॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा ॥

श्रीभगवानुवाच -
देहान्तरगतिं तस्य परलोकगतिं तथा ।
वक्ष्यामि नृपशार्दूल मत्तः शृणु समाहितः ॥ १ ॥
शंकर म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, जीवाचे दुसर्‍या देहांत गमन व परलोकांत गमन कसे होते हे मी आतां सांगतो. सावधानचित्त होत्साता मजपासून ऐक, १.

भुक्तं पीतं यदस्त्यत्र तद्रसादामबन्धनम् ।
स्थूलदेहस्य लिङ्गस्य तेन जीवनधारणम् ॥ २ ॥
मनुष्य जें कांहीं खातो व पितो त्या रसाचे योगानें स्थूलदेह व लिंगदेह यांच्यामध्ये नवीन बंधन उत्पन्न होते. त्याचे योगाने प्राणवायूचे धारण होते. २.

व्याधिना जरया वापि पीड्यते जाठरोऽनलः ।
श्लेष्मणा तेन भुक्तान्नं पीतं वा न पचत्यलम् ॥ ३ ॥
व्याधीने अथवा जरेने होणार्‍या कफाचे योगानें जठरांतील अग्नीला पीडा होते. तेणेंकरून खाल्लेले अथवा प्यालेले अन्न चांगले पचत नाहीं. ३.

भुक्तपीतरसाभावादाशु शुष्यन्ति धातवः ।
भुक्तपीतरसेनैव देहं लिम्पन्ति वायवः ॥ ४ ॥
खाल्लेल्या अथवा प्यालेल्या अन्नाचा रस न झाल्यामुळे लगेच रक्तमांसादि धातु शुष्क होतात. खाल्लेल्या आणि प्यालेल्या अन्नांचे रसानेंच वायु शरीरामध्ये धातूंची वृद्धि करतात. ४.

समीकरोति यस्मात्तत्समानो वायुरुच्यते ।
तदानीं तद्रसाभावादामबन्धनहानितः ॥ ५ ॥
परिपक्वरसत्वेन यथा गौरवतः फलम् ।
स्वयमेव पतत्याशु तथा लिङ्गं तनोर्व्रजेत् ॥ ६ ॥
अन्नादिकांचा रस शरीरामध्ये सम प्रमाणानें पोंचवितो म्हणून त्याला समान वायु म्हणतात. नंतर वृद्धावस्थेमध्यें रसांच्या अभावामुळें स्थूल व सूक्ष्म देहाचे बंधन शिथिल झाल्यानें, जसे रस परिपक्व झाल्याने गुरुत्वाचे योगानें फळ खाली पडते, तसा स्थूल देहापासून लिंग देह लगेच पतन पावतो. ५-६.

तत्तत्स्थानादपाकृष्य हृषीकाणां च वासनाः ।
आध्यात्मिकाधिभूतानि हृत्पद्मे चैकतां गतः ॥ ७ ॥
तदोर्ध्वगः प्राणवायुः संयुक्तो नववायुभिः ।
ऊर्ध्वोच्छ्वासी भवत्येष तथा तेनैकतं गतः ॥ ८ ॥
चक्षुषो वाथ मूर्ध्नो वा नाडीमार्गं समाश्रितः ।
विद्याकर्मसमायुक्तो वासनाभिश्च संयुतः।
प्राज्ञात्मानं समाश्रित्य विज्ञानात्मोपसर्पति ॥ ९ ॥
इंद्रियांच्या वासना, जीवात्म्याचे ठिकाणीं आरोपित अशी बुद्धि इत्यादि, आणि भावी देहाला कारणभूत आधिभौतिक कर्में ही त्या त्या स्थानापासून आकर्षण करून हृत्कमलाचे ठिकाणीं एकत्र झालेला ऊर्ध्वगामी प्राणवायु नऊ वायूंशीं संलग्न होऊन ऊर्ध्वोच्छ्‍वासरूप होतो. नंतर त्या प्राणवायूशीं एकरूप झालेला जीवात्मा ज्ञान, कर्म आणि वासना यांनी युक्त होत्साता नाडीमार्गाचा आश्रय करून डोळ्यांमधून अथवा मस्तकामधून निर्विकार परमात्म्याच्या प्रेरणेनें [प्राज्ञात्मानं सामाश्रित्य] देहाच्या बाहेर जातो. ७-९.

यथा कुम्भो नीयमानो देशाद्देशान्तरं प्रति ।
खपूर्ण एव सर्वत्र स साकाशोऽपि तत्र तु ॥ १० ॥
घटाकाशाख्यतां याति तद्वल्लिङ्गं परात्मनः ॥ ११ ॥
एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणीं नेला तरी ज्याप्रमाणे घट सर्वत्र आकाशाने पूर्ण असतो, तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याला घटाकाश म्हणतात, त्याप्रमाणे लिंगशरीर परमात्म्यानें पूर्ण आहे. १०-११.

पुनर्देहान्तरं याति यथा कर्मानुसारतः ।
आमोक्षात्संचरेत्येवं मत्स्यः कूलद्वयं यथा ॥ १२ ॥
त्याला पुनः कर्मानुसार दुसरा देह प्राप्त होतो. याप्रमाणे मोक्ष प्राप्त होईपर्यंत त्याचा संचार चालू असतो. जसा मत्स्य दोन तीरांच्या मध्ये संचार करीत असतो तद्वत्. १२.

पापभोगाय चेद्गच्छेद्यमदूतैरधिष्ठितः ।
यातनादेहमाश्रित्य नरकानेव केवलम् ॥ १३ ॥
पाप भोगण्यासाठी देहांतरांत जात असेल तर यातनादेहाचा आश्रय करून यमदूतांबरोबर नरकांमध्येच जातो. १३.

इष्टापूर्तादिकर्माणि योऽनुतिष्ठति सर्वदा ।
पितृलोकं व्रजत्येष धूममाश्रित्य बर्हिषः ॥ १४ ॥
जो सर्वदा यज्ञादि इष्ट, व वापी, कूप, तडाग इत्यादि पूर्त इत्यादि कर्में करतो तो अग्नीच्या धूमाचा आश्रय करून पितृलोकीं जातो. १४.

धूमाद्रात्रिं ततः कृष्णपक्षं तस्माच्च दक्षिणम् ।
अयनं च ततो लोकं पितॄणां च ततः परम् ।
चन्द्रलोके दिव्यदेहं प्राप्य भुङ्क्ते परां श्रियम् ॥ १५ ॥
धूमापासून रात्र, रात्रीपासून कृष्णपक्ष, कृष्णपक्षापासून दक्षिणायन, तेथून पितृलोक आणि नंतर चंद्रलोक अशा क्रमाने चंद्रलोकीं दिव्य देह पावून अत्यंत वैभव भोगतो. १५.

तत्र चन्द्रमसा सोऽसौ यावत्कर्मफलं वसेत् ।
तथैव कर्मशेषेण यथेतं पुनराव्रजेत् ॥ १६ ॥
तेथे जोपर्यंत कर्माचे फल असेल तोपर्यंत चंद्रासह रहातो. कर्म संपलें म्हणजे गेलेल्या त्याच मार्गाने पुनः परत येतो. १६.

वपुर्विहाय जीवत्वमासाद्याकाशमेति सः ।
आकाशाद्वायुमागत्य वायोरम्भो व्रजत्यथ ॥ १७ ॥
चंद्रलोकींच्या दिव्य देहाचा त्याग करून जीवाचें रूप धरून तो आकाशामध्ये येतो. आकाशांतून वायूमध्यें व वायूमधून उदकामध्ये येतो. १७,

अद्‌भ्यो मेघं समासाद्य ततो वृष्टिर्भवेदसौ ।
ततो धान्यानि भक्ष्याणि जायते कर्मचोदितः ॥ १८ ॥
उदकामधून मेघाचा आश्रय करून तो वृष्टीमध्ये येतो. नंतर कर्माच्या प्रेरणेनें तो भक्षण करण्याच्या धान्यांमध्ये येतो. १८.

योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः ।
मुक्तिमन्येऽनुसंयान्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥ १९ ॥
जसें कर्म अथवा ज्ञान असेल त्या मानानें हे जीव शरीर धारण करण्याकरिता विशिष्ट योनिंप्रत जातात अथवा मुक्तीप्रत जातात. १९.

ततोऽन्नत्वं समासाद्य पितृभ्यां भुज्यते परम् ।
ततः शुक्रं रजश्चैव भूत्वा गर्भोऽभिजायते ॥ २० ॥
अन्नामध्यें जीव आला म्हणजे तो अन्नाबरोबर मातापित्यांकडून भक्षिला जातो. त्यापासून शुक्र आणि शोणित होऊन गर्भ उत्पन्न होतो. २०.

ततः कर्मानुसारेण भवेत्स्त्रीपुंनपुंसकः ।
एवं जीवगतिः प्रोक्ता मुक्तिं तस्य वदामि ते ॥ २१ ॥
नंतर कर्माला अनुसरून स्त्री अथवा पुरुष अथवा नपुंसक होतो. याप्रमाणे जीवाचा मार्ग सांगितला. आता त्याच्या मुक्तीचा मार्ग तुला सांगतो. २१.

यस्तु शान्त्यादियुक्तः सन्सदा विद्यारतो भवेत् ।
स याति देवयानेन ब्रह्मलोकावधिं नरः ॥ २२ ॥
जो शांति इत्यादिकांनी युक्त होत्साता सर्वदा ज्ञानाचे ठिकाणीं रत असतो तो देवमार्गानें ब्रह्मलोकापर्यंत जातो. २२.

अर्चिर्भूत्वा दिनं प्राप्य शुक्लपक्षमथो व्रजेत् ।
उत्तरायणमासाद्य संवत्सरमथो व्रजेत् ॥ २३ ॥
अग्नीची ज्वाला होऊन दिवसाप्रत जातो, नंतर शुक्ल पक्षाला जातो. नंतर उत्तरायणाचा आश्रय करून संवत्सराप्रत जातो. २३.

आदित्यचन्द्रलोकौ तु विद्युल्लोकमतः परम् ।
अथ दिव्यः पुमान्कश्चिद्ब्रह्मलोकादिहैति सः ॥ २४ ॥
दिव्ये वपुषि संधाय जीवमेवं नयत्यसौ ॥ २५ ॥
नंतर आदित्यलोक, नंतर चंद्रलोक व त्यानंतर विद्युलोक याप्रमाणे जातो. मग कोणी तरी दिव्य पुरुष ब्रह्मलोकाहून येऊन या जीवाला दिव्य शरीर देऊन ब्रह्मलोकीं नेतो. २४-२५.

ब्रह्मलोके दिव्यदेहे भुक्त्वा भोगान्यथेप्सितान् ।
तत्रोषित्वा चिरं कालं ब्रह्मणा सह मुच्यते ॥ २६ ॥
मग दिव्य देही होऊन ब्रह्मलोकीं गेल्यानंतर यथेष्ट भोग भोगून, चिरकाल त्या लोकीं वास करून, ब्रह्मदेवासहवर्तमान मोक्ष पावतो. २६.

शुद्धब्रह्मरतो यस्तु न स यात्येव कुत्रचित् ।
तस्य प्राणा विलीयन्ते जले सैन्धवखिल्यवत् ॥ २७ ॥
जो शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी रममाण असतो तो कोठे जात नाहीं वा येत नाहीं. पाण्यांत जसा मिठाचा खडा, तसे त्याचे प्राण आत्मस्वरूपींच लय पावतात. २७.

स्वप्नदृष्टा यथा स्ऱिष्टिः प्रबुद्धस्य विलीयते ।
ब्रह्मज्ञानवतस्तद्वद्विलीयन्ते तदैव ते ।
विद्याकर्मविहीनो यस्तृतीयं स्थानमेति सः ॥ २८ ॥
स्वप्नांतील सृष्टि जशी जागृत होतांच लय पावते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान प्राप्त होतांच तात्काल ह्या सर्व (आदित्यलोक, चंद्रलोक इत्यादि) लोकांचा लय होतो. ज्ञान व कर्म या दोहोंनीही जो रहित तो नरकलोकी जातो. २८.

भुक्त्वा च नरकान्घोरान्महारौरवरौरवान् ।
पश्चात्प्राक्तनशेषेण क्षुद्रजन्तुर्भवेदसौ ॥ २९ ॥
यूकामशकदंशादि जन्मासौ लभते भुवि ।
एवं जीवगतिः प्रोक्ता किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ ३० ॥
त्या ठिकाणी रौरव, महारौरव इत्यादि अनेक प्रकारच्या नरकयातना भोगून, मग जे कांहीं थोडेसे अनिष्ट कर्म राहिले असेल, ते भोगण्यासाठी या पृथिवीवर ऊ, माशी, चिलट इत्यादि क्षुद्र जंतूचे जन्म पावतो, याप्रमाणे ही जीवाची गति तुला सांगितली. आतां तुला दुसरे काय ऐकावयाची इच्छा आहे ? २९. ३०.

श्रीराम उवाच -
भगवन्यत्त्वया प्रोक्तं फलं तज्ज्ञानकर्मणोः ।
ब्रह्मलोके चंद्रलोके भुङ्क्ते भोगानिति प्रभो ॥ ३१ ॥
राम म्हणाला, हे भगवन् ! आपण ज्ञान व कर्म यांचें फल अनुक्रमानें, ब्रह्मलोकीं व चंद्रलोकीं भोगप्राप्ति असे वर्णन केलें. ३१.

गन्धर्वादिषु लोकेषु कथं भोगः समीरितः ।
देवत्वं प्राप्नुयात्कश्चित्कश्चिदिन्द्रत्वमेति च ॥ ३२ ॥
आतां गंधर्वलोक, इत्यादि उत्तम लोकांमध्ये दिव्यभोग प्राप्त होतात, कोणी देव होतो, कोणी इंद्र होतो. ३२.

एतत्कर्मफलं वास्तु विद्याफलमथापि वा ।
तद्ब्रूहि गिरिजाकान्त तत्र मे संशयो महान् ॥ ३३ ॥
हे काय कर्माचे फल ? किंवा उपासनेचें फल ? ह्याविषयी मला मोठा संशय आहे तो आपण निरसन करा. ३३.

श्रीभगवानुवाच -
तद्विद्याकर्मणोरेवानुसारेण फलं भवेत् ।
युवा च सुन्दरः शूरो नीरोगो बलवान् भवेत् ॥ ३४ ॥
सप्तद्वीपां वसुमतीं भुङ्क्ते निष्कण्टकं यदि ।
स प्रोक्तो मानुषानन्दस्तस्माच्छतगुणो मतः ॥ ३५ ॥
शंकर म्हणाले, ज्ञान आणि कर्म या दोहोंना अनुसरून हे फल प्राप्त होत असते. परंतु तरुण, सुंदर, शूर, निरोगी, बलवान् असा असून सप्तद्वीपवती पृथ्वीचें निष्कंटक राज्य जर भोगीत आहे, तर त्या आनंदाला मानुषानंद म्हणतात. हा आनंद साधारण मनुष्यदेह प्राप्त झाल्याने होणार्‍या आनंदाहून शंभरपटीने अधिक आहे. ३४-३५.

मनुष्यस्तपसा युक्तो गन्धर्वो जायतेऽस्य तु ।
तस्माच्छतगुणो देवगन्धर्वाणां न संशयः ॥ ३६ ॥
तोच मनुष्य तपःसंपन्न असेल तर गंधर्व होतो. ह्याला मनुष्यगंधर्व असे म्हणतात. त्याला जो आनंद होतो, तो पूर्वोक्त मानुषानंदाहून शतपट अधिक आहे. ह्या मनुष्यगंधर्वाच्या आनंदाहून देवगंधर्वाचा आनंद शतगुण अधिक आहे. ३६.

एवं शतगुणानन्द उत्तरोत्तरतो भवेत् ।
पितॄणां चिरलोकानामाजानसुरसम्पदाम् ॥ ३७ ॥
देवतानामथेन्द्रस्य गुरोस्तद्वत्प्रजापतेः ।
ब्रह्मणश्चैवमानन्दः पुरस्तादुत्तरोत्तरः ॥ ३८ ॥
ह्याप्रमाणेच पुढें जे आनंद सांगावयाचे आहेत ते उत्तरोत्तर शंभर पटीने अधिक आहेत. देवगंधर्वाहून चिरलोकपितरांचा, त्यांच्याहून कर्मदेवांचा [कर्माने देवत्व पावलेल्यांचा], त्याहून देवांचा, देवांहून इंद्राचा, त्याहून बृहस्पतीचा, त्याहून प्रजापतीचा आणि प्रजापतीहून ब्रह्मदेवाचा. ३७-३८.

ज्ञानाधिक्यात्सुखाधिक्यं नान्यदस्ति सुरालये ।
श्रोत्रियोऽवृजिनोऽकामहतो यश्च द्विजो भवेत् ॥ ३९ ॥
तस्याप्येवं समाख्याता आनन्दाश्चोत्तरोत्तरम् ।
आत्मज्ञानात्परं नास्ति तस्माद्दशरथात्मज ॥ ४० ॥
जितके ज्ञान अधिक तितकें सुख अधिक. देवलोकीं अधिक सुख प्राप्त होण्याला ज्ञानाखेरीज दुसरें साधन नाहीं. जो ब्राह्मण वेदवेदांगपारंगत असून निष्पाप व निष्काम असा असेल त्याला वर सांगितलेले आनंद अनुक्रमानें उत्तरोत्तर प्राप्त होतात. म्हणून हे दशरथात्मजा ! आत्मज्ञानासारखे दुसरे कोणतेच सुखाला साधन नाहीं. ३९-४०.

ब्राह्मणः कर्मभिर्नैव वर्धते नैव हीयते ।
न लिप्यते पातकेन कर्मणा ज्ञानवान्यदि ॥ ४१ ॥
जो ब्रह्मवेत्ता आहे, त्याला कर्में केल्यापासून लाभ नाहीं व न केल्यापासून हानि नाहीं, मनुष्य जर ज्ञानी असेल तर तो पातकाने अथवा कर्मानें लिप्त होत नाहीं. ४१.

तस्मात्सर्वाधिको विभो ज्ञानवानेव जायते ।
ज्ञात्वा यः कुरुते कर्म तस्याक्षय्यफलं लभेत् ॥ ४२ ॥
तस्मात् जो ज्ञानी आहे तो सर्वांहून श्रेष्ठ, जो ज्ञानयुक्त होऊन कर्म करतो त्याला अक्षय फल म्ह० मुक्ति मिळते. ४२.

यत्फलं लभते मर्त्यः कोटिब्राह्मणभोजनैः ।
तत्फलं समवाप्नोति ज्ञानिनं यस्तु भोजयेत् ॥ ४३ ॥
कोटी ब्राह्मणभोजनानें जें फल प्राप्त होते ते एका ब्रह्मवेत्त्याला भोजन दिलें असतां प्राप्त होते. ४३.

ज्ञानवन्तं द्विजं यस्तु द्विषते च नराधमः ।
स शुष्यमाणो म्रियते यस्मादीश्वर एव सः ॥ ४४ ॥
जो नराधम, ब्रह्मवेत्त्याशी द्वेष करतो, तो क्षयरोगानें क्षीण होऊन मरतो. कारण ज्ञानी हा साक्षात् ईश्वर आहे. ४४.

उपासको न यात्येव यस्मात्पुनरधोगतिम् ।
उपासनरतो भूत्वा तस्मादास्स्व सुखी नृप ॥ ४५ ॥
हे नृपा, तथापि उपासना करणारालाही, अधोगति प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञान शक्य नसेल तर तूं माझ्या उपासनेचे ठिकाणी रत होऊन सुखी हो. ४५.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
जीवगत्यादिनिरूपणं नामैकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
इति एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥





GO TOP