|
ब्रह्मसूत्रअध्याय तिसरापाद चवथासंबंध - तिसर्या पादामध्ये परमात्म्याच्या प्राप्तीच्या उपायभूत भिन्न भिन्न विद्यांच्या विषयी प्रतीत होणार्या विरोधांना दूर केले गेले. तथा त्या विद्यांपैकी कुठल्या विद्येचे कोठले गुण दुसर्या विद्येत ग्रहण केले जाऊ शकतात; कोठले ग्रहण केले जाऊ शकत नाहीत ? या विद्यांचे अलग अलग अनुष्ठान करणे उचित आहे. अथवा यांच्यापैकी काहींचा समुच्चय ही केला जाऊ शकतो ? इत्यादि विषयांवर विचार करून सिद्धांताचे प्रतिपादन करण्यासाठी चौथ्या पादाचा आरंभ केला जात आहे. येथे प्रथम परमात्म्याची प्राप्तीरूप पुरुषार्थाची सिद्धि केवळ ज्ञानानेच होत असते, अथवा कर्मादिंच्या समुच्चयाने ? यावर विचार आरंभ करण्यासाठी वेदव्यास आपले निश्चित मत सांगत आहेत - पुरुषार्थोऽतश्शब्दादिति बादरायणः ॥ ३.४.१ ॥ अर्थ - पुरुषार्थः = परब्रह्मप्राप्तीरूप पुरुषार्थाची सिद्धि; अतः = याने अर्थात ब्रह्मज्ञानाने होते; शब्दात् = कारण की शब्दा(श्रुतिचे वचना)ने हेच सिद्ध होत आहे, इति = हे, बादरायणः = बादरायण सांगत आहेत. व्याख्या - वेदव्यास महाराज सर्व प्रथम आपले मत सांगत आहेत की, ‘तरति शोकमात्मवित्’ - ‘आत्मज्ञानी शोक-मोहातून तरून जातो.’ (छां.उ.७/१/३); ‘तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम्’ - ‘ज्ञानी महात्मा नामरूपातून मुक्त झाल्यावर परात्पर ब्रह्मास प्राप्त होतो.’ (मु.उ.३/२/८); ‘ब्रह्मविदाप्नोति परम्’ - ‘ब्रह्मवेत्ता परमात्म्यास प्राप्त करतो.’ (तै.उ.२/१); ‘ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः ।’ - ‘परम देवास जाणून सर्व प्रकारच्या पाशांतून (बंधनातून) मुक्त होऊन जातो.’ (श्वेता.उ.५/१३) याप्रकारे श्रुतिचे कथन असल्याने हेच सिद्ध होत आहे की परमात्म्याची प्राप्तीरूप परमपुरुषार्थाची सिद्धि या ब्रह्मज्ञानानेच होते. संबंध - उपर्युक्त सिद्धांताशी जैमिनि ऋषिचा मतभेद दाखवून सांगतात. शेषत्वात्पुरुषार्थवादो यथान्येष्विति जैमिनिः ॥ ३.४.२ ॥ अर्थ - शेषत्वात् = कर्माचे अंग असल्यामुळे; पुरुषार्थवादः = ब्रह्मविद्येस पुरुषार्थाचा हेतु म्हणणे अर्थवाद मात्र आहे; यथा = ज्याप्रकारे; अन्येषु = यज्ञाच्या दुसर्या अंगामध्ये फलश्रुति अर्थवाद मानली जाते; इति = हे, जैमिनिः = जैमिनि आचार्य सांगतात. व्याख्या - आचार्य जैमिनि हे मानतात की, आत्मा कर्माचा कर्ता असल्याने त्याच्या स्वरूपाचे ज्ञान करविणारी विद्या ही कर्माचे अंग आहे. म्हणून तिला पुरुषार्थाचे साधन म्हणणे तिची प्रशंसा करणे आहे. पुरुषार्थाचे साधन तर वास्तवात कर्मच आहे. ज्याप्रकारे कर्माच्या दुसर्या अंगांची फलश्रुति त्यांची प्रशंसामात्र समजली जाते, त्याप्रमाणेच हिलाहि समजले पाहिजे. संबंध - विद्या कर्माचे अंग आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी कारण सांगतात. आचारदर्शनात् ॥ ३.४.३ ॥ अर्थ - आचारदर्शनात् = श्रेष्ठ पुरुषांचा आचार पाहूनहि हेच सिद्ध होत आहे की विद्या कर्मांचे अंग आहे. व्याख्या - बृहदारण्यकोपनिषदात हा प्रसंग आला आहे की, ‘राजा जनकाने एका समयी खूप दक्षिणायुक्त यज्ञ केला, त्यात कुरु तथा पांचालदेशांतील बरेच ब्राह्मण एकत्र आले होते.’ इत्यादि (बृह.उ.३/१/१) छांदोग्यमध्ये वर्णन आले आहे की, राजा अश्वपतिने आपल्याजवळ ब्रह्मविद्या शिकण्यास आलेल्या ऋषिंना म्हटले, ‘आपण लोक ऐका, माझ्या राज्यात कोणी चोर नाही, कोणी कंजूष नाही, कोणी मद्यपी नाही, कोणी अग्निहोत्र न करणारा नाही आणि कोणी विद्याहीन नाही. येथे कोणी परस्त्री गामी पुरुष नाही, मग कुलटा स्त्री कशी राहू शकेल ? ‘न मे स्तेनो जनपदे न कदर्यो न मद्यपः । नानाहिताग्निर्नाविद्वान्न स्वैरी स्वैरिणी कुतः ॥’ ‘हे पूज्यगणांनो ! मी आता यज्ञकर्ता आहे. एकेका ऋत्विजास जितके धन देईन, तितकेच आपणास ही देईन, आपण येथे थांबा.’ (छां.उ.५/११/५) महर्षि उद्दालकहि यज्ञकर्म करणारे होते, ज्यांनी आपला पुत्र श्वेतकेतु यास ब्रह्मविद्येचा उपदेश केला. (छां.उ.संपूर्ण सहावा अध्याय) याज्ञवल्क्यहि जे ब्रह्मवादी लोकात सर्वश्रेष्ठ मानले गेले आहेत; गृहस्थ आणि कर्म करणारे होते, याप्रकारे श्रुतिमध्ये वर्णित श्रेष्ठ पुरुषांचे आचरण पाहिल्यावर ही हेच सिद्ध होत आहे की, ब्रह्मविद्या कर्माचेच अंग आहे आणि कर्मांसहितच ती पुरुषार्थाचे साधन आहे. संबंध - ही गोष्ट श्रुतिप्रमाणांनी दृढ करतात. तच्छ्रुतेः ॥ ३.४.४ ॥ अर्थ - तच्छ्रुतेः = तद्विषयक श्रुतिने ही ही गोष्ट सिद्ध होत आहे. व्याख्या - श्रुतिचे कथन आहे की, ‘जो ॐकाररूप अक्षराच्या तत्त्वास जाणतो आणि जो जाणत नाही, ते दोघेही कर्म करतात, परंतु जे कर्म, विद्या, श्रद्धा आणि योगाने युक्त होऊन केले जाते ते प्रबल तर होत असते.’ (छां.उ.१/१/१०) याप्रकारे श्रुतिमध्ये विद्येला कर्माचा अंग म्हटले गेले आहे. यावरूनहि हेच सिद्ध होत आहे की केवळ ज्ञान पुरुषार्थाचा हेतु नाही. संबंध - पुन्हा ही गोष्ट दृढ करण्यासाठी प्रमाण देतात. समन्वारम्भणात् ॥ ३.४.५ ॥ अर्थ - समन्वारम्भणात् = विद्या आणि कर्म दोन्ही जीवात्म्याच्या बरोबर जातात; हे कथन होण्यामुळेही हीच गोष्ट सिद्ध होत आहे. व्याख्या - ज्यावेळी आत्मा शरीरातून निघून जातो, तेव्हा त्याच्याबरोबर प्राण, अंतःकरण आणि इंद्रिये तर जातातच, विद्या आणि कर्मेही जातात. (बृह.उ.४/४/२) याप्रकारे विद्या आणि कर्मे दोन्हीच्या संस्कारांना बरोबर घेऊन जीवात्म्याचे एका शरीरातून दुसर्या शरीरात गमन सांगितले गेल्यामुळे हे सिद्ध होत आहे की, विद्या कर्माचे अंगच आहे. संबंध - परत दुसर्या प्रमाणाने ही ही गोष्ट सिद्ध करतात. तद्वतो विधानात् ॥ ३.४.६ ॥ अर्थ - तद्वतः = आत्मज्ञानयुक्त अधिकार्यासाठी; विधानात् = कर्मांचे विधान असल्यामुळे ही (हेच सिद्ध होत आहे.) व्याख्या - श्रुतिने ब्रह्मविद्येच्या परंपरेचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश ब्रह्मदेवांनी प्रजापतिला दिला, प्रजापतीने मनुला केला, मनुने प्रजावर्गास ऐकविला. ब्रह्मचारी नियमानुसार गुरुची सेवा आदि कर्तव्य कर्मांचे उत्तमप्रकारे अनुष्ठान करीत वेदाचे अध्ययन समाप्त करावे, नंतर आचार्य कुलातून समावर्तन-संस्कारपूर्वक स्नातक बनून परत यावे आणि कुटुंबात राहून पवित्र स्थानी स्वाध्याय करीत रहावे. पुत्र आणि शिष्यादिकांना धार्मिक बनवून समस्त इंद्रियांना आपल्या अंतःकरणात स्थापित करावे.’ या सर्व नियमांचे वर्णन करून त्यांच्या फलाचे याप्रकारे वर्णन केले आहे, ‘याप्रकारे आचरण करणारा मनुष्य अंती ब्रह्मलोकास प्राप्त होतो.’ (छां.उ.८/१५/१) याप्रकारे विद्यापूर्वक कर्म करण्याच्या विधानाने हीच गोष्ट सिद्ध होत आहे की, विद्या कर्माचे अंग आहे. संबंध - एवढेच नाही तर - नियमाच्च ॥ ३.४.७ ॥ अर्थ - नियमात् = श्रुतिने नियमित केले गेल्यामुळे; च = ही (कर्म अवश्य कर्तव्य आहे; म्हणून विद्या कर्माचे अंग आहे हे सिद्ध होत आहे.) व्याख्या - श्रुतिचा आदेश आहे की, ‘मनुष्याने शास्त्रविहित श्रेष्ठ कर्मांचे अनुष्ठान करीतच या जगतात शंभर वर्षेपर्यंत जीवित रहाण्याची इच्छा करावी. याप्रकारे जीवनयात्रेचा निर्वाह केल्यानंतर तुझ्यात मनुष्यात कर्मे लिप्त होणार नाहीत. याशिवाय दुसर्या प्रकारचा असा कुठलाहि उपाय नाही आहे, ज्यायोगे कर्म लिप्त होणार नाहीत.’ (ईशा.२) याप्रकारे आजीवन कर्मानुष्ठानाचा नियम असल्याने ही हेच सिद्ध होत आहे की, केवळ ज्ञान पुरुषार्थाचा हेतु नाही. संबंध - याप्रकारे जैमिनीच्या मताचे वर्णन करून सूत्रकार आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी उत्तर देतात. अधिकोपदेशात्तु बादरायणस्यैवं तद्दर्शनात् ॥ ३.४.८ ॥ अर्थ - तु = परंतु; अधिकोपदेशात् = श्रुतिमध्ये कर्मापेक्षा अधिक ब्रह्मविद्येच्या माहात्म्याचे कथन असल्यामुळे; बादरायणस्य = व्यासांचे मत; एवम् = जसे प्रथम सूत्रात सांगितले आहे तसेच आहे, तद्दर्शनात् = कारण की श्रुतिमध्ये विद्येची अधिकता तशीच दाखविली गेली आहे. व्याख्या - जैमिनीने जे विद्येला कर्मांचे अंग म्हटले आहे ते ठीक नाही आहे. त्यांनी आपल्या कथनाच्या सिद्धिसाठी ज्या युक्ति दिल्या आहेत त्या ही आभास मात्रच आहेत. म्हणून बादरायणाने पूर्वसूत्रात जे आपले मत प्रकट केले आहे ते आताही जसेच्या तसेच आहे. जैमिनीच्या युक्तिनी त्यात काही परिवर्तन झालेले नाही. यद्यपि ब्रह्मज्ञांना बरोबरच लोकसंग्रहासाठी अथवा प्रारब्धानुसार शरीर-स्थितिच्या निमित्त केली जाणारी कर्मे राहिली तर त्यांच्यामुळे काही हानि होत नाही; तथापि परमात्म्याच्या प्राप्तीरूप पुरुषार्थाचे कारण तर एकमात्र परमात्म्याचे तत्त्वज्ञानच आहे. याशिवाय, ना तर कर्म-ज्ञानाचा समुच्चय परम पुरुषार्थाचे साधन आहे आणि ना केवळ कर्महि साधन आहे. कारण की श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘इष्टापूर्त मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः । नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वेमं लोकं हीनतरं वा विशन्ति ॥’ ‘इष्ट आणि पूर्त कर्मांनाच श्रेष्ठ मानणारे मूर्खलोक त्याहून भिन्न वास्तविक श्रेयास जाणत नाहीत. ते शुभ कर्मांच्या फलरूप स्वर्गलोकातील उच्चतम स्थानी तेथील भोगांचा अनुभव करून या मनुष्यलोकात अथवा याहूनहि अत्यंत नीच (खालचे) लोकात पडतात.’ (मु.उ.१/२/१०) ‘परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन । तद्विज्ञानार्थं स गुरूमेवाभिगच्छेत् समित्याणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ॥’ ‘याप्रकारे कर्माने प्राप्त होणार्या लोकांची परीक्षा करून अर्थात त्यांची अनित्यता समजून द्विजाने त्यांच्यापासून सर्वथा विरक्त झाले पाहिजे. तथा हा निश्चय केला पाहिजे की तो अकृत अर्थात स्वतःसिद्ध परमात्मा कर्मांच्या द्वारा मिळू शकत नाही. म्हणून जिज्ञासु पुरुषाने त्या ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी वेदज्ञ, ब्रह्मनिष्ठ गुरूच्या जवळ हातात समिधा घेऊन जावे.’ (मु.उ.१/२/१२) ‘याप्रकारे आपल्याला शरण आलेल्या शिष्यास ब्रह्मज्ञानी महात्म्याने ब्रह्मविद्येचा उपदेश करावा.’ (मु.उ.१/२/१३) हे सर्व सांगून श्रुतिने तेथे ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे आणि त्यास ज्ञानद्वारा प्राप्त होण्यायोग्य सांगून (मु.उ.२/२/७) म्हटले आहे की, ‘कार्य-कारणस्वरूप त्या ब्रह्मास जाणल्यावर त्या मनुष्याच्या हृदयातील चिज्जड-ग्रंथिचे भेदन होऊन जाते, सर्व संशय नष्ट होऊन जातात आणि समस्त कर्मांचा क्षय होऊन जातो.’ (मु.उ.२/२/८) ‘भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः । क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे परावरे ॥’ याप्रकारे श्रुतिमध्ये ठिकठिकाणी कर्मांपेक्षा ब्रह्मज्ञानाचे महत्त्व खूपच अधिक सांगितले गेले आहे. म्हणून ब्रह्मविद्या कर्मांचे अंग नाही. संबंध - श्रेष्ठ पुरुषांचा आचार पाहून जे विद्येला कर्माचे अंग म्हटले गेले होते, त्याचे उत्तर देतात - तुल्यं तु दर्शनम् ॥ ३.४.९ ॥ अर्थ - दर्शनम् = आचाराचे दर्शन, तु = तर; तुल्यम् = समान आहे (म्हणून त्यायोगे विद्या कर्माचे अंग आहे हे सिद्ध होत नाही.) व्याख्या - आचाराने ही हे सिद्ध होत नाही की, विद्या कर्माचे अंग आहे; कारण की श्रुतिमध्ये दोन्ही प्रकारचा आचार दिसून येतो. एकीकडे ज्ञाननिष्ठ जनकादि गृहस्थ महापुरुष लोकसंग्रहासाठी यज्ञ-यागादि कर्मे करताना दिसून येतात, तर दुसरीकडे केवळ भिक्षेवर निर्वाह करणारे विरक्त संन्यासी महात्मा लोकसंग्रहासाठीच समस्त कर्मांचा त्याग करून ज्ञाननिष्ठ होऊन केवळ ब्रह्मचिंतनात रत रहातात. याप्रकारे आचार तर दोन्ही प्रकारचा उपलब्ध होत असतो. यामुळे कर्माची प्रधानता सिद्ध होत नाही. ज्यांना वास्तवात ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांना ना तर कर्म करण्याचे काही प्रयोजन असते आणि ना त्यांचे त्यागाशीही प्रयोजन असत नाही. (गीता ३/१७) म्हणून प्रारब्ध तथा ईश्वराच्या विधानानुसार त्यांचे आचरण दोन्ही प्रकारचे होत असते. याशिवाय श्रुतित असेही म्हटले आहे की, ‘म्हणून पूर्वीच्या विद्वानांनी अग्निहोत्रादि कर्मांचे अनुष्ठान केले नाही.’ (कौ.उ.२/५) ‘या आत्म्यास जाणूनच ब्राह्मण लोक पुत्रादिंच्या इच्छेचा त्याग करून विरक्त होऊन भिक्षेवर निर्वाह करीत विचरत रहातात.’ (बृह.उ.३/५/१) याज्ञवल्क्यांनी ही दुसर्यांमध्ये वैराग्याची भावना उत्पन्न करण्यासाठी अंती संन्यास ग्रहण केला. (बृह.उ.४/५/१५) याप्रकारे श्रुतिंच्या कर्म-त्यागाच्या आचाराचेहि ठिकठिकाणी वर्णन आढळून येते. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, परम पुरुषार्थाचा हेतु केवळ ब्रह्मज्ञानच आहे आणि ते कर्माचे अंग नाही. संबंध - पूर्वपक्षाकडून जे श्रुतिचे प्रमाण दिले गेले होते, त्याचे उत्तर देतात - असार्वत्रिकी ॥ ३.४.१० ॥ अर्थ - असार्वत्रिकी = (ती श्रुति) सर्वत्र संबंध बाळगणारी नाही, एकदेशीय आहे. व्याख्या - पूर्वपक्षीने जे ‘यदेव विद्यया करोति ।’ (छां.उ.१/१/१०) इत्यादि श्रुतिचे प्रमाण दिले आहे ते सर्व विद्यांशी संबंधित नाही आहे, एकदेशीय आहे. म्हणून त्या प्रकरणात आलेल्या उद्गीथ विद्येशीच त्याचा संबंध आहे, तिलाच ती कर्माचे अंग म्हणत आहे, अन्य सर्व प्रकरणात वर्णित समस्त विद्यांशी तिचा काही संबंध नाही आहे. म्हणून त्या एकदेशीय श्रुतिने हे सिद्ध होऊ शकत नाही की विद्यामात्र कर्माचे अंग आहे. संबंध - पाचव्या सूत्रात पूर्वपक्षीने ज्या श्रुतिचे प्रमाण दिले आहे, तिच्याविषयी उत्तर देतात. विभागः शतवत् ॥ ३.४.११ ॥ अर्थ - शतवत् = एकशे मुद्रांच्या विभागाप्रमाणे; विभागः = त्या श्रुतित म्हटलेला विद्या-कर्माचा विभाग अधिकारिभेदाने समजून घेतला पाहिजे. व्याख्या - ज्याप्रकारे कुणाला आज्ञा दिली गेली की, ‘एकशे मुद्रा उपस्थित लोकांना देऊन टाक.’ तर ऐकणारा पुरुष ग्रहण करणार्या लोकांच्या अधिकारानुसार विभाग करून त्या मुद्रांचे वितरण करील. त्याचप्रकारे या श्रुतिच्या कथनाचा भावही अधिकारी व्यक्तिच्या अनुसार विभागपूर्वक समजावयास हवा. जो ब्रह्मज्ञानी आहे, त्याचे कर्म तर येथेच नष्ट होऊन जाते. म्हणून तो केवळ विद्येच्या बळावरच ब्रह्मलोकास जातो. त्याच्या बरोबर कर्म जात नाही. (मु.उ.१/२/११) आणि जो सांसारिक मनुष्य आहे, अथवा साधनभ्रष्ट आहे, त्याच्याबरोबर विद्या आणि कर्म दोन्हीचे संस्कार जातात. तेथे विद्येचा अर्थ परमात्म्याचे अपरोक्ष ज्ञान नाही, तर केवळ श्रवण, मनन आदिचा अभ्यास असा समजला पाहिजे. म्हणून यावरून ही विद्या कर्माचे अंग आहे हे सिद्ध होत नाही. संबंध - पूर्वपक्षाच्या बाजूने जे सहाव्या सूत्रात प्रजापतीच्या वचनांचे प्रमाण दिले गेले होते, त्याचे उत्तर देतात - अध्ययनमात्रवतः ॥ ३.४.१२ ॥ अर्थ - अध्ययन मात्रवतः = ज्याने विद्येचे केवळ अध्ययन मात्र केले आहे, अनुष्ठान नाही; अशा विद्वानाविषयी हे कथन आहे. व्याख्या - प्रजापतिच्या उपदेशात जी विद्यासंपन्न पुरुषासाठी कुटुंबात जाणे आणि कर्म करणे याची गोष्ट सांगितली गेली आहे. ते कथन गुरुकुलातून अध्ययन मात्र करून बाहेर पडलेल्या ब्रह्मचार्यासाठी आहे. म्हणून ज्याने ब्रह्मविद्येचे केवल अध्ययन केले आहे, मनन आणि निदिध्यासनपूर्वक तिचे अनुष्ठान केलेले नाही, अशा अधिकार्याच्या प्रति अंतःकरणाच्या शुद्धिसाठी कर्मांचे विधान आहे, जे सर्वथा उचित आहे, परंतु यावरून हे सिद्ध होत नाही की ब्रह्मविद्या कर्मांचे अंग आहे. संबंध - पूर्वपक्षाच्या बाजूने जे अंतिम श्रुति-प्रमाण दिले गेले आहे, त्याचे उत्तर चार सूत्रात अनेक प्रकाराने देतात - नाविशेषात् ॥ ३.४.१३ ॥ अर्थ - अविशेषात् = ती श्रुति विशेषरूपाने विद्वानासाठी सांगितलेली नाही म्हणून; न = ज्ञानाबरोबर तिचा समुच्चय नाही आहे. व्याख्या - तेथे जे त्यागपूर्वक आजीव कर्म करण्यास सांगितले गेले आहे, ते कथन सर्व साधकासाठी समानभावाने आहे; ज्ञान्यासाठी विशेषरूपाने नाही. म्हणून त्यायोगे ना तर हे सिद्ध होत आहे की, ब्रह्मविद्या कर्माचे अंग आहे आणि हे ही सिद्ध होत नाही की, केवळ ब्रह्मविद्येने परम पुरुषार्थ प्राप्त होत नाही. संबंध - जर ती श्रुति समानभावाने सर्वासाठी मानली जाईल, तर मग तिच्या द्वारा ज्ञान्यासाठीही कर्माचे विधान होऊनच जाईल, यावर सांगतात. स्तुतयेऽनुमतिर्वा ॥ ३.४.१४ ॥ अर्थ - वा = अथवा असे समजा की, स्तुतये = विद्येच्या स्तुतिसाठी; अनुमतिः = सम्मतिमात्र आहे. व्याख्या - जर ही श्रुति समानभावाने ज्ञान्यासाठीही मानली गेली तर तिचे असा भाव समजून घेतला पाहिजे की, ज्ञानी लोकसंग्रहार्थ आजीवन कर्म करीत राहिला तरी ही ब्रह्मविद्येच्या प्रभावाने त्याच्यात कर्मे लिप्त होत नाहीत. तो त्यांच्यापासून सर्वथा संबंधरहित रहातो. याप्रकारे ब्रह्मविद्येची प्रशंसा करण्यासाठी ही श्रुति कर्म करण्याची सम्मतिमात्र देत आहे, त्यास कर्म करण्यास बाध्य करीत नाही, म्हणून ही श्रुति विद्येला कर्माचे अंग दाखविण्यासाठी नाही आहे. संबंध - हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरी युक्ति देतात - कामकारेण चैके ॥ ३.४.१५ ॥ अर्थ - च = याशिवाय, एके = कोणी एक विद्वान; कामकारेण = स्वेच्छापूर्वक (कर्मांचा त्याग करतात; म्हणून ही विद्या कर्मांचे अंग नाही आहे.) व्याख्या - श्रुति म्हणते की, ‘किं प्रजया करिष्यामो येषां नोऽयमात्मायं लोकः ।’ ‘आम्ही प्रजेशी काय प्रयोजन सिद्ध करणार आहोत, ज्यांचे हे परब्रह्म परमेश्वरच लोक अर्थात निवासस्थान आहे.’ (बृह.उ.४/४/२२) इत्यादि. श्रुतिमध्ये कित्येक विद्वानांचे स्वेच्छापूर्वक गृहस्थ-आश्रम आणि कर्मांचा त्याग करणे सांगितले गेले आहे. जर ‘कुर्वन्नेवेह’ इत्यादि श्रुति सर्व विद्वानासाठी कर्माचे विधान करणार्या मानल्या गेल्या तर या श्रुतिशी विरोध येईल. म्हणून असेच समजले पाहिजे की विद्वानांमध्ये काही आपल्या पूर्वप्रकृति अनुसार आजीवन कर्म करीत रहातात आणि काही सोडून देतात, यात त्यांची स्वतंत्रता आहे म्हणूनहि हे सिद्ध होत नाही की विद्या कर्माचे अंग आहे. संबंध - प्रकारान्तराने हीच गोष्ट सिद्ध करतात - उपमर्द च ॥ ३.४.१६ ॥ अर्थ - च = याशिवाय, उपमर्दम् = ब्रह्मविद्येने कर्मांचा सर्वथा नाश होणे सांगितले आहे. (यानेही पूर्वोक्त गोष्ट सिद्ध होत आहे.) व्याख्या - ‘त्या परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर याची समस्त कर्मे नष्ट होऊन जातात. (मु.उ.२/२/८) इत्यादि. श्रुतिंमध्ये आणि स्मृतिमध्ये ही ज्ञानाचे फल समस्त कर्मांचा उत्तम प्रकारे नाश सांगितले गेले आहे. (गीता ४/३७) ‘यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरूतेऽर्जुन । ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥’ ‘हे अर्जुन ! जशी प्रज्वलित आग लाकडांना भस्म करून टाकते, त्याचप्रकारे ज्ञानरूपी अग्नि सर्व कर्मांना भस्म करून टाकतो.’ म्हणून ब्रह्मविद्येला कर्माचे अंग मानणे शक्य होत नाही; तसेच केवळ ब्रह्मविद्येने परमात्म्याच्या प्राप्तीरूप परम पुरुषार्थाची सिद्धि होत नाही. असेही म्हणता येत नाही. संबंध - येथपर्यंत जैमिनींद्वारा उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे उत्तर देऊन हे सिद्ध केले आहे की, विद्या कर्माचे अंग नाही, स्वतंत्र साधन आहे. आता याच गोष्टीची पुन्हा पुष्टि करतात. ऊर्ध्वरेतस्सु च शब्दे हि ॥ ३.३.१७ ॥ अर्थ - ऊर्ध्वरेतस्सु = ज्यात वीर्याला सुरक्षित ठेवण्याचे विधान आहे अशा तीन आश्रमात; च = ही (ब्रह्मविद्येचा अधिकार आहे.) हि = कारण की; शब्दे = वेदात असे सांगितले आहे. (म्हणून ब्रह्मविद्या कर्माचे अंग नाही.) व्याख्या - जसा गृहस्थाश्रमात ब्रह्मविद्येच्या अनुष्ठानाचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास या तीन आश्रमातहि तिचा अनुष्ठानाचा अधिकार आहे. कारण की, वेदात असे वर्णन आहे. मुण्डकोपनिषदात (१/२/११) असे म्हटले आहे की, ‘तपः श्रद्धे ये ह्युपवसन्त्यरणे शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यां चरन्तः । सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥’ ‘जे वनांत रहाणारे (वानप्रस्थ) शांत स्वभावाचे विद्वान गृहस्थ तथा भिक्षेवर निर्वाह करणारे ब्रह्मचारी आणि संन्यासी तप आणि श्रद्धेचे सेवन करतात, ते रजोगुणरहित साधक सूर्याच्या मार्गाने तेथे निघून जातात. जेथे जन्म-मृत्यूरहित नित्य अविनाशी परम पुरुष निवास करतो.’ याशिवाय अन्य श्रुतिमध्येहि याप्रकारचे वर्णन दिसून येते. (प्र.उ.१/१०) यावरून हेच सिद्ध होत आहे की, विद्या कर्माचे अंग नाही, कारण की संन्याशासाठी वैदिक यज्ञादि कर्मांचे विधान नाही आहे आणि त्यांचा ब्रह्मविद्येत अधिकार आहे. जर ब्रह्मविद्येला कर्माचे अंग मानले गेले तर संन्यासी द्वारा तिचे अनुष्ठान कसे संभव होईल ? संबंध - आता जैमिनीच्या बाजूने पुन्हा शंका उपस्थित केली जात आहे. परामर्श जैमिनिरचोदना चापवदति हि ॥ ३.३.१८ ॥ अर्थ - जैमिनिः = आचार्य जैमिनी; परामर्शम् = उक्त श्रुतिंमध्ये संन्यासाश्रमाचा अनुवादमात्र मानतात, विधि नाही, हि = कारण की, अचोदना = त्यात विधिसूचक क्रियापदाचा प्रयोग नाही आहे; च = याशिवाय, अपवदति = श्रुति संन्यासाचा अपवाद (निषेध) करीत आहे. व्याख्या - आचार्य जैमिनीचे कथन आहे की, संन्यास-आश्रम अनुष्ठेय (पालन करण्यायोग्य) नाही. गृहस्थाश्रमात राहून कर्मानुष्ठान करतानाच मनुष्याचा परम पुरुषार्थ सिद्ध होऊ शकतो. पूर्वोक्त श्रुतिमध्ये ‘भैक्ष्यचर्यां चरन्तः’ या पदाच्या द्वारा संन्यासाचा अनुवाद मात्रच झाला आहे; विधि नाही आहे; कारण की, विधिसूचक क्रियापदाचा प्रयोग नाही आहे. याशिवाय श्रुतिने स्पष्ट शब्दात संन्यासाचा निषेधहि केला आहे. जसे ‘जो अग्निहोत्राचा त्याग करतो, तो देवांच्या वीरांना मारणारा आहे.’ (तै.सं.१/५/२/१) ‘आचार्यास त्यांच्या इच्छेनुसार धन दक्षिणेत देऊन संतान-परंपरेला टिकवून धरावे, तिचा उच्छेद करू नये. (तै.उ.१/११) या वचनांच्या द्वारा संन्यासाश्रमाचा प्रतिवाद होण्यामुळे हेच सिद्ध होत आहे की, संन्यासाश्रम आचरणात आणण्यायोग्य नाही आहे. म्हणून संन्याशाचा ब्रह्मविद्येत अधिकार दाखवून असे म्हणणे की ‘विद्या कर्माचे अंग नाही आहे.’ ठीक नाही आहे. संबंध - याच्या उत्तरात सूत्रकार आपले मत व्यक्त करतात. अनुष्ठेयं बादरायणः साम्यश्रुतेः ॥ ३.४.१९ ॥ अर्थ - बादरायणः = व्यासदेव सांगतात की; अनुष्ठेयम् = गृहस्थाप्रमाणेच अन्य आश्रमांच्या धर्मांचे अनुष्ठान हि कर्तव्य आहे; साम्यश्रुतेः = कारण की श्रुतिमध्ये समस्त आश्रमांची आणि त्यांच्या धर्मांची कर्तव्यता यांचे समानरूपाने प्रतिपादन केले गेले आहे. व्याख्या - जैमिनीच्या उक्त कथनास उत्तर देताना वेदव्यास सांगत आहेत- उक्त श्रुतिमध्ये चारी आश्रमांचा अनुवाद आहे; परंतु अनुवाद ही त्याचाच होतो, जे अन्यत्र विहीत असते. दुसर्या श्रुतिमध्ये जसे गृहस्थाश्रमाचे विधान प्राप्त होत असते त्याच प्रकारे अन्य आश्रमांचे विधान ही उपलब्ध होत असते, यात काही अन्तर नाही आहे. म्हणून ज्या प्रकारे गृहस्थाश्रमाच्या धर्मांचे अनुष्ठान उचित आहे त्याच प्रकारे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासाच्या धर्मांचेही अनुष्ठान करावयास पाहिजे. पूर्वपक्षीने ज्या श्रुतिंच्या द्वारा संन्यासाचा निषेध सूचित केला आहे, त्यांचे तात्पर्य दुसरेच आहे. तेथे अग्निहोत्राचा त्याग न करण्यावर जोर दिला गेला आहे. ही गोष्ट त्याच लोकांना लागू पडते जे त्याचे अधिकारी आहेत. गृहस्थ आणि वानप्रस्थ आश्रमात राहून कधी अग्नीहोत्राचा त्याग करता कामा नये. हेच सांगणे श्रुतिस अभीष्ट आहे. याप्रकारे संतान परंपरेचा उच्छेद न करण्याचा आदेश ही त्यांच्यासाठीच आहे, जे पूर्णतः विरक्त झालेले नाहीत. विरक्तासाठी तर तात्काळ संन्यास घेण्याचे विधान श्रुतिमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. यथा ‘यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत्।’ अर्थात ‘ज्या दिवशी वैराग्य होईल त्या दिवशी संन्यास ग्रहण करावा’ म्हणून संन्याशाचाही ब्रह्मविद्येत अधिकार असल्या कारणाने विद्येला कर्माचा अंग न मानणेच ठीक आहे. * संबंध - प्रकारान्तराने हाच सिद्धान्त दृढ करतात - विधिर्वा धारणवत् ॥ ३.४.२० ॥ अर्थ - वा = अथवा; विधिः = उक्त मंत्रात अन्य आश्रमांचा विधि ही मानला पाहिजे. अनुवाद नाही; धारणवत् = जसे समिधा-धारण संबंधी वाक्यात ‘वरील धारण’ च्या क्रियेला अनुवाद न मानता विधिच मानले गेले आहे. व्याख्या - जसे ‘अधस्तात् समिधं धारयन्ननुद्रवेदुपरि हि देवेभ्यो धारयति।’ अर्थात ‘स्रुगदंडाच्या खाली समिधा धारण करुन अनुद्रवण करावे, परंतु देवतांसाठी वर धारण करावे.’ या वाक्यात स्रुगदंडाच्या अधोभागात समिधा धारण विधिबरोबर एकवाक्यतेची प्रचीति होऊनही ‘वर धारणा’च्या क्रियेला अपूर्व होण्यामुळे विधि मानले आहे. त्याचप्रकारे पूर्वोक्त श्रुतिमध्ये जे चारी आश्रमांचे सांकेतिक वर्णन आहे त्याला अनुवाद न मानता विधि म्हणूनच स्वीकारावयास पाहिजे. दुसर्या श्रुतिमध्ये आश्रमांचे विधान करणारी वचने स्पष्ट आढळतात. यथा ‘ब्रह्मचर्यं परिसमाप्य गृही भवेत् गृही भूत्वा वनी भवेद् वनी भूत्वा प्रव्रजेत्। यदि वेतरथा ब्रह्मचर्या देव प्रव्रजेद् गृहाद् वा वनाद् वा ।....... यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत्।’ (जा.बा.उ.४) अर्थात ‘ब्रह्मचर्यास पूर्ण करुन गृहस्थ झाले पाहिजे. गृहस्थास वानप्रस्थ होऊन त्यानंतर संन्यासी होणे उचित आहे. अथवा तीव्र इच्छा झाली तर दुसर्या प्रकारे ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमातून अथवा वानप्रस्थाश्रमातून संन्यास ग्रहण केला पाहिजे. ज्या दिवशी पूर्ण वैराग्य होईल त्याच दिवशी संन्यास ग्रहण केला पाहिजे.’ याचप्रकारे अन्यान्य श्रुतिमध्ये ही आश्रमासाठी विधि आढळून येतात. म्हणून जेथे केवळ सांकेतिकरूपाने आश्रमांचे वर्णन असेल तेथे संकेतानेच त्यांचा विधिही मानावयास पाहिजे. येथे ही गोष्ट ही ध्यानात ठेवली पाहिजे की कर्मत्यागाचा निषेध करणारी जी श्रुति आहे ती कर्मासक्त मनुष्यांसाठीच आहे, विरक्तांसाठी नाही आहे. या विवेचनाने हेच सिद्ध झाले आहे की कर्मांशिवाय केवळ ज्ञानाचेच ब्रह्मप्राप्तीरुप परम पुरुषार्थाची सिद्धि होते. संबंध - पूर्व प्रकरणात संन्यासाश्रमाची सिद्धी केली गेली. आता यज्ञकर्माच्या अंगभूत उद्गीथ आदिमध्ये केली जाणारी जी उपासना आहे तिची तथा तिच्यासाठी सांगितलेल्या गुणांची विधेयता सिद्ध करून विद्या कर्मांचा अंग नाही आहे हे सिद्ध करण्याच्या उद्देश्याने पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. स्तुतिमात्रमुपादानादिति चेन्नापूर्वत्वात् ॥ ३.४.२१ ॥ अर्थ - चेत् = जर म्हणाल; उपादानात् = उद्गीथ आदि उपासनांमध्ये जी त्यांची महिमा सूचक वचने आहेत, त्यात कर्माच्या अंगभूत उद्गीथ आदिस धरून तसे वर्णन केले गेले आहे म्हणून; स्तुतिमात्रम् = ती सर्व केवळ त्यांची स्तुतिमात्र आहेत; इति न = तर अशी गोष्ट नाही आहे; अपूर्वत्वात् = कारण की उपासना आणि त्यांचे रसतमत्व आदि गुण अपूर्व आहेत. व्याख्या - जर म्हणाल की, ‘हा जो उद्गीथ आहे, तो रसांचाही उत्तम रस आहे; परमात्म्याचे आश्रयस्थान आणि पृथ्वी आदि रसांमध्ये आठवा सर्वश्रेष्ठ रस आहे.’ (छां.उ.१/१/३) या प्रकाराने जे उद्गीथाच्या विषयात वर्णन आहे, ते केवळ स्तुतिमात्र आहे, कारण की, यज्ञाच्या अंगभूत उद्गीथाविषयी असे सांगितले गेले आहे. याप्रकारे सर्व कर्मांगभूत उपासनांमध्ये ज्या ज्या विशेष गुणांचे वर्णन आहे ते सर्व त्या त्या अंगाची स्तुतिमात्र आहे म्हणून विद्या कर्माचे अंग आहे, तर हे म्हणणे उचित नाही; कारण की त्या उपासना आणि त्यांच्या संबंधाने बनविले गेलेले गुण अपूर्व आहेत. जे अन्य कुठल्या प्रमाणानी प्राप्त होत नाही त्यास अपूर्व म्हणतात. या उपासना आणि त्यांच्या गुणांचे अन्यत्र कोठे वर्णन नाही आणि ना अनुमान आदिनीही त्यांचे ज्ञान होत नाही. म्हणून त्यांना अपूर्व मानले गेले आहे. म्हणून हे कथन स्तुतिसाठी नाही परंतु उद्गीथ आदिना प्रतीक बनवून त्यात उपास्यदेवाची भावना करण्यासाठी स्पष्ट प्रेरणा देणारे विधिवाक्य आहे. म्हणून विद्या कर्माचे अंग नाही आहे. संबंध - प्रकारान्तराने या गोष्टीची पुष्टी करतात. भावशब्दाच्च ॥ ३.४.२२ ॥ अर्थ - च = याशिवाय; (या प्रकरणात), भावशब्दात् = याप्रकारे उपासना केली पाहिजे इत्यादि विधिवाचक शब्दाचा स्पष्ट प्रयोग असल्यामुळेहि (हीच गोष्ट सिद्ध होत आहे) व्याख्या - केवळ अपूर्व असल्यानेच त्यास विधिवाक्य मानले जात असेल अशी गोष्ट नाही आहे. त्या प्रकरणात ‘उद्गीथाची उपासना केली पाहिजे.’ (छां.उ.१/१/१) ‘सामाची उपासना केली पाहिजे.’ (छां.उ.२/२/१) इत्यादि रूपाने अत्यंत स्पष्ट विधिसूचक शब्दांचा प्रयोगहि आहे. जसा त्यांचा अपूर्व विधि आहे, त्याचप्रकारे त्या त्या उपासनांचे अपूर्व फलहि सांगितले गेले आहे. (छं.उ.१/१/७, १/७/९ आणि २/२/३) म्हणून हे सिद्ध होत आहे की, ते कथन कर्माच्या अंगभूत उद्गीथ आदिच्या स्तुतिसाठी नाही आहे. त्यांना प्रतीक बनवून उपासनेचे विधान करण्यासाठी आहे आणि म्हणून विद्या कर्माचे अंग नाही आहे. संबंध - भिन्न भिन्न प्रकरणात जे आख्यायिकांचे (इतिहासाचे) वर्णन आहे, त्याचा काय अभिप्राय आहे ? याचा निर्णय करून विद्या कर्माचे अंग नाही हे सिद्ध करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. पारिप्लवार्था इति चेन्न विशेषितत्वात् ॥ ३.४.२३ ॥ अर्थ - चेत् = जर म्हणाल; पारिप्लवार्थाः = उपनिषदात वर्णित आख्यायिका पारिप्लव नामक कर्मासाठी आहेत; इति न = तर हे ठीक नाही; विशेषितत्वात् = कारण की पारिप्लव कर्मात काही आख्यायिकाच विशेषरूपाने ग्रहण केल्या गेल्या आहेत. व्याख्या - उपनिषदात ज्या यम आणि नचिकेत, देवता आणि यक्ष, मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य, प्रतर्दन आणि इंद्र, जानश्रुति आणि रैक्व तथा याज्ञवल्क्य आणि जनक आदिंच्या कथा येतात, त्या यज्ञ-संबंधी पारिप्लव नामक कर्माच्या अंगभूत आहेत; कारण की ‘पारिप्लवमाचक्षीत’ (पारिप्लव नामक वैदिक उपाख्यान सांगावे) या विधिवाक्यद्वारा श्रुतिमध्ये याचे स्पष्ट विधान केले आहे. अश्वमेध यागात जे रात्रीच्या समयी कुटुंबासहित बसलेल्या राजाला अध्वर्यु उपाख्यान ऐकवितो त्यास ‘पारिप्लव’ म्हटले जाते. या पारिप्लव कर्मासाठीच उपर्युक्त कथा आहेत; असे जर कुणी म्हणेल तर ते ठीक नाही; कारण की, पारिप्लवाचे प्रकरण आरंभ करून श्रुतिने ‘मनुर्वैवस्वतो राजा’ इत्यादि वक्यांच्याद्वारा काही विशेष उपाख्यांनानाच तेथे ऐकविण्या म्हटले आहे. त्यात वर उल्लेखिलेल्या उपनिषदातील कथा येत नाहीत. म्हणून त्या पारिप्लव कर्माच्या अंगभूत नाहीत. ती सर्व आख्याने ब्रह्मविद्या उत्तम प्रकारे समजविली जावी म्हणून सांगितलेली ब्रह्मविद्येचेच अंग आहेत. म्हणून या सर्व आख्यानांचे विशेष माहात्म्य सांगितले गेले आहे. (क.उ.१/३/१६) संबंध - प्रकारान्तराने हीच गोष्ट दृढ करतात. तथा चैकवाक्यतोपबन्धात् ॥ ३.४.२४ ॥ अर्थ - तथा च = याप्रकारे त्या आख्यायिकांना पारिप्लवार्थक न मानता विद्येचेच अंग मानले पाहिजे, एकवाक्यतोपबन्धात् = कारण की त्या उपाख्यानाची तेथे सांगितल्या गेलेल्या विद्यांशी एकवाक्यता दिसून येत आहे. व्याख्या - याप्रकारे त्या कथांना पारिप्लवकर्माचे अंग न मानता तेथे सांगितलेल्या विद्यांचेच अंग मानणे उचित आहे; कारण की सन्निकट असल्याने त्या विद्याशीच त्यांचा संबंध असू शकतो; विद्येमध्ये रुचि उत्पन्न करणे तथा परब्रह्माच्या स्वरूपाचे तत्त्व सरलतेने समजण्यासाठीहि या कथांचा उपयोग केला गेला आहे. याप्रकारे यांचा त्या प्रकरणात वर्णित विद्यांबरोबर एकवाक्यता रूप संबंध आहे म्हणून ही सर्व आख्याने ब्रह्मविद्येचीच अंगे आहेत, कर्मांची नाहीत असे मानणेच ठीक आहे. संबंध - येथपर्यंत ही गोष्ट सिद्ध केली गेली आहे की ब्रह्मविद्या यज्ञादि कर्मांचे अंग नाही आहे. तथा स्वयं कुठल्याहि सहाय्याशिवाय परमपुरुषार्थास सिद्ध करण्यास समर्थ आहे. आता पुन्हा याचे समर्थन करीत या प्रकरणाच्या शेवटी सांगतात. अतएव चाग्नीन्धनाद्यनपेक्षा ॥ ३.४.२५ ॥ अर्थ - च = तथा; अतएव = म्हणून; अग्नीन्धाद्यनपेक्षा = या ब्रह्मविद्यारूप यज्ञात अग्नि, समिधा, घृत आदि पदार्थांची आवश्यकता नाही आहे. व्याख्या - हा ब्रह्मविद्यारूप यज्ञ आपले ध्येय सिद्ध करण्यात सर्वथा समर्थ आहे. हा पूर्ण होताच स्वयं परमात्म्याचा साक्षात्कार करून देतो. म्हणून या यज्ञात अग्नि, समिधा, घृत आदि भिन्न -भिन्न पदार्थांचे विधान न करता केवळ एक परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचेच प्रतिपादन केले गेले आहे. श्रीमद् भगवद् गीतेत ही भगवान श्रीकृष्णानी या गोष्टीचे समर्थन याप्रकारे केले आहे - ‘ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् । ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥’ (४/२४) ‘त्या ब्रह्मचिंतनरूप यज्ञात भिन्न-भिन्न उपकरणे आणि सामग्री आवश्यक नसते, परंतु तिच्यात तर स्रुवा ही ब्रह्म असते, हविही ब्रह्म असते आणि ब्रह्मरूप अग्नित ब्रह्मरूप होत्याच्याद्वारा ब्रह्मरूप हवनक्रिया केली जाते, त्या ब्रह्म चिंतनरूप कर्मात समाहित झालेल्या साधकाद्वारे जे प्राप्त केले जाते ते फलहि ब्रह्मच आहे.’ याप्रकारे ही ब्रह्मविद्या त्या परमपुरुषार्थाच्या सिद्धिमध्ये सर्वथा स्वतंत्र असल्याने कर्माच्या अंगभूत असू शकत नाही. संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, काय ब्रह्मविद्येचा कुठल्याहि यज्ञयागादि अथवा शमदमादि कर्मांशी काहीही संबंध नाही आहे, काय तिच्यामध्ये कुठल्याहि कर्माची आवश्यकता नाही आहे ? म्हणून याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. सर्वापेक्षा च यज्ञादिश्रुतेरश्ववत् ॥ ३.४.२६ ॥ अर्थ - च = याशिवाय, सर्वापेक्षा = विद्येच्या उत्पत्तिसाठी समस्त वर्णाश्रमोचित कर्मांची आवश्यकता आहे; यज्ञादिश्रुतेः = कारण की यज्ञादि कर्मांना ब्रह्मविद्येमध्ये हेतु सांगणारी श्रुति आहे; अश्ववत् = जसा घोडा योग्यतेनुसार स्वारी करण्यासाठीच उपयोगात आणता येतो; प्रासादावर चढण्याच्या कार्यात नाही, त्याचप्रकारे कर्म विद्येच्या उत्पत्तिसाठी अपेक्षित आहे, मोक्षासाठी नाही. व्याख्या - ‘हा सर्वेश्वर आहे, हा समस्त प्राण्यांचा स्वामी आहे.’ इत्यादि वचनांनी परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन करून श्रुतिमध्ये सांगितले आहे की ‘या परमेश्वरास ब्राह्मण लोक निष्काम भावाने केलेल्या स्वाध्याय, यज्ञ, दान आणि तपाच्या द्वारे जाणण्याची इच्छा करतात. याला जाणून मनुष्य मननशील होतो, या संन्यासी लोकांच्या लोकास प्राप्त करण्याच्या इच्छेने मनुष्यगण संन्यास ग्रहण करतात.’ इत्यादि (बृह.उ.४/४/२२) तथा दुसर्या श्रुतिमध्येहि सांगितले आहे की, ‘ज्या परमपदाचे सर्व वेद वारंवार प्रतिपादन करतात, समस्त तप ज्यास लक्ष्य करवितात अर्थात ज्याच्या प्राप्तीचे साधन आहे तसेच ज्याची इच्छा करणारे लोक ब्रह्मचर्याचे पालन करतात त्या पदासंबंधी मी तुला संक्षेपात सांगतो.’ (क.उ.१/२/१५) इत्यादि. श्रुतिच्या या वचनांवरून हे सिद्ध होत आहे की, परमात्म्याचे तत्त्व जाणण्यासाठी सर्व वर्णाश्रमोचित कर्मांची आवश्यकता आहे; म्हणून भगवंतांनी ही गीता (१८/५-६) मध्ये म्हटले आहे - ‘यज्ञदानतपः कर्म न त्याज्यं कार्यमेव तत् । यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणान् ॥ एतान्यापि तु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा फलानि च । कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥’ ‘यज्ञ, दान आणि तप ही कर्मे त्याज्य नाहीत. यांचे अनुष्ठान तर करायलाच हवे. कारण की, यज्ञ, दान आणि तप ही मनीषि (मननशील) पुरुषांना पवित्र करणारी आहेत. अर्जुना ! यांचे तसेच अन्य सर्व कर्मांचे ही अनुष्ठान फल आणि आसक्तीचा त्याग करून केले पाहिजे. हेच माझे निश्चित केलेले उत्तम मत आहे.’ ज्याचा असा अधिकार असेल त्यास अनुसरून शास्त्रांमध्ये वर्ण आणि आश्रम संबंधी कर्मे सांगितली गेली आहेत. म्हणून असे समजले पाहिजे की सर्व कर्मे साधकासाठी उपादेय होत नाहीत. परंतु श्रुतिमध्ये सांगितलेल्या ब्रह्मप्राप्तीच्या साधनापैकी जे साधन धरून साधक अग्रेसर होत असेल त्याने आपला वर्ण, आश्रम आणि योग्यतेनुसार अन्य शास्त्रविहित कर्मांचेहि अनुष्ठान निष्कामभावाने करीत राहिले पाहिजे. याच उद्देश्याने श्रुतिमध्ये विकल्प दाखविला गेला आहे की कोणी तर गृहस्थाश्रमात राहून यज्ञ, दान आणि तपाच्या द्वारा त्यास प्राप्त करू इच्छितात; कोणी संन्यासाश्रमात राहून त्यास जाणण्याची इच्छा करतात, कोणी ब्रह्मचर्याचे पालनद्वारा त्याची प्राप्ती करू इच्छितात आणि कोणी वानप्रस्थात राहून केवळ तपस्येनेच त्यास प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात, इत्यादि. याप्रकारे ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कर्म अत्यंत आवश्यक आहे, परंतु परमात्म्याच्या प्राप्तीत त्यांची अपेक्षा नाही आहे; ब्रह्मविद्येनेच त्या फलाची सिद्धि होते. यासाठी सुत्रकारांनी अश्वाचा दृष्टांत दिला आहे. जसे योग्यतेनुसार घोडा स्वारीच्या कामी उपयोगात आणता येतो. प्रासादावर चढण्याच्या कार्यात नाही; त्याचप्रकारे कर्म ब्रह्मविद्येच्या प्राप्तीत सहाय्यक आहे; ब्रह्मसाक्षात्कारात नाही. संबंध - परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काही असे विशेष साधनहि आहे, जे सर्व वर्ण, आश्रम आणि योग्यतेच्या साधकांसाठी समानभावाने आवश्यक आहे; या जिज्ञासेवर सांगतात. शमदमाद्युपेतः स्यात्तथापि तु तद्विधेस्तदङ्ग तया तेषामवश्यानुष्ठेयत्वात ॥ ३.४.२७ ॥ अर्थ - तथापि = अन्य कर्म आवश्यक नसूनहि (साधकास); शमदमाद्युपेतः = शम, दम तितिक्षा आदि गुणांनी संपन्न; स्यात् = असावयास हवे; तु = कारण की; तदङ्गतया = त्या ब्रह्मविद्येच्या अंगरूपाने; तद्विधेः = त्या शम-दमादिचे विधान असल्याने; तेषाम् = त्यांचे, अवश्यानुष्ठेयत्वात् = अनुष्ठान अवश्य कर्तव्य आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये प्रथम ब्रह्मवेत्त्याचे महत्त्व वर्णन करून सांगितले आहे की, ‘हा ब्रह्मवेत्त्याचा महिमा नित्य आहे. हा कर्माने वाढत नाही आणि घटत नाही. हा महिमा जाणून घेतला पाहिजे. ब्रह्मवेत्त्याचा महिमा जाणणारा पापकर्मांनी लिप्त होत नाही. म्हणून हा महिमा जाणणारा साधक शांत (अंतःकरणाचा संयमी), दान्त (इंद्रियांचा संयमी), उपरत, तितिक्षु आणि ध्यानात स्थित होऊन आत्म्यातच आत्म्यास पाहतो.’ (बृह.उ.४/४/२३) याप्रकारे श्रुतिमध्ये परमात्म्यास जाणण्याची इच्छा असणार्या साधकासाठी शम-दमादि साधनांचे ब्रह्मविद्येच्या अंगरूपाने विधान आहे. या कारणाने यांचे अनुष्ठान करणे साधकासाठी परम आवश्यक ठरते. म्हणून ज्या साधकासाठी वर्ण, आश्रमाचे यज्ञादि कर्म आवश्यक नसेल, त्यानेहि या शम-दम, तितिक्षा, ध्यानाभ्यास आदि साधनांनी संपन्न होणे आवश्यक आहे. सूत्रात आलेल्या तथापि शब्दाने उपर्युक्त भाव तर निघतोच आहे. त्याशिवाय हा भावहि व्यक्त होत आहे की, अधिकांश साधकांसाठी तर पूर्वसूत्राच्या कथानानुसार आपापल्या वर्ण आणि आश्रमासाठी विहित सर्व कर्मे आवश्यक आहेत, परंतु वैराग्य आणि उपरति आदि एखाद्या विशेष कारणाने कुणा कुणासाठी अन्य कर्मे आवश्यक नसली तरी ही शम-दमादिचे अनुष्ठान तर अवश्य झालेच पाहिजे. संबंध - श्रुतिमध्ये कोठ कोठे असेही वर्णन आढळते की प्राण-विद्येचे रहस्य जाणणारासाठी कुठलेहि अन्न अभक्ष्य होत नाही. (छां.उ.५/२/१) (बृह.उ.६/१/१४) म्हणून साधकाने अन्नाविषयी भक्ष्याभक्ष्याचा विचार करावयास हवा अथवा नको ? या जिज्ञासेवर सांगतात. सर्वान्नानुमातश्च प्राणात्यये तद्दर्शनात् ॥ ३.४.२८ ॥ अर्थ - सर्वान्नानुमतिः = सर्व प्रकारच्या अन्नास भक्षण करण्याची अनुमति; च = तर; प्राणात्यये = अन्नाशिवाय प्राण न रहाण्याची संभावना असल्यावरच (सदा नाही); तद्दर्शनात् = कारण की श्रुतिमध्ये तसाच आचार दिसून येतो. व्याख्या - श्रुतिमध्ये एक कथा येते - कोणे एके काळी कुरुदेशात टोळधाडीमुळे अथवा गारपीटीमुळे भयंकर दुष्काळ पडला. त्या समयी उषस्ति नावाचा एक विद्वान ब्राह्मण आपली पत्नी आटिकी हिच्यासह इभ्य-ग्रामात रहात होता. दारिद्र्यामुळे ती मोठया संकटात सापडली होती. कित्येक दिवस उपाशी राहिल्याने त्यांचे प्राण जातील की काय अशी संभावना उत्पन्न झाली. तेव्हा ती दोघे एका माहुताजवळ गेली. तो उडीद खात होता. त्यांनी त्या माहुताकडे उडीद मागितले. माहुत म्हणाला, ‘माझ्याजवळ एवढेच आहेत आणि मी ते पात्रात ठेवून खाण्यास आरंभ केला आहे, हे उष्टे अन्न आपल्याला कसे देऊ ?’ उषस्ति म्हणाले, ‘त्यातीलच मला दे.’ माहुताने ते उडीद त्यांना दिले आणि म्हणाला, ‘हे जलहि प्रस्तुत आहे, हे प्यावे.’ उषस्तिने म्हटले, ‘नाही ! हे उष्टे आहे, याने उष्टे पाणी पिण्याचा दोष लागेल.’ हे ऐकून माहूत म्हणाला, ‘काय हे उडीद उष्टे नव्हते का ?’ उषस्ति म्हणाला, ‘ते खाल्ले नसते तर माझे जगणेच असंभव होते, पण जल तर मला अन्यत्रहि इच्छेनुसार मिळू शकते’ इत्यादि. (छां.उ.१/१०/१ पासून ७ पर्यंत) श्रुतिमध्ये सांगितलेली ही कथा पाहिली की हे सिद्ध होत आहे की, ज्यावेळी अन्नाशिवाय मनुष्य जीवन धारण करण्यासहि असमर्थ होईल; प्राण वाचण्याची आशाहि रहाणार नाही, अशा परिस्थितीतच अपवित्र अथवा उच्छिष्ट अन्न भक्षण करण्यासाठी शास्त्राची संमति आहे, साधारण अवस्थेत नाही; कारण की, उडीद खाल्यानंतर उषस्तिने जल ग्रहण न करून ही गोष्ट उत्तम प्रकारे स्पष्ट केली आहे. म्हणून येथे जे म्हटले आहे की या रहस्याला जाणणार्यासाठी काही अभक्ष्य असत नाही, त्याचा अभिप्राय प्राणविद्येच्या ज्ञानाची स्तुति करण्यात आहे, अभक्ष्य भक्षणाच्या विधानात नाही, कारण की तसे म्हटले तर अभक्ष्याचा निषेध करणार्या शास्त्र-वचनाशी विरोध होईल. म्हणून साधारण परिस्थितीमध्ये मनुष्याने आपल्या आचार तसेच आहाराच्या पवित्रतेच्या संरक्षणसंबंधी नियमांचा त्याग कधीहि करता कामा नये. संबंध - दुसर्या युक्तिने पुन्हा हीच गोष्ट (पुष्ट) दृढ करतात. अबाधाच्च ॥ ३.४.२९ ॥ अर्थ - अबाधात् = अन्य श्रुतिस बाध येता कामा नये, या कारणामुळे; च = ही (हेच सिद्ध होत आहे की आपत्कालाशिवाय अन्य परिस्थितीत आचाराचा त्याग करता कामा नये. व्याख्या - ‘आहार शुद्धौ सत्त्वशुद्धिः’ आहाराच्या शुद्धिने अंतःकरणाची शुद्धि होत असते. (छां.उ.७/२६/२); इत्यादि जी भक्ष्याभक्ष्याचा विचार करणारी शास्त्र-वचने आहेत, त्यांच्याशी एकवाक्यता करण्यासाठी त्यांचा दुसर्या श्रुतिद्वारा विरोध (बाध) होणे उचित नाही. या कारणानेहि आपत्तिकालाशिवाय साधारण अवस्थेत भक्ष्याभक्ष्य विचार तसेच अभक्ष्याचा त्यागरूप आचार यांचा त्याग करता कामा नये. संबंध - प्रकारान्तराने पुन्हा हीच गोष्ट सिद्ध करतात. अपि च स्मर्यते ॥ ३.४.३० ॥ अर्थ - अपि च = याशिवाय; स्मर्यते = स्मृति ही या गोष्टीचे समर्थन करते. व्याख्या - मनुस्मृतित सांगितले आहे की, ‘जीवितात्ययमापन्नो योऽन्नमत्ति यतस्ततः । आकाशामिव पङ्केन न स पापेन लिप्यते ॥’ ‘जो मनुष्य प्राण संकटात पडल्यावर जेथून कुठूनहि अन्न घेऊन खातो, तो ज्याप्रमाणे आकाश चिखलाने लिप्त होत नाही त्याप्रमाणेच पापाने लिप्त होत नाही. (मनु.१०/१०४) याप्रकारे जे स्मृति-वचन उपलब्ध होत आहे त्यावरूनहि हेच सिद्ध होत आहे की प्राण जाण्याची परिस्थिती उत्पन्न न होईपर्यंत आहार-शुद्धि संबंधी सदाचारांचा परित्याग करता कामा नये. संबंध - आता श्रुति-प्रमाणांनी ही अभक्ष्य-भक्षणाचा निषेध सिद्ध करतात. शब्दश्चातोऽकामकारे ॥ ३.४.३१ ॥ अर्थ - अकामकारे = इच्छेनुसार अभक्ष्य भोजनाच्या निषेधात; शब्दः = श्रुतिप्रमाण; च = ही आहे; अतः = म्हणून (प्राणसंकटाची स्थिती आल्याशिवाय निषिद्ध अन्न-पाण्याचे ग्रहण (कधीहि) करता कामा नये. व्याख्या - इच्छेनुसार अभक्ष्य-भक्षणाचा निषेध करणारी श्रुति ही आहे. ‘स्तेनो हिरण्यस्य सुराँ पिबँश्च गुरोस्तल्पमावसन् ब्रह्महा चैते पतन्ति चत्वारः पञ्चमश्चाचरँस्तैरिति ॥’ (छां.उ.५/१०/९) ‘सुवर्ण चोरणारा, मद्यपी, गुरुपत्नीगामी तथा ब्रह्महत्यारा हे चारी पतित असतात आणि पाचवा त्यांच्याशी संसर्ग ठेवणाराहि पतित होतो.’ सुरा (मद्य) अभक्ष्य आहे. येथे दारु पिणार्यास महापातकी म्हणून त्याच्या मद्यपानाचा निषेध केला गेला आहे. म्हणून हे सिद्ध झाले की, जेथे कोठे श्रुतिमध्ये ज्ञानाची विशेषता दाखविण्यासाठी विद्वानांच्या संबंधी असे म्हटले आहे की, ‘त्याच्यासाठी काहीही अभक्ष्य असत नाही.’ ते केवळ विद्येची स्तुति करण्यासाठी आहे. सिद्धांत हा आहे की, जोपर्यंत प्राण जाण्यासारखी परिस्थिती उत्पन्न झालेली नसेल तोपर्यंत अभक्ष्य त्यागासंबंधी सदाचाराचा त्याग करता कामा नये. संबंध - येथपर्यंत हे सिद्ध केले गेले आहे की, ज्ञानाची प्राप्ती झाल्यावरहि अभक्ष्य-त्याग आदिच्या आचाराचे पालन करावयास हवे. आता ही जिज्ञासा उत्पन्न होत आहे की, ज्ञान्याला कर्म करावयास हवे की नको ? जर करावयास हवे असेल तर कोणते कर्म केले पाहिजे ? म्हणून याच्या निर्णयासाठी सांगतात. विहितत्वाच्चाश्रमकर्मापि ॥ ३.४.३२ ॥ अर्थ - च = तथा, विहितत्वात् = शास्त्रविहित असल्याकारणाने, आश्रमकर्म = आश्रमसंबंधी कर्मांचा, अपि = ही (अनुष्ठान केले पाहिजे.) व्याख्या - ज्ञानाच्या द्वारा ही ज्याप्रकारे शरीर स्थितीसाठी उपयोगी भोजनादि कर्मे तथा ब्रह्मविद्योपयोगी शम-दमादि कर्मे लोकसंग्रहासाठी कर्तव्य आहेत; त्याचप्रकारे ज्या आश्रमात तो रहातो, त्या आश्रमाची कर्मे ही त्याच्यासाठी विहित आहेत. (बृह.उ.४/४/२२) ‘तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन दानेन तपसानाशकेन ।’ म्हणून त्यांचे अनुष्ठान अवश्य केले पाहिजे, म्हणून भगवंतांनी ही सांगितले आहे की, ‘हे अर्जुना ! जसा अज्ञानी मनुष्य कर्मात आसक्त होऊन त्यांचे अनुष्ठान करतो, तसेच ज्ञानी माणसानेहि लोकसंग्रहाची इच्छा ठेवून आसक्ती विना कर्मांचे अनुष्ठान करावे. (गीता ३/२५) संबंध - प्रकारान्तराने ही गोष्ट दृढ करतात. सहकारित्वेन च ॥ ३.४.३३ ॥ अर्थ - सहकारित्वेन = साधनात सहाय्यक असल्यामुळे; च = ही (त्यांचे अनुष्ठान लोकसंग्रहासाठी केले पाहिजे.) व्याख्या - ज्याप्रकारे शम, दम, तितिक्षादि कर्मे परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनात सहाय्यक आहेत; त्याचप्रकारे निष्काम भावाने केली जाणारी शास्त्रविहित आश्रमसंबंधी आचार, व्यवहार आदि कर्मे हि सहाय्यक आहेत; म्हणून त्यांचे अनुष्ठानहि लोकसंग्रहासाठी अवश्य करावयास पाहिजे. त्यांचा त्याग करू नये. संबंध - येथपर्यंत हे सिद्ध केले गेले की, ब्रह्मविद्येचा अभ्यास करणार्या साधकासाठी निष्कामभावाने आणि परमात्म्यास प्राप्त झालेल्या महात्म्यांसाठी लोकसंग्रहार्थ आश्रम-संबंधी विहित कर्मांचे अनुष्ठान तसेच खाण्यापिण्यासंबंधीच्या सदाचाराचे पालन आवश्यक आहे. आता परब्रह्म पुरुषोत्तमाच्या भक्तिच्या अंगभूत जे श्रवण, कीर्तन आदि कर्मे आहेत त्यांचे पालन कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कशा प्रकारे केले पाहिजे ? यावर विचार करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. सर्वथापि त एवोभयलिङ्गात् ॥ ३.४.३४ ॥ अर्थ - अपि = कुठल्या कारणाने अडचण झाली तरीही; ते = ती भक्तिसंबंधी कर्मे अथवा भागवत धर्म तर; सर्वथा = सर्व प्रकाराने, एव = च आचरणात आणण्यायोग्य आहेत; उभयलिङ्गात् = कारण की श्रुति आणि स्मृति दोन्हीच्या निश्चयात्मक वर्णनरूप लिङ्गाने (लक्षणाने) हेच सिद्ध होत आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः । नानुध्यायाद् बहूय छब्दान् वाचो विग्लापनँ हि तत् ॥’ ‘बुद्धिमान ब्राह्मणाने त्या परब्रह्म पुरुषोत्तमाच्या तत्त्वास जाणून घेऊन त्यातच बुद्धिस प्रविष्ट करावयास पाहिजे. अन्य नाना प्रकारच्या व्यर्थ शब्दांवर ध्यान देऊ नये, कारण की तो तर केवळ वाणीचा अपव्ययमात्र आहे.’ (बृह.उ.४/४/२१) तथा ‘यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षमोतं मनः सह प्राणैश्च सर्वैः । तमेवैकं जानथ आत्मनमन्या वाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः ॥’ ‘ज्या परब्रह्म परमेश्वरात स्वर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष, मनासहित समस्त इंद्रिये आणि प्राण स्थित आहेत त्या एका सर्वांचा आत्मा असणार्या परमेश्वराला सांगितलेल्या उपायांच्या द्वारा जाणून घ्या; दुसर्या गोष्टी सोडून द्या. हाच अमृतस्वरूप परमात्म्यास प्राप्त करण्यासाठी सेतु सदृश सरल मार्ग आहे. (मु.उ.२/२/५) याचप्रकारे श्रीमद् भागवतातही सांगितले आहे की, ‘श्रृण्वन्ति गायन्ति गृणन्त्यभीक्ष्णशः । स्मरन्ति नन्दति तवेहितं जनाः ॥ त एव पश्यन्त्य चिरेण तावकं । भवप्रवाहोपरमं पदाम्बुजम् ॥’ ‘जे आपले भक्त आपले चरित्र प्रतिक्षण ऐकतात, गातात आणि वर्णन करतात तसेच त्यांचेच स्मरण करून आनंदित होतात, तेच अविलंब आपल्या त्या चरणकमलांचे दर्शन करतात, जी जन्म-मरणरूप प्रवाहाची नाशक आहेत.’ (१/८/३६) श्रीमद् भगवद् गीतेतहि म्हटले आहे की, ‘महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥’ ‘हे पार्थ ! दैवी प्रकृतिमध्ये स्थित झालेले अनन्य मन असणारे महात्मा गण मला समस्त प्राण्यांचा आदि आणि अविनाशी जाणून माझे भजन करतात. ते यत्नशील, दृढ निश्चयवाले भक्त निरंतर माझे कीर्तन करतात आणि मला नमस्कार करतात, सदा माझ्याशी संलग्न राहून प्रेमपूर्वक माझी उपासना करतात.’ (गीता ९/१३-१४) इत्यादि श्रुति आणि स्मृतिमध्ये वर्णित लक्षणांनी हेच सिद्ध होत आहे की, आपत्तिकालात काही कारणाने वर्ण, आश्रम आणि शरीर निर्वाहसंबंधी अन्य कर्मांचे पालन पूर्णतया होऊ शकले नाही तरी ही त्या भगवदुपासनाविषयक श्रवण, कीर्तन आदि मुख्य धर्मांचे अनुष्ठान तर कुठल्याहि प्रकारे अवश्य केलेच पाहिजे. भाव हा आहे की, कुठल्याहि अवस्थेत यांच्या अनुष्ठानात शिथिलता येऊ देता कामा नये. संबंध - उक्त धर्मानुष्ठानाची विशेषता दाखवितात. अनभिभवं च दर्शयति ॥ ३.४.३५ ॥ अर्थ - (श्रुति यांचे अनुष्ठान करणार्यांचे); अनभिभवम् = पापांनी अभिभूत न होणे; च = ही; दर्शयति = दाखविते. (यावरून ही हे सिद्ध होत आहे की यांचे अनुष्ठान अवश्य करावयास पाहिजे.) व्याख्या - श्रुतिने म्हटले आहे की, त्या परमात्म्यास प्राप्त करणार्याचा महिमा जाणणार्या ज्या साधकाचे मन शांत असते अर्थात विषय-वासनांनी अभिभूत नाही; ज्याची इंद्रिये वश केलेली आहेत, जो अन्य सर्व क्रियाकलापापासून उपरत आहे, सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक सुख-दुःखांना सहन करण्यास समर्थ तितिक्षु आहे तसेच परमात्म्याच्या स्मरणात तल्लीन आहे, तो आपल्या हृदयात स्थित त्या आत्मस्वरूप परमेश्वराचा साक्षात्कार प्राप्त करतो. म्हणून तो समस्त पापातून तरून जातो, त्यास पापे ताप देऊ शकत नाहीत. उलट तोच पापांना संतप्त करतो, इत्यादि. (बृह.उ.४/४/२३) याप्रकारे श्रुतिमध्ये भगवंताचे भजन-स्मरण करणार्यास पाप त्रास देऊ शकत नाही ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सांगितले गेलेले जे उपासनाविषयक श्रवण, कीर्तन आणि स्मरण आदि धर्म आहेत, त्यांचे अनुष्ठान तर प्रत्येक परिस्थितीमध्ये करत राहिलेच पाहिजे. संबंध - प्रकारान्तराने पुन्हा उपासनाविषयक कर्मानुष्ठानाच्या विशेषतेचे प्रतिपादन करतात. अन्तरा चापि तु तद्दृष्टेः ॥ ३.४.३६ ॥ अर्थ - तु - याशिवाय; अन्तरा = आश्रमधर्माच्या अभावात; च अपि = ही (केवळ उपासनाविषयक अनुष्ठानाने परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते.) तद्दृष्टेः = कारण की श्रुतिमध्ये असे विधान दिसून येते. व्याख्या - श्वेताश्वतरोपनिषद् (१/१४) मध्ये म्हटले आहे - ‘स्वदेहमरणिं कृत्वा प्रणवं चोत्तरारणिम् । ध्याननिर्मथनाभ्यासाद् देवं पश्येन्निगूढवत् ॥’ ‘आपल्या शरीरास खालची अरणि आणि प्रणावास वरील अरणि बनवून ध्यानद्वारा निरंतर मंथन करीत राहिल्याने साधक लपलेल्या अग्निप्रमाणे हृदयात स्थित परमदेव परमेश्वरास पाहतो.’ या कथनानंतर उपर्युक्तरूपाने परमेश्वरात ध्यानाच्या स्थितीसाठी प्रार्थना करणे तसेच त्याच परमात्म्यास शरण जाण्याचे ही वर्णन आहे. (श्वेता.उ.२/१ ते ५) यानंतर असे सांगितले गेले आहे की, ‘हे साधका ! संपूर्ण जगताच्या उत्पादक सर्वान्तर्यामी परमेश्वराच्या प्रेरणेने तुम्ही त्या परब्रह्म परमात्म्याची सेवा-आराधना केली पाहिजे. त्या परमेश्वरास शरण जाऊन त्याच्यातच आपण स्वतःस विलीन करून टाकले पाहिजे. असे केल्याने तुमची पूर्वकृत समस्त संचित कर्मे साधनात विघ्नकारक होणार नाहीत. (श्वेता.उ.२/७) यानंतर याचे फल आत्मा आणि परमात्मा यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार हे सांगितले आहे. (२/१४,१५) याचप्रकारे अन्य श्रुतिंमध्ये ही केवळ उपासनेनेच परमात्म्याची प्राप्ती सांगितली आहे. (श्वेता.उ.४/१७ तसेच ६/२३) यावरून हे सिद्ध होत आहे की, जो अन्य वर्णाश्रमधर्मांचे पालन करण्यास असमर्थ आहे, त्याने केवळ उपासनेच्या धर्मांचे पालन केले तरी त्यास परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. संबंध - ह्या गोष्टीच्या समर्थनासाठी स्मृतिचे प्रमाण देतात. अपि च स्मर्यते ॥ ३.४.३७ ॥ अर्थ - अपि च = याशिवाय, स्मर्यते = स्मृतिमध्येहि ही गोष्ट सांगितली गेली आहे. व्याख्या - गीता आदि स्मृतिमध्ये जे वर्णाश्रमोचित कर्माचे अधिकारी नाहीत, अशा पापयोनि चाण्डालादिकांनाहि भगवंताच्या शरणागतीने परमगतिची प्राप्ती सांगितली गेली आहे. (गीता ९/३२) तेथे भगवंतानी हे स्पष्ट सांगितले आहे की, ‘माझ्या प्राप्तिमध्ये वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, दान तथा नाना प्रकारची क्रिया आणि उग्र तप हेतु नाहीत. केवलमात्र अनन्यभक्तिनेच मी जाणला, दिसला आणि प्राप्त केला जाऊ शकतो. (११/४८,५३,५४) याप्रकारे श्रीमद् भगवद् आदि ग्रंथातहि ठिकठिकाणी या गोष्टींचे समर्थन केले गेले आहे की, वर्ण आणि आश्रम यांच्या मर्यादेरहित मनुष्य केवळ भक्तिने पवित्र होऊन परमात्म्यास प्राप्त करतो. यथा ‘किरातहूणान्ध्रपुलिन्द पुल्कसा आभीरकङ्का यवनाः खसादयः । येऽन्ये च पापा यदुपाश्रयाश्रयाः शुद्ध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः ॥’ ‘किरात, हूण, आन्ध्र, पुलिन्द, पुल्कस, आभीर, कङ्क, यवन, खस आदि तथा अन्य जितके म्हणून पापयोनिचे मानव आहेत, ते सर्व ज्यास शरण गेल्याने शुद्ध होऊन परमात्म्यास प्राप्त होतात, त्या सर्व समर्थ भगवंतास नमस्कार असो.’ (श्रीमद् भागवद् २/४/१८) या सर्व वचनानी हे सिद्ध आहे की, उपासनेसंबंधी धर्मांचे अनुष्ठान परम आवश्यक आहे. संबंध - आता भागवतधर्मानुष्ठानाचे विशेष माहात्म्य सिद्ध करतात. विशेषानुग्रहश्च ॥ ३.४.३८ ॥ अर्थ - च = याशिवाय, विशेषानुग्रहः = भगवंताच्या भक्तिसंबंधी धर्मांचे पालन करण्याने भगवंताचा विशेष अनुग्रह प्राप्त होतो. व्याख्या - वर सांगितलेल्या अन्य सर्व गोष्टी तर भागवतधर्माच्या विशेषतेमध्ये आहेतच. त्याशिवाय, एक विशेष गोष्ट ही आहे की अन्य कुठल्याहि प्रकारच्या धर्म-कर्म आदिचा आश्रय न घेता जो अनन्य भावाने केवळ भगवंताच्या भक्तिचे अनुष्ठान करतो, त्याला भगवंताची विशेष कृपा प्राप्त होत असते. भक्तिचे वर्णन श्रीमद् भागवतात याप्रकारे आले आहे, ‘श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्य मात्मनिवेदनम् ॥’ (७/५/२३) ‘भगवान विष्णूचे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तिचे नऊ भेद आहेत. (यांनाच नवधाभक्ति म्हणतात.) गीतेत भगवंतानी स्वतः सांगितले आहे की, ‘त्या भक्तासाठी मी सुलभ आहे.’ (गीता ८/१४) ‘त्यांचा योगक्षेम मी स्वतः वहन करतो.’ (गीता ९/२२) भगवंतानी आपल्या भक्तांचे महत्त्व सांगून श्रीमद् भागवतात येथपर्यंत सांगितले आहे की, ‘मी सदा भक्तांच्या अधीन राहतो.’ (९/४/६३) याशिवाय, इतिहास, पुराण आणि स्मृतिमध्ये हे वर्णन विशेष रूपाने आढळून येते की भक्तिचे अनुष्ठान करणार्यावर भगवंताची विशेष कृपा होते. हेच कारण आहे की, भगवंताच्या या भक्तवत्सल स्वभावास जाणणारे निरंतर त्यांच्या भजन, स्मरण यात दंग होऊन रहातात. (गीता १५/१९) तथा ते भक्तजन मुक्तिचाहि निरादार करून केवळ भक्तिचीच इच्छा करतात. संबंध - आता अन्य धर्मांपेक्षा भागवतधर्मांच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन करतात. अतस्त्वितरज्यायो लिङ्गाच्च ॥ ३.४.३९ ॥ अर्थ - अतः = वर सांगितल्या गेलेल्या या सर्व कारणामुळे, (हे सिद्ध झाले की) इतरज्यायः = अन्य सर्व धर्मांपेक्षा भगवंताच्या भक्तिविषयक धर्म श्रेष्ठ आहे, तु = याशिवाय, लिङ्गात् = लक्षणांनी (स्मृतिप्रमाणांनी); च = ही (हेच सिद्ध होत आहे.) व्याख्या - वर सांगितलेल्या कारणावरून ही गोष्ट सिद्ध होऊन चुकली आहे की, अन्य सर्व प्रकारच्या धर्मांपेक्षा भगवंताच्या भक्तिविषयक धर्म अधिक श्रेष्ठ आहे. याशिवाय स्मृति-प्रमाणांनी ही ही गोष्ट सिद्ध होत आहे. श्रीमद् भागवतात म्हटले आहे, ‘विप्राद् द्विषड्गुणयुतादरविन्दनाभ पादारविन्दविमुखाच्छ्वपचं वरिष्ठम् । मन्ये तदर्पितमनोवचने हितार्थ प्राणं पुनाति स कुलं न तु भूरिमानः ॥’ ‘बारा प्रकारच्या गुणांनी युक्त ब्राह्मणहि जर भगवान पद्मनाभाच्या चरणकमलांपासून विमुख असेल तर त्याच्यापेक्षा त्या चाण्डालास मी श्रेष्ठ मानतो; ज्याचे मन, धन, वचन, कर्म आणि प्राण परमात्म्यास अर्पित आहेत, कारण की तो भक्त चांडाळ आपल्या भक्तिच्या प्रतापाने सारे कुळ पवित्र करू शकतो, परंतु तो खूप मान असणारा ब्राह्मण असे करू शकत नाही.’ (७/९/१०) ‘अहो बत श्वपचोऽतो गरीयान् यज्जिह्वाग्रे वर्तते नाम तुभ्यम् । तेपुस्तपस्ते जुहुवुः सस्रुरार्या ब्रह्मानूचूर्नाम गृणन्ति ये ते ॥’ ‘अहो ! आश्चर्य आहे की, ज्याच्या जिह्वेवर तुमचे पवित्र नाम रहात असते, तो चाण्डालहि श्रेष्ठ आहे; कारण की जे तुमच्या नामाचे कीर्तन करतात, त्या श्रेष्ठ पुरुषांनी तप, यज्ञ, तीर्थस्थाने, वेदाध्ययन आदि सर्व काही केले आहे.’ (श्रीमद् भागवत ३/३३/७) याप्रकारे ठिकठिकाणी भगवंताच्या भक्तांची लक्षणे सांगून वर्ण-आश्रम आदिच्या धर्माचे पालन करणार्यांपेक्षा त्यांच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन केले गेले आहे. संबंध - याप्रकारे उपासना-विषयक श्रवण, कीर्तन आदि विशेष धर्माचे महत्त्व दाखविले गेले आहे. आता ही जिज्ञासा होत आहे की, जर कोणी मनुष्य काही कारणामुळे आश्रमाचा व्यतिक्रम करू इच्छील तर तो करू शकतो की नाही ? जर करेल तर त्याचे व्यक्तित्व कसे मानले गेले पाहिजे ? इत्यादि. म्हणून या विषयाचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात. तद्भुतस्य नातभ्दावो जैमिनेरपि नियमातद्रूपाभविभ्यः ॥ ३.४.४० ॥ अर्थ - तद्भुतस्य = उच्च आश्रमात स्थित मनुष्याचा; तु = तर, अतद्भावः = त्यास सोडून पूर्व आश्रमात परत येणे, न = बनू शकत नाही, नियमातद्रूपाभावेभ्यः = कारण की, शास्त्रात उलट परत न येण्याचाच नियम आहे, श्रुतिमध्ये आश्रम बदलण्याचा जो क्रम सांगितला गेला आहे, त्याहून हे विपरीत आहे आणि याप्रकारचा शिष्टाचारहि नाही आहे; जैमिनेः अपि = जैमिनि ऋषींची ही अशीच संमति आहे. व्याख्या - जे चतुर्थाश्रम ग्रहण करून चुकले आहेत, त्यांचे पुन्हा गृहस्थाश्रमात परत येणे शास्त्रसम्मत नाही आहे. याचप्रकारे वानप्रस्थाचाहि पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश उचित नाही आहे; कारण की श्रेष्ठ (उच्च) आश्रमात जाऊन पुन्हा परतण्याचा श्रुति-स्मृतिमध्ये निषेध आहे. तथा आश्रम बदलण्याचा जो क्रम श्रुतिमध्ये सांगितला गेला आहे तो याप्रकारे आहे. ‘ब्रह्मचर्यं परिसमाप्य गृही भवेत् । गृही भूत्वा वनी भवेत् । वनी भूत्वा प्रव्रजेत् । यदि वेतरथा ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेद् गृहाद् वा वनाद् वा ।’ ‘ब्रह्मचर्यास पूरे करून गृहस्थ व्हावे, गृहस्थानंतर वानप्रस्थ व्हावे, आणि वानप्रस्थानंतर संन्यास घ्यावा अथवा दुसर्या प्रकाराने म्हणजेच ब्रह्मचर्य अथवा गृहस्थ अथवा वानप्रस्थ आश्रमांतून संन्यास घ्यावा.’ (जाबाल.उ.४) म्हणून उलटे परतणे या क्रमाच्या विपरीत आहे. याशिवाय याप्रकारचा शिष्टाचार ही नाही. या सर्व कारणांनी जैमिनी ऋषिंचीही हीच सम्मति आहे की उच्च आश्रमातून पुन्हा परतणे शक्य नाही. म्हणून हेच सिद्ध झाले की वेद आणि श्रुतिमध्ये जे आश्रमातून दुसर्या आश्रमात प्रवेश करण्याची रीत सांगितली गेली आहे, ती सोडून आश्रमाचा व्यतिक्रम करणे कुठल्याहि प्रकारे न्यायसंगत नाही आहे. संबंध - याप्रकारचा मनुष्य प्रायश्चित्त घेऊन तर शुद्ध होऊन जातो का ? या जिज्ञासेवर सांगतात. न चाधिकारिकमपि पतनानुमानात्तदयोगात् ॥ ३.४.४१ ॥ अर्थ - च = याशिवाय, आधिकारिकम् = प्रायश्चिताचे अधिकारी असलेल्या अन्य आश्रमाच्या लोकासाठी जे प्रायश्चित्त सांगितले गेले आहे ते; अपि = ही, न = त्याच्यासाठी विहित नाही आहे, पतनानुमानात् = कारण की स्मृतिमध्ये त्याचे महान पतन मानले गेले आहे, तदयोगात् = म्हणून तो प्रायश्चित्तास उपयुक्त (योग्य) रहात नाही. व्याख्या - ब्रह्मचर्य आश्रमात जर ब्रह्मचर्याचे व्रत भंग झाले तर वेद आणि स्मृतिमध्ये त्याचे प्रायश्चित्त सांगितले गेले आहे. (मनु.२/१८१) तथा गृहस्थही ऋतुकालादि नियमपालन भंग करील तर त्याचेहि प्रायश्चित्त आहे; कारण की, ते प्रायश्चित्ताचे अधिकारी आहेत; परंतु ज्यांनी वानप्रस्थ वा संन्यास आश्रम स्वीकारला, ते जर पुन्हा गृहस्थाश्रमात परत येऊन स्त्रीप्रसंगादि मध्ये प्रवृत्त होऊन पतित झाले तर त्यांच्यासाठी शास्त्रात कुठल्याहि प्रकारच्या प्रायश्चित्ताचे विधान नाही; कारण की, स्मृतिमध्ये त्यांचे अतिशय पतन मानले गेले आहे. म्हणून ते प्रायश्चित्ताचे अधिकारी रहात नाहीत; जैमिनी आचार्यांची ही सूत्रकाराच्या मतानुसार हीच सम्मति आहे की, त्यांच्यासाठी प्रायश्चित्ताचे विधान नाही आहे. संबंध - यावर अन्य आचार्यांचे मत सांगतात. उपपूर्वमपि त्वेके भावमशनवत्तदुक्तम् ॥ ३.४.४२ ॥ अर्थ - एके = कोणी एक आचार्य; तु = तर, उपपूर्वम् = यास उपपातक; अपि = ही मानतात (म्हणून ते); अशनवत् = भोजनाच्या नियमभंगाच्या प्रायश्चित्ताप्रमाणे; भावम् = याच्यासाठीही प्रायश्चित्ताचा भाव मानतात; तदुक्तम् = ही गोष्ट शास्त्रात सांगितली गेली आहे. (असेही त्यांचे म्हणणे आहे.) व्याख्या - काही आचार्यांचे म्हणणे आहे की, ज्याप्रकारे ब्रह्मचारी आपल्या व्रतापासून भ्रष्ट होऊन प्रायश्चित्ताचा अधिकारी होतो, त्याप्रमाणेच वानप्रस्थी आणि संन्यासी यांनाहि प्रायश्चित्तात अधिकार आहे, कारण की हे महापातक नाही आहे. परंतु उपपातक आहे. आणि उपपातकाच्या प्रायश्चित्ताचे शास्त्रात विधानहि आहे. म्हणून अभक्ष्य भक्षणादिच्या प्रायश्चित्ताप्रमाणे याचेहि प्रायश्चित अवश्य झाले पाहिजे. संबंध - यावर आचार्य आपली सम्मति सांगतात. बहिस्तूभयथापि स्मृतेराचाराच्च ॥ ३.४.४३ ॥ अर्थ - तु = परंतु; उभयथापि = दोन्ही प्रकारानेहि, बहिः = तो अधिकारापासून बहिष्कृत आहे, स्मृतेः = कारण की, स्मृतिप्रमाणाने, च = आणि, आचारात् = शिष्टाचाराने ही (हीच गोष्ट सिद्ध होत आहे,) व्याख्या - ते उच्च आश्रमापासून पतित झालेले संन्यासी, आणि वानप्रस्थी लोक महापातकी असोत अथवा उपपातकी, दोन्ही प्रकाराने ही शिष्ट संप्रदाय आणि वैदिक ब्रह्मविद्येच्या अधिकारापासून सर्वथा बहिष्कृत आहेत, कारण की, स्मृति-प्रमाण आणि शिष्टांच्या आचार-व्यवहारावरून हीच गोष्ट सिद्ध होत आहे. त्यांचे पतन भोगांच्या आसक्तीनेच होते. म्हणून ते ब्रह्मविद्येचे अधिकारी नाहीत. श्रेष्ठ पुरुष त्यांच्याबरोबर यज्ञ, स्वाध्याय आणि विवाह आदि संबंध ही करत नाहीत. संबंध - याप्रकारे उच्च आश्रमापासून भ्रष्ट झालेल्या द्विजांना विद्येमध्ये अधिकार नाही हे सिद्ध केले गेले. आता जी कर्मांच्या अंगभूत उद्गीथ आदि मध्ये उपासना केली जाते तिचा कर्ता यजमान असतो की कर्म करणारा ऋत्विक् यावर विचार करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. स्वामिनः फलश्रुतेरित्यात्रेयः ॥ ३.४.४४ ॥ अर्थ - स्वामिनः = त्या उपासनेत यजमानाचे कर्तेपण असते; इति = असे, आत्रेयः = आत्रेय मानतात; फलश्रुतेः = कारण की श्रुतिमध्ये यजमानासाठीच फलाचे वर्णन केले गेले आहे. व्याख्या - आत्रेय ऋषि मानतात की, श्रुतिमध्ये ‘जो या उपासनेला याप्रकारे जाणतो, तो पुरुष वृष्टिमध्ये पाच प्रकारच्या सामाची उपासना करतो, त्याच्यासाठी वर्षा होते, तो वर्षा करविण्यास समर्थ होतो.’ (बृह.उ.२/३/२) बृहदारण्यकोपनिषदात प्रस्तोताद्वारा केल्या जाणार्या अनेक प्रार्थनांचा उल्लेख करून शेवटी उद्गात्याचे कर्म सांगून म्हटले आहे की, ‘उद्गाता आपल्या अथवा यजमानासाठी ज्याची कामना करतो त्याचे आगान करतो.’ (बृह.उ.१/३/३८) याप्रकारे फलाचे वर्णन करणार्या श्रुतिंनी सिद्ध होते की, यज्ञाच्या स्वामीला त्याचे फल मिळते. थोडक्यात या फलकामनायुक्त उपासनांचे कर्तेपण ही स्वामीचे अर्थात यजमानाचेच असणे उचित आहे. संबंध - यावर दुसर्या आचार्यांचे मत सांगतात. आर्त्त्विज्यमित्यौडुलोमिस्तस्मै हि परिक्रीयते ॥ ३.४.४५ ॥ अर्थ - आर्त्त्विज्यम् = कर्तेपण ऋत्विकाचे आहे; इति = असे; औडुलोमिः = औडुलोमि आचार्य मानतात, हि = कारण की, तस्मै = त्या कर्मासाठी; परिक्रीयते = तो ऋत्विक यजमानद्वारा धनदानादिनी वरण केला जात असतो. व्याख्या - आचार्य औडुलोमि असे मानतात की, कर्तेपण यजमानाचे नाही परंतु ऋत्विकाचेच आहे; तथापि फल यजमानास मिळते; कारण की, तो ऋत्विक त्या कर्मासाठी यजमानद्वारा धनदानादिने वरण केला गेलेला असतो; म्हणून दात्याकडून दिल्या गेलेल्या दक्षिणेचाच तो अधिकारी आहे, त्याच्या फलात अधिकार नाही. संबंध - सूत्रकार श्रुतिप्रमाणाने आपली सम्मति प्रकट करतात. श्रुतेश्च ॥ ३.४.४६ ॥ अर्थ - श्रुतेः = श्रुतिप्रमाणाने; च = ही (औडुलोमिचेच मत उचित सिद्ध होत आहे.) व्याख्या - यज्ञाचा ऋत्विक जी काही कामना करतो ती निःसंदेह यजमानासाठीच करतो. (शत.१/३/१/१/६) म्हणून याप्रकारे जाणणारा उद्गाता यजमानास म्हणेल की, ‘मी तुझ्यासाठी कुठल्या कुठल्या भोगांचे आगान करू ?’ (छां.उ.१/७/८) इत्यादि श्रुतिंनी ही कर्माचे कर्तेपण ऋत्विकाचे आणि फलात अधिकार यजमानाचा हे सिद्ध होत आहे. संबंध - याप्रकारे प्रसंगानुसार सकाम उपासनेचे फल आणि कर्तेपण यांचा निर्णय केला गेला. आता ब्रह्मविद्येचा अधिकार कुठल्या एक आश्रमात आहे अथवा सर्व आश्रमांत ? या गोष्टीचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. सहकार्यन्तरविधिः पक्षेण तृतीयं तद्वतो विध्यादिवत् ॥ ३.४.४७ ॥ अर्थ - तद्वतः = ब्रह्मविद्यासंबंधी साधनयुक्त साधकासाठी, तृतीयम् = बालपणा आणि पांडित्याबरोबर सांगितलेले जे तीसरे मौन साधन आहे, ते विधेय आहे; सहकार्यन्तरविधिः = (कारण की) त्याचे दुसर्या सहकारी साधनाच्या रूपात विधान आहे, विध्यादिवत् = दुसर्या स्थळी सांगितलेल्या विधिवाक्याप्रमाणे; पक्षेण = एका पक्षास धरून हा ही विधि आहे. व्याख्या - कहोलाने याज्ञवल्क्यास साक्षात् परब्रह्माचे स्वरूप विचारले, त्याच्या उत्तरात याज्ञवल्क्यांनी सर्वांचा अंतरात्मा परमात्म्याचे स्वरूप संकेताने सांगून म्हटले की, ‘जो शोक, मोह, भूक, तहान, म्हातारपण आणि मृत्यूच्या अतीत आहे तो परमात्मा आहे, या परमात्म्यास जाणून ब्राह्मण पुत्रकामना धनकामना तथा मानसन्मान आणि स्वर्गसंबंधी लोककामनेपासून विरक्त होऊन भिक्षेने निर्वाह करणार्या मार्गाने विचरतात.’ यानंतर या तीनही कामनांची एकता करून कामनामात्रास त्याज्य सांगितले आणि शेवटी म्हटले की, ‘तो ब्राह्मण या पांडित्यास उत्तमप्रकारे जाणून बाल्य भावाने रहाण्याची इच्छा करतो, नंतर त्यापासूनहि उपरत होऊन मुनि होऊन जाईल अर्थात ब्रह्मास उत्तमप्रकारे प्राप्त होतो.’ इत्यादि. (बृह.उ.३/५/१) या प्रकरणात संन्यासाश्रमात परमात्म-प्राप्तीचे वर्णन केले गेले आहे. या वर्णनात पाण्डित्य आणि बाल्यभावाच्या अंती तर ‘तिष्ठासेत्’ (स्थित रहाण्याची इच्छा करावी) हे विधिवाक्य आहे, परंतु मुनि शब्दाच्या नंतर काही विधि नाही आहे; म्हणून सूत्रकारांचे म्हणणे आहे की, ज्याप्रकारे अन्यत्र सांगितलेल्या वचनात स्पष्ट विधिका प्रयोग नसल्याने सहकारी भावाने एकासाठी प्रयुक्त विधिवाक्य दुसर्यासाठी ही मानले जाते, तसेच येथे ही पाण्डित्य आणि बाल्यभाव या दोन सहकारी साधनांनी युक्त साधकाप्रति त्यांच्याबरोबर सांगितलेले तिसरे साधन मुनिभावासाठी ही विधिवाक्याचा प्रयोग पक्षांतराने समजून घेतला पाहिजे. ध्यानात ठेवा, या प्रकरणात आलेल्या बाल्यभावाने तर दंभ, मान आदि विकारांचा अभाव दाखविला गेला आहे आणि मननशीलतेस मौन म्हटले आहे. म्हणून ब्रह्माचे शास्त्रीय ज्ञान (पांडित्य) वरील विकारांचा अभाव (बाल्यभाव) आणि निरंतर मनन तथा निदिध्यासन (मौन) या तीन्हीची परिपक्व अवस्था झाल्यावरच ब्रह्मसाक्षात्कार होतो, हाच या प्रकरणाचा भाव आहे. संबंध - पूर्वसूत्रात ज्या प्रकरणावर विचार केला गेला, तो संन्यासाश्रमाचा द्योतक आहे, म्हणून ही जिज्ञासा होते की, संन्यासाश्रमातच ब्रह्मविद्येचे साधन होऊ शकते अथवा अन्य आश्रमातहि त्याचा अधिकार आहे. जर संन्यासाश्रमातच त्याचे साधन होऊ शकत असेल तर (छां.उ.८/१५/१च्या) श्रुतित गृहस्थाश्रमाबरोबर ब्रह्मविद्येचे प्रकरण का समाप्त केले गेले ? तेथील वर्णनाने तर गृहस्थाचा ही अधिकार स्पष्टरूपाने सूचित होत आहे, म्हणून याचा निर्णय करण्यासाठी सांगतात. कृत्स्नभावात्तु गृहिणोपसंहारः ॥ ३.४.४८ ॥ अर्थ - कृत्स्नभावात् = गृहस्थ आश्रमात संपूर्ण आश्रमांचा भाव आहे म्हणून, तु = ही; गृहिणा = (त्या प्रकरणात) गृहस्थाश्रमाबरोबर, उपसंहारः = ब्रह्मविद्या प्रकरणाचा उपसंहार केला गेला आहे. व्याख्या - गृहस्थ-आश्रमाचा चारी आश्रमांचा भाव आहे, कारण की, ब्रह्मचारीही गृहस्थाश्रमात स्थित गुरुजवळच ब्रह्मचर्यव्रताचे पालन करतो, वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे मूळ गृहस्थच आहे. याप्रकारे चारी आश्रमांचा गृहस्थात अंतर्भाव आहे आणि ब्रह्मविद्येचा अधिकार सर्व आश्रमामध्ये आहे, हा ही श्रुतिचा अभिप्राय आहे, म्हणून तेथे त्या प्रकरणाचा गृहस्थाच्या वर्णनाबरोबरच उपसंहार केला गेला, तथा पूर्व प्रकरणात जो संन्यासाश्रमाचा संकेत आहे, तो साधनांच्या सुगमतेस लक्ष्य करून सांगितले गेले आहे; कारण कुठल्याहि आश्रमात स्थित साधकास ब्रह्मज्ञानसंपादनासाठी पुत्रैषणा आदि सर्व प्रकारच्या कामना आणि रागद्वेषादि विकारांचा सर्वथा नाश करून मननशील तर व्हावेच लागेल. दुसर्या आश्रमात विघ्नांची अधिकता आहे आणि संन्यासाश्रमात स्वभावतः त्यांचा अभाव आहे. ही सुगमता दृष्टि समोर ठेवून तसे सांगितले गेले आहे, अन्य आश्रमामध्ये ब्रह्मविद्येच्या अधिकाराचा निषेध करण्यासाठी नाही. संबंध - प्रकारान्तराने पुन्हा सर्व आश्रमामध्ये ब्रह्मविद्येचा अधिकार सिद्ध केला जात आहे. मौनवदितरेषामप्युपदेशात् ॥ ३.४.४९ ॥ अर्थ - इतरेषाम् = अन्य आश्रमवाल्यासाठी; अपि = ही, मौनवत् = मननशीलाप्रमाणे; उपदेशात् = (विद्योपयोगी सर्व साधनांचा) उपदेश असल्याने (सर्व आश्रमात ब्रह्मविद्येचा अधिकार सिद्ध होत आहे.) व्याख्या - ज्याप्रकारे पूर्व प्रकरणात मननशीलता (मौन) रूप साधनाचे सर्वांसाठी विधान सांगितले गेले आहे, त्याचप्रकारे श्रुतिमध्ये अन्य आश्रमवाल्यासाठी ही विद्योपयोगी सर्व साधनांचा उपदेश दिला गेला आहे. जसे - ‘याप्रकारे ब्रह्मवेत्त्याचा महिमा जाणणारा शांत (मनास वश करणारा मननशील), दान्त (इंद्रिय समुदायास वश करणारा), उपरत (भोगांपासून संबंधरहित), तितिक्षु (सुख-दुःखामुळे विचलित न होणारा) आणि समाहित (ध्यानस्थ) होऊन आपल्यातच त्या सर्वांचे आत्मस्वरूप अशा परमात्म्याचा साक्षात्कार करतो.’ (बृह.उ.४/४/२३) अशीच गोष्ट दुसर्या प्रकरणातहि सांगितली गेली आहे. यावरून हेच सिद्ध होत आहे की, ब्रह्मविद्येचा अधिकार सर्व आश्रमात आहे. संबंध - सेहेचाळिसाव्या सूत्राच्या प्रकरणात जी बाल्यभावात स्थित होण्याची गोष्ट सांगितली गेली आहे, त्यात बालकाच्या कोणत्या भावांचे ग्रहण आहे हे स्पष्ट करण्यासाठी सांगतात. अनाविष्कुर्वन्नन्वयात् ॥ ३.४.५० ॥ अर्थ - अनाविष्कुर्वन् = आपल्या गुणांना प्रकट न करता बालकाप्रमाणे दंभ आणि अभिमान रहित होणे; अन्वयात् = कारण की अशा भावांचाच ब्रह्मविद्येशी संबंध आहे. व्याख्या - आपल्या गुणांना प्रकट न करता बालकाच्या भावाचा स्वीकार करण्यासाठी श्रुतिचे सांगणे आहे म्हणून जसे बालकाच्या ठिकाणी मान, दंभ, तथा राग, द्वेष आदि विकारांचा प्रादुर्भाव नाही, तसेच गुणांचा अभिमान अथवा त्यांना प्रकट करण्याचा भावही नाही. त्याचप्रकारे त्या विकाररहित होणेच येथे बाल्यभाव आहे. अपवित्र भक्षण, आचारहीनता, अशौच आणि स्वेच्छाचारिता आदि निषिद्ध भावांचे ग्रहण करणे येथे अभीष्ट नाही; कारण की, विद्येच्या सहकारी साधनरूपाने श्रुतिमध्ये बाल्यभावाचा उल्लेख आला आहे. म्हणून त्याच्या उपयोगी भावच घेतले जाऊ शकतात, विरोधी भाव नाही. यावरून श्रुतिचा हा ही भाव कळून येतो की, ब्रह्मविद्येचा साधक बालकाप्रमाणे आपल्या गुणांचे प्रदर्शन न करता दंभ, अभिमान तथा राग-द्वेष आदिहून रहित होऊन विचरो. संबंध - येथपर्यंत हा निश्चय केला गेला की सर्व आश्रमांमध्ये ब्रह्मविद्येचा अधिकार आहे. आता ही जिज्ञासा होत आहे की, शास्त्रात जे ब्रह्मविद्येचे फल जन्म-मृत्यू आदि दुःखातून सुटणे आणि परमात्म्याची प्राप्ती होणे सांगितले गेले आहे, ते याच जन्मात प्राप्त होते का जन्मांतरी ? यावर सांगतात. ऐहिकमप्यप्रस्तुतप्रतिबन्धे तद्दएशनात् ॥ ३.४.५१ ॥ अर्थ - अप्रस्तुतप्रतिबन्धे = कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध उपस्थित झाला नाही तर; ऐहिकम् = याच जन्मात ते फल प्राप्त होऊ शकते; अपि = (प्रतिबंध झाल्यावर) जन्मांतरातही होऊ शकते; तद्दर्शनात् = कारण हीच गोष्ट श्रुति आणि स्मृतिमध्ये दिसून येते. व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की गर्भांत स्थित वामदेव ऋषींना ब्रह्मभावाची प्राप्ति झाली होती. (ऐ. उ. २.५) भगवद्गीतेत म्हटले आहे ’न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति । - कल्याणमय कर्म, अर्थात् परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधन करणारांची कधी दुर्गति होत नाही.’ (गी ६.४०) परंतु तो दुसर्या जन्मांत पूर्वजन्मसंबंधी शरीरद्वारा प्राप्त केलेल्या बुद्धीने युक्त होतो आणि पुन्हा परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनात मग्न होतो. (गीता ६.४३) याप्रकारे श्रुति आणि स्मृति यांच्या प्रमाणांना पाहिल्यास हेच सिद्ध होते की जर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध उपस्थित झाला नाही तर मग या जन्मातच त्यांना मुक्तिरूप फलाची प्राप्ती होते आणि जर काही विघ्न आले तर जन्मांतरात ते फल मिळते. तथापि हे निश्चित आहे की केलेला अभ्यास व्यर्थ जात नाही. संबंध - उपर्युक्त ब्रह्मविद्येचे मुक्तीरूप फल कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध राहिला नाही तर ज्या साधकांना याच जन्मांत मिळते, त्यास ते मृत्यूलोकातच मिळते की लोकांतरात जाऊन मिळते ? या जिज्ञासेवर सांगतात - एवं मुक्तिफलानियमस्तदवस्थावधृतेस्तदवस्थावधृतेः ॥ ३.४.५२ ॥ अर्थ - एवं = याप्रकारे; मुक्तिफलानियमः = कुठल्याही एका लोकातच मुक्तिरूप फल प्राप्त होईल असा नियम नाही; तदवस्थावधृतेः = त्याची अवस्था निश्चित केली गेली आहे. (द्विरुक्ती अध्यायाची समाप्ति सूचित करण्यासाठी आहे.) व्याख्या - ब्रह्मविद्येपासून मिळणार्या मुक्तरूप फलाविषयी ज्या प्रकारे असा नियम नाही की ’ते याच जन्मांत मिळते की जन्मांतरी’. त्याचप्रकारे त्याविषयी असाही नियम नाही की ते या लोकी मिळते वा ब्रह्मलोकी ! कारण जेव्हां याच्या हृदयात सर्व कामनांचा सर्वथा अभाव होतो तेव्हां साधक अमृत होतो आणि येथेच ब्रह्मास प्राप्त होतो. (क. उ. २.३.१४) इत्यादि वचनांच्या द्वारा मुक्तावस्थेचे स्वरूप निश्चित केले जेले आहे. म्हणून ज्यास ती स्थिती शरीर असेपर्यंत प्राप्त होते तो येथेच परमात्म्यास प्राप्त होतो; आणि ज्याची तशी अवस्था येथे होत नाही तो ब्रह्मलोकात जाऊन परमात्म्यास प्राप्त होतो. येथे तिसर्या अध्यायातील चवथा पाद पूर्ण झाला. |