श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
चतुर्थः स्कन्धः
अष्टमोऽध्यायः


प्रह्लादतीर्थयात्रावर्णनम्

सूत उवाच
इति पृष्टस्तदा विप्रो राज्ञा पारीक्षितेन वै ।
उवाच विस्तरात्सर्वं व्यासः सत्यवतीसुतः ॥ १ ॥
जनमेजयोऽपि धर्मात्मा निर्वेदं परमं गतः ।
चित्तं दुश्चरितं मत्वा वैराटीतनयस्य वै ॥ २ ॥
तस्यैवोद्धरणार्थाय चकार सततं मनः ।
विप्रावमानपापेन यमलोकं गतस्य वै ॥ ३ ॥
पुन्नामनरकाद्यस्मात्त्रायते पितरं स्वकम् ।
पुत्रेति नाम सार्थं स्यात्तेन तस्य मुनीश्वराः ॥ ४ ॥
सर्पदष्टं नृपं श्रुत्वा हर्म्योपरि मृतं तथा ।
विप्रशापादौत्तरेयं स्नानदानविवर्जितम् ॥ ५ ॥
पितुर्गतिं निशम्यासौ निर्वेदं गतवान्नृपः ।
पारीक्षितो महाभागः सन्तप्तो भयविह्वलः ॥ ६ ॥
पप्रच्छाथ मुनिं व्यासं गृहागतमनिन्दितः ।
नरनारायणस्येमां कथां परमविस्मृताम् ॥ ७ ॥
व्यास उवाच
स यदा निहतो रौद्रो हिरण्यकशिपुर्नृप ।
अभिषिक्तस्तदा राज्ये प्रह्लादो नाम तत्सुतः ॥ ८ ॥
तस्मिञ्छासति दैत्येन्द्रे देवब्राह्मणपूजके ।
मखैर्भूमौ नृपतयो यजन्तः श्रद्धयान्विताः ॥ ९ ॥
ब्राह्मणाश्च तपोधर्मतीर्थयात्राश्च कुर्वते ।
वैश्याश्च स्वस्ववृत्तिस्थाः शूद्राः शुश्रूषणे रताः ॥ १० ॥
नृसिंहेन च पाताले स्थापितः सोऽथ दैत्यराट् ।
राज्यं चकार तत्रैव प्रजापालनतत्परः ॥ ११ ॥
कदाचिद्‌ भृगुपुत्रोऽथ च्यवनाख्यो महातपाः ।
जगाम नर्मदां स्नातुं तीर्थं वै व्याहृतीश्वरम् ॥ १२ ॥
रेवां महानदीं दृष्ट्वा ततस्तस्यामवातरत् ।
उत्तरन्तं प्रजग्राह नागो विषभयङ्करः ॥ १३ ॥
गृहीतो भयभीतस्तु पाताले मुनिसत्तमः ।
सस्मार मनसा विष्णुं देवदेवं जनार्दनम् ॥ १४ ॥
संस्मृते पुण्डरीकाक्षे निर्विषोऽभून्महोरगः ।
न प्राप च्यवनो दुःखं नीयमानो रसातलम् ॥ १५ ॥
द्विजिह्वेन मुनिस्त्यक्तो निर्विण्णेनातिशङ्‌किना ।
मां शपेत मुनिः कुद्धस्तापसोऽयं महानिति ॥ १६ ॥
चचार नागकन्याभिः पूजितो मुनिसत्तमः ।
विवेशाप्यथ नागानां दानवानां महत्पुरम् ॥ १७ ॥
कदाचिद्‌भृगुपुत्रं तं विचरन्तं पुरोत्तमे ।
ददर्श दैत्यराजोऽसौ प्रह्लादो धर्मवत्सलः ॥ १८ ॥
दृष्ट्वा तं पूजयामास मुनिं दैत्यपतिस्तदा ।
पप्रच्छ कारणं किं ते पातालागमने वद ॥ १९ ॥
प्रेषितोऽसि किमिन्द्रेण सत्यं ब्रूहि द्विजोत्तम ।
दैत्यविद्वेषयुक्तेन मम राज्यदिदृक्षया ॥ २० ॥
च्यवन उवाच
किं मे मघवता राजन् यदहं प्रेषितः पुनः ।
दूतकार्यं प्रकुर्वाणः प्राप्तवान्नगरे तव ॥ २१ ॥
विद्धि मां भृगुपुत्रं तं स्वनेत्रं धर्मतत्परम् ।
मा शङ्कां कुरु दैत्येन्द्र वासवप्रेषितस्य वै ॥ २२ ॥
स्नानार्थं नर्मदां प्राप्तः पुण्यतीर्थे नृपोत्तम ।
नद्यामेवावतीर्णोऽहं गृहीतश्च महाहिना ॥ २३ ॥
जातोऽसौ निर्विषः सर्पो विष्णोः संस्मरणादिव ।
मुक्तोऽहं तेन नागेन प्रभावात्स्मरणस्य वै ॥ २४ ॥
अत्रागतेन राजेन्द्र मयाप्तं तव दर्शनम् ।
विष्णुभक्तोऽसि दैत्येन्द्र तद्‌भक्तं मां विचिन्तय ॥ २५ ॥
व्यास उवाच
तन्निशम्य वचः श्लक्ष्णं हिरण्यकशिपोः सुतः ।
पप्रच्छ परया प्रीत्या तीर्थानि विविधानि च ॥ २६ ॥
प्रह्लाद उवाच
पृथिव्यां कानि तीर्थानि पुण्यानि मुनिसत्तम ।
पाताले च तथाकाशे तानि नो वद विस्तरात् ॥ २७ ॥

च्यवन उवाच
मनोवाक्कायशुद्धानां राजंस्तीर्थं पदे पदे ।
तथा मलिनचित्तानां गङ्गापि कीकटाधिका ॥ २८ ॥
प्रथमं चेन्मनः शुद्धं जातं पापविवर्जितम् ।
तदा तीर्थानि सर्वाणि पावनानि भवन्ति वै ॥ २९ ॥
गङ्गातीरे हि सर्वत्र वसन्ति नगराणि च ।
व्रजाश्चैवाकरा ग्रामाः सर्वे खेटास्तथापरे ॥ ३० ॥
निषादानां निवासाश्च कैवर्तानां तथापरे ।
हूणबङ्गखसानां च म्लेच्छानां दैत्यसत्तम ॥ ३१ ॥
पिबन्ति सर्वदा गाङ्गं जलं ब्रह्मोपमं सदा ।
स्नानं कुर्वन्ति दैत्येन्द्र त्रिकालं स्वेच्छया जनाः ॥ ३२ ॥
तत्रैकोऽपि विशुद्धात्मा न भवत्येव मारिष ।
किं फलं तर्हि तीर्थस्य विषयोपहतात्मसु ॥ ३३ ॥
कारणं मन एवात्र नान्यद्‌राजन्विचिन्तय ।
मनःशुद्धिं प्रकर्तव्या सततं शुद्धिमिच्छता ॥ ३४ ॥
तीर्थवासी महापापी भवेत्तत्रात्मवञ्चनात् ।
तत्रैवाचरितं पापमानन्त्याय प्रकल्पते ॥ ३५ ॥
यथेन्द्रवारुणं पक्वं मिष्टं नैवोपजायते ।
भावदुष्टस्तथा तीर्थे कोटिस्तातो न शुध्यति ॥ ३६ ॥
प्रथमं मनसः शुद्धिः कर्तव्या शुभमिच्छता ।
शुद्धे मनसि द्रव्यस्य शुद्धिर्भवति नान्यथा ॥ ३७ ॥
तथैवाचारशुद्धिः स्यात्ततस्तीर्थं प्रसिध्यति ।
अन्यथा तु कृतं सर्वं व्यर्थं भवति तत्क्षणात् ॥ ३८ ॥
(हीनवर्णस्य संसर्गं तीर्थे गत्वा सदा त्यजेत् ।) ॥
भूतानुकम्पनं चैव कर्तव्यं कर्मणा धिया ।
यदि पृच्छसि राजेन्द्र तीर्थं वक्ष्याम्यनुत्तमम् ॥ ३९ ॥
प्रथमं नैमिषं पुण्यं चक्रतीर्थं च पुष्करम् ।
अन्येषां चैव तीर्थानां संख्या नास्ति महीतले ॥ ४० ॥
पावनानि च स्थानानि बहूनि नृपसत्तम ।
व्यास उवाच
तच्छ्रुत्वा वचनं राजा नैमिषं गन्तुमुद्यतः ॥ ४१ ॥
नोदयामास दैत्यान्वै हर्षनिर्भरमानसः ।
प्रह्लाद उवाच

उत्तिष्ठन्तु महाभागा गमिष्यामोऽद्य नैमिषम् ॥ ४२ ॥
द्रक्ष्यामः पुण्डरीकाक्षं पीतवाससमच्युतम् ।
व्यास उवाच
इत्युक्ता विष्णुभक्तेन सर्वे ते दानवास्तदा ॥ ४३ ॥
तेनैव सह पातालान्निर्ययुः परया मुदा ।
ते समेत्य च दैतेया दानवाश्च महाबलाः ॥ ४४ ॥
नैमिषारण्यमासाद्य स्नानं चक्रुर्मुदान्विताः ।
प्रह्लादस्तत्र तीर्थेषु चरन्दैत्यैः समन्वितः ॥ ४५ ॥
सरस्वतीं महापुण्यां ददर्श विमलोदकाम् ।
तीर्थे तत्र नृपश्रेष्ठ प्रह्लादस्य महात्मनः ॥ ४६ ॥
मनः प्रसन्नं सञ्जातं स्नात्वा सारस्वते जले ।
विधिवत्तत्र दैत्येन्द्रः स्नानदानादिकं शुभे ॥ ४७ ॥
चकारातिप्रसन्नात्मा तीर्थे परमपावने ॥ ४८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां ॥
चतुर्थस्कन्धे प्रह्लादतीर्थयात्रावर्णनं नामाष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


दैत्यराज प्रल्हादाची तीर्थयात्रा -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अशा रीतीने जनमेजय राजाने प्रश्‍न विचारल्यावर सत्यवतीपुत्र व्यासांनी त्याला सर्व कथा विस्ताराने निवेदन केली. त्यामुळे परीक्षित राजाचे चित्त दूषित होत असे. जनमेजयाला समजून चुकले. त्यामुळे त्या धर्मपरायण जनमेजयाला अपार खेद वाटला. विप्राचा अपमान केल्यामुळे यमलोकी गेलेल्या पित्याचा उद्धार कसा करावा याविषयी तो चिंता करू लागला.

पुत्र पुन्नाम नरकापासून स्वतःच्या पित्याला तारीत असतो. पण आपला पिता, परीक्षित राजा विप्रशापामुळे अंतराळामध्ये सर्पदंश होऊन स्नान, दान, नित्य कर्मे न करताच मृत्यू पावला हे ऐकून व आपल्या पित्याला भयानक दुर्गती प्राप्त झाल्याचे श्रवण करून त्या महाभाग्यशाली परीक्षित पुत्राला, जनमेजयाला अत्यंत दु:ख झाले. नंतर राजाने त्या मुनींना नरनारायण याच्या विषयी सविस्तर कथा सांगण्याची विनंती केली.

जनमेजयाचे भाषण ऐकल्यावर व्यास म्हणाले, "हे राजा, त्या उग्र, भयानक हिरण्यकशिपूचा वध झाल्यावर लयाल्या प्रल्हाद नावाच्या पुत्राला राज्याभिषेक करण्यात आला. तो दैत्यराज देवांची पूजा करणारा होता. त्याचवेळी पृथ्वीवरील राजे सश्रद्ध होऊन देवासाठी यज्ञयाग करीत असत. ब्राह्मण तप, तीर्थयात्रा वगैरे पुण्यकर्मे करीत. वैश्य स्वधर्माप्रमाणे आचरण करीत. शूद्र द्विजांची शुश्रुषा तत्परतेने करीत असत.

नृसिंहाने त्या दैत्यपुत्राची पातालमध्ये राज्यावर स्थापना केल्यावर प्रल्हाद तेथे धर्माने राज्य करू लागला. एकदा भृगुपुत्र महातपस्वी च्यवनमुनी नर्मदाकाठी व्याव्हृतीश्‍वरतीर्थांवर स्नान करण्याकरता निघाला व महानदी नर्मदेला अवलोकन करून तो तिच्यात उतरला. पण तो पाण्यात उतरत असताना विषारी अशा एका भयंकर नागाने त्याला वेढले. मुनी भयचकित झाला. नागाने त्या मुनीला पातालात नेले.

च्यवनाने सत्वर देवाधिदेव भगवान विष्णूचे नामस्मरण मनातल्या मनात केले. त्या कमलनयन भगवान विष्णूचे नामस्मरण होताच इकडे तो महासर्प विषरहित झाला. त्यामुळे भुजंगाने त्याला धरून नेत असताही च्यवनाला दुःख व त्रास झाला नाही.

पण तेवढयात तो भयंकर नाग विचार करू लागला, 'न जाणो हा महातपस्वी मुनी आपल्याला कोणता शाप देईल ?' अशाप्रकारे शंकायुक्त होऊन खिन्न झालेल्या सर्पाने च्यवनाला मुक्त केले. सर्व नागकन्या त्या महामुनीला अवलोकन करून मान देत होत्या. पण हा मुनीश्रेष्ठ तसाच महासागरात संचार करीत नाग व दानव यांनी व्यापलेल्या महानगरामध्ये प्राप्त झाला.

असाच एकदा त्या नगरात तो भृगुपुत्र च्यवन संचार करीत असता धर्माचा प्रतिपाल करणारा दैत्यांचा राजा प्रल्हाद याने त्या महातपस्व्याला पाहिले. मुनीच्या समोर जाऊन त्याने मुनींची पूजा केली. तो नम्रपणाने हात जोडून म्हणाला, "हे महामुने, आपण पातालात का बरे आला आहात ? इंद्राने माझे राज्य पाहण्यासाठी अथवा माझ्या राज्याची हेटाळणी करण्यासाठी आपणाला इकडे पाठविले आहे काय ? आपण खरे असेल ते निवेदन करा."

प्रल्हादाचे भाषण ऐकून महामुनी च्यवन म्हणाला, "हे दैत्यराजा, एखाद्या दूताप्रमाणे इंद्राने मला तुजकडे पाठवावे असा माझा आणि इंद्राचा काहीही संबंध नाही. मी स्वतंत्र मनाचा व धर्मकार्य तत्पर असा भृगुपुत्र आहे.

हे दैत्यराजा, इंद्राने मला येथे पाठवले असेल याबद्दल तू मनात शंका आणू नकोस.

हे नृपश्रेष्ठा, मी नित्याप्रमाणे स्नानासाठी नर्मदातीरावर आलो होतो. पण मी नदीत उतरताच एका महाभयंकर भुजंगाने मला घेरले. तेव्हा मी भगवान विष्णूचे स्मरण केले. त्याचक्षणी माझ्या विष्णुस्मरणाचा प्रभाव घडून आला. तो भुजंग सत्वर निर्विष झाला.

तेव्हा घाबरून त्याने मला सोडून दिले. हे राजेंद्रा, मी संचार करीत येथे आलो आणि मला तुझे दर्शन घडले. हे दैत्यराज, तू विष्णूभक्त आहेस तसाच मीसुद्धा त्याच भगवान विष्णूचा भक्त आहे हे तू लक्षात ठेव."

त्या मुनीचे ते भाषण ऐकल्यावर त्या भक्त प्रल्हादाने निरनिराळ्या तीर्थांविषयी मुनींना माहिती विचारली. प्रल्हाद च्यवनमुनीना म्हणाला, "हे मुनीश्रेष्ठा, पृथ्वी, अंतरिक्ष व पाताल या सर्व ठिकाणी कोणकोणती तीर्थक्षेत्रे आहेत हे आपण मला विस्ताराने निवेदन करा."

च्यवनमुनी म्हणाले, "हे भक्तश्रेष्ठा, हे राजा ज्यांची मने निर्मळ आहेत, जे वाणीने, चित्ताने, शरीराने शुद्ध आहेत, त्यांना सर्वच क्षेत्रे तीर्थासारखी आहेत. पण मलिन अंतःकरणाच्या पुरुषांस मात्र गंगा ही कीटक देशापेक्षाही अपवित्र आहे. प्रथम मन शुद्ध करून पापरहित झाल्यावर सर्व तीर्थे आपणाला पवित्र करू शकतात.

गंगातीरी सर्व ठिकाणी विविध नगरे, गोठे, खाणी व लहानमोठी गावे आहेत. हे दैत्यश्रेष्ठा, निषाद, आवर्त, हूण, वंग, खस, म्लेंच्छ ह्यांची सुद्धा निवासस्थाने त्यात आहेत. ब्रह्मतुल्य असे ते पवित्र गंगाजल ते पुरुष नित्य सेवीत असतात. स्वेच्छेने ते लोक त्रिकाल स्नाने करतात. पण ह्या सर्वांपैकी एकाचेही अंतःकरण शुद्ध झालेले नसते.

हे राजेंद्रा, ज्यांचे मन विषयात व्याप्त आहे अशा पुरुषांना तीर्थाच्या फलाचा उपयोग काय ? त्यांना फल कसे प्राप्त होणार ? म्हणून हे राजा, मन हेच सर्वांचे कारण असल्याने इतर दुसरी कारणे त्याबाबतीत नाहीत. म्हणून मनशुद्धीच नित्य सांभाळली पाहिजे.

तीर्थामध्ये वास्तव्य करणारा पुरुषही इतर बाबतीत दुसर्‍यांची वंचना करतो. त्यामुळे तो महापापी होतो. त्या तीर्थक्षेत्रावरच पापाचरण केल्याने ते अक्षय्य व अक्षम्य आहे. कौंडाळ पिकल्यावरसुद्धा जसे ते मधुर लागत नाही तसेच दूषित मनाने युक्त असलेला पुरुष तीर्थक्षेत्री कोटयावधी स्नाने केली तरी शुद्ध होत नाही.

तेव्हा हे राजा, शुभेच्छु पुरुषाने प्रथम मन शुद्ध ठेवावे. कारण मन शुद्ध असल्यासच द्रव्य शुद्ध होते. त्याविना ते शुद्ध राहात नाही. तसेच शुद्धाचरण आवश्यक आहे. आचरणशुद्धी झाल्यासच तीर्थयात्रा फलदायी होतात, नाहीतर सर्व प्रयत्‍न व्यर्थ होत.

तीर्थयात्रेला गेल्यावर हीन वर्णाशी संबंध सोडावा, प्राणीमात्रावर दया दाखवावी. हे राजा, तू ज्या अर्थी ऐकण्यास उत्सुक आहेस त्याअर्थी मी तुला आता ते विस्ताराने कथन करतो.

नैमिष हे उत्तम व प्रथमतीर्थ आहे. चक्रतीर्थ व पुष्करतीर्थ ही दोन तशीच श्रेष्ठ आहेत. हे नृपश्रेष्ठा, भूतलावर एवढी तीर्थे आहेत की त्यांची गणनाच करता येणे अशक्य. कारण तेथे पुष्कळच तीर्थक्षेत्रे आहेत."

च्यवनमुनींचे हे भाषण ऐकल्यावर दैत्यराज प्रल्हादाचे अंतःकरण आनंदाने उचंबळून आले. तो स्वतःच त्या नैमिष तीर्थावर जाण्याची इच्छा करू लागला. त्याने दैत्यांना तसे निवेदन केले. प्रल्हाद म्हणाला, "हे महाभाग्यवान दानवांनो, उठा. आज आपण निमिष तीर्थाला जाऊन त्या ठिकाणी असलेल्या कमलनयन व पीतवस्त्रधारी अच्युताचे दर्शन घेऊ."

विष्णूभक्त प्रल्हादाचे भाषण ऐकून सर्व दानव अत्यंत हर्षभरीत होऊन त्याचेबरोबर जाण्यासाठी पातललोकातून बाहेर पडले. ते सर्वजण एकत्र होऊन नैमिषारण्यात गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी अतिशय आनंदाने स्नानादि कर्मे केली.

अशा रीतीने सर्व महाबलाढय दैत्यांना बरोबर घेऊन प्रल्हाद तीर्थयात्रा करीत होता. तेव्हा महापुण्य फल देणारी व निर्मल जल असलेली ती श्रेष्ठ सरस्वती नदी त्याने अवलोकन केली. त्या सारस्वत जलरूपी तीर्थावर स्नान केल्यामुळे प्रल्हादाचे मन अतिशय प्रसन्न झाले. तेथे राहून स्नानादि इतर पुण्यकर्मेही त्याने केली. त्याने यथाविधी कार्ये केली.अध्याय आठवा समाप्त

GO TOP