ब्रह्मसूत्र

-

अध्याय पहिला

-

पाद तिसरा

संबंध - पहिल्या दोन पादात सर्वांतर्यामी परब्रह्म परमात्म्याचे व्यापक रूपाचे उत्तम प्रकारे प्रतिपादन केले गेले आहे. आता त्याच परमेश्वरास सर्वांचा आधार सांगत तिसर्‍या पादाचा आरंभ करतात -


द्युभ्वाद्यायतनं स्वशब्दात् ॥ १.३.१ ॥


अर्थ - द्युभ्वाद्यायतनम् = उपनिषदांतून ज्याला स्वर्ग आणि पृथिवीचा आधार म्हटले गेले आहे ते परब्रह्मच आहे; स्वशब्दात् = कारण तेथे त्या परमात्म्याच बोधक ’आत्मा’ शब्दाचा प्रयोग आहे.


व्याख्या - मुण्डकोपनिषद् २.२.५ इथे म्हटले आहे ’यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षं ओतं मनः सह प्राणैश्च सर्वैः । तं एवैकं जानथ आत्मानं अन्या वाचो विमुञ्चथ अमृतस्य सेतुः ॥’ - अर्थात् ’ज्याच्यात स्वर्ग, पृथिवी आणि दोहोंमधील आकाश, तसेच प्राण, मन गुंफले गेले आहे, त्या सर्वव्यापी आत्मरूप परमेश्वरालाच जाणा, आणि इतर सर्व मिथ्या वस्तूंचा त्याग करा. यालाच अमृत म्हटले आहे.’ या मंत्रात ज्या आत्मतत्त्वाला उंच ठिकाणचा स्वर्ग व खाली असलेली पृथ्वी या सर्वांचा आधार म्हटले आहे तो परमेश्वरच होय. जीवात्मा वा प्रकृति नव्हे, कारण त्यात परब्रह्मबोधक ’आत्मा’ शब्दाचा प्रयोग आहे.
संबंध - वरील सिद्धांताच्या पुष्टीप्रित्यर्थ आणखी एक प्रमाण -


मुक्तोपसृप्यव्यपदेशात् ॥ १.३.२. ॥


अर्थ - मुक्तोपसृप्यव्यपदेशात् = तो सर्वाधार परमात्माच जीवनमुक्त पुरुषांचे प्राप्तव्य आहे, जीवात्मा यांचे प्राप्तव्य असू शकत नाही.


व्याख्या - मुण्डकोपनिषद ३.२.८ येथे म्हटले आहे - यथा नद्य स्यन्दमानाः समुद्रेऽस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय । तथा विद्वान् नामरूपात् विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ - अर्थात् ’ज्याप्रकारे प्रवाही नद्या आपल्या नाम-रूपाचा त्याग करीत समुद्रात विलीन होतात, तद्वत् ज्ञानी महात्मा नाम-रूपाचा त्याग करून उत्तमातील उत्तम वस्तू म्हणजे परम पुरुष परमात्म्यास प्राप्त होतो. या प्रकारे श्रुतीने परमपुरुष परमात्म्यालाच मुक्त पुरुषांचे प्राप्तव्य दाखविले आहे. म्हणूनच मुण्डक् उप २.२.५ मध्यें द्युलोक व पृथिवीचा आधाररूप ’आत्म्या’चे वर्णन आले आहे ते तत्त्व ’जीवात्मा’ नव्हे तर साक्षात् परब्रह्म परमात्मा आहे. याच उपनिषदातील आधीचा मंत्र - प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते । अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् ॥ अर्थात् ’प्रणव धनुष्य असून जीवात्मा बाण सदृश आहे. ब्रह्मास त्याचे लक्ष्य म्हटले आहे. सतत सावधान, प्रमाद रहित मनुष्याद्वारा तेच विंधले जाणे योग्य आहे. म्हणून साधकाने त्या लक्ष्यास वेधून बाणाप्रमाणे त्यात तन्मय होणे हेच योग्य आहे. त्याने सर्व बंधनांतून मुक्त होऊन सदा परमेश्वराच्या चिंतनातच तत्पर राहून तन्मय व्हावे.
याप्रकारे अनेक ठिकाणी परमात्म्यास जीवाचे प्राप्य दर्शवून पूर्वोक्त श्रृतीत म्हटल्या प्रमाणे द्युलोक आदिंच आधारभूत आत्मा परब्रह्मच असू शकते, अन्य काही नाही.
संबंध - आता येथे शंका उपस्थित होते की पृथ्व्यादि सर्व भूतप्रपंच तर जड प्रकृतीचे कार्य आहे. कारणच कार्याचा आधार असते. मग जड प्रकृतीसच सर्वांचा आधार मानण्यास कोणती अडचण आहे, यावर म्हणतात -


नानुमानमतच्छब्दात् ॥ १.३.३ ॥


अर्थ - अनुमानम् = अनुमान वा कल्पित प्रधान, = द्युलोक आणि पृथिवीचा आधार होऊ शकत नाही; अतच्छब्दात् = कारण या प्रकरणात त्याचे प्रतिपादन करणारे कोणतेच प्रमाण नाही.


व्याख्या - या प्रकरणात असे कोणतेही इतर शब्दप्रमाण नाही ज्यायोगे जड प्रकृतीच स्वर्ग-पृथ्व्यादीचा आधार निर्देशित करता येईल. यास्तव जड प्रकृतीला त्याचा आधार म्हणता येणार नाही. कारण त्यास जगताचे कारण म्हणता येणार नाही हे आधीच सिद्ध झाले आहे. म्हणून प्रकृतीस जगताचा आधार मानणे संभवत नाही.
संबंध - प्रकृतीचा वाचक शब्द या प्रकरणात नाही हे मान्य. परंतु जीवात्म्याचा वाचक ’आत्मा’ शब्दाचा प्रयोग केला आहे. मग जीवात्म्यास द्यौ आदिचा आधार का मानू नये ?


प्राणभृच्च ॥ १.३.४ ॥


अर्थ - प्राणभृत् = प्राणधारी जीवात्मा; = ही; (न) = द्युलोक आदिचा आधार होऊ शकत नाही, कारच त्याचा वाचक शब्द या प्रकरणात नाही.


व्याख्या - जसा प्रकृतीचा वाचक शब्द या प्रकरणात नाही तसेच जीवात्म्याचा बोधक शब्दही प्रयुक्त नाही. ’आत्मा’ शब्द अन्यत्र जीवात्म्याच्या अर्थाने प्रयुक्त होऊनही या प्रकरणात तो जीवात्म्याचा वाचक नाही. कारण मुण्डकोपनिषद् २.२.७ येथे त्यास ’आनंदरूप’ आणि ’अमृत’ ही दोन विशेषणे दिली गेली आहेत, जी परब्रह्म परमात्म्यास अनुरूप आहेत. म्हणून प्राणधारी जीवात्मा स्वर्ग-पृथ्व्यादिंचा आधार मानला जाऊ शकत नाही.
संबंध - उपरोक्त अभिप्रायाच्या सिद्धीसाठी दुसरे कारण देतात -


भेदव्यपदेशात् ॥ १.३.५ ॥


अर्थ - भेदव्यपदेशात् = येथी सांगितलेल्या आत्म्यास जीवात्म्याहून भिन्न दाखविला गेल्यामुळे (प्राणभृत् न) = प्राणधारी जीवात्मा सर्वांचा आधार नव्हे.


व्याख्या - याच मंत्रात (मुं. २.२.५) ही गोष्ट सांगितली आहे की, ’त्या आत्म्यास जाण’ म्हणून ज्ञातव्य ’आत्मा’ त्याला जाणणारा (जीवात्मा) भिन्नच असणार. याच प्रकारे पुढे येणार्‍या मंत्रामध्ये - दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहायाम् ॥ मुं. उ. ३.१.७ - उक्त आत्म्यास द्रष्टा आत्म्याच्या हृदय गुहेत लपलेला म्हटले आहे. यावरून देखील ज्ञातव्य आत्म्याची भिन्नता सिद्ध होते. एवं या प्रकरणात सांगितलेल्या द्युलोक आदिंचा आधार परब्रह्म परमेश्वरच आहे, जीवात्मा नाही.
संबंध - आणखी एक प्रमाण -


प्रकरणात् ॥ १.३.६ ॥


अर्थ - प्रकरणात् = इथे परब्रह्म परमात्म्याचे प्रकरण चालू आहे, यावरूनही सिद्ध होते की जीवात्मा अथवा जड प्रकृति द्युलोकादिंचे आधार नव्हेत.


व्याख्या - या प्रकरणात मागील-पुढील सर्व मंत्रांत त्या परमात्म्यासच सर्वाधार, सर्वांचे कारण, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान म्हणून त्यालाच जीवात्म्याचे प्राप्तव्य ब्रह्म म्हटले आहे. यावरून हेच सिद्ध होते की जीवात्मा आणि परमात्मा एकमेकाहून भिन्न असून तेच स्वर्ग, पृथ्व्यादिंचा आधार परब्रह्म आहे, जीव अथवा जड प्रकृति नव्हे.
संबंध - याशिवाय


स्थित्यदनाभ्यां च ॥ १.३.७ ॥


अर्थ - स्थित्यदनाभ्याम् = एकाअर्थी साक्षीरूपाने स्थिति आणि दुसर्‍या अर्थी सुख-दुःखप्रद विषयांचा उपभोक्ता दाखविला आहे म्हणून; = ही (जीवात्मा परमात्म्याचा भेद सिद्ध होतो)


व्याख्या - मुण्डकोपनिषद् ३.१.१. तसेच श्वेताश्वरोपनिषद् ४.६ येथे म्हटले आहे - द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते । तयोरन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अनश्नन् अन्यो अभिचाकशीहि ॥ - अर्थात् ’एकमेकाजवळ राहणारे, परस्परात सख्यभाव असणारे दोन पक्षी (जीवात्मा, परमातमा) एकाच शरीररूपी वृक्षाचा आश्रय घेऊन राहतात. त्यापैकी एक (जीवात्मा) तर त्या वृक्षाच्या कर्मफलस्वरूप सुखदुःखांचा स्वाद घेऊन आसक्तिपूर्वक त्याचा उपभोग घेतो, परंतु दुसरा (परमात्मा) फळे न खाता केवळ साक्षीरूपाने पहात राहतो.’ या वर्णनात जीवात्मा कर्मफलाचा भोक्ता तथा परमात्म्यास केवळ साक्षीरूपाने स्थित राहणारा म्हटले गेले आहे. या दोहोंतला भेद स्पष्ट दिसतो. म्हणून या प्रकरणात द्यु पृथ्व्यादि समस्त जड-चेतनात्मक जगताचा आधार परब्रह्म परमात्माच सिद्ध होत आहे, जीवात्मा नव्हे.
संबंध - पूर्व प्रकरणात म्हटले आहे की ज्यास द्युलोक आणि पृथ्वी आदिंचा आधार म्हटले आहे, त्यालाच ’आत्मा’ म्हटले आहे, म्हणून तो परब्रह्म परमात्मा आहे, जीवात्मा नव्हे. यावरून शंका निर्माण होते की छांदोग्य उपनिषदातील सातव्या अध्यायात नारदांच्या प्रश्नास उत्तर म्हणून क्रमशः नाम, वाणी, मन, संकल्प, चित्त, ध्यान, विज्ञान, बल, अन्न, जल, तेज, आकाश, स्मरण व आशा यांना उत्तरोत्तर श्रेष्ठ सांगितले आणि अंती प्राणाला या सर्वांपेक्षा श्रेष्ठ म्हणून त्याची उपासना करण्यास सांगितले. हे ऐकून नारदांनी परत कोणताच प्रश्न (शंका) विचारला नाही. या वर्णनानुसार जर या प्रकरणातही सर्वांहून श्रेष्ठ प्राण आहे आणि त्यालाच ’भूमा’ वा ’आत्मा’ असेही म्हणतात. मग तर पूर्व प्रकरणातही सर्वांचा आधार प्राणशब्दवाच्य जीवात्म्यालाच मानावे लागेल. या शंकेच्या समाधानासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे.


भूमासम्प्रसादध्युपदेशात् ॥ १.३.८ ॥


अर्थ - भूमा = शंकेतील उदाहरणात दाखविलेल्या ठिकाणी ’भूमा’ ब्रह्मच आहे; सम्प्रसादाद् = कारण तेथेही प्राणशब्दवाच्य जीवात्म्याहून देखील; अधि = श्रेष्ठ; उपदेशात् = म्हटले गेले आहे.


व्याख्या - उदाहरणात प्रस्तुत नाम आदि क्रमाने एकाहून दुसरा श्रेष्ठ असे दाखवीत पंधराव्या खण्डात ’प्राणा’ला श्रेष्ठ ठरवून पुढे म्हटले आहे - ’यथा वा अरा नाभौ समर्पिता एवमस्मिन् प्राणे सर्वँ समर्पितम् । प्राणः प्राणेन याति, प्राणः प्राणं ददाति प्राणाय ददाति । प्राणो ह पिता प्राणो माता प्राणो भ्राता प्राणः स्वसा प्राण आचार्यः प्राणो ब्राह्मणः ।’ (छां. उप ७.१५.१) अर्थात् ’ज्याप्रमाणे रथचक्राचे आरे चक्राच्या नाभिच्या आश्रित असतात, त्याप्रकारे समस्त जगत प्राणाच्या आश्रित आहे. प्राणच पिता आहे, माता आहे, भ्राता आहे, बहीण आहे, आचार्य आहे आणि प्राणच ब्राह्मण आहे.’ यावरून हे कळून येते की येथे प्राणाच्या नावाने जीवात्म्याचे वर्णन आहे. कारण सूत्रकारांनी येथे या ’प्राणा’चेच दुसरे नाव ’सम्प्रसाद’ ठेवले आहे आणि सम्प्रसाद नाव जीवात्म्याचे आहे ही गोष्ट याच उपनिषदात (छां उप ८.३.४) स्पष्ट सांगितली आहे. या प्राण शब्दवाच्य जीवात्म्याच्या विषयी पुढे असेही म्हटले आहे की, "हे सर्व काही प्राणच आहे" अशा भावाने जो चिंतन करणारा, पाहणारा आणि जाणणारा आहे तो अतिवादी असतो. म्हणून येथे अशी धारणा होणे स्वाभाविक आहे की या प्रकरणात प्राण शब्दवाच्य जीवात्म्यालाच सर्वश्रेष्ठ ठरवले आहे. कारण हा उपदेश ऐकून नारदाने काहीच विचारले नाही, जणू काही त्याला त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले आहे. पण सनत्कुमार जाणत होते आणखी काही गोष्टी स्पष्ट केल्या खेरीज याचे ज्ञान अर्धवटच राहील. म्हणून नारदांनी न विचारताही ’सत्य’ शब्दाने ’ब्रह्मा’च्या प्रकरणाची सुरुवात केली. म्हणजेच ’तू’ शब्द प्रयोग करून स्पष्ट केले की वास्तविक त्यालाच अतिवादि म्हणता येईल जो ’सत्य’ जाणून त्याच्या बळावर प्रतिवाद करतो. या कथनाने नारदांच्या मनांत सत्यतत्त्वाची जिज्ञासा उत्पन्न करून त्यासा जाणण्यासाठी साधनरूप विज्ञान, मनन, श्रद्धा, निष्ठा आणि क्रियेसंबंधी सांगितले. नंतर सुखरूपाने ’भूमा’चे अर्थात सर्वांत महान् परब्रह्म परमात्म्याचे वर्णन करून प्रकरणाचा उपसंहार केला. या प्रकारे प्राण शब्दवाच्य जीवात्म्याहून ’भूमा’स अधिक श्रेष्ठ दाखवून या प्रकरणात ’भूमा’ शब्द सत्य ज्ञानानन्दस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याचा वाचक दाखविले आहे. भूमा हा प्राण, जीवात्मा अथवा प्रकृतिचा वाचक नव्हे.
संबंध - एवढेच नव्हे तर -


धर्मोपपत्तेश्च ॥ १.३.९ ॥


अर्थ - धर्मोपपत्तेः = मागील सूत्रात जे भूमाचे धर्म (लक्षणे) सांगितले आहेत ते ब्रह्मालाच सुसंगत होऊ शकतात म्हणून; = ही (म्हणूनही येथे भूमा ब्रह्म आहे)


व्याख्या - छां. उप ७.२४.१ येथे भूमाची लक्षणे येणेप्रमाणे सांगितली आहेत - ’यत्र नान्यत् पश्यति नान्यत् श्रृणोति नान्यत् विजानाति स भूमाथ यत्रान्यत् पश्यत्यन्यच्छृणोत्यन्यद् विजानाति तदल्पं यो वै भूमा तदमृतमथ यदल्पं तन्मर्त्यम् । स भगवः कस्मिन् प्रतिष्ठित इति स्वे महिम्नि ।’ अर्थात् ’जेथे पोहोचल्यावर अन्य काही दिसत नाही, अन्य काही ऐकू येत नाही, अन्य काही जाणत नाही तो भूमा आहे तेच अमृत आहे; आणि जे अल्प आहे ते नाशवान आहे’ यावर नारदांनी विचारले, "भगवन् ! ते भूमा कशात प्रतिष्ठित आहे ?" सनत्कुमार म्हणाले, "आपल्या महिमेमध्ये. पण धन, संपत्ति, घर आदि जे काही महिमा नावाने प्रसिद्ध आहे अशा महिम्यात तो भूमा प्रतिष्ठित नाही, परंतु तो खाली, वर, पुढे, डावीकडे, उजवीकडे तसेच तेच हे सर्व काही आहे." यानंतर त्या भूमाला आत्मा नावाने संबोधले आहे आणि सांगितले की ’आत्माच खाली, वर, मागे, पुढे, आणि हेच सर्व काही आहे. जो या प्रकारे पाहणारा, मानणारा, आणि विशेष रूपाने जाणणारा आहे तो आत्म्यात क्रीडा करणारा, आत्म्यातच रत असणारा, आत्म्याशीच जोडलेला तसेच आत्म्यातच आनंद घेणारा आहे, इत्यादि.’ या सर्व धर्मांची संगति परब्रह्म परमात्म्यालाच लागू पडते म्हणून तोच या प्रकरणात ’भूमा’ या नावाने सांगितला आहे.
संबंध - पूर्व प्रकरणात भूमाचे जे धर्म सांगितले आहेत तेच बृहदारण्यकोपनिषदात ३.८.७. येथे ’अक्षरा’चे सांगितले आहेत. अक्षर शब्द प्रणवरूप वर्णाचाही वाचक आहे. मग तेथे ’अक्षर’ शब्द कशाचा वाचक आहे ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला आहे -


अक्षरमम्बरान्तधृतेः ॥ १.३.१० ॥


अर्थ - अक्षरम् = (उक्त प्रकरणात) अक्षर शब्द परब्रह्म परमात्म्याचाच वाचक आहे; अम्बरान्तधृतेः = कारण त्याला आकाशापर्यंत संपूर्ण जगतास धारण करणारा म्हटले गेले आहे.


व्याख्या - हे प्रकरण या प्रकारे आहे - ’स होवाच यदूर्ध्वंयाज्ञवल्क्य दिवो यदवाक् पृथिव्या यदन्तरा द्यावापृथिवी इमे यद् भूतं च भवच्च भविष्यच्चेत्याचक्षते कस्मिन् च तदोतं च प्रोतं चेति’ (छां उप ३.८.६) - गार्गीने याज्ञवल्क्यांना विचारले, "याज्ञवल्क्य ! जे द्युलोकांच्याही वर, पृथ्वीच्याही खाली आणि या दोहोंच्याही मध्ये आहे, तथा जे हे पृथ्वी आणि द्युलोक आहे - हे सर्वच्या सर्व - आणि ज्याला भूत, भविष्य आणि वर्तमान म्हणतात तो काल कशात ओत प्रोत आहे." याज्ञवल्क्य म्हणाले, "हे सर्व आकाशात ओत प्रोत आहे.". यावर गार्गीने विचारले, "ते आकाश कशात ओत प्रोत आहे ?" (३.८.७) यावर याज्ञवल्क्य म्हणाले - एतद्‌वै तदक्षरं गार्गि ब्राह्मणा अभिवदन्त्यस्थूलमनण्वह्रस्वमदीर्घमलोहितमस्नेहम् ... इत्यादि. ’हे गार्गि त्या तत्त्वास ब्रह्मवेत्ते लोक "अक्षर" म्हणतात - जे स्थूल नाही, सूक्ष्म नाही, लहान नाही, मोठे नाही, लाल नाही, पिवळे नाही ... इत्यादि.’ (३.८.८) याप्रकारे ते अक्षर आकाशापर्यंत सर्वांना धारण करणारे सांगितले गेले आहे. म्हणून येथे ’अक्षर’ नामाने त्या परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आहे, अन्य कशाचेही नाही.
संबंध - कारण आपल्या कार्यास धारण करते हे सर्व मानतात. ज्यांच्या मताप्रमाणे प्रकृतिच जगताचे कारण आहे, तर तिलाच आकाशापर्यंत सर्व भूतांना धारण करणारी मानू शकतो. म्हणून त्यांच्या मतानुसार येथे ’अक्षर’ शब्द प्रकृतिचाच वाचक असू शकतो. या शंकेचे निवारण करण्यासाठी सांगतात -


सा च प्रशासनात् ॥ १.३.११ ॥


अर्थ - च = आणि; सा = ती आकाशापर्यंत सर्व भूतांना धारण करणेरूपी क्रिया परमेश्वराचीच आहे; प्रशासनात् = कारण त्या अक्षरास सर्वांवर उत्तम प्रकारे शासन करणारा म्हटले आहे.


व्याख्या - या प्रकरणात पुढे म्हटले आहे की ’एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि सूर्याचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठत एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि द्यावापृथिव्यौ विधृते तिष्ठत - इत्यादि’ - या अक्षराच्या प्रशासनात सूर्य आणि चंद्रमा धारण केलेले स्थित आहेत, एवं द्युलोक, पृथ्वी, निमेष, मुहूर्त, दिवस-रात्र आदि नावाने सांगितला जाणारा काळ - हे सर्व विशेषरूपाने धारण केलेले स्थित आहेत. याच्या प्रशासनात पूर्व आणि पश्चिमेकडे वाहणार्‍या सर्व नद्या आपापल्या निर्गमस्थान पर्वतातून निघून वहात जातात - इत्यादि. (बृह्. उप ३.८.९) या प्रकारे त्या अक्षरास सर्वांवर उत्तम प्रकारे शासन करीत असता आकाशापर्यंत सर्वांस धारण करणारा म्हटले गेले आहे. हे कार्य जड प्रकृतिचे असू शकत नाही. म्हणून सर्वांस धारण करणारे अक्षर तत्त्व ब्रह्मच आहे, अन्य कोणी नाही.
संबंध - याशिवाय -


अन्यभावव्यावृत्तेश्च ॥ १.३.१२ ॥


अर्थ - अन्यभावव्यावृत्तेः = येथे ’अक्षरा’त अन्य, प्रधान आदि यांच्या लक्षणांचे निराकरण केले गेले आहे म्हणून; = ही (अक्षर शब्द ब्रह्माचाच वाचक आहे)


व्याख्या - उक्त प्रसंगात पुढे जाऊन सांगितले आहे - ’ते अक्षर पाहण्यात न येणारे परंतु स्वतः सर्वांना पाहणारे, ऐकण्यात न येणारे परंतु स्वतः ऐकणारे, मनन न करता येणारे परंतु स्वयं मनन करणारे, जाणण्यात न येणारे परंतु स्वतः सर्वांना उत्तम प्रकारे जाणणारे आहे - इत्यादि’ (बृह. उप ३.९.११) या प्रकारे येथे त्या अक्षरात पाहणे, ऐकणे, जाणणे - या प्रधान आदिंच्या धर्मांचे निराकरण केले गेले आहे. एवढेच नव्हे तर याच श्रुतिमध्ये अक्षरास सर्वद्रष्टा म्हणून त्यात प्रकृतिचे जडत्व आणि जीवात्म्याचे अल्पज्ञत्व आदि धर्मांचेही निराकरण केले गेले आहे. एवं ’अक्षर’ शब्द विनाशशील जड प्रकृतिचा वाचक होऊ शकत नाही. यावरून हेच सिद्ध होते की येथे ’अक्षर’ शब्दाने परब्रह्माचेच प्रतिपादन केले आहे.
संबंध - ’अक्षर’ शब्दास परब्रह्माचा वाचक म्हणून सिद्ध केले, परंतु प्रश्नोपनिषद् ५.२-७ येथे ॐकार अक्षरास परब्रह्म आणि अपरब्रह्म दोन्हींचे प्रतीक म्हटले आहे, म्हणून तेथे अक्षरास अपरब्रह्म ही मानले जाऊ शकते, या शंकेची निवृत्ती व्हावी म्हणून पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


ईक्षतिकर्मव्यपदेशात् सः ॥ १.३.१३ ॥


अर्थ - ईक्षतिकर्मव्यपदेशात् = येथे परमपुरुषास ’ईक्षते’ क्रियेचे कर्म म्हटले गेल्याने; सः = तो परब्रह्म परमेश्वरच त्रिमात्रासंपन्न ’ॐ’ या अक्षरद्वारा चिंतन करण्यास योग्य सांगितला गेला आहे.


व्याख्या - या सूत्रात ज्या मंत्रावर विचार केला जात आहे तो या प्रकारे आहे - ’यः पुनरेतं त्रिमात्रेण ॐ इति एतेन एव अक्षरेण परं पुरुषं अभिध्यायीत स तेजसि सूर्ये संपन्नः । यथा पादोदरस्त्वचा विनिर्मुच्यत एवं ह वै स पाप्मना विनिर्मुक्तः स सामभिः उन्नीयते ब्रह्मलोकं स एतस्मात् जीवघनात् परात्परं पुरीशयं पुरुषमीक्षते । (प्रश्न उप ५.५) - जो ॐ अक्षराच्या (तीन्ही मात्रांसहीत) परम पुरुषाचे निरन्तर ध्यान करतो, तो तेजोमय (परमधाम) सूर्यलोकाची प्राप्ती करतो. ज्याप्रमाणे सर्प कात टाकतो त्याचप्रमाणे तो पापमुक्त होतो आणि साममंत्रांद्वारे ब्रह्मलोकी जातो. त्याला सर्व प्राणीसमुदायाच्या अंतर्यामी स्थित असलेल्या उत्तमांतील उत्तम अशा श्रेष्ठ परम पुरुषाचा साक्षात्कार होतो.’ या मंत्रात ज्यास तीन मात्रांनी संपन्न ॐ च्या द्वारा ध्येय सांगितले गेले आहे, तो पूर्णब्रह्म परमात्माच आहे. अपरब्रह्म नाही. कारण त्या ध्येयास जीव-समुदायाच्या नामाने वर्णित हिरण्यगर्भरूप अपरब्रह्माहून अत्यंत श्रेष्ठ म्हणून ’ईक्षते’ क्रियेचे कर्म म्हटले आहे.
संबंध - उपरोक्त प्रकरणार मनुष्य शरीररूप पुरात शयन करणार्‍या पुरुषाला परब्रह्म परमात्मा सिद्ध केले गेले आहे. परंतु छां. उप ८.१.१. येथे ब्रह्मपुरान्तर्गत सूक्ष (दहर) आकाशाचे वर्णन करून त्यात स्थित वस्तूस जाणावे असे म्हटले आहे. ते एकदेशीय वर्णन असल्यामुळे जीवपरक असू शकते म्हणून ही जिज्ञासा उत्पन्न होते की उक्त प्रकरणात ’दहर’ नावाने सांगितलेले तत्त्व काय आहे ? यावर सांगतात -


दहर उत्तरेभ्यः ॥ १.३.१४ ॥


अर्थ - दहरः = उक्त प्रकरणार ’दहर’ शब्दाने ज्या ज्ञेय तत्त्वाचे वर्णन केले गेले आहे ते ब्रह्मच आहे; उत्तरेभ्यः = कारण त्याच्या पश्चात् आलेल्या वचनांनी हे सिद्ध होते.


व्याख्या - छां उप ८.१.१ येथे म्हटले आहे - ’अथ यदिदमस्मिन् ब्रह्म, पुरे दहरं पुण्डरीकं वेश्म दहरोऽस्मिम् अनन्तराकाशस्तस्मिन् यदन्तस्तदन्वेष्टव्यं तद् वाव विजिज्ञासितव्यम् - या ब्रह्माचे नगररूप मनुष्यशरीरात कमलाच्या आकाराचे एक घर (हृदय) आहे, त्यात सूक्ष्म आकाश आहे, त्याच्या आत जी वस्तू आहे ती जाणण्याची इच्छा केली पाहिजे.’ या वर्णनात ज्यास ज्ञातव्य म्हटले आहे, ते ’दहर’ शब्दाचे लक्ष्य परब्रह्म परमेश्वरच आहे. कारण पुढील वर्णनात त्यातच समस्त ब्रह्माण्डास निहित म्हटले आहे, तथा त्याच्याविषयी असेही म्हटले आहे की ’हा आत्मा सर्व पापरहित, जरामरणवर्जित, शोकशून्य, तहान-भूक रहित, सत्यकाम तथा सत्यसंकल्प आहे - इत्यादि (८.१.५) पुढे (८.३.४) म्हटले आहे की, ’हाच आत्मा, अमृत, अभय आणि ब्रह्म आहे आणि याचेच नाम सत्य आहे.’ यावरून सिद्ध होते की येथे ’दहर’ शब्द परब्रह्माचाच बोधक आहे.
संबंध - प्रकारान्तराने हीच गोष्ट सिद्ध करतात -


गतिशब्दाभ्यां तथा दृष्टं लिङ्‌गं च ॥ १.३.१५ ॥


अर्थ - गतिशब्दाभ्याम् = ब्रह्मात गतिचे वर्णन असून ब्रह्मवाचक शब्द असल्याने; तथा दृष्टम् = एवं दुसर्‍या एका श्रुतिमध्ये असेच वर्णन आढळून येते; = आणि; लिङ्‌गम् = या वर्णनात आलेली लक्षणे ब्रह्माचीच आहेत, म्हणून येथे ’दहर’ नामाने ब्रह्माचेच वर्णल आले आहे.


व्याख्या - या प्रसंगात म्हटले आहे ’इमाः सर्वाः प्रजा अहरहर्गच्छन्त्य एतं ब्रह्मलोकं न विन्दन्त्यनृतेन हि प्रत्यूढाः - हे जीव-समुदाय प्रतिदिन सुषुप्तिकालात या ब्रह्मलोकास जातात परंतु असत्याने आवृत्त असल्याने त्यास जाणत नाहीत.’ या वाक्यात प्रतिदिन ब्रह्मलोकात जाण्याचे सांगणे तर गतिचे वर्णन आहे आणि त्या ’दहर’ ला ब्रह्मलोक म्हणणे त्याचा वाचक शब्द आहे. या दोन्ही कारणामुळे हे सिद्ध होते की येथे ’दहर’ शब्द ब्रह्माचाच वाचक आहे. या व्यतिरिक्त इतरत्र (६.८.१ मध्ये) ही असेच वर्णन आढळते. ’सता सोम्य तदा सम्पन्नो भवति’ - हे सोम्य ! त्या सुषुप्त अवस्थेत जीव ’सत्’ नामाने सांगितले गेलेल्या परब्रह्म परमात्म्याशीच संयुक्त होत असतो - इत्यादि. तसेच पुढे सांगितलेली अमृत, अभय आदि लक्षणेही ब्रह्माशी सुसंगत होत आहेत. या दोन्ही कारणांवरून सिद्ध होते की येथे ’दहर’ नावाने परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आहे.
संबंध - उपरोक्त सिद्धीसाठी आणखी एक कारण सांगतात -


धृतेश्च महिम्नोऽस्यास्मिन्नुपलब्धेः ॥ १.३.१६ ॥


अर्थ - धृतेः = या ’दहर’ मध्ये समस्त लोकांना धारण करण्याची शक्ति दाखवली गेली आहे म्हणूनही; = हा परब्रह्माचाच वाचक आहे; अस्य = याची; महिम्नः = समस्त लोकांना धारण करण्याचे सामर्थ्यरूप महिम्याचे; अस्मिन् = या परब्रह्म परमात्म्यात् असणे; उपलब्धेः = अन्य श्रुतिमध्येही आढळून येते म्हणून ’दहर’ नामाने ब्रह्माचे वर्णन मानणेच उचित आहे.


व्याख्या - छां उप ८.४.१ मध्ये म्हटले आहे की, ’अथ य आत्मा स सेतुर्विधृतिरेषां लोकानाम्’ अर्थात् ’हा जो आत्मा आहे, तोच या सर्व लोकांना धारण करणारा सेतु आहे.’ या प्रकारे येथे तो ’दहर’ शब्दवाच्य आत्म्यात समस्त लोकांस धारण करण्याच्या शक्तिचे वर्णन असल्याने ’दहर’ येथे परमात्म्याचाच वाचक आहे. कारण की अन्य श्रुतिंमध्येही परमेश्वराचा असा महिमा असल्याचे वर्णन या प्रकारे उपलब्ध आहे. ’एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि सूर्याचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठतः’ - हे गार्गि या अक्षर परमात्म्याच्याच शासनात राहून सूर्य आणि चंद्रमा उत्तम प्रकारे धारणेत स्थित आहेत - इत्यादि. (बृह. उप ३.८.९) याशिवाय असेही म्हटले आहे की, ’एष सर्वेश्वर एष भूताधिपतिरेष भूतपाल एष सेतुर्विधरण एषां लोकानामसम्भेदाय’ - अर्थात् - हा सर्वांचा ईश्वर आहे, हा सर्व प्राण्यांचा स्वामी आहे, हा सर्व भूतांचा पालन-पोषण कर्ता आहे, तसेच सर्व लोकलोकांचा विनाशापासून वाचविण्यास त्यांना धारण करणारा सेतु आहे. (बृह. उप ४.४.२२) परब्रह्माच्या अतिरिक्त अन्य कोणीही या संपूर्ण लोकांना धारण करण्यास समर्थ असून शकत नाही. म्हणून येथे ’दहर’ नामाने परब्रह्म परमेश्वराचेच वर्णन आहे.
संबंध - याच्याच पुष्टिसाठी आणखी एक हेतु -


प्रसिद्धेश्च ॥ १.३.१७ ॥


अर्थ - प्रसिद्धेः = आकाश शब्द परमात्मा या अर्थाने प्रसिद्ध आहे, या कारणाने; = ही (’दहर’ नाम परब्रह्माचेच वाचक आहे.)


व्याख्या - श्रुतिमध्ये ’दहराकाश’ नाम आलेले आहे. आकाश शब्द परमात्म्याच्या अर्थाने प्रसिद्ध आहे. यथा - ’को ह्येवान्यात् कः प्राण्याद् यदेष आकाश आनन्दो न स्यात्’ अर्थात् - जर हे आनंदस्वरूप आकाश (सर्वांना अवकाश देणारा परमात्मा) नसता तर कोण जीवित राहू शकले असते, प्राणांची क्रिया कोण करू शकले असते.’ (तैत्ति. उप २.७.१) तथा - ’सर्वाणि ह वा इमानि भूतान्याकाशादेव समुत्पद्यन्ते’ अर्थात् - निश्चितच हे प्राणी आकाशापासूनच उत्पन्न होतात. (छां उप १.९.१) म्हणूनही ’दहर’ शब्द परब्रह्म परमात्म्याचाच वाचक आहे.
संबंध - आता ’दहर’ शब्दाने जीवात्म्याचे ग्रहण का करू नहे, ही शंका उत्पन्न करतात आणि तिचे समाधान करतात -


इतरपरामर्षात् स इति चेन्नासम्भवात् ॥ १.३.१८ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; इतरपरामर्शात् = दुसरे अर्थात् जीवात्म्याचा संकेत होण्यामुळे; सः = तोच ’दहर’ नामाने सांगितला आहे; इति न = तर असे म्हणणे ठीक नाही; असम्भवात् = कारण तेथे सांगितलेली लक्षणे जीवात्म्यात संभवत नाहीत.


व्याख्या - छां उप ८.१.५ मध्ये या प्रकारे वर्णन आले आहे - ’स ब्रूयान्नास्य जरयैतज्जीर्यति न वधेनास्य हन्यत एतत्सत्यं ब्रह्मपुरस्मिन् कामाः समाहिता एष आत्मापहतपाप्मा विजयो विमृत्युर्विशोको विजिघत्सोऽपिपासः सत्यकामः सत्यसंकल्पो यथा ह्येवेह प्रजा अन्वाविशन्ति यथानुशासनं यं यमन्तमभिकामा भवन्ति यं जनपदं यं क्षेत्रभागं तं तमेवोपजीवन्ति’ - शिष्यांनी विचारल्यावर आचार्यांनी सांगितले की, ’या देहाच्या जरावस्थेने हा जीर्ण होत नाही, वा वधाने याचा नाश होत नाही. हे ब्रह्मपुर सत्य आहे. यात संपूर्ण काम-विषय सम्यक् प्रकाराने स्थित आहे. हा आत्मा पुण्य-पाप रहित, जरा-मृत्यू रहित, शोकहीन, तहान-भूक रहित, सत्यकाम तथा सत्यसंकल्प आहे. जसे या लोकात प्रजा जर राजाच्या आज्ञेचे अनुसरण करीत असेल तर ती ज्या ज्या वस्तूची कामना तथा ज्या ज्या जनपद एवं क्षेत्रभागाची अभिलाषा करते ते ते प्राप्त करून सुखपूर्वक जीवन धारण करते.’ या मंत्रातील ’देहाच्या जरावस्थेने हा जीर्ण होत नाही वा वधाने याचा नाश होत नाही’ यावरून हे जीवात्म्याला लक्ष्य करून सांगितलेले दिसते कारण, याच्या पुढील मंत्रात कर्मफलाची अनित्यता दाखवली गेली आहे आणि कर्मफल भोगाचा संबंध जीवात्म्याशीच संबंध आहे. या प्रकारे जीवात्म्याचा निर्देश केल्यामुळे तेथे ’दहर’ नामाने जीवात्म्यास संबोधले आहे म्हणावे तर ते ठीक नाही. कारण पूर्वोक्त मंत्रात जी ’सत्यसंकल्प’ आदि लक्षणे सांगितली गेली आहेत ती जीवात्म्यात असणे संभवनीय नाहीत. म्हणून येथे ’दहर’ श्ब्दाने परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आले आहे असे मानणे सर्वथा उचित आहे.
संबंध - पूर्वोक्त मताच्या पुष्टीसाठी पुन्हा शंका उपस्थित करून तिचे समाधान करतात -


उत्तराच्चेदाविर्भूतस्वरूपस्तु ॥ १.३.१९ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; उत्तरात् = त्यानंतरच्या वर्णनामुळेही ’दहर’ शब्द जीवात्म्याचाच बोधक होत आहे; तु = तर असे म्हणणे योग्य नाही; आविर्भूतस्वरूपः = कारण त्या मंत्रात ज्याचे वर्णन आहे तो आपल्या शुद्ध स्वरूपास प्राप्त झालेला आत्मा आहे.


व्याख्या - छां उप ८.३.४. मध्ये म्हटले आहे - ’अथ ह एष सम्प्रसादोऽस्माच्छरीरासमुत्थाय परं ज्योतिरुपसम्पद्य स्वेन रूपेणाभिनिष्पद्यत एष आत्मेति होवाचैतदमृतमभयमेतद्‌ब्रह्मेति तस्य ह वा एतस्य ब्रह्मणो नाम सत्यम् - हा जो सम्प्रसाद आहे तो या शरीरातून निघून परम ज्योतीस प्राप्त होऊन आपल्या शुद्ध स्वरूपाने संपन्न होतो. हा आत्मा आहे, हा अमृत आहे एवं अभय आहे आणि हेच ब्रह्म आहे, असे आचार्यांनी सांगितले आहे. त्या ज्या ब्रह्माचे नाम "सत्य" आहे.’ या मंत्रात सम्प्रसाद या नामाने स्पष्टपणे जीवात्म्याचे वर्णन आहे आणि त्यासाठी ही तीच अमृत, अभय आदि विशेषणे दिली गेली आहेत, जी अन्यत्र ब्रह्मासाठी येतात म्हणून ही लक्षणे जीवात्म्यात असणे असंभव नाही. म्हणून ’दहर’ शब्दास जीवात्म्याचा वाचक मानण्यात काही आपत्ति येता कामा नये, अशी शंका उत्पन्न केली तर ते ठीक नाही; कारण उक्त मंत्रात आपल्या शुद्ध स्वरूपास प्राप्त झालेल्या जीवात्म्यासाठी अशीच विशेषणे आली आहेत. म्हणून याच्या आधारावर ’दहर’ शब्दास जीवात्म्याचा वाचक मानता येत नाही.
संबंध - जर असे असेल तर मग उक्त प्रकरणात जीवात्म्यास लक्ष्य करविणार्‍या शब्दांचा प्रयोग का केला गेला ? अशी जिज्ञासा उत्पन्न झाल्यास, त्यावर म्हणतात -


अन्यार्थश्च परामर्शः ॥ १.३.२० ॥


अर्थ - परामर्शः = उक्त प्रकरणात जीवात्म्यास लक्ष्य करविणारा संकेत; = ही; अन्यार्थः = दुसर्‍या एका प्रयोजनासाठी आहे.


व्याख्या - पूर्वोक्त प्रकरणात जो जीवात्म्यास लक्ष्य करविणारे शब्दाचा प्रयोग झाला आहे, ते ’दहर’ शब्दाने जीवात्म्याचे ग्रहण करविण्यासाठी नाही तर दुसर्‍याच प्रयोजनासाठी आहे. अर्थात त्या ज्या दहर शब्दवाच्य परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर जीवात्माही त्याच गुणांचा बनतो, हा भाव प्रदर्शित करण्यासाठीच तेथे जीवात्म्याचे तसे वर्णन केले आहे. परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर अनेक दिव्य गुण जीवात्म्यात येतात ही गोष्ट भगवद् गीतेत १४.२ येथे सांगितली गेली आहे. म्हणून उक्त प्रकरणात जीवात्म्याचे वर्णन आहे यावरून हे सिद्ध होत नाही की तेथे ’दहर’ शब्द जीवात्म्याचा वाचक आहे.
संबंध - ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी सूत्रकार पुन्हा शंका उपन्न करतात आणि तिचे समाधान करतात -


अल्पश्रुतेरिति चेत्तदुक्तम् ॥ १.३.२१ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; अल्पश्रुतेः = श्रुतिमध्ये ’दहर’ ला अगदी लहान (सूक्ष्म) म्हटले गेले आहे म्हणून ’दहर’ शब्दाने येथे जीवात्म्याचेच ग्रहण होते; इति = असे मानले पाहिजे; तदुक्तम् = तर त्याचे उत्तर असे आहे;


व्याख्या - श्रुतिमध्ये दहराकाशास अत्यंत अल्प (सूक्ष्म) म्हटले गेले आहे, म्हणजेच त्याचे स्वरूप ’अणु’ मानले गेले आहे असे समजून त्यास जीवात्मावाचक म्हणणे योग्य नाही, याचे उत्तर पूर्वी १.२.७ मध्ये दिले आहे. त्याची वारंवार पुनरावृत्ति करण्याची आवश्यकता नाही.
संबंध - पूर्वसूत्रात शंकेचे उत्तर प्रकारान्तराने देतात -


अनुकृतेस्तस्य च ॥ १.३.२२ ॥


अर्थ - तस्य = त्या जीवात्म्याचे; अनुकृतेः = अनुकरण करण्यामुळे; = ही; (परमात्म्यास अल्प परिमाणवाला म्हणणे उचित नाही.


व्याख्या - मनुष्याच्या हृदयाचे माप अंगुष्ठासमान मानले गेले आहे. त्यात जीवात्म्याच्या बरोबर परमात्म्याच्या प्रविष्ट होण्याची गोष्ट श्रुतिमध्ये या प्रकार सांगितली आहे - ’तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्’ (तै. उप २.६) - परमात्मा त्या जडदेतनात्मक संपूर्ण जगताची रचना करून स्वतःही जीवात्म्याबरोबर त्यात प्रविष्ट झाला. ’सेयं देवतेमास्तिस्रो देवता अनेनैव जीवेनात्मनानुप्रविश्य नामरूपे व्याकरोत्’ (छा. उप ६.३.३.) - त्या परमात्म्याने त्रिविध तत्त्वरूप देवता अर्थात त्याचे कार्यरूप मनुष्य-शरीरात जीवात्म्यासहित प्रविष्ट होऊन नामरूपाचा विस्तार केला. तसेच ’ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे’ (कठ. उप १.३.१) - शुभकर्मांच्या फलरूप मनुष्य शरीरात परब्रह्माच्या निवासस्थानरूप हृदयाकाशाच्या अन्तर्गत बुद्धिरूप गुहेत लपलेले सत्याचे पान करणारे दोघे (जीवात्मा व परमात्मा) आहेत - इत्यादि. इथे परमात्म्याने जीवात्म्याचे अनुकरण केलेले दाखविले आहे आणि म्हणून त्याला अल्प परिमाणवाला दाखविणे उचित आहे, आणि या भावानुसार श्रुतिमध्ये ठीकठिकाणी परमात्म्याचे स्वरूप ’अणोरणीयान्’ तसेच ’महतो महीयान्’ असे दर्शविले आहे.
संबंध - यासाठी श्रुतिंचे प्रमाण -


अपि च स्मर्यते ॥ १.३.२३ ॥


अर्थ - अपि च = याशिवाय; स्मर्यते च = हेच स्मृतिंमध्ये सांगितले आहे.


व्याख्या - परब्रह्म परमेश्वर सर्वांच्या हृदयात स्थित आहे आणि तो लहानाहून लहान आहे असे वर्णन श्रुतिमध्ये इतरत्र आलेले आहे. ’सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टः’ (गीता १५.१५), ’हृदि सर्वस्य विष्ठितम् (गीता १३.१७), ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति (गीता १८.६१), अविभक्तं भूतेषु विभक्तमिव च स्थितम् (गीता १३.१६), ’अणोरणीयांसम् (गीता ८.९) इत्यादि ठिकाणी असे वर्णन असल्यामुळे त्या सर्वव्यापी परब्रह्म परमेश्वरास स्थानापेक्षाही लहान आकाराचे म्हणणे उचितच आहे. म्हणून ’दहर’ शब्दाने परब्रह्म परमेश्वराचेच वर्णन आहे, जीवात्म्याचे नाही.
संबंध - उपर्युक्त विवेचन वाचून अशी जिज्ञासा उत्पन्न होते की कठोपनिषद् (२.१.१२ व १३ तथा २.३.१७) मध्ये ज्यास अंगुष्ठमात्र म्हटले आहे, तो जीवात्मा आहे का परमात्मा ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


शब्दादेव प्रमितः ॥ १.३.२४ ॥


अर्थ - शब्दात् = उक्त प्रकरणात आलेल्या शब्दानें; एव = ही (हेच सिद्ध होत आहे की; प्रमितः = अंगुष्ठमात्र परिमाणाचा पुरुष परमेश्वरच आहे.


व्याख्या - कठोपनिषदांत म्हटले आहे - ’अंगुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति’ (कठ उप २.१.१२) तथा ’अंगुष्ठमात्रः पुरुषो ज्योतिरिवाधूमकः, ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उ श्वः’ (कठ उप २.१.१३) - अंगठ्याच्या मापाचा परमपुरुष शरीराच्या मध्यभागात (हृदयात) स्थित आहे, तथा अंगठ्याच्या मापाचा परम पुरुष धूमरहित ज्योतिप्रमाणे एकरस आहे. तो भूत भविष्य, वर्तमानावर शासन करणारा आहे. तो आजही आहे, आणि उद्याही असेल, अर्थात् तो नित्य सनातन आहे. या प्रकरणात ज्याला अंगठ्याच्या मापाचा पुरुष म्हटले आहे तो परब्रह्म परमात्माच आहे, ही गोष्ट याच मंत्रात सांगितलेल्या शब्दांनी सिद्ध होत आहे, कारण तेथे त्या पुरुषास भूत, वर्तमान आणि भविष्यात होणार्‍या समस्त प्रजेचा शासक, धूमरहित अग्निसदृश एकरस आणि सदा राहणारा म्हटले गेले आहे. तथा पुढे त्यालाच विशुद्ध अमृतस्वरूप जाणण्यासही सांगितले आहे (२.३.१७).
संबंध - आता ही जिज्ञासा उत्पन्न होते ही त्या परमात्म्यास अंगुष्ठ मापाचा का म्हटले आहे ? यावर सांगतात -


हृद्यपेक्षया तु मनुष्याधिकारत्वात् ॥ १.३.२५ ॥


अर्थ - तु = त्या परमपुरुषास अंगुष्ठ मापाचे म्हणणे तर; हृदि = हृदयात स्थित म्हटले जाण्याची; अपेक्षया = अपेक्षेने आहे; मनुष्याधिकारत्वात् = कारण ब्रह्मविद्येत मनुष्यच अधिकारी आहे.


व्याख्या - उपनिषदात वर्णित ब्रह्मविद्येच्या द्वारा ब्रह्मास जाणण्याचा अधिकार मनुष्यासच आहे. अन्य पशुपक्षी आदि अधम योनिमध्ये हा जीवात्मा त्या परब्रह्म परमात्म्यास जाणू शकत नाही. आणि मनुष्याच्या हृदयाचे माप अंगुष्ठाबरोबर मानले गेले आहे. यामुळे येथे मनुष्य हृदयमापाच्या अपेक्षेने त्या परब्रह्म परमात्म्यास अंगुष्ठमात्र पुरुष म्हटले गेले आहे.
संबंध - पूर्वसूत्रात अधिकाराचा विषय आला असल्याने प्रसंगानुसार दुसरे प्रकरण सुरू झाले. आधी सांगितले गेले आहे की वेदाध्ययनपूर्वक ब्रह्मविद्येच्या द्वारे ब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचा अधिकार मनुष्यालाच आहे. यावर जिज्ञासा उत्पन्न होते की काय मनुष्यास सोडून अन्य कुणालाही अधिकार नाही का ? यावर सांगतात -


तदुपर्यपि बादरायणः संभवात् ॥ १.३.२६ ॥


अर्थ - बादरायणः = आचार्य बादरायण म्हणतात की; तदुपरि = मनुष्याहून श्रेष्ठ देवता आदि आहेत त्यांचा; अपि = ही अधिकार आहे; सम्भवात् = कारण त्यांना वेदज्ञानपूर्वक ब्रह्मज्ञान होणे संभवनीय आहे.


व्याख्या - मनुष्याहुन नीचमध्ये तर वेदविद्या शिकून त्याद्वारे परमात्मज्ञान प्राप्त करण्याचे सामर्थ्यच नाही, म्हणून त्यांना अधिकार नाही असे म्हणणे संयुक्तिक आहे. परंतु देवादि योनि मनुष्याहून श्रेष्ठ आहेत. जो मनुष्य धर्म व ज्ञान यथार्थपणे जाणतो त्याला देवादि योनि प्राप्त होतात. म्हणून त्यास पूर्वजन्माच्या अभ्यासाने ब्रह्मविद्या जाणण्याचे सामर्थ्य असतेच. म्हणून साधन केल्यावर त्यांना ब्रह्मज्ञान होणे संभव आहे. एवं भगवान बादरायणाचे म्हणणे आहे की मनुष्याहून श्रेष्ठ योनिसही ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा अधिकार आहे.
संबंध - उपरोक्त वचनाच्या सिद्धीसाठी सूत्रकार स्वतः शंका उपस्थित करून तिचे समाधान करतात -


विरोधः कर्मणीति चेन्नानेकप्रतिपत्तेर्दर्शनात् ॥ १.३.२७ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल देवता आदिंना शरीरधारी मानल्यामुळे; कर्माणि = यज्ञादि कर्मात; विरोधः = विरोध येतो; इति न = तर असे म्हणणे योग्य नाही; अनेक प्रतिपत्तेः = कारण त्यांच्या द्वारा एकाच समयी अनेक रूपे धारण करणे संभवनीय आहे; दर्शनात् = असे शास्त्रात आढळून येते.


व्याख्या - जर देवता आदिंना मनुष्यांप्रमाणे विशेष आकृतियुक्त अथवा शरीरधारी मानले तर त्या देवताही एका देशात राहणार्‍या मानल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत एकाच समयी अनेक यज्ञात त्यांच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या हविष्याहुति त्या कशा ग्रहण करू शकतात ? म्हणून अनेक याज्ञिकांच्या द्वारा पण विभिन्न ठिकाणी एकाच समयी यज्ञादि कर्मात जो त्यांच्यासाठी हवि समर्पित करण्याचे विधान आहे, त्यात विरोध येईल. विरोधाची निवृत्ति तेव्हाच होऊ शकते जेव्हा देवतांना एकदेशी न मानता व्यापक मानले जाईल. पण अशी शंका घेण्याचे कारण नाही. कारण देवांमध्ये अनेक विग्रह धारण करण्याची शक्ति असते. म्हणून देवही योग्यांप्रमाणे एकाच काळी अनेक शरीरे धारण करून अनेक स्थानी एकाच वेळी त्यांच्यासाठी समर्पित केलेल्या हविचे ग्रहण करू शकतात. शास्त्रातही देवतांसंबंधी असे वर्णन आढळून येते. बृहदारण्यकोपनिषदात (३-९-१ व २) एक प्रसंग येतो ज्यात शाकल्य - याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे. शाकल्याने विचारले, ’देवता किती आहेत ?’ याज्ञवल्क्य म्हणाले, ’तीन आणि तिनशे तथा तीन आणि तीन सहस्र.’ परत प्रश्न केला, ’देवता किती आहेत ?’ याज्ञवल्क्य म्हणाले ’तेहतीस’ वारंवार हाच प्रश्न झाल्यामुळे याज्ञवल्क्य म्हणाले - ’हा सर्व त्यांचा महिमा आहे. अर्थात ते एक एक असूनही अनेक होतात. वास्तविक देवता तेहेतीसच आहेत’ इत्यादि. या प्रकारे श्रुतिने देवतांमध्ये अनेक रूपे धारण करण्याच्या शक्तिचे वर्णन केले आहे. योग्यांमध्येहे अशी शक्ति आढळून येते म्हणून यांत काही विरोध नाही.
संबंध - देवतांनाही शरीरधारी मानल्यास त्यांना विनाशशील मानावे लागेल. अशा परिस्थित्त वेदांमध्ये ज्या ज्या देवतांचे वर्णन आहे त्यांची नित्यता सिद्ध होणार नाही आणि म्हणून वेदांनाही नित्य आणि प्रमाणभूत मानणे शक्य होणार नाही. या विरोधाचा परिहार कसा होईल ? अशी जिज्ञासा उत्पन्न झाल्यास सांगतात -


शब्द इति चेन्नातः प्रभवात् प्रत्यक्षानुमानाभ्याम् ॥ १.३.२८ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; शब्दे = देवतांना शरीरधारी मानण्याने वैदिक विधानात विरोध येतो; इति न = तर असे म्हणणे योग्य नाही; अतः प्रभवात् = कारण या वेदोक्त शब्दानेच देवता आदि जगताची उत्पत्ति होते; प्रत्यक्षानुमानाभ्याम् = ही गोष्ट प्रत्यक्ष (वेद) आणि अनुमान (स्मृति) दोन्ही प्रमाणांनी सिद्ध होते.


व्याख्या - देवतांमध्ये अनेक शरीरे धारण करण्याची शक्ति मानण्याने कर्मात विरोध येत नाही हे ठीक आहे. परंतु असे मानण्याने जे वेदोक्त शब्दांना नित्य एवं प्रमाणभूत मानले जाते त्यात विरोध येईल. कारण शरीरधारी असल्याने देवतांनाही जन्म-मरणशील मानावे लागेल. अशा परिस्थितीत त्या नित्य ठरणार नाहीत तथा नित्य वैदिक शब्दांबरोबर त्यांच्या नाम-रूपांचा नित्य संबंधही मानू शकणार नाही. अशी शंका घेणे उचित नाही. कारण जेथे कल्पाच्या आदि देवादिकांच्या उत्पत्तिचे वर्णन येते, तेथे असे म्हटले आहे की, ’कुठल्या रूप आणि ऐश्वर्यशाली देवतेचे काय नाम असेल’. या प्रकारे वेदोक्त शब्दानेच त्यांच्या नाम, रूप आणि ऐश्वर्य आदिंची कल्पना केली जाते. अर्थात पूर्वकल्पात ज्या ज्या देवता ज्या ज्या नाम-रूप, ऐश्वर्य यांनी युक्त होत्या, वर्तमान कल्पातही तितक्याच देवता त्याच नाम, रूप आणि ऐश्वर्यांनी युक्त उत्पन्न केल्या जातात. यावरून हे ज्ञान होते की कल्पांतरात देवता आदिंचे जीव तर बदलले जातात, परंतु नाम-रूप पूर्व कल्पानुसारच राहतात. ही गोष्ट प्रत्यक्ष श्रुति आणि अनुमान (स्मृति) यांच्या प्रमाणानेही सिद्ध होते. श्रुति आणि स्मृति यांत उपर्युक्त वर्णन येते - ’स भूरिति व्याहरत् स भूमिमसृजत्’ ’सभुवरिति व्याहरत् सोऽन्तरिक्षमसृजत्’ (तै. ब्रा. २.२.४) - त्याने मनातल्या मनात ’भूः’ चे उच्चारण केले, नंतर भूमिची सृष्टि केली. त्याने मनातल्या मनात ’भुवः’ चे उच्चारण केले आणि अन्तरिक्षाची सृष्टि केली, इत्यादि. या वर्णनावरून सिद्ध होते की प्रजापतिने प्रथम वाचक शब्दांचे स्मरण करून त्याच्या अर्थभूत स्वरूप निर्माण केले. या प्रकारे स्मृतिमध्ये म्हटले आहे - ’सर्वेषां स तु नामानि कर्माणि च पृथक् पृथक् । वेदशब्देभ्य एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे ॥ (मनु १.२१) - त्या सृष्टीकर्त्या परमात्म्याने सृष्टीच्या प्रारंभी प्रथम सर्वांची नावे आणि वेगवेगळी कर्मे तसेच त्या सर्वांची वेदोक्त शब्दांच्या अनुरूप वेगवेागळी व्यवस्था बनविली.
संबंध - उपरोक्त कथनासही वेदाच्या नित्यतेत हेतु सांगतात -


अतएव च नित्यत्वम् ॥ १.३.२९ ॥


अर्थ - अतएव = यामुळे; नित्यत्वम् = वेदांची नित्यता; = ही (सिद्ध होते).


व्याख्या - सृष्टीकर्ता परमेश्वर वैदिक शब्दांना अनुसरूनच सर्व जगताची रचना करतो असे सांगितले. यावरून वेदांची नित्यता सिद्ध होते. कारण प्रत्येक कल्पात परमेश्वराद्वारा वेदही नवनिर्मित केले जातात असे कुठेही सांगितलेले नाही.
संबंध - प्रत्येक कल्पात देवतांची नाम-रूपे बदलली गेल्याने वेदोक्त श्बदांच्या नित्यतेत विरोध कसा येणार नाही ? या शंकेवर म्हणतात -


समाननामरूपत्वाच्चावृत्तावप्यविरोधो दर्शनात् स्मृतेश्च ॥ १.३.३० ॥


अर्थ - च = तथा; समाननामरूपत्त्वात् = (कल्पान्तरात उत्पन्न होणार्‍या देवादिकांचे) नाम-रूप पहिल्यासारखेच असते या कारणाने; आवृत्तौ = पुनरावृत्ति झाल्यावर; अपि = ही; अविरोधः = कुठल्याही प्रकारचा विरोध नाही; दर्शनात् = कारण श्रुति व स्मृतिमध्ये असेच वर्णन आढळून येते.


व्याख्या - वेदात सांगितले गेले आहे की ’सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् । (ऋ. १०.१९०.३) - जगत्‌स्रष्टा परमेश्वराने सूर्य, चन्द्रमा आदि सर्वांना पूर्वीप्रमाणेच बनविले. श्वेताश्वतरोपनिषदात् ६.१८ येथे म्हटले आहे - यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदाँश्च प्रहिणोति तस्मै । तँ ह देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये ॥ - जो परमेश्वर निश्चितच सृष्टीकाळी प्रथम ब्रह्मदेवास उत्पन्न करतो आणि त्यांना समस्त वेदांचा उपदेश देतो, त्या आत्मज्ञानविषयक बुद्धीस प्रकट करणार्‍या प्रसिद्ध परमेश्वरास मी मुमुक्षुभावाने शरण आलो आहे. अशा प्रकारेच स्मृतीत म्हटले आहे - तेषां ये यानि कर्माणि प्राक्‌सृष्ट्यां प्रतिपेदिरे । तान्येव ते प्रपद्यन्ते सृज्यमानाः पुनः पुनः ॥ (महाभारत १२.२३२.१६) - पूर्वकल्पाच्या सृष्टीत ज्यांनी ज्यांनी जी जी कर्में स्वीकारली होती, नंतरच्या सृष्टीमध्ये निर्माण केलेले ते प्राणी परत परत त्याच कर्मांना प्राप्त होतात.
या प्रकारे श्रुति-स्मृति यांतील वर्णनांवरून हे सिद्ध होते की कल्पांतर भेदाने उत्पन्न होणार्‍या देवादिकांची नाम-रूपे पहिल्यासारखीच वेद-वचनानुसार रचली जातात. त्यांची वारंवार आवृत्ति होत राहते; म्हणून वेदांचे नित्यत्व व प्रमाणत्व यात कोणत्याही प्रकारचा विरोध येत नाही.
संबंध - २६ व्या सूत्रात प्रसंगानुरूप म्हटले गेले की ब्रह्मविद्येत देवादिकांचा अधिकार आहे असे वेदव्यास मानतात. ३० व्या सूत्रापर्यंत त्याची पुष्टीही केली. पण आचार्य जैमिनिंच्या मतानुसार ब्रह्मविद्येत देवता आदिंचा अधिकार नाही -


मध्वादिष्वसम्भवादनधिकारं जैमिनिः ॥ १.३.३१ ॥


अर्थ - जैमिनि = जैमिनि नामक आचार्य; मध्वादिषु = मधुविद्या आदिमध्ये; अनधिकारम् = देवता आदिंचा अधिकार नाही असे म्हणतात; असम्भवात् = कारण हे संभवनीय नाही.


व्याख्या - छांदोग्य उपनिषदाच्या तिसर्‍या अध्यायात १ ते ११ खण्डापर्यंत मधुविद्येचे प्रकरण आहे. तेथे सूर्यास देवतांचा ’मधु’ म्हटले आहे. मनुष्यांसाठी साधनेद्वारा प्राप्त होणारी वस्तू देवतांना स्वतः प्राप्त आहे या कारणाने देवतांसाठी मधुविद्या अनावश्यक आहे, म्हणून त्यात त्यांचा अधिकार मानणे संभवनीय नाही. याप्रकारे स्वर्गादि देवलोकांच्या प्राप्तीसाठी वेदात ज्या यज्ञादिद्वारा देवतांच्या सकाम उपासनेचे वर्णन आहे त्याचे अनुष्ठानही देवतांसाठी अनावश्यक असल्याने त्यांच्या द्वारा केले जाणे संभवनीय नाही. म्हणून त्यांचा अधिकार नाही. म्हणून असे सिद्ध होते की मनुष्यासाठी यज्ञादि कर्मद्वारा स्वर्गादिची प्राप्ती करविणार्‍या वेदवर्णित विद्येमध्ये देवतांचा अधिकार नाही. त्याचप्रकारे ब्रह्मविद्येतही त्यांचा अधिकार नाही, असे आचार जैमिनिंचे म्हणणे आहे.
संबंध - याच्या पुष्टीसाठी आचार्य जैमिनि आणखी एक युक्ति सांगतात -


ज्योतिषि भावाच्च ॥ १.३.३२ ॥


अर्थ - ज्योतिषि = ज्योतिर्मय लोकात; भावात् = देवतांची स्थिति असल्यामुळे; = देखील त्यांचा यज्ञादि कर्म, ब्रह्मविद्येमध्ये अधिकार नाही.


व्याख्या - त्या देवता स्वाभाविकच ज्योतिर्मय देवलोकात निवास करतात. तेथे स्वभावतःच त्यांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त आहे. नवीन कर्मांच्याद्वारा त्यांना कुठल्याही प्रकारचे नूतन ऐश्वर्य प्राप्त करावयाचे नाही. म्हणून लोकलोकांच्या प्राप्तीसाठी सांगितलेल्या कर्मांत त्यांची प्रवृत्ति संभवनीय नाही. म्हणून ज्याप्रकारे वेदविहित अन्य विद्यांमध्ये त्यांना अधिकार नाही त्याचप्रकारे ब्रह्मविद्येतही नाही.
संबंध - पूर्वोक्त दोन सूत्रात जैमिनिच्या मतानुसार पूर्वपक्षाची स्थापना झाली. आता त्याच्या उत्तरात सूत्रकार आपले निश्चित मत सांगून देवतांचा अधिकार विषयक प्रकरण समाप्त करतात -


भावं तु बादरायणोऽस्ति हि ॥ १.३.३३ ॥


अर्थ - तु = परंतु; बादरायणः = बादरायण आचार्य यज्ञादि कर्म तसेच ब्रह्मविद्येमध्ये; भावं (मन्यते = देवादिकांचा भाव (अस्तित्व) मानतात; हि = कारण; अस्ति = श्रुतिंमध्ये त्यांच्या अधिकाराचे वर्णन आहे.


व्याख्या - आचार्य बादरायण आपल्या मताचे दृढपणे प्रतिपादन करताना ’तु’ या अव्यय पदाद्वारे सूचित करतात की पूर्वपक्षाचे मत शब्दप्रमाणरहित असल्याने मान्य नाही. निश्चितच यज्ञादि कर्म व ब्रह्मविद्येमध्ये देवतांचाही अधिकार आहे. कारण वेदात त्यांना हा अधिकार सूचित करणारी वचने दिसतात. जसे - ’प्रजापतिरकामयत प्रजायेयेति स एतदग्निहोत्रं मिथुनमपश्यत् । तदुदिते सूर्येऽजुहोत्’ (तै. ब्रा. २.१.२.८) तसेच ’देवा वै सत्रमासत् । (तै. सं २.३.३) - ’प्रजापतीने इच्छा केली की मी उत्पन्न होईन, उत्तम प्रकारे जन्म ग्रहण करेन. त्यांनी अग्निहोत्ररूप मिथुनावर दृष्टिपात केला आणि सूर्योदय झाल्यावर त्याचे हवन केले. तसेच निश्चितच देवतांनी यज्ञाचे अनुष्ठान केले’ इत्यादि वचनांद्वारा देवतांचा कर्माधिकार सूचित होत आहे. याप्रकारे ब्रह्मविद्येतही देवतांचा अधिकार दाखविणारी वचने आहेत - ’तद् यो देवानां प्रत्यबुध्यत स एव तदभवत्’ (बृह. उ. १.४.१०) - देवतांपैकी ज्यांनी त्या ब्रह्मास जाणले आहे त्या तेच (म्हणजे ब्रह्म) झाल्या, इत्यादि. याव्यतिरिक्त छान्दोग्य उप ८.७.२ ते ८.१२.६ पर्यंत असा प्रसंग येतो की इंद्र आणि विरोचनाने ब्रह्मदेवांच्या सेवेत राहून, अनेक वर्षे ब्रह्मचर्य पालन करून तद्‌नंतर ब्रह्मविद्या प्राप्त केली. या सर्व प्रमाणांवरून हेच सिद्ध होते की देवादिकांना देखील कर्माचा आणि ब्रह्मविद्येचा अधिकार आहे.
संबंध - एक शंका - कोणत्याही वर्णाच्या मनुष्यास ब्रह्मविद्येचा अधिकार आहे काय ? कारण छान्दोग्य उपनिषदात म्हटले आहे की रैक्वाने राजा जानश्रुतिला ’शूद्र’ असे संबोधूनही त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश केला. यावरून दिसते की शूद्रालाही ब्रह्मविद्येचा अधिकार आहे. याच्या निर्णयासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ होत आहे -


शुगस्य तदनादरश्रवणात्तदाद्रवणात् सूच्यते हि ॥ १.३.३४ ॥


अर्थ - तदनादरश्रवणात् = त्या हंसांच्या मुखाने आपला अनादर ऐकूनही; अस्य = राजा जानश्रुतीच्या मनात; शुक् = शोक उत्पन्न झाला; तद् = त्यानंतर; अद्रवणात् = ज्यांच्या तुलनेत आपली तुच्छता ऐकून शोक झाला होता, त्या रैक्वमुनिंकडे तो विद्या प्राप्तीसाठी धावत गेला (या कारणाने रैक्वाने त्यास शूद्र म्हणून संबोधले); हि = कारण यामुळे; सूच्यते = रैक्वमुनिंची सर्वज्ञता सूचित होते.


व्याख्या - या प्रकरणात रैक्वाने राजा जानश्रुतिस जे ’शूद्र’ म्हणून संबोधित केले, याचा अर्थ असा नव्हे की तो शूद्र जातीचा होता. तो शोकाने व्याकुळ होऊन धावत आला म्हणून त्याला शूद्र म्हटले होते. [शुचम् आद्रवति इति शूद्रः - जो शोकाने व्याकुळ होतो तो शूद्र]
छां. उप. ४.१.१ ते ४ मधेल प्रकरण असे आहे - ’राजा जानश्रुति श्रद्धापूर्वक दानधर्म करणारा होता. अतिथींसाठी तो नेहमी भरपूर अन्न तयार ठेवीत असे. अतिथींच्या निवासासाठीही त्याने अनेक विश्रामस्थाने बनविली होती. एका रात्री राजा जानश्रुति आपल्या महालाच्या गच्चीवर बसला होता. त्याचवेळी काही हंस आकाशात उडत जात होते. त्यांतील एक हंस दुसर्‍यास म्हणाला - ’जरा जपून हं, राजा जानश्रुतिचे महान् तेज आकाशातही पसरलेले आहे. चुकून स्पर्श झाला तर तू भस्मसात होशील.’ दुसरा म्हणाला - ’कोणत्या महिमेच्या कारणाने तू या राजाला एवढा महान समजत आहेस ? तू याला त्या गाडीवाल्या रैक्वाच्या समान समजतोस की काय ?’ पहिला हंस म्हणाला - ’म्हणजे हा रैक्व आहे तरी कसा ?’ दुसरा हंस म्हणाला - ’ही सर्व प्रजा जे काही शुभ कर्म करते, ती सर्व त्या रैक्वाला प्राप्त होतात, तसेच जे तत्त्व तो रैक्व जाणतो, ते तत्त्व जो कोणी जाणेल, त्याचीही महत्ता या रैक्वासारखीच असेल.’ या प्रकारे हंसांनी राजा जानश्रुतिला रैक्वाच्या तुलनेत तुच्छ मानले आणि म्हणून राजा शोकाने व्याकुळ झाला. ताबडतोब राजा जानश्रुतिने रैक्वाचा शोध घेऊन विद्याप्राप्तीसाठी त्याजकडे गेला. रैक्व सर्वज्ञ होताच. त्याने राजाची स्थिती जाणली. राजाच्या मनांतील रैक्वासंबंधी ईर्षा जाणून त्याला सावधान करण्यासाठी त्याला ’शूद्र’ असे म्हटले. राजा जानश्रुति क्षत्रिय होता हे रैक्व जाणत असूनही जेव्हा तो त्याला शूद्र म्हणतो त्याचे कारण राजा शोकाला वश झाला होता आणि म्हणून आगतिकतेने त्याच्याकडे त्वरित आला होता. यावरून शूद्राला वेदविद्येचा अधिकार आहे हे सिद्ध होत नाही.
संबंध - राजा जानश्रुतिचे क्षत्रिय असणे हे कसे काय सिद्ध होते ? यावर म्हणतात -


क्षत्रियत्वावगतेश्चोत्तरत्र चैत्ररथेन लिङ्गात् ॥ १.३.३५ ॥


अर्थ - क्षत्रियत्वावगतेः = प्रकरणात दिसलेल्या लक्षणांवरून राजा क्षत्रिय असणे जाणले जाते; = तसेच; उत्तरत्र = पुढे आलेल्या; चैत्ररथेन = चैत्ररथाच्या संबंधावरून; लिङ्गात् = क्षत्रियत्वसूचक जी प्रमाणे दिसतात त्यावरून तो क्षत्रिय असणे जाणले जाते.


व्याख्या - या प्रकरणात राजा जानश्रुति श्रद्धापूर्वक पुष्कळ दानधर्म करणारा, अतिथींच्या सत्कारानिमित्त त्यांच्यासाठी अन्न व निवार्‍याचा प्रबंध करणारा, इत्यादि वरून त्यास राजोचित ऐश्वर्य प्राप्त होते हे दिसून येते. तसेच पुढे आले आहे की राजाने आपली कन्या रैक्वास पत्‍नीरूपाने दिली. या लक्षणांवरून दिसते की राजा क्षत्रिय होता, शूद्र वर्णाचा नव्हता. यावरून शूद्र देखील वेदविद्येचा अधिकारी आहे हे सिद्ध होत नाही. या व्यतिरिक्त याच प्रकरणाच्या उत्तर भागात रैक्वाने वायु व प्राण यांना सर्वभक्षक असे सांगून त्यांच्या स्तुतिप्रित्यर्थ एक आख्यायिका सांगितली. त्यात म्हटले आहे - ’शौनक आणि अभिप्रतारी चैत्ररथ या दोघांना जेव्हां भोजन वाढत असतां एक ब्रह्मचारी भिक्षा मागण्यास आला - वगैरे’ या आख्यायिकेत शौनक आणि चैत्ररथ राजा जानश्रुतिकडे भोजन करीत होते. शौनक ब्राह्मण होता आणि चैत्ररथ क्षत्रिय होता. हे दोघे शूद्राकडे कसे बरे भोजन करतील ? एवं वेदविद्येमध्ये शूद्राला अधिकार नाही हेच सिद्ध होते.
संबंध - आता दुसरे एक प्रमाण देतात -


संस्कारपरामर्शात्तदभावाभिलापाच्च ॥ १.३.३६ ॥


अर्थ - संस्कारपरामर्शात् = श्रुतिप्रमाणानुसार वेदविद्या ग्रहण करण्यासाठी उपनयनादि संस्कार होणे आवश्य आहे म्हणून; = तसेच; तदभावाभिलापात् = शूद्रांसाठी हे संस्कार वर्ज्य मानले आहेत म्हणूनही (शूद्रास वेदविद्येचा अधिकार नाही).


व्याख्या - उपनिषदांत जेथे जेथे वेदविद्येच्या अध्ययनाचा प्रसंग आला आहे तिथे सर्वत्र असे दिसून येते की आचार्य शिष्यावर आधी उपनयनादि संस्कार करतात आणि मग वेदविद्येचा उपदेश करतात. जसे - ’तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद् यैस्तु चीर्णम् । (मु. उप. ३.२.१०) - ब्रह्मविद्येचा उपदेश त्यांनाच करावा ज्यांनी विधिपूर्वक उपनयनादि संस्कार करवून ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले आहे.’ ’उप त्वा नेष्ये’ (छां. उप. ४.४.५) - ’ये तुझे उपनयन करतो.’ ’तँ होपनिन्ये’ (श. ब्राम् ११.५.३.१३) ’त्याच्यावर उपनयन संस्कार केला.’ इत्यादि. यावरून वेदविद्येसाठी उपनयनादि संस्कार नितांत आवश्यक मानले आहेत पण या संस्कारांचे विधान (उल्लेख) शूद्रांसाठी केल्याचे कोठे आढळून येत नाही. यावरून स्पष्टच आहे की शूद्रासाठी वेदविद्येचा अधिकार नाही.
संबंध - आणखी एक कारण -


तदभावनिर्धारणे च प्रवृत्तेः ॥ १.३.३७ ॥


अर्थ - तदभावनिर्धारणे = शूद्रामध्ये आढळणारे दोष शिष्यामध्ये नाहीत हे निश्चित करण्यासाठी; प्रवृत्तेः = आचार्यांमध्ये प्रवृत्ति दिसून येते; = ही (यावरून हेच सिद्ध होते की वेदाध्ययनाचा शूद्रास अधिकार नाही.)


व्याख्या - जानश्रुति व रैक्वाच्या कथेनंतर (त्याच उपनिषदात) सत्यकाम जाबाल संबंधी प्रसंग आला आहे. जाबालपुत्र सत्यकामाने गौतम नामक आचार्यांना शरण जाऊन म्हटले - ’भगवन् ! ब्रह्मचर्याचे पालन करून मी आपल्या सेवेत उपस्थित झालो आहे.’ आचार्य गौतमांनी त्याची जात जाणण्याच्या हेतूने विचारले, ’तुझे गोत्र कोणते ?’ त्याने स्पष्ट शब्दात सांगितले, ’मी गोत्र जाणत नाही. मी आईलाही त्या संबंधी विचारले असता तिने सांगितले की, मलाही गोत्र माहीत नाही. मी फक्त एवढेच जाणते की माझे नाव जाबाला आणि तुझे नाव सत्यकाम.’ मी एवढेच म्हणू शकतो की मी जाबालापुत्र सत्यकाम आहे. आचार्य म्हणाले, इतके स्पष्ट आणि सत्य भाषण केवळ ब्राह्मणच करू शकतो, अन्य कोणी नाही. सत्यभाषण या गुणावरून आचार्यांनी निश्चित केले की सत्यकाम ब्राह्मण आहे, शूद्र नाही व त्यास समिधा आणण्याचा आदेश देऊन त्याचा उपनयन संस्कार केला. (छां. उप. ४.४.३-५) आचार्यांनी आधी सत्यकाम शूद्र नाही, ब्राह्मण आहे हे निश्चित झाल्यावरच त्याचा उपनयन संस्कार करवून त्यास वेदाध्ययनाचा अधिकार प्रदान केला. यावरून हे स्पष्ट होते की शूद्रास वेदाध्ययनाचा अधिकार नाही.
संबंध - शूद्रास वेदविद्येसंबंधी अधिकाराचा निषेध सांगतात -


श्रावणाध्ययनार्थप्रतिषेधात् स्मृतेश्च ॥ १.३.३८ ॥


अर्थ - श्रावणाध्ययनार्थप्रतिषेधात् = शूद्रास वेदांचे श्रवण, अध्ययन व अर्थज्ञान यांचा निषेध केला आहे; च = तसेच; स्मृतेः = स्मृतिप्रमाणानेही निषेध सांगितला आहे.


व्याख्या - स्मृतिमध्येही शूद्रास वेदांचे श्रवण, अध्ययन व अर्थज्ञान यांचा निषेध केला आहे. जसे - ’एतच्छ्मशानं यच्छूद्रस्तस्माच्छूद्रस्य समीपे नाध्येतव्यम् । - जो शूद्र आहे, श्मशानवत अयोग्य आहे त्याच्या समीपही वेदाध्ययन करू नये’ यावरून शूद्रास वेद श्रवणाचा निषेध सांगितला आहे. जर श्रवणाचाही अधिकार नाही तर अध्ययन, अर्थज्ञानाचा निषेध सांगण्याची आवश्यकताच नाही. यावरून हेच सिद्ध होते की शूद्रास वेदाध्ययनाचा अधिकार नाही. पराशर स्मृतीत एक वचन आहे - ’वेदाक्षरविचारेण शूद्रः पतति तत्क्षणात् (१.७३) - वेदोक्त शब्दांचा अर्थ समजण्याच्या विचारानेही शूद्र तत्काल पतीत होतो.’ मनुस्मृतीत म्हटले आहे - ’न शूद्राय मतिं दद्यात् (४.८०) - शूद्रास वेदविद्या प्रदान करू नये.’ याचप्रमाणे श्रुति-स्मृतिंमध्ये ठिकठिकाणी शूद्रास वेदाध्ययनाचा निषेध सांगितला आहे. इतिहास ग्रंथामध्ये जिथे विदुर आदि शूद्रजातीय सत्पुरुषांना ज्ञानप्राप्तीचे उल्लेख आहेत, त्याचा भाव असा आहे की इतिहास-पुराणांचे श्रवण पठण करण्यास चारही वर्णांना अधिकार आहे. इतिहास-पुराण ग्रंथांद्वारे शूद्रदेखील परमात्मतत्त्व जाणू शकतो. याद्वारे त्यालाही भक्ति व ज्ञानप्राप्ती होऊ शकते. फलप्राप्तीसंबंधी विरोध नाही, कारण भक्तिद्वारे परमगति प्राप्त करणे हा मनुष्यजातीचा अधिकारच आहे (गीता ९.३२)
संबंध - येथपर्यंतच्या प्रकरणात प्रसंगवशात प्राप्त झालेल्या अधिकारविषयक वर्णन पूर्ण करून हे सिद्ध केले की ब्रह्मविद्येत देवादिकांना अधिकार आहे आणि शूद्रास अधिकार नाही. आता हा विषय समाप्त करून पुन्हा पूर्वोक्त अंगुष्ठमात्र पुरुषाच्या स्वरूपावर विचार केला जात आहे -


कम्पनात् ॥ १.३.३९ ॥


अर्थ - (पूर्वोक्त अंगुष्ठमात्र पुरुष परमात्माच आहे) कम्पनात् = कारण त्यातच संपूर्ण जग व्यवहार करत आहे आणि त्याच्या भयाने सर्व कापत असतात.


व्याख्या - कठोपनिषदाच्या दुसर्‍या अध्यायात प्रथम वल्लीपासून तृतीय वल्लीपर्यंत अंगुष्ठवान पुरुषाचे प्रकरण आले आहे. (पहा - २,१,१२-१३ आणि २.३.१७ चे मंत्र) इथे अंगुष्ठमात्र पुरुष वर्णन करताना परमेश्वराच्या प्रभावाचे वर्णन केले आहे, आणि पुढे म्हटले आहे - "यदिदं किं च जगत् सर्वं प्राण एजति निःसृतम् । महद्‌भयं वज्रमुद्यतं य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति ॥ कठ. उप २.३.२ ॥ - त्या परमात्म्यापासून झालेले हे जे काही संपूर्ण जगत् आहे, ते प्राणस्वरूप ब्रह्मामध्येच सर्व व्यवहार करते. महान वज्रासमान सर्वशक्तिमान अशा त्या परमेश्वरास जो जाणतो तो अमर होतो." पुढे म्हटले आहे - "भयादस्याग्निस्तपति भयात्तपति सूर्यः । भयाद् इन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चमः ॥ कठ. उप २.३.३ ॥ - त्याच्या भयानेच अग्नि, सूर्य, इंद्र, वायु तथा मृत्यू आपापले काम करतात." या वर्णनावरून अगदी स्पष्ट होते की अंगुष्ठमात्र पुरुष ’ब्रह्म’च आहे. कारण जगतातील सर्व व्यवहार होत असताना ज्याच्या भयाने कंपित होऊन सर्व देवता आपापल्या कार्यात रत असतात तो प्राण वा इंद्र असू शकत नाही. उलट वायु व इंद्र त्याच्या आज्ञा पालनात कसूर राहू नये म्हणून सदा भयभीत असतात. म्हणून अंगुष्ठमात्र पुरुष ’ब्रह्म’च आहे यात लेशमात्र संशय असण्याचे कारण नाही.
संबंध - या पादाच्या चौदाव्या सूत्रापासून तेविसाव्यापर्यंत दहराकाशाचे प्रकरण चालू होते. तेथे हे दाखविले गेले की दहर शब्द परब्रह्म परमात्म्याचा वाचक आहे. नंतर चोविसाव्या सूत्रापासून कठोपनिषद वर्णित अंगुष्ठमात्र पुरुषाच्या स्वरूपावर विचार चालू होता; कारण दहराकाशाप्रमाणेच तोही हृदयात स्थित दाखविला आहे. त्याच प्रकरणात देवादिकांचा वेदविद्येत अधिकारासंबंधी प्रासंगिक विषयावर विचार झाला आणि ३८ व्या सूत्रात तो प्रसंग समाप्त झाला. परत ३९ व्या सूत्रात आधीचा अंगुष्ठमात्र पुरुष या विषयावर विचार केला गेला. याप्रकारे मध्येच उद्‌भवलेल्या प्रसंगावर विचार झाल्यावर आता पुनः दहराकाश या प्रकरणावर विचारास आरंभ केला जात आहे -


ज्योतिर्दर्शनात् ॥ १.३.४० ॥


अर्थ - ज्योतिः = येथे ज्योति शब्द परब्रह्माचा वाचक आहे; दर्शनात् = कारण श्रुतिमध्ये अनेक ठिकाणी ज्योतिः शब्दाचा अर्थ ब्रह्म असे केल्याचा आढळून येतो.


व्याख्या - छांदोग्य उपनिषदाच्या अंतर्गत दहराकाशविषयक प्रकरणात म्हटले आहे ’य एष सम्प्रसादोऽस्माच्छरीरात्समुत्थाय परं ज्योतिरुपसम्पद्य स्वेन रूपेणाभिनिष्पद्यते’ (८.३.४) - अर्थात् हा जो सम्प्रसाद (जीवात्मा) आहे, तो शरीराहून निघून परमज्योतिस प्राप्त होऊन आपल्या स्वरूपाने संपन्न होतो. या वर्णनात जो ’ज्योतिः’ शब्द आला आहे, तो परब्रह्म परमात्म्याचाच वाचक आहे. कारण श्रुतिमध्ये अनेक ठिकाणी ब्रह्माच्या अर्थाने ’ज्योतिः’ शब्दाचा प्रयोग आढळून येतो. उदा० ’अथ यदतः परो दिवो ज्योतिर्दीप्यते (छां ३.१३.७) - अर्थात् या द्युलोकाहून पर जी ज्योत प्रकाशित होत आहे. यात ’ज्योति’ पद परमात्म्याच्याच अर्थाचा आहे याचा निर्णय पूर्वीच केला गेला आहे. वर दिलेल्या (छां ८.३.४) श्रुतिमध्ये ’ज्योतिः’ पदाचे ’परम’ विशेषण आहे आहे. यावरूनही हेच सिद्ध होते की परब्रह्मालाच तेथे ’परमज्योति’ म्हटले आहे.
संबंध - मागच्या सूत्रात ’दहर’ प्रकरणात आलेल्या ’ज्योतिः’ पदास परब्रह्माचे वाचक दाखवून प्रकरण समाप्ति झाली. आता अशी जिज्ञासा उत्पन्न होते की, ’दहराकाश’ च्या प्रकरणात आलेला ’आकाश’ शब्द परब्रह्माचा वाचक असेल, परंतु छां ८.१४.१ येथे जो ’आकाश’ शब्द आला आहे, तो कोणत्या अर्थाने आला आहे ? त्याचा निर्णय करण्यासाठी पुढील सूत्राचा प्रारंभ करतात -


आकाशोऽर्थान्तरत्वादिव्यपदेशात् ॥ १.३.४१ ॥


अर्थ - आकाशः = तेथे ’आकाश’ शब्द परब्रह्माचाच वाचक आहे; अर्थान्तरत्वादिव्यपदेशात् = कारण त्यास नामरूपमय जगताहून भिन्न वस्तू असे दाखविले गेले आहे.


व्याख्या - छान्दो. ८.१४.१ मध्ये म्हटले आहे - ’आकाशो वै नाम नामरूपयोर्निर्वहिता ते यदन्तरा तद्‌ब्रह्म तदमृतँ स आत्मा ।’ अर्थात् - आकाश नामाने प्रसिद्ध तत्त्व नाम व रूपाचा निर्वाह करणारा आहे, हे दोन्ही ज्याच्या अंतर्गत आहेत तो ब्रह्म आहे, ते अमृततत्त्व आहे आणि तोच आत्मा आहे. इथे आकाशाला नापरूपाहून भिन्न तथा नामरूपात्मक जगतास धारण करणारे म्हटले आहे. म्हणून ते भूताकाश अथवा जीवात्म्याचे वाचक होऊ शकत नाही. कारण भूताकाश तर स्वतः नामरूपात्मक प्रपंचाच्या अंतर्गत आहे आणि जीवात्मा सर्वांना धारण करण्यास समर्थ नाही. म्हणून जो भूताकाशासहित समस्त जड-चेतनात्मक जगतास धारण करणारा आहे, तो परब्रह्म परमात्माच येथे आकाश नामाने सांगितला आहे. तेथेही ब्रह्म, अमृत आणि आत्मा ही विशेषणे दिली गेली आहेत. ती भूताकाश अथवा जीवात्म्यास लागू होत नाहीत. म्हणून त्याहून भिन्न परब्रह्म परमात्म्याचाच तेथे ’आकाश’ नामाने वर्णन केले आहे.
संबंध - आता अशी जिज्ञासा उत्पन्न होते की जेव्हां मुक्तात्मा ब्रह्मास प्राप्त होतो तेव्हां त्यात ब्रह्माची सर्व लक्षणे येतात. म्हणून येथे त्यालाच आकाश नामाने संबोधले गेले आहे असे मानले तर काय हरकत आहे ? यावर सांगतात -


सुषुप्त्युत्क्रान्त्योर्भेदेन ॥ १.३.४२ ॥


अर्थ - सुषुप्त्युत्क्रान्त्योः = सुषुप्ति तथा मृत्युसमयीही,; भेदेन = जीवात्मा आणि परमात्म्याचे भेदपूर्वक वर्णन आहे, म्हणून आकाश शब्द येथे परमात्म्याचाच बोधक आहे.


व्याख्या - छांदो० ८.३.४ (याचे विवरण सूत्र १.१.९ मध्ये आले आहे) मध्ये म्हटले आहे की, ज्या अवस्थेत हा पुरुष झोपी जातो. त्या समयी हा सत् आपल्या कारणाने संपन्न (संयुक्त) होतो. हे वर्णन सुषुप्तीकालाचे आहे. यात जीवात्म्याचा ’पुरुष’ नामाने आणि कारणभूत परमात्म्याचा ’सत्’ नामाने भेदपूर्वक उल्लेख आला आहे याच प्रकारे उत्क्रांतीचेही याप्रकारे वर्नन मिळते. हा जीवात्मा या शरीरातून निघून परमज्योतिःस्वरूप परमात्म्यास प्राप्त होऊन आपल्या शुद्धरूपाने संपन्न होतो. (छां. ८.३.४ - पहा सूत्र १.३.१९) यातही सम्प्रसाद नावाने जीवात्म्याचे आणि परमज्योति नामाने परमात्म्याचे भेदपूर्वक निरूपण आहे. याप्रकारे सुषुप्ति आणि उत्क्रांतिकाली हा जीवात्मा आणि परमात्म्याचे भेदपूर्वक वर्णन असल्याने उपरोक्त आकाश शब्द मुक्तात्म्याचा वाचक असू शकत नाही. कारण मुक्तात्म्यास ब्रह्म सदृश काही सद्‌गुणांचा आविर्भाव झाल्यावरही त्यास नाम-रूपात्मक जगतास धारण करण्याची शक्ति येत नाही.
संबंध - उपरोक्त कथनाच्या पुष्टिसाठी दुसर हेतु उपस्थित करतात -


पत्यादिशब्देभ्यः ॥ १.३.४३ ॥


अर्थ - पत्याभिशब्देभ्यः = परब्रह्मासाठी श्रुतिमध्ये पति, परमपति, परम-महेश्वर इ. विशेष शब्दांचा प्रयोग झाल्यानेही सिद्ध होते की जीवात्मा आणि परमात्मा यात भेद आहे.


व्याख्या - श्वेताश्वतरोपनिषद् ६.७ येथे परमात्माच्या स्वरूपाचे वर्णन असे आहे - ’तमीश्वराणां परमं महेश्वरं तं देवतानां परमं च दैवतम् । पतिं पतीनां परमं परस्ताद् विदाम देवं भुवनेशमीड्यम् ॥ - ईश्वरांचेही परम महेश्वर, देवतांचीही परम देवता आणि पतिंचेही परम पति अखिल ब्रह्मांडाचे स्वामी, तसेच स्तवन करण्यायोग्य त्या प्रकाशस्वरूप परमात्म्यास आम्ही सर्वांच्या पर जाणत आहोत.’
या मंत्रात देवता आदिंच्या कोटीमध्ये जीवात्मा आहे आणि परम देवता, परम महेश्वर व परम पतिंच्या नामाने परमात्म्याचे वर्णन केले गेले आहे. यावरून ही निश्चयाने जीवात्मा आणि परमात्म्यामध्ये भेद असल्याचे दिसते. म्हणून ’आकाश’ शब्द परमात्म्याचाच वाचक आहे. मुक्त जीवाचा नव्हे.
येथे पहिल्या अध्यायातील तिसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP