ब्रह्मसूत्र

अध्याय तिसरा

पाद तिसरा

संबंध - दुसर्‍या पादात जीवाची स्वप्नावस्था एवं सुषुप्ती-अवस्थेचे वर्णन करून परब्रह्म परमेश्वराच्या स्वरूपाविषयी हा निर्णय केला गेला की, तो निर्गुण-सगुण दोन्ही लक्षणांनी युक्त आहे. तत्पश्चात त्या परब्रह्म परमेश्वराचा आपल्या शक्तिस्वरूप परा आणि अपरा प्रकृतिशी कशा प्रकारे अभेद आहे आणि कशा प्रकारे भेद आहे, याचे निरूपण केले गेले आहे. आणि नंतर शेवटी हे निश्चित केले गेले की, जीवांच्या कर्मफलाची व्यवस्था करणारा एकमात्र तो परब्रह्म परमेश्वरच आहे. आता वेदान्तवाक्यांमध्ये ज्या एकाच आत्मविद्येचे अनेक प्रकारांनी वर्णन केले गेले आहे, त्याची एकता सांगण्यासाठी तसेच नाना ठिकाणी आलेल्या भगवत्प्राप्तिविषयक भिन्न भिन्न वाक्यातील विरोध दूर करून त्यांच्या एकतेचे प्रतिपादन करण्यासाठी ह्या तिसर्‍या पादाचा आरंभ केला जात आहे.


सर्ववेदान्तप्रत्ययं चोदनाद्यविशेषात् ॥ ३.३.१ ॥


अर्थ - सर्ववेदान्तप्रत्ययम् = समस्त उपनिषदात जे अध्यात्मविद्येचे वर्णन आहे त्या सर्वामध्ये विधि-वाक्यांची एकता आहे अर्थात सर्व विद्यांच्या द्वारा एकमात्र त्या परब्रह्म परमात्म्यालाच जाणण्यासाठी सांगितले गेले आहे तसेच सर्वांचे फल त्याची प्राप्ती सांगितले गेले आहे, म्हणून त्या सर्वांची एकता आहे.


व्याख्या - ‘ओमित्येतदक्षरमुद्‌गीथमुपासीत ।’ (छां.उ.१/४/१) ‘ॐ हे अक्षर उद्‌गीथ आहे, याप्रकारे त्याची उपासना करावी. इत्यादि वाक्यांनी प्रतीकोपासनेचे वर्णन करून तिच्या द्वारे त्या परब्रह्मास लक्ष्य केले गेले आहे आणि कोठे ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्मं’ ‘ब्रह्म सत्य, ज्ञानस्वरूप आणि अनंत आहे.’ (तै.उ.२/१) ‘हेच सर्वेश्वर, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, सर्वांचे परम कारण, सर्व प्राण्यांच्या उत्पत्ति आणि प्रलयाचे स्थान आहे.’ (मां.उ.६) याप्रकारे विधिमुखाने त्याचा कल्याणमय दिव्य लक्षणांद्वारा त्यास लक्ष्य केले गेले आहे. तथा कोठे ‘शब्दरहित, स्पर्शरहित, रूपरहित, रसरहित आणि गंधरहित तथा अविनाशी, नित्य, अनादि, अनंत (सीमारहित), सर्वश्रेष्ठ (क.उ.१/३/१५) याप्रकारे समस्त प्राकृत जड आणि चेतन पदार्थाहून भिन्न म्हणून त्याचे लक्ष्य केले गेले आहे. आणि शेवटी असे म्हटले आहे की, याची प्राप्ती करून उपासक जन्म-मरणापासून सुटून जातो. या सर्व वर्णनाचा उद्देश्य एकमात्र त्या परब्रह्म परमात्म्यास लक्ष्य करवून त्याची प्राप्ती करवून देणे हा आहे. सर्व ठिकाणी प्रकारभेदाने त्या परमात्म्याचेच चिंतन करावयास सांगितले गेले आहे. म्हणून विधि आणि साध्याची एकता असल्यामुळे साधनरूप विद्यांमध्ये वास्तविक भेद नाही, अधिकार्‍याच्या भेदाने प्रकारभेद आहे. याशिवाय भिन्न शाखा असणार्‍यांच्या द्वारा वर्णित एकाच प्रकाराच्या वैश्वानर आदि विद्यांमध्ये अंशिक भेद दाखविला जातो, यावरून ही विद्यांमध्ये भेद समजता कामा नये, कारण की, त्यांच्यामध्ये सर्वत्र विधिवाक्य आणि फलाची एकता आहे, म्हणून त्यांच्यामध्ये काहीही वास्तविक भेद नाही.
संबंध - वर्णन शैलीमध्ये काही भेद असूनहि विद्येमध्ये भेद मानता कामा नये, याचे प्रतिपादन करतात.


भेदान्नेति चेन्नैकस्यामपि ॥ ३.३.२ ॥


अर्थ - चेत् = जर असे म्हणाल की, भेदात् = त्या स्थळांच्या वर्णनात भेद आहे, म्हणून, न = एकता सिद्ध होत नाही, इति न = तर असे म्हणणे ठीक नाही कारण की; एकस्याम् = एका विद्येमध्ये, अपि = ही, (याप्रकारे वर्णनात भेद असणे अनुचित नाही आहे.)


व्याख्या - जगताच्या कारणास ब्रह्म म्हटले गेले आहे आणि तेच उपास्य असायला हवे. परंतु कोठे तर ‘जगताच्या उत्पत्तिच्या पूर्वी एक सत् च होते, त्याने इच्छा केली की, मी अनेक होईन, त्याने तेज उत्पन्न केले.’ (छां.उ.६/२/१-३) याप्रकारे जगताची उत्पत्ति सत्‌पासून सांगितली आहे. कोठे ‘प्रथम हा आत्माच होता, दुसरा कोणीही चलनवलन करणारा नव्हता, त्याने इच्छा केली की, मी लोकांची रचना करीन.’ (ऐ.उ.१/१) याप्रकारे जगताची उत्पत्ति आत्म्यापासून सांगितली आहे, कोठे ‘आनन्दमयाचे वर्णन करून नंतर त्यापासून सर्व जगताची उत्पत्ति दाखविली आहे. तेथे कुठल्याहि प्रकारच्या क्रमाचे वर्णन केलेले नाही. (तै.उ.२/६-७) कोठे आत्मापासून आकाशादिच्या क्रमाने जगताची उत्पत्ति सांगितली आहे. (तै.उ.२/१) कोठे रयि आणि प्राण या दोहोंच्या द्वारा जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले आहे. (प्र.उ.१/४) तसेच कोठे ‘हे त्यावेळी अप्रकट होते नंतर प्रकट झाले.’ (बृह.उ.१/४/७) असे म्हणून अव्यक्तापासून जगताची उत्पत्ति सांगितली आहे. याप्रकारे भिन्न भिन्न कारणांपासून आणि भिन्न भिन्न क्रमाने जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले गेले आहे. या सर्व वेदवाक्यांची एकता होऊ शकत नाही. याप्रकारे दुसर्‍या विषयातही समजले पाहिजे. असे जर कुणी म्हणेल तर हे ठीक नाही, कारण की येथे सर्व श्रुतिंचा अभिप्राय जगताच्या उत्पत्तिच्या पूर्वी त्याच्या कारणरूप एक परमेश्वरास दाखविणे हे आहे. त्यालाच ‘सत्’ नामाने उल्लेखिले आहे तसेच ‘आत्मा’ ‘आनन्दमय’ ‘प्रजापति’ आणि ‘अव्याकृत’ नामाने ही वर्णन केले गेले आहे. याप्रकारे एकाच तत्त्वाचे प्रतिपादन करणार्‍या एका विद्येमध्ये वर्णनात भेद असणे अनुचित नाही आहे, उद्देश्य आणि फल एक असल्याने त्या सर्वांची एकताच आहे.
संबंध - मुण्डकोपनिषदात म्हटले आहे की, ‘ज्यांनी शिरोव्रताचे अर्थात शिरावर जटा धारण पूर्वक ब्रह्मचर्यव्रताचे विधिपूर्वक पालन केले असेल, त्यांनाच या ब्रह्मविद्येचा उपदेश दिला पाहिजे.’ (३/२/१०) परंतु दुसर्‍या शाखेच्या लोकांनी असे म्हटलेले नाही म्हणून या आथर्वणशाखेमध्ये सांगितलेल्या ब्रह्मविद्येचा अन्य शाखामध्ये सांगितलेल्या ब्रह्मविद्येशी अवश्य भेद असला पाहिजे.’ अशी शंका आल्यावर सांगतात.


स्वाध्यायस्य तथात्वेन हि समाचारेऽधिकाराच्च सववच्च तन्नियमः ॥ ३.३.३ ॥


अर्थ - स्वाध्यायस्य = हे शिरोव्रताचे पालन अध्ययनाचे अंग आहे; हि = कारण की, समाचारे = आथर्वणशाखेच्या लोकांच्या परंपरागत शिष्टाचारात; तथात्वेन = अध्ययनाच्या अंगरूपानेच त्याचे विधान आहे, च = तथा; अधिकारात् = त्या व्रताचे पालन करणार्‍याचाच ब्रह्मविद्या अध्ययनात अधिकार असल्यामुळे; च = ही, सववत् = ‘सव’ होमाप्रमाणे; तन्नियमः = हा शिरोव्रताचा नियम आथर्वण शाखेच्या लोकांसाठीच आहे.


व्याख्या - आथर्वण-शाखेचे उपनिषद (मु.उ.३/२/१०) मध्ये सांगितले गेले आहे की, ‘तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद् यैस्तु चीर्णम् ।’ ‘त्यांना या ब्रह्मविद्येचा उपदेश करायला हवा, ज्यांनी विधिपूर्वक शिरोव्रताचे पालन केले आहे.’ उक्त शाखेच्या लोकांसाठी जो शिरोव्रताचे पालन करण्याचा नियम केला गेला आहे; तो विद्येच्या भेदामुळे नाही, अपितु त्या शाखेच्या लोकांच्या अध्ययन-विषयक परंपरागत आचारांतच हा नियम चालत आला आहे की जो शिरोव्रताचे पालन करतो, त्याला उक्त ब्रह्मविद्येचा उपदेश केला पाहिजे. त्याचा त्यात अधिकार आहे. ज्याने शिरोव्रताचे पालन केलेले नाही, त्याचा त्या ब्रह्मविद्येच्या अध्ययनात अधिकार नाही. ज्याप्रकारे ‘सव’ होमाचा नियम केवळ त्यांच्याच शाखेच्या लोकांसाठी आहे, तसाच हा शिरोव्रताच्या पालनाचा नियम त्यांच्याच शाखेच्या लोकांसाठी आहे. याप्रकारे हा नियम केवळ अध्ययनाध्यापनाच्या विषयीच असल्यामुळे याच्यामुळे ब्रह्मविद्येच्या एकतेमध्ये कुठल्याहि प्रकारचा विरोध नाही.
संबंध - सर्व उपनिषदामध्ये एक परमात्म्याचे स्वरूप सांगण्यासाठीच प्रकारभेदाने ब्रह्मविद्येचे वर्णन आहे, ही गोष्ट वेदप्रमाणानेच सिद्ध करतात.


दर्शयति च ॥ ३.३.४ ॥


अर्थ - दर्शयति च = श्रुतिसुद्धा हीच गोष्ट दाखविते.


व्याख्या - कठोपनिषदामध्ये म्हटले आहे की, ‘ सर्वे वेदा यत्पदमामनन्ति’ ‘समस्त वेद ज्या परम प्राप्य परमेश्वराचे प्रतिपादन करतात; इत्यादि (क.उ.१/२/१५) याच प्रकारचे वर्णन अन्यान्य श्रुतिमध्येहि आहे. तथा श्रीमदभगवदगीतेमध्ये भगवंतानी ही सांगितले आहे की, ‘वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यः’ (१५/१५) ‘सर्व वेदांच्या द्वारा जाणण्यायोग्य मीच आहे.’ याप्रकारे श्रुतिस्मृतिंचा सर्व वचनांचा एकच उद्देश्य दिसून येतो. म्हणून हेच सिद्ध होत आहे की ब्रह्मविद्या भिन्न भिन्न नाही आहे.
संबंध - जर ही गोष्ट असेल तर एका ठिकाणच्या वर्णनात दुसर्‍या ठिकाणच्या वर्णनापेक्षा काही गोष्टी अधिक सांगितल्या गेल्या आहेत आणि कोठे थोडया कमी आहेत, अशा परिस्थीतीत विभिन्न प्रकरणांच्या वर्णनांची एकता कशी होईल ? या जिज्ञासेवर सांगतात.


उपसंहारोऽर्थाभेदाद्विधिशेषवत्समाने च ॥ ३.३.५ ॥


अर्थ - समाने = एका प्रकारच्या विद्येमध्ये; च = ही, अर्थाभेदात् = प्रयोजनात भेद नसल्यामुळे; उपसंहारः = एका ठिकाणी सांगितलेल्या गुणांचा दुसर्‍या जागी उपसंहार करणे; विधिशेषवत् = विधिशेषाप्रमाणे (उचित आहे)


व्याख्या - ज्याप्रकारे कर्मकाण्डात प्रयोजनात भेद नसेल तर एका शाखेत सांगितलेल्या यज्ञादिच्या विधिशेषरूप अग्निहोत्र आदि धर्मांचा दुसर्‍या ठिकाणी ही उपसंहार (अध्याहार) केला जातो, त्याचप्रकारे विभिन्न प्रकरणात आलेल्या ब्रह्मविद्येच्या वर्णनात ही प्रयोजन-भेद नसेल तर एका जागी सांगितलेल्या अधिक गोष्टींचा दुसर्‍या जागी उपसंहार केला पाहिजे.
संबंध - श्रुतिमध्ये वर्णित ज्या ब्रह्मविद्या आहेत, त्यात कोठे शब्दभेदाने, कोठे नामभेदाने आणि कोठे प्रकरण-भेदाने भिन्नता प्रतीत होत असते, म्हणून त्यांची एकता प्रतिपादन करण्यासाठी सूत्रकार स्वतः शंका उत्पन्न करून तिचे समाधान करतात.


अन्यथात्वं शब्दादिति चेन्नाविशेषात् ॥ ३.३.६ ॥


अर्थ - चेत् = जर असे म्हणाल की, शब्दात् = सांगितलेल्या शब्दाने; अन्यथात्वम् = दोन्हीची भिन्नता प्रतीत होत आहे, म्हणून एकता सिद्ध होत नाही, इति न = तर अशी गोष्ट नाही आहे, अविशेषात् = विधि आणि फल आदिमध्ये भेद नसल्याने (दोन्ही विद्यामध्ये समानता आहे.)


व्याख्या - छान्दोग्योपनिषदाच्या आठव्या अध्यायात दहरविद्या आणि प्राजापत्यविद्या या प्रकारच्या दोन ब्रह्मविद्यांचे वर्णन आहे. त्या दोन्ही विद्या परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखविणार्‍या आहेत. म्हणून त्यांची समानता मानली जाते. यावर पूर्वपक्षाकडून शंका व्यक्त केली जाते की दोन्ही विद्यांच्यामध्ये शब्दाचे अंतर आहे अर्थात दहरविद्येच्या प्रकरणात तर असे म्हटले गेले आहे की, ‘मनुष्य शरीररूप ब्रह्मपुरात हृदयरूपी घरात जे आंतरिक आकाश आहे, त्याच्या आत जी वस्तु आहे, तिचे अनुसंधान करावयास पाहिजे.’ (छां.उ.८/१/१) तथा प्राजपत्यविद्येत ‘अपहतपाप्मा’ आदि विशेषणांनी युक्त आत्म्यास जाणण्यायोग्य म्हटले गेले आहे. (८/७/१) याप्रकारे दोन्ही विद्यांच्या वर्णनात शब्दाचा भेद आहे, म्हणून त्या दोन्ही एक होऊ शकत नाहीत. याच्या उत्तरात सूत्रकार म्हणतात की अशी गोष्ट नाही आहे, कारण की, दहरविद्येमध्ये त्या अंतराकाशास ब्रह्मलोक, आत्मा आणि सर्वांना धारण करणारा म्हटले गेले आहे. तथा त्यास सर्व पापे आणि सर्व विकाररहित तथा सत्यसंकल्प आदि समस्त दिव्य गुणांनी संपन्न म्हणून (छां.उ.८/१/५) त्याच जाणण्यायोग्य तत्त्वास (छां.उ.८/१/६) परब्रह्म निश्चित केले गेले आहे. त्याचप्रकारे प्राजपत्यविद्येमध्ये ही त्या जाणण्यायोग्य तत्त्वास आत्मा नावाने संबोधून त्यास समस्त पापे आणि विकाररहित तथा सत्यसंकल्पत्व, सत्यकामत्व आदि दिव्य गुणांनी युक्त परब्रह्म निश्चित केले गेले आहे. दहर विद्येमध्ये दहर आकाशासच उपास्य म्हटले आहे, त्याच्या अंतर्वर्ती लोकांना नाही. तेथे प्रकारान्तरानी त्या ब्रह्मास सर्वांचा आधार दाखविण्यासाठी प्रथम त्याच्या अंतरातील वस्तुंचा शोध घेण्यासाठी सांगितले गेले आहे. याप्रकारे वास्तवात काही भेद नसल्यामुळे दोन्ही विद्यांची एकता आहे. याचप्रकारे दुसर्‍या विद्यांमध्येहि समानता जाणून घेतली पाहिजे.
संबंध - पूर्वोक्त विद्यांची एकता सिद्ध करण्यासाठी दुसर्‍या असमान विद्यांच्या पेक्षा त्यांच्या विशेषतेचे प्रतिपादन करतात.


न वा प्रकरणभेदात्परोऽवरीयस्त्वादिवत् ॥ ३.३.७ ॥


अर्थ - वा = अथवा, परोऽवरीयस्त्वादिवत् = परम उत्कृष्टता अपकृष्टता आदि गुणांनी युक्त दुसर्‍या विद्यांप्रमाणे, प्रकरण येते.


व्याख्या - परंतु छान्दोग्यमध्ये जी उद्‌गीथ-विद्या आहे, ती अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण की तेथे उद्‌गीथची ‘ॐकार’ अक्षराबरोबर एकता करून त्याचे महत्त्व वाढविले आहे. (छां.उ. १/१ पूर्ण खण्ड) म्हणून त्याचे फलहि अत्यंत श्रेष्ठ सांगितले आहे. (छां.उ.१/९/१पासून ४पर्यंत) परंतु बृहदारण्यकची उद्‌गीथ विद्या केवळ प्राणांचे श्रेष्ठत्व संपादन करण्यासाठी तथा यज्ञादिमध्ये उद्‌गीथ गानाच्या वेळी स्वराची विशेषता दाखविण्यासाठी आहे. (बृह.उ.१/३/१पासून२७पर्यंत) म्हणून त्याचे फलहि तसे दाखविले गेले नाही. दोन्ही प्रकरणामध्ये केवळ देवासुर-संग्रामविषयक समानता आहे; पण त्यातहि उपासनेच्या प्रकारात भेद आहे. म्हणून किंचितमात्र समानतेमुळे दोन्हीची समानता होऊ शकत नाही. समानतेसाठी उद्देश्य विधेय आणि फलाची एकता पाहिजे, ती त्या प्रकरणात नाही. म्हणून त्यांच्यात भेद असणे उचित आहे. परंतु वर सांगितलेली दहरविद्या आणि प्राजापत्यविद्येत अशी गोष्ट नाही, केवळ वर्णनाचा भेद आहे, म्हणून वर्णनमात्र भेद असल्याने उत्तम आणि मध्यम आदिच्या भेदाने युक्त उद्‌गीथ विद्येप्रमाणे वर सांगितलेल्या दहरविद्या आणि प्राजापत्यविद्येमध्ये भेद सिद्ध होऊ शकत नाही. कारण दोन्हीचे उद्देश्य, विधेय आणि फल यांत भेद नाही.
संबंध - आता दुसर्‍या प्रकारच्या शंकेचे उत्तर देऊन दोन्ही विद्यांची एकता सिद्ध करतात.


संज्ञातश्चेत्तदुक्तमस्ति तु तदपि ॥ ३.३.८ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की, संज्ञातः = संज्ञेने परस्पर भेद होण्यामुळे (एकता सिद्ध होऊ शकत नाही), तर; तदुक्तम् = त्याचे उत्तर (सूत्र ३/३/१ मध्ये) दिले गेले आहे; तु = तथा, तदपि = ती (संज्ञाभेदामुळे होणारी विद्याविषयक विषमता) ही; अस्ति = अन्यत्र आहे.


व्याख्या - जर म्हणाल की त्यात संज्ञेचा अर्थात नामाचा भेद आहे, त्या विद्येचे नाव दहर विद्या आहे, आणि दुसरीचे नाव प्राजापत्यविद्या आहे, म्हणून दोन्हीची एकता होऊ शकत नाही. तर याचे उत्तर आम्ही पहिल्या सूत्रात (३/३/१) च देऊन चुकलो आहे. तेथे म्हटले आहे की, समस्त उपनिषदामध्ये भिन्न भिन्न नामानी ज्या ब्रह्मविद्यांचे वर्णन आहे, त्या सर्वात विधिवाक्य, फल आणि उद्देश्य विधेय आदिची एकता असल्याने सर्व ब्रह्मविद्यांची एकता आहे. म्हणून येथे संज्ञाभेदाने काही विरोध नाही. याशिवाय, ज्यात उद्देश्य, विधेय आणि फल आदिची समानता नाही आहे, त्या विद्यांमध्ये संज्ञा आदिच्यामुळे भेद होतो आणि तशा विद्यांचे वर्णन ही उपनिषदामध्ये आहेच. (छां.उ.३/१८/१ तसेच ३/१९/१)
संबंध - नामाचा भेद असल्यावरहि विद्यामध्ये एकता असू शकते, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरे कारण सांगतात.


व्याप्तेश्च समञ्जसम् ॥ ३.३.९ ॥


अर्थ - व्याप्तेः = ब्रह्म सर्वत्र व्याप्त आहे यामुळे; च = ही; समञ्जसम् = ब्रह्मविद्येत समानता आहे.


व्याख्या - परब्रह्म परमात्मा सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, आणि सर्वज्ञ आहे, म्हणून ब्रह्मविषयक विद्येची भिन्न-भिन्न नामे आणि प्रकरणे असल्यावरहि त्यांची एकता होणे उचित आहे. कारण की, त्या ब्रह्मविषयक सर्व विद्यांचे उद्देश्य एकमात्र परब्रह्म परमात्म्याच्याच स्वरूपाचे नाना प्रकाराने प्रतिपादन करणे आहे.
संबंध - आता ही जिज्ञासा उत्पन्न होत आहे की विद्यांची एकता आणि भिन्नता यांचा निर्णय करण्यासाठी प्रकरण, संज्ञा आणि वर्णनाची एकता आणि भेद यांची अपेक्षा आहे की नाही ? यावर सांगतात-


सर्वाभेदादन्यत्रेमे ॥ ३.३.१० ॥


अर्थ - सर्वाभेदात् = सर्वस्वरुप परब्रह्मसंबंधी विद्येहून; अन्यत्र = दुसर्‍या विद्येच्या संबंधाने; इमे = या पूर्व सूत्रात सांगितलेल्या सर्व हेतूंचा उपयोग आहे.


व्याख्या - परब्रह्म परमात्मा सर्वाहून अभिन्न सर्वस्वरुप आहे म्हणून त्याच्या तत्त्वाचे प्रतिपादन करणार्‍या विद्यांमध्ये भेद नाही आहे. म्हणून संज्ञा, प्रकरण आणि शब्दाच्या योगे यांची भिन्नता सिद्ध केली जाऊ शकत नाही, कारण ब्रह्माच्या सर्व संज्ञा होऊ शकतात. प्रत्येक प्रकरणात त्याची गोष्ट येऊ शकते तथा त्याचे वर्णनही भिन्न भिन्न सर्व शब्दाम्च्या द्वारा केले जाऊ शकते. परंतु ब्रह्मविद्येच्या अतिरिक्त ज्या दुसर्‍या विद्या आहेत, ज्यांचे उद्देश्य ब्रह्माचे प्रतिपादन करणे नाही आहे; त्यांची एकीची दुसरीपासून भिन्नता अथवा अभिन्नता समजून घेण्यासाठी पूर्व सांगितलेल्या प्रकरण, संज्ञा आणि शब्द या तीन्ही हेतूचा उपयोग केला जाऊ शकतो.
संबंध - श्रुतिमध्ये एका जागी ब्रह्मविद्येच्या प्रकरणात ब्रह्माचे आनन्द, सर्वज्ञता, सर्वकामता, सत्यसंकल्पत्व सर्वेश्वरत्व तसेच सर्वशक्तिमत्ता आदि धर्म सांगितले गेले आहेत, त्यांचा उपसंहार (संग्रह) दुसर्‍या जागी ब्रह्माच्या वर्णनात केला जाऊ शकतो. ही गोष्ट पहिले सूत्र (३/३/५) मध्ये सांगितली गेली आहे, म्हणून ही जिज्ञासा होते की तैत्तिरीयोपनिषदात आनन्दमय पुरुषाच्या वर्णनात पक्ष्याच्या रुपकात ज्या शब्दांचे वर्णन येते काय त्यांच्याच सर्वत्र उपसंहार केला जात आहे? यावर सांगतात-


आनन्दादयः प्रधानस्य ॥ ३.३.११ ॥


अर्थ - आनन्दादयः = आनन्द आदि; प्रधानस्य = सर्वश्रेष्ठ परब्रह्म परमात्म्याचे धर्म आहेत. (त्या सर्वांचा अन्यत्रही ब्रह्माच्या वर्णनात अध्याहार केला जाऊ शकतो.)


व्याख्या - आनन्द, सर्वगतत्व, सर्वात्मत्व तथा सर्वज्ञता आदि जितके ही परब्रह्म परमात्म्याचे धर्म आहेत ते जर श्रुतिमध्ये एका ठिकाणी ब्रह्माच्या वर्णनात आले असतील तर दुसर्‍या ठिकाणी ही ब्रह्माच्या वर्णनात त्यांचा उपसंहार केला जाऊ शकतो अर्थात एका ठिकाणाच्या वर्णनात जे धर्म अथवा दिव्य-गुण-सूचक विशेषणे सुटली असतील, त्यांची पूर्ति अन्यत्राच्या वर्णनाने करुन घेतली पाहिजे.
संबंध - ‘जर अशी गोष्ट आहे, तर मग तैत्तियोपनिषदात जे आनन्दमय आत्म्याचे प्रकरण आरंभ करुन म्हटले गेले आहे की ‘प्रिय हेच त्याचे शिर आहे मोद हा उजवा पंख आहे, प्रमोद डावा पंख आहे, आनन्द आत्मा आहे आणि ब्रह्म हेच पुच्छ एवं प्रतिष्ठा आहे.’ यास अनुसरुन ‘प्रियशिरस्त्व’ आदि धर्मांचा ही सर्वत्र ब्रह्मविद्येत संग्रह होऊ शकतो.’ अशी आशंका आल्यावर सांगतात-


प्रियशिरस्त्वाद्यप्राप्तिरूपचयापचयौ हि भेदे ॥ ३.३.१२ ॥


अर्थ - प्रियशिरस्त्वाद्यप्राप्तिः = ‘प्रियशिरस्त्व’ - ‘प्रियरुप शिर असणे’ आदि धर्मांची प्राप्ति अन्यत्र ब्रह्मविद्येच्या प्रकरणात होत नाही; हि = कारण की; भेदे = याप्रकारे शिर आदि अंगांचा भेद मानल्यावर; उपचयापचयौ = ब्रह्मात वाढणे, कमी होणे हा उपस्थित होईल.


व्याख्या - प्रिय त्याचे शिर आहे, मोद आणि प्रमोद पंख आहेत याप्रकारे पक्ष्याचे रुपक देऊन जी अंगाची कल्पना केली गेली आहे तो ब्रह्माचा स्वरुपगत धर्म नाही आहे कारण की याप्रकारे अंग-प्रत्यंगाच्या भेदाने ब्रह्मामध्ये भेद मानल्यावर त्यात वाढणे-घटणे या दोषाची आशंका होईल; म्हणून जी ब्रह्माची स्वाभाविक लक्षण नसतील, कुठल्या रुपकाच्या उद्देश्याने सांगितली गेली असतील, त्यांना दुसर्‍या ठिकाणी घेता कामा नयेत.
संबंध - त्यात जे आनन्द आणि ब्रह्म शब्द आले आहेत, त्यांना दुसर्‍या ठिकाणी घ्यायला हवे की नाही ? या जिज्ञासेवर सांगतात-


इतरे त्वर्थसामान्यात् ॥ ३.३.१३ ॥


अर्थ - तु = परंतु, इतरे = दुसरे जे आनंद आदि धर्म आहेत, ते (ब्रह्माचे स्वरूपाचे प्रतिपादन करण्यासाठी श्रुतिमध्ये सांगितले गेले आहे, म्हणून अन्यत्र ब्रह्मविद्येच्या प्रसंगात त्यांचे ग्रहण केले जाऊ शकते.), अर्थसामान्यात् = कारण की त्या सर्वात अर्थाची समानता आहे.


व्याख्या - रूपकासाठी अवयवाच्या कल्पनेने युक्त जे प्रियशिरस्त्व आदि धर्म आहेत, ते सोडून दुसरे जे आनंद आदि स्वरूपगत धर्म आहेत त्यांचा संग्रह प्रत्येक ब्रह्मविद्येच्या प्रसंगात केला जाऊ शकतो; कारण की त्यांच्यात अर्थाची समानता आहे अर्थात त्या सर्वांच्या द्वारा प्रतिपाद्य ब्रह्म एकच आहे.
संबंध - कठोपनिषदात जी रथाच्या रूपकाची कल्पना करून इंद्रिये आदिंचे घोडे आदिंच्या रूपात वर्णन केले आहे, तेथे तर इंद्रिये आदिंच्या संयमाची गोष्ट समजाविण्यासाठी तसे सांगणे सार्थक वाटत आहे. परंतु येथे तर पक्ष्याच्या रूपकाचे काही विशेष प्रयोजन दिसून येत नाही. म्हणून येथे या रूपकाची कल्पना कशासाठी केली आहे ? या जिज्ञासेवर सांगतात.


आध्यानाय प्रयोजनाभावात् ॥ ३.३.१४ ॥


अर्थ - प्रयोजनाभावात् = अन्य कुठल्याहि प्रकारचे प्रयोजन नसल्याने (हेच कळून येते की); आध्यानाय = त्या परमेश्वराचे उत्तमप्रकारे चिंतन करण्यासाठी, (त्याचे तत्त्व रूपकद्वारा समजाविले गेले आहे.)


व्याख्या - या रूपकाचे दुसरे काही प्रयोजन दिसून येत नाही, म्हणून असेच समजले पाहिजे की, पहिल्याने ज्या परब्रह्म परमेश्वराचे सत्य, ज्ञान आणि अनंत या नामाने वर्णन करून त्यास सर्वांच्या हृदयात स्थित म्हटले आहे आणि त्याच्या प्राप्तीचे जे महत्त्व वर्णन केले आहे (तै.उ.२/१) त्यास प्राप्त करण्याच्या एकमात्र उपायाचे वारंवार चिंतन करावयाचे आहे. पण त्याच्या स्वरूपाची काही माहिती असल्याशिवाय चिंतन होऊ शकत नाही, म्हणून तो कशाप्रकारे सर्वांच्या हृदयात व्याप्त आहे, ही गोष्ट समजण्यासाठी येथे अन्नमय आदि कोशवाचक शब्दांच्या द्वारा प्रकरण हाती घेण्यात आले आहे, कारण की एखाद्या पेटीमध्ये गुप्त ठेवलेल्या रत्नाप्रमाणे तो परमेश्वर ही सर्वांच्या हृदयात बुद्धिरूप गुहेत लपला आहे, हे तत्त्व समजावयाचे आहे, तेथे सर्वप्रथम जे हे अन्नमय स्थूल शरीर आहे, याला पुरुषाच्या नामाने संबोधून त्याच्या अंगांची पक्ष्याच्या अंगांशी तुलना करून पुढील प्रकरण चालू केले गेले तथा क्रमशः एकाचा दुसर्‍याला अंतरात्मा सांगून प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय पुरुषाचा वर्णन केले गेले. त्याचबरोबर प्रत्येकाचा आत्मा एकाच तत्त्वास निश्चित केले गेले यावरून हे कळून येते आहे की, उत्तरोत्तर सूक्ष्म तत्त्वाच्या आत दृष्टि नेवून त्या एकाच अंतरात्म्यास लक्ष्य केले गेले आहे. तेथे विज्ञानमय जीवात्म्याचे वर्णन करून त्याचाहि अंतरात्मा आनंदमयास म्हटले गेले आहे. शेवटी सर्वांचा अंतरात्मा आनंदमयास म्हणून तसेच त्याचा अंतरात्माहि त्यासच म्हणून या रूपकाची परंपरा समाप्त केली गेली आहे. यावरून हेच सिद्ध होत आहे की, परब्रह्म परमेश्वराचे उत्तम प्रकारे चिंतन करण्यासाठी त्याचे सूक्ष्म तत्त्वास समजाविणे हेच या रूपकाचे प्रयोजन आहे.
संबंध - येथे आनंदमय नामाने परमात्म्यासच लक्ष्य केले गेले आहे. अन्य कुठल्याहि तत्त्वास नाही, हा निश्चय कसा होऊ शकतो ? यावर सांगतात.


आत्मशब्दाच्च ॥ ३.३.१५ ॥


अर्थ - आत्मशब्दात् = आत्मशब्दाचा प्रयोग झाल्यामुळे; च = ही (हेच सिद्ध होत आहे.)


व्याख्या - वर सांगितलेल्या कारणाशिवाय या प्रकरणात वारंवार सर्वांचा अंतरात्मा म्हणून अंती विज्ञानमयाचा अंतरात्मा आनंदमयाला म्हटले आहे. त्याच्यानंतर त्याचा अंतरात्मा दुसर्‍या कोणाला म्हटलेले नाही, यावरून हे सिद्ध होत आहे की, येथे आनंदमय शब्द ब्रह्माचाच वाचक आहे.
संबंध - आत्मा शब्दाचा प्रयोग तर अधिक तर प्रत्यगात्म्याच (जीवात्म्याचाच); वाचक असतो. मग हा निश्चय कसा झाला की येथे आत्मा शब्द ब्रह्माचा वाचक आहे ? यावर सांगतात.


आत्मगृहीतिरितरवदुत्तरात् ॥ ३.३.१६ ॥


अर्थ - आत्मगृहीतिः = आत्म-शब्दाने परमात्म्याचे ग्रहण; इतरवत् = दुसर्‍या श्रुतिप्रमाणे; उत्तरात् = त्यानंतरच्या वर्णनाने (सिद्ध होत आहे.)


व्याख्या - ज्याप्रकारे ‘आत्मा वा इदमेकमेवाग्र आसीन्नान्यत् किञ्चन मिषत् स ईक्षत लोकान्नु सृजै,’ (ऐ.उ.१/१) ‘प्रथम हा एक आत्माच होता; त्याने इच्छा केली की मी लोकांची रचना करीन.’ (ऐ.उ.१/१/१) या श्रुतिमध्ये प्रजेच्या सृष्टिच्या प्रकरणात ‘आत्मा’ शब्दाचा प्रयोग आला आहे, म्हणून येथे ‘आत्मा’ शब्दास ब्रह्माचा वाचक मानला गेले आहे. त्याचप्रकारे तैत्तिरीय श्रुतिमध्ये ही आनंदमयाचे वर्णन केल्यानंतर तत्काळच ‘सोऽकामयत बहु स्याम्’ - ‘त्याने इच्छा केली की मी अनेक होईन’ इत्यादि वाक्यांच्या द्वारा त्या आनंदमय आत्म्यापासून समस्त जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले गेले आहे. म्हणून नंतर आलेल्या या वर्णनाने ही हे सिद्ध होत आहे की, येथे ‘आत्मा’ शब्द परमात्म्याचाच वाचक आहे आणि ‘आनंदमय’ नामही येथे त्या परब्रह्माचेच आहे.
संबंध - वर सांगितलेल्या गोष्टीत पुन्हा शंका उपस्थित करून त्याचे उत्तर देताना पूर्वोक्त सिद्धांताला दृढ करतात.


अन्वयादिति चेत्स्यादवधारणात् ॥ ३.३.१७ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की; अन्वयात् = प्रत्येक वाक्यात आत्म शब्दाचा अन्वय होत असल्याने हे सिद्ध होत नाही की आनंदमय ब्रह्म आहे; इति = तर याचे उत्तर हे आहे की; अवधारणात् = निर्धारित केले जाण्यामुळे; स्यात् = (आनंदमयच ब्रह्म आहे ही गोष्ट सिद्ध होऊ शकते.)


व्याख्या - जर म्हणाल की, ‘तैत्तिरीयोपनिषदाच्या ब्रह्मवल्लीमध्ये ‘आत्मा’ शब्दाचा प्रयोग तोही सर्व वाक्यांच्या अंती आला आहे. नंतर केवल ‘आत्मा’ शब्दाच्या प्रयोगाने ‘आनंदमय’ लाच ब्रह्म कसे मानावे ? तर याच्या उत्तरात सांगतात की ज्या ‘आत्मा’ शब्दाची सर्व वाक्यांत व्याप्ति आहे, तो ब्रह्माचा वाचक नाही आहे, परंतु अंती ज्याला निर्धारित केले गेले आहे तो ब्रह्माचा वाचक आहे. अन्नमय, प्राणमय आदि आत्म्यांना ब्रह्माचे शरीर आणि ब्रह्मास त्यांचा अंतरात्मा सांगण्याच्या उद्देश्याने तेथे सर्वांबरोबर ‘आत्मा’ शब्दाचा प्रयोग केला गेला आहे. म्हणून अन्नमयाचा अंतरात्मा त्याच्याहून भिन्न प्राणमयाला दाखविला आहे. नंतर प्राणमयाचा अंतरात्मा त्याच्याहून भिन्न मनोमयाला सांगितले आणि मनोमयाचा अंतरात्मा विज्ञानमयाला आणि विज्ञानमयाचा ही अंतरात्मा आनंदमयास सांगितले आहे. त्यानंतर आनंदमयाचा अंतरात्मा अन्य कुणाला दाखविलेले नाही, आणि अंती हे निर्धारित केले आहे की, याचा शरीरसंबंधी आत्मा हा स्वयंच आहे; जो की पहिल्याने सांगितलेल्या अन्य सर्व पुरुषांचा ही आत्मा आहे. असे सांगून त्याच्यापासून जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की, आनंदमय शब्द परमात्म्याचा वाचक आहे.
संबंध - या प्रकरणात आत्म्यापासून आकाशादि भूतांच्या उत्पत्तिचे वर्णन केल्यानंतर पृथ्वीपासून औषधी, औषधीपासून अन्न, अन्नापासून पुरुषाची उत्पत्ति सांगितली, नंतर म्हटले आहे की ‘निश्वयपूर्वक तोच हा पुरुष अन्नरसमय आहे.’ या वर्णनानुसार ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ या वाक्याद्वारा सांगितलेले ब्रह्मच येथे अन्नरसमय पुरुष आहे का त्याहून भिन्न ? या जिज्ञासेवर सांगतात -


कार्यारव्यानादपूर्वम् ॥ ३.३.१८ ॥


अर्थ - कार्याख्यानात् = ब्रह्माचे कार्य सांगितले गेल्याने हा पुरुष; अपूर्वम् = ते पूर्वोक्त ब्रह्म होऊ शकत नाही.


व्याख्या - ज्या प्रकरणात ज्या अन्नरसमय पुरुषाचे वर्णन आहे, ते पूर्वोक्त परब्रह्म असू शकत नाही. परंतु अन्नाचे परिणामभूत हे सजीव मनुष्य-शरीरच येथे अन्नरसमय पुरुषाच्या नावाने संबोधले गेले आहे कारण की, या पुरुषास त्या पूर्वोक्त ब्रह्माचे आकाशादिच्या क्रमाने कार्य म्हटले गेले आहे. आणि याचा अंतरात्मा प्राणमय आदिच्या क्रमाने विज्ञानमय जीवात्म्यास म्हटले गेले आहे तथा विज्ञानमयाचा आत्मा ब्रह्मास म्हटले आहे आणि अंती आनंदाबरोबर त्याची एकता केली गेली आहे म्हणून ज्याची ‘सत्य’ ‘ज्ञान’ आणि ‘अनंत’ ही लक्षणे सांगितली गेली आहेत तथा जो आत्मा आणि आनंदमय नावाने जगताचे कारण म्हटले गेले आहे, ते ब्रह्म या अन्नरसमय पुरुषाहून भिन्न सर्वांचा अंतरात्मा आहे.
संबंध - अकराव्या सुत्रापासून ‘आनंद’च्या प्रकरणाचा विचार सुरू करून अठराव्या सूत्रापर्यंत ते प्रकरण समाप्त केले गेले आहे. आता पहिल्याने आरंभ केलेल्या प्रकरणावर दुसर्‍या श्रुतिंच्या विषयींच्या विचाराचा आरंभ केला जात आहे.


समान एवं चाभेदात् ॥ ३.३.१९ ॥


अर्थ - समाने = एका शाखेत; च = आणि, एवम् = याप्रकारे विद्येची एकता समजली पाहिजे. अभेदात् = कारण की दोन्ही ठिकाणी उपास्यात काही भेद नाही.


व्याख्या - वाजसनेयी शाखेच्या शतपथ-ब्राह्मणात ‘सत्यच ब्रह्म आहे’ याप्रकारे उपासना केली पाहिजे. निःसंदेह हा पुरुष संकल्पमय आहे. तो जितक्या संकल्पांनी युक्त होऊन या लोकातून प्रयाण करतो, परलोकात गेल्यावर तशाच संकल्पांनी युक्त होऊन उत्पन्न होतो. त्याने मनोमय प्राण-शरीराने युक्त आकाशस्वरूप आत्म्याची उपासना करावी. याप्रकारे शांडिल्य विद्येचे वर्णन केले गेले आहे. (श.ब्रा.१०/६/३/२) ‘सत्यं ब्रह्मेत्युपासीत । अथ खलु क्रतुमयोऽयं पुरुषः स यावत्क्रतुरयमस्माल्लोकात् प्रैति एवं क्रतुर्भूत्वामुं लोकं प्रेत्याभिसम्भवति स आत्मानमुपासीत मनोमयं प्राणशरीरं भारूपं सत्यसंकल्पमाकाशात्मानम् ।’ त्याच शाखेच्या बृहदारण्यकामध्ये ही म्हटले आहे की, ‘प्रकाशच ज्याचे सत्य स्वरूप आहे तो पुरुष मनोमय आहे. तो धान्य आणि जवस आदि सदृश सुक्ष्म परिमाणाचा आहे, तो त्या हृदयाकाशात स्थित आहे, तो सर्वांचा स्वामी आणि सर्वांचा अधिपति आहे तथा हा जो कोणी आहे, सर्वांचे उत्तम शासन करतो.’ (बृह.उ.५/६/१) ‘मनोमयोऽयं पुरुषो भाः सत्यस्तस्मिन्नन्तहृदये यथा व्रीहिर्वा यवो वा स एष सर्वस्यशानः सर्वस्याधिपतिः सर्वमिदं प्रशास्ति यदिदं किञ्च ।’ (बृह.उ.५/६/१) या दोन्ही ग्रंथामध्ये सांगितलेल्या या विद्यांमध्ये भेद आहेत किंवा अभेद ? हा संशय उपस्थित झाल्यावर सूत्रकार म्हणतात - जशी भिन्न शाखांमध्ये विद्येची एकता आणि गुणांचा उपसंहार उचित मानला गेला आहे, त्याचप्रमाणे एका शाखेमध्ये सांगितलेल्या विद्यांमध्ये ही एकता मानली पाहिजे; कारण की तेथे उपास्यात भेद नाही. दोन्ही ठिकाणी एकच ब्रह्म उपास्य सांगितले गेले आहे.
संबंध - उपास्याच्या संबंधास धरून कोठल्या ठिकाणी विद्येची एकता मानायला पाहिजे आणि कोठे मानू नये ? याचा निर्णय करण्यासाठी पूर्वपक्ष उपस्थित केला जात आहे.


सम्बन्धादेवमन्यत्रापि ॥ ३.३.२० ॥


अर्थ - एवम् = याप्रकारे, सम्बन्धात् = उपास्यच्या संबंधाने; अन्यत्र = दुसर्‍या ठिकाणी, अपि = ही (काय विद्येची एकता मानली पाहिजे ?


व्याख्या - याप्रकारे एकाच उपास्याचा संबंध बृहदारण्यकामध्ये दिसून येतो. तेथे प्रथम सांगितले गेले आहे की, सत्यच ब्रह्म आहे, इत्यादि. (बृह.उ.५/५/१) नंतर त्याच सत्याची सूर्यमंडलात स्थित पुरुषाबरोबर आणि डोळ्यांमध्ये स्थित पुरुषाशी एकता केली गेली आहे. (बृह.उ.५/५/२) त्यानंतर दोन्हीची रहस्यमय नावे क्रमशः ‘अहर्’ आणि ‘अहम्’ सांगितली गेली आहेत. या प्रकरणामध्ये एकाच उपास्याचा संबंध असल्याने ही स्थान-भेदाने पृथक् पृथक् दोन उपासना सांगितल्या गेल्या आहेत, म्हणून त्यांच्यात भेद मानला पाहिजे की अभेद ?
संबंध - पूर्वसूत्रात उपस्थित केल्या गेलेल्या शंकेचे उत्तर पुढील सूत्रात देतात.


न वा विशेषात् ॥ ३.३.२१ ॥


अर्थ - न वा = या दोन्हीची एकता मानता कामा नये; विशेषात् = कारण की या दोन्ही पुरुषांच्या रहस्यमय नाम आणि स्थानात भेद केला गेला आहे.


व्याख्या - या दोन्ही उपासनांच्या वर्णनात स्थान आणि नाम भिन्न-भिन्न सांगितले गेले आहेत. सूर्यमंडलात स्थित सत्यपुरुषाचे तर रहस्यमय नाम ‘अहर’ म्हटले गेले आहे. आणि डोळ्यात स्थित पुरुषाचे रहस्यमय नाम ‘अहम’ म्हटले गेले आहे. याप्रकारे नाम आणि स्थानाचा भेद असल्यामुळे या उपासनांची एकता मानली जाऊ शकत नाही. म्हणून एकाचे नाम आणि गुणाचा उपसंहार दुसर्‍या पुरुषात करता कामा नाही.
संबंध - ही गोष्ट श्रुतिप्रमाणाने स्पष्ट करतात.


दर्शयति च ॥ ३.३.२२ ॥


अर्थ - दर्शयति च = श्रुति ही गोष्ट दाखवूनहि देत आहे.


व्याख्या - जेथे याप्रकारे स्थान आणि नामाचा भेद असेल तेथे एका ठिकाणी सांगितलेले गुण दुसर्‍या ठिकाणी घेतले जात नाहीत, ही गोष्ट श्रुतिद्वारा याप्रकारे दाखवली गेली आहे. छान्दोग्योपनिषदामध्ये आधिदैविक सामाच्या प्रसंगी सूर्यस्थ पुरुषाचे वर्णन करून नंतर आध्यात्मिक सामाच्या प्रसंगात डोळ्यात स्थित पुरुषाचे वर्णन केले गेले आहे. आणि तेथे सूर्यस्थ पुरुषाचे नाम रूप आदिचे ही डोळ्यात स्थित पुरुषातहि श्रुतिने स्वयं विधान करून दोन्हीची एकता केली आहे. (छां.उ.१/७/५) यावरून हे सूचित होत आहे की अशा स्थळी विद्येची एकता मानून गुणांचा अन्यत्र उपसंहार साधारण नियम नाही; जेथे विद्येची एकता मानून गुणांचा उपसंहार करणे अभीष्ट असते त्या प्रसंगात श्रुति स्वयं त्याचे विधान करते जसे की, उपर्युक्त प्रसंगात सूर्यात स्थित पुरुषाच्या गुणांचे मध्यवर्ती पुरुषामध्ये विधान केले आहे.
संबंध - नेत्रवर्ती तसेच सूर्यमंडलवर्ती आदि पुरुषांमध्ये ब्रह्माच्या कुठल्या कुठल्या गुणांचा उपसंहार (अध्याहार) केला जाऊ शकत नाही का ? याचा निर्णय ग्रंथकार दोन सूत्रांच्या द्वारे करतात.


सम्भृतिद्युव्याप्त्यपि चातः ॥ ३.३.२३ ॥


अर्थ - च = तथा; अतः = म्हणून अर्थात विद्येची एकता नसल्यामुळे ही, सम्भृतिद्युव्याप्ती = समस्त लोकांना धारण करणे तसेच द्युलोक आदि अखिल ब्रह्माण्डाला व्याप्त करून स्थित होणे - या दोन्ही ब्रह्मसंबंधी गुण; अपि = ही अन्यत्र (नेत्रान्तवर्ती आदि पुरुषामध्ये) घेता कामा नयेत.


व्याख्या - बृहदारण्यकामध्ये (३/८/३) गार्गी आणि याज्ञवल्क्यांच्या संवादाचे वर्णन येते. तेथे गार्गीने याज्ञवल्क्यांना विचारले आहे ‘जे द्युलोकाच्या वर आहे, जे पृथ्वीच्या खाली आहे आणि द्युलोक एवं पृथ्वीच्या मध्येही आहे तथा स्वयं ही जे हा द्युलोक आणि पृथ्वी आहे; याशिवाय ज्याला भूत, वर्तमान आणि भविष्य म्हणतात; ते सर्व कशात ओतप्रोत आहे ?’ याच्या उत्तरात याज्ञवल्क्यांनी म्हटले, ‘द्युलोकाच्या वर आणि पृथ्वीच्याही खालपर्यंत हे सर्व आकाशात ओतप्रोत आहे.’ (३/८/४) गार्गीने विचारले ‘आकाश कशात ओतप्रोत आहे ?’ (३/८/७) याज्ञवल्क्य म्हणाले, ‘गार्गी ! त्या तत्त्वास तर ब्रह्मवेत्ते पुरुष अक्षर म्हणतात, ते मोठे नाही, सडसडीत नाही, लहान नाही, मोठे नाही, लाल नाही अथवा सुंदरही नाही. छाया नाही, तम नाही, वायु नाही, आकाश नाही, संग नाही, रस नाही, गंध नाही, नेत्र नाही, कान नाही, वाणी नाही, मन नाही, तेज नाही, प्राण नाही, मुख नाही, माप नाही, आत नाही, बाहेर नाही, ते काही खात नाही, किंवा त्यालाहि कोणी खात नाही.’ (३/८/८/) याप्रकारे अक्षर ब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन करून याज्ञवल्क्यांनी हे ही सांगितले की ‘हा सूर्य, चंद्रमा, द्युलोक आणि पृथ्वी आदि याच्या शासनात आहेत. यानेच या सर्वांना धारण केले आहे.’ (३/८/९) या प्रसंगात अक्षरब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिपादन करताना दोन गोष्टी मुख्यतः सांगितल्या गेल्या आहेत; एक म्हणजे ते द्युलोकाच्या वर आणि पृथ्वीच्या खालपर्यंत समस्त ब्रह्माण्डात व्याप्त आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की, तेच सर्वांस धारण करणारे आहे. या दोन्ही गुणांचा नेत्रान्तवर्ती आणि सूर्यमण्डलवर्ती पुरुषामध्ये अध्याहार केला जाऊ शकत नाही, कारण की, प्रतीक उपासनेसाठी सीमित स्थानी स्थित सांगितलेला पुरुष सर्वव्यापक होऊ शकत नाही आणि सर्वांना धारण करणाराहि होऊ शकत नाही. याप्रकारे अन्यत्र ही जेथे पूर्ण ब्रह्माचे वर्णन नाही, त्या प्रतीकात या गुणांचा उपसंहार होऊ शकत नाही, हे उत्तमप्रकारे जाणून घेतले पाहिजे.
संबंध - उक्त पुरुषांत ब्रह्माच्या गुणांचा उपसंहार होऊ नये हे तर ठीक आहे. परंतु पुरुषविद्येमध्ये जे पुरुषाचे गुण सांगितले गेले आहेत त्यांचा उपसंहार तर अन्यत्र जेथे जेथे पुरुषांचे वर्णन आहे, त्या सर्व ठिकाणी असायलाच हवे. अशी आशंका उत्पन्न झाल्यावर सांगतात.


पुरुषविद्यामिव चेतरेषामनाम्नानात ॥ ३.३.२४ ॥


अर्थ - पुरुषविद्यायाम् इव = पुरुषविद्येचे जे गुण सांगितले गेले आहेत; तसे गुण, च = ही, इतरेषाम् = अन्य पुरुषात असू शकत नाहीत; अनाम्नानात् = कारण की, श्रुतिमध्ये असे गुण सांगितले गेलेले नाहीत.


व्याख्या - मुण्डकोपनिषदात (२/१/२ पासून १० पर्यंत) अक्षरब्रह्माचे पुरुषाच्या नामाने वर्णन केले गेले आहे. तेथे प्रथम अक्षरब्रह्मापासून सर्वांची उत्पत्ति आणि त्यातच सर्वांचा लय (२/१/१) सांगून त्यास दिव्य अमूर्त पुरुष म्हटले गेले आहे. (२/१/२) नंतर २/१/३ पासून २/१/९ पर्यंत त्यापासून समस्त प्राण, इंद्रिये, पंचभूते, सूर्य, चन्द्रमा, वेद, अग्नि, देवता, मनुष्य, अन्न, समुद्र तथा पर्वत आदिंची सृष्टि (उत्पत्ति) सांगितली गेली आहे. तदनंतर २/१/१० व्या मंत्रात त्या पुरुषाचा महिमा याप्रकारे वर्णन केला गेला आहे. ‘पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् । एतद् यो वेद निहितं गुहायां सोऽविद्याग्रन्थिं विकिरतीह सोम्य ।’ अर्थात ‘पुरुषच हे सर्व काही आहे, तोच तप, कर्म, आणि परम अमृत स्वरूप ब्रह्म आहे. हे सोम्य ! हृदयरूप गुहेत स्थित या अंतर्यामी परम पुरुषाला जो जाणतो तो या मनुष्य शरीरातच अविद्याजनित ग्रंथि(गाठ) छिन्न-भिन्न करतो. (नष्ट करतो.)’ याप्रकारे या पुरुषविद्येच्या प्रकरणात जे पुरुषाचे सर्वोत्पादकत्व, परापरत्व, सर्वव्यापकत्व तथा अविद्यानिवारकत्व आदि दिव्य गुण सांगितले गेले आहेत. त्यांचाहि नेत्रान्तर्वर्ती आणि सूर्यमण्डलवर्ती आदि पुरुषांमध्ये तथा जेथे जेथे स्थूल, सूक्ष्म अथवा कारण शरीराचे वर्णन पुरुष या नावाने केले गेले आहे त्या पुरुषांमध्येहि (छां.उ.५/९/१) (तै.उ.२/१ पासून ७ पर्यंत) अध्याहार केला जाऊ शकत नाही. कारण की श्रुतिमध्ये कुठेहि त्यांच्यासाठी तशा गुणांचे प्रतिपादन केले गेलेले नाही. त्या प्रकरणांत त्या पुरुषांच्या अंतरात्मा परमपुरुषास लक्ष्य करण्यासाठी त्यांना ‘पुरुष’ नाव दिले गेले आहे.
संबंध - याप्रकारे -


वेधाद्यर्थभेदात् ॥ ३.३.२५ ॥


अर्थ - वेधादि = वेधणे आदिंचे वर्णन करून जे ब्रह्मास वेधाचे लक्ष्य सांगितले गेले आहे, त्या सर्वांचा अध्याहार ही अन्य विद्यांमध्ये करता कामा नये, अर्थभेदात् = कारण की, तेथे प्रयोजनात भेद आहे.


व्याख्या - मुण्डकोपनिषदात (२/२/३) मध्ये म्हटले आहे की, ‘धनुर्गृहीत्वौपनिषदं, महास्रं शरं ह्युपासानिशितं सन्धयीत । आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्य तेदवाक्षरं सोम्य विद्धि ॥’ ‘हे सोम्य ! उपनिषदात वर्णित प्रणवरूप महान धनुष्य घेऊन त्यावर उपासनद्वारा तीक्ष्ण केलेला बाण चढवावयास हवा. नंतर भावपूर्ण चित्तद्वारा तो बाण खेचून तू परम अक्षर परमेश्वरासच लक्ष्य बनवून त्याचा वेध घे.’ या वर्णनानंतर दुसर्‍या मंत्रात आत्म्यासहि बाणाचे रूप दिले गेले आहे. याप्रकारे वेध्यत्व आदि गुणांचे तथा ॐकाराचा धनुर्भाव आणि आत्म्याचे बाणत्वाचे ही जेथे ओंकारद्वारा परमात्म्याची उपासना करण्याचे प्रकरण आहे, त्या ब्रह्मविद्येमध्ये उपसंहार करता कामा नये; कारण की, येथे चिंतनात तन्मयतेचे स्वरूप सांगण्यासाठी तसे रूपक केले गेले आहे. याप्रकारे रूपकाच्या कल्पनेद्वारा जी विशेष गोष्ट सांगितली गेली आहे ती अन्य प्रकरणात अनुपयुक्त असल्याने स्वीकारण्यायोग्य नाही.
संबंध - विसाव्या सूत्रापासून पंचविसाव्या सुत्रापर्यंत भिन्न भिन्न श्रुतिंच्या वर विचार केला गेला की, त्यातील कोणकोणत्या गोष्टी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अध्याहार करण्यायोग्य नाहीत. आता परमगति अर्थात परमधाम आणि परमात्म्यांच्या प्राप्तीविषयक श्रुतिंच्या विचार करण्यासाठी पुढील प्रकरण आरंभ केले जात आहे. श्रुतिमध्ये ब्रह्मविद्येचे फल कोठे तर केवळ दुःख, शोक, बन्धन आणि शुभाशुभ कर्मांची निवृत्तिमात्र सांगितले गेले आहे, कोठे यानंतर परम समता, परमधाम आणि परमात्म प्राप्तीचे ही वर्णन आहे. म्हणून ब्रह्मविद्येच्या फलात भेद आहे की नाही ? या जिज्ञासेवर सांगतात.


हानौ तूपायनशब्दशेषात्वात्कुशाच्छन्दस्तुन्युपगानवत्तदुक्तम् ॥ ३.३.२६ ॥


अर्थ - हानी = जेथे केवळ दुःख, शोक, पुण्य, पाप आदिच्या नाशाचे वर्णन आहे अशा श्रुतिमध्ये; तु = ही; उपायनशब्दशेषत्वात् = लाभरूप परमधामाची प्राप्ती आदि फलाचाही अध्याहार करावयास हवा; कारण की तो वाक्याचा शेष भाग आहे; कुशाच्छन्दस्तुत्युपगानवत् = ही गोष्ट कुशा, छंद, स्तुति आणि उपगानाप्रमाणे समजली पाहिजे, तत् उक्तम् = असे पूर्वी मीमांसेत सांगितले गेले आहे.


व्याख्या - उद्दालक आदि सहा ऋषींना वैश्वानरविद्येचा उपदेश देऊन राजा अश्वपति म्हणतात की जो ही विद्या जाणून हवन करतो त्याची समस्त पापे शिंगाचा अग्रभाग अग्नित टाकल्यावर जसा भस्म होतो त्याप्रमाणे भस्म होऊन जातात. (छां.उ.५/२४/३) याप्रकारे कठमध्ये परमात्मज्ञानाचे फल कोठे केवल हर्ष-शोकाचा नाश (१/२/१२) आणि कोठे मृत्युमुखातून सुटणे सांगितले गेले आहे. (१/३/१५) मुण्डकात अविद्येचा नाश (२/१/१०) आणि कोठे हृदयाची ग्रन्थि, समस्त संशय तथा कर्मांचा नाश सांगितला गेला आहे. (२/२/८) श्वेताश्वतरमध्ये समस्त पाशातून सुटणे (श्वे.उ.१/११; २/१५; ४/१५; १६; ५/१३; ६/१३) तसेच शोकाचा नाश होणे (श्वे.उ.४/७) आदि ब्रह्मज्ञानाचे फल सांगितले गेले आहे. याप्रकारे उपनिषदात ठिकठिकाणी ब्रह्मविद्येचे फल पुण्य, पाप आणि नाना प्रकारच्या विकारांचा नाश सांगितले गेले आहे. त्या मंत्रामध्ये परमात्म्याची अथवा परमपदाची किंवा परमधामाची प्राप्ती सांगितले गेलेली नाही; म्हणून सूत्रकार म्हणतात की अशा स्थळी जेथे केवळ दुःख, बंधन तसेच कर्मांचा त्याग अथवा नाश आदिंची गोष्ट सांगितली गेली आहे, त्याच्या वाक्यशेषाच्या रूपाने दुसर्‍या ठिकाणी सांगितलेले उपलब्धिरूप फलाचाहि अध्याहार करावयास हवा जसे परमात्म्याची प्राप्ती होणे (मु.उ.३/२/८) ब्रह्मधामाची प्राप्ती (मु.उ.३/२/४) ब्रह्मात लीन होणे (मु.उ.३/२/५) ब्रह्मलोकात परम अमृतस्वरूप होणे (मु.उ.३/२/६) अर्चि आदि मार्गाने ब्रह्मलोकामध्ये जाऊन तेथून परत न येणे (छां.उ.४/१५/५) आदि फलाचे वर्णन आहे; भाव हा आहे की जेथे जेथे केवल हानि-पाप-नाश आदिंचे वर्णन आहे, तेथे तेथे ब्रह्मलोक आदिची प्राप्ति वाक्यशेष आहे आणि जेथे केवळ उपायना (ब्रह्मधामाची प्राप्ती आदि) चेच वर्णन आहे, तेथे पूर्वोक्त हानि (दुःखनाश आदि) च वाक्यशेष आहे. म्हणून प्रत्येक समान विद्येत त्याचा अध्याहार करावयास पाहिजे. ज्यायोगे कुठल्या प्रकारचा विकल्प अथवा फलभेद रहाणार नाही. याप्रकारे वाक्यशेष ग्रहण करण्याचा दृष्टांत सूत्रकार देतात - जसे कौषितकी शाखा असणार्‍यांनी सामान्यतः वनस्पतिमात्राची कुशा घ्यावी असे म्हटले आहे. परंतु शाटयायन असलेल्यांनी त्याच्या स्थानी गूलराच्या लाकडाची बनलेली कुशा घ्यावी असे म्हटले आहे; म्हणून त्यांचे ते विशेष वचन कौषितकीच्या सामान्य वचनाचा वाक्य-शेष मानला जातो आणि दोन्ही शाखेचे लोक त्याचा स्वीकार करतात. याप्रकारे एका शाखेचे ‘छन्दोभिःस्तुवीत’ (देव आणि असुराच्या) छन्दाच्याद्वारा स्तुति करावी, याप्रकारे समान भावाने सांगतात. परंतु पैङ्गी शाखेचे ‘देवांचे छंद प्रथम म्हणावयास हवे.’ याप्रकारे विशेषरूपाने क्रम नियत करतात. तेव्हा त्या क्रमास पूर्वकथनाचा वाक्यशेष मानून सर्व स्वीकार करतात. जसे कुठल्या तरी शाखेत ‘षोडशिनः स्तोत्रमुपाकरोति’ (षोडशीचे स्तवन करावे) असे सामान्य वचन मिळते, परंतु तैत्तिरिय शाखेचे लोक या कर्मास अशा समयी कर्तव्य सांगतात की जेव्हा ब्रह्मवेळेत तारांचा लोप होतो आणि सूर्योदय झालेला नसतो. म्हणून हा कालविशेषाचा नियम पूर्वकथित वाक्याचा शेष (असून) म्हणून सर्वांना मान्य होतो. तसेच एका शाखेचे स्तुतिगानाच्या विषयी समान भावाने म्हणतात की, ‘ऋत्विज उपगायन्ति’ ‘ऋत्विज लोक स्तोत्राचे गान करोत.’ परंतु दुसर्‍या शाखेचे लोक असे विधान करतात की ‘नाध्वर्युरुपगायति’ ‘अध्वर्युने स्तोत्र-गान करता कामा नये.’ म्हणून यालाहि वाक्यशेष मानून हे सर्व हे स्वीकार करतात की ‘अध्वर्युला सोडून अन्य ऋत्विजांच्या द्वारा स्तोत्रांचे गान व्हावयास हवे.’ याप्रकारे जेथे केवळ पाप आदिच्या नाशाचीच गोष्ट सांगितली आहे, ब्रह्मलोकादिची प्राप्ती सांगितली गेलेली नाही, तेथे प्राप्तीरूप फळहि वाक्यशेषाच्या रूपाने ग्रहण करावयास हवे.
संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, ‘देवयान मार्गाने ब्रह्मलोकात जाणार्‍या महापुरुषांचे पापकर्म नष्ट होऊन जाते; परंतु पुण्यकर्म तर शेष रहातच असेल अन्यथा त्याचे ब्रह्मलोकी गमन कसे संभवनीय होईल ?’ कारण की, वरील लोकास जाणे शुभ कर्मांचेच फल आहे यावर सांगतात.


साम्पराये तर्तव्याभावात्तथा ह्यन्ये ॥ ३.३.२७ ॥


अर्थ - साम्पराये = ज्ञान्यासाठी परलोकात; तर्तव्याभावात् = भोगाच्या द्वारा पार करण्यायोग्य कुठलेहि कर्मफल शेष रहात नाही; या कारणाने (त्याचे पुण्यकर्महि येथे समाप्त होऊन जाते); हि = कारण की; तथा = हीच गोष्ट; अन्ये = अन्य शाखेचे लोक सांगतात.


व्याख्या - बृहदारण्यकोपनिषदात ही गोष्ट स्पष्ट शब्दात सांगितली गेली आहे की, ‘उभे उ हैवैष एते तरति ।’ (४/४/२२) अर्थात ‘हा ज्ञानी निश्चितच पुण्य आणि पाप दोन्हीना येथेच पार करतो.’ यावरून हे सिद्ध होते की ज्ञानी पुरुषाचा शरीर त्याग केल्यानंतर शुभाशुभ कर्माशी काहीही संबंध रहात नाही. त्याला जो ब्रह्मलोक (नित्यधाम) प्राप्त होतो, तो कुठल्या कर्माच्या फलस्वरूपात नाही तर ब्रह्मज्ञानाच्या बळाने प्राप्त होतो. म्हणून त्याच्यासाठी परलोकात जाऊन भोगद्वारा पार करण्यायोग्य कुठलेहि कर्मफल शेष रहात नाही. म्हणून त्याचे पुण्यकर्महि येथेच समाप्त होऊन जाते. ज्ञान्याच्या संचित आदि समस्त कर्मांचा सर्वथा नाश होऊन जातो या गोष्टीचे समर्थन मुण्डकोपनिषदात ही याप्रकारे केले गेले आहे, ‘तदा विद्वान पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति ।’ (मु.उ.३/१/३) ‘त्या समयी ज्ञानी पुरुष पुण्य आणि पाप दोन्हीना सारून निर्मल होऊन सर्वोत्तम साम्यरूप परब्रह्मास प्राप्त करतो.’
संबंध - येथे अशी जिज्ञासा होते की, ‘समस्त कर्मांचा नाश आणि ब्रह्माची प्राप्तीरूप फल तर ब्रह्मज्ञानाने येथेच तत्काल प्राप्त होते, मग देवयान मार्गाने ब्रह्मलोकात जाऊन परमात्म्याची प्राप्ती करण्याची गोष्ट का सांगितली गेली आहे ?’ यावर सांगतात.


छन्दत उभयथाविरोधात् ॥ ३.३.२८ ॥


अर्थ - छन्दतः = ज्ञानी पुरुषाच्या संकल्पानुसार; उभयथा = दोन्ही प्रकारची स्थिति होण्यामुळे; अविरोधात् = काही विरोध नाही (म्हणून ब्रह्मलोकात जाण्याचे विधान आहे.)


व्याख्या - छान्दोग्योपनिषद (३/१४/१) मध्ये म्हटले आहे की, ‘अथ खलु क्रतुमयः पुरुषो यथाक्रतुरास्मिँल्लोके पुरुषो भवति तथेतः प्रेत्य भवति ।’ अर्थात ‘हा पुरुष निश्चितच संकल्पमय आहे. या लोकात पुरुष जशा संकल्पाचा असेल तसाच देहत्यागानंतर येथून परलोकात गेल्यानंतर ही होतो.’ यावरून हे सिद्ध होते की जो ज्ञानी पुरुष कुठल्याहि लोकात जाण्याची इच्छा न करता येथेच मुक्त होण्याचा संकल्प बाळगतो, ब्रह्मज्ञानासाठी साधनात प्रवृत्त होते समयी ही ज्याची अशी भावना असेल तो तर तत्काळ येथेच ब्रह्मसायुज्य प्राप्त करतो, परंतु जो ब्रह्मलोक दर्शनाची इच्छा बाळगून साधनात प्रवृत्त झालेला असतो तसेच ज्याचा तिथे जाण्याचा संकल्प असतो तो देवयान मार्गाने तेथे जाऊनच ब्रह्मास प्राप्त करतो. याप्रकारे साधकाच्या संकल्पानुसार दोन्ही प्रकारची गति मानण्यात काहीही विरोध नाही.
संबंध - जर याप्रकारे ब्रह्मलोकात न जाता येथेच परमात्म्याची प्राप्ती होणे मानले गेले तर काय आपत्ति आहे ? यावर सांगतात.


गतेरर्थवत्त्वमुभयथान्यथा हि विरोधः ॥ ३.३.२९ ॥


अर्थ - गतेः = गतिबोधक श्रुतिची, अर्थवत्त्वम् = सार्थकता, उभयथा = दोन्ही प्रकाराने ब्रह्माची प्राप्ती मानल्यानेच होते; हि = कारण की, अन्यथा = जर अन्य प्रकाराने मानली तर; विरोधः = श्रुतित परस्पर विरोध येईल.


व्याख्या - श्रुतिमध्ये कोठे तर तत्काळच ब्रह्माची प्राप्ती सांगितली गेली आहे (क.उ.२/३/१४, १५) कोठे ब्रह्मलोकात गेल्यावर सांगितली गेली आहे (मु.उ.३/२/६) म्हणून जर उपरोक्त दोन्ही प्रकारांनी त्याची व्यवस्था मानली गेली नाही तर दोन्ही प्रकारच्या वर्णन करणार्‍या श्रुतिमध्ये विरोध येईल. म्हणुन हेच मानणे ठीक आहे की, साधकाच्या संकल्पानुसार दोन्ही प्रकारांनीही परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. असे मानल्यानेच देवयान मार्गाने गतिचे वर्णन करणार्‍या श्रुतिची सार्थकता होईल आणि श्रुतींचा परस्पर विरोध ही दूर होईल.
संबंध - पुन्हा हीच गोष्ट सिद्ध करतात.


उपपन्नस्तल्लक्षणार्थोपलब्धेर्लोकवत् ॥ ३.३.३० ॥


अर्थ - तल्लक्षणार्थोपलब्धेः = त्या देवयान मार्गाद्वारे ब्रह्मलोकात जाण्यास उपयुक्त सुक्ष्म शरीरादि उपकरणांच्या प्राप्तीचे कथन होण्याने; उपपन्नः = त्यांच्यासाठी ब्रह्मलोकात जाण्याचे कथन युक्तिसंगत आहे; लोकवत् = लोकातहि असे दिसून येते.


व्याख्या - श्रुतिमध्ये जेथे साधकांसाठी देवयान मार्गद्वारा ब्रह्मलोकात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे, त्या प्रकरणात त्यास उपयोगी उपकरणांचेहि वर्णन आढळून येते. श्रुतिमध्ये म्हटले आहे की हा जीवात्मा ज्या संकल्पाने युक्त असतो त्या संकल्पाद्वारा मुख्य प्राणात स्थित होतो. मुख्य प्राण उदान वायुमध्ये स्थित होऊन मन-इंद्रियांनी युक्त जीवात्म्यास त्याच्या संकल्पानुसार लोकात घेऊन जातो. (प्र.उ.३/१०) याचप्रकारे दुसर्‍या ठिकाणी अर्चि-अभिमानी देवतादिंना प्राप्त होणे सांगितले गेले आहे. (छां.उ.५/१०/१,२) याप्रकारे समस्त कर्मांचा अत्यंत अभाव झाल्यावरहि त्याचे दिव्य शरीराने संपन्न होणे सांगितले गेले आहे; परंतु ज्या साधकांचे शरीर असताच परब्रह्म परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष झालेला असतो; त्यांच्यासाठी तसे वर्णन येत नाही. (क.उ.२/३/१४) परंतु त्यांच्या विषयात श्रुतिने याप्रकारे सांगितले आहे की, ‘योऽकामो निष्काम आप्तकाम आप्तकामो न तस्य प्राणा उत्क्रामन्ति ब्रह्मैव सन् ब्रह्माप्येति ।’ (बृह.उ.४/४/६) अर्थात ‘जो कामनारहित, निष्काम, पूर्णकाम तथा केवळ परमात्म्याची इच्छा असणारा आहे, त्याचे प्राण वरील लोकात जात नाहीत. तो ब्रह्म होऊनच (येथे) ब्रह्मास प्राप्त होतो. म्हणून हेच मानणे सुसंगत आहे की, साधकाच्या संकल्पानुसार दोन्ही प्रकारांनी ही ब्रह्माची प्राप्ती होत असते. लोकातहि दिसून येते की ज्याला आपल्या स्थानापासून कोठे अन्यत्र जायचे असेल त्याच्या बरोबरच यात्रोपयोगी आवश्यक सामग्री रहात असते, त्याचप्रकारे उपरोक्त अधिकारी पुरुषासाठी दिव्य शरीर आदि उपकरणांचे वर्णन केले गेले आहे, म्हणून त्याचे या लोकातून ब्रह्मलोकात जाणे कथन उचितच आहे.
संबंध - ब्रह्मविद्येचे फल सांगताना श्रुतिने अनेक ठिकाणी ब्रह्मलोकात जाण्याची गोष्ट तर सांगितली आहे, परंतु देवयान मार्गाने जाण्याची गोष्ट सर्वत्र सांगितलेली नाही. म्हणून ही जिज्ञासा होते की, ब्रह्मलोकात जाणारे सर्व ब्रह्मवेत्ते देवयान मार्गानेच जातात अथवा ज्या ज्या विद्यांच्या प्रकरणात देवयान मार्गाचे वर्णन आहे त्यानुसार उपासना करणारे पुरुष त्या मार्गाने जातात. यावर सांगतात.


अनियमः सर्वेषामविरोधः शब्दानुमानाभ्याम् ॥ ३.३.३१ ॥


अर्थ - अनियमः = असा नियम नाही की त्या विद्यांच्या अनुसार उपासना करणारे देवयान मार्गद्वारा जातात; सर्वेषाम् = परंतु ब्रह्मलोकात जाणार्‍या सर्व साधकांची गति त्याच मार्गाने होते (हीच गोष्ट), शब्दानुमानाभ्याम् = श्रुति आणि स्मृतिनी सिद्ध होते (म्हणून); अविरोध = काही विरोध नाही.


व्याख्या - श्रुतिमध्ये काही ठिकाणी साधकास ब्रह्मलोक आणि परमधामाची प्राप्ती सांगितली गेली आहे; परंतु सर्व ठिकाणी देवयान मार्गाचे वर्णन नाही त्याचप्रकारे श्रीमद्‌भगवद्‌गीता आदि स्मृतिंमध्ये ही सर्व ठिकाणी मार्गाचे वर्णन नाही. म्हणून जेथे ब्रह्मलोकाच्या प्राप्तीची गोष्ट सांगितली गेली आहे तेथे जरी मार्गांचे वर्णन नसेल तरीही अन्य श्रुतिंच्या वर्णनावरून ही गोष्ट समजून घेतली पाहिजे; कारण की ब्रह्मलोकात गमन होईल तर कुठल्या ना कुठल्या मार्गानेच होईल. म्हणून हा नियम नाही की ज्या प्रकरणात देवयान मार्गाचे वर्णन आहे, त्या अनुसार उपासना करणारेच त्या मार्गाने जातात, दुसरे नाही. तर ज्यांचे ब्रह्मलोकात गमन सांगितले गेले आहे, ते सर्व देवयान मार्गाने जातात असे मानल्याने श्रुतिच्या कथनात कुठल्याहि प्रकारचा विरोध येणार नाही. येथे हे ही समजून घेतले पाहिजे की जे येथेच परमात्मप्राप्ती करून घेतात, ते ब्रह्मलोकास जात नाहीत.
संबंध - ‘वसिष्ठ आणि व्यास आदि जे अधिकारप्राप्त ऋषिगण आहेत त्यांची अर्चिमार्गाने गति होते अथवा ते याच शरीराने ब्रह्मलोकापर्यंत जाऊ शकतात ?’ यावर सांगतात.


यावदधिकारमवस्थितिराधिकारिकाणाम् ॥ ३.३.३२ ॥


अर्थ - अधिकारिकाणाम् = जे अधिकार प्राप्त कारक पुरुष आहेत त्यांची; यावदधिकारम् = जोपर्यंत अधिकाराची समाप्ति होत नाही तोपर्यंत; अवस्थितिः = आपल्या इच्छेनुसार स्थिति रहात असते.


व्याख्या - जे वसिष्ठ तथा व्यास आदि महापुरुष अधिकार घेऊन परमेश्वराच्या आज्ञेने येथे जगताचे कल्याण करण्यासाठी येतात, त्या कारक पुरुषांचे तर साधारण जीवांप्रमाणे येणे-जाणे होत नाही आणि जन्मणे आणि मरणे ही होत नाही. त्यांच्या सर्व क्रिया साधारण जीवांच्याहून विलक्षण आणि दिव्य होत असतात. ते आपल्या इच्छेनुसार शरीर धारण करण्यास समर्थ असतात, म्हणून त्यांच्यासाठी अर्चि आदि देवतांची मदत आवश्यक नसते. जोपर्यंत त्यांचा अधिकार असतो तोपर्यंत ते या जगतात आवश्यकतेनुसार सर्व लोकात स्वतंत्रतापूर्वक जाऊ शकतात. अंती परमात्म्यात विलीन होतात. म्हणून अन्य साधक अथवा मुक्त पुरुष त्यांच्या सारखे होऊ शकत नाहीत.
संबंध - बत्तीसाव्या सूत्रापर्यंत ब्रह्मलोक आणि परमात्मविषयक आलेल्या श्रुतिंवर विचार केला गेला. आता ब्रह्म आणि जीवाच्या स्वरूपाचे वर्णन करणार्‍या श्रुतिंवर विचार करण्यासाठी प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


अक्षरधियां त्ववरोधः सामान्यतद्भावाभ्यामौपसदवत्तदुक्तम् ॥ ३.३.३३ ॥


अर्थ - अक्षरधियाम् = अक्षर अर्थात परमात्म्याच्या निर्गुण-निराकार विषयक लक्षणांचा; तु = ही, अवरोधः = सर्व ठिकाणी अध्याहार करणे (उचित आहे), सामान्यतद्भावाभ्याम् = कारण की ब्रह्माची सर्व विशेषण समान आहेत तसेच त्याच्याच स्वरूपास लक्ष्य करणारे भाव आहेत; औपसदवत् = म्हणून ‘उपसत्’ कर्मसंबंधी मंत्राप्रमाणे, तदुक्तम् = त्यांचा अध्याहार करणे उचित आहे ही गोष्ट सांगितली गेली आहे.


व्याख्या - बृहदारण्यकात याज्ञवल्क्यांनी म्हटले आहे की, ‘हे गार्गि ! ज्याला तू विचारत आहेस, त्या तत्त्वास ब्रह्मवेत्ते लोक अक्षर म्हणतात अर्थात निर्गुण-निराकार अविनाशी ब्रह्म म्हणतात. ते मोठे नाही, बारीक नाही, लहान नाही, मोठे नाही.’ इत्यादि (बृह.उ.३/८/८) याप्रकारे तेथे ब्रह्मास या सर्व पदार्थाहून, इंद्रियांहून आणि शरीरधारी जीवांहून अत्यंत विलक्षण म्हटले गेले आहे. तथा मुण्डकोपनिषदात अंगिरा ऋषिनी शौनकास म्हटले आहे की, ‘ती परा विद्या आहे, जिच्या योगे त्या अक्षर (परब्रह्म परमात्म्या)ची प्राप्ती होत असते. जो जाणला अथवा पकडला जाऊ शकत नाही, जो गोत्र, वर्ण, डोळे, कान, पाय आदिरहित आहे, परंतु सर्वव्यापी, अतिसूक्ष्म, विनाशरहित आणि समस्त प्राण्यांचे कारण आहे, त्यास ज्ञानी पुरुष सर्व बाजूने पहातात. (मु.उ.१/१/५,६) या प्रकारे वेदात त्या अक्षरब्रह्माची जी विशेषणे सांगितली गेली आहेत, त्यांना ब्रह्माच्या वर्णनात सर्व ठिकाणी ग्रहण करणे आवश्यक आहे, कारण की ब्रह्माची सविशेष आणि निर्विशेष सर्व लक्षणे समान आहेत तथा सर्व त्याचेच भाव आहेत अर्थात त्या ब्रह्माच्या स्वरूपास लक्ष्य करण्यासाठीच ते भाव सांगितले गेले आहेत, म्हणून ‘उपसत्’ कर्मसंबंधी मंत्रांप्रमाणे त्यांचा अध्याहार करणे उचित आहे. ही गोष्ट सांगितली गेली आहे.
संबंध - मुण्डक (३/१/१) आणि श्वेताश्वतर (४/६) मध्ये तर पक्ष्याच्या दृष्टांताने जीव आणि ईश्वरास मनुष्याच्या हृदयात स्थित सांगितले गेले आहे. आणि कठोपनिषदात छाया आणि ऊन याप्रमाणे ईश्वर आणि जीवाचे मनुष्याच्या हृदयात स्थित असणे सांगितले गेले आहे. या श्रुतिमध्ये ज्या विद्येचे अथवा विज्ञानाचे वर्णन आहे, ते एक दुसर्‍याहून भिन्न आहे की अभिन्न ? या जिज्ञासेवर सांगतात.


इयदामननात् ॥ ३.३.३४ ॥


अर्थ - (उक्त तीन्ही मंत्रात एकाच ब्रह्मविद्येचे वर्णन आहे.) इयदामननात् = कारण की सर्व ठिकाणी इयत्तेचे वर्णन समान आहे.


व्याख्या - मुण्डक आणि श्वेताश्वतरमध्ये जे म्हटले आहे की ‘एकत्र राहून परस्पर सखाभाव बाळगणारे दोन पक्षी (जीवात्मा आणि परमात्मा) एकाच शरीररूप वृक्षाचा आश्रय घेऊन रहातात, त्या दोहोपैकी एक तर कर्मफलरूप सुख-दुःखांना भोगतो आणि दुसरा न खाता केवळ बघत रहातो.’ याप्रकारे हा जीव शरीराच्या आसक्तीत निमग्न होऊन असमर्थतेमुळे मोहित होऊन चिंता करीत राहतो. जर हा भक्तांच्याद्वारा सेवित आपल्याजवळ रहाणार्‍या सखा परमेश्वरास आणि त्याच्या विचित्र महिम्यास पाहिल तर तो तत्काळच शोकरहित होऊन जाईल. तथा कठोपनिषदात म्हटले आहे की ‘मनुष्य शरीरात परब्रह्माचे उत्तम निवासस्थान हृदयगुहेत लपलेले आहे आणि आपल्या सत्यस्वरूपाचा अनुभव करणारे (जीव आणि ईश्वर) दोन्ही आहेत जे की छाया आणि (प्रकाश) ऊन यांच्याप्रमाणे भिन्न स्वभावाचे आहेत, असे ब्रह्मवेत्ते लोक सांगतात. (क.उ.१/३/१) या सर्व ठिकाणी द्विवचनान्त शब्दांचा प्रयोग करून जीव आणि ईश्वरास परिच्छिन्न स्थल हृदयामध्ये स्थित सांगितले गेले आहे. यावरून हे सिद्ध होत आहे की तीन्ही ठिकाणी सांगितलेली विद्या एकच आहे. याचप्रकारे जेथे जेथे त्या परब्रह्म परमेश्वरास प्राण्यांच्या हृदयात स्थित म्हटले गेले आहे, त्या सर्व स्थळी वर्णीत विद्यांचीहि एकता समजून घेतली पाहिजे.
संबंध - आता (परमेश्वरास) परमात्म्यास सर्वान्तर्यामी सांगणार्‍या श्रुतिंवर विचार आरंभ करीत आहेत.


अन्तरा भूतग्रामवत्स्वात्मनः ॥ ३.३.३५ ॥


अर्थ - भूतग्रामवत् = आकाशादि भूतसमुदायाप्रमाणे (तो परमात्मा), स्वात्मनः = साधकाच्या स्वतःच्या आत्म्याचाहि, अन्तरा = अंतरात्मा (अंतर्यामी आहे.), आमननात् = कारण की ही गोष्ट अन्य श्रुतिमध्ये ही सांगितली गेली आहे.


व्याख्या - राजा जनकाच्या सभेत याज्ञवल्क्यांना चक्रायणाचा पुत्र उषस्ताने म्हटले की, ‘जे अपरोक्ष ब्रह्म आहे, जो सर्वांचा अंतरात्मा आहे, त्याच्याबद्दल मला समजावून सांगा.’ तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, ‘जो तुझा अंतरात्मा आहे, तोच सर्वांचा आहे.’ त्याने पुन्हा जिज्ञासा केल्यावर याज्ञवल्क्यांनी विस्ताराने समजाविले की, ‘जो प्राणाच्या द्वारा सर्वांना प्राणक्रिया संपन्न करतो.’ आदि. त्यानंतर उषस्ताने पुन्हा विचारल्यावर सांगितले की, ‘दृष्टिच्या द्रष्टयाला पाहू शकता येत नाही, श्रुतिच्या श्रोत्यास ऐकता येणे शक्य नाही, मतिच्या मन्त्याला मनन केले जाऊ शकत नाही, विज्ञातिच्या विज्ञात्यास जाणता येणे शक्य नाही, हा तुझा अंतरात्माच सर्वांचा अंतरात्मा आहे. जो भूक, तहान, शोक, मोह, वार्धक्य आणि मृत्यू या सर्वांच्या अतीत आहे.’ इत्यादि. (बृह.उ.३/५/१) या दोन्ही प्रकरणांना दृष्टि समोर ठेवून या प्रकारच्या सर्व प्रकरणांचा एकत्रित निर्णय करतात. येथे हा प्रश्न उठतो की, यात जो अंतरात्मा सांगितला गेला आहे, तो जीवात्मा आहे की परमात्मा ? जर परमात्मा असेल तर कुठल्या प्रकारे ? याचे उत्तर देताना सूत्रकार म्हणतात की, ज्याप्रकारे भूतसमुदायात पृथ्वीचा अंतरात्मा जल आहे, जलाचा तेज आहे, तेजाचा वायु आहे, आणि वायुचा ही आकाश आहे. म्हणून सर्वांचा अंतरात्मा आकाश आहे. त्याचप्रकारे समस्त जड तत्त्वांचा अंतरात्मा जीवात्मा आहे आणि जो आपला आपणच अर्थात जीवात्म्याचाहि अंतरात्मा आहे. तो सर्वांचा अंतरात्मा आहे. कारण की अन्य श्रुतिमध्ये हीच गोष्ट सांगितली गेली आहे. अर्थात त्याच प्रकरणाच्या सातव्या ब्राह्मणांत उद्दालकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना याज्ञवल्क्यांनी त्या परब्रह्म परमात्म्यास पृथ्वी आदि समस्त भूत-समुदायाचा अंतर्यामी म्हणून सांगून शेवटी विज्ञानाच्या अर्थात जीवात्म्याचाहि अंतर्यामी त्यास म्हटले आहे. तथा प्रत्येक वाक्याच्या शेवटी म्हटले आहे की, ‘हाच तुझा अंतर्यामी अमृतस्वरूप आत्मा आहे. श्वेताश्वतरमध्ये ही म्हटले आहे की, ‘सर्व प्राण्यांच्यामध्ये लपलेला तो एक देव सर्वव्यापी आणि समस्त प्राण्यांचा अंतरात्मा आहे, तो सर्वांचा कर्मांचा अधिष्ठाता, सर्वांचे निवासस्थान, सर्वांचा साक्षी, सर्वथा विशुद्ध आणि गुणातीत आहे.’ (श्वेता.उ.६/११) म्हणून हेच सिद्ध होत आहे की, सर्वांचा अंतरात्मा तो परब्रह्म पुरुषोत्तमच आहे. जीवात्मा सर्वांचा अंतरात्मा होऊ शकत नाही.
संबंध - आता सांगितलेल्या गोष्टीत शंका उत्पन्न करून तिचे उत्तर देतात.


अन्यथाभेदानुपपत्तिरिति चेन्नोपदेशान्तरवत् ॥ ३.३.३६ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की; अन्यथा = दुसर्‍या प्रकारांनी; अभेदानुपपत्तिः = अभेदाची सिद्धि होणार नाही म्हणून, (उक्त प्रकरणात जीवात्मा आणि परमात्मा यांचा अभेद मानणेच उचित आहे.) इति न = तर हे ठीक नाही. उपदेशान्तरवत् = कारण की दुसर्‍या उपदेशाप्रमाणे अभेदाची सिद्धि होऊन जाईल.


व्याख्या - जर म्हणाल की, उक्त वर्णनानुसार जीवात्मा आणि परमात्म्याच्या भेदास उपाधिकृत न मानता वास्तविक मानल्याने अभेदाची सिद्धि होणार नाही तर अशी गोष्ट नाही आहे. दुसर्‍या ठिकाणच्या उपदेशाप्रमाणे येथे ही अभेदाची सिद्धि होऊन जाईल. अर्थात ज्याप्रकारे दुसर्‍या ठिकाणी कार्यकारणभावाच्या अभिप्रायाने परब्रह्म परमेश्वराची जड-प्रपंच आणि जीवात्म्याशी एकता करून उपदेश दिला गेला आहे, त्याचप्रकारे प्रत्येक ठिकाणी अभेदाची सिद्धि होऊन जाईल. भाव हा आहे की, श्वेतकेतुला त्याच्या पित्याने माती, लोखंड आणि सोन्याच्या अंशद्वारा कार्य-कारणाची एकता समजावली, त्यानंतर (छां.उ.६/८/१ पासून ६/१६/३ पर्यंत) नऊ वेळा वेगवेगळे दृष्टांत देऊन प्रत्येकाच्या अंती हीच गोष्ट सांगितली गेली आहे की, ‘स य एषोऽणिमैतदात्म्यमिदं सर्वं तत्सत्य्ँ स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो.’ ‘हा जो अणिमा अर्थात अत्यंत सूक्ष्म परमात्मा आहे, याचे स्वरूप हे समस्त जगत आहे, तोच सत्य आहे, तो आत्मा आहे, आणि तो तू आहेस अर्थात कार्य आणि कारणाप्रमाणे तुझी आणि त्त्याची एकता आहे.’ त्याचप्रकारे सर्व ठिकाणी समजून घेतले पाहिजे.
संबंध - जर परमात्मा आणि जीवात्म्याचा उपाधिकृत भेद आणि वास्तविक अभेद मानला गेला तर काय हानि आहे ? या जिज्ञासेवर सांगतात.


व्यतिहारो विशिषन्ति हीतरवत् ॥ ३.३.३७ ॥


अर्थ - व्यतिहारः = परस्पर व्यत्यय करून अभेदाचे वर्णन आहे, म्हणून उपाधिकृत भेद सिद्ध होत नाही; हि = कारण की, इतरवत् = सर्व श्रुति दुसरीप्रमाणे, विशिषन्ति = विशेषण देऊन वर्णन करतात.


व्याख्या - परमात्म्याबरोबर जीवात्म्याची एकता प्रतिपादन करताना श्रुतिने म्हटले आहे की, ‘तद् योऽहं सोऽसौ योऽसौ सोऽहम् ।’ अर्थात ‘जो मी आहे, तोच तो आहे आणि जो तो आहे, तोच मी आहे.’ (ऐ.आ.२/४/३) तथा ‘त्वं वा अहमस्मि भगवो देवते अहं वै त्वमसि’ (वराहोपनिषद २/३४) अर्थात ‘हे भगवन् ! हे देव ! निश्चितच ‘तुम्ही’ मी आहात आणि ‘मी’ तुम्ही आहात.’ याप्रकारे प्रतिहारपूर्वक अर्थात एकामध्ये दुसर्‍याच्या धर्मांचा विनिमय करीत एकतेचे प्रतिपादन केले गेले आहे. असे वर्णन त्याच ठिकाणी केले जाते जेथे इतर वस्तुप्रमाणे वास्तवात भेद असून ही प्रकारान्तराने अभेद दाखविणे अभीष्ट असते. जसे की, दुसर्‍या ठिकाणी श्रुतिमध्ये दिसून येते. ‘अथ खलु य उद्गीथः स प्रणवो यः प्रणवः स उद्गीथः ।’ (छां.उ.१/५/१) अर्थात निश्चितच जो उद्गीथ आहे तो प्रणव आहे आणि जो प्रणव आहे तोच उद्गीथ आहे.’ उद्गीथ आणि प्रणवात भेद असूनहि येथे उपासनेसाठी श्रुतिने व्यतिहारवाक्यद्वारा दोन्हीची एकता प्रतिपादन केली आहे. याचप्रकारे येथे ही उपासनेसाठी परमात्म्याशी जीवात्म्याची एकता दाखविली गेली आहे, असे समजले पाहिजे. जेथे उपाधिकृत भेद असतो, तेथे असे कथन संगत ठरत नाही. येथे या एकतेच्या प्रतिपादनाचे हेच प्रयोजन जाणून येत आहे की, उपासक जर उपासना काळी आपल्याला परमात्म्याप्रमाणे देह आणि त्याचे व्यवहारापासून सर्वथा असंग तथा नित्य-शुद्ध-बुद्ध-मुक्त समजून तद्रूप होऊन ध्यान करील तर तो शीघ्रच सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्यास प्राप्त होऊन जाईल. (होतो)
संबंध - पुन्हा प्रकारान्तराने औपाधिक भेदाच्या मान्यतेचे निराकरण करतात.


सैव हि सत्यादयः ॥ ३.३.३८ ॥


अर्थ - सा एव = (परमात्मा आणि जीवाचा औपाधिक भेद तथा वास्तवात अत्यंत अभेद मानल्यावर) तीच अनुपपत्ति आहे; हि = कारण की; सत्यादयः = (परमात्म्याचे) सत्यसंकल्पत्व आदि धर्म (जीवात्म्याचे मानता येणे शक्य नाही.)


व्याख्या - जशी पूर्वसूत्रात ही अनुपपत्ति दाखविली गेली आहे की, जीवात्मा व परमात्म्यात अत्यंत अभेद असून श्रुतिच्या व्यतिहार-वाक्यद्वारा दोन्हीची एकता स्थापन करणे संगत होऊ शकत नाही. तशीच अनुपपत्ति या सूत्रात ही प्रकारान्तराने दाखविली जात आहे. सांगणे हे आहे की, परमात्म्याच्या स्वरूपाचे जेथे वर्णन केले गेले आहे तेथे त्यास सत्यकाम, सत्यसंकल्प, अपहतपाप्मा, अजर-अमर, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वांचे परम कारण तथा सर्वाधार म्हटले गेले आहे. हे सत्यकामच आदि धर्म जीवात्म्याच्या धर्माहून सर्वथा विलक्षण आहेत. जीवात्म्यात यांचे पूर्णरूपाने असणे संभव नाही. जेव्हा दोन्हीमध्ये धर्माची समानता नाही तर त्यांच्यात अत्यंत अभेद कसा सिद्ध होऊ शकतो ? म्हणून परमात्मा आणि जीवात्म्याचा भेद उपाधिकृत आहे ही मान्यता असंगत आहे.
संबंध - जर असे म्हटले गेले की, ‘परब्रह्म परमेश्वरात जे सत्यकामत्व आदि धर्म श्रुतिद्वारा सांगितले गेले आहेत, ते स्वाभाविक नाहीत तर उपाधिच्या संबंधाने आहेत, वास्तवात ब्रह्माचे स्वरूप तर निर्विशेष आहे. म्हणून या धर्मांना धरून जीवापासून त्याची भिन्नता दाखविली जाऊ शकत नाही.’ तर हे कथन ठीक नाही, कारण की -


कामादीतरत्र तत्र चायतनादिभ्यः ॥ ३.३.३९ ॥


अर्थ - (त्या परब्रह्माचे) इतरत्र = दुसर्‍या ठिकाणी (सांगितले गेलेले); कामादि = सत्यकामत्वादि धर्म; तत्र च = जेथे निर्विशेष स्वरूपाचे वर्णन आहे, तेथे ही आहे; आयतनादिभ्यः = कारण की तेथे त्याचे सर्वाधारकत्व आदि धर्मांचे वर्णन आढळून येते.


व्याख्या - त्या परब्रह्म परमेश्वराचे जे सत्यसंकल्पत्व सर्वज्ञत्व तथा सर्वेश्वरत्वादि धर्म विभिन्न श्रुतिमध्ये सांगितले गेले आहेत; ते सर्व जेथे निर्विशेष ब्रह्माचे वर्णन आहे तेथेहि आहेतच, कारण की निर्विशेष स्वरूपाचे प्रतिपादन करणार्‍या श्रुतिंमध्येहि ब्रह्माचे सर्वाधारकत्व आदि सविशेष धर्मांचे वर्णन आहे. म्हणून तसाच दुसर्‍या धर्मांचाहि अध्याहार करून घेणे उचित आहे. बृहदारण्यकात गार्गीच्या प्रश्नाचे उत्तर देताना याज्ञवल्क्यांनी त्या परम अक्षर परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. तेथे प्रथम ‘अस्थूलमनणु’ (स्थूल नाही, सूक्ष्म नाही) इत्यादि प्रकारे निर्विशेष स्वरूपाच्या लक्षणांचे वर्णन करून शेवटी म्हटले आहे की, ‘या अक्षराच्याच प्रशासनात सूर्य आणि चंद्रमा धारण केले गेले आहेत, या अक्षराच्याच प्रशासनात द्युलोक आणि पृथ्वी धारण केली गेली आहे.’ याप्रकारे याज्ञवल्क्यांनी येथे त्या अक्षरब्रह्मास समस्त जगताचा आधार म्हटले आहे. (बृह.उ.३/८/८-९) याप्रकारे मुण्डकोपनिषदात ‘जाणण्यात न येणारे, पकडता न येणारे’ इत्यादि प्रकाराने निर्विशेष स्वरूपाच्या धर्मांचे वर्णन केल्यानंतर त्या ब्रह्माला नित्य, विभु, सर्वगत, अत्यंत सूक्ष्म आणि समस्त प्राण्यांचे कारण सांगून त्यास विशेष धर्मांनी युक्त हि म्हटले गेले आहे. (मु.उ.१/१/६) यावरून हे सिद्ध होत आहे की, ‘तो परमात्मा दोन्ही प्रकारच्या धर्मांनी युक्त आहे.’ म्हणून दुसर्‍या ठिकाणी सांगितलेले सत्यसंकल्पत्व, सर्वज्ञत्व आदि जितके म्हणून परमेश्वराचे दिव्य गुण आहेत, ते त्यात स्वाभाविक आहेत, उपाधिकृत नाहीत. म्हणून जेथे ज्या लक्षणांचे वर्णन नाही आहे, तेथे त्यांचा अध्याहार करावयास हवा. याप्रकारे परमात्मा आणि जीवात्मा यात समानधर्मता नसल्यामुळे त्यांच्यात सर्वथा अभेद मानला जाऊ शकत नाही.
संबंध - जर जीव आणि ईश्वराचा भेद उपाधिकृत मानला गेला नाही तर मग अनेक द्रष्टयांची सत्ता सिद्ध होईल, या परिस्थीतीमध्ये श्रुतिद्वारा जे सांगितले गेले आहे की, ‘याच्याहून अन्य कोणी द्रष्टा नाही.’ इत्यादि; याची व्यवस्था कशी होईल ? यावर सांगतात


आदरादलोपः ॥ ३.३.४० ॥


अर्थ - आदरात् = हे कथन परमेश्वराप्रती आदराचे प्रदर्शक असल्यामुळे; अलोपः = त्यात अन्य द्रष्टयाचा लोप अर्थात निषेध नाही.


व्याख्या - त्या परब्रह्म परमेश्वरास सर्वश्रेष्ठ दाखविण्यासाठी तेथे आदराच्या दृष्टीने अन्य द्रष्टयाचा निषेध केला गेला आहे; वस्तवात नाही. भाव हा आहे की, तो परब्रह्म परमेश्वर असा द्रष्टा, असा सर्वश्रेष्ठ ज्ञाता आहे की त्यांच्या तुलनेत अन्य सर्व जीव द्रष्टे असूनहि नसल्यासारखे आहेत; कारण की, त्यांच्यात पूर्ण द्रष्टेपणा नाही. प्रलयकालात जड तत्त्वांप्रमाणे जीवांनाहि कुठल्याहि प्रकारचे विशेष ज्ञान रहात नाही, तसेच वर्तमान कालातहि जे जीवाचे जाणणे, पहाणे, ऐकणे आदि आहे ते सीमित आहे आणि त्या अंतर्यामी परमेश्वराच्याच सत्तेने (सकाशाने) आहे. (ऐ.उ.१/३/११) तथा (प्र.उ.४/९) तोच त्याचा प्रेरक आहे, म्हणून हा सर्वथा स्वतंत्र नाही. यावरून हेच सिद्ध होत आहे की श्रुतिचे हे कथन भगवंताची श्रेष्ठता दाखविण्यासाठी आहे, वास्तवात अन्य द्रष्टयाचा निषेध करण्यासाठी नाही.
संबंध - उपर्युक्त कथन परमेश्वराप्रती आदर सूचित करण्यासाठी आहे, ही गोष्ट प्रकारान्तराने सिद्ध करतात.


उपस्थितेऽतस्तद्वचनात् ॥ ३.३.४१ ॥


अर्थ - उपस्थिते = उक्त वचनांनी ज्या प्रकारे अन्य चेतनाचा निषेध प्राप्त झाल्यावरहि; अतः = या ब्रह्माच्या तुलनेत अन्य द्रष्टयाचा निषेध सांगितल्यामुळे; (हे कथन आदरार्थकच आहे.) तद्वचनात् = कारण की, त्या वाक्यांच्या बरोबर वारंवार अतः शब्दाचा प्रयोग केला गेला आहे.


व्याख्या - जेथे त्या परमात्म्याहून अन्य द्रष्टा, श्रोता आदिचा निषेध आहे (बृह.उ.३/७/२३) तेथे त्या वर्णनात वारंवार ‘अतः’ शब्दाचा प्रयोग केला गेला आहे, म्हणून हेच सिद्ध होत आहे की, याच्या इतका अथवा याच्याहून श्रेष्ठ कोणी द्रष्टा, श्रोता नाही आहे. जर सर्वथा अन्य द्रष्टयाचा निषेध करणे अभीष्ट असते तर ‘अतः’ शब्दाची काही आवश्यकता वाटली नसती. जसे असे म्हटले गेले की, याच्याहून अन्य कोणी धार्मिक नाही तर या कथनाद्वारे अन्य धार्मिकापेक्षा त्याची श्रेष्ठता दाखविणेच अभीष्ट आहे, अन्य सर्व धार्मिकांचा अभाव दाखविणे अभीष्ट नाही. त्याचप्रकारे तेथे जे असे म्हटले गेले आहे की, ‘या परमात्म्याहून अन्य कोणी द्रष्टा आदि नाही.’ या कथनाचा ही हाच अर्थ आहे की, याहून अधिक कोणी द्रष्टा पण आदि गुणांनी युक्त पुरुष नाही आहे. हा परमात्माच सर्वश्रेष्ठ द्रष्टा आदि आहे; कारण की त्याच वर्णनाच्या प्रसंगात (बृह.उ.३/७/२२) परब्रह्म परमात्म्यास जीवात्म्याचा अंतर्यामी आणि जीवात्म्यास त्याचे शरीर म्हणून दोन्हीतील भेदाचे प्रतिपादन केले आहे. जर ‘नान्योऽतो द्रष्टा’ इत्यादि वाक्यांनी अन्य द्रष्टा अर्थात जीवात्म्याचा निषेध सांगणे मानले गेले तर पूर्व वर्णनाशी विरोध येईल. म्हणून येथे अन्य द्रष्टयाच्या निषेधाचे तात्पर्य परमात्म्यास सर्वश्रेष्ठ द्रष्टा सांगून त्याच्या प्रती आदर प्रदर्शित करणे हेच समजले पाहिजे.
संबंध - येथपर्यंत निर्णय केला गेला की, जीवात्मा आणि परमात्म्याचा भेद उपाधिकृत नाही तसेच परब्रह्म परमेश्वरात जे सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्ता, सर्वाधारकता तसेच सर्वसुहृद होणे आदि दिव्य गुण शास्त्रात सांगितले गेले आहेत ते ही उपाधिकृत नाहीत परंतु स्वभावसिद्ध आणि नित्य आहेत. जेथे ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिपादन करते समयी त्यांचे वर्णन केले नसेल तेथे हि त्यांचा अध्याहार करावयास हवा. आता फलविषयक श्रुतिंचा विरोधाभास दूर करून सिद्धांत निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरण आरंभ केले जात आहे. दहरविद्येत तसेच प्रजापति इंद्राच्या संवादात ज्या ब्रह्मविद्येचे वर्णन आहे तिच्या फलात इच्छेनुसार नाना प्रकारचे भोग भोगण्याची गोष्ट आली आहे. (छां.उ.८/२/१ पासून १० पर्यंत) परंतु दुसर्‍या ठिकाणी असे म्हटलेले नाही. म्हणून ही जिज्ञासा होत आहे की, ब्रह्मलोक प्राप्त होणार्‍या सर्व साधकांसाठी हा नियम आहे की यात विकल्प आहे ? यावर सांगतात.


तन्निर्धारणानियमस्तद्‍दृष्टेः पृथग्‍ह्यप्रतिबन्धः फलम् ॥ ३.३.४२ ॥


अर्थ - तन्निर्धारणानियमः = भोग भोगण्यासंबंधी निश्चित नियम नाही आहे; तद्‌दृष्टेः = कारण की ही गोष्ट त्या प्रकरणात वारंवार ‘यदि’ शब्दाच्या प्रयोगाने दिसून येत आहे; हि = याशिवाय दुसरे कारण हे ही आहे की, पृथक् = कामोपभोगाहून भिन्न संकल्प असणार्‍यांसाठी, अप्रतिबन्धः = जन्म-मरण्याच्या बंधनातून सुटणेच, फलम् = फल सांगितले गेले आहे.


व्याख्या - ब्रह्मलोकात जाणार्‍या सर्व साधकांना त्या लोकातील दिव्य भोगांचा उपभोग घ्यावा लागतो, असा नियम नाही. कारण की जेथे जेथे ब्रह्मलोकप्राप्तीचे वर्णन केले गेले आहे, तेथे सर्व ठिकाणी भोगांच्या उपभोगाची गोष्ट सांगितलेली नाही. तथा जेथे सांगितली गेली आहे तेथे ही ‘यदि’ शब्दाचा प्रयोग करून साधकांच्या इच्छेनुसार तिचा विकल्प दाखविला गेला आहे.(छां.उ.८/२/१ पासून १० पर्यंत) यावरून हे स्पष्ट होत आहे की, जे साधक ब्रह्मलोकातील अथवा अन्य कुठल्याहि देवलोकातील भोग भोगण्याची इच्छा बाळगतात त्यांनाच ते भोग मिळतात, ब्रह्मविद्येच्या स्तुतिसाठी हे आनुषंगिक वर्णन आहे, त्या विद्येचे मुख्य फल नाही. परमात्म्याच्या साक्षात्कारात तर हे भोग विलंब करणारी विघ्ने आहेत; म्हणून साधकाने या भोगांची ही उपेक्षा केली पाहिजे. म्हणून ज्यांच्या मनात भोग भोगण्याचा संकल्प नाही, त्यांच्यासाठी जन्म-मरणाच्या बंधनातून सुटून तत्काल परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होणेच हिचे मुख्य फल सांगितले आहे. (बृह.उ.४/४/६ तसेच क.उ.२/३/१४)
संबंध - जर ब्रह्मलोकातील भोग ही त्या परब्रह्म परमेश्वराच्या साक्षात्कारात विलंब करणारे आहेत, तर श्रुतिने अशा फलांचे वर्णन कशासाठी केले ? या जिज्ञासेवर सांगतात.


प्रदानवदेव तदुक्तम् ॥ ३.३.४३ ॥


अर्थ - तदुक्तम् = ते कथन; प्रदानवत् = वरदानाप्रमाणे; एव = च आहे,


व्याख्या - ज्याप्रकारे भगवान अथवा कोणी शक्तिशाली महापुरुष कुणा श्रद्धाळू व्यक्तिला त्याची श्रद्धा आणि रुचि वाढविण्यासाठी वरदान देऊ करतो त्याचप्रकारे स्वर्गाच्या भोगांविषयी आसक्ती बाळगणारे सकामकर्मी श्रद्धाळू मनुष्यांची ब्रह्मविद्येत श्रद्धा वाढवून तिच्यात त्यांना प्रवृत्त करण्यासाठी व कर्मांच्या फलरूप स्वर्गीय भोगांची तुच्छता दाखविण्यासाठी ही श्रुतीचे ते कथन आहे.
संबंध - उक्त सिद्धांतास पुष्ट करण्यासाठी दुसरी युक्ति देतात.


लिङ्गभूयस्त्वान्तद्धि बलींयस्तदपि ॥ ३.३.४४ ॥


अर्थ - लिङ्गभूयस्त्वात् = जन्म-मरणरूपी संसारातून कायमचे मुक्त होऊन त्या परब्रह्मास प्राप्त होणे रूप फल सांगून लक्षणांची अधिकता होण्यामुळे; तद्‌बलीय = तेच फल बलवान (मुख्य) आहे; हि = कारण की, तदपि = ते दुसर्‍या फलांचे वर्णन ही मुख्य फलाचे महत्त्व प्रकट करण्यासाठीच आहे.


व्याख्या - वेदांत शास्त्रात जेथे जेथे ब्रह्मज्ञानाच्या फलाचे वर्णन केले गेले आहे, तेथे या जन्म-मृत्यूरूप संसारातून कायमचे सुटून त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होणे रूप फलाचेच अधिकतेने वर्णन आढळून येते; म्हणून तेच प्रबल अर्थात प्रधान फल आहे, असे मानले पाहिजे. कारण की त्याच्या बरोबर जी काही काही प्रकरणात ब्रह्मलोकातील भोगांची प्राप्ती रूप दुसर्‍या फलाची वर्णने आली आहेत, तीही मुख्य फलाची प्रधानता सिद्ध करण्यासाठीच आहेत. म्हणून त्याचे सर्व प्रकरणात वर्णन केले गेले नाही; परंतु उपर्युक्त मुख्य फलांचे वर्णन तर सर्व प्रकरणात आले आहे.
संबंध - ब्रह्मज्ञानच या जन्म-मृत्यूरूप संसारातून सुटण्याचा निश्चित उपाय आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पूर्वपक्षाची उत्थापना केली जात आहे.


पूर्वविकल्पः प्रकरणात्स्यात् क्रियामानसवत् ॥ ३.३.४५ ॥


अर्थ - क्रियामानसवत् = शारीरिक आणि मानसिक क्रियांमध्ये स्वीकृत विकल्पाप्रमाणे; पूर्वविकल्पः = प्रथम सांगितलेली अग्निविद्या ही विकल्पापासून मुक्तिचा हेतु, स्यात्= होऊ शकते, प्रकरणात् = ही गोष्ट प्रकरणाने सिद्ध होत आहे.


व्याख्या - नचिकेताचे प्रश्न आणि यमराजांचे उत्तरविषयक प्रकरणाची आलोचना करण्याने हेच सिद्ध होत आहे की, ज्याप्रकारे उपासनासंबंधी शारीरिक क्रियेप्रमाणे मानसिक क्रियाहि फल देण्यास समर्थ आहे, म्हणून अधिकारिभेदाने जे फल शारीरिक क्रिया करणार्‍यास मिळते, तेच मानसिक क्रिया करणार्‍यास ही मिळते; त्याचप्रकारे अग्निहोत्ररूप कर्महि ब्रह्मविद्येप्रमाणे मुक्तिचा हेतु होऊ शकते. उक्त प्रकरणात नचिकेताने प्रश्न करते समयी यमराजास असे म्हटले आहे की, ‘स्वर्गलोकात किंचितमात्र भय नाही, तेथे आपले भय नाही, अथवा वृद्धपणाचे भय नाही, भूक आणि तहान यांना पार करून हा जीव शोकरहित होऊन स्वर्गात प्रसन्न होतो; तो स्वर्ग देणारे अग्निहोत्ररूप जे कर्म त्याचे रहस्य आपण जाणता, ते मला सांगा.’ इत्यादि (क.उ.१/१/१२-१३) यावर यमराजांनी त्या अग्निहोत्र-क्रियेसंबंधीचे सर्व रहस्य नचिकेतास समजावले. (१/१/१५) नंतर त्या अग्निहोत्ररूप कर्माची स्तुति करताना यमराजांनी म्हटले आहे की, ‘या अग्निहोत्राचे तीन वेळा अनुष्ठान करणारा जन्म-मृत्यूपासून तरून जातो आणि अत्यंत शांतीला प्राप्त करतो.’ इत्यादि (१/१/१७-१८) या प्रकरणाकडे पाहिल्यावर या अग्निहोत्ररूप कर्मास मुक्तिचे कारण मानण्यात काहीही आपत्ति कळून येत नाही. ज्याप्रकारे यापूर्वी सांगितलेली ब्रह्मविद्या मुक्तिमध्ये हेतु आहे, तशीच त्या पूर्वी सांगितले गेलेले अग्निहोत्ररूप कर्म ही मुक्तित हेतु मानले जाऊ शकते.
संबंध - ही गोष्ट दृढ करतात.


अतिदेशाच्च ॥ ३.३.४६ ॥


अर्थ - अतिदेशात् = अतिदेशाने अर्थात विद्येसमान कर्मांनाहि मुक्तिमध्ये हेतु सांगितल्यामुळे, च = हि (वर सांगितलेली गोष्ट सिद्ध होत आहे.)


व्याख्या - केवळ प्रकरणाच्या बळावरच कर्म मुक्तिमध्ये हेतु सिद्ध होत आहे अशी गोष्ट नाही. श्रुतिने विद्येप्रमाणेच कर्माचेहि फळ सांगितले आहे. यथा - ‘त्रिकर्मकृत्तरति जन्ममृत्यू ।’ (क.उ.१/१/१७) अर्थात ‘यज्ञ, दान आणि तपरूप तीन कर्मांना करणारा मनुष्य जन्म-मृत्यूपासून तरून जातो.’ यायोगे ही कर्मांचे मुक्तिमध्ये हेतु होणे सिद्ध होत आहे.
संबंध - प्रथम दोन सूत्रात उत्पन्न केलेल्या पूर्वपक्षास सूत्रकार उत्तर देतात. -


विद्यैव तु निर्धारणात् ॥ ३.३.४७ ॥


अर्थ - तु = परंतु; निर्धारणात् = श्रुतिंच्या द्वारा निश्चितरूपाने सांगितले गेले आहे त्या कारणाने; विद्या एव = केवल मात्र ब्रह्मविद्याच मुक्तिमध्ये कारण आहे. (कर्म नाही.)


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।’ अर्थात ‘त्या परब्रह्म परमात्म्यास जाणूनच मनुष्य जन्म-मरणाचे उल्लंघन करतो. परमपदा (मोक्षा) च्या प्राप्तीसाठी दुसरा कोठलाहि मार्ग (उपाय) नाही आहे. (श्वेता.उ.३/८) याप्रकारे येथे निश्चितरूपाने एकमात्र ब्रह्मज्ञानासच मुक्तिचे कारण सांगितले गेले आहे, म्हणून ब्रह्मविद्याच मुक्तिचा हेतु आहे, कर्म नाही. ब्रह्मविद्येचा उपदेश देतेसमयी नचिकेतास स्वयं यमराजाने म्हटले आहे की, ‘एको वशी सर्वभूतान्तरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति । तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम् ॥’ ‘जो सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी, एक, अद्वितीय तथा सर्वांना आपल्या ताब्यात ठेवणारा आहे, जो आपल्या एकाच रूपास अनेक प्रकारचे बनवितो, त्या आपल्याच हृदयात स्थित परमेश्वरास जे ज्ञानी पहातात, त्यांना शाश्वत आनंद प्राप्त होतो, दुसर्‍यांना नाही.’ (क.उ.२/२/१२) म्हणून प्रथम अग्निविद्येच्या प्रकरणात जे जन्म-मृत्यूपासून सुटणे आणि अत्यंत शांतिची प्राप्तीरूप फल सांगितले आहे, ते कथन स्वर्गलोकाची स्तुति करण्यासाठी गौण रूपाने आहे असे समजावयास पाहिजे.
संबंध - ही गोष्ट दृढ करतात.


दर्शनाच्च ॥ ३.३.४८ ॥


अर्थ - दर्शनात् = श्रुतिमध्ये ठिकठिकाणी असे वर्णन दिसून येण्याने; च = हि (हेच दृढ होत आहे.)


व्याख्या - श्रुतिमध्ये यज्ञादि कर्मांचे फल स्वर्गलोकात जाऊन परत येणे, (मु.उ.१/२/९-१०) आणि ब्रह्मज्ञानाचे फल जन्ममरणातून सुटून परमात्म-प्राप्ती होणे (मु.उ.३/२/५,६) सांगितले गेले आहे. यावरूनहि हे सिद्ध होत आहे की, एकमात्र ब्रह्मविद्याच मुक्तिमध्ये हेतु आहे, यज्ञादि कर्मे नाहीत.
संबंध - प्रकारान्तराने पूर्वपक्षाचे उत्तर देऊन हे प्रकरण समाप्त करतात.


श्रुत्यादिबलीयस्त्वाच्च न बाधः ॥ ३.३.४९ ॥


अर्थ - श्रुत्यादिबलीयस्त्वात् = प्रकरणापेक्षा श्रुतिप्रमाण आणि लक्षणे आदि बलवान असल्यामुळे; च = हि, बाधः = प्रकरणद्वारा सिद्धांतास बाधा; न = येऊ शकत नाही.


व्याख्या - वेदाचा अर्थ आणि भावाचा निर्णय करण्यात प्रकरणापेक्षा श्रुतिचे वचन आणि लक्षणे आदि अधिक बलवान मानली जातात. म्हणून प्रकरणाने सिद्ध होणार्‍या गोष्टीचे निराकरण करणारी अनेक श्रुतिप्रमाणे असतील तथा त्याच्या विरुद्ध लक्षणेहि उपलब्ध होतील तर केवळ प्रकरणाचे हे सामर्थ्य नाही की ते सिद्धांतात बाधा उपस्थित करू शकेल. यावरून हे ही सिद्ध होत आहे की, परमात्म्याचा साक्षात्कार घडविण्यासाठी सांगितलेले उपासनादि उपाय अर्थात ब्रह्मविद्याच परमात्म-प्राप्ती आणि जन्म-मरणापासून सुटण्याचे साधन आहे, सकाम यज्ञ आदि कर्मे नाहीत.
संबंध - आता श्रुतिमध्ये सांगितलेल्या ब्रह्मविद्येच्या फलभेदाचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. सर्व ब्रह्मविद्यांचा उद्देश एकमात्र परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करवून देणे आणि या जीवात्म्यास कायमचे सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करणे हा आहे, मग एखाद्या विद्येचे फल ब्रह्मलोकादिची प्राप्ती आहे आणि एखादीचे फल या शरीरात रहात असताच ब्रह्माची प्राप्ती होऊन जाणे हे आहे - याप्रकारे फलांत भेद का केला गेला आहे ? या जिज्ञासेवर सांगतात. -


अनुबन्धादिभ्यः प्रज्ञान्तरपृथक्त्ववद् दृष्टश्च तदुक्तम् ॥ ३.३.५० ॥


अर्थ - अनुबन्धादिभ्यः = भावविषयक अनुबंध आदिच्या भेदाने; प्रज्ञान्तरपृथक्त्ववत् = उद्देश्यभेदाने केल्या जाणार्‍या दुसर्‍या उपासनांच्या पार्थक्याप्रमाणे (भेदाप्रमाणे); च = याची ही पृथक्ता आहे असे कथन; दृष्टः = त्या त्या प्रकरणात दिसून आले आहे, तदुक्तम् = तथा हे प्रथमच सांगितले गेले आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे उद्देश्यभेदाने केल्या गेलेल्या भिन्न भिन्न देवताशी संबंधित उपासनांची भिन्नता तसेच त्यांच्यात फलभेद असतो, त्याचप्रकारे या एकाच उद्देश्याने केल्या जाणार्‍या ब्रह्मविद्येमध्येहि साधकांची भावना भिन्न भिन्न असल्यामुळे उपासनेच्या प्रकारात आणि त्याच्या फलात अंशिक भेद असणेहि स्वाभाविक आहे. अभिप्राय हा आहे की, सर्व साधक एकाच प्रकारचा भाव ठेवून ब्रह्मप्राप्तिच्या साधनात लागत नाहीत, प्रत्येक साधकाच्या भावनेत भेद रहातो. एखादा साधक तर असा असतो की स्वभावतःच समस्त भोगांना दुःखप्रद आणि परिवर्तनशील जाणून त्यांच्यापासून विरक्त होऊन जातो तथा परब्रह्म परमेश्वराचा साक्षात्कार होण्यात थोडा ही विलंब त्याच्यासाठी असह्य होतो. कोणी साधक असा असतो की जो बुद्धिच्या विचाराने तर भोगांना दुःखरुप समजतो, म्हणून साधनही करु लागतो, परंतु ब्रह्मलोकांत प्राप्त होणारे भोग दुःख मिश्रित नाहीत केवळ सुखचसुख आहे तसेच तेथे गेल्यानंतर पुनरावृत्ति होत नाही, कायमची जन्ममरणापासून मुक्ति होते या भावनेने भावित असतो, परमात्म्याची प्राप्ती तात्काळच व्हावी अशी तीव्र लालसा त्यांच्या ठिकाणी नसते. याप्रकारे साधकांची भावना अनेक प्रकारची असू शकते तथा त्या भावनांच्या आणि योग्यतेच्या भेदामुळे त्यांच्या अधिकारात ही भेद होणे (असणे) स्वाभाविक आहे. म्हणून त्यांना मध्यंतरी प्राप्त होणार्‍या फलात भेद असणे संभवनीय आहे. जन्ममरणरूप संसार बंधनातून कायमची मुक्ति एवं परब्रह्म पुरुषोत्तमाची प्राप्ती रूप जे चरम फल आहे ते तर त्या सर्वांनाच प्राप्त होतच असते. साधकाच्या भावानुबंधामुळे फलात भेद होण्याची गोष्ट त्या त्या प्रकरणात स्पष्ट रुपाने उपलब्ध होते. जसे इंद्र आणि विरोचन ब्रह्मदेवाकडून ब्रह्मविद्या शिकण्यासाठी गेले त्यांची जी ब्रह्मविद्येच्या साधनात प्रवृत्ति झाली तीमध्ये मुख्य कारण हे होते की त्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखाने जे ऐकले होते की त्या परमात्म्यास जाणणारा समस्त लोकास आणि समस्त भोगास प्राप्त होतो. या फलश्रुतिवरच त्यांचे मुख्य लक्ष्य होते, म्हणून विरोचन तर त्या विद्येचा अधिकारी नसल्यामुळे साधनात टिकू शकला नाही; परंतु इंद्राने ती विद्या ग्रहण केली. तरी ही त्याच्या मनात प्रधानता त्या लोकांची आणि भोगांची (प्राप्ती) हीच होती, हे तेथील प्रकरणात स्पष्ट दिसून येते. (छां.उ.८/७/३) दहरविद्येमध्ये ही त्याच प्रकारे ब्रह्मलोकातील दिव्य भोगांची प्रशंसा आहे. (छां.उ.८/१/६) म्हणून ज्यांच्या अंतरात या फलश्रुतिंच्या आधारावर ब्रह्मलोकातील भोग प्राप्त करण्याचा संकल्प असतो, त्यांना तात्काल ब्रह्माचा साक्षात्कार कसा होऊ शकेल? परंतु जे भोगांपासून सर्वथा विरक्त होऊन त्या परब्रह्म परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी तत्पर असतात त्यांना परमात्म्याची प्राप्ती होण्यास विलंब लागू शकत नाही. शरीर असतानाच येथे परमात्म्याचा साक्षात्कार होऊन जातो. म्हणून भावनेच्या भेदामुळे भिन्न भिन्न अधिकार्‍यांना प्राप्त होणार्‍या फलामध्ये भेद असणे उचितच आहे.
संबंध - प्रकारान्तराने तोच सिद्धान्त दृढ करतात-


न सामान्यादप्युपलब्धेर्मृत्युवन्न हि लोकापत्तिः ॥ ३.३.५१ ॥


अर्थ - सामान्यात् = जरी सर्व ब्रह्मविद्या समान भावाने मोक्षात हेतु आहेत; अपि = तथापि; न = मध्यंतरी होणार्‍या फलभेदाचा निषेध नाही आहे; हि = कारण की; उपलब्धेः = परब्रह्म परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर; मृत्युवत् = ज्या प्रकारे मृत्यु झाल्यावर जीवात्म्याचा स्थूल शरीराशी संबंध राहात नाही; त्याचप्रकारे त्याचा सूक्ष्म अथवा कारण कुठल्याही शरीराशी संबंध राहात नाही म्हणून; लोकापत्तिः = कुठल्याही लोकाची प्राप्ती; न = होऊ शकत नाही.


व्याख्या - सर्व ब्रह्मविद्या अंती मुक्ती देणार्‍या आहेत, या विषयात सर्वांची समानता आहे तरी ही एखाद्याचे ब्रह्मलोकात जाणे आणि एखाद्याचे ब्रह्मलोकास न जाता येथेच ब्रह्मप्राप्ती होणे तथा तेथे जाऊन ही कुणाचे प्रलयकालापर्यंत भोगांच्या उपभोगाचे सुख अनुभवणे आणि एखाद्याचे तात्काळ ब्रह्मात लीन होणे इत्यादि रुपाने जे फलभेद आहेत ते त्या साधकांच्या भावाशी संबंधित असतात म्हणून या भेदाचा निषेध होऊ शकत नाही. थोडक्यात ज्या साधकास मृत्युपूर्वीच कधीही परमात्म्याचा साक्षात्कार होऊन जातो, जो त्या परमेश्वराच्या तत्त्वास उत्तमप्रकारे जाणतो, ज्याची ब्रह्मलोकापर्यंत कुठल्याही लोकातील सुख भोगात किंचित मात्र ही वासना राहात नाही, तो कुठल्याही लोक विशेषात जात नाही, तो तर तात्कालच त्या परब्रह्म परमात्म्यास प्राप्त होऊन जातो. (बृह.उ.४/४/६ हा मंत्र सूत्र ३/३/३० तथा क.उ. २/३/१४) प्रारब्ध भोगाच्या अंती त्याच्या स्थूल, सूक्ष्म, आणि कारण शरीराची तत्त्वे ज्याप्रकारे मृत्युनंतर प्रत्येक मनुष्याच्या स्थूल शरीराची तत्त्वे पंचभूतात विलीन होऊन जातात त्याप्रमाणे आपल्या आपल्या कारण तत्त्वामध्ये विलीन होऊन जातात. (मु.उ.३/२/७)
संबंध - असे होण्यात प्रमाण काय आहे? या जिज्ञासेवर सांगतात -


परेण च शब्दस्य ताद्विध्यं भूयस्त्वात्त्वनुबन्धः ॥ ३.३.५२ ॥


अर्थ - परेण = नंतरच्या मंत्रांनी (ही सिद्ध होत आहे); च = तथा, शब्दस्य = त्यात सांगितलेल्या शब्दसमुदायाचा; ताद्विध्यम् = त्याच प्रकारचा भाव आहे; तु = परंतु अन्य साधकांचे; भूयस्त्वात् = दुसर्‍या भावांच्या अधिकतेमुळे, अनुबन्धः = सूक्ष्म आणि कारण शरीराशी संबंध रहातो. (म्हणून या कारणाने ते ब्रह्मलोकात जातात.)


व्याख्या - मुण्डकोपनिषदात प्रथम तर ही गोष्ट सांगितली गेली आहे की, ‘वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धसत्त्वाः । ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे ॥ अर्थात ‘वेदांतशास्त्राच्या ज्ञानाच्या द्वारे ज्यांनी वेदांताच्या अर्थभूत परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचा निश्चय केला आहे, कर्मफलरूप समस्त भोगांच्या त्यागरूप योगाने ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले आहे, ते सर्व साधक मरणकाली ब्रह्मलोकात जाऊन परम अमृतस्वरूप होऊन सर्वथा मुक्त होऊन जातात.’ (३/२/६) यानंतर पुढील मंत्रात ज्यांना या शरीराचा नाश होण्यापूर्वी ब्रह्माची प्राप्ती होऊन जाते, त्यांच्याविषयी याप्रकारे सांगितले आहे. ‘गत्ताः कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु । कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परेऽव्यये सर्व एकीभवन्ति ॥ ‘त्यांच्या पंधरा कला अर्थात प्राणांसहित सर्व इंद्रिये आपापल्या देवतामध्ये विलीन होऊन जातात. जीवात्मा आणि त्याचे समस्त कर्मसंस्कार - हे सर्वच्या सर्व परम अविनाशी परमात्म्यात एक होऊन जातात.’ (३/२/७) नंतर नदी आणि समुद्राचा दृष्टांत देऊन सांगितले की ‘तथा विद्वान्नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् ।’ ‘तो ब्रह्मास जाणणारा विद्वान नामरूपाला येथे सोडून परात्पर ब्रह्मात विलीन होऊन जातो.’ (३/२/८) याप्रकारे शुद्ध अंतःकरणाच्या अधिकार्‍यासाठी ब्रह्मलोकाची प्राप्ती सांगितल्यानंतर साक्षात ब्रह्मास जाणणार्‍या विद्वानाचे येथेच नाम नामरूपापासून मुक्त होऊन परब्रह्मात विलीन होऊन जाणे सूचित करणारे शब्दसमुदाय पूर्वसूत्रात सांगितलेली गोष्ट स्पष्ट करीत आहेत. म्हणून हे सिद्ध होत आहे की, ज्यांच्या अंतःकरणात ब्रह्मलोकाच्या महत्वाचा भाव आहे तेथे जाण्याच्या संकल्पामुळे ज्यांचा सूक्ष्म आणि कारण-शरीराशी संबंध विच्छेद झालेला नाही, असेच साधक ब्रह्मलोकात जातात. ज्यांना येथे ब्रह्मसाक्षात्कार होऊन जातो ते जात नाहीत. हा अवांतर फलभेद होणे उचितच आहे.
संबंध - येथपर्यंत मुक्तिविषयक फलभेदाचे प्रकरण समाप्त करून आता शरीरपातानंतर आत्म्याची सत्ता आणि कर्मफलाचा भोग न मानणार्‍या नास्तिकांच्या मताचे खंडन करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात.


एक आत्मनः शरीरे भावात् ॥ ३.३.५३ ॥


अर्थ - एके = कोणी एक म्हणतात की; आत्मनः = आत्म्याचे; शरीरे = शरीर झाल्यावरच, भावात् = भाव होण्यामुळे, (शरीराहून भिन्न आत्म्याची सत्ता नाही.)


व्याख्या - काही नास्तिकांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत यात चेतन आत्म्याची प्रतीति होत असते, शरीराच्या अभावी आत्मा प्रत्यक्ष नाही. यावरून हेच सिद्ध होते की, शरीराहून भिन्न आत्मा नाही. म्हणून मेल्यानंतर आत्मा परलोकात जाऊन कर्मांचे फल भोगतो अथवा ब्रह्मलोकात जाऊन मुक्त होतो या सर्व गोष्टी असंगत आहेत.
संबंध - याच्या उत्तरात सूत्रकार म्हणतात.


व्यतिरेकस्तभ्दावाभावित्वान्न तूपलब्धिवत् ॥ ३.३.५४ ॥


अर्थ - व्यतिरेकः = शरीराहून आत्मा भिन्न आहे; तद्भावाभावित्वात् = कारण की शरीर रहात असून त्यात आत्मा रहात नाही म्हणून, न = आत्मा शरीर नाही आहे; तु = परंतु, उपलब्धिवत् = ज्ञातेपणाच्या उपलब्धिसदृश (आत्म्याचे शरीराहून भिन्न असणे सिद्ध होत आहे.)


व्याख्या - शरीरच आत्मा आहे, ही गोष्ट ठीक नाही; परंतु शरीराहून भिन्न, शरीर आदि समस्त भूते आणि त्यांच्या कार्यांना जाणणारा आत्मा अवश्य आहे, कारण की मृत्यूकाळी शरीर आपल्यासमोर पडलेले असते, तरीही त्यात सर्व पदार्थांना जाणणारा चेतन आत्मा रहात नाही. म्हणून ज्याप्रकारे हे प्रत्यक्ष आहे की शरीर रहात असूनहि त्यात चेतन आत्मा रहात नाही त्याचप्रकारे हे ही मानले पाहिजे की शरीर राहिले नाही तरीही आत्मा रहातो. तो या स्थूल शरीरात नाही तर अन्य (सूक्ष्म) शरीरात रहातो; परंतु आत्म्याचा अभाव होत नाही. म्हणून हे म्हणणे सर्वथा युक्तिविरुद्ध आहे की, या स्थूल शरीराहून आत्मा भिन्न नाही. जर या शरीराहून भिन्न चेतन आत्मा नसता तर तो आपल्या आणि दुसर्‍यांच्या शरीरास जाणू शकला नसता; कारण की घटादि जड पदार्थात एक दुसर्‍यास अथवा आपण आपणास जाणण्याची शक्ति नाही आहे. ज्याप्रकारे सर्वांचा ज्ञाता असल्यामुळे ज्ञातारूपात आत्म्याची उपलब्धी प्रत्यक्ष आहे, त्याचप्रकारे शरीराचा ज्ञाता असल्यामुळे या ज्ञेय शरीरापासून त्याचे भिन्न असणे ही प्रत्यक्ष आहे.
संबंध - प्रसंगवश प्राप्त झालेल्या नास्तिकवादाचे संक्षेपाने खंडन करून, आता पुन्हा भिन्न भिन्न श्रुतिंच्या वर विचार करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. जिज्ञासा ही आहे की भिन्न भिन्न शाखांमध्ये यज्ञांच्या उद्गीथ आदि अंगांमध्ये भेद आहेत. म्हणून यज्ञादिच्या अंगाशी संबंधित उपासना एका शाखेमध्ये सांगितल्या प्रकाराने दुसर्‍या शाखेच्या लोकांनी ही केली पाहिजे की नाही यावर सांगतात.


अङ्गावबद्धास्तु न शाखासु हि प्रतिवेदम् ॥ ३.३.५५ ॥


अर्थ - अङ्गावबद्धाः = यज्ञाच्या उद्गीथ आदि अंगाशी संबद्ध उपासना; शाखासु हि = ज्या शाखेत सांगितली गेली असेल, तिच्यातच करणे योग्य आहे, न = अशी गोष्ट नाही आहे; तु = परंतु, प्रतिवेदम् = प्रत्येक वेदाच्या शाखेचे लोक तिचे अनुष्ठान करू शकतात.


व्याख्या - ‘ओमित्येतदक्षरमुद्गीथमुपासीत’ ‘ॐ या एका अक्षराची उद्गीथाच्या रूपाने उपासना केली पाहिजे.’ (छां.उ.१/१/१) ‘लोकेषु पञ्चविधं सामोपासीत’ ‘पाच प्रकारच्या सामाची लोकाशी संबंध जोडून उपासना केली पाहिजे.’ (छां.उ.२/२/१) इत्यादि प्रकाराने यज्ञादिच्या अंगरूप उद्गीथ आदिशी संबंध असणारी जी प्रतीकोपासना सांगितली गेली आहे, तिचे ज्या शाखेत वर्णन आहे, त्याच शाखेच्या लोकांनी तिचे अनुष्ठान केले पाहिजे, अन्य शाखेच्या लोकांनी करू नये अशी गोष्ट नाही, तर प्रत्येक वेदाच्या शाखेचे अनुयायी तिचे अनुष्ठान करू शकतात.
संबंध - हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात.


मन्त्रादिवद्वाविरोधः ॥ ३.३.५६ ॥


अर्थ - वा = अथवा असे समजा की, मन्त्रादिवत् = मंत्र आदिप्रमाणे; अविरोधः = यात काही विरोध नाही.


व्याख्या - ज्याप्रकारे एका शाखेत सांगितलेले मंत्र आणि यज्ञोपयोगी अन्य पदार्थ दुसर्‍या शाखेचे लोकहि आवश्यकतेनुसार व्यवहारात आणू शकतात; त्यात कुठल्याहि प्रकारचा विरोध नाही, त्याप्रमाणे पूर्वसूत्रात सांगितलेली यज्ञांगांशी संबंध असणार्‍या उपासनांच्या अनुष्ठानात काही विरोध नाही.
संबंध - ज्याप्रकारे वैश्वानरविद्येमध्ये एकेका अंगाच्या उपासनांचे वर्णन येते, त्याचप्रकारे आणखी काही ठिकाणीहि येते, अशा उपासनामध्ये त्यांच्या एका एका अंगाची अलग अलग (वेगवेगळी) उपासना करावयास हवी, की सर्व अंगांचा समुच्चय करून एकत्र सर्वांची उपासना करावयास हवी ? या जिज्ञासेवर सांगतात.


भूम्नः क्रतुवज्ज्यायस्त्वं तथा हि दर्शयति ॥ ३.३.५७ ॥


अर्थ - क्रतुवत् = अंग उपांगांनी परिपूर्ण यज्ञाप्रमाणे; भूम्नः = पूर्ण उपासनेची, ज्यायस्त्वम् = श्रेष्ठता आहे; हि = कारण की, तथा = तसेच कथन, दर्शयति = श्रुति दाखवीत आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे यज्ञाच्या कुठल्या एका अंशाचे अनुष्ठान करणे, आणि कुठल्या एकाचे न करणे श्रेष्ठ नाही; परंतु सर्वांगपूर्ण अनुष्ठानच श्रेष्ठ आहे, त्याचप्रकारे वैश्वानरविद्या आदिमध्ये सांगितलेल्या उपासनेचे ही अनुष्ठान पूर्ण रूपाने करणेच श्रेष्ठ आहे, तिच्या एका अंगाचे नाही. वैश्वानर विद्येप्रमाणे सर्व ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. कारण की श्रु्तिने तसाच भाव वैश्वानर विद्येच्या वर्णनात दाखविला आहे. राजा अश्वपतिने प्राचीनशाल आदि सहा ऋषींना वेगवेगळे विचारले की तुम्ही वैश्वानराची कशा प्रकारे उपासना करता ? त्यांनी आपापली गोष्ट सांगितली. राजाने एकेक करून सर्वांना सांगितले, ‘तुम्ही अमुक अंगाची उपासना करता.’ त्याचबरोबर त्यांनी त्या एकांग उपासनेचे साधारण फल सांगितले आणि सर्वांना भय दाखवून म्हटले, ‘जर तुम्ही माझ्याजवळ आला नसता तर तुमचे शिर गळून पडले असते, तुम्ही अंध झाला असता.’ इत्यादि (छां.उ.५/११ पासून १७ पर्यंत) तदनंतर (१८व्या खंडात) हे सांगितले की, ‘तुम्ही लोक वैश्वानर परमात्म्याच्या एक-एक अंगाची उपासना करता, जो ही गोष्ट समजून आत्मारूपाने याची उपासना करतो तो समस्त लोकात, समस्त प्राण्यामध्ये आणि समस्त आत्म्यांच्यामध्ये अन्न भक्षण करणारा होतो.’ (छां.उ.५/१८/१) याप्रकारे तेथे पूर्ण उपासनेचे अधिक फल सांगितले गेले आहे. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, एकेक अंगाच्या उपासनेपेक्षा पूर्ण उपासना श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण उपासनेचेच अनुष्ठान केले पाहिजे.
संबंध - नाना प्रकारांनी सांगितली गेलेली ब्रह्मविद्या भिन्न भिन्न आहे की एकच आहे ? या जिज्ञासेवर सांगतात.


नाना शब्दादिभेदात् ॥ ३.३.५८ ॥


अर्थ - शब्दादिभेदात् = शब्द आदिचा भेद होण्यामुळे; नाना = सर्व विद्या वेगवेगळ्या आहेत.


व्याख्या - सद्विद्या, भूमविद्या, दहरविद्या, उपकोसल विद्या, शांडिल्यविद्या, वैश्वानर विद्या, आनन्दमय विद्या, अक्षर विद्या इत्यादि भिन्न भिन्न नामे आणि विधि-विधान असणार्‍या या विद्यांमध्ये नाम आणि प्रकार आदिचा भेद आहे. एखाद्या अधिकार्‍यांसाठी एक विद्या उपयुक्त ठरते तर दुसर्‍यासाठी दुसरीच उपयुक्त ठरते. म्हणून सर्वांचे फल एका ब्रह्माची प्राप्ती असूनही त्या एक नाहीत, भिन्न भिन्न आहेत.
संबंध - या सर्वांच्या समुच्चयाचे विधान आहे की विकल्पाचे अर्थात या सर्वांचे मिळून अनुष्ठान केले पाहिजे की एकेकीचे अलग-अलग? या जिज्ञासेवर सांगतात-


विकल्पोऽविशिष्टफलत्वात् ॥ ३.३.५९ ॥


अर्थ - अविशिष्ट फलत्वात् = सर्व विद्यांचे एकच फल आहे फलात भेद नाही म्हणून; विकल्पः = वेगवेगळे अनुष्ठान करणेच उचित आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे स्वर्गादिच्या प्राप्तीच्या साधनभूत जे भिन्न भिन्न यज्ञ-याग आदि सांगितले गेले आहेत, त्यांतील ज्यांचे ज्यांचे फल एक आहे, त्यांचा समुच्चय होत नाही. यजमान आपल्या इच्छेनुसार त्यांतील कुठल्याही एका यज्ञाचे अनुष्ठान करु शकतो. याचप्रकारे उपर्युक्त विद्यांचे ब्रह्मसाक्षात्कार रूप एकच फल असल्याने त्यांच्या समुच्चयाची आवश्यकता नाही. साधक आपल्या रुचि अनुसार कुठल्याही एका विद्येच्या अनुसार साधन करु शकतो.
संबंध - ज्या सकाम उपासना वेगवेगळ्या फलासाठी सांगितल्या गेल्या आहेत त्यांचे अनुष्ठान कुठल्या प्रकारे करावयास हवे? या जिज्ञासेवर सांगतात -


काम्यास्तु यथाकामं समुच्चीयेरन्न वा पूर्वहेत्वभावात् ॥ ३.३.६० ॥


अर्थ - काम्याः = सकाम उपासनांचे अनुष्ठान; तु = तर; यथाकामम् = आपल्या आपल्या कामनेनुसार; समुच्चीयेरन् = समुच्चय करुन करावे; वा = अथवा; न = समुच्चय न करता अलग अलग करावे; पूर्वहेत्वभावात् = कारण की यात पूर्वोक्त हेतु (फलाची समानता) चा अभाव आहे.


व्याख्या - सकाम उपासनांमध्ये सर्वांचे फल एक सांगितलेले नाही; भिन्न भिन्न उपासनांचे भिन्न भिन्न फल सांगितले गेले आहे, याप्रकारे पूर्वोक्त हेतु नसल्यामुळे सकाम उपासनेचे अनुष्ठान अधिकारी आपल्या कामनेनुसार ज्या प्रकारे आवश्यक वाटेल तसे करु शकतो. ज्या ज्या भोगांची कामना असेल त्यानुसार त्या त्यासाठी सांगितल्या गेलेल्या सर्व उपासनांचा समुच्चय करुनही करु शकतो अथवा अलग अलगही करु शकतो. यात काही अडचण नाही.
संबंध - आता उद्रिथ आदि अंगांमध्ये केल्या जाणार्‍या उपासनांविषयी विचार करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. पहिल्या चार सूत्रांच्या द्वारे पूर्वपक्षाची उत्थापना केली जात आहे-


अङ्गेषु यथाश्रयभावः ॥ ३.३.६१ ॥


अर्थ - अङ्गेषु =भिन्न भिन्न अंगांमध्ये (केल्या जाणार्‍या उपासनांचा); यथाश्रयभावः = यथाश्रय भाव आहे अर्थात जी उपासना ज्या अंगाच्या आश्रित आहे, त्या अंगानुसारच त्या उपासनेचा भाव समजून घ्यावयास हवा.


व्याख्या - यज्ञकर्माच्या अंगभूत उद्गीथ आदिमध्ये केल्या जाणार्‍या ज्या उपासना आहेत; ज्यांचे दिग्दर्शन पंचावन्नाव्या सूत्रात केले गेले आहे, त्यापैकी जी उपासना ज्या अंगाच्या आश्रित असेल, त्या आश्रयानुसारच तिची व्यवस्था करावयास हवी. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, ज्या ज्या कर्मांच्या अंगांचा समुच्चय होऊ शकतो, त्या त्या अंगामध्ये केल्या जाणार्‍या उपासनांचाहि त्या कर्मांबरोबर समुच्चय होऊ शकतो.
संबंध - याशिवाय -


शिष्टेश्च ॥ ३.३.६२ ॥


अर्थ - शिष्टेः = श्रुतिच्या शासनाने (विधानाने); च = ही (हेच सिद्ध होत आहे.)


व्याख्या - ज्याप्रकारे उद्गीथ आदि स्तोत्रांच्या समुच्चयाचे श्रुतिमध्ये विधान आहे, त्याचप्रकारे त्यांच्या आश्रित उपासनांच्या समुच्चयाचे विधानहि त्यांच्या बरोबरच होऊन जाते. यावरूनहि हेच सिद्ध होत आहे की, कर्मांच्या अंगानुसार त्यांच्या आश्रित रहाणार्‍या उपासनांचाहि समुच्चय होऊ शकतो.
संबंध - प्रकारान्तराने हीच गोष्ट दृढ करतात.


समाहारात् ॥ ३.३.६३ ॥


अर्थ - समाहारात् = कर्मांचा समाहार सांगितला गेला आहे; म्हणून त्यांच्या आश्रित उपासनांचा ही समाहार (समुच्चय) उचितच आहे.


व्याख्या - उद्गीथ उपासनेत म्हटले आहे की, ‘स्तोत्र गान करणारा पुरुष होत्याच्या कर्मात ज्या स्तोत्रसंबंधी त्रुटी होतात, त्याचेहि संशोधन करतो.’ (छां.उ.१/५/५) याप्रकारे प्रणव आणि उद्गीथाची एकता समजून ??????????????? करण्याचे महत्त्व दाखविले गेले आहे. या समाहाराने ही अंगाश्रित उपासनांचा समुच्चय सूचित होतो.
संबंध - पुन्हा तीच गोष्ट दृढ करतात.


गुणसाधारण्यश्रुतेश्च ॥ ३.३.६४ ॥


अर्थ - गुणसाधारण्यश्रुतेः = गुणांची साधारणता दाखविणार्‍या श्रुतिने; च = ही (हीच गोष्ट सिद्ध होत आहे.)


व्याख्या - उपासनेचा गुण जो ॐकार आहे, त्याचा प्रयोग समान भावाने दाखविला आहे. जसे म्हटले आहे की, ‘त्या ॐ अक्षरापासूनच ही त्रयीविद्या (तीन्ही वेदाशी संबंधित यज्ञादि कर्मसंबंधी विद्या) प्रवृत्त होत असते; ॐ असे म्हणूनच आश्रावण कर्म करतात, ॐ असे म्हणून होता (कथन) करतो; ॐ असे म्हणूनच उद्‌गाता स्तोत्रगान करतो.’ (छां.उ.१/१/९) याचप्रकारे कर्मांगसंबंधी गुण जे उद्गीथ आदि आहेत, त्यांचाहि समान भावाने प्रयोग श्रुतिंत विहित आहे. म्हणूनहि उपासनांचा त्यांच्या आश्रयभूत कर्मांगाबरोबर समुच्चय होणे उचित सिद्ध होत आहे.
संबंध - याप्रकारे चार सूत्रांच्याद्वारे पूर्वपक्षाची उत्थापना करून आता दोन सूत्रात त्याचे उत्तर देऊन या पादाची समाप्ती केली जात आहे.


न वा तत्सहभावाश्रुतेः ॥ ३.३.६५ ॥


अर्थ - वा = परंतु, तत्सहभावाश्रुतेः = त्या त्या उपासनांचा समुच्चय दाखविणारी श्रुति नाही आहे म्हणून; न = उपासनांचा समुच्चय सिद्ध होऊ शकत नाही.


व्याख्या - त्या त्या उपासनांच्या आश्रयभूत जी उद्गीथ आदि अंगे आहेत, त्या अंगांच्या समाहाराप्रमाणे त्यांच्याबरोबर उपासनांचा समाहार दाखविणारी कुठली श्रुति नाही, म्हणून हे सिद्ध होऊ शकत नाही की त्या त्या आश्रयांच्या समुच्चयाप्रमाणेच उपासनांचाहि समुच्चय व्हावयास पाहिजे; कारण की उपासनांचे उद्देश्य भिन्न आहे, ज्या उद्देश्यामुळे ज्या फलासाठी यज्ञादि कर्मे केली जातात, त्यांच्या अंगामध्ये केल्या जाणार्‍या उपासना त्यांच्याहून भिन्न उद्देश्याने केली जाते; म्हणून अंगांबरोबर उपासनेच्या समुच्चयाचा संबंध नाही. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, उपासनांचा समुच्चय बनू शकत नाही, त्यांचे अनुष्ठान वेगवेगळेच करावयास हवे.
संबंध - प्रकारान्तराने याच सिद्धांतास दृढ करतात.


दर्शनाच्च ॥ ३.३.६६ ॥


अर्थ - दर्शनात् = श्रुतिमध्ये उपासनांचा समाहार करू नये असे दाखविले गेले आहे म्हणून, च = ही (त्यांचा समाहार सिद्ध होऊ शकत नाही.)


व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, ‘पूर्वोक्त प्रकाराने रहस्य जाणणारा ब्रह्मा निःसंदेह यज्ञाचे, यजमानाचे आणि अन्य ऋत्विजांचे रक्षण करतो.’ (छां.उ.४/१७/१०) याप्रकारे श्रुतिमध्ये विद्येचा महिमा वर्णन करून हे दाखविले गेले आहे की त्या उपासनांचा कर्मांबरोबर समुच्चय होत नाही कारण की जर उपासनांचा सर्वत्र समाहार होत असता तर दुसरे ऋत्विक् ही त्या तत्त्वाचे ज्ञाते झाले असते आणि स्वयंही आपले रक्षण करते, ब्रह्म्यास त्यांचे रक्षण करण्याची आवश्यकता पडली नसती. यावरून हेच सिद्ध होत आहे की, उपासना त्यांच्या आश्रयभूत कर्मसंबंधी अंगांच्या अधीन नाहीत, स्वतंत्र आहेत म्हणून समुच्चय न करता त्यांचे अनुष्ठान वेगवेगळेच करावयास पाहिजे.
येथे तिसर्‍या अध्यायातील तिसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP