|
ब्रह्मसूत्रअध्याय दुसरापाद चवथासंबंध - यापूर्वी तिसर्या पादात पाच भूते तसेच अंतःकरणाच्या उत्पत्तिचे प्रतिपादन केले गेले आणि गौण रूपाने जीवात्म्याची उत्पत्ति ही सांगितली गेली. त्याचबरोबर प्रसंगवशात् जीवात्म्याच्या स्वरूपाचेही विवेचन केले गेले आहे. परंतु तेथे इंद्रियांची आणि प्राणाची उत्पत्ति यांचे प्रतिपादन झालेले नाही, म्हणून त्यांच्या उत्पत्तिचे विचारपूर्वक प्रतिपादन करण्यासाठी तथा तद्विषयक श्रुतिंमध्ये प्रतीत होणार्या विरोधाचे निराकरण करण्यासाठी चौथ्या पादाचा आरंभ केला जात आहे. श्रुतिमध्ये कोठे तर प्राण आणि इंद्रियांची उत्पत्ति स्पष्ट शब्दात परमेश्वरापासून सांगितली गेली आहे. (मु.उ.२/१/३, प्र.उ.६/४) कोठे अग्नि, जल आणि पृथ्वीपासून त्यांचे उत्पन्न होणे सांगितले गेले आहे. (छां.उ.६/६/२ पासून५) तसेच कोठे आकाश आदिच्या क्रमाने जगताच्या उत्पत्तिचे वर्णन आहे, तेथे या प्राण आणि इंद्रिये आदिचे नामसुद्धा आलेले नाही. (तै.उ.२/१) आणि कोठे तत्त्वांच्या उत्पत्तिच्या आधीच त्यांचे होणे मानले गेले आहे. (शतपथ ब्रा.६/१/१/१) याने यांच्या उत्पत्तिचा निषेध प्रतीत होत आहे. म्हणून श्रुतिवाक्यात प्रतीत होणार्या विरोधाचे निराकरण करीत सूत्रकार म्हणतात. तथा प्राणाः ॥ २.४.१ ॥ अर्थ - तथा = याप्रकारे, प्राणाः = प्राण शब्दवाच्य इंद्रियेही (परमेश्वरापासूनच उत्पन्न होतात) व्याख्या - ज्याप्रकारे आकाशादि पाच तत्त्वे तथा अन्य सर्व परब्रह्म परमेश्वरापासून उत्पन्न होतात, त्याचप्रकारे समस्त इंद्रिये ही त्याच परमेश्वरापासून उत्पन्न होतात, कारण की, त्या आकाश आदिची आणि इंद्रियांच्या उत्पत्तिमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. श्रुति स्पष्ट सांगतात की, ‘या परब्रह्म परमेश्वरापासूनच प्राण, मन, समस्त इंद्रिये, आकाश, वायु, ज्योति, जल आणि सर्वांना धारण करणारी पृथ्वी उत्पन्न होते. (मु.उ.२/१/३) याप्रकारे इंद्रियांच्या उत्पत्तिचे श्रुतित वर्णन असल्याने हेच सिद्ध होते की, इंद्रियेही त्या परमेश्वरापासूनच उत्पन्न होतात. संबंध - जेथे पहिल्याने तेज, जल आणि पृथ्वीची उत्पत्ति सांगून जगताच्या उत्पत्तिचे वर्णन केले आहे. तेथे स्पष्ट म्हटले आहे की ‘वाणी तेजोमयी आहे अर्थात वाक इन्द्रिय तेजापासून उत्पन्न झाले आहे म्हणून तेजाने ओतप्रोत आहे’ यावरुन तर पंचमहाभूतापासूनच इन्द्रियांची उत्पत्ति होणे सिद्ध होत आहे जसे की दुसर्या मताचे लोक मानतात. या परिस्थितीमध्ये दोन्ही श्रुतिंमध्ये एकता कशी होईल या जिज्ञासेवर सांगतात- गौण्यसम्भवात् ॥ २.४.२ ॥ अर्थ - असम्भवात् = सम्भव नसल्यामुळे ती श्रुति; गौणी = गौणी आहे अर्थात् तिचे कथन गौणरुपाचे आहे. व्याख्या - त्या श्रुतीत सांगितले गेले आहे की ‘भक्षण केले गेलेल्या तेजाचा जो सूक्ष्म अंश आहे, ते एकत्र होऊन वाणी बनते’ (छां.उ.६/६/४) यावरून हे सिद्ध होते आहे की तैजस पदार्थाचा सूक्ष्म अंश वाणीला बलवान बनवतो; कारण की श्रुतीने खाल्लेल्या तैजस पदार्थांच्या सूक्ष्मांशाचाच असा परिणाम सांगितला आहे म्हणून ज्याच्या द्वारा तो खाल्ला जातो त्या इन्द्रियाचे तैजस तत्त्वाच्या आधीच उत्पन्न होणे सिद्ध होत आहे. याचप्रकारे तेथे खाल्लेल्या अन्नाने मनाची आणि प्यायलेल्या जलाने प्राणांची उत्पत्ति सांगितली गेली आहे; परंतु प्राणांच्या शिवाय जल पिणेच सिद्ध होणार नाही. मग त्याच्यापासून प्राणांची उत्पत्ति कशी सिद्ध होईल? म्हणून जसे प्राणांचे उपकारी असल्याने जलाला गौण रुपाने प्राणांच्या उत्पत्तिचा हेतु म्हटले गेले आहे तसेच वाक्-इन्द्रियाचे उपकारी असल्याने तैजस पदार्थांना वाक्-इन्द्रियाच्या उत्पत्तिचा हेतु गौणरुपाने म्हटले गेले आहे. म्हणून ती श्रुति गौणी आहे अर्थात तिच्या द्वारा तेज आदि तत्त्वांपासून वाक् आदि इन्द्रियांच्या उत्पत्तिचे कथन गौण आहे हे मानणे ठीक आहे आणि असे मानल्यावर श्रुतिंच्या वर्णनात काही विरोध राहात नाही. संबंध - प्रकारान्तराने त्या श्रुतिचे गौणत्व सिद्ध करतात- ततप्रक्छ्रुतेश्च ॥ २.४.३ ॥ अर्थ - तत्प्राक्छ्रुतेः = श्रुतिंच्या द्वारा त्या आकाशादि तत्त्वांच्या आधी इंद्रियांची उत्पत्ति सांगितली गेली आहे; म्हणून, च = ही (तेज आदिपासून वाक् आदि इंद्रियांची उत्पत्ति सांगणारी श्रुति गौण आहे.) व्याख्या - शतपथ ब्राह्मणात ऋषिंच्या नामाने इंद्रियांच्या पाच तत्त्वांची उत्पत्ति पहिल्याने झाल्याचे सांगितले गेले आहे. (६/१/१/१) तसेच मुण्डकोपनिषदातही इंद्रियांची उत्पत्ति पाच भूतांच्या पूर्वी सांगितली गेली आहे. यावरूनहि हेच सिद्ध होते की, आकाशादि तत्त्वांपासून इंद्रियांची उत्पत्ति झालेली नाही, म्हणून तेज आदि तत्त्वांपासून वाक् आदिंची उत्पत्ति सूचित करणारी ती श्रुति गौण आहे. संबंध - आता दुसरी युक्ति देऊन उक्त गोष्टीची पुष्टि करतात. तत्पूर्वकत्वाद्वाचः ॥ २.४.४ ॥ अर्थ - वाचः = वाणीच्या उत्पत्तिचे वर्णन; तत्पूर्वकत्वात् = तीन्ही तत्त्वात ते ब्रह्म प्रविष्ट झाल्यानंतर (म्हणून तेजापासून त्याची उत्पत्ति सूचित करणारी श्रुति गौण आहे.) व्याख्या - या प्रकरणात असे सांगितले गेले आहे की, ‘त्या तीन तत्त्वरूप देवतांमध्ये जीवात्म्यासहित प्रविष्ट होऊन त्या ब्रह्माने नामरूपात्मक जगताची रचना केली.’ (छां.उ.६/३/३) याप्रकारे तेथे जगताची उत्पत्ति ब्रह्माच्या प्रवेशपूर्वक सांगितली गेली आहे. म्हणून ही हेच सिद्ध होते आहे की, समस्त इंद्रियांची उत्पत्ति ब्रह्मापासून झाली आहे, तेज आदि तत्त्वांपासून नाही. म्हणून तेज तत्त्वापासून वाणीची उत्पत्ति सूचित करणार्या या श्रुतिचे कथन गौण आहे. संबंध - याप्रकारे इंद्रियांची उत्पत्तिही त्या ब्रह्मापासूनच होत असते आणि ती पाच तत्त्वांच्या आधीच होत असते; हे सिद्ध केले गेले आहे. आता जे काही ठिकाणी प्राणांच्या नामाने सात इंद्रियांच्या उत्पत्तिचे वर्णन केले गेले आहे. (मु.उ.२/१/८) तथा कोठे मनासहित अकरा इंद्रियांचे वर्णन आहे. (बृह.उ.३/९/४) यापैकी कुठले वर्णन योग्य आहे त्याचा निर्णय करण्यासाठी पूर्वपक्षाची उत्थापना करीत प्रकरणाचा आरंभ करतात. सप्तगतेर्विशेषितत्वाच्च ॥ २.४.५ ॥ अर्थ - सप्त = इंद्रिये सात आहेत; गतेः = कारण की सातच ज्ञात होतात, च = तथा; विशेषितत्वात् = ‘सप्त प्राणाः’ म्हणून श्रुतिनी सप्तपदाचा प्राणां(इंद्रियां)साठी विशेषण रूपाने प्रयोग केला आहे. व्याख्या - पूर्वपक्षाचे कथन आहे की, मुख्यतः सात इंद्रियेही ज्ञात होतात आणि श्रुतिने ‘ज्यात सात प्राण अर्थात डोळे, कान, नाक, रसना, त्वचा, वाक् आणि मन ही सात इंद्रिये विचरतात, ते लोक सात आहेत. (मु.उ.२/१/८) असे म्हणून इंद्रियांचे ‘सात’ हे विशेषण दिले आहे. “सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात्सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः । सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहताः सप्त सप्त ॥” यावरून हेच सिद्ध होत आहे की इंद्रिये सातच आहेत. संबंध - आता सिद्धांतीच्या बाजूने उत्तर दिले जात आहे. हस्तादयस्तु स्थितेऽतो नैवम् ॥ २.४.६ ॥ अर्थ - तु = परंतु, हस्तादयः = हात आदि अन्य इंद्रिये ही आहेत; अतः = म्हणून, स्थिते = या स्थितीत, एवम् = असे, न = नाही (सांगितले पाहिजे की इंद्रिये सातच आहेत.) व्याख्या - हात आदि (हात, पाय, उपस्थ आणि गुदा) अन्य चार इंद्रियांचे वर्णन ही पूर्वोक्त सात इंद्रियांच्या बरोबरच दुसर्या श्रुतिमध्ये स्पष्ट येते. (प्र.उ.४/८) तसेच प्रत्येक मनुष्याच्या कार्यात करणरूपाने हस्त आदि चारी इंद्रियांचा प्रयोग प्रत्यक्ष उपलब्ध आहे, म्हणून असे म्हणणे शक्य नाही की इंद्रिये सातच आहेत. म्हणून जेथे दुसर्या कुठल्या तरी उद्देशाने केवळ सातांचे वर्णन असेल तेथेही या चारांनाहि अधिक समजले पाहिजे. गीतेमध्ये ही मनासहित अकरा इंद्रिये सांगितली गेली आहेत. (गीता१३/५) तथा बृहदारण्यक श्रुतिमध्ये ही दहा इंद्रिये आणि एक मन या अकराचे वर्णन स्पष्ट शब्दात केले गेले आहे. (३/९/४) म्हणून इंद्रिये सात नाहीत अकरा आहेत हे मानले पाहिजे. “दशेमे पुरुषे प्राणा आत्मैकादशः ।” संबंध - याप्रकारे प्रसंगवश प्राप्त झालेल्या शंकेचे निराकरण करीत मनासहित इंद्रियांची संख्या अकरा सिद्ध करून पुन्हा तत्त्वांच्या उत्पत्तिचे वर्णन करतात. अणवश्च ॥ २.४.७ ॥ अर्थ - च = तथा, अणवः = सुक्ष्मभूत म्हणजे तन्मात्रा ही त्या परमेश्वरापासूनच उत्पन्न होतात. व्याख्या - ज्याप्रकारे इंद्रियांची उत्पत्ति परमेश्वरापसून होते, त्याचप्रकारे पाच महाभूतांची जी सूक्ष्मरूपे आहेत, ज्यास दुसर्या दर्शनकारांनी परमाणुच्या नामाने संबोधले आहे तथा उपनिषदामध्ये मात्रा नावाने ज्यांचे वर्णन आहे (प्र.उ.४/८) त्याही परमेश्वरापासून उत्पन्न होतात. कारण की, तेथे त्यांची स्थिती त्या परमेश्वराच्या आश्रितच सांगितले गेल्या आहेत. काही महानुभावांचे म्हणणे आहे की, हे सूत्र इंद्रियांचे अणु-परिमाण सिद्ध करण्यासाठी सांगितले गेले आहे; परंतु प्रसंगाने हे योग्य वाटत नाही. त्वक् इंद्रियाला अणु म्हणता येणे शक्य नाही. कारण की, ते शरीराच्या कुठल्या एका देशात सूक्ष्मरूपाने स्थित नसून समस्त शरीरास आच्छादित करून राहते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना आहे. म्हणून विद्वान पुरुषांनी यावर विचार केला पाहिजे. इंद्रियांना अणु म्हणणार्या व्याख्याकारांनी या विषयी श्रुति आणि स्मृतींचे कुठलेहि प्रमाणही उद्धृत केलेले नाही. संबंध - अजून ... श्रेष्ठश्च ॥ २.४.८ ॥ अर्थ - श्रेष्ठः = मुख्य प्राण, च = ही (त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न होतो.) व्याख्या - ज्याला प्राण नावाने सांगितल्या गेलेल्या इंद्रियापेक्षा श्रेष्ठ सिद्ध केले गेले आहे, (प्र.उ.२/३,४, छां.उ.५/१/७) ज्याचे प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान या पाच नावांनी वर्णन केले गेले आहे, तो मुख्य प्राण ही इंद्रिये आदिंच्याप्रमाणे त्या परमेश्वरापासूनच उत्पन्न होतो. श्रुति ही याचे समर्थन करते. (मु.उ.२/१/३) संबंध - आता प्राणाच्या स्वरूपाचे निर्धारण करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात. न वायुक्रिये पृथगुपदेशात् ॥ २.४.९ ॥ अर्थ - वायुक्रिये = (श्रुतित वर्णित मुख्य प्राण) वायु-तत्त्व आणि त्याची क्रिया; न = नाही आहे, पृथगुपदेशात् = कारण की, त्या दोन्हीहून अलग याचे वर्णन आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये जेथे प्राणाच्या उत्पत्तिचे वर्णन आले आहे, (मु.उ.२/१/३) तेथे वायुच्या उत्पत्तिचे वर्णन अलग आहे. म्हणून श्रुतिमध्ये वर्णित मुख्य प्राण वायुतत्त्व ही नाही आणि वायुच्या क्रियेचे नावही मुख्य प्राण नाही, तो या दोन्हीहून भिन्न पदार्थ आहे हेच सिद्ध होत आहे. संबंध - येथे ही जिज्ञासा होत आहे की, प्राण आदि वायुतत्त्व नाहीत तर मग काय जीवात्म्याच्या प्रमाणे स्वतंत्र पदार्थ आहेत ? यावर सांगतात. चक्षुरादिवत्तु तत् सहशिष्ट्यादिभ्यः ॥ २.४.१० ॥ अर्थ - तु = परंतु, (प्राण ही); चक्षुरादिवत् = चक्षु आदि इंद्रियांप्रमाणे (जीवात्म्याचे उपकरण हे); तत्सहशिष्टयादिभ्यः = कारण की, त्यांच्याबरोबर प्राण आणि इंद्रियांच्या संवादात याचे वर्णन केले गेले आहे तसेच त्यांच्याप्रमाणे हा ही जड आहेच. व्याख्या - छान्दोग्योपनिषदात मुख्य प्राणाची श्रेष्ठता सूचित करणारी एक कथा येते, जी याप्रकारे आहे - एका समयी सर्व इंद्रिये परस्परात विवाद करीत म्हणू लागली, ‘मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे.’ शेवटी ती आपला न्याय करविण्यासाठी प्रजापतिकडे गेली. तेथे त्या सर्वांनी त्यांना विचारले, ‘भगवन् ! आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे ?’ प्रजापतींनी म्हटले, ‘तुमच्यापैकी ज्याच्या निघून जाण्याने शरीर मुडदा होऊन जाईल, तेच सर्वश्रेष्ठ आहे.’ हे ऐकून वाणी शरीरातून बाहेर पडली, त्यानंतर चक्षु, त्यानंतर श्रोत्र. याप्रकारे एकेक इंद्रिय निघाले तरीही शरीराचे काम चालू राहिले; शेवटी जेव्हा मुख्य प्राणाने शरीरातून बाहेर निघण्याची तयारी केली तेव्हा प्राणशब्दवाच्य मनासहित सर्व इंद्रियांना आपापल्या स्थानापासून विचलित करून टाकले, हे पाहून ती सर्व इंद्रिये घाबरली आणि मुख्य प्राणास म्हणू लागली, ‘तुम्ही आम्हा सर्वांहून श्रेष्ठ आहात, तुम्ही बाहेर जाऊ नका.’ (छां.उ.५/१/६ पासून १२) या वर्णनात जीवात्म्याच्या मन आणि चक्षु आदि अन्य करणांच्या बरोबरच प्राणाचे वर्णन आले आहे, यावरून हे सिद्ध होत आहे की, ज्याप्रकारे ती स्वतंत्र नाहीत, जीवात्म्याच्या अधीन आहेत त्याचप्रकारे मुख्य प्राणही त्याच्या अधीन आहे. म्हणून इंद्रियनिग्रहाप्रमाणे शास्त्रात प्राणाचा निग्रह करण्याचाहि उपदेश आहे. तसेच ‘आदि’ शब्दांनी हेही सूचित केले गेले आहे की, इंद्रियादिंच्या प्रमाणे तो जडही आहे; म्हणून जीवात्म्याप्रमाणे चेतन होऊ शकत नाही. संबंध - ‘जर चक्षु आदि इंद्रियाप्रमाणे प्राणहि कुठल्या विषयाच्या अनुभवाचे द्वार अथवा कुठल्या कार्याच्या सिद्धीत सहायक झाला असता तर मग यालाही ‘करण’ म्हणणे ठीक झाले असते; परंतु असे दिसून येत नाही. शास्त्रातहि मन तसेच दहा इंद्रियांनाच प्रत्येक कार्यात ‘करण’ सांगितले गेले आहे, प्राणाला नाही. जर प्राणाला ‘करण’ मानले गेले तर त्यासाठीही कुठल्या तरी ग्राह्य विषयाची कल्पना करावी लागेल ? या शंकेचे निवारण करण्यासाठी सांगतात. अकरणत्वाच्च न दोषस्तथा हि दर्शयति ॥ २.४.११ ॥ अर्थ - च = निश्चितच; अकरणत्वात् = (इंद्रियांप्रमाणे) विषयांच्या उपभोगात करण न होण्यामुळे; दोषः = उक्त दोष, न = नाही आहे, हि = कारण की, तथा = याचे करण होणे कसे आहे ही गोष्ट; दर्शयति = श्रुति स्वयं दाखवित आहे. व्याख्या - ज्याप्रकारे चक्षु आदि इंद्रिये रूप आदि विषयांचे ज्ञान करविण्यात करण आहेत, याचप्रकारे विषयांच्या उपभोगात करण नसूनहि त्यास जीवात्म्यासाठी करण मानण्यात काही दोष नाही आहे, कारण की, त्या सर्व इंद्रियांना प्राणच धारण करतो, हे शरीर आणि इंद्रियांचे पोषणहि प्राणच करतो, प्राणाच्या संयोगानेच जीवात्मा एका शरीरास सोडून दुसर्या शरीरात जातो. याप्रकारे श्रुतित याच्या करणभावास दाखविले गेले आहे. (छां.उ.५/१/६ पासून प्रकरणाच्या समाप्तीपर्यंत) या प्रकरणाशिवाय आणखी ही जेथे जेथे मुख्य प्राणाचे प्रकरण आले आहे, त्या सर्व ठिकाणी हीच गोष्ट सांगितली गेली आहे. (प्र.उ.३/१ ते १२ पर्यंत) संबंध - इतकेच नव्हे तर - पञ्चवृत्तिर्मनोवद् व्यपदिश्यते ॥ २.४.१२ ॥ अर्थ - मनोवत् = (श्रुतिंच्या द्वारा हे) मनाप्रमाणे, पञ्चवृत्तिः = पांच वृत्तिंनी युक्त, व्यपदिश्यते = सांगितले जाते. व्याख्या - ज्याप्रकारे श्रोत्र आदि ज्ञानेंद्रियांच्या रूपात मनाच्या पांच वृत्ति मानल्या गेल्या आहेत, त्याचप्रकारे श्रुतिने या मुख्य प्राणाला ही पांच वृत्तिवाला मानले आहे. (बृह.उ.१/५/३) प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान - याच त्याच्या पांच वृत्ति आहेत. त्यांच्या द्वारा हा अनेक प्रकाराने जीवात्म्याच्या उपयोगात येतो. श्रुतिंमध्ये याच्या वृत्तिंची भिन्न भिन्न कार्ये विस्तारपूर्वक सांगितली गेली आहेत. (प्र.उ.३/४/ ते ७) म्हणून प्राणाला जीवात्म्याचे उपकरण मानणे उचितच आहे. संबंध - मुख्य प्राणाच्या लक्षणांचे प्रतिपादन करण्यासाठी नवव्या सूत्रापासून आरंभ करून बाराव्या सूत्रापर्यंत हे सिद्ध केले गेले आहे की, ‘प्राण’ जीवात्मा तथा वायुतत्त्वाहूनहि भिन्न आहे. मन आणि इंद्रियांना धारण करीत असल्याने तो ही जीवात्म्याचे उपकरण आहे. शरीरात हा पाच प्रकाराने विचरत शरीराला धारण करतो आणि त्यात क्रियाशक्तिचा संचार करतो. आता पुढील सूत्रात याच्या स्वरूपाचे प्रतिपादन करून या प्रकरणाची समाप्ति करतात. अणुश्च ॥ २.४.१३ ॥ अर्थ - अणुः = हा सूक्ष्म; च = ही आहे. व्याख्या - हे प्राणतत्त्व आपल्या पाच वृत्तिंच्या द्वारा स्थूलरूपात उपलब्ध होते; याशिवाय हे अणु अर्थात सूक्ष्म ही आहे. येथे अणु म्हणण्याने असा भाव समजून चालणार नाही की, हा लहान आकाराचा आहे, त्याची सूक्ष्मता लक्षात यावी म्हणून त्यास अणु म्हटले गेले आहे. सूक्ष्म असण्याबरोबरच हे परिच्छिन्न तत्त्व आहे. सूक्ष्मतेमुळे व्यापक असूनहि सीमित आहे. या सर्व गोष्टी ही प्रश्नोपनिषदाच्या तिसर्या प्रश्नाच्या उत्तरात आल्या आहेत. संबंध - छान्दोग्य-श्रुतित जेथे तेज प्रभृति तीन तत्त्वांपासून जगताच्या उत्पतिचे वर्णन केले गेले आहे, तेथे त्या तीन्हीची अधिष्ठाता देवता कुणाला सांगितले गेले आहे ? हा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे. ज्योतिराद्यधिष्ठाने तु तदामननात् ॥ २.४.१४ ॥ अर्थ - ज्योतिराद्यधिष्ठानम् = ज्योति आदि तत्त्वे ज्याचे अधिष्ठान सांगितले गेले आहे ते, तु = ते ब्रह्मच आहे; तदामननात् = कारण की, दुसर्या जागी ही श्रुतिच्या द्वारा त्यास अधिष्ठाता म्हटले गेले आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये म्हटले आहे की, त्या जगत्कर्त्या परमदेवाने विचार केला की, ‘मी अनेक होईन’ तेव्हा त्याने तेजाची रचना केली, नंतर तेजाने विचार केला की इत्यादि (छां.उ.६/२, ३/४) या वर्णनांत जो तेज आदि तत्त्वांत विचार करणारा त्याचा अधिष्ठाता सांगितला आहे तो परमात्माच आहे कारण की, तैत्तिरीयोपनिषदात म्हटले आहे की, ‘या जगताची रचना करून त्याने त्यात जीवात्म्यासह प्रवेश केला.’ (तै.उ.२/६) म्हणून हेच सिद्ध होत आहे की, परमेश्वरानेच त्या तत्त्वांमध्ये अधिष्ठाता रूपाने प्रविष्ट होऊन विचार केला, स्वतंत्र जड तत्त्वांनी नाही. संबंध - आता येथे ही जिज्ञासा होत आहे की, जर तो परब्रह्म परमेश्वरच त्या आकाशादि तत्त्वांचा अधिष्ठाता आहे तर तो प्रत्येक शरीराचा ही तोच होईल. जीवात्म्याला शरीराचा अधिष्ठाता मानणे ही उचित होणार नाही; यावर सांगतात. प्राणवता शब्दात् ॥ २.४.१५ ॥ अर्थ - प्राणवता = (ब्रह्माने) प्राणधारी जीवात्म्यासहित (प्रवेश केला), शब्दात् = असे श्रुतिचे वचन असल्याने हा दोष नाही आहे. व्याख्या - श्रुतिमध्ये असेही वर्णन आले आहे की, या तीन तत्त्वांना उत्पन्न केल्यानंतर त्या परमदेवाने विचार केला की, ‘मी आता या जीवात्म्यासहित या तीन देवतामध्ये प्रविष्ट होऊन नाना नाम-रूपांना प्रकट करीन. (छां.उ.६/३/२) या कथनाने हेच सिद्ध होत आहे की, जीवात्म्यासहित परमात्म्याने त्या तत्त्वांमध्ये प्रविष्ट होऊन जगताचा विस्तार केला. याचप्रकारे ऐतरेयोपनिषदाच्या पहिल्या अध्यायात जगताच्या उत्पत्तिचे वर्णन करतांना तिसर्या खण्डात असे सांगितले गेले आहे की, जीवात्म्यास सहयोग देण्यासाठी जगत्कर्त्या परमेश्वराने सजीव शरीरात प्रवेश केला. तसेच मुण्डक आणि श्वेताश्वतर मध्ये ईश्वर आणि जीव यांना दोन पक्ष्यांप्रमाणे एकाच शरीररूपी वृक्षावर स्थित सांगितले गेले आहे. याचप्रकारे कठोपनिषदामध्येही परमात्मा आणि जीवात्म्याला हृदयरूपी गुहेत स्थित सांगितले गेले आहे. या सर्व वर्णनावरून जीवात्मा आणि परमेश्वर या दोघांचे प्रत्येक शरीरात एकत्र राहणे सिद्ध होत आहे. म्हणून जीवात्म्याला शरीराचा अधिष्ठाता मानण्यात कुठल्याहि प्रकारचा विरोध नाही आहे. संबंध - श्रुतिमध्ये तत्त्वांच्या उत्पत्तिपूर्वी अथवा नंतरही जीवात्म्याच्या उत्पत्तिचे वर्णन आले नाही, नंतर त्या परमेश्वराने सहसा असा विचार कसा केला की, या जीवात्म्यासहित मी या तत्त्वांत प्रवेश करीन ? अशी जिज्ञासा उत्पन्न झाल्यावर सांगतात. तस्य च नित्यत्वात्. ॥ २.४.१६ ॥ अर्थ - तस्य = त्या जीवात्म्याची; नित्यत्वात् = नित्यता प्रसिद्ध असल्यामुळे, च = ही (त्याच्या उत्पत्तिचे वर्णन करणे उचितच आहे.) व्याख्या - जीवात्म्याला नित्य मानले गेले आहे. सृष्टिच्या समयी शरीराच्या उत्पत्तिबरोबर गौणरूपानेच त्याची उत्पत्ति सांगितली गेली आहे. (सू.२/३/१६) वास्तवात त्याची उत्पत्ति मानली गेलेली नाही. (सू.२/३/१७) म्हणून पञ्चभूतांच्या उत्पत्तिपूर्वी किंवा नंतर त्याची उत्पत्ति न सांगता जे जीवात्म्यासहित परमेश्वराचे शरीरात प्रविष्ट होणे सांगितले गेले आहे ते उचितच आहे. त्यात कुठल्याहि प्रकारचा विरोध नाही. संबंध - श्रुतिमध्ये प्राणाच्या नावाने इंद्रियांचे वर्णन आले आहे. यावरून हे कळून येत आहे की, इंद्रिये मुख्य प्राणाचेच कार्य आहे, त्याच्या वृत्ति आहेत, भिन्न तत्त्व नाही, अथवा असे अनुमान होत आहे की, चक्षु आदिंच्याप्रमाणे मुख्य प्राणही एक इंद्रिय आहे; त्यांच्याच जातीचा पदार्थ आहे अशा परिस्थीतीत वास्तविक गोष्ट काय आहे ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जातो आहे. त इन्द्रियाणि तद्व्यपदेशादन्यत्र श्रेष्ठात् ॥ २.४.१७ ॥ अर्थ - ते = ती मन आदि अकरा; इंद्रियाणि = इंद्रिये, श्रेष्ठात् = मुख्य प्राणाहून भिन्न आहे; अन्यत्र तद्व्यपदेशात् = कारण की दुसर्या श्रुतिमधून त्याचे भिन्न प्रकारे वर्णन आहे. व्याख्या - दुसर्या श्रुतिमध्ये मुख्य प्राणाची गणना इंद्रियांहून वेगळी केली गेली आहे; तसेच इंद्रियांना प्राणांच्या नावाने संबोधिलेले नाही. (मु.उ.२/१/३) म्हणून पूर्वोक्त चक्षु आदि दहा इंद्रिये आणि मन मुख्य प्राणाहून सर्वथा भिन्न पदार्थ आहे. ते मुख्य प्राणाचे कार्य नाही किंवा मुख्य प्राण त्यांच्याप्रमाणे इंद्रियांच्या गणनेत नाही आहे. या सर्वांची स्थिती मुख्य प्राणाच्या अधीन आहे; म्हणून गौणरूपाने श्रुतिमध्ये इंद्रियांना प्राणाच्या नावाने संबोधले गेले आहे. संबंध - इंद्रियांहून मुख्य प्राणाची भिन्नता सिद्ध करण्यासाठी दुसरा हेतु प्रस्तुत करतात. भेदश्रुतेः ॥ २.४.१८ ॥ अर्थ - भेदश्रुतेः = इंद्रियांहून मुख्य प्राणाचा भेद ऐकीवात आहे, म्हणून (ही मुख्य प्राण त्याहून भिन्न तत्त्व सिद्ध होत आहे.) व्याख्या - श्रुतिमध्ये जेथे इंद्रियांचे प्राणाच्या नावाने वर्णन आले आहे, तेथे ही त्यांचा मुख्य प्राणाहून भेद केला गेला आहे. (मु.उ.२/१/३ तसेच बृह.उ.१/३/३) तसेच प्रश्नोपनिषदात ही मुख्य प्राणाच्या श्रेष्ठतेचे प्रतिपादन करण्यासाठी अन्य सर्व तत्त्वांहून आणि इंद्रियांहून मुख्य प्राणाहून अलग सांगितले गेले आहे. (प्र.उ.२/२/३) याप्रकारे श्रुतिमध्ये मुख्य प्राणाहून इंद्रियांचा भेद सांगितला गेला असल्याने हेही सिद्ध होत आहे की, मुख्य प्राण या सर्वाहून भिन्न आहे. संबंध - याशिवाय - वैलक्षण्याच्च ॥ २.४.१९ ॥ अर्थ - वैलक्षण्यात् = परस्पर विलक्षणता असल्याने, च = ही (हेच सिद्ध होत आहे की मुख्य प्राणाहून इंद्रिये भिन्न पदार्थ आहेत.) व्याख्या - सर्व इंद्रिये आणि अंतःकरण सुषुप्तिच्या समयी विलीन होऊन जातात, त्या समयी ही प्राण जागत राहतो, त्याच्यावर निद्रेचा काही प्रभाव पडत नाही. हीच या सर्वांच्या पेक्षा मुख्य प्राणाची विलक्षणता आहे; यामुळे ही हेच सिद्ध होत आहे की, मुख्य प्राणांहून इंद्रिये भिन्न आहेत. इंद्रिये ही प्राणाचे कार्य अथवा वृत्ति नाहीत अथवा मुख्य प्राण हेही इंद्रिय नाही आहे, इंद्रियांना गौणरूपानेच ‘प्राण’ नाम दिले गेले आहे. संबंध - तेज आदि तत्त्वांची रचना करून परमात्म्याने जीवासहित त्यांच्यात प्रवेश केल्यानंतर नाम-रूपात्मक जगताचा विस्तार केला असे श्रुतित वर्णन आले आहे. या प्रसंगी असा संदेह येतो की, नाम-रूपादिची रचना करणारा कोणी जीवविशेष आहे अथवा परमात्माच आहे ? म्हणून ह्याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात. संज्ञामूर्त्तिक्लृप्तिस्तु त्रिवृत्कुर्वत उपदेशात् ॥ २.४.२० ॥ अर्थ - संज्ञामूर्तिक्लृप्तिः = नाम-रूपाची रचना; तु = ही, त्रिवृत्कुर्वतः = तीन्ही तत्त्वांचे मिश्रण करणार्या परमेश्वराचे (च कर्म आहे.) उपदेशात् = कारण की तेथे श्रुतिच्या वर्णनाने हीच गोष्ट सिद्ध होत आहे. व्याख्या - या समस्त नाम-रूपात्मक जगताची रचना करणे जीवात्म्याचे काम नाही. तेथे जी जीवात्म्याच्या सहित परमात्म्याच्या प्रविष्ट होण्याची गोष्ट सांगितली गेली आहे त्याचा अभिप्राय जीवात्म्याच्या कर्तेपणात परमात्म्याच्या कर्तृत्वाची प्रधानता सांगितली गेली आहे. त्याला सृष्टिकर्ता सांगणे नाही आहे; कारण की, जीवात्म्याच्या कर्म-संस्कारांच्या अनुसार त्यास कर्म करण्याची शक्ति आदि आणि प्रेरणा देणारा तोच आहे. म्हणून तेथील वर्णनाने हेच सिद्ध होत आहे की, नाम-रूपाने व्यक्त केली जाणारी या जड-चेतनात्मक जगताची रचनारूप क्रिया त्या परब्रह्म परमेश्वराचीच आहे, ज्याने त्या तत्त्वांना उत्पन्न करून त्याचे मिश्रण केले आहे; अन्य कुणाची नाही. संबंध - त्या परमात्म्याने तीन्हीचे मिश्रण करून त्यापासून जर जगताची उत्पत्ति केली आहे तर कुठल्या तत्त्वापासून कुठला पदार्थ उत्पन्न झाला आहे ? याचा विभाग कोठल्या प्रकारे उपलब्ध होईल यावर सांगतात. मांसादि भौमं यथाशब्दमितरयोश्च ॥ २.४.२१ ॥ अर्थ - ज्याप्रकारे मांसादि = मांस आदि; भौमम् = पृथ्वीचे कार्य सांगितले गेले आहे; (तसेच) यथाशब्दम् = तेथे श्रुतिच्या शब्दद्वारा सांगितल्यानुसार; इतरयोः = दुसर्या दोन्ही तत्त्वांचे कार्य; च = ही समजून घेतले पाहिजे. व्याख्या - भूमी अर्थात पृथ्वीचे कार्यास भौम म्हणतात. त्या प्रकरणात ज्या प्रकारे भूमिरूप अन्नाचे कार्य मांस, विष्ठा आणि मन ही तीन्ही सांगितली गेली आहेत, याप्रकारे त्या प्रकरणाच्या शब्दात ज्या ज्या तत्त्वाचे जे जे कार्य सांगितले गेले आहे त्याची तीच कार्ये आहेत असे समजून घेतले पाहिजे. तेथे श्रुतिने जलाचे कार्य मूत्र, रक्त आणि प्राण यांना तथा तेजाचे कार्य हाडे, मज्जा आणि वाणी असे सांगितले आहे. म्हणून यांनाच त्यांचे कार्य समजले पाहिजे. संबंध - जर तीन्ही तत्त्वांचे मिश्रण करून सर्वांची रचना केली गेली आहे तर खाल्लेल्या कुठल्या एका तत्त्वापासून अमुक वस्तु झाली इत्यादि रूपाने वर्णन करणे कसे संगत होऊ शकेल ? यावर सांगतात. वैशेष्यात्तु तद्वादस्तद्वादः ॥ २.४.२२ ॥ अर्थ - तद्वादः = ते कथन; तु = तर, वैशेष्यात् = अधिकतेच्या नात्याने आहे. व्याख्या - तीन्हीच्या मिश्रणात ही एकाची अधिकता आणि दुसर्य़ांची न्यूनता राहते म्हणून ज्याची अधिकता रहाते त्या अधिकतेनुसार व्यवहारात मिश्रित तत्त्वांचे अलग-अलग नामाने कथन केले जाते; म्हणून काही विरोध नाही. येथे ‘तद्वादः’ पदाचा दोनवेळा प्रयोग अध्यायाची समाप्ति सूचित करण्यासाठी आहे. या प्रकरणात जे मनाला अन्नाचे कार्य आणि अन्नमय म्हटले गेले आहे; प्राणांना जलाचे कार्य आणि जलमय म्हटले गेले आहे, तथा वाणीला तेजाचे कार्य आणि तेजोमयी म्हटले गेले आहे तेही त्या त्या तत्त्वांच्या संबंधाने त्यांचा उपकार होत असलेला दिसून आल्यामुळे गौणरूपानेच सांगितले आहे असे मानले पाहिजे. वास्तविक मन, प्राण, आणि वाणी आदि इंद्रिये भूतांचे कार्य नाही आहे. भूतांहून भिन्न पदार्थ आहेत ही गोष्ट पूर्वीच सिद्ध केली गेली आहे. (ब्र.सू.२/४/२) येथे दुसर्या अध्यायातील चवथा पाद पूर्ण झाला. |