श्रीमद् भगवद्‌गीता
चतुर्थोऽध्यायः

कर्मयोगः


गीतेचा संप्रदाय.

कर्मयोग हा ज्याचा उपाय आहे, असा संन्यासासह ज्ञाननिष्ठारूप योग गेल्या दोन अध्यायाने सांगितला. त्या निष्ठाद्वयात्मक योगांत प्रवृत्तिलक्षण व निवृत्तिलक्षण वेदार्थ सर्वप्रकारे अंतर्भूत झाला आहे आणि पुढील सर्व गीताध्यायांमध्यें हाच साधनासह ज्ञाननिष्ठारूप योग सांगावयाचा आहे. म्हणून या गेल्या दोन अध्यायांत वेदार्थ पूर्णपणे समाप्त झाला आहे - त्यांत अंतर्भूत झाला आहे, असें मानणारे भगवान् त्या योगाची संप्रदायाच्या कथनाने स्तुति करतात.

श्रीभगवानुवाच -
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ ४-१ ॥

अन्वय : इमं अव्ययं योगम् - हा अविनाशी योग; अहं विवस्वते प्रोक्तवान् - मी सूर्याला सांगितला होता; विवस्वान् मनवे प्राह - सूर्याने तो योग आपला पुत्र वैवस्वत मनू याला सांगितला; (च) मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत् - आणि मनूने आपला पुत्र इक्ष्वाकू राजाला सांगितला. ॥ १ ॥

व्याख्या : अहं भगवान्‌ वासुदेवः इमं अध्यायद्वयेनोक्तं योगं कर्मनिष्ठोपायलभ्यं ज्ञाननिष्ठालक्षणयोगं विवस्वते विवांसि किरणाः विद्यंते यस्य सः विवस्वान्‌ तस्मै विवस्वते सर्वक्षत्रियवंशबीजभूताय सूर्याय प्रोक्तवान्‌ प्रकर्षेण सर्वसंशयच्छेदादिरूपेण उक्तवान्‌ कथितवान्‌ । सः मम शिष्यः विवस्वान्‌ सूर्यः मनवे वैवस्वताय स्वपुत्राय प्राह उक्तवान्‌ । मनुः वैवस्वतमनुः इक्ष्वाकवे स्वपुत्राय आदिराजाय अब्रवीत्‌ कथयामास । वैवस्वतमन्वंतराभिप्रायेण आदित्यमारभ्य संप्रदायो गणितः । कथंभूतं योगम्‌ । अव्ययं न विद्यते व्ययो नाशः यस्य सः अव्ययः तं अव्ययम्‌ ॥ १ ॥

अर्थ : भगवान् म्हणतात - मीं हा अक्षय फळ देणारा ज्ञानयोग आदित्याला सांगितला. त्या आदित्याने मनूला सांगितला. मनूने इक्ष्वाकु नांवाच्या आदित्यराजाला - आपल्या पुत्राला सांगितला. इश्वाकु हा सूर्यवंशांतील पहिला राजा आहे.

विवरण :


एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेन इह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥

अन्वय : परन्तप एवं परम्पराप्राप्तम् - हे परंतप अर्जुना अशाप्रकारे परंपरेने प्राप्त; इमं राजर्षयः विदुः - हा योग राजर्षींनी जाणला; सः योगः महता कालेन - परंतु त्यानंतर तो योग काळाच्या मोठ्या ओघात; इह नष्टः - या पृथ्वीलोकावर जवळजवळ नाहीसा झाला. ॥ २ ॥

व्याख्या : हे परंतप ! परान्‌ बाह्यशत्रून्‌ अथवा कमक्रोधादीन्‌ तापयतीति परंतपः तत्संबुद्धौ हे परंतप हे जितेंद्रिय ! एवं पूर्वोक्तप्रकारेण राजर्षयः राजानश्च ते ऋषयश्च राजर्षयः निमिप्रमुखाः परंपराप्राप्तं परंपरया आदित्यमारभ्य गुरुशिष्यपरंपरया प्राप्तः परंपराप्राप्तः तं इमं योगं विदुः जानंति । सः महाप्रयोजनः योगः महता दीर्घेण कालेन इह लोके नष्टः बभूव विच्छिन्नो बभूव ॥ २ ॥

अर्थ : याप्रमाणे क्षत्रियांच्या परंपरेने प्रास झालेल्या या योगास राजर्षि जाणते झाले, त्यांनीं या योगाचे अनुष्ठान केले. पण हे अर्जुना, मध्ये पुष्कळ काल निघून गेल्यामुळे तो योग आज संप्रदायरहित झाला आहे. याप्रमाणे क्षत्रियांच्या परंपरेने अनादिकालापासून चालत आलेल्या या योगाला राजर्षि जाणत होते. ऐश्वर्यसंपन्न असून सूक्ष्म अर्थ जाणण्यास समर्थ असणे हें राजर्षित्व होय. पण सांप्रतकालीं मध्यें दीर्घकाल लोटक्यामुळे त्या योगाचा संप्रदाय अविच्छन्न राहिला नाहीं. क्षत्रिय पित्याने आपल्या पुत्राला तो योग सांगावयाचा, त्याने आपल्या पुत्राला, अशी जी या योगाची परंपरा चालली होती, ती आतां राहिली नाहीं. ती परंपरा तुटली.

विवरण :


स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ४-३ ॥

अन्वय : (त्वं) मे भक्तः च सखा असि - तू माझा भक्त आणि प्रिय मित्र आहेस; इति सः एव अयं पुरातनः योगः - म्हणून तोच हा पुरातन योग; अद्य मया ते प्रोक्तः - आज मी तुला सांगितला आहे; हि एतत् उत्तमम् रस्यम् - कारण हे मोठेच उत्तम रहस्य आहे म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य असा विषय आहे. ॥ ३ ॥

व्याख्या : स एव पुरातन एव अयं योगः मया अतिकृपालुना अद्य संप्रदायविच्छेदकाले ते तुभ्यं प्रोक्तः कथितः । कस्मात्‌ कारणात्‌ इति हेतोः त्वं मे मम भक्तः असि चेत्यपरं सखा असि अतः हेतोः तुभ्यं उक्तः अन्यस्मै नोक्तः । हि यस्मात्‌ एतत्‌ ज्ञानं उत्तमं रहस्यं अतिगोप्यं अस्ति कथंभूतः योगः । पुरातनः गुरुपरंपरया आगतः ॥ ३ ॥

अर्थ : ’पण क्षत्रिय प्रजा अजितेंद्रिय निपजल्यामुळे हा योग नष्ट झाला व लोक पुरुपार्थहीन झाले, असें पाहून मीं तोच हा योग आज तुला सांगितला’ असे सुचविण्यासाठी भगवान् म्हणतात - तोच हा पुरातन योग मी तुला आज सांगितला. तें कां ? तर तूं माझा भक्त व सखा आहेस म्हणून सांगितला. कारण हे उत्तम रहस्थ-ज्ञान आहे.

विवरण :


कृष्णाच्या अनीश्वरत्वाविषयीं शंका व तिचे समाधान.

भगवान् हें भलतेंच कांहीं तरी सांगत आहेत, अशी कोणाची कल्पना होऊं नये, म्हणून अर्जुन म्हणाला -

अर्जुन उवाच -
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥

अन्वय : भवतः जन्म अपरम् - तुमचा जन्म तर अर्वाचीन, अलीकडच्या काळातील आहे; (च) विवस्वतः जन्म परम् - आणि सूर्याचा जन्म फार प्राचीन आहे म्हणजे कल्पाच्या आरंभी झालेला होता तर मग; इति कथं विजानीयाम् - ही गोष्ट मी कशी समजू की; त्वं आदौ (सूर्यम्) एतत् प्रोक्तवान् - तुम्हीच कल्पाच्या आरंभी सूर्याला हा योग सांगितला होता. ॥ ४ ॥

व्याख्या : हे कृष्ण ! भवतः तव जन्म वसुदेवगृहे शरीरग्रहणं अपरं अल्पकालीनं अस्ति । विवस्वतः सूर्यस्य जन्म परं बहुकालीनं अस्ति । त्वं आदौ प्रथमं विवस्वते सूर्याय योगं प्रोक्तवान्‌ इति एवं अहं एतत्‌ त्वद्वाक्यं कथं विजानीयाम्‌ कथं ज्ञातुं शक्नुयाम्‌ ? ॥ ४ ॥

अर्थ : आपला जन्म अलीकडचा - कांहीं वर्षांपूर्वी झालेला व सूर्याचा जन्म सृष्टीच्या आरंभीं, फार प्राचीन् कालीं झालेला. तेव्हा तूंच आरंभीं हा योग सूर्याला सांगितलास अशा प्रकारचे हे तुझे अनुपपन्न वचन मी सत्य कसे मानावे ! अर्जुनाचा हा प्रश्न भगवानांच्या निजस्वरूपाला अनुलक्षून नाहीं. तर लोकदृष्टया भगवानांनी जे मानुषशरीर धारण केलें आहे, त्याला उद्देशून आहे.

विवरण :


श्रीभगवानुवाच -
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥

अन्वय : परन्तप अर्जुन, मे च तव - हे परंतपा अर्जुना, माझे आणि तुझे; बहूनि जन्मानि व्यतीतानि - पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत; तानि सर्वणि तं न वेत्थ - ते सर्व तू जाणत नाहीस; (किन्तु) अहं वेद - परंतु मी जाणतो. ॥ ५ ॥

व्याख्या : हे अर्जुन ! मे मम बहूनि असंख्यातानि जन्मानि लीलादेहग्रहणानि व्यतीतानि अतिक्रांतानि संति । चेत्यपरं तव जन्मानि बहूनि व्यतितानि अतिक्रांतानि संति । हे परंतप ! परं शत्रुं भेददृष्ट्या परिकल्प्य हंतुं प्रवृत्तोसि । हे भांतबुद्धे ! अहं सर्वज्ञः सर्वशक्तिः ईश्वरः सर्वाणि मदीयानि त्वदीयानि च तानि जन्मानि वेद जानामि । त्वं अज्ञः जीवः तिरोभूतज्ञानशक्तिः अत एव तानि जन्मानि न वेत्थ न जानासि ॥ ५ ॥

अर्थ : भगवान् वासुदेव आपल्याविषयी 'हा ईश्वर नाहीं, सर्वज्ञ नाहीं' अशीं जी मूर्खाची शंका तिचा परिहार करीत होत्साते म्हणतात - हे अर्जुना, माझे व तुझे पुष्कळ जन्म मागे होऊन गेले आहेत. पण मी ते सर्व जाणतों व तूं जाणत नाहीस. तुझी ज्ञानशक्ति धर्म, अधर्म, राग-द्वेष-लोभ इत्यादिकांमुळें प्रतिबद्ध झाली आहे. पण मी नित्यस्वभाव, शुद्धस्वभाव, ज्ञानस्वभाव व मुक्तस्वभाव असल्यामुळें माझी ज्ञानशक्ति आवरणरहित आहे. त्यामुळे हे शत्रुतापना, मी माझ्या मागील जन्मांना जाणतों. मला त्रिकालज्ञान आहे. पण तुझी ज्ञानशक्ति आवृत झाली असध्यामुळें तूं ते जाणत नाहीस.

विवरण :


अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥

अन्वय : (अहं) अजः (च) अव्ययात्मा - मी जन्मरहित आणि अविनाशी स्वरूप असणारा; सन् अपि - असून सुद्धा; (तथा) भूतानां ईश्वरः सन् अपि - तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही; स्वां प्रकृतिं अधिष्ठाय - स्वतःच्या प्रकृतीला अधीन करून घेऊन; आत्ममायया सम्भवामि - आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. ॥ ६ ॥

व्याख्या : अहं सर्वज्ञः अजोपि सन्‌ जायते उत्पन्नो भवत्यसौ जः न जः अजः अजोपि अजन्मा सन्नपि चेत्यपरं अव्ययात्मा अनश्वरस्वभावः सन्नपि चेत्यपरं भूतानां ब्रह्मादिस्तंबपर्यंतानां जीवानां ईश्वरः कर्मपारतंत्र्यरहितः सन्नपि स्वां शुद्धसत्त्वात्मिकां प्रकृतिं मायां अधिष्ठाय स्वीकृत्य आत्ममायया आत्मनः अप्रच्युतज्ञानबलवीर्यस्य माया शक्तिः आत्ममाया तया संभवामि अवतरामि ॥ ६ ॥

अर्थ : 'पण तुज नित्य ईश्वरालाहि धर्माधर्माच्या अभावीं जन्म कां घ्यावा लागतो व तूं तो कसा घेतोस' म्हणून विचारशील तर सांगतों- मी सर्वसाक्षी जन्मरहित असूनहि, माझें ज्ञानशक्तिस्वरूप कधींहि क्षीण न होणारे असे असूनहि, मी आब्रह्मस्तंबपर्यंत भूतांचा ईश्वर, नियमन करणारा असून आपल्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीला स्वाधीन ठेवून आपल्या अचिंत्य सामरथ्यानें जणुकाय देहवान् असल्यासारखा होतों.

विवरण :


भगवद् अवताराचें निमित्त व कार्य.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥

अन्वय : भारत, यदा यदा धर्मस्य ग्लानिः - हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माची हानि; (च) अधर्मस्य अभ्युत्थानं भवति - आणि अधर्माची वृद्धी होते; तदा हि अहं आत्मानं सृजामि - तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो. ॥ ७ ॥

व्याख्या : हे भारत ! हे भरतवंशोद्‍भव ! यदा यदा यस्मिन्‌ यस्मिन्‌ काले धर्मस्य वेदविहितस्य धर्मस्य ग्लानिः हानिः भवति । हीति निश्चयेन । अधर्मस्य वेदनिषिद्धस्य अधर्मस्य अभ्युत्थानं आधिक्यं भवति तदा तदा तस्मिन्‌ तस्मिन्‌ काले अहं आत्मानं देहं सृजामि दर्शयामि ॥ ७ ॥

अर्थ : आता तो मायिक जन्म केव्हां होतो, तें सांगतों- हे भरतकुलोत्पन्ना, जेव्हां जेव्हां धर्माची हानि व अधर्माचा उद्‌भव होतो, त्यावेळीं मी कूटस्थ आत्मा स्वताला पूर्वोक्त प्रकारे उत्पन्न करितों. वर्ण, आश्रम, त्यांचा आचार, यावरून ज्ञात होणार्‍या धर्माची हानि झाली असतां लोक पुरुषार्थहीन होतात व त्यांची प्रवृत्ति स्वभावतःच अधर्माकडे होते. अशा वेळी मी मायेने शरीर धारण करितो.

विवरण :


परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

अन्वय : साधूनां परित्राणाय - साधु पुरुषांचा उद्धार करण्यासाठी; दुष्कृतां विनाशाय - पापकर्म करणार्‍यांचा विनाश करण्यासाठी; च धर्मसंस्थापनार्थाय - आणि धर्माची चांगल्याप्रकारे स्थापना करण्यासाठी; युगे युगे सम्भवामि - युगायुगात मी प्रकट होतो. ॥ ८ ॥

व्याख्या : अहं धर्मरक्षकः साधूनां स्वधर्मवर्तिनां परित्राणाय सर्वप्रकारेण रक्षणाय चेत्यपरं दुष्कृतां दुष्टं कर्म कुर्वंति ते दुष्कृतः तेषां विनाशाय वधाय चेत्यपरं धर्मसंस्थापनार्थाय धर्मस्य संस्थापनं धर्मसंस्थापनं धर्मसंस्थापनस्य अर्थः धर्मसंस्थापनार्थः तस्मै धर्मसंस्थापनार्थाय साधुरक्षणेन दुष्टवधेन धर्मं स्थिरीकर्तुं युगे युगे तस्मिन्‌ तस्मिन्‌ अवसरे सांभवामि अवतारं गृह्णामि ॥ ८ ॥

अर्थ : तो कशासाठीं होतो, म्हणून विचारशील तर तेंहि सांगतों- सन्मार्गस्थाचें सर्वप्रकारें रक्षण करण्यासाठी, पाप्यांचा विनाश करण्यासाठीं आणि वर्णाश्रमधर्मांचे उत्तमप्रकारें स्थापन करण्यासाठी मी प्रत्येक युगांत उत्पन्न होतों. धर्माची स्थापना लेल्यानें जगाची स्थापना केल्यासारखी होते. नाहीं तर धर्ममर्यादेनें रहित असलेलें जगत् पुरुषार्थांपासून च्यूत होईल.

विवरण :


जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥

अन्वय : अर्जुन मे जन्म च कर्म दिव्यम् - हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य म्हणजे निर्मल व अलौकिक आहेत; एवं यः तत्त्वतः वेत्ति - अशाप्रकारे जो पुरुष तत्त्वतः जाणून घेतो; सः देहं त्यक्त्वा - तो शरीराचा त्याग केल्यावर; पुनः जन्म न एति - पुनर्जन्माला येत नाही; माम् एति - तो मलाच प्राप्त करून घेतो. ॥ ९ ॥

व्याख्या : हे अर्जुन ! यः पुरुषः मे मम जन्म स्वेच्छाकृतं अवतारादि चेत्यपरं कर्म धर्मपालनरूपं च दिव्यं अलौकिकं तत्त्वतः शुद्धसच्चिदानंदरूपज्ञानेन एवंप्रकारेण वेत्ति जानाति सः पुरुषः देहं देहाभिमानं त्यक्त्वा पुनः जन्म नैति न प्राप्नोति । किं तु मां भगवंतं एति प्राप्नोति ॥ ९ ॥

अर्थ : जो माझा वर सांगितलेल्या प्रकारचा अलौकिक जन्म व कर्म यथार्थ जाणतो, तो वर्तमान देहाचा त्याग करून पुनर्जन्मास प्राप्त होत नाहीं, तर हे अर्जुना, तो श्रेष्ठ पुरुष मला प्राप्त होतो. ईश्वराचा जन्म मायामय आहे, खरा नव्हे. जगत्परिपालन हें त्याचेंच कर्म आहे, दुसर्‍या कोणाचें नव्हे, असें जाणणार्‍या पुरुषाला श्रेयःप्राप्ति होते. पण याच्या उलट ईश्वराचा जन्म खराच आहे व जगत्यरिपालनादि कर्म क्षत्रियांचें आहे, असे जो जाणतो, त्याच्या जन्मादि संसाराची परंपरा तुटत नाहीं.

विवरण :


या मार्गाचें अनादित्व.

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्‌भावमागताः ॥ ४-१० ॥

अन्वय : वीतरागभयक्रोधाः - पूर्वीसुद्धा ज्यांचे राग, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते; (च) मन्मयाः - आणि जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते अशा; मां उपाश्रिताः - माझ्या आश्रयाने राहणार्‍या; बहवः ज्ञानतपसा - पुष्कळ भक्तांनी उपर्युक्त ज्ञानरूपी तपाने; पूताः मद्‌भावं आगताः - पवित्र होऊन माझे रूप प्राप्त करून घेतले होते. ॥ १० ॥

व्याख्या : दुष्टनिग्रहं कुर्वतः मम निर्दयत्वं नास्ति । यथा । ' लालने ताडने मातुर्नाकारुण्यं यथा अर्भके । तद्वदेव महेशस्य नियंतुर्गुणदोषयोः ' ॥ बहवः अनेके ज्ञानतपसा ज्ञानमेव तपः ज्ञानतपः तेन यद्वा ज्ञानं च तपः स्वधर्मानुष्ठानं ज्ञानतपसी ज्ञानतपसोः समहारः ज्ञानतपः तेन पूताः संतः क्षीणसर्वपापाः संतः मद्भावं मम भावः मद्‌रूपत्वं मद्‍भावः तं मद्‍भावं मोक्षं प्राप्ताः जीवन्मुक्ताः बभूवुः । कथंभूताः बहवः । वीतरागभयक्रोधाः रागः विषयाभिलाषः च भयं 'विषयान्‌ परित्यज्य ज्ञानमार्गे कथं जीवितव्यं ' इति भयं क्रोधो द्वेषः रागभयक्रोधाः वीताः गताः रागभयक्रोधाः येभ्यस्ते । पुनः कथंभूताः बहवः । मन्मयाः मां परमात्मानं साक्षात्कृतवंतः । पुनः कथंभूताः बहवः । मां ईश्वरं उपाश्रिताः एकांतप्रेमभक्त्या शरणं गताः ॥ १० ॥

अर्थ : अर्जुना, हा मोक्षमार्ग आतां नवीन प्रवृत्त झाला आहे, असें नाहीं, तर तो फार दिवसांपासून, सृष्टीच्या आरंभापासून प्रवृत्त झाला आहे, त्यामुळें विषयासक्ति, भय व क्रोध यांनीं रहित असलेले, ईश्वरमय झालेले, म्ह० ईश्वराहून मी भिन्न आहे, असें न समजणारे, माझाच पूर्ण आश्रय केलेले, केवल ज्ञाननिष्ठ, असे अनेक लोक ईश्वराविषयींचे ज्ञान, याच तपानें पवित्र होत्साते माझ्या स्वरूपास- मोक्षास प्राप्त झाले आहेत. (सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत निष्काम, ऐक्यदर्शी व केवळ ज्ञाननिष्ठ झालेले पुष्कळ मुमुक्षु ज्ञान-तपाने पावन होऊन मत्स्वरूपास प्रास झाले आहेत. 'ज्ञानतपसा' हें विशेषण इतर तपाची अपेक्षा न करता 'ज्ञान' याच तपामध्यें निष्ठा ठेवून रहाणारे, असे सुचविण्यासाठी आहे.

विवरण :


ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥

अन्वय : पार्थ ये मां यथा प्रपद्यन्ते - हे अर्जुना जे भक्त मला ज्या प्रकाराने भजतात; तथा एव अहं तान् भजामि - त्याचप्रकाराने मी सुद्धा त्यांना भजतो; मनुष्याः सर्वशः - सर्व माणसे सर्व प्रकारांनी; मम वर्त्म अनुवर्तन्ते - माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ॥ ११ ॥

व्याख्या : हे पार्थ हे अर्जुन ! ये आर्ताः चेत्यपरं अर्थार्थिनः च जिज्ञासवः चेत्यपरं ज्ञानिनः यथा येन प्रकारेण सकामतया अथवा निष्कामतया मां ईश्वरं सर्वफलदातारं प्रपद्यंते भजंति तान्‌ सर्वान्‌ अहं तथैव तदपेक्षितफलदानेनैव भजामि अनुगृह्णामि । हे पार्थ ! सर्वशः सर्वप्रकारैः मनुष्याः मम सर्वात्मनः वासुदेवस्य वर्त्म भजनमार्गं अथवा कर्मज्ञानलक्षणमार्गं अनुवर्तंते अनुलक्षेण वर्तंते ॥ ११ ॥

अर्थ : तर मग तूंहि राग-द्वेषवान् आहेस, कारण तूं कांहीं लोकांनाच आत्मभाव देतोस, सर्वांना देत नाहीस, असे म्हणशील, तर तसे नाहीं. कारण जे लोक मला ज्याप्रकारे भजतात, त्यांवर मी तसा अनुग्रह करतों. अर्थातू मी राग, द्वेष व मोह यांच्या वश होऊन कांहीं करीत नाही. सर्व लोक सर्व प्रकारे माझ्याच ज्ञानकर्म मार्गाचे अनुवर्तन करतात.

विवरण :


काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥

अन्वय : इह मानुषे लोके - या मनुष्य लोकात; कर्मणां सिद्धिं काङ्क्षन्तः - कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक; देवताः यजन्ते - देवतांचे पूजन करतात; हि कर्मजा सिद्धिः क्ष्रिपं भवति - कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी शीघ्र मिळून जाते. ॥ १२ ॥

व्याख्या : सकामभक्ताः कर्मणां सिद्धिं फलनिष्पत्तिं कांक्षंतः कांक्षंति इच्छंति ते कांक्षंतः संतः इह लोके देवताः इंद्रादिदेवान्‌ यजंते पूजयंति । निष्कामास्तु मां भगवंतं वासुदेवं यजंते पूजयंति इति शेषः । हि यस्मात्‌ इंद्रादिदेवतायाजिनां कर्मजा कर्मभ्यः जाता कर्मजा सिद्धिः कर्मफसिद्धिः मानुषे मनुष्याणां अयं मानुषः तस्मिन्‌ लोके क्षिप्रं शीघ्रं भवति ज्ञानफलं मोक्षः न भवति ॥ १२ ॥

अर्थ : ’तुझ्या ठिकाणीं रागद्वेषादि दोष जर नाहींत व सर्व प्राण्यावर अनुग्रह करण्याची हच्छाहि एकसारखीच आहे. तर सर्व लोक ज्ञानानेच मुक्त होण्याची इच्छा कां करीत नाहींत,' म्हणून विचारशील तर सांगतों- कर्माचें फळ इच्छिणारे लोक येथे इंद्रादि देवतांचे यजन करितात. कारण मनुष्यलोकांत कर्मफलांची सिद्धि शीख होत असल्यामुळे त्या फलाच्या नादाला लागलेले लोक प्रायः ज्ञानमार्गापासून विमुख होतात. गीतेत फलेच्छा सोडून ईश्वरार्पण बुद्धीने कर्में करण्याविषयीं जो उपदेश केला आहे, तो मनुष्यानें ज्ञानमार्गाला लागावे म्हणून आहे. म्हणूनच मागे अर्जुनाला ' बुद्धौ शरणमन्विच्छ ' (२-४९) ज्ञानमार्गाचा आश्रय कर असे सांगितलें आहे.

विवरण :


चातुर्वर्ण्य ईश्वरसष्ट आहे.

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ ४-१३ ॥

अन्वय : चातुर्वर्ण्यम् - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा समूह; गुणकर्मविभागशः - गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार; मया सृष्टम् - माझ्यकडून रचला गेला आहे; तस्य कर्तारम् अपि - त्या सृष्टि-रचना इत्यादी कर्माचा कर्ता असूनसुद्धा; अव्ययं मां अकर्तारं विद्धि - अविनाशी परमात्मा असा खरे पाहता मी अकर्ताच आहे असे तू जाण. ॥ १३ ॥

व्याख्या : मया वासुदेवेन चातुर्वर्ण्यं चत्वारः वर्णाः इति चातुर्वर्ण्यं गुणकर्मविभागशः गुणाश्च कर्माणि च गुणकर्माणि गुणकर्मणां विभागाः गुणकर्मविभागाः गुणकर्मविभागैः इति गुणकर्मविभागशः गुणाः स त्त्वप्रधानाः ब्राह्मणाः तेषां ब्राह्मणानां शमदमादीनि कर्माणि सत्त्वरजःप्रधानाः क्षत्रियाः तेषां क्षत्रियाणां शौर्ययुद्धादीनि कर्माणि रजतमःप्रधानाः वैश्याः तेषां वैश्यानां कृषिवाणिज्यादीनि कर्माणि तमः प्रधानाः शूद्राः तेषां शूद्राणां त्रैवर्णिकशुश्रूषादिकर्माणि एवंगुणानां चेत्यपरं कर्मणां विभागैः सृष्टं निर्मितं तथापि एवं सत्यपि हे पार्थ ! त्वं तस्य चातुर्वर्ण्यस्य कर्त्तारमपि करोतीति कर्ता तं मां वासुदेवं अकर्तारमेव विद्धि जानीहि । कथंभूतं माम्‌ । अव्ययं न विद्यते व्ययो यस्य सः अव्ययः तं अव्ययं आसक्तिराहित्येन श्रमरहितम्‌ ॥ १३ ॥

अर्थ : ’मानुषलोकांतच वर्णाश्रमादि कर्मांचा अधिकार आहे, अन्य लोकांत नाहीं. असा नियम कोणत्या कारणाने केला आहे ? किंवा मनुष्य नियमानें तुझ्याच मार्गाला का अनुसरतात ? दुसर्‍या कोणाच्या मार्गाला कां अनुसरत नाहींत !' म्हणून विचारशील तर सांगतों- मीं गुणांच्या विभागाला अनुसरून कर्मांचा विभाग केला व त्याच्या अनुरोधाने चार वर्ण उत्पन्न केले आहेत. मायिक व्यवहारदष्टया मी जरी त्यांचा कर्ता आहे, तरी परमार्थदृष्ट्या अकर्ता आहे व त्यामुळेंच असंसारी आहें. मीं या मनुष्यलोकांतच ब्राह्मणादि चार वर्ण व ब्रह्मचारी इत्यादि चार आश्रम उत्पन्न केले आहेत. त्यांच्या शमादि कर्मांचाहि विभाग केला आहे. मला मायेमुळे कर्तुत्व आहे, वस्तुतः नाही, त्यामुळे मायिकदृष्ट्या मी चातुर्वण्य, कर्म इत्यादिकांचा जरी कर्ता असलों, तरी खरोखर अकर्ता व अभोक्ता आहे, असे तूं समज.

विवरण :


न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

अन्वय : कर्मफले स्पृहा न - कर्मांच्या फळांमध्ये माझी स्पृहा नसते; (अतः मां कर्माणि न लिम्पन्ति - म्हणून मला कर्मे लिप्त करीत नाहीत; इति यः मां अभिजानाति - अशाप्रकारे जो मला तत्त्वतः जाणून घेतो; सः कर्मभिः न बध्यते - तोसुद्धा कर्मांनी बांधला जात नाही. ॥ १४ ॥

व्याख्या : कर्माणि विश्वसृष्ट्यादीनि कर्माणि मां निरहंकारत्वेन कर्तृत्वाभिमानहीनं भगवंतं न लिंपंति देहारंभकत्वेन न बध्नंति । मे पूर्णमनोरथस्य भगवतः कर्मफले कर्मणः फलं कर्मफलं तस्मिन्‌ स्पृहा इच्छा नास्ति इति एवंप्रकारेण यः पुरुषः मां अकर्तारं अभोक्तारं अभिजानाति आत्मत्वेन जानाति सः पुरुषः कर्मभिः न बध्यते न बद्धो भवति ॥ १४ ॥

अर्थ : मी पूर्वोक्त कर्मांचा अकर्ताच कसा व कां ? व तसें जाणल्यानें कोणते फल मिळते, ते आतां सांगतों- मला कर्में पुण्य-पापाने लिप्त करीत नाहींत. कारण 'मी ही कर्मे करतों,' असा मला अभिमान नसतो व त्यांच्या फलाची इच्छाहि नसते. म्हणून तीं मला लिप्त करीत नाहींत. तीं केवळ मलाच बद्ध करीत नाहींत असे नाही, तर दुसराहि जो कोणी मला आत्मत्वानें 'मी कर्ता नाहीं, व मला फलेच्छा नाहीं' असें स्मरतो, तोहि कर्मांकडून बद्ध केला जात नाहीं.

विवरण :


एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ ४-१५ ॥

अन्वय : एवं ज्ञात्वा - अशाप्रकारे जाणूनच; पूर्वैः मुमुक्षुभिः अपि - पूर्वकालीन मुमुक्षुंच्याकडूनही; कर्म कृतम् - कर्म केले गेले आहे; तस्मात् पूर्वैः पूर्वरतं कृतम् - म्हणून पूर्वजांनी नेहमी केलेली; कर्म एव त्वं अपि कुरु - कर्मेच तू सुद्धा कर. ॥ १५ ॥

व्याख्या : एवं उक्तप्रकारेण मां सर्वकर्तारमपि अकर्तारं ज्ञात्वा पूर्वैरपि अस्मिन्‌ युगे ययाति-यदुप्रभृतिभिरपि मुमुक्षुभिः मोक्तुं संसारात्‌ मोक्तुं इच्छंति ते मुमुक्षुवतैः कर्म स्वकर्म कृतम्‌ । यथा पूर्वैः जनकादिभिः पूर्वतरं युगांतरेःष्वपि कर्म स्वकर्म कृतं तथा तस्मात्‌ कारणात्‌ त्वमपि मुमुक्षुः सन्‌ कर्म स्वकर्म कुरु ॥ १५ ॥

अर्थ : पूर्वींच्याहि मुमुक्षूंनीं 'मी- आत्मा कर्ता नाहीं व मला कर्मफलाची इच्छा नाहीं' असे जाणून पूर्वीपासून चालत आलेले कर्मच केले. यास्तव तूंही कर्मच कर. स्वधर्मरूप कर्म सोडून मुकाट्याने बसू नको, किंवा परधर्मरूप संन्यासहि करूं नको.

विवरण :


कर्म गहन म्हणून कर्माकर्माचा निर्णय.

'मनुष्यलोकीं कर्म जर करावयासच पाहिजे असेल, तर मी तें तुझ्या सांगण्यावरूनच करीन. पूर्वीच्या जनकादिकांनीं त्यांच्याहि पूर्वीपासून चालत आलेले कर्म केले व तेच तूं कर, असे कशाला सांगावयास पाहिजे !' म्हणून म्हणशील तर कर्माचें वास्तविक स्वरूप कळणें फार कठिण आहे. कारण-

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ ४-१६ ॥

अन्वय : कर्म किं (च) अकर्म किम् - कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे; इति अत्र कवयः अपि - या बाबतीत निर्णय करण्यामध्ये बुद्धिमान् पुरुषसुद्धा; मोहिताः - मोहून जातात; (अतः) यत् ज्ञात्वा - म्हणून जे जाणल्यावर; अशुभात् मोक्ष्यसे - अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून तू मोकळा होशील; तत् (कर्म) ते प्रवक्ष्यामि - ते कर्मतत्त्व तुला नीटपणे समजावून सांगेन. ॥ १६ ॥

व्याख्या : किं कर्म कीदृशं कर्मकरणं किं अकर्म कीदृशं कर्माकरणं इति एवं अत्र अस्मिन्‌ अर्थे कवयोपि विवेकिनोपि मोहिताः अविवेकं प्राप्ताः । तस्मात्‌ कारणात्‌ अहं ते तुभ्यं तत्‌ कर्म प्रवक्ष्यामि कथयामि । त्वं यत्‌ कर्माकर्मस्वरूपं ज्ञात्वा अनुष्ठाय अशुभात्‌ संसारात्‌ मोक्ष्यसे मुक्तो भविष्यसि ॥ १६ ॥

अर्थ : कर्म काय व अकर्म काय ? याविषयीं मोठे मोठे बुद्धिमानहि मोहित झाले आहेत, म्हणून मी तुला कर्म कोणते व अकर्म कोणतें ते सांगेन. कर्माकर्मांचें तत्त्व कळल्यानें तूं अशुभापासून, संसारापासून मुक्त होशील. ''अहो पण, कर्म म्ह० शरीरेंद्रियांची हालचाल व अकर्म म्ह० मुकाट्यानें बसणे, हें प्रसिद्ध आहे. मग त्यांत जाणावयाचें काय आहे ?'' असें जर म्हणसील, तर ते बरोबर नाहीं.

विवरण :


कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥

अन्वय : कर्मणः अपि बोद्धव्यम् - कर्माचे स्वरूपसुद्धा जाणले पाहिजे; च अकर्मणः बोद्धव्यम् - आणि अकर्माचे स्वरूपसुद्धा जाणून घ्यावयास हव् ए; च विकर्मणः बोद्धव्यम् - तसेच विकर्माचे स्वरूपसुद्धा जाणले पाहिजे; हि कर्मणः गतिः गहना - कारण कर्माची गती गहन आहे. ॥ १७ ॥

व्याख्या : हि यस्मात्‌ कारणात्‌ कर्मणः विहितव्यापारस्य तत्त्वं बोद्धव्यं बोधितं ज्ञातुं योग्यं बोद्धव्यं अस्ति । अकर्मणः निर्व्यापारस्यापि तत्त्वं बोद्धव्यं अस्ति । चेत्यपरं विककर्मणोपि निषिद्धाचरणस्यापि तत्त्वं बोद्धव्यं बोधितुं ज्ञातुं योग्यं बोद्धव्यं अस्ति । यतः हेतोः कर्मणः कर्माकर्मविकर्मणां गतिः तत्त्वं गहना दुर्विज्ञेया अस्ति ॥ १७ ॥

अर्थ : कारण शास्त्रविहित कर्माचेंहि तत्त्व जाणणें उचित आहे. व शात्रनिषिद्ध कर्माचेंहि तत्त्व समजून घेणे योग्य आहे. तसेच सर्व कर्मे टाकून मुकाव्यानें बसणे या अवस्थेचेंहि स्वरूप समजून घेण्यासारखे आहे. कारण कर्माचे यथार्थ स्वरूप गहन आहे. कर्म, अकर्म व विकर्म यांचे तात्त्विक स्वरूप अवश्य समजून घेतलें पाहिजे. कारण त्याचे तत्त्व कळणे फार कठिण आहे.

विवरण :


कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८ ॥

अन्वय : यः कर्मणि अकर्म पश्येत् - जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो; च यः अकर्मणि कर्म पश्येत् - आणि जो अकर्मात कर्म पाहतो; सः मनुष्येषु बुद्धिमान् - तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान् आहे; (च) सः युक्तः कृत्स्नकर्मकृत् - आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. ॥ १८ ॥

व्याख्या : यः पुरुषः कर्मणि परमेश्वराराधनलक्षणे कर्मणि अकर्म कर्म इदं न भवति तत्‌ अकर्म पश्येत्‌ अवलोकयेत्‌ चेत्यपरं अकर्मणि विहिताकरणे यः पुरुषः कर्म पश्येत्‌ यद्वा यः पुरुषः कर्मणि व्यापारभूते विषये अकर्म निर्व्यापारं ब्रह्म पश्येत्‌ पश्यति । तथा अकर्मणि निर्व्यापारे ब्रह्मणि कर्म समाधौ अहं निर्व्यापारेण तूष्णींभूतः पूर्णः कृतकृत्योहमिति तूष्णींभूताभिमानेन आरोपितसमाधिव्यापारं पश्यति स्वव्यापारराहित्ये उपाधिव्यापारवत्‌ ब्रह्म पश्यति । सः पुरुषः भासमाने अपि कर्माकर्मणी विहाय तदधिष्ठानं ब्रह्म पश्यन्‌ सन्‌ मनुष्येषु शास्त्राधिकारिषु बुद्धिमान्‌ व्यवसायात्मिकाबुद्धिमत्त्वात्‌ श्रेष्ठः अस्ति । स एव पुरुषः युक्तः योगी स्वरूपात्‌ अप्रचलितः । स एव पुरुषः कृत्स्नकर्मकृत्‌ कृत्स्नानि सर्वाणि च तानि कर्माणि च कृत्स्नकर्माणि कृत्स्नकर्माणि करोतीति कृत्स्नकर्मकृत्‌ यद्वा कृत्स्नकर्माणि प्रवृत्तिनिवृत्तिपराणि कृतिछिनत्ति । यदा आरुरुक्षोरपि कर्म बंधकं न भवति तदा आरूढस्य कर्म बंधकं कुतः स्यात्‌ ? अपि तु न स्यात्‌ ॥ १८ ॥

अर्थ : जो विवेकी मनुष्य शरीर-इंद्रियें-प्राण यांच्या प्रत्येक व्यापारामध्यें, त्यांच्या प्रत्येक हालचालींत अकर्म-आत्म्याचे अकर्तुत्व पहातो व जो मुकाट्यानें बसणे या अकर्मांत कर्तुत्व पहातो, तो सर्व मनुष्यांमध्ये मोठा बुद्धिमान्-ज्ञानी, मोठा योगी, व समस्त कमें करणारा होय. वेगाने धांवत असलेल्या नौकेंतील मनुष्याला तीरावरील वृक्ष उलट दिशेला वेगाने जात आहेत, असे जरी वाटलें, तरी वृक्षांच्या ठिकाणीं धांवणें ही क्रिया नाहीं, असे पहाणें हें यथाभूत दर्शन, सम्यग्दर्शन आहे. त्याचप्रमाणें लौकिकदृष्ट्या आत्म्यामध्ये भासणारें कर्म वस्तुतः आत्म्याचें नव्हे, असे जो पहातो तो बुद्धिमान्, ज्ञानी होय. त्याचप्रमाणे अकर्मामध्यें, शरीरेंद्रियांच्या व्यापाराभावांत, कर्माप्रमाणेंच आत्म्यामध्ये आरोपिलेल्या कर्माभावांत, मी मुकाट्याने कांहीं न करतां सुखाने बसलों आहे, अशाप्रकारे अहंकार व फलाभिलाष यांना तो कर्माभाव कारण होत असल्यामुळे कर्म जो पहातो, तो बुद्धिमान् होय. अज्ञ लोक आत्म्यावर शरीरेंद्रियांचा आरोप करतात व शरीरेंद्रियांचीं कर्में तीं आत्म्याचीच कर्में आहेत, असे मानूं लागतात. शुक्तीच्या ठिकाणीं रजताचा जसा आरोप करतात, तसाच आत्म्यावर कर्माकर्मांचा आरोप होतो. पण शुक्तीच्या ठिकाणीं वस्तुतः रजत नाही, हें जसे पहावें, त्याप्रमाणें आत्म्यामध्यें कर्म नाहीं, असें जो पहातो, त्याचप्रमाणें शरीरेंद्रियांचा व्यापार शान्त करून त्याच्याद्वारा मीच आतां कर्मरहित झालों आहे, सुखी-स्वस्थ आहें, अशा प्रकारच्या अकर्माला अहंकारामुळे जो कर्मच समजतो, तो पंडित होय. कारण रुपें व त्याचा अभाव या दोन्ही पदार्थांनी हीन असलेल्या शिंपीला तिच्याच रूपानें पहावे, त्याप्रमाणे कर्म व अकर्म यांनी हीन असलेल्या केवळ निर्विकार आत्म्याला जाणणारा पुरुष ज्ञानी, योगी, इत्यादि स्तुतीला पात्र होतो.

विवरण :


ज्ञानी पुरुषाची स्तुति.

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥

अन्वय : यस्य सर्वे समारम्भाः - ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे; कामसङ्कल्पवर्जिताः - कामना व संकल्प यांच्या विना असतात; (तथा) ज्ञानाग्निदग्धकर्माणम् - तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीचे द्वारा भस्म झालेली असतात; तं बुधाः अपि पण्डितं आहुः - त्या महापुरुषाला ज्ञानी सुद्धा पंडित म्हणतात. ॥ १९ ॥

व्याख्या : यस्य परमार्थदर्शिनः सर्वे यावंतः वैदिकलौकिकाः समारंभाः सम्यक्‌ आरभ्यंत इति समारंभाः कर्माणि कामसंकल्पवर्जिताः काम्यत इति कामः फलं कामस्य संकल्पः कामसंकल्पः कामसंकल्पेन वर्जिताः यद्वा कामः फलतृष्णा च संकल्पः अहं करोमीति कर्तृत्वाभिमानः कामसंकल्पौ कामसंकल्पाभ्यां वर्जिताः रहिताः भवंति बुधाः तल्लक्षणज्ञाः तं पुरुषं पंडितं पंडा शास्त्रतात्पर्यवती बुद्धिः संजात यस्य सः पंडितः तं तथोक्तं आहुः कथयंति । कथंभूतं तम्‌ । ज्ञानाग्निदग्धकर्माणम्‌ । ज्ञानमेव अग्निः ज्ञानाग्निः ज्ञानाग्निना दग्धानि कर्माणि यस्य सः ज्ञानाग्निदग्धकर्मा तम्‌ ॥ १९ ॥

अर्थ : ज्या विवेकी पुरुषाचे सर्व समारंभ, कर्में, विषयेच्छा व त्याचें कारण संकल्प यांनी रहित असतात, त्यावरील ज्ञानरूपी अग्नीने ज्याचीं कर्में जळाली आहेत, अशा त्याला ब्रह्मवेत्ते खरा पंडित म्हणतात. ( शरीराच्या कर्माला आत्म्याचे अकर्म व शरीराच्या अकर्माला शरीराचे कर्म जाणणार्‍या पुरुषांची सर्व लौकिक व वैदिक कर्में फलेच्छा व त्याविषयींचे संकल्प यांनीं रहित असतात. तो प्रवृत्त मार्गात कर्माधिकारी गृहस्थ असेल, तर आपलीं सर्व कर्में लोकसंग्रहासाठीं करतो व निवृत्त मार्गांत असेल, तर केवल शरीरधारणार्थ अवश्य तेवढींच करतो, पण तीं सर्व कामसंकल्पवर्जित असल्यामुळें केवल शरीरेंद्रियांची हालचाल या स्वरूपाचींच होत असतात. अशा त्या ज्ञानाग्नीनें कर्म जाळून टाकणार्‍या पुरुषाला ब्रह्मवेत्ते खरा पंडित-आत्मज्ञ म्हणतात.

विवरण :


त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥

अन्वय : कर्मफलासङ्गम् त्यक्त्वा - सर्व कर्मे आणि त्यांची फले यातील आसक्ती संपूर्णपणे सोडून देऊन; (यः) निराश्रयः - जो पुरुष भौतिक आश्रयाने रहित झालेला आहे; (च) नित्यतृप्तः - आणि परमात्म्यामध्ये नित्यतृप्त आहे; सः कर्मणि अभिप्रवृताः अपि - तो कर्मांमध्ये व्यवस्थितपणे वावरत असतानाही; न एव किंचित् करोति - वस्तुतः काहीही करीत नाही. ॥ २० ॥

व्याख्या : स पुरुषः कर्मफलासंगं कर्मणां फलानि कर्मफलानि कर्मफलेषु आसंग आसक्तिः कर्मफलासंगः तं त्यक्त्वा विहाय कर्माणि विहितानुष्ठाने प्रवृत्तोपि वर्तमानोपि किंचित्‌ किमपि न करोति तस्य कर्म अकर्मतां आपद्यते । कथंभूतः सः । नित्यतृप्तः नित्येन निजानंदेन तृप्तः संतुष्टः अत एव निराश्रयः निर्गतः आश्रयो देहबुद्ध्याश्रय यस्य सः ॥ २० ॥

अर्थ : जो कर्म व कर्मफल यांविषयींचा अभिमान् व इच्छा टाकून आत्मज्ञानाने, आत्मस्वरूप सुखाच्या अनुभवानें नित्य तृप्त झालेला, विषयांविषयीं विरक्त झालेला व ऐहिक आणि पारलौकिक फलांच्या लौकिक, वैदिक साधनांचा आश्रय न करणारा ज्ञानी, अज्ञानावस्थेंत जसा, तसाच कर्मामध्ये जरी सर्व प्रकारे प्रवृत्त झाला असला तरी कांहीं करीत नाहीं. लोकांना हा पूर्वींप्रमाणेच कर्मानुष्ठान करीत आहे, असे जरी वाटलें, तरी स्वतःच्या दृष्टीने तो कांहींच करीत नाहीं. कारण त्याला सर्व कर्मशून्य आत्म्याचें साक्षात् ज्ञान झालेले असते. वस्तुतः अशा अवस्थेत त्याला कर्मांचा कांहींच उपयोग नसतो. त्यामुळें त्याला शिखा-सूत्रादि साधनांसह सर्व कर्मांचा त्याग करणेंच शास्त्रतः प्रास असते. पण ज्याला प्रारब्धानुसार लोकसंग्रहाची इच्छा असते, किंवा शिष्टजनांनीं आपली निंदा करूं नये, असे वाटत असते, तो साक्षातू कर्मसंन्यास करूं शकत नाहीं. तो गृहस्थाश्रमांत राहून कर्मयोगच आचरतो. तथापि त्याचीं कर्में आत्मज्ञानानें दग्ध होत असल्या मुळे वस्तुतः तीं कर्मेंच नव्हेत.

विवरण :


पण वरच्या श्लोकांत सांगितलेल्या लोकसंग्रहादिकांची इच्छा करणार्‍या पुरुषाहून अगदी निराळ्या म्ह० गृहस्थाश्रम स्वीकारण्याच्या पूर्वीच ज्याला ब्रह्मत्मसाक्षात्कार झाला आहे, मीच सर्वान्तर्यामी निष्क्रिय ब्रह्म आहे, असा अपरोक्षानुभव आला आहे, त्यामुळे ज्याच्या ऐहिक व पारलौकिक विषयांविषयींच्य सर्व इच्छा नाहींशा झाल्या आहेत, तो ऐहिक व पारलौकिक फल देणार्‍या कर्मांचा आपल्याला कांहीं उपयोग नाहीं, असे पहातो व त्यामुळे साधनांसह सर्व कर्मांचा संन्यास करतो आणि शरीरयात्रा चालण्यास अत्यंत अवश्य तेवढीच हालचाल करतो. असला ज्ञाननिष्ठ यतिच मुक्त होतो, असें भगवान् सांगतात.

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वनाप्नोति किल्बिषम् ॥ ४-२१ ॥

अन्वय : यतचित्तात्मा - ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे; (च) त्यक्तसर्वपरिग्रहः निराशीः - आणि सर्व भोगांच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केला आहे असा आशारहित सांख्ययोगी; केवलम् शारीरं कर्म कुर्वन् अपि - केवळ शरीर संबंधी कर्म करीत असताना सुद्धा; किल्बिषम् न आप्नोति - त्याला पाप लागत नाही. ॥ २१ ॥

व्याख्या : सः सर्वज्ञः पुरुषः केवल कर्तृत्वाभिमानशून्यं शारीरं शरीरस्य इदं शारीरं शरीरनिर्वाहमात्रोपि कर्म कुर्वन्‌ करोतीति कुर्वन्‌ सन्‌ किल्बिषं धर्माधर्मफलभूतं बंधं न प्राप्नोति । कथंभूतः सः । निराशीः निर्गताः आशिषः कामप्रार्थनाः यस्य सः निराशीः गततृष्णः । पुनः कथंभूतः सः । यतचित्तात्मा चित्तं अंतःकरणं च आत्मा देहः चित्तात्मानौ यतौ संयतौ चित्तात्मानौ यस्य सः यतचित्तात्मा अत एव त्यक्तसर्वपरिग्रहः सर्वः संपूर्णश्चासौ परिग्रहश्च जायासुतादिः त्यक्तः सर्वपरिग्रहो येन सः तथोक्तः ॥ २१ ॥

अर्थ : तृष्णाशून्य म्ह० विषयांविषयी विरक्त, ज्यानें चित व शरीरेंद्रियसंघात यांचे उत्तम प्रकारें संयमन केले आहे; ज्याने स्त्री-पुत्रादि सर्व परिग्रह सोडला आहे, असा ज्ञाननिष्ठ यति नुसते शरीरस्थितीला कारण होणारे कर्म जरी करीत असला; तरी तो पापाला म्ह० दोषाला प्राप्त होत नाहीं. असा ज्ञाननिष्ठ पुरुष शरीरस्थितीपुरतेंच व तेंहि अहंकाररहित कर्म जरी करीत असला तरी त्याला पाप लागत नाहीं. त्या तेवढ्या कर्माने तो बद्ध होत नाहीं. अर्थात् 'मी अकर्ता आहे व सर्व किया शरीरेंद्रियांच्या आहेत,' असें जाणून केलेले कोणतेंहि कर्म बंध उत्पन्न करीत नाहीं. म्हणजे सें कर्म अकर्मच आहे.

विवरण :


सर्व परिग्रहाचा त्याग केलेल्या यतीपाशीं शरीराच्या निर्वाहासाठीं अवश्य असलेल्या अन्नाच्छादनादिकांचाहि अभाव असल्यामुळें भिक्षा, सेवा, शेती, इत्यादि उपायांतील एखाद्या उपायानें शरीरनिर्वाह करणें प्राप्त होते. पण यतीनें अयाचित, असंकॢप्त, यदृच्छाप्राप्त इत्यादि उपायांनीं शरीरीस्थतीला अवश्य असलेले अन्नादि संपादन करावें, अशी धर्मशास्त्राने 'अयाचितं असंकॢतम्' या वचनाने अनुज्ञा दिली आहे. तोच शास्त्रोक्त अन्नप्राप्तीचा मार्ग भगवान् पुढील वाक्यांत प्रकट करीत आहेत.

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥

अन्वय : (यः) यदृच्छालाभसंतुष्टः - जो पुरुष इच्छा नस्तानाही आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट असतो; विमत्सरः - ज्याच्या ठिकाणी ईर्षेचा संपूर्ण अभाव आहे; द्वन्द्वातीतः - जो हर्ष-शोकादि द्वंद्वांच्या पलिकडे गेला आहे; सिद्धौ च असिद्धौ - सिद्धी आणि असिद्धी यांच्याबाबतीत; समः कृत्वा अपि न निबध्यते - समतोल राहणारा कर्मयोगी कर्म करीत असताना देखील त्या कर्मांनी बद्ध होत नाही. ॥ २२ ॥

व्याख्या : किंच सः पंडितः कर्म वेदप्रतिपादितं स्वाभाविकं कर्म अथवा शरीरनिर्वाहार्थं भिक्षाटनादि कर्म कृत्वापि न निबध्यते न बंधं प्राप्नोति । कथभूतं सः । यदृच्छालाभसंतुष्टः यदृच्छालाभेन अन्नाच्छादनादेः अप्रार्थितलाभेन संतुष्टः संतोषं प्राप्तः यदृच्छालाभसंतुष्टः । पुनः कथंभूतः सः । द्वंद्वातीतः द्वंद्वानि क्षुत्पिपासाशीतोष्णादीनि अतीतः अतिक्रांतः द्वंद्वातीतः अत एव विमत्सरः विगतः मत्सरो यस्य सः विमत्सरः निर्वैरः । पुनः कथंभूतः सः । सिद्धौ लाभे चेत्यपरं असिद्धौ अलाभे समः हर्षविषादराहित्यः ॥ २२ ॥

अर्थ : अनायासानें व याचनेवांचून जे प्राप्त होईल, त्याने संतुष्ट होणारा, शीतोष्ण द्वंद्वांची कितीहि पीडा होत असली तरी विषाद न मानणारा, कोणाचाहि मत्सर न करणारा, मनांत वैरबुदि न बाळगणारा, शरीरयात्रेसाठीं अत्यंत अवश्य अशाहि अअन्नाच्छादनाचा लाभ झाला असतां हर्ष न मानणारा, तें न मिळाल्यास विषाद न करणारा व कर्मादिकांस अकर्मादि समजणारा आत्मज्ञाननिष्ठ पुरुष शरीरस्थिति एवढेंच ज्याचे प्रयोजन आहे, अशा शरीरेंद्रियांनी होणार्‍या भिक्षाटनादि कर्मांत जरी प्रवृत्त झाला, तरी तो तें कांही करीत नाहीं. कारण तें करीत असतांनाहि 'गुणागुणेहु वर्तन्ते' ही त्याची भावना दृढ असते. त्यामुळेंच तो आत्मा अकर्ता आहे ही गोष्ट केव्हांहि विसरत नाहीं. म्हणून तो भिक्षाटनादि करीत असला तरी त्यानें बद्ध होत नाहीं.

विवरण :


गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥

अन्वय : गतसंगस्य मुक्तस्य - ज्याची आसक्ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झाला आहे; ज्ञानावस्थितचेतसः - ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित राहात आहे; यज्ञाय आचरतः - केवळ यज्ञ संपादन करण्यासाठी जो कर्म करीत अशा माणसाचे - समग्रं कर्म प्रविलीयते - संपूर्ण कर्म पूर्णपणे विलीन होऊन जाते. ॥ २३ ॥

व्याख्या : तस्य स्थितप्रज्ञस्य समग्रं सहफलेन अग्रेण विद्यते वर्तते इति समग्रं संपूर्णं कर्म यज्ञदानादिकं प्रविलीयते तत्त्वदर्शनेन नश्यति यद्वा प्रविलीयते फलदानाय नावशिष्यते किं तु ज्ञानसहायतां प्राप्नोति । कथंभूतस्य तस्य । गतसंगस्य गतः संगो कर्तृत्वाभिनिवेशः अथवा फलाभिलाषः यस्य सः गतसंगः तस्य । पुनः कथंभूतस्य मुक्तस्य । वासनाभिः परित्यक्तस्य । पुनः कथंभूतस्य तस्य । ज्ञानावस्थितचेतसः ज्ञाने निर्विकल्पब्रह्मात्मैक्यबोधे अवस्थितं चेतो अंतःकरणं यस्य सः ज्ञानावस्थितचेताः तस्य । पुनः कथंभूतस्य तस्य । यज्ञाय विष्णुप्रीत्यर्थं ' यज्ञो वै विष्णुः ' इति श्रुतेः । कर्म विहिताचरणं आचरतः आचरतीति आचरन्‌ तस्य आचरतः ॥ २३ ॥

अर्थ : ज्याची कर्म व फल यांविषयींची आसक्ति निवृत्त झाली आहे; ज्याची त्यांत आसक्ति राहिलेली नाहीं, त्यामुळे जो धर्माधर्मादि बंधनापासून सुटला आहे व ज्याचे चित्त ज्ञानांतच अवस्थित आहे, अशा यज्ञासाठीच कर्म करणार्‍या पुरुषाचे तें कर्म फलासह विनाश पावतें. ज्याने अगोदर कर्मानुष्ठानाला आरंभ केला आहे, पण पुढें ज्याला निष्क्रिय ब्रह्मच माझा आत्मा आहे, असे आत्मज्ञान झालें, तो आत्मा अकर्ता आहे, त्याचे अमुक कर्तव्य आहे, त्याचे त्याला अमुक फळ मिळेल, असे समजत नाहीं, तर त्याच्या ठिकाणीं कर्तृकर्म प्रयोजनांचा अभाव आहे, असे समजतो, त्याला कर्मत्यागच प्राप्त होतो. अशा स्थितींत तो संन्यासच करील, यांत संशय नाहीं. पण कांहीं कारणाने त्याला संन्यास करतां न आल्यास तो ज्ञान झाल्यावरहि पूर्वीप्रमाणेच कर्मानुष्ठान करीत रहातो. तथापि वस्तुत: तो कांहींच करीत नाहीं, असे म्हणून त्याच्या कर्माचा अभाव मागे २० व्या श्लोकांत सांगितला आहे. पण ज्याचा याप्रमाणे कर्माभाव प्रदर्शित केला आहे, त्या आसक्तिशून्य, धर्माधर्मादि बंधनरहित व ज्ञानामध्येच अवस्थितचित्त अशा ज्ञानी पुरुषाने भगवत्प्राप्तीसाठीं किंवा केवळ यज्ञाचे स्वरूप सिद्ध होण्यासाठीं केलेले कर्म समग्र-फलासह नाश पावते. ते पुढील जन्माला कारण होत नाहीं.

विवरण :


ज्ञानयज्ञ व त्याच्या स्तुत्यर्थ अनेक यज्ञांचा उपन्यास.

'कर्माचे फल भोगल्यावाचून दीर्घकाल जरी लोटला, तरी तें क्षीण होत नाहीं.' अशीं स्मृति असल्यामुळें, ’केलेले कर्म आपल्या कार्याचा, फलाचा आरंभ न करतां कोणत्या कारणाने समग्र नाश पावते ?' अखे विचारशील तर सांगतो -

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥

अन्वय : यस्मिन् यज्ञे अर्पणं अपि ब्रह्म - ज्या यज्ञात अर्पण म्ह० स्रुवा इत्यादी सुद्धा ब्रह्म आहेत; (च) हविः अपि ब्रह्म - आणि हवन करण्यास योग्य असे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे; (तथा) ब्रह्मणा ब्रह्माग्नौ हुतम् - तसेच ब्रह्मरूप अशा अक्र्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुति देणे ही क्रिया देखील ब्रह्म आहे; तेन ब्रह्मकर्मसमाधिना - त्या ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणार्‍या योग्याला; गन्तव्यं ब्रह्म एव - प्राप्त करून घेण्यास योग्य असे फळसुद्धा ब्रह्मच आहे. ॥ २४ ॥

व्याख्या : अर्पणं अर्प्यते अनेनेति अर्पणं स्रुवादि ब्रह्मैव आसीत्‌ । हविः घृतादिकं ब्रह्मैव आसीत्‌ । ब्रह्माग्नौ ब्रह्मैव अग्निः ब्रह्माग्निः तस्मिन्‌ ब्रह्मणा कर्त्रा ब्रह्मैव हृतं होमितं तेन ब्रह्मार्पणक्रमेण ब्रह्मैव गंतव्यं गंतुं प्राप्तुं योग्यं गंतव्यं अस्ति । कथंभूतेन तेन । ब्रह्मकर्मसमाधिना ब्रह्मैव कर्म ब्रह्मकर्म ब्रह्मकर्मणि समाधिः चित्तैकाग्र्यं यस्य सः ब्रह्मकर्मसमाधिः तेन ॥ २४ ॥

अर्थ : स्रुक, स्रुवा इत्यादि ज्या साधनांनीं ब्रह्मवित् अग्नींत हवि अर्पण करतो, ते साधन ब्रह्म; तूप, भात, इत्यादि अग्नींत होमावयाचा पदार्थही ब्रह्म; ज्यांत होम करावयाचा तो अग्नि ब्रह्म, हवन करणारा यजमान ब्रह्म, ब्रह्मच कर्म, त्यामध्ये ज्याच्या चित्ताची समाधि-समाधान-स्थिरता आहे, अशा पुरुषाला प्राप्तव्य असलेले फलहि ब्रह्मच म्ह० ब्रह्मरूप साधनानें ब्रह्मरूप हवि ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मरूप यजमानाकडून ब्रह्मरूप होम केला जातो, व त्याला इष्ट असलेले फलही ब्रह्मच आहे. अर्जुना, कर्तुत्वाभिमान व फलेच्छा यांनीं युक्त होऊन केलेल्या शुभाशुभ कर्मामध्ये कितीहि जरी काल लोटला तरी आपले फल दिल्यावांचून तें क्षीण होत नाहीं, हे शास्त्रवचन खरें आहे. त्यामुळें 'ज्ञानी पुरुषानेंहि केलेले कर्म फलाचा आरंभ केल्यावांचून क्षीण होईल असें वाटत नाहीं. तेव्हां तें समग्र विनाश कसें पावणार !' अशी तुला आलेली जी शंका ती यथार्थ आहे. पण ब्रह्मवेत्त्याला सर्व द्वैत ब्रह्ममात्र भासते. त्याच्या दृष्टीने कर्म व त्याचें साधनादि हीं सर्व ब्रह्मरूप असतात. त्यामुळे बाधित झालेले कर्म समग्र नाश पावतें. ज्ञान झाल्यावरहि लोकसंग्रहादि कांहीं कारणाने गृहस्थाश्रमाचा त्याग न करणार्‍या पुरुषाने अग्निहोत्रादि कर्म जरी केले, तरी ते ब्रह्मबुद्धीनें बाधित होत असल्यामुळे वस्तुतः अकर्मच आहे. त्यामुळें लोकसंग्रहार्थ कर्में करणाराहि कर्मयोगी नव्हे, तर तो तत्त्वतः संन्यासीच आहे. या श्लोकांत ज्ञानाची स्तुति केली आहे. प्रसिद्ध यज्ञांत जी अर्पणादि साधने आहेत, तीं सर्व ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानरूप आहेत. परमार्थदर्शी पुरुष अर्पणादि सर्व ब्रह्मच पहातो. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष कर्मानुष्ठान करावें लागत नाहीं. अर्थाद सर्व ब्रह्मच आहे असे जाणणार्‍या ज्ञाननिष्ठाच्या सर्व कर्मांचा अभाव आहे. येथे लोकसंग्रहार्थ कर्मे करणार्‍या पुरुषाला ब्रह्मदृष्टीमुळें कर्म बद्ध करूं शक्य नाहीं, असे सांगून ज्ञाननिष्ठाच्या दृष्टीने त्याचा अभावच आहे असे सांगितले आहे.

विवरण :


दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥

अन्वय : अपरे योगिनः दैवम् - दुसरे योगी लोक देवतांचे पूजनरूपी; यज्ञं एव पर्युपासते - यज्ञाचेच चांगल्याप्रकारे अनुष्ठान करतात; अपरे ब्रह्माग्नौ - इतर योगी लोक परब्रह्म परमात्मस्वरूप अग्नीमध्ये; यज्ञेन एव यज्ञं उपजुह्वति - अभेददर्शनरूपी यज्ञाचे द्वाराच आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. ॥ २५ ॥

व्याख्या : अपरे अन्ये योगिनः कर्मयोगिनः दैवमेव देवाः इंद्राग्निवरुणादयः इज्यंते यस्मिन्‌ सः दैवः तं यज्ञं दर्शपूर्णमासज्योतिष्टोमादिरूपं पर्युपासते सर्वदा कुर्वंति । अपरे ज्ञानयोगिनः ब्रह्माग्नौ ब्रह्मरूपश्चासौ अग्निश्च ब्रह्माग्निः तस्मिन्‌ यज्ञेनैव उपायभूतेन ब्रह्मार्पणमित्युक्तप्रकारेण यज्ञं परमात्मानं उपजुह्वंति ब्रह्मदृष्ट्या सर्वाणि यज्ञकर्माणि प्रविलापयंति ॥ २५ ॥

अर्थ : आत्मवेत्त्याची सर्वत्र ब्रह्मदृष्टि हाच ज्ञानयज्ञ आहे, असे सांगून आतां त्याच्या स्तुतीसाठी भगवान् दुसर्‍या यज्ञांचाहि उल्लेख करतात. ज्यांत देवतांना उद्देशून हवन केले जाते तो दैवयज्ञ कांहीं कर्माधिकारी गृहस्थ करितात. दुसरे ज्ञाननिष्ठ संन्यासी सत्य-ज्ञान-अनंत-विज्ञान-आनंद-साक्षात्-अपरोक्ष-सर्वांतर आत्मरूप ब्रह्माग्नींत आत्म्याचा होम करितात, म्ह० सोपाधिक आत्मा निरुपाधिक ब्रह्मरूप आहे असें पहातात. हेच मूळ श्लोकांत दुसरे कांहीं ब्रह्यवेत्ते-ज्ञाननिष्ठ 'यज्ञं' -आत्म्याला म्ह० बुद्ध्यादि उपाधियुक्त जीवाला 'ब्रह्माग्नौ' - ब्रह्मरूप अग्नींत 'यज्ञेन एव' - निरुपाधिक ब्रह्मरूपानेंच हवन करतात, या वाक्याने सांगितला आहे. सोपाधिक आत्मा निरुपाधिक ब्रह्मरूप आहे, असे पहातात. आत्मा बुद्ध्यादि उपाधींनी संयुक्त झाल्यामुळे त्याच्यावर उपाधीचे सर्व धर्म आरोपिले जातात. त्यामुळें तो परब्रह्माहून अगदी भिन्न आहे, असा भ्रम होतो. तो घालविण्यासाठी ज्ञाननिष्ठ त्या सोपाधिक आत्म्याचा निरुपाधिक आत्मतत्त्वांत लय करतात. पुढें ३३ व्या श्लोकांत ज्ञानयज्ञाची स्तुति करावयाची असल्यामुळें येथें दैवयज्ञादिकांत त्याची पुन: गणना केली आहे; असो. याप्रमाणे येथे गृहस्थांच्या प्रसिद्ध मुख्य यज्ञाची प्रथम गणना करून नंतर 'ज्ञाननिष्ठाचें ब्रह्मात्मैक्यज्ञान हाहि यज्ञच आहे,' असे गौणवृत्तीनें म्हटले आहे. यज्ञांतील गुण यांत दाखविण्यासाठी सोपाधिक आत्म्याचा निरुपाधिक ब्रह्मरूप अग्नींत सर्वसंसारधर्मरहित निर्विशेष स्वरूपाने होम करतात, असे म्हटले आहे.

विवरण :


श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥

अन्वय : अन्ये श्रोत्रादीनि इन्द्रियाणि - अन्य योगी जन श्रोत्र इत्यादि सर्व इंद्रियांचे; संयमाग्निषु जुह्वति - संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात; (च) अन्ये शब्दादीन् विषयान् - आणि इतर योगी लोक शब्द इत्यादी विषयांचे; इन्द्रियाग्निषु जुह्वति - इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करतात. ॥ २६ ॥

व्याख्या : अन्ये नैष्ठिकाः ब्रह्मचारिणः श्रोत्रादीनि श्रोत्रं आदिर्येषां तानि इंद्रियाणि ज्ञानेंद्रियाणि संयमग्निषु संयमरूपाः इंद्रियनियमनरूपाश्च ते अग्नयश्च संयमाग्नयः तेषु । जुह्वति इंद्रियाणि निरुध्य तिष्ठंति । अन्ये गृहस्थाः शब्दादीन्‌ शब्दः आदिर्येषां ते शब्दादयः तान्‌ विषयान्‌ सब्दस्पर्शरसरूपगंधान्‌ इंद्रियाग्निषु इंद्रियरूपाश्च ते अग्नयश्च इंद्रियाग्नयः तेषु जुह्वति विषयभोगसमयेपि अनासक्ताः संतः शब्दादिविषयान्‌ प्रक्षिपंति त्यजंति इत्यर्थः ॥ २६ ॥

अर्थ : या श्लोकांत भगवान् आणखी दोन गौणयज्ञ सांगतात - श्रेयःसाधनांचे अनुष्टान करणारे दुसरे योगी श्रोत्रादिक इंद्रिये पांच इंद्रियांचा पांच प्रकारचा संयम-निग्रह हेच अग्नि, त्यांत होमितात, संयमाग्नींत होम करतात. दुसरे कांहीं योगी शब्द, स्पर्श, रूप, रस, व गंध या पूर्वोक्त श्रोत्रादि ज्ञानेंद्रियांच्या विषयांस इंद्रियरूप अग्नींत होमितात. मनोरूप संयमांत इंद्रियांचा होम करावयाचा आहे. म्हणून त्यांना येथे अग्नि म्हटले आहे. बाह्य व आंतर इंद्रियांचा मनांत प्रत्याहार करतात, असा याचा भावार्थ. हा तिसरा संयमयज्ञ होय. दुसरे साधक शब्दादि विषयांचा इंद्रियाग्नींत होम करतात. इंदियें हेच अग्नि, त्या इंद्रियाग्नींत विषयांचा होम करतात. श्रोत्रादि इंद्रियांनीं अनिषिद्ध विषयांचें ग्रहण करणे यालाच ते होम मानतात. म्ह० निषिद्ध विषय सोदून प्राप्त झालेल्या विहित विषयांना राग-द्वेषरहित होत्साते त्या त्या इंद्रियांनीं भोगतात.

विवरण :


सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥

अन्वय : अपरे सर्वाणि इन्द्रियकर्माणि - आणि दुसरे योगीलोक इंद्रियांच्या सर्व क्रिया; च प्राणकर्माणि - आणि प्राणांच्या सर्व क्रिया; ज्ञानदीपिते - ज्ञानाने प्रकाशित झालेल्या; आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति - आत्मसंयमयोगरूपी अग्नीमध्ये हवन करतात. ॥ २७ ॥

व्याख्या : अपरे ध्याननिष्ठाः सर्वाणि संपूर्णानि इंद्रियकर्माणि इंद्रियाणां कर्माणि इंद्रियकर्माणि इंद्रियाणां ज्ञानेंद्रियाणां श्रोत्रत्वक्चक्षूरसनघ्राणेंद्रियाणां कर्माणि शब्दस्पर्शरूप्रसगंधाख्यानि कर्मेंद्रियाणां वाक्पाणिपादपायूपस्थानां कर्माणि वचनादानगमनविसर्गानंदाख्यानि चेत्यपरं प्राणकर्माणि प्राणानां कर्माणि प्राणकर्माणि प्राणानां प्रंचप्राणानां प्राणस्य बहिर्गमनं अपानस्य अधोनयनं व्यानस्य आकुंचनप्रसारणादि समानस्य अशितपीतादीनां सम्यक्‌ नयनं उदानस्य ऊर्ध्वनयनम्‌ । पंचानां उपप्राणानां लक्षणम्‌ - नागः वायुः उद्गारे कथितः । कूर्मः उन्मीलने स्मृतः । कृकरः क्षुत्कृत्‌ । देवदत्तः विजृंभणे स्मृतः । धनंजयः सर्वव्यापी सन्‌ मृतं देहमपि न त्यजति । आत्मसंयमयोगाग्नौ आत्मनि विषये ब्रह्मणि संयमः ध्यानैकाग्र्यं आत्मसंयमः आत्मसंयम एव योगः मन‍इंद्रियाणां एकाग्रीकरणं आत्मसंयमयोगः आत्मसंयमयोग एव अग्निः आत्मसंयमयोगाग्निः तस्मिन्‌ जुह्वति क्षिपंति त्यजंति इत्यर्थः । कथंभूते आत्मसंयमयोगाग्नौ । ज्ञानदीपिते ज्ञानेन ध्येयविषयेण दीपितः प्रज्वलितः ज्ञानदीपितः तस्मिन्‌ ॥ २७ ॥

अर्थ : या श्लोकांत आणखी एक गौण यज्ञ सागतात. दुसरे कांहीं साधक सर्व इंद्रियांची कर्मे व प्राणापानादि वायूची कर्में विवेकज्ञानानें प्रदीस झालेल्या आत्मसंयमरूप योगाग्नींत होमितात. तेलाने दीप जसा प्रदीप्त करतात, त्याप्रमाणे विवेकज्ञानानें उज्ज्वल भावास प्राप्त केलेल्या योगाग्नींत इंद्रियकर्में न प्राणकर्में यांना कोणी अत्यंत लीन करतात, त्यांना त्यात मिळवून सोडतात. सर्व व्यापारांचा निरोध करून आत्म्यामध्ये चित्ताचें समाधान करतात असा याचा भावार्थ.

विवरण :


द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥

अन्वय : अपरे द्रव्ययज्ञाः - काही पुरुष द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत; तपोयज्ञाः - कित्येकजण तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत; तथा योगयज्ञाः - तसेच काही योगी योगरूपी यज्ञ करणारे आहेत; च संशितव्रताः यतयः - आणि अहिंसा इत्यादि कडक व्रतांनी युक्त असे प्रयत्‍नशील पुरुष; स्वाध्यायज्ञानयज्ञाः - स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत. ॥ २८ ॥

व्याख्या : अपरे अन्यपुरुषाः द्रव्ययज्ञाः द्रव्यमेव गोभूहिरण्यादेः सत्पात्रार्पणमेव यज्ञो येषां ते द्रव्ययज्ञाः संति । केचित्‌ तपोयज्ञाः तप एव कृच्छ्रचांद्रायणादिकमेव यज्ञो येषां ते तपोयज्ञाः संति । केचित्‌ योगयज्ञाः योग एव चित्तवृत्तिनिरोधलक्षणः समाधिरेव यज्ञो येषां ते योगयज्ञाः संति । तथा स्वाध्यायज्ञानयज्ञाः स्वाध्यायेन वेदपठनश्रवणमननादिना ज्ञानं अर्थज्ञानं स्वाध्यायज्ञानं स्वाध्यायज्ञानमेव यज्ञो येषां ते तथोक्ताः संति । चेत्यपरं यतयः यतंति ते यतयः प्रयत्नशीलाः संशितव्रताः सम्यक्‌ शितं तीक्ष्णं व्रतं येषां ते संशितव्रताः दृढव्रताः संति ॥ २८ ॥

अर्थ : या श्लोकांत आणखी सहा गौण यज्ञ सांगतात - सत्पात्री द्रव्याचा विनियोग यज्ञाच्या भावनेनें जे करितात, ते द्रव्ययज्ञ होत. जे तपश्चर्या करतात, ते तपोयज्ञ होत. तसेच जे दुसरे योगांगांचा अभ्यास करतात, ते योगयज्ञ, जे ऋग्वेदादिकांचें यथाविधि अध्ययन करतात, ते स्वाध्याययज्ञ, जे शास्त्रार्थाचा अभ्यास करून शास्त्रार्थज्ञान संपादन करतात, ते ज्ञानयज्ञ व ज्यांनी व्रतें अतिशय तीक्ष्ण केलीं आहेत, ते यति-संन्यासी हे व्रतयज्ञ होत.

विवरण :


अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥

अन्वय : अपरे अपाने प्राणं जुह्वति - दुसरे कितीतरी योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात; तथा प्राणे अपानं जुह्वति - तसेच काहीजण प्राण वायूमध्ये अपान वायूचे हवन करतात; अपरे नियताहाराः - अन्य कित्येक नियमित आहार करणारे; प्राणायामपरायणाः - प्राणायाम परायण पुरुष; प्राणापानगति रुद्ध्वा - प्राण आणि अपान यांच्या गतीचा रोध करून प्राणान् प्राणेषु जुह्वति - प्राणांचे प्राणांमध्येच हवन करतात; एते सर्वे अपि - हे सर्व साधक देखील; यज्ञक्षपितकल्मषाः - यज्ञांचे द्वारा पापांचा नाश करणारे; च यज्ञविदः - आणि यज्ञ जाणणारे असतात. ॥ २९-३० ॥

व्याख्या : अपरे अन्यपुरुषाः प्राणायामपरायणाः संतः प्राणायामेषु पूरककुंभकरेचकेषु परायणाः तत्पराः प्राणायामपरायणाः अपाने अधोवृत्तौ वायौ प्राणं ऊर्ध्ववृत्तिं वायुं पूरकाख्यप्राणायामेन जुह्वति पूरककाले प्राणं अपानेन एकी कुर्वंति । तथा प्राणे प्राणवायौ अपानं अपान वायुं जुह्वति रेचककाले अपानं प्राणेन एकीकुर्वंति । तथा प्राणापानगतीः प्राणश्च अपानश्च प्राणापानौ प्राणापानयोः गतयः ऊर्ध्वाऽधोगतयः प्राणापानगतयः ताः रुध्वा कुंभकाख्यं प्राणायामं कृत्वा रेचककाले अपानवायुं प्राणवायौ जुह्वति एकी कुर्वंति । अयं प्राणायामयज्ञः ॥ २९ ॥
अपरे अन्यपुरुषाः नियताहाराः संतः नियतः शास्त्रेण नियमितः आहारो येषां ते प्राणेषु आहारसंकोचेन स्वयमेव जीर्यमाणेषु इंद्रियेषु प्राणान्‌ तत्तदिंद्रियविषयान्‌ जुह्वति जीर्यमाणेषु इंद्रियेषु सत्सु तत्तदिंद्रियवृत्तिलयहोमं भावयंति । रेचकपूरकद्वारा वर्तमानयोः प्राणापानयोः ' हंसः सोहं ' - इति अनुलोमप्रतिलोमाभ्यां आवर्तमानेन वायुना अजपामंत्रेण तत्त्वंपदार्थैक्यं भावयंति । तदुक्तं योगशास्त्रे - प्राणः हकारेण बहिर्याति पुनः सकारेण अंतः प्रविशति स एव ' हंसः ' इति चिंतयेत्‌ । आहारनियमोपि योगशास्त्रे दर्शितः - ' द्वौ भागौ पूरयेदन्नैस्तोयेनैकं प्रपूरयेत्‌ । मारुतस्य प्रचारार्थं चतुर्थमेवशेषयेत्‌ ' ॥ कुंभके सर्वे प्राणाः एकीभवंति । यथा सदा अभ्यासात्‌ मनसः स्थिरता भवेत्‌ मनसः स्थिरतया सर्वेषां इंद्रियाणां स्थिरवृत्तिः भवति । उक्तानां द्वादशयज्ञानां फलं आह अर्धश्लोकेन । एते पूर्वोक्ताः सर्वेपि संपूर्णा अपि यज्ञविदः यज्ञान्‌ द्वादश यज्ञान्‌ विंदंति लभंते ते यज्ञविदः यज्ञकर्तारः संति । कथंभूताः यज्ञविदः । यज्ञक्षपितकल्मषाः यज्ञैः द्वादशयज्ञैः क्षपितं नाशितं कल्मषं वासनारूपं यैस्ते यज्ञक्षपितकल्मषाः चित्तशुद्धिद्वारा एकाग्रतया ज्ञानयोग्या भवंति ॥ ३० ॥

अर्थ : आतां प्राणायामसंज्ञक यश सांगतात - दुसरे कांहीं मुमुक्षु अपान वायूंत प्राणवायूला, त्याचप्रमाणे प्राणवायूंत अपानाला होमितात आणि प्राण व अपान यांच्या गति बंद करून प्राणायामपरायण होतात. क्रमाने पूरक, रेचक व कुंभक करतात. हा बाह्य कुंभक होय. दुसरे कित्येक परिमित आहार करणारे प्राणापानादि वायुभेदांस प्राणांमध्येच होमिसात. हे सर्वही यज्ञवेत्ते म्ह० आपापल्या साधनाला यज्ञ समजून त्याचे अनुष्ठान करणारे, यज्ञाने पापाचा क्षय केलेले असे होतात, म्ह० यज्ञानें निष्पाप होतात. प्राणापानगतिनिरोधरूप कुंभक करून पुन्हां पुन्हां वायूचा जय करतात. म्ह० जिंकलेल्या वायुभेदांत न जिंकलेले वायूचे भेद जणूकाय प्रविष्ट झाले आहेत, असे पहातात. हे सर्वहि आपापल्या श्रेयःसाधनामध्ये यज्ञकल्पना कणारे यज्ञवेत्ते यज्ञाच्या योगानें निष्पाप होतात.

विवरण :


यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
न अयं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥

अन्वय : कुरुसत्तम - हे कुरुश्रेष्ठ अर्जुना; यज्ञशिष्टामृतभुजः - यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक; सनातन ब्रह्म यान्ति - सनातन परब्रह्म परमात्म्याप्रत जातात; च अयज्ञस्य - आणि यज्ञ न करणार्‍या पुरुषांसाठी तर; अयं लोकः न अस्ति - हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक राहात नाही; अन्यः कुतः - तर मग परलोक कसा बरे सुखदायक होऊ शकेल ? ॥ ३१ ॥

व्याख्या : यज्ञशिष्टामृतभुजः यज्ञान्‌ कृत्वा पश्चात्‌ शिष्टं यज्ञशिष्टं यज्ञशिष्टमेव अमृतं अमृतरूपं अन्नं यज्ञशिष्टामृतं यज्ञशिष्टामृतं भुंजंति ते सनातनं नित्यं ब्रह्म यांति ज्ञानद्वारेण प्राप्नुवंति । अयं अल्पसुखः लोकः मनुष्यलोकः अयज्ञस्य नास्ति यज्ञो यस्य सः अयज्ञः तस्य यज्ञानुष्ठानशून्यस्य नास्ति । हे कुरुसत्तम ! अन्यः परलोकः कुतः । अतः हेतोः यज्ञाः सर्वथा कर्तव्याः ॥ ३१ ॥

अर्थ : याप्रमाणे यज्ञ करून अवशिष्ट राहिलेल्या वेळीं 'अमृत' नांवाचे अन्न खाणारे मुमुक्षू चित्तशुद्धि-ज्ञात्रप्राप्तीच्या द्वारा नित्य ब्रह्मास प्राप्त होतात. हे कुरुकुल श्रेष्ठा, यांतील एकहि यज्ञ न करणार्‍या पुरुषाला हा सर्वसाधारण लोकहि नाही. मग विशिष्ट साधनांनीं साध्य होणारा दुसरा असाधारण लोक कोठचा !

विवरण :


एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

अन्वय : एवं बहुविधा यज्ञाः - अशाप्रकारे आणखीसुद्धा नाना प्रकारचे यज्ञ; ब्रह्मणः मुखे वितताः - वेदाच्या वाणीमध्ये विस्ताराने सांगितले गेले आहेत; तान् सर्वान् कर्मजान् विद्धि - ते सर्व मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारा संपन्न होणारे आहेत असे त्ऊ जाण; एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे - अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांच्या अनुष्ठानद्वारा कर्मबंधनातूत तू मुक्त होशील. ॥ ३२ ॥

व्याख्या : एवंप्रकारेण बहुविधाः अनेकप्रकाराः यज्ञाः ब्रह्मणः वेदस्य मुखे पूर्वकांडे वितताः विस्तारं गताः तैस्तैः मंत्रैः प्रकाशिताः । हे पार्थ ! त्वं सर्वान्‌ संपूर्णान्‌ तान्‌ यज्ञान्‌ कर्मजान्‌ कर्मभ्यः वाङ्‍मनःकाय कर्मभ्यः जाताः कर्मजाः तान्‌ कर्मजान्‌ आत्मस्वरूपसंस्पर्शरहितान्‌ विद्धि जानीहि । त्वं एवंप्रकारेण ज्ञात्वा ज्ञाननिष्ठः सन्‌ संसारात्‌ विमोक्ष्यसे विशेषेण पुनरुत्पत्तिशून्येन मोक्ष्यसे विमुक्तो भविष्यसि ॥ ३२ ॥

अर्थ : याप्रमाणे अनेक प्रकारचे यज्ञ वेदाच्या द्वारा विस्तारलेले आहेत. ते सर्व कर्मापासून झालेले आहेत, असे जाणून तूं अशुभ संसारापासून मुक्त होशील. ज्याअर्थी अशा प्रकारचे सर्व यक्ष वेदमूलक आहेत, त्याअथीं ते काल्पनिक नाहींत.

विवरण :


श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥

अन्वय : परन्तप - हे परंतप अर्जुना; द्रव्यमयात् यज्ञात् - द्रव्यमय यज्ञापेक्षा; ज्ञानयज्ञः श्रेयान् - ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे; तथा अखिलम् सर्वं कर्म - तसेच जितकी म्हणून सर्व कर्मे आहेत ती; ज्ञाने परिसमाप्यते - ज्ञानामध्ये समाप्त होतात. ॥ ३३ ॥

व्याख्या : हे परंतप ! ज्ञानयज्ञः ज्ञानमेव यज्ञः सः द्रव्यमयात्‌ द्रव्यप्रचुरः द्रव्यमयः यद्वा द्रव्यविकारः द्रव्यमयः तस्मात्‌ यज्ञात्‌ कर्मजात्‌ श्रेयान्‌ श्रेष्ठः अस्ति । हे पार्थ ! सर्वं समस्तं अखिलं सकलं कर्म कर्तुरीप्सिततमं ज्ञाने जानाति सर्वं‌ प्रकाशयति तत्‌ ज्ञानं तस्मिन्‌ परिसमाप्यते सम्यक्‌ समाप्तिं प्राप्नोति ॥ ३३ ॥

अर्थ : पण हे शत्रूंना ताप देणार्‍या अर्जुना, द्रव्यादि साधनानी साध्य होणार्‍या या सर्व साधनांहून 'ब्रह्मार्पणम्०' या श्लोकांत सांगितलेला ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व कर्म प्रतिबद्ध न होतां ज्ञानांत अंतर्भूत होते. द्रव्य या साधभानें साध्य होणार्‍या यज्ञाहून ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, या वाक्यांतील द्रव्य हा शब्द स्वाध्यायादिकांच्या उपलक्षणार्थ आहे. कारण ज्ञानयज्ञ स्वाध्यायादि इतर सर्व यज्ञांहूनहि श्रेयस्कर आहे. कारण द्रव्यमय यज्ञ फलाचा आरंभक आहे. ज्ञानयज्ञ कोणत्याहि फलाचा आरंभक नाहीं. तर नित्य मोक्षाला अभिव्यक्त करणारा आहे. म्हणून अग्निहोत्रादि सर्व कर्मांचें फल 'सर्वतः संप्लुतोदकस्थानीय' मोक्षसाधनरूप ज्ञानांत अंतर्भूत होते. येथे पूर्वोक्त यज्ञानें ज्ञानाची स्तुति केली आहे.

विवरण :


ज्ञानप्रासीचा उपाय व ज्ञानाची प्रशंसा.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

अन्वय : तत् विद्धि - ते ज्ञान तत्त्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडून तू जाणून घे; प्रणिपातेन सेवया - त्यांना यथायोग्य दंडवत प्रणाम अक्रण्याने, त्यांची सेवा करण्याने; परिप्रश्नेन - आणि त्यांना कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने; तत्त्वदर्शिनः ते ज्ञानिनः - परमात्मतत्त्व व्यवस्थितपणे जाणणारे असे ते ज्ञानी महात्मे; ज्ञानम् उपदेक्ष्यन्ति - तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. ॥ ३४ ॥

व्याख्या : ' अर्जुन उवाच । एतादृशं ज्ञानं केनोपायेन प्राप्तव्यं अस्ति ' । श्रीभगवानुवाच । त्वं तु मत्कृपया उपायं विनैव तत्‌ ज्ञानं मत्तः त्रैलोक्यगुरोः विद्धि प्राप्नुहि त्वदन्ये तु त्वद्व्यतिरिक्ताः पुरुषाः ज्ञानिभ्यः प्रणिपातेन प्रकर्षेण निपातः दंडवत्‌ उच्चनीचकर्दमकंटकाद्यविचार्य एकनिष्ठतया पतनं प्रणिपातः तेन प्रणिपातेन साष्टांगनमस्कारेण चेत्यपरं परिप्रश्नेन ' भो स्वामिन्‌ अनादौ अस्मिन्संसारे अहं निमग्नः तस्य संसारस्य पारं चेत्यपरं स्वरूपावस्थानं मोक्षं कथं गमिष्यामि ' - इति प्रश्नेन ततस्तदनंतरं प्रश्नानंतरं यावत्‌ ते ज्ञानिनः कृपया उपदेक्ष्यंति तावत्कालपर्यंतं सेवया तदनुकूलतया नीचवत्‌ दास्येन विदुः जानंति । एवं पूर्वोक्तप्रकारेण सेवायां कृतायां सत्यां ते ज्ञानिनः न उपेक्ष्यंति । किं तु ते ज्ञानिनः ज्ञानं सर्वार्थप्रकाशकं ज्ञानं उपदेक्ष्यंति उप नाम सामीप्येन दर्शयिष्यंति । कथंभूताः ज्ञानिनः । तत्त्वदर्शिनः तत्त्वस्य याथार्थ्यस्वरूपस्य दर्शनं साक्षात्कारः येषां ते अथवा तत्त्वेन तत्त्वंपदशोधनेन दर्शनं अनुभवः येषां ते तत्त्वदर्शिनः ॥ ३४ ॥

अर्थ : असें हे अत्यंत श्रेष्ठ ज्ञान कोणत्या उपायानें प्राप्त होते ते सांगतो- अर्जुना, तूं हे ज्ञान आचार्यांना शरण जाऊन, त्यांना साष्टांग नमस्कार करून, बंधमोक्षासंबंधीं विविध प्रश्न विचारून व त्यांची शुश्रूषा करून संपादन कर. तत्त्वदर्शी ज्ञानी तुंला ह्या ज्ञानाचा उपदेश करतील.

विवरण :


यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥

अन्वय : यत् ज्ञात्वा - जे जाणल्यावर; पुनः एवं मोहं न यास्यसि - पुन्हा अशा प्रकारे तू मोहात पडणार नाहीस; पाण्डव - हे अर्जुना; येन भूतानि - ज्या ज्ञानाच्या द्वारे सर्व भूतांना; अशेषेण आत्मनि - संपूर्णपणे आपल्यामध्ये; अथो मयि द्रक्ष्यसि - आणि नंतर सच्चिदानंदघन मज परमात्म्यामध्ये तू पाहशील. ॥ ३५ ॥

व्याख्या : हे पांडव ! यत्‌ ज्ञानं ज्ञात्वा तादात्म्यं प्राप्य एवं इदानीं मोहुं स्वजनमरणनिमित्तं मोहं पुनः बंधुवधादिदुःखं न यास्यसि न प्राप्स्यसि । येन ज्ञानेन ज्ञप्तिस्वरूपेण भूतानि चराचराणि ब्रह्मांडोदरवर्तिनि अशेषेण साकल्येन आत्मनि स्वस्मिन्‌ द्रक्ष्यसि पश्यसि । अथो सर्वभूतदर्शनानंतरं त्वं मयि त्वदुपदेष्टरि भूतैः सह आत्मानं द्रक्ष्यसि पश्यसि मद्‌रूपेण अनुभवसि ॥ ३५ ॥

अर्थ : हे पांडवा, तें ज्ञान संपादन केल्यावर तूं पुनरपि असा मोहित होणार नाहींस, उलट त्या ज्ञानाने आब्रह्मस्तंबपर्यंत सर्व भूतांस आपल्या प्रत्यगात्म्यामध्ये व मज परमेश्वरामध्ये पहाशील. तत्त्वज्ञ आचार्यांनी ज्ञानोपदेश केला असतां तुला आत्मसाक्षात्कार होईल. त्यानंतर तुला आतां जसा मोह झाला आहे, तसा पुनः होणार नाहीं. इतकेच नव्हे, तर त्या ज्ञानाच्या योगाने आब्रह्मस्तंबपर्यंत सर्व भूते तूं आपल्या आत्म्यामध्यें व त्याचप्रमाणे मजमध्यें पहाशील. म्ह ० क्षेत्रज्ञ व ईश्वर यांचे ऐक्य तुझ्या अनुभवास येईल.

विवरण :


अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥

अन्वय : चेत् सर्वेभ्यः पापेभ्यः अपि - जरी तू सर्व पापी माणसांपेक्षा सुद्धा; पापकृत्तमः असि - अधिक पाप करणारा असा असलास; ज्ञानप्लवेन एव - तरी सुद्धा निःसंशयपणे ज्ञानरूपी नौकेने; सर्वं वृजिनम् सन्तरिष्यसि - संपूर्ण पापसमुद्र तू चांगल्याप्रकारे तरून जाशील. ॥ ३६ ॥

व्याख्या : त्वं सर्वेभ्यः संपूर्णेभ्यः पापेभ्योऽपि पापकारिभ्योपि पापकृत्तमः पापं करोतीति पापकृत्‌ अतिशयेन पापकृत्‌ इति पापकृत्तमः भीष्मादिवधनिमित्तेन पापिष्ठः असि चेत्‌ तर्हि सर्वं संपूर्णं वृजिनं पापसमुद्रं ज्ञानप्लवेनैव ज्ञानमेव प्लवः नौका ज्ञानप्लवः तेन ज्ञानप्लवेन संतरिष्यसि अनायासेन तरिष्यसि ॥ ३६ ॥

अर्थ : अर्जुना, तूं जरी सर्व पाप्यांहून अधिक पाप करणारा असलास, तरी या ज्ञानरूपी नौकेनेंच म्ह० ब्रह्मात्मैक्य ज्ञानालाच नौका करून सर्व पापाच्या समुद्राला तूं उत्तम प्रकारे तरून जाशील. अध्यात्मशास्त्रांत मुमुक्षुचा धर्महि 'पाप' म्हटला जातो. येथे मुमुक्षूच्या धर्मालाहि पाप म्हटले आहे. कारण निषिद्धाचरणाप्रमाणेंच विहिताचरणहि त्याला बंध उत्पन्न करते व मुमुक्षूचे धर्माधर्मसंज्ञक सर्व बधं तुटले पाहिजेत, तरच त्याला मोक्ष मिळतो. येथें आत्मज्ञानाचे माहात्म्य सांगितलें आहे.

विवरण :


यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ ४-३७ ॥

अन्वय : अर्जुन, यथा समिद्ध अग्निः - हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलिन अग्नी; एधांसि भस्मसात् कुरुते - सर्पणाला भस्ममय करतो; तथा ज्ञानाग्निः सर्वकर्माणि - त्याप्रमाणेच ज्ञानरूपी अग्नि सर्व कर्मांना; भस्मसात् कुरुते - भस्ममय करून टाकतो. ॥ ३७ ॥

व्याख्या : यथा समिद्धः सम्यक्‌ उत्तमप्रकारेण इद्धः प्रदीप्तः समिद्धः अग्निः एधांसि शुष्ककाष्ठानि भस्मसात्‌ दग्ध्वा भस्म कुरुते करोति । हे अर्जुन ! तथा ज्ञानाग्निः ज्ञानमेव अग्निः ज्ञानाग्निः सर्वकर्माणि सर्वाणि संपूर्णानि च तानि कर्माणि च सर्वकर्माणि प्रारब्धव्यरिक्तानि शुभाशुभफलानि पुण्यपापात्मकानि भस्मसात्‌ दग्ध्वा भस्म कुरुते करोति ॥ ३७ ॥

अर्थ : अर्जुना, ज्याप्रमाणे प्रदीप्त झालेला अग्नि इंधनाला जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अअग्नि अज्ञानाचा नाश करून त्याच्या द्वारा, ज्या कर्मांच्या फळाला आरंभ झालेला नाही, अशीं याच जन्मांत ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी केलेली, ज्ञानानंतर शरीर असेपर्यत होणारीं व मागे होऊन गेलेल्या अनेक जन्मी केलेली अशी संचित व आगामी सर्व कमें दग्ध-निर्बीज करतो.

विवरण :


न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥

अन्वय : इह ज्ञानेन सदृशं पवित्रम् - या संसारात ज्ञानासमान पवित्र करणारे; हि न विद्यते - निःसंदेहपणे काहीही नाही; तत् कालेन योगसंसिद्धः - ते ज्ञान दीर्घ काळाने कर्मयोगाच्या द्वार अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य; स्वयं आत्मनि विन्दते - आपण स्वतःच आत्म्यामध्ये प्राप्त करून घेतो. ॥ ३८ ॥

व्याख्या : इह ब्रह्मांडोदरे ज्ञानेन पवित्रं सदृशं तुल्यं पवित्रं पवेः संसारात्‌ त्रायते संरक्षते इति पवित्रं शुद्धिकरं अन्यत्‌ न विद्यते । हि इति निश्चयेन । त्वं योगसंसिद्धः सन्‌ योगेन कर्मोपासनयोः अनुष्ठानेन संसिद्धः ज्ञानाधिकारी योगसंसिद्धः योग्यतां प्राप्तः सन्‌ तत्‌ ज्ञानं स्वयं अनायासेन आत्मनि अंतःकरणे कालेन महता कर्मयोगेन विंदति लभते ज्ञानरूपो भवति ॥ ३८ ॥

अर्थ : अर्जुना, ज्याअर्थी या ज्ञानाचें एवढे माहात्म्य आहे, त्याअर्थी त्या ब्रह्मात्मैक्य ज्ञानासारखें पावन करणारें, शुद्धि करणारें या जगात कांहींच नाही. तें आत्मविषयक ज्ञान कर्मयोगाने व समाधियोगानें सुसंस्कृत झालेला मुमुक्षु दीर्घकालाने स्वतःच संपादन करितो. कर्मयोग व समाधियोग या योगाने सुसंस्कृत झालेल्या मुमुक्षुला ब्रह्मामैक्यज्ञान अनायासानें होते. अर्थात् ज्ञानाची योग्यता संपादन करण्यासाठी पुरुषाला अनेक जन्म दीर्धकाल यत्‍न करावा लागतो. ज्ञानाची योग्यता प्राप्त झाल्यावर त्याच्या सिद्धीसाठी पुथक् यज्ञ करावा लागत नाही, असा याचा भावार्थ.

विवरण :


श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥

अन्वय : संयतेन्द्रियः तत्परः - जितेंद्रिय, साधन तत्पर; च श्रद्धावान् - आणि श्रद्धावान असा मनुष्य; ज्ञानम् लभते - ज्ञान प्राप्त करून घेतो; ज्ञानं लब्ध्वा - आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर; सः अचिरेण - तो मनुष्य तत्काळ, विना विलंब; पराम् शान्तिम् अधिगच्छति - भगवत् प्राप्तीरूप परम शांती प्राप्त करून घेतो. ॥ ३९ ॥

व्याख्या : श्रद्धावान्‌ श्रद्धा गुरुशास्त्रादौ विश्वासः विद्यते यस्य सः श्रद्धावान्‌ ज्ञानं लभते प्राप्नोति । कथंभूतः श्रद्धावान्‌ । तत्परः तदेव ज्ञानमेव परं श्रेष्ठपुरुषार्थः यस्य सः तत्परः । पुनः कथंभूतः संयतेंद्रियः । संयतानि विषयेभ्यः पराङ्‌मुखानि इंद्रियाणि यस्य सः संयतेंद्रियः सः श्रद्धावान्‌ ज्ञानं ज्ञप्तिमात्रं लब्ध्वा तादात्म्यं प्राप्य अचिरेण ज्ञानव्यवधानेन परां चरमां शांतिं अविद्यानिवृत्तिरूपां मुक्तिं अधिगच्छति प्राप्नोति । यथा दीपः स्वोत्पत्तिमात्रेणैव अंधकारनिवृत्तिं करोति साहायं नापेक्षते तथा ज्ञानमपि स्वोत्पत्तिमात्रेणैव अज्ञाननिवृत्तिं करोति न तु कालांतरेण ॥ ३९ ॥

अर्थ : ज्याच्या योगाने नियमाने ज्ञानप्राप्ति होते, तो अंतरंग उपाय मी तुला सांगतों - श्रद्धाळु, गुरूची उपासना इत्यादि ज्ञानप्राप्तीच्या उपायांमध्ये अतिशय तत्पर असणारा व विषयांपासून इंद्रियांना निवृत्त करणारा पुरुष आत्मज्ञानाला प्राप्त होतो. अशाच पुरुषाला आत्मज्ञान होते आणि ज्ञानप्राप्ति झाल्यावर त्याला मोक्ष नांवाची पराशांति सत्वर प्राप्त होते.

विवरण :


संशय सर्वथा त्याज्य, म्हणून त्याचा त्याग करून ज्ञानसाधनभूत कर्मयोगाच्या अनुष्ठानाचा उपदेश.

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥

अन्वय : अज्ञः च अश्रद्दधानः - जो विवेकहीन आणि श्रद्धारहित असा असतो; संशयात्मा विनश्यति - तो संशययुक्त मनुष्य परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होतो; संशयात्मनः अयं लोकः न अस्ति - संशययुक्त माणसाला हा लोक तर नसतोच; न परः च न सुखम् - पण परलोकही नसतो वा सुखही नसते. ॥ ४० ॥

व्याख्या : अज्ञः आत्मानं जानातीति ज्ञः न ज्ञः अज्ञः देहात्मदर्शी चेत्यपरं अश्रद्दधानः गुरुशास्त्रोपदिष्टे अर्थे प्रीतिरहितः चेत्यपरं संशयात्मा संशयरूपः आत्मा अंतःकरणं यस्य सः संशयात्मा अत्यंतं निकृष्टः विनश्यति विशेषेण नाशं प्राप्नोति तथापि एवं सत्यपि चकारद्वयेन अज्ञश्रद्दधानौ कालांतरे कस्मिंश्चित्‌ पुण्यकर्मोदये केनचित्‌ कृपालुना बोधार्हौ बोधाय बोधं कर्तुं अर्हौ योग्यौ बोधार्हौ भवतः । संशयात्मा कालांतरेपि बोधयोग्यः न भवति । एवंप्रकारेण नश्यति । तौ अज्ञश्रद्दधानौ प्रति विहाय त्यक्त्वा सुखेन संशयात्मनः अनिष्टफलं दर्शयति । संशयात्मनः संशयरूपं आत्मा मनः यस्य सः संशयात्मा तस्य अयं सर्वलोकप्रत्यक्षः लोकः मनुष्यलोकः नास्ति परः परलोकः कुतः ? । किं च संशयात्मनः सर्वत्र विषयेषु संशयोदयेन सुखमपि सामान्यसुखमपि नास्ति ॥ ४० ॥

अर्थ : श्रद्धावान्, गुरुसेवाप्रभृति उपायांमध्ये तत्पर व जितेंद्रिय असलेल्या मुमुक्षूला निश्चयानें ज्ञान होते ज तें झालें म्हणजे तो मोक्ष या नावाच्या श्रेष्ठ उपरतीला सत्वर प्राप्त होतो. या सिद्धांताविषयीं मनांत संशय आणू नये. कारण तो संशय अतिशय पापी आहे असे सांगण्यासाठी भगवान् म्हणतात - आत्म्याला न जाणणारा, -अश्रद्धाळू व संशयचित्त, संशयस्वभाव संशयी पुरुष विनाश पावतो. कारण संशयी पुरुषाला हा सर्वसाधारण मनुष्यलोकहि मिळत नाहीं. विशिष्ट साधनांनीं साध्य होणारा परलोकहि नाही व सुखहि मिळत नाहीं. कारण त्याला त्या त्या फलाच्या प्राप्तीविषयी संशय येणारच. मीं या साधनाचे आचरण करीत आहे खरें, पण त्याचे फल मिळेल की नाहीं, हे कोणाला ठाऊक, असा संशय संशयचित्त पुरुषाला येणे अपरिहार्य आहे. म्हणून अज्ञ व अश्रद्धाळू हे दोघेहि जरी विनाश पावत असले तरी संशयात्मा जसा विनाश पावतो, तसे ते विनाश पावत नाहींत. संशय महापापी आहे. म्हणून संशयात्म्याला हा सर्वप्राणिसाधारण मनुष्यलोकहि मिळत नाहीं; मग विशिष्ट साधनांनी साध्य असलेला स्वर्गादि परलोक व श्रेष्ठ सुख कोठून मिळणार !

विवरण :


योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

अन्वय : धनञ्जय, योगसंन्यस्तकर्माणम् - हे धनंजया, कर्मयोगाच्या द्वारा ज्याने विधिपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केला आहेत; ज्ञानसञ्छिन्नसंशयम् - विवेकाच्या द्वारा ज्याने सर्व संशयांचा नाश केलेला आहे; आत्मवन्तम् - ज्याने अंतःकरण वश करून घेतले आहे अशा पुरुषाला; कर्माणि न निबध्नन्ति - कर्मे बद्ध करीत नाहीत. ॥ ४१ ॥

व्याख्या : हे धनंजय ! धनं आत्मसाक्षात्काररूपं धनं जयतीति धनंजयः तत्संबुद्धौ हे धनंजय ! कर्माणि लोकसंग्रहार्थानि ज्ञानिनं न निबध्नंति निःसंशयेन जन्ममरणरूपबंधं न संपादयंति । कथंभूतं ज्ञानिनम्‌ । योगसंन्यस्तकर्माणं योगेन कर्मोपासनासमुच्चयरूपेण अथवा योगेन परमेश्वराराधनयोगेन अथवा परमार्थदर्शनलक्षणयोगेन संन्यस्तानि भगवति समर्पितानि कर्माणि येन सः योगसंन्यस्तकर्मा तम्‌ । पुनः कथंभूतं ज्ञानिमन्‌ । ज्ञानसंच्छिन्नसंशयं ज्ञानेन अकर्तात्मबोधेन यद्वा ज्ञानेन आत्मनिश्चयलक्षणेन संच्छिन्नः त्रुटितः संशयो देहाद्यभिमानलक्षणसंशयः यस्य सः ज्ञानसंच्छिन्नसंशयः तम्‌ । अत एव आत्मवंतं आत्मा निश्चयात्मिका बुद्धिः विद्यते यस्य सः आत्मवान्‌ तं आत्मवंतं अप्रमादिनम्‌ ॥ ४१ ॥

अर्थ : यास्तव हे अर्जुना, आत्मा व ईश्वर यांच्या एकत्वदर्शनरूप ज्ञानाने ज्याचा संशय पार गेला आहे व त्यामुळे परमार्थदर्शनरूप योगाने म्ह० ज्ञानयोगाने धर्म व अधर्म या नांवांची कर्में ज्याने सोडली आहेत, अशा सावधान पुरुषाला धर्माधर्माख्य कर्में बद्ध करीत नाहीत. म्ह० त्या त्या इष्टानिष्ट कर्मांचा आरंभ करीत नाहींत. कारण तो तीं कमें शरीरेंद्रियांचीं आहेत, माझी नव्हेत, असे सतत समजतो. त्यामुळे ती त्याला कर्मफळाने बद्ध करूं शकत नाहींत.

विवरण :


तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥

अन्वय : तस्मात् भारत - म्हणून हे परतवंशी अर्जुना; हृत्स्थं एनम् - हृदयामध्ये असणार्‍या या; अज्ञानसंभूतम् - अज्ञानाने निर्माण झालेल्या; आत्मनः संशयम् - आपल्या संशयाला; ज्ञानासिना छित्त्वा - विवेकज्ञानरूपी तलवारीने कापून टाकून; योगम् आत्तिष्ठ - समत्त्वरूप कर्मयोगात स्थित होऊन जा; उत्तिष्ठ - आणि युद्धासाठी उठून उभा रहा. ॥ ४२ ॥

व्याख्या : हे भारत ! हे क्षत्रियवंशोद्‍भव ! तस्मात्‌ ज्ञानात्‌ सर्वघातकः संशयः छिद्यते त्वं आत्मनः स्वस्य एनं सर्वानर्थमूलभूतं संशयं ज्ञानासिना ज्ञानमेव मदुपदिष्टं आत्मानात्मविवेकरूपं ज्ञानमेव असिः खड्गः ज्ञानासिः तेन छित्त्वा द्विधा खंडं कृत्वा समूलं उत्पाट्य योगं युद्धाख्यं स्वधर्मं आतिष्ठ आश्रय । प्रथमं युद्धाय उत्तिष्ठ विलंबं मा कुरु । भरतवंशे जातस्य तव युद्धोद्यमः न निष्फल इति भावः । कथंभूतं संशयम्‌ । अज्ञानसंभूतं अज्ञानेन संभूतः उत्पन्नः अज्ञानसंभूतः तम्‌ । पुनः कथंभूतं संशयम्‌ । हृत्स्थं हृदि बुद्धौ तिष्ठतीति हृत्स्थः तं हृत्स्थम्‌ ॥ ४२ ॥

अर्थ : ज्याअर्थी कर्मयोगाच्या अनुष्टानामुळें अशुद्धीचा क्षय होऊन उत्पन्न होणार्‍या ज्ञानाने ज्याचा संशय तुटला आहे, तो कर्माकडून बद्ध केला जात नाही आणि ज्याअर्थी ज्ञान व कर्मानुष्ठान यांविषयी ज्याला संशय असतो, तो विनाश पावतो, त्याअर्थीं अर्जुना, तूं अविवेकामुळे अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व बुद्धींत असलेल्या आत्म्याविषयींच्या या संशयास शोक-मोहादि दोषांना घालविणार्‍या परोक्ष यथार्थ ज्ञानरूपी तरवारीने तोडून अपरोक्ष ज्ञानसाधनरूप कर्मानुष्ठान कर. हे भारता, आतां अगोदर तूं युद्धाला ऊठ.
कर्मानुष्ठानानें अशुद्धीचा क्षय होऊन ज्ञान होते. ज्ञानानें सर्व संशय नाहींसे होतात व ज्ञानाप्रीनें सर्व कर्में दग्ध झाल्यामुळें तो ज्ञानी धर्माधर्माख्य कर्मांनी बद्ध होत नाहीं. त्याचप्रमाणें ज्ञान व कर्म यांविषयीं ज्याला संशय असतो तो विनाश पावतो. म्हणून तू आपल्या बुद्धींतील अविवेकामुळें उत्पन्न झालेल्या अत्यंत पापी संशयाला शोकमोहादि दोष घालविणार्‍या तत्त्वदर्शनाने, परोक्ष आत्मज्ञानानें घालवून, ज्ञानरूपी खड्गाने आत्म्याविषयींच्या संशयाला तोडून, आत्मसाक्षाकाराचा उपाय असा जो कर्मयोग त्याचे अनुष्ठा कर. पण हे अर्जुना, आतां अगोदर त्या स्वधर्मरूप कर्मयोगाचा एकदेश असे जे हे प्राप्त युद्ध तें कर. या समग्र अध्यायांत 'योगाचें कृत्रिमत्व व भगवानाचे अनीश्वरत्व याविषयींची शंका घालवून प्रणिपातादि बहिरंग व श्रद्धादि अंतरंग साधनांच्या योगानें उत्पन्न झालेल्या कर्मादिकांमध्यें अकर्मादि दर्शनरूप आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने सर्व अनर्थांची निवृत्ति होऊन ब्रह्मभावप्राप्ति होते,' असे सांगितलें व शेवटी संशयरहित असलेल्या पुरुषालाच सर्वोत्तम ज्ञानाचा अधिकार असल्यामुळें सर्व अनर्थांचें मूळ असा जो संशय तो घालवून उत्तम अधिकार्‍यासाठीं ज्ञाननिष्ठा व मध्यम अधिकार्‍यासाठीं कर्मनिष्ठा विहित आहे, असे सिद्ध केलें.
येथे भगवद्‌गीतेचा 'ज्ञान-कर्मसंन्यासयोग' नांवाचा चवथा अध्याय समास झाला.

विवरण :


ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥


॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

GO TOP