ब्रह्मसूत्र

अध्याय तिसरा

पाद दुसरा

संबंध - पहिल्या पादात देहान्तर प्राप्तीच्या प्रसंगात पञ्चाग्निविद्येच्या प्रकरणावर विचार करून जीवाला वारंवार प्राप्त होणार्‍या जन्म-मृत्युरूप दुःखाचे वर्णन केले गेले आहे. या वर्णनाचा गूढ अभिप्राय हाच आहे की जीवाच्या मनात सांसारिक पदार्थ तसेच आपल्या नश्वर शरीराच्या प्रति आसक्ति कमी व्हावी आणि निरंतर वैराग्याची भावना वाढावी. आता दुसर्‍या पादात वर्तमान शरीराच्या भिन्न भिन्न अवस्थांवर विचार करून या ज्न्म-मरणरूप संसार बंधनातून सुटण्यासाठी परमेश्वराचे ध्यानरूप उपाय सांगितले आहेत. म्हणून पहिल्याने स्वप्नावस्थेवर विचाराचा आरंभ करून दोन सूत्रात पूर्वपक्षाची उत्थापना केली जात आहे.


संध्ये सृष्टिराह हि ॥ ३.२.१ ॥


अर्थ - संध्ये = स्वप्नात ही जागृतीप्रमाणे, सृष्टिः = सांसारिक पदार्थांची रचना होते; हि = कारण की, आह = श्रुति असे वर्णन करीत आहे.


व्याख्या - बृहदारण्यकोपनिषदात असे वर्णन आले आहे की, ‘स्वप्नावस्थेत हा जीवात्मा हा लोक आणि परलोक दोन्हीना पहातो. तेथे दुःख आणि आनंद दोन्हीचा उपभोग घेतो, या स्थूल शरीराला स्वतः अचेत करून वासनामय नवीन शरीराची रचना करून (बृह.उ.४/३/९) जगतास पाहतो. त्या अवस्थेत खरोखर नसतांना ही रथ, रथाला नेणारे वाहन, आणि त्याचा मार्ग यांची तसेच आनंद, मोद, प्रमोदाची एवं कुण्ड, सरोवर आणि नद्यांची रचना करतो.’ (बृह.उ.४/३/१०) इत्यादि. “न तत्र रथा न रथयोगा न पन्थानो भवन्त्यथ रथान् रथयोगान् पथः सृजते न तत्रानन्दा मुदः प्रमुदो भवन्त्यथानन्दान् मुदः प्रमुदः सृजते -------- वेशान्तान् पुष्करिणीः स्रवन्तीः सृजते ।” याप्रकारे दुसर्‍या श्रुतिमध्ये ही स्वप्नात सृष्टि होणे सांगितले गेले आहे. (प्र.उ.४/५ ; बृह.उ.२/१/१८) म्हणून हे सिद्ध होत आहे की स्वप्नातही सांसारिक पदार्थांची रचना होत असते आणि ती अत्यंत विचित्र तथा जीवकृत असते.




संबंध - पुढे म्हणतात -


निर्मातारं चैके पुत्रादयश्च ॥ ३.२.२ ॥


अर्थ - च = तथा, एके = एकाच शाखेचे, निर्मातारम् = पुरुषाला कामनांचा निर्माताही मानतात; च = आणि (त्यांच्या मताने), पुत्रादयः = पुत्र आदि ही ‘काम’ अथवा वासनेचा विषय आहेत.


व्याख्या - कठोपनिषदात वर्णन आले आहे की, ‘य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः ।’ (२/२/८) ‘हा नाना प्रकारच्या भोगांची रचना करणारा पुरुष अन्य सर्व झोपी गेल्यावर स्वयं जागत राहतो.’ यात पुरुषाला कामनांचा निर्माता म्हटले आहे. (क.उ.१/१/२३-२४) च्या अनुसार पुत्र-पौत्र आदिसुद्धा काम अथवा कामनेचे विषय आहेत. यावरून ही हेच सिद्ध होते की, स्वप्नात सृष्टि आहे.




संबंध - याप्रकारे पूर्वपक्षींच्या द्वारा स्वप्नातील सृष्टिला सत्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला तसेच तिला जीवकर्तृक दाखविले गेले. आता सिद्धान्तीच्या तर्फे त्याचे उत्तर दिले जात आहे.


मायामात्रं तु कार्त्स्न्येनानभिव्यक्तस्वरूपत्वात् ॥ ३.२.३. ॥


अर्थ - तु = परंतु, कार्त्स्न्येन = पूर्णरूपाने; अनभिव्यक्तस्वरूपत्वात् = त्याच्या रूपाची अभिव्यक्ति (उपलब्धी) होत नसल्याने; मायामात्रम् = ती मायामात्र आहे.


व्याख्या - स्वप्नाच्या सृष्टिचे वर्णन करीत असतांना श्रुतिने ही गोष्ट तर प्रथमच स्पष्ट केली आहे की, जीवात्मा तेथे ज्या ज्या वस्तुंची रचना करतो, त्या वास्तवात नसतात. याशिवाय, असेही दिसून येते की, स्वप्नात सर्व वस्तु पूर्णरूपाने दिसून येत नाहीत. जे काही दिसून येते ते अनियमित आणि अर्धवटच दिसून येते. प्रश्नोपनिषदात तर स्पष्टच म्हटले आहे की, ‘जागृत अवस्थेत ऐकलेल्या, पाहिलेल्या आणि अनुभव केलेल्या वस्तूंना पाहतो, परंतु विचित्र ढंगाने पहातो. पाहिलेल्या-ऐकलेल्या आणि न पाहिलेल्या ऐकलेल्या ही गोष्टी पहातो तसेच अनुभव केलेल्या आणि अनुभव न केलेल्याहि पाहतो.’ या सर्व कारणामुळे हेच सिद्ध होत आहे की, स्वप्नाची सृष्टि वास्तविक नाही आहे. जीवाला कर्मफलाचा भोग करविण्यासाठी भगवान आपल्या योगमायेने त्याच्या कर्मसंस्कारांच्या वासनानुसार तशी दृश्ये पहाण्यास त्यास भाग पाडतात; म्हणून ती स्वप्न-सृष्टि तर मायामात्र आहे. जागृतीप्रमाणे खरी नाहीत. हेच कारण आहे की, त्या अवस्थेमध्ये केलेल्या शुभाशुभ कर्मांचे फळ जीवात्म्यास भोगावे लागत नाही. तथा पूर्वपक्षीने जे असे म्हटले होते की काही काही शाखांचे लोक पुरुषाला पुत्र-पौत्रादि काम्य विषयांची रचना करणारा म्हणतात, ते ठीक नाही आहे; कारण की तेथे स्वप्नावस्थेचे प्रकरण नाही आणि त्या मंत्रात जीवात्म्यास काम्य-विषयांचा निर्माता म्हटलेले नाही, तेथे हे विशेषण परमात्म्यासाठी आले आहे.




संबंध - यावरून तर हेच सिद्ध होत आहे की, स्वप्न सर्वथा व्यर्थ आहे, त्याची काही सार्थकता नाही; यावर सांगतात.


सूचकश्च हि श्रुतेराचक्षते च तद्विदः ॥ ३.२.४ ॥


अर्थ - सूचकः = स्वप्न भविष्यात घडणार्‍या शुभाशुभ परिणामाचे सूचक; च = ही असते, हि = कारण की; श्रुतेः = श्रुतिवरून हे सिद्ध होत आहे; च = आणि तद्विदः = स्वप्नविषयक शास्त्रास जाणणारे ही; आचक्षते = अशीच गोष्ट सांगतात.


व्याख्या - ‘यदा कर्मसु काम्येषु स्त्रियं स्वप्नेषु पश्यति । समृद्धिं तत्र जानीयात्तास्मिन् स्वप्ननिदर्शने ॥’ ‘ज्यावेळी काम्यकर्मांच्या प्रसंगात स्वप्नातील दृश्यात स्त्रीला पहातो, तेव्हा असे स्वप्न पहाण्याचा परिणाम हा समजला पाहिजे की, त्या केल्या जाणार्‍या काम्यकर्मात उत्तमप्रकारे अभ्युदय होणार आहे.’ तसेच असे ही म्हटले आहे की, ‘जर स्वप्नात काळे दात असणार्‍या काळ्या पुरुषास पाहिले तर ते मृत्यूचे सूचक असते.’ (ऐतरेय आरण्यक ३/२/४/१७) इत्यादि श्रुतिच्या प्रमाणांनी हे सिद्ध होत आहे की, स्वप्न सर्वथा व्यर्थ नाही; ते वर्तमानाच्या आगामी परिणामाचे सूचक ही असते. याशिवाय, जे स्वप्नविज्ञान जाणणारे विद्वान आहेत, ते ही याप्रकारे स्वप्नात पाहिलेल्या दृश्यास भविष्यात होणार्‍या शुभाशुभ घटनांचे सूचक म्हणतात. यावरून हे ही सिद्ध होत आहे की, स्वप्नातील घटना जीवात्म्याची स्वतंत्र रचना नाही, तो तर निमित्तमात्र आहे. वास्तवात सर्व काही जीवाच्या कर्मानुसार त्या परमेश्वराच्या शक्तिनेच होत असते.




संबंध - जीवात्मा हा तर ईश्वराचाच अंश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी ईश्वराचे ज्ञान आणि ऐश्वर्य आदि गुण ही अंशिक रूपाने असतीलच. मग जर असे मानले की, स्वप्नातील सृष्टि जीवात्मा स्वयं करतो तर काय हानि आहे ? यावर सांगतात.


पराभिध्यानात्तु तिरोहितं ततो ह्यस्य बन्धविपर्ययौ ॥ ३.२.५ ॥


अर्थ - जीवात्म्यामध्ये ही ईश्वरासमान गुण आहेत. तु = परंतु, तिरोहितम् = लपलेले (आवृत्त) आहेत; पराभिध्यानात् = (अतः) परब्रह्म परमात्म्याचे निरंतर ध्यान करण्याने (ते प्रकट होतात); हि = कारण की, ततः = त्या परमात्म्याच्या सकाश असल्यानेच; अस्य = याचे; बन्धविपर्ययौ = बन्धन आणि त्याचा विपरीत अर्थात मोक्ष आहे.


व्याख्या - जीवात्मा ईश्वराचा अंश आहे, म्हणून हा ही ईश्वराच्या सदृश गुणांचा आहे, यात काहीही संदेह नाही आहे; परंतु याचे ते सर्व गुण तिरोहित आहेत. लपलेले आहेत. यामुळे त्यांचा उपयोग दिसून येत नाही. त्या परब्रह्म परमेश्वराचे निरंतर ध्यान करण्याने जीवाचे ते लपलेले गुण पुन्हा प्रकट होऊ शकतात. (श्वे.उ.१/१०) ‘तस्याभिध्यानाद् योजनातत्त्वभावाद्‌भूयश्चान्ते विश्वमायानिवृत्तिः ॥’ परमेश्वराच्या आराधनेशिवाय आपोआप त्यांचे प्रकट होणे संभव नाही. कारण की, या जीवाचे अनादिसिद्ध बंधन आणि त्यापासून मुक्त होणे त्या जगत्कर्त्या परमेश्वराच्याच अधीन आहे. (श्वे.उ.६/१६) म्हणून तो स्वयं स्वप्नाची सृष्टि आदि काही करू शकत नाही. साधकास हे आवश्यक आहे की, हे रहस्य समजून घेऊन त्या परम दयाळू सर्वशक्तिमान परब्रह्म परमेश्वराचा आश्रित होऊन निरंतर त्याचे भजन-ध्यान करावे आणि या बंधनातून सुटका व्हावी म्हणून भगवंताची प्रार्थना करावी. या जगतरूपी नाटकाचा सूत्रधार परमेश्वर ज्याला त्या प्रपंचापासून अलग करण्याची इच्छा करेल, तोच यापासून अलग होऊ शकतो.




संबंध - या जीवात्म्याचे जे वास्तविक ईश्वरसंबंधी गुण आहेत, ते का लपलेले आहेत ? या जिज्ञासेवर सांगतात.


देहयोगाद्वा सोऽपि ॥ ३.२.६ ॥


अर्थ - सः = तो तिरोभाव, अपि = ही, देहयोगात् = शरीराच्या संबंधाने; वा = ही आहे.


व्याख्या - या जीवात्म्यामध्ये त्या परब्रह्म परमात्म्याचे स्वाभाविक गुण विद्यमान असूनहि जो त्या गुणांचा तिरोभाव होतो, ते गुण प्रकट होत नाहीत. तसेच हा जीवात्मा त्या सर्व गुणांबद्दल सर्वथा अनभिज्ञ आहे याचे मुख्य कारण जीवात्म्याची शरीराशी एकता मानणे हेच आहे. हेच याचे बंधन आहे आणि हे अनादिकाळापासून आहे. याच कारणामुळे जन्म-जन्मांतरातील कर्म-संस्कारांमुळे परवश झालेला हा जीव नाना योनिमध्ये जन्म घेतो आणि मरतो तसेच नाना प्रकारच्या दुःखांचा उपभोग करीत राहतो.




संबंध - येथपर्यंत स्वप्नावस्थेवर विचार केला गेला आहे. त्यातच प्रवेशवश जीवात्म्याचे बंधन आणि त्यातून सुटण्याच्या उपायाचेही संक्षेपात वर्णन झाले आहे. आता जीवात्म्याच्या सुषुप्ति अवस्थेवर विचार करण्यासाठी पुढील प्रसंगाचा आरंभ केला जात आहे. प्रायः असे सांगितले जाते की, सुषुप्ति अवस्थेमध्ये जीवात्म्याचा ब्रह्माशी संयोग होत असतो. यामुळे अशी भ्रांत धारणा होऊ शकते की, सुषुप्ति ही समाधीच्या सदृश काही सुखप्रद अवस्था आहे. म्हणून या भ्रमाचे निवारण करण्यासाठी सांगतात.


तदभावो नाडीषु तच्छ्रुतेरात्मनि च ॥ ३.२.७ ॥


अर्थ - तद्‌भावः = (सुषुप्ति अवस्थेत) त्या स्वप्नदृश्याचा अभाव होऊन जातो. (त्या समयी जीवात्मा); नाडीषु = नाडयांमध्ये (स्थित होऊन जातो); तच्छ्रुतेः = कारण की श्रुतिचे कथनही तसेच आहे; च = तथा, आत्मनि = आत्म्यामध्ये ही (त्याची स्थिती सांगितली गेली आहे.)


व्याख्या - पूर्वसूत्रात जे स्वप्नावस्थेचे वर्णन केले गेले आहे तिचा उपभोग करते समयी हा जीवात्मा कधी तर स्वप्नातून जागा होतो आणि कधी परत स्वप्नात स्थित होऊन जातो. पुन्हा जागतो आणि परत स्वप्नावस्थेत निघून जातो. (बृह.उ.४/३/१० पासून १८पर्यंत) याप्रकारे स्वप्नगत मानसिक सुख-दुःखांचा उपभोग करीत करीत कधी सुषुप्ति अवस्था झाल्यावर स्वप्नातील दृश्यांचा अभाव होऊन जातो. यावरून हेच सिद्ध होते की ती मायामात्र आहेत, कारण की बाह्यजगताचा अभाव होत नाही, त्याचे कार्य जसेच्या तसेच चालत रहाते तथा जीवात्म्याचे शरीर ही सुरक्षित रहाते, म्हणून त्याचे सत् असणे सिद्ध होते. त्या समयी जीवात्म्याला या प्रपंच्याच्या उपभोगापासून विश्राम मिळतो तथा शरीर आणि इंद्रियांचा थकवा दूर होतो. ती अवस्था आल्यावर जीवात्म्याची स्थिती कशी आणि कोठे रहाते या विषयी श्रुति म्हणते - ‘जेव्हा हा सुषुप्ति अवस्थेला प्राप्त होतो, तेव्हा काहीही जाणत नाही. त्याच्या शरीरात ज्या बाहत्तर हजार हिता नावाच्या नाडया हृदयापासून निघून समस्त शरीरात व्याप्त होतात, त्यात पसरून तो समस्त शरीरात व्याप्त होऊन शयन करतो.’ (बृह.उ.२/१/१९) दुसर्‍या श्रुतिमध्ये असेही सांगितले गेले आहे की, ‘ ज्यावेळी हा शयन करीत असून कुठल्याहि प्रकारचे स्वप्न बघत नसतो, सर्व प्रकाराने सुखी होऊन नाडयांमध्ये व्याप्त होऊन जातो त्या समयी त्यास कुठलेहि पाप स्पर्श करू शकत नाही.’ (छां.उ.८/६/३) भाव हा आहे की, त्या समयी अज्ञातामध्ये याच्या शरीराच्या क्रियेद्वारा कुठल्या जीवाची हिंसादि पापकर्म घडले तरी ते पाप लागत नाही. तसेच कोठे असे ही सांगितले आहे की, ‘हे सौ‌म्या ! त्या सुषुप्तिच्या समयी हा पुरुष ‘सत्’ ने संपन्न असतो.’ (छां.उ.६/८/१) एका ठिकाणी असे वर्णन आले आहे की, त्या समयी परमात्म्याच्या स्पर्शास प्राप्त झालेला हा जीवात्मा बाहेरच्या कुठल्या वस्तुला ही जाणत नाही आणि शरीराच्या आतील कुठल्या वस्तुलाही जाणत नाही. (बृह.उ.४/३/२१) या सर्व वर्णनावरून हेच कळून येते की, नाडयांचे मूळ आणि हा जीवात्मा तथा परब्रह्म परमात्मा यांचे निवासस्थान हृदय आहे, त्याच जागी सुषुप्तिमध्ये जीवात्मा शयन करतो, म्हणून त्याची स्थिती हृदयस्थ नाडयांत आणि परमात्म्यातही सांगितली गेली जाऊ शकते. यात काही विरोध नाही आहे. स्थानाच्या एकतेमुळेच कोठे त्यास ब्रह्माची प्राप्ति, कोठे प्रलयाप्रमाणे परमात्म्याशी संयुक्त होणे आदि सांगितले गेले आहे. परंतु यावरून असे समजता कामा नये की हा ही समाधिप्रमाणे मुक्तिमध्ये सहायक आहे. ती तर महान तामसी सुखाचा उपभोग करविणारी अज्ञानमयी स्थिती आहे. (गीता१८/३९) म्हणून शरीराच्या रक्षणासाठी कमीत कमी आवश्यक समयापर्यंतच शयन करायला हवे, श्रेष्ठ सुखाच्या बुद्धिने नाही. प्रश्नोपनिषदात स्पष्टच असे वर्णन आहे की, ‘हे मन जेव्हा तेजाने अर्थात उदानवायुने दबले जाते - उदानवायु इंद्रियांसहित मनास हृदयात घेऊन जाऊन मोहित करून टाकतो, तेव्हा याची सुषुप्ति अवस्था होते त्या समयी हा स्वप्न बघत नाही. या शरीरात जीवात्म्यास हे सुषुप्ति-जनित सुख होत असते.’ (प्र.उ.४/६) या विषयात दुसर्‍या श्रुतिमध्ये जी अशी गोष्ट सांगितली आहे की, ‘त्या समयी तो तेजाने संपन्न असतो.’ (छां.उ.८/६/३) तेथे ही तेजाचा अर्थ उदानवायुच समजायला हवा, ब्रह्म नाही. कारण की, प्रश्नोपनिषदात तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर देताना नऊ आणि दहा या मंत्रात स्पष्टच उदानवायुची आणि तेजाची एकता केली गेली आहे. म्हणून असे मानण्यानेच तेथे केले गेलेल्या वर्णनाशी छान्दोग्यश्रुतिची एकवाक्यता सिद्ध होईल.




संबंध - सुषुप्तिकाळात जी परमात्माबरोबर जीवात्म्याची स्थिती सांगितली गेली आहे, तिची पुष्टि करतात.


अतः प्रबोधोऽस्मात् ॥ ३.२.८ ॥


अर्थ - अतः = म्हणून, अस्मात् = येथून; प्रबोधः = जीवात्म्याचे जगणे (श्रुतिमध्ये सांगितले गेले आहे)


व्याख्या - जी वस्तु जिच्यात विलीन होते आणि तेथूनच प्रकटही होत असते या न्यायाने जीवात्मा सुषुप्तिचा अंत झाल्यावर जेव्हा जागा होतो तेव्हा येथून अर्थात परमात्म्याचे निवास-स्थान हृदयापासूनच जागृत होतो. म्हणून त्याचा लय होण्याचे स्थानही तेच आहे हे आपोआपच सिद्ध होत आहे. हे जागणे त्या परमात्म्याच्याच व्यवस्थेने होते. जितका वेळपर्यंत त्याच्या प्रारब्धानुसार सुषुप्तिचा सुखोपभोग व्हावयास हवा असेल तितका समय पूर्ण झाल्यावर त्या परमेश्वराच्या व्यवस्थेने जीवात्मा जागृत होतो, हा भावही येथे समजून घेतला पाहिजे.




संबंध - येथे ही जिज्ञासा होते की जो जीवात्मा सुषुप्ति-अवस्थेमध्ये विलीन होत असतो, तो जागा झाल्यावर परत येतो अथवा शरीराच्या कुठल्यातरी अंगात पडून राहिलेला दुसराच कुठला जीव जागा होतो ? यावर सांगतात.


स एव तु कर्मानुस्मृतिशब्दविधिभ्यः ॥ ३.२.९ ॥


अर्थ - तु = निःसंदेह, स एव = तोच जागा होतो; कर्मानुस्मृतिशब्दविधिभ्यः = कारण की कर्म, अनुस्मृति, वेदप्रमाण आणि कर्म करण्याची आज्ञा या सर्वांची सिद्धी तेव्हाच होईल, म्हणून असे मानणेच योग्य आहे.


व्याख्या - जो जीवात्मा झोपी जातो तोच जागा होतो. झोपतो एक आणि जागतो दुसरा असे मानण्यात अनेक दोष येतात. म्हणून असे मानणे शक्य नाही; कारण की असे दिसून येते की मनुष्य पहिल्या दिवशी ज्या कर्माचा आरंभ करतो, त्याच्या शेष भागाची पूर्ति दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापर्यंत करीत राहतो. अर्धे काम कुणी एकाने केले असेल आणि शेष राहिलेले अर्धे काम आपणच सोडून दिलेले समजून त्याची पूर्ति दुसरा करेल हे संभव नाही तसेच जागे झाल्यावर पूर्वीच्या सर्व गोष्टींच्या स्मृतिबरोबर हे ही स्मरण आपोआप होतच असते की जो आतापर्यंत झोपलेला होता तोच मी आता जागा झालो आहे. दुसर्‍या जीवात्म्याची कल्पना केल्याने कुठल्याही प्रकारे याची संगति लागू शकत नाही. तसेच श्रुतिमध्येही ठिकठिकाणी जो झोपतो तो जागा होतो असे सांगितले गेले आहे. (बृह.उ.४/३/१६) आणि कर्म करण्याची जी वेदामध्ये आज्ञा दिली गेली आहे तिची सफलता ही जो झोपतो त्याच्या जागण्याने होईल. कारण की, एकाला दिलेल्या आज्ञेचे पालन दुसरा कसा करू शकेल ? या सर्व कारणांनी हेच सिद्ध होत आहे की जो जीवात्मा सुषुप्तिकालात विलीन होतो तोच जागा होतो.




संबंध - ज्यावेळी मनुष्य एखाद्या कुठल्यातरी औषध आदिने मूर्च्छित केला जातो अथवा अन्य कुठल्या रोग आदि कारणांनी अचेत होऊन जातो त्या समयी ही त्याला बाहेरच्या जगताचे ज्ञान रहात नाही, ना तो स्वप्नहि पाहतो आणि सुखाचाहि अनुभव करत नाही, तर ती कोणती अवस्था आहे ? या जिज्ञासेवर सांगता


मुग्धेऽर्द्धसम्पत्तिः परिशेषात् ॥ ३.२.१० ॥


अर्थ - मुग्धे = मूर्च्छाकाळी; अर्द्धसम्पत्तिः = अर्धवट सुषुप्ति-अवस्था मानली पाहिजे; परिशेषात् = कारण की हीच अवस्था शेष राहत आहे; अन्य कुठली अवस्था शेष नाही.


व्याख्या - जन्मानंतर मरणापूर्वी जीवाच्या पूर्वोक्त तीन अवस्थाच प्रसिद्ध आहेत. कुठल्या विशेष कारणाने कधी कधी होणारी मुग्धावस्था सर्वांची आणि सदैव (नेहमी) असत नाही; म्हणून तिची लक्षण काहीशी सुषुप्तिमध्येच संगत असू शकतात. म्हणून हिला अर्धवट सुषुप्ति मानणेच उचित आहे; कारण की त्या अवस्थेत सुषुप्तिचा सुखलाभ होत नाही; केवळ अज्ञानमात्र मध्येच सुषुप्तिशी हिची समता आहे. म्हणून हिला पूर्णतया सुषुप्तिही म्हणता येणे शक्य नाही.




संबंध - पूर्वप्रकरणात जीवात्म्याच्या जागृत आदि अवस्थांचे निरूपण केले गेले आहे. त्यात प्रसंगवश ही गोष्टही सांगितली गेली आहे की, त्या परब्रह्म परमेश्वराचे निरंतर चिंतन केल्याने हा जीव कर्मबंधनापासून मुक्त होऊ शकतो. ज्याच्या ध्यानाचे हे महान फल सांगितले गेले आहे त्या परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप काय आहे ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. येथे ही जिज्ञासा होत आहे की, श्रुतिमध्ये काही ठिकाणी तर त्या परमेश्वरास सर्वथा निर्विशेष निर्गुण म्हटले गेले आहे. (क.उ.१/३/१५, मा.उ.७) कोठे त्यास सर्वेश्वर, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, अंतर्यामी, सर्वसाक्षी तसेच समस्त प्राण्यांच्या उत्त्पत्ति आणि प्रलयाचे कारण म्हटले गेले आहे. (मा.उ.६) कोठे त्यास सर्वव्यापी आणि कोठे अङ्गुष्ठमात्र म्हटले गेले आहे. कोठे क्रियाशील तर आणखी कोठे अक्रिय म्हटले आहे, म्हणून त्याचे वास्तविक स्वरूप काय आहे ? तसेच हृदय आदि ज्या ज्या स्थानी परमात्म्याची स्थिती सांगितली गेली आहे त्यांच्या दोषांनी तो लिप्त होतो की नाही ? या जिज्ञासेवर सांगतात.


न स्थानतोऽपि परस्योभयलिङगं सर्वत्र हि ॥ ३.२.११ ॥


अर्थ - स्थानतः = स्थानाच्या संबंधाने; अपि = ही, परस्य = परब्रह्म परमात्म्याचे, न = कुठल्या ही प्रकारच्या दोषापासून संसर्ग होत नाही; हि = कारण की, सर्वत्र = सर्व वेदवाक्यामध्ये त्या ब्रह्मास; उभयलिङगम् = दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त अर्थात सर्व प्रकारच्या दोषांपासून रहित निर्विशेष तथा समस्त दिव्य गुणांनी संपन्न सांगितले गेले आहे.


व्याख्या - कठोपनिषदात म्हटले आहे की, ‘अणोरणीयान महतो महीयानात्मास्य जन्तोर्निहितो गुहायाम्’ (क.उ.१/२/२०) ‘या जीवात्म्याच्या हृदयरूपी गुहेत राहणारा परमात्मा लहानाहून लहान तसेच मोठयाहून मोठा आहे.’ ‘ते ब्रह्म बसलेले असूनहि दूर निघून जाते, झोपलेले असूनहि सर्व बाजूस निघून जाते.’ (क.उ.१/२/२१) ‘ते जीवात्म्याबरोबर त्याच्या हृदयगुहेत स्थित आहे.’ (क.उ.१/३/१) ‘ते सर्व धर्मरहित आहे.’ (क.उ.१/३/१५) ‘भूत आणि भविष्याचा शासक आहे.’ (क.उ.२/१/१२-१३) ‘त्या परब्रह्मात नाना भेद नाहीत.’ (क.उ.२/१/११) ‘त्याच्या भयाने अग्नि आदि देवता आपापल्या कार्यात संलग्न राहतात.’ (क.उ.२/३/३) याचप्रकारे अन्य श्रुतिमध्येही जेथे यास निर्विशेष म्हटले आहे, त्याच प्रकरणात यास नाना प्रकारच्या दिव्य गुणांनी युक्त ही म्हटले आहे. (श्वे.उ.३/१९) तसेच जे याचे दिव्य गुण सांगितले गेले आहेत ते जीव आणि प्रकृति या दोहोपेक्षा विलक्षण आहेत. म्हणून असेही म्हणता येणे शक्य नाही की, हे दिव्य गुण जीवात्म्याचे अथवा जड प्रकृतिचे आहेत, अथवा उपाधिच्या मुळे त्या परब्रह्मावर याचा आरोप केला गेला आहे, कारण की, परब्रह्म परमात्मा उपाधिरहित आहे. म्हणून हेच सिद्ध होत आहे की तो परमात्मा स्वभावानेच दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त आहे. अर्थात तो सर्व प्रकारच्या दोषांपासून रहित निर्विशेष तसेच समस्त दिव्य गुणांनी संपन्न आहे, म्हणून सर्वत्र व्याप्त आणि समस्त प्राण्यांच्या हृदयात स्थित राहून ही तो परमात्मा त्या त्या वस्तु आणि स्थानांच्या दोषांनी लिप्त होत नाही. त्यात परस्पर विरोधी लक्षणे एकाच वेळी राहू शकतात, कारण की, तो सर्वशक्तिमान आणि सांसारिक पदार्थांहून सर्वथा विलक्षण आहे. लौकिक वस्तुशी तुलना करून त्याचे स्वरूप समजावून देणे शक्य नाही. कारण की तो मन, वाणीचा विषय नाही आहे. म्हणुन वेदांनी त्यास दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त दाखवून त्याच्या अपार महिम्यास लक्ष्य करविले आहे.




संबंध - प्रकारान्तराने शंका उपस्थित करून त्याचे निराकरण करून पूर्वोक्त गोष्ट दृढ करतात.


न भेदादिति चेन्न प्रत्येक मतद्वचनात् ॥ ३.२.१२ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की, भेदात् = सगुण (अपरब्रह्म अथवा कार्य ब्रह्म) आणि निर्गुण (परब्रह्म) ही ब्रह्माची पृथक् पृथक् दोन स्वरूपे मानली गेली आहेत म्हणून; (तो एकच परमात्मा दोन्ही लक्षणांनी युक्त आहे.) न = होऊ शकत नाही, इति न = तर अशी गोष्ट नाही आहे; प्रत्येकम् अतद्वचनात् = कारण की प्रत्येक श्रुतिमध्ये याच्या विपरीत एका परब्रह्म परमेश्वरासच दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त म्हटले गेले आहे.


व्याख्या - जर असे म्हणाल की, ‘जेथे परमात्म्यास सर्वश्रेष्ठ गुणांनी संपन्न म्हटले गेले आहे तेथे मायाविशिष्ट कार्यब्रह्म अथवा अपरब्रह्माचे वर्णन आहे तसेच जेथे त्याच्या निर्विशेष स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे, तेच परब्रह्माचे वर्णन आहे. याप्रकारे दोन्हीचे पृथक् पृथक् वर्णन असल्यामुळे दोन्ही लक्षणे एकाची नाहीत. म्हणून त्या परब्रह्म परमात्म्यास उभयलिंगांनी युक्त मानणे ठीक नाही.’ तर अशी गोष्ट नाही आहे. कारण की, अंतर्यामी ब्राह्मणात पृथ्वीपासून जीवात्म्यापर्यंत सर्वांचा अंतर्यामी आणि अमृत एकाच परब्रह्म परमात्म्यास म्हटले गेले आहे. (बृह.उ.३/७/३ पासून २२ पर्यंत) तसेच माण्डूक्योपनिषदात ही एकाच परब्रह्म परमात्म्याचे वर्णन करून त्यास समस्त दिव्य गुणांनी संपन्न (मा.उ.६) आणि सर्वथा निर्विशेष (मा.उ.७) म्हटले गेले आहे. श्वेताश्वतरोपनिषद् (३/१, २) मध्ये त्या एकाच ब्रह्माच्या स्वरूपाचे वर्णन करताना त्यास सुर्यासमान स्वयंप्रकाश आणि मायेपासून सर्वथा अतीत म्हटले गेले आहे. नंतर ‘त्याच्याहून श्रेष्ठ, महान तसेच सूक्ष्म दुसरे कोणी नाही’ असे म्हणून त्यास सर्वत्र परिपूर्ण म्हटले गेले आहे. (श्वे.उ.३/८,९) पुढे जाऊन त्यास सर्व जागी मुखे, शिर आदि अंगे असणारा म्हटले आहे. (श्वे.उ.३/११) तसेच त्यास सर्वांवर शासन करणारा, महान, सर्वांचा प्रेरक, ज्ञानस्वरूप आणि निर्मल म्हटले गेले आहे. (श्वे.उ.३/१२) त्यानंतर त्या परमेश्वराला जगतस्वरूप, सर्वत्र हात-पाय आदि अवयव असणारा, सर्व इंद्रियांनी युक्त, आणि समस्त इंद्रिये रहित, सर्वांचा स्वामी, शासक आणि आश्रय म्हटले आहे. (३/१५-१७) याप्रकारे तेथे प्रत्येक श्रुति-वाक्यात एक परब्रह्म परमेश्वरास दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त म्हटले गेले आहे. त्याहून भिन्न अपर (कार्य) ब्रह्माचे तेथे वर्णन नाही, म्हणून पर आणि अपर ब्रह्म भिन्न भिन्न आहे असे म्हणणे ठीक नाही. म्हणून हेच सिद्ध झाले आहे की, तो परब्रह्म परमात्माच निर्गुण-निराकार आहे. आणि तोच सगुण-साकारही आहे. या दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त असणे त्याचा स्वभावच आहे; कुठल्या उपाधिमुळे अथवा कार्य-कारण भेदामुळे नाही.




संबंध - दुसर्‍या श्रुतिच्या प्रमाणाने पुन्हा त्याचे एकत्वच दृढ करतात.


अपि चैवमेके ॥ ३.२.१३ ॥


अर्थ - अपि च = याशिवाय; एके = कुठल्या एका शाखेचा (विशेषरूपाने), एवम् = याप्रकारे प्रतिपादन करतात.


व्याख्या - तैत्तिरीयोपनिषदात त्या परब्रह्म परमेश्वरास सत्य, ज्ञान आणि अनंत सांगून त्याच्यापासून समस्त जगताची उत्पत्ति दाखविली आहे. (तै.उ.२/१) तसेच असेही म्हटले आहे की, ‘त्याने स्वयं स्वतःला या रूपात बनविले आहे.’ तथा त्याला रसस्वरूप आणि सर्वांना आनंदी करणारा म्हटले आहे. नंतर त्याच्या निर्विशेष लक्षणांचे वर्णन करून त्या परमात्म्यामध्ये स्थिति लाभ प्राप्त करणार्‍या साधकाचे निर्भय पदी स्थित होणे सांगितले आहे. (तै.उ.२/७) त्यानंतर त्याची स्तुति करीत म्हटले आहे की, ‘याच्या भयाने वायु वाहतो, याच्याच भयाने सूर्य उदय पावतो, याच्याच भयाने अग्नि आणि इंद्र तथा पाचवा मृत्यू आपापल्या कार्यात प्रवृत्त होत आहेत.’ (तै.उ.२/८) याप्रकारे तैत्तिरीय शाखेच्या मंत्रांच्या द्वारा ही त्या एकाच परमात्म्याच्या दोन्ही प्रकारच्या लक्षणांचे कथन होण्यामुळेही एकाच परमेश्वरास निर्गुण आणि सगुण रूपाचे होणे सिद्ध होत आहे.




संबंध - पुन्हा हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरे कारण प्रस्तुत करतात.


अरूपवदेव हि तत्प्रधानत्वात् ॥ ३.२.१४ ॥


अर्थ - हि = कारण की, अरूपवत् = रूपरहित निर्विशेष लक्षणांप्रमाणे; एव = ही; तत्प्रधानत्वात् = त्या सगुण स्वरूपाच्या लक्षणांची ही प्रधानता आहे म्हणून; (हेच सिद्ध होत आहे की ते ब्रह्म दोन्ही लक्षणांनी युक्त आहे.)


व्याख्या - ज्या प्रकारे त्या परब्रह्म परमात्म्यास निर्गुण-निराकार म्हणणारी वेद-वाक्ये मुख्य आहेत. ठीक त्याचप्रकारे त्याला सगुण-साकार, सर्व दिव्य गुण संपन्न सांगणारी वेद-वाक्येच प्रधान आहेत, त्यांच्यापैकी कुठल्या एकाला मुख्य आणि दुसर्‍यांना गौण असे म्हणता येणे शक्य नाही; कारण की, एकाच प्रकरणात आणि एकाच मंत्रात एका परब्रह्म परमात्म्याच्या स्वरूपाचे वर्णन करून त्यास दोन्ही लक्षणांनी युक्त सांगितले गेले आहे. (श्वे.उ.६/११) “एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा । कर्माध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ॥११॥” म्हणून रूपरहित निर्विशेष लक्षणांप्रमाणेच सगुण-साकार रूपाची ही प्रधानता होण्यामुळे हेच सिद्ध होत आहे की, तो परब्रह्म परमेश्वर दोन्ही लक्षणांनी युक्त आहे.




संबंध - आता दुसर्‍या दृष्टांताने हीच गोष्ट सिद्ध करतात.


प्रकाशवच्चावैयर्थ्यात् ॥ ३.२.१५ ॥


अर्थ - च = तथा, प्रकाशवत् = प्रकाशाप्रमाणे; अवैयर्थ्यात् = दोन्हीपैकी कुठले ही लक्षण अथवा त्याचे प्रतिपादक वेदवाक्य व्यर्थ नाही आहे म्हणून (हेच सिद्ध होत आहे की, परमात्मा दोन्ही लक्षणांनी युक्त आहे.)


व्याख्या - ज्याप्रकारे अग्नि आणि वीज आदि सर्व ज्योतिंची दोन रूपे होतात - एक प्रकट आणि दुसरे अप्रकट - या दोन्हीपैकी कुठलेहि व्यर्थ नाही, दोन्ही सार्थक आहेत, त्याचप्रकारे त्या ब्रह्माचीही ही दोन्ही रूपे सार्थ आहेत; व्यर्थ नाहीत. कारण की, अशा मानण्यानेच त्याच्या उपासनादिंची सार्थकता होईल; दोन्हीपैकी कुठल्या तरी एकाला प्रधान आणि दुसर्‍याला गौण अथवा अनावश्यक मानले तर त्याची सार्थकता होणार नाही. श्रुतिमध्ये त्याच्या दोन्ही लक्षणांचे वर्णन आहे; श्रुतिचे वचन कधी व्यर्थ असू शकत नाही, कारण की, ती स्वतः प्रमाण आहेत, म्हणून त्या वेदवाक्यांच्या सार्थकतेसाठी ही ब्रह्माला सविशेष आणि निर्विशेष दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त मानणेच उचित आहे.




संबंध - आता श्रुतित प्रतीत होणार्‍या विरोधाचे दोन सूत्रांच्या द्वारे समाधान केले जात आहे.


आह च तन्मात्रम् ॥ ३.२.१६ ॥


अर्थ - तन्मात्रम् = (श्रुति त्या परमात्म्यास) केवळ सत्य, ज्ञान आणि अनंतमात्र, च = च, आह = म्हणत आहे, तेथे सगुणवाचक शब्दांचा प्रयोग नाही.


व्याख्या - तैत्तिरीय-श्रुतिमध्ये ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ (तै.उ.२/१) अर्थात ‘ब्रह्म, सत्य, ज्ञान आणि अनंत आहे.’ याप्रकारे ब्रह्माला केवळ ज्ञान स्वरूपच म्हटले आहे. सत्यसंकल्पत्व आदि गुणांनी युक्त म्हटलेले नाही म्हणून त्यास दोन्ही लक्षणांनी युक्त मानले जाऊ शकत नाही.




संबंध - अशी गोष्ट नाही आहे परंतु -


दर्शयति चाथो अपि स्मर्यते ॥ ३.२.१७ ॥


अर्थ - अथो = उक्त कथनानंतर, दर्शयति = श्रुति त्यास अनेक रूपांनी युक्त ही म्हणते, च = याशिवाय, स्मर्यते अपि = स्मृतित ही त्याचे सगुण रूपाचे वर्णन आले आहे.


व्याख्या - पूर्वोक्त ‘सत्यं ज्ञानमनन्तम्’ या मंत्रात पुढे त्या परमात्म्यास सर्वांच्या हृदयात निहित म्हटले आहे आणि त्याच्यापासून समस्त जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले आहे. (तै.उ.२/१) नंतर त्याला रस-स्वरूप, सर्वांना आनंद देणारा (२/७) आणि सर्वांचा संचालक (२/८) म्हटले आहे. म्हणून त्या श्रुतिला केवळ निर्गुणपरक मानणे उचित नाही. याचप्रकारे स्मृतिमध्ये ठिकठिकाणी त्या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन दोन्ही प्रकाराने उपलब्ध होत आहे. जसे - ‘जो मला अजन्मा, अनादि आणि लोकमहेश्वर जाणतो, तो मनुष्यामध्ये ज्ञानी आहे. आणि सर्व पापांपासून मुक्त होऊन जातो.’ (गीता १०/३) ‘यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥’ ‘मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, संपूर्ण लोकांचा महान ईश्वर, समस्त प्राण्य़ांचा सुहृद जाणून मनुष्य शांतिस प्राप्त होतो.’ (गीता ५/२९) ‘भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥’ ‘असा सगुणरूप असणारा मी केवळ अनन्य भक्तिच्या द्वारा पाहिला जाऊ शकतो, तत्वाने जाणण्यात येऊ शकतो आणि माझ्यामध्ये प्रवेश करणे ही शक्य होऊ शकते.’ (गीता ११/५४) ‘भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥’ श्रीमद्‌‌भगवद्‌गीतेच्या पंधराव्या अध्यायात क्षर आणि अक्षरांची लक्षणे सांगून हे स्पष्ट रूपाने सांगितले गेले आहे की, ‘उत्तम पुरुष या दोन्हीहून भिन्न आहे जो परमात्मा या नावाने ओळखला जातो, जो तिन्ही लोकांमध्ये प्रविष्ट होऊन सर्वास धारण करतो तसेच जो सर्वांचा ईश्वर एवं अविनाशी आहे.’ (१५/१७) ‘उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः । यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥’ याप्रकारे परब्रह्म पुरुषोत्तमाच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करून शेवटी असेही म्हटले आहे की, ‘जो मला याप्रकारे पुरुषोत्तम जाणतो, तो सर्व काही जाणणारा आहे.’ (१५/१९) ‘यो मामेवसम्मूद्ये जानाति पुरुषोत्तमम् । य सर्वविद् --------------॥’ याप्रकारची अनेक वचने स्मृतिमध्ये आढळून येतात. ज्यात भगवंताच्या सगुण रूपाचे वर्णन आहे आणि त्यांना वास्तविक म्हटले गेले आहे. याप्रकारे श्रुति आणि स्मृतिमध्ये परमेश्वराच्या निर्गुण-निर्विशेष रूपाचेहि वर्णन दिसून येते. (क.उ.१/३/१५, मुण्डक.१/१/६, माण्डूक्य.७) आणि ते ही सत्य आहे. म्हणून हेच सिद्ध होते की ब्रह्म दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त आहे.




संबंध - त्या परब्रह्म परमेश्वराचे सगुण रूप उपाधिभेदाने नाही, परंतु स्वाभाविक आहे, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरे प्रमाण देतात.


अत एव चोपमा सूर्यकादिवत् ॥ ३.२.१८ ॥


अर्थ - च = आणि, अत एव = म्हणून अर्थात त्या परमेश्वराची उभय रूपे स्वाभाविक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, सूर्यकादिवत् = सूर्य आदिच्या प्रतिबिंबाप्रमाणे, उपमा = उपमा दिली गेली आहे.


व्याख्या - ‘सर्व भूतांचा आत्मा परब्रह्म परमेश्वर एक आहे. तथापि तो भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये स्थित आहे, म्हणून जलात प्रतिबिंबित चन्द्रम्याप्रमाणे एक आणि अनेक रूपातहि दिसत असतो.’ (ब्रह्मबिन्दु उ.१२) ‘एक एव हि भूतात्मा भूते भूते व्यवस्थितः । एकधा बहुधा चैव दृश्यते जलचन्द्रवत् ॥’ या दृष्टांताने ही गोष्ट दाखविली गेली आहे की, तो सर्वांतर्यामी परमेश्वर सगुण आणि निर्गुण भेदाने अलग-अलग नाही; परंतु एकच आहे; तथापि प्रत्येक जीवात्म्यात वेगवेगळा दिसून येत आहे. येथे चंद्रम्याच्या प्रतिबिंबाचा दृष्टांत देऊन हा भाव दाखविला गेला आहे की, जसा सूर्य आणि चंद्रमा आदिमध्ये जो प्रकाशगुण आहे, तो स्वाभाविक आहे, उपाधिमुळे नाही आहे. त्याचप्रकारे परमात्म्यामध्ये ही जे सत्यसंकल्पत्व, सर्वज्ञत्व आणि सर्वव्यापित्वादि गुण आहेत ते स्वाभाविक आहेत, उपाधिच्या योगे नाहीत. दुसरा हा भाव दाखविला आहे की, ज्याप्रकारे चंद्रम्याचे प्रतिबिंब जलात वेगवेगळे दिसत असूनहि एक आहे त्याचप्रकारे परमात्मा सर्व प्राण्यामध्ये अंतर्यामी रूपाने अलग-अलग असल्याप्रमाणे स्थित असून ही एकच आहे तसेच तो सर्वात रहात असूनहि त्यांच्या त्यांच्या गुण-दोषापासून अलिप्त आहे. गीतेच्या निम्नांकित वचनाने ही या सिद्धांताची पुष्टि होत आहे. ‘अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।’ ‘तो परमात्मा विभागरहित आहे तरीही विभक्ताप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये स्थित आहे.’ इत्यादि (१३/१६) हाच त्याचा विचित्र महिमा आहे.




संबंध - येथे प्रतिबिंबाचा दृष्टांत दिला गेल्यामुळे असा भ्रम होऊ शकतो की, परमात्म्याचे सर्व प्राण्यांमध्ये रहाणे प्रतिबिंबाप्रमाणेच मिथ्याच आहे, वास्तविक नाही; म्हणून या भ्रमाच्या निवृत्तिसाठी पुढील सूत्र सांगतात.


अम्बुवदग्रहणात्तु न तथात्वम् ॥ ३.२.१९ ॥


अर्थ - तु = परंतु, अम्बुवत् = जलात स्थित चंद्रम्याप्रमाणे, अग्रहणात् = परमात्म्याचे ग्रहण न होण्यामुळे, (त्या परमेश्वरास); तथात्वम् = सर्वथा तसेच, न = नाही असे समजता कामा नये.


व्याख्या - पूर्व सूत्रात परमेश्वरास समस्त प्राण्यांमध्ये स्थित सांगून जलात दिसणार्‍या चंद्रम्याचा दृष्टांत दिला आहे; परंतु पूर्णतया तो दृष्टांत परमात्म्यास बरोबर लागू पडत नाही. कारण की, चंद्रमा वस्तुतः जलात नाही आहे. केवळ त्याचे प्रतिबिंब दिसत असते. परंतु परमात्मा तर स्वयं सर्वांच्या हृदयात खरोखरच स्थित आहे आणि त्या त्या जीवांच्या कर्मानुसार त्यांना आपल्या शक्तिच्या द्वारे संसारचक्रात भ्रमण करवितो. (गीता१८/६१) म्हणून चंद्रम्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे परमेश्वराची स्थिती नाही आहे. येथे दृष्टांताचा केवळ एक अंश घेऊन असे समजले पाहिजे की परमेश्वर एक असून ही अनेक असल्यासारखा दिसतो. वास्तवात तो नाना (अनेक) नाहीच, तथापि सर्वशक्तिमान असल्यामुळे अलग-अलग प्राण्यांमध्ये एका रूपाने स्थित आहे.




संबंध - जरी अशी गोष्ट आहे तर प्रतिबिंबाचा दृष्टांत का दिला गेला ? या जिज्ञासेवर सांगतात.


वृद्धिह्लासभाक्त्वमन्तर्भावादुभयसामञ्जस्यादेवम् ॥ ३.२.२० ॥


अर्थ - अन्तर्भावात् = शरीरात स्थित असल्यामुळे; वृद्धिह्लासभाक्त्त्वम् = शरीराप्रमाणे परमात्म्याच्या वाढणे-घटणे (कमी होणे) याची संभावना असते म्हणून; (त्याच्या निषेधात), उभयसामञ्जस्यात् = परमात्मा आणि चंद्रप्रतिबिंब या दोन्हीची समानता आहे म्हणून, एवम् = या प्रकारचा दृष्टांत दिला गेला आहे.


व्याख्या - उपमा उपमेय वस्तुच्या कुठल्या तरी एका अंशाची समानता लक्षात घेऊन दिली जाते. पूर्णतया दोन्हीची एकता होईल तर मग उपमा म्हटली जाणार नाही. तर ते वास्तविक वर्णन होऊन जाईल. म्हणून येथे ही ज्याप्रकारे चंद्रम्याचे प्रतिबिंब जलात राहूनहि जलाच्या कमी जास्त होणे आदि विकारांशी संबद्ध असत नाही, तसाच परब्रह्म परमेश्वर सर्वात राहूनही निर्विकार रहात असतो. त्याच्या कमी जास्त होणे आदि विकाराने तो लिप्त होत नाही. या दृष्टांताचा आशय एवढाच आहे म्हणून या दृष्टांतामुळे अशी शंका करता कामा नये की, परमात्म्याची सर्व प्राण्यांमध्ये जी स्थिती सांगितली गेली आहे ती ही चंद्रम्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे अवास्तविक (खोटी) होईल.




संबंध - प्रकारान्तराने पुन्हा त्या भ्रमाची निवृत्ति केली जात आहे.


दर्शनाच्च ॥ ३.२.२१ ॥


अर्थ - दर्शनात् = श्रुतिमध्ये दुसरे दृष्टांत दिसून येतात म्हणून; च = ही, (हेच सिद्ध होत आहे की, परमात्म्याची स्थिती प्रतिबिंबाप्रमाणे अवास्तविक नाही.)


व्याख्या - कठोपनिषद (२/२/९) मध्ये सांगितले आहे की, ‘अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ॥’ ‘ज्याप्रकारे समस्त ब्रह्माण्डात प्रविष्ट झालेला एकच अग्नि नाना रूपात त्यांच्या सदृश्य रूपाचा होऊन रहातो, त्याचप्रकारे सर्व प्राण्यांचा अंतरात्मा परमेश्वर एक असूनहि नाना रूपात प्रत्येकाच्या रूपाचा जणु होत असतो. तसेच त्यांच्या बाहेरहि आहे.’ अग्निच्या प्रमाणेच तेथे वायु आणि सूर्याच्या दृष्टांताने ही परमेश्वराची वस्तुगत गुण-दोषापासून निर्लिप्तता सिद्ध केली गेली आहे. (क.उ.२/२/१०-११) याप्रकारे प्रतिबिंबाच्या अतिरिक्त दुसरे दृष्टांत जे त्या ब्रह्माच्या स्थितीच्या सत्यत्वाचे प्रतिपादन करणारे आहेत, वेदात आढळून येतात, म्हणूनहि प्राण्यांमध्ये आणि प्रत्येक वस्तुमध्ये त्या परब्रह्म परमेश्वराची स्थिति प्रतिबिंबाप्रमाणे आभासमात्र नाही आहे. तर सत्य आहे. म्हणून तो सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारच्या लक्षणानी युक्त आहे हे मानणे युक्तिसंगत आहे.




संबंध - येथपर्यंत हे सिद्ध केले गेले आहे की, परब्रह्म परमेश्वर दोन्ही प्रकारच्या लक्षणांनी युक्त आहे. आता ही जिज्ञासा होत आहे की, वेदामध्ये ब्रह्माला दोन्ही प्रकारचे लक्षणांनी युक्त सांगून अंती जे असे सांगितले गेले आहे की, ‘नेति नेति’ अर्थात ‘असे नाही, असे नाही.’ या निषेधपरक श्रुतिंचा काय अभिप्राय आहे ? म्हणून याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


प्रकृतैतावत्त्वं हि प्रतिषेधति ततो ब्रवीति च भूयः ॥ ३.२.२२ ॥


अर्थ - प्रकृतैतात्त्वम् = प्रकरणात जी ब्रह्माची लक्षणे सांगितली गेली आहेत त्यांच्या इयत्तेचे; प्रतिषेधति = ‘नेति, नेति’ श्रुति निषेध करते; हि = कारण की, ततः = त्यानंतर, भूयः = दोनदा, ब्रवीति च = सांगतहि आहे.


व्याख्या - बृहदारण्यकोपनिषदात ब्रह्माचे मूर्त्त आणि अमूर्त्त दोन रूपे सांगून प्रकरणाचा आरंभ केला गेला आहे. तेथे भौतिक जगतात तर पृथ्वी, जल, आणि तेज - या तिन्हीना त्यांच्या कार्यासहित मूर्त्त म्हटले गेले आहे तथा वायु आणि आकाशाला अमूर्त्त म्हटले आहे. त्याच प्रकारे आध्यात्मिक जगतात प्राण आणि हृदयाकाशास अमूर्त्त तथा त्याहून भिन्न शरीर आणि इंद्रियगोलकादिकांना मूर्त्त म्हटले आहे. त्यापैकी ज्यांना मूर्त्त म्हटले आहे, त्यांना नाशवंत अर्थात त्या रूपात न रहाणारे, परंतु प्रत्यक्ष उपलब्ध होण्यामुळे ‘सत्’ म्हटले, त्याचप्रकारे अमूर्तास अमृत अर्थात नष्ट न होणारे म्हटले आहे. याप्रकारे त्या जड तत्त्वांचे विवेचन करते वेळीच आधिभौतिक जगतात सूर्यमण्डलास आणि आध्यात्मिक जगतात नेत्राला मूर्ताचे सार म्हटले आहे. याप्रकारे आधिदैविक जगतात सूर्यमण्डलस्थ पुरुषाला आणि आध्यात्मिक जगतात नेत्रस्थ पुरुषाला अमूर्त्ताचे सार म्हटले आहे. याप्रकारे सगुण परमेश्वराच्या साकार आणि निराकार - या दोन रूपांचे वर्णन करून नंतर सांगितले गेले आहे की, ‘नेति,नेति’ अर्थात इतकेच नाही, इतकेच नाही. याहून श्रेष्ठ काही उपदेश नाही आहे. त्यानंतर असे सांगितले गेले आहे की, ‘त्या परम तत्त्वाचे नाम सत्याचे सत्य आहे. हा प्राण अर्थात जीवात्मा सत्य आहे आणि त्याचेहि सत्य तो परब्रह्म परमेश्वर आहे.’ (बृह.उ.२/३/१/६) याप्रकारे त्या परमेश्वराच्या साकार रूपाचे वर्णन करून हा भाव दाखविला गेला आहे की, यामध्ये जो जड अंश आहे, तो तर त्याच्या अपरा प्रकृतिचा विस्तार आहे आणि जो चेतन आहे ती जीवात्मारूप त्याची परा प्रकृति आहे आणि या दोन्ही सत्यांच्या आश्रयभूत तो परब्रह्म परमेश्वर यांच्याहूनहि पर अर्थात श्रेष्ठ आहे, म्हणून येथे ‘नेति-नेति’ श्रुति सगुण परमात्म्याचा प्रतिषेध करण्यासाठी नाही आहे; परंतु याची इयत्ता अर्थात तो इतकाच आहे, या परिमित भावाचा निषेध करून त्या परमेश्वराची असीमता अनंतता सिद्ध करण्यासाठी आहे म्हणून ‘नेति-नेति’ म्हणून सत्याचे सत्य परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध केले गेले आहे. म्हणून हा परब्रह्म परमेश्वर केवळ निर्गुण-निर्विशेषच आहे, सगुण नाही, असे समजता कामा नये.




संबंध - त्या परब्रह्म परमात्म्याची सगुण आणि निर्गुण दोन्हीही स्वरूपे वास्तविक प्राकृत मन-बुद्धि आणि इंद्रियांच्या अधीन आहे, हा भाव स्पष्ट करण्यासाठी सांगतात.


तदव्यक्तमाह हि ॥ ३.२.२३ ॥


अर्थ - हि = कारण की (श्रुति); तत् = त्या सगुण रूपास; अव्यक्तम् = इंद्रियांच्या द्वारा जाणण्यात न येणारा; आह = सांगत आहे.


व्याख्या - केवळ निर्गुण-निराकार रूपानेच तो परब्रह्म अव्यक्त अर्थात मन-इंद्रियांच्या द्वारा जाणला जाणारा नाही, इतकेच नाही, याचप्रमाणे त्याचे सगुण स्वरूप ही या प्राकृत मन आणि इंद्रिये आदिचा विषय नाही आहे. कारण की, श्रुतिमध्ये आणि स्मृतिमध्ये त्यासही अव्यक्त म्हटले गेले आहे. मुण्डकोपनिषदात प्रथम परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचे वर्णन याप्रकारे केले गेले आहे. - ‘यदा पश्यः पश्यते रुक्मवर्ण कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् । तदा विद्वान पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति ॥’ ‘जेव्हा तो द्रष्टा (जीवात्मा) सर्वांचा शासक, ब्रह्माचेही आदिकारण, समस्त जगताचे रचयिता, दिव्यप्रकाशस्वरूप, परम पुरुष, परमात्म्यास प्रत्यक्ष करतो, त्या समयी पुण्य-पाप दोन्हीना उत्तमप्रकारे धुवून टाकून निर्मल झालेला ज्ञानी सर्वोत्तम समतेला प्राप्त करून घेतो.’ (मु.उ.३/१/३) यानंतर चौथ्या मंत्रापासून सातव्या मंत्रापर्यंत सत्य, तप आणि ज्ञान आदिला त्याच्या प्राप्तीचा उपाय सांगितला गेला आहे. नंतर अनेक विशेषणांच्या द्वारा त्याच्या स्वरूपाचे वर्णन करून शेवटी म्हटले आहे. - ‘न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवेस्तपसा कर्मणा वा ।’ (मु.उ.३/१/८) ‘हा परमात्मा ना तर नेत्रांनी, ना वाणीने, ना दुसर्‍या इंद्रियांनी अथवा ना मनाने, ना तपाने आणि ना कर्मांनी पहाता येऊ शकत नाही.’ याप्रकारचे वर्णन अन्यान्य श्रुतिंमध्ये ही आहे, विस्तारभयामुळे येथे अधिक प्रमाणे दिली गेलेली नाहीत.




संबंध - यावरून असे समजता कामा नये की, परब्रह्म परमेश्वराचे कुठल्याहि अवस्थेत दर्शन होत नाही; कारण की,


अपि च संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम् ॥ ३.२.२४ ॥


अर्थ - अपि च = याप्रकारे अव्यक्त असूनहि; संराधने = आराधना केल्यावर (उपासक परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करतो); प्रत्यक्षानुमानाभ्याम् = ही गोष्ट वेद आणि स्मृति दोन्हीच्या कथनाने सिद्ध होत आहे.


व्याख्या - श्रुति आणि स्मृतिमध्ये जेथे सगुण आणि निर्गुण परमेश्वरास इंद्रियादिकांच्या द्वारे दिसून न येणारा सांगितला गेला आहे तेथेच हे ही सांगितले आहे की, तो परमात्मा नामजप, स्मरण, ध्यान आदि आराधनांच्या द्वारा प्रत्यक्ष होणाराहि आहे. (मु.उ.३/१/८, श्वेता.१/३, १०, २/१५ तथा श्रीमद्‌भगवद्‌गीता ११/५४) ‘ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु न पश्यते निष्कलं ध्यायमानः ।’ या प्रकारची अनेक प्रमाणे आहेत. वेद आणि स्मृतिंच्या या वचनात त्या सगुण निर्गुण-स्वरूप परब्रह्म परमात्म्यास आराधनेच्या द्वारा प्रत्यक्ष होणारा म्हटले गेले आहे. म्हणून हे सिद्ध होत आहे की, त्याचे प्रत्यक्ष दर्शन होत असते. भगवंतानी स्वतः सांगितले आहे - ‘हे अर्जुना ! अनन्य भक्तिच्या द्वाराच मला तत्त्वतः जाणणे शक्य होत असते. माझे दर्शन होऊ शकते आणि माझ्यात प्रवेश करणेही शक्य होते.’ (११/५४) म्हणूनही हेच सिद्ध होत आहे की, तो परब्रह्म परमेश्वर अवश्य आहे. आणि तो सगुण तथा निर्गुण दोन्ही लक्षणांनी युक्त आहे.




संबंध - त्या परमेश्वराचे स्वरूप आराधनेने जाणले जाते, अन्यथा नाही; या कथनाने तर हे सिद्ध होत आहे की, वास्तविक परमात्मा निर्विशेषच आहे, केवळ भक्तांसाठी आराधनकाळात सगुण होतो, अशी शंका आली तर सांगतात.


प्रकाशादिवच्चावैशेष्यं प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात् ॥ ३.२.२५ ॥


अर्थ - प्रकाशादिवत् = अग्नि आदिच्या प्रकाशादि गुणांप्रमाणे; च = ही, अवैशेष्यम् = (परमात्म्यातही) भेद नाही; प्रकाशः = प्रकाश; च = ही, कर्मणि = कर्मामध्ये, अभ्यासात् = अभ्यास करण्यानेच (प्रकट होतो.)


व्याख्या - ज्याप्रकारे अग्नि आणि वीज आदि तत्त्व प्रकाश आणि उष्णता आदि गुणांनी युक्त आहेत, त्याचे ते रूप जेव्हा प्रकट होते, त्या अवस्थेत ही त्या त्या स्वाभाविक गुणांनी युक्त आहेत, आणि प्रकट नसेल, लपलेले असेल त्या समयी ही तो त्या गुणांनी युक्त आहे. व्यक्त आणि अव्यक्त स्थितिमध्ये तो स्वाभाविक गुणांनी युक्त होण्यात काही अंतर पडत नाही. त्याचप्रकारे तो परमेश्वर उपासनेद्वारा प्रत्यक्ष होण्याच्या समयी ज्या प्रकारे समस्त कल्याणमय विशुद्ध दिव्य-गुणांनी संपन्न असतो, तसा तो अप्रकट अवस्थेतहि आहे, असे समजले पाहिजे. अग्नि आदि तत्त्वांना प्रकट करण्यासाठी जी साधने सांगितली आहेत, त्यांचा अभ्यास केल्यानंतरच ती आपल्या गुणांसहित प्रकट होतात. त्याच प्रकारे आराधना केल्यावर अप्रकट परमेश्वराचे प्रकट होणे उचितच आहे.




संबंध - उभयलिंङगांच्या प्रकरणास समाप्त करताना शेवटी म्हणतात.


अतोऽनन्तेन तथा हि लिङगम् ॥ ३.२.२६ ॥


अर्थ - अतः = यावर सांगितलेल्या कारणावरून हे सिद्ध झाले आहे की, अनन्तेन = (ते ब्रह्म) अनंत दिव्य कल्याणमय गुण-समुदायांनी संपन्न आहे; हि = कारण की, तथा = तसे तर; लिङगम् = लक्षणे उपलब्ध होत आहेत.


व्याख्या - पूर्वोक्त कारणांनी हेच सिद्ध होत आहे की, तो परब्रह्म परमेश्वर सत्यसंकल्पता, सर्वज्ञता, सर्वशक्तिमत्ता, सौहार्द, पतितपावनता, आनंद, विज्ञान, असंगता आणि निर्विकारता आदि असंख्य कल्याणमय गुण-समुदाय यांनी संपन्न आणि निर्विशेष - समस्त गुणरहित ही आहे, कारण की, श्रुतिमध्ये असेही लक्षण दिसून येते. (श्वे.उ.३/८,---२१)




संबंध - आता परमपुरुष आणि त्याची प्रकृति भिन्न आहे की अभिन्न ? या विषयावर विचार करण्यासाठी प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. येथे ही गोष्ट सांगितली जात आहे की, शक्ति आणि शक्तिमानात कुठल्या प्रकारे अभेद आहे.


उभयव्यपदेशात्त्वहिकुण्डलवत् ॥ ३.२.२७ ॥


अर्थ - उभयव्यपदेशात् = दोन्ही प्रकारचे कथन असल्यामुळे; अहिकुण्डलवत् = सर्पाच्या कुण्डलाकाराप्रमाणे, तु = हि (त्याचा भाव समजला पाहिजे.)


व्याख्या - ज्याप्रकारे सर्प कधी संकुचित होऊन कुण्डलाकार होऊन जातो आणि कधी आपल्या साधारण अवस्थेत रहातो. परंतु दोन्ही अवस्थामध्ये तो सर्प एकच असतो. साधारण अवस्थेत रहाणे त्याचा कारणभाव आहे. त्या समयी त्याची कुण्डलादिभावात प्रकट होण्याची शक्ति अप्रकट असते, तथापि ती त्याच्यात विद्यमान असते आणि त्याच्या पासून अभिन्न असते. एवं कुण्डलादि आकारात स्थित होणे त्याचा कार्यभाव आहे; हेच त्याच्या पूर्वोक्त अप्रकट शक्तिचे प्रकट होणे आहे. त्याचप्रकारे ते परब्रह्म जेव्हा कारण-अवस्थेत रहाते त्या समयी त्याची अपरा तथा परा प्रकृतिरूप दोन्ही शक्ति सृष्टिच्या पूर्वी त्याच्या ठिकाणी अभिन्न रूपाने विद्यमान असूनहि अप्रकट रहाते. आणि तेच जेव्हा कार्यरूपात स्थित होते तेव्हा त्याच्या उक्त दोन्ही शक्ति ही भिन्न भिन्न नामरूपात प्रकट होतात. म्हणून श्रुतिमध्ये जे ब्रह्माला निराकार म्हटले आहे ते त्याच्या कारणावस्थेस धरून म्हटले आहे आणि जे त्यास आपल्या शक्तिनी युक्त एवं साकार म्हटले आहे ते त्याच्या कार्यावस्थेस धरून म्हटले आहे. याप्रकारे श्रुतिमध्ये त्याच्या कारण आणि कार्य दोन्ही स्वरूपांचे वर्णन आले आहे. म्हणून हे सिद्ध होत आहे की, परब्रह्म परमात्म्यामध्ये त्याची शक्ति सदाच अभिन्न रूपाने विद्यमान असते.




संबंध - प्रकारान्तराने तीच गोष्ट सिद्ध करतात.


प्रकाशाश्रयवद्वा तेजस्त्वात् ॥ ३.२.२८ ॥


अर्थ - वा = अथवा; प्रकाशाश्रयवत् = प्रकाश आणि त्याच्या आश्रयाप्रमाणे त्यांचा अभेद आहे; तेजस्त्वात् = कारण की तेजाच्या दृष्टिने दोन्ही एकच आहेत.


व्याख्या - ज्याप्रकारे प्रकाश आणि त्याचा आश्रय सूर्य वास्तविक तेजतत्त्वाच्या नात्याने अभिन्न आहेत; तरीही दोन्हीना पृथक् पृथक् म्हटले जाते. त्याचप्रकारे परमेश्वर आणि त्याची शक्ति-विशेष वास्तविक अभिन्न असूनहि त्यांचे वेगवेगळे वर्णन केले जाते. भाव हा आहे की प्रकाश आणि सूर्याप्रमाणे परमात्मा आणि त्याच्या प्रकृतिमध्ये परस्पर भेद नाही तरीही त्यांच्यात भेद मानला जाऊ शकतो.




संबंध - पुन्हा सर्व गोष्टी समजाविण्यासाठी सांगतात.


पूर्ववद्वा ॥ ३.२.२९ ॥


अर्थ - वा = अथवा, पूर्ववत् = ज्याप्रकारे पूर्वी सिद्ध केले गेले होते तसेच; (दोन्हीचा अभेद समजून घेतला पाहिजे.)


व्याख्या - अथवा पहिल्याने (सूत्र २/३/४ मध्ये) ज्याप्रकारे परमात्म्याचा आपल्या अंशभूत जीवसमुदायाशी अभेद सिद्ध केला गेला आहे, त्याचप्रकारे येथे शक्ति आणि शक्तिमानाचा अभेद समजून घेतला पाहिजे.




संबंध - शक्ति आणि शक्तिमानाच्या अभेदाचे मुख्य कारण सांगतात.


प्रतिषेधाच्च ॥ ३.२.३० ॥


अर्थ - प्रतिषेधात् = दुसर्‍याचा प्रतिषेध होण्यामुळे; च = ही (अभेदच सिद्ध होत आहे.)


व्याख्या - श्रुतिमध्ये सांगितले आहे की, ‘हे जगत प्रकट होण्यापूर्वी एकमात्र परमात्माच होता; दुसरा कोणी हालचाल करणारा नव्हता.’ (ऐ.उ.१/१/१) या कथनात अन्याचा प्रतिषेध असल्यामुळे हेच समजून येत आहे की, जगताच्या उत्पत्तिच्या पूर्वी प्रलयकालात त्या परब्रह्म परमात्म्याच्या दोन्ही प्रकृति त्यात विलीन होऊन रहातात, म्हणून त्यांच्यात कुठल्याहि प्रकारच्या भेदाची प्रतीति होत नाही; म्हणून त्यांचा अभेद सांगितला गेला आहे.




संबंध - येथपर्यंत त्या परब्रह्म परमात्म्याचा आपल्या दोन्ही प्रकृतीशी अभेद कुठल्या प्रकारचा आहे याचे स्पष्टीकरण केले गेले आहे. आता त्या दोन्हीहून त्याची विलक्षणता आणि श्रेष्ठता यांचे प्रतिपादन करतात.


परमतः सेतून्मानसम्बन्धभेदव्यपदेशेभ्यः ॥ ३.२.३१ ॥


अर्थ - अतः = या जड-चेतनरूप दोन्ही प्रकृतिंच्या समुदायाने; परम् = (ते ब्रह्म) अत्यंत श्रेष्ठ आहे; सेतून्मानसम्बन्धभेदव्यपदेशेभ्यः = कारण की, श्रुतिमध्ये सेतु, सन्मान, संबंध तसेच भेदाचे वर्णन (करून हेच सिद्ध केले गेले आहे.)


व्याख्या - या जड-चेतनात्मक जगताची कारणभूतता ज्या भगवंताची अपरा एवं परा नामाच्या दोन प्रकृति आहेत. (गीता७/४, ५) श्वेताश्वतरोपनिषदात (१/१०) ज्याचे ‘क्षर’ आणि ‘अक्षर’ या नावाने वर्णन आले आहे, श्रीमद् भगवद्‌गीतेमध्ये कुठे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञच्या नावाने (१३/१) तसेच कोठे प्रकृति आणि पुरुषाच्या नावाने (१३/१९) ज्यांचा उल्लेख केला गेला आहे, त्या दोन्ही प्रकृतिपेक्षा तसेच त्यांच्या विस्ताररूप या दृश्य जगतापेक्षा तो परब्रह्म पुरुषोत्तम सर्वथा विलक्षण एवं परम श्रेष्ठ आहे. (गीता १५/१७) कारण की वेदामध्ये त्याची श्रेष्ठता सिद्ध करणारे चार हेतु उपलब्ध होतात. १. सेतु, २. उन्मान, ३. संबंध आणि ४. भेदाचे वर्णन. सेतुचे वर्णन श्रुतिमध्ये याप्रकारे आले आहे. ‘अथ य आत्मा स सेतुर्विधृतिः ।’ (छां.उ.८/४/१) ‘हा जो परमात्मा आहे, हाच सर्वांना धारण करणारा सेतु आहे.’ इत्यादि. दुसरा हेतु आहे उन्मानाचे वर्णन. उन्मानचा अर्थ आहे सर्वात मोठे माप. महत् परिमाण. श्रुतिमध्ये त्या परमेश्वरास सर्वात मोठा म्हटले आहे. ‘तावानस्य महिमा ततो ज्यायाश्च पूरुषः । पादोऽस्य सर्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥’ (छां.उ.३/१२/६) ‘जितका त्याचा महिमा आहे, तो परम पुरुष परमात्मा याच्याहून ही श्रेष्ठ आहे. संपूर्ण भूत-प्राणी याचा एक पाद आहे आणि शेष तीन अमृतस्वरूप पाद अप्राकृत परमधामात आहे.’ तिसरा हेतु आहे संबंधाचे प्रतिपादन. परब्रह्म परमेश्वरास पूर्वोक्त प्रकृतिंचा स्वामी, शासक एवं संचालक सांगून श्रुतिने यांच्यात स्वामी-सेवकभाव, शास्य-शासकभाव तथा नियन्तृ-नियन्तव्यभावरूप संबंधाचे उपपादन केले आहे. जसे - ईश्वराचा ही परम महेश्वर, देवतांचीही परम देवता, पतिंचाही परम पति, समस्त ब्रह्मांडाचे स्वामी एवं स्तुति करण्यास योग्य त्या प्रकाशस्वरूप परमात्म्यास आम्ही जाणतो. (श्वेता.उ.६/७) ‘तो ज्ञानस्वरूप परमात्मा सर्वांचा स्रष्टा, सर्वज्ञ, स्वयंही आपल्या प्राकटयाचा हेतु, कालाचाही महाकाल, समस्त कल्याणमय गुणांनी संपन्न आणि सर्वांना जाणणारा आहे. तो प्रकृति आणि जीवात्म्याचा स्वामी, समस्त गुणांचा शासक तसेच जन्म-मृत्युरूप संसारात बांधणारा, स्थित ठेवणारा आणि त्यापासून मुक्त करणारा आहे.’ “स विश्वकृद विश्वविदात्मयोनिज्ञेः कालकालो गुणी सर्वविद यः । प्रधानक्षेत्रज्ञपतिर्गुणेशः सँसारमोक्षस्थितिबन्धहेतुः ॥” (श्वेता.६/१६) चौथा हेतु आहे भेदाचे प्रतिपादन. त्या परब्रह्म परमात्म्यास या दोन्ही प्रकृतिंचा अंतर्यामी एवं धारण-पोषण करणारा सांगून तथा अन्य प्रकाराने ही श्रुतिने यापासून त्याच्या भिन्नतेचे निरूपण केले आहे. (श्वेताश्वतरोपनिषद अध्याय ४ मधील ६, ७, ८, १४, १५ आदि मंत्र, मु.उ.३/१/१-२, श्वेता.उ.१/९; बृह.उ. ३/४/१-२ तथा ३/७/१ पासून २३ पर्यंत) या सर्व कारणांवरून हेच सिद्ध होत आहे की, तो सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, सर्वाधार, सर्वांचा स्वामी परमात्मा आपल्या दोन्ही प्रकृतिंहून अत्यंत विलक्षण आणि परम श्रेष्ठ आहे, कारण की, त्या श्रुतिंमध्ये म्हटले आहे ते त्या परमात्म्याचे स्वरूप दिव्य, अलौकिक आणि उपाधिरहित आहे. तसेच त्या परब्रह्माला जाणण्याचे फळ परम शांतिची प्राप्ती “तमीशानं वरदं देवमीढयं निचाय्येमां शान्तिमत्यन्तमेति ।” (श्वेता.उ.४/११) “ज्ञात्वा शिवं शान्तिमत्यन्तमेति ।” (श्वेता.उ.४/१४) “तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ।” (क.उ.२/२/१३) सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त होणे “ज्ञात्वा देवं सर्वपाशापहानिः ।” (श्वेता.उ.१/११) तसेच अमृत प्राप्त होणे “तमेव विदित्वातिमृत्यूमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय ।” (श्वेता.उ.३/८) सांगितले गेले आहे.




संबंध - येथपर्यंत हे सिद्ध केले आहे की, त्या परब्रह्म परमात्म्याचा आपली अपरा आणि परा नामक प्रकृतिशी अभेद आहे आणि भेदही. आता ही जिज्ञासा होत आहे की, या दोहोपैकी अभेदपक्ष उत्तम आहे की, भेदपक्ष ? म्हणून याचा निर्णय करण्यासाठी सूत्रकार सांगतात.


सामान्यात्तु ॥ ३.२.३२ ॥


अर्थ - सामान्यात् = श्रुतिमध्ये भेद वर्णन आणि अभेद-वर्णन दोन्ही समान भावाने आहे, यामुळे, तु = तर (हेच निश्चित होत आहे की, भेद आणि अभेद दोन्ही पक्ष मान्य आहेत.)


व्याख्या - परब्रह्म परमात्म्यास सर्वांचा ईश्वर, ‘एष सर्वेश्वरः’ अधिपति, ‘एष सर्वेश्वर एष भूताधिपतिः ।’, प्रेरक, ‘भोक्ता भोग्यं प्रेरितारं च मत्वा ।’, शासक ‘एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि सूर्याचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठतः ।’, आणि अंतर्यामी ‘एष त आत्मान्तर्याम्यमृतः ।’ म्हणणार्‍या भेदप्रतिपादक श्रुति ज्याप्रकारे प्रमाण-भूत आहे, त्याचप्रकारे ‘तत्त्वमसि’ (छां.उ.६/८ पासून १६ व्या खण्डापर्यंत) ‘ते ब्रह्म तूच आहेस.’ इत्यादि. अभेदप्रतिपादक श्रुतिही प्रमाण आहेत. दोन्हीच्या प्रामाणिकतेमध्ये किंचितमात्र ही अंतर नाही आहे. म्हणून कुठल्या एका पक्षास श्रेष्ठ आणि दुसर्‍यास याचा विपरित म्हणणे कदापि संभव नाही आहे. म्हणून भेद आणि अभेद दोन्ही ही पक्ष मान्य आहेत.




संबंध - श्रुतिमध्ये कोठे तर, त्या ब्रह्माला आपल्यापासून भिन्न मानून त्याची उपासना करण्यास सांगितले आहे, यथा - ‘त्ँ ह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुवैं शरणमहं प्रपद्ये’ (श्वेता.उ.६/१८) ‘परमात्मज्ञानविषयक बुद्धिला प्रकट करणार्‍या त्या प्रसिद्ध देव परमेश्वरास मी संसारबंधनातून सुटण्याची इच्छा असणारा उपासक शरण जात आहे.’ या मंत्रास अनुसरून उपासक आपल्याहून भिन्न उपास्यदेवास शरण जातो. यावरून भेदोपासना सिद्ध होत आहे आणि कोठे त्याच्यापासून पुन्हा प्रकट होत असते तथा ब्रह्माच्याच परा प्रकृतिच्या अंतर्गत असल्यामुळे त्याचाच अंश आहे, म्हणून ते परमात्म्यापासून अभिन्न म्हटले जाते आणि परमात्मा त्यांचा नियामक आहे तथा समस्त जीव त्यांचे नियम्य आहेत, या कारणामुळे ते त्या ब्रह्माहून ही भिन्न आहेत आणि परस्पराहूनहि असे मानणेच युक्तिसंगत आहे.


तथान्यप्रतिषेधात् ॥ ३.२.३६ ॥


अर्थ - तथा = त्याचप्रकारे, अन्यप्रतिषेधात् = दुसर्‍याचा निषेध केला गेला आहे म्हणून ही; (हेच सिद्ध होते.)


व्याख्या - श्रुतिमध्ये ठिकठिकाणी परब्रह्म परमात्म्याहून भिन्न दुसर्‍या कुठल्याहि वस्तुच्या सत्तेचा निषेध केला गेला आहे. ‘मनसैवेदभाप्तव्यं नेह्र नानास्ति किंचन ।’ (क.उ.२/१/११) यावरून ही हेच सिद्ध होत आहे की, आपल्या परा आणि अपरा दोन्ही शक्तिंनी संपन्न तो परब्रह्म परमात्माच नाना रूपात प्रकट होत आहे. त्याच्या दोन्ही प्रकृतिमध्ये नानात्व असूनहि त्यांच्यात काही भेद नाही आहे. तो सर्वथा निर्विकार, असंग, भेदरहित आणि अखण्ड आहे.




संबंध - पूर्वोक्त गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरी युक्ति प्रस्तुत करतात.


अनेन सर्वगतत्वमायामशब्दादिभ्यः ॥ ३.२.३७ ॥


अर्थ - अनेन = याप्रकारे भेद आणि अभेदाच्या विवेचनाने; आयामशब्दादिभ्यः = तथा श्रुतिमध्ये जे ब्रह्माची व्यापकत सूचित करणारे शब्द आदि हेतु आहेत, त्याहूनहि; सर्वगतत्वम् = त्या ब्रह्माचे सर्वगत (सर्वत्र व्यापक असणे सिद्ध होत आहे.)


व्याख्या - ‘त्या सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तमाने हे संपूर्ण जगत परिपूर्ण होऊन राहिले आहे.’ (श्वेता.उ.३/९ तथा ईश.१) ‘परम पुरुष तोच आहे ज्याच्यायोगे हे समस्त जगत् व्याप्त आहे.’ (गीता८/२२) इत्यादि. श्रुति आणि स्मृतिंच्या वचनात जे परमात्म्याच्या सर्वव्यापकतेस सूचित करणारे ‘सर्वगत’ आदि शब्द प्रयुक्त केले गेले आहेत, त्यांच्यावरून तथा उपर्युक्त विवेचनावरूनहि हेच सिद्ध होत आहे की, तो परमात्मा सर्वत्र व्यापक आहे. सर्वथा अभेद मानण्याने या व्याप्य-व्यापक भावाची सिद्धि होणार नाही. म्हणून हाच निश्चय झाला आहे की परब्रह्म पुरुषोत्तम आपल्या दोन्ही प्रकृतीहून भिन्न ही आहे आणि अभिन्न ही; कारण की, त्या त्याच्या शक्ति आहेत. शक्ति आणि शक्तिमानामध्ये भेद असत नाही म्हणून तथा त्या प्रकृतिंचे अभिन्न निमित्तोपादान कारण असल्याने ही तो त्यांच्यापासून अभिन्न आहे. आणि याप्रकारे अभिन्न असूनहि त्यांचा नियंता असल्यामुळे तो त्यांच्याहून सर्वथा विलक्षण आणि उत्तमहि आहे.




संबंध - याप्रकारे त्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतिपादन करून आता या गोष्टीचा निर्णय करण्यासाठी की जीवांच्या कर्मांचे यथायोग्य फळ देणारा कोण आहे ? पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


फलमत उपपत्तेः ॥ ३.२.३८ ॥


अर्थ - फलम् = जीवांच्या कर्मांचे फल; अतः = या परब्रह्मापासूनच होत असते; उपपत्तेः = कारण की असे मानणेच युक्तिसंगत आहे.


व्याख्या - जो सर्वशक्तिमान आणि सर्वांच्या कर्मांना जाणणारा असेल तोच जीवांच्या द्वारा केल्या गेलेल्या कर्मांचे यथायोग्य फल प्रदान करू शकतो. त्याच्याशिवाय ना तर जड प्रकृति ही कर्मांना जाणण्यास आणि त्यांच्या फळांची व्यवस्था करण्यास समर्थ आहे आणि ना स्वयं जीवात्मा ही; कारण की, तो अल्पज्ञ आणि अल्प शक्ति असणारा आहे. कोठे कोठे जे देवता आदिना कर्मांचे फल देणारा म्हटले गेले आहे, तेही भगवंताचे विधानास धरूनच सांगितले गेले आहे. भगवानच त्यांना निमित्त बनवून ते फल देतात. (गीता ७/२२) या न्यायाने हेच सिद्ध झाले की, जीवांच्या कर्मफल-भोगाची व्यवस्था करणाराहि तो परमात्माच आहे, दुसरा कोणी नाही.




संबंध - केवळ युक्तिने ही हीच गोष्ट सिद्ध होत आहे असे नाही; परंतु -


श्रुतत्वाच्च ॥ ३.२.३९ ॥


अर्थ - श्रुतत्वात् = श्रुतिमध्ये असेही म्हटले गेले आहे म्हणून; च = ही (हेच मानणे ठीक आहे की कर्मांचे फल परमात्म्यापासूनच प्राप्त होत असते.)


व्याख्या - हा परमेश्वरच कर्मफल देणारा आहे, याचे वर्णन वेदामध्ये याप्रकारे येते - ‘य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः । तदेव शुक्रं तद्‌ब्रह्म तदेवामृतमुच्यते ॥’ (क.उ.२/२/८) ‘जो हा जीवांच्या कर्मानुसार नाना प्रकारच्या भोगांना निर्माण करणारा परम पुरुष परमेश्वर प्रलयकाली सर्व झोपी गेल्यावर ही जागृत राहतो, तोच परम विशुद्ध आहे, तोच ब्रह्म आहे आणि त्यालाच अमृत म्हटले जाते.’ तथा श्वेताश्वतरमध्ये ही याप्रकारे वर्णन आले आहे - ‘नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान् ।’ (श्वे.उ.६/१३) ‘जो एक नित्य चेतन परमात्मा अनेक नित्य चेतन आत्म्यांच्या कर्मफल-भोगांचे विधान करतो.’ या वेदवाक्यांनी ही हेच सिद्ध होत आहे की, जीवांच्या कर्मफलाची व्यवस्था करणारा परमेश्वरच आहे.




संबंध - या विषयांत आचार्य जैमिनींचे मत उपस्थित केले जात आहे.


धर्मं जैमिनिरत एव ॥ ३.२.४० ॥


अर्थ - अत एव = पूर्वोक्त कारणांनी ही; जैमिनिः = जैमिनि; धर्मम् = धर्मा(कर्मा)चा फलदाता म्हणतात.


व्याख्या - जैमिनी आचार्य मानतात की, युक्ति आणि वैदिक प्रमाण या दोन्ही कारणांनी हे सिद्ध होत आहे की, धर्म अर्थात कर्म स्वयंहि फलाचा दाता आहे, कारण की, हे प्रत्यक्ष दिसून येते की, शेती आदि कर्म करण्याने अन्नाची उत्पत्तिरूप फल प्राप्त होते. याप्रकारे वेदामध्ये ही ‘अमुक फलाची इचछा असेल तर अमुक कर्म केले पाहिजे.’ असे विधि वाक्य असल्याने हेच सिद्ध होत आहे की, कर्म स्वयंही फल देणारे आहे. त्याहून भिन्न कोणा कर्मफलदात्याची कल्पना आवश्यक नाही आहे.




संबंध - आचार्य जैमिनीच्या या कथनास अयुक्त सिद्ध करीत सूत्रकार आपल्या मतास उपादेय म्हणतात.


पूर्वं तु बादरायणो हेतुव्यपदेशात् ॥ ३.२.४१ ॥


अर्थ - तु = परंतु, बादरायणः = वेदव्यास; पूर्वम् = पूर्वोक्त परमेश्वरासच कर्मफलदाता मानतात; हेतुव्यपदेशात् = कारण की, वेदामध्ये त्यासच सर्वांचे कारण म्हटले गेले आहे. (म्हणून जैमिनीचे कथन ठीक नाही.)


व्याख्या - सूत्रकार व्यासजी म्हणतात की, जैमिनी जे कर्माचे ही फल देणारा म्हणतात ते ठीक नाही, कर्म तर निमित्तमात्र होत असते; ते जड, परिवर्तनशील आणि क्षणिक असल्यामुळे फलाची व्यवस्था करू शकत नाही, म्हणून जसे पहिल्याने सांगितले गेले आहे, तो परमेश्वरच जीवांच्या कर्मानुसार फल देणारा आहे; कारण की श्रुतिमध्ये ईश्वरास सर्वांचा हेतु सांगितले गेले आहे.




येथे तिसर्‍या अध्यायातील दुसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP