॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक अकरावा : भीमदशकनाम

समास पहिला : सिद्धांतनिरूपण

॥ श्रीराम ॥

आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो ।
वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥
आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नि कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐका. (१)

वायोची कठीण घिसणी । तेथें निर्माण जाला वन्ही ।
मंद वायो सीतळ पाणी । तेथुनि जालें ॥ २ ॥
वायूचे जे कठीण घर्षण होते, तेथे अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. (२)

आपापासून जाली पृथ्वी । ते नाना बीजरूप जाणावी ।
बीजापासून उत्पत्ति व्हावी । हा स्वभावचि आहे ॥ ३ ॥
आपापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे सामावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती, प्राणिमात्र यांची स्वाभाविकरीत्या उत्पत्ती होत असते. (३)

मुळीं सृष्टी कल्पनेची । कल्पना आहे मुळींची ।
जयेपासून देवत्रयाची । काया जाली ॥ ४ ॥
ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. 'बहु स्याम्' ही जी पहिली कल्पना तीच मूळमाया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. (४)

निश्चळामधें चंचळ । ते चि कल्पना केवळ ।
अष्टधा प्रकृतीचें मूळ । कल्पनारूप ॥ ५ ॥
निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचळाची कल्पना करणे हेच अति विलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मुळी कल्पनारूप आहे. (५)

कल्पना तेचि अष्टधा प्रकृति । अष्टधा तेचि कल्पनामुर्ती ।
मुळाग्रापासून उत्पत्ति । अष्टधा जाणावी ॥ ६ ॥
कल्पनाच अष्टधा प्रकृतिरूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे, ते अष्टधा प्रकृतिरूपच आहे, हे जाणून घ्यावे. (६)

पांच भूतें तीन गुण । आठ जालीं दोनी मिळोन ।
म्हणौनि अष्टधा प्रकृति जाण । बोलिजेते ॥ ७ ॥
पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून आठ तत्त्वे होतात. म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते. (७)

मुळीं कल्पनारूप जाली । पुढें तेचि फापावली ।
केवळ जडत्वास आली । सृष्टिरूपें ॥ ८ ॥
प्रथम कल्पनाच मूळमाया सूक्ष्मरूपाने उत्पन्न झाली व तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टिरूपाने स्थूलपणे आकारास आली. (८)

मुळीं जाली ते मूळमाया । त्रिगुण जाले ते गुणमाया ।
जडत्व पावली ते अविद्या माया । सृष्टिरूपें ॥ ९ ॥
मुळात जी स्फुरणरूपाने उत्पन्न झाली ती मूळमाया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रगट झाले, ती गुणमाया होय आणि सृष्टिरूपाने जी जडत्वास प्राप्त झाली, ती अविद्या माया जाणावी. (९)

पुढें च्यारी खाणी जाल्या । च्यारी वाणी विस्तारल्या ।
नाना योनी प्रगटल्या । नाना वेक्ती ॥ १० ॥
पुढे जीवांच्या चारी खाणी प्रगट झाल्या, चार प्रकारच्या वाणी विस्तारल्या, अनेक योनी प्रगट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रगट झाल्या. असे असंख्य जीव निर्माण झाले. (१०)

ऐसी जाली उभारणी । आतां ऐका संव्हारणी ।
मागील दशकीं विशद करूनि । बोलिलें असे ॥ ११ ॥
या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तारपूर्वक सांगितलीच आहे. (११)

परंतु आतां संकळित । बोलिजेल संव्हारसंकेत ।
श्रोते वक्ते येथें चित्त । देऊन ऐका ॥ १२ ॥
परंतु आता या समासातही संहारणी संकेतरूपाने संकलित करून सांगितली जाईल, तरी श्रोत्या-वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. (१२)

शत वरुषें अनावृष्टि । तेथें आटेल जीवसृष्टि ।
ऐशा कल्पांताच्या गोष्टी । शास्त्रीं निरोपिल्या ॥ १३ ॥
शंभर वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. अशा प्रकारच्या कल्पान्ताच्या गोष्टी शास्त्रांत वर्णन केलेल्या आहेत. (१३)

बाराकळीं तपे सूर्य । तेणें पृथ्वीची रक्षा होये ।
मग ते रक्षा विरोन जाये । जळांतरीं ॥ १४ ॥
सूर्य त्याच्या बारा कळांनी तापू लागला की, सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. (१४)

तें जळ शोषी वैश्वानरु । वन्ही झडपी समीरु ।
समीर वितुळे निराकारु । जैसें तैसें ॥ १५ ॥
अग्नीमुळे ते सर्व जल शोषले जाते व वायूमुळे तो अग्नीही विझून जातो. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो व परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. (१५)

ऐसी सृष्टिसंहारणी जाली । मागां विस्तारें बोलिली ।
मायानिरासें उरली । स्वरूपस्थिति ॥ १६ ॥
याप्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो, हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेच आहे. मायेचाही निरास झाला की, केवळ निर्विकार स्वरूपस्थिती मात्र उरते. (१६)

तेथें जीवशिव पिंडब्रह्मांड । अटोन गेलें थोतांड ।
मायेअविद्येचें बंड । वितळोन गेलें ॥ १७ ॥
अशी स्थिती होते, तेव्हा जीव-शिव, पिंड-ब्रह्मांड, वगैरे सर्व थोतांड नाहीसे होते आणि अविद्यामायाही संपूर्ण नाश पावते. (१७)

विवेकेंचि बोलिला क्षये । म्हणोनि विवेकप्रळये ।
विवेकी जाणती काये । मूर्खास कळे ॥ १८ ॥
याप्रमाणे विवेकाने जो संहार करावयाचा, त्याला विवेक-प्रलय असे म्हणतात. जे विवेकी असतात, ते अनुभवाने जाणतात. पण मूर्खांना हे कसे कळणार ? (१८)

सृष्टि शोधितां सकळ । येक चंचळ येक निश्चळ ।
चंचळास कर्ता चंचळ । चंचळरूपी १९ ॥
सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले असता दोनच तत्त्वे आढळून येतात. एक चंचळ व एक निश्चल होय, चंचळाचा कर्ताही चंचळच असतो व तो चंचळरूपच असतो. (१९)

जो सकळ शरीरीं वर्ते । सकल कर्तुत्वास प्रवर्ते ।
करून अकर्ता हा वर्ते । शब्द जया ॥ २० ॥
जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो, सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते, त्यालाच करून अकर्ता असे म्हटले जाते. (२०)

राव रंक ब्रह्मादिक । सकळांमधें वर्ते येक ।
नाना शरीरें चाळक । इंद्रियेंद्वारें ॥ २१ ॥
राव, रंक, ब्रह्मादिक देव या सर्वांना तोच एक चालवतो व सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. (२१)

त्यास परमात्मा बोलती । सकळ कर्ता ऐसें जाणती ।
परि तो नासेल प्रचिती । विवेकें पाहावी ॥ २२ ॥
त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात व तोच सकळांचा कर्ता आहे असेही जाणतात. पण तोही अखेर नाश पावतो, याची प्रचीती विवेकाने जाणावी. (२२)

जो स्वानामधें गुरुगुरितो । जो सूकरांमधें कुरुकुरितो ।
गाढवीं भरोन भुंकतो । आटाहास्यें ॥ २३ ॥
जो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो आणि गाढवात अंतर्यामी भरून अट्टाहासाने ओरडतो. (२३)

लोक नाना देह देखती । विवेकी देहांत पाहाती ।
पंडित समदर्शनें घेती । येणें प्रकारें ॥ २४ ॥
सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते सर्वांना याप्रकारे समदृष्टीने पाहतात. (२४)

॥ श्लोक ॥ विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥
अर्थ-विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाल या सर्वांना विवेकी पुरुष समदृष्टीने पाहतात.

देह पाहातां वेगळाले । परंतु अंतर येकचि जालें ।
प्राणीमात्र देखिलें । येकांतरें ॥ २५ ॥
प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तरी अंतरी जाणीव कळा सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने विवेकी पुरुष सर्वांना समदृष्टीने पाहातात. (२५)

अनेक प्राणी निर्माण होती । परी येकचि कळा वर्तती ।
तये नांव जगज्जोती । जाणतीकळा ॥ २६ ॥
अनेक प्राणी निर्माण होतात. पण ते सर्व अंत:करणातील जाणिवेच्या योगेच व्यवहार करीत असतात. त्या जाणीवकळेलाच जगज्ज्योती नाव आहे. (२६)

श्रोत्रीं नाना शब्द जाणे । त्वचेमधें सीतोष्ण जाणे ।
चक्षुमधें पाहों जाणे । नाना पदार्थ ॥ २७ ॥
सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत, उष्ण याचे ज्ञान होते. (डोळ्यांच्या) योगेच सर्व प्राणी नाना पदार्थ पाहतात. (२७)

रसनेमधें रस जाणे । घ्राणामधें वास तो जाणे ।
कर्मैंद्रियामधें जाणे । नाना विषयस्वाद ॥ २८ ॥
जिभेच्या योगे त्यांना रसाची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास घेतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा स्वाद ते घेतात. (२८)

सूक्ष्म रूपें स्थूळ रक्षी । नाना सुखदुःखें परीक्षी ।
त्यास म्हणती अंतरसाक्षी । अंतरात्मा ॥ २९ ॥
सर्वांच्या हृदयांत सूक्ष्मरूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो व नाना सुख-दुःखांची जो अनुभूती घेतो, त्यालाच अंतर-साक्षी अंतरात्मा असे म्हणतात. (२९)

आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । चैतन्य सर्वात्मा सुक्ष्मात्मा ।
जीवात्मा शिवात्मा परमात्मा । द्रष्टा साक्षी सत्तारूप ॥ ३० ॥
आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप हीही त्याची नावे आहेत. (३०)

विकारामधील विकारी । अखंड नाना विकार करी ।
तयास वस्तु म्हणती भिकारी । परम हीन ॥ ३१ ॥
विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी, आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो, म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे भिकारी आहेत, असे परम हीन लोक या जगज्ज्योतीलाच सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. (३१)

सर्व येकचि दिसती । अवघा येकंकार करिती ।
ते अवघी माईक स्थिती । चंचळामधें ॥ ३२ ॥
या चंचळाच्या राज्यात सर्व देह बाह्यतः सारखेच दिसतात, म्हणून वर्णाश्रमधर्माचा अनादर करून सर्व एकच मानणारांची स्थिती मायिक होय. (३२)

चंचळ माया ते माईक । निश्चळ परब्रह्म येक ।
नित्यानित्यविवेक । याकारणे ॥ ३३ ॥
जे जे म्हणून चंचळ आहे ते सर्व मायिक आहे. निश्चल परब्रह्म एकले एक जसेच्या तसेच असते. म्हणूनच नित्यानित्यविवेकाने त्यास जाणून घ्यावे. (३३)

जातो जीव तो प्राण । नेणे जीव तो अज्ञान ।
जन्मतो जीव तो जाण । वासनात्मक ॥ ३४ ॥
जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव होय. ज्यास जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. (३४)

ऐक्य जीव तो ब्रह्मांश । जेथें पिंडब्रह्मांडनिरास ।
येथें सांगितले विशेष । चत्वार जीव ॥ ३५ ॥
स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे, तो जीव ब्रह्मांश होय. तेथे पिंड-ब्रह्मांडाचे निरसन झालेले असते. याप्रमाणे हे जीवांचे चार विशेष प्रकार सांगितले आहेत. (३५)

असो हें अवघें चंचळ । चंचळ जाईल सकळ ।
निश्चळ तें निश्चळ । आदिअंतीं ॥ ३६ ॥
असो. हे सर्वच चंचळ आहेत व जे जे चंचळ असते ते शेवटी नाश पावते. जे निश्चल असते, ते आदि-अंती जसेच्या तसे निश्चलच असते. (३६)

आद्य मध्य अवसान । जे वस्तु समसमान ।
निर्विकारी निर्गुण निरंजन । निःसंग निःप्रपंच ॥ ३७ ॥
जी परब्रह्मवस्तू आहे, ती आधी, मध्ये व अंती सदासर्वकाळ समानच असते. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन, निःसंग आणि नि:प्रपंच असते. (३७)

उपाधीनिरासें तत्वता । जीवशिवास ऐक्यता ।
विवंचून पाहों जातां । उपाधि कैंची ॥ ३८ ॥
जीवाची उपाधी अविद्या माया व शिवाची उपाधी विद्या माया या दोन्ही उपाधींचा तत्त्वज्ञानाने निरास झाला असता जीवशिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाही, हे कळून येते. (३८)

असो जाणणें तितुकें ज्ञान । परंतु होतें विज्ञान ।
मनें वोळखावें उन्मन । कोण्या प्रकारें ॥ ३९ ॥
हे सर्व जाणणे यास ज्ञान म्हणतात, परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती होय. त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरे होऊ शकेल ? (३९)

वृत्तिस न कळे निवृत्ति । गुणास कैंची निर्गुणप्राप्ती ।
गुणातीत साधक संतीं । विवेकें केलें ॥ ४० ॥
जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते, तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. (४०)

श्रवणापरीस मनन सार । मननें कळे सारासार ।
निजध्यासें साक्षात्कार । निःसंग वस्तु ॥ ४१ ॥
अध्यात्मनिरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. कारण मनन केल्यानेच सारासारविवेक उत्पन्न होतो. याप्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निदिध्यासाने नि:संग जी आत्मवस्तू तिचा साक्षात्कार होतो. (४१)

निर्गुणीं जे अनन्यता । तेचि मुक्ति सायोज्यता ।
लक्ष्यांश वाच्यांश आतां । पुरे जाला ॥ ४२ ॥
निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिलाच सायुज्यमुक्ती म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश आणि लक्ष्यांश दोन्हीही शिल्लक राहात नाहीत. (४२)

अलक्षीं राहिलें लक्ष । सिद्धांतीं कैंचा पूर्वपक्ष ।
अप्रत्यक्षास कैंचें प्रत्यक्ष । असोन नाहीं ॥ ४३ ॥
अलक्ष्याच्या ठिकाणी लक्ष्य विरून जाते. सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार ? इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला, त्याला दिसणार तरी कशी ? त्याला ती असून नसल्यासारखीच होय. (४३)

असोन माईक उपाधी । तेचि सहजसमाधी ।
श्रवणें बळावी बुद्धी । निश्चयाची ॥ ४४ ॥
याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे, त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहजसमाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तूसंबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. (४४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिद्धांतनिरूपणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सिद्धान्तनिरूपणनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : चत्वारदेवनिरूपण

॥ श्रीराम ॥

येक निश्चळ येक चंचळ । चंचळीं गुंतलें सकळ ।
निश्चळ तें निश्चळ । जैसें तैसें ॥ १ ॥
जगामध्ये दोनच वस्तू आहेत. एक निश्चल आहे, एक चंचळ आहे. सर्व प्राणिमात्र चंचळातच गुंतलेले आहेत. निश्चल हे सदासर्वकाळ जसेच्या तसे असते. (१)

पाहे निश्चळाचा विवेक । ऐसा लक्षांमधें येक ।
निश्चळाऐसा निश्चयात्मक । निश्चळचि तो ॥ २ ॥
निश्चलासंबंधी विचार करणारा लक्षावधी माणसांत एखादाच असतो. जो निश्चलासंबंधी निश्चयात्मक विचार करतो, तो स्वत:ही निश्चलाप्रमाणे निश्चलच बनतो. (२)

या निश्चळाच्या गोष्टी सांगती । पुन्हां चंचळाकडे धांवती ।
चंचळचक्रीं निघोन जाती । ऐसे थोडे ॥ ३ ॥
काही लोक असे असतात की, गोष्टी तर निश्चलाच्या करतात, पण पुन्हा चंचळाकडेच धावतात. या चंचळाच्या चक्रातून सहीसलामत सुटणारे फारच थोडे असतात. (३)

चंचळीं चंचळ जन्मलें । चंचळाचि मधें वाढलें ।
अवघें चंचळचि बिंबलें । जन्मवरी ॥ ४ ॥
चंचळात चंचळच जन्मते, ते चंचळातच वाढते आणि त्यामुळे जन्मभर मनावर, चंचळाचाच ठसा उमटतो. (४)

पृथ्वी अवघी चंचळाकडे । करणें तितुकें चंचळीं घडे ।
चंचळ सांडून निश्चळीं पवाडे । ऐसा कैंचा ॥ ५ ॥
सारी सृष्टी चंचळ आहे. सर्व क्रिया चंचळातच घडत असतात. म्हणून चंचळ सोडून निश्चलाचा विवेक करणारा विरळाच असतो. (५)

चंचळ कांहीं निश्चळेना । निश्चळ कदापी चळेना ।
नित्यानित्यविवेकें जना । उमजे कांहीं ॥ ६ ॥
जे चंचळ आहे ते कधी निश्चल होऊ शकत नाही आणि जे निश्चल आहे ते कदापि चळत नाही. नित्यानित्यविवेक केल्याने लोकांना चंचळ काय आणि निश्चल काय याचे थोडेसे ज्ञान होते. (६)

कांहीं उमजलें तरी नुमजे । कांहीं समजलें तरी न समजे ।
कांहीं बुझे तरी निर्बुजे । किंचित मात्र ॥ ७ ॥
पण थोडे फार कळले तरी न कळल्यासारखेच होते. थोडे काही समजले असे वाटते, पण समजलेले नसते. काही प्रचीती आल्यासारखी वाटते, पण ती किंचितमात्रच कळते. (७)

संदेह अनुमान आणी भ्रम । अवघा चंचळामधें श्रम ।
निश्चळीं कदा नाहीं वर्म । समजलें पाहिजे ॥ ८ ॥
माणसाच्या मनात जे संदेह, अनुमान आणि भ्रम वगैरे उत्पन्न होतात, ते सर्व चंचळामुळेच होणारे भ्रम असतात. या गोष्टी निश्चलामध्ये कधी असूच शकत नाहीत, हे वर्म समजले पाहिजे. (८)

चंचळाकरी तितुकी माया । माईक जाले विलया ।
लहान थोर म्हणावया । कार्य नाहीं ॥ ९ ॥
जेवढे काही चंचळाकार आहे ते सर्व मायिक असते व जे जे मायिक असते ते नाश पावते. मायानिर्मित वस्तूमध्ये लहान -थोर असा भेद करणेच बरोबर नाही, कारण सर्व काही नाशिवंतच असते. (९)

सगट माया विस्तारली । अष्टधा प्रकृति फांपावली ।
चित्रविचित्र विकारली । नाना रूपें ॥ १० ॥
सरसकट सर्वत्र मायाच विस्तारली असून अष्टधा प्रकृतीच्या रूपाने तीच फोफावली आहे. तिच्या योगेच चित्रविचित्र नाना रूपे उत्पन्न झाली आहेत. (१०)

नाना उत्पत्ती नाना विकार । नाना प्राणी लाहान थोर ।
नाना पदार्थ मकार । नाना रूपें ॥ ११ ॥
मायेच्या योगेच अनेक पदार्थ उत्पन्न झाले आहेत, नाना विकार उत्पन्न झाले आहेत. लहान-थोर असंख्य प्राणी, नाना पदार्थ, नाना प्रकार, नाना रूपे यांनी विश्व व्यापून गेले आहे. (११)

विकारवंत विकारलें । सूक्ष्म जडत्वा आलें ।
अमर्याद दिसों लागलें । कांहींचाबाहीं ॥ १२ ॥
अष्टधा प्रकृती विकारवंत असल्याने तिच्या योगे सूक्ष्म अव्यक्त असलेली ही सृष्टी दृश्य झाली व अमर्याद काहीच्या बाही स्थूल रूपाने प्रगट झाली. (१२)

मग नाना शरीरें निर्माण जालीं । नाना नामाभिधानें ठेविलीं ।
भाषा परत्वें कळों आलीं । काहीं कांहीं ॥ १३ ॥
मग नाना शरीरे निर्माण झाली. त्यांना नाना नामे ठेवली गेली. भाषेच्या योगाने त्यांतील काही काही कळून येऊ लागली. (१३)

मग नाना रीति नाना दंडक । आचार येकाहून येक ।
वर्तों लागले सकळ लोक । लोकाचारें ॥ १४ ॥
मग नाना रीती, नाना दंडक निर्माण झाले. निरनिराळ्या प्रकारचे लोकाचार रूढ झाले. ते एकापेक्षा एक भिन्न होते व त्या लोकाचारांप्रमाणे सर्व लोक वागू लागले. (१४)

अष्टधा प्रकृतीचीं शरीरें । निर्माण जालीं लाहानथोरें ।
पुढें आपुलाल्या प्रकारें । वर्तों लागती ॥ १५ ॥
अष्टधा प्रकृतीच्या योगे अनेक लहानथोर शरीरे निर्माण झाली व लोक आपापल्या स्वभावानुसार वागू लागले. (१५)

नाना मत्तें निर्माण जालीं । नाना पाषांडें वाढलीं ।
नाना प्रकारीचीं उठिलीं ॥ नाना बंडें ॥ १६ ॥
अनेक मतमतांतरे निर्माण झाली. अनेक पाखंडे वाढू लागली. नाना प्रकारचे नाना मतप्रवाह निर्माण झाले. (१६)

जैसा प्रवाह पडिला । तैसाच लोक चालिला ।
कोण वारील कोणाला । येक नाहीं ॥ १७ ॥
रूढीचा प्रवाह जसा निर्माण झाला, त्याला अनुसरून लोक वागू लागले. कोण कोणाला जाब विचारणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. (१७)

पृथ्वीचा जाला गळांठा । येकाहून येक मोठा ।
कोण खरा कोण खोटा । कोण जाणे ॥ १८ ॥
सर्व पृथ्वीवर एकच गोंधळ माजून राहिला. प्रत्येक जण स्वतःला दुसर्‍यापेक्षा श्रेष्ठ मानू लागला. त्यामुळे कोण खरा आणि कोण खोटा हेच कळेनासे झाले. (१८)

आचार बहुकाचेंत पडिला । कित्येक पोटासाठीं बुडाला ।
अवघा वरपंगचि जाला । साभिमानें ॥ १९ ॥
नाना प्रकारचा आचार रूढ झाला. पोटासाठी उत्तम आचार बुडाला, तर अभिमानामुळे आचाराचा देखावा दांभिक लोक करू लागले. (१९)

देव जाले उदंड । देवांचें मांडलें भंड ।
भूतादेवतांचें थोतांड । येकचि जालें ॥ २० ॥
देव उदंड झाले. सर्वत्र देव-देवतांचे बंड माजले. भूते आणि दैवते यांचे थोतांड सर्वत्र माजून कुणाला काही कळेनासे झाले. (२०)

मुख्य देव तो कळेना । काशास कांहींच मिळेना ।
येकास येक वळेना । अनावर ॥ २१ ॥
खरा देव कोणता हे कुणीच जाणत नव्हते. एकाची मते दुसर्‍याच्या मतांशी मिळत नव्हती. सर्वच मतभेद अनावर झाले आणि कुणीच कुणाचे ऐकत नाही अशी अनवस्था ओढवली. (२१)

ऐसा नासला विचार । कोण पाहातो सारासार ।
कैचा लहान कैंचा थोर । कळेचिना ॥ २२ ॥
याप्रमाणे सगळा समाज विवेकहीन बनला आहे. सारासार विचार करणारा कुणी राहिलेला नाही. त्यामुळे कोण लहान, कोण थोर हेही कळेनासे झाले आहे. (२२)

शास्त्रांचा बाजार भरला । देवांचा गल्बला जाला ।
लोक कामनेच्या व्रताला । झोंबोन पडती ॥ २३ ॥
शास्त्रांचा बाजार भरला आहे. देवांची एकच गर्दी झाली आहे. लोक सकाम व्रतवैकल्ये करण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. (२३)

ऐसें अवघें नासलें । सत्यासत्य हारपलें ।
अवघें अनायेक जालें । चहूंकडे ॥ २४ ॥
अशा प्रकारे सर्वच नासले आहे. सत्यासत्य कळेनासे झाले आहे. जिकडे-तिकडे योग्य नेता कुणी नसल्याने अराजक माजले आहे. (२४)

मतामतांचा गल्बला । कोणी पुसेना कोणाला ।
जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ २५ ॥
मतमतांचा गल्बला माजून कुणी कुणाला विचारीत नाही असे झाले आहे. जो ज्या मतांच्या प्रवाहात सापडतो, त्याला तेच मत श्रेष्ठ वाटू लागते. (२५)

असत्याचा अभिमान । तेणें पाविजे पतन ।
म्हणोनियां ज्ञाते जन । सत्य शोधिती ॥ २६ ॥
असत्याचा अभिमान धरला की अध:पात ठरलेला असतो. म्हणूनच ज्ञाते लोकसत्याचा शोध घेत असतात. (२६)

लोक वर्तती सकळ । तें ज्ञात्यास करतळामळ ।
आतां एइका केवळ । विवेकी हो ॥ २७ ॥
लोक ज्याप्रमाणे वागत असतात, ते तसे का वागतात हे ज्ञात्या पुरुषांना तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे कळून येत असते. तरी आता विवेकी पुरुषांनी हे सर्व नीट ऐकावे. (२७)

लोक कोण्या पंथें जाती । आणि कोण्या देवास भजती ।
ऐसी हे रोकडी प्रचिती । सावध ऐका ॥ २८ ॥
लोक कोणत्या मार्गाचे आचरण करतात, कुठल्या देवाला भजतात, त्यासंबंधीचा रोकडा अनुभव आता सावधपणे ऐका. (२८)

मृत्तिका धातु पाषाणादिक । ऐसिया प्रतिमा अनेक ।
बहुतेक लोकांचा दंडक । प्रतिमादेवीं ॥ २९ ॥
मृत्तिका, धातू, पाषाणादींच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा असतात. बहुतेक लोक रूढ मार्गाने अशा प्रतिमारूपी देवांना भजतात. (२९)

नाना देवांचे अवतार । चरित्रें ऐकती येक नर ।
जप ध्यान निरंतर । करिती पूजा ॥ ३० ॥
काही लोक देवांचे जे नाना अवतार झाले, त्या अवतारांची चरित्रे आदराने ऐकतात व त्यांची पूजा करून निरंतर त्यांचा जप, ध्यान आदी करीत असतात. (३०)

येक सकळांचा अंतरात्मा । विश्वीं वर्ते जो विश्वात्मा ।
द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा । मानिती येक ॥ ३१ ॥
तर काही लोक या जगातील सर्व जीवांचा तो अंतरात्मा आहे, या जगात जो विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, ज्ञानात्मा म्हणून ओळखला जातो, त्या एकाला मानतात आणि भजतात. (३१)

येक ते निर्मळ निश्चळ । कदापी नव्हेति चंचळ ।
अनन्यभावें केवळ । वस्तुच ते ॥ ३२ ॥
तर काही लोक निर्मळ, निश्चल अशा परब्रह्म वस्तूलाच अनन्यभावाने भजतात. त्यांची त्या अचळ परब्रह्माच्या ठिकाणी अचल निष्ठा असते. त्यामुळे ते केवळ वस्तुरूपच होऊन राहतात. (३२)

येक नाना प्रतिमा । दुसरा अवतारमहिमा ।
तिसरा तो अंतरात्मा । चौथा तो निर्विकारी ॥ ३३ ॥
याप्रमाणे नाना प्रतिमा हा एक प्रकार, दुसरा प्रकार अवतारमहिमा, तिसरा प्रकार अंतरात्मा, आणि चौथा प्रकार निर्विकार परब्रह्म. (३३)

ऐसे हे चत्वार देव । सृष्टीमधील स्वभाव ।
यावेगळा अंतर्भाव । कोठेंचि नाहीं ॥ ३४ ॥
असे हे चार प्रकारचे देव सांगितले जातात. ह्या चार प्रकारांखेरीज इतर कुठलाही प्रकार या सृष्टीत आढळून येत नाही. (३४)

अवघें येकचि मानिती । ते साक्ष देव जाणती ।
परंतु अष्टधा प्रकृति । वोळखिली पाहिजे ॥ ३५ ॥
कुणी एकच प्रकार साक्षी देवाचा जाणतात. पण हे सर्व अष्टधा प्रकृतीतच आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. (३५)

प्रकृतीमधील देव । तो प्रकृतीचा स्वभाव ।
भावातीत माहानभाव । विवेकें जाणावा ॥ ३६ ॥
अष्टधा प्रकृतीमधील देव हा प्रकृतीच्याच स्वभावाचा म्हणजे मायिकच असतो. म्हणून भावातीत जो खरा देव तो श्रेष्ठ पुरुषाने विवेकाने जाणून घ्यावा. (३६)

जो निर्मळास ध्याईल । तो निर्मळचि होईल ।
जो जयास भजेल । तो तद्रूप जाणावा ॥ ३७ ॥
जो निर्मळ, निश्चल अशा देवाचे ध्यान करील, तो स्वत:ही निर्मलच होईल, जो ज्याचे भजन करतो, तो त्याच्याशी तद्‌रूप होतो, हे जाणून घ्यावे. (३७)

क्षीर नीर निवडिती । ते राजहंस बोलिजेती ।
सारासार जाणती । ते माहानभाव ॥ ३८ ॥
क्षीरनीर एकत्र केले असता त्यातून पाणी सोडून दूध जे ग्रहण करतात, त्यांनाच राजहंस म्हटले जाते. तसे जे सारासार निवडून सार ग्रहण करतात, तेच आत्मसाक्षात्कारी पुरुष जाणावेत. (३८)

अरे जो चंचळास ध्याईल । तो सहजचि चळेल ।
जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥ ३९ ॥
अरे, जो चंचळाचे ध्यान करतो तो स्वत:ही चंचळच बनतो आणि जो निश्चलास भजेल तो निश्चलच होईल, हे जाणून घ्यावे. (३९)

प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरीं शाश्वत वोळखावें ।
सत्य होऊन वर्तावें । लोकांऐसें ॥ ४० ॥
सर्वसामान्य प्रापंचिकासारखे वर्तन असावे, पण अंतरांत शाश्वत आत्मवस्तूचे अनुसंधान असावे. स्वतः सत्य वस्तू होऊन लोकांमध्ये मात्र लोकांसारखेच वागावे. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चत्वारदेवनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'चत्वारदेवनिरूपणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : शिकवण निरूपण

॥ श्रीराम ॥

बहुतां जन्मांचा सेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नितिन्यायें ॥ १ ॥
अनेक जन्मांच्या शेवटी अचानक नरदेह लाभतो. म्हणून नरदेहात नीतिन्यायाने शुद्ध आचरण करून त्याचे सार्थक करावे. (१)

प्रपंच करावा नेमक । पाहावा परमार्थविवेक ।
जेणेंकरितां उभय लोक । संतुष्ट होती ॥ २ ॥
माणसाने प्रपंचही नीतिनियमाने वागून अगदी व्यवस्थित करावा आणि परमार्थासंबंधीही विचार करावा. असे केल्याने इहलोक आणि परलोक दोन्हीकडे सुख लागते. (२)

शत वरुषें वय नेमिलें । त्यांत बाळपण नेणतां गेलें ।
तारुण्य अवघें वेचलें । विषयांकडे ॥ ३ ॥
माणसाचे आयुष्य अंदाजे शंभर वर्षांचे मानले जाते. त्यातील बालपण तर अज्ञानातच निघून जाते आणि तारुण्य तर सगळे विषयभोग भोगण्यात खर्ची पडते. (३)

वृद्धपणीं नाना रोग । भोगणें लागे कर्मभोग ।
आतां भगवंताचा योग । कोणे वेळे ॥ ४ ॥
म्हातारपणी देह अनेक रोगांनी जर्जर होतो. प्रारब्धाप्रमाणे कर्मभोग भोगावेच लागतात. मग भगवंताची प्राप्ती करून घेण्यास वेळ तरी कसा मिळणार ? (४)

राजिक देविक उदेग चिंता । अन्न वस्त्र देहममता ।
नाना प्रसंगें अवचिता । जन्म गेला ॥ ५ ॥
राजकीय त्रास, दैविक ताप, उद्वेग, चिंता, अन्नवस्त्राची तरतूद करणे, देहममता आणि इतर अचानक ओढवणारे प्रसंग यात बघता बघता आयुष्य सरून जाते. (५)

लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती ।
जाणत जाणत निश्चिती । काये मानिलें ॥ ६ ॥
आजूबाजूला लोक मरतच असतात, वडील माणसेही जातात. हा अनुभव सतत येतच असतो, हे जाणून तरी निश्चिंत कसे राहावे ? (६)

अग्न गृहासी लागला । आणि सावकास निजेला ।
तो कैसा म्हणावा भला । आत्महत्यारा ॥ ७ ॥
एखाद्या माणसाच्या घराला आग लागलेली असता त्याने बेसावधपणे खुशाल झोपून राहावे, तर त्याला शहाणा कोण म्हणेल ? त्याला आत्मघातकीच म्हणावे लागेल, (७)

पुण्यमार्ग अवघा बुडाला । पापसंग्रह उदंड जाला ।
येमयातनेचा झोला । कठीण आहे ॥ ८ ॥
जीवनात माणसाने काहीच पुण्य केले नाही आणि उदंड पापसंग्रहच केला, तर त्याला पुढे कठीण अशा यमयातनेच्या हल्ल्यास तोंड द्यावे लागते. (८)

तरी आतां ऐसें न करावें । बहुत विवेकें वर्तावें ॥
इक लोक परत्र साधावें । दोहीकडे ॥ ९ ॥
म्हणून आता असे करू नये. प्रपंच आणि परमार्थात दोन्हीकडे अत्यंत विवेकाने वागावे आणि इहलोकी आणि परलोकी आपले हित साधावे. (९)

आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे ।
सुख म्हणौन आवडे । आळसी लोकां ॥ १० ॥
जो कोणी अत्यंत आळशी असतो, त्याला त्याच्या आळसाचे फळ तत्काळ प्राप्त होते. असा माणूस जांभया देऊन खुशाल झोपी जातो. आळशी लोकांना अशा प्रकारे झोपून राहण्यातच सुख वाटते. (१०)

साक्षेप करितां कष्टती । परंतु पुढें सुरवाडती ।
खाती जेविती सुखी होती । येत्नेंकरूनी ॥ ११ ॥
जे कोणी कष्ट करतात, त्यांना पुढे सुख मिळते. प्रयत्नपूर्वक उद्योग केल्याने ते खाऊन-पिऊन सुखी होतात. (११)

आळस उदास नागवणा । आळस प्रेत्नबुडवणा ।
आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट करिती ॥ १२ ॥
आळसामुळे माणसाला कधी सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो. सर्व प्रकारे तो नागवला जातो. आळसामुळे प्रयत्न केलाच जात नाही आणि अखेर करंटेपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागतात. (१२)

म्हणौन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा ।
अरत्रीं परत्रीं जीवा । समाधान ॥ १३ ॥
म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आळस सोडून उद्योग केल्यानेच वैभव प्राप्त होते आणि जीवाला इहलोकी आणि परलोकी समाधान प्राप्त होते. (१३)

प्रेत्न करावा तो कोण । हेंचि ऐका निरूपण ।
सावध करून अंतःकरण । निमिष्य येक ॥ १४ ॥
पण तो प्रयत्न कोणता करावा, याचे निरूपण आता क्षणभर चित्त एकाग्र करून सावधपणे ऐका. (१४)

प्रातःकाळी उठावें । कांहीं पाठांतर करावे ।
येथानशक्ती आठवावें सर्वोत्तमासी ॥ १५ ॥
रोज प्रात:काळी उठावे, नित्य काहीतरी पाठांतर करावे आणि यथाशक्ती सर्वोत्तमास आठवावे. (१५)

मग दिशेकडे जावें । जे कोणासिच नव्हे ठावें ।
शौच्य आच्मन करावें । निर्मळ जळें ॥ १६ ॥
मग गावाबाहेर लांब कोठेतरी शौचास जावे व स्वच्छ पाण्याने हातपाय धुऊन आचमन करावे. (१६)

मुखमार्जन प्रातःस्नान । संध्या तर्पण देवतार्चन ।
पुढें वैश्यदेवौपासन । येथासांग ॥ १७ ॥
नंतर तोंड धुऊन प्रात:स्रान करावे आणि संध्या, तर्पण, देवतार्चन करून यथासांग वैश्वदेव व उपासना करावी. (१७)

कांहीं फळाहार घ्याव । मग संसारधांदा करावा ।
सुशब्दें राजी राखावा । सकळ लोक ॥ १८ ॥
नंतर काही फलाहार घेऊन मग संसारासाठी आवश्यक तो उद्योग-धंदा करावा. सर्वांशी नेहमी गोड बोलून सर्वांना राजी राखावे. (१८)

ज्या ज्याचा जो व्यापार । तेथें असावे खबर्दार ।
दुश्चितपणें तरी पोर । वेढा लावी ॥ १९ ॥
ज्याचा जो काही व्यापार, धंदा असेल तो अत्यंत दक्षतेने, सावधपणे करावा. तेथे बेसावधपणा केल्यास एखादे पोरही फसवू शकेल, हे ध्यानी घ्यावे. (१९)

चुके ठके विसरे सांडी । आठवण जालियां चर्फडी ।
दुश्चित आळसाची रकडी । प्रचित पाहा ॥ २० ॥
जो माणूस चुकतो, फसतो, विसरतो, वस्तू वा पदार्थ हरवतो आणि नंतर आठवण आल्यावर चरफडतो त्याची फटफजिती होते. दुश्चितपणा व आळस यांच्या परिणामामुळे अशी प्रचीती येते. (२०)

याकारणें सावधान । येकाग्र असावें मन ।
तरी मग जेवितां भोजन । गोड वाटे॥ २१ ॥
म्हणून माणसाने अत्यंत सावध असावे. जे काही करायचे असेल ते मन एकाग्र करून करावे. अशा रीतीने उद्योगधंदा व्यवस्थित करून घरी आल्यावर भोजन केले असता ते गोड लागते. (२१)

पुढें भोजन जालियांवरी । कांहीं वाची चर्चा करी ।
येकांतीं जाऊन विवरी । नाना ग्रंथ ॥ २२ ॥
पुढे भोजन झाल्यावरही अनेक चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे, त्यावर चर्चा करावी. नंतर एकांतात त्यावर मनन, चिंतन करावे. (२२)

तरीच प्राणी शाहाणा होतो । नाहींतरी मूर्खचि राहातो ।
लोक खाती आपण पाहातो । दैन्यवाणा ॥ २३ ॥
याप्रमाणे केल्यानेच माणूस शहाणा होतो, नाहीतर तो मूर्खच राहतो. आणि मग लोक खात-पीत असताना त्यांच्याकडे आशाळभूतासारखा दैन्यवाणा होऊन पाहात राहतो. (२३)

ऐक सदेवपणाचें लक्षण । रिकाम्या जाऊं नेदी येक क्षण ।
प्रपंचवेवसायाचें ज्ञान । बरें पाहे ॥ २४ ॥
आता भाग्यवंताचे लक्षण सांगतो, ते ऐक. भाग्यवान असतो, तो एक क्षणभरही रिकामा बसून राहात नाही. आपल्या प्रपंचासाठी जो व्यवसाय करतो, त्याचे उत्तम ज्ञान तो संपादन करतो व सर्व वेळ सार्थकी लावतो. (२४)

कांहीं मेळवी मग जेवी । गुंतल्या लोकांस उगवी ।
शरीर कारणीं लावी । कांहीं तरी ॥ २५ ॥
काही ना काही कमावल्याशिवाय जो खात नाही व अडलेल्या-नडलेल्या लोकांना जो यथाशक्ती मदत करीत असतो, असा मनुष्य खरोखरच आपल्या देहाचे सार्थक करतो. (२५)

कांहीं धर्मचर्चा पुराण । हरीकथा निरूपण ।
वायां जऊं नेदी क्षण । दोहींकडे ॥ २६ ॥
तो रोज काही ना काही धर्मचर्चा करतो, पुराण श्रवण करतो आणि हरिकथा व अध्यात्मनिरूपण यात वेळ घालवतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो एक क्षणही वाया जाऊ देत नाही. (२६)

ऐसा जो सर्वसावध । त्यास कैंचा असेल खेद ।
विवेकें तुटला समंध । देहबुद्धीचा ॥ २७ ॥
असा जो सर्वकाळ सर्व विषयांबाबत अत्यंत सावध असतो त्यास खेद होईलच कसा ? सारासारविचाराने तो देहबुद्धीचा संबंध तोडून टाकतो. (२७)

आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।
मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥
जे काही आहे, ते सर्व देवाचे आहे, असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो व त्यास अनुसरून तो वागत असल्याने उद्वेगाचे मूळ कारणच नाहीसे होते. (२८)

प्रपंचीं पाहिजे सुवर्ण । परमार्थीं पंचिकर्ण ।
माहावाक्याचें विवरण । करितां सुटे ॥ २९ ॥
प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते, तर परमार्थासाठी पंचीकरण जाणून घेणे आवश्यक असते. यानंतर 'तत्त्वमसि' इत्यादी महावाक्यांचे मनन, निदिध्यासन म्हणजेच विवरण केले असता मोक्ष प्राप्त होतो. (२९)

कर्म उपासना आणि ज्ञान । येणें राहे समाधान ।
परमार्थाचें जें साधन । तेंचि ऐकत जावें ॥ ३० ॥
कर्म, उपासना आणि ज्ञान यांपैकी आपणांस रुचेल ते परमार्थ-साधन करावे. यांचेसंबंधी सतत श्रवण करावे, म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होते. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिकवणनिरूपणनाम समास तीसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवावे 'सिकवणनिरूपणनाम' समास तिसरा समाप्त.

GO TOP

समास चौथा : सारविवेकनिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्म म्हणिजे निराकार । गगनासारिखा विचार ।
विकार नाहीं निर्विकार । तेंचि ब्रह्म ॥ १ ॥
ब्रह्म हे निराकार असते. ते गगनासारखे असे म्हणता येईल, पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो आणि ब्रह्म हे पूर्ण निर्विकार असते. (१)

ब्रह्म म्हणिजे निश्चळ । अंतरात्मा तो चंचळ ।
द्रष्टा साक्षी केवळ । बोलिजे तया ॥ २ ॥
ब्रह्म हे निश्चल असते, तर अंतरात्मा हा चंचळ असतो. त्याला द्रष्टा अथवा केवळ साक्षी असे म्हणतात. (२)

तो अंतरात्मा म्हणिजे देव । त्याचा चंचळ स्वभाव ।
पाळिताहे सकळ जीव । अंतरी वसोनी ॥ ३ ॥
तो अंतरात्मा म्हणजेच देव होय. तो चंचळ स्वभावाचा असून सर्वांच्या अंत:करणात जाणीवरूपाने राहून सर्व जीवांचे पालन करतो. (३)

त्यावेगळे जड पदार्थ । तेणेंवीण देह वेर्थ ।
तेणेंचि कळे परमार्थ । सकळ कांही ॥ ४ ॥
त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात. त्याच्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. त्या अंतरात्म्याच्या योगे परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचे ज्ञान होते. (४)

कर्ममार्ग उपासना मार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । देवची चालवी ॥ ५ ॥
कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांतमार्ग, प्रवृत्तिमार्ग, निवृत्तिमार्ग सर्व काही देव म्हणजे अंतरात्माच चालवतो. (५)

चंचळेविण निश्चळ कळेना । चंचळ तरी स्थिरावेना ।
ऐसें हे विचार नाना । बरे पाहा ॥ ६ ॥
चंचळाशिवाय म्हणजेच अंतरात्म्याशिवाय निश्चल अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही आणि जे चंचळ असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावते. अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात, ते नीट जाणून घ्यावेत. (६)

चंचळनिश्चळाची संधी । तेथें भांबावते बुद्धि ।
कर्ममार्गाचे जे विधी । ते मग ऐलिकडे ॥ ७ ॥
चंचळ अंतरात्म्याकडून निश्चल परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधिकालात मध्येच शून्यत्वाचे विघ्न येते, तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते. म्हणून तो शून्यालाच परब्रह्म समजण्याचा संभव असतो. त्या स्थितीत कर्ममार्गाचे विधिनिषेध अलीकडेच राहतात. (७)

देव या सकळांचे मूळ । देवास मूळ ना डाळ ।
परब्रह्म तें निश्चळ । निर्विकारी ॥ ८ ॥
देव किंवा अंतरात्मा हाच सर्वांचे मूळ असला, तरी त्या देवाला मूळ ना शेंडा अशी स्थिती असते. फक्त परब्रह्म हेच निश्चल आणि निर्विकारी असते. (८)

निर्विकारी आणि विकारी। येक म्हणेल तो भिकारी ।
विचाराची होते वारी । देखतदेखतां ॥ ९ ॥
निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहेत, असे जो कुणी म्हणेल, तो विवेकाच्या दृष्टीने भिकारीच जाणावा, चंचळ आणि निश्चल एकच असल्याचा विचार सारासारविवेकाने नष्ट होतो. (९)

सकळ परमार्थास मूळ । पंचीकर्ण माहावाक्य केवळ ।
तेंची करावें प्रांजळ । पुनःपुन्हां ॥ १० ॥
पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व परमार्थाचे मूळ आहे, आधार आहे. म्हणून प्रांजळपणे त्याचे वारंवार मनन, निदिध्यासन करावे. (१०)

पहिला देह स्थूळकाया । आठवा देह मूळमाया ।
अष्ट देह निर्शलियां । विकार कैंचा ॥ ११ ॥
पिंडाचा पहिला देह म्हणजे आपले स्थूल शरीर होय. आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे मूळमाया होय, हे पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून आठ देहांचे विवेकाने निरसन केल्यावर विकार शिल्लक उरतोच कोठे ? (११)

याकारणें विकारी । साचाऐसी बाजीगरी ।
येक समजे येक खरी । मानिताहे ॥ १२ ॥
म्हणून सर्व दृश्य सृष्टी ही सतत बदलणारी असून ती गारुडीविद्येसारखी आभासमय असूनही खर्‍यासारखी वाटते. विवेकी लोक ती अशाश्वत, मिथ्या हे जाणतात, तर विवेकहीन लोक तिला खरी मानतात. (१२)

उत्पत्ति स्थिती संव्हार । यावेगळा निर्विकार ।
कळायासाठीं सारासार । विचार केला ॥ १३ ॥
उत्पत्ती, स्थिती, आणि संहार यांच्याही पलीकडे असलेले निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासारविचार केला पाहिजे. (१३)

सार असार दोनी येक । तेथें कैंचा उरला विवेक ।
परिक्षा नेणती तंक । पापी करंटे ॥ १४ ॥
सार आणि असार दोन्ही एकच असे मानले तर मग विवेकाला वावच उरत नाही. जे सार कोणते आणि असार कोणते याची परीक्षा निवड करणे जाणत नाहीत, ते विवेकहीन लोक पापी, रंक आणि भाग्यहीनच जाणावेत. (१४)

जो येकचि विस्तारला । तो अंतरात्मा बोलिला ।
नाना विकारीं विकारला । निर्विकारी नव्हे ॥ १५ ॥
जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नव्हे (१५)

ऐसें प्रगटचि आहे । आपुल्या प्रत्ययें पाहे ।
काय राहे काय न राहे । हें कळेना ॥ १६ ॥
हे सर्व खरे तर स्पष्टच आहे. आपल्या अनुभवासही येत असते. तरी सुद्धा काय शाश्वत आणि काय अशाश्वत हे कळत नाही. (१६)

जें अखंड होत जातें । जें सर्वदा संव्हारतें ।
रोकडें प्रचितीस येतें । जनामधें ॥ १७ ॥
जे अखंड निर्माण होते व नाश पावते, ज्याचा नेहमी संहार होतो, त्याची लोकांना रोकडी प्रचीती येतच असते. (१७)

येक रडे येक चर्फडी । येकांची धरी नरडी ।
येकमेकां झोंबती बराडी । दुकळ्ळले जैसे ॥ १८ ॥
कुणी एखादा रडत असतो, तर दुसरा कुणी एखादा चरफडत असतो. कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो, तर कुणी आशाळभूत दुष्काळातून आल्यासारखे एकमेकांशी झोंबू लागतात. (१८)

नाहीं न्यावे नाहिं नीति । ऐसे हे लोक वर्तती ।
आणि अवघेंच सार म्हणती । विवेकहीन ॥ १९ ॥
समाजात लोक न्यायनीती सोडून वागत असतात आणि तरीही विवेकहीन माणसे ह्या सर्व गोष्टीच सार आहेत असे म्हणतात. (१९)

धोंडे सांडून सोनें घ्यावें । माती सांडून अन्न खावें ।
आणि आवघेंचि सार म्हणावें । बाष्कळपणें ॥ २० ॥
सामान्य माणूसही धोंडे टाकून सोने घेतो, माती न खाता अन्न खातो, म्हणजे त्यालाही सार, असार कळते. आणि तरी बाष्कळपणाने सर्वच सार आहे, असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच होय. (२०)

म्हणौनि हा विचार करावा । सत्यमार्ग तोचि धरावा ।
लाभ जाणोन घ्यावा । विवेकाचा ॥ २१ ॥
म्हणून सारासारविचार करून सत्य मार्गाचाच अवलंब करावा आणि विवेकाने आपला लाभ करून घ्यावा. (२१)

सारगार येकचि सरी । तेथें परीक्षेस कैंची उरी ।
याकारणें चतुरीं । परीक्षा करावी ॥ २२ ॥
सार म्हणजे संपत्ती आणि गार म्हणजे गारगोटी दोन्ही सारखेच असे म्हटले तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. म्हणून शहाण्या माणसांनी वस्तूची नीट पारख करावी. (२२)

जेथें परीक्षेचा अभाव । तेथें दे घाव घे घाव ।
सगट सारिखा स्वभाव । लौंदपणाचा ॥ २३ ॥
जेथे परीक्षाच केली जात नाही, तेथे दोन दिले काय किंवा दोन घेतले काय, काहीच फरक पडत नाही. सरसकट सर्व मूर्खपणाचाच बाजार असतो. (२३)

घेव ये तेंचि घ्यावें । घेव न ये तें सोंडावें ।
उंच नीच वोळखावें । त्या नाव ज्ञान ॥ २४ ॥
घेण्यासारखे असेल तेच घ्यावे, जे घेण्यासारखे नसेल त्याचा त्याग करावा. चांगले काय, वाईट काय हे ओळखावे. यालाच ज्ञान असे म्हणतात. (२४)

संसारसांतेस आले । येक लाभें अमर जाले ।
येक ते करंटे ठकले । मुदल गेलें ॥ २५ ॥
संसाररूपी बाजारपेठेत आले असता काही लोक लाभ करून घेऊन देव होतात. पण काही भाग्यहीन नरदेहरूपी मूळ मुद्दलही घालवून बसतात. (२५)

जाणत्यानें ऐसें न करावें । सार तेंचि शोधून घ्यावें ।
असार तें जाणोन त्यागावें । वमक जैसें ॥ २६ ॥
म्हणून जाणत्याने म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असेल तेच निवडून घ्यावे, असार जे असेल ते जाणून त्याचा ओकारीप्रमाणे त्याग करावा. (२६)

तें वमक करी प्राशन । तरी तें स्वानाचें लक्षण ।
तेथें सुचिस्मंत ब्राह्मण । काय करी ॥ २७ ॥
कुत्र्याचा स्वभावच असा असतो की तो वमनच प्राशन करतो. पवित्र ब्राह्मणाने असे करावे काय ? (२७)

जेहिं जैसें संचित केलें । तयास तैसेंचि घडलें ।
जें अभ्यासीं पडोन जडलें । तें तों सुटेना ॥ २८ ॥
ज्याचे जसे पूर्वकर्म असेल, त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असते. ज्यांचा अनेक जन्मांत अभ्यास घडलेला असतो, ती लक्षणे सुटता सुटत नाहीत. (२८)

येक दिव्यान्नें भक्षिती । येक विष्ठा सावडिती ।
आपुल्या वडिलांचा घेती । साभिमान ॥ २९ ॥
काही दिव्यान्ने सेवन करतात, तर काही विष्ठाच चिवडत बसतात आणि वर अभिमानाने आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतो, असे म्हणतात. (२९)

असो विवेकेविण । बोलणें तितुका सीण ।
कोणीयेकें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ३० ॥
असो. ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, त्यास या गोष्टी सांगणे म्हणजे केवळ श्रम होय म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण-मनन करावे. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सारविवेकनिरूपणनाम समास चवथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'विवेकनिरूपणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : राजकारण निरूपण

॥ श्रीराम ॥

कर्म केलेंचि करावें । ध्यान धरिलेंचि धरावें ।
विवरलेंचि विवरावें । पुन्हा निरूपण ॥ १ ॥
पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे. ध्यानाभ्यासही नित्य करीतच जावा. तसेच अध्यात्मनिरूपणाचे विवरण सतत तेच तेच करीत असावे. (१)

तैसें आम्हांस घडलें । बोलिलेंचि बोलणें पडिलें ।
कां जें बिघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥
समर्थ म्हणतात की, आम्हालाही तसेच करावे लागत आहे. जे पूर्वी बोललो तेच परत परत बोलणे भाग पडत आहे. कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून दिले पाहिजे. (२)

अनन्य राहे समुदाव । इतर जनास उपजे भाव ।
ऐसा आहे अभिप्राव । उपायाचा ॥ ३ ॥
आपल्याभोवती जो लोकसमुदाय गोळा झाला आहे, त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्त्वाचे आहे. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू लोकशिक्षण हा आहे. (३)

मुख्य हरिकथा निरूपण । दुसरें तें राजकरण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषईं ॥ ४ ॥
लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत, ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्मनिरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुसद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. (४)

चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप ।
अन्याये थोर अथवा अल्प । क्ष्मा करीत जावे ॥ ५ ॥
चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे आणि इतरांचे आक्षेप यांचे निरसन त्याला करता आले पाहिजे. तसेच इतरांचे लहान-थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. (५)

जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर ।
नीतिन्यायासि अंतर । पडोंच नेदावें ॥ ६ ॥
तो लोकांच्या अंत:करणातील भाव जाणणारा असला पाहिजे. निरंतर तो अलिप्त असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याने नीतिन्याय सोडून वागता कामा नये. (६)

संकेतें लोक वेधावा । येकूनयेक बोधावा ।
प्रपंचहि सावरावा । येथानशक्त्याो ॥ ७ ॥
संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावे व लोकांना उपदेश करावा, शहाणे करावे आणि यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासही मदत करावी. (७)

प्रपंचसमयो वोळखावा । धीर बहुत असावा ।
संमंध पडों नेदावा । अति परी तयाचा ॥ ८ ॥

प्रपंचात वेळप्रसंगाचे भान ठेवावे. कठीण समयीही धीर सोडू नये. यथायोग्य ते सर्व करीत असताही प्रपंचात अधिक गुंतू नये. (८)

उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपडावें ।
नीचत्व पहिलेंच घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥
आपल्या कार्याचा व्याप वाढवावा, पण त्यात जास्त गुंतू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणाही घ्यावा. (९)

दोष देखोन झांकावे। अवगुण अखंड न बोलावे ।
दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥ १० ॥
दुसयाचे दोष दिसले तरी त्यावर पांघरूण घालावे. कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत. दुर्जनांशी गाठ पडली तर (त्यांना समज देऊन) त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावे. (१०)

तर्ह्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये ।
नव्हे तेंचि करावें कायें । दीर्घ प्रेत्नें ॥ ११ ॥
तर्‍हेवाईकपणे वागू नये. अडचणीत सापडले असता नाना उपाय योजून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्येही करून दाखवावीत. (११)

फड नासोंचि नेदावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणीयेकासी ॥ १२ ॥
समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांस सावरून धरावे. कुणाशीही अतिवाद करू नये. (१२)

दुसर्या चें अभिष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ।
न सोसे तरी जावें । दिगांतराप्रती ॥ १३ ॥
दुसऱ्यांचे मनोगत, इच्छित जाणून घ्यावे. अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे. जर ते सोसत नसेल तर तेथून लांब कुठे तरी निघून जावे. (१३)

दुखः दुसयाचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें ।
बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ १४ ॥
दुसऱ्याचे दु:ख जाणावे आणि ते सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे. आपल्या समुदायाचे बरे वाईट सहन करावे. (१४)

अपार असावें पाठांतर । सन्निधचि असावा विचार ।
सदा सर्वदा तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥
खूप पाठांतर असावे. नेहमी विचारपूर्वक वागावे. तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे.(१५)

शांती करून करवावी । तर्ह्हे सांडून सांडवावी ।
क्रिया करून करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥
स्वतः अत्यंत शांत राहावे व इतरांनाही शांत करावे. आपण तर्‍हेवाईकपणाने वागू नये व इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत असावे व अनेक लोकांकडूनही करवून घ्यावे. (१६)

करणें असेल अपाये । तरी बोलोन दाखऊं नये ।
परस्परेंचि प्रत्यये । प्रचितीस आणावा ॥ १७ ॥
कुणाला अपाय करायचाच असला, तर तो बोलून दाखवू नये. परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याला प्रत्यय आणून द्यावा. (१७)

जो बहुतांचे सोसीन । त्यास बहुतेक लोक मिळेना ।
बहुत सोसितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥
जो अनेक लोकांचे बोलणे, वागणे सहन करीत नाही, त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त सोशीकपणाही दाखवू नये. नाहीतर आपले महत्त्वच राहत नाही. (१८)

राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें ।
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥
मुत्सद्देगिरीने वागावे. पण आपण काय करतो याचा कुणालाही थांगपत्ता लागू देऊ नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. (१९)

लोक पारखून सांडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।
पुन्हा मेळऊन घ्यावें । दुरील दोरे ॥ २० ॥
लोकांची नीट पारख करावी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा व परत त्यांना युक्ती-प्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे. (२०)

हिरवटासी दुरी धरावें । कचरटासी न बोलावें ।
समंध पडता सोडून जावें । येकीकडे ॥ २१ ॥
हिरवटाला लांब ठेवावे. भीतिग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नयेत, अशा माणसांशी संबंध आल्यास तेथून दुसरीकडे निघून जावे. (२१)

ऐसें असो राजकारण । सांगतां तें असाधारण ।
सुचित अस्तां अंतःकरण । राजकारण जाणे ॥ २२ ॥
असो. राजकारण हे अशा प्रकारचे असते. त्याचे वर्णन करून सांगणे अवघड आहे. ज्याचे अंत:करण एकाग्र होऊ शकते, तोच राजकारण जाणू शकतो. (२२)

वृक्षीं रूढासी उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें ।
कारबाराचें सांगावें । आंग कैसें ॥ २३ ॥
भीतिग्रस्त असेल त्याला धीर द्यावा व युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही. कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतिग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावे लागते, तर केव्हा शूरास जास्तच चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते. (२३)

पाहातां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना ।
आलें वैभव अभिळासीना । कांहीं केल्यां ॥ २४ ॥
जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू जावे, तर तो सापडत नाही. पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवायही तो राहात नाही. बरे, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. (२४)

येकांची पाठी राखणें । येकांस देखो न सकणें ।
ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥
एखाद्याची पाठराखणे, आणि कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नव्हेत. (२५)

न्याय बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना ।
येथें कांहींच चालेना । त्यागेंवीण ॥ २६ ॥
न्याय्य असेल ते सांगू लागले असता जो ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावे तर ते ज्याच्या मनास येत नाही, अशा माणसापढे काही उपाय चालत नाही. त्याचा त्यागच करावा लागतो. (२६)

श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणौन बोलिलेंचि बोलिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥
श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते, तरी श्रोत्यांनी अधिक-उणे काही बोलले गेले असेल, त्याबद्दल क्षमा केली पाहिजे. (२७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
राजकारणनिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'राजकारणनिरूपणनाम' समास पाचवा समाप्त.

GO TOP

समास सहावा : महंत लक्षण

॥ श्रीराम ॥

शुद्ध नेटकें ल्याहावें । लेहोन शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥
जो महंत असेल त्याने शुद्ध लिहावे, नीटनेटके लिहावे. लिहून झाल्यावर त्यातील अशुद्ध शोधून काढून ते शुद्ध करावे व अशा रीतीने तपासून शुद्ध केल्यावर ते व्यवस्थित शद्ध वाचावे. या सर्व बाबतीत चुका करू नयेत. (१)

विश्कळित मात्रुका नेमस्त कराव्या । धाट्या जाणोन सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥
विस्कळित काना-मात्रा तपासून व्यवस्थित कराव्यात. लेखनाची जी शैली एकदा स्वीकारली असेल तीच सुदृढ धरावी. लिहिताना कथा-प्रसंगाच्या अनुरोधाने मध्ये मध्ये सुंदर चित्रे काढून ती उत्तम प्रकारे रंगवावीत. (२)

जाणायाचें सांगतां न ये । सांगायाचें नेमस्त न ये ।
समजल्याविण कांहींच न ये । कोणीयेक ॥ ३ ॥
- ज्याला जे जाणायचे ते नीट सांगता येत नाही, जे सांगायचे असेल ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही किंवा ज्याला काहीच नीट समजत नाही, असा माणूस महंत होऊ शकत नाही. (३)

हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण ।
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥
महंतास हरिकथा व अध्यात्मनिरूपण करणे चांगल्या प्रकारे येणे आवश्यक आहे. तसेच नेमस्तपणे राजकारण करणेही त्याला यावयास हवे. त्याचे आचरणही उत्तम असायलाच हवे. (४)

पुसों जाणे सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे ।
सकळिकांचें राखों जाणे । समाधान ॥ ५ ॥
कुणाला काय विचारावे, कुणाला काय सांगावे, ग्रंथातील मजकुराचा अचूक अर्थ करणे, हे सर्व महंतास आले पाहिजे. सर्वांचे मन राखून त्यांचे समाधान करणे त्याला जमायला हवे. (५)

दीर्घ सूचना आधीं कळे । सावधपणें तर्क प्रबळे ।
जाणजाणोनि निवळे । येथायोग्य ॥ ६ ॥
पुढे काय घडणार याची ज्याला आधी कल्पना येते आणि जो सावधपणे त्याच्याविषयी तर्क करून त्या वेळी कसे वागावे याचा यथायोग्य निश्चय करू शकतो, तोच महंत होण्यास लायक ठरतो. (६)

ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिमंत ।
यावेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ ७ ॥
अशा प्रकारे जो सर्व गोष्टी जाणतो, तोच बुद्धिमान महंत होय. याखेरीज जे इतर सर्व काही ते नाशिवंत जाणावे. (७)

ताळवेळ तानमानें । प्रबंद कविता जाड वचनें ।
मज्यालसी नाना चिन्हें । सुचती तया ॥ ८ ॥
ज्याला काळवेळ यांची योग्य समज आहे, जो प्रबंध, काव्य करणे व सुभाषिते उच्चारणे यात प्रवीण असून, ज्याच्या अंगी सभाधीटपणा असतो व ज्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात; (८)

जो येकांतास तत्पर । आधीं करी पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भींचें ॥ ९ ॥
जो एकांताविषयी तत्पर असतो, आधी खूप पाठांतर करून नंतर जो अर्थाचा शोध घेऊन ग्रंथांतील सार ग्रहण करतो; (९)

आधींच सिकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ १० ॥
जो एखादी विद्या अथवा कला आधी स्वतः शिकून मग लोकांना शिकवतो, तोच श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो. असा महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना सोडवतो. (१०)

अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करून दावी ॥ ११ ॥
त्याचे अक्षर सुंदर असते, वाचणे सुंदर असते, बोलणे सुंदर असते, चालणे सुंदर असते. त्याची भक्ती, त्याचे ज्ञान आणि त्याचे वैराग्यही सुंदर असून त्यास अनुसरून त्याचे वागणे असते. (११)

जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगीं पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥
त्याला नेहमी प्रयत्न करणेच आवडते, जो कठीण प्रसंगी धैर्याने उभा ठाकतो, धीटपणे आल्या प्रसंगाला उघडपणे तोंड देतो, कधीही दडून बसत नाही. (१२)

सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे ।
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥ १३ ॥
संकटसमयी कसे वागावे हे तो यथार्थपणे जाणतो, तो लोकसंग्रहही करू शकतो आणि त्याच वेळी स्वत:स त्यापासून अलिप्त कसे राखावे हेही जाणतो. (१३)

आहे तरी सर्वां ठाईं । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाईं । गुप्त जाला ॥ १४ ॥
तसे बघितले तर तो सर्वांठायी असतो, पण बारकाईने विचार केला असता तो कोठेच गुंतलेला नाही हे कळून येते. अंतरात्मा जसा प्रत्येकाच्या हृदयातच असतो, पण गुप्त असतो. (१४)

त्यावेगळें कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणीमात्रांसी ॥ १५ ॥
खरे तर अंतरात्म्याशिवाय काहीच खरे नाही, पण त्यास पाहू जावे तर तो दिसत नाही, पण दिसत नसूनही तोच सर्व प्राणिमात्रांना चालवत असतो. (१५)

तैसाच हाहि नानापरी । बहुत जनास शाहाणे करी ।
नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥
तसाच महंत हाही नाना प्रकारे अनेक लोकांना शहाणे करून सोडतो. लौकिक विद्या, अध्यात्मविद्या व इतरही नाना विद्या यांचे विवरण तो करतो. (१६)

आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि सोये धरिती ।
जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥
जे आपले कल्याण इच्छितात, ते स्वाभाविकच अशा महंताचा आश्रय घेतात. ज्ञानाची महती ही अशी थोर आहे. (१७)

राखों जाणें नीतिन्याय । न करी न करवी अन्याये ।
कठीण प्रसंगीं उपाये । करूं जाणे ॥ १८ ॥
महंत नीतिन्यायाने वागतो, स्वतः कधी अन्याय करत नाही अथवा दुसर्‍याकडूनही करवीत नाही. कठीण प्रसंगी काय उपाय योजावा, हेही तो अचूक जाणतो. (१८)

ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥
अशा लक्षणांचा जो पुरुष असतो, तो अनेक जणांचा आधार ठरतो. रामदास म्हणतात की, रघुनाथाच्या अंगी असणारा हा गुण महंताने घ्यावा. (१९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
महंतलक्षणनिरूपणनाम समास सहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'महंतलक्षणनाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : चंचळ नदीनिरूपणनाम

॥ श्रीराम ॥

चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा ।
प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥
या समासात समर्थांनी मायेचे नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केले आहे. ते म्हणतात की, विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचळ अशी महानदी आहे. तीतील ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे. या वचनाची श्रोत्यांनी प्रचीती घेऊन पाहावी, म्हणजे हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल. (१)

केवळ अचंचळीं निर्माण जाली । अधोमुखें बळें चालिली ।
अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणीं ॥ २ ॥
ही चंचळ महानदी केवळ निश्चल अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख वाहात जाते. ती अखंड वाहतच असते आणि तरी तिला कोणीच पाहू शकत नाही. (२)

वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे ।
लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ॥ ३ ॥
या महानदीत अनेक वळणे, वाकणे, भोवरे आहेत. उकळ्या, तरंग, झरे आहेत, दलदल आहे. उसळणार्‍या लाटा आहेत. खडकामुळे ती ठायी ठायी दुभंगली जाते. (३)

शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥
कित्येक ठिकाणी तिचे पात्र अगदी कोरडे पडलेले असते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत कोसळत असतो. काही ठिकाणी पात्र अगदी अरुंद असते. काही ठिकाणी खूप रुंदही असते. काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहात असतो. असे हे पाणी अत्यंत चंचळ, चपळ असते. (४)

फेण फुगे हेलावे । सैरावैरा उदक धावे ।
थेंब फुई मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥
कित्येक ठिकाणी त्यावर फेस येतो, तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात. नदीचे उदक सैरावैरा सर्वत्र धावत असते. त्यातील थेंब, तुषार आणि असंख्य अणूरेणू यांची मोजदाद, गणती कोण करू शकेल ? (५)

वोसाणे वाहती उदंड । झोतावे दर्कुटे दगड ।
खडकें बेटें आड । वळसा उठे ॥ ६ ॥
प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ, केरकचरा वगैरे वाहात येतात. अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात. लहान-मोठे दगड, खडक आणि बेटे यांनी पाणी दुभंगले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते. (६)

मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या ।
ठाईं ठाईं उदंड पाहिल्या । सृष्टीमधें ॥ ७ ॥
मऊ जमिनी वाहून जातात, म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहांत वाहात जातात, तर कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसेच राहातात. असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते. (७)

येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले ।
येक सांकडींत आडकले । अधोमुख ॥ ८ ॥
काही लोक या मायानदीत वाहातच गेले, कुणी भोवर्‍यात अडकले, तर काही अधोमुख होऊन कडेकपारीत अडकले. (८)

येक आपटआपटोंच गेली । येक चिरडचिर्दोंच मेलीं ।
कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥
एक आपटत आपटतच खलास झाले, तर कुणी चिरडून चिरडून मेले. तर कित्येकांच्या पोटांत पाणी भरल्याने ते फुगून गेले. म्हणजे कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. (९)

येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरूप ॥ १० ॥
काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक मात्र पोहत पोहत लौकिक प्रवाहाच्या उलट जाऊन उगमास पोहोचले म्हणजे परब्रह्माकडे पोहोचले. त्याच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते त्या परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. (१०)

तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें ।
उफराटी गंगा पाहातां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥
याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेस जे जातात, त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने व ब्रह्मांड देवतांची स्थाने यांचे दर्शन घडते. (११)

त्या जळाऐसें नाही निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ ।
आपोनारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥
त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते, ते अत्यंत निर्मळ असते, पण चंचळही असते. त्यालाच आपोनारायण असेही म्हणतात. (१२)

माहानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकाळीं ।
स्वर्गमृत्युपाताळी । पसरली पाहा ॥ १३ ॥
ही महामायारूपी नदी अंतराळात म्हणजे चिदाकाशात परब्रह्म स्वरूपात सर्वकाळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकांत पसरलेली आहे. (१३)

अधोर्ध अष्टहि दिशा । तिचें उदक करी वळसा ।
जाणते जाणती जगदीशा । सारिखीच ते ॥ १४ ॥
खाली-वर, सर्वत्र, आठ दिशांना या मायानदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदीशासारखीच आहे असे जाणतात. (१४)

अनंत पात्रीं उदक भरलें । कोठें पाझपाझरोंच गेलें ।
कितीयेक तें वेचलें । संसारासी ॥ १५ ॥
अनेक पात्रांत म्हणजे प्राणिमात्रांत या मायानदीचे उदक म्हणजे अहंभाव भरलेला असतो. पण काही पात्रांतून मात्र ते पाझरून पाझरून नाहीसे होते. (म्हणजे साधुसंत आदींचा अहंभाव मात्र वाहून जाऊन नाहीसा झालेला असतो.) कित्येक त्या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात. (१५)

येक्यासंगे तें कडवट । येक्यासंगें तें गुळचट ।
येक्यासंगे ते तिखट । तुरट क्षार ॥ १६ ॥
जसे पात्र असेल तसे ते उदक बनते. कडवटाबरोबर कडवट, गुळचटाबरोबर गुळचट, तर तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट, तर क्षाराबरोबर क्षार बनते. (१६)

ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे ।
सखोले भूमीस तुंबळे । सखोलपणें ॥ १७ ॥
ज्या ज्या पदार्थात ते मिसळले जाते त्याच्याशी ते तद्‌रूप होते. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून राहते. (१७)

विषामधें विषचि होतें । अमृतामधें मिळोन जाते ।
सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥
विषामध्ये ते विषच होते. अमृतात एकजीव होऊन अमृत बनते. सुगंधी पदार्थाच्या योगे सुगंधी, तर दुर्गंधी पदार्थाच्या योगे दुर्गंधी बनते. (१८)

गुणीं अवगुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे ।
त्या उदकाचा महिमा न कळे । उदकेंविण ॥ १९ ॥
गुणात गुणी, अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होते. त्या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा उदकाशिवाय म्हणजेच विद्यामायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. (१९)

उदक वाहे अपरंपार । न कळे नदी कीं सरोवर ।
जळवास करून नर । राहिले कितीयेक ॥ २० ॥
उदक इतके अपरंपार वाहात असते की नदी आहे की सरोवर आहे हेही कळत नाहीसे होते. त्यांत कित्येक माणसे जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहातात. (२०)

उगमापैलिकडे गेले । तेथें परतोन पाहिलें ।
तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ॥ २१ ॥
जे उगमापलीकडे जातात, म्हणजे मायेपलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोहोचतात, त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्व पाणीच आटून गेलेले दिसते. तेथे पाणीच नाही, काहीही नाही, असा अनुभव त्यांना येतो. (२१)

वृत्तिसुन्य योगेश्वर । याचा पाहावा विचार ।
दास म्हणे वारंवार । किती सांगों ॥ २२ ॥
मीपणाविरहित जे साक्षात्कारी योगेश्वर त्यांचा अनुभव असा असतो. यासंबंधी श्रोत्यांनी विचार करावा. रामदास म्हणतात की, वारंवार तीच गोष्ट किती म्हणून सांगावी ? (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चंचळ नदीनिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'चंचळनदीनिरूपणनाम' समास सातवा समाप्त.

GO TOP

समास आठवा : अंतरात्माविवरण

॥ श्रीराम ॥

आतां वंदूं सकळकर्ता । समस्त देवांचा जो भर्ता ।
त्याचे भजनीं प्रवर्ता । कोणीतरी ॥ १ ॥
आता सर्व विश्वाचा कर्ता आणि सर्व देवांचा जो देव त्याला आधी वंदन करू या. श्रोतेहो, कोणीतरी त्या देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा. (१)

तेणेंविण कार्य न चले । पडिलें पर्ण तेंहि न हाले ।
अवघें त्रैलोक्येचि चाले । जयाचेनी ॥ २ ॥
त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. गळून पडलेले पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. त्याच्या सत्तेनेच सर्व त्रैलोक्यातील कार्य चालते. (२)

तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा ।
चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥
तो देव, दानव, मानव यांचा, तसेच चार खाणी, चारी वाणी यांचा प्रवर्तक असून त्यालाच सर्वांचा अंतरात्मा असे म्हणतात. (३)

तो येकलाचि सकळां घटीं । करी भिन्नभिन्ना राहाटी ।
सकळ सृष्टीची गोष्टी । किती म्हणोन सांगावी ॥ ४ ॥
तोच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करवितो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्या योगेच होत असल्याने किती म्हणून वर्णन करणार ? (४)

ऐसा जो गुप्तेश्वर । त्यास म्हणावें ईश्वर ।
सकळ ऐश्वर्य थोर थोर । जयाचेनि भोगिती ॥ ५ ॥
असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा सर्वांचा चालक त्यालाच ईश्वर असे म्हणावे. त्याच्या योगेच थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. (५)

ऐसा जेणें वोळखिला । तो विश्वंभरचि जाला ।
समाधी सहजस्थितीला । कोण पुसे ॥ ६ ॥
अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो, तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मारामच बनतो, तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल ? (६)

अवघें त्रैलोक्य विवरावें । तेव्हां वर्म पडेल ठावें ।
आवचटें घबाड सिणावें । नलगेचि कांहीं ॥ ७ ॥
सर्व दृश्य सृष्टीचे सारासारविवेकाने विवरण, निरसन करावे, तेव्हाच अचानक वर्म कळून येते. अचानक आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाहीत. (७)

पाहातां ऐसा कोण आहे । जो अंतरात्मा विवरोन पाहे ।
अल्प स्वल्प कळोन राहे । समाधानें ॥ ८ ॥
प्रत्यक्ष स्वरूपानुभव येईपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाच असतो. बहुतेक लोक अल्प-स्वल्प ज्ञानानेच समाधान मानतात. (८)

आरे हें पाहिलेंच पाहावें । विवरलेंचि मागुतें विवरावें ।
वाचिलेंचि वाचावें । पुन्हापुन्हा ॥ ९ ॥
बाबांनो, असे एवढ्या-तेवढ्यावर समाधान मानू नका. अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा. पूर्वी त्यासंबंधी वाचलेले असेल तरी परत परत वाचून चिंतन करा. (९)

अंतरात्मा केवढा कैसा । पाहाणाराची कोण दशा ।
देखिल्या ऐकिल्या ऐसा । विवेक सांगे ॥ १० ॥
अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते, याबद्दल ज्याने जेवढे ऐकले किंवा पाहिले असेल तेवढेच तो सांगतो. (१०)

उदंड ऐकिलें देखिलें । अंतरात्म्यास नवचे पुरविलें ।
प्राणी देहधारी बाउलें । काय जाणे ॥ ११ ॥
पण उदंड ऐकले आणि पाहिले तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्म्यास कसा जाणणार ? (११)

पूर्णास अपूर्ण पुरेना । कां जें अखंड विवरेना ।
विवरतां विवरतां उरेना । देवावेगळा ॥ १२ ॥
अंतरात्मा हा चंचळ, अपूर्ण असल्याने तो पूर्ण निश्चल परब्रह्म केव्हाही होणार नाही, पण हे कळत नाही; कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो, तो मग देवापासून वेगळा उरतच नाही. तो एकरूप होऊन जातो. (१२)

विभक्तपणें नसावें । तरीच भक्त म्हणवावें ।
नाहींतरी वेर्थचि सिणावें । खटाटोपें ॥ १३ ॥
जो याप्रमाणे एकरूप होतो, विभक्तपणे उरतच नाही, त्यालाच भक्त म्हणवून घेणे शोभते. याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जे प्रयत्न करावे तो केवळ शीणच होय. (१३)

उगाच घर पाहोन गेला । घरधनी नाहीं वोळखिला ।
राज्यामधूनचि आला । परी राजा नेणे ॥ १४ ॥
एखादा माणूस जाऊन उगाच नुसते घर पाहून आला आणि घरमालकाला भेटलाच नाही किंवा कुणी एखाद्या राज्यात जाऊन आला, पण राजालाच त्याने जाणले नाही. (१४)

देहसंगें विषये भोगिले । देहसंगें प्राणी मिरवलें ।
देहधर्त्यास चुकलें । नवल मोठें ॥ १५ ॥
त्याप्रमाणे माणसांची स्थिती असते. ते देहाच्या योगे विषयोपभोग भोगतात, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात, पण देह धारण करणारा जो अंतरात्मा त्यास मात्र जाणत नाहीत, ही मोठी नवलाची गोष्ट आहे. (१५)

ऐसे लोक अविवेकी । आणि म्हणती आम्ही विवेकी ।
बरें ज्याची जैसी टाकी । तैसें करावें ॥ १६ ॥
याप्रमाणे लोक विवेकहीन असतात, पण स्वत:ला मोठे विवेकी म्हणवतात. असो. ज्याची जशी कुवत असेल, तसा तो वागतो. (१६)

मूर्ख अंतर राखों नेणे । म्हणौन असावें शाहाणे ।
ते शाहाणेहि दैन्यवाणे । होऊन गेले ॥ १७ ॥
मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यास जाणत नाही. म्हणून माणसाने शहाणे असावे. पण जगात मात्र असे दिसून येते की, जे स्वतःस शहाणे समजतात, तेही त्यांच्या अंतरात्म्यास जाणत नसल्याने दैन्यवाणेच असतात. (१७)

अंतरीं ठेवणें चुकलें । दारोदारीं धुंडूं लागलें ।
तैसें अज्ञानास जालें । देव न कळे ॥ १८ ॥
आपल्या अंतरातच आत्मवस्तुरूपी ठेवा असून, ते त्याच्या शोधासाठी दारोदार हिंडतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. (१८)

या देवाचें ध्यान करी । ऐसा कोण सृष्टीवरी ।
वृत्ती येकदेंसी तर्तरी । पवाडेल कोठें ॥ १९ ॥
अनंत अशा अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे ? माणसाची वृत्ती एकदेशी असते. तिची शक्ती मर्यादित असते. (१९)

ब्रह्मांडीं दाटले प्राणी । बहुरूपें बहुवाणी ।
भूगर्भीं आणि पाषाणीं । कितीयेक ॥ २० ॥
या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झाली आहे. त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक भाषा आहेत, एवढेच नव्हे, तर भूगर्भात आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत. (२०)

इतुके ठाईं पुरवला । अनेकीं येकचि वर्तला ।
गुप्त आणि प्रगटला । कितीयेक ॥ २१ ॥
इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि या अनेकांच्या ठिकाणी जो एकच वर्तत असतो, तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो, तर काही ठिकाणी प्रगट असतो. (२१)

चंचळें न होईजे निश्चळ । प्रचित जाणावी केवळ ।
चंचळ तें नव्हे निश्चळ । परब्रह्म तें ॥ २२ ॥
जोपर्यंत माणूस चंचळाच्या सत्तेत वावरत असतो तोपर्यंत तो निश्चल अशा परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही, हे केवळ अनुभवाने जाणून घ्यावे. चंचळ अंतरात्मा आणि निश्चल परब्रह्म एक म्हणता येणार नाही. (२२)

तत्वें तत्व जेव्हां उडे । तेव्हां देहबुद्धि झडे ।
निर्मळ निश्चळ चहुंकडे । निरंजन ॥ २३ ॥
तत्त्वाने तत्त्वांचे जेव्हा निरसन होते, तेव्हा 'मी देह' ही देहबुद्धी नष्ट होते. आणि मग चहूकडे निर्मळ, निश्चल, निरंजन असे परब्रह्मच ओतप्रोत कोंदटलेले आहे, अशी अनुभूती येते. (२३)

आपण कोण कोठें कैंचा । ऐसा मार्ग विवेकचा ।
प्राणी जो स्वयें काचा । त्यास हें कळेना ॥ २४ ॥
पण हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण, मी कसा आहे, कोठून आलो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जो प्राणी स्वत: अर्धवट असतो, त्याला हे कळत नाही. (२४)

भल्यानें विवेक धरावा । दुस्तर संसार तरावा ।
अवघा वंशचि उधरावा । हरिभक्ती करूनी ॥ २५ ॥
म्हणून भल्या माणसाने सारासारविवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तरून जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अंतरात्माविवरणनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'अंतरात्माविवरणनाम' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : उपदेश निरूपण

॥ श्रीराम ॥

आधीं कर्माचा प्रसंग । कर्म केलें पाहिजे सांग ।
कदाचित पडिले व्यंग । तरी प्रत्यवाय घडे ॥ १ ॥
प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावेच लागते. म्हणून कर्म जे करायचे ते व्यवस्थितपणे केले पाहिजे. त्यात काही न्यूनता राहिली तर दोष लागतो. (१)

म्हणौन कर्म आरंभिले । कांहींयेक सांग घडलें ।
जेथजेथें अंतर पडिलें । तेथें हरिस्मरण करावें ॥ २ ॥
म्हणून एखादे कर्म आरंभले असता ते काही प्रमाणात यथासांग घडले, पण काही ठिकाणी त्यात चूक झाली, तर तेथे हरिस्मरण करावे. (२)

तरी तो हरी आहे कैसा । विचार पाहावा ऐसा ।
संधेपूर्वीं जगदीशा । चोविसां नामीं स्मरवें ॥ ३ ॥
पण ज्याचे स्मरण करावयाचे तो हरी आहे तरी कसा याचाही विचार करणे आवश्यक आहे. संध्या करण्यापूर्वी त्या जगदीशाची चोवीस नामे घेऊन त्याचे स्मरण करावे. (३)

चोवीसनामी सहस्त्रनामी । अनंतनामी तो अनामी ।
तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
ज्याची ती चोवीस नामे आहेत, एवढेच नव्हे, तर सहस्र नामेच काय पण अनंत नामे आहेत, तो वास्तविक नामरूपातीत आहे, हे आपण विवेकाने आपल्या अंतर्यामी ओळखावे. (४)

ब्राह्मण स्नानसंध्या करून आला । मग तो देवार्चनास बैसला ।
येथासांग तो पूजिला । प्रतिमादेवो ॥ ५ ॥
ब्राह्मण स्‍नान-संध्या करून येतो आणि नंतर देवतार्चनास बसतो, त्या वेळी देव म्हणून तो यथासांग प्रतिमेचे पूजन करतो. (५)

नाना देवांच्या नाना प्रतिमा । लोक पूजिती धरून प्रेमा ।
ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा । कैसा आहे ॥ ६ ॥
नाना देवांच्या नाना प्रतिमा असतात. लोक प्रेमाने त्या प्रतिमांची पूजाही करतात. पण ज्याच्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो परमात्मा आहे तरी कसा, हे जाणून घेतले पाहिजे. (६)

ऐसें वोळखिलें पाहिजे । वोळखोन भजन कीजे ।
जैसा साहेब नमस्कारिजे । वोळखिल्याउपरी ॥ ७ ॥
याप्रकारे त्या परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून मग त्याचे भजन-पूजन केले पाहिजे. जसे मालक कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यास आपण नमस्कार करतो. (७)

तैसा परमात्मा परमेश्वर । बरा वोळखावा पाहोन विचार ।
तरीच पाविजे पार । भ्रमसागरचा ॥ ८ ॥
त्याप्रमाणे विचार करून परमात्मा, परमेश्वर कसा आहे हे जाणून घेतले, तरच या भ्रमरूपी भवसागराच्या पार जाता येते. (८)

पूजा घेताती प्रतिमा । आंगा येतो अंतरात्मा ।
अवतारी तरी निजधामा । येऊन गेले ॥ ९ ॥
प्रतिमांची पूजा केली तरी ती अंतरात्म्यास पावते. भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून परत निजधामास जातात. (९)

परी ते निजरूपें असती । तें निजरूप ते जगज्जोती ।
सत्वगुण तयेस म्हणती । जाणती कळा ॥ १० ॥
पण ते निजरूपाने असतातच आणि ते निजरूप म्हणजेच जगज्ज्योती होय. शुद्ध सत्त्वगुण किंवा जाणती कळा असेही तिला म्हणतात. (१०)

तये कळेचे पोटीं । देव असती कोट्यान्-कोटी ।
या अनुभवाच्या गोष्टी । प्रत्ययें पाहाव्या ॥ ११ ॥
त्या जाणती कळेच्या म्हणजेच जगज्ज्योतीच्या पोटीच कोट्यनुकोटी देव असतात. या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पाहावा. (११)

देहपुरामधें ईश । म्हणोन तया नांव पुरुष ।
जगामधें जगदीश । तैसा वोळखावा ॥ १२ ॥
या देहरूपी पुरामध्ये जो ईश असतो, त्याला त्याच्या संबंधानेच 'पुरुष' असे म्हणतात. तोच जगाच्या संदर्भात 'जगदीश' म्हणून ओळखला जातो. (१२)

जाणीवरूपें जगदांतरें । प्रस्तुत वर्तती शरीरें ।
अंतःकरणविष्णु येणें प्रकारें । वोळखावा ॥ १३ ॥
जगातील सर्व प्राण्यांच्या शरीरात जाणीवरूपाने राहून जो त्या शरीरांना कार्यप्रवण करतो, तोच अंत:करणरूपी विष्णू होय, याप्रकारे त्यास जाणून घ्यावे. (१३)

तो विष्णु आहे जगदांतरीं । तोचि आपुले अंतरीं ।
कर्ता भोक्ता चतुरीं । अंतरात्मा वोळखावा ॥ १४ ॥
जो विष्णू याप्रकारे सर्व जगांतील प्राण्यांच्या अंतर्यामी असतो, तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच कर्ता-भोक्ता असणारा अंतरात्मा होय, हे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. (१४)

ऐके देखे हुंगे चाखे । जाणोन विचारें ओळखे ।
कित्येक आपुले पारिखे । जाणताहे ॥ १५ ॥
तोच इंद्रियांच्या द्वारे ऐकतो, पाहातो, हुंगतो, चाखतो, सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो, तसेच विचाराने आपला कोण, परका कोण हेही जाणतो. (१५)

येकची जगाचा जिव्हाळा । परी देहलोभाचा आडताळा ।
देहसमंधें वेगळा । अभिमान धरी ॥ १६ ॥
सर्व जगाची जीवनकला म्हणजेच अंतरात्मा एकच असून देहलोभाच्या अडथळ्यामुळे, देहाच्या संबंधाने आपण इतरांहून वेगळे आहोत, असा अभिमान तो धरतो. (१६)

उपजे वाढे मरे मारी । जैशा उचलती लहरीवरी लहरी ।
चंचळ सागरीं भरोवरी । त्रैलोक्य होत जातें ॥ १७ ॥
सागरात जशा एकामागोमाग एक लाटा येतच राहतात, त्याप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह धारण करतो, त्यांची वाढ होते, ते देह मरतात, इतरांस मारतात. अशा प्रकारे त्या चंचळ अंतरात्मारूपी सागरातील लाटांच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती, स्थिती, लय होतच राहतात. (१७)

त्रैलोका वर्तवितो येक । म्हणोन त्रिलोक्यनायेक ।
ऐसा प्रत्ययाचा विवेक । पाहाना कैसा ॥ १८ ॥
संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्माच चालवितो, म्हणूनच त्याला त्रैलोक्यनायक असे म्हणतात. विवेकाने याचा अनुभव तरी घेऊन पहा ना. (१८)

ऐसा अंतरात्मा बोलिला । परी तोहि तत्वांमधें आला ।
पुढें विचार पाहिजे केला । माहावाक्याचा ॥ १९ ॥
असा हा अंतरात्मा सर्वशक्तिसंपन्न असला, तरी तो तत्त्वामध्येच अंतर्भूत होतो, म्हणून पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करीतच राहिले पाहिजे. (१९)

आधीं देखिला देहधारी । मग पाहावें जगदांतरीं ।
तयाचेनियां उपरी । परब्रह्म पावे ॥ २० ॥
आधी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घ्यावा. नंतर जगदांतरी त्याचा शोध घेता घेता अचानक परब्रह्माची प्राप्ती होते. (२०)

परब्रह्माचा विचार । होतां निवडे सारासार ।
चंचळ जाईल हा निर्धार । चुकेना कीं ॥ २१ ॥
सारासारविचाराने परब्रह्मासंबंधी विचार करू लागल्यावर तेथे चंचळ राहाणार नाही, हे निर्धारपूर्वक जाणून घ्यावे. (२१)

उत्पत्ति स्थिति संव्हार जाण । त्याहून वेगळा निरंजन ।
येथें ज्ञानाचें विज्ञान । होत आहे ॥ २२ ॥
जे चंचळ आहे त्यालाच उत्पत्ती, स्थिती, संहार हे विकार असतात. त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळा असतो. हे जाणणे याला विज्ञान म्हणतात. (२२)

अष्टदेह थानमान । जाणोन जालियां निर्शन ।
पुढें उरे निरंजन । विमळ ब्रह्म ॥ २३ ॥
पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे चार मिळून सर्व अष्ट देहांचा जेव्हा निरास होतो, तेव्हा केवळ निरंजन विमल ब्रह्म तेवढे उरते. (२३)

विचारेंचि अनन्य जाला । पाहाणाराविण प्रत्यय आला ।
तेहि वृत्ति निवृत्तीला । बरें पाहा ॥ २४ ॥
विचाराने ऐक्य अनुभवावे. हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही, असा निश्चय झाला, तरी ही पण अति सूक्ष्म अशी वृत्तीच होय. हिचाही लय झाला पाहिजे. (२४)

येथें राहिला वाच्यांश । पाहोन सांडिला लक्ष्यांश ।
लक्ष्यांशासारिसा वृत्तिलेश । तोहि गेला ॥ २५ ॥
येथे वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवून लक्ष्यांशही मागे पडतो आणि लक्ष्यांशाबरोबर त्या अति सूक्ष्म वृत्तीचाही लय होतो. अर्थात परब्रह्माशी ऐक्य होते. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उपदेश निरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'उपदेशनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : निस्पृह वर्तणूक

॥ श्रीराम ॥

मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो ।
जैसा बहुधा होऊन भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥
मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहातो. चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईने लक्ष असते. ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेकरूपांनी अनेकविध सुखांचा उपभोग घेतो; (१)

तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥
त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्याने त्याची दृष्टीही विशाल असते. तो सर्व काही जाणतो आणि तो विख्यात योगीही असतो. (२)

कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥ ३ ॥
सर्व जगात कर्ता, भोक्ता, तत्त्वतः अंतरात्माच असतो आणि सर्व भूमंडळावर त्याचीच सत्ता असते. त्याला जाणणारा दुसरा कुणी असूच शकत नाही. तो स्वत:च स्वत:स जाणतो.. (३)

ऐसें महंते असावें । सर्व सार शोधून घ्यावें ।
पाहों जातां न सांपडावें । येकायेकी ॥ ४ ॥
महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावे. त्याने सर्व शोधून सार ग्रहण करावे आणि कुणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्यास सहजासहजी सापडू नये. (४)

कीर्तिरूपें उदंड ख्यात । जाणती लहान थोर समस्त ।
वेश पाहातां शाश्वत । येकचि नाहीं ॥ ५ ॥
त्याची उदंड कीर्ती झाल्याने कीर्तिरूपाने सर्व त्याला जाणतात, पण एकही वेष शाश्वत नसल्याने ते त्यास ओळखू शकत नाहीत. (५)

प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना ।
पाहों जातां आडळेना । काये कैसें ॥ ६ ॥
त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते, ती कधी कमी होत नाही, पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे हे कळत नाही. तो कसा काय आहे, याचा पत्ताच कुणाला लागत नाही. (६)

वेषभूषण ते दूषण । कीर्तिभूषण तें भूषण ।
चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥ ७ ॥
उत्तम वेष हे खरे भूषण नसून दूषणच ठरते. कारण उत्तम कीर्ती हेच खरे भूषण होय. महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देत नाही. (७)

त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन ।
लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥
जुन्या ओळखीच्या लोकांना सोडून तो नित्य नूतन लोकांत मिसळतो. त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करतात, पण त्याला कुठलीही इच्छा वा वासना असल्याचे त्यांना आढळून येत नाही. (८)

पुर्तें कोणाकडे पाहेना । पुर्तें कोणासीं बोलेना ।
पुर्तें येके स्थळीं राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥
तो कोणाकडेही पुरते पाहत नाही, कोणाशी पुरते बोलत नाही. दीर्घकाळ एका ठिकाणी राहातही नाही. तेथून उठून निघून जातो. (९)

जातें स्थळ तें सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना ।
आपुली स्थिति अनुमाना । येवोंच जेदी ॥ १० ॥
आपण कोठे जाणार ते कोणाला सांगत नाही. समजा, कदाचित सांगितले तर तेथे तो मुळी जातच नाही. आपण कोठे आहोत याचा कुणाला थांगपत्ताच लागू देत नाही. (१०)

लोकीं केलें तें चुकावी । लोकी।म् भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी । निर्फल करूनी ॥ ११ ॥
लोकांनी काही अनुमान केले तर ते चुकीचे ठरवितो. लोकांनी काही कल्पना केली असेल तर त्याच्या उलट करतो. लोकांनी जे तर्क केले असतील, ते तो निष्फळ करतो. (११)

लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोक सर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिछ्या ॥ १२ ॥
लोकांना दृश्य पाहाण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटतो. लोक सर्वकाळ ज्यासाठी अति तत्पर असतात, त्या गोष्टीची महंतास अनिच्छा असते. (१२)

एवं कल्पितां कल्पेना । न तर्कितांहि तर्केना ।
कदपी भावितां भावेना । योगेश्वर ॥ १३ ॥
याप्रमाणे महंताविषयी कल्पना करू जावे, तर तेही जमत नाही. नाना तर्क करू जावे तर तर्क करणेही अशक्य होते. त्याच्याविषयी काही भावनाही करता येत नाहीत, असा तो विलक्षण योगेश्वर असतो. (१३)

ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठाईं पडेना ।
क्षणयेक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥
याप्रमाणे महंताच्या अंतरंगात काय चालले आहे हेही लोकांना कळून येत नाही आणि शरीराने गाठ पडणेही कठीण जाते. मात्र महंत कथा-कीर्तनांत क्षणभरही खंड पडू देत नाही. (१४)

लोक संकल्प विकल्प करिती । ते अवघेचि निर्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्वर ॥ १५ ॥
लोक त्याच्यासंबंधी जे जे संकल्प-विकल्प करतात, ते सर्व निष्फळ होतात. त्यामुळे लोकांना स्वत:लाच स्वत:ची लाज वाटू लागते. अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्याच्याबद्दल दिसून येते, तो योगेश्वर आहे असे जाणावे. (१५)

बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥ १६ ॥
महंताच्या कार्याविषयी, चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेतात. या गोष्टी जर त्यांच्या मनास आल्या, तर मग फारच मोठे कार्य साधले गेले आहे असे जाणावे. (१६)

अखंड येकां सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७ ॥
महंताने अखंड एकांत करावा, सतत अभ्यास करीत असावे आणि स्वत:सहित लोकांचा वेळही सार्थकी लावावा. (१७)

उत्तम गुण तितुले घ्यावे । घेऊन जनास सिकवावे ।
उदंड समुदाये करावे । परी गुप्तरूपें ॥ १८ ॥
त्याने स्वतः उत्तम गुण संपादन करावेत आणि लोकांनाही शिकवावे. अखंड लोकसंग्रह करीत असावे. पण हे सर्व गुप्तपणे करावे. (१८)

अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जग ।
लोक समजोन मग । आज्ञा इछिती ॥ १९ ॥
अखंड कामाची घाईगर्दी सुरू असावी. अनेक लोकांना त्याने भगवंताची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी म्हणजे मग त्याची ती तळमळ पाहून लोक त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात. (स्वतःस त्याचे सेवक मानू लागतात.) (१९)

आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।
साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥
आधी कष्ट करावेत आणि मग फळाची अपेक्षा ठेवावी. कष्टच केले नाहीत तर कार्यसिद्धी होत नाही. जो कष्ट करीत नाही, तो कुचकामाचा समजावा. (२०)

लोक बहुत शोधावे । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोन धरावे । जवळी दुरी ॥ २१ ॥
अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घ्यावा आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर सारावे. (२१)

अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नस्तां वेर्थ जातें ।
जाणोनि शोधावीं चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥
ज्याचा जसा अधिकार असेल, त्याचेकडून त्याप्रकारे योग्य ते काम करवून घ्यावे. लायकी नसताना कार्य सांगितले असता ते व्यर्थ जाते, म्हणून अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घ्यावा. (२२)

अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहीतरी ॥ २३ ॥
ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यास अनुसरून त्यास कार्य सांगावे. त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झाले तरी आपले महत्त्व कायम राखावे. (२३)

हें प्रचितीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीयेकें ॥ २४ ॥
हे बोलणे अनुभवाचे आहे. आधी स्वतः करून मी लोकांना सांगितले आहे. माझे म्हणणे ज्यास पटत असेल त्याने यापासून बोध घेतला पाहिजे. (२४)

महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीनें भरावे ।
जाणते करून विखरावे । नाना देसीं ॥ २५ ॥
महंताने दुसरे नवीन महंत करावेत आणि त्यांना युक्ती व बुद्धीने शहाणे करावे. त्यांना ज्ञानसंपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात पाठवावे. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निस्पृह वर्तणूक निरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'निस्पृहवर्तणूकनाम' समास दहावा समाप्त.

॥ दशक अकरावा समाप्त ॥



GO TOP