ब्रह्मसूत्र

अध्याय चवथा

पाद पहिला

संबंध - तीसर्‍या अध्यायात परमात्म्याच्या प्राप्तीच्या भिन्न-भिन्न साधनासंबंधी सांगणार्‍या श्रुतिंवर विचार केला गेला, आता त्या उपासनांच्या फलविषयक श्रुतिंच्यावर विचार करण्यासाठी फलाध्यायनामक चौथ्या अध्यायाचा आरंभ केला जात आहे. येथे ही जिज्ञासा होत आहे की पूर्वोक्त उपासना गुरुद्वारा अध्ययन करविले गेल्यानेच केवळ आपले फळ देण्यास समर्थ आहेत अथवा त्यांच्या साधनांचा वारंवार अभ्यास करावयास हवा ? यावर सांगतात -


आवृत्तिरसकृदुपदेशात् ॥ ४.१.१ ॥


अर्थ - आवृत्तिः = अध्ययन केलेल्या उपासनेचे आवर्तन (वारंवार अभ्यास) करावयास हवा; असकृदुपदेशात् = कारण की श्रुतिमध्ये अनेक वेळा याविषयी उपदेश केला गेला आहे.


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे ‘आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः ।’ ‘तो परमात्माच दर्शन करण्यायोग्य, ऐकण्यायोग्य, मनन करण्यायोग्य आणि ध्यान करण्यायोग्य आहे.’ (बृह.उ.४.५.६) ‘ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः ।’ अर्थात ‘विशुद्ध अन्तःकरण असणारा साधक त्या अवयवरहित परमेश्वराचे निरन्तर ध्यान करीत ज्ञानाच्या निर्मलतेने त्यास पहातो.’ (मु.उ.३.१.८) ‘उपासते पुरुषं ये ह्य कामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः ।’ ‘je कामनारहित साधक त्या परम-पुरुषाची उपासना करतात, ते या रजोवीर्यमय शरीराचे अतिक्रमण करून जातात.’ (मु.उ.३.२.१) याप्रकारे ठिकठिकाणी ब्रह्मविद्यारूप उपासनेचा अभ्यास करण्यासाठी वारंवार उपदेश दिला गेला आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की आचार्याजवळ उत्तमप्रकारे ब्रह्मविद्येचे अध्ययन करून त्यावर वारंवार विचार करीत त्या परमात्म्यामध्ये संलग्न व्हावयास हवे.
संबंध - प्रकारान्तराने ही गोष्ट सिद्ध करतात -


लिङ्गाच्च ॥ ४.१.२ ॥


अर्थ - लिङगात् = स्मृतिच्या वर्णनरूप (लिङ्ग) प्रमाणाने; च = ही हीच गोष्ट सिद्ध होत आहे.


व्याख्या - भगवद्‌गीतेमध्ये ठिकठिकाणी ही गोष्ट सांगितली आहे की, ‘सर्वेषु कालेषु मामनुस्मर’ ‘सर्व काळी माझे स्मरण कर’ (गीता ८.७); ‘परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।’ वारंवार चिन्तन करीत साधक परम पुरुषास प्राप्त होतो.’ (गीता ८.८) ‘जो माझा अनन्यभक्त माझे नित्य निरंतर स्मरण करतो; त्या नित्ययुक्त योग्यासाठी मी सुलभ आहे’ (गीता ८.१४) ‘मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।’ ‘जो नित्ययुक्त भक्त माझ्या ठिकाणी मन लावून माझी उपासना करतो.’ (गीता १२.२) याप्रकारे इतर स्मृतिंमध्येही सांगितले आहे. यावरूनही हेच सिद्ध होत आहे की, ब्रह्मविद्येचा निरन्तर अभ्यास करीत राहिले पाहिजे.
संबंध - त्या परमप्राप्य परब्रह्माचे कुठल्या भावाने निरंतर चिंतन करावयास पाहिजे. या जिज्ञासेवर सांगतात -


आत्मेति तूपगच्छन्ति ग्राहयन्ति च ॥ ४.१.३ ॥


अर्थ - आत्मा = तो माझा आत्मा आहे; इति = या भावाने; तु = ही; उपगच्छन्ति = ज्ञानी जन ह्याला जाणतात अथवा प्राप्त करतात; च = आणि; ग्राहयन्ति = असेच ग्रहण करवितात अथवा समजावितात.


व्याख्या - हा आत्मा ब्रह्म आहे, हा आत्मा चार पाद असणारा आहे. इत्यादि (मां.उ.३.२) ‘सर्वांचा अन्तर्वर्ती हा तुझा आत्मा आहे’ (बृह.उ.३.४.१) ‘हा तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत आहे’. (बृह.उ.३.७.३) याच प्रकारे उद्दालकाने आपला पुत्र श्वेतकेतु यास वारंवार म्हटले आहे की, ‘तो सत्य आहे, तो आत्मा आहे, तो तू आहेस.’ (छां.उ.६.८ पासून १६ व्या खण्डापर्यंत) ‘जो आत्म्यामध्ये स्थित असलेला आत्म्याचा अन्तर्यामी आहे, ज्यास आत्मा जाणत नाही, ज्याचा आत्मा शरीर आहे, तो तुझा आत्मा अन्तर्यामी अमृत आहे. (शतपथ ब्रा.१४.५.३०) याप्रकारे श्रुतिमध्ये त्या परब्रह्म परमात्म्यास आपला अन्तर्यामी आत्मा मानून उपासना करण्याचे विधान येते तथा भगवद्‌गीतेतही भगवंतानी आपल्याला सर्वांचा अन्तर्यामी सांगितले आहे. (गीता १८.६१) इतर श्रुतिंमध्ये ही त्या ब्रह्माला हृदयरूप गुहेत निहित सांगून त्यास जाणणार्‍या विद्वानाच्या महिम्याचे वर्णन केले गेले आहे. (तै.उ.२.१) म्हणून साधकास उचित आहे की, त्याने परमेश्वरास आपला अन्तर्यामी आत्मा समजून त्याच भावाने त्याची उपासना करावी. ’अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः । तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥’ हा मंत्र सूत्र १.२.२० च्या टिपणीत आला आहे.
संबंध - काय प्रतीकोपासनेतही अशीच भावना करावयास हवी ? या जिज्ञासेवर सांगतात -


न प्रतीके नहि सः ॥ ४.१.४ ॥


अर्थ - प्रतीके = प्रतीकात; न = आत्मभाव करता कामा नये; हि = कारण की; सः = तो; न = उपासकाचा आत्मा नाही.


व्याख्या - ‘मनच ब्रह्म आहे, याप्रकारे उपासना करावी’ (छां.उ.३.१८.१) ‘आदित्य’ ब्रह्म आहे, हा आदेश आहे.’ (छां.उ.३.१९.१) याप्रकारे जे भिन्न भिन्न पदार्थात ब्रह्मरूपाने उपासना करण्याचे कथन आहे, तीच प्रतीकोपासना आहे. तेथे प्रतीकात आत्मभाव करता कामा नये; कारण की, ते उपासकाचा अन्तरात्मा नाही आहे. प्रत्युत प्रतीकात ज्याची उपासना केली जाते तो साधकाचा आत्मा आहे. जसे मूर्ति आदिमध्ये भगवंताची भावना करून उपासना केली जाते त्याप्रकारे मन आदि प्रतीकातही उपासना करण्याचे विधान आहे. भाव हा आहे की पूर्वोक्त मन, आकाश, आदित्य आदिना प्रतीक बनवून त्यांच्यात भगवंताच्या उद्देशाने केली गेलेली जी उपासना आहे तिचे परम दयाळू पुरुषोत्तम परमात्मा आपलीच उपासना मानून ग्रहण करतात आणि उपासकाला त्याच्या भावनेनुसार फलही देतात; म्हणून तशा उपासनेचे विधान केले गेले आहे; परंतु प्रतीकास आपला अन्तर्यामी आत्मा मानला जाऊ शकत नाही.
संबंध - प्रतीकोपासना करणार्‍याने प्रतीकात ब्रह्मभाव ठेवला पाहिजे अथवा ब्रह्मात त्या प्रतीकाचा भाव करावयास पाहिजे ? या जिज्ञासेवर सांगतात -


ब्रह्मदृष्टिरुत्कर्षात् ॥ ४.१.५ ॥


अर्थ - उत्कर्षात् = ब्रह्मच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून; ब्रह्मदृष्टिः = प्रतीकात ब्रह्मदृष्टि केली पाहिजे. (कारण की निकृष्ट वस्तुतच उत्कृष्टाची भावना केली जाते.)


व्याख्या - जेव्हा कुठल्याहि देवतेची प्रत्यक्ष उपासना करण्याचे साधन सुलभ नसते तेव्हा सुविधापूर्वक उपलब्ध होणार्‍या साधारण वस्तूमध्ये त्या देवतेची भावना करून उपासना केली जाते, देवतेमध्ये त्या वस्तुची भावना केली जात नाही; कारण की तसे केल्याचा काही उपयोगच नाही आहे. त्याचप्रकारे जो साधक त्या परब्रह्म परमात्म्याच्या तत्त्वास समजू शकत नाही, त्याच्यासाठी प्रतीकोपासनेचे विधान केले गेले आहे, म्हणून त्याने इन्द्रिये आदिनी प्रत्यक्ष अनुभवास येणार्‍या प्राण, मन, सूर्य, चन्द्रमा आदि कुठल्याहि पदार्थास परब्रह्म परमात्म्याचे प्रतीक बनवून त्यात ब्रह्माची भावना करून उपासना केली पाहिजे. कारण की, परब्रह्म परमात्माच सर्वश्रेष्ठ आहे आणि निकृष्टातच श्रेष्ठाची भावना केली जाते, श्रेष्ठात निकृष्टाची नाही. याचप्रकारे प्रतीकात ब्रह्मभाव करून उपासना करण्याने तो परब्रह्म परमात्मा त्या उपासनेला आपलीच उपासना मानतो.
संबंध - आता कर्माच्या अंगभूत उद्‌गीथ आदिच्या विषयात सांगतात -


आदित्यादिमतयश्चाङ्ग उपपत्तेः ॥ ४.१.६ ॥


अर्थ - च = तथा; अङ्गे = कर्माङ्गभूत, उद्‌गीथ = आदिमध्ये; आदित्यादिमतयः = आदित्य आदिची बुद्धी केली पाहिजे; उपपत्तेः = कारण की हेच युक्तियुक्त आहे, असे करण्याने कर्मसमृद्धिरूप फलाची सिद्धी होते.


व्याख्या - कर्माच्या अंगभूत उद्‌गीथ आदिमध्ये जे आदित्य आदिच्या भावनापूर्वक उपासना करण्याचे विधान केले गेले आहे. (छां.उ.१.३.१ तथा २.२.१) ते अवश्य कर्तव्य आहे; कारण की असे करण्याने कर्म-समृद्धी रूप फलाची सिद्धी होते. आत्मभाव करण्याचे असे काहीही फल दिसून येत नाही. म्हणून हेच सिद्ध होत आहे की कनिष्ठ वस्तुमध्ये श्रेष्ठाच्या भावनेचे नाव प्रतीक-उपासना आहे.
संबंध - ही जिज्ञासा होते की साधकास एखाद्या आसनावर बसून उपासना करावयास पाहिजे की हिंडता-फिरताना प्रत्येक परिस्थितीमध्ये तो उपासना करू शकतो ? यावर सांगतात -


आसीनः सम्भवात् ॥ ४.१.७ ॥


अर्थ - आसीनः = बसूनच (उपासना केली पाहिजे); सम्भवात् = कारण की बसूनच निर्विघ्न उपासना करणे संभव आहे.


व्याख्या - परब्रह्म परमेश्वराचे जसे रूप ऐकल्यावर आणि विचार केल्यावर समजून येते, त्याचे वारंवार तैलधारावत् निरंतर चिंतन करीत राहण्याचे नाव उपासना आहे. ही उपासना हिंडता फिरताना अथवा शरीर-संबंधी कामे करतेवेळी होऊ शकत नाही, कारण की त्या समयी चित्त विक्षिप्त रहाते. तसेच झोपून करताना निद्रारूप विघ्न येणे स्वाभाविक आहे; म्हणून केवळ बसून करण्यानेच निर्विघ्न उपासना होऊ शकते. म्हणून उपासनेचा अभ्यास बसूनच करावयास पाहिजे. भगवान श्रीकृष्णानीही म्हटले आहे की ‘उपविश्यासने युञ्जाद योगमात्मविशुद्ध्ये ।’ अर्थात आसनावर बसून अंतःकरणाच्या शुद्धिसाठी योगाचा अभ्यास करावा. (गीता ६.१२)
संबंध - हीच गोष्ट दृढ करण्यासाठी दुसरा हेतु उपस्थित करतात -


ध्यानाच्च् ॥ ४.१.८ ॥


अर्थ - ध्यानात् = उपासनेचे स्वरूप ध्यान आहे, म्हणून; च = ही (हेच सिद्ध होत आहे की बसून उपासना केली पाहिजे.)


व्याख्या - आपल्या इष्टदेवाचे ध्यानच उपासनेचे स्वरूप आहे. (मु.उ.३.१.८) आणि चित्ताच्या एकाग्रतेचे नाव ध्यान आहे. अतएव ही बसूनच केली जाऊ शकते; हिंडता फिरताना अथवा झोपून केली जाऊ शकत नाही.
संबंध - पुन्हा ही गोष्ट दृढ करतात.


अचलत्वं चापेक्ष्य ॥ ४.१.९ ॥


अर्थ - च = तथा श्रुतिमध्ये; अचलत्वम् = शरीराची निश्चलता; अपेक्ष्य = आवश्यक सांगून ध्यान करण्याचा उपदेश केला गेला आहे.


व्याख्या - श्रुतित म्हटले आहे की - ‘चिरुन्नतं स्थाप्य समं शरीरं हृदीन्द्रियाणि मनसा संनिवेश्य । ब्रह्मोडुपेन प्रतरेत विद्वान् स्त्रोतांसि सर्वाणि भयावहानि ॥’ ‘ब्रह्माच्या प्राप्तीसाठी ध्यानाचा अभ्यास करणार्‍याने, शिर, ग्रीवा आणि छाती - या तीन्हीस ताठ धरून, शरीरास सरळ आणि स्थिर करून समस्त इन्द्रियांवर मनाच्या द्वारा हृदयात निरुद्ध करून काररूप नौकेच्या द्वारा समस्त भयदायक जन्मांतररूप स्त्रोतापासून तरून गेले पाहिजे.’ (श्वेता.उ.२.८) या श्रुतीने हे स्पष्ट होत आहे की उपासनेसाठी शरीराचीही अचलता आवश्यक आहे, म्हणून ही उपासना बसूनच केली गेली पाहिजे.
संबंध - हीच गोष्ट श्रुतिप्रमाणांनी दृढ करतात -


स्मरन्ति च ॥ ४.१.१० ॥


अर्थ - च = तथा; स्मरन्ति = असेच स्मरण करतात.


व्याख्या - स्मृतिमध्येही हीच गोष्ट सांगितली गेली आहे - ‘समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः । सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्वानवलोकयन् ॥ प्रशान्तात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थितः । मनः संयम्य मचित्रो युक्त आसीत मत्परः ॥’ ‘काया, शिर आणि ग्रीवा (मान) यांना सम आणि अचल धारण करून स्थिर होऊन, आपल्या नासिकेच्या अग्रभागावर दृष्टि एकत्र करून, अन्य दिशांकडे न बघता निर्भय होऊन, मनास वश करून, माझ्यात चित्त लावून, मलाच आपले परम प्राप्य मानून साधन करण्यासाठी बसावे. (गीता ६.१३-१४) याप्रकारे स्मृति प्रमाणांनी ही हेच सिद्ध होत आहे की परम प्राप्य परमात्म्याचे निरंतर चिन्तनरूप ध्यानाचा अभ्यास बसूनच करावयास पाहिजे.
संबंध - उक्त साधन कशा स्थानी बसून करावयास पाहिजे ? या जिज्ञासेवर सांगतात -


यत्रैकाग्रता तत्राविशेषात् ॥ ४.१.११ ॥


अर्थ - अविशेषात् = कुठल्या विशेष स्थानाचे अथवा दिशेचे विधान नसल्यामुळे (हेच सिद्ध होत आहे की); यत्र = जेथे; एकाग्रता = चित्ताची एकाग्रता (सुगमतेने होऊ शकेल); तत्र = तेथेच (बसून ध्यानाचा अभ्यास करावा.)


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की - ‘समे शुचौ शर्करावह्निवालुका । विवर्जिते शब्दजलाश्रयांदिभिः ॥ मनोऽनुकूले न तु चक्षुपीडने । गुहानिवाताश्रयणे प्रयोजयेत्’ ॥ (श्वेता.उ.२.१०) ‘जे सर्व प्रकारे शुद्ध, समतल, काटेकुटे, अग्नि आणि वाळू रहित तथा शब्द, जल आणि आश्रयाच्या दृष्टीने मनास अनुकूल असेल, जेथे डोळ्यांना पीडा देणारे दृश्य नसेल आणि वायुचा झोकाही लागणार नाही, अशा गुहा आदि स्थानी बसून परमात्म्याच्या ध्यानाचा अभ्यास करावयास पाहिजे.’ (श्वेता.उ.२.१०) याप्रकारे कुठली विशिष्ट दिशा अगर स्थानाचा निर्देश नसल्यामुळे तथा मनास अनुकूल देशात अभ्यास करण्यासाठी श्रुतिची आज्ञा प्राप्त झाल्यामुळे हेच सिद्ध होत आहे की, जेथे सरलतेने मनाची एकाग्रता होऊ शकते, असे कोठलेही पवित्र स्थान उपासनेसाठी उपयुक्त होऊ शकते. म्हणून जे जास्त प्रयत्‍न न करता प्राप्त होऊ शकेल, अशा निर्विघ्न आणि अनुकूल स्थानी बसूनच ध्यानाचा अभ्यास करीत राहिले पाहिजे.
संबंध - याप्रकारे उपासनेचा अभ्यास कोठपर्यंत केला पाहिजे ? या जिज्ञासेवर सांगतात -


आप्रायणात् तत्रापि हि दृष्टम् ॥ ४.१.१२ ॥


अर्थ - आ प्रायणात् = मरणपर्यंत (उपासना करीत राहिले पाहिजे); हि = कारण की; तत्रापि = मरणकालीहि; दृष्टम् = उपासना करीत राहण्याचे विधान दिसून येते.


व्याख्या - छांगोग्योपनिषदात प्रजापतिचे हे वचन आहे की, ‘स खल्वेवं वर्तयन् यावदायुषं ब्रह्मलोकमभिसम्पद्यते ।’ ‘तो याप्रकारे पूर्ण आयुष्यपर्यंत उपासनेत तत्पर राहून शेवटी निःसंदेह ब्रह्मलोकास प्राप्त होतो.’ (छां.उ.८.१५.१) प्रश्नोपनिषदातील गोष्ट आहे की, सत्यकामाने आपले गुरु पिप्पलाद यांना विचारले, ‘भगवन् । मनुष्यांमध्ये जो मरणपर्यंत ॐकाराचे ध्यान करतो, तो कुठला लोक जिंकतो ?’ (प्रश्न.उ.५.१) यावर गुरुनी ॐकारचा महिमा वर्णन करून (५.२) दोन मंत्रांमध्ये हा लोक आणि स्वर्गलोकाच्या प्राप्तीच्या उद्देश्याने केल्या जाणार्‍या उपासनेचे फल सांगितले (५.३.४); नंतर शेवटी म्हटले - ‘जो तीन मात्रांच्या या अक्षराद्वारा या (हृदयस्थ) परमपुरुषाचे निरंतर ध्यान करतो, तो तेजोमय सूर्यलोकात पोहोचतो तथा ज्याप्रकारे सर्प कात टाकतो, ठीक त्याचप्रकारे तो पापांतून मुक्त होऊन सामवेदाच्या श्रुतिंच्या अभिमानी देवतांद्वारा वर ब्रह्मलोकात नेला जातो. तेथे तो या जीवघनरूप हिरण्यगर्भातून अत्यंत श्रेष्ठ तथा सर्वांच्या हृदयात शयन करणार्‍या परमपुरुषाचा साक्षात्कार करतो.’ (प्र.उ.५.५) याप्रकारे मृत्यूपर्यंत निरंतर उपासना करीत राहाण्याचे श्रुतिमध्ये विधान असल्यामुळे हेच मानणे उचित आहे की, आजीवन नित्य निरंतर उपासना करीत राहिले पाहिजे. ज्याला जीवनकालातच त्या परमपुरुषाचा साक्षात्कार होऊन जातो त्याचा तर त्या परमेश्वराशी कधी वियोग होतच नाही, तो तर स्वभावतःच त्याच्याशी संयुक्त होऊन जातो. तथापि तो जी मरणपर्यंत निरंतर उपासना करीत राहतो, ती त्याच्या अन्य कर्मांप्रमाणे लोकसंग्रहासाठी असते, परंतु साधकासाठी तर मृत्यूपर्यंत उपासना परम आवश्यक आहे. अन्यथा योगभ्रष्ट झाल्यावर पुनर्जन्म अनिवार्य होऊन जातो. (गीता ६.३७ ते ४०) म्हणून भगवंतानी मरणपर्यंत साधन करत राहण्याविषयी ठिकठिकाणी सांगितले आहे. (गीता २.७२; ७.३०; ८.५; ८,९,१०,१२,१३ इत्यादि)
संबंध - येथपर्यंत उपासनाविषयक वर्णनाची समाप्ति करून आता परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केल्या जाणार्‍या साधनांच्या फलासंबंधी विचार आरंभ केला जात आहे. येथे ही जिज्ञासा होत आहे की, ज्याला जीवनकालातच परमात्म्याची प्राप्ती होऊन जाते त्याच्या पूर्वार्जित तसेच भावी पुण्य-पापरूप कर्मांचे काय होते ? यावर सांगतात -


तदधिगमे उत्तरपूर्वाघयोरश्लेषविनाशौ तद्व्यपदेशात् ॥ ४.१.१३ ॥


अर्थ - तदधिगमे = त्या परब्रह्म परमात्म्यास प्राप्त झाल्यावर; उत्तरपूर्वाघयोः = पुढे होणार्‍या आणि पूर्वी केले गेलेल्या पापांचा; अश्लेषविनाशौ = क्रमशः असम्पर्क एवं नाश होतो; तद्‌व्यपदेशात् = कारण की श्रुतिमध्ये ही गोष्ट ठिकठिकाणी सांगितली गेली आहे.


व्याख्या - श्रुतिमध्ये सांगितले आहे की, ‘यथा पुष्करपलाश आपो न श्लिष्यन्त एवमेवंविदि पापं कर्म न लिप्यते ।’ अर्थात ज्याप्रकारे कमलपत्रावर जल टिकत नाही त्याचप्रकारे पूर्वोक्त परमात्म्यास जाणणार्‍या महापुरुषास पापकर्म लिप्त करीत नाही. (छां.उ. ४.१४.३) याप्रकारे श्रुतिच्या द्वारा ज्ञानोत्तरकाली होणार्‍या पापकर्मांपासून ही ज्ञान्यांचे अलिप्त राहाणे सांगितले गेले आहे तथा हा दृष्टान्तही दिला गेला आहे ‘ज्याप्रमाणे मुंजातृणामध्ये असएलेली काडी अग्नित पाडली गेली की तत्काळ भस्म होऊन जाते याचप्रकारे या ज्ञान्याची समस्त पापे निःसंदेह भस्म होऊन जातात.’ (छां.उ. ५.२४.३) मुण्डक (२.२.८) आणि गीता (४.३७) मध्येही असेच सांगितले गेले आहे. याचप्रकारे श्रुति आणि स्मृतिमध्ये ब्रह्मज्ञानानंतर लोकसंग्रहासाठी केल्या जाणार्‍या व्यावहारिक क्रियांमध्ये होणार्‍या आनुषंगिक पापांचा त्याच्याशी संबंध न येणे आणि पूर्वकृत पापे सर्वथा नष्ट होणे सांगितले असल्यामुळे हाच निश्चय होत आहे की परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीनंतर त्या सिद्ध पुरुषाच्या पूर्वकृत पापांचा सर्वथा नाश होऊन जातो आणि पुढे होणार्‍या पापांशी त्याचा कधी सम्पर्क होत नाही.
संबंध - भगवत्प्राप्त पुरुषाच्या पुण्यकर्मांचे काय होते ? या जिज्ञासेवर सांगतात -


इतरस्याप्येवमसंश्लेषः पाते तु ॥ ४.१.१४ ॥


अर्थ - इतरस्य = पुण्यकर्मसमुदायाचे; अपि = ही; एवम् = याप्रकारे; असंश्लेषः = संबंध न होणे आणि नाश होऊन जाणे समजले पाहिजे; पाते तु = देहपात झाल्यावर तर तो परमात्म्यास प्राप्त होऊनच जातो.


व्याख्या - ‘हा पुण्य आणि पाप या दोन्हीपासूनही निःसंदेह तरून जातो.’ (बृह.उ.४.४.२२) या प्रकारे सांगितले गेल्यामुळे हेच सिद्ध होत आहे की, पापकर्मांप्रमाणेच पूर्वकृत आणि पुढे होणार्‍या पुण्यकर्मांशीही जीवन्मुक्त अवस्थेत त्या ज्ञान्याचा काही संबंध राहात नाही; तो समस्त कर्मांपासून सर्वथा अतीत होऊन जातो. देहपातानंतर तर प्रारब्धाचाही क्षय झाल्याने तो परमात्म्यास प्राप्त होऊनच जातो.
संबंध - जर ज्ञान्याचे पूर्वकृत आणि पुढे होणारे सर्व पापपुण्य नष्ट होऊन जाते आणि त्यांच्याशी त्याचा काहीही संबंध राहात नाही तर त्याचे शरीर कसे टिकून राहाते ? कारण की, शरीराची स्थिति तर कर्मफल भोगासाठीच आहे. जर ज्ञान झाल्यावर शरीर राहिले नाही तर ज्ञानाचा उपदेशक न राहिल्याने सम्प्रदायपरंपरा नष्ट होऊन जाईल ? यावर सांगतात -


अनारब्धकार्ये एव तु पूर्वे तदवधेः ॥ ४.१.१५ ॥


अर्थ - तु = परंतु; अनारब्धकार्ये = ज्यांचे फलभोगरूप कार्याचा आरंभ झालेला नाही अशी; पूर्वे = पूर्वकृत पुण्य आणि पापे; एव = च नष्ट होतात; तदवधेः = कारण की श्रुतिमध्ये प्रारब्ध कर्म असेपर्यंत शरीराचा राहाण्याचा अवधि निर्धारित केला गेला आहे.


व्याख्या - पूर्वसूत्रामध्ये श्रुति-प्रमाणांनी जो पूर्वकृत आणि पापकर्मांचा नाश सांगितला गेला आहे, तो केवळ त्याच कर्मांचा होतो की जी आपले फल देण्यास तयार (परिपक्व) झालेली नाहीत; संचित अवस्थेतच एकत्रित होत असतात. ज्या प्रारब्धकर्मांचे फल भोगण्यासाठी त्या विद्वानास शरीर मिळालेले असते त्यांचा नाश सांगितला गेलेला नाही; कारण की ‘तस्य तावदेव चिरं यावन्न विमोक्ष्येऽथ सम्पत्स्ये ।’ ‘त्यास तोपर्यंत विलंब होतो, जोपर्यंत प्रारब्धाचा नाश होऊन देहपात होत नाही. त्यानंतर तो परमात्म्यात विलीन होऊन जातो.’ (छां.उ.६.१४.२) याप्रकारे श्रुतिमध्ये प्रारब्धक्षयापर्यंत ज्ञान्याच्या शरीराची स्थिति सांगितली गेली आहे.
संबंध - जर ज्ञान्याचा कर्मांशी काही संबंध राहात नाही, तर त्याच्यासाठी श्रुतिमध्ये आजीवन अग्निहोत्रादि आश्रम-संबंधी कर्मांचे विधान कसे केले आहे ? या जिज्ञासेवर सांगतात -


अग्निहोत्रादि तु तत्कार्यायैव तद्दर्शनात् ॥ ४.१.१६ ॥


अर्थ - अग्निहोत्रादि = आश्रमोपयोगी अग्निहोत्र आदि विहित कर्मांच्या अनुष्ठानाचे विधान; तु = तर; तत्कार्याय = त्या त्या विहित कर्मांचे रक्षण करण्यासाठी; एव = च आहे; तद्दर्शनात् = हेच श्रुति आणि स्मृतिमध्ये दिसून येते.


व्याख्या - ज्ञानी महापुरुषांसाठी जी श्रुतिमध्ये विधान केलेली आपली आश्रम-संबंधी अग्निहोत्रादि कर्मे जीवनपर्यंत करण्याची गोष्ट सांगितली गेली आहे. (ब्र.सू.३.४.३२) ते कथन त्या कर्मांचे रक्षणाच्या उद्देश्यानेच आहे. अर्थात साधारण जनता त्याच्या (देखा-देखीकडे) पाहून कर्मांचा त्याग करून भ्रष्ट न व्हावी, तर आपापली कर्मे श्रद्धापूर्वक करीत राहावी, याप्रकारे लोकसंग्रहासाठी तसे सांगितले गेले आहे, अन्य कुठल्या उद्देश्याने नाही. ही गोष्ट श्रुति आणि स्मृतिमध्येहि दिसून येते. श्रुतिमध्ये जनक अश्वपति, याज्ञवल्क्य आदि ज्ञानी महापुरुषांच्या दृष्टांताने लोकसंग्रहासाठी कर्म करण्याचे विधान सिद्ध केले गेले आहे आणि श्रीमद्‌भगवदगीतेत भगवंतानी स्वतः म्हटले आहे की, ‘हे पार्थ । माझ्यासाठी कुठलेहि कर्तव्य नाही आहे, मला तीन्ही लोकात कुठल्याहि अप्राप्त वस्तुची प्राप्ती करावयाची नाही, तरीही मी कर्मांशी संलग्न राहातो, कारण की जर मी सावधानपूर्वक कर्म केले नाही तर हे सर्व लोक माझे अनुकरण करून नष्ट-भ्रष्ट होऊन जातील आणि मी त्यांच्या नाशामध्ये निमित्त बनेन.’ इत्यादि (३.२२.ते २४) तसेच असेही सांगितले आहे की, ‘विद्वान पुरुषाने कर्मासक्त अज्ञानी मनुष्यांच्या बुद्धिमध्ये भेद उत्पन्न करू नये, परंतु स्वतः त्यांच्याप्रमाणे कर्म करीत राहून त्यांना कर्मांस प्रवृत्त करावे.’ (३.२५) ‘यज्ञ-रक्षणासाठी केल्या जाणार्‍या कर्मांहून भिन्न कर्मांच्या द्वाराच हा मनुष्य बंधनात पडतो.’ इत्यादि (३.९) याप्रकारे श्रुति आणि स्मृति प्रमाणांनी हेच सिद्ध होत आहे की विद्वानासाठी कर्म करण्याचे कथन केवळ लोकसंग्रहासाठीच आहे.
संबंध - आश्रमासाठी विहित कर्मांशिवाय अन्य कर्मे त्यांच्या द्वारा केली जातात अथवा नाही ? या जिज्ञासेवर सांगतात -


अतोऽन्यापि ह्येकेषामुभयोः ॥ ४.१.१७ ॥


अर्थ - अतः = याहून; अन्यापि = भिन्न क्रियाही; उभयोः = ज्ञानी आणि साधक दोघांसाठी; हि = ही; एकेषाम् = कुठल्या एका शाखेच्या मतामध्ये विहित आहेत.


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘आजीवन शास्त्रविहित कर्मे करीत राहूनच या लोकात शंभर वर्षेपर्यंत जगण्याची इच्छा करावी.’ इत्यादि (ईशा. ११) याप्रकारे काही काही शाखेच्या लोकांच्या मतामध्ये ज्ञानी आणि साधक दोघांसाठी या आश्रम-संबंधी कर्मांशिवाय अन्य सर्व विहित कर्मांचे अनुष्ठान आजीवन करत राहाण्याचे विधान आहे. म्हणून ज्ञानी लोकसंग्रहासाठी प्रत्येक शुभ कर्माचे अनुष्ठान कर्तृत्व-अहंकार रहित तसेच कर्मासक्ति आणि फलासक्तिपासून सर्वथा अतीत राहून करू शकतो; कारण की, ज्ञानोत्तर कालात केल्या जाणार्‍या कुठल्याही कर्माने तो लिप्त होत नाही. (गीता ४.२२,१८.१७)
संबंध - काय विद्या आणि कर्माच्या समुच्चयाचेहि विधान आहे ? यावर सांगतात -


यदेव विद्ययेति हि ॥ ४.१.१८ ॥


अर्थ - यत् = जर; एव = ही; विद्यया = विद्येसहित (केले जाते); इति = याप्रकारे कथन करणारी श्रुति आहे, हि = म्हणून (विद्या कर्मांचे अंग काही ठिकाणी होऊ शकते.)


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘जर कर्म विद्या, श्रद्धा आणि रहस्य ज्ञानासह केले गेले तर ते अधिक सामर्थ्यसंपन्न होऊन जाते.’ (छां.उ.१.१.१०) ही श्रुति कर्मांच्या अंगभूत उद्‌गीथ आदिच्या उपासनेच्या प्रकरणातील आहे. म्हणून हिचा संबंध तशाच उपासनेशी आहे तथा ही विद्या ब्रह्मविद्या नाही. म्हणून ज्ञान्याशी अथवा परमात्मप्राप्तीसाठी अभ्यास करणार्‍या अन्य उपासकांशी या श्रुतिचा संबंध नाही. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, त्या प्रकारच्या उपासनांमध्ये सांगितलेली विद्याच त्या कर्मांचे अंग होऊ शकते. ब्रह्मविद्या नाही.
संबंध - ज्ञान्याच्या प्रारब्ध कर्मांचा नाश कसा होतो ? या जिज्ञासेवर सांगतात -


भोगेन त्वितरं क्षपयित्वा सम्पद्यते ॥ ४.१.१९ ॥


अर्थ - इतरं = संचित आणि क्रियमाणाशिवाय दुसरे या प्रारब्धरूप शुभाशुभ कर्मांना; तु = तर; भोगेन = उपभोगद्वारा; क्षपयित्वा = क्षीण करून; सम्पद्यते = (तो ज्ञानी) परमात्म्यास प्राप्त होऊन जातो.


व्याख्या - वर सांगितले गेलेच आहे की विद्वानाची पूर्वकृत संचित कर्मे तर भस्म होऊन जातात आणि क्रियमाण कर्मांशी त्याचा संबंधच राहात नाही, शेष राहिली शुभाशुभ प्रारब्धकर्मे, त्या दोन्हीचा उपभोगाद्वारे नाश करून ज्ञानी पुरुष परमपदास प्राप्त होतो, ही गोष्ट श्रुतित सांगितली गेली आहे. (छां.उ.६.१४.२)
येथे चवथ्या अध्यायातील पहिला पाद पूर्ण झाला.

GO TOP