार असे की, स्त्री कोणास म्हणतोस, देहास का आत्म्यास ? देह पंचभौतिक - तेव्हां तेथे ’मी’ ’माझे’ असंभव. आत्मा तर पूर्ण निर्लेप, सच्चिदानंदस्वरूप. म्हणजे सुख-दुःख हे अज्ञानाने आरोपित असते. जीवाने देह सोडला की जाळला, पुरला, पशु-पक्ष्यांनी खाल्ला तरी त्यास काहीच कळत नाही. देह सुंदर वाटतो पण मांसमय शरीर दुर्गंधीचे कुंडच जाणावे, आणि विवेकी पुरुषाने दोषदृष्टीनेच पहावे. पुरीचा ईश तो पुरुष. आत्मा स्त्री, पुरुष, नपुंसक यांपैकी कांहीच नाही. ’अमूर्त पुरुष पूर्ण एक । द्रष्टा जीवविता देहा ॥’ (८८) देह मरण पावला तरी आत्मा मरत नाही. ब्रह्मात्म अभेदता संचली असल्याने ’कैचा राघव कैची सीता । कैचा रावण कोणे नेली ॥’. राम म्हणतात स्वस्वानुभव कुबेराकरितां नरतनु लंका निर्माण केली, पण त्यास घालवून अहंकार रावण तेथे येऊन राहिला आहे.
श्रीरामांनी प्रश्न केला की मग सुखदुःखाचा भोक्ता कोण ? हे जर काहीच नाही म्हणता तर बंधमोक्षादि व्यवस्थ कशी ? गुरु, शास्त्र यांचे प्रयोजन काय ? अगस्ति सांगतात, शाम्भवी माया दुर्ज्ञेय आहे, ज्ञात्यासह सर्व जगास ती मोहविते. केवळ ’सत्यज्ञान आनंदघन । हेच शंभूचे निजरूप पूर्ण ॥’ मायेने भुलविल्यामुळे अंगी ब्रह्म असून मीव वेगळाले झाले आणि ’नसता सुखदुःख उभे केले, भोक्तेपण देऊन ।’ स्वस्वरूप न कळणे हेच सुखदुःखाचे कारण आहे. रज्जु न ओळखल्याने सर्पभयाने कापावे तसेच हे समजावे. जीवत्व व ईश्वरत्व दोन्ही उपाधिच - म्हणजे मिथ्याच. ’तस्मात् माया लोपतां नसे । त्यासी सत्यत्व मानिती ते ज्ञाते कैसे । असो येणेंचि व्यापिले असे । जग हे सारें ॥’ (१७१) ’चंचळ प्रकृति जरी सरे । तरी जाण ते ईश्वरत्व कैचे उरे । कापूर जळतां सुगंध नुरे । जैशिया परी ॥’ (१७८) सत्य असल्याशिवाय भासही होत नाही. ईश्वर आणि ब्रह्म एकमेकांस साह्य होतात तेव्हां जग हे कार्य भासते. मिथ्या असून सत्यत्वे दिसते तेथे भोक्तृत्व आहे. स्थूल शरीरी राहून जीवच सुखदुःख भोगतो. चांगली संगति लाभली की चांगला वागतो, वाईट संगतिने वाईट कर्मे करतो. पण संगत लाभणे हेही पूर्वकर्मांवरच अवलंबून असते. जागा असून जो निजतो तो कोणाकडून उठविला जाईल ? ’जीवेंचि बळें प्रपंच धरिला । प्रपंच न धरी यासी ॥’ शिव शिंपीवर रजत विश्व अज्ञानाने दिसते. सर्वत्र चिदात्मता पाहिली की विश्व नाम कोठे राहते. ’अविद्या कैची, कैची माया । जीव कैचा, कैचा शिव । कैचा भोग्य, भोक्ता नांव ॥ (ओवी १५७-१६४) सर्वांचा निरास केला आहे. ’पूर्ण ब्रह्म एकले ।’ हेंच खरे. पण गुरूशिवाय स्वात्मानुभूति प्राप्त होत नाही. म्हणून श्रीशिवगुरू करावा.
GO TOP
|