|
ब्रह्मसूत्रअध्याय चवथापाद चवथासंबंध - तिसर्या पक्षात अर्चि आदि मार्गांद्वारा परब्रह्म आणि कार्यब्रह्म लोकात जाणार्यांच्या गतिविषयी निर्णय केला गेला. आता उपासकांच्या संकल्पानुसार ब्रह्मलोकात पोहोचल्यावर जो त्यांच्या स्थितीमध्ये भेद होतो, त्याचा निर्णय करण्यासाठी चौथ्या पादाचा आरंभ केला जात आहे. त्यात पहिल्याने त्या साधकाविषयी निर्णय करतात, ज्यांचे उद्देश्य परब्रह्माची प्राप्ति आहे आणि जे त्या परब्रह्माच्या अप्राकृत दिव्य परमधामात जातात. सम्पद्याविर्भावः स्वेन शब्दात् ॥ ४.४.१ ॥ अर्थ - सम्पद्य = परमधामास प्राप्त होऊन (या जीवाचा); स्वेन = आपल्या वास्तविक स्वरूपात; आविर्भावः = प्राकट्य होते; शब्दात् = कारण की, श्रुतिमध्ये असेच सांगितले गेले आहे. व्याख्या - ‘जो हा उपासक या शरीरापासून वर चढून परम ज्ञानस्वरूप परमधामास प्राप्त होतो तो (तेथे) आपल्या वास्तविक स्वरूपाने संपन्न होऊन जातो - हा आत्मा आहे - असे आचार्यांने म्हटले आहे - हा (त्यास प्राप्त होणारा) अमृत आहे; अभय आहे आणि हेच ब्रह्म आहे. निःसंदेह त्या या (प्राप्तव्य) परब्रह्माचे नाव सत्य आहे.’ (छां.उ. ८.३.४) या श्रुतिनेहि हेच सिद्ध होत आहे की, परमधामास प्राप्त होताच तो साधक आपल्या वास्तविक स्वरूपाने सम्पन्न होऊन जातो अर्थात प्राकृत सूक्ष्म शरीर रहित, श्रुतिमध्ये सांगितलेल्या पुण्य-पापशून्य, जन्म-मृत्यू आदि विकाररहित, सत्यकाम, सत्यसंकल्प, शुद्ध एवं अजर-अमर रूपाने युक्त होऊन जातो.’ (छां.उ.८.१.५) या प्रकरणात जे संकल्पानेच पितर आदिची उपस्थिति होण्याचे वर्णन आहे, ते ब्रह्मविद्येच्या माहात्म्याचे सूचक आहे. त्याचा भाव हा आहे की, जीवनकालातच हृदयाकाशाच्या आंत संकल्पाने पितृलोक आदिच्या सुखाचे अनुभव येतो, ब्रह्मलोकात गेल्यानंतर नाही; कारण की त्या प्रकरणाच्या वर्णनात ही गोष्ट स्पष्ट आहे. तेथे जीवनकालातच त्यांचे संकल्पाने उपस्थित होणे सांगितले आहे. (छां.उ. ८.२.१ पासून १०) यानंतर त्याच्यासाठी प्रतिदिन येथे हृदयातच परमानन्द प्राप्त होण्याची गोष्ट सांगितली आहे. (छां.उ. ८.३.३) त्यानंतर शरीर सोडून परमधामी जाण्याची गोष्ट सांगितली आहे. (छां.उ. ८.३.४) आणि त्याचे नाव सत्य अर्थात सत्यलोक सांगितले आहे. त्याच्यापूर्वी जे असे म्हटले आहे की, ‘जे येथे आत्म्यास तथा या सत्यकामांना जाणून परलोकात जातात, त्यांचे सर्व लोकात इच्छेनुसार गमन होते.’ (छां.उ. ८.१.६) हे वर्णन आत्मज्ञानाचा महिमा दाखविण्यासाठी आहे परंतु दुसर्या खंडाचे वर्णन तर स्पष्टच जीवनकालाचा आहे. उक्त प्रकरण दहर-विद्येचे आहे आणि ‘दहर’ येथे परब्रह्म परमेश्वराचा वाचक आहे, ही गोष्ट प्रथमच सिद्ध केली गेली आहे. (ब्र.सू. १.३.१४) म्हणून येथे असे म्हणू शकत नाही की, हे प्रकरण हिरण्यगर्भाची अथवा जीवात्म्याच्या आपल्या स्वरूपाच्या उपासनेचे आहे. संबंध - त्या परमधामात जो तो उपासक आपल्या वास्तविक रूपाने संपन्न होतो त्यात पहिल्यापेक्षा काय विशेषता आहे ? या जिज्ञासेवर सांगतात. मुक्तः प्रतिज्ञानात् ॥ ४.४.२ ॥ अर्थ - प्रतिज्ञानात् = प्रतिज्ञा केली गेल्याने हे सिद्ध होत आहे की; मुक्तः = (ते स्वरूप) सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त असते. व्याख्या - श्रुतिमध्ये ठिकठिकाणी ही प्रतिज्ञा केली गेली आहे की, ‘त्या परब्रह्म परमात्म्याच्या लोकाची प्राप्ती झाल्यानंतर हा साधक कायमचा सर्व प्रकारच्या बंधनातून सुटून जातो.’ (मु.उ.३.२.६) यावरून हे सिद्ध होत आहे की, आपल्या वास्तविक स्वरूपाने संपन्न झाल्यावर उपासक सर्व प्रकारच्या बंधनरहित, सर्वथा शुद्ध, दिव्य, विभु आणि विज्ञानमय होतो, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विकार राहत नाही. पूर्वकाली अनादि सिद्ध कर्मसंस्कारामुळे जे याचे स्वरूप कर्मानुसार प्राप्त शरीराच्या अनुरूप होत असे; (ब्र.सू. २.३.३०) परमधामात गेल्यानंतर तसे राहत नाही; हा सर्व बन्धनांतून मुक्त होऊन जातो. संबंध - हा कसा निश्चय होतो की त्यासमयी उपासक सर्व बन्धनातून मुक्त होऊन जातो ? यावर सांगतात. - आत्मा प्रकरणात् ॥ ४.४.३ ॥ अर्थ - प्रकरणात् = प्रकरणावरून (हे सिद्ध होत आहे की तो); आत्मा = शुद्ध आत्माच होऊन जातो. व्याख्या - त्या प्रकरणात जे वर्णन आहे त्यात स्पष्ट म्हटले आहे की, ‘ते ब्रह्मलोकास प्राप्त होणारे स्वरूप आत्मा आहे.’ (छां.उ. ८.३.४) म्हणून त्या प्रकरणावरून हेच सिद्ध होत आहे की, त्या समयी तो सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमात्म्यासमान परम दिव्य शुद्ध स्वरूपाने युक्त होतो. (गीता १४.२, मु.उ. ३.१.३) संबंध - आता ही जिज्ञासा होते की, ब्रह्मलोकात जाऊन त्या उपासकाची परमात्म्यापासून पृथक् स्थिति राहते अथवा तो त्यांच्यात मिळून जातो ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात. प्रथम क्रमशः तीन प्रकारची मते प्रस्तुत करतात. - अविभागेनैव दृष्टत्वात् ॥ ४.४.४ ॥ अर्थ - अविभागेन = (त्या मुक्तात्म्याची स्थिति त्या परब्रह्मात) अविभक्त रूपाने होते, दृष्टत्त्वात् = कारण की हीच गोष्ट श्रुतिमध्ये दिसून आली आहे. व्याख्या - श्रुतित म्हटले आहे की, ‘यथोदकं शुद्धे शुद्धमासिक्तं तादृगेव भवति । एवं मुनेर्विजानत आत्मा भवति गौतम ॥’ ‘हे गौतम ज्याप्रकारे शुद्ध जलात पडलेले शुद्ध जल तसेच होऊन जाते, त्याप्रकारे परमात्म्यास जाणणार्या मुनिचा आत्मा होऊन जातो.’ (क.उ.२.१.१५) ‘ज्याप्रकारे वाहणार्या नद्या नाम-रूपांना सोडून समुद्रात विलीन होऊन जातात, तसेच परमात्म्यास जाणणारे विद्वान नामरूपातून मुक्त होऊन परात्पर, दिव्य परब्रह्म परमात्म्यास प्राप्त होऊन जातात.’ (मु.उ. ३.२.८) श्रुतिच्या या वर्णनाने हे सिद्ध होत आहे की, मुक्तात्मा त्या परब्रह्म परमात्म्यात अविभक्त रूपानेच स्थित होतो. हा मंत्र सूत्र १.४.२१ च्या व्याख्येत अर्थासहित आलेला आहे. संबंध - या विषयात आचार्य जैमिनि यांचे मत सांगतात - ब्राह्मेण जैमिनिरपन्यासादिभ्यः ॥ ४.४.५ ॥ अर्थ - जैमिनिः = आचार्य जैमिनि म्हणतात; ब्राह्मेण = मुक्तात्मा ब्रह्म सदृश रूपात स्थित असतो; उपन्यासादिभ्यः = कारण श्रुतिंमध्ये त्याच्या स्वरूपाचे जे निरूपण केले आहे ते पाहता तसे श्रुतिप्रमाणानेही हेच सिद्ध होते. व्याख्या - आचार्य जैमिनिंचे म्हणणे आहे की श्रुतिमध्ये ’तो निर्मल असून परम समत्वभावाला प्राप्त होतो’ (मुं उप ३.१.३) असे वर्णन आढळते; तसेच वरील प्रकरणात त्याचे दिव्य रूपात परिणत होणे असे जे म्हटले आहे (छां ८.३.४); व गीतेत भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे ’ज्ञानी त्याच्या दिव्य गुणांमुळे समत्वभावाला प्राप्त झालेला महापुरुष सृष्टि उत्पत्तिच्या वा सृष्टि लयाच्या काळी व्यथित होत नाही’ (गीता १४.२); या प्रमाणांवरून हेच सिद्ध होते की तो मुक्तात्मा परमात्म सदृश दिव्य स्वरूपाने संपन्न होतो. संबंध - याच विषयात आचार्य औडुलोमिचे मत उपस्थित करतात. - चितितन्मात्रेण तदात्मकत्वादित्यौडुलोमिः ॥ ४.४.६ ॥ अर्थ - चितितन्मात्रेण = केवळ चेतनमात्र स्वरूपाने स्थित राहतो; तदात्मकत्वात् = कारण की त्याचे वास्तविक स्वरूप तसेच आहे; इति = असे, औडुलोमिः = आचार्य औडुलोमि सांगतात. - व्याख्या - परमधामात गेलेला मुक्तात्मा आपल्या वास्तविक चैतन्यमात्र स्वरूपाने स्थित राहतो, कारण की, श्रुतिमध्ये त्याचे तसेच स्वरूप सांगितले गेले आहे. बृहदारण्यकात म्हटले आहे की, ‘स यथा सैन्धवघनोऽनन्तरोऽबाह्यः कृत्स्नो रसघन एवैवं वा अरेऽयमात्मानन्तरोऽबाह्यः कृत्स्नः प्रज्ञानघन एव ।’ ज्याप्रकारे मीठाचा खडा बाह्य-अंतररहित सर्वच्या सर्व रसघन आहे तसाच हा आत्मा आंतून-बाहेरून भेदरहित सर्वच्या सर्व प्रज्ञानघनच आहे.’ (बृह.उ. ४.५.१३) म्हणून त्याचे आपल्या स्वरूपाने संपन्न होणे चैतन्य घनरूपात स्थित होणे आहे. संबंध - आता आचार्य बादरायण या विषयात आपला सिद्धांत प्रस्तुत करतात. - एवमप्युपन्यासात् पूर्वभावादविरोधं बादरायणः ॥ ४.४.७ ॥ अर्थ - एवम् = या प्रकाराने अर्थात औडुलोमि आणि जैमिनिच्या कथनानुसार; अपि = ही; उपन्यासात् = श्रुतिंमध्ये त्या मुक्तात्म्याच्या स्वरूपाचे निरूपण झाल्याने, तथा; पूर्वभावात् = पहिल्याने (चौथ्या सूत्रात) सांगितलेल्या भावानेही; अविरोधम् = सिद्धान्तात काही विरोध नाही आहे; बादरायणः (आह) = हे बादरायण सांगत आहेत. व्याख्या - आचार्य जैमिनिंच्या कथनानुसार मुक्तात्म्याचे स्वरूप परब्रह्म परमात्म्याच्या सदृश दिव्यगुणांनी सम्पन्न असते. ही गोष्ट श्रुति आणि स्मृतिंमध्ये सांगितली गेली आहे. तथा आचार्य औडुलोमि यांच्या कथनानुसार चेतनमात्र स्वरूपाने स्थित होण्याचे वर्णनही आढळते. याप्रकारे प्रथम (४.४.४) सूत्रात जसे सांगितले गेले आहे, त्यास अनुसरून परमेश्वरात अभिन्नरूपाने स्थित होण्याचेहि वर्णन मिळते. म्हणून हेच मानणे ठीक आहे की, त्या मुक्तात्म्याच्या भावानुसार त्याची तीन्ही प्रकाराने स्थिति होऊ शकते. यात काही विरोध नाही आहे. संबंध - येथपर्यंत परमधामाला जाणार्या उपासकाविषयी निर्णय केला गेला. आता जे उपासक प्रजापति ब्रह्मदेवाच्या लोकास प्राप्त होतात त्यांच्याविषयी निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. येथे प्रश्न असा पडतो की, त्या उपासकांना ब्रह्मलोकाच्या भोगांची प्राप्ति कशा प्रकारे होते ? यावर सांगतात. - सङ्कल्पादेव तु तच्छ्रुतेः ॥ ४.४.८ ॥ अर्थ - तु = त्या भोगांची प्रति तर; संकल्पात् = संकल्पाने; एव = च होते; तच्छ्रुतेः = कारण की श्रुतिमध्ये हीच गोष्ट सांगितली गेली आहे. व्याख्या - ‘हा आत्मा मनरूप दिव्य नेत्रांनी ब्रह्मलोकांतील समस्त भोगांना पाहून रमण करतो.’ (छां.उ.८.१२.५,६) ही गोष्ट श्रुतिमध्ये सांगितली गेली आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की, मनाच्या द्वारा केवळ संकल्पानेच उपासकास त्या लोकातील दिव्य भोगांचा अनुभव येतो. संबंध - युक्तिनेहि ही गोष्ट दृढ करतात. अत एव चानन्याधिपतिः ॥ ४.४.९ ॥ अर्थ - अत एव = म्हणून; च = तर; अनन्याधिपतिः = मुक्तात्म्यास ब्रह्म्याशिवाय अन्य स्वामी-रहित सांगितले गेले आहे. व्याख्या - ‘तो स्वाराज्यास प्राप्त होऊन जातो. मनाचे स्वामी हिरण्यगर्भास प्राप्त होऊन जातो, म्हणून तो स्वयं बुद्धि, मन, वाणी, नेत्र आणि श्रोत्र या सर्वांचा स्वामी होऊन जातो.’ (तै.उ. १.६) भाव हा आहे की, एक ब्रह्मदेवाशिवाय अन्य कोणाचेही त्याच्यावर आधिपत्य राहात नाही. म्हणून पूर्वसूत्रात सांगितले गेले आहे की, ‘तो मनद्वारा संकल्प मात्रानेच सर्व दिव्य भोगांना प्राप्त करून घेतो.’ संबंध - त्याला संकल्पमात्रे जे दिव्य भोग प्राप्त होतात, त्यांच्या उपभोगासाठी तो शरीरही धारण करतो कां नाही ? यावर आचार्य बादरिचे मत उपस्थित करतात. अभावं बदरिराह ह्येवम् ॥ ४.४.१० ॥ अर्थ - अभावम् = त्याचे शरीर नसते असे; बादरिः = आचार्य बादरि मानतात; हि = कारण की; एवम् = याप्रकारे; आह = श्रुति सांगते. व्याख्या - आचार्य बादरिचे म्हणणे आहे की, त्या लोकात स्थूल शरीराचा अभाव आहे; म्हणून विना शरीर केवळ मनानेच त्या भोगांना भोगतो; कारण की श्रुतिमध्ये याप्रकारे सांगितले आहे, ‘स वा एष एतेन दैवेन चक्षुषा मनसैतान् कामान् पश्यन् रमते । य एते ब्रह्मलोके ॥’ (छां.उ.८.१२.५-६) निश्चयच तो हा आत्मा या दिव्य नेत्र मनद्वारा जो या ब्रह्मलोकातील भोग आहेत त्यांना पहात रमण करतो.’ याशिवाय त्याचे आपल्या दिव्य रूपाने संपन्न होणेही सांगितले आहे. (८.१२.२) दिव्य रूप स्थूल देहाच्या बन्धनाविरहित असते. म्हणून कार्यब्रह्माच्या लोकात गेलेल्या मुक्तात्म्याच्या स्थूल शरीराचा अभाव मानणेच उचित आहे. (८.१३.१) संबंध - या विषयी आचार्य जैमिनिंचे मत सांगतात - भावं जैमिनिर्विकल्पामननात् ॥ ४.४.११ ॥ अर्थ - जैमिनिः = आचार्य जैमिनि; भावम् = मुक्तात्म्याच्या शरीराचे अस्तित्व मानतात; विकल्पामननात् = कारण की काही प्रकारांनी स्थित होण्याचे श्रुतिमध्ये वर्णन येते. व्याख्या - आचार्य जैमिनिचे सांगणे आहे की ‘मुक्तामा एका प्रकारचा असतो, तीन प्रकारचा असतो, पाच प्रकारचा असतो, सात प्रकारचा, नऊ प्रकारचा, तथा अकरा प्रकारचा असतो असे सांगितले गेले आहे. (छां.उ. ७.२.६.२) याप्रकारे श्रुतिमध्ये त्याचे नाना भावांनी युक्त होणे सांगितले आहे, यावरून हेच सिद्ध होत आहे की त्याच्या स्थूल शरीराचा भाव आहे. अर्थात तो शरीराने युक्त असतो, अन्यथा याप्रकारे श्रुतिचे सांगणे संगत होऊ शकत नाही.’ संबंध - आता या विषयात आचार्य बादरायण आपले मत प्रकट करतात. द्वादशाहवदुभयविधं बादरायणतोऽतः ॥ ४.४.१२ ॥ अर्थ - बादरायणः = वेदव्यास म्हणतात की; अतः = पूर्वोक्त दोन्ही मतांनी; द्वादशाहवत् = द्वादशाह यज्ञाप्रमाणे; उभयविधम् = दोन्ही प्रकारची स्थिति उचित आहे. व्याख्या - वेदव्यास म्हणतात की दोन्ही आचार्यांचे कथन प्रमाणयुक्त आहे, म्हणून उपासकाच्या संकल्पानुसार शरीराचे राहाणे अथवा न राहाणे दोन्हीही संभवनीय आहेत. जसे द्वादशाह यज्ञ श्रुतिमध्ये कोठे अनेक कर्तृक असल्यावर ‘सत्र’ आणि नियत कर्तृक असल्यावर ‘अहीन’ मानले गेले आहे, त्याचप्रकारे येथेही श्रुतिमध्ये दोन्ही प्रकारचे कथन असल्याने मुक्तात्म्याचे स्थूल शरीराने युक्त होऊन दिव्य भोग भोगणे आणि शरीराशिवाय केवळ मनानेच त्यांचा उपभोग घेणे संभावनीय आहे त्याची ही दोन्ही प्रकारची स्थिति उचित आहे यात काही विरोध नाही. संबंध - शरीराशिवाय केवळ मनाने उपभोग कसा होतो ? या जिज्ञासेवर सांगतात. तन्वभावे सन्ध्यवदुपपत्तेः ॥ ४.४.१३ ॥ अर्थ - तन्वभावे = शरीराच्या अभावात; संध्यवत् = स्वप्नाप्रमाणे (भोगांचा उपभोग होतो); उपपत्तेः = कारण की असे मानणेच युक्तिसंगत आहे. व्याख्या - जसा स्वप्नात स्थूल शरीराशिवाय मनानेच समस्त भोगांचा उपभोग घेताला जातो असे दिसून येते, तसेच ब्रह्मलोकातही शरीराशिवाय समस्त दिव्य भोगांचा उपभोग घेणे संभव आहे; म्हणून बादरिची ही मान्यता सर्वथा उचितच आहे. संबंध - शरिराच्या द्वारा कशाप्रकारे उपभोग घेता येतो ? या जिज्ञासेवर सांगतात. भावे जाग्रद्वत् ॥ ४.४.१४ ॥ अर्थ - भावे = शरीर असल्यावर; जाग्रद्वत् = जाग्रत अवस्थेप्रमाणे (उपभोग घेणे युक्तिसंगत आहे.) व्याख्या - आचार्य जैमिनिच्या मतानुसार ज्या मुक्तात्म्यास शरीराची उपलब्धि होते, तो त्याच्याद्वारा, जसा येथे जाग्रत अवस्थेत साधारण मनुष्य विषयांचा अनुभव घेतो, त्याचप्रकारे भोगांचा उपभोग घेतला जातो. ब्रह्मलोकात असे होणे ही संभव आहे. म्हणून दोन्ही प्रकारची स्थिति मानण्यात काही आपत्ति नाही आहे. संबंध - जैमिनिनी ज्या श्रुतिचे प्रमाण दिले आहे, तिच्यानुसार मुक्तात्म्याची अनेक शरीरे होण्याची गोष्ट कळून येत आहे म्हणून ही जिज्ञासा होत आहे की ती अनेक शरीरे निरात्मक असतात की त्यांचा अधिष्ठाता याहून भिन्न असतो ? यावर सांगतात. प्रदीपवदावेशस्तथा हि दर्शयति ॥ ४.४.१५ ॥ अर्थ - प्रदीपवत् = दीपकाप्रमाणे; आवेशः = सर्व शरीरात मुक्तात्म्याचा प्रवेश होऊ शकतो; हि = कारण की; तथा दर्शयति = श्रुति असे दाखवते. व्याख्या - जसा अनेक दीपकात एकच अग्नि प्रकाशित होतो अथवा ज्याप्रकारे अनेक बल्बात विजेची एकच शक्ति व्याप्त होऊन त्यांना सर्वाना प्रकाशित करते, त्याच प्रकारे एकच मुक्तात्मा आपल्या संकल्पाने रचलेल्या समस्त शरीरात प्रविष्ट होऊन दिव्य लोकातील भोगांचा उपभोग करु शकतो, कारण की श्रुतिमध्ये त्या एकाचीच अनेक रुपे होणे दाखविले गेले आहे. (छां.उ.७.२६.२) संबंध - मुक्तात्मा तर समुद्रात नद्याप्रमाणे नामरुपातून मुक्त होऊन त्या परब्रह्म परमेश्वरात विलीन होऊन जातात (मु.उ. ३.२.८) ही गोष्ट प्रथम सांगून झाली आहे. याशिवाय आणखीही ठिकठिकाणी याप्रकारचे वर्णन सापडते. मग येथे त्यांच्या नाना शरीरे धारण करण्याची आणि यथेच्छ भोग भूमिंमध्ये विचरण करण्याची गोष्ट कशी सागितली गेली आहे ? या जिज्ञासेवर सांगतात - स्वाप्ययसम्पत्त्योरन्यतरापेक्षमाविष्कृतं हि ॥ ४.४.१६ ॥ अर्थ - स्वाप्ययसम्पत्त्योः = सुषुप्ति आणि परमात्म्याची प्राप्ति या दोन्हीतून; अन्यतरापेक्षम् = कुठल्या एकाच्या अपेक्षेने सांगितलेली (ही वचने आहेत); हि = कारण की; आविष्कृतम् = श्रुतिमध्ये ही गोष्ट स्पष्ट केली गेली आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये जी कुठल्याही प्रकारचे ज्ञान न राहण्याची आणि समुद्रात नदीप्रमाणे त्या परमात्म्यात मिळून जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे, ती कार्यब्रह्माच्या लोकास प्राप्त होणार्या अधिकार्याविषयी नाही आहे, तर लय अवस्थेसंबंधी तसे कथन केले आहे. (छां.उ. ६.८.१; प्र.उ. ४.७,८) (प्रलय कालातही प्राण्यांची स्थिति सुषुप्तिप्रमाणेच राहात असते. म्हणून त्याचा पृथक् उल्लेख सूत्रात केलेला नाही, असे अनुमान होत आहे.) अथवा परब्रह्माची प्राप्ति अर्थात् सायुज्य मुक्तीस धरुन असे सांगितले गेले आहे. (मु.उ. ३.२.८; बृह. २.४.१२) भाव हा आहे की लय अवस्था आणि सायुज्य मुक्ति या दोन्हीपैकी कुणा एकाच्या उद्देश्याने तसे कथन केले आहे कारण की ब्रह्मलोकात जाणार्या अधिकार्यासाठी तर स्पष्ट शब्दात तेथील दिव्य भोगांच्या उपभोगाची, अनेक शरीरे धारण करण्याची तसेच यथेच्छ लोकात विचरण करण्याची गोष्ट श्रुतिंमध्ये त्या त्या ठिकाणी सांगितली गेली आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचा विरोध अथवा असंभवनीय गोष्ट नाही आहे. संबंध - जर ब्रह्मलोकात गेलेल्या मुक्त आत्म्यांना याप्रकारे आपली अनेक शरीरे निर्माण करून भोगांचा उपभोग करण्याचे सामर्थ्य आहे, तर मग त्यांच्यात परमेश्वराप्रमाणे जगताची रचना आदि कार्ये करण्याचे ही सामर्थ्य असू शकेल ? या जिज्ञासेवर सांगतात. - जगद्व्यापारवर्ज्जं प्रकरणादसन्निहितत्वाच्च ॥ ४.४.१७ ॥ अर्थ - जगद्व्यापारवर्जम् = जगताची रचना आदि व्यापारांना सोडून आणखी इतर गोष्टींतच त्यांचे सामर्थ्य आहे; प्रकरणात = कारण की, प्रकरणाने हेच सिद्ध होत आहे; च = तथा; असन्निहितत्वात् = जगताची रचना आदि व्यापाराशी (उद्योगाशी) त्यांचा काही निकट संबंध दिसून येत नाही. (म्हणून ही गोष्ट सिद्ध होत आहे.) व्याख्या - जेथे जेथे या जड-चेतनात्मक समस्त जगताची उत्पत्ति, संचालन आणि प्रलयाचे प्रकरण श्रुतिमध्ये आले आहे (तै.उ. ३.१; छां.उ. ६.२.१-३; ऐ.उ. १.१; बृह.उ. ३.७.३ पासून २३ पर्यंत; शतपथ. १४.३.५.७ पासून ३१ पर्यंत); तेथे सर्व ठिकाणी हे कार्य परब्रह्म परमात्म्याचे सांगितले गेले आहे. ब्रह्मलोकास प्राप्त होणार्या मुक्तात्म्यांचा सृष्टिरचनादि कार्याशी संबंध कोठेही दाखविला गेलेला नाही. या दोन्ही कारणामुळे हीच गोष्ट सिद्ध होत आहे की या जड-चेतनात्मक समस्त जगताची रचना, त्याचे संचालन आणि प्रलय आदि जितकी म्हणून कार्ये आहेत, त्यात त्या मुक्तात्म्यांचा काही हात अथवा सामर्थ्य नाही. ते केवळ तेथील दिव्य भोगांचा उपभोग करण्याचेच यथेष्ट सामर्थ्य बाळगतात. संबंध - यावर पूर्वपक्ष मांडून त्याचे समाधानपूर्वक पूर्व सूत्रात सांगितलेल्या सिद्धांताची पुष्टि करतात. - त्यक्षोपदेशादिति चेन्न, आधिकारिकमण्डलस्थोक्तेः ॥ ४.४.१८ ॥ अर्थ - चेत् = जर म्हणाल की; प्रत्यक्षोपदेशात् = तेथे प्रत्यक्षरूपाने इच्छेनुसार लोकांत विचरण्याचा उपदेश आहे, अर्थात तेथे जाऊन इच्छानुसार कार्य करण्याचा अधिकार सांगितला गेला आहे; इति न = तर अशी गोष्ट नाही आहे; आधिकारिकमण्डलस्थोक्तेः = कारण की ते म्हणणे अधिकारी लोकांमध्ये स्थित भोगांचा उपभोग करण्यासाठीच आहे. व्याख्या - जर कोणी अशी शंका घेईल की, ‘तो स्वराट् होऊन जातो, त्याला समस्त लोकामध्ये इच्छेनुसार गमन करण्याची शक्ति येते.’ (छां.उ.७.२५.२) ‘तो स्वराज्यास प्राप्त होऊन जातो.’ (तै.उ.१.६.२) इत्यादि श्रुतिवाक्यांत त्याला स्पष्ट शब्दात स्वराट् आणि स्वाराज्यास प्राप्त सांगितले गेले आहे. तथा इच्छेनुसार भिन्न-भिन्न लोकात विचरण्याच्या सामर्थ्याने संपन्न म्हटले गेले आहे, यावरून त्याचा जगताची रचना आदिच्या कार्यात अधिकार आहे हे स्वतः सिद्ध होत आहे, तर अशी गोष्ट नाही आहे. कारण की, तेथेही हे म्हटले आहे की, ‘तो सर्वांच्या मनाच्या स्वामीला प्राप्त होऊन जातो.’ (तै.उ.१.६.२) म्हणून त्याचे सर्व सामर्थ्य त्या ब्रह्मलोकाच्या प्राप्तीच्या प्रभावामुळे आहे आणि ब्रह्म्याच्या (ब्रह्मदेवाच्या) अधीन आहे; म्हणून जगताच्या कार्यात हस्तक्षेप करण्याची शक्ति त्यांच्यात नाही. त्याला जी शक्ति आणि जे अधिकार दिले गेले आहेत, ते केवळ त्या त्या अधिकार्यांच्या लोकामध्ये स्थित भोगांच्या उपभोग करण्याच्या स्वतंत्रतेसाठी आहेत; म्हणून हे कथन तेथील (स्थितिसाठी आहे.) संबंध - जर याप्रकारे त्या त्या लोकातील विकारमय भोगांचा उपभोग करण्यासाठी ती सर्व शरीरे, शक्ति आणि अधिकार आदि त्यास मिळत असले तर मग देवलोकास प्राप्त होणार्या कर्माधिकार्यासदृशच ब्रह्मविद्येचे फल (झाले) मिळाले यात विशेषता काय झाली ? या जिज्ञासेवर सांगतात. - विकारवर्ति च तथा हि स्थितिमाह ॥ ४.४.१९ ॥ अर्थ - च = याशिवाय; विकारावर्ति = तो मुक्तात्मा जन्मादि विकाररहित ब्रह्मरूप फलाचा अनुभव करतो; हि = कारण की; तथा = त्याची तशी; स्थितिम् = स्थिति; आह = श्रुति सांगते. व्याख्या - श्रुतिमध्ये ब्रह्मविद्येचे मुख्य फल परब्रह्माची प्राप्ति सांगितले गेले आहे, ‘जो जन्म, जरा आदि विकारांना प्राप्त न होणारा, अजर-अमर, समस्त पापरहित तथा कल्याणमय दिव्य गुणांनी संपन्न आहे.’ (छां.उ. ८.१.५). म्हणून हेच सिद्ध होत आहे की, त्याला प्राप्त होणारे फल कर्मफलाप्रमाणे विकारी नाही. ब्रह्मलोकातील भोग तर आनुषंगिक फल आहे. ब्रह्मविद्येची सार्थकता तर परब्रह्माची प्राप्ति करविण्यात आहे. श्रुतिमध्ये त्या मुक्तात्म्याची अशीच स्थिति सांगितली गेली आहे. ‘यदा ह्येवैष एतास्मिन् अदृश्येऽनात्म्येऽनिरुक्तेऽनिलथनेऽभयं प्रतिष्ठां विन्दते । अथ सोऽभयं गतो भवति ॥’ (तै.उ. २.७) अर्थात ‘जेव्हा हा जीवात्मा या दिसून न येणार्या शरीररहित सांगता न येणार्या तथा दुसर्याचा आश्रय न घेणार्या परब्रह्म परमात्म्यात निर्भयतापूर्वक स्थिति प्राप्त करतो, तेव्हा तो निर्भय पदास प्राप्त होऊन जातो. संबंध - पूर्वी सांगितलेल्या सिद्धांतास प्रमाणांनी दृढ करतात. - दर्शयतश्चैवं प्रत्यक्षानुमाने ॥ ४.४.२० ॥ अर्थ - प्रत्यक्षानुमाने = श्रुति आणि स्मृति; च = ही; एवम् = याचप्रकारे; दर्शयतः = दाखवितात. व्याख्या - श्रुतिमध्ये स्पष्ट म्हटले आहे की ‘तो परम ज्योतिला प्राप्त होऊन आपल्या वास्तविक रूपाने संपन्न होतो. हा आत्मा आहे. हेच अमृत एवं अभय आहे आणि हेच ब्रह्म आहे.’ (छां.उ.८.३.४) ब्रह्मलोक अन्य लोकाप्रमाणे विकारी नाही. श्रुतिमध्ये त्यास नित्य (छां.उ. ८.१३.१), सर्व पापरहित (छां.उ. ८.४.१) तथा रजोगुण आदिपासून शून्य विशुद्ध (प्र.उ. १.१६) म्हटले आहे. गीतेतही सांगितले आहे की, ‘या ज्ञानाची उपासना करून माझ्या सदृश धर्मांना अर्थात निर्लेपता आदि दिव्य कल्याणमय भावांना प्राप्त होऊन जातात. म्हणुन ते जगताच्या रचनाकालात उत्पन्न होत नाहीत आणि प्रलयकाली मरणाचे दुःखहि भोगत नाहीत. याप्रकारे श्रुति आणि स्मृति मध्ये ठिकठिकाणी मुक्तात्म्याची तशीच स्थिति दाखविली गेली आहे. त्याचे जे त्या त्या अधिकारी वर्गांच्या लोकात जाणे येणे आणि तेथील भोगांचा उपभोग घेणे आहे ती लीलामात्र आहे. बंधनकारक अथवा पुनर्जन्माचा हेतु नाही. ’इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः । सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥’ संबंध - ब्रह्मलोकात जाणार्या मुक्तात्म्यास जगताच्या उत्पत्ति आदिमध्ये अधिकार अथवा सामर्थ्य नाही आहे; ही पूर्वोक्त गोष्ट या प्रकरणाच्या अंती पुन्हा सिद्ध करतात. - भागमात्रसाम्यलिङ्गाच्च ॥ ४.४.२१ ॥ अर्थ - भोगमात्रसाम्यलिङ्गात् = भोगमात्रात समतारूप लक्षणाने; च - ही (हेच सिद्ध होत आहे की त्याचा जगताची रचना आदिमध्ये अधिकार असत नाही.) व्याख्या - ज्याप्रकारे तो ब्रह्मा समस्त दिव्य कल्याणमय भोगांचा उपभोग करूनही त्यांनी लिप्त होत नाही; त्याचप्रकारे हा मुक्तात्माही त्या ब्रह्मलोकात राहतेसमयी उपासनाकालात केलेल्या भावनेनुसार प्राप्त झालेल्या भोगांचा शरीराशिवाय स्वप्नाप्रमाणे केवळ संकल्पाने अथवा शरीरधारणपूर्वक जाग्रतावस्थेप्रमाणे उपभोग करूनही त्याने लिप्त होत नाही. याप्रकारे भोगमात्रात त्या ब्रह्मा (ब्रह्मदेवा) बरोबर त्याची समानता आहे. या लक्षणाने हेच सिद्ध होत आहे की जगताची रचना आदि कार्यात त्याचा ब्रह्मा (ब्रह्मदेवा) समान कुठल्याही अंशात अधिकार अथवा सामर्थ्य नाही आहे. संबंध - जर ब्रह्मलोकास प्राप्त होणार्या मुक्त आत्म्याचे सामर्थ्य सीमित आहे, परमात्म्यासमान असीम नाही आहे ? तर मग त्याचा उपभोगाचा समय पूर्ण झाल्यावर त्याचा पुनर्जन्मही होऊ शकतो ? यावर सांगतात. - अनावृत्तिः शब्दादनावृत्तिः शब्दात् ॥ ४.४.२२ ॥ अर्थ - अनावृत्तिः = ब्रह्मलोकात गेलेल्या आत्म्याचे पुनरागमन होत नाही; शब्दात् = ही गोष्ट श्रुतिच्या वचनाने सिद्ध होत आहे, अनावृत्तिः = पुनरागमन होत नाही; शब्दात् = ही गोष्ट श्रुतिच्या वचनाने सिद्ध होत आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये वारंवार ही गोष्ट सांगितली गेली आहे की, ‘ब्रह्मलोकात गेलेला साधक परतून येत नाही.(बृह.उ. ६.२.१५; प्र.उ. १.१७; छां.उ. ८.६.६; ४.१५.६; ८.१५.१) या शब्द-प्रमाणाने हेच सिद्ध होत आहे की ब्रह्मलोकात जाणारा अधिकारी तेथून या लोकात परत येत नाही.’ ‘अनावृत्तिः शब्दात्’ या वाक्याची आवृत्ति ग्रंथाची समाप्ति सूचित करण्यासाठी आहे. येथे चवथ्या अध्यायातील चवथा पाद पूर्ण झाला.
|