श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
एकविंशोऽध्यायः


नरकस्वरूपवर्णनम्

श्रीनारायण उवाच
तस्यानुभावं भगवान् ब्रह्मपुत्रः सनातनः ।
सभायां ब्रह्मदेवस्य गायमान उपासते ॥ १ ॥
उत्पत्तिस्थितिलयहेतवोऽस्य कल्पाः
     सत्त्वाद्याः प्रकृतिगुणा यदीक्षयाऽऽसन् ।
यद्‌रूपं ध्रुवमकृतं यदेकमात्मन्-
     नानाधात्कथमुह वेद तस्य वर्त्म ॥ २ ॥
मूर्तिं नः पुरुकृपया बभार सत्त्वं
     संशुद्धं सदसदिदं विभाति यत्र ।
यल्लीलां मृगपतिराददेऽनवद्या-
     मादातुं स्वजनमनांस्युदारवीर्यः ॥ ३ ॥
यन्‍नाम श्रुतमनुकीर्तयेदकस्मा-
     दार्तो वा यदि पतितः प्रलम्भनाद्वा ।
हन्त्यंहः सपदि नृणामशेषमन्यं
     कं शेषाद्‍भगवत आश्रयेत्युमुक्षुः ॥ ४ ॥
मूर्धन्यर्पितमणुवत्सहस्रमूर्ध्नो
     भूगोलं सगिरिसरित्समुद्रसत्त्वम् ।
आनन्त्यादनमितविक्रमस्य भूम्नः
     को वीर्याण्यधिगणयेत्सहस्रजिह्वः ॥ ५ ॥
एवंप्रभावो भगवाननन्तो
     दुरन्तवीर्योरुगुणानुभावः ।
मूले रसायाः स्थित आत्मतन्त्रो
     यो लीलया क्ष्मां स्थितये बिभर्ति ॥ ६ ॥
एता ह्येवेह तु नृभिर्गतयो मुनिसत्तम ।
गन्तव्या बहुशो यद्वद्यथाकर्मविनिर्मिताः ॥ ७ ॥
यथोपदेशं च कामान्सदा कामयमानकैः ।
एतावतीर्हि राजेन्द्र मनुष्यमृगपक्षिषु ॥ ८ ॥
विपाकगतयः प्रोक्ता धर्मस्य वशगास्तथा ।
उच्चावचा विसदृशा यथाप्रश्नं निबोधत ॥ ९ ॥
नारद उवाच
वैचित्र्यमेतल्लोकस्य कथं भगवता कृतम् ।
समानत्वे कर्मणां च तन्‍नो ब्रूहि यथातथम् ॥ १० ॥
श्रीनारायण उवाच
कर्तुः श्रद्धावशादेव गतयोऽपि पृथग्विधाः ।
त्रिगुणत्वात्सदा तासां फलं विसदृशं त्विह ॥ ११ ॥
सात्त्विक्या श्रद्धया कर्तुः सुखित्वं जायते सदा ।
दुःखित्वं च तथा कर्तू राजस्या श्रद्धया भवेत् ॥ १२ ॥
दुःखित्वं चैव मूढत्वं तामस्या श्रद्धयोदितम् ।
तारतम्यात्तु श्रद्धानां फलवैचित्र्यमीरितम् ॥ १३ ॥
अनाद्यविद्याविहितकर्मणां परिणामजाः ।
सहस्रशः प्रवृत्तास्तु गतयो द्विजपुङ्‌गव ॥ १४ ॥
तद्‍भेदान्वर्णयिष्यामि प्राचुर्येण द्विजोत्तम ।
त्रिजगत्या अन्तराले दक्षिणस्यां दिशीह वै ॥ १५ ॥
भूमेरधस्तादुपरि त्वतलस्य च नारद ।
अग्निष्वात्ताः पितृगणा वर्तन्ते पितरश्च ह ॥ १६ ॥
वसन्ति यस्यां स्वीयानां गोत्राणां परमाशिषः ।
सत्याः समाधिना शीघ्रं त्वाशासानाः परेण वै ॥ १७ ॥
पितृराजोऽपि भगवान् सम्परेतेषु जन्तुषु ।
विषयं प्रापितेष्वेषु स्वकीयैः पुरुषैरिह ॥ १८ ॥
सगणो भगवत्प्रोक्ताज्ञापरो दमधारकः ।
यथाकर्म यथादोषं विदधाति विचारदृक् ॥ १९ ॥
स्वान्गणान्धर्मतत्त्वज्ञान्सर्वानाज्ञाप्रवर्तकान् ।
सदा प्रेरयति प्राज्ञो यथादेशनियोजितान् ॥ २० ॥
नरकानेकविंशत्या संख्यया वर्णयन्ति हि ।
अष्टाविंशमितान्केचित्ताननुक्रमतो ब्रुवे ॥ २१ ॥
तामिस्र अन्धतामिस्रो रौरवोऽपि तृतीयकः ।
महारौरवनामा च कुम्भीपाकोऽपरो मतः ॥ २२ ॥
कालसूत्रं तथा चासिपत्रारण्यमुदाहृतम् ।
सूकरस्य मुखं चान्धकूपोऽथ कृमिभोजनः ॥ २३ ॥
संदंशस्तप्तमूर्तिश्च वज्रकण्टक एव च ।
शाल्मली चाथ देवर्षे नाम्ना वैरतणी तथा ॥ २४ ॥
पूयोदः प्राणरोधश्च तथा विशसनं मतम् ।
लालाभक्षः सारमेयादनमुक्तमतः परम्॥ २५ ॥
अवीचिरप्ययः पानं क्षारकर्दम एव च ।
रक्षोगणाख्यसम्भोजः शूलप्रोतोऽप्यतः परम् ॥ २६ ॥
दन्दशूकोऽवटारोधः पर्यावर्तनकः परम् ।
सूचीमुखमिति प्रोक्ता अष्टाविंशतिनारकाः ॥ २७ ॥
इत्येते नारका नाम यातनाभूमयः पराः ।
कर्मभिश्चापि भूतानां गम्याः पद्मजसम्भव ॥ २८ ॥


कर्म व श्रद्धा यांचे विवेचन -

श्री नारायण म्हणाले, "हे नारदा, षड्‍गुणैश्वर्यसंपन्‍न आणि नित्य असा जो ब्रह्मपुत्र, जो ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये त्या अनंताचे महात्म्य गात, गानस्वरूपानेच त्याची उपासना करतो. या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय यांना कारण जे सत्त्व वगैरे मायागुण ज्याच्या संकल्पाने आपापले कार्य करण्यास समर्थ होतात, ज्याचे स्वरूप एकच आहे, व जो त्या स्वरूपात राहूनच नानाप्रकारची कार्ये करतो, तो नित्य, अकृत्रिम असून अनादि आहे. तेच ब्रह्मरूपाचे तत्त्व असून ते प्राण्याला कसे बरे समजणार ?

ज्याच्या ठिकाणी सत व असत हे दोन्ही भाव दर्शित होतात. त्यानेच आमच्यावर निःसीम कृपा करण्याकरता ही अत्यंत शुद्ध सात्त्विक मूर्ती धारण केली आहे. आपल्या लोकांची मने वश करून घेण्यासाठी त्याची शुद्ध लीला शेष शिकला.

त्याचे पराक्रम खरोखरच उदार आहेत. ज्याचे नाव कोणीही पीडिताने ऐकले किंवा निजलेल्याने थट्टेने जरी उच्चारले तरीही तत्काल मनुष्याचे पातक नाहीसे होते. एवढे सामर्थ्य त्या परमेश्वराच्या नावात आहे. तेव्हा त्या भगवान शेषाला सोडून मुमुक्षू दुसर्‍या कोणाचा बरे आश्रय करण्यास सिद्ध होतील ?

त्या सहस्र मस्तकांनी युक्त असलेल्या शेषाच्या मस्तकावर ठेवलेला हा पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी यांनी परिपूर्ण असलेला पृथ्वीचा गोल प्रत्यक्ष एखाद्या अणूसारखा दिसतो तेथे भूमा नावाचा ईश्वर आहे. तो अमर्याद व अपरिमित सामर्थ्य असलेला आहे. अशा या ईश्वराची, जरी प्राणी हजार जिव्हांनी युक्त असला, तरीही गणना कशी बरे करू शकणार ?

असा सर्वच प्रभावशक्तींनी परिपूर्ण असलेला तो भगवान त्याला कोणतीही सीमा नाही. तो अनंत आहे. तसेच सामर्थ्यसंपन्‍न आणि अतिशय उदार आहे. तो अगदी स्वतंत्रपणे त्या रसातलाच्या मूलप्रदेशात नित्य वास्तव्य करीत असतो आणि पृथ्वीचे संरक्षण व्हावे म्हणून तो अगदी लीलया त्या पृथ्वीला मस्तकावर धारण करतो. हे मुनिश्रेष्ठा, विविध प्रकारचे जसजसे कर्म प्राप्त झाले असेल त्या त्या योग्यतेप्रमाणेच मनुष्यास गती प्राप्त होत असतात. त्या गतीही कर्माइतक्या अनेक आहेत. हे पुरुषश्रेष्ठा, जे लोक आपल्या कर्मांची शास्त्राधाराप्रमाणे इच्छा करतात त्या लोकांना मनुष्य, पशु, पक्षी इत्यादीपैकी हव्या असतील त्या गती मिळत असतात. त्या गती अनेक आहेत.

तसेच हे नारदा, जे धर्माच्या आधीन होऊन रहातात त्यांना परिणाम रूपाने उच्च नीच अथवा मध्यम गती प्राप्त होतात. इतर गतींप्रमाणे त्या गती सांगितल्या गेल्या आहेत. हे मुने, त्या गती आता ध्यानात ठेव."

नारदमुनी शांत चित्त करून श्रीनारायणांचे भाषण ऐकत होते. त्यांनी वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नांना नारायणमुनी उत्तर देत होते. नारदांनी गतीविषयी प्रश्न विचारला. "हे नारायण ऋषे, बहुधा सर्व कर्मे सारखीच असतात. मग असे असताना त्या भगवानाने लोकांमधे विविध प्रकार निर्माण करून हा असला विचित्रपणा का बरे केला, हे मला आता खरे सांगा."

नारदाचा प्रश्न ऐकून नारायणमुनी हसले आणि ऐकण्यास उत्सुक झालेल्या नारदाला म्हणाले, "हे देवप्रिया, हे नारदा, हे ब्रह्मपुत्रा, तुझे म्हणणे योग्यच आहे. पण आता मी सांगतो ते ऐक तर. प्रत्येक कर्म करणार्‍या पुरुषाची श्रद्धा ही विविध प्रकारची असते. त्यामुळे गतीही विविध प्रकारच्या निर्माण केलेल्या आहेत. श्रद्धा ही त्रिगुणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे त्यांचे फल अत्यंत भिन्‍नभिन्‍नच मिळणार यात काय बरे संशय ?

सात्त्विकी श्रद्धेमुळे पुरुषाला म्हणजे त्या कर्मकर्त्याला नित्य सुखच लाभते. पण राजसी श्रद्धेच्या प्रभावामुळे मात्र त्याला दुःखाचाच लाभ होतो. तसेच तिसरी तामसी श्रद्धा. तिच्या योगाने त्याला दुःख व मोह दोन्हीचीही प्राप्ती होते.

पुरुषाच्या कर्माप्रमाणेच त्याला विविध फले प्राप्त होतात. फक्त कर्मावर फल अवलंबून नसून फल हे बहुधा श्रद्धेमुळे विविध प्रकारात प्रत्येकाला मिळत असते. श्रद्धेच्या कमी-अधिक प्रमाणातच फलाची विविधता सांगितली आहे.

हे नारदा, हे ब्राह्मणश्रेष्ठा, अनादि विद्येच्यायोगाने जी कर्मे निर्माण होतात, त्या कर्माच्या फलात वेगवेगळ्या गती सांगितल्या आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे त्या हजारो गती प्रवृत्त झाल्या आहेत.

आता हे विप्रोत्तमा, त्या सर्व गतीचे भेद मी तुला सविस्तर कथन करतो. तू श्रवण कर.

हे नारदा, या त्रैलोक्यात मध्यभागी पण दक्षिण दिशेस भूमीच्या खाली व अतलाच्यावर अग्रीश्वान म्हणून प्रसिद्ध असलेले पितृगण रहातात व पितर तेथे राहून आपल्या वंशजांकडून त्यांची अपेक्षा करीत ते तेथेच असतात. त्यांची उत्सुकता पराकोटीला पोचलेली असते. तरीही आपले वंशज कर्म करतील अशी आशा धरून ते शांतपणे तेथे रहात असतात.

आपल्या पुरुषांनी मृत झालेल्या प्राण्यांना यमलोकी आणून सोडल्यावर भगवानाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे लक्षपूर्वक ऐकून तो भगवान गणांच्या सहकार्याने मृतांना दंड करीत असतो. पितृराज यमही पुरुषाचे जसे कर्म असेल त्या प्रमाणात विचारपूर्वक दंड करीत असतो. त्याचे गण आज्ञा पालन करणारे असतात. तसेच तो यमही अत्यंत बुद्धिमान आहे. तो त्या कर्मफलाप्रमाणे दंड करून त्या प्राण्यांना योग्य त्या प्रदेशात जाण्यास सांगतो.

त्याने ऐकून एकवीस नरक निर्माण केलेले आहेत. कोणी म्हणतात, एकूण अठठावीस नरक आहेत. हे नारदा, ते सर्व आता तुला सांगतो.

तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपात्रारण्य, सूकरमुख, अंधकूप, कृमिकोजन, संदंश, तत्वमूर्ति, वज्रकंटक असे हे नरक असून शाल्मली व वैतरणी या नावाची नदी आहे.

पूमोद, प्राणारोध, विशसन, ललभक्ष, सारमेयादन, अवीची, अयःपन, क्षारकर्दम, रक्षोगण, संभाज, शूलप्रोत, दंदशूक, वटारोध पर्यावर्तनक, सूचीमुख असे हे अठठावीस नरक या नावांनी सांगितले आहे.

हे ब्रह्मपुत्र नारदमुने, हे सर्व नरक म्हणजे ऐहिक स्वरूपात दुःख देणार्‍या अत्यंत यातनाच आहेत. हे सर्व त्या प्राण्यांच्या कर्मगतीप्रमाणे त्यांना प्राप्त होत असते हे तू निश्चितपणे समज. याप्रमाणे मी तुला नरकांची नावे कथन केली."


इति श्रीमद्देवीभागवतेमहापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
नरकस्वरूपवर्णनं नामैकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥
अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP