॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक बारावा : विवेकवैराग्य

समास पहिला : विमळ लक्षण

॥ श्रीराम ॥

आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।
येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥
माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार करावा. विवेकी जन हो ! येथे आळस करू नका. (१)

प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।
प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥
प्रपंचाकडे दुर्लक्ष करून जर तुम्ही परमार्थ साधण्याचा प्रयत्न कराल, तर तुम्ही कष्टी व्हाल. जर तुम्ही प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सावधपणे व्यवस्थित कराल, तरच तुम्हांला विवेकी म्हणता येईल. (२)

प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।
मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥
प्रपंचाकडे दुर्लक्ष करून परमार्थ करू लागल्यास खायला अन्न मिळत नाही. अशा भाग्यहीन माणसाला परमार्थ कसा साधेल ? (३)

परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी ।
अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥
बरे, परमार्थ अजिबात सोडून देऊन केवळ तुम्ही प्रपंचच कराल, तर तुम्हांला पुढे यमयातना भोगाव्या लागतील आणि यमयातना भोगता भोगता अत्यंत कष्ट होतील. (४)

साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवडोन बैसला ।
तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥
एखादा नोकर मालकाकडे कामाला गेलाच नाही आणि खुशाल आळसाने घरीच बसून राहिला, तर त्याचा मालक त्याला कुटून काढील आणि लोक ती गंमत पाहात राहतील. (५)

तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें ।
दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥
तेव्हा मग अशा माणसाचे महत्त्वच राहाणार नाही. त्या दुर्जन माणसाचे हसे होईल आणि त्याला उदंड दुःख भोगावे लागेल. (६)

तैसेचि होणार अंतीं । म्हणोन भजावें भगवंतीं ।
परमार्थाची प्रचिती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥
जर परमार्थ केलाच नाही, तर आपली पण शेवटी तशीच स्थिती होईल, म्हणून आपला मालक जो भगवंत त्याला भजावे आणि परमार्थाची प्रत्यक्ष प्रचीती घ्यावी. (७)

संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त ।
अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥
साधकाच्या विवेक-वैराग्यादिकांची कसोटी प्रत्यक्ष संसारातील व्यवहारात होत असते. व्यवहारातही ज्याची धारणा ढळत नाही तोच साधक योग्य असतो. नेहमी योग्य काय, अयोग्य काय, याचा विचार करूनच वागत असतो. (८)

प्रपंची तो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थीं खोटा ॥ ९ ॥
जो प्रपंचात अत्यंत दक्ष असतो, तोच परमार्थही नीट करू शकतो. ज्याला प्रपंच सावधपणे करणे जमत नाही, त्याला परमार्थही जमू शकत नाही. (९)

म्हणौन सावधपणें । प्रपंच परमार्थ चालवणें ।
ऐसें न करिता भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥
म्हणून अत्यंत सावधपणाने प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करावेत. असे केले नाही, तर पुढे अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. (१०)

पर्णाळि पाहोन उचले । जीवसृष्टि विवेकें चाले ।
आणि पुरुष होऊन भ्रमले । यासी काय म्हणावें ॥ ११ ॥
पानावरचा किडा अगोदर पुढचे पाय दुसऱ्या पानावर रोवल्यावरच मग पाठीमागील पानाचा आधार सोडतो. मनुष्याखेरीज इतर जीवसृष्टीसुद्धा विवेकाने वागते आणि ज्याला बुद्धीची विशेष देणगी आहे, असा पुरुष अविवेकाने भ्रमिष्टासारखा वागतो, याला काय म्हणावे ? (११)

म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा ।
पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥
म्हणून विवेकी माणसाच्या ठिकाणी दूरदृष्टी असावी आणि त्याने निरंतर परिस्थितीचा अंदाज घेत असावे आणि विचाराने पुढे काय होणार आहे, याचा अचूक अंदाज करून परिस्थिती जाणून घ्यावी. (१२)

सुखी असतो खबर्दार । दुःखी होतो बेखबर ।
ऐसा हा लोकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥
जे याप्रकारे दक्ष असतात, ते सुखी होतात. जे बेसावध असतात, ते दुःखी होतात. असे लौकिक व्यवहारातही विचाराने प्रत्यक्ष दिसून येते. (१३)

म्हणौन सर्वसावधान । धन्य तयाचें महिमान ।
जनीं राखे समाधान । तोचि येक ॥ १४ ॥
म्हणून जो सदासर्वकाळ सर्व बाबतीत सावध असतो, त्याचा महिमा किती म्हणून वर्णन करावा ? तोच खरोखर धन्य होय. सर्व लोकांचे समाधान तोच एकटा करू शकतो. (१४)

चाळणेचा आळस केला । तरी अवचिता पडेल घाला ।
ते वेळे सावरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥
परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्यात जर आळस केला, तर मग अवचित संकट उपस्थित होईल आणि मग सावरायलासुद्धा वेळ मिळणार नाही. (१५)

म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक ।
लोकांकरिता लोक । शाहाणे होती ॥ १६ ॥
म्हणून विवेकसंपन्न दूरदृष्टी असणारे लोक कसे विचारपूर्वक वागतात, हे जाणून घ्यावे. एकाच्या उदाहरणाने दुसरा शहाणा होतो, ही लोकांची रीतच आहे. (१६)

परी ते शाहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे ।
अवगुण देखोन सांडावे । जनामधें ॥ १७ ॥
म्हणून आपल्या भोवताली जे लोक असतात, त्यांत शहाणे कोण आहेत हे ओळखावे. जे गुणवान आहेत, त्यांचे गुण आपण घ्यावे. लोकांमधील अवगुण जे असतील, ते पाहून त्या अवगुणांचा त्याग करावा. (१७)

मनुष्य पारखूं राहेना । आणि कोणाचें मन तोडीना ।
मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥
विवेकी असतो, तो प्रत्येकाची मनोमन परीक्षा करीतच असतो, पण तो कोणाचे मन मात्र दुखवत नाही. पण मनुष्यमात्रासंबंधी तो अचूक अनुमान मात्र करतो.(१८)

दिसे सकळांस सारिखा । पाहातां विवेकी नेटका ।
कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥
बाहेरून वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो, पण अंतर्यामी तो अत्यंत विवेकी असतो. तो कोण काम करणारा आहे आणि कोण निकामी आहे हे बरोबर जाणतो. (१९)

जाणोन पाहिजेत सर्व । हेंचि तयाचें अपूर्व ।
ज्याचे त्यापरी गौरव । राखों जाणे ॥ २० ॥
आणि हे सर्व जाणूनही तो सर्व तर्‍हेच्या लोकांशी यथायोग्य व्यवहार ठेवू शकतो, हे त्याचे वैशिष्ट्य होय. ज्याची जशी योग्यता असेल, त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीचा योग्य तो गौरव करण्याचे चातुर्य त्याच्या ठिकाणी असते. (२०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विमळलक्षणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'विमळलक्षणनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : प्रत्ययनिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका संसारासी आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो ।
सुचितपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥
या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया, पुरुष, निःस्पृह यांनी मी काय सांगतो ते ऐका आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करा. (१)

काये म्हणते वासना । काये कल्पिते कल्पना ।
अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥
आपली वासना काय म्हणते, आपली कल्पना काय काय मनोरथ करते, अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठत असतात, याचा विचार करा. (२)

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
मनासारिखें असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥
आपल्याला वाटते की, बरे खावे, बरे जेवावे, बरे कपडे घालावेत, बरे नेसावे. सर्व काही अगदी आपल्या मनासारखे असावे. (३)

ऐसें आहे मनोगत । तरी तें कांहींच न होत ।
बरें करितां अकस्मात । वाईट होतें ॥ ४ ॥
याप्रमाणे आपले मनोगत असते, पण तसे काहीच घडत नाही. आपण काही चांगले करायला जावे, तर अकस्मात वाईटच घडून येते. (४)

येक सुखी येक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकीं ।
कष्टी होऊनियां सेखीं । प्रारब्धावरी घालिती ॥ ५ ॥
संसारात एक सुखी तर एक दुःखी असे प्रत्यक्ष घडताना दिसून येते. त्यामुळे लोक कष्टी होतात आणि अखेर सर्व दोष प्रारब्धावर ठेवतात. (५)

अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ॥ ६ ॥
खरे तर अचूक प्रयत्न केला जात नाही, म्हणूनच काही लोक यशस्वी होत नाहीत. पण लोकांना आपला अवगुण काही केल्या कळूनच येत नाही. (६)

जो आपला आपण नेणे । तो दुसयाचें काये जाणे ।
न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक ॥ ७ ॥
जो आपल्या स्वतःला जाणत नाही, तो दुसऱ्याला काय जाणणार ? न्याय्य मार्गाने जाणे सोडल्यामुळे लोक दैन्यवाणे जिणे जगत आहेत. (७)

लोकांचे मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्तवेना ।
मूर्खपणें लोकीं नाना । कळह उठती ॥ ८ ॥
लोकांना परस्परांचे मनोगत कळत नाही, त्यामुळे एकमेकाच्या मनासारखे वागता येत नाही. त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्यामध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात. (८)

मग ते कळो वाढती । परस्परें कष्टी होती ।
प्रेत्न राहातां अंतीं । श्रमचि होयें ॥ ९ ॥
मग ते कलह वाढू लागतात आणि सर्वच लोक याप्रकारे परस्परांमुळे कष्टी होतात. कुणी योग्य दिशेने प्रयत्नच करीत नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात. (९)

ऐसी नव्हे वर्तणुक । परिक्षावे नाना लोक ।
समजलें पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥
अशी वर्तणूक असू नये. अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी. कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतले पाहिजे. (१०)

शब्द परीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं येक कळे दक्षा ।
मनोगत नतद्रक्षा । काय कळे ॥ ११ ॥
जो दक्ष असतो, त्याला लोकांच्या बोलण्यावरून, त्यांच्या अंतरंगाची पारख होते. जे नतद्रष्ट असतात त्यांना दुसर्‍याचे मनोगत कसे काय कळणार ? (११)

दुसयास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें ।
पाहों जातां लोकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं ॥ १२ ॥
दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणणे बरोबर असा दुराग्रह धरायचा, अशीच या जगात बहुतेकांची प्रवृत्ती आढळून येते. (१२)

लोकीं बरें म्हणायाकारणें । भल्यास लागतें सोसणें ।
न सोसितां भंडवाणें । सहजचि होये ॥ १३ ॥
ज्याला लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटत असेल त्याने लोकांचे बोलणे, वागणे सहन करायला हवे. ते जर सोसले नाही, तर सहजच फजिती होते. (१३)

आपणास जें मानेना । तेथें कदापि राहावेना ।
उरी तोडून जावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥
जेथे आपल्याला बरे वाटत नाही, तेथे कधीही राहू नये. पण कोणीही भीड मोडून किंवा भांडण करून जाऊ नये. (१४)

बोलतो खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें ।
न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥
जो कोणी नेहमी खरे बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान-थोर मानतात. न्याय-अन्याय कुणालाही सहजच कळतो. (१५)

लोकांस कळेना तंवरी । विवेकें क्ष्मा जो न करी ।
तेणेंकरितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥
लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही, तोपर्यंत थोर लोकांनी लोकांना विवेकाने क्षमाच केली पाहिजे. तसे जर तो न करील तर मग इतरांची आणि त्याची बरोबरीच होईल, (१६)

जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना ।
चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥ १७ ॥
जोपर्यंत चंदन झिजत नाही, तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही आणि म्हणून चंदन आणि इतर नाना वृक्ष लोकांना सारखेच वाटतात. (१७)

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥ १८ ॥
जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले उत्तम गुण प्रगट होत नाहीत, तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळत नाही. ज्यावेळी प्रसंगपरत्वे उत्तम गुण प्रगट होतात, तेव्हा जगातील लोकांच्या अंतःकरणास समाधान वाटते. (१८)

जगदांतर निवळत गेलें । जगदांतरी सख्य जालें ।
मग जाणावें वोळले । विश्वजन ॥ १९ ॥
लोकांच्या अंतःकरणास समाधान झाले, लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले आहेत, हे जाणावे. (१९)

जनींजनार्दन वोळला । तरी काये उणें तयाला ।
राजी राखावें सकळांला । कठीण आहे ॥ २० ॥
ज्याच्यावर जनीजनार्दन म्हणजे भगवत्स्वरूप जनता प्रसन्न होते, त्याला काय उणे पडणार आहे ? पण सर्वांना प्रसन्न करणे सोपे नाही. (२०)

पेरिलें तें उगवतें । उसिणें द्यावें घ्यावें लागतें ।
वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥
जसे जे आपण पेरतो तेच उगवून येते. लोकांशी व्यवहार करताना उसने द्यावे-घ्यावे लागते. पण म्हणून आपण जर कोणाचे वर्म काढले, तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते. (२१)

लोकीकीं बरेपण केलें । तेणें सौख्य वाढलें ।
उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥ २२ ॥
लोकांशी आपण चांगले वागलो तर आपले सुख वाढते. आपण जसे उत्तर द्यावे, त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर मिळते. (२२)

हें आवघें आपणांपासीं । येथें बोल नाहीं जनासी ।
सिकवावें आपल्या मनासी । क्षणक्षणा ॥ २३ ॥
म्हणून त्याचा उपाय आपल्याच हातात असतो. लोकांना उगीच दोष देणे योग्य नाही, म्हणून आपणच आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे. (२३)

खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला ।
तरी मोनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥
समजा, एखाद्या अत्यंत दुर्जनाशी गाठ पडली आणि क्षमा करणे अगदी अशक्य झाले, तर गुपचूप न बोलता साधकाने ते स्थळ सोडून निघून जावे. (२४)

लोक नाना परीक्षा जाणती । अंतरपरीक्षा नेणती ।
तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥
लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे जाणतात, पण त्यांना दुसऱ्याच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही. म्हणूनच माणसे भाग्यहीन ठरतात, यात शंका नाही. (२५)

आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।
कठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥
आपण आज ना उद्या मरणार आहोतच हे जाणून सर्वांशी भलेपणाने वागावे. या प्रकारचा विवेक करणे कठीण आहे, हे मात्र खरे. (२६)

थोर लाहान समान । आपले पारिखे सकळ जन ।
चढतें वाढतें सनेधान । करितां बरें ॥ २७ ॥
आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी, मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्क असतील त्यांच्याशी, तसेच आपले व परके अशा सर्वच लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हे बरे. (२७)

बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास येतें ।
आतां पुढें सांगावें तें । कोणास काये ॥ २८ ॥
आपण लोकांचे बरे केले की त्यायोगे आपलेही बरेच होते, ही तर अनुभवाची गोष्ट आहे. आता यापुढे आणखी कोणाला काय सांगावे बरे ? (२८)

हरिकथानिरूपण । बरेपणें राजकारण ।
प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥
नित्य हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करीत असावे. प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारणही करावे. प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही, तर सर्वच व्यर्थ ठरते. (२९)

विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला ।
तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥
एखाद्याने खूप विद्या संपादन केली, पण योग्य वेळी त्याला विद्येचा उपयोग करता आला नाही, तर ती विद्या व्यर्थ होय. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रत्ययनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'प्रत्ययनिरूपणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : भक्तनिरूपण

॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक ।
इहलोक आणि परलोक । बरा पाहावा॥ १ ॥
या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत. त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल, हे पाहावे. (१)

इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें ।
परलोक साधायाकारणें । सद्गुसरु पाहिजे ॥ २ ॥
इहलोकी सुख मिळावे म्हणून व्यवहारकुशल जाणत्या माणसाची संगती धरावी. तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे. (२)

सद्गु रुसी पाय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें ।
अनन्यभावें येकभावें । दोनी गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥
सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे, हेही कळत नाही. अनन्यभावाने, एकनिष्ठपणे त्यांना पुढील दोन गोष्टी विचाराव्यात. (३)

दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण ।
या गोष्टींचे विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥
त्या दोन गोष्टी कुठल्या म्हणाल, तर एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत, ह्या होत. याचे सद्गुरू जे उत्तर देतील, त्याचे विवरण वारंवार करावे. (४)

आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण ।
पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥
आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे आणि नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे. त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण, मनन, निदिध्यासन पुन्हापुन्हा करीतच असावे.(५)

सकळ केलियाचें फळ । शाश्वत वोळखावें निश्चळ ।
आपण कोण का केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥
हे सर्व केले असता शाश्वत, निश्चल अशा परब्रह्माची ओळख होते. आपले खरे स्वरूप काय आहे, याचाही शोध घ्यावा. (६)

सारासार विचार घेतां । पदास नाहीं शाश्वतता ।
आधी कारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥
सारासारविचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात, हे जाणून घ्यावे. आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे. (७)

निश्चळ चंचळ आणि जड । अवघा मायेचा पवाड ।
यामधें वस्तु जाड । जाणार नाहीं ॥ ८ ॥
निश्चल, चंचळ आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार आहे. म्हणून हे सर्व नाशिवंत होय. मायातीत असे जे परब्रह्म ते मात्र असे नाशिवंत नाही. (८)

तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें ।
माईक विचार खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥
परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासारविचाराने जे मायिक त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. (९)

खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें ।
मायेचें अवघेचि जाणावें । रूप माईक ॥ १० ॥
परीक्षावंताने खर्‍या-खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे. मायेचे सर्व रूपच मायिक आहे, हे जाणून घ्यावे. (१०)

पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया ।
पिंडब्रह्मांड अष्टकाया । नसिवंत ॥ ११ ॥
जे जे सर्व पांचभौतिक आहे, ते सर्व माया असून जे जे मायिक आहे ते सर्व अंती नाश पावते, म्हणून पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून जे आठ देह आहेत, ते सर्व नाशिवंत आहेत, हे जाणून घ्यावे. (११)

दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल ।
रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥
जे जे दिसते, ते ते नाश पावणार. जे जे उपजते ते ते मरणार. जे जे रचले जाते ते ते खचणार. असे हे मायेचे रूप आहे. (१२)

वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुलें जाईल ।
भूतांस भूत खाईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥
ज्याची ज्याची वाढ होईल, ते ते क्षय पावणार. जे जे येईल ते ते जाईल. कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांचा एकेका भूतांत अनुक्रमे लय होणार. (१३)

देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचिती ।
मनुष्येंविण उत्पत्ति । रेत कैंचें ॥ १४ ॥
जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात, ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. माणसावाचून माणूस कसा उत्पन्न होणार ? वीर्य कसे उत्पन्न होणार ? (१४)

अन्न नस्तां रेत कैंचें । वोषधी नस्तां अन्न कैंचें ।
वोषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नस्तां ॥ १५ ॥
अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार ? झाडे असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार ? आणि पृथ्वी नसेल तर वनस्पती, झाडे, झुडुपे कशी जगतील ? (१५)

आप नस्तां पृथ्वी नाहीं । तेज नस्तां आप नाहीं ।
वायो नस्तां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥
आप नसेल तर पृथ्वी नसेल. तेज नसेल तर आपही नसेल. वायू नसेल तर तेजही नसेल. असे हे सर्व जाणून घ्यावे. (१६)

अंतरात्मा नस्तां वायो कैंचा । विकार नस्तां अंतरात्मा कैंचा ।
निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥
अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल ? विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल ? आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल ? या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पाहावा. (१७)

पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायो नाहीं ।
अंतरात्मा विकार नाहीं । निर्विकारीं ॥ १८ ॥
निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, विकारी अंतरात्माही नाही. (१८)

निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।
अष्टधा प्रकृति संपूर्ण । नासिवंत ॥ १९ ॥
निर्विकार, निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टधा प्रकृती ही नाशिवंत आहे. (१९)

नासिवंत समजोन पाहिलें । तों तें अस्तांचि नस्तें जालें ।
सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥
नाशिवंत जे जे आहे, ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते. आणि सारासारविवेकाने त्याचे सत्य स्वरूप कळले की, समाधान प्राप्त होते. (२०)

विवेकें पाहिला विचार । मनास आलें सारासार ।
येणेंकरितां विचार । सदृढ जाला ॥ २१ ॥
आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासारविवेक जागृत होतो आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सुदृढ होऊ लागतो. (२१)

शाश्वत देव तो निर्गुण । ऐसीं अंतरीं बाणली खूण ।
देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ ॥
मग शाश्वत देव हा निर्गुण आहे, ही खूण अनुभवाने अंतरात बाणते. याप्रमाणे देव कोण हे कळले तरी 'मी कोण' हे कळायलाच हवे. (२२)

मी कोण पाहिजे कळलें । देहतत्व तितुकें शोधिलें ।
मनोवृत्तीचा ठाईं आलें । मीतूंपण ॥ २३ ॥
मी कोण हे कळायला हवे, म्हणून प्रथम देहाचा तत्त्वाने निरास केला. तेव्हा मग 'मी तू पणा' हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे, असे वाटले. (२३)

सकळ देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहातां ।
मीतूंपण हें तत्वता । तत्वीं मावळलें ॥ २४ ॥
याप्रमाणे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण इत्यादी सर्व देहांचा विचाराने निरास झाला की, 'मी' म्हणून कोणी शिल्लकच राहात नाही. तत्त्वात तत्त्वाचा निरास केला की, त्या तत्त्वांमध्ये मीतूपणही नष्ट होते. (२४)

दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वें तत्व तेव्हां सरे ।
मीतूंपण हें कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥
जेव्हा एका तत्त्वाचा दुसऱ्यात लय होतो, तेव्हा सर्व दृश्य पदार्थच मायिक आहेत हे कळून येते. मग 'मी-तू पणा' तरी कसा उरणार ? फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. (२५)

पंचीकर्ण तत्वविवर्ण । माहावाक्यें वस्तु आपण ।
निसंगपणें निवेदन । केले पाहिजे ॥ २६ ॥
म्हणून पंचीकरण, तत्त्वविवरण करून महावाक्यांच्या साह्याने मीपणाविरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे. (२६)

देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।
उपाधिवेगला केवळ । निरोपाधी आत्मा ॥ २७ ॥
याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निरास होऊन उपाधिवेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहातो. (२७)

मीपण तें बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें ।
निवृत्तिपदास प्राप्त जालें । उन्मनीपद ॥ २८ ॥
मीपण नाहीसे होते. विवेकाने वेगळेपणा, द्वैतही जाते आणि मायेच्या वेढ्यातून निवृत्त झालेले मन उन्मन बनते व नंतर तो साधक परब्रह्मस्वरूपी ऐक्य पावतो. (२८)

विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येये राहिलें ध्यान ।
सकळ कांहीं कार्याकारण । पाहोन सांडिलें ॥ २९ ॥
स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येयरूपच झाल्याने ध्यानही उरत नाही. आब्रह्मस्तंबापर्यंत सर्व काही कार्यकारणसापेक्ष आहे, असे समजून त्या सर्वांचा त्याग केला. (२९)

जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें ।
येमयातनेचें जालें । निसंतान ॥ ३० ॥
जन्ममरणाचे फेरे चुकले, सर्व पाप नष्ट झाले आणि यमयातनेची भीतीही नष्ट झाली. (३०)

निर्बंद अवघाचि तुटला । विचारें मोक्ष प्राप्त जाला ।
जन्म सार्थकचि वाटला । सकळ कांहीं ॥ ३१ ॥
बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्षप्राप्ती झाली आणि मनुष्यजन्माचे सार्थक झाले असे वाटले. (३१)

नाना किंत निवारले । धोके अवघेचि तुटले ।
ज्ञानविवेकें पावन जालें । बहुत लोक ॥ ३२ ॥
नाना प्रकारचे शंकासंशय नाहीसे झाले. कुठलीही भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. (३२)

पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास ।
ऐसी हे प्रचित मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥
पतितपावन अशा रामाचे दास असतात, ते सर्व जगाला पावन करतात, अशी प्रचीती अनेकांच्या मनाला आलेली आहे. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भक्तनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'भक्तिनिरूपणनाम' समास तिसरा समाप्त.

GO TOP

समास चौथा : विवेकवैराग्यनिरूपण

॥ श्रीराम ॥

महद्‌भाग्ये हातासी आलें । परी भोगूं नाहीं जाणितलें ।
तैसें वैराग्य उत्पन्न जालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥
एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा, हे जर त्याला कळत नसेल, तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते. त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झाले, पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल, तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही. (१)

आदळतें आफळतें । कष्टी होतें दुःखी होतें ।
ऐकतें देखते येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥
या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगांस तोंड द्यावे लागते, त्यामुळे तो आदळ आपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो. अशा रीतीने ऐकून, पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते. (२)

नाना प्रपंचाच्या वोढी ॥ नाना संकटें सांकडीं ।
संसार सांडुनी देशधडी । होये तेणें ॥ ३ ॥
संसारात ओढाताण होते, नाना संकटे, अडचणी उपस्थित होतात. त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. (३)

तो चिंतेपासून सुटला । पराधेनतेपासुनि पळाला ।
दुःखत्यागें मोकळा जाला । रोगी जैसा ॥ ४ ॥
त्यामुळे रोगी जसा रोग बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूसही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखांतून मुक्त होतो. (४)

परी तो होऊं नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट ।
सीमाच नाहीं सैराट । गुरूं जैंसें ॥ ५ ॥
पण त्याने मोकाट, उनाड, अनाचारी, उन्मत्त, एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. (५)

विवेकेंविण वैराग्ये केलें । तरी अविवेकें अनर्थीं घातलें ।
अवघें वेर्थचि गेलें । दोहिंकडे ॥ ६ ॥
विवेक नसता वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला, तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. (६)

ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि जालें वेर्थ ।
अविवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥
धड ना प्रपंच, ना परमार्थ, असे होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते. अविवेकामुळे असा अनर्थ ओढवतो. (७)

का।म् वेर्थचि ज्ञान बडबडिला । परी वैराग्ययोग नाहीं घडला ।
जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥ ८ ॥
एखादा असा शब्दज्ञानी असतो की, तोंडाने ज्ञान बडबडत असतो, पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बढाया माराव्यात, तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते. (८)

वैराग्येंविण ज्ञान । तो वेर्थचि साभिमान ।
लोभदंभें घोळसून । कासाविस केला ॥ ९ ॥
वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कासावीस होते. (९)

स्वान बांधलें तरी भुंके । तैसा स्वार्थमुळें थिंकें
पराधीक देखों न सके । साभिमानें ॥ १० ॥
कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकत राहाते, तसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चरफडत राहातो. अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. (१०)

हें येकेंविण येक । तेणें उगाच वाढे शोक ।
आतां वैराग्य आणि विवेक । योग ऐका ॥ ११ ॥
याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होते, ते ऐका. (११)

विवेकें अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला ।
अंतर्बाह्य मोकळा जाला । निःसंग योगी ॥ १२ ॥
विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो, तो योगी निःसंग परब्रह्माशी एकरूप होतो. (१२)

जैसें मुखें ज्ञान बोले । तैसीच सवें क्रिया चाले ।
दीक्षा देखोनी चक्कित जाले । सुचिस्मंत ॥ १३ ॥
तो मुखाने जसे ज्ञान सांगतो, त्याला अनुसरूनच त्याचे वागणे असते. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात. (१३)

आस्था नाहीं त्रिलोक्याची । स्थिती बाणली वैराग्याची ।
येत्नविवेकधारणेची । सीमा नाहीं ॥ १४ ॥
वैराग्य सुदृढपणे बाणलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह, आस्था नसते. पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेकधारणेस सीमाच नसते. (१४)

संगीत रसाळ हरिकीर्तन । तालबद्ध तानमान ।
प्रेमळ आवडीचें भजन । अंतरापासुनी ॥ १५ ॥
तो तालबद्ध, ताना इत्यादी संगीताचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो आणि त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते. (१५)

तत्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे ।
वगत्रृत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥
त्याचे हे हरिकीर्तन, प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गास लागतात, त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो. त्याचे वक्तृत्व असे असते की, त्यातून वेदान्तासारखे अनुभूत शास्त्रसिद्धान्त प्रगट होतात. (१६)

सन्मार्गें जगास मिळाला । म्हणिजे जगदीश वोळला ।
प्रसंग पाहिजे कळला । कोणीयेक ॥ १७ ॥
याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की, त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे जाणावे. पण तरी त्यानेही प्रसंग पाहून वागायला हवे. (१७)

प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
स्नानसंध्या भगवद्भीजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥
अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान व स्नानसंध्या आणि भगवद्भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. (१८)

विवेकवैराग्य तें ऐसें । नुस्तें वैराग्य हेंकाडपिसें ।
शब्दज्ञान येळिलसें । आपणचि वाटे ॥ १९ ॥
याप्रमाणे विवेक, वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एककल्लीपणा अथवा खुळेपणाच होय, आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. (१९)

म्हणौन विवेक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्भापग्य ।
रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥
म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीची जोड असणे हे महद्भाग्य होय. रामदास म्हणतात की, साधू असतात ते हे सर्व जाणतात. (२०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विवेकवैराग्यनिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'विवेकवैराग्यनिरूपणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : आत्मनिवेदन

॥ श्रीराम ॥

रेखेचें गुंडाळें केलें । मात्रुकाक्षरीं शब्द जाले ।
शब्द मेळऊन चाले । श्लोक गद्य प्रबंद ॥ १ ॥
रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षरे तयार होतात. त्या अक्षरांना काना-मात्रा दिल्याने शब्द तयार होतात. असे अनेक शब्द एकत्र येऊन त्यांतून श्लोक, गद्य, प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होते. (१)

वेदशास्त्रें पुराणें । नाना काव्यें निरूपणें ।
ग्रंथभेद अनुवादणें । किती म्हणोनि ॥ २ ॥
वेद, शास्त्रे, पुराणे, नाना काव्ये, निरूपणे इत्यादी ग्रंथांचे अनेक प्रकार आहेत. ते किती म्हणून सांगावेत ? (२)

नाना ऋषी नाना मतें । पाहों जातां असंख्यातें ।
भाषा लिपी जेथ तेथें । काये उणें ॥ ३ ॥
अनेक ऋषी झाले. त्यांची अनेक मते आहेत. ती सांगता येणे शक्य नाही. कारण ती असंख्य आहेत. अनेक भाषा आणि अनेक लिप्या असल्याने ग्रंथाना काय तोटा ? (३)

वर्ग ऋचा श्रुति स्मृति । अधे स्वर्ग स्तबक जाती ।
प्रसंग मानें समास पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥
वेदांतील वर्ग वेद मनू इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले 'मनुस्मृती' आदी ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती इत्यादी ग्रंथ विभाग, माने, समास आदी चम्पू आदी काव्याचे भाग आणि पोथ्या, किती म्हणून नावे सांगावीत ? (४)

नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना कडक ।
नाना साख्या दोहडे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥
नाना पदे, नाना श्लोक, नाना वीर, कडक, साक्या, दोहे इत्यादी हिंदी काव्यांतील छंद अशी अनेक नावे आहेत. (५)

डफगाणें माचिगाणें । दंडिगाणें कथागाणें ।
नाना मानें नाना जसनें । नाना खेळ ॥ ६ ॥
याशिवाय डफगाणे, माचिगाणे, दिंडी गाण्याचे प्रकार, तसेच कथागाणे, नाना माने, नाना आडकथा, नाना खेळ इत्यादी गाण्यांचे अनेक प्रकार आहेत. (६)

ध्वनि घोष नाद रेखा । चहुं वाचामध्यें देखा ।
वाचारूपेंहि ऐका । नाना भेद ॥ ७ ॥
ध्वनी, घोष, नाद, रेखा असे चारी वाचांमध्ये अनेक भेद आहेत. वाणीचेही अनेक प्रकार आहेत. (७)

उन्मेष परा ध्वनि पश्यंति । नाद मध्यमा शब्द चौथी ।
वैखरीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥
उन्मेष म्हणजे स्फूर्ती ही परावाचा होय. ध्वनी ही पश्यंती, नाद ही मध्यमा, आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी होय. या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रगट होतात. (८)

अकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर ।
औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका ॥ ९ ॥
सर्वप्रथम अकार, उकार मकार आणि अर्धमात्रा मिळून साडेतीन मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला आणि त्यानंतर सोळा स्वर आणि छत्तीस व्यंजने मिळून बावन्न अक्षरे निर्माण झाली. (९)

नाना भेद रागज्ञान । नृत्यभेद तानमान ।
अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥
नाना प्रकारचे रागज्ञान, नृत्याचे भेद, तानमान, अर्थभेद, तत्त्वज्ञान व त्याचे विवरण सर्व काही शब्दांच्या योगेच चालते. (१०)

तत्वांमध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्धसत्व ।
अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥
तत्त्वांमध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्त्व जाणावे. ह्यालाच अर्धमात्रा, महत्तत्त्व किंवा मूळमाया म्हणतात. (११)

नाना तत्वें लाहानथोरे । मिळोन अष्टहि शरीरें ।
अष्टधा प्रकृतीचें वारें । निघोन जातें ॥ १२ ॥
नाना लहान-थोर तत्त्वांच्या कमी-अधिक मिश्रणाने आठ देह निर्माण होतात. (चार पिंडाचे व चार ब्रह्मांडाचे), पंचमहाभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये चंचळ वायू असल्याने ती निघून जाते. (१२)

वारें नस्तां जें गगन । तैसें परब्रह्म सघन ।
अष्ट देहाचें निर्शन । करून पाहावें ॥ १३ ॥
चंचळ वायू लय पावल्यावर जसे निश्चल गगन शिल्लक उरते, तसे परब्रह्म सघन सर्वत्र कोंदटलेले असते. आठही देहांचा निरास करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवाने जाणावे. (१३)

ब्रह्मांडपिंडौभार । पिंडब्रह्मांडसंव्हार ।
दोहिवेगळें सारासार । विमळब्रह्म ॥ १४ ॥
ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणी आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संहारणी कशी होते ते जाणून घ्यावे, म्हणजे सारासारविवेकाने या दोहीवेगळे जे विमल ब्रह्म त्याचा बोध होतो. (१४)

पदार्थ जड आत्मा चंचळ । विमळब्रह्म तें निश्चळ ।
विवरोन विरे तत्काळ । तद्रूप होये ॥ १५ ॥
सर्व दृश्य पदार्थ जड असतात, अंतरात्मा चंचळ असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चल असते. त्या विमल ब्रह्माचे मनन, निदिध्यासन, चिंतन करता करता सहज तद्‌रूपता प्राप्त होते. (१५)

पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघाचि देवाचा ।
जड आत्मनिवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥
सर्व दृश्य पदार्थ, आपले मन, काया, वाचा यांसह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन होय. (१६)

चंचळकर्ता तो जगदीश । प्राणीमात्र तो त्याचा अंश ।
त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥
ईश्वर म्हणजेच मूळमाया अथवा अंतरात्मा हा चंचळ असून तोच कर्ता आहे आणि प्राणिमात्र त्याचा अंश आहे. येथे आपण म्हणजे 'मी' म्हणून कुणी नाहीच. (१७)

चंचळ आत्मनिवेदन । याचें सांगितलें लक्षण ।
कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ ८ ॥
देव हाच कर्ता, आपणाला अस्तित्वच नाही, ही धारणा दृढ होणे, हे चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. (१८)

चंचळ चळे स्वप्नाकार । निश्चळ देव तो निराकार ।
आत्मनिवेदनाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥
चंचळ हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि निश्चल देव हा निराकार असून एकला एक आहे. त्याच्याशिवाय अन्य काही नाहीच, ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार होय. (१९)

ठावचि नाईं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा ।
निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥
जेथे चंचळाचा म्हणजे मूळमायेचाच पत्ता नाही, तेथे 'आपण' म्हणून अस्तित्व राहीलच कसे, हा विचार दृढ होणे, हा निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक होय, (२०)

तिहिं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण ।
आपण नस्तां मीपण । नाहींच कोठें ॥ २१ ॥
याप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मीपण म्हणजे 'आपण' च शिल्लक उरत नसल्याने तेथे दुजेपण म्हणजेच वेगळेपणा उरतच नाही. आपणच नाही, मग मीपण तरी कोठे असणार ? (२१)

पाहातां पाहातां अनुमानलें । कळतां कळतां कळों आलें ।
पाहातां अवघेंचि निवांत जालें । बोलणें आतां ॥ २२ ॥
ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागते आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव येतो. याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिले तेव्हा आता बोलण्यासारखे काही उरलेच नाही. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आत्मनिवेदननाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'आत्मनिवेदननाम' समास पाचवा समाप्त.

GO TOP

समास सहावा : सृष्टिक्रमनिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्म निर्मळ निश्चळ । शाश्वत सार अमळ विमळ ।
अवकाश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥
परब्रह्म हे निर्मळ, निश्चल, शाश्वत, सर्वांचे सार असून अमल, विमल आणि गगनासारखे सूक्ष्म असून सर्वत्र घनदाट व्यापून राहिलेले असते. (१)

तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें ।
तेथें जाणणें ना नेणणें । सुन्यातीत ॥ २ ॥
त्याला काहीही करणे नसते, धरणे नसते. त्यास जन्म नसतो, मरण नसते. त्याच्या ठिकाणी जाणीवही नसते व नेणीवही नसते आणि ते शून्याच्याही पलीकडे असते. (२)

तें रचेना ना खचेना । तें होयेना ना जायेना ।
मायातीत निरंजना पारचि नाहीं ॥ ३ ॥
ते रचत नाही, खचत नाही, उत्पन्न होत नाही, नाश पावत नाही, त्या मायातीत निरंजनाला पारच नाही. (३)

पुढें संकल्प उठिला । षडगुणेश्वर बोलिजे त्याला ।
अर्धरारीनटेश्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥
अशा त्या परब्रह्माच्या ठिकाणी 'बहु स्याम्' हे मूळ स्फुरण उठले. त्यालाच अर्धनारीनटेश्वर, षड्गुणेश्वर असे म्हणतात. (४)

सर्वेश्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन ।
परेश परमात्मा जगजीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥
त्याला सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगजीवन, मूळ पुरुष असेही म्हणतात. (५)

ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुणक्षोभिणी ।
गुणत्रये तिजपासूनि । निर्माण जाले ॥ ६ ॥
तीच बहुगुणी मूळमाया विस्ताररूपाने गुणक्षोभिणी झाली आणि तिच्यापासून तीनही गुण निर्माण झाले. (६)

पुढें विष्णु जाला निर्माण । जाणतीकळा सत्वगुण ।
जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥ ७ ॥
पुढे जाणती कळा अर्थात सत्त्वगुणापासून विष्णू निर्माण झाला. तोच या त्रैलोक्याचे पालन करतो.(७)

पुढें जाणीवनेणीवमिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त ।
त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रैं ॥ ८ ॥
पुढे जाणीव-नेणीवमिश्रित रजोगुणापासून ब्रह्मा झाला व त्याच्या रजोगुणापासून भुवनत्रयाची उत्पत्ती झाली. (८)

पुढें रुद्र तमोगुण । सकळ संव्हाराचें कारण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥
पुढे तमोगुणयुक्त रुद्र जो सर्व संहाराचे कारण आहे, तो निर्माण झाला. याप्रमाणे सर्व काही कर्तेपण तेथेच आले. (९)

तेथून पुढें पंचभूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
अष्टधा प्रकृतीचें स्वरूप तें । मुळींच आहे ॥ १० ॥
पुढे त्यापासून पंचमहाभूते स्पष्ट दशेला प्राप्त झाली, म्हणून स्थूल रूपाने प्रकट झाली. मूळमायेचे ठिकाणीच अष्टधा प्रकृती अत्यंत सूक्ष्म रूपाने अव्यक्त दशेत असते. (१०)

निश्चळीं जालें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥
निश्चलाच्या ठिकाणी जे चलनवलन झाले तेच वायूचे लक्षण होय. त्या मूळमायेतच पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म रूपाने असतात. (११)

आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहवा महिमा ।
त्या आकाशापासून जन्मा । वायो आला ॥ १२ ॥
आकाश म्हणजेच अंतरात्मा होय. त्याचा महिमा अनुभवाने जाणून घ्यावा. त्या आकाशापासून वायूचा जन्म झाला. (१२)

तया वायोच्या दोनी झुळुका । उष्ण सीतळ ऐका ।
सीतळापासून तारा मयंका । जन्म जाला ॥ १३ ॥
वायूच्या दोन प्रकारच्या झुळुका आहेत. एक उष्ण व एक शीतल, शीतलापासून चंद्र आणि तारा यांचा जन्म झाला. (१३)

उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्यता आदिकरूनि ।
सीतळ उष्ण मिळोनि । तेज जाणावें ॥ १४ ॥
उष्णापासून सूर्य, अग्नी आणि विद्युल्लता निर्माण झाली. हे शीत आणि उष्ण मिळून तेज तत्त्व जाणावे. (१४)

तया तेजापासून जालें आप । आप आळोन पृथ्वीचें रूप ।
पुढें औषधी अमूप । निर्माण जाल्यां ॥ १५ ॥
त्या तेजापासून आप झाले. आप आळून पृथ्वीचे रूप निर्माण झाले व त्या पृथ्वीवर असंख्य वनौषधी निर्माण झाल्या. (१५)

औषधीपासून नाना रस । नाना बीज अन्नरस ।
चौयासि लक्ष योनीच वास । भूमंडळीं ॥ १६ ॥
औषधींपासून नाना रस, नाना बीजे, नाना अन्नरस निर्माण होऊन या भूमंडलावर चौऱ्याऐंशी लक्ष योनी वास करून राहू लागल्या. (१६)

ऐसी जाली सृष्टीरचना । विचार आणिला पाहिजे मना ।
प्रत्ययेंविण अनुमाना । पात्र होईजे ॥ १७ ॥
याप्रकारे या दृश्य सृष्टीची रचना झाली. साधकाने या सृष्टिरचनेच्या क्रमाचा विचार करून अनुभव घ्यावा. अनुभव नसेल, तर उगीच अनुमान, तर्क करीत बसावे लागते. (१७)

ऐसा जाला आकार । येणेंचि न्यायें संव्हार ।
सारासारविचार । यास बोलिजे ॥ १८ ॥
याप्रमाणे ही सृष्टी आकारास प्राप्त झाली. ज्या अनुक्रमाने उभारणी झाली, त्याच क्रमाने यथान्याय संहारणी होते. या दोन्हीच्या विचारालाच सारासारविचार म्हणतात. (१८)

जें जें जेथून निर्माण जालें । तें तें तेथेंचि निमालें ।
येणेंचि न्यायें संव्हारलें । माहाप्रळईं ॥ १९ ॥
जे जे तत्त्व जेथून निर्माण होते, तेथेच ते लय पावते. या न्यायानेच महाप्रलयाच्या वेळी सर्व दृश्य सृष्टीचा संहार होतो. (१९)

आद्य मध्य अवसान । जें शाश्वत निरंजन ।
तेथें लावावें अनुसंधान । जाणते पुरुषीं ॥ २० ॥
म्हणून जाणत्या पुरुषांनी सृष्टीपूर्वी, सृष्टी असताना आणि सृष्टीचा संहार झाल्यावर जे शाश्वत निरंजन परब्रह्म जसेच्या तसेच असते, त्याच्याकडे अनुसंधान लावावे. (२०)

होत जाते नाना रचना । परी ते कांहींच तगेना ।
सारासार विचारणा । याकारणें ॥ २१ ॥
नाना रचना होतात आणि जातात, पण एकही टिकून राहात नाही, शाश्वत असत नाही. म्हणून यासाठीच आपण सारासारविवेक केला पाहिजे. (२१)

द्रष्टा साक्षी अंतरात्मा । सर्वत्र बोलती महिमा ।
परी हे सर्वसाक्षिणी अवस्ता मां । प्रत्ययें पाहवी ॥ २२ ॥
मात्र ज्या अंतरात्म्याचा द्रष्टा, साक्षी असा महिमा वर्णन करतात, तो म्हणजे सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था मात्र होय, हे अनुभवून पाहावे. (२२)

मुळापासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी ।
नाना विद्या कळाकुंसरी । तयेमधें ॥ २३ ॥
मुळापासून शेवटापर्यंत अवघा मायेचाच विस्तार होय. नाना विद्या, कला, कुसरी यांचा अंतर्भाव मायेमध्येच होतो. (२३)

जो उपाधीचा सेवट पावेल । त्यास भ्रम ऐसें वाटेल ।
जो उपाधीमध्यें आडकेल । त्यास काढिता कवण ॥ २४ ॥
जो उपाधीच्याही पलीकडे जाईल, तो सर्व दृश्य सृष्टी म्हणजे भ्रम आहे हे जाणेल. पण जो उपाधी खरी असे धरून चालेल, त्याला त्यातून कोण सोडवू शकणार आहे ? (२४)

विवेक प्रत्ययाचीं कामें । कैसीं घडतील अनुमानभ्रमें ।
सारासारविचाराचेन संभ्रमें । पाविजे ब्रह्म ॥ २५ ॥
विवेकाच्या साहाय्याने अनुभवाने जे कार्य होते, ते अनुमानाने, भ्रमाने कसे साध्य होईल ? सारासारविवेकाच्या साहाय्यानेच परब्रह्माची प्राप्ती होते. (२५)

ब्रह्मांडींचे माहाकारण । ते मुळमाया जाण ।
अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण । विवेकहीन ॥ २६ ॥
ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजेच मूळमाया जाणावी. जे विवेकहीन असतात, ते अपूर्ण अशा मूळमायेलाच पूर्णब्रह्म समजतात. (२६)

सृष्टीमधें बहुजन । येक भोगिती नृपासन ।
येक विष्ठा टाकिती जाण । प्रत्येक्ष आतां ॥ २७ ॥
सृष्टीमध्ये असंख्य लोक आहेत. कुणी राजसिंहासनावर बसून सुखोपभोग भोगतात, तर एक विष्ठा टाकण्यासारखे हीन काम करीत असतात. हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते. (२७)

ऐसे उदंड लोक असती । आपणास थोर म्हणती ।
परी ते विवेकी जाणती । सकळ कांहीं ॥ २८ ॥
कित्येक लोक असे आहेत की, जे आपल्याला थोर म्हणवितात, पण जे विवेकी असतात, तेच खरोखर थोर कोण आहे हे जाणतात. (२८)

ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार ।
बहुतांच्या बोलें हा संसर । नासूं नये ॥ २९ ॥
खरी स्थिती ही अशी आहे. म्हणून विवेक करणे अत्यंत आवश्यक आहे. अविवेकी लोकांच्या नादाने उगाच आयुष्य फुकट घालवू नये. (२९)

पुस्तकज्ञानें निश्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।
याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ॥ ३० ॥
पुस्तकी ज्ञानाने जर परब्रह्मस्वरूपाचा निश्चय होत असता, तर मग सद्‌गुरू करण्याची काय आवश्यकता असते, हे आपल्याच अनुभवावरून ठरवावे. (३०)

जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला ।
येक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मगावा ॥ ३१ ॥
जो अनेकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, तो नक्कीच बुडाला असे जाणावे. एकच मालक नसेल तर वेतन कोणाजवळ मागणार ? (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सृष्टिक्रमनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टीक्रमनिरूपणनाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : विषयत्याग

॥ श्रीराम ॥

न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥
न्यायनिष्ठुर बोलणे अनेकांना आवडत नाही. त्यांना ते कंटाळवाणे वाटते. पण मळमळत असताना जेवणे योग्य नव्हे. त्याप्रमाणेच मनात शंका ठेवून श्रवण केले असता ते हिताचे ठरत नाही. (१)

बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले ।
विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥
श्रोत्यांच्या मनात अशी शंका आहे की, अनेक लोक विषयांची निंदा करतात, पण स्वतः तेही विषय सेवन करीत असतात. विषयांचा जर संपूर्ण त्याग केला, तर देह कसा चालेल ? ते अशक्य वाटते. (२)

बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥
एक बोलायचे आणि वागायचे मात्र त्याच्या विरुद्ध. याला हीन विवेक म्हणतात. अशा तर्‍हेने वागले असता सर्व लोक उपहास करतात. (३)

विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।
ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥
लोक ठायी ठायी असे म्हणतात की, विषयत्यागाशिवाय परलोक प्राप्त होत नाही, याचा नीट विचार करा. (४)

प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती ।
उभयता सारिखे दिसती । विषयाविषईं ॥ ५ ॥
प्रापंचिक असतात ते खातात-पितात आणि पारमार्थिक लोक उपास करतात, असे थोडेच आहे ? विषयसेवनाचे बाबतीत तर दोघे सारखेच दिसतात. (५)

देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं ।
याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥
देह जिवंत असताना जो विषयांचा त्याग करतो असा या जगात कोण आहे ? याचे उत्तर गुरुदेवांनी कृपा करून मला सांगावे. (६)

विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।
ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥
विषयाचा संपूर्ण त्याग करावा आणि मगच परमार्थ करावा, असे म्हणण्यात फार घोटाळा आहे, असे मला वाटते. (७)

ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला ।
सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥
याप्रमाणे श्रोत्याने शंका उत्पन्न केली, तिला वक्त्याने जे उत्तर दिले, ते मन एकाग्र करून सावधपणे ऐका. (८)

वैरग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग ।
प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥
वैराग्याने विषयत्याग करावा, तरच परमार्थ साध्य होतो यात शंका नाही. प्रपंचाचा संपूर्ण त्याग केला, तरच परमार्थ यथासांग घडतो. (९)

मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहिं बहुत कष्ट केले ।
तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥
पूर्वी जे अनेक ज्ञानी लोक होऊन गेले, त्यांनी परमार्थ साध्य होण्यासाठी खूप कष्ट सोसले. तेव्हा ते या भूमंडळावर प्रसिद्ध झाले. (१०)

येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं ।
कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥
याखेरीज कित्येक लोक लोकांचा मत्सर करतानाच मरून गेले; तर कित्येक अन्नान्नदशा होऊन मरून गेले, तर कित्येक पोटासाठी भ्रष्ट झाले. (११)

वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं ।
सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचें ॥ १२ ॥
आधी मुळात जराही वैराग्य नाही, अनुभवाचे ज्ञान तेही नाही, आणि शुद्ध आचार तोही नाही, मग भजन कसे घडणार ? (१२)

ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन ।
पाहों जातां अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥
अशा प्रकारचे लोकही आपणांस सज्जन म्हणवितात आणि प्रत्यक्षात मात्र हे सर्व काल्पनिकच असते. (१३)

जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप ।
क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥
ज्याला कृतकर्माबद्दल पश्चात्ताप होत नाही, त्याचे ते पूर्वपापच जाणावे. शिवाय दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने क्षणोक्षणी दुःख होत असते ते वेगळेच. (१४)

मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना ।
खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥
मला जे मिळत नाही, ते तुलाही शोभून दिसत नाही, असा मत्सरी माणसाचा स्वभाव असतो, हे सर्व लोकांना माहीत आहे. ज्याला खायला मिळत नाही, तो दुसऱ्यास खाताना शांतपणे बघू शकत नाही, अशी ही स्थिती असते. (१५)

भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाळखोर ।
सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥
भाग्यवंत अशा थोर थोर लोकांना पाहून टवाळखोर लोक त्यांची निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर जसा चरफडतो, तसाच हा प्रकार आहे. (१६)

वैराग्यपरतें नाहीं भग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।
वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥
वैराग्यासारखे भाग्य नाही, ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तो अभागी होय. वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊच शकत नाही. (१७)

प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी ।
तो जाणीजे माहांयोगी । ईश्वरी पुरुष ॥ १८ ॥
जो पुरुष स्वात्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्यसंपन्न असतो, तो पुरुष महायोगी ईश्वरी अवतारच जाणावा. (१८)

अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करून घेतली योगदीक्षा ।
घरोघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥
अष्टमहासिद्धींची जो उपेक्षा करतो, ज्याने योगदीक्षा घेतलेली असते आणि जो घरोघरी भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो, तो महादेवच होय. (१९)

ईश्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी ।
म्हणोनियां सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥
केवळ बैराग्यासारखा वेष धारण करणारा वेषधारी ईश्वराची बरोबरी कसा करू शकेल ? म्हणून केवळ बाह्य वेषावरून दोघांची बरोबरी होऊ शकत नाही. (२०)

उदास आणि विवेक । त्यास शोधिती सकळ लोक ।
जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥
ज्याच्या ठिकाणी औदासीन्य आणि विवेक दोन्ही असतात अशाचा शोध सर्व लोक घेत असतात, तर लालची, रंक आणि मूर्ख माणूस दैन्यवाणे जीवन जगत असतो. (२१)

जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्ठले ।
विवेक करूं विसरले । विषयलोभीं ॥ २२ ॥
विषयलोभी जे असतात ते विचार करू शकत नाहीत किंवा विवेकहीन असतात, आचारभ्रष्टही असतात. (२२)

भजन तरी आवडेना । पुरश्चर्ण कदापि घडेना ।
भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥
त्यांना भजन मुळीच आवडत नाही. त्यांच्या हातून कधीही पुरश्चरण आदी घडत नाही. आणि याच कारणामुळे चांगल्या माणसांशी त्यांचे पटत नाही. (२३)

वैराग्यें करून भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना ।
वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥
वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाही, ज्ञानी असून जो सगुणाचे भजन सोडत नाही आणि व्युत्पन्न असून जो वाद घालत नाही, असा एखादाच विरळा असतो. (२४)

कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके ।
जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥
कष्ट केल्याने शेतात उत्तम पीक येते. चांगली वस्तू तत्काळ विकली जाते. त्याप्रमाणे अशा विवेकवैराग्यसंपन्न माणसांकडे लोकांच्या उड्या पडतात. (२५)

येर ते अवघेचि मंदले । दुराशेनें खोटे जाले ।
कानकोंडें ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥
अशा माणसांखेरीज इतर जे असतात, ते सर्व त्याच्यापुढे निस्तेज ठरतात. कारण त्यांच्या मनात दुराशा असल्याने ते खोटे ठरतात. ते वैराग्यभ्रष्ट होतात आणि त्यामुळे त्यांच्या ज्ञानालाही कमीपणा येतो. (२६)

सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें ।
विषयत्यागाचीं लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥
अशुद्ध विषयांचा त्याग करावा व शुद्ध विषयांचे देहनिर्वाहापुरते कार्यकारणपरत्वे सेवन करावे. हीच विषयत्यागाची लक्षणे जाणून घ्यावीत. (२७)

सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव ।
विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥
विवेकी पुरुष जाणतो की, सर्वांचा कर्ता-करविता एक देवच आहे. प्रकृतीला अस्तित्वच नाही. हा विचार विवेकी बरोबर जाणतात. (२८)

शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर ।
कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥
जो शूरत्वाविषयी तत्पर असतो, त्याला लहान-थोर सर्व मान देतात. असा कार्यकर्ता आणि अंगचोर आहे त्याची बरोबरी कशी होईल ? (२९)

त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे ।
पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथायोग्य ॥ ३० ॥
कशाचा त्याग करावा आणि कशाचा करू नये हे तर्काने चतुर माणूस जाणतो. त्याचे वागणे त्याच्या बोलण्यास अनुसरूनच असते. पिंडब्रह्मांड विचार, सारासारविवेक वगैरे सर्व काही तो यथायोग्य प्रकारे जाणतो. (३०)

ऐसा जो सर्वजाणता । उत्तमलक्षणी पुरुता ।
तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥
असा जो सर्व जाणणारा उत्तम लक्षणांनी पूर्णपणे युक्त पुरुष असतो, त्याच्या संगतीने आपल्या जीवनाचेही सहज सार्थक होते. (३१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विषयत्यागनिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे "विषयत्यागनिरूपणनाम' समास सातवा समाप्त.

GO TOP

समास आठवा : काळरूपनिरूपण

॥ श्रीराम ॥

मूळमाया जगदेश्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।
सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
प्रथम मूळमाया म्हणजेच जगदीश्वर होता. त्यापासून अष्टधा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने आकारास आली. (१)

हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसें गगन अंतराळ ।
निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥
ज्या वेळी हे काहीच नव्हते, तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार, निश्चल परब्रह्म तेवढे एकले एक होते. त्या निराकाराच्या ठिकाणी काळ-वेळ इत्यादी काहीच नव्हते. (२)

उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।
येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाही ॥ ३ ॥
उपाधीचा विस्तार झाला, तेव्हा काळ वेळ वगैरे दिसून येऊ लागले. उपाधी नसताना काळाला काही अस्तित्वच नाही. (३)

येक चंचळ येक निश्चल । यावेगळा कोठें काळ ।
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥
एक चंचळ (मूळमाया) आणि एक निश्चल परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत. यावेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही. जोपर्यंत चंचळ आहे, तोपर्यंत चंचळाच्या सापेक्षतेने काळ ही संज्ञा द्यावी लागते. (४)

आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।
त्या विलंबरूप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥
आकाश म्हणजेच अवकाश होय. विलंबालाच अवकाश असे म्हणतात. काळ हा विलंबरूप आहे. त्याचे स्वरूप जाणून घ्यावे. (५)

सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥
सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो. आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो (६)

पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।
शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥
पळ, घटिका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष, मास, सहा महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत कालगणना करू शकतो. (७)

क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।
देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥
त्यानंतर कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी चार युगे या भूमंडळावर चालत आली आहेत. याखेरीज देवांची आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रांत वर्णिली आहेत. (८)

ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट ।
दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥
त्या तिन्ही देवांची कार्ये सूक्ष्मरूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात. लोकांनी नीतिनियम मोडले, तर त्यांना पश्चात्तापाची पाळी येते. (९)

मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥
तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले आहेत. ते वेगळे करता येत नाहीत. आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळेच झाली आहे. तेथे कोण लहान आणि कोण थोर हे कसे म्हणावे ? (१०)

असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥
असो. ही शहाण्या माणसाची कामे आहेत. अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो. अनुभवाने यांतील रहस्ये जाणून घ्यावीत. (११)

उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।
आद्यंत अवघा काळ । विलंबरूपी ॥ १२ ॥
काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामे प्राप्त होतात. उत्पन्नकाळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ, संहारकाळ इत्यादी. आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंबरूपच असतो. (१२)

जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥
ज्या ज्या प्रसंगी जे जे घडते, त्या त्यानुसार काळाला नाव पडते. तर्काने जाणता येत नसेल, तर पुढे सांगतो ते ऐका (१३)

प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।
सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥
पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख-आनंदकाळ, यांचा प्रत्यय आपल्याला येतो (१४)

प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।
पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥
प्रातःकाळ, माध्याह्नकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच. (१५)

जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥
जन्मकाळ, बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होतात.(१६)

सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।
सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे. (१७)

असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥
एक असताना दुसरेच काही वाटते, यास हीन विवेक म्हणतात. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्तीच जाणतात. (१८)

प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्धमुखें ।
ऊर्धमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥
प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते, तर निवृत्ती ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते. एकत्वामुळेच नाना सुखे प्राप्त होतात, हे विवेकी लोक जाणतात. (१९)

ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।
विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥
ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांडरचना झाली, तेथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापर स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त होते. (२०)

प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।
प्रारब्धयोगें करून राहे । लोकांमधें ॥ २१ ॥
जो कुणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो, त्यालाही परमार्थाची प्राप्ती तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहात असला तरीही होते. (२१)

सकळांचे येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।
विवेकें करून तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥
निर्गुण-निराकार परब्रह्म हेच सर्वांचे मिळून एकच मूळ आहे. काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा. (२२)

तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।
कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥
असे केले तरच मनुष्य-जन्माचे सार्थक होते. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार करतात. म्हणून विवेकाने मूळ परब्रह्मापर्यंत पोहोचले पाहिजे. (२३)

विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।
त्यांचे ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥
जे लोक विवेकहीन असतात, ते पशूसमान जाणावेत. त्यांचे भाषण ऐकून त्याप्रमाणे आचरण केल्यास परलोक कुठला ? (२४)

बरें आमचें काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।
पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥
माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचे काय नुकसान होणार आहे. त्याने जे केले असेल त्याचे त्याप्रमाणे फळ त्याला प्राप्त झालेले आहे. जे पेरले असेल, तेच आता उगवले आहे आणि तेच आता त्यांना भोगावे लागत आहे. (२५)

पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।
देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥
पुढेही जो जसे करतो त्यास तसे फळ मिळते. म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. देवभक्ताचे मीलन झाले की, समाधान दुपटीने वाढते. (२६)

कीर्ति करून नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।
शाहाणे होऊन भुलले । काये सांगवें ॥ २७ ॥
जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करीत नाहीत, ते जगात उगाचच येतात आणि जातात. शहाणे असूनही भुलतात, याला काय म्हणावे ? (२७)

येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास हेतें ।
कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥
येथील सर्व वस्तू, व्यक्ती येथेच राहातात ही गोष्ट तर नेहमी अनुभवास येते. मरताना कोण काय घेऊन जाते, जरा सांगा तर खरे ! (२८)

पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।
येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥
म्हणून दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासारविवेक करीत असावे, म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. (२९)

जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं ।
संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥
जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही. योगायोगाने सर्व काही होते. या भावनेमुळे संसारही समाधानास कारण होतो. (३०)

मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥
पूर्वी जनकादिकांसारखे अनेक राजे राज्य करीत असतानाही मुक्त झाले. त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. (३१)

राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबुल जाला ।
तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥
एखादा राजा असताना त्याचा मृत्युकाळ आल्यावर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले, तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडीत नाही. (३२)

ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें ।
नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥
असे हे मानवाचे जिणे अत्यंत पराधीन आहे. त्यातच दुखणीबाणी, नाना उद्वेग, नाना चिंता यांनी माणूस त्रस्त होतो. ते किती म्हणून सांगावे ? (३३)

हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।
तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥
याप्रमाणे हा संसाराचा बाजार भरलेला आहे. यात देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल, ते आधी पाहावे. त्यासाठी कसून प्रयत्न करावेत, तरच सर्व कष्टांचा मोबदला मिळतो. (३४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
काळरूपनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'काळरूपनाम' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : यत्‍नशिकवण

॥ श्रीराम ॥

दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त ।
मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥
एखादा माणूस दुर्बळ, निराश्रित, ओढगस्तीने जगणारा, आळशी, खादाड, कर्जबाजारी, मूर्खपणाने सर्व प्रकारे अयोग्य वर्तन करणारा, एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो. (१)

खाया नाहीं जेवाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं ।
अंथराया नाहीं पांघराया नाहीं । कोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥
ज्याला धड खायला नाही, जेवायला नाही, काही ल्यायला नाही, नेसायला नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, राहायला खोपट नाही, असा अभागी असतो. (२)

सोएयेरे नाहीं धायेरे नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं ।
पाहातां कोठें वोळखी नाहीं । आश्रयेंविण परदेसी ॥ ३ ॥
त्याला सगे नाहीत, सोयरे-धायरे नाहीत. इष्टमित्र नाही. त्याची कुणाशी ओळख नाही, असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाणा झालेला असतो. (३)

तेणें कैसें करावें । काये जीवेंसीं धरावें ।
वाचावें किं मरावें । कोण्या प्रकारें ॥ ४ ॥
त्याने काय करावे ? कशा प्रकारे जिवंत राहावे की मरून जावे ? करावे तरी काय ? (४)

ऐसें कोणीयेकें पुसिलें । कोणीयेकें उत्तर दिधलें ।
श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां । ५ ॥
असे कोणी एकाने विचारले. त्याला जे उत्तर दिले गेले, ते आता श्रोत्यांनी सावध होऊन ऐकले पाहिजे. (५)

लाहान थोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं ।
करंट्या सावध पाहीं । सदेव होसी ॥ ६ ॥
लहान-मोठे कुठलेही काम असो, ते केल्याखेरीज होत नाही. करंट्या माणसाने सावधपणे ही गोष्ट जर जाणून घेतली, तर तोही भाग्यवान होईल. (६)

अंतरीं नाहीं सावधानता । येत्न ठाकेना पुरता ।
सुखसंतोषाची वार्ता । तेथें कैंची ॥ ७ ॥
जेथे अंतरी सावधानता नसते, पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नाही, तेथे सुख-संतोष कसे प्राप्त होणार ? (७)

म्हणोन आळस सोडावा । येत्नं साक्षेपें जोडावा ।
दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥
म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न करावा. मनातील दुश्चित्तपणाचा भाव प्रयत्नपूर्वक मोडावा. (८)

प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरामि करावें ।
नित्य नेमें स्मरावें । पाठांतर ॥ ९ ॥
नित्य प्रातःकाळी उठावे. प्रातःस्मरामि म्हणून भगवंताचे स्मरण करावे. नित्य नेमाने पाठांतर करावे. (९)

मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।
बाष्कळपणाची वटवट । करूंच नये ॥ १० ॥
पूर्वी पाठ केले, त्याची उजळणी करून पुढील पाठांतर करण्याचा नेम निग्रहाने पाळावा. उगीच बाष्कळपणाची वटवट करूच नये. (१०)

दिशेकडे दुरी जावें । सुचिस्मंत होऊन यावें ।
येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥
शौचासाठी दूर कोठेतरी जावे. निर्मळ होऊन यावे. येताना काही ना काही आणावे. रिकाम्या हाताने येणे योग्य नाही. (११)

धूतवस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षाळण ।
देवदर्शन देवार्चन । येथासांग ॥ १२ ॥
आपण धुऊन आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी. हातपाय स्वच्छ धुऊन देवदर्शन, देवतार्चन यथासांग करावे. (१२)

कांहीं फळाहार घ्यावा । पुढें वेवसाये करावा ।
लोक आपला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥
काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल, तो करावा. आपला कोण, परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. (१३)

सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावें ।
विवरविवरों जाणावें । अर्थांतर ॥ १४ ॥
सुंदर अक्षर लिहावे. स्पष्ट बरोबर वाचावे. अर्थांचे वारंवार विवरण करून तो नीट जाणून घ्यावा. (१४)

नेमस्त नेटकें पुसावें । विशद करून सांगावें ।
प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥
कुणाला काही विचारावयाचे असेल, तर नीट नेमके विचारावे. कुणाला काही सांगायचे असेल तर नीट स्पष्ट करून सांगावे. अनुभवाशिवाय बोलणे हेच पाप होय. (१५)

सावधानता असावी । नीतिमर्याद राखावी ।
जनास माने ऐसी करावी । क्रियासिद्धि ॥ १६ ॥
वागण्यात सावधानता असावी. नीतिमर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारेच कार्यसिद्धी करावी. (१६)

आलियाचें समाधान । हरिकथा निरूपण ।
सर्वदा प्रसंग पाहोन । वर्तत जावें ॥ १७ ॥
आल्या गेल्याचे समाधान करावे. नित्य हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करीत जावे आणि नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचारण करावे. (१७)

ताळ धाटी मुद्रा शुद्ध । अर्थ प्रमये अन्वये शुद्ध ।
गद्यपद्यें दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥
गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यास दाखवणें ।
सभारंजकें वचनें । आडकथा छंदबंद ॥ १९ ॥
बहुतांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें बोलावें ।
विलग पडों नेदावें । कथेमधें ॥ २० ॥
ताल, धाटी, शुद्ध मुद्रा, अर्थ प्रमेये, शुद्ध अन्वय, गद्य, पद्य, उत्तम दृष्टांत, अन्वय, गाणे, वाजविणे, नाचणे, हाताने हावभाव करणे, सभेस रंजक वाटतील अशी वचने सांगणे, आडकथा, छंद, बंध इत्यादी सर्वांचा समयोचित उपयोग हरिकथेत करावा. अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असेच बोलावे. कथेमध्ये विसंगती येऊ देऊ नये. (१८-२०)

लोकांस उदंड वाजी आणूं नये । लोकांचे उकलावें हृदये ।
तरी मग स्वभावें होये । नामघोष ॥ २१ ॥
लोकांना फार जिकिरीस आणू नये. लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल, असे बोलावे. म्हणजे मग स्वाभाविकच लोक आनंदाने नामघोष करतात. (२१)

भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनाचे प्रयोग ।
जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥ २२ ॥
भक्ती, ज्ञान, वैराग्य, योग, नाना प्रकाराची साधने याचे असे विवरण करावे की, श्रोत्यांनी ते मनन केले असता तेवढ्यानेही त्यांचा भवरोग नष्ट व्हावा (२२)

जैसें बोलणें बोलावें । तैसेंचि चालणें चालावें ।
मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणे ॥ २३ ॥
आपण जसे बोलतो तसेच आपले वागणेही असावे. म्हणजे महंताचे चारित्र्य सहजच अंगी बाणते. (२३)

युक्तिवीण साजिरा योग । तो दुराशेचा रोग ।
संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥
महंतीचा योग येणे उत्तम हे खरे, पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचा रोग ठरतो आणि संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू भोगच उभा राहतो. (२४)

ऐसें न करावें सर्वथा । जनास पावऊं नये वेथा ।
हृदईं चिंतावें समर्थ । रघुनाथजीसी ॥ २५ ॥
म्हणून अशा प्रकारे कधीही वागू नये. लोकांना दुःख होईल असे कधी करू नये. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. (२५)

उदासवृत्तिस मानवे जन । विशेष कथानिरूपण ।
रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाड न्यावी ॥ २६ ॥
अनासक्त वृत्ती लोकांना मानवते. कथानिरूपण अशा उत्तम प्रकारे करावे की, रामकथा ब्रह्मांड भेदून त्याच्याही पलीकडे न्यावी. (२६)

सांग महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।
नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥
जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तेथे वैभवास काय उणे पडणार आहे ! आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्याभोवती लोक गर्दी करून सोडतात. (२७)

आकलबंद नाहीं जेथें । अवघेंचि विश्कळित तेथें ।
येकें आकलेविण तें । काये आहे ॥ २८ ॥
जेथे अक्कलहुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळित होऊन जाते. एका अक्कलहुशारीशिवाय काय आहे ? (२८)

घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड ।
तेथें कैचें आणिले द्वाड । करंटपण ॥ २९ ॥
म्हणून अक्कलहुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्मांडाहून श्रेष्ठ व्हावे. मग तेथे द्वाड अभागीपण कसे राहील ? (२९)

येथें आशंका फिटली । बुद्धि येत्नींप प्रवेशली ।
कांहींयेक आशा वाढली । अंतःकर्णी ॥ ३० ॥
येथे श्रोत्यांची शंका फिटली. बुद्धीला प्रयत्नाचे महत्त्व कळले आणि म्हणून अंतःकरणात आशा वाढली. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
यत्नशिकवणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'येत्‍नसिकवणनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : उत्तमपुरुषनिरूपण

॥ श्रीराम ॥

आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।
परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥
आपण पोटभर जेवल्यावर जे अन्न उरेल ते वाटावे. ते वाया घालवणे हा काही धर्म नव्हे. (१)

तैसें ज्ञानें तृप्त व्हावें। तेंचि ज्ञान जनास सांगावें ।
तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥
त्याप्रमाणे ज्ञानाने आपण तृप्त व्हावे आणि तेच ज्ञान लोकांना सांगावे. ज्याला पोहायला येत असेल, त्याने इतरांना बुडू देऊ नये. (२)

उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे ।
वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥
स्वतः उत्तम गुण घ्यावेत आणि मग ते इतरांना सांगावेत. स्वतः आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे खोटे बोलण्यासारखेच आहे. (३)

स्नान संध्या देवार्चन । येकाग्र करावें जपध्यान ।
हरिकथा निरूपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥
स्‍नान, संध्या, देवार्चन, एकाग्र मनाने जप आणि ध्यान, तसेच हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण हे केलेच पाहिजे. (४)

शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें । कोणियेकाचें ॥ ५ ॥
आपले शरीर परोपकारासाठी झिजवावे. अनेकांच्या उपयोगी पडावे. कुणाचेही उणे पडू देऊ नये. (५)

आडले जाकसलें जाणावें । यथानशक्ति कामास यावें ।
मृदवचनें बोलत जावें । कोणीयेकासी ॥ ६ ॥
कुणी अडले असेल, गांजलेले असेल, तर ते जाणून घ्यावे आणि त्याला आपल्या शक्तीनुसार मदत करावी. कुणाशीही मृदु वचनांनी बोलावे. (६)

दुसयाच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बया शब्दें ॥ ७ ॥
दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हावे, लोकांच्या संतोषाने सुखी व्हावे, गोड शब्दाने प्राणिमात्रांना आपलेसे करून घ्यावे. (७)

बहुतांचे अन्याये क्ष्मावे । बहुतांचे कार्यभाग करावे ।
आपल्यापरीस व्हावे । पारखे जन ॥८ ॥
अनेकांच्या अन्यायाची त्यांना क्षमा करावी. अनेकांच्या कार्यात त्यांना मदत करावी. परके लोक असतील त्यांना आपल्या बाजूचे करून घ्यावे. (८)

दुसयाचें अंतरजाणावें । तदनुसारचि वर्तावें।
लोकांस परीक्षित जावें । नाना प्रकारें ॥ ९ ॥
दुसऱ्यांच्या अंतरंगातील विचार जाणून त्यानुसार त्यांच्याशी वागावे. नाना प्रकारे लोकांची परीक्षा करीत असावे. (९)

नेमकचि बोलावें । तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।
कदापी रागास न यावें । क्ष्मारूपें ॥ १० ॥
मोजकेच बोलावे. कुणी काही विचारले, तर तात्काळ त्यास प्रत्युत्तर द्यावे. कधीही कुणावर रागावू नये. सर्वांना क्षमा करावी (१०)

आलस्य अवघाच दवडावा । येत्न उदंडचि करावा ।
शब्दमत्सर न करावा । कोणीयेकाचा ॥ ११ ॥
आळस पूर्णपणे झटकून टाकावा. उदंड प्रयत्न करीत राहावे. दुसऱ्या कुणी बोललेला एखादा शब्द धरून त्यावर वितंडवाद कधी घालू नये. (११)

उत्तम पदार्थ दुसयास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणें करीत जावा । संसार आपला ॥ १२ ॥
उत्तम पदार्थ असेल, तो दुसऱ्यास द्यावा. शब्द विचारपूर्वक बोलावा. आपला संसार दक्षतेने करीत जावा. (१२)

मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीस सादर व्हावें ।
मरोन कीर्तीस उरवावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥
मरणाचे नेहमी स्मरण ठेवावे आणि हरिभक्तीस सादर असावे. याप्रकारे वागून मेल्यावरही कीर्तिरूपे उरावे (१३)

नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला ।
सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥१४ ॥
याप्रमाणे उत्तम गुणाने युक्त असे त्याचे नेमस्त वागणे पाहून अनेक लोकांत तो प्रसिद्धी पावतो. मग सर्व लोक त्याच्याशी प्रेमाने वागू लागतात. मग त्याला काहीच उणे पडत नाही. (१४)

ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।
जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥
अशा विशेष उत्तम गुणांनी जो संपन्न असतो, त्यालाच माणूस म्हणावे. त्याने केलेल्या भजनाने जगदीश प्रसन्न होतो. (१५)

उदंड धिःकारून बोलती । तरी चळों नेदावी शांति ।
दुर्जनास मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥
लोक जरी खूप धिक्कारून बोलले, तरी आपली शांती कधी ढळू देऊ नये. जे दुर्जनांनाही आपलेसे करतात, ते साधू धन्य होत. (१६)

उत्तम गुणीं श्रृंघारला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोची येक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥
उत्तम गुणांनी जो शृंगारलेला असतो, ज्ञान आणि वैराग्याने जो शोभत असतो, तोच एक या भूमंडळावर उत्तम म्हणून जाणावा. (१७)

स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोसित जावें ।
झिजोन कीर्तीस उरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥
आपण स्वतः कष्ट करावेत. अनेकांचे वागणे, बोलणे सोशीत असावे आणि नाना प्रकारांनी झिजून आपली कीर्ती उरवावी. (१८)

कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ती नाहीं ।
विचारेंविण कोठेंचि नाहीं । सामाधान ॥ १९ ॥
कीर्ती हवी असेल, तर सुखाची अपेक्षा करू नये. सुखाची लालसा असेल, तर कीर्ती मिळणार नाही. विचाराशिवाय प्रपंच वा परमार्थ कोठेच समाधान मिळणार नाही. (१९)

परांतरास न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका ।
स्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २० ॥
लोकांचे अंतःकरण कधी दुखवू नये. यात कधीही चूक होऊ देऊ नये. जो क्षमाशील असतो, त्याच्या महत्त्वाची कधी हानी होत नाही.. (२०)

आपलें अथवा परावें । कार्य अवघेंच करावें ।
प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥
आपले असो, दुसऱ्याचे असो, उत्तम कार्य नेहमी करीतच असावे. प्रसंगी कामचुकारपणा करणे हे कधीही योग्य नाही. (२१)

बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें ।
आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥ २२ ॥
चांगले गोड बोलल्यामुळे सुख वाटते, हे तर अनुभवाने प्रत्यक्ष कळतेच. म्हणून लोकांना स्वतःसारखेच मानीत जावे. (२२)

कठिण शब्दें वाईट वाटतें । तें तों प्रत्ययास येतें ।
तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥
कुणी कठोर शब्द बोलले की, वाईट वाटते, असा तर अनुभव येतच असतो. तर मग दुसऱ्याला तरी का वाईट बोलावे ? (२३)

आपणास चिमोट घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरून दुसयाला । राखत जावें ॥ २४ ॥
आपल्याला कुणी चिमोटा घेतला, तर आपला जीव कासावीस होतो. म्हणून आपल्यावरून लोकांच्या दुःखाची कल्पना करून त्यांना दुःख न होईल असे वागावे. त्यांना प्रसन्न राखावे. (२४)

जे दुसयास दुःख करी । ते अपवित्र वैखरी ।
आपणास घात करी । कोणियेके प्रसंगीं ॥ २५ ॥
जी दुसऱ्याला दुःख देते, ती वैखरी वाणी अपवित्र होय. ती वेळप्रसंगी आपल्याच घातास कारण ठरते. (२५)

पेरिलें ते उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।
तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥ २६ ॥
जे पेरावे तेच उगवून येते. आपण जसे बोल, तसेच उत्तर आपल्याला मिळते. मग कुठल्या कारणाने कर्कश बोलावे बरे ? (२६)

आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।
परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥
आपल्या पराक्रमाने, वैभवाने अनेकांना सुखी करावे. त्याच्यायोगे दुसऱ्यास दुःखी करणे ही राक्षसी क्रिया होय. (२७)

दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीितेंत बोलिलें ॥ २८ ॥
दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वचन ही अज्ञानाची लक्षणे आहेत, असे भगवद्गीतेत म्हटले आहे. (२८)

जो उत्तम गुणें शोभला । तोचि पुरुष माहा भला ।
कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥
जो उत्तम गुणांनी शोभत असतो, तोच महापुरुष जाणावा. कित्येक लोक त्याला शोधत फिरतात. (२९)

क्रियेविण शब्दज्ञान । तेंचि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन । कदापी न करिती ॥ ३० ॥
क्रियेशिवाय नुसते शब्दज्ञान हे कुत्र्याच्या ओकासारखे असते. चांगले लोक कधीही तिकडे बघतही नाहीत. (३०)

मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें ।
तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥
जो मनापासून भक्ती करतो आणि अगत्याने उत्तम गुण धारण करतो, त्या महापुरुषाला लोक शोधत येतात. (३१)

ऐसा जो माहानुभाव। तेणें करावा समुदाव ।
भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥
असा जो कुणी साक्षात्कारी महापुरुष असेल त्याने लोकसंग्रह करावा आणि भक्तीच्या योगे देवाधिदेव आपलासा करावा. (३२)

आपण आवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें ।
याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥
समजा, आपण अवचित मरून गेलो, तर मग भजन कोण करील ? असा विचार करून त्याने अनेक लोकांना भगवद्भक्ती करण्यास लावावे. (३३)

आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।
आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥
आमची प्रतिज्ञा अशी आहे की शिष्यापाशी काहीही मागू नये; पण एवढे जरूर मागावे की त्यांनी आपल्या मागे जगदीशास भजत जावे. (३४)

याकारणें समुदाव । जाला पाहिजे मोहोछाव ।
हातोहातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥
हे व्हावे म्हणून समुदाय एकत्रित करण्यासाठी महोत्सव करावेत आणि सहजासहजी देवाधिदेव प्रसन्न होईल असे करावे. (३५)

आता समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणें ।
श्रोतीं येथें सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥
आता लोकसंग्रह व्हावा म्हणून महंताच्या अंगी पुढील दोन लक्षणे असणे आवश्यक आहे. श्रोत्यांनी मन एकाग्र करून सावधपणे ती ऐकावीत. (३६)

जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति ।
बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥
ज्या योगाने अनेकांकडून भक्ती घडेल अशा रीतीने प्रबोधनशक्ती म्हणजे विषय नीट समजावून सांगता येईल, असे वक्तृत्व हवे आणि अनेकांचे अंतःकरण जिंकता आले पाहिजे. (३७)

मागा बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।
प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥
यापूर्वी जे उत्तम गुण सांगितले ते अंगी असणे आवश्यक आहे. ते ज्याच्या अंगी दिसून येतात त्याचे बोलणे लोक प्रमाण मानतात व त्याच्या प्रबोधनशक्तीने लोक प्रेरित होऊन कार्य करू लागतात. (३८)

बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करून बोलणें ।
तयाचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥
जो बोलण्याप्रमाणेच स्वतः वागतो आणि आधी स्वतः करून मग बोलून दुसर्‍यास उपदेश करतो त्याची वचने लोक प्रमाण मानतात. (३९)

जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना ।
आपण येकला जन नाना । सृष्टिमधें ॥ ४० ॥
जे जे लोकांना पटत नाही ते ते लोक मानत नाहीत, ऐकून घेत नाहीत. आपण एकटे असतो आणि जगात लोक अनेक असतात. (४०)

म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे ।
हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१ ॥
म्हणून लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे, हळूहळू समजावत त्यांच्या कलाने घेऊन त्यांना शिकवावे आणि विवेकाने हळूहळू त्यांना शेवटच्या पायरीपर्यंत न्यावे. (४१)

परंतु हे विवेकाचीं कामें । विवेकी करील नेमें ।
इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥
परंतु याप्रमाणे युक्तीने लोकसंग्रह करणे हे विवेकी पुरुषाचे काम आहे. त्यालाच ते जमते. इतर लोक बापडे भ्रमाने एकमेकांत भांडूच लागतात. (४२)

बहुतांसीं भांडतां येकला । शैन्यावांचून पुरवला ।
याकारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥
सेनापती ज्याप्रमाणे सैन्याशिवाय एकट काहीच करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वांशी जो भांडतो तो एकाकी पडतो व काहीच कार्य करू शकत नाही. म्हणून उत्तम पुरुषाने अनेक लोकांना राजी राखावे. (४३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उत्तमपुरुषनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'उत्तमपुरुषनिरूपणनाम' समास दहावा समाप्त.

॥ दशक बारावा समाप्त ॥



GO TOP