श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
नवमोऽध्यायः


मान्धातोत्पत्तिवर्णनम्

व्यास उवाच -
कदाचिदष्टकाश्राद्धे विकुक्षिं पृथिवीपतिः ।
आज्ञापयदसंमूढो मांसमानय सत्वरम् ॥ १ ॥
मेध्यं श्राद्धार्थमधुना वने गत्वा सूतादरात् ।
उत्युक्तोऽसौ तथेत्याशु जगाम वनमस्त्रभृत् ॥ २ ॥
गत्वा जघान बाणैः स वराहान्सूकरान्मृगान् ।
शशांश्चापि परिश्रान्तो बभूवाथ बुभूक्षितः ॥ ३ ॥
विस्मृता चाष्टका तस्य शशं चाददसौ वने ।
शेषं निवेदयामास पित्रे मांसमनुत्तमम् ॥ ४ ॥
प्रोक्षणाय समानीतं मांसं दृष्ट्वा गुरुस्तदा ।
अनर्हमिति तज्ज्ञात्वा चुकोप मुनिसत्तमः ॥ ५ ॥
भुक्तशेषं तु न श्राद्धे प्रोक्षणीयमिति स्थितिः ।
राज्ञे निवेदयामास वसिष्ठः पाकदूषणम् ॥ ६ ॥
पुत्रस्य कर्म तज्ज्ञात्वा भूपतिर्गुरुणोदितम् ।
चुकोप विधिलोपात्तं देशान्निःसारयत्ततः ॥ ७ ॥
शशाप इति विख्यातो नाम्ना जातो नृपात्मजः ।
गतो वने शशादस्तु पितृकोपादसम्भ्रमः ॥ ८ ॥
वन्येन वर्तयन्कालं नीतवान् धर्मतत्परः ।
पितर्युपरते राज्यं प्राप्तं तेन महात्मना ॥ ९ ॥
शशादस्त्वकरोद्‌राज्यमयोध्यायाः पतिः स्वयम् ।
यज्ञाननेकशः पूर्णांश्चकार सरयूतटे ॥ १० ॥
शशादस्याभवत्पुत्रः ककुत्स्थ इति विश्रुतः ।
तस्यैव नामभेदाद्वै इन्द्रवाहः पुरञ्जयः ॥ ११ ॥
जनमेजय उवाच -
नामभेदः कथं जातो राजपुत्रस्य चानघ ।
कारणं ब्रूहि मे सर्वं कर्मणा येन चाभवत् ॥ १२ ॥
व्यास उवाच -
शशादे स्वर्गते राजा ककुत्स्थ इति चाभवत् ।
[राज्यं चकार धर्मज्ञः पितृपैतामहं बलात् ।]
एतस्मिन्नन्तरे देवा दैत्यैः सर्वे पराजिताः ॥ १३ ॥
जग्मुस्त्रिलोकाधिपतिं विष्णुं शरणमव्ययम् ।
तान्प्रोवाच महाविष्णुस्तदा देवान्सनातनः ॥ १४ ॥
विष्णुरुवाच -
पार्ष्णिग्राहं महीपालं प्रार्थयन्तु शशादजम् ।
स हनिष्यति वै दैत्यान्संग्रामे सुरसत्तमाः ॥ १५ ॥
आगमिष्यति धर्मात्मा साहाय्यार्थं धनुर्धरः ।
पराशक्तेः प्रसादेन सामर्थ्यं तस्य चातुलम् ॥ १६ ॥
हरेः सुवचनाद्देवा ययुः सर्वे सवासवाः ।
अयोध्यायां महाराज शशादतनयं प्रति ॥ १७ ॥
तानागतान् सुरान् राजा पूजयामास धर्मतः ।
पप्रच्छागमने राजा प्रयोजनमतन्द्रितः ॥ १८ ॥
राजोवाच -
धन्योऽहं पावितश्चास्मि जीवितं सफलं मम ।
यदागत्य गृहे देवा ददुश्च दर्शनं महत् ॥ १९ ॥
ब्रुवन्तु कृत्यं देवेशा दुःसाध्यमपि मानवैः ।
करिष्यामि महत्कार्यं सर्वथा भवतां महत् ॥ २० ॥
देवा ऊचुः -
साहाय्यं कुरु राजेन्द्र सखा भव शचीपतेः ।
संग्रामे जय दैत्येन्द्रान्दुर्जयांस्त्रिदशैरपि ॥ २१ ॥
पराशक्तिप्रसादेन दुर्लभं नास्ति ते क्वचित् ।
विष्णुना प्रेरिताश्चैवमागतास्तव सन्निधौ ॥ २२ ॥
राजोवाच -
पार्ष्णिग्राहो भवाम्यद्य देवानां सुरसत्तमाः ।
इन्द्रो मे वाहनं तत्र भवेद्यदि सुराधिपः ॥ २३ ॥
संग्रामं तु करिष्यामि दैत्यैर्देवकृतेऽधुना ।
आरुह्येन्द्रं गमिष्यामि सत्यमेतद्‌ब्रवीम्यहम् ॥ २४ ॥
तदोचुर्वासवं देवाः कर्तव्यं कार्यमद्‌भुतम् ।
पत्रं भव नरेन्द्रस्य त्यक्त्वा लज्जां शचीपते ॥ २५ ॥
लज्जमानस्तदा शक्रः प्रेरितो हरिणा भृशम् ।
बभूव वृषभस्तूर्णं रुद्रस्येवापरो महान् ॥ २६ ॥
तमारुरोह राजासौ संग्रामगमनाय वै ।
स्थितः ककुदि येनास्य ककुत्स्थस्तेन चाभवत् ॥ २७ ॥
इन्द्रो वाहः कृतो येन तेन नाम्नेन्द्रवाहकः ।
पुरं जितं तु दैत्यानां तेनाभूच्च पुरञ्जयः ॥ २८ ॥
जित्वा दैत्यान्महाबाहुर्धनं तेषां प्रदत्तवान् ।
पप्रच्छ चैवं राजर्षेरिति सख्यं बभूव ह ॥ २९ ॥
ककुत्स्थश्चातिविख्यातो नृपतिस्तस्य वंशजाः ।
काकुत्स्था भुवि राजानो बभूवुर्बहुविश्रुताः ॥ ३० ॥
ककुत्स्थस्याभवत्पुत्रो धर्मपत्‍न्यां महाबलः ।
अनेना विश्रुतस्तस्य पृथुः पुत्रश्च वीर्यवान् ॥ ३१ ॥
विष्णोरंशः स्मृतः साक्षात्पराशक्तिपदार्चकः ।
विश्वरन्धिस्तु विज्ञेयः पृथोः पुत्रो नराधिपः ॥ ३२ ॥
चन्द्रस्तस्य सुतः श्रीमान् राजा वंशकरः स्मृतः ।
तत्सुतो युवनाश्वस्तु तेजस्वी बलवत्तरः ॥ ३३ ॥
शावन्तो युवनाश्वस्य जज्ञे परमधार्मिकः ।
शावन्ती निर्मिता तेन पुरी शक्रपुरीसमा ॥ ३४ ॥
बृहदश्वस्तु पुत्रोऽभूच्छावन्तस्य महात्मनः ।
कुवलयाश्वः सुतस्तस्य बभूव पृथिवीपतिः ॥ ३५ ॥
धुन्धुर्नामा हतो दैत्यस्तेनासौ पृथिवीतले ।
धुन्धुमारेति विख्यातं नाम प्रापातिविश्रुतम् ॥ ३६ ॥
पुत्रस्तस्य दृढाश्वस्तु पालयामास मेदिनीम् ।
दृढाश्वस्य सुतः श्रीमान्हर्यश्व इति कीर्तितः ॥ ३७ ॥
निकुम्भस्तत्सुतः प्रोक्तो बभूव पृथिवीपतिः ।
बर्हणाश्वो निकुम्भस्य कुशाश्वस्तस्य वै सुतः ॥ ३८ ॥
प्रसेनजित्कृशाश्वस्य बलवान्सत्यविक्रमः ।
तस्य पुत्रो महाभागो यौवनाश्वेति विश्रुतः ॥ ३९ ॥
यौवनाश्वसुतः श्रीमान्मान्धातेति महीपतिः ।
अष्टोत्तरसहस्रं तु प्रासादा येन निर्मिताः ॥ ४० ॥
भगवत्यास्तु तुष्ट्यर्थं महातीर्थेषु मानद ।
मातृगर्भे न जातोऽसावुत्पन्नो जनकोदरे ॥ ४१ ॥
निःसारितस्ततः पुत्रः कुक्षिं भित्त्वा पितुः पुनः ।
राजोवाच -
न श्रुतं न च दृष्टं वा भवता तदुदाहृतम् ॥ ४२ ॥
असंभाव्यं महाभाग तस्य जन्म यथोदितम् ।
विस्तरेण वदस्वाद्य मान्धातुर्जन्मकारणम् ॥ ४३ ॥
राजोदरे यथोत्पन्नः पुत्रः सर्वाङ्गसुन्दरः ।
व्यास उवाच -
यौवनाश्वोऽनपत्योऽभूद्‌राजा परमधार्मिकः ॥ ४४ ॥
भार्याणां च शतं तस्य बभूव नृपतेर्नृप ।
राजा चिन्तापरः प्रायश्चिन्तयामास नित्यशः ॥ ४५ ॥
अपत्यार्थे यौवनाश्वो दुःखितस्तु वनं गतः ।
ऋषीणामाश्रमे पुण्ये निर्विण्णः स च पार्थिवः ॥ ४६ ॥
मुमोच दुःखितः श्वासांस्तापसानां च पश्यताम् ।
दृष्ट्वा तु दुःखितं विप्रा बभूवुश्च कृपालवः ॥ ४७ ॥
तमूचुर्ब्राह्मणा राजन्कस्माच्छोचसि पार्थिव ।
किं ते दुःखं महाराज ब्रूहि सत्यं मनोगतम् ॥ ४८ ॥
प्रतीकारं करिष्यामो दुःखस्य तव सर्वथा ।
यौवनाश्व उवाच -
राज्यं धनं सदश्वाश्च वर्तन्ते मुनयो मम ॥ ४९ ॥
भार्याणां च शतं शुद्धं वर्तते विशदप्रभम् ।
नारातिस्त्रिषु लोकेषु कोऽप्यस्ति बलवान्मम ॥ ५० ॥
आज्ञाकरास्तु सामन्ता वर्तन्ते मन्त्रिणस्तथा ।
एकं सन्तानजं दुःखं नान्यत्पश्यामि तापसाः ॥ ५१ ॥
अपुत्रस्य गतिर्नास्ति स्वर्गो नैव च नैव च ।
तस्माच्छोचामि विप्रेन्द्राः सन्तानार्थं भृशं ततः ॥ ५२ ॥
वेदशास्त्रार्थतत्त्वज्ञास्तापसाश्च कृतश्रमाः ।
इष्टिं सन्तानकामस्य युक्तां ज्ञात्वा दिशन्तु मे ॥ ५३ ॥
कुर्वन्तु मम कार्यं वै कृपा चेदस्ति तापसाः ।
व्यास उवाच -
तच्छ्रुत्वा वचनं राज्ञः कृपया पूर्णमानसाः ॥ ५४ ॥
कारयामासुरव्यग्रास्तस्येष्टिमिन्द्रदेवताम् ।
कलशः स्थापितस्तत्र जलपूर्णस्तु वाडवैः ॥ ५५ ॥
मन्त्रितो वेदमन्त्रैश्च पुत्रार्थं तस्य भूपतेः ।
राजा तद्यज्ञसदनं प्रविष्टस्तृषितो निशि ॥ ५६ ॥
विप्रान्दृष्ट्वा शयानान्स पपौ मन्त्रजलं स्वयम् ।
भार्यार्थं संस्कृतं विप्रैर्मन्त्रितं विधिनोद्‌धृतम् ॥ ५७ ॥
पीतं राज्ञा तृषार्तेन तदज्ञानान्नृपोत्तम ।
व्युदकं कलशं दृष्ट्वा तदा विप्रा विशङ्‌किताः ॥ ५८ ॥
पप्रच्छुस्ते नृपं केन पीतं जलमिति द्विजाः ।
राज्ञा पीतं विदित्वा ते ज्ञात्वा दैवबलं महत् ॥ ५९ ॥
इष्टिं समापयामासुर्गतास्ते मुनयो गृहान् ।
गर्भं दधार नृपतिस्ततो मन्त्रबलादथ ॥ ६० ॥
ततः काले स उत्पन्नः कुक्षिं भित्त्वाऽस्य दक्षिणाम् ।
पुत्रं निष्कासमायासुर्मन्त्रिणस्तस्य भूपतेः ॥ ६१ ॥
देवानां कृपया तत्र न ममार महीपतिः ।
कं धास्यति कुमारोऽयं मन्त्रिणश्चुक्रुशुर्भृशम् ॥ ६२ ॥
तदेन्द्रो देशिनीं प्रादान्मां धातेत्यवदद्वचः ।
सोऽभवद्‌बलवान् राजा मान्धाता पृथिवीपतिः ।
तदुत्पत्तिस्तु भूपाल कथिता तव विस्तरात् ॥ ६३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां
सप्तमस्कन्धे मान्धातोत्पत्तिवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


पित्याच्या उदरातून मांधाताचा जन्म -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

व्यास म्हणाले, "राजा जनमेजया, इक्ष्वाकु राजा निर्मोही आणि धार्मिक होता. तो नीतीने कारभार करीत असे. एकदा अष्ठिका श्राद्ध आले.

इक्ष्वाकु राजा विकुक्षीला म्हणाला, "हे पुत्रा, आज अष्ठिका श्राद्ध असल्याने तू सत्वर वनात जाऊन पवित्र असे मांस घेऊन ये."

विकुक्षी राजाज्ञा पालन करण्यासाठी आपली शस्त्रे घेऊन गेला. त्याने वराह, सूकर, मृग आणि ससे यांची आपल्या बाणांनी शिकार केली. पण तोपर्यंत राजपुत्र अत्यंत श्रमला होता. तो भुकेने व्याकुळ झाला, तहानेने त्याचा जीव कासावीस होऊ लागला. त्याला त्या दिवशी असलेल्या अष्ठिका श्राद्धविधीचे विस्मरण झाले व वनातच त्याने एक ससा मारून आपली क्षुधा भागविली. उरलेले मांस घेऊन तो राजाकडे आला व त्याने आपली संपूर्ण शिकार राजाला दिली. मुनिश्रेष्ठ वसिष्ठ अष्ठिका श्रद्धाचे पौरोहित्य करीत होते. त्यांनी विधियुक्त प्रोक्षणासाठी आणलेल्या मांसावरून दृष्टी फिरविली तेव्हा ते पवित्र नाही हे त्यांच्या अंतःचक्षूंनी जाणले. कारण उष्टेल्याचा शेष भाग घेऊ नये असा श्राद्ध नियम आहे. त्यामुळे वसिष्ठ क्रुद्ध झाले. त्यांनी राजाला "हे मांस भुक्तशेष असल्याने श्राद्धास अयोग्य झाले आहे. "असे सांगताच राजाही संतप्त झाला. आपल्या पुत्राच्या हातून हे कुकर्म घडले म्हणून आपल्या श्राद्धविधीचा भंग झाला असे त्याला वाटले. त्याने क्रोधायमान होऊन आपल्या पुत्राला देशातून सत्वर हाकलून लावले.

त्यानंतर तो राजपुत्र देशांतरास गेला व पुढे शशाद या नावाने तो जगद्‌विख्यात झाला. पित्याचा कोप होऊन वनात गेलेल्या त्या राजपुत्राने वनातील फळे व कंदमुळे यावर आपला उदरनिर्वाह करण्यास सुरवात केली आणि अत्यंत धर्मनिष्ठेने तो आपला काळ घालवू लागला. असाच काही काळ लोटल्यावर इकडे इक्ष्वाकु मृत्यू पावला. राजपुत्र शशादाला ते राज्य मिळाले.

अयोध्येच्या राज्यावर येताच त्याने सरयूचे तीरावर अनेक परिपूर्ण असे यज्ञ केले. त्याने धर्मतत्पर राहून प्रजेला सुख दिले. शशाद राजाला ककुस्थ नावाचा एक सुप्रसिद्ध पुत्र लाभला होता. त्यालाच इंद्रवाह, पुरंजय अशी अनेक नावे कारणापरत्वे मिळाली होती. या सर्व नाम बिरुदावल्यांनी तो प्रसिद्धी पावला."

व्यास इक्ष्वाकु कुलाचा इतिहास सांगत होते जनमेजय तत्परतेने ते ऐकत होता. ककुस्थ राजाची कथा ऐकून त्याने शंकित होऊन महर्षी व्यासांना विचारले, "हे मुनिवर्य, ककुस्थ राजाला इंद्रवाह, पुरजय इत्यादि वेगवेगळी नावे कशी मिळाली ? कोणत्या योग्य कारणामुळे त्याला ही नावे प्राप्त झाली ती सर्व कारणे व त्यांची सर्व नावे आता मला निवेदन करा. खरोखरच ही कथा अद्‌भुत रम्य आहे."

व्यास म्हणाले, "हे जनमेजया शशाद राजाला स्वर्ग प्राप्त झाल्यावर त्याचा पुत्र ककुस्थ राज्यावर बसला. त्यावेळी देव व दानव यांच्यात भयंकर युद्ध झाले. दानवांनी देवांचा पराभव केला. त्यामुळे देव दीन झाले व त्रैलोक्याधिपति विष्णूस शरण गेले. तेव्हा तो सनातन भगवान महाविष्णु देवांना म्हणाला, "हे सुरश्रेष्ठांनो, आता यावेळी दैत्य बलाढ्य झाले आहेत. ते देवांना अजेय आहेत. तेव्हा तुम्ही सर्वजण शशाद राजाकडे जा व देवांसाठी युद्धसहाय्य मागा. तो युद्धात दैत्यांचा नाश करील. तो निःसंशय महावीर आहे. तो धर्मात्मा असून धुरंधर आहे. तोच तुम्हाला यावेळी मदत करील. तो महादेवी पराशक्तीचा उपासक असल्याने त्याला देवी प्रसन्न आहे. तिच्या अनुग्रहामुळे सांप्रत तो अत्यंत महाबलाढ्य झाला आहे. तो शत्रुनाशक आज तुम्हाला यश मिळवून देईल."

असे विष्णूचे बोलणे ऐकताच इंद्र सर्व देवांसह अयोध्येस आला. शशाद राजाकडे इंद्रासह सर्व देव आल्यामुळे राजाला आनंद झाला. त्याने श्रद्धापूर्वक त्यांचे पूजन केले व नम्रतेने देवांपुढे हात जोडून तो धर्मपरायण राजा शशाद म्हणाला, "हे सुरवरांनो, मी आपली कोणती सेवा करावी ? आपण आज कोणते निमित्त घेऊन मजकडे आला आहात ? आपण सत्वर आज्ञा द्यावी म्हणजे मी तसेच वागेन. हे देवांनो, मी आज तुमच्या दर्शनामुळे पुनीत झालो आहे. देवांचे दुर्लभ दर्शन आज मला घडले म्हणून माझे जीवन आज सफल झाले. आज मी धन्य झालो. हे सुरश्रेष्ठांनो मानवाला दुष्कर असे कोणतेही काम असले तरी मी ते तडीस नेईन. आपण मनात किंतु न बाळगता मला सांगा. कार्याची व्याप्ती केवढीही असली तरी कार्य पूर्ण केल्यावाचून मी रहाणार नाही."

इंद्र म्हणाला, "हे राजेश्वर, खरोखरच तू धन्य आहेस. पराशक्तीच्या प्रसादाने तू महाप्रतापवान झाला आहेस असे भगवान विष्णूने आम्हास सांगितले. अजेय अशा दैत्यांनी युद्धात आम्हाला पराभूत करून आमची मानहानी केली आहे. म्हणून तुझ्यासारख्या देवीभक्तीने सांप्रत आम्हाला मदत करावी म्हणून सहाय्य मागण्यास आम्ही तुजकडे आलो आहोत. हे राजेंद्रा, दैत्यांचा पराभव करून तू देवांचा व प्रत्यक्ष इंद्राचा सखा हो."

इंद्राचे भाषण ऐकून शशाद विचारपूर्वक म्हणाला, सूरश्रेष्ठहो, मी निश्चित आसुरांचा नाश करीन. पण त्या युद्धात देवराज इंद्राने माझे वाहन झाले पाहिजे. इंद्रावर आरूढ होऊन मी युद्धास जाईन व विजय मिळवून आणीन हे निश्चित लक्षात घ्या."

त्यावर देवांमध्ये कुजबूज सुरू झाली. देव म्हणाले, हे शचिपते, आपणाला देवकार्य करायचे आहे. तेव्हा मानसन्मान बाजूस ठेवून तू निश्चिंत मनाने शशादाचे वाहन हो. कसल्याही प्रकारचा संकोच तू यावेळी मनात बाळगू नकोस. तरच हे महान देवकार्य सिद्धीस जाईल."

पण यावेळी इंद्र फार लज्जित झाला व आढेवेढे घेऊ लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला शशादाचे वाहन होण्यास प्रेरणा दिली. प्रत्यक्ष विष्णूची प्रेरणा होताच इंद्राने भयंकर अशा वृषभाचे रूप घेतले. शशाद राजा युद्धासाठी सज्ज होऊन बसला. (वशिंड म्हणजे कुकद, म्हणून राजाला कुकस्थ हे नाव प्राप्त झाले.) इंद्राला वाहन होण्यास लावल्यामुळे शशादाला इंद्रवाह म्हणू लागले. पुढे तो वशिंडावर स्वार होऊन दैत्यांशी संग्राम करू लागला. दैत्यांचे महानगर (पुर) त्याने जिंकले. म्हणून तो पुरंजय या नावाने प्रसिद्ध पावला. राजाने युद्धात सर्व दैत्यांचा पराभव करून सर्व द्रव्य देवास अर्पण केले आणि युद्ध समाप्त झाल्यावर त्याने आपल्या नगराकडे जाण्याची देवांना परवानगी मागितली. अशा तऱ्हेने शशाद राजा व इंद्र यांचे सख्य झाले. असे दिग्विजय प्राप्त झाल्यामुळे तो ककुस्थ राजा त्रैलोक्यात प्रसिद्धीस पावला आणि त्याचे पुत्र व वंशातील राजे ककुस्थ म्हणून विख्यात झाले.

कुकुस्थाला आपल्या धर्मपत्‍नीपासून अत्यंत बलवान असा पुत्र झाला. तोसुद्धा ककुस्थ या नावानेच प्रसिद्ध झाला. त्या ककुस्थाचा पुत्र वीर्यवान असा पृथुराजा होय. पृथुराजा साक्षात विष्णूचा अंश होता व कल्याणी पराशक्तीचा उपासक होता. विश्वसंधि नावाचा प्रसिद्ध असलेला राजा हा त्या पृथूचा पुत्र होय. त्याचा पराक्रमी पुत्र चंद्रराजा व चंद्रराजाचा पुत्र युवनाश्च. हा युवनाश्च महातेजस्वी व अतिबलाढ्य राजा होऊन गेला.

युवनाश्व राजाचा पुत्र शार्वत हा अत्यंत पराक्रमी होता. त्याने इंद्रनगरीशी स्पर्धा करील अशी शार्वती नावाची नगरी बसविली. तो धर्मात्मा होता. त्याचा पुत्र बृहदश्व. बृहदश्वाचा पुत्र थोर भूपाल कुवलयाश्व म्हणून होऊन गेला. तो महापराक्रमी निपजला. त्याने पृथ्वीवर धुंधु नावाच्या बलाढ्य दैत्याचा वध केला. त्यामुळे तो राजा धुंधुमार या नावाने जगात सुविख्यात झाला.

पुढे धुंधुमारपुत्र दृढाश्व याने प्रामाणिकपणे राहून पृथ्वीचे पालन केले. त्याला हर्यश्व नावाचा उत्कृष्ट पुत्र झाला. त्याचा पुत्र निकुंभ याने पृथ्वीचे राज्य केले. निकुंभाचा पुत्र बर्हणाश्व व त्याचा पुत्र कृशाश्व असे हे सर्व प्रसिद्ध राजे होऊन गेले.

प्रचंड पराक्रमी, सत्यप्रेमी असा प्रसेनजित हा त्या थोर कृशाश्वाचा मुलगा. त्याला यौवनाश्व नावाचा अत्यंत भाग्यवान पुत्र झाला. सुप्रसिद्ध मांधाता हा राजा यौवनाश्वाचा पुत्र.

तो मातृगर्भात उदयास न येता भगवतीच्या प्रसादाने पित्याच्या उदरात जन्मास आला. तो पित्याचे उदर फोडून बाहेर आला. त्याने पराशक्ती भगवतीच्या तृप्तीसाठी एक हजार आठ देवालये महातीर्थांच्या ठिकाणी बांधली."

व्यासमुनींकडून ही अद्‌भुत घटना ऐकताच जनमेजय म्हणाला, "हे व्यासमुने, आजपर्यंत अशी असंभाव्य व्युत्पत्ती ऐकिवात नाही, तेव्हा तो सर्वांगसुंदर पुत्र राजाच्या उदरातून कसा बाहेर आला ते आता निवेदन करा. मला मांधात्याच्या जन्माचे कारण समजून घेण्याची इच्छा झाली आहे. ती घटना आश्चर्यकारक आहे."

व्यास म्हणाले, "हे राजा, ऐक आता. यौवनाश्व राजा अत्यंत धार्मिक होता. पण त्याच्या पोटी संतान नव्हते. त्या राजाला शंभर भार्या होत्या. पण पुत्र नसल्याने राजा नेहमी चिंता करीत असे. अखेर अपत्य होत नसल्याने खिन्न व उदास होऊन दुःखी मनाने तो एकदा वनात गेला. ऋषींचे अनेक पुण्य आश्रम त्याने अवलोकिले. त्यासन्निध काही दिवस वास्तव्य करीत असता तो ऋषींसमोर अत्यंत उदास होऊन सुस्कारे टाकू लागला. शेवटी त्या ऋषीवृंदांना त्याची दया आली. ते राजाला म्हणाले, "राजा, सर्व सुखे असताना तू असा शोक विव्हल का ? तू आपल्या मनातले दुःख निश्चिंत मनाने आम्हाला सांग. आम्ही तुझे दुःख दूर करू."

राजा म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठांनो, मला सर्व सुखे प्राप्त झाली आहेत, राज्य आहे, वैभव आहे, महासाध्वी व तेजस्वी अशा शंभर स्त्रिया आहेत, त्रैलोक्यात मी अजेय असून सर्व राजे माझे मांडलिक आहेत, माझे मंत्रीजन माझ्या आज्ञेत राहतात, तेव्हा अशी सर्व सुखे असूनही हे तापसहो, पोटी पुत्रसंतान नसल्याने मी अत्यंत दुःखी आहे.

अपुत्राला उत्तम गती प्राप्त होत नाही. स्वर्ग मिळत नाही असे शास्त्रवचन आहे. म्हणून निपुत्रिक असल्याने मी शोक करीत आहे. हे मुनीवर्यांनो, तुम्ही वेदांचे चिंतन केले असल्याने जाणकार आहात. तेव्हा संतान होण्यासाठी मी काय करावे सांगा. आपण माझ्यावर अनुग्रह करून मला समाधान प्राप्त करून द्या."

राजाचे शोकमग्न भाषण ऐकून ऋषींना वाईट वाटले. त्यांनी ज्या इष्टीत इंद्रदेवता मुख्य आहे अशी इष्टी राजाकडून करविली. राजाला पुत्र व्हावा म्हणून ब्राह्मणांनी त्या इष्टीत उदकाने भरलेला कलश स्थापन केला व राजाला पुत्र व्हावा म्हणून वेदमंत्रांनी त्याचे अभिमंत्रण केले. एकदा रात्री राजा तुषाक्रांत झाला असता यज्ञ मंडपात आला. सर्व ब्राह्मण निद्रिस्त झाले होते. राजाने अज्ञानाने त्या स्थापित कलशातील जल प्राशन केले. वास्तविक ब्राह्मणांनी ते जल राजाच्या भार्यांकरता अभिमंत्रित केले होते. राजाने जल प्राशन करून तो कलश पूर्ववत ठेवून दिला.

दुसरे दिवशी सर्व ब्राह्मण उठून पहातात तो कलशात जल नाही. तेव्हा संशय आला. त्यांनी चौकशी केली. राजाने आपण जलपान केल्याचे सांगताच मुनींनी दैवबल श्रेष्ठ आहे असे जाणून नाईलाजाने इष्टि समाप्त केली व ते स्वस्थानी निघून गेले.

पुढे त्या मंत्रसामर्थ्यामुळे राजाला गर्भ राहिला. पुढे यथावकाश योग्य समय प्राप्त होताच राजाची कूस फोडून तो बाहेर येऊ लागला. मंत्रीजनांनी त्या पुत्राला ओढून बाहेर काढले. दैव बलवत्तर असल्याने राजाला मृत्यु आला नाही.

पण आता हा पुत्र कोणाचे दूध पील अशा शंकेने राजा व मंत्री व्याकुल झाले. तेव्हा तेथे इंद्र प्रकट झाला. तो आपली तर्जनी मुलाच्या मुखात घालून म्हणाला, "मां धास्यति." (तो मला पील.)

अशातऱ्हेने या पुत्राला मांधाता हे नाव प्राप्त झाले. तो पृथ्वीवर बलाढ्य राजा म्हणून प्रसिद्ध पावला.अध्याय नववा समाप्त

GO TOP