श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


अश्विभ्यां च्यवनद्वारा सोमपानाय प्रतिज्ञावर्णनम्

व्यास उवाच -
तयोस्तद्‌भाषितं श्रुत्वा वेपमाना नृपात्मजा ।
धैर्यमालम्ब्य तौ तत्र बभाषे मितभाषिणी ॥ १ ॥
देवौ वां रविपुत्रौ च सर्वज्ञौ सुरसम्मतौ ।
सतीं मां धर्मशीलां च नैवं वदितुमर्हथः ॥ २ ॥
पित्रा दत्ता सुरश्रेष्ठौ मुनये योगधर्मिणे ।
कथं गच्छामि तं मार्गं पुंश्चलीगणसेवितम् ॥ ३ ॥
द्रष्टायं सर्वलोकस्य कर्मसाक्षी दिवाकरः ।
कश्यपाच्चैव सम्भूतो नैवं भाषितुमर्हथः ॥ ४ ॥
कुलकन्या पतिं त्यक्त्वा कथमन्यं भजेन्नरम् ।
असारेऽस्मिन्हि संसारे जानन्तौ धर्मनिर्णयम् ॥ ५ ॥
यथेच्छं गच्छतं देवौ शापं दास्यामि वानघौ ।
सुकन्याहं च शर्यातेः पतिभक्तिपरायणा ॥ ६ ॥
व्यास उवाच -
इत्याकर्ण्य वचस्तस्या नासत्यौ विस्मितौ भृशम् ।
तावब्रूतां पुनस्त्वेनां शङ्कमानौ भयं मुनेः ॥ ७ ॥
राजपुत्रि प्रसन्नौ ते धर्मेण वरवर्णिनि ।
वरं वरय सुश्रोणि दास्यावः श्रेयसे तव ॥ ८ ॥
जानीहि प्रमदे नूनं आवां देवभिषग्वरौ ।
युवानं रूपसम्पन्नं प्रकुर्यावः पतिं तव ॥ ९ ॥
ततस्त्रयाणामस्माकं पतिमेकतमं वृणु ।
समानरूपदेहानां मध्ये चातुर्यपण्डिते ॥ १० ॥
सा तर्योवचनं श्रुत्वा विस्मिता स्वपतिं तदा ।
गत्वोवाच तयोर्वाक्यं ताभ्यामुक्तं यदद्‌भुतम् ॥ ११ ॥
सुकन्योवाच -
स्वामिन् सूर्यसुतौ देवौ सम्प्राप्तौ च्यवनाश्रमे ।
दृष्टौ मया दिव्यदेहौ नासत्यौ भृगुनन्दन ॥ १२ ॥
वीक्ष्य मां चारुसर्वाङ्‍गीं जातौ कामातुरावुभौ ।
कथितं वचनं स्वामिन् पतिं ते नवयौवनम् ॥ १३ ॥
दिव्यदेहं करिष्यावश्चक्षुष्मन्तं मुनिं किल ।
एतेन समयेनाद्य तं शृणु त्वं मयोदितम् ॥ १४ ॥
समावयवरूपं च करिष्यावः पतिं तव ।
तत्र त्रयाणामस्माकं पतिमेकतमं वृणु ॥ १५ ॥
तच्छ्रुत्वाहमिहायाता प्रष्टुं त्वां कार्यमद्‌भुतम् ।
किं कर्तव्यमतः साधो ब्रूह्यस्मिन्कार्यसङ्कटे ॥ १६ ॥
देवमायापि दुर्ज्ञेया न जाने कपटं तयोः ।
यदाज्ञापय सर्वज्ञ तत्करोमि तवेप्सितम् ॥ १७ ॥
च्यवन उवाच -
गच्छ कान्तेऽद्य नासत्यौ वचनान्मम सुव्रते ।
आनयस्व समीपं मे शीघ्रं देवभिषग्वरौ ॥ १८ ॥
क्रियतामाशु तद्वाक्यं नात्र कार्या विचारणा
व्यास उवाच -
एवं सा समनुज्ञाता तत्र गत्वा वचोऽब्रवीत् ॥ १९ ॥
क्रियतामाशु नासत्यौ समयेन सुरोत्तमौ ।
तच्छ्रुत्वा चाश्विनौ वाक्यं तस्यास्तौ तत्र चागतौ ॥ २० ॥
ऊचतू राजपुत्रीं तां पतिस्तव विशत्वपः ।
रूपार्थं च्यवनस्तूर्णं ततोऽम्भः प्रविवेश ह ॥ २१ ॥
अश्विनावपि पश्चात्तत्प्रविष्टौ सर उत्तमम् ।
ततस्ते निःसृतास्तस्मात्सरसस्तत्क्षणात्त्रयः ।
तुल्यरूपा दिव्य देहा युवानः सदृशाः किल ।
दिव्यकुण्डलभूषाढ्याः समानावयवास्तथा ॥ २३ ॥
तेऽब्रुवन्सहिताः सर्वे वृणीष्व वरवर्णिनि ।
अस्माकमीप्सितं भद्रे पतिं त्वममलानने ॥ २४ ॥
यस्मिन्वाप्यधिका प्रीतिस्तं वृणुष्व वरानने ।
व्यास उवाच -
सा दृष्ट्वा तुल्यरूपांस्तान्समानवयसस्तथा ॥ २५ ॥
एकस्वरांस्तुल्यवेषांस्त्रीन्वै देवसुतोपमान् ।
सा तु संशयमापन्ना वीक्ष्य तान्सदृशाकृतीन् ॥ २६ ॥
अजानन्ती पतिं सम्यग्व्याकुला समचिन्तयत् ।
किं करोमि त्रयस्तुल्याः कं वृणोमि न वेद्म्यहम् ॥ २७ ॥
पतिं देवसुता ह्येते संशये पतितास्म्यहम् ।
इन्द्रजालमिदं सम्यग्देवाभ्यामिह कल्पितम् ॥ २८ ॥
कर्तव्यं किं मया चात्र मरणं समुपागतम् ।
न मया पतिमुत्सृज्य वरणीयः कथञ्चन ॥ २९ ॥
देवस्त्वाधुनिकः कश्चिदित्येषा मम धारणा ।
इति सञ्चिन्त्य मनसा परां विश्वेश्वरीं शिवाम् ॥ ३० ॥
दध्यौ भगवतीं देवीं तुष्टाव च कृशोदरी ।
सुकन्योवाच -
शरणं त्वां जगन्मातः प्राप्तास्मि भृशदुःखिता ॥ ३१ ॥
रक्ष मेऽद्य सतीधर्मं नमामि चरणौ तव ।
नमः पद्मोद्‌भवे देवि नमः शङ्करवल्लभे ॥ ३२ ॥
विष्णुप्रिये नमो लक्ष्मि वेदमातः सरस्वति ।
इदं जगत्त्वया सृष्टं सर्वं स्थावरजङ्गमम् ॥ ३३ ॥
पासि त्वमिदमव्यग्रा तथात्सि लोकशान्तये ।
ब्रह्मविष्णुमहेशानां जननी त्वं सुसम्मता ॥ ३४ ॥
बुद्धिदासि त्वमज्ञानां ज्ञानिनां मोक्षदा सदा ।
आज्ञा त्वं प्रकृतिः पूर्णा पुरुषप्रियदर्शना ॥ ३५ ॥
भुक्तिमुक्तिप्रदासि त्वं प्राणिनां विशदात्मनाम् ।
अज्ञानां दुःखदा कामं सत्त्वानां सुखसाधना ॥ ३६ ॥
सिद्धिदा योगिनामम्ब जयदा कीर्तिदा पुनः ।
शरणं त्वां प्रपन्नास्मि विस्मयं परमं गता ॥ ३७ ॥
पतिं दर्शय मे मातर्मग्नास्मि शोकसागरे ।
देवाभ्यां चरितं कूटं कं वृणोमि विमोहिता ॥ ३८ ॥
पतिं दर्शय सर्वज्ञे विदित्वा मे सतीव्रतम् ।
व्यास उवाच -
एवं स्तुता तदा देवा तथा त्रिपुरसुन्दरी ॥ ३९ ॥
हृदयेऽस्यास्तदा ज्ञानं ददावाशु सुखोदयम् ।
निश्चित्य मनसा तुल्यवयोरूपधरान्सती ॥ ४० ॥
प्रसमीक्ष्य तु तान् सर्वान्वव्रे बाला स्वकं पतिम् ।
वृतेऽथ च्यवने देवौ सन्तुष्टौ तौ बभूवतुः ॥ ४१ ॥
सतीधर्मं समालोक्य सम्प्रीतौ ददतुर्वरम् ।
भगवत्याः प्रसादेन प्रसन्नौ तौ सुरौत्तमौ ॥ ४२ ॥
मुनिमामन्त्र्य तरसा गमनायोद्यतावुभौ ।
लब्ध्वा तु च्यवनो रूपं नेत्रे भार्यां च यौवनम् ॥ ४३ ॥
हृष्टोऽब्रवीन्महातेजास्तौ नासत्याविदं वचः ।
उपकारः कृतोऽयं मे युवाभ्यां सुरसत्तमौ ॥ ४४ ॥
किं ब्रवीमि सुखं प्राप्तं संसारेऽस्मिन्ननुत्तमे ।
प्राप्य भार्यां सुकेशान्तां दुःखं मेऽभवदन्वहम् ॥ ४५ ॥
अन्धस्य चातिवृद्धस्य भोगहीनस्य कानने ।
युवाभ्यां नयने दत्ते यौवनं रूपमद्‌भुतम् ॥ ४६ ॥
सम्पादितं ततं किञ्चिदुपकर्तुमहं ब्रुवे ।
उपकारिणि मित्रे यो नोपकुर्यात्कथञ्चन ॥ ४७ ॥
तं धिगस्तु नरं देवौ भवेच्च ऋणवान्भुवि ।
तस्माद्वां वाञ्छितं किञ्चिद्दातुमिच्छामि साम्प्रतम् ॥ ४८ ॥
आत्मनो ऋणमोक्षाय देवेशौ नूतनस्य च ।
प्रार्थितं वां प्रदास्यामि यदलभ्यं सुरासुरैः ॥ ४९ ॥
ब्रुवाथां वां मनोद्दिष्टं प्रीतोऽस्मि सुकृतेन वाम् ।
श्रुत्वा तौ तु मुनेर्वाक्यमभिमन्त्र्य परस्परम् ॥ ५० ॥
तमूचतुर्मुनिश्रेष्ठं सुकन्यासहितं स्थितम् ।
मुने पितुः प्रसादेन सर्वं नो मनसेप्सितम् ॥ ५१ ॥
उत्कण्ठा सोमपानस्य वर्तते नौ सुरैः सह ।
भिषजाविति देवेन निषिद्धौ चमसग्रहे ॥ ५२ ॥
शक्रेण वितते यज्ञे ब्रह्मणः कनकाचले ।
तस्मात्त्वमपि धर्मज्ञ यदि शक्तोऽसि तापस ॥ ५३ ॥
कार्यमेतद्धि कर्तव्यं वाञ्छितं नौ सुसम्मतम् ।
एतद्विज्ञाय वा ब्रह्मन्कुरु वां सोमपायिनौ ॥ ५४ ॥
पिपासास्ति सुदुष्प्रापपा त्वत्तः समुपयास्यति ।
च्यवनस्तु तयोः प्राह तच्छ्रुत्वा वचनं मृदु ॥ ५५ ॥
यदहं रूपसम्पन्नो वयसा च समन्वितः ।
कृतो भवद्‌भ्यां वृद्धः सन्भार्यां च प्राप्तवानिति ॥ ५६ ॥
तस्माद्युवां करिष्यामि प्रीत्याहं सोमपायिनौ ।
मिषतो देवराजस्य सत्यमेतद्‌ब्रवीम्यहम् ॥ ५७ ॥
राज्ञस्तु वितते यज्ञे शर्यातेरमितद्युतेः ।
इत्याकर्ण्य वचो हृष्टौ तौ दिवं प्रतिजग्मतुः ॥ ५८ ॥
च्यवनस्तां गृहीत्वा तु जगामाश्रममण्डलम् ॥ ५९ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां सप्तमस्कन्धे अश्विभ्यां च्यवनद्वारा
सोमपानाय प्रतिज्ञावर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


च्यवनमुनींना तारुण्यप्राप्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अश्विनीकुमारांचे ते मदनविव्हल भाषण ऐकून ती साध्वी सुकन्या थरथर कापू लागली. ती पतिव्रता असल्याने असले भाषण ऐकणेही तिला पाप वाटत होते. ती पूर्णपणे भयभीत झाली व सूर्यपुत्रांना म्हणाली,

"हे देवपुत्रांनो, तुम्ही मला देवाप्रमाणेच पूज्य आहात. तुम्ही साक्षात् देवच असल्याने तुम्हाला अंतर्ज्ञानाने सर्व परिस्थिती समजते. तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्यासारख्यांनी एका पतिव्रतेला असले बोलणे योग्य नव्हे. माझ्यासारख्या नीतीधर्माने वागणार्‍या सत्प्रवृत्ती स्त्रीबरोबर आपण असले भाषण कसे बरे केलेत ? हे देवांनो, माझ्या पित्याने सर्व विधीपूर्वक मला त्या महान तपस्वी मुनीला अर्पण केले आहे. तेव्हा आपण सांगत असलेल्या अविचाराच्या मार्गाचे अवलंबन करणे खरोखरच योग्य नव्हे. प्रत्यक्ष भगवान सूर्य हा सर्वसाक्षी आहे. तो कश्यपपुत्र तुमचा पिता आहे. त्यादेखत तुम्ही मजजवळ असले शब्द उच्चारणे तुमच्यासारख्या देवांना शोभत नाही.

हा सर्व संसार असार असून हे जग म्हणजे माया आहे. सुखोपभोग खोटे आहेत. मी आहे या स्थितीत अत्यंत समाधानात आहे. कारण मी माझा धर्म पालन करीत आहे. धर्माने घालून दिलेली बंधने आपण जाणत आहात. पतीचा त्याग करणे हे कुलीन स्त्रीचे लक्षण नव्हे. पतीविना परपुरुषाचा स्वीकार कोणती साध्वी स्त्री करील ? तेव्हा हे देवपुत्रांनो, तुम्ही त्वरित येथून चालते व्हा. नाहीतर मी तुम्हाला शाप दिल्याविना खचित रहाणार नाही. मी पतीभक्त असून त्याच्याशी एकनिष्ठ आहे. महापराक्रमी शर्याति राजाची मी कन्या आहे. याचा आपणाला विसर पडू देऊ नका."

अशा तर्‍हेचे सुकन्येचे तीव्र भाषण ऐकताच देवपुत्र अश्विनीकुमार विस्मयचकित झाले व मुनींच्या शापवाणीची आठवण होऊन ते घाबरून गेले. ते अत्यंत नम्रतेने व स्वतःला सावरून घेत म्हणाले, "हे कोमलांगी, खरोखरच तुझी पतीनिष्ठा व धर्मपरायणता पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत. आम्ही तुला प्रसन्न झालो असल्याने तुला हवा तो इच्छित वर मागून घे. हे कल्याणी, तुझे चांगले व्हावे, म्हणून आम्ही तुला हवे ते देण्यास तयार आहोत. आम्ही देवांचेही वैद्य असल्याने तुझ्या पतीला नुसते तारुण्यच काय पण रूपसौंदर्यही प्राप्त करून देऊ. ह्यावर विश्वास ठेव. अशाप्रकारे तुझा पती रूपयौवनसंपन्न झाल्यावर तू आम्हा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर. आम्ही तुझ्या पतीला खचित सुंदर करू तेव्हा विचार कर."

अश्विनीकुमारांचे हे मर्मभेदी व अद्‌भुत भाषण ऐकून सुकन्या आपल्या पतीजवळ गेली व अश्विनीकुमारांबरोबर आपला झालेला संवाद तिले आपल्या देवतुल्य पतीला निवेदन केला. ती म्हणाली, "हे भूगुनंदना, आज मी दिव्यदेहधारीव रूपयौवनसंपन्न मनोहर अशा अश्विनीकुमारांना पाहिले. ते दोघे सूर्यपुत्र या वनात सांप्रत आले आहेत. मला पाहून ते दोघेही माझ्या सुंदर देहाविषयी आसक्त झाले व अत्यंत मदनविव्हल होऊन ते म्हणाले,

"आम्ही देवांचे वैद्य आहोत. तुझ्या पतीला आम्ही रूपयौवनसंपन्न तर करूच, शिवाय पुन्हा दृष्टी प्राप्त करून देऊ. पण त्यावर त्यांनी एक दुष्ट अशी अट आहे. ते म्हणाले, तुझा पती देहाने व रूपाने आमच्यासारखा दिसेल असे आम्ही करू व पुढे तू पती शोधून घे किंवा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर. त्यांचे हे विचित्र भाषण ऐकून मी आपणाला ही दुर्घट घटना निवेदन करावे म्हणून आले आहे. तेव्हा आता मी काय करावे हे आपण निवेदन करावे. हे नाथ, देवाचे कपट मी जाणत नाही. देवाची माया अनाकलनीय आहे. तेव्हा अशा प्रसंगी पतिव्रता धर्माला योग्य असे मी कसे वागावे हे मला सांगा, म्हणजे मी तसेच करीन."

आपल्या एकनिष्ठ व सेवातत्पर पत्‍नीचे भाषण ऐकून च्यवन विचार करून म्हणाले, "व्रतस्थ प्रिये, तू आता त्वरेने त्या देववैद्य अश्विनीकुमारांकडे जा व त्यांना येथवर घेऊन ये. नंतर तू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होकार दे. विलंब करू नकोस. तू कसलीही चिंता न करता त्यांचे ऐक." पतीची आज्ञा घेऊन सुकन्या देवपुत्र अश्विनीकुमारांकडे येऊन म्हणाली, "सुरवरांनो आपण आताच माझ्या पतीकडे चलावे. तुम्ही जे सांगाल तसे मी करीन. तुमच्या अटी मला मान्य आहेत. खरेच तुम्ही सत्वर माझ्या पतीला रूपयौवनसंपन्न करा व दिव्यदृष्टी प्राप्त करून द्या."

तिचे भाषण ऐकताच अश्विनीकुमारांनी सरोवरातील उदकात काही दिव्य औषधे मिसळली. नंतर त्यांनी सुकन्येला सांगितले, "हे मानिनी, आता तू तुझ्या पतीला त्या जलात नेऊन ठेव, म्हणजे तो दिव्यदेहधारी होईल."

सुकन्येने आपल्या प्रिय पतीला सत्वर त्या सरोवरात नेऊन बसविले व ती परत काठावर आली. अश्विनीकुमार त्वरेने त्या सरोवरात शिरले. थोड्याच वेळाने सर्वांनी बुडी घेतली व लवकरच ते तिघेहीजण सरोवरातून बाहेर पडले. त्या तिघांचे तेजःपुंज असे देह अत्यंत एकसारखे दिसत होते. त्यांच्यात थोडाही उणेपणा नव्हता. तिघेही प्रसन्न व शांत होते. त्या तिघांचेही अवयव सारखेच असल्याने रूपाने अतुल होते. सर्वजण दिव्य वस्त्रे व भूषणांनी मंडित होते.

सरोवरातून बाहेर पडताच ते तिघेही आपल्या एकाच आवाजात सुकन्येला म्हणाले, "हे सुमुखी, हे वरवर्णिनी, हे अमलवदने, हे कल्याणी, आम्हा तिघांपैकी तुला हवा वाटेल त्या कोणासही तू पती म्हणून वर. तुझे ज्याच्यावर अधिक प्रेम असेल त्याचा तू स्वीकार कर."

ते त्या तिघांचेही सम आवाजातले बोलणे ऐकून व त्या तिघांचेही रूप, गुण, वय व वेष सारखेच असलेले पाहून ती बिकट संभ्रमात पडली. आपला पती कोणता हेच तिला उमजेना. आपले पातिव्रत्य भंग तर पावणार नाही ना ! असाही प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला. ती भयभीत झाली. आता तिघांपैकी कोणाला पती म्हणून स्वीकारावे याबद्दल ती चिंतन करू लागली. खरोखरच देवांनी चांगलीच कपटमाया केली आहे. आता काय करावे बरे ? खरेच माझे पातिव्रत्य भंग होत असेल तर माझा मृत्यूच जवळ आला असे म्हणावे लागेल. पतीविना कोणालाही, मग ते देव असले तरी मी वरणार नाही. मी पतीशी एकनिष्ठ राहीन.

अशाप्रकारे संभ्रम प्राप्त झाल्यावर तिने देवीचे चिंतन करावे असा विचार केला. त्या वृकोदरी विश्वेश्वरीचे, त्या सर्वोत्कृष्ट कल्याणीचे, त्या सर्व फलदायिनी भगवती देवीचे ध्यान करण्यास सुकन्येने सुरुवात केली.

"हे जगन्माते, मी आज अत्यंत दुःखद स्थितीत असून खिन्न होऊन तुला शरण आले आहे. हे मोक्षदायिनी देवते, आता तूच फक्त माझ्या पातिव्रत्याचे रक्षण करण्यास समर्थ आहेस. मी तुझ्या चरणांना नम्रतेने प्रणाम करते. हे कमलोद्‌भवे, हे शंकरवल्लभे, हे विष्णूप्रिये, हे लक्ष्मी, हे वेदमाते, हे सरस्वती, हे देवी, तुला नमस्कार असो.

हे भगवती, हे सर्व चराचर विश्व तूच निर्माण करतेस, तूच याचे रक्षण करतेस व योग्य काली तूच याचा लय करतेस. तूच भगवान विष्णू महेश्वर व ब्रह्मदेव यांची खरोखर जननी आहेस. अज्ञानी जनांना तूच ज्ञानस्पर्श करून ज्ञानी करतेस व सूज्ञांना मोक्ष प्राप्त करून देतेस. तूच सारसर्वस्व असून आद्यप्रकृती तूच आहेस. म्हणून त्या पूर्ण अशा परम-पुरुषाला तुझे दर्शन प्रिय असते. निर्मल अंतःकरणाल्या सर्व प्राण्यांना तूच भुक्ती, मुक्ती देतेस. तूच अज्ञानी जनांना दुःख व पीडा देतेस आणि योगी जनांना सिद्धी, कीर्ती व जय प्राप्त करून देतेस. मी अत्यंत संकटात असून हे देवी, तुझ्या चरणावर मी नत झाले आहे. म्हणून हे भगवती माते, यातील माझे पतीराज कोणते याचे मला मार्गदर्शन कर. खरोखर देवांनी कपट करून मला मोहात पाडले आहे. तेव्हा अशा या दुर्घट अवस्थेत मी माझ्या पतीला कसे बरे ओळखू ? हे सर्वसाक्षी देवते, तूच माझ्या पातिव्रत्याचे रक्षण कर. मला माझा पती कोणता हे सत्वर दाखव."

अशाप्रकारे सुकन्येने त्या शुभफलदायिनी देवीचे स्मरण व स्तवन केले. तेव्हा त्या सुख देणार्‍या देवीने दिव्य असे ज्ञान सुकन्येच्या हृदयात निर्माण केले. तेव्हा त्यातला आपला पति कोणता हे तिला अचूक ओळखता आले व तिने आपल्या पतिचाच स्वीकार केला.

अशाप्रकारे एका दिव्य परीक्षेत ती यशस्वी झाली असता प्रसन्न झालेले अश्विनीकुमार तिला निरनिराळे दिव्य आशीर्वाद देऊन परत जाण्यास निघाले.

आपल्या पतिनिष्ट पत्‍नीला च्यवनमुनींनी प्रसन्न होऊन अनेक शुभ वर दिले.

च्यवनमुनींना रूप व विशालनेत्र अशी पतिव्रता भार्या व सुरेख यौवन प्राप्त झाल्याने अत्यंत आनंदित होऊन ते अश्विनीकुमारांना म्हणाले, "हे सुरश्रेष्ठहो, आपण खरोखर अनपेक्षितपणे मला हे रूपसौंदर्य देऊन अत्यंत उपकृत केले आहे. तुमच्या कृपाप्रसादामुळे मला आता संसारातील सर्व सुखे प्राप्त होणार आहेत. या अनुपमेय सुखप्राप्तीमुळे काय बोलावे हेच मला समजत नाही. ती सुंदर केशसंभाराने युक्त असलेली भार्या माझ्यासारख्या अंध वृद्धाला लाभल्यावर मी सुखावाचून दुःखी राहूनच त्या अरण्यात वास्तव्य करीत होतो. मला प्रत्यही दारुण दुःख होत असे. तुम्ही मला त्या दुष्ट अवस्थेतून मुक्त करून हे उत्कृष्ट नेत्र, हे दुर्लभ यौवन व अद्वितीय असे रूप प्राप्त करून दिले आहेत. त्याचे उपकार न फिटण्यासारखे असले तरी कृतज्ञताबुद्धीने मी आता बोलतो आहे, ते आपण श्रवण करा.

हे देवपुत्रांनो, आपल्या उपकारकर्त्या मित्रावर जे कृतज्ञ मनाने पुन्हा उपकार करीत नाहीत ते पुरुष धिक्कार करण्यासच योग्य होत. प्रत्येक पुरुषाने उपकारकर्त्याचे ऋणी रहावे. म्हणून आपली जर काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यास मी तयार आहे. आपण सांगा. देव-दानवांनाही दुर्लभ असे तुमचे कोणतेही मनोरथ मी पूर्ण करीन. म्हणून आपली इच्छा मला कथन करा. तुम्ही केलेल्या या पुण्यकारण कृत्याने मी संतुष्ट झालो आहे."

प्रसन्न झालेल्या मुनीचे भाषण ऐकून अश्विनीकुमारांनी एकमेकात विचारविनिमय केला. ते मुनीश्रेष्ठाला म्हणाले, "हे महामुने, तो सर्वलक्षी, सर्वसाक्षी असा सूर्य आमचा पिता आहे. त्यामुळे आम्हाला सर्व काही मनाप्रमाणे मिळत असते. पण हे मुनीवर्या, देवांच्याबरोबर सोमपान करावी अशी आमची एक इच्छा राहून गेलेली आहे. पूर्वी एकदा ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी इंद्राने मेरूपर्वतावर यज्ञ केला. त्यावेळी ज्या पात्राने सोमपान करतात. ते चमसपात्र आम्ही वैद्य असूनही घेतल्यामुळे इंद्राने आमचा निषेध केला. म्हणून हे धर्माज्ञा, तापसा ती आमची अपूर्ण राहिलेली इच्छा तू पूर्ण कर. तुझ्यात सामर्थ्य असेल तर तेवढेच आमचे मनोरथ पूर्ण कर. आमची ही दुर्लभ इच्छा जाणून तू आम्हाला सोमपानाची झालेली इच्छा सोमपान देऊन पूर्ण कर. देवांसह सोमपान करण्याची आमची इच्छा तूच शेवटास नेशील याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो."

च्यवन म्हणाले, "हे देवपुत्रांनो, मी वृद्ध व अंध असूनही तुम्ही माझा कायापालट करून मला रूपसंपन्न व यौवनाने परिपूर्ण केले. केवळ त्या योगानेच मला माझ्या या सुंदर भार्येची खरी प्राप्ती झाली. म्हणून त्या इंद्राच्या रागद्वेषास न जुमानता मी तुम्हाला सोमपान करवीन. त्या महातेजस्वी शर्याति राजाच्या यज्ञात मी तुमची इच्छा पूर्ण करीन. हे माझे वचन सत्य समजा."

नंतर हे प्रिय भाषण ऐकल्यावर अश्विनीकुमार समाधानाने स्वर्गाकडे निघून गेले व च्यवन भार्गव मुनीही आपल्या सुंदर भार्येसह आश्रमात आले.अध्याय पाचवा समाप्त

GO TOP