॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ अष्टमोऽध्यायः - अध्याय आठवा ॥

श्रीराम उवाच -
पाञ्चभौतिकदेहस्य चोत्पत्तिर्विलयः स्थितिः ।
स्वरूपं च कथं देव भगवन्वक्तुमर्हसि ॥ १ ॥
राम म्हणाला, भगवन् या पांचभौतिक देहाची उत्पत्ति, स्थिति व नाश हीं कशीं होतात व ह्याचे स्वरूप कसे आहे हे मला सांगण्यास तूं योग्य आहेस. १.

श्रीभगवानुवाच -
पञ्चभूतैः समारब्धो देहोऽयं पाञ्चभौतिकः ।
तत्र प्रदानं पृथिवी शेषाणां सहकारिता ॥ २ ॥
शंकर म्हणाले, पृथिव्यादि पंचमहाभूतांनी हा स्थूल देह उत्पन्न केलेला आहे म्हणून ह्याला पांचभौतिकदेह म्हणतात. ह्यांत पृथिवी मुख्य [निम्मे] आहे व इतर चार मिळून निम्मे आहेत. २.

जरायुजोऽण्डजश्चैव स्वेदजश्चोद्भिजस्तथा ।
एवं चतुर्विधः प्रोक्तो देहोऽयं पाञ्चभौतिकः ॥ ३ ॥
जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज असे ह्या पांचभौतिक देहाचे चार भेद आहेत. ३.

मानसस्तु परः प्रोक्तो देवानामेव संस्मृतः ।
तत्र वक्ष्ये प्रथमतः प्रधानत्वाज्जरायुजम् ॥ ४ ॥
मानस म्हणून ह्याचा एक पांचवा प्रकार आहे तो फक्त देवांसच, इतर योनीत नाहीं. वरील चतुर्विध देहांत जरायुज हा मुख्य आहे म्हणूनच त्याचे स्वरूप प्रथम सांगतों. ४.

शुक्रशोणितसंभूता वृत्तिरेव जरायुजः ।
स्त्रीणां गर्भाशये शुक्रमृतुकाले विशेद्यदा ॥ ५ ॥
योषितो रजसा युक्तं तदेव स्याज्जरायुजम् ।
बाहुल्याद्रजसा स्त्री स्याच्छुक्राधिक्ये पुमान्भवेत् ॥ ६ ॥
शुक्र आणि शोणित ह्यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारी जरायुज, पुरुषाचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयांत ऋतुकाली जेव्हां प्रविष्ट होऊन स्त्रीच्या शोणिताशी मिश्रित होते तेव्हां त्याला जरायुज हें नाम प्राप्त होते. शोणित अधिक असेल तर स्त्री गर्भ होतो, शुक्र अधिक असेल तर पुरुष गर्भ होतो. ५-६.

शुक्रशोणितयोः साम्ये जायते च नपुंसकः ।
ऋतुस्नाता भवेन्नारी चतुर्थे दिवसे ततः ॥ ७ ॥
शुक्रशोणितांचे अगदी साम्य असेल तर नपुंसक होतो. ऋतु प्राप्त झाल्यापासून चतुर्थ दिवशीं स्त्री ऋतुस्नात होते. ७.

ऋतुकालस्तु निर्दिष्ट आषोडशदिनावधि ।
तत्रायुग्मदिने स्त्री स्यात्पुमान्युग्मदिने भवेत् ॥ ८ ॥
ऋतु प्राप्त झाल्यापासून सोळा रात्रीपर्यंत ऋतुकाल असतो. त्यांत विषम दिवशीं गर्भधारणा झाल्यास कन्या होते व सम दिवशीं झाल्यास पुत्र होतो. ८.

षोडशे दिवसे गर्भो जायते यदि सुभ्रुवः ।
चक्रवर्ती भवेद्‌राजा जायते नात्र संशयः ॥ ९ ॥
जर सोळाव्या रात्री गर्भ राहिला तर तो सार्वभौम राजा होईल यांत संशय नाहीं. ९.

ऋतुस्नाता यस्य पुंसः साकाङ्क्षं मुखमीक्षते ।
तदाकृतिर्भवेदर्भस्तत्पश्येत्स्वामिनो मुखम् ॥ १० ॥
ऋतुस्नात झालेल्या स्त्रीला कामातुर होऊन गर्भधारणेचे प्रसंगी ज्या पुरुषाचे मुख दिसते त्याच्या आकृतीचा गर्भ होतो. म्हणून भर्त्याचेच मुखावर दृष्टि ठेवावी. १०.

याऽस्ति चर्मावृतिः सूक्ष्मा जरायुः सा निगद्यते ।
शुक्रशोणितयोर्योगस्तस्मिन्नेव भवेद्यतः ।
तत्र गर्भो भवेद्यस्मात्तेन प्रोक्तो जरायुजः ॥ ११ ॥
स्त्रीच्या उदरांत जी एक सूक्ष्म अशी चर्माची पिशवी आहे तिला जरायु म्हणतात. त्यांतच शुक्रशोणितांचा संयोग होऊन त्यापासून गर्भ उत्पन्न होतो म्हणून त्याला "जरायुज" असें म्हणतात. ११.

अण्डजाः पक्षिसर्पाद्याः स्वेदजा मशकादयः ।
उद्भिज्जास्तृणगुल्माद्या मानसाश्च सुरर्षयः ॥ १२ ॥
पक्षि, सर्प इत्यादि हे प्रथम अंडरूपानें उत्पन्न होतात म्हणून अंडज, मशकादिक हे स्वेदज, वृक्षगुल्मादि हे उद्भिज्ज आणि देवर्षि हे मानस. १२.

जन्मकर्मवशादेव निषिक्तं स्मरमन्दिरे ।
शुक्रं रजःसमायुक्तं प्रथमे मासि तद्द्रवम् ॥ १३ ॥
(पुनः जरायुजांचेच वर्णन करतों ) प्राण्याच्या भावि जन्माला कारणभूत अशा कर्माच्या योगाने स्त्रीच्या योनींत ओतलेलं शुक्र शोणिताशीं संयोग पावून प्रथम महिन्यांत कांही दिवस तसेंच द्रवरूपानें असतें. १३.

बुद्बुदं कललं तस्मात्ततः पेशी भवेदिदम् ।
पेशीघनं द्वितीये तु मासि पिण्डः प्रजायते ।१४ ॥
नंतर ते बुद्बुदाकृति होते. नंतर कलल होतें [म्हणजे त्यांत दह्यासारखा कांहीं घट्टपणा येतो ]. पुढे त्याची पिशवी बनते. पुढे दुसर्‍या मासांत त्याचाच मांसपिंड बनतो. १४,

कराङ्घ्रिशीर्षकादीनि तृतीये संभवन्ति हि ।
अभिव्यक्तिश्च जीवस्य चतुर्थे मासि जायते ॥ १५ ॥
हात, पाय, मस्तक इत्यादि अवयव तृतीय मासांत उत्पन्न होतात. जीवाला आश्रयभूत जो लिंगदेह तो चतुर्थ मासांत उत्पन्न होतो. १५.

ततश्चलति गर्भोऽपि जनन्या जठरे स्वतः ।
पुत्रश्चेद्दक्षिणे पार्श्वे कन्या वामे च तिष्ठति ॥ १६ ॥
नपुंसकस्तूदरस्य भागे तिष्ठति मध्यतः ।
अतो दक्षिणपार्श्वे तु शेते माता पुमान्यदि ॥ १७ ॥
नंतर तो गर्भ मातेच्या उदरांत प्रवृत्तीने चलनवलन करू लागतो. पुत्र असेल तर उजव्या कुशीत आणि कन्या असेल तर डाव्या कुशीत आणि नपुंसक असेल तर उदराच्या मध्यभागी. म्हणून पुंगर्भ असेल तर त्याचे चलनवलन दक्षिण कुक्षीत असल्यामुळे माता उजव्या कुशीवर निजते. १६-१७.

अङ्गप्रत्यङ्गभागाश्च सूक्ष्माः स्युर्युगपत्तदा ।
विहाय श्मश्रुदन्तादीञ्जन्मानन्तरसंभवान् ॥ १८ ॥
चतुर्थे व्यक्तता तेषां भावानामपि जायते ।
पुंसां स्थैर्यादयो भावा भीरुत्वाद्यास्तु योषिताम् ॥ १९ ॥
जन्म झाल्यानंतर उत्पन्न होणारे श्मश्रुदंतादि सोडून बाकीची अंगे आणि प्रत्यंगे, तसेच पुरुषाचे गांभीर्य, स्थैर्य इत्यादि धर्म व स्त्रियांचे भीरुत्व इत्यादि धर्म ह्यांची सूक्ष्मरूपाने चतुर्थ मासांत उत्पत्ति होते. १८-१९.

नपुंसके च ते मिश्रा भवन्ति रघुनन्दन ।
मातृजं चास्य हृदयं विषयानभिकाङ्क्षति ॥ २० ॥
हे रघुनंदना, नपुंसकगर्भात ते धर्म मिश्र असतात. गर्भाचे हृदय मातेच्याच हृदयापासून उत्पन्न होते म्हणून माता ज्यांची इच्छा करते तेच विषय तो इच्छितो. २०.

ततो मातुर्मनोऽभीष्टं कुर्याद्गर्भविवृद्धये ।
तां च द्विहृदयां नारीमाहुर्दौहृदिनीं ततः ॥ २१ ॥
तस्मात् गर्भ चांगला वाढावा म्हणून मातेचे मनोरथ पूर्ण करावे. गर्भाचे व तिचे अशी दोन हृदये तिचे ठायीं असतात म्हणून तिला दौहृदिनी म्हणतात. २१.

अदानाद्दौहृदानां स्युर्गर्भस्य व्यङ्गतादयः ।
मातुर्यद्विषये लोभस्तदार्तो जायते सुतः ॥ २२ ॥
दोहद पूर्ण केले नाहीत तर गर्भाला व्यंगता इत्यादि दोष उत्पन्न होतात. गर्भिणीचा ज्या विषयावर लोभ असतो त्याच विषयावर अपत्याचा विशेष लोभ होतो. २२.

प्रबुद्धं पञ्चमे चित्तं मांसशोणितपुष्टता ।
षष्ठेऽस्थिस्नायुनखरकेशलोमविविक्तता ॥ २३ ॥
पंचममासांत चित्त प्रबुद्ध होते, मांस आणि रक्त यांची पुष्टि होते. सहाव्या मासांत अस्थि, स्नायु, नखे, मस्तकावरील केश व शरीरावरील लोम यांची व्यक्तता होते. २३.

बलवर्णौ चोपचितौ सप्तमे त्वङ्गपूर्णता ।
पादान्तरितहस्ताभ्यां श्रोत्ररन्ध्रे पिधाय सः ॥ २४ ॥
उद्विग्नो गर्भसंवासादस्ति गर्भलयान्वितः ॥ २५ ॥
सप्तममासांत बल व वर्ण हे व्यक्त होऊन सर्व अवयवांची पूर्णता होते आणि तो गर्भ पायांत अडखळलेल्या हातांनी कान झांकून गर्भवासाने उद्विग्न होऊन पुनः आपल्याला असाच गर्भवास होईल अशा भयाने युक्त असा राहतो. २४-२५.

आविर्भूतप्रबोधोऽसौ गर्भदुःखादिसंयुतः ।
हा कष्टमिति निर्विण्णः स्वात्मानं शोशुचीत्यथ ॥ २६ ॥
त्यावेळी त्याला अनेक जन्मांचे ज्ञान प्राप्त होते, आणि गर्भवासदुःख भोगीत असलेला तो खिन्न होऊन हाय हाय ! असे म्हणून आपणाविषयीं अतिशय शोक करूं लागतो. २६.

अनुभूता महासह्याः पुरा मर्मच्छिदोऽसकृत् ।
करंभवालुकास्तप्ताश्चादह्यन्तासुखाशयाः ॥ २७ ॥
ज्यांत असह्य वे मर्मभेद करणार्‍या असंख्य यातना प्राप्त होतात असे नारकी प्राण्यांचे देह मीं पुष्कळ अनुभविले; अत्यंत तापलेल्या वाळूवर उभे राहणे इत्यादि अनेक दुःखदायक यातना मी भोगल्या. २७.

जठरानलसंतप्तपित्ताख्यरसविप्लुषः ।
गर्भाशये निमग्नं तु दहन्त्यतिभृशं तु माम् ॥ २८ ॥
जठराग्नीने तप्त झालेल्या अशा पित्तरसाच्या ज्वाला मी गर्भाशयांत निजलों असतां मला अत्यंत जाळतात. २८.

उदर्यकृमिवक्त्राणि कूटशाल्मलिकण्टकैः ।
तुल्यानि च तुदन्त्यार्तं पार्श्वास्थिक्रकचार्दितम् ॥ २९ ॥
मातेच्या उदरांतील कृमींचीं शेवरीच्या कांट्यांसारखीं तीक्ष्ण मुखें मातेच्या कुशींतील अस्थिरूप करवतानें पीडलेल्या मला अतिशय पीडतात. २९.

गर्भे दुर्गन्धभूयिष्ठे जठराग्निप्रदीपिते ।
दुःखं मयाप्तं यत्तस्मात्कनीयः कुम्भपाकजम् ॥ ३० ॥
दुर्गंधानें पूर्ण व जठराग्नीच्या तापाने युक्त अशा गर्भवासांत जे मी दुःख भोगलें त्याहून कुंभपाकनरकांतील दुःख कमी आहे. ३०.

पूयासृक्श्लेष्मपायित्वं वाग्ताशित्वं च यद्भवेत् ।
अशुचौ कृमिभावश्च तत्प्राप्तं गर्भशायिना ॥ ३१ ॥
पू, रक्त, कफ हे अमंगल पदार्थ पिणें, वांति भक्षण करणे आणि मलमूत्रादि अशुचि पदार्थांत कृमिरूपाने राहणे ही सर्व दुःखें मी गर्भवासांत अनुभवीत आहे. ३१.

गर्भशय्यां समारुह्य दुःखं यादृङ् मयापि तत् ।
नातिशेते महादुःखं निःशेषनरकेषु तत् ॥ ३२ ॥
हा गर्भवास प्राप्त झाल्यापासून जे मी दुःख भोगलें त्याहून निरंतरचे नरकांतील महादुःख अधिक नाहीं. ३२.

एवं स्मरन्पुरा प्राप्ता नानाजातीश्च यातनाः ।
मोक्षोपायमभिध्यायन्वर्ततेऽभ्यासतत्परः ॥ ३३ ॥
पूर्वी प्राप्त झालेल्या नाना योनि व यातना स्मरून, ह्यापासून माझी सुटका कशी होईल याचे चिंतन करीत, ह्याचाच एकसारखा अभ्यास करीत रहातो. ३३.

अष्टमे त्वक्सृती स्यातामोजस्तेजश्च हृद्भवम् ।
शुभ्रमापीतरक्तं च निमित्तं जीवितं मतम् ॥ ३४ ॥
पुढें अष्टममासांत त्वचा आणि गति हीं प्राप्त होतात. तसेच जीविताला मुख्य कारणीभूत असलेल हृदयस्थ शुभ्र ओज आणि किंचित् लाल असे तेज हीं प्राप्त होतात. ३४.

मातरं च पुनर्गर्भं चञ्चलं तत्प्रधावति ।
ततो जातोऽष्टमे गर्भो न जीवत्योजसोज्झितः ॥ ३५ ॥
तीं कांहीं वेळपर्यंत गर्भाच्या हृदयांत व कांहीं वेळपर्यंत मातेच्या हृदयांत अशीं चंचलरूपाने राहतात म्हणून अष्टममासांत जन्मलेला प्राणि ओज व तेज ह्यांनी रहित असेल तर जगत नाहीं. ३५.

किंचित्कालमवस्थानं संस्कारात्पीडिताङ्गवत् ।
समयः प्रसवस्य स्यान्मासेषु नवमादिषु ॥ ३६ ॥
पुढे नवमादिमास हा प्रसूतीचा काल होय. परंतु ( शीघ्रप्रसवप्रतिबंधक असे गर्भाचें कांहीं ) प्रारब्धकर्म असेल तर नंतरही कांहीं गर्भात त्याला रहावें लागते. दमलेला प्राणि कांहीं काल थांबल्यावांचून पुढे जात नाहीं तद्वत् ३६.

मातुरस्रवहां नाडीमाश्रित्यान्ववतारिता ।
नाभिस्थनाडी गर्भस्य मात्राहाररसावह ।
तेन जीवति गर्भोऽपि मात्राहारेण पोषितः ॥ ३७ ॥
मातेच्या एका रक्तवाहिनी नाडीशी नाभिचक्रांतील एक नाडी मिळालेली आहे ती मातेनें भक्षिलेल्या अन्नाचा रस गर्भाला पोंचविते. त्यानें गर्भ जगतो व त्या स्वल्प आहारानें देखील गर्भ पुष्ट राहतो. ३७.

अस्थियन्त्रविनिष्पिष्टः पतितः कुक्षिवर्त्मना ।
मेदोऽसृग्दिग्धसर्वाङ्गो जरायुपुटसंवृतः ॥ ३८ ॥
निष्क्रामन्भृशदुःखार्तो रुदन्नुच्चैरधोमुखः ।
यन्त्रादेव विनिर्मुक्तः पतत्त्युत्तानशाय्युत ॥ ३९ ॥
योनिचक्रांतील अस्थियंत्राने पिळून निघालेला कुक्षीच्या संकुचित मार्गाने बाहेर येतो. मेद रक्त ह्यांनी सर्वांग भरलेलें असे असून जरायुनामक चर्माच्या पिशवीने वेष्टिलेला, अतिशय दुःखित होऊन अधोमुख असा जेव्हां बाहेर येतो, तेव्हां उच्चस्वराने रोदन करू लागतो. याप्रमाणे जणूंकाय यंत्रांतून बाहेर आल्यावर उताणा पडतो. ३८-३९.

अकिंचित्कस्तथा बालो मांसपेशीसमास्थितः ।
श्वमार्जारादिदंष्ट्रिभ्यो रक्ष्यते दण्डपाणिभिः ॥ ४० ॥
कांहींच करावयास समर्थ नसलेल्या व मांसाच्या पिशवीप्रमाणे असलेल्या त्या बालाचें कुत्रे, मांजर इत्यादि दंतयुक्त प्राण्यांपासून हातात काठी घेऊन स्वजन रक्षण करतात. ४०,

पितृवद्राक्षसं वेत्ति मातृवड्डाकिनीमपि ।
पूयं पयोवदज्ञानाद्दीर्घकष्टं तु शैशवम् ॥ ४१ ॥
राक्षस असला तरी त्याला बापासारखाच मानतो,डाकिनीलाही आई मानतो, पूसुद्धां दुध मानतो. तात्पर्य बाळपण अज्ञानामुळे अति कष्टकारक आहे. ४१.

श्लेष्मणा पिहिता नाडी सुषुम्ना यावदेव हि ।
व्यक्तवर्णं च वचनं तावद्वक्तुं न शक्यते ॥ ४२ ॥
जोपर्यंत सुषुम्ना नामक नाडी कफानें भरलेली असते तोपर्यंत तो स्पष्टपणाने शब्द बोलावयास समर्थ नसतो. ४२.

अत एव च गर्भेऽपि रोदितुं नैव शक्यते ॥ ४३ ॥
ह्याच कारणामुळे गर्भात असतांना त्याला रडतां येत नाहीं. ४३.

दृप्तोऽथ यौवनं प्राप्य मन्मथज्वरविह्वलः ।
गायत्यकस्मादुच्चैस्तु तथा कस्माच्च वल्गति ॥ ४४ ॥
नंतर तारुण्य प्राप्त होतांच गर्वित होतो आणि कामज्वराने विव्हल होऊन अकस्मात् गाऊं लागतो, किंवा वल्गना करू लागतो. ४४.

आरोहति तरून्वेगाच्छान्तानुद्वेजयत्यपि ।
कामक्रोधमदान्धः सन्न कांश्चिदपि वीक्षते ॥ ४५ ॥
वेगाने वृक्षांवर चढतो, शांत अशा प्राण्यांना उद्वेग देतो. काम, क्रोध यांच्या मदानें अंध होऊन कोणालाच पहात नाहींसा होतो. ४५.

अस्थिमांसशिरालाया वामाया मन्मथालये ।
उत्तानपूतिमण्डूकपाटितोदरसन्निभे ।
आसक्तः स्मरबाणार्त आत्मना दह्यते भृशम् ॥ ४६ ॥
अस्थि, मांस आणि शिरा यांनी युक्त अशा स्त्रीच्या, फाडून उताणें करून ठेविलेल्या बेडकाच्या दुर्गंधयुक्त उदरासारख्या अशा, योनीचे ठिकाणीं आसक्त होऊन अंतःकरणांत कामबाणानें व्यथित होत्साता अतिशय दुःख पावतो. ४६.

अस्थिमांसशिरात्वग्भ्यः किमन्यद्वर्तते वपुः ।
वामानां मायया मूढो न किंचिद्वीक्षते जगत् ॥ ४७ ॥
अस्थि, मांस, शिरा आणि त्वचा ह्यांशिवाय स्त्रियांच्या शरीरांत दुसरें कांहीं आहे काय ? तथापि मायेने मूढ झालेल्या त्याला जग बिलकूल दिसत नाहीं. ४७.

निर्गते प्राणपवने देहो हंत मृगीदृशः ।
यथाहि जायते नैव वीक्ष्यते पञ्चषैर्दिनैः ॥ ४८ ॥
प्राणवायु निघून गेल्यानंतर पांच सहा दिवसांत स्त्रीच्या देहाची काय अवस्था होते हें ( कामाने मूढ झालेले तरुण ) पहात नाहींत. ४८.

महापरिभवस्थानं जरां प्राप्यातिदुःखितः ।
श्लेष्मणा पिहितोरस्को जग्धमन्नं न जीर्यति ॥ ४९ ॥
सर्व अपमानांचे स्थान अशी जरा प्राप्त झाली म्हणजे अत्यंत दुःख पावतो, उर कफानें दाटतो, खाल्लेले अन्न जिरत नाहीं. ४९.

सन्नदन्तो मन्ददृष्टिः कटुतिक्तकषायभुक् ।
वातभुग्नकटिग्रीवकरोरुचरणोऽबलः ॥ ५० ॥
दांत पडले, दृष्टि मंद झाली, कडू, तिखट, खारट अशी औषधें खाल्लीं, वायूने कंबर व मान मोडली, हात-मांड्या-पाय दुर्बळ झाले, ५०,

गदायुतसमाविष्टः परित्यक्तः स्वबन्धुभिः ।
निःशौचो मलदिग्धाङ्ग आलिङ्गितवरोषितः ॥ ५१ ॥
हजारों रोगांनी युक्त झाला, स्वजनांनीं त्याग केला. स्वच्छता नाहींशी झाली. सर्व शरीर मलानें व्यापून टाकलें, आनखशिखांत सर्व शरीराचा दाह होऊं लागला, ५१.

ध्यायन्नसुलभान्भोगान्केवलं वर्तते चलः ।
सर्वेन्द्रियक्रियालोपाद्धस्यते बालकैरपि ॥ ५२ ॥
तथापि ईश्वराचें ध्यान न करतां केवल विषयांचे ध्यान करीत, थरथर कांपत, हस्तपादादि सर्व इंद्रियांच्या शक्ति कुंठित झाल्यामुळे पोरें सुद्धा ज्याची थट्टा करीत आहेत असा होतो. ५२.

ततो मृतिजदुःखस्य दृष्टान्तो नोपलभ्यते ।
यस्माद्बिभ्यति भूतानि प्राप्तान्यपि परां रुजम् ॥ ५३ ॥
ह्याच्या पुढें जे मरणाचे दुःख-अत्यंत ( इतर) दुःख प्राप्त झाले असतांही ज्याला मनुष्य भितात-त्याला तर उपमाच नाहीं, ५३.

नीयते मृत्युना जन्तुः परिष्वक्तोऽपि बन्धुभिः ।
सागरान्तर्जलगतो गरुडेनेव पन्नगः ॥ ५४ ॥
स्वजनांनी जरी घट्ट धरलेला असला तथापि जसा समुद्रांतही राहणार्‍या सर्पाला गरुड नेतो तसा मृत्यु त्याला नेतोच. ५४.

हा कान्ते हा धनं पुत्राः क्रन्दमानः सुदारुणम् ।
मण्डूक इव सर्पेण मृत्युना नीयते नरः ॥ ५५ ॥
हाय ! हाय ! माझी कांता कोठे आहे ? माझे धन काय झाले ? माझे पुत्र कोठे गेले ? असा कर्णकटु आक्रोश जरी करू लागला तरी सर्प जसा बेडकाला नेतो तसा मृत्यु त्याला नेतोच. ५५.

मर्मसून्मथ्यमानेषु मुच्यमानेषु संधिषु ।
यद्दुःखं म्रियमाणस्य स्मर्यतां तन्मुमुक्षुभिः ॥ ५६ ॥
मर्मस्थानांचे आकर्षण होऊं लागलें, अवयवांचीं संधिबंधनें तुटूं लागलीं म्हणजे त्या मरणार्‍याला जें दुःख होतें तें मुमुक्षुजनांनी नेहमीं ध्यानात बाळगावें. ५६.

दृष्टावाक्षिप्यमाणायां संज्ञया ह्रियमाणया ।
मृत्युपाशेन बद्धस्य त्राता नैवोपलभ्यते ॥ ५७ ॥
दृष्टि आकर्षण केली, चेतना नाहीशी केली, कालपाशांनीं बद्ध झाला म्हणजे मग त्यावेळी त्याला कोणी त्राता नसतो. ५७.

संरुध्यमानस्तमसा मच्चित्तमिवाविशन् ।
उपाहूतस्तदा ज्ञातीनीक्षते दीनचक्षुषा ॥ ५८ ॥
अज्ञानाने व्यापलेला, तथापि जणूं काय मोठा विवेक प्राप्त झाला आहे असा, स्वजन हांका मारू लागले असतां केवल दीनमुखाने त्यांच्याकडे पहातो. ५८.

अयः पाशेन कालेन स्नेहपाशेन बन्धुभिः ।
आत्मानं कृष्यमाणं तं वीक्षते परितस्तथा ॥ ५९ ॥
लोखंडाच्या पाशांनी आणि स्वजन स्नेहपाशानें ज्याला ओढीत असतात असा हा स्वतः केवळ सर्वत्र पहात असतो. ५९.

हिक्कया बाध्यमानस्य श्वासेन परिशुष्यतः ।
मृत्युनाकृष्यमाणस्य न खल्वस्ति परायणम् ॥ ६० ॥
मृत्यु ओढून नेत असतां उचकी लागून पीडा झाली, श्वास लागून शुष्क झाला, तरी त्यावेळीं कांहीं उपाय नसतो. ६०.

संसारयन्त्रमारूढो यमदूतैरधिष्ठितः ।
क्व यास्यामीति दुःखार्तः कालपाशेन योजितः ॥ ६१ ॥
संसाररूप फिरणार्‍या चक्रावर बसला असतां यमदूतांनीं धरल्यामुळे दुःखित होऊन मी कोठे जात आहे असा विचार करत आहे इतक्यांत काळाचे पाश गळ्यांत पडले. ६१.

किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् ।
इति कर्तव्यतामूढः कृच्छ्राद्देहात्त्यजत्यसून् ॥ ६२ ॥
काय करूं, कोठे जाऊं, काय घेऊं, काय टाकूं, अशा प्रकारे काय करावे हे सुचेनासे झालें म्हणजे मोठ्या संकटाने देहांतून प्राण सोडून देतो. ६२.

यातनादेहसंबद्धो यमदूतैरधिष्ठिताः ।
इतो गत्वानुभवति या यास्ता यमयातनाः ।
तासु यल्लभते दुःखं तद्वक्तुं क्षमते कुतः ॥ ६३ ॥
मग यमदूत त्याला इथून यमलोकीं नेल्यावर यातना भोगणार्‍या देहानें युक्त करतात. तेथे तो अनेक प्रकारच्या यमयातना भोगतो. त्यांमध्ये जे दुःख भोगावे लागतें ते बोलून दाखविणे अशक्य आहे. ६३.

कर्पूरचन्दनाद्यैस्तु लिप्यते सततं हि यत् ।
भूषणैर्भूष्यते चित्रैः सुवस्त्रैः परिवार्यते ॥ ६४ ॥
अस्पृश्यं जायतेऽप्रेक्ष्यं जीवत्यक्तं सदा वपुः ।
निष्कासयन्ति निलयात्क्षणं न स्थापयन्त्यपि ॥ ६५ ॥
ज्याला कापूर, चंदन, इत्यादि सुगंध द्रव्यांचा नित्य लेप करावयाचा, ज्याच्यावर अनेक प्रकारची रत्नजडित भूषणें घालावयाचीं, उंची वस्त्रांनी ज्याला भूषित करावयाचे, तेच शरीर प्राणवायूनें वियुक्त झाले म्हणजे तत्काल अस्पृश्य व पहावयास अयोग्य असे होते, मग तत्काल त्याला बाहेर काढतात, क्षणभर देखील घरांत ठेवीत नाहींत. ६४-६५.

दह्यते च ततः काष्ठैस्तद्भस्म क्रियते क्षणात् ।
भक्ष्यते वा सृगालैश्च गृध्रकुक्करवायसैः ।
पुनर्न दृश्यते सोऽथ जन्मकोटिशतैरपि ॥ ६६ ॥
श्मशानांत नेऊन काष्ठांनी जाळून क्षणांत त्याचे भस्म करून टाकतात; अथवा कोल्हे, गिधाडे, कुत्रे, कावळे, इत्यादि त्याला खाऊन टाकतात. पुनः कोट्यवधि जन्म प्राप्त झाले तरी तो मनुष्य देह मिळत नाहीं. ६६.

माता पिता गुरुजनः स्वजनो ममेति
    मायोपमे जगति कस्य भवेत्प्रतिज्ञा ।
एको यतो व्रजतो कर्मपुरःसरोऽयं
    विश्रामवृक्षसदृशः खलु जीवलोकः ॥ ६७ ॥
गारुड्याने उत्पन्न केलेल्या गारुड्यासारख्या या जगतांत, माझी माता, माझा पिता, माझे गुरुजन, माझे स्वजन, अशी कोण प्रतिज्ञा करील ? ज्या अर्थीं जीव हा केवळ कर्मच बरोबर घेऊन परलोकीं जात असतो, त्याअर्थीं जसा वाटेत विश्रांति घेण्यासारखा एकादा वृक्ष असतो तसा हा मृत्युलोक आहे. ६७.

सायं सायं वासवृक्षं समेताः
    प्रातः प्रातस्तेन तेन प्रयान्ति ।
त्यक्त्वान्योन्यं तं च वृक्षं
    विहङ्गा यद्वत्तद्वज्ज्ञातयोऽज्ञातयश्च ॥ ६८ ॥
जसे पक्षी सायंकाल होतांच वस्तीसाठीं एकाद्या वृक्षावर येतात आणि प्रातःकाल होतांच पुनः निरनिराळ्या दिशांनी एकमेकांना व त्या वृक्षाला सोडून निघून जातात तसे हे सर्व स्वजन व परजन आहेत. ६८.

मृतिबीजं भवेज्जन्म जन्मबीजं भवेन्मृतिः ।
घटयन्त्रवदश्रान्तो बम्भ्रमीत्यनिशं नरः ॥ ६९ ॥
मृत्यूचे बीज जन्म आणि जन्माचें बीज मृत्यु. हा जीव, राहाटासारख्या ह्या जन्ममृत्युरूप यंत्रांत एकसारखा फिरत आहे. ६९.

गर्भे पुंसः शुक्रपाताद्यदुक्तं मरणावधि ।
तदेतस्य महाव्याधेर्मत्तो नान्योऽस्ति भेषजम् ॥ ७० ॥
अस्तु; रामचंद्रा ! गर्भाशयांत शुक्रपातापासून मरणापर्यंत हा महाव्याधि वर्णन केला, त्याला माझ्याशिवाय दुसरें कांहींच औषध नाहीं. ७०.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
पिण्डोत्पत्तिकथनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
॥ इति अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥





GO TOP