॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ गणेशगीता ॥

॥ नवमोऽध्यायः - अध्याय नववा - क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेकयोगः ॥

वरेण्य उवाच -
अनन्यभावस्त्वां सम्यङ्मूर्तिमन्तमुपासते ।
योऽक्षरं परमव्यक्तं तयोः कस्ते मतोऽधिकः ॥ १ ॥
वरेण्य म्हणाला, जो अनन्यभक्ति मनुष्य मूर्तिरूपाने तुझी उत्तम प्रकारे उपासना करतो आणि जो श्रेष्ठ अशा अविनाशी अव्यक्ताची (म्हणजे ब्रह्माची निर्गुण) उपासना करतो त्या दोघांपैकीं तुला अधिक प्रिय कोण आहे ? १.

असि त्वं सर्ववित्साक्षी भूतभावन ईश्वरः ।
अतस्त्वां परिपृच्छामि वद मे कृपया विभो ॥ २ ॥
तूं सर्वज्ञ, साक्षी, भूतांचा उत्पन्नकर्ता व ईश्वर आहेस. म्हणून मी तुला विचारीत आहे. हे सर्वव्यापिन्, कृपा करून मला सांग, २.

श्रीगजानन उवाच -
यो मां मूर्तिधरं भक्त्या मद्‌भक्तः परिसेवते ।
स मे मान्योऽनन्यभक्तिर्नियुज्य हृदयं मयि ॥ ३ ॥
खगणं स्ववशं कृत्वाखिलभूतहितार्थकृत् ।
ध्येयमक्षरमव्यक्तं सर्वगं कूटगं स्थिरम् ॥ ४ ॥
सोऽपि मामेत्यनिर्देश्यं मत्परो य उपासते ।
संसारसागरादस्मादुद्धरामि तमप्यहम् ॥ ५ ॥
श्रीगजानन झणाला, जो माझा भक्त भक्तिपूर्वक मूर्तिरूपी माझी उपासना करतो तो मला मान्य आहे. अनन्यभक्ति होऊन, हृदयाची माझे ठिकाणीं योजना करून, इंद्रियसमुदाय आपल्या ताब्यांत घेऊन, सर्व भूतांचे हित करीत असणारा देखील जो मत्पर होत्साता ध्यानगम्य, अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापी, कूटस्थ [= निर्विकार], शाश्वत व अनिर्देश्य अशा माझी उपासना करतो तो देखील मजप्रत येतो. या संसारसागरापासून त्याचा देखील मी उद्धार करतो. ३-५.

अव्यक्तोपासनाद्दुःखमधिकं तेन लभ्यते ।
व्यक्तस्योपासनात्साध्यं तदेवाव्यक्तभक्तितः ॥ ६ ॥
(मात्र अव्यक्त उपासना कठिण आहे म्हणून ) अव्यक्त उपासनेचे अधिक दुःख त्याला होते. व्यक्त उपासनेच्या योगाने जे साध्य होते तेच अव्यक्त भक्तीच्या योगाने साध्य होते. ६.

भक्तिश्चैवादरश्चात्र कारणं परमं मतम् ।
सर्वेषां विदुषां श्रेष्ठो ह्यकिंचिज्ज्ञोऽपि भक्तिमान् ॥ ७ ॥
याविषयीं भक्ति आणि आदर, हेंच मुख्य कारण आहे. ज्याला कांहीं ज्ञान नाहीं तो देखील भक्तिमान् असेल तर सर्व विद्वानांपेक्षा श्रेष्ठ होय. ७.

भजन्भक्त्या विहीनो यः स चाण्डालोऽभिधीयते ।
चाण्डालोऽपि भजन्भक्त्या ब्राह्मणेभ्योऽधिको मतः ॥ ८ ॥
जो भक्तिविरहित माझी उपासना करतो त्याला चांडाल म्हणतात. चांडाल देखील भक्तिपूर्वक उपासना करीत असेल तर तो मला ब्राह्मणापेक्षा अधिक वाटतो. ८.

शुकाद्याः सनकाद्याश्च पुरा मुक्ता हि भक्तितः ।
भक्त्यैव मामनुप्राप्ता नारदाद्याश्चिरायुषः ॥ ९ ॥
भक्तीच्या योगानेच शुक, सनक इत्यादि पूर्वी मुक्त झाले. नारद आदिकरून चिरायु मुनि भक्तीच्याच योगाने मजप्रत आले. ९.

अतो भक्त्या मयि मनो विधेहि बुद्धिमेव च ।
भक्त्या यजस्व मां राजंस्ततो मामेव यास्यसि ॥ १० ॥
म्हणून मन आणि बुद्धि भक्तिपूर्वक माझे ठिकाणी ठेव. हे राजा, भक्तीने माझे यजन कर म्हणजे मजप्रतच येशील. १०.

असमर्थोऽर्पितुं स्वान्तं एवं मयि नराधिप ।
अभ्यासेन चे योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ॥ ११ ॥
हे राजा, याप्रकारें माझे ठिकाणीं मन अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास आणि योग यांचे योगानें मजकडे येण्याचा प्रयत्न कर. ११.

तत्रापि त्वमशक्तश्चेत्कुरु कर्म मदर्पणम् ।
मामनुग्रहतश्चैवं परां निर्वृतिमेष्यसि ॥ १२ ॥
याविषयी देखील तूं असमर्थ असलास तर सर्व कर्म मला अर्पण कर. याप्रकारे माझ्या अनुग्रहानें तं अत्यंत श्रेष्ठ अशी शांति पावशील. १२.

अथैतदप्यनुष्ठातुं न शक्तोऽसि तदा कुरु ।
प्रयत्‍नतः फलत्यागं त्रिविधानां हि कर्मणाम् ॥ १३ ॥
आता हे देखील करण्यास तूं समर्थ नसलास तर त्रिविध कर्माच्या फलाचा प्रयत्नतः त्याग कर. १३.

श्रेयसी बुद्धिरावृत्तेस्ततो ध्यानं परं मतम् ।
ततोऽखिलपरित्यागस्ततः शान्तिर्गरीयसी ॥ १४ ॥
कर्मापेक्षां [आवृत्ति] ज्ञान [बुद्धि] श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा सर्वाचा त्याग श्रेष्ठ आहे, सर्वत्यागापेक्षां शान्ति श्रेष्ठ आहे. १४.

निरहंममताबुद्धिरद्वेषः शरणः समः ।
लाभालाभे सुखे दुःखे मानामाने स मे प्रियः ॥ १५ ॥
अहंकार व ममत्वबुद्ध यांनी विरहित असलेला, द्वेषरहित, करुण, लाभ-अलाभ व सुख-दुःख व मान-अपमान यांचे ठिकाण सम असा असेल तो मला प्रिय आहे. १५.

यं वीक्ष्य न भयं याति जनस्तस्मान्न च स्वयम् ।
उद्वेगभीः कोपमुद्‌भीरहितो यः स मे प्रियः ॥ १६ ॥
ज्याला पाहून जन भय पावत नाहींत, जनांना पाहून जो स्वतः उद्वेग आणि भीति पावत नाहीं आणि क्रोध, आनंद व भीति यांनी जो रहित असतो तो मला प्रिय आहे. १६.

रिपौ मित्रेऽथ गर्हायां स्तुतौ शोके समः समुत् ।
मौनी निश्चलधीभक्तिरसंगः स च मे प्रियः ॥ १७ ॥
शत्रु, मित्र, निंदा, स्तुति, शोक यांचे ठिकाणीं जो समान व आनंदयुक्त असणारा, मौनी, ज्याची बुद्धि व भक्ति निश्चल आहे असा व संगरहित जो असतो तो मला प्रिय आहे. १७.

संशीलयति यश्चैनमुपदेशं मया कृतम् ।
स वन्द्यः सर्वलोकेषु मुक्तात्मा मे प्रियः सदा ॥ १८ ॥
मी केलेल्या या उपदेशाची जो संवय करतो तो सर्व लोकांमध्यें वंद्य होय, तो मुक्तात्मा होय, तो मला सर्वदा प्रिय आहे. १८.

अनिष्टाप्तौ च न द्वेष्टीष्टप्राप्तौ च न तुष्यति ।
क्षेत्रतज्ज्ञौ च यो वेत्ति समे प्रियतमो भवेत् ॥ १९ ॥
अनिष्टप्राप्ति झाली असतां जो द्वेष करीत नाहीं, इष्टप्राप्ति झाली असतां जो संतोष पावत नाहीं, क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांना जो जाणतो तो मला अत्यंत प्रिय आहे. १९.

वरेण्य उवाच -
किं क्षेत्रं कश्च तद्वेत्ति किं तज्ज्ञानं गजानन ।
एतदाचक्ष्व मह्यं त्वं पृच्छते करुणाम्बुधे ॥ २० ॥
वरेण्य म्हणाला, हे गजानना, क्षेत्र म्हणजे काय, ते कोण जाणतो, त्याचे ज्ञान म्हणजे काय, हे विचारणार्‍या मला हे करुणसागरा, तू सांग. २०.

श्रीगजानन उवाच -
पञ्च भूतानि तन्मात्राः पञ्च कर्मेन्द्रियाणि च ।
अहंकारो मनो बुद्धिः पञ्च ज्ञानेन्द्रियाणि च ॥ २१ ॥
इच्छाव्यक्तं धृतिद्वेषौ सुखदुःखे तथैव च ।
चेतनासहितश्चायं समूहः क्षेत्रमुच्यते ॥ २२ ॥
गजानन म्हणाला, पांच महाभूतें, गंध इत्यादि त्यांच्या पांच मात्रा, पांच कर्मेंद्रियें, अहंकार, मन, बुद्धि, पांच ज्ञानेंद्रिये, इच्छा, अव्यक्त, धैर्य, द्वेष, सुख, दुःख आणि चेतना या समूहाला क्षेत्र म्हणतात. २१-२२.

तज्ज्ञं त्वं विद्धि मां भूप सर्वान्तर्यामिणं विभुम् ।
अयं समूहोऽहं चापि यज्ज्ञानविषयौ नृप ॥ २३ ॥
हे भूपा, सर्वान्तर्यामी सर्वव्यापी असा याचा ज्ञाता - हा समूह आणि मी देखील हे नृपा, ज्याच्या ज्ञानाचे विषय झालो आहों असा क्षेत्रज्ञ वस्तुतः मीच आहे असे जाण. २३.

आर्जवं गुरुशुश्रूषा विरक्तिश्चेन्द्रियार्थतः ।
शौचं क्षान्तिरदम्भश्च जन्मादिदोषवीक्षणम् ॥ २४ ॥
समदृष्टिर्दृढा भक्तिरेकान्तित्वं शमो दमः ।
एतैर्यच्च युतं ज्ञानं तज्ज्ञानं विद्धि बाहुज ॥ २५ ॥
हे क्षत्रिया, सरलता, गुरूपासून ज्ञान श्रवण करण्याची इच्छा, इंद्रियांच्या विषयांपासून विरक्ति, शौच, शान्ति, दंभाचा अभाव, जन्म व मृत्यु इत्यादि दोष आहेत असे पहाणे, समान दृष्टि, दृढ भक्ति, एकान्तवास, शम, दम यांनी युक्त जें ज्ञान ते खरें ज्ञान असें जाण. २४-२५.

तज्ज्ञानविषयं राजन्ब्रवीमि त्वं शृणुष्व मे ।
यज्ज्ञात्वैति च निर्वाणं मुक्त्वा संसृतिसागरम् ॥ २६ ॥
हे राजा, त्या ज्ञानाचा विषय, जो जाणला असतां संसारसागर सोडून मनुष्य मोक्ष पावतो - तो मी तुला सांगतो, ऐक. २६.

यदनादीन्द्रियैर्हीनं गुणभुग्गुणवर्जितम् ।
अव्यक्तं सदसद्‌भिन्नमिन्द्रियार्थावभासकम् ॥ २७ ॥
विश्वभृच्चाखिलव्यापि त्वेकं नानेव भासते ।
बाह्याभ्यन्तरतः पूर्णमसंगं तमसः परम् ॥ २८ ॥
दुर्ज्ञेयं चातिसूक्ष्मत्वाद्दीप्तानामपि भासकम् ।
ज्ञेयमेतादृशं विद्धि ज्ञानगम्यं पुरातनम् ॥ २९ ॥
जें अनादि, इंद्रियरहित गुण भोगणारे, पण गुणांनीं विरहित, अव्यक्त, सत् व असत या दोहोंहूनहि वेगळे, इंद्रियें व त्यांचे विषय प्रकाशित करणारें, विश्वाचे पालन करणारें, सर्वव्यापी, एक असून नाना प्रकारांनी भासमान होणारें, बाह्यतः व आन्तरतः पूर्ण असलेलें, संगरहित, अंधकाराच्या पलीकडे असलेलें, अति सूक्ष्मत्वामुळे जाणण्याला कठिण, प्रकाशमान वस्तूंना देखील प्रकाशित करणारे, असे ते ज्ञानानेच समजणारे पुरातन ज्ञेय [ म्ह० ज्ञानाचा विषय ] आहे असें जाण. २७-२९.

एतदेव परं ब्रह्म ज्ञेयमात्मा परोऽव्ययः ।
गुणान्प्रकृतिजान्भुङ्क्ते पुरुषः प्रकृतेः परः ॥ ३० ॥
हेच अत्यंत श्रेष्ठ [परं] ब्रह्म, ज्ञेय व नाशरहित अत्यंत श्रेष्ठ [ परः] आत्मा होय. प्रकृतीहून वेगळा असलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न होणार्‍या गुणांचा भोग घेतो. ३०.

गुणैस्त्रिभिरियं देहे बध्नाति पुरुषं दृढम् ।
यदा प्रकाशः शान्तिश्च वृद्धे सत्त्वं तदाधिकम् ॥ ३१ ॥
ही (प्रकृति म्हणजे माया) पुरुषाला तीन गुणांनीं देहाचे ठिकाणी बंधन करते. जेव्हां ज्ञान आणि क्षमा यांची वृद्धि झालेली असते तेव्हां सत्त्वगुण अधिक असतो. ३१.

लोभोऽशमः स्पृहारम्भः कर्मणां रजसो गुणः ।
मोहोऽप्रवृत्तिश्चाज्ञानं प्रमादस्तमसो गुणः ॥ ३२ ॥
लोभ, चित्त शान्त नसणे, इच्छा आणि कर्मांची आरंभ असतात तेव्हां रजोगुण अधिक असतो. मोह, अप्रवृत्ति, अज्ञान आणि प्रमाद असतात तेव्हां तमोगुण अधिक असतो. ३२.

सत्त्वाधिकः सुखं ज्ञानं कर्मसंगं रजोऽधिकः ।
तमोऽधिकश्च लभते निद्रालस्यं सुखेतरत् ॥ ३३ ॥
सत्त्वगुण अधिक असलेल्या मनुष्याला सुख व ज्ञान मिळते. रजोगुण अधिक असलेल्या मनुष्याला कर्माची संसक्ति प्राप्त होते. तमोगुण अधिक असलेल्या मनुष्याला निद्रा, आलस्य आणि सुखरहितता मिळते. ३३.

एषु त्रिषु प्रवृद्धेषु मुक्तिसंसृतिदुर्गतीः ।
प्रयान्ति मानवा राजंस्तस्मात्सत्त्वयुतो भव ॥ ३४ ॥
हे तीन गुण वृद्धि पावले असतां मनुष्य अनुक्रमें मुक्ति, संसार आणि दुर्गति यांप्रत जातात. म्हणून हे राजा, सत्त्वगुणयुक्त हो. ३४.

ततश्च सर्वभावेन भज त्वं मां नरेश्वर ।
भक्त्या चाव्यभिचारिण्या सर्वत्रैव च संस्थितम् ॥ ३५ ॥
नंतर हे नरेशा, सर्व भावानें सर्वत्र स्थित असलेल्या माझी अव्यभिचारिणी भक्तीनें भक्ति कर. ३५.

अग्नौ सूर्ये तथा सोमे यच्च तारासु संस्थितम् ।
विदुषि ब्राह्मणे तेजो विद्धि तन्मामकं नृप ॥ ३६ ॥
हे नृपा, अग्नि, सूर्य, चंद्र, तारा, विद्वान् ब्राह्मण यांचे ठिकाण जें तेज असते ते माझे आहे असे जाण. ३६.

अहमेवाखिलं विश्वं सृजामि विसृजामि च ।
औषधीस्तेजसा सर्वा विश्वं चाप्याययाम्यहम् ॥ ३७ ॥
सर्व विश्वाची मीच उत्पत्ति करतों व नाश करतों. सर्व औषधी व विश्व यांना तेजाने युक्त करतो. ३७.

सर्वेन्द्रियाण्यधिष्ठाय जाठरं च धनंजयम् ।
भुनज्मि चाखिलान्भोगान्पुण्यपापविवर्जितः ॥ ३८ ॥
सर्व इंद्रियांचे ठिकाणीं अधिष्ठान करून आणि जठरांतील धनंजय अग्नीचे ठिकाणीं अधिष्ठान करून मी पुण्य व पाप यांनी रहित होत्साता सर्व भोग भोगतों. ३८.

अहं विष्णुश्च रुद्रश्च ब्रह्मा गौरी गणेश्वरः ।
इन्द्राद्या लोकपालाश्च ममैवांशसमुद्‌भवाः ॥ ३९ ॥
मी विष्णु आहें, रुद्र आहें, ब्रह्मदेव, गौरी, गणेश आहें. इंद्रादि लोकपाल देखील माझ्याच अंशापासून उत्पन्न झालेले आहेत. ३९.

येन येन हि रूपेण जनो मां पर्युपासते ।
तथा तथा दर्शयामि तस्मै रूपं सुभक्तितः ॥ ४० ॥
ज्या ज्या रूपाने लोक माझी उपासना करतात त्या त्या प्रकारें त्यांच्या उत्कृष्ट भक्तीच्या योगाने माझे तें तें रूप मी त्यांना दाखवितों. ४०.

इति क्षेत्रं तथा ज्ञाता ज्ञानं ज्ञेयं मयेरितम् ।
अखिलं भूपते सम्यगुपपन्नाय पृच्छते ॥ ४१ ॥
हे भूपते, योग्य तर्‍हेने मजप्रत आलेल्या व प्रश्न करणार्‍या तुला याप्रकारे क्षेत्र, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे सर्व मी सांगितले. ४१.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेकयोगो नाम नवमोऽध्यायः ॥
क्षेत्रज्ञातृज्ञेयविवेकयोग नामक नववा अध्याय समाप्त ॥ ९ ॥





GO TOP