॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ गणेशगीता ॥

॥ सप्तमोऽध्यायः - अध्याय सातवा - उपासनायोगः ॥

वरेण्य उवाच -
का शुक्ला गतिरुद्दिष्टा का च कृष्णा गजानन ।
किं ब्रह्म संसृतिः का मे वक्तुमर्हस्यनुग्रहात् ॥ १ ॥
वरेण्य म्हणाला, हे गजानना, शुक्ल गति कशाला म्हणतात ? कृष्ण गति कोणती ? ब्रह्म कोणते ? संसार कोणता ? कृपा करून हे मला सांगण्याला तू योग्य आहेस. १.

श्रीगजानन उवाच -
अग्निर्ज्योतिरहः शुक्ला कर्मार्हमयनं गतिः ।
चान्द्रं ज्योतिस्तथा धूमो रात्रिश्च दक्षिणायनम् ॥ २ ॥
कृष्णैते ब्रह्मसंसृत्योरवाप्तेः कारणं गती ।
दृश्यादृश्यमिदं सर्वं ब्रह्मैवेत्यवधारय ॥ ३ ॥
श्रीगजानन म्हणाला, अग्नि, सूर्यप्रकाश, दिवस आणि कर्म करण्याला योग्य असे अयन [ म्ह० उत्तरायण ] ही शुक्ल गति होय. कृष्णपक्ष, चंद्रप्रकाश, धूमयुक्त अग्नि, रात्र आणि दक्षिणायन ही कृष्ण गति होय. या दोन गती अनुक्रमें ब्रह्म आणि संसार यांना कारणे आहेत. हे दृश्य व अदृश्य सर्व जग ब्रह्म होय असे जाण. २-३.

क्षरं पञ्चात्मकं विद्धि तदन्तरक्षरं स्मृतम् ।
उभाभ्यां यदतिक्रान्तं शुद्धं विद्धि सनातनम् ॥ ४ ॥
पंचभूतात्मक जें ते क्षर व त्याच्या आंत असणारे तें अक्षर. या दोहोंच्याहि जें पलीकडचे ते शुद्ध व सनातन ब्रह्म असे जाण, ४.

अनेकजन्मसंभूतिः संसृतिः परिकीर्तिता ।
संसृतिं प्राप्नुवन्त्येते ये तु मां गणयन्ति न ॥ ५ ॥
अनेक जन्मांमध्ये उत्पत्ति होणे याला संसार म्हणतात. जे मजकडे लक्ष देत नाहीत ते संसाराप्रत येतात. ५.

ये मां सम्यगुपासन्ते परं ब्रह्म प्रयान्ति ते ।
ध्यानाद्यैरुपचारैर्मां तथा पञ्चामृतादिभिः ॥ ६ ॥
स्नानवस्त्राद्यलंकारसुगन्धधूपदीपकैः ।
नैवेद्यैः फलतांबूलैर्दक्षिणाभिश्च योऽर्चयेत् ॥ ७ ॥
भक्त्यैकचेतसा चैव तस्येष्टं पूरयाम्यहम् ।
एवं प्रतिदिनं भक्त्या मद्‌भक्तो मां समर्चयेत् ॥ ८ ॥
अथवा मानसीं पूजां कुर्वीत स्थिरचेतसा ।
अथवा फलपत्राद्यैः पुष्पमूलजलादिभिः ॥ ९ ॥
पूजयेन्मां प्रयत्‍नेन तत्तदिष्टं फलं लभेत् ।
त्रिविधास्वपि पूजासु श्रेयसी मानसी मता ॥ १० ॥
जे माझी योग्य प्रकारें उपासना करतात ते ब्रह्म पावतात. ध्यान आदिकरून उपचारांनी, तसेच पंचामृतादिकांनी, स्नान, वस्त्रे, अलंकार, सुगंध, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल आणि दक्षिणा यांनीं भक्तिपूर्वक एकचित्ताने जो माझे अर्चन करतो त्याची इच्छा मी पूर्ण करतो. याप्रमाणे प्रत्येक दिवशीं जो भक्त भक्तीने माझे अर्चन करतो अथवा स्थिर चित्ताने मानस पूजा करतो अथवा फल, पत्र, पुष्प, मूल, उदक इत्यादिकांनी प्रयत्नाने माझी पूजा करतो त्याला ते ते इष्ट फल प्राप्त होते. तिन्ही प्रकारच्या पूजांमध्ये मानसपूजा श्रेष्ठ मानली आहे. ६-१०.

साप्युत्तमा मता पूजानिच्छया या कृता मम ।
ब्रह्मचारी गृहस्थो वा वानप्रस्थो यतिश्च यः ॥ ११ ॥
एकां पूजां प्रकुर्वाणोऽप्यन्यो वा सिद्धिमृच्छति ।
मदन्यदेवं यो भक्त्या द्विषन्मामन्यदेवताम् ॥ १२ ॥
सोऽपि मामेव यजते परं त्वविधितो नृप ।
यो ह्यन्यदेवतां मां च द्विषन्नन्यां समर्चयेत् ॥ १३ ॥
याति कल्पसहस्रं स निरयान्दुःखभाक् सदा ।
भूतशुद्धिं विधायादौ प्राणानां स्थापनं ततः ॥ १४ ॥
माझी इच्छारहित जी पूजा करतात ती देखील उत्तम पूजा मानली आहे. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यति अथवा इतर कोणीहि एक प्रकारची पूजा केल्याने देखील सिद्धि पावतो. माझा अथवा इतर देवतेचा द्वेष करणारा जो माझ्याहून इतर देवाचे पूजन करतो तो देखील वस्तुतः माझेच पूजन करतो. पण हे राजा, ते अविधियुक्त पूजन होय. इतर देवतेचा अथवा माझा द्वेष करणारा असून जो दुसर्‍या कोणत्याहि देवतेची पूजा करीत नाहीं तो सर्वदा दुःखभाक् होत्साता हजारों कल्पांपर्यंत नरकांप्रत जातो. अगोदर भूतशुद्धि [ माती, उदक इत्यादिकांची शुद्ध करून ] नंतर प्राणांची [ शरीरांतील वायूंची ] स्थापना करावी. ११-१४.

आकृष्य चेतसो वृत्तिं ततो न्यासमुपक्रमेत् ।
कृत्वान्तर्मातृकान्यासं बहिश्चाथ षडङ्‌गकम् ॥ १५ ॥
नंतर चित्ताच्या वृत्तीचें आकर्षण करून न्यासाला आरंभ करावा. अन्तर्मातृकान्यास करून षडंग असा बहिर्मातृकान्यास करावा. १५.

न्यासं च मूलमन्त्रस्य ततो ध्यात्वा जपेन्मनुम् ।
स्थिरचित्तो जपेन्मन्त्रं यथा गुरुमुखागतम् ॥ १६ ॥
मूलमंत्राचा न्यास कृरून नंतर ध्यान करावें व मंत्राचा जप करावा. जसा गुरुमुखाने प्राप्त झालेला असेल तसा मंत्र स्थिरचित्त होऊन जपावा. १६.

जपं निवेद्य देवाय स्तुत्वा स्तोत्रैरनेकधा ।
एवं मां य उपासीत स लभेन्मोक्षमव्ययम् ॥ १७ ॥
जप केल्यावर देवाला अर्पण करून स्तोत्रांनी अनेक प्रकारे स्तुति करावी. याप्रकारे जो माझी उपासना करतो त्याला शाश्वत मोक्ष प्राप्त होतो. १७,

य उपासनया हीनो धिङ्नरो व्यर्थजन्मभाक् ।
यज्ञोऽहमौषधं मंत्रोऽग्निराज्यं च हविर्हुतम् ॥ १८ ॥
ध्यानं ध्येयं स्तुतिं स्तोत्रं नतिर्भक्तिरुपासना ।
त्रयीज्ञेयं पवित्रं च पितामहपितामहः ॥ १९ ॥
ॐकारः पावनः साक्षी प्रभुर्मित्रं गतिर्लयः ।
उत्पत्तिः पोषको बीजं शरणं वास एव च ॥ २० ॥
असन्मृत्युः सदमृतमात्मा ब्रह्माहमेव च ।
दानं होमस्तपो भक्तिर्जपः स्वाध्याय एव च ॥ २१ ॥
जो मनुष्य उपासनाहीन त्याला धिक्कार असो. तो व्यर्थ जन्म पावला. मी यज्ञ आहे, औषध आहे, मंत्र, अग्नि, राज्य, हविर्द्रव्य, हवन, ध्यान, ध्येय (देवता ), स्तुति, स्तोत्र, नमन, भक्ति, उपासना, वेदांनी जाणण्याला योग्य असे पवित्र (ब्रह्म), पितामहाचा [ब्रह्मदेवाचा] देखील पितामह, पवित्र करणारा ॐकार, साक्षी, प्रभु, मित्र, गति, नाश, उत्पत्ति, पोषक, बीज, शरणस्थान, निवास, असत् मृत्यु, सत् मृत्युराहित्य (अथवा मोक्ष ), ब्रह्म, दान, होम, तप, भक्ति, जप, स्वाध्याय ही सर्व मी आहे. १८-२१,

यद्यत्करोति तत्सर्वं स मे मयि निवेदयेत् ।
योषितोऽथ दुराचाराः पापास्त्रैवर्णिकास्तथा ॥ २२ ॥
मदाश्रया विमुच्यन्ते किं मद्‌भक्त्या द्विजादयः ।
न विनश्यति मद्‌भक्तो ज्ञात्वेमा मद्विभूतयः ॥ २३ ॥
भक्त जें जें करील तें तें सर्व त्याने मला अर्पण करावे. स्त्रिया, तसेच दुराचारी अथवा पापी क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र हे माझा आश्रय केला असतां मुक्त होतात. मग माझ्या भक्तीने ब्राह्मण मुक्त होतील हे कशास सांगावयास पाहिजे ? या माझ्या विभूती जाणणारा माझा भक्त नाश पावत नाहीं. २२-२३.

प्रभवं मे विभूतिश्च न देवा ऋषयो विदुः ।
नानाविभूतिभिरहं व्याप्य विश्वं प्रतिष्ठितः ॥ २४ ॥
देव अथवा ऋषि माझी उत्पत्ति व या विभूति जाणत नाहीत. नानाप्रकारच्या विभूतींनीं विश्व व्यापून मी स्थित आहे. २४.

यद्यच्छ्रेष्ठतमं लोके स विभूतिर्निबोध मे ॥ २५ ॥
जगामध्ये जें जें अत्यंत श्रेष्ठ ते ते माझी विभूति आहे असे जाण. २५.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
उपासनायोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥
उपासनायोग नामक सातवा अध्यायः समाप्त ॥ ७ ॥





GO TOP