ब्रह्मसूत्र

अध्याय चवथा

पाद तिसरा

संबंध - दुसर्‍या पादामध्ये हे सांगितले की ब्रह्मलोकात जाण्याचा मार्ग आरंभ होण्यापूर्वी पर्यंतची गति (वाणीचा मनांत लय होणे आदि) विद्वान आणि अविद्वान दोन्हीची एक समानच आहे नंतर अविद्वान कर्मानुसार संसारात पुन्हा नूतन शरीर ग्रहण करतो आणि ज्ञानी महापुरुष ज्ञानाने प्रकाशित मोक्ष नाडी द्वाराचा आश्रय घेऊन सूर्याच्या रश्मिंद्वारा सूर्यलोकात पोहोचून तेथून ब्रह्मलोकात निघून जातो. रात्र आणि दक्षिणायन काळातही विद्वानाच्या या उर्ध्वगतित काही बाधा येत नाही; परंतु ब्रह्मलोकात जाण्याचा जो मार्ग आहे त्याचे वर्णन कोठे अर्चिमार्ग, कोठे उत्तरायण मार्ग आणि देवयान मार्ग या नावाने केले गेले आहे. तथा या मार्गांची चिन्हे ही भिन्न भिन्न सांगितली गेली आहेत. म्हणून ही जिज्ञासा होत आहे की उपासना आणि अधिकारी भेदाने हे मार्ग भिन्न भिन्न आहेत अथवा एकाच मार्गाची ही सर्व नावे आहेत ? याशिवाय मार्गात तर कोठे नाना देवतांच्या लोकांचे वर्णन येते, कोठे दिन, पक्ष, मास, अयन आणि संवत्सर यांचे वर्णन येते आणि कोठे केवळ सूर्यरश्मि आणि सूर्यलोकाचेच वर्णन येते हा वर्णनाचा भेद एक मार्ग मानण्याने कशा प्रकारे संगत होईल ? म्हणून या विषयाचा निर्णय करण्यासाठी तीसरा पाद तथा पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


अर्चिरादिना तत्प्रथितेः ॥ ४.३.१ ॥


अर्थ - आर्चिरादिना = अर्चिपासून आरंभ होणार्‍या एकाच मार्गाने (ब्रह्मलोकास जातात); तत्प्रथितेः = कारण की ब्रह्मज्ञान्यासाठी हा एकच मार्ग (विभिन्न नामांनी) प्रसिद्ध आहे.


व्याख्या - श्रुतिमध्ये ब्रह्मलोकात जाण्यासाठी विभिन्न नामांनी ज्याचे वर्णन केले गेले आहे, तो एकच मार्ग आहे अनेक मार्ग नाहीत. त्या मार्गाचे प्रसिद्ध नाम अर्चिःआदि आहे; कारण तो अर्चिपासून प्रारंभ होणारा मार्ग आहे. याच्या द्वारेच ब्रह्मलोकात जाणारे सर्व साधक जातात. याचेच देवयान, उत्तरायण मार्ग आदि नामांनी वर्णन आले आहे. तथा मार्गात येणार्‍या लोकांचे जे वर्णन येते ते काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी अधिक आहे. त्या स्थळी जेथे ज्या लोकांचे वर्णन केले गेलेले नाही तेथे त्याचा अन्यत्राच्या वर्णनावरुन अध्याहार करुन घेतला पाहिजे.




संबंध - एका जागी सांगितलेल्या लोकांचा दुसर्‍या जागी कशा प्रकारे अध्याहार केला पाहिजे? या जिज्ञासेवर सांगतात.


वायुमब्दादविशेषविशेषाभ्याम् ॥ ४.३.२ ॥


अर्थ - वायुम् = वायुलोकास; अब्दात् = संवत्सरानंतर (आणि सूर्याच्या आधी समजावयास पाहिजे); अविशेषविशेषाभ्याम् = कारण की वायुचे वर्णन समान भावाने कोठे आहे आणि कोठे विशेष भावाने आहे.


व्याख्या - एक श्रुति म्हणते - ‘जे या प्रकारे ब्रह्मविद्येचे रहस्य जाणतात तथा जे वनात राहून श्रद्धापूर्वक सत्याची उपासना करतात ते अर्चि (ज्योती, अग्नि अथवा सूर्यकिरणे) ला प्राप्त होतात. अर्चिपासून दिनास, दिनापासून शुक्ल पक्षास, शुक्ल पक्षापासून उत्तरायणाच्या सहा महिन्यास, त्या सहा महिन्यापासून संवत्सरास, संवत्सरापासून सूर्यास, सूर्यापासून चंद्रम्यास तथा चन्द्रम्यापासून विद्युतला प्राप्त होतात. तेथून अमानव पुरुष यांना ब्रह्माजवळ पोहोचवितो. हा देवयान मार्ग आहे.’(छां.उ.५.१०.१.२) दुसर्‍या श्रुतिचे कथन आहे - ‘जेव्हा हा मनुष्य या लोकाहून ब्रह्मलोकास जातो, तेव्हा तो वायुस प्राप्त होतो, वायु त्याच्यासाठी रथ-चक्राच्या छिद्राप्रमाणे रस्ता देतो. त्या रस्त्याने तो वर चढतो, नंतर तो सूर्यास प्राप्त होतो. तेथे त्यास सूर्य लम्बर नामक वाद्यात असणार्‍या छिद्रासदृश्य रस्ता देतो. त्या रस्त्याने वर जाऊन तो चन्द्रम्यास प्राप्त होतो, चन्द्रमा त्याच्यासाठी नगार्‍याच्या छिद्रासदृश्य रस्ता देतो. त्या रस्त्याने वर चढून तो शोकरहित ब्रह्मलोकास प्राप्त होतो. तेथे अनंतकालापर्यंत निवास करतो. (त्या नंतर ब्रह्मात लीन होऊन जातो)’ (बृह.उ.५.१०.१) तीसरी श्रुति सांगते - ‘तो या देवयानमार्गास प्राप्त होऊन अग्निलोकात येतो, नंतर वायुलोक, सूर्यलोक, वरुणलोक, इन्द्रलोक तथा प्रजापती लोकात जाऊन ब्रह्मलोकात पोहोचतो.’(कौ.उ.१.३) या वर्णनात वायुलोकाचे वर्णन दोन श्रुतिमध्ये आले आहे. कौषीतकि उपनिषदात तर केवळ लोकांची नावे मात्र दिलेली आहेत, विशेष रुपाने क्रमाचे स्पष्टीकरण केलेले नाही; परंतु बृहदारण्यकात वायुलोकातून सूर्यलोकात जाण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणून अर्चिपासुन आरंभ करुन मार्गांचे वर्णन करणार्‍या छांदोग्योपनिषदातील श्रुतिमध्ये अग्निच्या स्थानी तर अर्चि म्हटले आहे, परंतु तेथे वायुलोकाचे वर्णन नाही आहे, म्हणून वायुलोकास संवत्सरानंतर आणि सूर्याच्या आधी मानले पाहिजे.




संबंध - वरुण, इंद्र आणि प्रजापति लोकांचेही अर्चि आदि मार्गात वर्णन नाही आहे, म्हणून त्यांना कशानंतर समजले पाहिजे? या जिज्ञासेवर सांगतात

तडितोऽधिवरुणः सम्बन्धात् ॥ ४.३.३ ॥


अर्थ - तडितः = विद्युतपासून; अधि = वर; वरुणः = वरुणलोक (समजला पाहिजे); सम्बन्धात् = कारण की त्या दोन्हीचा परस्पर सम्बन्ध आहे.


व्याख्या - वरुण जलाचा स्वामी आहे; विद्युतचा जलाशी निकटतम सम्बन्ध आहे; म्हणून विद्युतच्या वर वरुणलोकाची स्थिति समजली पाहिजे. त्यानंतर इन्द्र आणि प्रजापति लोकांची स्थिति ही त्या श्रुतित सांगितलेल्या क्रमानुसार समजून घेतली पाहिजे. याप्रकारे सर्व श्रुतिंची एकता होऊन जाईल आणि एक मार्ग मानण्यात कुठल्याही प्रकारचा विरोध राहणार नाही.




संबंध - अर्चिरादि मार्गात जे अर्चि, अहः, पक्ष, अयन, संवत्सर, वायु आणि विद्युत आदि सांगितली गेली आहेत ती जड आहेत की चेतन? या जिज्ञासेवर सांगतात


आतिवाहिकस्तल्लिङ्गात् ॥ ४.३.४ ॥


अर्थ - आतिवाहिकाः = ते सर्व साधकांना एका स्थानाहून दुसर्‍या स्थानापर्यंत पोहोचविणारे त्या त्या लोकांचे अभिमानी पुरुष आहेत; तल्लिङ्गात् = कारण की श्रुतिमध्ये तसेच लक्षण दिसून येते.


व्याख्या - अर्चि, अहः आदि शब्दांच्या द्वारे सांगितले जाणार्‍या ह्या सर्व त्या त्या नावाच्या आणि लोकांच्या अभिमानी देवता अथवा मानवाकृति पुरुष आहेत त्यांचे काम ब्रह्मलोकात जाणार्‍या विद्वानास एका स्थानापासून दुसर्‍या स्थानापर्यंत पोहोचविणे आहे; म्हणून त्यांना आतिवाहक म्हणतात. विद्युल्लोकात पोहोचल्यावर अमानव पुरुष त्या ज्ञान्यास ब्रह्माची प्राप्ती करवितो. त्याच्यासाठी जे अमानव विशेषण दिले गेले आहे, त्यावरून सिद्ध होत आहे की, त्याच्या आधी जे अर्चि आदिना प्राप्त होणे सांगितले गेले आहे, त्या त्या लोकांच्या अभिमानी देवता मानवाकार पुरुष आहेत. तेही दिव्य आहेत परंतु त्यांची आकृति मानवांसारखीच आहे.




संबंध - याप्रकारे अभिमानी देवता मानण्याची काय आवश्यकता आहे ? या जिज्ञासेवर सांगतात. -


उभयव्यामोहात् तत्सिद्धेः ॥ ४.३.५ ॥


अर्थ - उभयव्यामोहात् = दोन्हीचा मोहयुक्त होण्याचा प्रसंग येतो; म्हणून, तत्सिद्धेः = त्यांना अभिमानी देवता मानण्याने त्यांच्याद्वारा ब्रह्मलोकापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य सिद्ध होऊ शकते. (म्हणून तसेच मानले पाहिजे.)


व्याख्या - जर अर्चि आदि शब्दांनी त्यांच्या अभिमानी देवता न मानता त्यांना ज्योति आणि लोकविशेषरूप जड पदार्थ मानले तर दोन्हीचेही मोहयुक्त (मार्ग-ज्ञानशून्य) होण्याने ब्रह्मलोकापर्यंत पोहोचणेच संभव होणार नाही; कारण की गमन करणारा जीवात्मा तर तेथील मार्गाशी परिचित नाही. त्यास पुढे घेऊन जाणारे अर्चि आदि ही जर चेतन नसतील तर मार्गास जाणणारा कोणी न राहिल्याने देवयान आणि पितृयान मार्गाचे ज्ञान होणे असंभव होऊन जाईल. म्हणून अर्चि आदि शब्दांनी त्या त्यांच्या त्यांच्या अभिमानी देवतांचे वर्णन मानणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्या द्वारा ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य सिद्ध होऊ शकते. म्हणून मार्गात ज्या ज्या लोकांचे वर्णन आले आहे, त्यावरून त्या त्या लोकांच्या अधिष्ठात्री देवताच समजली पाहिजे. आपल्या लोकापासून पुढील लोकापर्यंत पोहोचविणेच त्यांचे काम आहे.




संबंध - विद्युत लोकानंतर असे सांगितले गेले आहे की, तो अमानव पुरुष त्यांना ब्रह्माजवळ पोहोचवितो. (छां.उ.५.१०.१) मग मध्येच येणार्‍या वरुण, इन्द्र आणि प्रजापतिंच्या लोकांच्या अभिमानी देवतांना काय काम राहिले ? या जिज्ञासेवर सांगतात. -


वैद्युतेनैव ततस्तच्छ्रुतेः ॥ ४.३.६ ॥


अर्थ - ततः = तेथून पुढे ब्रह्मलोकापर्यंत; वैद्युतेन = विद्युत लोकात प्रकट झालेल्या अमानव पुरुषद्वारा; एव = च (पोहोचविले जातात); तच्छ्रुतेः = कारण की तसे श्रुतित सांगितले आहे.


व्याख्या - तेथून त्यांना त्या विद्युतलोकात प्रकट झालेला अमानव पुरुष ब्रह्माजवळ नेऊन पोहोचवितो, याप्रकारे श्रुतित स्पष्ट सांगितले गेल्याने हेच सिद्ध होत आहे की, विद्युत लोकापासून पुढे ब्रह्मलोकापर्यंत विद्युत लोकात प्रकट झालेला अमानव पुरुष त्यांना पोहोचवितो, वाटेतील लोकांच्या ज्या अभिमानी देवता आहेत, त्यांचे एवढेच काम आहे की, ते आपल्या लोकातून जाण्याकरिता त्यांना मार्ग द्यावयाचा आणि अन्य आवश्यक सहयोग करावयाचा.




संबंध - ब्रह्मविद्येचा उपासक अधिकारी विद्वान तेथे ब्रह्मलोकात ज्यास प्राप्त होतो ते परब्रह्म आहे अथवा सर्व प्रथम उत्पन्न झालेला ब्रह्मा ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे, येथे प्रथम बादरि आचार्यांच्या बाजूने सातव्या सूत्रापासून अकराव्या सूत्रापर्यंत त्यांच्या पक्षाची स्थापना केली जात आहे.


कार्यं बादरिरस्य गत्युपपत्तेः ॥ ४.३.७ ॥


अर्थ - बादरिः = आचार्य बादरिंचे मत आहे की; कार्यम् = कार्यब्रह्मास अर्थात हिरण्यगर्भाला (प्राप्त होतात); गत्युपपत्तेः = कारण की गमन करण्याच्या कथनाची उपपत्ति; अस्य = या कार्यब्रह्मासाठी (होऊ शकते.)


व्याख्या - श्रुतिमध्ये जे लोकान्तरात गमनाचे कथन आहे; ते परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी उचित नाही; कारण की, परब्रह्म परमात्मा तर सर्व जागी आहे, त्याची प्राप्ती होण्यासाठी लोकान्तरात जाण्याची काय आवश्यकता आहे ? म्हणून हेच सिद्ध होत आहे की, या ब्रह्मविद्यांच्या उपासना करणार्‍यांसाठी जे प्राप्त होणारे ब्रह्म आहे, ते परब्रह्म नाही. परंतु कार्यब्रह्मच आहे, कारण की, या कार्यब्रह्माच्या प्राप्तीसाठी लोकान्तरात जाऊन त्यास प्राप्त करण्याचे कथन सर्वथा युक्तिसंमत आहे.




संबंध - प्रकारान्तराने आपला पक्ष दृढ करतात. -


विशेषितत्वाच्च ॥ ४.३.८ ॥


अर्थ - च = तथा; विशेषितत्त्वात् = विशेषण देऊन स्पष्ट सांगितले गेले आहे; म्हणूनही ( कार्यब्रह्माची प्राप्ती मानणेच उचित आहे.)


व्याख्या - ‘अमानव पुरुष यांना ब्रह्मलोकात घेऊन जातो’ (बृह.उ.६.२.१५) या श्रुतिमध्ये ब्रह्मलोकात बहुवचनाचा प्रयोग केला गेला आहे; तथा ब्रह्मलोकात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे; ब्रह्मास प्राप्त होण्याची गोष्ट सांगितली गेली नाही, याप्रकारे विशेष रूपाने स्पष्ट सांगितले गेल्यामुळेही हेच सिद्ध होते की, कार्य ब्रह्मास प्राप्त होतो, कारण तो लोकांचा स्वामी आहे. म्हणून भोग्यभूमि अनेक असल्याने लोकांच्या बरोबर बहुवचनाचा प्रयोग उचितच आहे.




संबंध - दुसर्‍या श्रुतिमध्ये जे असे सांगितले आहे की, तो अमानव पुरुष त्यांना ब्रह्माजवळ घेऊन जातो, हे कथन कार्यब्रह्म मानण्याने उपयुक्त ठरत नाही. कारण की, श्रुतिचे उद्देश्य जर कार्यब्रह्माची प्राप्ती सांगणे असते तर ब्रह्माजवळ पोहोचवून देतो असे कथन पाहिजे होते. यावर सांगतात. -


सामीप्यात्तु तद्व्यपदेशः ॥ ४.३.९ ॥


अर्थ - तद्‌व्यपदेशः = ते कथन; तु = तर; सामीप्यात् = ब्रह्माच्या समीपतेमुळे ब्रह्मदेवासाठीही होऊ शकते.


व्याख्या - जो सर्वप्रथम ब्रह्मदेवाची रचना करतो तथा जो त्यास समस्त वेदांचे ज्ञान प्रदान करतो, परमात्म-ज्ञानविषयक बुद्धिस प्रकट करणार्‍या त्या प्रसिद्ध परमदेव परमेश्वरास मी मुमुक्षु साधक शरण जात आहे. (श्वेता.उ.६.१८) या श्रुति कथनानुसार ब्रह्मदेव त्या परब्रह्म्याचे पहिले कार्य असल्याने ब्रह्मदेवास ‘ब्रह्म’ म्हटले गेले आहे, असे मानणे युक्तिसंगत होऊ शकते. हा मंत्र पृष्ठ ७६ वर अर्थासहित आला आहे.




संबंध - गीतेत म्हटले आहे की, ब्रह्मलोकापर्यंत सर्व लोक पुनरावृत्तिशील आहेत. (गीता.८.१६) या प्रसंगात ब्रह्मदेवांचे आयुष्य पूर्ण झाल्यावर तेथे जाणार्‍यांचे परत येणे अनिवार्य आहे आणि श्रुतिमध्ये देवयान मार्गाने जाणार्‍यांचे मागणे परतून न येणे स्पष्ट सांगितले आहे म्हणून कार्यब्रह्माची प्राप्ती न मानता परब्रह्माची प्राप्ती मानणेच उचित आहे असे कळून येत आहे, यावर बादरिच्या बाजूने सांगतात -


कार्य्यात्यये तदध्यक्षेण सहातः परमभिधानात् ॥ ४.३.१० ॥


अर्थ - कार्यात्यये = कार्यरूप ब्रह्मलोकाचा नाश झाल्यावर; तदध्यक्षेण = त्याचे स्वामी ब्रह्मदेवांच्या, सह = सहित; अतः = यावरून; परम = श्रेष्ठ परब्रह्म परमात्म्यास; अभिधानात् = प्राप्त होण्याचे कथन आहे, म्हणून (पुनरावृत्ति होणार नाही.)


व्याख्या - ‘ज्यांनी उपनिषदांच्या विज्ञानद्वारा त्यांच्या अर्थभूत परमात्म्याचा उत्तमप्रकारे निश्चय केलेला आहे, तथा कर्मफल आणि आसक्तिच्या त्यागरूप योगाने ज्यांचे अन्तःकरण शुद्ध झालेले आहे, ते सर्व साधक ब्रह्मलोकात जाऊन अन्तकाली परम अमृतस्वरूप होऊन उत्तमप्रकारे मुक्त होऊन जातात. (मु.उ. ३.२.६) याप्रकारे श्रुतिमध्ये त्या सर्वांच्या मुक्तिचे कथन असल्याने हेच सिद्ध होत आहे की, प्रलयकालात ब्रह्मलोकाचा नाश झाल्यावर त्याचे स्वामी ब्रह्मदेव यांच्यासह तेथे गेलेले सर्व ब्रह्मविद्येचे उपासकही परब्रह्मास प्राप्त होऊन मुक्त होऊन जातात, म्हणून त्यांची पुनरावृत्ति होत नाही. हा मंत्र पृष्ठ ३३८ वर अर्थासहित आलेला आहे.




संबंध - स्मृति प्रमाणाने आपल्या मतास पुष्ट करतात.


स्मृतेश्च ॥ ४.३.११ ॥


अर्थ - स्मृतेः = स्मृति प्रमाणाने; च = ही (हीच गोष्ट सिद्ध होत आहे.)


व्याख्या - ‘ते सर्व शुद्ध अन्तःकरणाचे पुरुष प्रलयकाल प्राप्त झाल्यावर समस्त जगताच्या अंती ब्रह्मदेवा बरोबर त्या परमपदात प्रविष्ट होऊन जातात. (कू.पु.पूर्वखंड १२.२६९) याप्रकारे स्मृतिमध्ये ही हाच भाव प्रदर्शित केला आहे, म्हणून कार्यब्रह्माची प्राप्ति होते, हेच मानणे ठीक आहे.’ ‘ब्रह्मणा सह ते सर्वे सम्प्राप्ते प्रतिसंचरे । परस्यान्ते कृतात्मानः प्रविशानी परं पदम् ॥’




संबंध - येथपर्यंत बादरिच्या पक्षाची स्थापना करुन आता त्याच्या उत्तरात आचार्य जैमिनिचे मत उद्‍धृत करतात.


परं जैमिनिर्मुख्यत्वात् ॥ ४.३.१२ ॥


अर्थ - जैमिनिः = आचार्य जैमिनिंचे म्हणणे आहे की; मुख्यत्वात् = ब्रह्मशब्दाचा मुख्य वाच्यार्थ असल्यामुळे; परम् = परब्रह्मास प्राप्त होतो (असे मानणेच युक्तिसंगत आहे.)


व्याख्या - तो अमानव पुरुष यांना ब्रह्माजवळ पोहोचवून देतो. (छां.उ. ५.१०.१) श्रुतिच्या या वाक्यात सांगितलेला ‘ब्रह्म’ शब्द मुख्यतः परब्रह्म परमात्म्याचाच वाचक आहे; म्हणून अर्चि आदि मार्गाने जाणारे परब्रह्म परमात्म्यासच प्राप्त होतात, कार्य ब्रह्मास नाही. जेथे मुख्य अर्थाची उपयोगिता नसते तेथेच गौण अर्थाची कल्पना केली जाऊ शकते; मुख्य अर्थाची उपयोगिता राहात असताना नाही. तो परब्रह्म परमात्मा सर्वत्र परिपूर्ण असूनही त्याच्या परम परम धामाचे प्रतिपादन आणि तेथे विद्वान उपासकांच्या जाण्याचे वर्णन श्रुति (क.उ.१.३.९), (प्र.उ.१.१०) आणि स्मृति (गीता १५.६) मध्ये ठिकठिकाणी केले गेले आहे. म्हणून त्याच्या लोकविशेषात गमन करण्यासाठी सांगणे कार्यब्रह्माचे द्योतक नाही आहे. बहुवचना प्रयोगही आदरासाठी केला जाणे संभवनीय आहे. तथा त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या स्वतःसाठी रचलेल्या अनेक लोकांचे अस्तित्वही काही असंभवनीय गोष्ट नाही. म्हणून सर्वथा हेच सिद्ध होत आहे की ते त्याच्या परमधामात जातात तथा परब्रह्म परमात्म्यासच प्राप्त होतात; कार्यब्रह्मास नाही.




संबंध - प्रकारान्तराने जैमिनिचे मत दृढ करतात.


दर्शनाच्च ॥ ४.३.१३ ॥


अर्थ - दर्शनात् = श्रुतिमध्ये ठिकठिकाणी गतिपूर्वक परब्रह्माची प्राप्ती दाखविली गेली आहे; च = ही (हेच सिद्ध होत आहे की कार्यब्रह्माची प्राप्ती नाही.)


व्याख्या - ‘त्यांच्यापैकी सुषुम्णा नाडीद्वारा वर चढून अमृतत्वास प्राप्त होतो.’ (छा.उ.८.६.६) ‘तो संसारमार्गाच्या पार त्या विष्णुच्या परमदास प्राप्त होतो.’ (क.उ.१.३.९) याशिवाय सुषुम्णा नाडीद्वारा शरीरातून निघून जाण्याचे वर्णन कठोपनिषदातही तसेच आले आहे. (क.उ.२.३.१६) या प्रकारे ठिकाठिकाणी गतिपूर्वक परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती श्रुतिमध्ये प्रदर्शित केली गेली आहे. यावरुन हेच सिद्ध होत आहे की देवयान मार्गद्वारा जाणारे ब्रह्मविद्येचे उपासक परब्रह्मासच प्राप्त होतात, कार्यब्रह्मास नाही.’




संबंध - प्रकारान्तराने जैमिनिचे मत दृढ करतात.


न च कार्यं प्रतिपत्त्यभिसन्धिः ॥ ४.३.१४ ॥


अर्थ - च = याशिवाय; प्रतिपत्यभिसन्धिः = त्या ब्रह्मविद्या उपासकांचा प्राप्तीविषयक संकल्पही, कार्ये= कार्यब्रह्मासाठी; न = नाही.


व्याख्या - याशिवाय त्या ब्रह्मविद्येच्या उपासकांचा प्राप्तिविषयक जो संकल्प आहे, तो कार्यब्रह्मासाठी नाही आहे. तर परब्रह्म परमात्म्यासच प्राप्त करण्यासाठी त्यांची साधनात प्रवृत्ति दिसून आली आहे, म्हणून त्यांना कार्यब्रह्माची प्राप्ती होऊ शकत नाही, परब्रह्मांचीच प्राप्ति होते. श्रुतिमध्ये जे असे म्हटले आहे की ते प्रजापतिच्या सभाभवनास प्राप्त होतात. (छां.उ.८.१४.१) त्या प्रसंगातही उपासकाचे लक्ष्य प्रजापतिच्या लोकात राहणे नाही आहे, परंतु परमात्म्याच्या परमधामात जाणे हेच आहे; कारण की, तेथे ज्या यशाच्या यशाचे म्हणजेच महायशाचे वर्णन आहे ते ब्रह्माचेच नाम आहे. ही गोष्ट अन्यत्र श्रुतिमध्येही सांगितली गेली आहे. (श्वेता.उ.४.१९) तथा त्यापूर्वी (छां.उ.८.१३.१) च्या प्रसंगावरूनही हेच सिद्ध होऊ शकते की, तेथे साधकाचे लक्ष्य परब्रह्मच आहे.




संबंध - याप्रकारे बादरिच्या पक्षाची आणि त्याच्या उत्तराची स्थापना करून आता सूत्रकार आपले मत प्रकट करत सिद्धांताचे वर्णन करतात.


अप्रतीकालम्बनान्नयतीति बादरायण उभयथा च दोषात् तत्क्रतुश्च ॥ ४.३.१५ ॥


अर्थ - अप्रतीकालम्बनान् = वाणी आदि प्रतीकाचे अवलम्बन करून उपासना करणार्‍या शिवाय अन्य सर्व उपासकांना; नयति = (हे अर्चि आदि देवता लोक देवयान मार्गाने) घेऊन जातात; उभयथा = (म्हणून) दोन्ही प्रकाराने; अदोषात् = मानण्यांत काही दोष नसल्याने; तत्क्रतुः = त्यांच्या संकल्पानुसार परब्रह्मास; च = आणि कार्यब्रह्मास प्राप्त करणे सिद्ध होत आहे; इति = हे, बादरायणः = व्यासदेव म्हणतात.


व्याख्या - आचार्य बादरायण आपला सिद्धांत सांगून असे म्हणतात की ज्याप्रकारे वाणी आदिमध्ये ब्रह्माच्या प्रतीक-उपासनेचे वर्णन आहे, त्याचप्रकारे इतर तशा उपासनांचेही उपनिषदात वर्णन आहे. त्या उपासकांशिवाय जे ब्रह्मलोकाच्या भोगांना स्वेच्छेनुसार भोगण्याची इच्छा असणारे कार्यब्रह्माचे उपासक आहेत. आणि जे परब्रह्म परमात्म्यास प्राप्त करण्याच्या इच्छेने त्या सर्वशक्तिमान सर्वज्ञ परमेश्वराची उपासना करणारे आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या उपासकांना त्यांच्या भावनानुसार कार्यब्रह्माच्या भोगसंपन्न लोकात आणि परब्रह्म परमात्म्याच्या परमधामात दोन्ही ठिकाणी तो अमानव पुरुष पोहोचवितो, म्हणून दोन्ही प्रकारच्या मान्यतेमध्ये काही दोष नाही; कारण की, उपासकाचा संकल्पच या विशेषतेमध्ये कारण आहे. श्रुतिमध्येही हे वर्णन स्पष्ट आहे की, ‘ज्यांना परब्रह्माच्या परमधामात पोहोचवितात, त्यांचा मार्ग प्रजापति, ब्रह्मा यांच्या लोकातूनच जातो.’ (कौ.उ.१.३) म्हणून ज्यांच्या अन्तःकरणात लोकात रमण करण्याचे संस्कार असतात, त्यांना तेथेच सोडतात, आणि ज्यांच्या मनात तसे भाव नसतात, त्यांना परमधामात पोहोचवितात. परंतु देवयान मार्गाने दोन्ही प्रकारचे उपासक परत माघारी येत नाहीत.’




संबंध - प्रतीकोपासनावाल्यांना अर्चि मार्गाने घेऊन न जाण्याचे काय कारण आहे ? या जिज्ञासेवर सांगतात.


विशेषञ्च दर्शयति ॥ ४.३.१६ ॥


अर्थ - विशेषम् = याचे विशेष कारण; च = हि, दर्शयति = श्रुति दाखवित आहे.


व्याख्या - वाणी आदि प्रतीकोपासनावाल्यांना देवयानमार्गाने अधिकारी का घेऊन जात नाहीत, याचे विशेष कारण त्या त्या उपासनांच्या विभिन्न फलाचे वर्णन करताना श्रुति स्वयं दाखवीत आहे; वाणीत प्रतीकोपासनेचे फल जेथपर्यंत वाणीची गति आहे, तेथपर्यंत इच्छानुसार विचरण करण्याची शक्ति सांगितले गेली आहे. (छां.उ.७.२.२) याच प्रकारे इतर प्रतीकोपासनांचे वेगवेगळे फल सांगितले आहे. सर्वांच्या फलात एकता नाही. म्हणून ते उपासक देवयान मार्गाने कार्यब्रह्माच्या लोकात जाण्याचे अधिकारी नाहीत आणि परब्रह्म परमेश्वराच्या परमधामास जाण्याचेहि अधिकारी नाहीत; म्हणून त्या मार्गाच्या अधिकारी देवतांनी त्यांना अर्चिमार्गाने घेऊन न जाणेच उचितच आहे.




येथे चवथ्या अध्यायातील तिसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP