॥ श्रीमत् दासबोध ॥

॥ दशक दुसरा : मूर्खलक्षणाचा ॥ १ ॥

समास पहिला : मूर्खलक्षण

॥ श्रीराम ॥

[ Right click to 'save audio as' for download ]

[ Right click to 'save audio as' for download ]


ॐ नमोजि गजानना । येकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टि भक्तजना अवलोकावें ॥ १ ॥
श्री समर्थ म्हणतात की ओंकारस्वरूप, एकदंत व त्रिनयन अशा गजाननाला मी नमन करतो. ''हे गजानना, तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे'' अशी विनंती आहे. (१)

तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्मसुते ।
अंतरी वसे कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥
वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करून तिने आपल्या अंतरी स्फूर्तिरूपाने राहावे, अशी मी तिला प्रार्थना करतो. (२)

वंदून सद्गुरुचरण । करून रघुनाथस्मरण ।
त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥ ३ ॥
नंतर सद्‌गुरुचरणांना वंदन करून व श्रीरामस्मरण करून समर्थ म्हणतात की, लोकांनी सोडून द्यावीत, म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो. (३)

येक मूर्ख येक पढतमूर्ख । उभय लक्षणीं कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥
मूर्खांचे दोन प्रकार असतात. काही मूर्ख तर काही पढतमूर्ख असतात. कौतुक म्हणून मी दोन्हींचे वर्णन करीत आहे. श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे. (४)

पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
साअवध हो‍ऊनि विचक्षण । परिसोत पुढें ॥ ५ ॥
पढतमूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहेत. ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी. (५)

आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार ।
परि कांहीं येक तत्पर । हो‍ऊन ऐका ॥ ६ ॥
मूर्खाची लक्षणें सांगावयाची म्हटली, तर ती अपार आहेत. आता या समासात काही लक्षणे सांगितली आहेत. श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी. (६)

जे प्रपंचिक जन । जयांस नाहीं आत्मज्ञान ।
जे केवळ अज्ञान । त्यांचीं लक्षणें ॥ ७ ॥
जे केवळ प्रापंचिक लोक आहेत, ज्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका. (७)

जन्मला जयांचे उदरीं । तयासि जो विरोध करी ।
सखी मनिली अंतुरी । तो येक मूर्ख ॥ ८ ॥
ज्या आईबापांच्या पोटी आपण जन्मलो, त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्ख समजावा. (८)

सांडून सर्वही गोत । स्त्री‍आधेन जीवित ।
सांगे अंतरींची मात । तो येक मूर्ख ॥ ९ ॥
सर्व नातेवाइकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो, तो एक मूर्खच. (९)

परस्त्रीसीं प्रेमा धरी । श्वशुरगृही वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो येक मूर्ख ॥ १० ॥
जो परस्त्रीवर प्रेम करतो, सासुरवाडीस जाऊन राहातो किंवा कुळशीलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो, तो एक मूर्खच. (१०)

समर्थावरी अहंता । अंतरीं मानी समता ।
सामर्थ्येंविण करी सत्ता । तो येक मूर्ख ॥ ११ ॥
जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो, मनात स्वतःला त्यांच्या बरोबरीचे मानतो, अंगी सामर्थ्य नसतां लोकांवर सत्ता गाजविण्याचा प्रयत्न करतो, तोही एक मूर्खच. (११)

आपली आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ति ।
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ १२ ॥
जो स्वतःच आपली स्तुती करतो, आपल्या देशांत असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो, तोही मूर्खच जाणावा. (१२)

अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी ।
जो बहुतांचा वैरी । तो येक मूर्ख ॥ १३ ॥
कारण नसताना जो उगीचच हसतो, विवेक शिकवू गेले असतां जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो, तो एक मूर्खच. (१३)

आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यासीं करी मीत्री ।
परन्यून बोले रात्रीं । तो येक मूर्ख ॥ १४ ॥
स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो, उठत बसता जो दुसऱ्याची निंदा करतो, तोही मूर्खच होय. (१४)

बहुत जागते जन । तयांमध्यें करी शयन ।
परस्थळीं बहु भोजन- । करी, तो येक मूर्ख ॥ १५ ॥
अनेक लोक जागत बसले असता त्यांच्यामध्ये एकट्टाच खुशाल झोपतो, किंवा जो दुसऱ्याच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो, तो एक मूर्खच. (१५)

मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न ।
सप्त वेसनीं जयाचें मन । तो येक मूर्ख ॥ १६ ॥
आपला मान अथवा अपमान स्वतःच जो उघड करून सांगतो, किंवा ज्याचे मन सात प्रकारच्या व्यसनांत रमते, तो एक मूर्खच समजावा. (सात व्यसने म्हणजे द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परदारारमण, लघुपक्षीक्रीडा व नायकिणीचे गायन.) (१६)

धरून परावी आस । प्रेत्न सांडी सावकास ।
निसुगाईचा संतोष- । मानी, तो येक मूर्ख ॥ १७ ॥
जो दुसर्‍याचा भरवसा धरून स्वतः प्रयत्न करणे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो, तो एक मूर्ख. (१७)

घरीं विवेक उमजे । आणि सभेमध्यें लाजे ।
शब्द बोलतां निर्बुजे । तो येक मूर्ख ॥ १८ ॥
घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो, शब्द बोलताना घाबरतो, तो एक मूर्खच. (१८)

आपणाहून जो श्रेष्ठ । तयासीं अत्यंत निकट ।
सिकवेणेचा मानी वीट । तो येक मूर्ख ॥ १९ ॥
आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी फाजील सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा वीट मानतो, तोही मूर्खच होय. (१९)

नायेके त्यांसी सिकवी । वडिलांसी जाणीव दावी ।
जो आरजास गोवी । तो येक मूर्ख ॥ २० ॥
जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो, मोठ्या माणसांच्या पुढे शहाणपणा दाखवतो, वडिलांना कमीपणा आणतो, तो एक मूर्ख. (२०)

येकायेकीं येकसरा । जाला विषईं निलाजिरा ।
मर्यादा सांडून सैरा- । वर्ते, तो येक मूर्ख ॥ २१ ॥
जो अचानक कामवासनेपायी निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वागू लागतो, तोही मूर्खच. (२१)

औषध न घे असोन वेथा । पथ्य न करी सर्वथा ।
न मिळे आलिया पदार्था । तो येक मूर्ख ॥ २२ ।
जो रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थांत संतोष मानीत नाही, तो एक मूर्खच होय. (२२)

संगेंविण विदेश करी । वोळखीविण संग धरी ।
उडी घाली माहापुरीं । तो येक मूर्ख ॥ २३ ॥
सोबतीशिवाय जो विदेशात जातो, अनोळखी माणसाची संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो, तो मूर्ख समजावा. (२३)

आपणास जेथें मान । तेथें अखंड करी गमन ।
रक्षूं नेणे मानाभिमान । तो येक मूर्ख ॥ २४ ॥
जो जेथे आपल्याला मान मिळतो तेथे वारंवार जातो, आपला मान कसा राखावा हे ज्याला कळत नाही, तो एक मूर्खच. (२४)

सेवक जाला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित ।
सर्वकाळ दुश्चित्त । तो येक मूर्ख ॥ २५ ॥
आपला नोकर श्रीमंत झाला असता जो त्याच्या अंकित होऊन राहातो; अथवा ज्याचे चित्त सर्वकाळ अस्थिर असते, तोही मूर्खच जाणावा. (२५)

विचार न करितां कारण । दंड करी अपराधेंविण ।
स्वल्पासाठीं जो कृपण । तो येक मूर्ख ॥ २६ ॥
कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसताही विनाकारण दंड करतो, किंवा जो थोडक्यासाठी कंजूष बनतो, तो मूर्ख जाणावा. (२६)

देवलंड पितृलंड । शक्तिवीण करी तोड ।
ज्याचे मुखीं भंडउशभंड । तो येक मूर्ख ॥ २७ ॥
जो देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही. स्वतः अशक्त असून शिवीगाळ करतो, कुणावरही तोंड सोडून अर्वाच्य शब्द बोलतो, तो मूर्खच जाणावा. (२७)

घरीच्यावरी खाय दाढा । बाहेरी दीन बापुडा ।
ऐसा जो कां वेड मूढा । तो येक मूर्ख ॥ २८ ॥
घरच्या लोकांशी रागाने वागतो, त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा, अज्ञानी असेल तो मूर्खच समजावा. (२८)

नीच यातीसीं सांगात । परांगनेसीं येकांत ।
मार्गें जाय खात खात । तो येक मूर्ख ॥ २९ ॥
जो नीच जातींच्या लोकांत राहतो, परस्त्रीशी एकांत करतो, वाटेने जाताना खात खात जातो, तो एक मूर्खच. (२९)

स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडें बोले फार । तो येक मूर्ख ॥ ३० ॥
स्वतः तर परोपकार करीतच नाही, कुणी उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करतो. करतो थोडे पण बोलतो फार, असा माणूस मूर्खच होय. (३०)

तपीळ खादाड आळसी । कुश्चीळ कुटीळ मानसीं ।
धारीष्ट नाहीं जयापासीं । तो येक मूर्ख ॥ ३१ ॥
जो तापट खादाड आळशी आहे, दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटिल आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही, तो मूर्खच होय. (३१)

विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ ३२ ॥
स्वतःजवळ विद्या, वैभव, धन किंवा कुठलाही पुरुषार्थ, सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो, तो एक मूर्खच. (३२)

लंडी लटिका लाबाड । कुकर्मी कुटीळ निचाड ।
निद्रा जयाची वाड । तो येक मूर्ख ॥ ३३ ॥
उर्मट खोटा, लबाड वाईट कृत्ये करणारा, कुटिल, नामर्द व जो फार झोपतो, तो एक मूर्खच होय. (३३)

उंचीं जाऊन वस्त्र नेसे । चौबारां बाहेरी बैसे ।
सर्वकाळ नग्न दिसे । तो येक मूर्ख ॥ ३४ ॥
उंच ठिकाणी जाऊन जो वस्त्र नेसतो. शौचादी क्रिया जो चव्हाट्यावर करतो व सर्वकाळ जवळ जवळ वस्त्रहीन असतो, तोही मूर्खच जाणावा. (३४)

दंत चक्षु आणी घ्राण । पाणी वसन आणी चरण ।
सर्वकाळ जयाचे मळिण । तो येक मूर्ख ॥ ३५ ॥
ज्याचे दात, डोळे, नाक, हात, पाय, कपडे इत्यादी सर्वकाळ अत्यंत मलिन असतात, तोही मूर्खच. (३५)

वैधृति आणी वितिपात । नाना कुमुहूर्तें जात ।
अपशकुनें करी घात । तो येक मूर्ख ॥ ३६ ॥
जो गावाला जाताना वैधृती, व्यतिपात इत्यादी विविध कुमुहूर्तांवर प्रयाण करतो, एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्यांचाही घात करतो, तो मूर्ख जाणावा. (३६)

क्रोधें अपमानें कुबुद्धि । आपणास आपण वधी ।
जयास नाहीं दृढ बुद्धि । तो येक मूर्ख ॥ ३७ ॥
जो कुणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो, तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही, तो मूर्खच जाणावा. (३७)

जिवलगांस परम खेदी । सुखाचा शब्द तोहि नेदी ।
नीच जनास वंदी । तो येक मूर्ख ॥ ३८ ॥
आपल्या जिवलग माणसांना जो दुःख देतो, कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि नीच माणसांना मात्र वंदन करतो, तो एक मूर्खच. (३८)

आपणास राखे परोपरी । शरणागतांस अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरवसा धरी । तो येक मूर्ख ॥ ३९ ॥
स्वतःस नानापरीने जपतो, पण शरण आलेल्यांचे रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरवसा धरतो, तो मूर्खच जाणावा. (३९)

पुत्र कळत्र आणी दारा । इतुकाचि मानुनियां थारा ।
विसरोन गेला ईश्वरा । तो येक मूर्ख ॥ ४० ॥
आपला मुलगा, कुटुंब, पत्नी हाच आपला आधार आहे, असे समजून जो देवाला विसरून जातो, तोही मूर्खच होय. (४०)

जैसें जैसें करावें । तैसें तैसें पावाअवें ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ ४१ ॥
जसे करावे तसे फळ मिळते, हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा. (४१)

पुरुषाचेनि अष्टगुणें । स्त्रियांस ईश्वरी देणें ।
ऐशा केल्या बहुत जेणें । तो येक मूर्ख ॥ ४२ ॥
पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी आठपट अधिक कामवासना असते. अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो, तो मूर्खच जाणावा. (४२)

दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडून चाले ।
दिवसा झांकिले डोळे । तो येक मूर्ख ॥ ४३ ॥
दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व दिवसाही डोळे झाकून घेतो, ज्ञान असून मुद्दाम अज्ञान्यासारखा वागतो, तोही मूर्खच. (४३)

देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही ।
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही । तो येक मूर्ख ॥ ४४ ॥
जो देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो, तो मूर्खच जाणावा. (४४)

परपीडेचें मानी सुख । पससंतोषाचें मानी दुःख ।
गेले वस्तूचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ ४५ ॥
लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असता जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूसाठी जो शोक करतो, तो मूर्खच होय. (४५)

आदरेंविण बोलणें । न पुसतां साअक्ष देणें ।
निंद्य वस्तु आंगिकारणें । तो येक मूर्ख ॥ ४६ ॥
कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही, कुणी न विचारताच साक्ष देतो व निंद्य वस्तूचा स्वीकार करतो तो मूर्खच जाणावा. (४६)

तुक तोडून बोले । मार्ग सांडून चाले ।
कुकर्मी मित्र केले । तो येक मूर्ख ॥ ४७ ॥
महत्त्व सोडून जो वायफळ बडबडतो, उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्मे करणारांशी जो मैत्री करतो, तो मूर्खच होय. (४७)

पत्य राखों नेणें कदा । विनोद करी सर्वदा ।
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८ ॥
जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही, सदासर्वदा चेष्टामस्करी करतो, त्याला कुणी हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागतो, तोही मूर्खच होय. (४८)

होड घाली अवघड । काजेंविण करी बडबड ।
बोलोंचि नेणे मुखजड । तो येक मूर्ख ॥ ४९ ॥
जो अवघड पैज मारतो, किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही, तो मूर्ख जाणावा. (४९)

वस्त्र शास्त्र दोनी नसे । उंचे स्थळीं जाऊन बैसे ।
जो गोत्रजांस विश्वासे । तो येक मूर्ख ॥ ५० ॥
स्वतःजवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊबंदांवर विश्वास ठेवतो, ते दोघेही मूर्खच ! (५०)

तश्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे ।
आपलें आन्हीत करी रागें । तो येक मूर्ख ॥ ५१ ॥
जो चोराला आपली माहिती देतो, जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपलेच अनहित करतो, तो मूर्खच असतो. (५१)

हीन जनासीं बरोबरी । बोल बोले सरोत्तरीं ।
वामहस्तें प्राशन करी । तो येक मूर्ख ॥ ५२ ॥
हीन लोकांशी जो बरोबरी करतो, उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो, तो मूर्ख जाणावा. (५२)

समर्थासीं मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी ।
घरीचा घरीं करी चोरी । तो येक मूर्ख ॥ ५३ ॥
श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा, अलभ्य वस्तूचा हेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय. (५३)

सांडूनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भर्वसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो येक मूर्ख ॥ ५४ ॥
ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्यजीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय. (५४)

संसारदुःखाचेनि गुणें । देवास गाळी देणें ।
मैत्राचें बोले उणें । तो येक मूर्ख ॥ ५५ ॥
संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकांत उघड करून सांगतो, तो एक मूर्खच. (५५)

अल्प अन्याय क्ष्मा न करी । सर्वकाळ धारकीं धरी ।
जो विस्वासघात करी । तो येक मूर्ख ॥ ५६ ॥
कुणी लहानसहान अपराध केला तरी जो क्षमा करीत नाही व त्या व्यक्तीस सारखे धारेवर धरतो, तसेच जो विश्वासघात करतो, तो एक मूर्खच जाणावा. (५६)

समर्थाचे मनींचे तुटे । जयाचेनि सभा विटे ।
क्षणा बरा क्षणा पालटे । तो येक मूर्ख ॥ ५७ ॥
जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो, सभा ज्याला विटते, कंटाळते, जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यात अस्थिर असतो, तो मूर्खच असतो. (५७)

बहुतां दिवसांचे सेवक । त्यागून ठेवी आणिक ।
ज्याची सभा निर्नायेक । तो येक मूर्ख ॥ ५८ ॥
कित्येक दिवसांचे जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कुणी योग्य नेता नसतो, तो मूर्खच जाणावा. (५८)

अनीतीनें द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी ।
संगतीचें मनुष्य तोडी । तो येक मूर्ख ॥ ५९ ॥
जो अनीतीने द्रव्य मिळवितो, धर्म, नीती, न्याय यांची पर्वा करत नाही, आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो, तो एक मूर्खच होय. (५९)

घरीं असोन सुंदरी । जो सदांचा परद्वारी ।
बहुतांचे उच्छिष्ट अंगीकारी । तो येक मूर्ख ॥ ६० ॥
घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो, अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच. (६०)

आपुलें अर्थ दुसयापासीं । आणी दुसयाचें अभिळासी ।
पर्वत करी हीनासी । तो येक मूर्ख ॥ ६१ ॥
आपले द्रव्य दुसऱ्यापाशी ठेवतो व दुसऱ्याच्या द्रव्याची अभिलाषा धरतो, हलक्या लोकांच्या बरोबर देण्याघेण्याचा व्यवहार करतो, तो मूर्ख जाणावा. (६१)

अतिताचा अंत पाहे । कुग्रामामधें राहे ।
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥ ६२ ॥
जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहातो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. (६२)

दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें ।
डो‍ई खाजवी दोहीं हातें । तो येक मूर्ख ॥ ६३ ॥
दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असता हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवितो, त्यास मूर्खच म्हणावे लागेल. (६३)

उदकामधें सांडी गुरळी । पायें पायें कांडोळी ।
सेवा करी हीन कुळीं । तो येक मूर्ख ॥ ६४ ॥
स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो, पायाने पाय खाजवतो, हीनकुळाची सेवा करतो, तो एक मूर्खच. (६४)

स्त्री बाळका सलगी देणें । पिशाच्या सन्निध बैसणें ।
मर्यादेविण पाळी सुणें । तो येक मूर्ख ॥ ६५ ॥
स्त्रिया व मुले यांच्यात उगीचच मिसळतो, पिशाच्चाजवळ जाऊन बसतो, कुत्रे पाळतो, पण त्यास शिस्त लावत नाही, तो एक मूर्खच. (६५)

परस्त्रीसीं कळह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगती धरी । तो येक मूर्ख ॥ ६६ ॥
जो परस्त्रीशी भांडतो, मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो, मूर्ख माणसाची संगत करतो, तो मूर्ख जाणावा. (६६)

कळह पाहात उभा राहे । तोडविना कौतुक पाहे ।
खरें अस्ता खोटें साहे । तो येक मूर्ख ॥ ६७ ॥
जो भांडणतंटा पाहात उभा असतो, तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट कौतुकाने बघतो, जे खरे असते ते सोडून खोटे सहन करतो, तो एक मूर्खच होय. (६७)

लक्ष्मी आलियावरी । जो मागील वोळखी न धरी ।
देवीं ब्राह्मणीं सत्ता करी । तो येक मूर्ख ॥ ६८ ॥
संपत्ती प्राप्त झाली असता जो जुनी ओळख ठेवत नाही व देवाब्राह्मणांवर सत्ता गाजवतो, तो मूर्ख जाणावा. (६८)

आपलें काज होये तंवरी । बहुसाल नम्रता धरी ।
पुढीलांचें कार्य न करी । तो येक मूर्ख ॥ ६९ ॥
जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत, जो इतरांशी नम्रतेने वागतो. मात्र कुणाच्या उपयोगी पडत नाही, तोही मूर्खच. (६९)

अक्षरें गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ।
नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ ७० ॥
जो वाचताना अक्षरे गाळतो किंवा पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही, तो मूर्खच होय. (७०)

आपण वाचीना कधीं । कोणास वाचावया नेदी ।
बांधोन ठेवी बंदीं । तो येक मूर्ख ॥ ७१ ॥
जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा. (७१)

ऐसीं हें मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे ।
चीत्त दे‍उनियां शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥
अशी ही मूर्खलक्षणे अपार आहेत. यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बाणते. म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने यांचे श्रवण करतात. (७२)

लक्षणें अपार असती । परी कांहीं येक येथामती ।
त्यागार्थ बोलिलें श्रोतीं । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ७३ ॥
मूर्खांची लक्षणे अपार आहेत. पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी क्षमा करावी. (७३)

उत्तम लक्षणें घ्यावीं । मूर्खलक्षणें त्यागावीं ।
पुढिले समासी आघवीं । निरोपिलीं ॥ ७४ ॥
मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत, यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणांचे वर्णन केले आहे. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मूर्खलक्षणनाम समास पहिला ॥ १ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसवादे 'मूर्खलक्षणनाम' समास पहिला समाप्त.

GO TOP

समास दुसरा : उत्तमलक्षण

॥ श्रीराम ॥

श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥
आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली, तर अंगी सर्वज्ञता बाणते. (१)

वाट पुसल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घे‍ऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥
कुठेही जाताना योग्य प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली, तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. (२)

अति वाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये ।
शोधल्याविण करूं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥
फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये, कुलशीलाची चौकशी केल्याखेरीज कुणाही मुलीशी विवाह करू नये. (३)

विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे. (४)

प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्री पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥
प्रेम नसेल तर तेथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. (५)

जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये ।
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥
लोकांत सरळपणा कधी सोडू नये, पापमार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठल्याही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. (६)

निंदा द्वेष करूं नये । असत्संग धरूं नये ।
द्रव्यदारा हरूं नये । बळात्कारें ॥ ७ ॥
कुणाचीही निंदा करू नये, कुणाचा द्वेष करू नये, वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. (७)

वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥
वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडण करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. (८)

तोंडाळासि भांडों नये । वाचाळासी तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥
तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. (९)

अति क्रोध करूं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥
अति क्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास चार गोष्टी शिकवत असेल, तर त्याचा कंटाळा मानू नये. (१०)

क्षणाक्षणां रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥
वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारक्या मारू नयेत. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नयेत. (११)

बोलिला बोल विसरों नये । प्रसंगी सामर्थ्य चुकों नये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसि कदा ॥ १२ ॥
आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. योग्य वेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दाखविल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. (१२)

आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिलुआविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥
आळसात कधीही सुख मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे. (१३)

सुखा आंग दे‍ऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासों नये । निरंतर ॥ १४ ॥
देहाचे फार चोचले करू नयेत. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. (१४)

सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । काहीं केल्या ॥ १५ ॥
सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्कळपणे वटवट करू नये, कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. (१५)

बहुत चिंता करूं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥
फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. (१६)

कोणाचा उपकार घे‍ऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करूं नये । विस्वासघात ॥ १७ ॥
शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. (१७)

शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जणारास पुसों नये । कोठें जातोस म्हणौनी ॥ १८ ॥
कधी अस्वच्छ, अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नयेत किंवा कुणी बाहेर जाण्यास निघाला असेल, तर 'कोठे जातोस' असेही कधी विचारू नये. (१८)

व्यापकपण सांडूं नये । पराधेन हो‍ऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥
आपल्या अंतःकरणाची विशालता, औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या आधीन होऊन राहू नये व आपला भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये. (१९)

पत्रेंविण पर्वत करूं नये । हीनाचें रुण घे‍ऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥
लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्याघेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसांकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षीपुराव्याशिवाय राजदरबारी- कोर्टकचेरीत कधी जाऊ नये (२०)

लटिकी जाजू घे‍ऊं नये । सभेस लटिकें करूं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥
कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेस खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये. (२१)

आदखणेपण करूं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥
कुणाचाही मत्सर करू नये, उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये. शरीरबळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये. (२२)

बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करूं नये ।
बहुत दिवस राहूं नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥
अती आहार घेऊ नये. फार झोपही काढू नये. दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये. (२३)

आपल्याची गोही दे‍ऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हांसों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥
केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये. आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये. गोष्टी सांगताना आपणच हसू नये. (२४)

धूम्रपान घे‍ऊं नये । उन्मत्त द्रव्य सेवूं नये ।
बहुचकासीं करूं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥
धूम्रपान करू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. वाचाळाशी मैत्री करू नये. (२५)

कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न से‍ऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥
कामाशिवाय कधी मोकळे बसू नये. नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये. (२६)

तोंडीं सीवी असों नये । दुसयास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥
तोंडात शिवी नसावी. दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये. चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिकटवू नये. (२७)

देखिली वस्तु चोरूं नये । बहुत कृपण हो‍ऊं नये ।
जिवलगांसी करूं नये । कळह कदा ॥ २८ ॥
जी वस्तू दिसेल ती चोरू नये, अत्यंत कृपण होऊ नये. आपल्या जिवलगांशी कधी भांडण करू नये. (२८)

येकाचा घात करूं नये । लटिकी गोही दे‍ऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥
कोणाचाही घात करू नये. खोटी साक्ष देऊ नये. अमर्याद वर्तन कधीही करू नये. (२९)

चाहाडी चोरी धरूं नये । परद्वार करूं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥
कुणाची चहाडी करू नये, कुठलीही चोरी करू नये. परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये. (३०)

समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियांस दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥
प्रसंगी धैर्य दाखविण्यास चुकू नये. सत्त्वगुण कधी सोडू नये. शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये. (३१)

अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥
थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये. हरिभक्ती करण्यास कधी लाजू नये. पवित्र लोकांत वाटेल तसे अमर्याद वागू नये. (३२)

मूर्खासीं संमंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥
मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये. अंधारात कधी हात घालू नये. वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. (३३)

स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥
स्नानसंध्या (नित्यकर्म) सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये. (३४)

हरिकथा सांडूं नये । निरूपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥
हरिकथेचे श्रवण, कीर्तन सोडू नये. अध्यात्मनिरूपण टाळू नये. प्रपंचांत दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये. (३५)

देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलते भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥
देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपल्या धर्माचा त्याग करू नये. विचार न करता भिडेस बळी पडून भलतेसलते करू नये. (३६)

निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये ।
पा‍उस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥
निष्ठुरपणा करू नये, कुणाही जीवाची हत्या करू नये. फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठे जाऊ नये. (३७)

सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारितां चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥
सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळप्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. (३८)

गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करूं नये ।
जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥
गुरूवाचून राहू नये पण हलक्या जातीचा गुरू करू नये. वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये. (३९)

सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथें जाऊं नये ।
कदा अभिमान घे‍ऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
सत्यमार्ग कधीही सोडू नये. खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये. (४०)

अपकीर्ति ते सांडावी । सद्की्र्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥
अपकीर्ती कधीही होऊ देऊ नये. सत्कीर्ती वाढवावी. विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी. (४१)

नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥
हे उत्तम गुण जो घेत नाही, तो मनुष्य अवलक्षणी समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन ऐका. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उत्तामलक्षणनाम समास दुसरा ॥ २ ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे 'उत्तमलक्षणनाम' समास दुसरा समाप्त.

GO TOP

समास तिसरा : कुविद्यालक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका कुविद्येचीं लक्षणें । अति हीनें कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलीं ते श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥
आता कुविद्येची अति हीन अशी कुलक्षणे, त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावी. (१)

ऐका कुविद्येचा प्राणी । जन्मा ये‍ऊन केली हानी ।
सांगिजेल येहीं लक्षणीं । वोळखावा ॥ २ ॥
आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल त्याने जन्मास येऊन स्वतः चे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते. (२)

कुविद्येचा प्राणी असे । तो कठिण निरूपणें त्रासे ।
अवगुणाची समृद्धि असे । म्हणौनियां ॥ ३ ॥
कुविद्येचा जो मनुष्य असतो, त्याच्या ठिकाणी अवगुणाची खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो. (३)

श्लोक ॥ दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम ॥
अर्थ : अर्जुना, आतां आसुरी संपत्तीचे गुण तुला सांगतो. आसुरी संपत्तीला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषामध्ये पुढील गुण दिसतात. ‘ मी मोठा धार्मिक आहे ’ असे बाह्य वेष व आचार यांवरून लोकांस भासविणे, हा दंभ; पुष्कळ धन असणे, किंवा पिता, बंधु इत्यादि आप्त मोठा अधिकारी - राजाप्रभृति असणे, यामुळे सामान्य मनुष्याच्या ठिकाणी जो मद उत्पन्न होतो, तो दर्प होय; अशा दर्पाने युक्त असलेला पुरुष मोठमोठ्या विद्वान् व शीलसंपन्न पुरुषांचाहि धिक्कार करतो. त्याचप्रमाणे ‘ मी उत्कृष्ट आहे ’ असे मानणे, कोप, कठोर - मर्मभेदक शब्द बोलणे, जसे कुरूपाला सुस्वरूप, हीनाला उत्तम, आंधळ्याला डोळस, इत्यादि म्हणणे व कर्तव्याकर्तव्याविषयीचे अविवेकज्ञानमिथ्याप्रत्यय; हे पांच गुण राजस पुरुषांमध्ये मुख्यतः असतात.

काम क्रोध मद मत्सर । लोभ दंभ तिरस्कार ।
गर्व ताठा अहंकार । द्वेष विषाद विकल्पी ॥ ४ ॥
आशा ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना ।
असूय अविज्ञा ईषणा वासना । अतृप्ती लोलंगता ॥ ५ ॥
इछ्या वांछ्या चिकिछ्या निंदा । आनित्य ग्रामणी मस्ती सदा ।
जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ती दुर्वासना ॥ ६ ॥
स्पर्धा खटपट आणि चटचट । तर्हे झटपट आणी वटवट ।
सदा खटपट आणी लटपट । परम वेथा कुविद्या ॥ ७ ॥
अर्थ - दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही आसुरी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, (लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा किंवा कुणी म्हणतात पुत्रेषणा या) तीन ईषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनीती, गावगुंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट तर्‍हेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे, ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. (४-७)

कुरूप आणी कुलक्षण । अशक्त आणी दुर्जन ।
दरिद्री आणी कृपण । आतिशयेंसीं ॥ ८ ॥
कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूष असतो. (८)

आळसी आणी खादाड । दुर्बळ आणी लाताड ।
तुटक आणी लाबाड । आतिशयेंसीं ॥ ९ ॥
तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणारा असतो. (९)

मूर्ख आणी तपीळ । वेडें आणी वाचाळ ।
लटिकें आणी तोंडाळ । आतिशयेंसीं ॥ १० ॥
तो मूर्ख असून तापट वेडा असून वाचाळ खोल असूनही अतिशय तोंडाळ असतो. (१०)

नेणे आणी नायके । न ये आणी न सीके ।
न करी आणी न देखे । अभ्यास दृष्टी ॥ ११ ॥
स्वतःला काही कळत नाही, तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःस काही येत नाही आणि कुणी शिकवू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहातही नाही. (११)

अज्ञान आणी अविस्वासी । छळवादी आणी दोषी ।
अभक्त आणी भक्तांसी । देखों सकेना ॥ १२ ॥
अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. (१२)

पापी आणी निंदक । कष्टी आणी घातक ।
दुःखी आणी हिंसक । आतिशयेंसीं ॥ १३ ॥
हीन आणी कृत्रिमी । रोगी आणी कुकर्मी ।
आचंगुल आणी अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥
पापी, निंदा करणारा, स्वत: दुःखी-कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणात, कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. (१३-१४)

हीन देह आणी ताठा । अप्रमाण आणी फांटा ।
बाष्कळ आणी करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥
देह हीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो, स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणारा असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. (१५)

लंडी आणी उन्मत्त । निकामी आणी डुल्लत ।
भ्याड आणी बोलत । पराक्रमु ॥ १६ ॥
तो भित्रा असून उन्मत्त असतो, कुचकामाचा असून ऐट मिरविणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणारा असतो. (१६)

कनिष्ठ आणी गर्विष्ठ । नुपरतें आणी नष्ट ।
द्वेषी आणी भ्रष्ट । आतिशयेंसीं ॥ १७ ॥
तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो, विषयासक्त असून नष्ट असतो व अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. (१७)

अभिमानी आणी निसंगळ । वोडगस्त आणी खळ ।
दंभिक आणी अनर्गळ । आतिशयेंसीं ॥ १८ ॥
अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. (१८)

वोखटे आणी विकारी । खोटे आणी अनोपकारी ।
अवलक्ष्ण आणी धिःकारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥
अती लंपट व विकारी, खोय्टा आणि अपकार करणारा, अवलक्षणी असूनही प्राणिमात्रांचा धिक्कार करणारा असतो. (१९)

अल्पमती आणी वादक । दीनरूप आणि भेदक ।
सूक्ष्म आणी त्रासक । कुशब्दें करूनि ॥ २० ॥
मंदबुद्धीचा असून वाद घालतो, दीनवाणा असूनही मर्मभेदक बोलतो, धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. (२०)

कठिणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥
तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत कूर निष्ठुर दुरात्माच असतो. (२१)

न्यूनवचनी पैशून्यवचनी । अशुभवचनी अनित्यवचनी ।
द्वेषवचनी अनृत्यवचनी । बाष्कळवचनी धिःकारु ॥ २२ ॥
तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरविणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा व बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. (२२)

कओअटी कुटीळ गाठ्याळ । कुर्टें कुचर नट्याळ ।
कोपी कुधन टवाळ । आतिशयेंसीं ॥ २३ ॥
तो कपटी, कुटिल, आंतल्या गाठीचा, मनांतल्या मनांत कुढणारा, कामचुकार, नष्ट तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळविणारा व अत्यंत टवाळखोर असतो. (२३)

तपीळ तामस अविचार । पापी अनर्थी अपस्मार ।
भूत समंधी संचार । आंगीं वसे ॥ २४ ॥
तो तापट तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्मारांनी पीडित व ज्याच्या अंगात भूत, समंधादी संचारतात असा असतो. (२४)

आत्महत्यारा स्त्रीहत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा ।
मातृहत्यारा पितृहत्यारा । माहापापी पतित ॥ २५ ॥
तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. (२५)

उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विस्वासघातकी ।
कृतघ्न तल्पकी नारकी । अतित्याई जल्पक ॥ २६ ॥
तो सर्वच बाबतीत उणा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबड्या असतो. (२६)

किंत भांडण झगडा कळहो । अधर्म अनराहाटी शोकसंग्रहो ।
चाहाड वेसनी विग्रहो । निग्रहकर्ता ॥ २७ ॥
संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने, रूढीविरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. (२७)

द्वाड आपेसी वोंगळ । चाळक चुंबक लच्याळ ।
स्वार्थी अभिळासी वोढाळ । आद्दत्त झोड आदखणा ॥ २८ ॥
तो द्वाड, अपयशी, अस्वच्छ, चाळविणारा, कंजूष, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. (२८)

शठ शुंभ कातरु । लंड तर्मुंड सिंतरु ।
बंड पाषांड तश्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥
तो लबाड बेअकली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळविणारा असतो. (२९)

धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजट ।
थोट उद्धट लंपट । बटवाल कुबुद्धी ॥ ३० ॥
तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट वात्रट कुभांड रचणारा, उद्धट लंपट भ्रष्ट व कुबुद्धी असतो. (३०)

मारेकरी वरपेकरी । दरवडेकरी खाणोरी ।
मैंद भोंदु परद्वारी । भुररेकरी चेटकी ॥ ३१ ॥
तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर काळीजखाऊ, मैंद, भोंदू बाहेरख्याली, मोहिनीविद्येने भुलविणारा, चेटूक करणारा असतो. (३१)

निशंक निलाजिरा कळभंट । टौणपा लौंद धट उद्धट ।
ठस ठोंबस खट नट । जगभांड विकारी ॥ ३२ ॥
तो निःशंक, निलाजरा, भांडकुदळ टोणपा, गलेलठ्ठ, धटिंगण व उद्धट असून नफ्फट अक्षरशत्रू शठ, नष्ट सार्‍या जगाशी भांडणारा व विकारी असतो. (३२)

अधीर आळिका अनाचारी । अंध पंगु खोकलेंकरी ।
थोंटा बधिर दमेकरी । तर्ह्ही ताठा न संडी ॥ ३३ ॥
तो उतावळ्या स्वभावाचा, हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोय, बहिरा, दमेकरी असा रोगजर्जर असूनही ताठा न सोडणारा असतो. (३३)

विद्याहीन वैभवहीन । कुळहीन लक्ष्मीहीन ।
शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीन भिकारी ॥ ३४ ॥
तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन भिकारीच असतो. (३४)

बळहीन कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन ।
लक्षणहीन लावण्यहीन । आंगहीन विपारा ॥ ३५ ॥
तो बल्लीन, कळहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन कुरूप असा असतो. (३५)

युक्तिहीन बुद्धिहीन । आचारहीन विचारहीन ।
क्रियाहीन सत्वहीन । विवेकहीन संशई ॥ ३६ ॥
तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्त्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. (३६)

भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन वैराग्यहीन ।
शांतिहीन क्ष्माहीन । सर्वहीन क्षुल्लकु ॥ ३७ ॥
तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन सर्वच प्रकारे हीन, अगदी क्षुद्र, असा असतो. (३७)

समयो नेणे प्रसंग नेणे । प्रेत्न नेणे अभ्यास नेणे ।
आर्जव नेणे मैत्री नेणे । कांहींच नेणे अभागी ॥ ३८ ॥
त्यास वेळप्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, आर्जवाने वागता येत नाही, कुणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. (३८)

असो ऐसे नाना विकार । कुलक्षणाचें कोठार ।
ऐसा कुविद्येचा नर । श्रोतीं वोळखावा ॥ ३९ ॥
असो, याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे, असे श्रोत्यांनी ओळखावे. (३९)

ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि त्यागची करणें ।
अभिमानीं तर्ह्हें भरणें । हें विहित नव्हें ॥ ४० ॥
याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली आहेत, त्यांचा त्याग करावा हेच बरे ! अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कुविद्यालक्षणनाम समास तिसरा ॥ ३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'कुविद्याक्षणनाम' समास तिसरा समाप्त

GO TOP

समास चौथा : भक्तिनिरूपण

॥ श्रीराम ॥

नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ ।
त्याहिमधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥
अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो. (१)

नरदेहीं विशेष ब्राह्मण । त्याहीवरी संध्यास्नान ।
सद्वासना भगवद्भयजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥
नरदेहातही विशेषेकरून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे, संध्यास्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून भगवद्‌भजन घडणे, हे सर्व पूर्वपुण्याईनेच होऊ शकते. (२)

भगवद्भनक्ति हे उत्तम । त्याहिवरी सत्समागम ।
काळ सार्थक हाचि परम । लाभ, जाणावा ॥ ३ ॥
भगवद्‌भक्ती करणे हे उत्तम आहेच. त्यांतही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल, तर हा फारच मोठा लाभ जाणावा. (३)

प्रेमप्रीतीचा सद्भा व । आणी भक्तांचा समुदाव ।
हरिकथा मोहोत्साव । तेणें प्रेमा दुणावे ॥ ४ ॥
हृदयांत भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवद्‌भक्ताचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथाश्रवण घडले तर त्यायोगे भगवत्प्रेम दुणावते. (४)

नरदेहीं आलियां येक । कांही करावें सार्थक ।
जेणें पाविजे परलोक । परम दुल्लभ जो ॥ ५ ॥
नरदेह प्राप्त झाला असतां त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे परम दुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते. (५)

विधियुक्त ब्रह्मकर्म । अथवा दया दान धर्म ।
अथवा करणें सुगम । भजन भगवंताचें ॥ ६ ॥
त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी, दानधर्मादी करावे व सर्वांत सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे. (६)

अनुतापें करावा त्याग । अथवा करणें भक्तियोग ।
नाहीं तरी धरणें संग । साधुजनाचा ॥ ७ ॥
पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्तियोगाचे आचरण करावे. नाही तर निदान साधुपुरुषाच्या संगतीत राहावे. (७)

नाना शास्त्रें धांडोळावीं । अथवा तीर्थे तरी करावीं ।
अथवा पुरश्चरणें बरवीं । पापक्षयाकारणें ॥ ८ ॥
अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्रांची पुरश्चरणे तरी करावीत. (८)

अथवा कीजे परोपकार । अथवा ज्ञानाचा विचार ।
निरूपणीं सारासार । विवेक करणें ॥ ९ ॥
अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा. (९)

पाळावी वेदांची आज्ञा । कर्मकांड उपासना ।
जेणें हो‍इजे ज्ञाना- । आधिकारपात्र ॥ १० ॥
वेदांची आज्ञा पाळावी व ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग, उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे. (१०)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
कांहीं तरी येका भजनें । सार्थक करावें ॥ ११ ॥
काया, वाचा आणि मनाने, जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने, फुले फळे अथवा जल यांनी भगवंताचे पूजन, भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. (११)

जन्मा आलियाचें फळ । कांहीं करावें सफळ ।
ऐसें न करितां निर्फळ । भूमिभार होये ॥ १२ ॥
नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा. असे जर केले नाही, तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो. (१२)

नरदेहाचे उचित । कांहीं करावें आत्महित ।
येथानुशक्त्या चित्तवित्त । सर्वोत्तमीं लावावें ॥ १३ ॥
नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे. आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त व वित्त त्या सर्वोत्तमाचे- भगवंताचे चरणी समर्पित करावे. (१३)

हें कांहींच न धरी जो मनीं । तो मृत्यप्राय वर्ते जनीं ।
जन्मा ये‍ऊन तेणें जननी । वायांच कष्टविली ॥ १४ ॥
यापैकी जो काहीच करीत नाही, तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा. जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते. (१४)

नाहीं संध्या नाहीं स्नान । नाहीं भजन देवतार्चन ।
नाहीं मंत्र जप ध्यान । मानसपूजा ॥ १५ ॥
अशी माणसे, स्नान, संध्या, भजन, देवतार्चन, मंत्रजप, ध्यान वा मानसपूजा काहीच करीत नाहीत. (१५)

नाहीं भक्ति नाहीं प्रेम । नाहीं निष्ठा नाहीं नेम ।
नाहीं देव नाहीं धर्म । अतीत अभ्यागत ॥ १६ ॥
ती भक्ती करीत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते. ती कुठलाही नेम पाळीत नाहीत, देव नाही, धर्म नाही, भोजनसमयी आलेल्या अतिथीचा सत्कार अन्नदान करीत नाहीत. (१६)

नाहीं सद्बुाद्धि नाहीं गुण । नाहीं कथा नाहीं श्रवण ।
नाहीं अध्यात्मनिरूपण । ऐकिलें कदां ॥ १७ ॥
त्यांच्या ठिकाणी सद्‌बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन, श्रवण, किंवा अध्यात्मनिरूपण यांपैकी काहीही करत नाहीत. (१७)

नाहीं भल्यांची संगती । नाहीं शुद्ध चित्तवृत्ती ।
नाहीं कैवल्याची प्राप्ती । मिथ्यामदें ॥ १८ ॥
ती सज्जनांची संगत करीत नाहीत, त्यांची चित्तशुद्धी होत नाही व मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्तीही नाही. (१८)

नाहीं नीति नाहीं न्याये । नाहीं पुण्याचा उपाये ।
नाहीं परत्रीची सोये । युक्तायुक्त क्रिया ॥ १९ ॥
ती न्यायाची चाड बाळगत नाहीत. पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्‍न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी, यासाठीही काही उपाय करीत नाहीत. (१९)

नाहीं विद्या नाहीं वैभव । नाहीं चातुर्याचा भाव ।
नाहीं कळा नाहीं लाघव । रम्यसरस्वतीचें ॥ २० ॥
विद्या, वैभव, चातुर्य, कला, किंवा सुंदर सरस्वतीचा वाग्विलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते. (२०)

शांती नाहीं क्ष्मा नाहीं । दीक्षा नाहीं मैत्री नाहीं ।
शुभाशुभ कांहींच नाहीं । साधनादिक ॥ २१ ॥
शांती, क्षमा, दीक्षा म्हणजे एखादे व्रत, नेम पाळणे, सज्जनांशी मैत्री, इत्यादी शुभाशुभ साधनादिक त्यांच्यापाशी नसते. (२१)

सुचि नाहीं स्वधर्म नाहीं । आचार नाहीं विचार नाहीं ।
आरत्र नाहीं परत्र नाहीं । मुक्त क्रिया मनाची ॥ २२ ॥
पवित्रता, स्वधर्मविचार उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतिसंबंधी विचार ते करीत नाहीत. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात. (२२)

कर्म नाहीं उपासना नाहीं । ज्ञान नाहीं वैराग्य नाहीं ।
योग नाहीं धारिष्ट नाहीं । कांहीच नाहीं पाहातां ॥ २३ ॥
त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही; याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही. (२३)

उपरती नाहीं त्याग नाहीं । समता नाहीं लक्षण नाहीं ।
आदर नाहीं प्रीति नाहीं । परमेश्वराची ॥ २४ ॥
त्यांच्या ठिकाणी विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे, भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. (२४)

परगुणाचा संतोष नाहीं । परोपकारें सुख नाहीं ।
हरिभक्तीचा लेश नाहीं । अंतर्यामीं ॥ २५ ॥
लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही. परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो. (२५)

ऐसे प्रकारीचे पाहातां जन । ते जीतचि प्रेतासमान ।
त्यांसीं न करावें भाषण । पवित्र जनीं ॥ २६ ॥
अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत व पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. (२६)

पुण्यसामग्री पुरती । तयासीच घडें भगवद्भाक्ती ।
जें जें जैसें करिती । ते पावती तैसेंचि ॥ २७ ॥
जर पूर्वपुण्याचा संग्रह असेल, तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवद्‌भक्ती घडते. ज्याचे पूर्व कर्म जसे असते, त्याप्रमाणेच त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. (२७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
भक्तिनिरूपणणनाम समास चवथा ॥ ४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ' भक्तिनिरूपणनाम ' समास चौथा समाप्त.

GO TOP

समास पाचवा : रजोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मुळीं देह त्रिगुणाचा । सत्त्वरजतमाचा ।
त्यामध्यें सत्त्वाचा । उत्तम गुण ॥ १ ॥
हा देह मुळात त्रिगुणांचा आहे. ते तीन गुण म्हणजे सत्त्व, रज व तमोगुण. त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्त्वगुण होय. (१)

सत्वगुणें भगवद्भवक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती ।
तमोगुणें अधोगती । पावति प्राणी ॥ २ ॥
सत्त्वगुणाने भगवद्‌भक्तीची प्राप्ती होते. रजोगुणामुळे पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. (२)

श्लोक ॥ ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः ।
जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥
अर्थ- सत्त्वगुणप्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात. रजोगुणप्रधान माणसे मध्ये राहतात, तर तमोगुणप्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात.

त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ ।
शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥
गुणांमध्ये शुद्ध व शबल दोन प्रकारचा भेद आहे. शुद्ध ते निर्मळ असते तर शबल अशुद्ध असून बाधक असते. ते सर्व आता वर्णन करून सांगतो. (३)

शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण ।
शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो संसारिक ॥ ४ ॥
शुद्ध आणि शबल यांची वर्णने आता सांगतो ती सुज्ञांनी सावधपणे ऐकावी. शुद्ध गुण पारमार्थिक असतो तर शबल प्रापंचिक असतो. (४)

तयां संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती ।
येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥
त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका. त्याच्या देहात तिन्ही गुणांचे कार्य चालते. एकाचा जोर होतो, तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात. (५)

रज तम आणी सत्व । येणेंचि चाले जीवित्व ।
रजोगुणाचें कर्तृत्व । दाखऊं आता ॥ ६ ॥
रज, तम आणि सत्त्व या तीन गुणांच्या योगानेच जीवननिर्वाह होतो. त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवू या. (६)

रजोगुण येतां शरिरीं । वर्तणुक कैसी करी ।
सावध हो‍ऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥
शरीरात रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा वर्तणूक कशी होते, ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे. (७)

माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर ।
ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥
रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस ''माझे घर माझा संसार येथे देव थोर म्हणून कुठला आणला '' असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो. (८)

माता पिता आणी कांता । पुत्र सुना आणी दुहिता ।
इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगोण ॥ ९ ॥
तो आईवडील, बायको, मुले सुना, मुली इतक्यांचीच चिंता वाहतो. (९)

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
दुसर्याचें अभिळाषावें । तो रजोगोण ॥ १० ॥
रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे, तर दुसऱ्याच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी, अशा प्रकारची असते. (१०)

कैंचा धर्म कैंचें दान । कैंचा जप कैंचें ध्यान ।
विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥
कसला आला आहे धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान, असे म्हणून जो पापपुण्याचा विचार करीत नाही, तो रजोगुण होय. (११)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत ।
अनाचारीं मनोगत । तो रजोगोण ॥ १२ ॥
रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथि-अभ्यागत तरजाणतच नाही उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते. (१२)

धनधान्याचे संचित । मन होये द्रव्यासक्त ।
अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगोण ॥ १३ ॥
ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूष असतो, तो रजोगुण होय. (१३)

मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर ।
मी सकळांमध्ये थोर- । म्हणे, तो रजोगुण ॥ १४ ॥
मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे. एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो, तो रजोगुण होय. (१४)

माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव ।
ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगोण ॥ १५ ॥
हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा वाडा माझा आहे, हे माझे राहाण्याचे ठिकाण आहे, अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो, तो रजोगुण होय. (१५)

दुसर्या चें सर्व जावें । माझेचेंचि बरें असावें ।
ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगोण ॥ १६ ॥
दुसऱ्याचे सर्व जावे, पण माझे मात्र सर्व बरे असावे, असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते, तो रजोगुणच होय. (१६)

कपट आणी मत्सर । उठे देहीं तिरस्कार ।
अथवा कामाचा विकार । तो रजोगोण ॥ १७ ॥
जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी कामविकार प्रबळ असतो, तो रजोगुण जाणावा. (१७)

बाळकावरी ममताअ । प्रीतीनें आवडे कांता ।
लोभ वाटे समस्तां । तो रजोगोण ॥ १८ ॥
ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व सर्वांविषयी ज्यास लोभ असतो, तो रजोगुण होय. (१८)

जिवलगांची खंती । जेणें काळें वाटे चित्तीं ।
तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥
ज्या वेळी निकटच्या आप्तस्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते, त्या वेळी रजोगुण प्रबळ झाला आहे, असे समजावे. (१९)

संसाराचे बहुत कष्ट । कैसा हो‍ईल सेवट ।
मनास आठवे संकट । तो रजोगोण ॥ २० ॥
संसारात इतके कष्ट आहेत, आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक, असे ज्याच्या मनास संकट वाटते, तो रजोगुणच होय. (२०)

कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें ।
दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगोण ॥ २१ ॥
किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले, त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते, तो रजोगुणच होय. (२१)

वैभव देखोनि दृष्टी । आवडी उपजली पोटीं ।
आशागुणें हिंपुटी- । करी, तो रजोगुण ॥ २२ ॥
दुसर्‍याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो, तो रजोगुण जाणावा. (२२)

जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें ।
लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगोण ॥ २३ ॥
जे जे दृष्टीस पडते, ते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्यायोगे दुःख होते, तो रजोगुण जाणावा. (२३)

विनोदार्थीं भरे मन । शृंघारिक करी गायेन ।
राग रंग तान मान । तो रजोगोण ॥ २४ ॥
ज्याचे मन हास्यविनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग, रंग, तान, मान यात रस असतो, तो रजोगुण. (२४)

टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा ।
हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगोण ॥ २५ ॥
व्यंगोक्ती, थट्टामस्करी, निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्यविनोद करीत असतो, तो रजोगुणच. (२५)

आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ ।
कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगोण ॥ २६ ॥
ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो, तो रजोगुण जाणावा. (२६)

कळावंत बहुरूपी । नटावलोकी साक्षेपी ।
नाना खेळी दान अर्पी । तो रजोगोण ॥ २७ ॥
जो कलावंत असतो, बहुरूप्याप्रमाणे नाना सोंगे घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, नाना प्रकारच्या खेळांवर जो पैसे घालवतो, तो रजोगुण जाणावा. (२७)

उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं ।
आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥
मादक किंवा धुंदी, नशा आणणल्या द्रव्याची ज्यास अत्यंत आवड असते, विषयासक्ती व गुंडपणा याचेच जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते, तो रजोगुण जाणावा. (२८)

तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे ।
नित्यनेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥
ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष, कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्यनेमाला ज्याचे मन विटते, तो रजोगुण होय. (२९)

देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु ।
प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥
देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते, तो रजोगुण. (३०)

गोडग्रासीं आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण ।
रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥
ज्याला गोडधोड पदार्थांची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो आणि ज्यास उपास करणे आवडत नाही, तो माणूस रजोगुणी जाणावा. (३१)

शृंगारिक तें आवडे । भक्ती वैराग्य नावडे ।
कळालाघवीं पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥
ज्यास शृंगारिक गोष्टींची आवड असते, भक्ती, वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो, तो रजोगुण. (३२)

नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थी प्रेमा ।
बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥
परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, तो रजोगुण. (३३)

असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण ।
प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥
याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्ममरण भोगायला लावतो व प्रपंचांतही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. (३४)

आतां रजोगुण हा सुटेना । संसारिक हें तुटेना ।
प्रपंचीं गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥
आता हा रजोगुण तर सुटता सुटत नाही, त्यामुळे या संसारचक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते, तरी यावर उपाय काय? (३५)

उपाये येक भगवद्भवक्ती । जरी ठाकेना विरक्ती ।
तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥
त्यावर श्री समर्थ म्हणतात की, यावर भगवद्‌भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवद्‌भजन करावे. (३६)

काया वाचा आणी मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें ।
ईश्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥
काया, वाचा आणि मनाने, पत्र, पुष्प, फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल, ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. (३७)

येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य ।
सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥
यथाशक्ती दान, पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत, सुखात अथवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे. (३८)

आदि‍अंती येक देव । मध्येंचि लाविली माव ।
म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंतीं असावा ॥ ३९ ॥
या विश्वाच्या आदी व अंती एक देवच आहे. मध्ये उगीचच ही माया भुलवते. म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. (३९)

ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन ।
आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥
शबल रजोगुण हा असा आहे. त्याचे येथे थोडक्यात वर्णन केले आहे. आता शुद्ध रजोगुण जो पारमार्थिक असतो, तोही तू जाणून घे. (४०)

त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण ।
तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥
सत्त्वगुणाच्या वर्णनांतच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे. म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. (४१)

ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला ।
आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥
याप्रमाणे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे, ते श्रोत्यांनी अनुमानाने जाणून घेतले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे. तेही श्रवण करावे. (४२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा ॥ ५ ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे 'रजोगुणलक्षणनाम' समास पाचवा समाप्त

GO TOP

समास सहावा : तमोगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

[ Right click to 'save audio as' for download ]

[ Right click to 'save audio as' for download ]


मागां बोलिला रजोगुण । क्रियेसहित लक्षण ।
आतां ऐका तमोगुण । तोहि सांगिजेल ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले आहे. आता तमोगुणाचे वर्णन करतो, तेही ऐका. (१)

संसारीं दुःखसंमंध । प्राप्त होतां उठे खेद ।
कां अद्भुुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ २ ॥
प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो, तो तमोगुण समजावा. (२)

शेरीरीं क्रोध भरतां । नोळखे माता पिता ।
बंधु बहिण कांता । ताडी, तो तमोगुण ॥ ३ ॥
जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो, तेव्हा तो आईवडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ, बहीण, बायको यांनाही मारू लागतो, तो तमोगुण होय. (३)

दुसर्यामचा प्राण घ्यावा । आपला आपण स्वयें द्यावा ।
विसरवी जीवभावा । तो तमोगुण ॥ ४ ॥
दुसऱ्याचा प्राण घ्यावा, किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो, तेव्हा तो तमोगुण. (४)

भरलें क्रोधाचें काविरें । पिश्याच्यापरी वावरे ।
नाना उपायें नावरे । तो तमोगुण ॥ ५ ॥
ज्या वेळी क्रोधाचा आवेग येतो, तेव्हा जणू शरीरात पिशाच्याचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण. (५)

आपला आपण शस्त्रपात । पराचा करी घात ।
ऐसा समय वर्तत । तो तमोगुण ॥ ६ ॥
प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे, हा तमोगुणच होय. (६)

डोळा युध्यचि पाहवें । रण पडिलें तेथें जावें ।
ऐसें घेतलें जीवें । तो तमोगुण ॥ ७ ॥
जेव्हा डोळ्यांनी युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते, तो तमोगुणच असतो. (७)

अखंड भ्रांती पडे । केला निश्चय विघडे ।
अत्यंत निद्रा आवडे । तो तमोगुण ॥ ८ ॥
ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुण होय. (८)

क्षुधा जयाची वाड । नेणे कडु अथवा गोड ।
अत्यंत जो कां मूढ । तो तमोगुण ॥ ९ ॥
ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही, असा जो अत्यंत मूढ असतो, तो तमोगुण. (९)

प्रीतिपात्र गेलें मरणें । तयालागीं जीव देणें ।
स्वयें आत्महत्या करणें । तो तमोगुण ॥ १० ॥
आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास, प्रवृत्त होतो, तो तमोगुण होय. (१०)

किडा मुंगी आणी स्वापद । यांचा करूं आवडे वध ।
अत्यंत जो कृपामंद । तो तमोगुण ॥ ११ ॥
ज्याला किडा, मुंगी, श्वापदे यांचा वध करणे अत्यंत आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय. (११)

स्त्रीहत्या बाळहत्या । द्रव्यालागीं ब्रह्मत्या ।
करूं आवडे गोहत्या । तो तमोगुण ॥ १२ ॥
ज्याला स्त्रीहत्या, बालहत्या, एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या, गोहत्यादी करणे आवडते तो तमोगुण जाणावा. (१२)

विसळाचेनि नेटें । वीष घ्यावेंसें वाटे ।
परवध मनीं उठे । तो तमोगुण ॥ १३ ॥
नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व जो दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा करतो, तो तमोगुण होय. (१३)

अंतरीं धरूनि कपट । पराचें करी तळपट ।
सदा मस्त सदा उद्धट । तो तमोगुण ॥ १४ ॥
जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो, तो तमोगुण समजावा. (१४)

कळह व्हावा ऐसें वाटे । झोंबी घ्यावी ऐसें उठे ।
अन्तरी द्वेष प्रगटे । तो तमोगुण ॥ १५ ॥
कुणाशी तरी भांडावे, कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होणे, हे तमोगुणाचे कार्य होय. (१५)

युध्य देखावें ऐकावें । स्वयें युध्यचि करावें ।
मारावें कीं मरावें । तो तमोगुण ॥ १६ ॥
युद्ध डोळ्यांनी पाहावे, कानांनी युद्धाच्या वार्ता ऐकाव्या, एवढेच नव्हे, तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच. (१६)

मत्सरें भक्ति मोडावी । देवाळयें विघडावीं ।
फळतीं झाडें तोडावीं । तो तमोगुण ॥ १७ ॥
जो कुणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालये पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी, असे ज्यास वाटते तो तमोगुण होय. (१७)

सत्कर्में ते नावडती । नाना दोष ते आवडती ।
पापभय नाहीं चित्ती । तो तमोगुण ॥ १८ ॥
ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते, तो तमोगुण होय. (१८)

ब्रह्मवृत्तीचा उछेद । जीवमात्रास देणें खेद ।
करूं आवडे अप्रमाद । तो तमोगुण ॥ १९ ॥
ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीवमात्रास दुःख देणे व अती पाप करणेच ज्याला आवडते, तो तमोगुण जाणावा. (१९)

आग्नप्रळये शस्त्रप्रळये । भूतप्रळये वीषप्रळये ।
मत्सरें करीं जीवक्षये । तो तमोगुण ॥ २० ॥
जो आगी लावतो, शस्त्रांनी लोकांचा घात करतो, जो भूतप्रेतबाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो, तो तमोगुण होय. (२०)

परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥ २१ ॥
लोकांना पीडा देण्यात ज्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्यास जो त्रासत नाही, तो तमोगुणच जाणावा. (२१)

भांडण लाऊन द्यावें । स्वयें कौतुक पाहावें ।
कुबुद्धि घेतली जीवें । तो तमोगुण ॥ २२ ॥
लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतः ती मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते, तो तमोगुणच होय. (२२)

प्राप्त जालियां संपत्ती । जीवांस करी यातायाती ।
कळवळा नये चित्तीं । तो तमोगुण ॥ २३ ॥
स्वतःस संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुणच. (२३)

नावडे भक्ति नावडे भाव । नावडे तीर्थ नावडे देव ।
वेदशास्त्र नलगे सर्व । तो तमोगुण ॥ २४ ॥
ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा व देवही आवडत नाही व वेदशास्त्रादी ज्यास नकोसे वाटते, तो तमोगुणच होय. (२४)

स्नानसंध्या नेम नसे । स्वधर्मीं भ्रष्टला दिसे ।
अकर्तव्य करीतसे । तो तमोगुण ॥ २५ ॥
जो स्नानसंध्यादी कुठलाही नेम करीत नाही; स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला दिसतो आणि जे करू नये तेच जो करतो, तो तमोगुण समजावा. (२५)

जेष्ठ बंधु बाप माये । त्यांचीं वचनें न साहे ।
सीघ्रकोपी निघोन जाये । तो तमोगुण ॥ २६ ॥
मोठा भाऊ, आईवडील यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घरच सोडून निघून जातो, तो तमोगुण होय. (२६)

उगेंचि खावें उगेंचि असावें । स्तब्ध हो‍ऊन बैसावें ।
कांहींच स्मरेना स्वभावें । तो तमोगुण ॥ २७ ॥
उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरीत्याच काहीच स्मरत नाही, तो तमोगुण जाणावा. (२७)

चेटकविद्येचा अभ्यास । शस्त्रविद्येचा हव्यास ।
मल्लविद्या व्हावी ज्यास । तो तमोगुण ॥ २८ ॥
जारणमारणादी चेटकविद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो आणि मल्लविद्या यावी अशी जो इच्छा धरतो, तो तमोगुण होय. (२८)

केले गळाचे नवस । रडिबेडीचे सायास ।
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस । तो तमोगुण ॥ २९ ॥
जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे, किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्ठयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो, तो तमोगुण. (२९)

मस्तकीं भदें जाळावें । पोतें आंग हुरपळावें ।
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें । तो तमोगुण ॥ ३० ॥
मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतःस शस्त्र टोचून घ्यावे, हा तमोगुणच जाणावा. (३०)

देवास सिर वाहावें । कां तें आंग समर्पावें ।
पडणीवरून घालून घ्यावे । तो तमोगुण ॥ ३१ ॥
आपले मस्तक देवास वाहावे, किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे, हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. (३१)

निग्रह करून धरणें । कां तें टांगून घेणें ।
देवद्वारीं जीव देणें । तो तमोगुण ॥ ३२ ॥
जो देवाच्या दारी निग्रहाने, हट्टाने धरणे धरतो, किंवा स्वतःस टांगून घेतो, किंवा देवद्वारी जीव देतो, तो तमोगुण जाणावा. (३२)

निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान ।
आपणास घ्यावें पुरून । तो तमोगुण ॥ ३३ ॥
जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो, अथवा पंचाग्निसाधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यावर तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो, अथवा धूम्रपानाचे साधन करतो, किंवा स्वतःस पुरून घेतो, तो तमोगुणच होय. (३३)

सकाम जें का अनुष्ठान । कां तें वायोनिरोधन ।
अथवा राहावें पडोन । तो तमोगुण ॥ ३४ ॥
काही कामना धरून जो अनुष्ठान करतो, किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो, तो तमोगुण जाणावा. (३४)

नखें केश वाढवावे । हस्तचि वर्ते करावे ।
अथवा वाग्सुंन्य व्हावें । तो तमोगुण ॥ ३५ ॥
जो नखे, केस वाढवतो, हात वर करून उभा राहातो किंवा जो एकदम मौनच राहातो, तो तमोगुणच होय. (३५)

नाना निग्रहें पिडावें । देहदुःखें चर्फडावें ।
क्रोधें देवांस फोडावें । तो तमोगुण ॥ ३६ ॥
नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यावयाची आणि देहास दुःख झाले की चरफडायचे व रागारागाने देवालाच फोडायचे, हे तमोगुणाचे कार्य असते. (३६)

देवाची जो निंदा करी । तो आशाबद्धि अघोरी ।
जो संतसंग न धरी । तो तमोगुण ॥ ३७ ॥
जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही, तो तमोगुण होय. (३७)

ऐसा हा तमोगुण । सांगतां जो असाधारण ।
परी त्यागार्थ निरूपण । कांहीं येक ॥ ३८ ॥
तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन येथे केले आहे. (३८)

ऐसें वर्ते तो तमोगुण । परी हा पतनास कारण ।
मोक्षप्राप्तीचें लक्षण । नव्हे येणें ॥ ३९ ॥
वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते, तो तमोगुण होय; पण हा अधोगतीसच कारण होतो. याच्यायोगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. (३९)

केल्या कर्माचें फळ । प्राप्त हो‍ईल सकळ ।
जन्म दुःखाचें मूळ । तुटेना कीं ॥ ४० ॥
माणूस जसे कर्म करतो, त्या कर्माचे यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही. (४०)

व्हावया जन्माचें खंडण । पाहिजे तो सत्वगुण ।
तेंचि असे निरुपण । पुढिले समासीं ॥ ४१ ॥
जन्मच नको असेल तर त्याचे खंडण होण्याकरिता सत्त्वगुण आवश्यक आहे. म्हणून पुढील समासात त्या सत्त्वगुणाचेच निरूपण केले आहे. (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
तमोगुणलक्षणनाम समास सहावा ॥ ६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'तमोगुणलक्षणनाम' समास सहावा समाप्त.

GO TOP

समास सातवा : सत्त्वगुणलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां बोलिला तमोगुण । जो दुःखदायक दारुण ।
आतां ऐका सत्वगुण । परम दुल्लभ ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, मागील समासात अत्यंत दारुण दुःख देणारा जो तमोगुण त्याचे वर्णन केले. आता परम दुर्लभ अशा सत्त्वगुणाचे वर्णन ऐकावे. (१)

जो भजनाचा आधार । जो योगियांची थार ।
जो निरसी संसार । दुःखमूळ जो ॥ २ ॥
भजनाला म्हणजेच भगवद्‌भक्तीला सत्त्वगुणाचा आधार असतो. योगी याचा आश्रय करूनच सिद्धी मिळवतात आणि सत्त्वगुणामुळे दुःखमूळ जो संसार त्याचे निरसन होते. (२)

जेणें होये उत्तम गती । मार्ग फुटे भगवंतीं ।
जेणें पाविजे मुक्ती । सायोज्यता ते ॥ ३ ॥
उत्तम गती सत्त्वगुणामुळेच प्राप्त होते व भगवद्‌भक्तीचा मार्ग सापडून सायुज्यता मुक्तीही प्राप्त होते. (३)

जो भक्तांचा कोंवसा । जो भवार्णवींचा भर्वसा ।
मोक्षलक्ष्मीची दशा । तो सत्वगुण ॥ ४ ॥
सत्त्वगुण हा भक्तांची कणव करणारा त्यांचा सखा आहे. तो भवसागरातून पार करण्यासाठी भरवशाचा मदतनीस आहे. मोक्षरूपी लक्ष्मीची स्थिती म्हणजे सत्त्वगुणच होय. (४)

जो परमार्थाचें मंडण । जो महंतांचें भूषण ।
रजतमाचें निर्शन । तो सत्वगुण ॥ ५ ॥
सत्त्वगुण परमार्थाची शोभा आहे, संत-महंतांचे ते भूषण आहे आणि रजोगुण व तमोगुणांचे निरसन सत्त्वगुणामुळेच होतो. (५)

जो परमसुखकारी । जो आनंदाची लहरी ।
दे‍ऊनियां, निवारी- । जन्ममृत्य ॥ ६ ॥
सत्त्वगुण परम सुख देणारा असून तो स्वात्मसुखाचा अनुभव देऊन जन्ममृत्यूचे निवारण करतो. (६)

जो अज्ञानाचा सेवट । जो पुण्याचें मूळ पीठ ।
जयाचेनि सांपडे वाट । परलोकाची ॥ ७ ॥
सत्त्वगुणामुळेच अज्ञानाचा नाश होतो. पुण्याचा मूळ आधार सत्त्वगुणच आहे व त्यामुळे परलोकाची वाट सापडते. (७)

ऐसा हा सत्वगुण । देहीं उमटतां आपण ।
तये क्रियेचें लक्षण । ऐसें असे ॥ ८ ॥
असा हा सत्त्वगुण देहाच्या ठिकाणी जेव्हा प्रगट होतो, तेव्हा आचरणात जो बदल घडून येतो, त्या क्रियेचे लक्षण असे असते. (८)

ईश्वरीं प्रेमा अधिक । प्रपंच संपादणे लोकिक ।
सदा सन्निध विवेक । तो सत्वगुण ॥ ९ ॥
परमेश्वराविषयी अधिक प्रेम उत्पन्न होते, प्रपंच चारचौघांसारखा लौकिकरीत्या केला जातो आणि सदा सर्वकाळ अंतःकरणात विवेक जागृत राहतो, हे सत्त्वगुणाचे लक्षण होय. (९)

संसारदुःख विसरवी । भक्तिमार्ग विमळ दावी ।
भजनक्रिया उपजवी । तो सत्वगुण ॥ १० ॥
सत्त्वगुणामुळे संसारदुःखाचा विसर पडतो, निर्मळ अशा भक्तिमार्गाचे ज्ञान होते व भजनाची आवड उत्पन्न होते. (१०)

परमार्थाची आवडी । उठे भावार्थाची गोडी ।
परोपकारीं तांतडी । तो सत्वगुण ॥ ११ ॥
परमार्थाची आवड उत्पन होऊन परमात्म्याविषयी भावभक्ती वाढू लागते व परोपकार करण्याविषयी उत्सुकता वाटू लागते. (११)

स्नानसंध्या पुण्यसीळ । अभ्यांतरींचा निर्मळ ।
शरीर वस्त्रें सोज्वळ । तो सत्वगुण ॥ १२ ॥
स्नानसंध्यादी आचार आवडणे, शरीर व वस्त्रे यांची निर्मलता ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत. (१२)

येजन आणी याजन । आधेन आणी अध्यापन ।
स्वयें करी दानपुण्य । तो सत्वगुण ॥ १३ ॥
यज्ञयाग करणे आणि करविणे, अध्ययन आणि अध्यापन करणे व दान व पुण्यकर्मे करणे हे सत्त्वगुणच करवितो. (१३)

निरूपणाची आवडी । जया हरिकथेची गोडी ।
क्रिया पालटे रोकडी । तो सत्वगुण ॥ १४ ॥
जेथे वेदान्त- निरूपणाची आवड असते, हरिकथेत गोडी वाटते व आचरणात तत्काळ चांगला बदल होतो तो सत्त्वगुण जाणावा. (१४)

अश्वदानें गजदानें । गोदानें भूमिदानें ।
नाना रत्नांचीं दानें- । करी, तो सत्वगुण ॥ १५ ॥
अश्वदाने, गजदाने, गोदाने, भूमिदाने, नाना रत्नांची दाने दिली जातात, तो सत्त्वगुण होय. (१५)

धनदान वस्त्रदान । अन्नदान उदकदान ।
करी ब्राह्मणसंतर्पण । तो सत्वगुण ॥ १६ ॥
संपत्तीचे दान, वस्त्राचे दान, अन्नदान, उदकदान, ब्राह्मणसंतर्पण ही कार्ये सत्त्वगुणाची आहेत. (१६)

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।
निःकाम तीर्थें उपोषणे । तो सत्वगुण ॥ १७ ॥
कार्तिकस्‍नाने, माघसस्‍नाने, निरनिराळी व्रते, त्यांची उद्यापने, दाने, निष्काम तीर्थयात्रा व उपोषणे असतील, तेथे सत्त्वगुण जाणावा. (१७)

सहस्रभोजनें लक्षभोजनें । विविध प्रकारींचीं दानें ।
निःकाम करी सत्वगुणें । कामना रजोगुण ॥ १८ ॥
सहस्रभोजने, लक्षभोजने, विविध प्रकारची दाने इत्यादी जेथे निष्काम बुद्धीने घडते, तो सत्त्वगुण होय. सकामता ही रजोगुणामुळे उत्पन्न होते. (१८)

तीर्थीं अर्पी जो अग्रारें । बांधे वापी सरोवरें ।
बांधे देवाळयें सिखरें । तो सत्वगुण ॥ १९ ॥
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अग्रहार देणे, सरोवरे, विहिरी बांधणे, देवळे व देवळांची शिखरे बांधणे हा सत्त्वगुण होय. (१९)

देवद्वारीं पडशाळा । पाईरीया दीपमाळा ।
वृंदावनें पार पिंपळा- । बांधे, तो सत्वगुण ॥ २० ॥
देवद्वारी धर्मशाळा बांधणे, पायऱ्या व दीपमाळा बांधणे, तुळशी वृंदावने किंवा पिंपळाला पार बांधणे हा सत्त्वगुणच आहे. (२०)

लावीं वनें उपवनें । पुष्पवाटिका जीवनें ।
निववी तापस्यांचीं मनें । तो सत्वगुण ॥ २१ ॥
वने, उपवने, पुष्पवाटिका निर्माण करून त्यांना पाणी देणे, तपस्वी लोकांना संतोष होईल अशी त्यांची सेवा करणे, हे सत्त्वगुणाचे कार्य आहे. (२१)

संध्यामठ आणि भुयेरीं । पाईरीया नदीतीरीं ।
भांडारगृहें देवद्वारीं । बांधें, तो सत्वगुण ॥ २२ ।
संध्यामठ व ध्यानासाठी गुहा बांधणे, नदीतीरी घाट बांधणे अथवा देवद्वारी भांडारगृह बांधणे हे असेल तेथे सत्त्वगुण जाणावा. (२२)

नाना देवांचीं जे स्थानें । तेथें नंदादीप घालणें ।
वाहे आळंकार भूषणें । तो सत्वगुण ॥ २३ ॥
निरनिराळ्या देवस्थानांच्या ठिकाणी नंदादीपाची व्यवस्था करणे, देवाला अलंकार भूषणे अर्पण करणे, हा सत्त्वगुण होय. (२३)

जेंगट मृदांग टाळ । दमामे नगारे काहळ ।
नाना वाद्यांचे कल्लोळ । सुस्वरादिक ॥ २४ ॥
झेंगट, मृदुंग, टाळ दमामा, नगारे ,काहळ वगैरे सुस्वर वाद्यादिकांचा कल्लोळ जेथे असेल तो सत्त्वगुण होय. (२४)

नाना समग्री सुंदर । देवाळईं घाली नर ।
हरिभजनीं जो तत्पर । तो सत्वगुण ॥ २५ ॥
अनेक प्रकारची सुंदर सामग्री जो देवालयाला अर्पण करतो, आणि जो हरिभजनी तत्पर असतो, तो सत्त्वगुण होय. (२५)

छेत्रें आणी सुखासनें । दिंड्या पताका निशाणें ।
वाहे चामरें सूर्यापानें । तो सत्वगुण ॥ २६ ॥
छत्रे, पालख्या, दिंड्या, पताका, ध्वज (निशाणे), चामर अबदागिरी वगैरे जो देवास वाहतो, तो सत्त्वगुण होय. (२६)

वृंदावनें तुळसीवने । रंगमाळा संमार्जनें ।
ऐसी प्रीति घेतली मनें । तो सत्वगुण ॥ २७ ॥
वृंदावने, तुळसीवने, सडासंमार्जन, रांगोळ्या यांची अंतःकरणात आवड उत्पन्न होते, तो सत्त्वगुण होय. (२७)

सुंदरें नाना उपकर्णें । मंडप चांदवे आसनें ।
देवाळईं समर्पणें । तो सत्वगुण ॥ २८ ॥
नाना सुंदर उपकरणी, मंडप, चांदवे, आसने देवालयाला समर्पण करणे हा सत्त्वगुणच आहे. (२८)

देवाकारणें खाद्य । नाना प्रकारीं नैवेद्य ।
अपूर्व फळें अर्पी सद्य । तो सत्वगुण ॥ २९ ॥
देवासाठी नाना प्रकारचे खाद्यपदार्थ, नाना प्रकारचे नैवेद्य, उत्तमोत्तम फळे जो अर्पण करतो, तो सत्त्वगुण होय. (२९)

ऐसी भक्तीची आवडी । नीच दास्यत्वाची गोडी ।
स्वयें देवद्वार झाडी । तो सत्वगुण ॥ ३० ॥
अशी भक्तीची अत्यंत आवड जेथे असते, देवाचे हलक्यातील हलके काम करण्यातही जिथे गोडी वाटते व स्वतः देवद्वार झाडतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३०)

तिथी पर्व मोहोत्साव । तेथें ज्याचा अंतर्भाव ।
काया वाचा मनें सर्व- । अर्पी, तो सत्वगुण ॥ ३१ ॥
निरनिराळ्या तिथींना, पर्वकाळी व महोत्सवात जो सहभागी होतो व काया-वाचा-मनाने जो सर्व ईश्वरास अर्पण करतो, तो सत्त्वगुणच होय. (३१)

हरिकथेसी तत्पर । गंधें माळा आणी धुशर ।
घे‍ऊन उभीं निरंतर । तो सत्वगुण ॥ ३२ ॥
जे लोक हरिकथेस तत्पर असतात व गंध, माळ बुक्का इत्यादी घेऊन देवद्वारी उभे असतात, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३२)

नर अथवा नारी । येथानुशक्ति सामग्री ।
घे‍ऊन उभीं देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३३ ॥
स्त्रिया अथवा पुरुष शक्तीस अनुसरून देवपूजेची सामग्री घेऊन प्रेमाने देवद्वारी उभी असतात, तो सत्त्वगुणच होय. (३३)

महत्कृत्य सांडून मागें । देवास ये लागवेगें ।
भक्ति निकट आंतरंगें । तो सत्वगुण ॥ ३४ ॥
जो महत्त्वाचे काम मागे सारून तत्काळ देवाकडे धाव घेतो व ज्याच्या अंतरंगात परमेश्वराविषयी जवळीक असून भक्तिभाव असतो, तेथे सत्त्वगुण जाणावा. (३४)

थोरपण सांडून दुरी । नीच कृत्य आंगीकारी ।
तिष्ठत उभा देवद्वारीं । तो सत्वगुण ॥ ३५ ॥
जो अभिमान सोडून देऊन हलक्यात हलकी सेवाही स्वीकारतो व सदा देवद्वारात तिष्ठत उभा असतो तो सत्त्वगुण होय. (३५)

देवालागीं उपोषण । वर्जी तांबोल भोजन ।
नित्य नेम जप ध्यान- । करी, तो सत्वगुण ॥ ३६ ॥
जो भगवंताच्या कृपेसाठी उपोषण करतो व भोजन, तांबूल इत्यादी भोगसामग्रीचा त्याग करून नित्यनेमाने जपध्यानादी करतो, तो सत्त्वगुणच असतो. (३६)

शब्द कठीण न बोले । अतिनेमेसी चाले ।
योगू जेणें तोषविले । तो सत्वगुण ॥ ३७ ॥
जो कधीही कठोर शब्द बोलत नाही, अत्यंत नेमाने वागतो व जो योगी लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३७)

सांडूनिया अभिमान । निःकाम करी कीर्तन ।
श्वेद रोमांच स्फुराण । तो सत्वगुण ॥ ३८ ॥
जो अभिमान सोडून निष्काम भावनेने कीर्तन करतो व त्या प्रसंगी स्वेद, रोमांच, स्फुरण इत्यादी अष्ट सात्त्विकभाव जेथे प्रगट होतात, तो सत्त्वगुण होय. (३८)

अंतरीं देवाचें ध्यान । तेणें निडारले नयन ।
पडे देहाचें विस्मरण । तो सत्वगुण ॥ ३९ ॥
ज्याच्या अंतरी सदा देवाचे ध्यान लागलेले असते व भक्तिभावामुळे ज्याचे डोळे पाण्याने भरून येतात व जो देहाचे भानही विसरतो, तो सत्त्वगुणच जाणावा. (३९)

हरिकथेची अति प्रीति । सर्वथा नये विकृती ।
आदिक प्रेमा आदि‍अंतीं । तो सत्वगुण ॥ ४० ॥
ज्यास हरिकथेची अत्यंत प्रीती असते व कधी चुकूनही कंटाळा येत नाही, उलट सुरुवातीस व शेवटीही अधिकच प्रेम दिसून येते, तो सत्त्वगुणच असतो. (४०)

मुखीं नाम हातीं टाळी । नाचत बोले ब्रीदावळी ।
घे‍ऊन लावी पायधुळी । तो सत्वगुण ॥ ४१ ॥
जो मुखाने भगवंताचे नाव उच्चारत, हाताने टाळ्या वाजवत, आनंदाने नाचत नाचत भगवंताचे गुणानुवाद व ब्रीदावळी गातो, तसेच भगवद्‌भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी धारण करतो, तो सत्त्वगुण होय. (४१)

देहाभिमान गळे । विषईं वैराग्य प्रबळे ।
मिथ्या माया ऐसें कळे । तो सत्वगुण ॥ ४२ ॥
ज्यायोगे देहाभिमान नष्ट होतो, विषयासंबंधी वैराग्य वाढू लागते आणि माया मिथ्या हे कळू लागते, तो सत्त्वगुण जाणावा. (४२)

कांहीं करावा उपाये । संसारीं गुंतोन काये ।
उकलवी ऐसें हृदये । तो सत्वगुण ॥ ४३ ॥
या भवसागरातून तरून जाण्याचा काही तरी उपाय करावा, या संसारात गुंतून काय होणार आहे, असे अंतरंगात तीव्रपणे जेव्हां वाटू लागते, तेव्हां तो सत्त्वगुण समजावा. (४३)

संसारासी त्रासे मन । कांहीं करावें भजन ।
ऐसें मनीं उठे ज्ञान । तो सत्वगुण ॥ ४४ ॥
प्रपंचाच्या योगे मन त्रासून जाते व काहीतरी भगवद्‌भजन करावे असे ज्ञान अंतःकरणात स्फुरण पावू लागते, तो सत्त्वगुण. (४४)

असतां आपुले आश्रमीं । अत्यादरें नित्यनेमी ।
सदा प्रीती लागे रामीं । तो सत्वगुण ॥ ४५ ॥
आपापल्या आश्रमात असता जो अत्यंत आदराने नित्यनेम पाळतो व ज्याचे चित्त अत्यंत प्रेमाने सदा भगवंताचे चरणी जडलेले असते, तो सत्त्वगुण जाणावा. (४५)

सकळांचा आला वीट । परमार्थीं जो निकट ।
आघातीं उपजे धारिष्ट । तो सत्वगुण ॥ ४६ ॥
ज्याला प्रपंचाचा अत्यंत वीट येतो व जो सदा परमार्थाच्या निकट असतो व संकटकाळी जो धैर्य धारण करतो, तो सत्त्वगुण. (४६)

सर्वकाळ उदासीन । नाना भोगीं विटे मन ।
आठवे भगवद्भसजन । तो सत्वगुण ॥ ४७ ॥
जो सदासर्वकाळ विषयभोगाविषयी उदासीन असतो, विविध भोगांविषयी ज्याचे मन विटलेले असते व ज्यास भगवद्‌भजनच सर्वकाळ आठवते, तो सत्त्वगुण जाणावा. (४७)

पदार्थीं न बैसे चित्त । मनीं आठवे भगवंत ।
ऐसा दृढ भावार्थ । तो सत्वगुण ॥ ४८ ॥
ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूवर आसक्त होत नाही, मनात जो अखंड भगवंताचे स्मरण करीत असतो, असा ज्याचा भक्तिभाव दृढ असतो, तो सत्त्वगुण होय. (४८)

लोक बोलती विकारी । तरी आदिक प्रेमा धरी ।
निश्चय बाणे अंतरीं । तो सत्वगुण ॥ ४९ ॥
त्याचे भगवत्‌प्रेम पाहून लोक त्याला वेडा समजतात पण त्याचे भगवत्‌प्रेम अधिकाधिक वाढतच असते. भगवद्‌भक्तीचा निश्चय ज्याच्या अंतरी दृढ ठसलेला असतो, तो सत्त्वगुण जाणावा. (४९)

अंतरीं स्फूर्ती स्फुरे । सस्वरूपीं तर्क भरे ।
नष्ट संदेह निवारे । तो सत्वगुण ॥ ५० ॥
ज्या वेळी अंतर्यामी स्फूर्तीचे स्फुरण होऊ लागते, स्वस्वरूपासंबंधीच्या विचारांनी मन भरून जाते व वाईट संशय आपोआप नाहीसे होऊ लागतात, तो सत्त्वगुण होय. (५०)

शरीर लावावें कारणीं । साक्षेप उठे अंतःकर्णी ।
सत्वगुणाची करणी । ऐसी असे ॥ ५१ ॥
हे मनुष्यशरीर कारणी लावावे असा प्रयत्न करण्याविषयी जेव्हा मनाचा दृढ निश्चय होतो, तेव्हा तो सत्त्वगुण जाणावा. (५१)

शांति क्ष्मा आणि दया । निश्चय उपजे जया ।
सत्वगुण जाणावा तया । अंतरीं आला ॥ ५२ ॥
ज्याच्या अंतःकरणात शांती, क्षमा, दया असतात व भगवद्‌भक्तीसंबंधी दृढ निश्चय झालेला असतो, त्याच्या अंतःकरणात सत्त्वगुण येऊन राहिला आहे असे जाणावे. (५२)

आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त ।
येथानुशक्ती दान देन । तो सत्वगुण ॥ ५३ ॥
अतिथि-अभ्यागत आले असता जो त्यांना विमुख, भुकेले धाडीत नाही व जो यथाशक्ती दान देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (५३)

तडितापडी दैन्यवाणें । आलें आश्रमाचेनि गुणें ।
तयालागीं स्थळ देणें । तो सत्वगुण ॥ ५४ ॥
तपस्वी, बैरागी अथवा कुणी दुःखी दैन्यवाणा आश्रयास आला असता गृहस्थाश्रमाचे कर्तव्य जाणून जो त्यांना राहाण्यास जागा देतो, तो सत्त्वगुण होय. (५४)

आश्रमीं अन्नची आपदा । परी विमुख नव्हे कदा ।
शक्तिनुसार दे सर्वदा । तो सत्वगुण ॥ ५५ ॥
आपल्या घरात पुरेसे अन्‍न नसले तरी जो कुणाला विमुख पाठवीत नाही आणि नेहमी आपल्या शक्तीनुसार देत असतो, तो सत्त्वगुण. (५५)

जेणें जिंकिली रसना । तृप्त जयाची वासना ।
जयास नाहीं कामना । तो सत्वगुण ॥ ५६ ॥
ज्याने जिव्हेवर विजय मिळविलेला असतो, ज्याच्या वासना तृप्त झालेल्या असतात व मनात कोणतीही कामना नसते, तो सत्त्वगुण होय. (५६)

होणार तैसें होत जात । प्रपंचीं जाला आघात ।
डळमळिना ज्याचें चित्त । तो सत्वगुण ॥ ५७ ॥
जे होणार ते होतच असते हे जाणून प्रपंचात एखादा मोठा आघात झाला तरी ज्याचे चित्त डळमळत नाही, तेथे सत्त्वगुण जाणावा. (५७)

येका भगवंताकारणें । सर्व सुख सोडिलें जेणें ।
केलें देहाचें सांडणें । तो सत्वगुण ॥ ५८ ॥
केवळ एका भगवंताकरिताच ज्याने सर्व सुखांचा त्याग केलेला असतो, एवढेच नव्हे, तर आपला देहही भगवत्‌चरणी समर्पण केलेला असतो, तो सत्त्वगुण. (५८)

विषईं धांवे वासना । परी तो कदा डळमळिना ।
ज्याचें धारिष्ट चळेना । तो सत्वगुण ॥ ५९ ॥
मनात विषयवासना आली तरी जो कधी डळमळत नाही व ज्याचे मनोधैर्य कधी ढळत नाही, तो सत्त्वगुण समजावा. (५९)

देह आपदेनें पीडला । क्षुधे तृषेनें वोसावला ।
तरी निश्चयो राहिला । तो सत्वगुण ॥ ६० ॥
शरीर दारिद्र्याने अथवा रोगाने पीडलेले असले, तहानभुकेने व्याकूळ झालेले असले, तरी ज्याचा परमार्थाचा निश्चय टिकून राहातो तो सत्त्वगुण होय. (६०)

श्रवण आणी मनन । निजध्यासें समाधान ।
शुद्ध जालें आत्मज्ञान । तो सत्वगुण ॥ ६१ ॥
जो श्रवण, मनन, निदिध्यास जाणीवपूर्वक सातत्याने करतो त्यास शुद्ध आत्मज्ञान होऊन समाधान लाभते. हे सर्व सत्त्वगुणाचे कार्य होय (६१)

जयास अहंकार नसे । नैराशता विलसे ।
जयापासीं कृपा वसे । तो सत्वगुण ॥ ६२ ॥
ज्याच्या ठिकाणी अहंकार मुळीच नसतो, अनासक्ती सदा विलसत असते व जो अत्यंत कृपाळू असतो, तो सत्त्वगुण होय. (६२)

सकळांसीं नम्र बोले । मर्यादा धरून चाले ।
सर्व जन तोषविले । तो सत्वगुण ॥ ६३ ॥
जो सर्वांशी नम्रपणे बोलतो, ज्याचे वागणे मर्यादशील असते व जो सर्व लोकांना संतोष देतो, तो सत्त्वगुण जाणावा. (६३)

सकळ जनासीं आर्जव । नाहीं विरोधास ठाव ।
परोपकारीं वेची जीव । तो सत्वगुण ॥ ६४ ॥
जो सर्व लोकांशी अत्यंत सरळपणे व प्रेमाने वागतो, त्यामुळे विरोधास जागाच उरत नाही व जो परोपकारासाठी आपले सर्व आयुष्य खर्ची घालतो, तो सत्त्वगुण समजावा. (६४)

आपकार्याहून जीवीं । परकार्यसिद्धी करावी ।
मरोन कीर्ती उरवावी । तो सत्वगुण ॥ ६५ ॥
जो स्वतःच्या कार्याहून लोकांचे कार्य सिद्धीस जावे म्हणून प्रयत्नशील असतो, मेल्यावरही कीर्तिरूपाने जो अमर होतो, तो सत्त्वगुण होय. (६५)

पराव्याचे दोषगुण । दृष्टीस देखे आपण ।
समुद्राऐसी साठवण । तो सत्वगुण ॥ ६६ ॥
दुसऱ्याचे दोष, गुण दिसले तरी जो त्यांची चर्चा न करता ते समुद्राप्रमाणे आपल्या अंतःकरणात साठवून ठेवतो, जगात प्रगट करीत नाही, तो सत्त्वगुण जाणावा. (६६)

नीच उत्तर साहाणें । प्रत्योत्तर न देणें ।
आला क्रोध सावरणें । तो सत्वगुण ॥ ६७ ॥
कोणी टाकून बोलले तरी जो सहन करतो व जशास तसे प्रत्युत्तर देत नाही, कधी चुकून राग आला तरी जो आवरून धरतो, तो सत्त्वगुण होय. (६७)

अन्यायेंवीण गांजिती । नानापरी पीडा करिती ।
तितुकेंहि साठवी चित्तीं । तो सत्वगुण ॥ ६८ ॥
जरी कुणी काहीही कारण नसताना अन्यायाने छळत असून, नाना प्रकारे पीडा देत असतील तर त्यांचे ते अपराधही जो मोठ्या मनाने चित्तात साठवतो, (त्याच्यासंबंधी विरुद्ध भावना ज्याच्या मनातही येत नाही,) तो सत्त्वगुण समजावा. (६८)

शरीरें घीस साहाणें । दुर्जनासीं मिळोन जाणें ।
निंदकास उपकार करणें । हा सत्वगुण ॥ ६९ ॥
देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशीही मिळून मिसळून वागतो व निंदा करणाऱ्यावरही जो उपकारच करतो, तो सत्त्वगुण असतो. (६९)

मन भलतीकडे धावें । तें विवेकें आवराअवें ।
इंद्रियें दमन करावें । तो सत्वगुण ॥ ७० ॥
मन भलतीकडे धावू लागले तरी जो विवेकाने त्यास आवरतो व इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवतो, तो सत्त्वगुण होय. (७०)

सत्क्रिया आचरावी । असत्क्रिया त्यागावी ।
वाट भक्तीची धरावी । तो सत्वगुण ॥ ७१ ॥
सत्कर्मेच करावी, दुष्कर्मांचा त्याग करावा आणि भक्तिमार्गाचेच अनुसरण करावे असे वाटणे, हा सत्त्वगुण. (७१)

जया आवडे प्रातःस्नान । आवडे पुराणश्रवण ।
नाना मंत्रीं देवतार्चन- । करी, तो सत्वगुण ॥ ७२ ॥
ज्याला प्रातःस्‍नान करणे आवडते, पुराणश्रवणात व नाना मंत्रांनी देवतार्चन करण्यात ज्याला गोडी वाटते, तो सत्त्वगुण होय. (७२)

पर्वकाळीं अतिसादर । वसंतपूजेस तत्पर ।
जयंत्यांची प्रीती थोर । तो सत्वगुण ॥ ७३ ॥
ज्याला पर्वकाळबद्दल फार आदर असतो, जो वसंतपूजा करण्याविषयी तत्पर असतो व देवतांच्या जयंत्यादी उत्सव करण्याची ज्याला गोडी असते, तो सत्त्वगुण. (७३)

विदेसिं मेलें मरणें । तयास संस्कार देणें ।
अथवा सादर होणें । तो सत्वगुण ॥ ७४ ॥
कुणी परदेशी माणूस बेवारसाप्रमाणे मेला, तर त्याचा अंत्यसंस्कार करणे किंवा त्यास हजर राहणे, हे सत्त्वगुणाचे कार्य होय. (७४)

कोणी येकास मारी । तयास जाऊन वारी ।
जीव बंधनमुक्त करी । तो सत्वगुण ॥ ७५ ॥
कोणी कुणास मारत असेल तर मध्ये पडून त्याचे निवारण जो करतो किंवा बंधनात पडलेल्या लोकांना जो सोडवतो, तो सत्त्वगुण होय. (७५)

लिंगें लाहोलीं अभिशेष । नामस्मरणीं विश्वास ।
देवदर्शनीं अवकाश । तो सत्वगुण ॥ ७६ ॥
लिंगार्चन करणे, पत्रपुष्पांची लाखोली वाहाणे, नामस्मरणावर दृढ विश्वास असणे आणि देवदर्शनासाठी वेळ काढणे, हा सत्त्वगुण होय. (७६)

संत देखोनि धावें । परम सुख हेलावे ।
नमस्कारी सर्वभावें । तो सत्वगुण ॥ ७७ ॥
संतांना पाहून जो त्यांचे दर्शनासाठी धांव घेतो व त्यांच्या दर्शनाने परमसुखाने ज्याचे अंतःकरण उचंबळून येते आणि भावभक्तीने जो त्यांना साष्टांग दंडवत घालतो, तो सत्त्वगुण जाणावा. (७७)

संतकृपा होय जयास । तेणें उद्धरिला वंश ।
तो ईश्वराचा अंश । सत्वगुणें ॥ ७८ ॥
संतांची कृपा ज्याच्यावर होते, त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्त्वगुणामुळेच त्याच्या ठिकाणीचा ईश्वरांश प्रगट होतो. (७८)

सन्मार्ग दाखवी जना । जो लावी हरिभजना ।
ज्ञान सिकवी अज्ञाना । तो सत्वगुण ॥ ७९ ॥
जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवद्‌भक्तीच्या मार्गास लावतो व अज्ञानी लोकांना जो ज्ञानाचा उपदेश देतो, तो सत्त्वगुण समजावा. (७९)

आवडे पुण्य संस्कार । प्रदक्षणा नमस्कार ।
जया राहे पाठांतर । तो सत्वगुण ॥ ८० ॥
ज्यास पुण्य, संस्कार आवडतात, देवास प्रदक्षिणा, नमस्कार करणे आवडते व ज्याचे पाठांतर उत्तम असते, तो सत्त्वगुण होय. (८०)

भक्तीचा हव्यास भारी । ग्रंथसामग्री जो करी ।
धातुमूर्ति नानापरी । पूजी, तो सत्वगुण ॥ ८१ ॥
ज्याला भक्तीचा अंतःकरणपूर्वक हव्यास असतो. जो ग्रंथ जवळ बाळगतो व धातुमूर्तीचीही नानाप्रकारे पूजा करतो, तो सत्त्वगुण असतो. (८१)

झळफळित उपकर्णें । माळा गवाळी आसनें ।
पवित्रे सोज्वळें वसनें । तो सत्वगुण ॥ ८२ ॥
देवपूजेची स्वच्छ चकचकीत उपकरणे, जपमाळ, उपासनामूर्ती ठेवण्याचे साहित्य, आसने, गोमुखी व पवित्र व स्वच्छ, सोज्वळ वस्त्रे हे सर्व ज्यास आवडते तो सत्त्वगुण होय. (८२)

परपीडेचें वाहे दुःख । परसंतोषाचें सुख ।
वैराग्य देखोन हरिख- । मानी, तो सत्वगुण ॥ ८३ ॥
जो लोकांचे दुःख, पीडा, कष्ट पाहून दुःखी होतो, लोकांचा संतोष पाहून ज्यास सुख होते आणि वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो, तो सत्त्वगुण असतो. (८३)

परभूषणें भूषण । परदूषणें दूषण ।
परदुःखें सिणे जाण । तो सत्वगुण ॥ ८४ ॥
जो लोकांचे भूषण ते आपले भूषण मानतो, लोकांचे दूषण ते आपले दूषण समजतो, परदुःखाने जो कष्टी होतो, तो सत्त्वगुण जाणावा. (८४)

आतां असों हें बहुत । देवीं धर्मीं ज्याचें चित्त ।
भजे कामनारहित । तो सत्वगुण ॥ ८५ ॥
आता हे वर्णन पुरे झाले, थोडक्यात असे म्हणता येईल की, ज्याचे चित्त देवाधर्माचे ठिकाणी जडलेले असते आणि जो निष्काम भावनेने भगवद्‌भजन करतो तो सत्त्वगुण होय. (८५)

ऐसा हा सत्वगुण सात्विक । संसारसागरीं तारक ।
येणें उपजे विवेक । ज्ञानमार्गाचा ॥ ८६ ॥
असा हा सत्त्वगुण अत्यंत सात्त्विक असून तो संसारसागरातून तारून नेणारा आहे. त्याच्या योगानेच ज्ञानमार्गाचा विवेक उत्पन्न होतो. (८६)

सत्वगुणें भगवद्भ क्ती । सत्वगुणें ज्ञानप्राप्ती ।
सत्वगुणें सायोज्यमुक्ती । पाविजेते ॥ ८७ ॥
सत्त्वगुणानेच भगवद्‌भक्ती प्राप्त होते, सत्त्वगुणानेच ज्ञानप्राप्ती होऊन त्यानेच सायुज्यमुक्तीही मिळते. (८७)

ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥
याप्रमाणे सत्त्वगुणाची स्थिती येथे थोडक्यात यथामती वर्णन केली आहे. आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे काय सांगतो ते ऐकावे. (८८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सत्वगुणनाम समास सातवा ॥ ७ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सत्त्वगुणक्षणनाम' समास सातवा समाप्त

GO TOP

समास आठवा : सद्‌विद्यानिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका सद्विद्येचीं लक्षणें । परम शुद्ध सुलक्षणें ।
विचार घेतां बळेंचि बाणे । सद्विद्या आंगीं ॥ १ ॥
आता परम शुद्ध व अती उत्तम अशी सद्‌विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो, ती श्रोत्यांनी ऐकावी. त्यांच्यासंबंधी विचार केला असता आपोआपच ती अंगी बाणतात. (१)

सद्विद्येचा जो पुरुष । तो उत्तमलक्षणी विशेष ।
त्याचे गुण ऐकतां संतोष । परम वाटे ॥ २ ॥
जो सद्‌विद्यायुक्त पुरुष असतो, तो विशेष उत्तमगुणांनी युक्त असतो. त्याचे गुण ऐकूनसुद्धा परम संतोष वाटतो. (२)

भाविक सात्विक प्रेमळ । शांति क्ष्मा दयासीळ ।
लीन तत्पर केवळ । अमृतवचनी ॥ ३ ॥
तो भाविक, सात्त्विक, प्रेमळ, शांती, क्षमा व दया यांनी युक्त, लीन, कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुरवचने बोलणारा असतो. (३)

परम सुंदर आणी चतुर । परम सबळ आणी धीर ।
परम संपन्न आणी उदार । आतिशयेंसीं ॥ ४ ॥
तो परम सुंदर परम चतुर परम बलवान आणि परम धैर्यशील असून परमसंपन्न असून अत्यंत उदार असतो. (४)

परम ज्ञाता आणी भक्त । माहा पंडीत आणी विरक्त ।
माहा तपस्वी आणी शांत । आतिशयेंसीं ॥ ५ ॥
तो परम ज्ञानी, परम भक्त, महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो. (५)

वक्ता आणी नैराशता । सर्वज्ञ आणी सादरता ।
श्रेष्ठ आणी नम्रता । सर्वत्रांसी ॥ ६ ॥
तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो. सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असूनही अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो. (६)

राजा आणी धार्मिक । शूर आणी विवेक ।
तारुण्य आणी नेमक । आतिशयेंसीं ॥ ७ ॥
तो राजा असूनही धार्मिक असतो. शूर असूनही विवेकी असतो. तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो. (७)

वृधाचारी कुळाचारी । युक्ताहारी निर्विकारी ।
धन्वंतरी परोपकारी । पद्महस्ती ॥ ८ ॥
तो वडीलधाऱ्यांना मानणारा, कुळधर्म, कुळाचार पाळणार, युक्त आहार घेणारा व कुठल्याही विकाराच्या आधीन न होणार, वैद्यक विद्या जाणणारा, परोपकारी व ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे, असा असतो. (८)

कार्यकर्ता निराभिमानी । गायक आणी वैष्णव जनी ।
वैभव आणी भगवद्भभजनी । अत्यादरें ॥ ९ ॥
उत्तम कार्यकर्ता असून तो निरभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवद्‌भक्त असतो, वैभवसंपन्न असून अतिआदराने भगवद्‌भजन करणारा असतो. (९)

तत्वज्ञ आणी उदासीन । बहुश्रुत आणी सज्जन ।
मंत्री आणी सगुण । नीतिवंत ॥ १० ॥
तो तत्त्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो; बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही सद्‌गुणसंपन्न व नीतिमान असतो. (१०)

आधु पवित्र पुण्यसीळ । अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ ।
कर्मनिष्ठ स्वधर्में निर्मळ । निर्लोभ अनुतापी ॥ ११ ॥
तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू व धर्मात्मा असतो. स्वधर्मनिष्ठ निर्मळ कर्मनिष्ठ (निष्काम कर्मयोगी) व निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो. (११)

गोडी आवडी परमार्थप्रीती । सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती ।
श्रुति स्मृती लीळा युक्ति । स्तुती मती परीक्षा ॥ १२ ॥
त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते व प्रेमही असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्‌क्रिया करणारा उत्तम धारणाशक्ती असणारा व धैर्यशील असतो. श्रुती, स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते, भगवंताच्या लीलांविषयी त्यास प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती व वस्तूंची उत्तम पारख त्यास असते. (१२)

दक्ष धूर्त योग्य तार्किक । सत्यसाहित्य नेमक भेदक ।
कुशळ चपळ चमत्कारिक । नाना प्रकारें ॥ १३ ॥
तो नेहमी सावध असून वेळप्रसंग पाहून वागणारा, रीतीने व प्रमाणात तर्क जाणणारा, सत्‌साहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ व पारदर्शी, कुशल, चपळ व नाना प्रकारच्या उत्तम गुणांनी संपन्न असतो. (१३)

आदर सन्मान तार्तम्य जाणे । प्रयोगसमयो प्रसंग जाणे ।
कार्याकारण चिन्हें जाणे । विचक्षण बोलिका ॥ १४ ॥
कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा, यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशाप्रकारे वागायचे, हे वेळप्रसंग पाहून तो अचूक जाणतो, कार्यकारणसंबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. (१४)

सावध साक्षेपी साधक । आगम निगम शोधक ।
ज्ञानविज्ञान बोधक । निश्चयात्मक ॥ १५ ॥
तो सदा सावध, कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान व आत्मानुभव दोन्ही असल्याने दुसऱ्यास ज्ञानविज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. (१५)

पुरश्चरणी तीर्थवासी । धृढव्रती कायाक्लेसी ।
उपासक, निग्रहासी- । करूं जाणे ॥ १६ ॥
तो तीर्थक्षेत्रात वास करणारा व नाना मंत्रांची पुरश्चरणे करणार, दृढव्रती, शरीरकष्टाची तमा बाळगणारा व इंद्रियनिग्रह करून उपासना करणारा असतो. (१६)

सत्यवचनी शुभवचनी । कोमळवचनी येकवचनी ।
निश्चयवचनी सौख्यवचनी । सर्वकाळ ॥ १७ ॥
तो नेहमी सत्यभाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा व कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदासर्वकाळ तो निश्चयात्मक व दुसऱ्यास सौख्य होईल, असेच बोलतो. (१७)

वासनातृप्त सखोल योगी । भव्य सुप्रसन्न वीतरागी ।
सौम्य सात्विक शुद्धमार्गी । निःकपट निर्वेसनी ॥ १८ ॥
त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्त्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्यसंपन्न असूनही सौम्य व सात्त्विक असतो. तसेच निष्कपटी, निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. (१८)

सुगड संगीत गुणग्राही । अनापेक्षी लोकसंग्रही ।
आर्जव सख्य सर्वहि । प्राणीमात्रासी ॥ १९ ॥
तो चतुर असून संगीताचा उत्तम जाणकार व गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो व सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाने व सरलतेने वागणारा असतो. (१९)

द्रव्यसुची दारासुची । न्यायसुची अंतरसुची ।
प्रवृत्तिसुची निवृत्तिसुची । सर्वसुची निःसंगपणें ॥ २० ॥
द्रव्याचे, पति-पत्नी संबंधाचे, न्याय-अन्यायाचे, अंतःकरणाचे, तसेच प्रवृत्ती व निवृत्ती म्हणजे प्रपंच व परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निःसंग वृत्तीमुळे दिसून येते. (२०)

मित्रपणें परहितकारी । वाग्माधुर्य परशोकहारी ।
सामर्थ्यपणें वेत्रधारी । पुरूषार्थें जगमित्र ॥ २१ ॥
तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहिततत्पर असतो, मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो, सामर्थ्यसंपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुषसंपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. (२१)

संशयछेदक विशाळ वक्ता । सकळ क्लृप्त असोनी श्रोता ।
कथानिरूपणीं शब्दार्था । जाऊंच नेदी ॥ २२ ॥
सर्वसमावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो व म्हणून सर्व संशयांचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान व ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथानिरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. (२२)

वेवादरहित संवादी । संगरहित निरोपाधी ।
दुराशारहित अक्रोधी । निर्दोष निर्मत्सरी ॥ २३ ॥
वादविवाद टाळून संवाद करणे त्याला जमते. तो निःसंग वृत्तीचा असल्याने कुठलीही उपाधी आपल्यामागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही व कुणावर कधी क्रोधही करीत नाही. असा तो सदा निर्मत्सरी व निर्दोष असतो. (२३)

विमळज्ञानी निश्चयात्मक । समाधानी आणी भजक ।
सिद्ध असोनी साधक । साधन रक्षी ॥ २४ ॥
तो संदेहरहित विमलज्ञानाने युक्त असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. (२४)

सुखरूप संतोषरूप । आनंदरूप हास्यरूप ।
ऐक्यरूप आत्मरूप । सर्वत्रांसी ॥ २५ ॥
तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्याने त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख वा संतोषच त्याच्या रूपाने प्रगट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मितहास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. (२५)

भाग्यवंत जयवंत । रूपवंत गुणवंत ।
आचारवंत क्रियावंत । विचारवंत स्थिती ॥ २६ ॥
तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचारसंपन्न असून क्रियाशील व सुविचारी असतो. (२६)

येशवंत किर्तिवंत । शक्तिवंत सामर्थ्यवंत ।
वीर्यवंत वरदवंत । सत्यवंत सुकृती ॥ २७ ॥
तो यशवंत, कीर्तिवंत, शक्तिसंपन्न, सामर्थ्यवान, वीर्यवंत व ज्याचे आशीर्वाद सुफल होतात, असा सत्यवंत व पुण्यकर्मे करणाराही असतो. (२७)

विद्यावंत कळावंत । लक्ष्मीवंत लक्ष्णवंत ।
कुळवंत सुचिष्मंत । बळवंत दयाळु ॥ २८ ॥
तो विद्यावंत, कलावंत असतो. ऐश्वर्यसंपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असतो. कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो व बलशाली असूनही दयाळू असतो (२८)

युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ । बुद्धिवंत बहुधारिष्ट ।
दीक्षावंत सदासंतुष्ट । निस्पृह वीतरागी ॥ २९ ॥
तो युक्तिप्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ व बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरूकडून दीक्षा घेतलेली असते व तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते व तो अत्यंत वैराग्यसंपन्न असतो. (२९)

असो ऐसे उत्तम गुण । हें सद्विद्यचें लक्षण ।
अभ्यासाया निरूपण । अल्पमात्र बोलिलें ॥ ३० ॥
असो. याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत, ते सद्‌विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन केले आहे. (३०)

रूपलावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ ३१ ॥
रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. जे उपजत गुण असतात, त्यांत परिवर्तन घडवून आणता येत नाही. तेथे काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो, त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. (३१)

ऐसी सद्विद्या बरवी । सर्वत्रांपासी असावी ।
परी विरक्तपुरुषें अभ्यासवी । अगत्यरूप ॥ ३२ ॥
याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशीच असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. (३२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्विद्यानिरूपणनाम समास आठवा ॥ ८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'सद्‌विद्यानिरूपणनाम' समास आठवा समाप्त.

GO TOP

समास नववा : विरक्तलक्षण

॥ श्रीराम ॥

ऐका विरक्तांची लक्षणें । विरक्तें असावें कोण्या गुणें ।
जेणें आंगीं सामर्थ्य बाणें । योगियाचें ॥ १ ॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका. विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो. कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बाणते व योग सिद्धीस जातो. (१)

जेणें सत्कीर्ति वाढे । जेणें सार्थकता घडे ।
जेणेंकरितां महिमा चढे । विरक्तांसी ॥ २ ॥
विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्यजन्माचे सार्थक होते व वैराग्यसंपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते. (२)

जेणें परमार्थ फावे । जेणें आनंद हेलावे ।
जेणें विरक्ति दुणावे । विवेकेंसहित ॥ ३ ॥
या गुणामुळे स्वस्वरूपसाक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते. (३)

जेणें सुख उचंबळे । जेणें सद्विद्या वोळे ।
जेणें भाग्यश्री प्रबळे । मोक्षेंसहित ॥ ४ ॥
त्या गुणांनीच सुख उचंबळून येते, सद्‌विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते. (४)

मनोरथ पूर्ण होती । सकळ कामना पुरती ।
मुखीं राहे सरस्वती । मधुर बोलावया ॥ ५ ॥
सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जिभेवर येऊन राहते. (५)

हे लक्षणें श्रवण कीजे । आणी सदृढ जीवीं धरिजे ।
तरी मग विख्यात हो‍ईजे । भूमंडळीं ॥ ६ ॥
आता जी लक्षणे सांगतो, ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो. (६)

विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ।
विरक्तें धारिष्ट धरावें । दमनविषईं ॥ ७ ॥
विरक्त माणसाने विवेकाने वागावे. त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे. (७)

विरक्तें राखावें साधन । विरक्तें लावावें भजन ।
विरक्तें विशेष ब्रह्मज्ञान । प्रगटवावें ॥ ८ ॥
विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये. त्याने लोकांमध्ये भगवद्‌भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेषेकरून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे. (८)

विरक्तें भक्ती वाढवावी । विरक्ते शांती दाखवावी ।
विरक्तें येत्नें करावी । विरक्ती आपुली ॥ ९ ॥
विरक्ताने लोकांत भक्तिमार्गाचा प्रचार करावा, त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते, हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे. (९)

विरक्तें सद्क्रि या प्रतिष्ठावी । विरक्तें निवृत्ति विस्तारावी ।
विरक्तें नैराशता धरावी । सदृढ जिवेंसीं ॥ १० ॥
विरक्ताने सत्‌क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी. त्याने विरक्तीचा, अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निःसंगता दृढपणे हृदयी धारण करावी. (१०)

विरक्तें धर्मस्थापना करावी । विरक्तें नीति आवलंबावी ।
विरक्तें क्ष्मा सांभाळावी । अत्यादरेंसी ॥ ११ ॥
विरक्ताने धर्मस्थापना करावी. स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी. (११)

विरक्तें परमार्थ उजळावा । विरक्तें विचार शोधावा ।
विरक्तें सन्निध ठेवावा । सन्मार्ग सत्वगुण ॥ १२ ॥
विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे. त्याने नित्यानित्य-विवेक करावा व नेहमी सत्त्वगुणाचे रक्षण करून त्याच्या साह्याने सन्मार्गाचे आचरण करावे. (१२)

विरक्तें भाविकें सांभाळावीं । विरक्तें प्रेमळें निववावीं ।
विरक्तें साबडीं नुपेक्षावीं । शरणागतें ॥ १३ ॥
विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवद्‌भक्ताची अंतःकरणे निववावी आणि जे भोळेभाबडे लोक भगवंतास शरण आले असतील, त्यांची कधीही उपेक्षा करू नये. (१३)

विरक्तें असावें परम दक्ष । विरक्तें असावें अंतरसाक्ष ।
विरक्तें वोढावा कैपक्ष । परमार्थाचा ॥ १४ ॥
विरक्ताने नेहमी सावध असावे, दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न कमवा. (१४)

विरक्तें अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ।
विरक्तें वग्त्रृत्वें उभारावा । मोडला परमार्थ ॥ १५ ॥
विरक्ताने नेहमी शास्त्राभ्यास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा. त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता, आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे. (१५)

विरक्तें विमळज्ञान बोलावें । विरक्तें वैराग्य स्तवीत जावें ।
विरक्तें निश्चयाचें करावें । समाधान ॥ १६ ॥
विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना नि संदेह असे समाधान मिळवून द्यावे. (१६)

पर्वें करावीं अचाटें । चालवावी भक्तांची थाटे ।
नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग ॥ १७ ॥
विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे. त्यानिमित्ताने मोठ्या आदराने, थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावेत आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन, कीर्तन, प्रवचनादी उपासनामार्गांचे अवलंबन करावे. (१७)

हरिकीर्तनें करावीं । निरूपणें माजवावीं ।
भक्तिमार्गे लाजवावीं । निंदक दुर्जनें ॥ १८ ॥
त्याने हरिकीर्तने करावी. प्रवचने, निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्तिमार्गाचा आवेशाने प्रचार करावा की, त्यायोगे निंदक, दुर्जन यांना लाज वाटावी. (१८)

बहुतांस करावे परोपकार । भलेपणाचा जीर्णोद्धार ।
पुण्यमार्गाचा विस्तार । बळेंचि करावा ॥ १९ ॥
अनेकांवर परोपकार करावा, उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार प्रसार करावा. (१९)

स्नान संध्या जप ध्यान । तीर्थयात्रा भगवद्भोजन ।
नित्यनेम पवित्रपण । अंतरशुद्ध असावें ॥ २० ॥
स्‍नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवद्‌भजन, तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असतां अंतःकरणही अत्यंत शुद्ध असावे. (२०)

दृढ निश्चयो धरावा । संसार सुखाचा करावा ।
विश्वजन उद्धरावा । संसर्गमात्रें ॥ २१ ॥
विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल. (२१)

विरक्तें असावें धीर । विरक्तें असावें उदार ।
विरक्तें असावें तत्पर । निरूपणविषईं ॥ २२ ॥
विरक्ताने धीरगंभीर व अत्यंत उदार असावे. तसेच त्याने अध्यात्मनिरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे. (२२)

विरक्तें सावध असावें । विरक्तें शुद्ध मार्गें जावें ।
विरक्तें झिजोन उरवावें । सद्कीरर्तीसी ॥ २३ ॥
विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गानेच चालावे. लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्तिरूपाने अमर व्हावे. (२३)

विरक्तें विरक्त धुंडावे । विरक्तें साधु वोळखावे ।
विरक्तें मित्र करावे । संत योगी सज्जन ॥ २४ ॥
विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा, समाजातील साधुपुरुषांना ओळखून, संत, योगी, सजन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे. त्या सर्वांना आपलेसे करावे. (२४)

विरक्तें करावीं पुरश्चरणें । विरक्तें फिरावीं तीर्थाटणें ।
विरक्तें करावीं नानास्थानें । परम रमणीय ॥ २५ ॥
विरक्ताने स्वतः नाना पुरश्चरणे करावीत, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परम रमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावी. (२५)

विरक्तें उपाधी करावी । आणि उदासवृत्ति न संडावी ।
दुराशा जडो नेदावी । कोणयेकविषईं ॥ २६ ॥
विरक्ताने लोकसंग्रह करावा पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये. कशाविषयीही भलती आशा कधीही बाळगू नये. (२६)

विरक्तें असावें अंतरनिष्ठ । विरक्तें नसावें क्रियाभ्रष्ट ।
विरक्तें न व्हावें कनिष्ठ । पराधेनपणें ॥ २७ ॥
विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये. आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये. (२७)

विरक्तें समय जाणावा । विरक्तें प्रसंग वोळखावा ।
विरक्त चतुर असाअवा । सर्वप्रकारें ॥ २८ ॥
विरक्तास वेळप्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे. यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे. (२८)

विरक्तें येकदेसी नसावें । विरक्तें सर्व अभ्यासावें ।
विरक्तें अवघें जाणावें । ज्याचें त्यापरी ॥ २९ ॥
विरक्ताने एकांगी कधी असू नये. त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल, ते त्याने सर्व जाणून घ्यावे. (२९)

हरिकथा निरूपण । सगुणभजन ब्रह्मज्ञान ।
पिंडज्ञान तत्वज्ञान । सर्व जाणावें ॥ ३० ॥
त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत, वेदान्ताचे निरूपणही त्यास साध्य असावे. सगुणभजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण, सगुण भेद वगैरेसंबंधी सर्व त्यास ज्ञात असावे. (३०)

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
प्रवृत्तिमार्ग निवृत्तिमार्ग । सकळ जाणावें ॥ ३१ ॥
परमात्मप्राप्तीचा कर्ममार्ग, उपासनामार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धान्तमार्ग, प्रवृत्तिमार्ग, निवृत्तिमार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे. (३१)

प्रेमळ स्थिती उदास स्थिती । योगस्थिती ध्यानस्थिती ।
विदेह स्थिती सहज स्थिती । सकळ जाणावें ॥ ३२ ॥
भगवद्‌भक्ताची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदासस्थिती, योग्यांची योगस्थिती व ध्यानी लोकांची ध्यानस्थिती तसेच जीवमुक्ताची विदेहावस्था व सहजावस्था यांचे अचूक व स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे. (३२)

ध्वनी लक्ष मुद्रा आसनें । मंत्र यंत्र विधी विधानें ।
नाना मतांचें देखणें । पाहोन सांडावें ॥ ३३ ॥
याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधिविधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे. (३३)

विरक्तें असावें जगमित्र । विरक्तें असावें स्वतंत्र ।
विरक्तें असावें विचित्र । बहुगुणी ॥ ३४ ॥
विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी, तो जगन्मित्र असला, तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे. विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावेत. थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा. (३४)

विरक्तें असावें विरक्त । विरक्तें असावें हरिभक्त ।
विरक्तें असावें नित्यमुक्त । अलिप्तपणें ॥ ३५ ॥
विरक्ताने नेहमी वैराग्यसंपन्न असणे जरूर आहे. तो हरिभक्त असावा. तसेच जीवन्मुक्त असून निःसंग असावा. (३५)

विरक्तें शास्त्रें धांडोळावीं । विरक्तें मतें विभांडावीं ।
विरक्तें मुमुक्षें लावावीं । शुद्धमार्गें ॥ ३६ ॥
विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा, परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडण करावे आणि मुमुक्षूंना शुद्ध परमार्थमार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे. (३६)

विरक्तें शुद्धमार्ग सांगावा । विरक्तें संशय छेदावा ।
विरक्तें आपला म्हणावा । विश्वजन ॥ ३७ ॥
विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे, लोकांच्या मनातील शंका, संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे. (३७)

विरक्तें निंदक वंदावें । विरक्तें साधक बोधावे ।
विरक्तें बद्ध चेववावे- । मुमुक्षनिरूपणें ॥ ३८ ॥
विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे. जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करवा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्मनिरूपणाच्या योगे चेतवावे, स्वहिताचा विचार करण्यासाठी जागृत करावे. (३८)

विरक्तें उत्तम गुण घ्यावे । विरक्तें अवगुण त्यागावे ।
नाना अपाय भंगावे । विवेकबळें ॥ ३९ ॥
विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा. (३९)

ऐसीं हे उत्तम लक्षणें । ऐकावीं येकाग्र मनें ।
याचा अव्हेर न करणें । विरक्त पुरुषें ॥ ४० ॥
अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत, विरक्त पुरुषाने ती एकाग्र मनाने श्रवण करावीत, त्यांचा अव्हेर करू नये. (४०)

इतुकें बोलिलें स्वभावें । त्यांत मानेल तितुकें घ्यावें ।
श्रोतीं उदास न करावें । बहु बोलिलें म्हणौनी ॥ ४१ ॥
स्वाभाविकरीत्या मला जी पटली, ती मी येथे सहजपणे सांगितली आहेत, त्यांतील पटतील तितकी श्रोत्यांनी घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये. (४१)

परंतु लक्षणें ने घेतां । अवलक्षणें बाष्कळता ।
तेणें त्यास पढतमूर्खता । येवों पाहे ॥ ४२ ॥
परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो, त्याच्या ठिकाणी पढतमूर्खता मात्र येते. (४२)

त्या पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण ।
बोलिलें असे सावधान- । हो‍ऊन आ‍इका ॥ ४३ ॥
त्या पढतमूर्खांची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत. तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी. (४३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विरक्तलक्षणनाम समास नववा ॥ ९ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे 'विरक्तक्षणनाम' समास नववा समाप्त.

GO TOP

समास दहावा : पढतमूर्खलक्षण

॥ श्रीराम ॥

मागां सांगितलीं लक्षणें । मूर्खा‍आंगी चातुर्य बाणे ।
आतां ऐका शाहाणे- । असोनि, मूर्ख ॥ १ ॥
यापूर्वी ज्यायोगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात, त्यांची लक्षणे ऐका. (१)

तया नांव पढतमूर्ख । श्रोतीं न मनावें दुःख ।
अवगुण त्यागितां , सुख- । प्राप्त होये ॥ २ ॥
अशा लोकांना पढतमूर्ख म्हणतात. यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले, तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये. त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा, म्हणजे सुख लाभेल. (२)

बहुश्रुत आणि वित्पन्न । प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान ।
दुराशा आणि अभिमान । धरी, तो येक पढतमूर्ख ॥ ३ ॥
जो बहुश्रुत, थोर व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो, तो एक पढतमूर्खच जाणावा. (३)

मुक्तक्रिया प्रतिपादी । सगुणभक्ति उछेदी ।
स्वधर्म आणि साधन निंदी । तो येक पढतमूर्ख ॥ ४ ॥
जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडण करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो, तो पढतमूर्ख असतो. (४)

आपलेन ज्ञातेपणें । सकळांस शब्द ठेवणें ।
प्राणीमात्राचें पाहे उणें । तो येक पढतमूर्ख ॥ ५ ॥
जो स्वतःस फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणिमात्राचे ठिकाणी दोषच पाहतो, तोही पढतमूर्खच असतो. (५)

शिष्यास अवज्ञा घडे । कां तो संकटीं पडे ।
जयाचेनि शब्दें मन मोडे । तो येक पढतमूर्ख ॥ ६ ॥
जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्या मनाला दुःख होते, असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पढतमूर्खच असतो. (६)

रजोगुणी तमोगुणी । कपटी कुटिळ अंतःकर्णी ।
वैभव देखोन वाखाणी । तो येक पढतमूर्ख ॥ ७ ॥
जो रजोगुणी, तमोगुणी असतो, कपटी, कुटिल अंतःकरणाचा असतो आणि वैभवास भुलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो, तो पढतमूर्खच होय. (७)

समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८ ॥
जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहातो, तो पढतमूर्ख जाणावा. (८)

लक्षणें ऐकोन मानी वीट । मत्सरें करी खटपट ।
नीतिन्याय उद्धट । तो येक पढतमूर्ख ॥ ९ ॥
चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी, लटपटी करतो व ज्याला नीतिन्यायाची जराही चाड नसून जो उद्धट असतो, तोही पढतमूर्खच होय. (९)

जाणपणें भरीं भरे । आला क्रोध नावरे ।
क्रिया शब्दास अंतरे । तो येक पढतमूर्ख ॥ १० ॥
स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत, असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच, तो पढतमूर्ख असतो. (१०)

वक्ता अधिकारेंवीण । वग्त्रृत्वाचा करी सीण ।
वचन जयाचें कठीण । तो येक पढतमूर्ख ॥ ११ ॥
योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते, तो पढतमूर्ख जाणावा. (११)

श्रोता बहुश्रुतपणें । वक्तयास आणी उणें ।
वाचाळपणाचेनि गुणें । तो येक पढतमूर्ख ॥ १२ ॥
एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो, पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो, तो पढतमूर्खच समजावा. (१२)

दोष ठेवी पुढिलांसी । तेंचि स्वयें आपणापासीं ।
ऐसें कळेना जयासी । तो येक पढतमूर्ख ॥ १३ ॥
जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो; पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो, असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पढतमूर्खच असतो. (१३)

अभ्यासाचेनि गुणें । सकळ विद्या जाणे ।
जनास निवऊं नेणें । तो येक पढतमूर्ख ॥ १४ ॥
जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो, पण लोकांच्या अंतःकरणास सुख-समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही, तो पढतमूर्खच समजावा. (१४)

हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।
ऐसा जो प्रपंची गुंते । तो येक पढतमूर्ख ॥ १५ ॥
कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यांमुळे प्रपंचातच गुंतून पडतो, तो पढतमूर्खच होय. (१५)

स्त्रियंचा संग धरी । स्त्रियांसी निरूपण करी ।
निंद्य वस्तु आंगिकारी । तो येक पढतमूर्ख ॥ १६ ॥
जो स्त्रियांच्या संगतीत राहातो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो, तो पढतमूर्ख. (१६)

जेणें उणीव ये आंगासी । तेंचि दृढ धरी मानसीं ।
देहबुद्धि जयापासीं । तो येक पढतमूर्ख ॥ १७ ॥
ज्यायोगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते, तो पढतमूर्ख जाणावा. (१७)

सांडूनियां श्रीपती । जो करी नरस्तुती ।
कां दृष्टी पडिल्यांची कीर्ती- । वर्णी, तो येक पढतमूर्ख ॥ १८ ॥
लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुति करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो, तो पढतमूर्खच असतो. (१८)

वर्णी स्त्रियांचे आवेव । नाना नाटकें हावभाव ।
देवा विसरे जो मानव । तो येक पढतमूर्ख ॥ १९ ॥
जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके, हावभाव, नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पढतमूर्खच होय. (१९)

भरोन वैभवाचे भरीं । जीवमात्रास तुछ्य करी ।
पाषांडमत थावरी । तो येक पढतमूर्ख ॥ २० ॥
ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमेंडीने जो जीवमात्रास तुच्छ समजतो, तसेच शास्त्रविरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पढतमूर्खच असतो. (२०)

वित्पन्न आणी वीतरागी । ब्रह्मज्ञानी माहायोगी ।
भविष्य सांगों लागे जगीं । तो येक पढतमूर्ख ॥ २१ ॥
जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो; पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो, तोसुद्धा पढतमूर्खच जाणावा. (२१)

श्रवण होतां अभ्यांतरीं । गुणदोषाची चाळणा करी ।
परभूषणें मत्सरी । तो येक पढतमूर्ख ॥ २२ ॥
काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषांसंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो, तोही पढतमूर्खच असतो. (२२)

नाहीं भक्तीचें साधन । नाहीं वैराग्य ना भजन ।
क्रियेविण ब्रह्मज्ञान- । बोले, तो येक पढतमूर्ख ॥ २३ ॥
जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्यसंपन्न नसतो व काही भजन, पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो, तो पढतमूर्ख होय. (२३)

न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्रकुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥
जो तीर्थक्षेत्र, वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्रकुळी जन्मला असून ज्याचे आचरण अपवित्र असते, तो पढतमूर्ख समजावा. (२४)

आदर देखोनि मन धरी । कीर्तीविण स्तुती करी ।
सवेंचि निंदी अनादरी । तो येक पढतमूर्ख ॥ २५ ॥
जो आदर देतो, त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो, तो एक पढतमूर्खच असतो. (२५)

मागें येक पुढें येक । ऐसा जयाचा दंडक ।
बोले येक करी येक । तो येक पढतमूर्ख ॥ २६ ॥
माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते; जो बोलतो एक तर करतो दुसरेच, तो पढतमूर्खच समजावा. (२६)

प्रपंचविशीं सादर । परमार्थीं ज्याचा अनादर ।
जाणपणें घे अधार । तो येक पढतमूर्ख ॥ २७ ॥
जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो, तो पढतमूर्ख जाणावा. (२७)

येथार्थ सांडून वचन । जो रक्षून बोले मन ।
ज्याचें जिणें पराधेन । तो येक पढतमूर्ख ॥ २८ ॥
जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते, तोही पढतमूर्खच असतो. (२८)

सोंग संपाधी वरीवरी । करूं नये तेंचि करी ।
मार्ग चुकोन भरे भरीं । तो येक पढतमूर्ख ॥ २९ ॥
जो वर वर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो; पण (चोरून) जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने आडमार्गास लागतो, तो पढतमूर्खच होय. (२९)

रात्रंदिवस करी श्रवण । न संडी आपले अवगुण ।
स्वहित आपलें आपण । नेणे तो येक पढतमूर्ख ॥ ३० ॥
जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही, तो पढतमूर्ख असतो. (३०)

निरूपणीं भले भले । श्रोते ये‍ऊन बैसले ।
क्षुद्रें लक्षुनी बोले । तो येक पढतमूर्ख ॥ ३१ ॥
जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो, तो पढतमूर्खच जाणावा. (३१)

शिष्य जाला अनधिकारी । आपली अवज्ञा करी ।
पुन्हां त्याची आशा धरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३२ ॥
ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरूची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्या शिष्याची आशा धरतो, तो पढतमूर्खच असतो. (३२)

होत असतां श्रवण । देहास आलें उणेपण ।
क्रोधें करी चिणचिण । तो येक पढतमूर्ख ॥ ३३ ॥
श्रवण करीत असता जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला, उणीव भासू लागली, तर जो रागाने चिडचिड करतो, तो पढतमूर्खच होय. (३३)

भरोन वैभवाचे भरीं । सद्गु२रूची उपेक्षा करी ।
गुरुपरंपरा चोरी । तो येक पढतमूर्ख ॥ ३४ ॥
आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्‌गुरूची उपेक्षा करतो आणि गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३४)

ज्ञान बोलोन करी स्वार्थ । कृपणा ऐसा सांची अर्थ ।
अर्थासाठीं लावी परमार्थ । तो येक पढतमूर्ख ॥ ३५ ॥
ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूष माणसासारखा द्रव्यसंचय करतो, संपत्ती मिळविण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो, तो पढतमूर्ख समजावा. (३५)

वर्तल्यावीण सिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी ।
पराधेन गोसावी । तो येक पढतमूर्ख ॥ ३६ ॥
जो स्वत: तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो. वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्राज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असून पराधीन होऊन राहतो, तो पढतमूर्खच असतो. (३६)

भक्तिमार्ग अवघा मोडे । आपणामध्यें उपंढर पडे ।
ऐसिये कर्मीं पवाडे । तो येक पढतमूर्ख ॥ ३७ ॥
जी कर्मे केली असता भक्तिमार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते अशी कर्मे करण्यास जो मागेपुढे पाहात नाही, तो पढतमूर्ख जाणावा. (३७)

प्रपंच गेला हातीचा । लेश नाहीं परमार्थाचा ।
द्वेषी देवां ब्राह्मणाचा । तो येक पढतमूर्ख ॥ ३८ ॥
हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही, असा जो देवा-ब्राह्मणांचा द्वेष करतो, तो पढतमूर्ख होय. (३८)

त्यागावया अवगुण । बोलिलें पढतमूर्खाचें लक्षण ।
विचक्षणें नी‍उन पूर्ण । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ३९ ॥
लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पढतमूर्खाची लक्षणे वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. (३९)

परम मूर्खामाजी मूर्ख । जो संसारीं मानी सुख ।
या संसारदुःखा ऐसें दुःख । आणीक नाहीं ॥ ४० ॥
या संसारात जो सुख मानतो तो परम मूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसारदुखाएवढे दुःख आणखी कुठलेही नाही. (४०)

तेंचि पुढें निरूपण । जन्मदुःखाचें लक्षण ।
गर्भवास हा दारुण । पुढें निरोपिला ॥ ४१ ॥
येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे (४१)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पढतमूर्खलक्षणनाम समास दहावा ॥ १० ॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे 'पढतमूर्खलक्षणनिरूपणनाम' समास दहावा समाप्त दशक दुसरा समाप्त

॥ दशक दुसरा समाप्त ॥



GO TOP