॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ श्रीवेदेश्वरी ॥

॥ अध्याय सार - अध्याय पहिला ॥

श्रीहंसराजस्वामींच्या ग्रंथसंपदेत ’वेदेश्वरी’ यास महत्त्वाचे स्थान आहे. सर्व ग्रंथात विस्ताराने मोठा आणि महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ वैरागच्या श्री आबा साबळे या जंगमास्थासाठी लिहिला गेला असा उल्लेख ’हंसपद्धती’ मध्ये आहे. परांड्यास असताना शके १७६९ मध्ये पू. स्वामींनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. या ग्रंथामुळे पू. स्वामींचा लौकिक खूप वाढला. श्री रघुनाथशास्त्री गोडबोले यांच्या मते कथाकल्पलता, वेदेश्वरी व वाक्यवृत्ति इत्यादि ग्रंथ मंदप्रज्ञांसाठी आहेत. श्रीरघुनाथशास्त्री गोडबोले यांनी शके १७०९ मध्ये पुणे येथे हा ग्रंथ प्रथम प्रकाशित केला. दुसरी आवृत्ति बेळगाव येथे श्री आबाजी रामचंद्र सावंत यांनी शके १८३५ मध्ये प्रकाशित केली. तिसरी आवृत्ति पुण्याच्या यशवंत प्रकाशनच्या श्री वैद्यांनी शके १८९८ (इ.स्. १९७६) मध्ये काढली.

या ग्रंथात एकूण सोळा अध्याय असून ओवीसंख्या ९२३८ आहे असे डॉ कल्याण काळे म्हणतात तर श्री वैद्य ओवीसंख्या ८१९८ आहे असे म्हणतात. श्री न. र. फाटक यांनी "या पुरुषाच्या ग्रंथरचनेचा विशेष हा की, ज्या जुन्या वेदान्त प्रदेशाची साधारणपणे पूर्वींच्या ग्रंथकारांनी उपेक्षा केली, त्यांचा परिचय करून देण्याची कामगिरी श्री हंसराजांनी बजावली" असे म्हटले असून "हंसराजांनी अशा सामान्यतः उपेक्षित ग्रंथांचे नवे दालन उघडून मराठीच्या ग्रंथभांडारांत नवी भर टाकली असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे भय नाही", असे गौरवोद्‌गार काढले आहेत.

भगवान शंकरांनी श्रीरामांना दंडकारण्यांत सीताहरणानंतर जो उपदेश केला तोच "शिवगीता" नांवाने प्रसिद्ध असून ही गीता पद्मपुराणांत आहे. नैमिष्यारण्यांत सूत-शौनकादिकांच्या संवादातून वेदान्त विषयावरील अत्यंत गुह्य अशा "शिवगीते"वर (शिव-राघव संवादावर) भाष्य निर्मिती झाली. पद्मपुराणान्तर्गत शिवगीता मूळ संस्कृतामध्ये आहे, ती मराठीत आणून श्रीहंसराज स्वामींनी फार मोठी कामगिरी केली आहे. पू. स्वामी हिला शिवगिरीपासून निघून रामसमुद्रास जाऊन मिळालेली गीता-गोदावरी म्हणतात. या ग्रंथात मुख्यतः अद्वैत वेदान्ताची चर्चा आहे. अशा या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायात जे विवेचन आले आहे त्याचा सारांश देऊन वाचकांना परिचय करून देण्याचा प्रयत्‍न ईशप्रेरणेने या अल्पबुद्धिनुसार करण्यात येत आहे.

अध्याय पहिला

यांत मुख्यतः अनुबंध चतुष्टयाचे लक्षण सांगण्यात आले आहे. श्री स्वामी प्रसंगीच सांगतात की शिव=परमात्मा, राम=प्रत्यगात्मा, आणि गुरु=विमळात्मा. शिव, राम आणि गुरु हे भिन्न मानू नयेत; ते पर्यायी शब्द आहेत हे ओळखावे. एकपणी संवाद घडत नाही म्हणून गुरुशिष्य दोन रूपे घेतली, अन्यथा संवाद-सुख कसे लाभले असते ? जगदोद्धार कसा झाला असता ? सकळ उपनिषदार्थ मंथून श्रीव्यासांनी शिव-राघव संवादमिषे गीता रत्‍न काढले. तोच गीतार्थ मी तुम्हां संतांच्या प्रसादाने महाराष्ट्र वचनीं बोलत आहे. बालकाचे बोबडे बोल सर्व गोड मानतात तशी माझी आर्षवाणी गोड मानावी अशी विनंति श्रीहंसराज स्वामी करतात.

ब्रह्म-प्रत्यगात्मा-अद्वय हाच ग्रंथाचा विषय आहे. साध्य-साधक भाव हा संबंध असून ’दुःख जाणे हे अनिष्ट निवृत्ति । कैवल्य पावणे हे इष्टप्राप्ती ॥" हेच या ग्रंथाचे प्रयोजन आहे. जो नित्यानित्य विवेकयुक्त असतो, इहपर भोगाची इच्छा नसते, असा वैराग्ययुक्त शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान इत्यादि गुणसंपन्न जो असेल तोच ’अधिकारी’ होय. अनधिकार्‍यास ही गीता सांगू नये असे बजावले आहे. शिवस्वरूपाचे यथार्थ ज्ञान ज्यास नाही तो अनधिकारी. शिव-सच्चिद्‌घन निर्गुण तोच मायेच्या योगे सगुण झाला हे कळले तरी विश्वास बसत नाही. भजनाने ज्याचे अंतःकरण स्थिर होते तो ज्ञानास अधिकारी ठरतो.

पूर्वी दंडकारण्यात शिवांनी रामास जी शिवगीता सांगितली तीच शिवपुत्र षडाननाने सनत्कुमारास सांगितली. त्यांनी व्यासांना सांगितली, व्यासांनी रोमहर्षणास सांगितली. त्यांच्या पुत्राने, सूताने ती शौनकादिकांस सांगितली. व्यासांनी सांगितले की अनधिकार्‍यास सांगू नये; देवता क्षोभतात, शाप देतात. सूतांनी विचारले का क्षोभतात ? व्यास म्हणाले - ज्ञानवान विप्र देवांना दुःखद होतात. जे अनधिकारी ज्ञान संपादन करतात ते पापपुण्य मिथ्या, स्वर्ग-नरकच नाहीत, असे म्हणून यथेच्छाचरणी होतात. पाखंड माजवून स्वतः नाश पावतात व लोकांनाही तेच शिकवितात. ज्य ज्ञानाने मुक्त व्हावे त्यानेच बंधनात पडावे हे अनधिकारामुळे घडते. नंतर भक्ति म्हणजे काय - ह्याचे उत्तर असे दिले आहे की, शिवरूप हे सच्चिद्‌घन, अखण्डैकरसपूर्ण आहे हे ज्ञान असून जेथे जीवाशिवाच्या भेदाचे किंचितही भान नसते अशी ऐक्यभक्ति हीच खरी भक्ति असून हीच जीवन्मुक्ताची चरम स्थिति होय.

प्रश्न - अनधिकारी अधिकारी कसे होतील ? याचे उत्तरात सांगतात की, स्वर्गकामी असतील त्यांनी कर्मे आचरावी, वैकुण्ठी, कैलासी राहावे वाटत असेल त्यांनी कर्मभक्तियुक्त उपासना आरंभावी. उपासनेच्या योगे निष्कामकर्मे करू लागला की चित्तशुद्धि होऊन तो ज्ञानाधिकारी होतो. मग गुरुमुखें श्रवण करून मनन, निदिध्यासन करून साक्षात्कार, जीवन्मुक्ति आणि भक्ति प्राप्त होते. हे परंपरासाधन आहे; यानेही मुक्ती मिळते.

कोटी जन्मांचे पुण्य असेल तरच शिवभक्ति उत्पन्न होते व संसारी उद्विग्न होऊन भजन पूजन करू लागतो. जे मानव निष्काम भावनेने इष्टापूर्तादि कर्मे यथाविधि करून शिवार्पण करतात, त्यांच्यावर शिव स्वतःच गुरुरूपाने अनुग्रह करतात. सक्रिय आणि प्रबोधशक्ति संपन्न गुरूंनी उपदेश केला की संशय सत्‌शास्त्र प्रामाण्यें नष्ट होतात आणि वेदान्तश्रवणी दृढ श्रद्धा होते. मग इंद्रिय देवताही विघ्ने करीत नाहीत. सुदृढ विश्वासाने गुरुमुखाने श्रवण घडले की ऐक्यज्ञान उपजते व याच देही तो मुक्त होतो. देह पडल्यानंतर मोक्ष मिळतो असे मानतात ते मूर्ख आणि जे असे सांगतात ते पढतमूर्ख होत. एकदा अपरोक्ष ज्ञान झाले की ते नष्ट होत नाही. जो एकदा शिवाशी अभिन्न एकरूप झाला त्याच्या हातून कोटी पातके घडली तरी तो मुक्तच असतो.

यानंतर आत्मनिवेदन झाल्याशिवाय अभिन्न ऐक्यभक्ती होत नाही असे सांगून आत्मनिवेदनाचे तीन प्रकार वर्णिले आहेत. १) मी, माझे जाणे हे जड-आत्मनिवेदन, २) कर्तृत्व-भोक्तृत्व भावना नष्ट होणे हे चंचल आत्मनिवेदन आणि ३) द्वैत संपूर्णपणे नष्ट होणे हे निश्चल आत्मनिवेदन. आत्मज्ञान झाले की कर्तृत्वाभिमानच नाहीस होतो. त्यामुळे आत्मबोधाने कोटी पापे नष्ट होतात. स्वप्नांत पाप घडले तर जागृतीत प्रायश्चित्त शास्त्रांतही सांगितलेले नाही. अशा ऐक्यरूप भक्तीचा अधिकार खरोखर सर्वांनाच आहे. मग ज्याच्या ठिकाणी ती विद्यमान असेल तो मुक्त कसा असणार नाही ? चांडालसुद्धा अपरोक्षज्ञानाने ऐक्यभक्ती प्राप्त करून शकतो.

अशी शिवाभिन्न भक्ती प्रेमाने करो वा द्रोहाने; तो जरूर तरून जातो असे म्हणून प्रिय भक्तीचे व द्रोह भक्तीचेही चार प्रकार वर्णिले आहेत. प्रियभक्ती करणारांत अपरोक्ष ज्ञाता उत्तम, परोक्षज्ञानी मध्यम, ज्ञानहीन तो अधम आणि विपरीत ज्ञाता निकृष्ट असे म्हटले आहे. उत्तम द्रोह भक्त, परोक्षज्ञानी द्रोही, भयाने भक्ती करतो तो अधम, आणि प्रतिमापूजन आवडीने करणारा परोपकारी तो निकृष्ट असे सांगितले आहे. प्रीति किंवा द्रोहाने भजणारे दोन्ही शिवास आवडतात आणि परंपरा उपायाने सर्वच अधिकारी भक्त होऊ शकतात. भक्त द्रोही एक रीती तरी त्यात तारतम्य आहे. हे चारी प्रकारचे भक्त आपापली इच्छित फळे प्राप्त करतात.

अनधिकारी कोण हे सांगतांना यथार्थ शिवरूप न जाणता भजन-पूजन करतात, विष्णुद्रोहादि करतात, शिवास एकदेशी मानतात ते अनधिकारी होत. जे जे समग्र दिसते, भासते ते सर्व शिवरूप आहे असे म्हणून ’पाताळ ते पदतळ’ असे ओवी २२६ ते २४४ ओवीपर्यंत शिवाच्या विश्वरूपाचे वर्णन केले आहे; व असा शिव विश्वव्यापक असतां अल्पज्ञ जीव एकदेशी भाव धरून त्याला वेगवेगळी नांवे ठेवतात व भिन्न भिन्न नांवाने भजतात; व अमुक देव लहान, अमुक थोर असे मानतात ते अनधिकारी होत.

पुढे भजन पूजनांचे प्रकार वर्णिले आहेत. खरा शिवभक्त शिवामाजीच वावरतो. आपला देहच समर्पण करतो, भिन्नपणाची मातच मोडतो. शिवरूपी शिव होऊन आपणच आपणास भजतो. देवभक्त अभिन्न हा भाव सर्व अवस्थांत टिकल्यावर समाधि ती आणखी कोणती ? याप्रमाणे समष्टि-तादात्म्य ही पूजा सांगितल्यानंतर पिंड तादात्म्याचे वर्णन केले आहे. आत्मासाक्षी हीच शिवमूर्ति, बुद्धि ही पार्वती, प्राण हे सेवाधारी, देह हे देऊळ, सर्व विषयभोग हेच नैवेद्यादि, निद्रा हीच समाधि, चालणे हीच प्रदक्षिणा, बोलणे हीच शिवस्तुति, एवढेच नव्हे, जे जे कर्म घडते ते ते शिवार्पण होणे अशा रीतीने भक्त अखंड शिवपूजनच करीत असतो. पण याप्रमाणें कांहीही करीत असतां भावना सारखी असली तरी व्यागण्यांत तारतम्य हवे. गाईस पक्वान्न आणि ब्राह्मणास तृण असे करू नये. भावनेने एकत्त्व पहावे, क्रियेने तारतम्य आचरावे असे बजावले आहे.

’परी मुमुक्षु अथवा साधक । जे मोक्षार्थीचे पाइक । तयांसी प्रार्थितो अवश्यक । महानेटे गर्जोनी ॥’ - असे म्हणून पू. स्वामी कळवळून सांगतात की, ’नामरूप अवघें सांडावे । जे का मायिक स्वभावे । शिवभक्त शिवरूपे पहावे । अभिन्नपणे ॥’ (४१५) येथे कोणते सायास पडतात. हा अभ्यासही दुर्घट नाही. फक्त सुदृढ निदिध्यास लागला पाहिजे. देश, काल, आसन, नियम, एकाग्र मन, कशाचीही आवश्यकता नाही. घरधंदा करा, काहीही करा, फक्त जारस्त्रियेचे मन जसे जाराकडे लागलेले असते तसे ’सच्चिदानंद शिवब्रह्म । तो मी निजांगे आत्माराम ॥’ असे सतत अनुसंधान ठेवले की झाले. नामरूप सोडून स्वस्वरूप ध्यानी धरणे हीच सविकल्प समाधि होय. याचेच नाव कर्तृतंत्रध्यान व या योगेंच वस्तुतंत्र ज्ञान होते.

भक्तांचे उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे तीन प्रकारही वर्णिले आहेत. येथील टीकेत भगवत् गीता, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इत्यादि ग्रंथांशी साम्यस्थळे बरीच आढळतात. येथील उत्तम भक्तीची लक्षणे वाचतांना भगवद्‌गीतेतील स्थितप्रज्ञ लक्षणें आठवतात. मध्य भक्ताची लक्षणे वाचतांना गीतेतील ’पत्रं पुष्पं फलं तोयं’ हा श्लोक व त्यावरील टीका आठवते. कनिष्ठ भक्त लक्षणातील ओवी ’जे जे दिसे तो तो शिव । तेथें न कल्पी रूपनांव । हा मनीं आवडीचा स्वभाव । देखिल्या ठायां सोके ॥’ (३१५) ज्ञानेश्वरीची आठवण करून देते. उत्तमाच्या ठिकाणी ऐक्यभक्ति दृढ झाल्याने सर्व द्वंद्वे नष्ट झालेली असतात. मध्यमास पण सर्व शिव हा बोध होतो, तो सर्व शिवार्पण करूं लागतो. त्यांत न्यूनाधिक भावना नसते. तो त्रैलोक्यदानी प्रवर्ततो त्यामुळे सर्वांना प्रिय होतो. कनिष्ठ अधिकारीही सर्व दानास प्रवर्ततो पण ’मी दिले’ हा पुण्याभिमान त्याच्या ठिकाणी असल्याने परत जन्मास येतो. शिवास मुख्य भावार्थाची प्रीति असते म्हणून मानस पूजा करीत जावे. त्यांत आपणांस आवडेल ते शिवास वाहावे. या पूजेत बहुधन लागत नाही, शरीर कष्टवावे लागत नाही. मनाची भावना दृढ असावी. सायासाने पण भावार्थाशिवाय जे अर्पण केले जाते ते शिवास आवडत नाही. आदराने, प्रेमाने जे समर्पण केले जाते त्याने प्रसन्न होऊन शिव त्यास ज्ञानद्वारा कैवल्यही देतात. अशा प्रकारे पूर्वी अनधिकारी असणारे ’भावार्थबळे’ अधिकारी होऊन त्यांना गुरुमुखाने गीतार्थ सुलभ होतो.

किंचिदज्ञ असतात ते शिवगुरूस भजण्याऐवजी भिन्न भिन्न देवास भजतात, त्यांना कैवल्यमुक्ति मिळत नाही असे सूत म्हणाले तेव्हां शौनकांनी विचारले की, आकाशातून पाणी पडले की ते समुद्रास मिळते त्याप्रमाणे कुठल्याही देवास नमस्कारिले की ते एका शिवासच पावते तर मग येथे विषमता का दिसते ? याचे उत्तर सूत देतात की, ’हा सर्वपणा कोणावरी उठिला । तो देव पाहिजे ओळखिला । मग तो तृणासी जरी भजिन्नला । तो मुख्य देवा पावे ॥’ (३६३) विष्णु, शिव वा इतर कोणी देव का असेनात ’परी भावनेसी सर्वेश्वर । एकाचि ऐसे पाहिजे ॥’. एकदेशी देवास न भजता सर्व एकात्म भावनेने पहावे. मुक्तीची चाड असेल त्यांनी अन्यांची भीड न धरता एकल्या शिवगुरूलाच भजावे.

यानंतर साधारण साधन सांगितले आहे, ज्यायोगे धर्मार्थकाममोक्षादि चारी पुरुषार्थ लाभतात, अशा पाशुपत व्रताचे वर्णन येथे केले आहे व विरजा दीक्षा, विभूति, रुद्राक्षधारण करून वेदसाराख्य जे शिवसहस्रनाम त्याचा जप करतो तो मर्त्य शरीराचा त्याग करून शैव तनु प्राप्त करतो. त्यावर लोकशंकर भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यास कैवल्य देतात असे मूळ शिवगीतेत सांगितले आहे. या सर्वांचा श्रीहंसराज स्वामींनी नेहमीप्रमाणे अध्यात्मपर अर्थ लावून शिव म्हणजे गुरुभक्तीचेच वर्णन केले आहे.

धर्म म्हणजे विहित वर्णाश्रमानुसार कर्म. त्याचा निर्वाह फलाशा सोडून केला असतां हृदयशुद्धि होते. अर्थ आणि काम यांसह फलाशेचा, म्हणजेच त्रैविद्येचा त्याग करून साधकाने गुरुभजनी लागावे. कायिक, वाचिक, मानसिक गुरुभजन करणाराचा शोध घेत ब्रह्मानंद त्याच्या घरी येतो. मग इतर विवेक वैराग्यादि लक्षणांची गोष्टच सोडा. गुरुभक्ताची विरजा दीक्षा कशी असते ते ऐका ! विरजा दीक्षा म्हणजे रजोगुणास सोडचिठ्ठी देणे, काम-क्रोध-लोभास तिळपात्र देणे होय. काम क्रोध लोभ हेच मळ. हे झडले म्हणजे विरजा दीक्षा, अंतर्बाह्य शुद्धता सहज प्राप्त होते. संतसाधूंची सेवा हेच खरे विभूति (भस्म) लेपन - ही कायिक सेवा होय. सर्वत्र रुद्रास पाहणे हेच रुद्राक्ष धारण असून ही मानसिक सेवा होय. सतत शिवसहस्रनाम म्हणजे वाणीने सतत गुरुस्तवन. ही वाचिक सेवा होय. बाह्य चिन्हे विभूति, रुद्राक्षादि धारण केली पण ही त्रिविध सेवा केली नाही तर तो गीतार्थास अधिकारी नाही. अंतरी गुरुभक्ति असताना बाहेरही विभूति, रुद्राक्ष, सहस्रनाम धारण करणारास लौकिकी शोभा लाभते. गुरुसेवेस देह विकून, मानसांत ध्यानरूपे स्मरण भजन अखंडित घडले आणि मुक्तीचीही इच्छा केली नाही व अन्य देवांकडेही ’सद्‌गुरूचीच भेटी घडवा’ अशी प्रार्थना केली की पूर्वचिन्हे पालटून तो साधक दैवीसंपत्तियुक्त होऊन गीतार्थास अधिकारी ठरतो. दैवीसंपत्तीची प्राप्ती म्हणजेच मर्त्य तनु जाऊन शैवतनु लाभणे. अशा या त्रिविध गुरुभक्तीने शिव प्रसन्न होऊन गुरुरूपाने ज्ञानोपदेश करून देहबुद्धि निरसून जीव-ईश ऐक्यरूपे कैवल्यमुक्ति देईल. याप्रकारे श्रीहंसराज स्वामींनी या पहिल्या अध्यायांतच अनेक महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत.

GO TOP