श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
षोडशोऽध्यायः


सोमादिगतिवर्णनम्

श्रीनारायण उवाच
अथातः श्रूयतां चित्रं सोमादीनां गमादिकम् ।
तद्‍गत्यनुसृता नॄणां शुभाशुभनिदर्शना ॥ १ ॥
यथा कुलालचक्रेण भ्रमता भ्रमतां सह ।
तदाश्रयाणां च गतिरन्या कीटादिनां भवेत् ॥ २ ॥
एवं हि राशिवृन्देन कालचक्रेण तेन च ।
मेरुं धुरं च सरतां प्रादक्षिण्येन सर्वदा ॥ ३ ॥
ग्रहाणां भानुमुख्यानां गतिरन्यैव दृश्यते ।
नक्षत्रान्तरगामित्वाद्‌भान्तरे गमनं तथा ॥ ४ ॥
गतिद्वयं चाविरुद्धं सर्वत्रैष विनिर्णयः ।
स एव भगवानादिपुरुषो लोकभावनः ॥ ५ ॥
नारायणोऽखिलाधारो लोकानां स्वस्तये भ्रमन् ।
कर्मशुद्धिनिमित्तं तु आत्मानं वै त्रयीमयम् ॥ ६ ॥
कविभिश्चैव वेदेन विजिज्ञास्योऽर्कधाभवत् ।
षट्सु क्रमेण ऋतुषु वसन्तादिषु च स्वयम् ॥ ७ ॥
यथोपजोषमृतुजान् गुणान् वै विदधाति च ।
तमेनं पुरुषाः सर्वे त्रय्या च विद्यया सदा ॥ ८ ॥
वर्णाश्रमाचारपथा तथाम्नातैश्च कर्मभिः ।
उच्चावचैः श्रद्धया च योगानां च वितानकैः ॥ ९ ॥
अञ्जसा च यजन्ते ये श्रेयो विन्दन्ति ते मतम् ।
अथैष आत्मा लोकानां द्यावाभूम्यन्तरेण च ॥ १० ॥
कालचक्रगतो भुङ्क्ते मासान्द्वादशराशिभिः ।
संवत्सरस्यावयवान्मासः पक्षद्वयं दिवा ॥ ११ ॥
नक्तं चेति स पादर्क्षद्वयमित्युपदिश्यते ।
यावता षष्ठमंशं स भुञ्जीत ऋतुरुच्यते ॥ १२ ॥
संवत्सरस्यावयवः कविभिश्चोपवर्णितः ।
यावतार्धेन चाकाशवीथ्यां प्रचरते रविः ॥ १३ ॥
तं प्राक्तना वर्णयन्ति अयनं मुनिपूजिताः ।
अथ यावन्नभोमण्डलं सह प्रतिगच्छति ॥ १४ ॥
कार्त्स्न्येन सह भुञ्जीत कालं तं वत्सरं विदुः ।
संवत्सरं परिवत्सरमिडावत्सरमेव च ॥ १५ ॥
अनुवत्सरमिद्वत्सरमिति पञ्चकमीरितम् ।
भानोर्मान्द्यशैघ्र्यसमगतिभिः कालवित्तमैः ॥ १६ ॥
एवं भानोर्गतिः प्रोक्ता चन्द्रादीनां निबोधत ।
एवं चन्द्रोऽर्करश्मिभ्यो लक्षयोजनमूर्ध्वतः ॥ १७ ॥
उपलभ्यमानो मित्रस्य संवत्सरभुजिं च सः ।
पक्षाभ्यां चौषधीनाथो भुङ्क्ते मासभुजिं च सः ॥ १८ ॥
सपादमाभ्यां दिवसभुक्तिं पक्षभुजिं चरेत् ।
एवं शीघ्रगतिः सोमो भुङ्क्ते नूनं भचक्रकम् ॥ १९ ॥
पूर्यमाणकलाभिश्चामराणां प्रीतिमावहन् ।
क्षीयमाणकलाभिश्च पितॄणां चित्तरञ्जकः ॥ २० ॥
अहोरात्राणि तन्वानः पूर्वापरसुघस्रकैः ।
सर्वजीवनिकायस्य प्राणो जीवः स एव हि ॥ २१ ॥
भुङ्क्ते चैकैकनक्षत्रं मुहूर्तत्रिंशता विभुः ।
स एव षोडशकलः पुरुषोऽनादिसत्तमः ॥ २२ ॥
मनोमयोऽप्यन्नमयोऽमृतधामा सुधाकरः ।
देवपितृमनुष्यादिसरीसृपसवीरुधाम् ॥ २३ ॥
प्राणाप्यायनशीलत्वात्स सर्वमय उच्यते ।
ततो भचक्रं भ्रमति योजनानां त्रिलक्षतः ॥ २४ ॥
मेरुप्रदक्षिणेनैव योजितं चेश्वरेण तु ।
अष्टाविंशतिसंख्यानि गणितानि सहाभिजित् ॥ २५ ॥
ततः शुक्रो द्विलक्षेण योजनानामथोपरि ।
पुरः पश्चात्सहैवासावर्कस्य परिवर्तते ॥ २६ ॥
शीघ्रमन्दसमानाभिर्गतिभिर्विचरन्विभुः ।
लोकानामनुकूलोऽयं प्रायः प्रोक्तः शुभावहः ॥ २७ ॥
वृष्टिविष्टम्भशमनो भार्गवः सर्वदा मुने ।
शुक्राद्‌ बुधः समाख्यातो योजनानां द्विलक्षतः ॥ २८ ॥
शीघ्रमन्दसमानाभिर्गतिभिः शुक्रवत्सदा ।
यदार्काद्व्यतिरिच्येत सौम्यः प्रायेण तत्र तु ॥ २९ ॥
अतिवाताभ्रपातानां वृष्ट्यादिभयसूचकः ।
उपरिष्ठात्ततो भौमो योजनानां द्विलक्षतः ॥ ३० ॥
पक्षैस्त्रिभिस्त्रिभिः सोऽयं भुङ्क्ते राशीनथैकशः ।
द्वादशापि च देवर्षे यदि वक्रो न जायते ॥ ३१ ॥
प्रायेणाशुभकृत्सोऽयं ग्रहौघानां च सूचकः ।
नतो द्विलक्षमानेन योजनानां च गीष्पतिः ॥ ३२ ॥
एकैकस्मिन्नथो राशौ भुङ्गे संवत्सरं चरन् ।
यदि वक्रो भवेन्नैवानुकूलो ब्रह्मवादिनाम् ॥ ३३ ॥
ततः शनैश्चरो घोरो लक्षद्वयपरो मितः ।
योजनैः सूर्यपुत्रोऽयं त्रिंशन्मासैः परिभ्रमन् ॥ ३४ ॥
एकैकराशौ पर्येति सर्वान् राशीन्महाग्रहः ।
सर्वेषामशुभो मन्दः प्रोक्तः कालविदां वरैः ॥ ३५ ॥
तत उत्तरतः प्रोक्तमेकादशसुलक्षकैः ।
योजनैः परिसंख्यातं सप्तर्षीणां च मण्डलम् ॥ ३६ ॥
लोकानां शं भावयन्तो मुनयः सप्त ते मुने ।
यत्तद्विष्णुपदं स्थानं दक्षिणं प्रक्रमन्ति ते ॥ ३७
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादलसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
सोमादिगतिवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥


चंद्र व इतर ग्रह यांचे गमन-गती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण मुनींनी नारदाला याप्रमाणे सूर्याच्या गतींविषयी माहिती सांगितली. त्यानंतर ते नारदाला म्हणाले, "हे नारदा, चंद्र व इतर ग्रह तारे याबद्दल विशेष असलेल्या गमनाविषयी मी तुला आता माहिती सांगतो. त्यांची गमनस्थाने, आगमनस्थाने याबद्दल तू आता ऐक. कारण त्यांच्या गमनादि क्रियांवरून प्राणीमात्रांना शुभ अशुभ फले प्राप्त होत असतात.

जसे कुलालाचे चाक म्हणजे कुंभाराचे चाक फिरत असते, त्यावेळी त्याच्यावर असलेल्या कीटादिकांची गती चाकाच्या गतीच्या उलट होते, त्याप्रमाणे राशींनी युक्त असलेल्या कालचक्रामुळे मेरु, ध्रुव यांच्या दक्षिणेकडील स्थानावरून नेहमी गमन करीत असणार्‍या सूर्य व इतर ग्रहांची गती निराळीच असल्यासारखी दिसते.

त्याचप्रमाणे एका नक्षत्रापासून दुसर्‍या नक्षत्रांमध्ये अनुक्रमाने गमन होत असल्यामुळे त्यामधूनसुद्धा गती निर्माण होतात. सूर्य वगैरे ग्रहांची गती काही निराळीच असते. त्याचप्रमाणे त्या ग्रहांचे एका नक्षत्रातून दुसर्‍या नक्षत्रात गमन होते. त्यामुळे त्यांच्या गती मधूनही होत असतात. अशा पद्धतीने दोघांच्या वेगवेगळ्या दोन गती संभवतात. हे नारदा, सर्व ठिकाणी हाच निर्णय समजावा. सारांश, आदिपुरुष, लोकांचे कारण, सर्व लोकांचा आधार असा जो भगवान नारायण तो लोकांच्या कल्याणासाठीच भ्रमण करीत असतो. कर्मशुद्धीसाठी त्याने स्वतःला तिन्ही वेदांनी युक्त केले आहे. ज्ञाते लोक वेदांच्या सहाय्याने सूर्याबद्दल अंदाज बांधू शकतात.

सूर्य हा क्रमाक्रमाने सहा ऋतु निर्माण करतो, तो बारा प्रकारात असतो. कर्माच्या भोगाप्रमाणे तो प्रत्येक ऋतुमध्ये होणारे शीत-उष्ण यासारखे गुण धारण करीत असतो. अशा त्या आदि नारायणाला सर्व पुरुष, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या रूपाने पाहून विद्येच्या बलावर, वर्णाश्रम मार्गाने आचरण करून वेदात सांगितल्याप्रमाणे उत्तम अथवा अधम कर्मांनी अत्यंत श्रद्धाशील मनाने, नेहमी यज्ञ समारंभ करून त्याची पूजा करतात.

या आदिसूर्यनारायणाची जे पुरुष अत्यंत प्रेमाने पूजा करतात त्याचे मनोरथ पूर्ण होऊन अपेक्षित फल मिळते.

द्युलोक व भूलोक या दोन्ही लोकात बरोबर मध्यभागी जे अंतराळ आहे त्या अंतराळात असलेल्या कालचक्रात हा सर्व लोकांचा आत्मा रहात असतो. त्या कालचक्रात वास्तव्य करूनच तो मेष वगैरे बारा राशी उत्पन्न करतो. त्या बारा राशी ज्या महिन्यांमुळे झाल्या आहेत त्या महिन्यांचा तो आत्मा उपभोग घेतो.

हे सर्व बारा महिने म्हणजे संपूर्ण संवत्सराचे अवयव होत. तसेच चंद्राच्या कलेप्रमाणे महिन्याचे दोन भाग पडले आहेत. त्यांना पक्ष म्हणतात. सौर गणनेप्रमाणे सव्वा दोन नक्षत्रांची एक म्हणजेच पितरांची दिवसरात्र होते. कालचक्राचा हा सहावा अंश होय. याचा अर्थ असा की दोन राशी भोगीपर्यंत जो काल लागतो त्याला ऋतू असे म्हणतात.

मास ज्याप्रमाणे संवत्सराचे अवयव आहेत तसेच ते ऋतुदेखील संवत्सराचे अवयवच आहेत. सूर्याला अर्ध्या आकाशमार्गाचे भ्रमण करायला जितका वेळ लागतो, तेवढा काल अत्यंत पूज्य आहे असे प्राचीन ज्योतिष अयन यांनी सांगितले आहे. या अयन ज्योतिष्याला सर्व मुनी अत्यंत मान देतात.

सूर्याला हे संपूर्ण अंतरिक्ष म्हणजे संपूर्ण नभोमंडळ आक्रमण करण्यासाठी जेवढा काळ लागतो त्याला सर्व ज्ञानी जनांनी शोधून काढले असून त्यांची गणना केली आहे.

हे नारदा, सर्व लोकांचे कल्याण करणारे असे हे पंडित वत्सर म्हणून संबोधतात. संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर, इद्वत्सर असे वत्सराचे पाच प्रकार असून ते सूर्याच्या गतीप्रमाणे म्हणजे मंद, शीघ्र, मध्यम वगैरे गतीमधून भ्रमण केल्यामुळे हे पाचही प्रकारभेद निर्माण होतात असे कालाची गती जाणणारे सांगत असतात. याप्रमाणे सूर्याची गती सांगण्यात आलेली आहे. हे नारदा, आता या सूर्यगतीप्रमाणेच चंद्राच्याही वेगवेगळ्या गती आहेत त्या तू समजून घे. मी आता तुला चंद्राच्या गती सांगतो.

सूर्यमंडल व चंद्र यातील अंतर एक लक्ष योजनांचे आहे. तो औषधीचा पती आहे. सूर्याच्या संवत्सराप्रमाणे चंद्र पंधरावडयाचा भोग घेत असतो. दर सव्वादोन दिवसांचा भाग पाडून तो संपूर्ण महिन्याचा भोग भोगतो व संपूर्ण पक्षाचा भोग तो फक्त एकाच दिवसाच्या योगाने घेतो.

अशा या प्रमाणात तो चंद्र गतीमध्ये शीघ्र असून सर्व नक्षत्रांचा तो भोग घेतो. तसेच त्याच्या कला क्षीण होत जातात. त्यांच्यामुळे तो पूर्व व अपर पक्षांचा बलाने अहोरात्र निर्माण करतो व पितरांचे चित्तरंजन करीत रहतो. सर्व जीवन अन्नमय असल्यामुळे प्राण हा जीवनाला आवश्यक असतो. म्हणून वस्तुतः तोच जीव आहे. तोच परमेश्वर प्रभू तीस मुहूर्तांनी एका एका नक्षत्राचा भोग घेत रहातो. तोच या सर्व सोळा कलांचा स्वामी असून अनादि व उत्तम पुरुष आहे. वास्तवीक तो मनोमय आहे. पण तो अंतमय असून अमृताचे स्थान आहे. चंद्र हा साक्षात सुधेची खाण आहे.

देव, पितर, मनुष्ये, वेलीप्रमाणे सरपटणारे तिर्यक प्राणी यांना जीवनशक्ती देणे हे त्याचे शील आहे. म्हणून त्या चंद्रालाच सर्वमय असे म्हणतात. त्या चंद्रापासून तीन लक्ष योजने अंतरावरून नक्षत्रमंडलाचे भ्रमण होत असते. ईश्वराने मेरूच्या दक्षिण बाजूसच चंद्राची योजना करून ठेवली आहे.

अभिजित वगैरे नक्षत्रांसह एकूण अट्टावीस नक्षत्रे आहेत. अशी कालगणना करण्यात आली आहे. या नक्षत्रांपासून दोन लक्ष योजने अंतरावर शुक्र हा ग्रह आहे. तो सूर्याच्या पुढे तर कधी मागे आणि काही वेळा सूर्याच्याबरोबर भ्रमण करीत असतो.

तो भगवान शुक्र, शीघ्र, मंद आणि सम या सर्व गतीतून फिरत असतो. बहुधा शुक्र हा ग्रह सर्वच लोकांना अनुकूल असतो व शुभ फल प्राप्त करून देत रहातो असे ज्योतिष शास्त्रज्ञ सांगतात.

हे नारदमुने, जे ग्रह वृष्टीला प्रतिबंध करतात त्या सर्व ग्रहांना हा प्रभू शुक्र शांत करीत असतो. या शुक्रापासून दोन लक्ष योजने अंतरावर एक ग्रह असून तो बुध या नावाने प्रसिद्ध आहे.

हा बुध ग्रह शुक्राप्रमाणेच नेहमी शीघ्र, मंद व सम गतीतून भ्रमण करतो. ज्यावेळी बुध सूर्याला सोडून जातो तेव्हा त्या भागात बहुधा वावटळी, मेघपात, अतिवृष्टी इत्यादींपासून भय निर्माण होणार असे स्पष्टपणे सुचवून ठेवतो.

या बुधानंतर पुढे दोन लक्ष योजनांवर मंगळ हा ग्रह आहे. हे नारदा, हे देवर्षे, जर मंगळ हा ग्रह वक्री झाला नाही तर तीन, तीन पक्षांनी तो सर्व बारा राशीही भोगत असतो. बहुधा हा ग्रह अशुभ निर्माण करतो, तसेच दुःखांचा सूचक तो ग्रह आहे.

या तीव्र मंगळामुळे दोन लक्ष योजनांवर तो देवांचा गुरु बृहस्पती फिरत असतो. तो वर्षभर फिरत असतो व तो एकएक अशा क्रमाने सर्व राशी भोगतो. जर हा गुरु वक्र झाला तर ब्रह्मज्ञांना म्हणजे ब्राह्मणांना हा कधीही अनुकूल होत नाही.

या बृहस्पतीच्या पुढे आणखी दोन लक्ष योजने अंतरावर तो महाघोर शनैश्वर आहे. हा सूर्यपुत्र असून सतत भ्रमण करीत रहातो व तीस महिन्यांनी एक अशा सर्व राशीतून हा महाग्रह फिरतो व त्यांचा भोग घेतो. हा ग्रह अशुभ व मध्यम फले मुख्यतः देत असतो, असे ज्योतिषमार्तंड सांगत असतात.

या शनैश्वराच्या उत्तरेला पूर्णपणे अकरा लक्ष योजने इतक्या दूर अंतरावर सप्तऋषींचे मंडल भ्रमण करीत असते असे ज्ञानी जनांनी शोधून काढले असून त्यांची गणना केली आहे.

हे नारदा, सर्व लोकांचे कल्याण करणारे असे हे सात मुनी आहेत. विष्णुपद नावाचे जे प्रसिद्ध स्थान आहे त्याच्या दक्षिणेकडून हे सप्तर्षीचे मंडल भ्रमण करीत असते."


अध्याय सोळावा समाप्त

GO TOP