श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
नवमोऽध्यायः


भुवनकोशवर्णने हरिवर्षकेतुमालरम्यकवर्षवर्णनम्

श्रीनारायण उवाच
हरिवर्षे च भगवान्‍नृहरिः पापनाशनः ।
वर्तते योगयुक्तात्मा भक्तानुग्रहकारकः ॥ १ ॥
तस्य तद्दयितं रूपं महाभागवतोऽसुरः ।
पश्यन्भक्तिसमायुक्तः स्तौति तद्‍गुणतत्त्ववित् ॥ २ ॥
प्रह्लाद उवाच
ॐ नमो भगवते नरसिंहाय नमस्तेजस्तेजसे
आविराविर्भव वज्रदंष्ट्र कर्माशयान् रन्धय रन्धय
तमो ग्रस ग्रस ॐ स्वाहा । अभयं ममात्मनि
भूयिष्ठाः ॥ ॐ क्षौं ॥
स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदतां
     ध्यायन्तु भूतानि शिवं मिथो धिया ।
मनश्च भद्रं भजतादधोक्षजे
     आवेश्यतां नो मतिरप्यहैतुकी ॥ ३ ॥
मागारदारात्मजवित्तबन्धुषु
     सङ्‌गो यदि स्याद्‍भगवत्प्रियेषु नः ।
यः प्राणवृत्त्या परितुष्ट आत्मवान्
     सिद्ध्यत्यदूरान्‍न तथेन्द्रियप्रियः ॥ ४ ॥
यत्सङ्‌गलब्धं निजवीर्यवैभवं
     तीर्थं मुहुः संस्पृशतां हि मानसम् ।
हरत्यजोऽन्तः श्रुतिभिर्गतोऽङ्‌गजं
     को वै न सेवेत मुकुन्दविक्रमम् ॥ ५ ॥
यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिञ्चना
     सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुराः ।
हरावभक्तस्य कुतो महद्‍गुणा
     मनोरथेनासति धावतो बहिः ॥ ६ ॥
हरिर्हि साक्षाद्‍भगवाञ्छरीरिणा-
     मात्मा झषाणामिव तोयमीप्सितम् ।
हित्वा महांस्तं यदि सज्जते गृहे
     तदा महत्त्वं वयसा दम्पतीनाम् ॥ ७ ॥
तस्माद्‌रजोरागविषादमन्यु-
     मानस्पृहाभयदैन्याधिमूलम् ।
हित्वा गृहं संसृतिचक्रवालं
     नृसिंहपादं भजतां कुतो भयम् ॥ ८ ॥
एवं दैत्यपतिः सोऽपि भक्त्यानुदिनमीडते ।
नृहरिं पापमातङ्‌गहरिं हृत्पद्मवासिनम् ॥ ९ ॥
केतुमाले च वर्षे हि भगवान्स्मररूपधृक् ।
आस्ते तद्वर्षनाथानां पूजनीयश्च सर्वदा ॥ १० ॥
एतेनोपासते स्तोत्रजालेन च रमाब्धिजा ।
तद्वर्षनाथा सततं महतां मानदायिका ॥ ११ ॥
रमोवाच
ओं ह्रां ह्रीं ह्रूं स्म नमो भगवते
हृषीकेशाय सर्वगुणविशेषैर्विलक्षितात्मने
आकूतीनां चित्तीनां चेतसां विशेषाणां चाधिपतये
षोडशकलाय छन्दोमयायान्‍नमयायामृतमयाय
सर्वमयाय महसे ओजसे बलाय कान्ताय
     कामाय नमस्ते उभयत्र भूयात् ।
स्त्रियो व्रतैस्त्वां हृषीकेश्वरं स्वतो
     ह्याराध्य लोके पतिमाशासतेऽन्यम् ।
तासां न ते वै परिपान्त्यपत्यं
     प्रियं धनायूंषि यतोऽस्वतन्त्राः ॥ १२ ॥
स वै पतिः स्यादकुतोभयः स्वतः
     समन्ततः पाति भयातुरं जनम् ।
स एक एवेतरथा मिथो भयं
     नैवात्मलाभादधिमन्यते परम् ॥ १३ ॥
या तस्य ते पादसरोरुहार्हणं
     न कामयेत्साखिलकामलम्पटा ।
तदेव रासीप्सितमीप्सितोऽर्चितो
     यद्‍भग्नयाञ्चा भगवन् प्रतप्यते ॥ १४ ॥
मत्प्राप्तयेऽजेशसुरासुरादय-
     स्तप्यन्त उग्रं तप ऐन्द्रिये धियः ।
ऋते भवत्पादपरायणान्‍न मां
     विदन्त्यहं त्वद्धृदया यतोऽजित ॥ १५ ॥
स त्वं ममाप्यच्युत शीर्ष्णि वन्दितं
     कराम्बुजं यत्त्वदधायि सात्वताम् ।
बिभर्षि मां लक्ष्य वरेण्य मायया
     क ईश्वरस्येहितमूहितुं विभुः ॥ १६ ॥
एवं कामं स्तुवन्त्येव लोकबन्धुस्वरूपिणम् ।
प्रजापतिमुखा वर्षनाथाः कामस्य सिद्धये ॥ १७ ॥
रम्यके नामवर्षे च मूर्तिं भगवतः पराम् ।
मात्स्यां देवासुरैर्वन्द्यां मनुः स्तौति निरन्तरम् ॥ १८ ॥
मनुरुवाच
ॐ नमो भगवते मुख्यतमाय नमः सत्त्वाय
प्राणायौजसे बलाय महामत्स्याय नमः ।
अन्तर्बहिश्चाखिललोकपालकै-
रदृष्टरूपो विचरस्युरुस्वनः ।
स ईश्वरस्त्वं य इदं वशे नय-
न्‍नाम्ना यथा दारुमयीं नरः स्त्रियम् ॥ १९ ॥
यं लोकपालाः किल मत्सरज्वरा
हित्वा यतन्तोऽपि पृथक् समेत्य च ।
पातुं न शेकुर्द्विपदश्चतुष्पदः
सरीसृपं स्थाणु यदत्र दृश्यते ॥ २० ॥
भवान् युगान्तार्णव ऊर्मिमालिनि
क्षोणीमिमामोषधिवीरुधां निधिम् ।
मया सहोरुक्रम तेऽज ओजसा
तस्मै जगत्प्राणगणात्मने नमः ॥ २१ ॥
एवं स्तौति च देवेशं मनुः पार्थिवसत्तमः ।
मत्स्यावतारं देवेशं संशयच्छेदकारणम् ॥ २२ ॥
ध्यानयोगेन देवस्य निर्धूताशेषकल्मषः ।
आस्ते परिचरन्भक्त्या महाभागवतोत्तमः ॥ २३ ॥


वर्षगत ईश्वराचे वर्णन -

भक्तांवर अनुग्रह करण्यास सिद्ध असलेला भगवान हरी हा हरिवर्षात शांत मनाने वास्तव्य करीत असतो. तो सर्व पापांचा नाश करतो. असुर योनीत जन्मास आलेला जो भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, तो त्या हरीचे सुंदर वदन पाहून त्याची स्तुती करतो. त्याच्या अंतःकरणात भक्ती परिपूर्ण भरलेली आहे. कारण त्या हरीचे प्रेम व गुण प्रल्हाद पूर्णपणे जाणतो. प्रल्हाद म्हणतो,

"भगवान नरसिंहाला माझा नमस्कार असो. हे देवा, तूच सर्व तेजांचेही तेज आहेस. म्हणून तुला माझा साष्टांग नमस्कार असो. हे ईश्वरा, आता तू प्रकट हो. हे वज्राप्रमाणे दाढा असलेल्या नारायणा, तू माझ्या कर्मवासनांचा संपूर्ण क्षय कर आणि अज्ञानाला ग्रासून टाक. "ॐ स्वाहा" माझे अंतःकरण शांतीचे वस्तीस्थान होवो, "ॐ क्षौम्" या विश्वाचे कल्याण होवो, तसेच सर्व दुष्ट आपल्या क्रूरतेचा त्याग करोत. सर्व माणसे एकांतात राहून भगवान शंकराचे नामस्मरण करोत. मनात शांती वसो. अधोक्षजाच्या ठिकाणी आमची मती अहेतुकपणे प्रविष्ट होवो. घर, स्त्री, पुत्र, द्रव्य आणि बांधव या ठिकाणी माझी आसक्ती न राहो, जर आमच्या मनात प्रीतीच निर्माण होणार असेल तर ती भगवंताविषयी निर्माण होवो.

प्राणवृत्ती झाल्याने अत्यंत संतुष्ट होणारा आत्मज्ञानी पुरुष ज्याप्रमाणे सत्वर सिद्धी पावतो तसा विषयात रममाण झालेला गृहस्थ सिद्धी पावत नाही. गंगा वगैरे तीर्थावर स्नान केल्याने केवळ शरीराचाच मल नाहीसा होतो, पण भगवद् भक्तांच्या संगतीमुळे अथवा मुकुंदाचे चरित्र वगैरे श्रवण केल्यास त्यायोगे भक्तांच्या अंतःकरणात भगवत्प्रेम निर्माण होते व मनाला चिकटलेला मल नाश पावतो. भगवंताच्या चरित्राचा हा उत्तम प्रभाव आहे. म्हणून अशा त्या मुक्त करणार्‍या मुकुंदाची सेवा कोण बरे करणार नाही !

जो भगवंताचे ठिकाणी निष्काम भक्तीयुक्त प्रेम करतो त्याचे ठिकाणी सर्व देव गुणासह येऊन वास्तव्य करतात. विषयसुखाच्या भूतमात्रांच्या कल्पना मिथ्या आहेत. त्यामुळे तेथे हरिभक्त वास्तव्य न करता बाहेर धावत असतो. पण विषयसुखाक्त असलेले त्या महान गुणाची प्राप्ती कशी होणार ?

कारण उदक हा ज्याप्रमाणे सर्व जलचरांचा आत्मा आहे, तसेच हा साक्षात् भगवान हरीच प्राण्याचा आत्मा आहे. विद्वानांनी हे मान्य केले आहे. पण त्याला सोडून जर प्राणी गृहात आसक्त झालाच तर त्याचे महत्त्व वयावरूनच ठरणारे आहे. तो ज्ञानाने मोठा नव्हे. म्हणून तृष्णा, अभिमान, खेद, क्रोध, मान, लालसा, भय व दैन्य यांचे निमित्त आणि जन्ममरण रूप चक्र जसे जे गृह त्याचा त्याग करून जे चरण निर्भय आहेत अशा नृसिंह चरणांची सेवा करावी."

अशाप्रकारे तो दैत्यराज प्रल्हादसुद्धा त्याची भक्तीने स्तुति करतो. कारण तोच नरहरी पापरूपी हत्तीचे मर्दन करण्यास समर्थ आहे व प्राण्यांच्या हृदयरूपी कमलात वास्तव्य करणारा आहे.

केतुमाल वर्षामध्ये भगवंताने स्मराचे रूप म्हणजे कामाचे रूप धारण केले आहे. त्या वर्षात रहाणारे राजे त्या ईश्वराचीच सर्वदा पूजा करीत असतात. मोठयांना मान देण्यांस सिद्ध असलेली अशी ती क्षीरसागराची कन्या लक्ष्मी ही त्या वर्षाची अधिकारीण आहे. तीसुद्धा पुष्कळ स्तोत्रे गाऊन त्या भगवंताची उपासना करते. ती लक्ष्मी उर्फ रमा म्हणते, "ॐ र्‍हां र्‍हीं र्‍हुं," त्या भगवान वासुदेवाला म्हणजे त्या इंद्रियांच्या अधिपतीला माझा नित्य नमस्कार असो. सर्वजण त्याच्याजवळ विशेषगुण असल्याने त्या योगे त्याचे पूजन करतात व त्याच्या स्वरूपाचे पूर्ण रक्षण करतात. क्रिया, ज्ञान व विशिष्ट संकल्प यांचा तो अधिपती आहे. तो श्रोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा, नासिका, वाक, पाणी, पाद, वायु, उपस्थ, मन, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सोळा कलांनी युक्त आहे. जो वेदोक्त कर्माचे अधिष्ठान आहे, जो अन्‍नमय म्हणजे देहरूप आहे, जो अमृतमय म्हणजे परमानंदरूप आहे, तसाच जो सर्वरूप असून साक्षात् बल, वीर्य, ओज, सौंदर्य व काम यांची मूर्तीच आहे त्याला सर्वदा वंदन असो.

ज्या स्त्रिया व्रतांच्या योगाने तुमच्यासारख्या इंद्रियाधिपतीची आराधना करतात व लौकिक जीवनांत योग्य अशा पतीची अपेक्षा करतात, त्यांची अपत्ये, प्रिय, वित्त, पतिव्रत्य व आयुष्य यांचे ते पति परतंत्र असल्यामुळे संरक्षण करीत नाहीत. पण जो स्वतः निर्भय असल्याने इतर भीतीने व्याकुळ झालेल्यांना नित्य संरक्षण देतो, तोच खरा पती होय. हे देवा, तो तूच एकटा आहेस.

हे भगवान, तुला आत्मलाभापेक्षा अधिक कशाची अपेक्षा नाही. कारण असे जर नसते तर द्वितीयत्वामुळे अनेक स्वतंत्र राजांप्रमाणे परस्पर भय शिल्लक रहातेच. जी स्त्री तुझ्या पदकमलांची पूजा करण्याची इच्छा करते, ती मात्र अन्य कशाचीही इच्छा करीत नाही. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

त्यातून काही इच्छा मनात धरून तुझी पूजा केल्यास पूजकाची तू फक्त इच्छित इच्छा पूर्ण करतोस. पण त्याचा भोग संपला म्हणजे हे भगवान, त्याला अपार दुःख होते. हे महासामर्थ्यवाना, माझ्या प्राप्तीसाठी इंद्रियसुखाची लालसा मनात धरून विष्णुदेव, असुर इत्यादि सर्वजण उग्र तपश्चर्या करीत असतात. पण हे देवा, तुझ्या पदकमलामध्ये एकचित्त झाल्याशिवाय त्यांना माझ्या स्वरूपाचे ज्ञान होत नाही. कारण मी नित्य तुझ्याच हृदयात आधीन होऊन वास्तव्य करीत आहे.

म्हणून हे अच्युता, तू भक्ताच्या मस्तकावर कमलरूपी वरदहस्त ठेवतो तो वरदहस्त माझ्याही मस्तकावर ठेव. कारण सर्वांनी त्याच हस्तकमलाची स्तुति केली आहे. पण हे देवा ईश्वरा, अनादराने तू मला चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले आहेस. तेव्हा तुझ्यासारख्या ईश्वराची मायेमुळे घडणारी लीला जाणण्यास कोण बरे समर्थ आहे ?

लोकांना बंधूच्या आकाराने भासणार्‍या कामाची प्रजापतीप्रमाणे सर्व वर्षाचे अधिपती, कामसिद्धी व्हावी म्हणून तुझीच स्तुति करतात.

रम्यक नावाच्या वर्षात भगवानाची श्रेष्ठ मूर्ती आहे. ती माशाच्या आकाराची आहे. ती मूर्तीही सर्व देवांना व असूरांना पूजनीय आहे. प्रत्यक्ष मनूही त्या देव मूर्तीची नित्य पूजा करीत असतो. मनु म्हणतो,

"अत्यंत मुख्य अशा तुला हे देवा, मी वंदन करीत असतो. तू सत्वाने प्रमुख असून प्रत्यक्ष सूत्रात्मा आहेस. तसेच तू वीर्यवान व बलवान आहे. म्हणून तुझ्यासारख्या महामत्स्याला माझे वंदन असो. हे ईश्वरा, तूच हे सर्व व्यापून राहिला आहेस. पण कोणत्याही लोकपालास मात्र तुझे स्वरूप दिसत नाही. फक्त तुझा वेदरूप नाद ऐकू येत असतो.

लाकडाच्या बाहुलीला जसे सामान्य पुरुष स्वाधीन ठेवतो, त्याप्रमाणे केवळ नावाच्या योगाने ज्याने हे सर्व स्ववश करून घेतले आहे तो ईश्वर तूच आहेस. अशा तुझा त्याग करून जे लोकपाल मत्सररूपी ज्वराने पीडित झालेले आहेत, त्या लोकपालांना वेगवेगळे अथवा सांघिक रीतीने प्रयत्‍न केले तरी तुझे रूप दिसत नाही. ते या ठिकाणी दिसत असलेल्या जंगल व स्थावराचे संरक्षण करू शकले नाहीत.

हे ईश्वरा, आपण या प्रलयकालाच्या समुद्रातून स्वतःच्या सामर्थ्याने व तेजाने या मनूसह औषधी, वेली यांच्या साठ्याने समृद्ध असलेल्या पृथ्वीचे रक्षण केलेत. ते केवळ हे प्रभो, आपले सामर्थ्य म्हणून आपण या जगांतील प्राण्यांच्या प्राणांचा समुदायच आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो."

अशा रीतीने हे नारदा, सर्व राजेलोकांत सर्वोत्तम असा तो मनू त्या देवाधिदेवाची स्तुति करतो. तो मत्स्याचा अवतार घेतलेला देव सर्व संशयांच्या छेदास कारण आहे. या देवाच्या ध्यानाने सिद्ध होणारा जो योग त्याच्यामुळे मनूचेही सर्व पातक नाहीसे होते. तो सर्वोत्तम भगवद्‌भक्त होऊन भक्तिपूर्वक त्या ईश्वराची सेवा करीत तेथेच रहातो.


इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने हरिवर्षकेतुमालरम्यकवर्षवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अध्याय नववा समाप्त

GO TOP