॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक पाचवा : मंत्रांचा

समास पहिला : गुरुनिश्चय

॥ श्रीराम ॥

[ Right click to 'save audio as' for download ]

[ Right click to 'save audio as' for download ]


जय जज जी सद्‌गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा ।
अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात, 'हे सदुरुराया, तुमचा जयजयकार असो ! तुम्ही पूर्णकाम आहात, तुम्हीच परमेश्वर आहात ! व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात ! तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणून त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. (१)

जें वेदांस सांकडें । जें शब्दासि कानडें ।
तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २॥
जे वेदांना कळण्यासही कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे, अशा आत्मतत्त्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सत्शिष्याला साक्षात करून देता. (२)

जें योगियांचें निजवर्म । जें शंकराचें निजधाम ।
जें विश्रांतीचें निजविश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३॥
तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणचि हो‍ईजे आंगें ।
दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना सर्वथा ॥ ४॥
जे योग्यांचे परम रहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीला विश्राम मिळतो असे जे अगाध परम गुह्य असे ब्रह्म ते तुमच्या कृपेच्या योगाने सत्शिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या योगाने कधीही बद्ध होत नाही. (३ -४)

आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें प्रमाणें - । मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥
वक्ताचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की, स्वामींनी आता लडिवाळपणाने गुरुशिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की, ती ऐकून मुमुधूंना तत्काळ सद्‌गुरूस शरण जाता यावे. (५)

गुरु तों सकळांसी ब्राह्मण । जर्ह्हीं तो जाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावें ॥ ६॥
तेव्हा स्वामी सांगतात की, सर्व वर्णांना ब्राह्मणच गुरुस्थानी आहे. म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्यभावाने त्यालाच सर्वांनी शरण जावे. (६)

अहो या ब्राह्मणाकारणें । अवतार घेतला नारायेणें ।
विष्णूनें श्रीवत्स मिरविणें । तेथें इतर ते किती ॥ ७॥
अहो, या ब्राह्मणांसाठीच नारायणांनी अवतार घेतला ! प्रत्यक्ष श्रीविष्णू ब्राह्मणाचे चरणचिह श्रीवत्स आपल्या वक्षःस्थलावर धारण करतात, तेथे इतरांची काय कथा ? (७)

ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्रांचे ब्राह्मण ।
धातुपाषाणीं देवपण । ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥
ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानले जाते. त्याच्या वचनाच्या योगे शूद्रही ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणांनी मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येते. (८)

मुंजीबंधनेंविरहित । तो शूद्रचि निभ्रांत ।
द्विजन्मी म्हणोनि सतंत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥
जो ब्राह्मण मौजीबंधनाविरहित असतो, तो निःसंशय शूद्र समजावा. मौंजीबंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणूनच त्याला द्विज म्हणतात. (९)

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।
वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥
सर्व वर्णांना ब्राह्मण पूज्य आहे, अशी मुख्य वेदाज्ञ । असून ती प्रमाण मानावी. जे वेदविरहित असते, ते अप्रमाण असते आणि ते भगवंतालाही अप्रिय असते. (१०)

ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें ।
कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥
ब्राह्मणामुळेच योग, याग, व्रते, दाने, सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होते. ब्राह्मणांशिवाय कर्ममार्ग टिकूच शकत नाही. (११)

ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत ।
पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥
ब्राह्मण हे मूर्तिमंत वेदच जाणावेत. एवढेच नव्हे, तर ब्राह्मण म्हणजे साक्षात् भगवंत अशी भावना असावी. त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात. (१२)

ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । हो‍ऊन, जडे भगवंतीं ।
ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥
ब्राह्मणांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंतांच्या ठिकाणी जडते. ब्राह्मण हे तीर्थरूप असल्याने त्यांच्यायोगे प्राण्यांना उत्तम गती प्रास होते. (१३)

लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण ।
परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥
लक्षभोजनात जेवण्याचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे. तेथे दुसऱ्यांना कोण विचारतो ? परंतु भगवंत भावाचे भुकेले असतात. त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते. (१४)

असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती ।
जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥
असो. श्रेष्ठ देवही ब्राह्मणांना वंदन करतात तेथे बिचाऱ्या मानवांची काय कथा ? ब्राह्मण मूढमती असला तरी तो जगद्‌वद्य आहे. (१५)

अंत्येज शब्दज्ञाता बरवा । परी तो ने‍ऊन कायी करावा ।
ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तों न घडे कीं ॥ १६॥
एखादा अंत्यज उत्तम शब्दज्ञानी असला तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. (१६)

जें जनावेगळें केलें । तें वेदें अव्हेरिलें ।
म्हणोनि तयासि नाम ठेविलें । पाषांडमत ॥ १७॥
लोकरीतीला सोडून काही केले तरते वेद मान्य करीत नाहीत. म्हणून त्याला पाखंड असे म्हणण्यात येते. (१७)

असो जे हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विस्वास ।
ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८॥
असो. जे हरीचे व हराचे भक्त असतात, त्यांचा ब्राह्मणांवर विश्वास असतो. ब्राह्मणांची सेवा केल्याने अनेकजण पावन झाले आहेत. (१८)

ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्‌गुरु करावा ।
ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्‌गुरुविण नाहीं ॥ १९॥
जर तुम्ही असे म्हणाल की, ब्राह्मणाची सेवा केल्याने देवाधिदेवाची प्राप्ती होते, तर सदुरू कशासाठी करावा ? तर याचे उत्तर असे की, आपले खरे धन जे स्वरूपसाक्षात्कार त्याची प्राप्ती सदुरूशिवाय होऊ शकत नाही. (१९)

स्वधर्मकर्मी । म् पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्‌गुरुविण ।
ब्रह्मज्ञान नस्तां सीण । जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥
स्वधर्मकर्मात ब्राह्मण पूज्य असला तरी सदुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही आणि ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणपरंपरेतून सुटका होत नाही. (२०)

सद्‌गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१॥
सदुरूशिवाय ज्ञानाची प्राप्ती कधीही होणार नाही. आणि ज्ञानप्राप्ती ज्यांना होत नाही, ते अज्ञानी प्राणी जन्ममृत्यूच्या प्रवाहात वाहतच जातात. (२१)

ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें ।
म्हणौनि सद्गुरूचीं पा‍ऊलें । सुधृढ धरावीं ॥ २२॥
मोक्षासाठी ज्ञानविरहित जे जे उपाय केले जातात, ते जन्मालाच कारण ठरतात. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी सदुरूंची पावले सुदृढ धरावीत. (२२)

जयास वाटे देव पाहावा । तेणें सत्संग धरावा ।
सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३॥
ज्याला भगवंताच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल, त्याने सत्संग धरावा. सत्संगाशिवाय देवाधिदेवाची प्राप्ती होतच नाही. (२३)

नाना साधनें बापुडीं । सद्‌गुरुविण करिती वेडीं ।
गुरुकृपेविण कुडकुडीं । वेर्थचि होती ॥ २४॥
अज्ञानी माणसे बिचारी सद्‌गुरूशिवाय नाना साधने करतात, पण सदुरुकृपा न लाभल्यामुळे व्यर्थच दुःखी- कष्टी होतात. (२४)

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।
गोरांजनें धूम्रपानें । साधिती पंचाग्नी ॥ २५॥
कुणी कार्तिकखाने, माघस्त्राने करतात अथवा नाना व्रते, उद्यापने, दाने करतात. कुणी स्वतःस जाळून घेतात, तर कुणी झाडास उलटे टंगून घेऊन खाली केलेला धूर पिऊन तप करतात. तर कुणी उन्हाळ्यात चारी बाजूस अग्नी पेटवून, मस्तकी सूर्याचा ताप सहन करून तप करतात. (२५)

हरिकथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण ।
सर्व तीर्थें परम कठिण । फिरती प्राणी ॥ २६॥
कुणी हरिकथा, पुराणश्रवण करतात, तर कुणी आदराने अध्यात्माचे निरूपण करतात. तर कित्येक लोक अत्यंत कठीण अशा सर्व तीर्थाच्या यात्रा करीत हिंडत राहतात. (२६)

झळफळित देवतार्चनें । स्नानें संध्या दर्भासनें ।
टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥
कुणी झळफळित देवतार्चने, खान-संध्या, दर्भासने, टिळे, माळा, गोपीचंदनाचे टिळे आणि श्रीमुद्रांचे (वैष्णवी मुद्रांचे) ठसे इत्यादी कर्मकांडात बुडून जातात. (२७)

अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें । मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें ।
नाना प्रकारीचीं उपकर्णें । साहित्यशोभा ॥ २८॥
काही लोक प्रयज्ञपूर्वक अर्घ्यपात्रे, संपुष्ट, गोकर्णे, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेली देवतांची यंत्रे व त्यांचे मंत्र, नाना प्रकारची उपकरणी वगैरे पूजेचे साहित्य अत्यंत सुंदर सुशोभित ठेवण्यात समाधान मानतात. (२८)

घंटा घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती ।
आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥
काही लोक देवळातील घड घणघण वाजवतात. स्तोत्रे, स्तवने, स्तुती घडघडा म्हणतात. निरनिराळी योगासने, मुद्रा, ध्यानधारणा, प्रदक्षिणा, नमस्कार इत्यादी आवडीने करत असतात. (२९)

पंचायेत्न पूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें लाखोली ।
बेलें नारिकेळें भरिली । संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥
कुणी पंचायतन-पूजा करतात, कुणी मृत्तिकेची लिंगे करून त्यास बेल, नारळ फळे. फुले यांची लाखोली वाहून यथासांग संपूर्ण पूजा करतात. (३०)

उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म ।
फळचि पावती, वर्म- । चुकले प्राणी ॥ ३१॥
काही लोक उपवास करतात, तर कुणी एखादा नेम निष्ठेने चालवतात. याप्रकारे या कर्मांसाठी ते अत्यंत कष्ट सोसतात व त्याचे फळही त्यांना मिल्ले. पण हे सर्व लोक भगवतूप्रासीचे मुख्य वर्म जाणत नाहीत; तेथे त्यांची फार मोठी चूक होते. (३१)

येज्ञादिकें कर्में केलीं । हृदईं फळाशा कल्पिली ।
आपले इछेनें घेतली । सूति जन्मांची ॥ ३२॥
यज्ञादिक कर्मे केली आणि अंतःकरणात जर फळाशा धरली तर आपल्या इच्छेनेच ते जणू पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. सकाम कर्मामुळे त्यांची कर्मे हा पुढील जन्मांचा प्रारंभ ठरतो. (३२)

करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास ।
रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥ ३३॥
तरी सद्‌गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित ।
येमेपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ३४॥
समजा, खूप कष्ट करून चौदा विद्यांचा अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांना यथावकाश ऋद्धी-सिद्धी जरी प्रास झाल्या तरी सदुरुकृपेशिवाय सर्वथा स्वहित साधता येत नाही आणि यमपुरीचा अनर्थही त्यायोगे चुकत नाही. (३३ - ३४)

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती ।
गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५॥
जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही, तोपर्यंत मरण व जन्म चुकत नाही. गुरुकृपेशिवाय अधोगती अथवा गर्भवास चुकत नाही. (३५)

ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ती भाव आणी भजन ।
सकळहि फोल ब्रह्मज्ञान - । जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥
ध्यान, धारणा, मुद्रा, आसने, एवढेच नव्हे, तर भक्ती, भाव व भजन हे सर्व ब्रह्मज्ञान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत व्यर्थच समजावे. (३६)

सद्‌गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे ।
जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणी गडधरां ॥ ३७॥
सदुरूकृपा जर झाली नाही, तर साधक भलीकडेच वावरतो. एखादा आंधळा चाचरून दलदलीत अथवा खाचखळग्यांत पडावा तशी त्या साधकाची स्थिती होते. (३७)

जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान ।
तैसें सद्‌गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८॥
जसे नेत्रांत अंजन घातले की, जमिनीतील गुप्त द्रव्य दृष्टीस पडते, त्याप्रमाणे सदुरुवचन श्रवणी पडले की ज्ञानाचा प्रकाश पसरतो. (३८)

सद्‌गुरुविण जन्म निर्फळ । सद्‌गुरुविण दुःख सकळ ।
सद्‌गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९॥
सदुरूशिवाय जन्म निर्फळ होतो. सदुरूशिवाय सगळे दुःखच वाट्याला येते. सदुरूशिवाय तळमळ जात नाही. (३९)

सद्‌गुरुचेनि अभयंकरें । प्रगट हो‍ईजे ईश्वरें ।
संसारदुःखें अपारें । नासोन जाती ॥ ४०॥
अभय देणारा सदुरूंचा कृपाहस्त लाभला की त्या कृपेमुळे साक्षात ईश्वर प्रकट होतो. अपार ससारदुखे नाहीशी होतात. (४०)

मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर ।
तयांसहि ज्ञानविज्ञानविचार । सद्‌गुरुचेनी ॥ ४१॥
पूर्वीही जे अत्यंत श्रेष्ठ असे संत, महंत, मुनीश्वर वगैरे होऊन गेले; त्यांनाही सदुरूंच्या योगानेच आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. (४१)

श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अतितत्पर गुरुभजनीं ।
सिद्ध साधु आणी संतजनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२॥
श्रीराम, कृष्ण आदी भगवंताचे अवतारही गुरुभजनी तत्पर होते. तसेच इतर साधू सिद्ध आणि संतांनीही गुरुसेवा केली. (४२)

सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक ।
तेहि सद्गुपदीं रंक । महत्वा न चढेती ॥ ४३॥
सर्व वृष्टीचे चालक जे हरि हर ब्रह्मा आदी मुख्य त्रिदेव तेही सदुरुचरणी अत्यंत लीन होतात. त्यामुळेच त्यांचे महत्त्व वाढते. (४३)

असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सद्‌गुरु करावा ।
सद्‌गुरुविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥
असो. ज्याला अंतःकरणापासून मोक्षाची तीव्र इच्छा असेल त्याने सदुरू करावा. सदुरूशिवाय कल्पांतीही मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. (४४)

आतां सद्‌गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे ।
जयांचे कृपेनें प्रकाशे । शुद्ध ज्ञान ॥ ४५॥
आता सदुरू कसे असतात ते सांगतो. ते इतर गुरूंच्यासारखे नसतात. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते, त्यांना सदुरू म्हणावे. (४५)

त्या सद्गुरूची वोळखण । पुढिले समासीं निरूपण ।
बोलिलें असे श्रोतीं श्रवण । अनुक्रमें करावें ॥ ४६॥
त्या सदुरूंची ओळख पुढील समासात करून दिली जाईल. तरी यानंतर अनुक्रमाने श्रोत्यांनी पुढील समासातील निरूपण श्रवण करावे, असे श्रीसमर्थ सांगतात. (४६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'गुरूनिश्चयनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : गुरुलक्षण

॥ श्रीराम ॥

जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणिजेती ।
परंतु सद्‌गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, जे चमत्कार करून दाखवितात, त्यांनाही गुरू म्हटले जाते. पण ते मोक्ष देणारे सदुरू नसतात. (१)

सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें ।
नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २॥
सभेचे वशीकरण करणे, चेडे, चेटके, शाबर मंत्र, अनेक कौटाळे करणे, नाना कौतुके, चमत्कार करणे, असंभाव्य गोष्टी शक्य करून दाखविणे, (२)

सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ।
दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३॥
नाना औषधींच्या प्रयोगांची माहिती देणे, दुसऱ्या धातूंपासून सोने बनविण्याच्या पद्धती दाखवणे, नजरबंदीचा, तत्काळ इच्छित प्रासीचा प्रयोग करणारांनाही लोक गुरूच म्हणतात. (३)

साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान ।
नाना वाद्यें सिकविती जन । तेहि येक गुरु ॥ ४॥
जे साहित्य, संगीत, सगज्ञान, गीत, नुत्य, तान, मान, नाना वाद्ये इत्यादी कला लोकांना शिकवितात, तेही गुरूच होत. (४)

विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी ।
कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५॥
काही मांत्रिक मंत्रविद्या शिकवितात, ताईत, गंडे- दोरे देण्याचे शिकवितात. तर काही पोट भरण्याची विद्या शिकवितात. (५)

जो यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर ।
तेहि गुरु परी साचार- । सद्‌गुरु नव्हेती ॥ ६॥
ज्या जातीचा जो व्यापार अथवा उद्योगधंदा असेल तो पोट भरण्यासाठी जे शिकवितात, तेही गुरूच; पण ते सदुरू मात्र नव्हेत. (६)

आपली माता आणी पिता । तेहि गुरुचि तत्वतां ।
परी पैलापार पावविता । तो सद्‌गुरु वेगळा ॥ ७॥
आपली आई, आपले वडील हेही एक प्रकारे आपले गुरूच असतात, पण जो संसारसागरातून पैलतीरास नेतो, तो सदुरू वेगळाच असतो. (७)

गाईत्रीमंत्राचा इचारू । सांगे तो साचार कुळगुरु ।
परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८॥
जो गायत्री मंत्राचा उपदेश देतो, तोही खरोखर कुळगुरूच असतो. पण आत्मज्ञानाशिवाय पैलतीर गाठता येत नाही. (८)

जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानांधारें निरसी ।
जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९॥
जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून अज्ञानरूपी अंधकाराचे निरसन करून जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य करून देतो, (९)

विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत ।
तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्‌गुरु ॥ १०॥
भिन्न आहेत असे वाटणाऱ्या देव आणि भक्त यांचे जीव-शिवपणाने जे द्वैत भासत असते, त्या देवभक्तांना जो एकरूप करतो, तो सदुरू जाणावा. (१०)

भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी ।
केली, देखोनि सीघ्र सोडी । तो सद्‌गुरु जाणावा ॥ ११॥
वाघाने उडी घेऊन गाय व वासराची तायतूट केली आहे असे पाहून जो कृपाळूपणाने तेथे उडी घालून वाघाच्या तावडीतून गायवासरांना सोडवितो, त्याप्रमाणे संसाररूप वाघाच्या तावडीतून जीवाला सोडवून त्याची ईश्वराशी भेट घडवितो, तो सदुरू जाणावा. (११)

प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें ।
ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्‌गुरु जाणावा ॥ १२॥
मायारूपी जाळ्यात सापडून संसारदुःखाने व्याकूळ झालेल्यांना जो त्या जाळ्यातून मुक्त करतो, तो सदुरू जाणावा. (१२)

वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी ।
तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुारु जाणावा ॥ १३॥
वासनारूपी नदीच्या महापुरात सापडून बुडत असता जेव्हा प्राणी गयावया करू लागतो, तेव्हा कृपाळूपणाने उडी घालून जो त्याला तारतो, तो सदुरू समजावा. (१३)

गर्भवास अति सांकडी । इछाबंधनाची बेडी ।
ज्ञान दे‍ऊन सीघ्र सोडी । तो सद्‌गुरु स्वामी ॥ १४॥
इच्छा म्हणजेच वासनारूपी बेडीत जीव अडकतो आणि त्यामुळे त्याला गर्भवासाच्या महा विपत्तीत सापडावे लागते. ज्ञान देऊन जो या बेडीतून शीख सोडवितो, तोच सदुरू स्वामी होय. (१४)

फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार ।
तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५॥
सदुरू वेदातील शब्दाचे अंतरंग दाखवून देऊन स्वस्वरूपानुभव करून देतात, ते सदुरू हे अनाथांचे माहेर असते. (१५)

जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्मचि करी रोकडें ।
फेडी संसारसांकडे । वचनमात्रें ॥ १६॥
जीव बापडा अल्पज्ञ असतो. त्याला ते साक्षात ब्रह्मच करतात आणि ज्ञानोपदेश करून त्याची जन्म-मरण-चक्रातून सुटका करतात. (१६)

जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी ।
शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गांरवचनें ॥ १७॥
वेदांचे अभ्यतरी असणारे गुह्य असे जे ब्रह्मज्ञान ते वेदांतून काढून आई ज्याप्रमाणे आपल्या अपत्याला छोटे छोटेघास भरवते, त्याप्रमाणे सदुरूमाउली अत्यंत वात्सल्याने आपल्या शिष्याच्या कानांत आपल्या शब्दांनी हळूहळू आत्मज्ञानाची गूढ रहस्ये ऐकवते. (१७)

वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव ।
तोचि येक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८॥
वेद, शास्त्रे, आणि ब्रह्मज्ञानी पुरुष या सर्वांचे अनुभव पाहता ते अगदी एकच आहेत असे कळून येते. सदुरूही परमात्म्याशी ऐक्यरूप होण्यासाठी तोच अनुभव शिष्यास देतात. (१८)

संदेह निःशेष जाळी ॥ स्वधर्म आदरें प्रतिपाळी ।
वेदविरहित टवाळी । करूंच नेणे ॥ १९॥
सदुरू संशय पूर्णपणे नाहीसे करतात, स्वतः आदराने स्वधर्माचे प्रतिपालन करतात आणि वेदविरहित व्यर्थ बडबड तर कधीच करत नाहीत. (१९)

जें जें मन अंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी ।
तो गुरु नव्हे, भिकारी- । झडे आला ॥ २०॥
काही गुरू असे असतात की मनास जे जे वाटेल ते मनसोक्त आचरतात, ते गुरू नव्हेतच. ते बळेच शिष्याच्या गळ्यात पडणारे भिकारीच समजावेत. (२०)

शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन ।
ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥
जे शिष्याला साधना करायला स्त्रवत नाहीत, त्याला इंद्रियनिग्रह करायला लावीत नाहीत, असे गुरू दमडीला तीन इतके स्वस्तात मिळाले तरी त्यांचा त्याग करावा. (२१)

जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी ।
इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्‌गुरु जाणावा ॥ २२॥
जो कोणी ज्ञानाचा उपदेश करतो, अविद्येचा समूळ नाश करतो आणि इंद्रियनिग्रहाची शिकवण देतो, तोच सदुरू जाणावा. (२२)

येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले ।
अतिदुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥
काही गुरू द्रव्याने विकत घेता येतात, काही शिष्यांचे अंकित असतात आणि अति दुराशेने दीनवाणे झालेले असतात. (२३)

जें जें रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी ।
ऐसी कामना पापिणी । पडली गळां । २४॥
ते शिष्याला जे आवडते तेच करतात, शिष्याची मनधरणी करतात. त्यांच्या गळ्यात कामनारूपी पापीण पडलेली असते. (२४)

जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु ।
चोरटा मंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५॥
जो गुरूसत्य स्पष्टपणे न सांगणारा असतो तो अधमाहून अत्यंत अधम, चोर, मैंद आणि पामर असून द्रव्यासाठी भोंदूपणा करणारा असतो. (२५)

जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी ।
आणी सेखीं भीड करी । घातघेणा ॥ २६॥
ज्याप्रमाणे एखादा दुरचारी वैद्य रोग्याच्या सर्वस्वाची राखरांगोळी तर करतोच पण शेवटी भिडेमुळे घातकी ठरतो. (२६)

तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा ।
भीड करूनियां, गोवा- । घाली बंधनाचा ॥ २७॥
येथे वर्णन केलेल्या वैद्यासारखा गुरू नसावा. असा गुरू असेल तर देव तर दुरावतोच, शिवाय भिडेला बळी पडून तो शिष्याला बंधनात गुंतवतो. (२७)

जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन ।
तोचि सद्‌गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८॥
च्याचेजवळ ब्रह्मज्ञान आहे आणि स्थूल देहाने जो उत्तम प्रकारेसाधनही करीत असतो, असा सदुरूच आपल्याला स्वस्वरूपानुभव प्रास करून देतो. (२८)

देखणें दाखविती आदरें । मंत्र फु । म्किती कर्णद्वारें ।
इतुकेंच ज्ञान, तें पामरें- । अंतरलीं भगवंता ॥ २९॥
काही गुरू प्रकाशदर्शनादी चमत्कार मोठ्या आदराने दाखवतात, मंत्रोपदेशही देतात. पण त्यांचे ज्ञान इतकेच मर्यादित असते, त्यामुळे त्यांच्याकडून मंत्रोपदेशादी घेणारे बिचारे जीव भगवंतास अंतरतात. (२९)

बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण ।
तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥
ज्याला शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती व आत्मप्रचीती या तिन्ही प्रास झाल्या असतील, तोच उत्तम लक्षणांनी युक्त सदुरू होय. जो खरा मुमुक्षु असेल त्याने अत्यंत आदराने अशा सदुरूंनाच शरण जावे. (३०)

अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता ।
ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१॥
एखादा गुरू म्हणवून घेणारा अद्वैत निरूपण करण्यात अत्यंत अगाध विद्वत्ता व वस्तूत्व दाखवितो, पण विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती तशीच राहिलेली असते. अशा व्यक्तीला गुरू केल्याने आपल्या मानवी देहाची सार्थकता होणार नाही. (३१)

जैसा निरूपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो ।
कृतबुद्धीचा जयो । जालाच नाहीं ॥ ३२॥
निरूपणसमयी तो उत्तम रीतीने ब्रह्मज्ञान सांगत असला तरी त्याचे मन चंचल असते. स्वस्वरूपानुभव त्याला प्रत्यक्ष आलेला नसल्याने त्याचे ज्ञान निश्चयात्मक नसते. (३२)

निरूपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी ।
नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३॥
काही वक्ते निरूपण करताना सिद्धीचे सामर्थ्य वगैरे वर्णन करून सांगतात. श्रोत्यांनी ते ऐकल्यावर त्यांच्या मनात दुराशा उत्पन्न होते. नाना चमत्कार पाहिले की त्यांची बुद्धी डळमळू लागते. (३३)

पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत ।
आणी सामर्थ्यहि अद्भुतत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥
त्यांना वाटते की पूर्वीही अनेक ज्ञानी, विरक्त भक्त होऊन गेले की ज्यांना भगवंत प्रत्यक्ष दर्शन देत असे. त्यांच्या ठिकाणी सिद्धीच्या योगे अडत सामर्थ्य दिसून येत असे. (३४)

ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ ।
ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५॥
त्यांचे सामर्थ्य असे अचाट होते की, त्यापुढे आमचे नुसते ज्ञान व्यर्थच म्हणावे लागेल. अशा प्रकारे सिद्धींच्या सामर्थ्याविषयी स्वार्थ त्यांच्या अंतरांत उत्पन्न होत असतो. (३५)

निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे ।
दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥
सिद्धींची ही आशा दुसशाच आहे. जोपर्यंत दुराशा नष्ट होत नाहीत, तोपर्यंत भगवंत भेटत नाही. शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असल्याने चांगले नसतात. (३६)

बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७॥
अनेक ज्ञानी म्हणविणारे लोक कामनेने वेडे झाल्याने नागविले जातात. त्यांना आत्मज्ञान प्रास होत नाही. आपली कामना पूर्ण व्हावी म्हणून धडपडणारी बिचारी ही मूर्ख माणसे काही न कमावताच मरून जातात. (३७)

निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत ।
अवघ्यांवेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८॥
ज्याच्या अंतःकरणात यतूकिंचितही कामना नाही, असा संत विरळच असतो. त्याचे मत, त्याचे वागणे इतसंपेक्षा सर्वस्वी वेगळे असते. तो सदासर्वदा भगवंतासंबंधीच बोलत असतो. इतर वस्तूंविषयी विचारच त्याच्या मनात कधी येत नाहीत. (३८)

अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा ।
तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९॥
भगवंत हा वास्तविक सर्वांचाच कधी नष्ट न होणारा असा अक्षय ठेवा आहे. पण शरीराविषयीची आसक्ती काही केल्या सुटत नाही. त्यामुळे भगवणसी होत नाही. (३९)

सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्त्व आलें ।
तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४०॥
योगाभ्यासाने सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त झाले की देहाला महत्त्व येते. तेथे देहबुद्धीचेच प्रस्थ खूप वाढते. (४०)

सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इछिती ते मूर्ख ।
कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥
ज्यायोगे अक्षय सुख प्रास होते, त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याऐवजी जे सिद्धींच्या सामर्थ्याची इच्छा करतात, ते मूर्ख असतात. कारण कामनेमुळे होणाऱ्या दुःखासारखे दुसरे दुःख नाही. (४१)

ईश्वरेंविण जे कामना । तेणींचि गुणें नाना यातना ।
पावती, होती पतना- । वरपडे प्राणी ॥ ४२॥
एका ईश्वराशिवाय जी कामना करावी, तिच्यायोगे नाना यातना भोगाव्या लागतात. अखेर ते प्राणी पतन पावतात. (४२)

होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात ।
सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३॥
जेव्हा शरीराचा अंत होतो, तेव्हा सामर्थ्यही निघून जाते. अशा रीतीने कामनेच्या योगाने शेवटी भगवंत अंतरतो. (४३)

म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु ।
तोचि सद्‌गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४॥
म्हणून जो अत्यंत निष्काम आहे आणि आत्मानुभवामुळे भगवंताविषयी ज्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो, असा सदुरूच भवसागराच्या पैलतीरावर घेऊन जाण्यास समर्थ असतो. (४४)

मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५॥
सदुरूचे मुख्य लक्षण हे आहे की, त्याच्या ठिकाणी सर्वप्रथम विमल ज्ञान पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी शाश्वत टिकून रुहणारेसमाधान पाहिजे व त्याची स्वरूपस्थितीही कायम टिकून राहिली पाहिजे. (४५)

याहीवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।
विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषईं ॥ ४६॥
याचबरोबर तो अत्यंत वैराग्यसंपन्न असावा व त्याची चित्तवृत्ती कोठेही गुंतलेली नसावी आणि त्याचे स्वधर्माचे आचरण अत्यंत निर्मळ असावे. (४६)

याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण ।
जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥
याखेरीज तो जेथे असेल तेथे नित्य अध्यात्माचे श्रवण, हरिकथानिरूपण आणि परमार्थाचे विवरण हे चालू असावे. (४७)

जेथें सारासारविचार । तेथें होये जगोद्धार ।
नवविधा भक्तीचा आधार । बहुता जनासी ॥ ४८॥
जेथे याप्रमाणे सारासारविचार सतत होत असतो, तेथेच अनेक लोकांचा उद्धार होतो. त्याच्यापाशीच नवविधा भक्ती कशी करावी हे अनेक लोकांना कळून येते व त्या भक्तीचा आधार त्यांना मिळतो. (४८)

म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन ।
हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥
म्हणून जेथे नवविधा भक्ती केली जाते व जेथे साधनांना अत्यंत प्रतिष्ठा प्रास होते, ते सदुरूंचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. (४९)

अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन ।
तेथें बहु भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५०॥
जेथे अंतरात शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत निष्ठेने भगवद्‌भजन चालते, तेथे अनेक भक्त लोकांना समाधान मिठ्ये. (५०)

नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।
कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१॥
ज्या परमार्थाला उपासनेचा आधार नसेल तो परमार्थ निराधार होय. स्वधर्मकर्माचे निष्ठेने आचरण केले नाही, तर अनाचार माजून लोक धर्मधष्ट होतात. (५१)

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन ।
कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥
म्हणून आत्मज्ञान, वैराग्य, भगवद्- भजन (उपासना), स्वधर्मकर्माचे यथोचित आचरण आणि नित्यनेमाने व प्रेमाने साधन, तसेच हरिकथा, अध्यात्मनिरूपण, श्रवण, मनन, नीति-न्याय, मर्यादायुक्त आचरण, (५२)

यामधें येक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे ।
म्हणौन सर्वहि विलसे । सद्‌गुरुपासीं ॥ ५३॥
यांपैकी एक जरी उणे असले तरी ते सर्व विपरीत दिसते. म्हणून जेथे सदुरू असतील तेथे वरील सर्व गोष्टी निश्चितपणे आढळ्यात. (५३)

तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।
नाना साधनें समर्था । सद्‌गुरुपासीं ॥ ५४॥
सदुरू हे अनेकांचे पालन-पोषण करतात. त्यांना अनेक लोकांची काळजी असते. प्रत्येकास अधिकासनुरूप देता येईल, अशी अनेक साधने समर्थ सदुरूपाशी असतात. (५४)

साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुतां सवेंच भ्रष्टे ।
याकारणे दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५॥
जो साधनाशिवाय परमार्थाची प्रतिष्ठा मानतो, तो लवकरच स्वतःही भ्रष्ट होतो, म्हणून दूरदृष्टीच्या महानुभावांनी साधनास महत्त्व दिले आहे. (५५)

आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती ।
जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६॥
जे महंत आचार उपासना सोडतात, ते ४८ अभक्त होतात, असे दिसून येते. अशांच्या महंतीला आग लागो ! त्यांना कोण विचारतो ? (५६)

कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव ।
तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७॥
ज्या समुदायात स्वधर्मकर्माचा, उपासनेचा अभाव असतो, तेथे बहकण्यास अवसर मिळतो. त्या तिरस्कृत समुदायाला प्रपंची लोक हसतात. (५७)

नीच यातीचा गुरु । तोही कानकोंड विचारु ।
ब्रह्मसभेस जैसा चोरू । तैसा दडे ॥ ५८॥
खालच्या जातीचा गुरू केला तरी तेही अयोग्य ठरते. संतांच्या सभेत जेथे ब्रह्मस्वरूपाची चर्चा चालू आहे, तेथे एखादा चोर आला तर त्याची जशी अवस्था होते, तशी त्या शिष्याची अवस्था होते. (५८)

ब्रह्मसभे देखतां । त्याचें तीर्थ नये घेतां ।
अथवा प्रसाद सेवितां । प्राश्चित पडे ॥ ५९॥
त्या ब्रह्मसभेत त्याला आपल्या गुरूचे तीर्थ घेता येत नाही, अथवा प्रसाद घेतला तर प्रायश्चित्त घ्यावे लागते. (५९)

तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली ।
गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६०॥
गुरूचा तीर्थप्रसाद घेतला नाही, तरी कमीपणा दिसून येतो. त्यामुळे एकदम गुरुभक्ती एकाएकी क्षीण होते. (६०)

गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्वतां ।
तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥
गुरूची मर्यादा राखण्याचा प्रयत्न केला, तर ब्राह्मण रागावतात. आपले ब्राह्मण्य सांभाळायचा प्रयत्न केला तर गुरूंचा राग ओढवतो, ते क्षोभतात. (६१)

ऐसीं सांकडीं दोहींकडे । तेथें प्रस्तावा घडे ।
नीच यातीस गुरुत्व न घडे । याकारणें ॥ ६२॥
खालच्या जातीचा गुरू केला, तर दोन्हीकडून अशी कोंडी होते, अडचण निर्माण होते आणि मग पश्चात्तापाची पाळी येते. म्हणूनच कनिष्ठ जातीला श्रेष्ठ जातीच्या शिष्याच्या गुरुत्वाचा अधिकार नाही. (६२)

तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें ।
बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥
तथापि एखाद्याला कनिष्ठ जातीतील गुरूची आवड उत्पन्न झाली, तरी त्याने एकट्याने फक्त भ्रष्ट व्हावे. अनेक लोकांना भ्रष्ट करणे हा फार मोठा दोष आहे. (६३)

आतां असो हा विचारू । स्वयातीचा पाहिजे गुरु ।
नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥
आता हे विवेचन पुरे झाले. मुख्य सांगायचे हे आहे की, आपल्या जातीचा गुरू कमवा, नाहीतर निश्चितपणे भ्रष्टाचार घडतो. (६४)

जे जे कांहीं उत्तम गुण ॥ तें तें सद्गुरूचें लक्षण ।
तथापि संगों वोळखण । होये जेणें ॥ ६५॥
जे जे काही उत्तम गुण आहेत, ते सदुरूचे लक्षण म्हणून समजावे, पण तरी सदुरूंची ओळख पटावी म्हणून येथे सांगितले आहेत. (६५)

येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु ।
येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६॥
एक नुसता गुरू, तर एक मंत्रगुरू असतो. कुणी यंत्रगुरू तर कुणी तंत्रगुरू असतो. कुणी मल्लविद्या शिकविणार गुरू असतो, तर कुणाला लोक राजगुरू म्हणून ओळखतात. (६६)

येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु ।
येक असद्‌गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७॥
एक कुलगुरू असतो, तर एक कुणी मानलेला गुरू असतो. एक विद्यागुरू तर एक कुविद्यागुरू म्हणजे भलतीच शिकवण देणारा गुरू असतो. कुणी खोय गुरू असतो, तर कुणी जातिप्रमुख म्हणून गुरू असतो, तो वेळप्रसंगी दंडही करतो. (६७)

येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु ।
येक बोलिजे जगद्गुपरु । सकळकळा ॥ ६८॥
एक माता गुरू, तर एक पिता गुरू असतो. कुणी सजा गुरू तर कुणी देव गुरू असतो, तर कुणी सकलकला- संपन्न जगदुरू म्हटला जातो. (६८)

ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु ।
ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९॥
हे असे सतरा गुरू आहेत. याशिवायही काही गुरू आहेत. त्यांच्याविषयीही सांगतो. (६९)

येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु ।
येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७०॥
एक स्वप्नात उपदेश करणारे स्वप्नगुरू असतात, तर कुणी विशिष्ट संप्रदायाची दीक्षा देणारे दीक्षागुरू असतात. एकाला प्रतिमा-गुरू म्हणतात, ते मूर्तिरूप गुरू होत. कुणी आपला गुरू आपणच असेही असतात. (७०)

जे जे यातीचा जो व्यापारु । ते ते त्याचे तितुके गुरु ।
याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१॥
च्या ज्या जातीचा जो जो व्यवसाय, उद्योगधंदा असेल, ते ते शिकविणारे त्या त्या जातीचे तितके गुरू असतात, असा विचार केला असता उदंड गुरू आहेत. (७१)

असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु ।
परी जो मोक्षदाता सद्‌गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२॥
असो. या प्रमाणे नाना मतांचा विचार केला असता असे असंख्य गुरू आढळून येतात. पण मोक्षदाता सदुरू या सर्वांपेक्षा वेगळाच असतो. (७२)

नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण ।
हें सद्गुरूचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३॥
ज्याच्या ठिकाणी सद्‌विद्येची लक्षणे, गुण असतात व त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे जो अत्यंत कृपाळू असतो, तोच सदुरू असतो. हे सदुरूचे लक्षण श्रोत्यांनी नीट जाणून घ्यावे, असे श्रीसमर्थ सांगतात. (७३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गुरुलक्षणनाम समास दुसरा ॥ २॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'गुरुलक्षणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : शिष्यलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात सद्‌गुरूचे लक्षण विस्तारपूर्वक सांगितले. आता सतप्शष्य कुणास म्हणावे, त्याची लक्षणे कोणती, हे सावधपणे ऐका. (१)

सद्‌गुरुविण सच्छिष्य । तो वायां जाय निशेष ।
कां सच्छिष्येंविण विशेष । सद्‌गुरु सिणे ॥ २॥
सदुरूंची प्राप्ती झाली नाही, तर शिष्य चांगला असून तो संपूर्णपणे वाया जातो किंवा सतरशष्य जर भेटला नाही, तर सदुरू व्यर्थच शिणतात. (२)

उत्तमभूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडखाद ।
कां तें उत्तम बीज परी समंध । खडकेंसि पडिला ॥ ३॥
उत्तम सुपीक शुद्ध जमीन आहे, ती शुद्धही केली, पण त्यात किडके बीज जर पेरले; किंवा उत्तम बीज आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले गेले, तर दोन्ही ठिकाणी चांगले पीक येणारच नाही. (३)

तैसा सच्छिष्य तें सत्पात्र । परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र ।
तेथें अरत्र ना परत्र । कांहिंच नाहीं ॥ ४॥
त्याप्रमाणे सत्शिष्य हा ज्ञानोपदेशास सत्पात्र आहे पण गुरू त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्र, तंत्र सांगू लागले, तर त्या शिष्याचे इहलोकीही सार्थक होत नाही व परलोकीही सार्थक होत नाही. (४)

अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी ।
भाअग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५॥
अथवा गुरू अत्यंत अधिकारसंपन्न आहे, तो पूर्ण कृपाही करतो, पण शिष्यच जर अनधिकारी असेल, तर एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निपजावा, तशी स्थिती होते. ५

तैसें येकाविण येक । होत असे निरार्थक ।
परलोकींचें सार्थक । तें दुर्ह्हावे ॥ ६॥
तसे एकाशिवाय दुसरे निरर्थक ठरते व परलोकीचे सार्थक दूरच राहते. (६)

म्हणौनि सद्‌गुरु आणी सच्छिष्य । तेथें न लगती सायास ।
त्यां उभयतांचा हव्यास । पुरे येकसरा ॥ ७॥
म्हणून सदुरू आणि सत्शिष्य ह्यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीही सायास करावे न लागता दोघांची इच्छा एकदमच पुरी होते. (७)

सुभूमि आणी उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण ।
तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ॥ ८॥
पण याप्रमाणे जरी भूमी उत्तम आहे, बीज ही उत्तम आहे, पण पर्जन्याशिवाय उत्तम पीक उगवून हाती येत नाही, तसेच अध्यात्माचे निरूपण जर नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही. (८)

सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें ।
साधनेंविण तैसें जालें । साधकांसी ॥ ९॥
शेतात बी पेरले, ते उगवूनही आले, पण त्याची. जर नीट निगा राखली गेली नाही, तर ते फुकट जाते. त्याप्रमाणे साधकाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधन जर केले नाही, तर त्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही. (९)

जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे ।
पीक आलियांहि, उगें- । राहोंचि नये ॥ १०॥
जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही, तोपर्यंत सर्व तव्हेने त्याची काळजी घ्यावीच लागते. एवढेच नव्हे, तर पीक आल्यावरही स्वस्थ राहून चालत नाही. (१०)

तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें ।
येक वेळ उदंड जेविलें । तर्ह्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥
त्याप्रमाणेच साधकाला आत्मज्ञान झाले तरी त्याने साधना करीतच राहिले पाहिजे. कारण एकवेळ अगदी पोटभर जेवलो तरी तेवढ्याने भागत नाही, पुन्हा भूक लागते. म्हणून भोजनसामग्री जवळ असावीच लागते. (११)

म्हणौन साधन अभ्यास आणी सद्‌गुरु । सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु ।
सत्कर्म सद्वासना, पारु- । पाववी भवाचा ॥ १२॥
म्हणून साधन, त्याचा अभ्यास, त्यात मार्गदर्शन करणारे सदुरू आणि त्यांच्या आदेशाचे कसोशीने पालन करणारा सतरशष्य, सतूशास्त्रविचार सत्कर्म, सद्‌वासना या सर्व गोष्टी असतील, तरच भवसागरातून पार जाता येते. (१२)

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणी स्वधर्म ।
सत्संग आणी नित्य नेम । निरंतर ॥ १३॥
ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान निवळे ।
नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदा‍ईं ॥ १४॥
सदुपासना, सत्कर्म, सतूक्रिया, स्वधर्म, सतूसंग आणि नित्यनेम, या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होते. नाहीतर लोकांत बळेच पाखंडाचा प्रचार होतो. (१३ - १४)

येथें शब्द नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्‌गुरुपासीं ।
सद्‌गुरु पालटी अवगुणासी । नाना येत्नें करूनी ॥ १५॥
यात शिष्याचा दोष नसतो. हे सर्व सदुरूवर अवलंबून असते. कारण शिष्य अवगुणी असला तरी सदुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात. (१५)

सद्‌गुरुचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्‌गुरु न पालटे ।
कां जें थोरपण तुटे । म्हणौनिया ॥ १६॥
असत् शिष्य असला तरी सदुरूंनी प्रयत्न केल्यावर त्याच्या ठिकाणचे अवगुण जाऊन त्याच्यात चांगला बदल घडून येतो. परंतु सत्शिष्याच्या योगे असदुरूंमध्ये कधीही सुधारणा होऊ शकत नाही. कारण गुरूंना आपल्या मोठेपणाचा अभिमान असतो, त्यामुळे ते सत्शिष्याचे ऐकत नाहीत. (१६)

याकरणें सद्‌गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे ।
नाहिं तरी हो‍ईजे । पाषांडा वरपडे ॥ १७॥
या कारणामुळे सदुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. तसे सदुरू भेटले तरच सन्मार्ग प्रास होतो. नाहीतर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो. (१७)

येथें सद्‌गुरुचि कारण । येर सर्व निःकारण ।
तथापि सांगो वोळखण । सच्छिष्याची ॥ १८॥
म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सदुरूंची भेट व्हावी लागते. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तथापि सतू-शिष्याची लक्षणे आता सांगतो. (१८)

मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्‌गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।
अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥
सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे सदुरूंच्या वचनावर त्याचा संपूर्ण विश्वास असतो व तो अनन्यभावाने सदुरूंना शरण जातो. (१९)

शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ ।
शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २०॥
शिष्य निर्मळ असावा. आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषांची ज्याला जाणीव आहे व त्याबद्दल ज्याला पश्चात्ताप वाटतो, असा असावा. (२०)

शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत ।
शिष्य पाहिजे नेमस्त । सर्वप्रकारीं ॥ २१॥
शिष्य निष्ठावंत असावा, पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा. (२१)

शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष ।
शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥ २२॥
शिष्य अत्यंत उद्योगी, परम दक्ष आणि अलक्ष्म अशा परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल, असा असावा. (२२)

शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार ।
शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३॥
शिष्य अत्यंत धैर्यवान, अत्यंत उदार आणि परमार्थाविषयी अतितत्यर असावा. (२३)

शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।
शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४॥
तो परोपकारी निर्मत्सरी आणि अध्यात्मनिरूपण श्रवण करताच त्यातील लक्ष्यार्थ जाणण्याची पात्रता असणारा असावा. (२४)

शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध ।
शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५॥
शिष्य अत्यंत शुद्ध अतिशय सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा. (२५)

शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त ।
शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६॥
शिष्य प्रज्ञावंत प्रेमळ भक्त आणि नीतिमान असून मर्यादशील असावा. (२६)

शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत ।
शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता ॥ २७॥
शिष्य युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्यानित्यविचार करून वागणारा असावा. (२७)

शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढ व्रताचा ।
शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यसीळ ॥ २८॥
शिष्य धाडसी, दृढव्रती आणि उत्तम कुलांत जन्मलेला पुण्यशील असा असावा. (२८)

शिष्य असावा सात्विक । शिष्य असावा भजक ।
शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९॥
तो सात्त्विक, भजनतत्यर आणि नित्यनेमाने साधन करणारा साधकही असावा. (२९)

शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी ।
शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३०॥
गुरूंच्या चरणी त्याचा दृढ विश्वास असावा. शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी तीव्र इच्छा त्याला असावी. (३०)

शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र ।
शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१॥
शिष्य स्वतंत्र जगमित्र, सर्वगुणसंपन्न आणि परमार्थास अत्यंत लायक असावा. (३१)

शिष्य असावा सद्विद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा ।
शिष्य असावा अंतरींचा । परमशुद्ध ॥ ३२॥
तो सद्‌विद्येच्या लक्षणांनी युक्त, सद्धावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असावा. (३२)

शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी ।
शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देही ॥ ३३॥
शिष्य अविवेकी नसावा. तो गर्भश्रीमंत नसावा. तर तो त्रिविधतापाने संतप्त झालेला व संसारदुःखाने दुखावलेला असावा. (३३)

जो संसारदुःखें दुःखवला । जो त्रिविधतापें पोळला ।
तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४॥
कारण जो संसार खाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थप्रासीसाठी योग्य अधिकारी ठरतो. (३४)

बहु दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे ।
संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५॥
ज्याने अत्यंत दु ख भोगलेले असते, त्याच्या अंतःकरणातच परमार्थ बाणतो. कारण संसारदुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेले असते. (३५)

जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास ।
विस्वासबळें दृढ कास । धरिली सद्गुरूची ॥ ३६॥
जो संसारामुळे अत्यंत त्रासलेला असतो, त्याचाच सदुरुचरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो आणि त्या दृढ विश्वासाच्या बळावर तो सदुरूंची कास घट्ट पकडतो. (३६)

अविस्वासें कास सोडिली । ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं ।
नाना जळचरीं तोडिलीं । मध्येंचि सुखदुःखें ॥ ३७॥
पण कित्येक साधक अविश्वासाने सदुरूंची कास सोडतात ते बहुतेक लोक भवसागरात बुडतात किंवा मध्येच नाना जलचर त्यांचे लचके तोडतात व ते सुख- दु खाच्या अधीन होतात. (३७)

याकारणें दृढ विस्वास । तोचि जाणावा सच्छिष्य ।
मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु ॥ ३८॥
म्हणून जो दृढ विश्वास ठेवतो, तोच सत्शिष्य जाणावा. मोक्षाला पात्र असणाऱ्या साधकांमध्ये तो अग्रगण्य असतो. (३८)

जो सद्‌गुरुवचनें निवाला । तो सयोज्यतेचा आंखिला ।
सांसारसंगे पांगिला । न वचे कदा ॥ ३९॥
जो शिष्य सदुरूंच्या वचनाने निवालेला असतो, तोच सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो. मग तो संसारातील संकयंनी कधीही गर्भगळित होत नाही. (३९)

सद्‌गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ।
सुटला वैभवाचा फांटा । सामरथ्यपिसें ॥ ४०॥
सदुरूहून देव मोठा असे ज्या शिष्याला वाटते, तो शिष्य खरोखर अभागीच समजावा. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा श्रम उत्पन्न झालेला असतो. (४०)

सद्‌गुरुस्वरूप तें संत । आणी देवांस मांडेल कल्पांत ।
तेथें कैचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१॥
सदुरुस्वरूप हे नित्य असते. कल्पानाच्या समयी सर्व देवही लय पावतात. मग त्या वेळी हरिहरांचे सामर्थ्य कसे उरेल ? (४१)

म्हणौन सद्‌गुरुसामर्थ्य आधीक । जेथें आटती ब्रह्मादिक ।
अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसि हें कळेना ॥ ४२॥
जेथे ब्रह्मादिकही लय पावतात, तेथे सदुरुस्वरूप नित्य असल्याने त्याचे सामर्थ्य सर्व देवापेक्षाही अधिक असते. पण मानव अल्पज्ञ असल्याने त्याच्या ठिकाणी बुद्धीचे दाखिद्य असते, त्यामुळे हे मर्म त्याला कळत नाही. (४२)

गुरुदेवांस बराबरी- । करी तो शिष्य दुराचारी ।
भ्रांति बैसली अभ्यांतरीं । सिद्धांत नेणवे ॥ ४३॥
गुरू आणि देव यांची जो बरोबरी करतो, तो शिष्य दुराचारी समजावा. तो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सुदृढ झालेले असते. (४३)

देव मनिषीं भाविला । मंत्रीं देवपणासि आला ।
सद्‌गुरु न वचे कल्पिला । ईश्वराचेनि ॥ ४४॥
वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो, मंत्रामुळे देवाला देवपण येते, परंतु ईश्वरालाही सदुरूची कल्पना करता येणार नाही. (४४)

म्हणौनि सद्‌गुरु पूर्णपणें । देवाहून आधीक कोटिगुणें ।
जयासि वर्णितां भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥ ४५॥
म्हणून सदुरू हे देवांपेक्षा कोटीगुणानेही अधिक श्रेष्ठ आहेत, कारण ते परिपूर्ण आहेत. त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांचे पूर्ण ज्ञानच कुणाला होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्याच्या प्रयत्नात वेद आणि शास्त्रे यांच्यात मतभेद आहेत. (४५)

असो सद्‌गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे ।
देवसामर्थ्य तें केवढें । मायाजनित ॥ ४६॥
असो. सदुरुपदाहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही, कारण ते मायातीत आहेत. त्याच्यापुढे मायाजनित देवांचे सामर्थ्य ते केवढे ? (४६)

अहो सद्‌गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तयापासीं ।
ज्ञानबळें वैभवासी । तृणतुछ केलें ॥ ४७ ॥
अहो, ज्याच्यावर सदुरूंची कृपा होते. त्याच्यावर कुणाचीही सत्ता चालू शकत नाही. कारण सदुरुकृपेने त्याला ज्ञान झालेले असते व त्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवास कस्पयसमान तुच्छ मानतो. (४७)

अहो सद्‌गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळें ।
मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न यें ॥ ४८॥
सदुरुकृपेच्या बळाने प्रास झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानुभवाच्या बळाने मायेसहित सर्व ब्रह्मांडत्याच्या दृष्टीसच पडत नाही. (४८)

ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्‌गुरुवचनीं दृढ भाव ।
तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥ ४९॥
सत्शिष्याचे वैभव हे असे असते. सदुरुवचनावर त्याचा दृढ विश्वास असतो. त्यायोगे तो स्वतःच ईश्वरस्वरूप बनून जातो. (४९)

अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें ।
पुढें सद्‌गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५०॥
ज्या शिष्याचे अंतःकरण पश्चात्तापाने पोळून शुद्ध झालेले असते व सदुरूवचनाने ज्यांना समाधान लाभते, तेच सत्शिष्य होत. (५०)

लागतां सद्गु‍रुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें ।
तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ॥ ५१॥
सदुरूच्या उपदेशाप्रमाणे साधन मार्ग आक्रमीत असता ब्रह्मांड पालथे होण्याचा प्रसंग आला तरी ज्याच्या सदुरूवरील निष्ठेत थोडासुद्धा पालट होत नाही. (५१)

शरण सद्गुरूस गेले । सच्छिष्य ऐसे निवडले ।
क्रियापालटें जाले । पावन ईश्वरीं ॥ ५२॥
याप्रकारे अनन्यभावाने जे सदुरूस शरण जातात, त्यांनाच सत्शिष्य म्हणतात. त्याच्यांत आत बाहेर बदल होऊन ते ईश्वरस्वरूपी ऐक्य पावून पावन होतात. (५२)

ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वाटेकरी ।
येर माईक वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३॥
असा सदुरूविषयी दृढ सद्धाव ज्यांच्या अंतरात असतो, तेच मुक्तीचे वाटेकरी ठरतात. बाकीचे शिष्य नुसते वेषधारी असतात. ते असते शिष्यच होत. (५३)

वाटे विषयांचे सुख । परमार्थ संपादणे लौकिक ।
देखोवेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४॥
असे जे वेषधारी असत् शिष्य असतात, ते खरे तर विषयांत सुख मानणारे असतात. लोकांत प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात व त्यासाठी सदुरूस शरण जाण्याचा देखावा करतात. वास्तविक ते पढतमूर्ख असतात. (५४)

जाली विषईंप वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार ।
परमार्थचर्चेचा विचार । मळिण झाला ॥ ५५॥
अशांना विषयांची अनावर ओढ असते. त्यांनी संसायला दृढ धरलेले असते. त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो. (५५)

मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा ।
भार वाहिला कुटुंबाचा । काबाडी जाला ॥ ५६॥
त्यांना हव्यूळूपरमार्थाचा कंद्यळा येऊलागतो. प्रपंचाचा त्यांना लोभ असतो, त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्याचे सेवक बनून जातात. (५६)

मानिला प्रपंचीं आनंद । केला परमार्थी विनोद ।
भ्रांत मूढ मतिमंद । लोधला कामीं ॥ ५७॥
प्रपंच करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो. परमार्थ ते करमणुकीकरता करतात. ते भ्रमात राहतात आणि मूळ व मतिमंद असून कामाने लुब्ध होतात. (५७)

सूकर पूजिलें विलेपनें । म्हैसा मर्दिला चंदनें ।
तैसा विषई" ब्रह्मज्ञानें । विवेकें बोधिला ॥ ५८॥
सुकराला सुगंधी लेप लावावा, रेड्याला चंदनाने मर्दन करावे, तसे विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे हे याप्रमाणेच व्यर्थ आहे. (५८)

रासभ उकिरडां लोळे । तयासि परिमळसोहळे ।
उलूक अंधारीं पळे । तया केवी हंसपंगती ॥ ५९॥
गाढव उकिरड्यावर लोळत असते, त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन करून काय उपयोग ? घुबडाला अंधार प्रिय असतो, त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेते. त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या पंगतीत कसे बसविता येईल ? (५९)

तैसा विषयदारींचा बराडी । घाली अधःपतनीं उडी ।
तयास भगवंत आवडी । सत्संग कैंचा ॥ ६०॥
त्याप्रमाणे आशाळभूतपणे विषयसुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंताची आवड सत्संगाची आवड कशी असणार ? (६०)

वर्ती करून दांताळीं । स्वानपुत्र हाडें चगळी ।
तैसा विषई" तळमळी । विषयसुखाकारणे । ॥ ६१॥
ज्याप्रमाणे एखादे कुत्र्याचे पिल्लू दात काढून हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे विषयासक्त माणसालाही विषयोपभोगातच सुख वाटते. ते मिळाले नाही, तर तो त्यासाठी तळमळू लागतो. (६१)

तया स्वानमुखीं परमान्न । कीं मर्कटास सिंहासन ।
तैसें विषयशक्तां ज्ञान । जिरेल कैंचें ॥ ६२॥
त्या हाड चघळण्यात सुख मानणाऱ्या श्वानाच्या मुखी परमान्न दिले, तर त्याला ते कसे गोड लागेल ? किंवा माकडाला सिंहासन आवडत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान विषयासक्त माणसाला कसे बरे पचनी पडेल ? (६२)

रासभें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्यें प्रतिष्ठला ।
न वचे, तैसा आअशक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३॥
गाढवे राखता राखता ज्याचा जन्म गेला, अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत नेऊन बसविले, तर त्याला ते मानवत नाही. तसा विषयासक्त माणसाला परमार्थ मानवत नाही. (६३)

मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा ।
लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ॥ ६४॥
राजहंसांच्या समुदायात एखादा डोंबकावळा चुकून आला तरी त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडे असते. मात्र तो स्वतःला हंस म्हणवितो. (६४)

तैसे सज्जनाचे संगती । विषई सज्जन म्हणविती ।
विषय आमेद्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५॥
तसेच सज्जनांच्या संगतीत आलेले विषयासक्त लोक स्वतःला सज्जन म्हणवितात, पण त्या डोंबकावळ्याप्रमाणेच त्यांचे सर्व लक्ष विषयरूपी अपवित्र गोळ्याकडेच लागलेले असते. (६५)

काखे घे‍ऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा ।
तैसा विषई् सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥ ६६॥
बायकोला काखेत घेऊन जर कुणी ' मला संन्यासी कस, असे म्हणू लागला, तर त्याचे ते बोलणे जसे असंबद्ध वाटते, त्याप्रमाणे विषयी माणसाची ज्ञानासंबंधीची बडबड असते. (६६)

असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख ।
नारकी प्राणी नर्क । भोगिती स्वैच्छा ॥ ६७॥
असो. जे असे पढतमूर्ख असतात, ते अद्वैत सुख कसे काय जाणू शकतील ? नरकयोग्य जे प्राणी असतात ते स्वतःच्या इच्छेनेच नरक भोगतात. (६७)

वैषेची करील सेवा । तो कैसा मंत्री म्हणावा ।
तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवी ॥ ६८॥
वेश्येची जो सेवा करतो, तो सज्याचा मंत्री कसा काय होऊ शकेल ? त्याप्रमाणे जो विषयांचा दास बनलेला आहे, त्याला भक्तराज कसे मानावे ? (६८)

तैसे विषईद बापुडे । त्यांस ज्ञान कोणीकडे ।
वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे जाले ॥ ६९॥
तसेच जे विषयी लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना आत्मज्ञान कसे मिळणार ? ते वाचाळ शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात. (६९)

ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमधें कनिष्ठ ।
हीन अविवेकी आणी दृष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७०॥
असे जे शिष्य ते परमनष्ट कनिष्ठांमध्येही कनिष्ठ, हीन, अविवेकी, कु. खळ खोटे आणि दुर्जन असतात. (७०)

ऐसे जे पापरूप । दीर्घदोषी वज्रलेप ।
तयांस प्राश्चीत, अनुताप- । उद्भवतां ॥ ७१॥
असे जे पापरूप, दीर्घकाळ दोष केलेले व त्यामुळे ते दोष जणू वब्रलेपासारखे ज्यांचे झाले आहेत, त्यांना जर पश्चात्ताप अगदी मनापासून झाला, तर तेच त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त ठरते. (७१)

तेंहि पुन्हां शरण जावें । सद्गुरूस संतोषवावें ।
कृपादृष्टी जालियां व्हावें । पुन्हां शुद्ध ॥ ७२॥
त्यांनी परत सदुरूंना शरण जावे, त्यांना प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे त्यांना सदुरूंची कृपादृष्टी लाभेल व ते परत शुद्ध होतील. (७२)

स्वामीद्रोह जया घडे । तो यावश्चंद्र नरकीं पडे ।
तयास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचुनी ॥ ७३॥
जो गुरुद्रोह करतो, त्याला अनंतकाळपर्यंत नरकात खितपत पडावे लागते. गुरूंना प्रसन्न करण्यावाचून यातून सुययला दुसरा उपायच नाही. (७३)

स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें ।
तेणें गुणें उपतिष्ठले- । नाहीं ज्ञान । ७४॥
स्मशानवैराग्य आले, म्हणून लोयंगण घालून गुरूंना जरी शरण आला, तरी ते वैराग्य क्षणिक असल्याने त्याला ज्ञान प्रास नाही. (७४)

भाव आणिला जायाचा । मंत्र घेतला गुरूचा ।
शिष्य जाला दो दिसांचा । मंत्राकारणें ॥ ७५॥
अगदी क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सदुस्कडून मंत्र घेतला, तर त्या मंत्रामुळे तो दोन दिवसांपुरता शिष्य झाला. (क)

ऐसे केले गुरु उदंड । शब्द सिकला पाषांड ।
जाला तोंडाळ तर्मुंड । माहापाषांडी ॥ ७६॥
अशा शिष्याने अनेक गुरू केले, तरी तो पाखंडीपणा शिकला, शब्दज्ञान बडबडू लागला, उचखल महापाखंडी झाला, असे होईल. (७६)

घडी येक रडे आणी पडे । घडी येक वैराग्य चढे ।
घडी येक अहंभाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७॥
घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे दाखवून रडतो, तर घटकेत गडबडा लोळतो, तर दुसऱ्या घडीला वैराग्य आल्याचे दाखवतो, तर परत काही वेळाने ज्ञातेपणाचा अहंभाव त्याच्या ठिकाणी दिसून येतो. (७७)

घडी येक विस्वास धरी । सवेंच घडि येक गुर्गुरी ।
ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८॥
घटकेत अत्यंत विश्वास असल्याचे दाखवतो, तर दुसऱ्या घडीला मृगाने गुरगुतयला लागतो. असे एखाद्या वेड्यासारखे नाना छंद तो करतो. (७८)

काम क्रोध मद मत्सर । लोभ मोह नाना विकार ।
अभिमान कापट्य तिरस्कार । हृदईंा नांदती ॥ ७९॥
त्याच्या हृदयात काम, क्रोध, मद, मत्सर लोभ, मोह, अभिमान, कपटीपणा, तिरस्कार इत्यादी नाना विकार असतात. (७९)

अहंकार आणी देहपांग । अनाचार आणी विषयसंग ।
संसार प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८०॥
अहंकार आणि देहासक्ती अनाचार आणि विषयासक्ती, संसार प्रपंच आणि उद्वेग अंतरात वास करतात. (८०)

दीर्घसूत्री कृतघ्न पापी । कुकर्मी कुतर्की विकल्पी ।
अभक्त अभाव सीघ्रकोपी । निष्ठुर परघातक ॥ ८१॥
तो चेंगद कृतप्न, पापी, कुकर्म करणारा, कुतर्क करणारा, संशयी, अभक्त, भावहीन, आणि शीधकोपी, तसेच निष्ठर आणि लोकांचा घात करणारा असतो. (८१)

हृदयेंसुन्य आणी आळसी । अविवेकी आणि अविस्वासी ।
अधीर अविचार, संदेहासी- । दृढ धर्ता ॥ ८२॥
हदयशून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर अविवेकाला आणि संशयाला दृढपणे धरून ठेवणात असतो. (८२)

आशा ममता तृष्णा कल्पना । कुबुद्धी दुर्वृत्ति दुर्वासना ।
अल्पबुद्धि विषयकामना । हृदईं वसे ॥ ८३॥
आशा, ममता, कृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती आणि दुर्वासना, अल्पबुद्धी आणि विषयकामना त्याच्या हृदयात वस्ती करतात. (८३)

ईषणा असूया तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें ।
देहाभिमानें हुंबरे । जाणपणें ॥ ८४॥
ईर्ष्या, मत्सर तिरस्कार यांना वश होऊन तो अति आदग्रनेलोकांची निंदा करतो. देहाभिमानामुळेतो जाणीवपूर्वक गर्वाने, उन्मत्तपणे वागतो. (८४)

क्षुधा तृष्णा आवरेना । निद्रा सहसा धरेना ।
कुटुंबचिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५॥
त्याला भूक तहान आवरत नाही. बहुतेक वेळा झोपही आवरत नाही आणि सतत कुटुंबाची चिंता करीत असतो. त्याला भ्रांती पडलेली असते. (८५)

शाब्दिक बोले उदंड वाचा । लेश नाहीं वैराग्याचा ।
अनुताप धारिष्ट साधनाचा । मार्ग न धरी ॥ ८६॥
तोंडाने तो सारखा शब्दज्ञान बडबडतो, पण त्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो. त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी कृतकर्माचा पश्चात्तापही नसतो, धाडस नसते आणि तो साधनाचा मार्गही धरीत नाही. (८६)

भक्ति विरक्ति ना शांती । सद्वृात्ति लीनता ना दांती ।
कृपा दया ना तृप्ती । सुबुद्धि असेच ना ॥ ८७॥
त्याच्याजवळ भक्ती, विरक्ती, शांती, सद्‌वृत्ती, लीनता, इंद्रियदमन, कृपा, दया, तृप्ती अथवा सुबुद्धी यांपैकी काहीही असतच नाही. (८७)

कायाक्लेसीं शेरीरहीन । धर्मविषईं‍ परम कृपण ।
क्रिया पालटेना कठिण । हृदये जयाचें ॥ ८८॥
तो शायरिककष्टचुकविणाय असतो. धर्माच्या संबंधात अत्यंत कृपण असून कठोर अंतःकरणाचा असतो व त्याच्या आचरणात कधी सुधारणाही होत नाही. (८८)

आर्जव नाहीं जनासी । जो अप्रिये सज्जनासी ।
जयाचे जिवीं आहिर्णेसीं । परन्यून वसे ॥ ८९॥
तो लोकांशी सरळ वागत नाही. सज्जनांना तो आवडत नाही. त्याच्या चित्तात रात्रंदिवस दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन चालू असते. (८९)

सदा सर्वकाळ लटिका । बोले मा‍ईक लापणिका ।
क्रिया विचार पाहतां, येका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९०॥
सदासर्वकाळतो खोयरडा असतो. तो तोंडदेखलेपणाने गोड गोड बोलतो. त्याच्या आचार-विचारांत मेळ नसतो आणि त्याचे कुठलेच बोलणे खरे नसते. (९०)

परपीडेविषईंर तत्पर । जैसे विंचु आणि विखार ।
तैसा कुशब्दें जिव्हार । भेदी सकळांचें ॥ ९१॥
विंचू आणि सर्पांच्याप्रमाणे तो परपीडेविषयी अत्यंत तत्पर असतो आणि लागट शब्द बोलून तो सर्वांचे अंतःकरण दुखावतो. (९१)

आपले झांकी अवगुण । पुढिलांस बोले कठिण ।
मिथ्या गुणदोषेंविण । गुणदोष लावी ॥ ९२॥
तो आपले अवगुण लपवून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या दोषाबद्दल त्यांना कठोर शब्द बोलतो. गुणदोष नसताना उगीचच खोटेपणाने दुसऱ्यावर आरोप करतो. (९२)

स्वयें पापात्मा अंतरीं । पुढिलांचि कणव न करी ।
जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३॥
स्वतः अत्यंत पापी अंतःकरणाचा असून दुक्याची दयामाया ठेवत नाही. एखादा दुराचारी कूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दु खाने कधी कष्टी होत नाही, तसेच याचे वागणे असते. (९३)

दुःख पराव्याचें नेणती । दुर्जन गांजिले चि गांजिती ।
श्रम पावतां आनंदती । आपुले मनीं ॥ ९४॥
दुर्जन लोक असतात ते दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाहीत, दुसऱ्यांना सतत छळतच राहतात आणि त्यांना कष्ट झाले पाहिले की ते मनोमन आनंदून जातात. (९४)

स्वदुःखें झुरे अंतरीं । आणी परदुःखें हास्य करी ।
तयास प्राप्त येमपुरी । राजदूत ताडिती ॥ ९५॥
आपल्या दु खाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दु ख झाले पाहून ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात, त्याला यमलोक प्राप्त होतो व तेथे यमराजाचे दूत त्याला मारतात. (९५)

असो ऐसें मदांध बापुडें । तयांसि भगवंत कैंचा जोडे ।
जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेंकरूनी ॥ ९६॥
असो. असे जे बिचारे मदांध लोक असतात, ज्यांना त्यांच्या पूर्वपातकांच्यामुळे सुबुद्धी आवडत नाही; त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होणार ? (९६)

तयास देहाचा अंतीं । गात्रें क्षीणता पावती ।
जिवलगें वोसंडिती । जाणवेल तेव्हां ॥ ९७॥
त्यांना देहाचा अंतकाळ जवळ येऊन ज्या वेळी सर्व गात्रे क्षीण होतील आणि जिवलग म्हणविणारी माणसेही जेव्हा सोडून जातील त्या वेळी कृतकर्मांची जाणीव होईल. (९७)

असो ऐसे गुणावेगळे । ते सच्छिष्य आगळे ।
दृढभावार्थें सोहळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८॥
असो. येथे वर्णन केले अवगुण ज्यांच्या ठिकाणी नसतात असे शिष्य आगळेच असतात. त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव दृढ असतो. त्यामुळे त्यांना स्वस्वरूपानुभव येऊन ते स्वानंदाचा उपभोग घेतात. (९८)

जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभिमान पाठीं लागे ।
ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९॥
ज्यांच्या ठिकाणी संशय असतो आणि जे अत्यंत झ्यभिमानी असतात, ते प्रपंचात आसक्त होऊन दु ःखी-कष्टी होतात. (९९)

जेणेंकरितां दुःख जालें । तेंचि मनीं दृढ धरिलें ।
तेणें गुणें प्राप्त जालें । पुन्हां दुःख ॥ १००॥
ज्यायोगे दु ख झालेले असते ते अज्ञान ते मनात दृढ धरून ठेवतात. त्यामुळे त्यांना वारंवार दुःख भोगावे लागते. (१००)

संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।
ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १०१॥
संसारात ममत्व ठेवल्याने कुणाला सुख झाले आहे असे कधीही दिसून येत नाही किंवा ऐकूही येत नाही. हे जाणूनही जे आपले स्वतःचे अहित करतात, ते आपल्या स्वत: च्या करणीनेच स्वत : दु ख भोगतात. (१०१)

संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती ।
जाणोन डोळे झांकिती । पढतमूर्ख ॥ १०२॥
अत्यंत छ बुद्धीचे जे असतात, तेच लोक संसारात सुख मानतात आणि जे पढतमूर्ख असतात, त्यांना हे सर्व कळत असूनही ते तिकडे डोळेझाक करतात. (१०२)

प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा ।
परमार्थ अवघाचि बुडवावा । हें विहित नव्हे ॥ १०३॥
श्रीसमर्थ शेवटी सांगतात की, प्रपंच करायला काहीच हरक्त नाही, पण त्याचबरोबर आपत्य परमार्थही थोड थोड वाढवावा. परमार्थ सर्वस्वी बुडवावा, हे मनुष्यास केव्हाही योग्य नाही. (१०३)

मागां जालें निरूपण । गुरुशिष्यांची वोळखण ।
आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४॥
मागील दोन समासांत गुरूची व शिष्याची लक्षणे वर्णन करून सांगितली. आता पुढील समासांत उपदेशाचे लक्षण सांगितले जाईल. (१०४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शिष्यलक्षणनाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिष्यलक्षणनाम समास तिसरा समाप्त.

GO TOP

समास चौथा : उपदेशलक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें ।
सांगतां तें असाधारणें । परी कांहीं येक सांगों ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता उपदेशाची लक्षणे ऐका. ती असंख्य आहेत. ती सर्व सांगावयाची म्हटली तर ते शक्य होणार नाही, पण येथे त्यातील काही सांगतो. (१)

बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती ।
येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २॥
बरेचसे गुरू मंत्राचा उपदेश करतात, कोणी फक्त नामच सांगतात, तर कुणी ओंकाराचा जप करवितात. (२)

शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र ।
अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३॥
कुणी शिवमंत्र, कुणी भवानीमंत्र, कुणी विण्यमत्र, कुणी महालक्ष्मीमंत्र, कुणी अवधूतमंत्र, कुणी गणेशमंत्र, तर कुणी मार्तंड मंत्र याप्रमाणे निरनिराळ्या मंत्रांचा उपदेश करतात. (३)

मछकूर्मवर्ह्हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र ।
भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४॥
मल, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशराम, श्रीराम किंवा श्रीकृष्णमंत्रांचा उपदेश करतात. (४)

भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र ।
नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५॥
कोणी भैरव मंत्र, मल्हारी मंत्र, हनुमंत मंत्र, यक्षिणींचा मंत्र, नारायण मंत्र, पांडूरंग मंत्र, किंवा अघोर मंत्रही कुणी कुणी सांगतात. (५)

शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमन्त्र वेताळमंत्र ।
झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे ॥ ६॥
शेषमंत्र, गरुडमंत्र, वायुमंत्र, वेताळमंत्र, झोटिंगमंत्र असे अनेक मंत्र आहेत, ते किती म्हणून सांगावेत ? (६)

बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र ।
बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७॥
बाळामंत्र, बगुळामत्र, कालिमंत्र, कंकाळीमंत्र, बहुकमंत्र असे अनेक शक्तींचे अनेक मंत्र आहेत. (७)

पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र ।
सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८॥
जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे व स्वतंत्र आहेत. काही सोपे आहेत, काही अवघड आहेत, काही खेचर किंवा दारुण बीजाचे असे सर्व विचित्र विचित्र आहेत. (८)

पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी ।
तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९॥
पृथ्वीवर असंख्य देव आहेत. त्यांची गणना करणे शक्यच नाही. जितके देव तितके मंत्र असल्याने वाणीने किती म्हणून वर्णन करावे ? (९)

असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा ।
विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १०॥
मंत्रमाळा असंख्य आहेत. एकापेक्षा एक सामर्थ्यसंपन्न आहेत. हा सर्व मायेचा विचित्र खेळ आहे. तो कोण जाणू शकेल ? (१०)

कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती ।
कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११॥
कित्येक मंत्रांनी भूतबाधा नाहीशी होते. कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात. तर कित्येक मंत्रांनी थंडीताप किंवा विंचू व साप यांचे विष उतरते. (११)

ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं ।
जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२॥
अशा नाना प्रकारच्या मंत्रांचा कानात उपदेश देतात व त्यांचे जप, ध्यान, पूजा, यंत्र इत्यादीसंबंधीची विधानयुक्त सर्व माहिती सांगतात. (१२)

येक शिव शिव सांगती । । येक हरि हरि म्हणविती ।
येक उपदेशिती । विठल विठल म्हणोनी ॥ १३ ॥
एक ' शिव, शिव ' म्हणायला सांगतात, तर एक ' हरि हरि ' म्हणावयास सांगतात. कुणी ' विठ्ठल, विल्य' म्हणा असा उपदेश करतात. (१३)

येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्ण विष्ण ।
येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४॥
कुणी ' कृष्ण, कृष्ण ' म्हणायला सांगतात, तर कुणी ' विष्णू विष्णू ' म्हणायला सांगतात. तर कुणी ' नारायण, नारायण ' म्हणायला सांगतात. (१४)

येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत ।
येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५॥
एक ' अच्युत, अच्युत ' म्हणायला सांगतात, तर दुसरे कुणी ' अनंत, अनंत ' किंवा ' दत्त, दत्त ' म्हणत जावे असे सांगतात. (१५)

येक सांगती राम राम । येक सांगती ऒं ऒं म ।
येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६॥
एक ' राम, राम ' म्हणायला सांगतात, तर एक ' २, ३२ ' म्हणायला सांगतात, तर कुणी म्हणतात, मेघश्याम श्रीकृष्णाचे स्मरण त्याच्या अनेक नामांनी करावे. (१६)

येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्वरु ।
येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७॥
एक ' गुरू, गुरू ' असा जप करायला सांगतात, तर कुणी परमेश्वराचे, तर कुणी विस्तहसचे चिंतन करावे, असे म्हणतात. (१७)

येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज ।
येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८॥
एक ' शामयज ' म्हणा म्हणतात, तर दुसरे ' गरुडद्धज ' किंवा ' अधोक्षज ' म्हणत जावे, असे सांगतात. (१८)

येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव ।
येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९॥
कुणी ' देव देव ' म्हणायला सांगतात तर कुणी ' केशव केशव ' तर कुणी ' भार्गव भार्गव ' म्हणायला सांगतात. (१९)

येक विश्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती ।
येक ते जप करविती । तुका‍ई तुका‍ई म्हणौनी ॥ २०॥
एक विश्वनाथ म्हणवून घेतात, तर एक मल्हारी म्हणा असे म्हणतात. तर कुणी ' तुकाई, तुकाई ' असा जप करवून घेतात. (२०)

हें म्हणौनी सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें ।
इछेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१॥
हे सर्व किती म्हणून सांगावे ? शिवशक्तीची अनंत नामे आहेत. प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार रुचेल त्या नामाचा उपदेश करतात. (२१)

येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी ।
येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२॥
कुणी खेचरी, खरी, चाचरी आणि अगोचरी या चार मुद्रांचा अभ्यास करावा असा, तर दुसरे कुणी परोपरीची आसने करावीत असा उपदेश करतात. (२२)

येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी ।
येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३॥
कुणी प्रकाशाची किंवा तेजाची विविध रूपे दाखवितात, तर कुणी अनाहत ध्वनीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. कुणी पिंडज्ञानी गुरू असतात, ते शरीरविज्ञानाचा उपदेश करतात. (२३)

येक संगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग ।
येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥ २४॥
कुणी कर्ममार्ग तर कुणी उपासनामार्ग याचा उपदेश करतात, तर कुणी अष्टांग योग शिकवितात, तर कुणी नाना चक्रे कशी भेदन करावी, ते सांगतात. (२४)

येक तपें सांगती । येक अजपाअ निरोपिती ।
येक तत्वें विस्तारिती , तत्वज्ञानी ॥ २५॥
कुणी तप करा म्हणतात, तर कुणी अजपाजप करा म्हणतात. तर तत्त्वज्ञानी लोक तत्त्वांचे सविस्तर वर्णन करतात. (२५)

येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण ।
येक उपदेशिती तीर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६॥
कुणी सगुणाची उपासना सांगतात, तर कुणी निर्गुण उपासना सांगतात. कुणी तीर्थयात्रा करीत फिरावे म्हणून सांगतात. (२६)

येक माहावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती ।
येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनी ॥ २७॥
कुणी महावाक्ये सांगून त्यांचा जप कस म्हणतात, तर कुणी सर्व ब्रह्मच आहे असा उपदेश करतात. (२७)

येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती ।
येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८॥
कोणी शाक्तमार्ग सांगतात, तर कुणी मुक्तमार्गाचे प्रतिष्ठापन करतात. कुणी इंद्रियांचे पूजन भावाने करवितात. (२८)

येक सांगती वशीकर्ण । स्तंबन मोहन उच्चाटण ।
नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९॥
कुणी वशीकरण सांगतात, तर कुणी स्तंभन, मोहन, उच्चाटण, तसेच नाना चेटके यांचा उपदेश करतात. (२९)

ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती ।
ऐसे हे उपदेश असती । असंख्यात । ३०॥
उपदेशांची स्थिती ही अशी आहे. किती सांगणार ? याप्रमाणे उपदेशाचे अनेक प्रकार आहेत. (३०)

ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेविण निरार्थक ।
येविषईंs असे येक । भगवद्वचन ॥ ३१॥
असे अनेक प्रकारचे उपदेश असले तरी ज्ञानोपदेशाशिवाय सर्व निरर्थक आहेत. याविषयी भगवंताचे एक वचन आहे. (३१)

श्लोक ॥ नानाशास्त्रं पठेल्लोको नाना दैवतपूजनम् ।
आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥
शैवशाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मताः ।
अपभ्रंशसमास्ते । अपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥
श्लोक अर्थ- नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात. पण अर्जुना, आत्मज्ञानावाचून ही सर्व कर्मे वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व आणखी अनेक मते आहेत. भ्रमात वावरणाऱ्या जीवांना झालेला तो बुद्धिप्रशच जाणावा. या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काहीही नाही.

याकारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।
म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२॥
याकारणाने ज्ञानासारखे पवित्र व उत्तम अन्य काहीही नाही. म्हणून मनुष्याने सर्वप्रथम आत्मज्ञान प्रास करून घेतले पाहिजे. (३२)

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।
येविषईंs जगदीश । बहुतां ठा‍ईं बोलिला ॥ ३३॥
सकळ उपदेशामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश विशेष महत्त्वाचा आहे, याविषयी भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. (३३)

श्लोक ॥ यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् ।
तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ॥
श्लोक अर्थ-माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल, तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो.

आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा ।
प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४॥
चतुर्मुख ब्रह्मदेवही आत्मज्ञानाचा महिमा जाणत नाही, तेथे बिचारा जीवात्मा काय जाणार ? (३४)

सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती ।
त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५॥
सगळ्या तीर्थयात्रांच्या ठिकाणी केलेल्या खानदानादींची फलमुती जी सांगितली आहे, त्याहून ज्ञानाची फलसुती अनंत पट आहे. (३५)

श्लोक: ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् ।
तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥
श्लोक अर्थ- पृथ्वीवर जेवढी तीर्थे आहेत, तेथे खान, दान इत्यादी केल्याचे जे फळ आहे, त्याच्या कोटिपट अधिक ब्रह्मज्ञानाचे फळ आहे.

म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन ।
ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६॥
म्हणून आत्मज्ञान हे गहनाहून गहन म्हणजे अत्यंत गूढ आहे. तरी त्याचे लक्षण आता सांगितले जाईल, असे श्रीसमर्थ म्हणतात. (३६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उपदेशनाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'उपदेशलक्षणनाम' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण

॥ श्रीराम ॥

जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं निर्फळ ।
ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, जोपर्यंत अत्यंत विशुद्ध असे आत्मज्ञान जीवाला होत नाही, तोपर्यंत सर्व काही निष्कळ आहे. आत्मज्ञानाशिवाय मनाची तळमळ जाणार नाही. (१)

ज्ञान म्हणतां वाटे भस्म । काये रे बा असेल वर्म ।
म्हणौनि हा अनुक्रम । सांगिजेल आतां ॥ २॥
ज्ञान असे नुसते म्हटले की सामान्य माणूस घोयळ्यात पडतो, असे हे रहस्य काय असेल बरे ? म्हणून आता अनुक्रमाने ज्ञान म्हणजे काय ते सांगितले जाईल. (२)

भूत भविष्य वर्तमान । ठा‍ऊकें आहे परिछिन्न ।
यासीहि म्हणिजेत ज्ञान । परी तें ज्ञान नव्हे ॥ ३॥
भूत, भविष्य व वर्तमानकाळाचे स्पष्ट ज्ञान असणे, यालाही ज्ञान असे म्हणतात. परंतु ते ज्ञान नाही. खरे ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञान होय. (३)

बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाधेन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४॥
खूप विद्यापठन केले संगीत शास्त्र, रणज्ञान, वैदिक शास्त्र, वेदाध्ययन हेही खरे ज्ञान नव्हे. (४)

नाना वेवसायाचें ज्ञान । नाना दिक्षेचें ज्ञान ।
नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५॥
नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना प्रकारच्या दीक्षांचे ज्ञान, नाना परीक्षांचे ज्ञान हेही ज्ञान नव्हे. (५)

नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा ।
नाना नरांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ६॥
स्त्रियांची, पुरुषांची, मनुष्यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (६)

नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा ।
नाना स्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७॥
अनेक प्रकारच्या अश्वांची, हत्तींची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. (७)

नाना पशूंची परीक्षा । नाना पक्षांची परीक्षा ।
नाना भूतांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८॥
नाना पशूंची, नाना पक्ष्यांची किंवा नाना भूतांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. (८)

नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा ।
नाना शस्त्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ९॥
नाना वाहनांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाल शस्त्रांची परीक्षा, (९)

नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा ।
नाना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १०॥
नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा, (१०)

नाना पाषाण परीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा ।
नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११॥
नाना पाषाणांची परीक्षा, काष्ठांची परीक्षा, वाद्यांची परीक्षा, (११)

नाना भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा ।
नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२॥
नाना भूमींची परीक्षा, नाना जलांची परीक्षा, नाना तेजांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (१२)

नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा ।
नाना अंकुर परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३॥
रस, बीज, अंकुर (१३)

नाना पुष्पांची परीक्षा । नाना फळांची परीक्षा ।
नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४॥
फुले, फळे वेली, (१४)

नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा ।
नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १५॥
दुखणी, रोग, या सर्वांची लक्षणे ओळखता येणे म्हणजे ज्ञान नव्हे. (१५)

नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा ।
नाना मूर्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १६॥
मंत्रांची परीक्षा, यंत्रांची परीक्षा, गृहांची परीक्षा, मूर्तीची परीक्षा, (१६)

नाना क्षत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा ।
नाना पात्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १७॥
क्षत्रियांची परीक्षा, गृहांची परीक्षा, पात्रांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (१७)

नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा ।
नाना तर्कांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १८॥
होणाऱ्या गोष्टींची परीक्षा, काळवेळाची परीक्षा, नाना तर्कांची परीक्षा, (१८)

नाना अनुमान परीक्षा । नाना नेमस्त परीक्षा ।
नाना प्रकार परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १९॥
नाना अनुमानांची परीक्षा, नियमांची परीक्षा व इतरही अनेक प्रकारच्या परीक्षा करता येणे म्हणजेही ज्ञान नव्हे. (१९)

नाना विद्येची परीक्षा । नाना कळेची परीक्षा ।
नाना चातुर्य परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २०॥
नाना विद्या, कला, चातुर्य, यांची परीक्षा करता येणे हे ज्ञान नव्हे. (२०)

नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थांची परीक्षा ।
नाना भाषांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २१॥
शब्दांची, अर्थांची, भाषांची, (२१)

नाना स्वरांची परीक्षा । नाना वर्णांची परीक्षा ।
नाना लेक्षनपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २२॥
स्वरांची, वर्णांची, लेखनाची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (२२)

नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा ।
नाना वृत्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २३॥
विविध मते, अनेक प्रकारचे ज्ञान, अनेक प्रकारच्या वृत्ती यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (२३)

नाना रूपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा ।
नाना सुगंधपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २४॥
नाना रूपांची, रसांची, सुगंध यांची परीक्षा करता येणे हेही ज्ञान नव्हे. (२४)

नाना सृष्टींची परीक्षा । नाना विस्तारपरीक्षा ।
नाना पदार्थपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २५॥
वृष्टी, तिचा विस्तार व नाना पदार्थ यांच्या विषयीचे ज्ञानही खरे ज्ञान नव्हे. (२५)

नेमकेचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें ।
सीघ्रचि कवित्व करणें । हें ज्ञान नव्हे ॥ २६॥
नेमकेच बोलणे, तत्काळ प्रतिवचन देणे, शीप्रकवित्व करणे हेही ज्ञान नव्हे. (२६)

नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा ।
स्वरपालवी संकेतकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २७॥
नेत्रपल्लवी, नादकळा, करपल्लवी, भेदकळा, स्वरपल्लवी, संकेतकळा यांचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. (२७)

काव्यकुशळ संगीतकळा । गीत प्रबंद नृत्यकळा ।
सभाच्यातुर्य शब्दकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २८॥
काव्यकुशलता, संगीतकला, गीत, प्रबंध, नृत्यकला, सभाचातुर्य असणे, शब्दकळा अवगत असणे हेही खरे ज्ञान नव्हे. (२८)

वग्विळास मोहनकळा । रम्य रसाळ गायनकळा ।
हास्य विनोद कामकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २९॥
वग्ण्विलासाने मोहून यकणे, रम्य रसाळ गायन करणे, हास्यविनोद तसेच कामकला यांचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. (२९)

नाना लाघवें चित्रकळा । नाना वाद्यें संगीतकळा ।
नाना प्रकारें विचित्र कळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३०॥
नाना लाघवे, चित्रकला, नाना वाद्ये आणि संगीतकला, इतर नाना विचित्र कला यांचे ज्ञान म्हणजेही खरे ज्ञान नव्हे. (३०)

आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा ।
चौदा विद्या सिद्धि सकळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३१॥
एकूण चौसष्ट कला आणि त्यांखेरीजही ज्या इतर नाना कला यांचे ज्ञान, तसेच चौदा विद्या व सर्व सिद्धींचे ज्ञान हेही खरे ज्ञान नव्हे. (३१)

असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण ।
तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- । म्हणोंचि नये ॥३२॥
एखादा माणूस सर्व कलांमध्ये प्रवीण असला, सर्व विद्या त्याला परिपूर्ण रीतीने येत असल्या, तरी ते त्याचे कौशल्य आहे. पण या सर्वांस ज्ञान असे म्हणूच नये. (३२)

हें ज्ञान होयेसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें ।
जेथें प्रकृतीचें पिसें । समूळ वाव ॥ ३३॥
हे ज्ञान आहे असे भासते, पण मुख्य ज्ञान याहून वेगळेच आहे. खरे ज्ञान जेथे असते तेथे प्रकृतीने उत्पन्न केलेला श्रम समूळ मिथ्या ठरतो. (३३)

जाणावें दुसर्याचें जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें ।
परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४॥
दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणे हे खरे ज्ञान आहे असे वाटते, परंतु हे काही आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. (३४)

माहानुभाव माहाभला । मानसपूजा करितां चुकला ।
कोणी येकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५॥
कुणी एक अधिकारसंपन्न साधक मानसपूजा करीत असताना चुकला. तेव्हा तेथे असलेल्या दुसऱ्या कुणी त्याला हाक मारून ' हे असे करावयाचे नसते ' म्हणून त्याची चूक दाखवून दिली. (३५)

ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासि परम ज्ञाता म्हणती ।
परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥
याप्रमाणे दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणणासस फार मोठा ज्ञानी म्हटले जाते. पण च्या ज्ञानाने मोक्षप्राप्ती होते, ते ज्ञान हे नव्हे. (३६)

बहुत प्रकारींची ज्ञानें । सांगों जातां असाधारणें ।
सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७॥
याप्रमाणे अनेक प्रकारचे ज्ञान असते, पण त्याचे सर्व प्रकारसांगणे अशक्यच आहे. पण च्या ज्ञानानेसायुज्यमुक्ती प्राक्ष होते, ते ज्ञान वेगळेच असते. (३७)

तरी तें कैसें आहे ज्ञान । समाधानाचें लक्षण ।
ऐसें हें विशद करून । मज निरोपावें ॥ ३८ ॥
हे ऐकून श्रोता म्हणतो की, ज्यायोगे सायुज्यमुक्ती प्रास होते ते ज्ञान कसे असते व त्याने समाधान कसे प्रास होते, ते मला आपण स्पष्ट करून सांगावे. (३८)

ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिले समासीं निरोपिलें ।
श्रोतां अवधान दिधलें । पाहिजे पुढें ॥ ३९॥
अशा प्रकारेशुद्ध ज्ञानासंबंधी श्रोत्याने प्रश्न केल्यावरून पुढल्या समासात त्यासंबंधी निरूपण केले जाईल. त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे. (३९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बहुधाज्ञाननाम समास पंचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'बहुधाज्ञाननाम' समास पाचवा.

GO TOP

समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण

॥ श्रीराम ॥

[ Right click to 'save audio as' for download ]

[ Right click to 'save audio as' for download ]


ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, हे शिष्या, ज्ञानाचे लक्षण ऐक ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपण .आपल्याला पाहावे, याचे नाव ज्ञान. (१)

मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप वोळखावें ।
नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २॥
मुख्य देव कोणता ते जाणावे. आपले सत्य स्वरूप काय ते ओळखावे आणि नित्य काय, अनित्य काय याचा विचार करावा, यास ज्ञान असे म्हणतात. (२)

जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे ।
समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३॥
जेथे दृश्य असणारी प्रकृती संपते, पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेले पदार्थ नाहीसे होतात, द्वैत समूळ नष्ट होते त्याला ज्ञान म्हणावे. (३)

मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार ।
उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ॥ ४॥
जे आत्मस्वरूप आहे, ते मन, बुद्धी, इंद्रिये यांनी जाणता येत नाही, तेथे तर्क चालू शकत नाही, ते परावाणीच्याही पलीकडे आहे. असे जे आहे त्यास जाणणे म्हणजे ज्ञान होय. (४)

जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान ।
विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५॥
जेथे दृश्याचे भान उरतच नाही, जाणीवही उरत नाही. कारण जाणीव असणे हेच अज्ञान होय. यालाच विमल शुद्ध स्वरूपाचे ज्ञान म्हणतात. (५)

सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया ।
परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६॥
सर्वसाक्षी जी चौथी अवस्था तुर्या तिला ज्ञान असे म्हणतात. पण हेम्हणणेही बसेबरनाही. काम त्या अवस्थेतही साक्षीत्वाने पदार्थज्ञान शिल्लक असतेच. (६)

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे ।
शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७॥
दृश्य पदार्थाचे ज्ञान याला पदार्थज्ञान म्हणतात, तर शुद्ध स्वरूप जाणणे याला स्वरूपज्ञान म्हणतात. (७)

जेथें सर्वचि नाहीं ठा‍ईंचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचें ।
म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥
स्वरूपाच्या ठिकाणी शुद्ध स्वरूपाखेरीज ' सर्व ' सुद्धा जर वहात नाही, तर त्या ' सर्व ' चे साक्षित्व कसे राहणार ? म्हणून तुर्यावस्थेचे ज्ञान हे शुद्ध ज्ञान मानूच नये. (८)

ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत ।
म्हणौनि शुद्ध ज्ञान सतंत । वेगळेंचि असे ॥ ९॥
ज्ञान म्हणजे अद्वैत आणि तुर्येत तर साक्षित्व म्हणजे प्रत्यक्ष द्वैतच असते. म्हणून तुर्येपेक्षा शुद्ध ज्ञान हे नेहमी वेगळेच असते, हे जाणून घ्यावे. (९)

ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण ।
या नांव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १०॥
आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐका. आपण शुद्ध स्वरूपच असतो हे जाणणे, याचा अनुभव येणे याला शुद्ध स्वरूपज्ञान म्हणतात, हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. (१०)

माहावाक्यौपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला ।
तेथीचा तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११॥
महावाक्याचा उपदेश उत्तम आहे, पण त्याचा जप करण्यास सांगितलेला नाही. त्या महावाक्यांच्या अर्थाचा साधकाने विचारच केला पाहिजे. (११)

माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार ।
त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥
महावाक्यात परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंकाच नाही. पण त्यांच्या अर्थासंबंधी विचार चिंतनच करणे जरूर आहे. नुसता त्याचा जप करून अज्ञानाचा अंधकार नाहीसा होणार नाही. (१२)

माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां ।
त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥
महावाक्यांचा अर्थ लक्षात घेतला की आपण तत्त्वतः आत्मस्वरूपच आहोत, हे कळून येते. नुसता त्याचा जप केल्याने व्यर्थ शीणच होतो. (१३)

माहावाक्याशें विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण ।
शुद्ध लक्ष्यांचें आपण । वस्तुच आहे ॥ १४॥
महावाक्याचे विवरण हेच ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. शुद्ध लक्ष्यांशावरून आपण आत्माच आहोत, याचा अनुभव येतो. (१४)

आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।
जें आदि‍अंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५॥
आपल्याला आपल्याच लभ होणे म्हणजेच स्वस्वरूपाचा अनुभव येणे हे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे. वास्तविक ते ज्ञान आदी व अंती स्वत: स्वतःस प्रकाशित करणारे स्वस्वरूपच असते. (१५)

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणि सकळही जेथें आटे ।
तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६॥
जेधून हे सर्व विश्व प्रगट होते आणि शेवटी सर्व जेथे लय पावते, त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की बंधनाची भ्रांती नाहीशी होते. (१६)

मतें आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें ।
अतिसूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७॥
मते आणि मतांतरे जेथे फोल ठरतात, त्याच्यासंबंधी अतिसूक्ष्म विचार केल्यावर त्याच्यात पूर्ण ऐक्य दिसून येते. (१७)

जे या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ ।
या नांव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८॥
या चराचराचे मूळ असलेले शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप त्याचा साक्षात अनुभव येणे, यालाच वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हणतात. (१८)

शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान ।
या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९॥
आपल्या स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागले की स्वाभाविकरीत्या अज्ञान नाहीसे होते. यालाच मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात.. (१९)

आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता ।
तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥
आपण आपला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात् अनुभव येतो. ते स्वरूप सर्वव्यापी असल्याने मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसे होते व आत्मा हेच आपले स्वस्वरूप असल्याने सर्वज्ञता अंगी बाणते. (२०)

मी कोण ऐसा हेत- । धरून, पाहातां देहातीत ।
आवलोकितां नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१॥
वृत्ती अंतर्मुख करून मी कोण हे जाणण्याच्या हेतूने आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीत आहोत हे कळून येते. नंतर नीट विचार केला असता स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. (२१)

असो पूर्वीं थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार- ।
पावले, ते साचार । ऐक आतां ॥ २२॥
असो. पूर्वीचे महाथोर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगे भवसागराच्या पैलतीरास पोहोचले, त्यांची नावे आता ऐका. (२२)

व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी ।
जनकादिक माहाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३॥
या ज्ञानाच्या योगेच व्यास, वसिष्ठ महामुनी, शुक, नारद समाधानी झाले व जनकादिक महाज्ञानी झाले. (२३)

वामदेवादिक योगेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर ।
शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४॥
वामदेव आदी योगेश्वर वाल्पीकी, अत्री, यांच्यासारखे ऋषीश्वर शौनकादी, वेदान्त मतांचे सार जे आत्मज्ञान त्याच्या योगानेच परम पदाला पोहोचले. (२४)

सनकादिक मुख्यकरूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी ।
आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५॥
मुख्यत्वे सनकादिक, तसेच आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, इत्यादींची गणती करू लागल्यास असंख्य आहेत. (२५)

सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव ।
जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६॥
सिद्ध, मुनी, श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी पुरुष यांचा जो स्वानुभव आहे आणि ज्या सुखाच्या योगे महादेव सदा डुलत असतात, (२६)

जें वेदशास्त्रांचें सार । सिद्धांत धादांत विचार ।
ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७॥
जे वेदशास्त्रांचे सार आहे, त्याची गुरुप्रतीती, आत्मप्रतीती याची प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते. (२७)

साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान ।
सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें संगिजेल आतां ॥ २८॥
भूतकाळात होऊन गेले, वर्तमानकाळी हयात असले व पुढे भविष्यकाळात होणारे जसे जे सर्व साधू संत आणि सजन ह्या सर्वांचे जे गुह्मज्ञान ते आता मी तुला सांगतो. (२८)

तीर्थें व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें ।
पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९॥
ते गुह्मज्ञान तीर्थे, व्रते, तपे, दाने यांनी किंवा धूप्रपान, पंचाग्निसाधन, गोरांजने यांनी प्रास होत नाही. (२९)

सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ ।
जेणें संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥
ते ज्ञान म्हणजे सर्व साधनांचे फळ ज्ञानाचे केवळ शिखरच असून त्याच्या योगाने संशय पूर्णतः नष्ट होतो. (३०)

छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत ।
या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१॥
जगात छप्पन म्हणजे अनेकानेक भाषा आहेत आणि त्यात तसेच अनेकानेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांचा आणि मुख्यत्वे वेदान्ताचा गहन अर्थ एकच आहे, तो म्हणजे आत्मज्ञान. (३१)

जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी ।
तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२॥
ज्याचे ज्ञान पुराणांना नाही, ज्याचे वर्णन करताना वेदही शिणले, तेच ज्ञान आता या क्षणी मी गुरुकृपेने उपदेशितो. (३२)

पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मर्ह्हाष्ट ग्रंथीं ।
हृदईं वसल्या कृपामुर्ती । सद्‌गुरु स्वामी ॥ ३३॥
श्रीसमर्थ म्हणतात की, संस्कृत ग्रंथांत काय आहे हे मी पाहिलेले नाही, मराठी ग्रंथात माझा प्रवेश नाही, पण कृपामूर्ती सदुरू स्वामी माझ्या हृदयात बसले आहेत. (३३)

आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत ।
माझा स्वामी कृपेसहित । हृदईं वसे ॥ ३४॥
त्यामुळे मला आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांची आवश्यकताच नाही. कारण माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयात वसत आहे. (३४)

न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास ।
प्रेत्नेंविण सौरस । सद्‌गुरुकृपा ॥ ३५॥
वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता प्रयत्नाशिवाय सदुरुकृपारूपी अमृतमय प्रसाद मला लाभला आहे. (३५)

ग्रंथ मात्र मर्ह्हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ ।
त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६॥
मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहूनही संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत व संस्कृत ग्रंथांतही वेदान्त ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. (३६)

त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाहीं ।
जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगटजाला ॥ ३७॥
त्या वेदांतापेक्षा श्रेष्ठ दुसरे काहीही नाही, कारण त्यात सर्व वेदांचे सार प्रकट झाले आहे. (३७)

असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाहि मथितार्थ ।
अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८॥
असो. असा जो अतिश्रेष्ठवेदांत, त्या वेदांताचा मथितार्थ असा जो अतिगहन परमार्थ, तो तू आता ऐक. (३८)

अरे गहनाचेंही गहन । तें तूं जाण सद्‌गुरुवचन ।
सद्‌गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९॥
अरे त्या गहनाचेही गहन म्हणजे जे सदुरुवचन ते तू जाणून घे. त्या सदुरुवचनामुळे निश्चितपणे समाधान लाभेल. (३९)

सद्‌गुरुवचन तोचि वेदांत । सद्‌गुरुवचन तोचि सिद्धांत ।
सद्‌गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४०॥
सदुरुवचन हाच वेदांत आहे. तोच सिद्धांत आहे व तोच प्रत्यक्ष अनुभवलेले ज्ञान आहे. (४०)

जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन ।
जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१॥
जे माझ्या स्वामीचे अत्यंत गहन वचन आहे आणि ज्याने माझे अत्यंत समाधान झाले (४१)

तें हें माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतों तुज ।
जरी अवधान देसी मज ॥ तरी आतां येच क्षणीं ॥ ४२॥
ते हे माझ्या जीवींचे गुज, मी तुला सांगावे म्हणतो. जर तू नीट लक्ष देऊन ऐकणार असशील तर आता या क्षणी सांगतो. (४२)

शिष्य म्लान्वदनें बोले । धरिले सदृढ पाउले ।
मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३॥
हे ऐकताच शिष्याने गुरूची पावले सदृढ धरली आणि तो दीनपणेबोलूलगल. तेव्हा मग गुरुदेवांनी बोलण्यास आरंभ केला. (४३)

अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्ये ।
तोही सांगतों, ऐक्य- । गुरुशिष्य जेथें ॥ ४४॥
' अहं ब्रह्मास्मि ' हे महावाक्य आहे. त्याचा अर्थ तर्काने जाणता येत नाही. तो अर्थही मी तुला सांगतो. त्याच्या योगे गुरुशिष्य त्या अर्थाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात. (४४)

ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।
ये विषईं= संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५॥
श्री गुरुदेव म्हणतात की, हे शिष्या, येथे जे रहस्य आहे ते तू ऐक. तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, याविषयी संदेह अथवा श्रम धरूच नकोस. (४५)

नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन ।
तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६॥
नवविधा भक्तीमधील मुख्य जे भजन, आत्मनिवेदन ते तुला आता समग्र वर्णन करून सांगतो. (४६)

निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें ।
प्रकृति पुरुष जीयें । तेही ब्रह्म होती ॥ ४७॥
विश्वोत्यत्ती होताना ही पंचमहाभूते च्या क्रमाने निर्माण होतात, त्या क्रमानेच ती कल्पांतात लय पावत जातात. एवढेच नव्हे, तर प्रकृती आणि पुरुष यांचाही ब्रह्मात लय होऊन ती ब्रह्मरूपच होतात. (४७)

दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां ।
ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८॥
सर्व दृश्य पदार्थ नाहीसे झाले की ज्याला आपण ' मी ' म्हणतो, तोही राहत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूपच असल्याने एकरूपता स्वाभाविकच आहे. (४८)

सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता ।
पिंड ब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठें ॥ ४९॥
जेथे सृष्टीचीच वार्ता नाही, ती पण मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर एकटे एक परब्रह्म तेवढे उरते. मग पिंड, ब्रह्मांड पाहू गेल्यास तेथे कसे दिसणार ? (४९)

ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केर आटे ।
तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५०॥
ज्ञानरूपी अग्नी प्रकट झाल्यावर त्यायोगे दृश्यरूपी केरकचरा जळून जातो. सर्व काही ब्रह्मरूप झाल्याने भिन्नत्वाचे मूळच नाहीसे होते. (५०)

मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे ।
सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥
साक्षात्कारानंतर जरी वृत्ती उद्भवली, तरी ती जग सत्यत्चाने पाहातच नसल्याने दृश्य प्रपंच असून नसल्यासारखा होतो. याप्रकारे सहजच आत्मनिवेदन होते. (५१)

असो गुरूचे ठा‍ईं अनन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता ।
वेगळेंपणें अभक्ता । उरोंचि नको ॥ ५२॥
असो. तुझी जर गुरूच्या ठायी अनन्यता असेल तर तुला चिंता करण्याचे कारणच नाही. अभक्त जसा स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो, तसे तू स्वतःला गुरूपासून वेगळा समजूच नकोस. (५२)

आतां हेंचि दृढीकर्ण- । व्हावया, करीं सद्‌गुरुभजन ।
सद्‌गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥
आता हे आत्मज्ञान दृढ करण्याकरिता तू सदुरुभजन कर तू सदुरुभजन केलेस की तुला निश्चित समाधान लाभेल. (५३)

या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।
भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥
शिष्या, यालाच आत्मज्ञान म्हणतात. त्यायोगेच पूर्ण समाधान प्रास होते. भवभयाचे बंधन हे वास्तविक समूळ मिथ्याच असते. (५४)

देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिनानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५॥
च्या नसला मी म्हणजे देह असे वाटते, तो आत्महत्याराच जाणावा. देहाभिमानामुळे तो जन्ममृत्यूच्या येरझारा पुन्हा पुन्हा भोगत राहतो. (५५)

असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा ।
सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६॥
हे असू दे. हे लक्षात घ्यावे की, आत्मा हा स्थल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चारी देहांहून वेगळा, भिन्न आहे. जन्ममरण व कुठलेही कर्म याचा त्याला स्पर्शही होऊ शकत नाही. (हे सर्व देहाशी संबंधित असते.) या आब्रह्मस्तंबपर्यंतच्या सर्व विश्वप्रपंचाला तू आत्मरूपाने सबाह्य व्यापलेले आहेस. (५६)

कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन ।
दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७॥
वास्तविक पाहता येथे कुस्त्याच जीवाला बंधन नाही. देहाभिमानामुळे म्हणजे मी देहच आहे अशी दृढ समजूत करून घेतल्यामुळे व स्वस्वरूपाचा विसर पडल्याने, त्यांना आपण बंधनात आहोत अशी भ्रांती झाली आहे व त्यामुळे सर्व लोक भुलले आहेत. (५७)

शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८॥
हे शिष्या, सांगतो ते ऐक. नित्यनियमाने एकांतात बसून स्वस्वरूपाचे चिंतन करीत जावे. त्यायोगेस्वस्वरूपानुभव येऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणीच तुला विश्रांती, समाधान मिळेल. असे केल्यानेच परमार्थ म्हणजे आत्मज्ञान दृढ होईल. (५८)

अखंड घडे श्रवणमनन । तरीच पाविजे समाधान ।
पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥
अखंड श्रवण, मनन घडले तरच पूर्ण समाधान प्रास होते. अशा रीतीने पूर्ण ब्रह्मज्ञान झाले की, अंगी तीव्र वैराग्य संचारते. (५९)

शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसीं इंद्रियें बाष्कळ ।
तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६०॥
शिष्या, तू जर स्वच्छंदपणे इंद्रियांना मोकळे सोडलेस, मोकाट सोडलेस, तर ती उचंखल होतील व मग तुझ्या मनातील तळमळही जाणार नाही. (६०)

विषईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें ।
मणी टाकितांचि लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१॥
ज्याला विषयांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उपजते, त्यालाच पूर्ण ज्ञान झाले असे समजावे. जसे राजाने प्रथम मण्याच्या लोभाने राज्याचा त्याग केला, पण मणी कवडीमोलाचा आहे हे कळताच त्याने तो त्याच्या पूर्वीच्या मालकास देऊन टाकला व त्यामुळे त्याला स्वतःचे राज्य परत मिळाले. (६१)

मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनिया तयाचा ।
मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२॥
तो मणी क्षुद्र शिंगाचा होता, पण राजाने त्याचा लोभ धरून मूर्खपणाने राज्याचा अव्हेर केला होता. (६२)

ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन ।
जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३॥
असो. हे शिष्या, मी तुला एक निश्चित भविष्य सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक. ज्या पुरुषाला च्या गोष्टीचे ध्यान लागले असते, त्याला तीच गोष्ट प्रास होते. (६३)

म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या ।
तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४॥
म्हणून माणसाने अविद्येचा त्याग करून सुविद्या दृढ धरावी म्हणजे त्यायोगे त्याला आत्मज्ञान व शाश्वत समाधान प्रास होऊन तो लवकरच जगहंद्य होतो. (६४)

सन्यपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे ।
औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५॥
ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला सन्निपात झाला की भ्रम होऊन भयानक दृश्ये दिसू लागतात व तो दुःखी होतो, पण त्याने सन्निपातावर औषध घेतले की रोग बस होऊन त्याला सुख होते व आनंद मिळतो. (६५)

तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें ।
ज्ञानाउषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६॥
त्याप्रमाणेच अज्ञानरूपी सन्निपातामुळे मिथ्या दृश्य दृष्टीस दिसू लागते. यावर आत्मज्ञानरूपी औषध घेताच त्याचा श्रम नाहीसा होऊन एका आत्मरूपाशिवाय दुसरे मुळी काही नाहीच, हे त्याला कळून येते. (६६)

मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला ।
तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७॥
मिथ्या स्वप्नाने जो भिऊन ओरडतो, त्याला जागे केले की, त्याचे भय जाऊन पूर्वीची निर्भय स्थिती त्याला प्रास होते. (६७)

मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें ।
मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८॥
स्वप्न मिथ्या असून स्वप्नावस्थेत ते खरे वाटले, त्यामुळेत्याला दुःख झाले जे मिथ्या आहेम्हणजे अस्तित्वातच नाही, त्याचे निरसनही होणे शक्य नसते. (६८)

मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी ।
जागा जालियां तयासी । भयेंचि नाहीं॥ ६९॥
जो जागा झालेला असतो त्याला ते मिथ्या आहे हे कळ्ये, पण जो झोपलेला असतो त्याला ते खरे भासून भुलविते. झोपलेला जागा झाला की, त्याचेही भय नाहीसे होते. (६९)

परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगी काविरें ।
पूर्ण जागृती श्रवणद्वारें- । मननें करावी ॥ ७०॥
पण अविद्यारूपी झोप जबरीने येते आणि त्या वेळी वाईट स्वप्ने पडून तो जीव भयभीत होऊन त्याच्या सर्वांगाला कंप सुटतो. या अविद्यारूपी निद्रेतून पूर्ण जागती येण्याकरिता सतत श्रवण-मननाची आवश्यकता आहे. (७०)

जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण ।
जो विषईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१॥
या जागृतीची ओळख पडवी म्हणून एक लक्षण सांगतो, ते नीट ऐक. जो अंतःकरणापासून विषयांविषयी पूर्ण विरक्त होतो, तो जागा झाला असे जाणावे. (७१)

जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें ।
तेणें साधन करावें । थोरीव सांडुनी ॥ ७२॥
जो पूर्ण विरक्त झाला नसेल तो साधक आहे असे जाणावे. त्याने आपला मोठेपणा सोडून साधन करीत राहावे. (७२)

साधन न मने जयाला । तो सिद्धपणे बद्ध जाला ।
त्याहूनि मुमुक्ष भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३॥
ज्याला साधन करणे आवडत नाही, तो ' मी सिद्धच आहे, मला साधनाची काय आवश्यकता आहे ' या घमेंडीत असतो. त्याच्यापेक्षा ज्ञानाचा अधिकारी असलेला मुमुक्षू बरा. (७३)

तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण ।
साधक सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४॥
हे सदुरूंचे बोलणे ऐकून शिष्याने प्रश्न केला की, बद्धाचे व मुमुधूचे लक्षण कोणते ? कोण साधक व कोण सिद्ध हे कसे ओळखावे, ते आपण सांगा. (७४)

याचें उत्तर श्रोतयांसी । दिधलें पुढिलीये समासीं ।
सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५॥
श्रीसमर्थ म्हणतात की, श्रोत्यांना याची उत्तरे पुढल्या समासातून मिळतील. त्यांनी सावध होऊन कथेकडे लक्ष द्यावे. (७५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरू
पणनाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'शुद्धज्ञाननाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : बद्धलक्षण

॥ श्रीराम ॥

सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार ।
परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, ही जी चराचर वृष्टी आहे, त्यात अपार जीवांची गर्दी झालेली आहे. यातील मनुष्यांचे चार प्रकारांत वर्गीकरण केले आहे. (१)

ऐक तयांचें लक्षण । चत्वार ते कोण कोण ।
बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ २॥
ते चार प्रकार कोणते, त्यांची लक्षणे काय ते तू ऐक. बद्ध, मुमुक्षू साधक आणि सिद्ध हे चार प्रकार तू जाणून घे. (२)

यां चौघांविरहित कांहीं । सचराचरीं पांचवा नाहीं ।
आतां असो हें सर्वही । विशद करूं ॥ ३॥
सर्व चराचर वृष्टीत या चार प्रकारांहून पाचवा प्रकार नाही. असो. आता या सर्व प्रकारांचे वर्णन करू या. (३)

बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षाचें लक्षण ।
साधकसिद्धवोळखण । कैसी जाणावी ॥ ४॥
बद्ध म्हणजे कोण, मुमुधूचे लक्षण काय, साधक कोण व सिद्ध कोण, हे कसे ओळखावे ते ऐक. (४)

श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध ।
मुमुक्ष साधक आणि सिद्ध । पुढें निरोपिले ॥ ५॥
श्रोत्यांनी सावध व्हावे. येथे प्रथम बद्ध कोणते सांगून नंतर पुढे मुमुसू साधक व सिद्ध यांचे वर्णन केले जाईल. (५)

आतां बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा ।
चक्षुविण दाही दिशा । सुन्याकार ॥ ६॥
आता बद्ध कसा असतो ते ऐका. अंधारात चाचपडणाऱ्या आंधळ्या माणसासारखी बद्धाची अवस्था असते. तो अज्ञानरूपी अंधारात चाचपडत असतो. आंधळ्या माणसाला डोळे नसल्याने दहाही दिशा जसा शून्याकार भासतात, तशी बद्ध माणसाची स्थिती असते. (६)

भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी ।
पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥
भक्त, ज्ञानी, तापसी, योगी, विरक्त व संन्यासी त्याच्यासमोर आले तरी त्याला ते दिसत नाहीत, म्हणजे तो त्यांना जाणू शकत नाही. (७)

न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्माधर्म ।
न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८॥
चांगले कर्म, वाईट कर्म, धर्म व अधर्म इत्यादी जणू काय त्याला दिसतच नाहीत, त्याप्रमाणे सोपा असा परमार्थ मार्ग तोही त्याला दिसत नाही. (८)

तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र ।
सन्मार्ग जो कां पवित्र । तो ही न दिसे ॥ ९॥
त्याला खरे शास्त्र, सतूसगती, सत्पात्र किंवा अत्यंत पवित्र असा सन्मार्ग यांपैकी काहीच दिसत नाही. (९)

न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार ।
न कळे कैसा परोपकार । दानपुण्य ॥ १०॥
सारासारविचार म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, त्याचा आचार कसा असतो, परोपकार कसा करावा, दान कसे द्यावे, पुण्य कसे संपादन करावे वगैरे तो काहीच जाणत नाही. (१०)

नाहीं पोटीं भूतदया । नाहीं सुचिष्मंत काया ।
नाहीं जनासि निववावया । वचन मृद ॥ ११॥
त्याच्या अंतःकरणात भूतदया नसते, त्याचा देह पवित्र, स्वच्छ नसतो किंवा लोकांशी मृदू भाषण करून त्यांना निवविणेही त्याला जमत नाही. (११)

न कळे भक्ति न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान ।
न कळे मोक्ष न कळे साधन । या नांव बद्ध ॥ १२॥
ज्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष किंवा साधन यांतील काहीच कळत नाही, त्याला बद्ध म्हणावे. (१२)

न कळे देव निश्चयात्मक । न कळे संतांचा विवेक ।
न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३॥
ज्याला देवासंबंधी निश्चयात्मक ज्ञान नसते, संतांचा विवेक किंवा मायेचे कौतुक याबद्दल काहीच माहीत नसते, त्याला बद्ध म्हणावे. (१३)

न कळे परमार्थाची खूण । न कळे अध्यात्मनिरूपण ।
न कळे आपणासि आपण । या नांव बद्ध ॥ १४॥
ज्याला परमार्थाची खूण, किंवा अध्यात्मनिरूपण याचा गंधही नसतो, जो स्वतःसही जाणत नाही, त्यास बद्ध म्हणावे. (१४)

न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनाचें फळ ।
न कळे तत्वतां केवळ । या नांव बद्ध ॥ १५॥
जीवाचे जन्ममूळ कोणते, साधनाचे फळ काय हे ज्याला कळत नाही, (१५)

न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण ।
न कळे वस्तु विलक्षण । या नांव बद्ध ॥ १६॥
बंधन कसे असते, मुक्तीचे लक्षण कोणते, आत्मवस्तु कशी विलक्षण आहे, हे ज्याला कळत नाही, तो बद्ध. (१६)

न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला ।
न कळे संकल्पें बांधला । या नांव बद्ध ॥ १७॥
शास्त्रार्थाचे श्रवण केले तरी तो ज्याला कळत नाही, ज्याला स्वतःचा स्वार्थ कोणता हे कळत नाही, अथवा संकल्पाने जीव कसा बद्ध होतो, हे कळत नाही, तो बद्ध जाणावा. (१७)

जयासि नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण ।
तीर्थ व्रत दान पुण्य । कांहींच नाहीं ॥ १८॥
बद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे त्याला आत्मज्ञान नसते. याखेरीज तीर्थ, व्रत, दान, पुण्य इत्यादी काहीच त्याला माहीत नसते. (१८)

दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मित्रि नाहीं ।
शांति नाहीं क्ष्मा नाहीं । या नांव बद्ध ॥ १९॥
त्याच्या ठिकाणी दया, करुणा, आर्जव, मैत्री, शांती, क्षमा इत्यादींचा अभाव असतो. (१९)

जें ज्ञानविशिं उणें । तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें ।
बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २०॥
ज्याला आत्मज्ञान नसते, त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणे कशी असणार ? ज्याच्या अंगी अनेक कुलक्षणे असतात, तो बद्ध जाणावा. (२०)

नाना प्रकारीचे दोष- । करितां, वाटे परम संतोष ।
बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१॥
नाना प्रकारचे दोष करण्यातच ज्याला संतोष वाटतो व बाष्कळपणाची ज्याला हौस असते तो बद्ध जाणावा. (२१)

बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद ।
बहु द्वंद बहु खेद । या नांव बद्ध ॥ २२॥
अति काम, अति क्रोध, अति गर्व, अति मद, अति भांडखोरपणा, अति खेद, (२२)

बहु दर्प बहु दंभ । बहु विषये बहु लोभ ।
बहु कर्कश बहु अशुभ । या नांव बद्ध ॥ २३॥
अत्यंत दर्प, खूप दंभ, अति विषयासक्ती, अति लोभ, अत्यंत कर्कशपणा, अति अशुभ वृत्ती या सर्व अवगुणांनी जो युक्त असतो, तो बद्ध असतो. (२३)

बहु ग्रामणी बहु मत्सर । बहु असूया तिरस्कार ।
बहु पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४॥
ज्याच्या ठिकाणी अति गावगुंडपणा असतो, जो अति मत्सरी असतो, लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो, अशा अत्यंत पापी, अति विकारी माणसाला बद्ध म्हणावे. (२४)

बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा ।
बहु कुकर्माचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५॥
अत्यंत अभिमान, अति गर्व, अति अहंकार व अत्यंत वटवट व कुकर्मांचा मोठा साठा ज्याच्याजवळ असेल तो बद्ध जाणावा. (२५)

बहु कापट्य वादवेवाद । बहु कुतर्क भेदाभेद ।
बहु क्रूइर कृपामंद । या नांव बद्ध ॥ २६॥
जो अत्यंत कपटी, वादविवाद करणारा, फार कुतर्क करणारा, भेदाभेद करणात, अत्यंत रू व कृपाशून्य असतो तो बद्ध असतो. (२६)

बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिळाष ।
बहु प्रकारीचे दोष । या नांव बद्ध ॥ २७॥
जो खूप निंदा, द्वेष करतो, अत्यंत अधर्मी आणि अभिलाषी असून ज्याच्यापाशी नाना प्रकारचे दोष असतात, तो बद्ध जाणावा. (२७)

बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट येकंकार ।
बहु आनित्य अविचार । या नांव बद्ध ॥ २८॥
जो अतिप्रष्ट्र अनाचारी, नष्ट सर्व गोत्कार समजणाय, अत्यंत अनीतिमान, अविचारी असतो, तो बद्ध. (२८)

बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी ।
तपीळ कुविद्या अनेकी । या नांव बद्ध ॥ २९॥
अत्यंत निमुर घातकी, हत्यारा, पातकी, तापट व ज्याच्याजवळ अनेक कुविद्या असतात, तो बद्ध जाणावा. (२९)

बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनर्थी ।
बहु डा‍ईक दुर्मती । या नांव बद्ध ॥ ३०॥
अत्यंत दुसशा, स्वार्थीपणा, भांडखोरपणा, अनर्थ करण्याचा स्वभाव, दावेदारी, दुर्मती या अवगुणांनी युक्त असतो तो बद्ध समजावा. (३०)

बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना ।
बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥ ३१॥
कल्पना, कामना, कृष्णा, वासना, ममता व भावना यांचा अतिरेक ज्याच्यापाशी असतो तो बद्ध. (३१)

बहु विकल्पी बहु विषादी । बहु मूर्ख बहु समंधी ।
बहु प्रपंची बहु उपाधी । या नांव बद्ध ॥ ३२॥
जो अत्यंत विकल्यी, विषादी, मूर्ख, नातलगांचा हव्यास असणार, प्रपंचात रत असणारा, ज्याला अनेक उपाधी लावून घेण्याची हौस असते तो बद्ध होय. (३२)

बहु वाचाळ बहु पाषंडी । बहु दुर्जन बहु थोतांडी ।
बहु पैशून्य बहु खोडी । या नांव बद्ध ॥ ३३॥
अति वाचाळ पाखंडी, दुर्जन, थोतांड करणारा, निंदा, चहाडी, खोडसाळपणा करणारा असेल तो बद्ध जाणावा. (३३)

बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम ।
बहु विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४॥
नास्तिक्य, श्रम, भ्रांती, तमोगुण, व्याप, पसाऱ्याची आवड आळसाची अति आवड ज्याला असेल तो बद्ध होय. (३४)

बहु कृपण बहु खंदस्ती । बहु आदखणा बहु मस्ती ।
बहु असत्क्रिया व्यस्ती । या नांव बद्ध ॥ ३५॥
अति कृपण, अत्यंत दांडगा, अत्यंत मत्सरी, ज्याला अति मस्ती आहे व जो शास्त्रविरुद्ध असत् कर्मे करतो तो बद्ध समजावा. (३५)

परमार्थविषईं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान ।
नेणे स्वयें समाधान । या नांव बद्ध ॥ ३६॥
ज्याला परमार्थाविषयी अज्ञान असते पण प्रपंचाचे उदंड ज्ञान असते व जो असमाधानी असतो, तो बद्ध होय. (३६)

परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर ।
संसारभार जोजार । या नांव बद्ध ॥ ३७॥
ज्याला परमार्थाविषयी अनादर असतो आणि प्रपंचाविषयी अत्यंत आदर असतो, जो संसाराचा भार वाहता वाहता बेजार झालेला असतो, तो बद्ध असतो. (३७)

सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी ।
देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥ ३८॥
सत्संगाची ज्याला गोडी नसते, संतांची निंदा करणे आवडते व देहबुद्धीच्या बेडीने जो जखडलेला असतो, तो बद्ध होय. (३८)

हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ ।
सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥
ज्याच्या हातात द्रव्याची जपमाळ असते, जो बायकोचे सर्वकाळ ध्यान करीत असतो व ज्याच्याजवळ सत्संगाचा दुष्काळ असतो, तो बद्ध जाणावा. (३९)

नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी ।
चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४०॥
डोळ्यांनी द्रव्यदास पाहावी, श्रवणाने त्यांच्याविषयी ऐकावे, द्रव्यदारेचेच चिंतन करावे ही बद्धाची लक्षणे आहेत. (४०)

काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण ।
द्रव्यदारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥ ४१॥
काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव, प्राण यांनी जो द्रव्य आणि दास यांचेच भजन करतो तो बद्ध. (४१)

इंद्रियें करून निश्चळ । चंचळ हो‍ऊं नेदी पळ ।
द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥ ४२॥
इंद्रिये एकाग्र करून त्यांना जराही इकडेतिकडेन जाऊ देता त्यांना जो द्रव्य व दारेकडेच लावतो, तो बद्ध होय. (४२)

द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ ।
द्रव्य दारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥ ४३॥
द्रव्य-दाय हेच ज्याचे तीर्थ असते, तोच ज्याचा परमार्थ व सर्व स्वार्थही असतो, त्याला बद्ध म्हणावे. (४३)

वेर्थं जा‍ऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ ।
कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४॥
जो आपला सर्व वेळ संसारचिंता करण्यात घालवतो, दुसऱ्या गोष्टीत वेळ गेला तर व्यर्थ गेला, असे ज्याला वाटते व जो सर्वकाळ प्रपंचाच्या कथा करीत असतो, तो बद्ध जाणावा. (४४)

नाना चिंता नाना उद्वेग । नाना दुःखाचे संसर्ग ।
करी परमार्थाचा त्याग । या नांव बद्ध ॥ ४५॥
नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे प्रसंग यांनी बेजार झाल्याने जो परमार्थाचा त्याग करतो, तो बद्ध होय. (४५)

घटिका पळ निमिष्यभरी । दुश्चीत नव्हतां अंतरीं ।
सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६॥
जो घटिका, पळ इतकेच नव्हे, तर निमिषभरही दुश्चित्त न होता अंतरात सर्वकाळ द्रव्यदारा व प्रपंच यांचे ध्यान करीत असतो, तो बद्ध होय. (४६)

तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ति कथा निरूपण ।
मंत्र पूजा जप ध्यान । सर्वही द्रव्य दारा ॥ ४७॥
ज्याच्या दृष्टीने तीर्थ, यात्रा, दान, पुण्य, भक्ती, कथा, निरूपण, मंत्र, पूजा, जप, ध्यान सर्व काही द्रव्य-दासच असते तो बद्ध. (४७)

जागृति स्वप्न रात्रि दिवस । ऐसा लागला विषयेध्यास ।
नाहीं क्षणाचा अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८॥
ज्याला जागृतावस्था, स्वप्नावस्था यांतही रात्रंदिवस विषयांचा ध्यास लागलेला असतो, ज्याला दुसऱ्या गोष्टीस क्षणाचाही अवसर नसतो तो बद्ध होय. (४८)

ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षपणीं पालटे जाण ।
ऐक तेही वोळखण । पुढिलीये समासीं ॥ ४९॥
याप्रमाणे बद्धाची जी लक्षणे सांगितली आहेत ती मुमुधुत्व प्रास झाल्यावर पालटतात. त्यांची ओळख पुढल्या समासात ऐकावे, असे श्रीसमर्थ म्हणतात. (४९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बद्धलक्षणनाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'बद्धलक्षणनाम' समास सातवा समाप्त

GO TOP

समास आठवा : मुमुक्षलक्षण

॥ श्रीराम ॥

संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें ।
जयाचेनि मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, जो संसाराच्या मदाने उन्मत्त होतो, त्याच्या ठिकाणी अनेक हीन कुलक्षणे उत्पन्न होतात, अशाचे मुखावलोकन केले तरी दोष लागतो. (१)

ऐसा प्रणी जो कां बद्ध । संसारीं वर्ततां अबद्ध ।
तायस प्राप्त जाला खेद । काळांतरीं ॥ २॥
असा जो बद्ध प्राणी संसारात अति अनियमितपणे वागत असतो, त्याला कालांतराने दुःख प्रास होते. (२)

संसारदुःखें दुखवला । त्रिविधतापें पोळला ।
निरूपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३॥
असा संसाराच्या दुःखामुळेजो दुखावला जातो, त्रिविध तापाने जो पोओ, त्याने संतांच्या मुखाने अध्यात्म-निरूपण ऐकले की, त्याला पश्चात्ताप वाटू लागतो. (३)

जाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास ।
म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४॥
मग तो प्रपंचाविषयी उदास होतो, त्याच्या मनाला सर्व विषयोपभोग नकोसे वाटू लागतात व तो मनाशी म्हणू लागतो की आता या संसाराचा हव्यास पुरे झाला. (४)

प्रपंच जा‍ईल सकळ । येथील श्रम तों निर्फळ ।
आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५॥
हा सर्व प्रपंच नष्ट होणार आहे. यासाठी जे श्रम केले ते व्यर्थ गेले आहेत. आता आपल्या आयुष्यातील उरलेला काळ तरी सार्थकी लावू या. (५)

ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली ।
म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६॥
असा त्याला बुद्धिपूर्वक पश्चात्ताप होतो. त्यामुळे त्याच्या मनाला तळमळ लागते. तो म्हणू लागतो की, आतापर्यंतचे माझे आयुष्य सर्व व्यर्थच गेले ! (६)

पूर्वी नाना दोष केले । ते अवघेचि आठवले ।
पुढें ये‍उनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७॥
पूर्वी त्याने जी अनेक दुष्कर्मे केली, ती त्याला आठवू लागतात व त्याच्या मनापुढे उभी राहतात. (७)

आठवे येमाची यातना । तेणें भयेचि वाटे मना ।
नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८॥
त्याला यमयातनांचे स्मरण होते आणि आपल्या अगणित पापांमुळे त्याच्या मनात भय उत्पन्न होते. आता तो असा विचार करू लागतो. (८)

नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर ।
आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९॥
आतापर्यंत आपण पुण्याचा विचारच केला नाही. आपल्या हातून डोंगयसारखी पातके झाली आहेत. आता हा दुस्तर असा संसार कशा रीतीने तरून जाता येईल ? (९)

आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले ।
देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १०॥
मी स्वतःचे दोष लपवले आणि चांगल्या माणसांवर वृथा दोषारोप केले. देवा, मी संत, साधू सज्जन यांची अकारणच निंदा केली. (१०)

निंदे ऐसे नाहीं दोष । तें मज घडले कीं विशेष ।
माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११॥
निंदेसारखे पाप नाही. ते पाप माझ्याकडून विशेषत्वे घडले आहे. माझे अवगुण, दोष इतके आहेत की, त्यात आकाशही बुडून जाईल. (११)

नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत ।
नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२॥
मी संतांना ओक्सलेनाही, भगवंताची कधी पूजाअर्चा केली नाही की अतिथी- अभ्यागतांना कधी संतुष्ट केले नाही. (१२)

पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें ।
मन अव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३॥
पूर्वपापामुळे यातील काहीच माझ्या हातून घडले नाही. माझे मन सदा कुमार्गाकडेच प्रवृत्त झाले. (१३)

नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार ।
नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४॥
सत्कर्मासाठी मी कधी शरीर झिजविले नाही, कधी परोपकार केला नाही. काममदामुळे कधी सदाचाराने वागलो नाही. (१४)

भक्तिमाता हे बुडविली । शांति विश्रांति मोडिली ।
मूर्खपणें म्यां विघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५॥
भक्तिरूपी माउलीला मी बुडविले शांतीचे समाधान नष्ट केले, मूर्खपणाने मी सदुद्धी आणि सद्‌वासना यांना असमर्थ करून टकले. (१५)

आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक ।
पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६॥
आतापर्यंत मी निरर्थक पापच करीत आलो. आता या आयुष्याचे सार्थककसे होईल ? तसे पाहिलेतरमाझ्यापाशी आता विवेकच उरलेला नाही. (१६)

कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा ।
कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७॥
आता काय उपाय करावा ? परमार्थाची प्राप्ती करून परलोक कसा मिळवावा ? काय केले असता मला देवाधिदेवाची प्राप्ती होईल ? (१७)

नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला ।
दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८॥
भगवंताविषयी सद्धाव माझ्या मनात कधी उत्पन्नच झाला नाही. लौकिक संपादण्यातच सर्व आयुष्य खर्ची पडले. जो कर्माचा खयटोप केला तो सर्व वरवर देखावा केला. तो दंभ होता. (१८)

कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं ।
आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९॥
देवांचा बाजार मांडला आणि पोयसाठी कीर्तन केले. देवा ! माझी बुद्धी किती खोटी आहे, हे फक्त माझे मीच जाणतो. (१९)

पोटीं धरूनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान ।
अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २०॥
अंतःकरणात अभिमान धरून बाहेर लोकात मात्र निरभिमानाच्या गप्पा करीत राहिलो. मनात द्रव्याची इच्छा धरून बाहेर मात्र ध्यानस्थ असल्याचे नाटक केले. (२०)

वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले ।
माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारींचे ॥ २१॥
विद्वत्तेने लोकांना फसविले, पोयसाठी संतांची निंदा केली. या प्रकारे माझ्या ठिकाणी नाना प्रकारचे दोष भरलेले आहेत. (२१)

सत्य तेंचि उछेदिलें । मिथ्य तेंचि प्रतिपादलें ।
ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें ॥ २२॥
सत्याचा उच्छेद केला, खोड्याचे प्रतिपादन केले. अशी नाना (कु) कर्मे केवळ पोट भरण्यासाठी केली. (२२)

ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला ।
तोचि मुमुक्ष बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३॥
असा ज्याला मनापासून खराखरा पश्चात्ताप होतो व संतांचा उपदेश ऐकून ज्याच्या आचरणात, आचार- विचारांत बदल घडून येतो, त्याला ग्रंथांत मुमुक्षू असे संबोधले जाते. (२३)

पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी ।
विरक्त जाला संसारीं । या नांव मुमुक्ष ॥ २४॥
मनापासून जो पुण्यमार्गाची आवड धरतो, सत्संगाची इच्छा करतो आणि संसारात विरक्त होतो, त्याला मुमुक्षू म्हणतात. (२४)

गेले राजे चक्रवर्ती । माझें वैभव तें किती ।
म्हणे धरूं सत्संगती । या नांव मुमुक्ष ॥ २५॥
आतापर्यंत कितीतरी राजे-महाराजे नष्ट झाले, त्यांच्या तुलनेने माझे वैभव ते किती ? असा विचार करून सत्संगाची इच्छा धरतो तो मुमुक्षू होय. (२५)

आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे ।
आपणासि निंदी दुःखें । या नांव मुमुक्ष ॥ २६॥
विरक्तीच्या बळावर जो आपले अवगुण पाहू लागतो व दुःखाने स्वतःचीच निंदा करू लागतो, त्यास मुमुधू म्हणावे. (२६)

म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी ।
म्हणे मी काये अनाचारी । या नांव मुमुक्ष ॥ २७॥
तो म्हणू लागतो की, मी किती अनुपकारी आहे, मी किती दंभ करणारा आहे, अनाचारी आहे ! (२७)

म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ ।
म्हणे मी पापी केवळ । या नांव मुमुक्ष ॥ २८॥
मी पतित चांडाळ आहे, दुराचारी खळ केवळ पापी आहे. (२८)

म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन ।
म्हणे मी जन्मलो पाषाण । या नांव मुमुक्ष ॥ २९॥
मी अभक्त, दुर्जन असून हीनाहून हीन आहे. मी पाषाण जन्मलो आहे. (२९)

म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं ।
म्हणे मी नाना वेसनी । या नांव मुमुक्ष ॥ ३०॥
मी दुरभिमानी आहे, लोकांत मी अत्यंत तापट असून मला नाना व्यसने आहेत. (३०)

म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर ।
म्हणे मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्ष ॥ ३१॥
तो म्हणतो की, मी आळशी, अंगचोर म्हणजे कामचुकार आहे. मी कपटी, भ्याड मूर्ख आणि अविचारी आहे. (३१)

म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ ।
म्हणे मी कुबुद्धि कुटीळ । या नांव मुमुक्ष ॥ ३२॥
तो म्हणतो, मी कुचकामाचा, वाचाळ, पाखंडी आणि तोंडाळ, कुबुद्धी, कुटील असा आहे. (३२)

म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें ।
आपलीं वर्णी कुलक्षणें । या नांव मुमुक्ष ॥ ३३॥
मला काहीच कळत नाही, मी सगळ्यांपेक्षा क्षुद्र आहे, याप्रमाणे जो आपली कुलक्षणे वर्णन करतो, तो मुमुक्षू असे जाणावे. (३३)

म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्चिळ अघोरी ।
म्हणे मी नीच नानापरी । या नांव मुमुक्ष ॥ ३४॥
तो म्हणतो की मी अनधिकारी आहे, कठोर आहे, शीलश्वष्ट व सर्व प्रकारे मी नीच आहे. (३४)

म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी ।
म्हणे मी नव्हे परमार्थी । या नांव मुमुक्ष ॥ ३५॥
मी अत्यंत स्वार्थी आहे, मी अनर्थ करणारा आहे, मी परमार्थी नव्हेच. (३५)

म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी ।
म्हणे मी भार जालों भूमीसी । या नांव मुमुक्ष ॥ ३६॥
मी अवगुणांची रास आहे, मी व्यर्थ जन्माला आलो आणि भूमातेस भार झालो. (३६)

आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास ।
धरी सत्संगाचा हव्यास । या नांव मुमुक्ष ॥ ३७॥
अशी आपली वारंवार निंदा करतो, त्याला संसार त्रासदायक वाटू लागतो व सत्संगाची गोडी लागल्याने त्याचा हव्यास जो धरतो, तो मुमुधू होय. (३७)

नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं ।
नाना ग्रन्थांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८॥
तो मग अनेक तीर्थे धुंडाळतो, शमदमादी नाना साधने करतो, अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करतो. (३८)

तेणें नव्हे समाधान । वाटे अवघाच अनुमान ।
म्हणे रिघों संतांस शरण । या नांव मुमुक्ष ॥ ३९॥
पण त्याने त्याचे समाधान होत नाही. हे सर्व ज्ञान अनुमानाचे आहे, असे त्याला वाटते व मग तो म्हणतो की, आता संतांना शरण जाऊ या. (३९)

देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान ।
सांडूनि, संतचरणीं अनन्य- । या नांव मुमुक्ष ॥ ४०॥
मग देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान आदी अनेक प्रकारच्या अभिमानांचा त्याग करून मुमुधू संतचरणी अनन्यभावाने शरण जातो. (४०)

अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्ष ॥ ४१॥
जो अहेतेचा सर्वस्वी त्याग करतो, स्वतःची नाना प्रकारे निंदा करतो, आणि मोक्षाची अपेक्षा करतो, त्याला मुमुधू म्हणावे. (४१)

ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थाकारणें झिजे ।
संतापा‍ईं विश्वास उपजे । या नांव मुमुक्ष ॥ ४२॥
ज्याला थोरपणाची लाज वाटू लागते, जो परमार्थासाठी देह झिजवतो आणि ज्याचा संतचरणी दृढ विश्वास असतो, तो मुमुधू होय. (४२)

स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।
अंकित हो‍ईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३॥
ज्याने संसाराचा स्वार्थ सोडलेला असतो आणि परमार्थाचा हव्यास धरलेला असतो व जो सज्जनांचा अंकित होण्याची इच्छा करतो, तो मुमुधू जाणावा. (४३)

ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें वोळखिजे ।
पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४॥
याप्रमाणे या संकेतचिहांवरून मुमुधूला ओळखावे. आता पुढे साधकाची लक्षणे सांगितली जातील, त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे, असे समर्थ सांगतात. (४४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोथे गुरूशिष्यसंवादे ' मुमुक्षुलक्षणनाम ' समास आठवा समाप्त

GO TOP

समास नववा : साधकनिरूपण

॥ श्रीराम ॥

मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन ।
आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात मुमुधूची लक्षणे थोडक्यात सांगितली. आता सावध होऊन साधक कसा असतो ते ऐका. (१)

अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।
तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥२॥
ज्याने अवगुणांचा त्याग करून संतसंग धरलेला असतो, त्याला साधक असे म्हणतात. (२)

जो संतांसि शरण गेला । संतजनीं आश्वासिला ।
मग तो साधक बोलिला । ग्रन्थांतरीं ॥ ३॥
जो संतांना शरण जातो आणि ज्याला संतांनी आपला म्हणून त्याचे हित करण्याचे आश्वासन दिले असेल त्याला साधक म्हणतात. (३)

उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन ।
दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक ॥ ४॥
ज्याला संतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्याने ज्याचे संसारबंधन तुटले असते व जो आत्मज्ञान दृढ होण्याकरिता साधन करतो, तो साधक होय. (४)

धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी ।
मननें अर्थांतर काढी । या नांव साधक ॥ ५॥
जो श्रवणाची आवड धरतो, अद्वैतनिरूपणात ज्याला गोडी वाटते व त्यावर मनन करून जो गूढ व खय अर्थ बरोबर जाणून घेतो तो साधक जाणावा. (५)

होतां सारासार विचार । ऐके हो‍ऊनि तत्पर ।
संदेह छेदूनि, दृढोत्तर- । आत्मज्ञान पाहे ॥ ६॥
संतांच्या समुदायात सारासारविचाराचे विवेचन होत असता जो ते तत्पर होऊन मनःपूर्वक श्रवण करतो व संदेह नाहीसे करून जो दृढ निष्ठेने आत्मज्ञानाकडे वळतो तो साधक होय. (६)

नाना संदेहनिवृत्ती- । व्हावया, धरी सत्संगती ।
आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसी आणी ॥ ७॥
आपल्या मनातील निरनिराळ्या प्रकारच्या संदेहांचं निवृत्ती व्हावी, निरसन व्हावे, यासाठी जो संतांची सगर धरतो व शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती व आत्मप्रचीतीच्या क्योच अनुभव घेतो, तो साधक. (७)

देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी ।
श्रवण मन केलेंचि करी । या नांव साधक ॥ ८॥
विवेकाने देहबुद्धीचा त्याग करून जो आत्मबुद्ध सुदृढ होण्यासाठी नेहमी श्रवण-मनन करीतच राहतो, ते साधक जाणावा. (८ .)

विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान ।
विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥ ९॥
दृश्याचे भान दुर्लक्षून जो आत्मज्ञान दृढ धरतो आणि विचाराच्या योगाने आपले समाधान टिकवून धरतो, त्याला साधक म्हणावे. (९)

तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी ।
लावी ऐक्यतेची समाधी । या नांव साधक ॥ १०॥
द्वैताची उपाधी सोडून देऊन जो साधनाने अद्वैत वस्तू म्हणजे जे परब्रह्मस्वरूप त्याची प्राप्ती करून घेतो आणि स्वस्वरूपानुभवाने जो परमात्म्याशी एकरूप होऊन समाधान पावतो, तो साधक होय. (१०)

आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११॥
पूर्वी जीर्णजर्जर झालेल्या आत्मज्ञानाचा जीर्णोद्धार करतो, म्हणजेच ज्या आत्मज्ञानाचे त्याला विस्मरण झाले होते ते जो परत विवेकाने प्रास करून घेतो व अशा रीतीने भवसागरांतून जो पैलतीरास पोहोचतो, त्यास साधक म्हणावे. (११)

उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरूपणें ।
बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव साधक ॥ १२॥
अध्यात्मनिरूपणात श्रवण केलेली उत्तम सास्ती लक्षणे जो अंगी बाणवतो व अभ्यासाने जो स्वस्वरूपाशी तदाकार होतो, तो साधक होय. (१२)

असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३॥
ज्याने असत् क्रियेचा त्याग केलेला असतो व जो प्रयलपूर्वक सतक्रिया वाढवतो व त्यायोगे ज्याची स्वरूपस्थिती अधिकाधिक दृढ होत जाते, त्यास साधक म्हणावे. (१३)

अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास ।
स्वरूपीं लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४॥
दिवसेंदिवस जो अवगुणांचा त्याग करून उत्तम गुणांचा अभ्यास करतो व स्वरूपी निजध्यास लावतो तो साधक होय. (१४)

दृढ निश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे ।
सदा स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५॥
दृढ निश्चयाच्या बळावरदृश्य विश्वाचे आकर्षण ज्याला उरत नाही आणि जो सदा स्वरूपी ऐक्य पावलेला असतो, त्याला साधक म्हणतात. (१५)

प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।
आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६॥
प्रत्यक्ष दिसणारी जी मायामय वृष्टी तिच्याकडे जो लक्ष देत नाही आणि प्रत्यक्ष डोळ्यांना न दिसणारे जे स्वस्वरूप ते जो अंतर्यामी एकाग्र होऊन पाहतो, त्यास साधक म्हणून जाणावे. (१६)

जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें ।
तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ॥ १७॥
जे लोकांना अज्ञात असते, मनाने ज्याचे अनुमानही करता येत नाही, तेच स्वरूप जो आपल्या अंतरात दृढ धरून ठेवतो, तो साधक होय. (१७)

जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहातांचि अंध करी ।
तें साधी नाना परी । या नांव साधक ॥ १८॥
ज्याचे वर्णन करू लागल्यास वाचा कुंठित होते, जे स्वरूप डोळ्यांना दिसू शकत नाही, त्याची नाना प्रयत्नाने जो प्राप्ती करून घेतो, त्यास साधक म्हणावे. (१८)

जें साधूं जाता साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना ।
तेंचि अनुभवें आणी मना । या नांव साधक ॥ १९॥
जे आत्मस्वरूप अनुभवास यावे म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात, पण ते साध्य करू शकत नाहीत व जे पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जे दिसू शकत नाही, त्याचा साधनाच्या बळावर जो प्रत्यक्ष अनुभव घेतो, त्यास साधक म्हणावे. (१९)

जेथें मनचि मावळे । जेथे तर्कचि पांगुळे ।
तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥ २०॥
च्या स्वस्वरूपापर्यंत मन पोहोचू शकत नाही, जेथे तर्कही पोहोचू शकत नाही, त्याचा अभ्यासाच्या बळाने जो साक्षात अनुभव घेतो, त्यास साधक म्हणावे. (२०)

स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें ।
तेंचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१॥
स्वानुभवाच्या योगे आत्यवस्तूची ज्याने त्वरित प्राप्ती करून घेतलेली असते, एवढेच नव्हे, तर जो स्वतः ती वस्तूच होतो, तो साधक होय. (२१)

अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे ।
कांहींच नहोन असणें । या नांव साधक ॥ २२॥
जो अनुभवाची सर्व अंगे जाणतो, योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बाणलेल्या असतात आणि मीपणविरहित सहजतेने देहप्रारव्याचा क्षय होईपर्यंत असणे ज्यास सहजसाध्य असते, तो साधक म्हणून ओळखावा. (२२)

परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी ।
स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३॥
विद्या, अविद्या उपाधींना बाजूस सारून, जो साधनाने इंद्रियगोचर नसल्याने असाध्य भासणारी आत्मवस्तु प्रास करून घेतो आणि स्वरूपी ज्याने दृढ बुद्धी केलेली असते, तो साधक होय. (२३)

देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ ।
साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४॥
देव कोण, भक्त कोण यांचे मूळ जो पूर्णपणे शोधून पाहतो आणि त्या दोहोंचे मूळ जी परब्रह्मवस्तू त्या साध्याशी एकरूप होऊन जो तात्काळ साध्यच होतो, त्याला साधक म्हणतात. (२४)

विवेकबळें गुप्त जाला । आपेंआप मावळला ।
दिसतो, परी देखिला । नाहींच कोणीं ॥ २५॥
विवेकाच्या बळाने ज्याचा मीपणा नाहीसा होऊ लागतो आणि शेवटी ज्याचा मीपणा पूर्णपणे नाहीसाच होतो, तो देहाने दिसत असला तरी त्याचे खरे स्वरूप कोणालाच दिसत नाही. (२५)

मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें ।
तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६॥
मीपणा पूर्वीच ज्याने सोडून दिलेला असतो, ज्याने स्वतःच स्वतःचा शोध घेतलेला असतो आणि ज्याने तुर्येलाही ओलांडलेले असते, म्हणजे साक्षित्वाची जाणीवही ज्याची उरत नाही, तो साधक होय. (२६)

पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी ।
अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥
पुढेपूर्ण मनोक्य झाल्यावर आपल्याला स्वस्वरूपानुभव आला की आपली आपल्यालाच अखंड भेट होते. अशी अखंड स्वरूपस्थिती ज्याची टिकून राहते, त्यास साधक म्हणावे. (२७)

द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला ।
देहीं असोनि विदेह जाला । या नांव साधक ॥ २८॥
ज्याने द्वैताचा संबंध कायमचा तोडून यकलेला असतो, अज्ञानामुळे भासणारा विश्वाचा भास ज्याने नष्ट केलेला असतो, आणि जो देहात असून विदेही असतो, त्यास साधक म्हणतात. (२८)

जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती ।
सकळ संदेहनिवृत्ती । या नांव साधक ॥ २९॥
ज्याची स्वरूपस्थिती अखंड असते, देहाहंकार ज्याचा नष्ट झालेला असतो आणि ज्याचे सर्व संदेह नष्ट झालेले असतात, त्यास साधक म्हणावे. (२९)

पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार ।
निर्गुणीं जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥
हा पंचमहाभूतांचा विस्तार ज्याला स्वप्नाकार वाटतो आणि निर्गुण आत्मस्वरूपाविषयी स्वानुभवामुळे ज्याचा ठाम निर्धार झालेला असतो, तो साधक असे जाणावे. (३०)

स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतास नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१॥
एखाद्यास स्वप्नात भय वाटते, ते तो जागृत झाल्यावर राहात नाही. त्याप्रमाणे सर्व पांचभौतिक वृष्टी मिथ्या आहे, असा ज्याचा निर्धार होतो, त्याला साधक म्हणावे. (३१)

मायेचें जें प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण ।
स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२॥
मायेने निर्माण केले दृश्य जगत प्रत्यक्ष दिसते म्हणून सामान्य लोक त्याला प्रमाण मानतात, पण स्वानुभवाने ते मिथ्या आहे, असे जो जाणतो, तो साधक होय. (३२)

निद्रा सांडूनि चे‍इरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला ।
माया सांडून तैसा गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३॥
झोपेतून जो जागा होतो, तो स्वप्रभयातून मुक्त होतो, तसा अविद्यारूपी मायेचा त्याग करून साधक स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत होतो. (३३)

ऐसि अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली ।
संसारौपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४॥
अशी अंतरस्थिती आत्मस्वरूपी ज्याची स्थिर झालेली असते आणि बाह्यतः ज्याने निःस्मृहता अवबलेली असते आणि ज्याने संसार-उपाधीचा त्याग केलेला असतो, त्याला साधक म्हणतात. (३४)

कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला ।
मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥
साधक कामवासनेतून मुक्त झालेला असतो, क्रोधापासून तो दूर गेलेला असतो आणि मद, मत्सर यांना त्याने दूर लोटलेले असते. (३५)

कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें ।
परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६॥
त्याने कुळाभिमानाचा त्याग केलेला असतो, जो लोकांची भीड धरत नाही, आणि विरक्तीच्या जोरावर परमार्थास खूप वाढवतो. (३६)

अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥
साधक अविद्येशी जराही संबंध ठेवत नाही, प्रपंचातून तो निसटून जातो आणि एकाएकी लोभाच्या हातातूनही निसटून जातो. (३७)

थोरपणासि पाडिलें । वैभवासि लाथाडिलें ।
महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥
विरक्तीच्या बळावर लौकिकाची पर्वा करीत नाही, वैभवास लाथाडतो आणि महत्त्वास झिडकारून यकतो. (३८)

भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला ।
पा‍ईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥
साधक भेदाचे घर मोडून यकतो. अहंकारास सोडून धुळीस मिळवतो आणि संदेहरूपी शत्रूचे पाय धरून त्याला आपटतो. (३९)

विकल्पाचा केला वधू । थापें मारिला भवसिंधू ।
सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४०॥
साधक विकल्पाचा वध करतो. थपडेने भवसिंधूला मारतो आणि सर्व भूतांचा विरोध तोडून यकतो. (४०)

भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें ।
मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१॥
साधक भवभयाला नष्ट करतो. काळाची यंग मोडतो. आत्मज्ञान झाल्याने तो जन्ममृत्यूच्या मस्तकावर आघात करून ते फोडतो. (४१)

देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला ।
कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२॥
देहबुद्धीचा नाश करतो, संकल्परहित होतो आणि कल्पनाच करणे बंद करतो. (४२)

अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें ।
पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३॥
साधक दुष्ट भयाचे ताडण करतो. लिंगदेहाल जिंकतो, आणि विवेकाच्या बळावर पाखंडाचा नाश करतो. (४३)

गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थीं घातला ।
अनर्थ तोही निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४॥
साधक गर्वावर गर्व करतो म्हणजे प्रथम मी देह हा अहंकारहोता, तो जाऊन मी ब्रह्म आहेहा अभिमान तो धरतो. स्वार्थ अनर्थी घालतो म्हणजे तो निःस्वार्थी बनतो. साधक शास्त्रशुद्ध मार्गाने अनर्थाला म्हणजे दुर्देवाला ठरकरतो. (४४)

मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥
मोहाला तो मध्येच तोडतो, दुःखाचे दोन भाग करून द्यकतो व शोकाला खंडून यकतो. (४५)

द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥
द्वेषाला तो हद्दपार करतो, नास्तिकपणाचे नरडेदाबतो, आणि कुतर्काच्या मनात धाक उत्पन्न करतो. (४६)

ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चयो बळावला ।
अवगुणांचा संव्हार केला । वैराग्यबळें ॥ ४७॥
आत्मज्ञानामुळे विवेक फारच बळावतो. त्यामुळे आत्मस्वरूपाविषयीचा निश्चयही सुदृढ होतो व वैण्ग्यबळाने अवगुणांचा संहार होतो. (४७)

अधर्मास स्वधर्में लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झुगटिलें ।
लांटुन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८॥
साधकाच्या ठिकाणचा स्वधर्म अधर्मास लुटतो, सत्कर्माने कुकर्माला झुगारून देतो आणि विचाराने अविचासत्य नष्ट करतो. (४८)

तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला ।
विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९॥
साधक तिरस्काराला चिरडून यकतो, द्वेषाला खरडून त्याचा त्याग करतो. अविषादाच्या मदतीने विषादाला पायदळी तुडवतो. (४९)

कोपावरी घालणें घातलें । कापट्य अन्तरीं कुटिलें ।
सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५०॥
साधक कोपावर हल्ला चढवून त्याला मारतो, कपटीपणाला अंतरात कुटून नष्ट करतो व जगातील सर्व लोकांना आत्मवत मानू लागतो. (५०)

प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग ।
निवृत्तिपंथें ज्ञानयोग । साधिता जाहला ॥ ५१॥
तो प्रवृत्तीचा त्याग करतो, सुहृदांचा संग सोडतो आणि निवृत्तीच्या मार्गाने ज्ञानयोग साधतो. (५१)

विषयमैंदासि सिंतरिलें । कुविद्येसी वेढा लाविलें ।
आपणास सोडविलें । आप्ततस्करांपासूनी ॥ ५२॥
तो विषयरूपी ठगाला ठकवितो, कुविद्येला वेढून नष्ट करतो आणि नातलग वगैरे चोरांपासून स्वतःला सोडवतो. (५२)

पराधीनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला ।
दुराशेचा त्याग केला । येकायेकीं ॥ ५३॥
तो पराधीनतेवर रागावतो, ममतेवर चिडतो आणि अकस्मात दुराशेचा त्याग करतो. (५३)

स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।
साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४॥
साधक स्वरूपाच्या ठिकाणी मन लावतो, त्यामुळे यातनेला यातना होतात. साधक दृढनिश्चय आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो. (५४)

अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला ।
प्रेत्न सांगातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५॥
साधक अभ्यासाची संगत धरून निग्रहाने साधन मार्गास लागतो. या मार्गांत प्रयत्न हा त्याचा उत्तम सोबती असतो. (५५)

सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्यविवेक ।
संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६॥
जो सदैव दक्ष असतो त्याला साधक म्हणावे. तो नेहमी नित्यानित्यविवेक करतो आणि मीपणाचा संग सोडून सत्संग धरतो. (५६)

बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार ।
शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७॥
साधक निर्धाराने संसाराला बाजूस सारतो, विवेकाने सर्व व्याप सोडून देतो आणि शुद्ध आचाराने अनाचाराला व्यवहारातून हाकलून देतो. (५७)

विसरास विसरला । आळसाचा आळस केला ।
सावध नाहीं दुश्चित्त झाला । दुश्चित्तपणासी ॥ ५८॥
साधक आत्मबुद्धीच्या विस्मरणाला विसरतो, सदा प्रयत्नशील राहतो आणि मनाच्या इतस्ततः भरकटण्याला न घाबरता सावध सहतो. (५८)

आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरूपणें ।
तो साधक ऐसा येणें- । प्रमाणें बुझावा ॥ ५९॥
असो. आता हे बोलणे पुरे झाले. थोडक्यात म्हणजे अध्यात्म-निरूपणाच्या योगे जो आपल्या अवगुणांच त्याग करतो, तो साधक असे जाणावे. (५९)

बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणोनि साधक बोलिजे ।
आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६०॥
तो बळेच सर्व संगांचा त्याग करतो, म्हणून त्याल साधक म्हणतात. आता पुढील समासात सिद्ध कस ओळखावा ते जाणून घ्यावे. (६०)

येथें संशयो उठिला । निस्पृह तोचि साधक जाहला ।
त्याग न घडे संसारिकाला । तरि तो साधक नव्हे कीं ॥ ६१॥
येथे असा संशय निर्माण झाला की, जो निःस्मृह असतो तोच साधक होतो, मग प्रापंचिक माणसाच्या हातून त्याग घडत नाही. मग तो साधक होऊ शकत नाही का ? (६१)

ऐसें श्रोतयाचें उत्तर । त्याचें कैसें प्रत्युत्तर ।
पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२॥
अशी श्रोत्यांनी शंका व्यक्त केली, त्याचे उत्तर कसे दिले आहे, ते पुढल्या समासात तत्पर होऊन ऐका. असे श्रीसमर्थ म्हणतात. (६२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
साधकलक्षणनिरूपण नाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'साधकलक्षणनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।
ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला होता की, प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का ? यासंबंधीचा विचार असा आहे. (१)

सन्मार्ग तोचि जीवीं धरणें । अन्मार्गाचा त्याग करणें ।
संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २॥
कुणाही साधकाला सन्मार्गाचा अंतःकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि असत मार्गाचा त्याग करावा लागतो. या प्रकारचा त्याग करणे सांसारिक माणसाला सहज शक्य आहे. (२)

कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं ।
संसारिकां त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३॥
कुबुद्धीचा त्याग केल्याखेरीज सुबुद्धी उत्पन्न होत नाही. सांसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो. त्याने अशा प्रकारे त्याग करावा. (३)

प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला ।
तरीच पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४॥
मनाने प्रपंचाचा वीट आला पाहिजे आणि मनःपूर्वक विषयांचा त्याग केला पाहिजे, तरच पुढे परमार्थमार्गाचे अवलंबन करता येते. (४)

त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा ।
त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५॥
साधकाने नास्तिकपणाचा त्याग करावा, संशयाचा त्याग करावा म्हणजे पुढे हळूहळू अज्ञानाचा त्याग घडू लागतो. (५)

ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयतांस घडे सांग ।
निस्पृहास बाह्य त्याग । विशेष आहे ॥ ६॥
प्रापंचिक साधक असो किंवा निःस्मृह साधक असो, अशा प्रकारचा सूक्ष्म अंतःस्थ त्याग दोघांनाही करावाच लागतो. जो प्रापंचिक नसेल त्या निःस्पृह साधकाला बाह्य त्यागही विशेषेकरून आवश्यक आहे. (६)

संसारिका ठा‍ईं ठा‍ईं । बाह्य त्याग घडे कांहीं ।
नित्य नेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७॥
प्रापंचिक माणसालाही ठायी ठायी थोडा तरी बाह्य त्याग करावाच लागतो. त्याशिवाय त्याला अध्यात्मश्रवण, नित्यनेम इत्यादी काहीच घडणार नाही. (७)

फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८॥
याप्रकारे शंकेचे समाधान झाले. त्यागाशिवाय कुणीही साधक बनू शकतच नाही, हे शंकेचे उत्तर आहे. आता पुढील विषयाचा संदर्भ लक्षपूर्वक ऐकावा. (८)

मागां झालें निरूपण । साधकाची ओळखण ।
आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९॥
मागील समासात साधक कसा ओळखावा, त्याची लक्षणे कोणती याविषयी निरूपण झाले आता सिद्धक्ष्मणाची खूण सांगतो. (९)

साधु वस्तु होऊनि ठेला । संशयें ब्रह्मांडाबाहेरी गेला ।
निश्चयें चळेना ऐसा झाला । या नांव सिद्ध ॥ १०॥
जो साधक ब्रह्मरूप होतो, वस्तूच होऊन सहतो, ज्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेलेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीत आत्मस्वरूपाविषयी ज्याचा निश्चय ढळत नाही, त्याला सिद्ध म्हटले जाते. (१०)

बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।
मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११॥
बद्धपणात जे अवगुण असतात, ते मुमुधूपणात नसतात आणि मुमुधूपणाची लक्षणे साधकपणात दिसून येत नाहीत. (११)

साधकासि संदेहवृत्ति । पुढें होतसे निवृत्ती ।
या कारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२॥
साधकाची संदेहवृत्ती पुढे पूर्ण नाहीशी होऊन तो जेव्हा निःसंदेहहोतो, तेव्हा तो सिद्ध साधू म्हणून ओळखावा. (१२)

संशयरहित ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण ।
सिद्धाआंगीं संशयो हीन । लागेल कैसा ॥ १३॥
संशयरहित ज्ञान हेच साधूचे मुख्य लक्षण असते. जो सिद्ध होतो, त्याच्या ठिकाणी हीन संशय उत्पन्न होईलच कसा ? (१३)

कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशय कालवला ।
सर्वांमध्यें संशयो भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४॥
कर्ममार्ग संशयाने भरले आहे. परमार्थाच्या साधनातही संशय काड्यक्सो आहे. याप्रकारेसर्वत्र संशय भरून राहिलेला असतो. फक्त एक साधुपुरुष मात्र निःसंदेह असतो. (१४)

संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें ।
संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५॥
संशयासहित असलेले ज्ञान खोटे असते. संशयासहित वैराग्यही आश्रयहीन असते. संशयासहचे भजनही वाईट असून ते निष्कळ होते. (१५)

व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव ।
व्यर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांही ॥ १६॥
ज्या देवाविषयी संशय असेल, तो देव व्यर्थ होय. जेथे संशय आहे तो भावही व्यर्थ व ज्याचा स्वभाव संशयी असेल, तोही व्यर्थच. संशय असेल ते सर्व काही व्यर्थच ठरते. (१६)

व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ ।
व्यर्थ संशयाचा परमार्थ । निश्चयेंवीण ॥ १७॥
संशयसहित व्रत, संशयसहित तीर्थयात्रा दोन्ही व्यर्थ आहेत. निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच ठरतो. (१७)

व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ संशयाची प्रीती ।
व्यर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८॥
संशयाने केलेली भक्ती, संशययुक्त प्रीती आणि संशयाने केलेली संगत यांमुळे संशय मात्र वाढतो. (१८)

व्यर्थ संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें ।
व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९॥
संशयाने भरलेले जीवन, प्रत्येकाबद्दल संशय धरणे आणि जे काही करावयाचे ते संशय ठेवूनच करावयाचे असे झाले तर सर्व काही व्यर्थच होते. (१९)

व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती ।
व्यर्थ संशयाची गती । निश्चयेंविण ॥ २०॥
संशयाने भरलेला अध्यात्मग्रंथ, संशययुक्त म्युत्पत्ती, दोन्ही व्यर्थ आहेत. संशयामुळे माणसाला चांगली गतीही मिळत नाही. (२०)

व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ संशयाचा पक्ष ।
व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१॥
संशयाने भरलेली सावधानता, संशयाने एखाद्याची बाजू घेणे, पक्ष घेणे व्यर्थ आहे. जो संशयी असेल त्याला मोक्षप्राप्ती होऊच शकत नाही. (२१)

व्यर्थ संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित ।
व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण ॥ २२॥
संशयग्रस्त असलेला संत, पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत, कुठल्याही बाबतीत निश्चय नसेल तर ते व्यर्थच ठरतात. (२२)

व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता ।
व्यर्थ संशयाचा ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥
संशयावर उभारलेली श्रेष्ठता, स्तुत्यन्नता, किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी व्यर्थच असते. (२३)

निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
व्यर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४॥
या जगात कुठलीही गोष्ट निश्चित नसेल, तर ती अणुमात्र प्रमाण मानली जात नाही. संशयाच्या प्रवाहात जे सापडते, ते सर्व व्यर्थ वाहतच जाते. (२४)

निश्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।
बाष्कळ बोलिजे वाचाळपणें । निरर्थक ॥ २५॥
वक्याचे बोलणे जर निश्चयात्मक नसेल तर ते कडक्याणे ठरते. बाष्कळपणाने तो उगीच बडबड करतो. त्यामुळे ती निरर्थक ठरते. (२५)

असो निश्चयेंविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना ।
संशयें काहीं समाधाना । उरी नाहीं ॥ २६॥
निश्चयाशिवाय जी वलाना केली जाते, ती खरोखर विटंबनाच असते. संशयामुळे समाधानाला ठावच उरत नाही. (२६)

म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान ।
तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्चयेंसीं ॥ २७॥
म्हणून संदेहरहित ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या निश्चयामुळे त्याच्या ठिकाणी असणारे समाधान हेच सिद्धाचे लक्षण होय. (२७)

तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय करावा कवण ।
मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८॥
तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला की, कोणता निश्चय करावा, निश्चयाचे मुख्य लक्षण काय, ते मल्या समजावून सांगावे. (२८)

ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा ।
नाना देवांचा वळसा । करूंचि नये ॥ २९॥
श्रीगुरू म्हणतात की, मुख्य देव कसा आहे हे जाणणे म्हणजे निश्चय होय. नाना देवाच्या गलबल्यात आपण पडूच नये. (२९)

जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार ।
शुद्ध विवेकें परमेश्वर । ओळखावा ॥ ३०॥
ज्याने हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्यासंबंधी विचार करावा. शुद्ध विवेकाच्या बळावर परमेश्वर म्हणजेच मुख्य देव कोणता हे ओळखावे. (३०)

मुख्य देव तो कोण । भक्तांचें कैसें लक्षण ।
असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१॥
मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय हे सत्याची कास धरून व विवेकाने असत्य बाजूस सारून जाणून घ्यावे. (३१)

आपुल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पहावें ।
संग त्यागून रहावें । वस्तुरूप ॥ ३२॥
आपल्या उपास्य देवतेला ओळखावे. मग आपल्या खऱ्या स्वरूपाचा शोध घ्यावा. आणि ' मी ' पणाचा त्याग करून वस्तुरूप होऊन सहावे. (३२)

तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्चयो ।
पहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३॥
'मी बद्ध आहे ' हा विकल्प तोडून टकावा व ' मी मुक्तच आहे' असा मोक्षाचा निश्चय करावा पंचमहाभूतांचा अन्यय-व्यतिरेकासह म्हणजेच वृष्टीची उभारणी व संहारणी यांच्यासह विचार करावा. (३३)

पूर्वपक्षें सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्चयो देवाचा ॥ ३४॥
पूर्वपक्ष म्हणजे ' मी देह आहे ' आणि सिद्धांत म्हणजे मी म्हणजे देह नव्हे हे कळून येणे व अधिक सखोल निदिध्यासाने स्वस्वरूपानुभव येणे. त्या वेळी प्रकृतीचा अंत होतो व मग त्या अनुभवामुळे तो निश्चय कधी चळत नाही. (३४)

देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चळों नेदावा निश्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५॥
'मी देह ' असे वाटते, त्यामुळेच संशय उत्पन्न होतात व ते समाधान क्षीण करतात. म्हणून मी आत्मा आहे हा निश्चय कधी ढळू देऊ नये. (३५)

सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान । आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६॥
आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे, पण त्याचे विस्मरण झाल्याने ' मी देह ' असा देहाभिमान उत्पन्न होतो व त्यामुळे संदेह होतो. म्हणून ' मी आत्मा आहे ' असा दृढ निश्चय करावा, म्हणजे शाश्वत समाधान लाभते. (३६)

आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७॥
'मी देह आहे ' ही देहबुद्धी जर दृढ झाली, तर विवेकाची शुद्धी उडते म्हणजे विवेक लोपतो, म्हणून आत्मबुद्धी सुदृढ करावी. (३७)

आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधींची । विसरों नये ॥ ३८॥
आत्मबुद्धीचा निश्चय शब्दज्ञानाने दृढ होत नाही, तर स्वरूपानुभव आल्याने आत्मबुद्धी दृढ होते, हेच मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य होय. म्हणून ' मी आत्मा आहे ' हे कधीच विसरू नये. (३८)

निरोपिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण ।
संतांसी गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९॥
आतापर्यंत निश्चय म्हणजे कोणता त्याचे लक्षण सांगितले. पण सत्संगाशिवाय ते कळत नाही. संतांना शरण गेल्यानेच सर्व संशय नष्ट होतात. (३९)

आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४०॥
आता हे बोलणे पुरेझाले सिद्ध पुरुषाची लक्षणे आता ऐका. जो पूर्ण निःसंदेह होतो, त्यास सिद्ध म्हणावे. (४०)

सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो ।
याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१॥
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही, तर मग संदेह कोठला ? म्हणूनच सिद्ध हा नेहमी निःसंदेह असतो. (४१)

देहसमंधाचेनि गुणें । लक्षणासि काये उणें ।
देहातीतांचीं लक्षणें । काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२॥
देहाचा संबंध जेथे असतो, तेथे त्रिगुण असतात, म्हणून लक्षणांची उणीव नसते. देहातीत असतो तो गुणातीतही असतो, तर त्याची लक्षणे सांगणार तरी कशी ? (४२)

जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंसीं ॥ ४३॥
जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, जे इंद्रियातीत आहे, त्याची लक्षणे कशी सांगणार ? सिद्ध हा निर्मळ आत्मवस्तूशी एकरूप होतो, तर त्याची लक्षणे कशी असणार ? (४३)

लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठा‍ईंची निर्गुण ।
तेंचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरूप ॥ ४४॥
लक्षणे त्रिगुणांच्या योगे भासतात आणि आत्मवस्तु तर गुणातीत असते. सिद्ध हा परमात्मस्वरूप असतो, म्हणून तोही गुणातीत असतो, हेच त्याचे लक्षण होय. (४४)

तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें ।
न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५॥
तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितला असल्याने येथील बोलणे आता आटोपते घेतो. यात जे कमी- अधिक असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी, असे समर्थ म्हणतात. (४५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सिद्धलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासबोथे गुरूशिष्यसंवादे 'सिद्धलक्षणनाम' समास दहावा समाप्त. दशक पाचवा समाप्त

॥ दशक पाचवा समाप्त ॥



GO TOP