राजाचे भाषण ऐकून व्यास म्हणाले, "हे राजा, गुह्य, अदभूत, पवित्र, कल्याणकारक आणि अनेक आख्यानांनी युक्त असे भागवत पुराण मी तुला कथन करतो. तू ऐक. हे मी पूर्वी माझा पुत्र शुक याला पढविले. ते परम रहस्य, मी तुला सांगतो सर्व वेदांचे सार काढून तयार केलेले हे भागवत, सुखावह व शुभफल देणारे आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ त्यामुळे साध्य होतात.
जनमेजय म्हणाला," हे प्रभो, अस्तिक कोणाचा पुत्र ? यज्ञात विघ्न आणायला कसा आला ? हे आपण विस्ताराने सांगा व सर्व पुराणेही सविस्तर कथन करा."
व्यास सांगू लागले, "नित्य शांतचित्त असलेला जगतकारु मुनी अविवाहितच राहिला असता. पण एकदा वनात एका खड्ड्यात लोंबत असलेले त्यांचे पूर्वज त्याला म्हणाले," हे पुत्रा, तू विवाह केला नाहीस तर वंश वाढणार नाही. त्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळणार नाही. यास्तव तू विवाह कर."
माझ्याच नावाची कन्या, याचना न करता मला मिळाली तरच मी विवाह करीन." असे म्हणून जरतकारु तीर्थयात्रा करु लागला. इकडे त्याचवेळी मातेने भुजंगांना ‘तुम्ही अग्नीत पडाल’ असा शाप दिला तो इतिहास असा.
कश्यप मुनीला कदू व विनता नावाच्या भार्या होत्या. एक दिवस सूर्याच्या रथाचा अश्व पाहू कद्रू विनतेला म्हणाली,"हा अश्व कोणत्या रंगाचा आहे ते सांग.
विनता म्हणाली "हा अश्व श्वेतवर्णी आहे. तुझे काय मत आहे? यावर आपण पण लावू."
कद्रू म्हणाली, "हे सुहास्यवदने, हा अश्व कृष्णवर्णाचा आहे. ज्याचे म्हणणे खोटे होईल त्याने दासी व्हावे. असा पण लावू."
इतके सांगून कद्रू आपल्या सर्परुपी पुत्रांना म्हणाली, "हे पुत्रांनो, त्या अश्वाच्या शरीरावरील सर्व केस तुम्ही कृष्णवर्णाचे करा." तिच्या या म्हणण्याला ज्यांनी नकार दिला, त्यांना मातेने शाप दिला,"तुम्ही जनमेजयाच्या सर्पयज्ञात अग्नीत पडाल." तेव्हा इतर सर्व अनेकवर्णी पुत्रांनी अश्वाचे पुच्छ वेढून टाकले व त्याचा वर्ण काळा केला. नंतर दोघी बहिणी पुन: अश्व पाहण्यास गेल्या, पण अश्वाचा वर्ण बराचसा कृष्ण असल्याचे पाहताच विनितेला दु:ख झाले. तेव्हा भुजंग भक्षण करणारा गरुड तेथे आला व तिची दयनीय अवस्था पाहून म्हणाला, "हे माते, तू का रोदन करीत आहेस? मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना, ज्याअर्थी माते तुला दु:ख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो. मातेला दु:ख असेल तर आमच्या जन्माचा काय उपयोग? म्हणून तू चिंतेचे कारण सत्वर सांग. मी तुझी काळजी दूर करतो."
विनता म्हणाली, "मी पराजित झाल्याने सक्तीची दासी झाले आहे. त्यामुळे मला दु:ख होत आहे. ती मला म्हणती आहे, "मला घेऊन जा." गरुड म्हणाला, "तर मग तिला जिकडे जाण्याची इच्छा असेल, तिकडे मी घेऊन जाईन. तू शोक करु नकोस." असे सांगताच विनिता कद्रूकडे गेली. गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे तिच्या सर्व पुत्रांसह उड्डाण करुन समुद्रापलीकडे नेले व तो कद्रूला म्हणाला, "हे माते, तुला नमस्कार असो. माझी माता दास्यमुक्त कशी होईल ते सत्वर सांग." कद्रू म्हणाली, "हे पुत्रा, तू देवलोकातून अमृत आणून माझ्या पुत्रांना दे म्हणजे आजच तुझी माता दास्यमुक्त होईल.
कद्रूचे बोलणे ऐकून महाप्रतापी गरुड इंद्रलोकी गेला व युद्ध करुन तेथून अमृतकुंभ घेऊन आला. आपल्या सावत्र आईला ते अर्पण केले व विनता मातेला दास्यमुक्त केले. इकडे सर्व सर्प स्नानाला गेले असता इंद्राने ते हरण केले. पण गरुडाच्या सामर्थ्यामुळे विनता दास्यातून मुक्त झाली. अमृत कुंभातील दर्भावर सांडलेले काही थेंब सर्पानी चाटले. त्यामुळे त्यांच्या जिव्हा फाटून ते द्विजिव्ह झाले. इकडे वासुकी प्रभृति नागांना मातेने शाप दिल्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले, "जरत्कारु नावाच्या ऋषीला त्याच नावाची असलेली वासुकीची बहिण अर्पण करा. तिच्या पोटी अस्तिक मुनी जन्माला येईल व तुमचे संरक्षण करील."
हे ऐकून सर्व नाग स्वस्थानी गेले. वासुकीने आपली बहिण जरत्कारुला दिली. पण दोघांचीही एकच नावे असल्याने मुनी म्हणाला,"जेव्हा हिच्या हातून मला अप्रिय असलेले कृत्य घडेल तेव्हा मी हिचा त्याग करीन." असे स्पष्ट सांगितल्यावर, दोघांचा विवाह झाला. वासुकी निघून गेला. तो नंतर एका विशाल वनात जरत्कारुने आपली पर्णकुटी बांधली आणि पत्नीसह तो क्रीडा करीत सुखाने राहू लागला. एकदा मुनीश्रेष्ठ आपल्या पत्नीस म्हणाला, "कुठल्याही परिस्थितीत मला तू जागृत करु नकोस." असे सांगून तो निद्राधीन झाला.
त्याच वेळी संध्यासमय झाला. जरत्कारुने विचार केला, "आता यांना उठवावे तर ते आपला त्याग करणार, न उठवावे तर धर्मकृत्ये केल्याविना संध्याकाळ व्यर्थ जाणार ! पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय, पण मरणही चालेल. कारण धर्महानिमुळे नरक प्राप्त होणार. असा त्या साध्वीने विचार करुन ती म्हणाली, "हे सुव्रत उठा, संध्याकाळ झाली." त्याबरोबर मुनी क्रोधायमान होऊन उठला व त्वेषाने म्हणाला, "तू माझ्या निद्रेचा भंग केलास. मी निघून जातो. तू भावाच्या घरी जा." ती म्हणाली की, "महाराज ज्या शुभकार्यासाठी भावाने मला आपणास अर्पण केली ते कार्य कसे होणार ? तेव्हा मुनीश्वर विचारपूर्वक म्हणाला, "ते कार्य घडले आहे."
तो तिचा त्याग करुन निघून गेला. ती वासुकीच्या घरी परत गेली. कार्याविषयी भावाने विचारले, तेव्हा मुनीने, "आहे" म्हणून सांगितले आहे, असे तिने उत्तर दिले. तेव्हा मुनी सत्यवचनी आहे म्हणून वासुकीने विश्वास ठेवून भगिनीला आधार दिला.
पुढे योग्य समय प्राप्त होताच तिच्यापोटी एक सुंदर मुनिपुत्र जन्माला आला. तोच प्रसिद्ध अस्तिक होय.
"जनमेजया, त्या जितेंद्रिय मुनीनेच मातृवंशाच्या रक्षणासाठी तुझा यज्ञ थांबविला आहे. त्या यथावार कुलातील मुनीला तू मान दिलास, हे फार उत्तम झाले. मूनींचे पूजन केलेस, पण तरीही तुझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती झाली व तुझ्या हातून सर्व कुल पवित्र झाले नाही. म्हणून भूपेंद्रा, श्रद्धापूर्वक देवीचे मोठे मंदिर बांध म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. सदासर्वदा त्या कल्याणीचे स्तवन केले की कुलवृद्धी होईल. राज्यही स्थिर होईल. म्हणून तू विधीपूर्वक देवीयज्ञ कर. तू श्रीमदभागवत नावाचे सर्वोत्तम पुराण श्रवण कर. ते अत्यंत पवित्र, भवसागर तरुन नेणारे, सर्व रस युक्त, अशा कथा मी तुला सांगतो.
ह्या कथेपेक्षा दुसरे श्रवणास योग्य असे काही नाही. देवीशिवाय काहीही श्रेष्ठ नाही. ज्याच्या चित्तात सदा देवीचे वास्तव्य असते तेच खरे भाग्यवान, ज्ञानी व धन्य होत. जे महामाया अंबिकेचे पूजन करीत नाहीत, ते सदा दु:खी असतात. भगवती देवीने विष्णूला कथन केलेले भागवत जो श्रवण करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. म्हणून त्याच्या श्रवणाने तुझ्या पूर्वजांना चिरंतन स्वर्गप्राप्ती होईल.