ब्रह्मसूत्र

अध्याय तिसरा

पाद पहिला

संबंध - पूर्वीच्या दोन अध्यायात ब्रह्म आणि जीवात्मा यांच्या स्वरूपाचे प्रतिपादन केले गेले. आता त्या परब्रह्म परमेश्वराच्या प्राप्तीचा उपाय दाखविण्यासाठी तिसर्‍या अध्यायाचा आरंभ केला जात आहे. म्हणून या अध्यायाला साधनाध्याय अथवा उपासनाध्याय म्हटले जाते. परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनात सर्वप्रथम वैराग्याची आवश्यकता आहे. संसारातील अनित्य भोगासंबंधी वैराग्य उत्पन्न झाल्यानेच मनुष्याच्या ठिकाणी परमात्म्याला प्राप्त करण्याची शुभेच्छा प्रकट होत आहे. आणि तो त्यासाठी प्रयत्नशील होतो. म्हणून वैराग्योत्पादनासाठी वारंवार जन्म-मृत्यु आणि गर्भादिच्या दुःखांचा प्रदर्शन करण्यासाठी पहिला पाद आरंभ केला जात आहे. प्रलयानंतर सृष्टिकालात त्या परब्रह्म परमेश्वरापासून ज्याप्रकारे या जगताची उत्पत्ति होते, त्याचे वर्णन तर पहिल्या दोन अध्यायात केले गेले आहे. त्यानंतर वर्तमान जगतात जे जीवात्म्याच्या शरीरांचे परिवर्तन होत रहाते, त्याच्या विषयी श्रुतिंनी जसे वर्णन केले आहे त्यावर या तिसर्‍या अध्यायाच्या प्रथम पादात विचार केला जात आहे. विचाराचा विषय हा आहे की, जेव्हा हा जीवात्मा पहिले शरीर सोडून दुसर्‍या शरीरांत जातो तेव्हा एकटाच जातो अथवा आणखी कोणी त्याच्याबरोबर जाते, याचा निर्णय करण्यासाठी सांगतात.


तदन्तरप्रतिपत्तौ रंहति सम्परिष्वक्तः प्रश्ननिरूपणाभ्याम् ॥ ३.१.१ ॥


अर्थ - तदन्तरप्रतिपत्तौ = उक्त देहानंतर देहान्तराच्या प्राप्तीच्या समयी (हा जीवात्मा); सम्परिष्वक्तः = शरीराच्या बीजरूप सूक्ष्म तत्त्वांनी युक्त होऊन; रंहति = जातो (ही गोष्ट); प्रश्ननिरुपणाभ्याम् = प्रश्न आणि त्याच्या उत्तराने सिद्ध होत आहे.


व्याख्या - श्रुतिमध्ये हा विषय कित्येक ठिकाणी आला आहे, त्यापैकी ज्या स्थळी वर्णन स्पष्ट आहे, ते तर आपोआप समजून येते; परंतु जेथील वर्णन काहीसे अस्पष्ट आहे, ते स्पष्ट करण्यासाठी येथे छान्दोग्य उपनिषदातील प्रकरणावर विचार केला जात आहे. येथे असे वर्णन आहे की श्वेतकेतु नावाने प्रसिद्ध एक ऋषिकुमार होता, तो एकदा पांचालांच्या सभेत गेला. तेथे प्रवाहण नामक राजाने त्यास विचारले, ‘काय तू आपल्या पित्याकडून शिक्षण घेतले आहेस का ?’ त्याने म्हटले, ‘हो !’ तेव्हा प्रवाहणाने विचारले, ‘येथे मेल्यावर हा जीवात्मा कोठे जातो ? तेथून परत येथे कसा येतो ? देवयान आणि पितृयान मार्गात काय अंतर आहे ? येथून गेलेल्या लोकांनी तेथील लोक भरून का जात नाहीत ? या सर्व गोष्टींना आणि ज्याप्रकारे पाचव्या आहुतित हे जल पुरुषरूप होऊन जाते ही गोष्ट तू जाणतोस की नाही ?’ तेव्हा प्रत्येक गोष्टीच्या उत्तरात श्वेतकेतुने हेच सांगितले आहे, ‘मी जाणत नाही.’ हे ऐकून प्रवाहणने त्यास फटकारले आणि म्हटले, ‘जर तू या सर्व गोष्टी जाणत नाहीस मग तू कसे म्हणतोस की मी शिक्षण घेऊन चुकलो आहे ?’ श्वेतकेतु लज्जित होऊन पित्याजवळ गेला आणि म्हणाला की, ‘प्रवाहण नामक एका साधारण क्षत्रियाने मला पाच गोष्टी विचारल्या, परंतु त्यापैकी एकाही गोष्टीचे उत्तर मी देऊ शकलो नाही. आपण मला कसे सांगितले होते की मी तुला शिक्षण देऊन चुकलो आहे ?’ पित्याने म्हटले, ‘मी स्वतः या पाचांपैकी कशाला जाणत नाही; तर तुला कसे सांगणार ?’ त्यानंतर आपल्या पुत्रासहित पित्या त्या राजाजवळ गेला आणि धनादिचे दान न स्वीकारता म्हटले, ‘आपण माझ्या पुत्राला ज्या पाच गोष्टी विचारल्या होत्या, त्याच मला सांगाव्या.’ तेव्हा त्या राजाने बरेच दिवस त्या दोघांना आपल्याजवळ ठेवून घेतले आणि म्हटले की, ‘आजपर्यंत ही विद्या क्षत्रियांजवळच राहिली आहे, आता सर्वप्रथम आपल्याला ब्राह्मणांना ती मिळत आहे.’ असे म्हणून राजा प्रवाहणाने प्रथम त्या पाच प्रश्नांचे उत्तर देण्यास आरंभ केला, ज्यात ही जिज्ञासा केली गेली की, ‘हे जल पाचव्या आहुतित पुरुषरूप कसे होऊन जाते ?’ तेथे द्युलोकरूप अग्नित श्रद्धेची पहिली आहुति देण्याने राजा सोमाची उत्पत्ति सांगितली आहे. दुसरी आहुति आहे, मेघरूपी अग्नित राजा सोमाचे हवन करणे; त्यायोगे वर्षाची उत्पत्ति सांगितली गेली आहे. तीसरी आहुति आहे, पृथ्वीरूप अग्नित वर्षाचे हवन करणे, त्यापासून अन्नाची उत्पत्ति सांगितली गेली आहे. चौथी आहुति आहे पुरुषरूप अग्नित अन्नाचे हवन करणे; त्यापासून वीर्याची उत्पत्ति सांगितली गेली आहे. आणि पाचवी आहुति आहे स्त्रीरूप अग्नित वीर्याचे हवन करणे, त्यापासून गर्भाची उत्पत्ति सांगून म्हटले आहे की, याप्रकारे हे जल पाचव्या आहुतित ‘पुरुष’ संज्ञक होतो. याप्रकारे जन्म ग्रहण करणारा मनुष्य जोपर्यंत आयुष्य असते तोपर्यंत येथे जीवित राहतो, इत्यादि. (छां.उ.५/३/१ पासून ५/९/२ पर्यंत) या प्रकरणात जलाच्या नावाने बीजरूप समस्त तत्त्वांचा समुदाय सूक्ष्म शरीरासहित वीर्यात स्थित जीवात्मा सांगितला गेला आहे. म्हणून तेथील प्रश्नोत्तरपूर्वक विवेचनाने हेच सिद्ध होत आहे की, जीवात्मा जेव्हा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो, तेव्हा बीजरूपात स्थित समस्त तत्त्वांनी युक्त होऊनच प्रयाण करतो.




संबंध - या प्रकरणात तर केवळ जलाचेच पुरुष होणे सांगितले आहे, मग यामध्ये सर्व सूक्ष्म तत्त्वांचेहि असणे कसे समजून येईल ? जर श्रुतिला हेच सांगणे अभीष्ट होते तर केवळ जलाचेच नाव का घेतले आहे ? या जिज्ञासेवर सांगतात -


त्र्यात्मकत्वात्तु भूयस्त्वात् ॥ ३.१.२ ॥


अर्थ - त्र्यात्मकत्वात् = (शरीर) तीन्ही तत्त्वांचे सम्मिश्रण आहे, म्हणून (जलाचे म्हणण्याने सर्वांचे ग्रहण होऊन जाते.), तु = तथा, भूयस्त्वात् = वीर्यात सर्वाहून अधिक जलाचा भाग राहतो, म्हणून (जलाच्या नावाने त्यांचे वर्णन केले गेले आहे.)


व्याख्या - जगताच्या उत्पत्तिच्या वर्णनात सांगितले गेले आहे की, तीन्ही तत्त्वांचे संमीलन करून त्यानंतर परमेश्वराने नाम आणि रूपाला प्रकट केले. (छां.उ.६/३/३) तेथे तीन तत्त्वांचे वर्णन ही उपलब्ध आहे. त्यात सर्व तत्त्वांचे मिश्रण समजून घेतले पाहिजे. स्त्रीच्या गर्भात ज्या वीर्याचे आधान केले जाते त्यात सर्व भौतिक तत्त्वे रहातात तथापि जलाची अधिकता असल्याने तेथे त्याच्या नावाने त्याचे वर्णन केले गेले आहे. वास्तवात ते कथन शरीराच्या बीजभूत सर्व तत्त्वांना लक्ष्य करविणारे आहे. एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातेवेळी जीव प्राणात स्थित होऊन जातो आणि प्राणाला आपोमय (जलरूप) म्हटले गेले आहे, म्हणून त्या दृष्टिने ही तेथे जलासच पुरुषरूप म्हणणे सर्वथा सुसंगत आहे. म्हणून हेच सिद्ध झाले आहे की, जीवात्मा सूक्ष्म तत्त्वांनी युक्त होऊनच एका शरीरातून निघून दुसर्‍या शरीरात जातो.




संबंध - प्रकारान्तराने या गोष्टीची पुष्टि करतात.


प्राणगतेश्च ॥ ३.१.३ ॥


अर्थ - प्राणगतेः = जीवात्म्याच्या बरोबर प्राणांच्या गमनाचे वर्णन असल्याने, च = ही (हीच गोष्ट सिद्ध होत आहे.)


व्याख्या - प्रश्नोपनिषदात आश्वलायन मुनिंनी पिप्पलादांना प्राणाविषयी काही प्रश्न केले आहेत. त्यातील एक प्रश्न हा आहे की, ‘हा जेव्हा एका शरीरास सोडून जेव्हा दुसर्‍या शरीरात जातो तेव्हा पहिल्या शरीरांतून कशा प्रकारे निघतो ?’ (प्र.उ.३/१) त्याच्या उत्तरात पिप्पलादाने सांगितले आहे की, ‘जेव्हा या शरीरातून उदानवायु निघतो तेव्हा हे शरीर थंड होऊन जाते, त्या समयी जीवात्मा मनात विलीन झालेल्या इंद्रियांना बरोबर घेऊन उदानवायुसहित दुसर्‍या शरीरात निघून जातो. त्या समयी जीवात्म्याचा जसा संकल्प असेल, त्या संकल्प आणि मन-इंद्रियांसहित हा प्राणात स्थित होऊन जातो. तो प्राण उदानासहित जीवात्म्याला त्याच्या संकल्पानुसार भिन्न भिन्न लोकांत (योनिमध्ये) घेऊन जातो.’ (प्र.उ.३/१० पर्यंत) याप्रकारे जीवात्म्याच्या बरोबर प्राण आणि मन-इंद्रिये आदिच्या गमनाचे वर्णन असल्याने ही हेच सिद्ध होत आहे की, बीजरूप सर्व सूक्ष्म तत्त्वांसहित हा जीवात्मा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो. छान्दोग्योपनिषदात जे सर्व प्रथम श्रद्धेचे हवन सांगितले गेले आहे, तेथे श्रद्धा या नावाने संकल्पाचेच हवन समजले पाहिजे. भाव हा की श्रद्धारूप संकल्पाच्या आहुतिने जे त्याचे सूक्ष्म शरीर निर्माण झाले तोच पहिला परिणाम राजा सोम झाला, नंतर त्याचा दुसरा परिणाम वर्षारूपाने मेघात स्थिति आहे. तिसर्‍या परिणामात पोहोचून तो अन्नात स्थित झाला, चौथ्या परिणामात वीर्यरूपाने त्याची पुरुषात स्थिति झाली आणि पाचव्या परिणामात तो गर्भ होऊन स्त्रीच्या गर्भाशयात स्थित झाला. त्यानंतर तोच मनुष्य होऊन बाहेर आला. याप्रकारे दोन्ही ठिकाणच्या वर्णनात एकता आहे. प्राणाचा सहयोग सर्व ठिकाणी आहे; कारण की, गति प्राणाच्या अधीन आहे; प्राणाला जलमय म्हटले गेलेच आहे. याप्रकारे श्रुतिच्या समस्त वर्णनाची संगति लागत आहे.




संबंध - आता दुसर्‍या प्रकारच्या विरोधाचा उल्लेख करून त्याचे निराकरण करतात.


अग्न्यादिगतिश्रुतेरिति चेन्न भाक्तत्वात् ॥ ३.१.४ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की; अग्न्यादिगतिश्रुतेः = अग्नि आदिमध्ये प्रवेश करण्याची गोष्ट दुसर्‍या श्रुतिमध्ये सांगितली गेली आहे म्हणून, (हे सिद्ध होत नाही), इति न = तर हे ठीक नाही; भाक्तत्वात् = कारण की, ती श्रुति अन्यविषयक असल्याने गौण आहे.


व्याख्या - जर म्हणाल, “बृहदारण्यकाचा आर्तभाग आणि याज्ञवल्क्य यांच्या संवादात असे वर्णन आले आहे की, मरणकालात वाणी अग्निमध्ये विलीन होऊन जाते, प्राण वायुमध्ये विलीन होऊन जातो.’ इत्यादि (बृह.उ.३/२/१३) यावरून हे म्हणणे सिद्ध होत नाही की, जीवात्मा दुसर्‍या तत्त्वांसहित जातो कारण की ती सर्व तर आपापल्या कारणात येथेच विलीन होऊन जातात.” तर अशी गोष्ट नाही आहे, कारण की ही गोष्ट आर्तभागाने प्रश्नात तर सांगितली आहे पण याज्ञवल्क्यांनी उत्तरात तिचा स्वीकार केलेला नाही. उलट सभेपासून दूर नेऊन त्यास गुप्तरूपाने तीच पाच आहुतिविषयक गोष्ट समजावली असे अनुमान होत आहे. कारण की, यानंतर श्रुति म्हणते आहे की, ‘त्यांनी जे काही वर्णन केले आहे निःसंदेह ते कर्माचेच वर्णन होते. मनुष्य पुण्यकर्मांनी पुण्यशील होतो आणि पापकर्मांनी पापी होतो.’ छांदोग्यच्या प्रकरणात ही नंतर हीच गोष्ट सांगितली गेली आहे, म्हणून वर्णनात काही भेद नाही. ती श्रुति प्रश्नविषयक असल्याने गौण आहे. उत्तरातील गोष्टच योग्य आहे. उत्तर अशासाठी गुप्त ठेवले गेले की, सभेत मध्येच गर्भाधानाचे वर्णन करणे जराशी संकोचाची गोष्ट आहे, सभेत तर स्त्रिया-बालके सर्वच ऐकत असतात.




संबंध - पुन्हा विरोध उपस्थित करून त्याचे निराकरण करतात.


प्रथमेऽश्रवणादिति चेन्न ता एव ह्युपपत्तेः ॥ ३.१.५ ॥


अर्थ - चेत् = जर असे म्हणाल की, प्रथमे = प्रथम आहुतिंच्या वर्णनात; अश्रवणात् = (जलाचे नाव) ऐकण्यात आले नाही म्हणून, (शेवटी असे म्हणणे की पाचव्या आहुतित जल पुरुष नामाचा होऊन जातो, हे विरुद्ध आहे) इति न = तर अशी गोष्ट नाही आहे; हि = कारण की, उपपत्तेः = पूर्वापार संगतिने (हेच सिद्ध होत आहे की); ताः एव = (तेथे श्रद्धा नावाने त्या जलाचेच कथन आहे.)


व्याख्या - जर म्हणाल की, सर्व प्रथम श्रद्धेला हवनीय द्रव्याचे रूप दिले गेले आहे, म्हणून तिचाच परिणाम सर्व आहेत. या स्थितीत असे म्हणणे की पाचव्या आहुतित जलच पुरुष नावाचे होऊन जाते, हे विरुद्ध प्रतीत होत आहे. तर अशी गोष्ट नाही आहे, कारण की तेथे श्रद्धा नावाने संकल्पात स्थित जल आदि समस्त सूक्ष्मतत्त्वांचे ग्रहण आहे आणि अंती ही त्याला जल नावाने संबोधले आहे; म्हणून काहीही विरोध नाही. भाव हा आहे की, जीवात्म्याची गति त्याच्या अंतिम संकल्पानुसार होत असते आणि ती प्राणाच्याद्वाराच होत असते तथा श्रुतिमध्ये प्राणास जलमय म्हटले आहे, म्हणून संकल्पानुसार जो सूक्ष्म तत्त्वांचा समुदाय प्राणात स्थित होतो, त्यालाच तेथे श्रद्धा नावाने संबोधले आहे. ते कथन गतिमध्ये संकल्पांची प्रधानता दाखविण्यासाठी आहे. याप्रकारे प्रथम जी गोष्ट श्रद्धा नावाने सांगितली गेली होती, तिचेच अंतिम वाक्यात जल नावाने वर्णन केले आहे म्हणून पूर्वापरमध्ये काही विरोध नाही आहे.




संबंध - पहिल्याप्रमाणे दुसर्‍या विरोधाची उत्थापना करून तिचे निराकरण करतात.


अश्रुतत्वादिति चेन्नेष्टादिकारिणां प्रतीतेः ॥ ३.१.६ ॥


अर्थ - चेत् = जर असे म्हटले गेले की; अश्रुतत्वात् = श्रुतिमध्ये तत्वांच्या बरोबर जीवात्म्याच्या गमनाचे वर्णन नाही आहे म्हणून, (त्यांच्या सहित जीवात्मा जातो असे म्हणणे युक्तिसंगत नाही आहे.) इति न = तर असे म्हणणे ठीक नाही; इष्टादिकारिणाम् = (कारण की) त्याच प्रसंगात चांगली-वाईट कर्मे करणार्‍यांचे वर्णन आहे; प्रतीतेः = म्हणून या श्रुतिमध्ये त्या शुभाशुभकारी जीवात्म्यांच्या वर्णनाची प्रतीति स्पष्ट आहे म्हणून, (उक्त विरोध येथे नाही आहे.)


व्याख्या - जर म्हणाल की, त्या प्रकरणात जीवात्मा त्या तत्त्वांना घेऊन जातो असे सांगितलेले नाही, केवळ जलाच्या नावाने तत्त्वांचेच पुरुषरूप होणे सांगितले गेले आहे म्हणून हे सांगणे विरुद्ध आहे की, तत्त्वांनी युक्त जीवात्मा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो तर असे म्हणणे ठीक नाही; कारण की, त्याच प्रकरणात पुढे असे म्हटले आहे की, ‘जे चांगले आचरण करणारे असतात ते उत्तम योनिला प्राप्त होतात आणि नीच कर्मे करणारे असतात ते नीच योनिला प्राप्त होतात.’ (छां.उ.५/१०/७) ‘तद् य इह रमणीयचरणा अभ्याशो ह यत्ते रमणीयां योनिमापद्येरन् ब्राह्मणयोनिं वा क्षत्रिययोनिं वा वैश्ययोनिं वाथ य इह कपूयचरणा अभ्याशो ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् ।’ या वर्णनाने चांगली वाईट कर्मे करणार्‍या जीवात्म्यास त्या तत्त्वांच्या सह एका शरीरातून दुसर्‍या शरीरास प्राप्त होणे सिद्ध होत आहे म्हणून काही विरोध नाही.




संबंध - याच प्रकरणात जेथे सकामभावाने शुभ कर्मे करणार्‍यांसाठी धूम मार्गाने स्वर्गात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे तेथे असे वर्णन येते की, ‘तो स्वर्गात जाणारा पुरुष देवतांचे अन्न आहे. देवता लोक त्याला भक्षण करतात.’ (छां.उ.६/२/१६) म्हणून हे म्हणणे कसे संगत होईल की, पुण्यात्मा लोक आपल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी स्वर्गात जातात. जर ते स्वतःच देवतांचा भोग बनतात तर त्यांच्याद्वारा स्वर्गाचे भोग भोगणे जसे सिद्ध होईल ? या जिज्ञासेवर सांगतात.


भाक्तं वानात्मवित्त्वात्तथा हि दर्शयति ॥ ३.१.७ ॥


अर्थ - अनात्मवित्त्वात् = ते लोक आत्मज्ञानी नाहीत, या कारणाने (आत्मज्ञानीपेक्षा त्यांची हीनता दाखविण्यासाठी), वा = ही, भाक्तम् = त्यांना देवतांचे अन्न म्हणणारी श्रुति गौण आहे; हि = कारण की, तथा = त्याप्रकारे (त्यांचे हीनत्व आणि स्वर्गलोकात नाना प्रकारचे भोग भोगणे) ही, दर्शयति = श्रुति दाखवून देते.


व्याख्या - ते सकामभावाने शुभ कर्मे करणारे लोक आत्मज्ञानी नाहीत; म्हणून आत्मज्ञानाची स्तुति करण्यासाठी गौणरूपाने त्यांना देवतांचे अन्न आणि देवतांच्याद्वारा त्यांचे भक्षण केले जाणे सांगितले गेले आहे, वास्तवात तर श्रुति असे सांगत आहे की, ‘देवता लोक खातही नाहीत आणि पितही नाहीत; या अमृतास बघूनच तृप्त होऊन जातात. (छां.उ.३/६/१) “न ह वै देवा अश्नन्ति न पिबन्त्येतदेवामृतं दृष्टवा तृप्यन्ति ।” म्हणून या कथनाचा हा भाव आहे की, राजाच्या नोकरांप्रमाणे ते देवतांचे भोग्य अर्थात सेवक होतात. या भावाची वचने श्रुतिमध्ये दुसर्‍या ठिकाणी प्राप्त होतात. ‘जो त्या परमेश्वरास न जाणता दुसर्‍या देवतांची उपासना करतो, तो जसे येथे लोकांच्या घरात पशु असतात, तसेच देवतांचे पशु होतात.’ (बृह.उ.१/४/१०) ‘अथ योऽन्यां देवतामुपास्ते ----------- यथा पशुरेव्ँस देवानाम् ।’ आत्मज्ञानाच्या स्तुतिसाठी याप्रकारे सांगणे उचितच आहे. याशिवाय ते शुभ कर्म करणारे लोक देवतांसह आनंदाचा उपभोग करतात, याचे श्रुतिमध्ये याप्रकारे वर्णन केले गेले आहे. ‘पितृलोकावर विजय मिळविणार्‍यांपेक्षा शंभरपट आनंद कर्मांनी देवभावास प्राप्त होणार्‍यांना होत असतो.’ ‘अथ ये शतं पितृणां जितलोकानामानन्दाः ------- स एकः कर्मदेवानामानन्दो ये कर्मणा देवत्वमभिसम्पद्यन्ते ।’ (बृह.उ.४/३/३३) तसेच गीतेमध्येही याप्रकारे सांगितले गेले आहे. ‘ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥’ ‘ते तेथे विशाल स्वर्गलोकाचे भोग भोगून पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मृत्युलोकात परत येतात. याप्रकारे वेदोक्त धर्माचे आचरण करणारे ते भोगकामी ‘मानव’ आवागमनास प्राप्त होत राहातात.’ (गीता९/२१) म्हणून हे सिद्ध झाले की, त्यांना देवतांचे अन्न म्हणणे येथे गौणरूपाने आहे, वास्तविक तेथे जाऊन ते आपल्या कर्मांचीच फळे भोगतात आणि नंतर तेथून परत मृत्युलोकात येतात. म्हणून जीवात्म्याचे एका शरीरातून दुसर्‍या शरीरात सूक्ष्म तत्त्वांसहित जाणे सर्वथा सुसंगत आहे. यात कुठल्याही प्रकारचा विरोध नाही.




संबंध - उक्त प्रकरणात सांगितले गेले आहे की, ‘जोपर्यंत त्याचा कर्मांचा क्षय होत नाही, तोपर्यंत तो तेथेच रहातो, नंतर तेथून परत या लोकात येतो.’ म्हणून प्रश्न उत्पन्न होतो की, त्याची सर्व पुण्यकर्मे पूर्णतया समाप्त होऊन जातात का काही कर्मे शेष रहातात, ज्यांना बरोबर घेऊन तो परत येतो ? याचा निर्णय करण्यासाठी सांगतात.


कृतात्ययेऽनुशयवान्दृष्टस्मृतिभ्यां यथेतमनेवं च ॥ ३.१.८ ॥


अर्थ - कृतात्यये = केलेल्या पुण्यकर्माचा क्षय झाल्यावर; अनुशयवान् = शेष कर्मसंस्कारांनी युक्त (जीवात्मा); यथेतम् = जसा गेला होता त्या मार्गाने; च = अथवा, अनेवम् = याहून भिन्न कुठल्या दुसर्‍या प्रकाराने परत येतो; दृष्टस्मृतिभ्याम् = श्रुति आणि स्मृतिनी (हीच गोष्ट सिद्ध होत आहे.)


व्याख्या - त्या जीवाच्या द्वारा केलेल्या कर्मांपैकी ज्यांचे फळ भोगण्यासाठी त्याला स्वर्गलोकात धाडले गेलेले असते, त्या पुण्यकर्मांचा पूर्णतया क्षय झाल्यावर तो स्वर्गस्थ जीवात्मा अनुशयाने अर्थात शेष कर्मसंस्कारांनी युक्त होऊन ज्या मार्गाने गेला होता, त्याने अथवा दुसर्‍या कुठल्या प्रकाराने परत येतो. या प्रकरणात जी ही गोष्ट सांगितली गेली आहे, ‘तद् य इह रमणीयचरणा अभ्याशो ह यत्ते कपूयां योनिमापद्येरन् ।’ अर्थात ‘चांगले आचरण करणार्‍यांना चांगली योनि प्राप्त होते आणि वाईट आचरण करणार्‍यांना वाईट योनि प्राप्त होते.’ (छां.उ.५/१०/७) या वर्णनाने हेच सिद्ध होते तथा स्मृतित जे असे म्हटले गेले आहे की, ‘जे वर्णाश्रमी लोक आपल्या कर्मामध्ये स्थित राहाणारे आहेत; ते येथून स्वर्गलोकात जाऊन तेथे कर्मांचे फळ भोगून उरलेल्या कर्मांच्या अनुसार उत्तम जन्म, कुल, रूप आदिला प्राप्त होतात.’ (गौतमस्मृति ११/१) या स्मृतिवाक्याने ही हीच गोष्ट सिद्ध होत आहे.




संबंध - प्रकारान्तराने विरोधाची उत्थापना करून त्याचे निराकरण करतात.


चरणादिति चेन्नोपलक्षणार्थेति कार्ष्णाजिनिः ॥ ३.१.९ ॥


अर्थ - चेत् = जर असे म्हणाल की, चरणात् = चरण शब्दाचा प्रयोग आहे. म्हणून (असे म्हणणे उचित नाही आहे की तो शेष कर्मसंस्कारांना बरोबर घेऊन येतो); इति न = तर अशी गोष्ट नाही आहे, उपलक्षणार्था = कारण की ते कथन अनुशय (शेष कर्म-संस्कारांचे) उपलक्षण करण्यासाठी आहे; इति = ही गोष्ट, कार्ष्णाजिनिः = ‘कार्ष्णाजिनि’ नावाने आचार्य म्हणतात (म्हणुन काही विरोध नाही आहे.)


व्याख्या - उपर्युक्त शंकेचे उत्तर आपण स्वतः न देता आचार्य कार्ष्णाजिनिंचे मत उपस्थित करून सूत्रकार सांगतात, जर पूर्वपक्षीद्वारा असे सांगितले जाईल की, ‘येथे’ रमणीयचरणाः’ इत्यादि श्रुतिमध्ये तर चरण शब्दाचा प्रयोग आहे, जो कर्मसंस्कारांचा वाचक नाही आहे; म्हणून हे सिद्ध होत नाही की, जीवात्मा स्वर्गलोकातून परत येताना शेष कर्मसंस्कारांना बरोबर घेऊन परत येतो.’ तर हे म्हणणे ठीक नाही; कारण की तेथे जो ‘चरण’ शब्द आहे, तो अनुशयाचे उपलक्षण करण्यासाठी आहे. अर्थात हे सूचित करण्यासाठीच आहे की, जीवात्मा भुक्तशेष कर्मसंस्कारांना बरोबर घेऊन परत येतो; म्हणून काही दोष नाही आहे.




संबंध - उपर्युक्त कथनात पुन्हा शंका उपस्थित करून तिचे निराकरण करतात.


आनर्थक्यमिति चेन्न तदपेक्षत्वात् ॥ ३.१.१० ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; आनर्थक्यम् = (कुठल्याहि कारणाशिवाय उपलक्षणच्या रूपात ‘चरण’ शब्दाचा प्रयोग करणे) निरर्थक आहे; इति न = तर हे ठीक नाही, तदपेक्षत्वात् = कारण की कर्माशयात आचरण आवश्यक आहे.


व्याख्या - जर असे म्हटले गेले की, येथे ‘चरण’ शब्दाला विनाकारण कर्मसंस्कारांचे उपलक्षण मानणे निरर्थक आहे, म्हणून उपर्युक्त उत्तर ठीक नाही, तर अशी गोष्ट नाही आहे. उपर्युक्त उत्तर सर्वथा उचित आहे; कारण की, कर्मसंस्काररूप अनुशय पूर्वकृत शुभाशुभ आचरणानीच बनत असतो. म्हणून कर्माशयासाठी आचरण अपेक्षित आहे, म्हणून ‘चरण’ शब्दाचा प्रयोग निरर्थक नाही आहे.




संबंध - आता पूर्वोक्त शंकेच्या उत्तरात महर्षि बादरिंचे मत प्रस्तुत करतात.


सुकृतदुष्कृते एवेत्ति त्तु बादरिः ॥ ३.१.११ ॥


अर्थ - बादरिः तु = बादरि आचार्य तर; इति = असे मानतात की, सुकृतदुष्कृते = या प्रकरणात ‘चरण’ नावाने शुभाशुभ कर्मे; एव = च सांगितली आहेत.


व्याख्या - आचार्य श्रीबादरिंचे म्हणणे आहे की, येथे उपलक्षण मानण्याची काही आवश्यकता नाही; येथे ‘रमणीयचरण’ शब्द पुण्यकर्मांचा आणि ‘कपूयचरण’ शब्द पापकर्माचाच वाचक आहे. म्हणून असे समजले पाहिजे की, जे रमणीयचरण आहेत ते शुभ कर्माशयवाले आहेत आणि जे कपूयचरण आहेत ते पाप कर्माशयवाले आहेत. यामुळे हेच सिद्ध होत आहे की, जीवात्मा शेष कर्मसंस्कारांना बरोबर घेऊनच परत येत असतो.




संबंध - आता पूर्वपक्षी पुन्हा शंका उपस्थित करतात.


अनिष्टादिकारिणामपि च श्रुतम् ॥ ३.१.१२ ॥


अर्थ - च = परंतु, अनिष्टादिकारिणाम् = अशुभ आदि कर्मे करणार्‍यांचा, अपि = ही (चंद्रलोकात जाणे), श्रुतम् = वेदांत ऐकले गेले आहे.


व्याख्या - कौषितकी ब्राह्मणोपनिषदात म्हटले आहे की, ‘ये वैके चास्माल्लोकात् प्रयन्ति चन्द्रमसमेव ते सर्वे गच्छन्ति ।’ (१/२) अर्थात ‘जे कोणी ही या लोकातून जातात, ते सर्व चंद्रम्यासच प्राप्त होतात.’ याप्रकारे येथे कोठलेही विशेषण न देता सर्वांचे चंद्रलोकात जाणे सांगितले गेले आहे. यावरून तर वाईट कर्मे करणार्‍यांचे ही स्वर्गलोकामध्ये जाणे सिद्ध होत आहे, म्हणून श्रुतिमध्ये जे असे सांगितले गेले आहे की, इष्टापूर्त आणि दानादि शुभ कर्मे करणारे धूममार्गाने चंद्रलोकास जातात, त्याच्याशी उपर्युक्त श्रुतिचा, विरोध प्रतीत होत आहे. त्याचे निराकरण कसे होईल ?




संबंध - पूर्वसूत्रात उपस्थित केलेल्या शंकेचे उत्तर देतात.


संयमने त्वनुभूयेतरेषामारोहावरोहौ तग्द्रतिदर्शनात् ॥ ३.१.१३ ॥


अर्थ - तु = परंतु, इतरेषाम् = दुसर्‍यांचे अर्थात पापकर्मे करणार्‍यांचे; संयमने = यमलोकात; अनुभूय = पापकर्मांचे फळ भोगल्यानंतर, आरोहावरोहौ = चढणे, उतरणे होते; तग्द्रतिदर्शनात् = कारण की, त्यांची गती श्रुतित याप्रकारे दिसून येते.


व्याख्या - तेथे पापी लोकांचे चंद्रलोकात जाणे सांगितलेले नाही कारण की, पुण्यकर्मांचे फळ भोगण्यासाठीच स्वर्गलोकात जाणे होत असते; चंद्रलोकात वाईट कर्मांचे फळ भोगण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून हेच समजले पाहिजे की, चांगली कर्मे करणारेच चंद्रलोकात जातात. त्याहून भिन्न जे पापी लोक आहेत ते आपल्या पापकर्मांचे फल भोगण्यासाठी यमलोकात जातात. तेथे पापकर्मांचे फळ भोगल्यानंतर त्यांचे पुन्हा कर्मानुसार गमनागमन म्हणजे नरकातून मृत्युलोकात येणे आणि पुन्हा नव्या कर्मानुसार स्वर्गात जाणे अथवा नरकादि अधोगतीस प्राप्त होणे असे होत असते. त्या लोकांच्या गतिचे असेच वर्णन श्रुतिमध्ये आढळून येते. कठोपनिषदात स्वतः यमराजाने म्हटले आहे की, ‘न साम्परायः प्रतिभाति बालं प्रमाद्यन्तं वित्तमोहेन मूढम् । अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वशमापद्यते मे ॥’ ‘संपत्तीच्या अभिमानाने मोहित झालेले निरंतर प्रमाद करणार्‍या अज्ञानी लोकांना परलोक दिसत नाही. ते समजतात की हा प्रत्यक्ष दिसणारा लोकच सत्य आहे, दुसरा कुठलाहि लोक नाही. याप्रकारे मानणारे लोक वारंवार माझ्या अधीन होतात.’ (कठ.१/२/६) यावरून हेच सिद्ध होत आहे की, शुभ कर्म करणाराच पितृयानमार्गाने अथवा अन्य मार्गाने स्वर्गलोकात जातो, पापी लोक यमलोकात जातात. कौषितकी ब्राह्मणात ज्यांच्या चंद्रलोकात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे; ते सर्व पुण्यकर्मे करणारेच होते; कारण की, श्रुतिमध्ये चंद्रलोकाहून परत येणार्‍यास कर्मानुसार गति सांगितली गेली आहे. म्हणून दोन्ही श्रुतिंच्या मध्ये काहीही विरोध नाही आहे.




हेच परत श्रुतिप्रमाणाने सिद्ध करतात -

स्मरन्ति च ॥ ३.१.१४ ॥

च = तथा; स्मरन्ति = स्मृतिमध्येही याचे समर्थन केले गेले आहे.

भगवद्‌गीतेच्या सोळाव्या अध्यायातील ७ ते १५ या श्लोकांमध्ये आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे विस्तृत वर्णन करून शेवटी म्हटले आहे - विचित्र विचारांनी भ्रान्त झाल्यामुळे मोहाच्या तडाख्यात सापडून विषयभोगांत गुंतलेले मूढ लोक कुंभीपाक इत्यादि नरकात जातात. यावरूब पापाचरणाने नरकात जावे लागते हेच सिद्ध होते.



संबंध - प्रकारांतराने पुढे म्हणतात -


अपि च सप्त ॥ ३.१.१५ ॥


अर्थ - अपि च = याशिवाय; सप्त = पापकर्मांचे फळ भोगण्यासाठी प्रधानतः सात नरकाचे ही वर्णन आले आहे.


व्याख्या - याशिवाय, पापकर्मांचे फळ भोगण्यासाठी पुराणामध्ये प्रधानतेने रौरव आदि नरकांचेहि वर्णन केले गेले आहे. यावरून त्या पापकर्मी लोकांच्या स्वर्गगमनाची तर संभावनाहि केली जाऊ शकत नाही.




संबंध - नरकात तर चित्रगुप्त आदि दुसरे अधिकारी सांगितले गेले आहेत, मग नंतर कसे म्हटले आहे की, पापी लोक यमराजाच्या अधिकारात दंड भोगत आहेत ? यावर सांगतात.


तत्रापि च तद्‌व्यापारादविरोधः ॥ ३.१.१६ ॥


अर्थ - च = तथा, तत्र = त्या यातनांच्या स्थानी; अपि =ही, तद्‌व्यापारात् = त्या यमराजाच्या आज्ञेनुसार कार्य होत असल्याने, अविरोधः = कुठल्याहि प्रकारचा विरोध नाही.


व्याख्या - यातना भोगण्यासाठी जे रौरव आदि सात नरक सांगितले गेले आहेत आणि तेथे जे चित्रगुप्त आदि दुसरे अधिकारी आहेत, ते ही यमराजाच्या आज्ञेनुसार कार्य करतात, म्हणून त्यांनी केलेले कार्यहि यमराजाचेच कार्य आहे, यात काही विरोध नाही.




संबंध - असे मानल्यावर ही पूर्वोक्त श्रुतित जी सर्वांच्या चंद्रलोकात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे तिची संगति (कौ.१/२) कशी होईल ? यावर सांगतात.


विद्याकर्मणोरिति तु प्रकृतत्वात् ॥ ३.१.१७ ॥


अर्थ - विद्याकर्मणोः = ज्ञान आणि शुभ कर्म या दोन्हीचे, तु = ही; प्रकृतत्वात् = प्रकरण असल्यामुळे, इति = असे कथन उचितच आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे छान्दोग्योपनिषदात (५/१०/१) विद्या आणि शुभ कर्मांचे फल सांगण्याचा प्रसंग आरंभ करून देवयान आणि पितृयान मार्गाची गोष्ट सांगितली गेली आहे, त्याचप्रकारे तेथे कौषितकी उपनिषदात ही ज्ञान आणि शुभ कर्मांचे फल सांगण्याच्या प्रकरणातच उक्त कथन आहे. म्हणून असे समजले पाहिजे की, जे शुभ कर्म करणारे अधिकारी मानव या लोकातून जातात ते सर्वच्या सर्व चंद्रलोकास जातात, अनिष्ट कर्मे करणारे नाही. कारण की त्यांचे प्रकरण नाही आहे.




संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, कठोपनिषदात जी पापी लोकासाठी यमलोकात जाण्याची गोष्ट सांगितली गेली आहे ती छान्दोग्यश्रुतिमध्ये सांगितली गेली आहे. त्या तिसर्‍या गतिच्या अंतर्गत आहे अथवा तिच्याहून भिन्न ? याच्या उत्तरात सांगतात.


न तृतीये तथोपलब्धेः ॥ ३.१.१८ ॥


अर्थ - तृतीये = तेथे सांगितलेल्या तिसर्‍या गतिमध्ये; न = (यमलोकगमनरूप गतिचा) अंतर्भाव होत नाही, तथा उपलब्धेः = कारण की, त्या वर्णनात अशीच गोष्ट प्राप्त होत आहे.


व्याख्या - तेथे छान्दोग्योपनिषद (५/१०/८) मध्ये असे सांगितले गेले आहे की, ‘अथैतयोः पथोर्न कतरेण च तानीमानि क्षुद्राण्यसकृदावर्तीनि भूतानि भवन्ति जायस्व म्रियस्वेत्येतत्तृतीयं स्थानम् ।’ अर्थात ‘देवयान आणि पितृयान - या दोन्ही मार्गापैकी कुठल्याहि मार्गाने जे वरच्या लोकात जात नाहीत, ते क्षुद्र तसेच वारंवार जन्मणारे-मरणारे प्राणी होतात;’ ‘उत्पन्न व्हा आणि मरा’ असा मृत्युलोकच त्यांचे तिसरे स्थान आहे, इत्यादि. या वर्णनात असे आढळून येते की, त्यांचे कुठल्याहि परलोकात गमन होत नाही, ते या मृत्युलोकातच जन्मत-मरत रहातात. म्हणून या तिसर्‍या गतीमध्ये यमयातनारूप नरकलोकाच्या गतिचा अंतर्भाव नाही.




संबंध - या तीन गतिंच्या शिवाय चौथी गति जिच्यामध्ये नरकयातना आदिचा भोग आहे, तसेच जी वर सांगितलेल्या तिसर्‍या गतिपेक्षाहि अधम गति आहे, तिचे वर्णन कोठे येते ? यावर सांगतात.


स्मर्यतेऽपि च लोके ॥ ३.१.१९ ॥


अर्थ - स्मर्यते = स्मृतिमध्ये याचे समर्थन केले गेले आहे, च = तथा; लोके = लोकात, अपि = ही (ही गोष्ट प्रसिद्ध आहे.)


व्याख्या - श्रीमद् भगवद्‌गीता (१४/१८) मध्ये सांगितले आहे की - “ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः ॥” “सत्त्वगुणात स्थित राहून मरणारे लोक वरील लोकात जातात. (देवयान आणि पितृयान - दोन्ही मार्ग याच्या अंतर्गत आहेत.) राजसी लोक मध्ये अर्थात या मनुष्यलोकातच जन्मत-मरत राहतात. (हे छान्दोग्यमध्ये दिलेल्या तिसर्‍या गतिच्या अंतर्गत आहे.) निंदनीय तमोगुणाच्या वृत्तिमध्ये स्थित तामसी जीव नीच लोकात जातात.” (याच्या अंतर्गत उक्त तिसर्‍या गतिहून अधम अशी यमयातनारूप गति ही आहे.) याचे स्पष्टीकरण गीता अध्याय १६ श्लोक २० मध्ये केले गेले आहे. याप्रकारे या यमयातनारूप अधोगतीचे वर्णन स्मृतिमध्ये आढळून येते तसेच लोकात ही हे प्रसिद्ध आहे. पुराणांतून तर याचे वर्णन खूप विस्ताराने केले आहे. यास अधोगति म्हणतात, म्हणून तेथून जे नारकी जीवांचे पुन्हा मृत्युलोकात येणे आहे ते त्याच्या पूर्व कथनानुसार वर जाणे (उन्नति करणे आहे आणि पुन्हा नरकात जाणे अवनति (पतन)च आहे.)




संबंध - आता दुसरे प्रमाण देऊन हीच गोष्ट सिद्ध करतात.


दर्शनाच्च ॥ ३.१.२० ॥


अर्थ - दर्शनात् = श्रुतिमध्ये ही असे वर्णन आढळून येते म्हणून; च = ही (हे मानणे ठीक आहे की या प्रकरणात सांगितल्या गेलेल्या तिसर्‍या गतित यमयातनांचा अंतर्भाव नाही आहे.)


व्याख्या - ईशावास्योपनिषदात म्हटले आहे - ‘असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः ॥’ (ईशा.३) ‘जे असुरांचे प्रसिद्ध लोक आहेत, ते सर्वच्या सर्व अज्ञान तसेच दुःख-क्लेशरूप महान अंधकाराने आच्छादित आहेत, जे कोणी ही आत्महत्या करणारे लोक आहेत, ते मेल्यानंतर त्याच भयंकर लोकांना वारंवार प्राप्त होतात.’ याप्रकारे उपनिषदातहि त्या नरकादि लोकांची प्राप्तीरूप गतिचे वर्णन आढळून येते. म्हणूनहि हेच सिद्ध होत आहे की, या प्रसंगात सांगितलेल्या तिसर्‍या गतित यमयातनावाल्या गतिचा अंतर्भाव नाही आहे.




संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, छान्दोग्योपनिषदात जीवांच्या तीन श्रेणी दाखविल्या गेल्या आहेत - अण्डज, अण्डापासून उत्पन्न होणारे - जीवज - (गर्भाशयापासून) उत्पन्न होणारे, आणि उद्भिज - (पृथ्वीतून उत्पन्न होणारे) (छां.उ.६/३/१); परंतु दुसर्‍या ठिकाणी जीवांचे चार भेद ऐकण्यात येतात. येथे चौथी स्वेदज अर्थात घामापासून उत्पन्न होणार्‍या श्रेणीला का सोडले गेले आहे ? यावर सांगतात.


तृतीयशब्दावरोधः संशोकजस्य ॥ ३.१.२१ ॥


अर्थ - संशोकजस्य = घामापासून उत्पन्न होणार्‍या जीवसमुदायाचा, तृतीयशब्दावरोधः = तिसर्‍या नामाच्या उद्भिज जातीत संग्रह (जाणून घेतला पाहिजे.)


व्याख्या - या प्रकरणात जे घामापासून उत्पन्न होणार्‍या स्वेदज जीवांचे वर्णन आलेले नाही. त्याचा श्रुतिमध्ये तिसर्‍या नावाने सांगितल्या गेलेल्या उद्भिज जातीत अंतर्भाव समजावयास हवा. कारण की दोन्ही पृथ्वी आणि जलाच्या संयोगाने उत्पन्न होतात.




संबंध - आता स्वर्गलोकातून परत येणार्‍यांच्या गतिवर विचार करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. छान्दोग्योपनिषद (५/१०/५,६) मध्ये सांगितले गेले आहे की, स्वर्गातून परत येणारे जीव प्रथम आकाशास प्राप्त होतात, आकाशापासून वायु, धूम, मेघ आदिच्या क्रमाने उत्पन्न होतात. येथे ही जिज्ञासा होते की, जीव त्या त्या आकाशादिच्या रूपात स्वयं परिणत होतात की त्यांच्या समान होऊन जातात ? यावर सांगतात.


तत्साभाव्यापत्तिरूपपत्तेः ॥ ३.१.२२ ॥


अर्थ - तत्साभाव्यापत्तिः = त्यांच्या सदृश भावाची प्राप्ती होत असते; उपपत्तेः = कारण की, हीच गोष्ट युक्तिने सिद्ध होते.


व्याख्या - येथे जी आकाश, वायु आदि बनून परत येण्याची गोष्ट सांगितली गेली आहे, या कथनाने जीवात्म्याचे त्या त्या तत्त्वांच्या रूपात परिणत होणे युक्तिसंगत नाही आहे; कारण की, आकाश आदि तर प्रथमपासूनच विद्यमान आहेत आणि जीवात्मा जेव्हा एकानंतर दुसर्‍या भावास प्राप्त होतो त्यानंतर ही ते आकाशादि पदार्थ रहातातच. म्हणून हेच मानणे युक्तिसंगत आहे की, ते त्या आकाश आदिच्या सदृश आकाराचे बनून परत येतात. त्यांचे आकाशाप्रमाणे सूक्ष्म होणेच आकाशास प्राप्त होणे आहे. याप्रकारे वायु आदिच्या विषयातहि समजून घेतले पाहिजे.




संबंध - आता ही जिज्ञासा होते की, ते जीव त्या त्या तत्त्वांच्या आकारात बरेच दिवसपर्यंत टिकून राहतात की, तत्कालच क्रमाने खाली उतरत जातात, यावर सांगतात.


नातिचिरेण विशेषात् ॥ ३.१.२३ ॥


अर्थ - विशेषात् = वर गमन करण्यापेक्षा खाली उतरण्याच्या परिस्थीतीत भेद असल्यामुळे; नातिचिरेण = जीव त्या आकाश, वायु आदिच्या रूपात अधिक कालपर्यंत न रहाता क्रमशः खाली उतरून येतात.


व्याख्या - वरील लोकात जाण्याचे जे वर्णन आहे, ते कर्मांच्या फलभोगाशी संबंधित असते, म्हणून मध्ये आलेल्या पितृलोक आदिमध्ये विलंब होणे ही संभव आहे; परंतु परत येते समयी कर्मभोग तर समाप्त होऊन जातात म्हणून मध्ये कोठे विलंब होण्याचे काही कारण रहात नाही. याप्रकारे वरील लोकात जाणे आणि तेथून परत येण्याच्या गतीत विशेषता असल्यामुळे हेच सिद्ध होत आहे की, परत येताना रस्त्यात विलंब होत नाही.




संबंध - आता ही जिज्ञासा होत आहे की, परलोकातून परत येणार्‍या जीवात्म्याचे जे धान्य, जव, तीळ आणि उडीद आदिच्या रूपात (उत्पन्न) होणे सांगितले गेले आहे, त्यात काय भाव आहे ? काय तो स्वतः तसा बनून जातो अथवा त्या योनीला भोगणारा जीवात्मा कोणी दुसरा असतो ज्याच्या बरोबर हा ही रहातो ? यावर सांगतात.


अन्याधिष्ठितेषु पूर्ववदभिलापात् ॥ ३.१.२४ ॥


अर्थ - पूर्ववत् = पहिल्याप्रमाणेच, अभिलापात् = असे कथन आहे म्हणून; अन्याधिष्ठितेषु = दुसरा जीवात्मा आपल्या कर्मफलभोगासाठी ज्यात स्थित होऊन राहिला असेल, असे धान्य, जव आदिमध्ये केवळ सन्निधिमात्राने याचा निवास आहे.


व्याख्या - ज्याप्रकारे पूर्वसूत्रात असे सांगितले गेले आहे की, तो परत येणारा जीवात्मा आकाश आदि बनत नाही; त्यांच्या सदृश होऊनच त्यांच्याशी संयुक्त होतो त्याचप्रकारे येथे धान्य आदिच्या विषयांतहि समजायला हवे, कारण की हे कथन ही पहिल्याच्या सदृशच आहे. म्हणून हेच सिद्ध होत आहे की, त्या धान्य, जव आदिमध्ये आपल्या कर्मांचे फळ भोगण्यासाठी जे दुसरे जीव पहिल्यापासून स्थित आहेत, ते रहात असताच हा चंद्रलोकाहून परतणारा जीवात्मा त्यांच्याबरोबर पुरुषाच्या उदरात निघून जातो. धान्य, जव आदि स्थावर योनिंना प्राप्त होत नाही.




संबंध - यावर शंका उपस्थित करून ग्रंथकार तिचे निराकरण करतात.


अशुद्धमिति चेन्न शब्दात् ॥ ३.१.२५ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल की; अशुद्धम् = हे तर अशुद्ध (पाप) कर्म होईल; इति न = तर अशी गोष्ट नाही आहे; शब्दात् = श्रुतिच्या वचनानी याची निर्दोषता सिद्ध होत आहे.


व्याख्या - जर अशी शंका आली की, ‘धान्याच्या प्रत्येक दाण्यात जीव राहतो; या मान्यतेनुसार (अन्नाला) धान्याला दळणे, शिजवणे, आणि खाणे तर मोठे अशुद्ध (पाप) कर्म होईल.’ कारण की, त्यात तर अनेक जीवांची हिंसा केल्यानंतर एका जीवाची उदरपूर्ति होईल’ तर अशी गोष्ट नाही आहे; कारण की, या प्रकरणात पुरुषाला ‘अग्नि’ म्हणून त्यात अन्नाचे हवन करणे सांगितले गेले आहे; तसेच श्रुतिमध्ये ठिकठिकाणी अन्न खाल्ले गेल्याचे वर्णन आहे. (छां.उ.६/६/२) म्हणून श्रुतिचे विधान असल्याने त्यात हिंसा होत नाही तसेच त्या जीवांची त्या काळी सुषुप्ति-अवस्था रहात असते. ज्यावेळी ते पृथ्वी आणि जलाच्या संबंधाने अंकुरित होते तेव्हा त्यात चेतना येते आणि सुख-दुःखाचे ज्ञान होते, त्यापूर्वी नाही. म्हणून अन्नभक्षणात हिंसा नाही आहे.




संबंध - अन्नाशी संयुक्त झाल्यानंतर तो कशाप्रकारे कर्मफल भोगासाठी शरीर धारण करतो त्याचा क्रम सांगतात.


रेतः सिग्योगोऽथ ॥ ३.१.२६ ॥


अर्थ - अथ = त्यानंतर; रेतःसिग्योगः = वीर्याचे सिंचन करणार्‍या पुरुषाबरोबर त्याचा संबंध होतो.


व्याख्या - त्यानंतर तो जीवात्मा अन्नाबरोबर पुरुषाच्या पोटात जाऊन त्याच्या वीर्यात प्रविष्ट होऊन त्या पुरुषाशी संयुक्त होतो, या कथनाने हे स्पष्ट होत आहे की, आकाशापासून अन्नापर्यंत सर्व ठिकाणी संयोगानेच त्याचे तदाकार होणे सांगितले आहे. स्वरूपाने नाही.




संबंध - त्यानंतर -


योनेः शरीरम् ॥ ३.१.२७ ॥


अर्थ - योनेः = स्त्रीच्या योनित प्रविष्ट झाल्यानंतर; शरीरम् = तो जीवात्मा कर्मफलभोगास अनुरूप शरीरास प्राप्त होतो.


व्याख्या - याप्रकारे तो स्वर्गातून येणारा जीवात्मा प्रथम पुरुषाच्या वीर्याचा आश्रित होतो. नंतर त्या पुरुषाच्या द्वारा गर्भाधानाच्या वेळी स्त्रीच्या योनित वीर्याबरोबर प्रविष्ट केला जातो. तेथे गर्भाशयाशी संबंध येऊन उक्त जीव आपल्या कर्मफलांस अनुसरून अनुरूप शरीरास प्राप्त होतो. येथून त्याच्या कर्मांच्या फळाचा भोग होण्यास आरंभ होतो. याच्यापूर्वी स्वर्गातून उतरून वीर्यात प्रविष्ट होण्यापर्यंत त्याचा कुठलाहि जन्म अथवा शरीर धारण करणे नाही आहे, केवळ त्या त्या आकाश आदिच्या आश्रित रहाणे मात्र सांगितले गेले आहे; त्या धान्य आदि शरीरांचे अधिष्ठाता जीव दुसरेच आहेत.




येथे तिसर्‍या अध्यायातील पहिला पाद पूर्ण झाला.

GO TOP