ब्रह्मसूत्र

अध्याय पहिला

पाद दुसरा

संबंध - प्रथम पादात निर्णय झाला की ’आनंदमय’, ’आकाश’, ’ज्योति’ तथा ’प्राण’ आदि नामांनि उपनिषदात जे जगताचे कारण आणि उपास्य देवाचे वर्णन आले आहे, ते परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आहे. ’प्राण’ शब्दाचा प्रसंग आल्याने छांदोग्योपनिषदात (३.१४.२) आलेल्या ’मनोमयः प्राणशरीरः’ आदि वचनांचे स्मरण झाले. म्हणून उक्त उपनिषदाच्या तिसर्‍या अध्यायाच्या चौदाव्या खंडावर विचार करण्यासाठी द्वितीय पादाचा आरंभ करतात.
या पादात पहिले प्रकरण आठ सूत्रांचे आहे. छांदो. ३.१४.१ मध्ये प्रथम संपूर्ण जगतास ब्रह्मरूप समजून त्याची उपासना करण्यास सांगितले आहे. त्यानंतर त्यासाठी ’सत्यसंकल्प’, ’आकाशात्मा’ आणि ’सर्वकर्मा’ आदि विशेषणे दिली गेली आहेत (३.१४.२) जी ब्रह्माची प्रतीत होत आहेत. तत्पश्चात् त्याला ’अणीयान्’ अर्थात् अत्यंत लहान आणि ’ज्यायान्’ अर्थात् सर्वांहून मोठा म्हणून हृदयात राहणारा आपला आत्मा आणि ब्रह्मही म्हटले आहे (३.१४.३-४). यामुळे अशी जिज्ञासा उत्पन्न होते की उक्त उपास्यदेव कोण आहे ? जीवात्मा की परमात्मा, का अणि अन्य कोणी ? याचा निर्णय करण्यासाठी आता प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


सर्वत्र प्रसिद्धोपदेशात् ॥ १.२.१ ॥


अर्थ - सर्वत्र - सर्व वेदान्त वाक्यात; प्रसिद्धोपदेशात् - (जगताची उत्पत्ति, स्थिति आणि लयाच्या कारण रूपाने) प्रसिद्ध परब्रह्माचा उपास्य देवाच्या रूपात उपदेश झाला आहे, म्हणून (छांदोग्य श्रुति ३.१४ मध्ये सांगितला गेलेला उपास्यदेव ब्रह्मच आहे).


व्याख्या - छांदोग्य उपनिषद अध्याय ३ खण्ड १४ येथे सर्वप्रथम मंत्र आला आहे तो असा - ’सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति शान्त उपासीत । अथ खलु क्रतुमयः पुरुषो यथाक्रतुः अस्मिन् लोके पुरुषो भवति तथेतः प्रेत्य भवति स क्रतुं कुर्वीत ।’ अर्थात् हे संपूर्ण चराचर जगत् निश्चितच ब्रह्म आहे. कारण हे त्याच्यापासून उत्पन्न झाले आहे, स्थितीच्या समयी त्यातच वर्तत आहे आणि अंती ते त्यातच लीन होते. साधकाने राग-द्वेष रहित, शांतचित्त होऊन याप्रकारे उपासना केली पाहिजे. अर्थात् असा निश्चयात्मक भाव धारण करायला पाहिजे. कारण हा मनुष्य संकल्पमय आहे. या लोकात हा ज्या संकल्पाने युक्त असतो, येथून गेल्यानंतर परलोकात हा तसाच बनतो. म्हणून उपरोक्त निश्चय करायला हवा. या मंत्रवाक्यात त्याच परब्रह्माची उपासना करण्यास सांगितले आहे, ज्याच्यापासून या जगताची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय होतात. तसेच जो समस्त वेदवाक्यात जगताच्या महाकारणरूपाने प्रसिद्ध आहे. म्हणून या प्रकरणात सांगितलेला उपास्यदेव परब्रह्म परमात्माच आहे, अन्य कोणी नाही.
संबंध - आता प्रश्न उपस्थित होतो की (छांदो उ ३.१४.२ मध्ये) उपास्यदेवाला मनोमय आणि प्राणरूप शरीर असणारा म्हटले आहे. ही विशेषणे तर जीवात्म्याची आहेत. म्हणून त्याला ब्रह्म मानणे विसंगत वाटते. यावर म्हणतात -


विवक्षितगुणपपत्तेश्च ॥ १.२.२ ॥


अर्थ - च = तथा; विवक्षितगुणोपपत्तेः = श्रुतिंद्वारा वर्णित गुणांची संगति त्या परब्रह्मात्म्यातच होते. म्हणून या प्रकरणात कथित उपास्यदेव ब्रह्मच आहे.


व्याख्या - ’मनोमयः प्राणशरीरो भारूपः सत्यसंकल्प आकाशात्मा सर्वकर्मा सर्वकामः सर्वगन्धः सर्वरसः सर्वमिदमभ्यात्त्ऽवाइक्यनादरः ।’ अर्थात् तो उपास्यदेव मनोमय, प्राणरूप शरीर असणारा, प्रकाशस्वरूप, सत्यसंकल्प, आकाशाप्रमाणे व्यापक, संपूर्ण जगताचा कर्ता, पूर्णकाम, सर्वगंध, सर्वरस, या समस्त जगतास सर्व बाजूंनी व्याप्त करणारा, वाणीरहित तथा संभ्रमशून्य आहे. या वर्णनात उपास्यदेवाचे जे उपादेय गुण सांगितले आहेत, ते सर्व ब्रह्मातच संगत होतात. ब्रह्माला ’मनोमय’ अथवा ’प्राणरूप शरीराचा’ म्हणणे अनुचित नाही. कारण, तो सर्वांचा अंतर्यामी आत्मा आहे. केनोपनिषदात त्याला मनाचेही मन, तथा प्राणाचाही प्राण** म्हटले आहे. म्हणून या प्रकरणात म्हटल्याप्रमाणे उपास्यदेव परब्रह्म परमेश्वरच आहे.


[** श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनोयत् वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः । केन उ १.२ ]
संबंध - उपरोक्त सूत्रात श्रुतिवर्णित गुणांची उपपत्ति (संगति) ब्रह्मात दाखविली गेली आहे. आता जीवात्म्यात त्या गुणांची अनुपपत्ति दाखवून पूर्वोक्त सिद्धान्ताची पुष्टि केली जात आहे -


अनुपपत्तेस्तु न शारीरः ॥ १.२.३ ॥


अर्थ - तु = परंतु; अनुपपत्ते = जीवात्म्यामध्ये श्रुतिवर्णित गुणांची संगति न लागल्यामुळे; शारीरः = जीवात्मा; न = या प्रकरणात सांगितलेला उपास्यदेव नाही.


व्याख्या - उपासनेसाठी श्रुतिमध्ये जी सत्य-संकल्पता, सर्व व्यापकता, सर्वात्मकता, सर्वशक्तिमत्ता आदि गुण सांगितले आहेत ते जीवात्म्यात आढळत नाहीत. म्हणून या प्रसंगात सांगितलेला उपास्यदेव जीवात्मा नाही असे मानणेच योग्य आहे.
संबंध - प्रकारान्तराने हेच परत प्रतिपादन केले आहे -


कर्मकर्तृव्यपदेशाच्च ॥ १.२.४ ॥


अर्थ - कर्मकर्तृव्यपदेशात् = उक्त प्रकरणात उपास्यदेवास प्राप्ति या क्रियेचे कर्म अर्थात् प्राप्त करण्यायोग्य म्हटले आहे आणि जीवात्म्याला प्राप्तिक्रियेचा कर्ता अर्थात् त्या ब्रह्मास प्राप्त करणारा म्हटले आहे म्हणून; च = ही (जीवात्मा उपास्य होऊ शकत नाही.)


व्याख्या - छांदो. उ. ३.१४.४ मध्ये म्हटले आहे की ’सर्व कर्मा आदि विशेषणांनी युक्त ब्रह्मच माझ्या हृदयात राहणारा माझा आत्मा आहे. मेल्यानंतर येथून जाऊन परलोकात मी त्याला प्राप्त होईन. ** या प्रकारे येथे पूर्वोक्त उपास्यदेवास प्राप्त होण्यायोग्य तथा जीवात्म्यास त्याला प्राप्त करणारा म्हटले आहे. म्हणून येथे उपास्यदेव परब्रह्म परमात्मा आहे आणि उपासक जीवात्मा आहे असे मानणेच उचित आहे.


[ ** एष म आत्मान्तर्हृदयेऽणीयान् व्रीहेर्वा यवाद् वा सर्वपाद् वा श्यामाकाद् वा श्यामाकतण्डुलाद् वैष म आत्मान्तर्हृदये ज्यायान् पृथिव्या ज्यायान् अन्तरिक्षात् ज्यायान् दिवो ज्यायान् एभ्यो लोकेभ्यः _ छां उ ३.१४.३ - सर्वकर्मा सर्वकामः सर्वगन्धः सर्वरसः सर्वमिदमभ्यात्तोऽवाक्यनादर एष म आत्मान्तर्हृदय एतद् ब्रह्मैतमितः प्रेत्यभिसम्भवितास्मि " छां उ ३.१४.४ ]
संबंध - प्रकारांतराने उक्त गोष्टीची पुन्हा पुष्टि करतात -


शब्दविशेषात् ॥ १.२.५ ॥


अर्थ - शब्दविशेषात् = (उपास्य आणि उपासकांसाठी) शब्दात भेद असल्या कारणानेही हे सिद्ध होते की येथे उपास्यदेव जीवात्मा नाही.


व्याख्या - छां. उ. ३.१४ च्या ३ र्‍या व ४ थ्या (हे दोन्ही मंत्र मागील सूत्राच्या टीपेत् आले आहेत) मंत्रात म्हटले आहे की, ’हा माझ्या हृदयात राहणारा अंतर्यामी आत्मा आहे.’ या कथनात ’एषः - हा आत्मा’ तसेच ’ब्रह्म’ हे प्रथमान्त शब्द उपास्यदेवासाठी प्रयुक्त झाले आहेत आणि ’मे’ अर्थात् ’माझा’ हे षष्ठ्यंत पद भिन्नरूपाने उपासक जीवात्म्यासाठी प्रयुक्त झाले आहे. या प्रकारे दोन्हीसाठी प्रयुक्त केलेल्या शब्दात भेद असल्याने उपास्यदेव जीवात्म्याहून भिन्न सिद्ध होत आहे. म्हणून जीवात्म्यास उपास्यदेव मानता येत नाही.
संबंध - याशिवाय -


स्मृतेश्च ॥ १.२.६ ॥


अर्थ - स्मृतेः च = स्मृति प्रमाणाने ही उपास्य आणि उपासकाचा भेद सिद्ध होत आहे.


व्याख्या - श्रीमद् भगवद्‍गीता आदि स्मृतिग्रंथांच्या योगे उपास्य आणि उपासकाचा भेद सिद्ध होतो. जसे - ’मयि एव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । निवसिष्यसि मय्येव अत ऊर्च्वं न संशयः ॥ (गी. १२.८) - आणि जो पुरुष अंतकाळी माझेस स्मरण करीत शरीराच्या त्याग करतो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो, यात काही संशय नाही.’ इथे उपास्य परब्रह्म परमात्माच आहे. जीवात्मा अथवा अन्य कोणी नाही हे मानणेच योग्य आहे.
संबंध - छां. उप. ३.१४ च्या ३ व ४ या मंत्रात् उपास्य देवास ’हृदयांत स्थित’ म्हणजेच एकदेशीय दाखविले आहे तसेच त्यास एका मोहरीहूनही लहान (अर्थात् अति सूक्ष्म) म्हटले आहे. अशा स्थितीत त्यास परब्रह्म कसे मानले जाऊ शकते ? याव म्हणतात -


अर्भकौकस्त्वत्तद्‍व्यपदेशाच्च नेति चेन्न निचाय्यत्वादेवं व्योमवच्च ॥ १.२.७ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; अर्भकौकस्त्वात् = उपास्यदेव हृदयरूप छोटेसे स्थान असणारा आहे म्हणून; च = तथा; तत्‍व्यपदेशात् = त्यास अत्यंत लहान म्हटले गेले आहे या कारणाने; न = तो ब्रह्म होऊ शकत नाही; इति न = पण असे म्हणणे योग्य नाही; निचारत्वात् = कारण तो हृदयदेशात द्रष्टव्य आहे म्हणून; एवम् = त्याचे विषयी असे म्हटले गेले आहे; च = तथा; व्योमवत् = ते आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापक आहे या दृष्टीनेही असे म्हणणे उचित आहे.


व्याख्या - जर छां उपनिषदातील ३.१४.३-४ या मंत्रावरून त्याचे स्थान जव अथवा मोहरीहूनही अत्यंत सूक्ष्म व एकदेशीय असे दाखवले असल्यामुळे परब्रह्म परमात्मा उपास्य देव होऊ शकत नाही अशी शंका उद्‍भवते, कारण परब्रह्म परमात्म्यास तर सर्वाहून मोठे, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान असे म्हणतात - असे म्हणाल तर असे म्हणणे योग्य नाही. कारण उक्त मंत्रात जे परब्रह्म परमात्म्यास हृदय स्थित म्हटले आहे ते त्याच्या उपलब्धि स्थानाच्या अपेक्षेने म्हटले आहे. भाव असा आहे की परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप आकाशाप्रमाणे सूक्ष्म आणि व्यापक आहे म्हणून तो सर्वत्र आहे तसाच प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयातही आहे आणि त्याच्या बाहेरही** (ईशावास्य उप. ५, गीता १३.१५) आहे. म्हणून त्यास हृदयस्थ म्हटल्याने केवळ त्याचे एकदेशीय असणे सिद्ध होत नाही तसेच त्याला जव, मोहरी सारखे लहान म्हणणे याचा उद्देश त्याचा आकार दाखविणे हा नसून त्याचे सूक्ष्मत्व दर्शविणे व तो इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करण्यास अशक्य दाखविणे आहे. तसेच उक्त मंत्रात हेही दाखविले आहे तो पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक आणि समस्त लोकाहूनही मोठा आहे. भाव हा आहे की तो सूक्ष्म असूनही समस्त लोकांच्या आत व बाहेर व्याप्त आणि त्यांच्या पलिकडचा आहे. सर्वत्र तोच आहे म्हणून येथे उपास्य देव परब्रह्म परमात्माच आहे, अन्य कोणी नाही.


[ ** तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः । (ईशा. उप. ५). बहिरन्तश्च भूतानां अचरं चरमेव च । सूक्ष्मत्त्वात् तदिविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ गीता १३.१५ - तो परमात्मा चराचर सर्व भूतांच्या आत-बाहेर परिपूर्ण आहे. तथा चर आणि अचर देखील आहे तथा तो सूक्ष्म असल्यामुळे अविज्ञेय आहे तसाच अगदी जवळ असूनही दूरही तोच स्थित आहे. ]
संबंध - परब्रह्म परमात्मा सर्वांच्या हृदयात स्थित असूनही त्यांच्या सुखदुःखाने अभिभूत होत नाही. त्याचे हे वैशिष्ठ्य दाखविण्यासाठी सांगतात -


संम्भोगप्राप्तिरिति चेन्न वैशेष्यात् ॥ १.२.८ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; सम्भोगप्राप्तिः = (सर्वांच्या हृदयात स्थित असल्याने, चेतन असल्यामुळे त्याला) सुखदुःखांचा भोगही प्राप्त होत असेल; इति न = तर असे म्हणणे योग्य नाही; वैशेष्यात् = कारण जीवात्म्यापेक्षा त्या परब्रह्मात विशेषता आहे.


व्याख्या - जर कोणाला अशी शंका येत असेल की आकाशाप्रमाणे सर्वव्यापक परमात्मा समस्त प्राण्यांच्या हृदयात स्थित असल्याने त्या जीवांच्या सुखदुःखांचा भोगही तो करीत असेल, कारण तो जड नाही, चेतन आहे आणि चेतनात सुखदुःखाची अनुभूति स्वाभाविक आहे, तर असे म्हणणे ठीक नाही. कारण परमात्म्यामध्ये कर्तेपणाचा अभिमान आणि भोक्तापण नाही. तो सर्वांच्या हृदयात राहूनही त्यांच्या गुणदोषांपासून सर्वथा असंग आहे. हीच जीवात्म्यापेक्षा त्यात विशेषता आहे. जीवात्मा तर अज्ञानामुळे कर्ता आणि भोक्ता आहे, परंतु परमात्मा सर्वथा निर्विकार आहे. तो केवळ साक्षीमात्र आहे, भोक्ता नाही. ’तयोः अन्यः पिप्पलं स्वादुवत्त्यन् अनश्नन् अन्यो अभिचाकशीति ।' (मुण्डक उप. ३.१.१.) म्हणून जीवांच्या कर्मफलरूप सुखदुःखादिशी त्याचा संबंध असणे संभव नाही.
संबंध - मागील प्रकरणात हे सिद्ध केले आहे की सर्वांच्या हृदयात निवास करीत असून परमात्मा भोक्ता नाही, परंतु वेदान्तात त्याला कोठे कोठे भोक्ताही म्हटले आहे. उदा. कठ. उप १.२.२५. मग ते वचन अन्य कोणाविषयी आहे की त्याचा दुसराच काही अर्थ आहे ? हा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ करतात -


अत्ता चराचरग्रहणात् ॥ १.२.९ ॥


अर्थ - चराचरग्रहणात् = चर आणि अचर सर्वांना ग्रहण करण्यामुळे येथे; अत्ता = भोजन करणारा, अर्थात् प्रलयकाळात सर्वांना आपल्यात विलीन करून घेणारा परब्रह्म परमेश्वरच आहे.


व्याख्या - कठोपनिषद १.२.२५ मध्ये सांगितले आहे की ’ यस्य ब्रह्म च क्षत्रं च उभे भवत ओदनः । मृत्युर्यस्योपचनं क इत्था वेद यत्र सः ॥’ अर्थात् संहारकाली ज्या परमेश्वराचे ब्राह्मण आणि क्षत्रिय, समस्त स्थावर-जंगम प्राणिमात्र भोजन बनतात तसेच सर्वांचा संहार करणारा मृत्यु उपसेचन (व्यंजन- शाक आदि) बनतात. तो परमेश्वर जेथे आणि जसा आहे, तो कर्मफलरूप सुख-दुःख आदि भोगणारा आपल्यात विलीन करून घेणे हेच येथे त्याचे भोक्तेपण आहे. म्हणून परब्रह्म परमात्म्यासही येथे ’अत्ता’ अथवा भोक्ता म्हटले आहे, अन्य कोणाला नाही.
संबंध - हीच गोष्ट सिद्ध करण्यासाठी आता एक दुसरी युक्ती देतात -


प्रकरणाच्च ॥ १.२.१० ॥


अर्थ - प्रकरणानेच ही गोष्ट सिद्ध होत आहे.


व्याख्या - उपर्युक्त कठोपनिषदातील मंत्राच्या आधी २० व्या ते २४ व्या श्लोकापर्यंत परब्रह्म परमेश्वराचेच प्रकरण आहे. त्याच्याच स्वरूपाचे वर्णन करून त्यास जाणण्याचे महत्त्व तथा त्याच्या कृपेलाच त्याला जाणणाचा उपाय सांगितला आहे. उक्त मंत्रांत त्या परमेश्वरास जाणणे अत्यंत दुर्लभ सांगितले आहे जे चालू प्रकरणास अनुरूपच आहे. म्हणून पूर्वापार प्रसंग पाहिल्यावरही हेच सिद्ध होते की येथे परब्रह्म परमेश्वरासच ’अत्ता’ (भोजन करणारा) म्हटले आहे.
संबंध - आता अशी जिज्ञासा उत्पन्न होते की या नंतरच्या श्रुतिमध्ये (१.३.१) कर्मफलरूप ’ऋत्’ यास पिणार्‍या छाया आणि ऊन यांच्याप्रमाणे दोन भोक्त्यांचे वर्णन आहे. जर परमात्मा कर्मफलाचा भोक्ता नाही, तर मग उक्त दोन भोक्ते कोण कोण आहेत ? यावर सांगतात -


गुहांप्रविष्टावात्मानौ हि तद्दर्शनात् ॥ १.२.११ ॥


अर्थ - गुहाम् = हृदयरूप गुहेत; प्रविष्टौ = प्रविष्ट झालेले दोघे; आत्मानौ = जीवात्मा आणि परमात्मा; हि = देखील आहेत. तद्दर्शनात् = कारण इतर श्रुतिंमध्येही असेच आढळून येते.


व्याख्या - कठोपनिषद १.३.१ मध्ये सांगितले आहे - ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे । छाया तपौ ब्रह्मविदो वदन्ति पञ्चाग्नयो ये च त्रिणाचिकेताः॥’ - शुभकर्मांच्या फलस्वरूप, मनुष्य शरीरात परब्रह्माचे उत्तम निवासस्थानात, म्हणजे हृदयाकाशात, बुद्धिरूप गुहेत लपलेले; तसेच ’सत्या’चे पान करणारे दोघे, छाया आणि ऊन यांप्रमाणे परस्पर विरुद्ध स्वभाव असलेले असतात, असे ब्रह्मवेत्ता ज्ञानी सांगतो. तसेच जे तीन वेळा नचिकेत अग्निचे चयन करणारे पञ्चाग्नि संपन्न गृहस्थ आहेत तेही सांगतात. या मंत्रात सांगितलेले दोन्ही भोक्ते जीवात्मा आणि परमात्माच आहेत. त्यांचेच वर्णन छाया आणि ऊन यांचे रूपाने केले आहे. परमात्मा सर्वज्ञ, पूर्ण ज्ञानस्वरूप एवं स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याचे उन्हाच्या रूपात वर्णन केले आहे; आणि जीवात्मा अल्पज्ञ आहे, त्याच्या ठिकाणी जे काही अल्प ज्ञान आहे तेही परमात्म्याचेच आहे. जसे छायेमध्ये जो अल्प प्रकाश असतो तो उन्हाचा (सूर्यप्रकाशाचाच) अंश असतो. म्हणून जीवात्म्यास छाया नाव दिले आहे. अन्यत्र श्रुतिंमध्येही जीवात्मा आणि परमात्मा या दोहोंचे बरोबरच मनुष्य शरीरात प्रविष्ट होणे याप्रकारे सांगितले आहे - ’सेयं देवतैक्षत हन्ताहन्मिमास्तिस्रो देवता अनेक जीवनात्मनानुप्रविष्य नामरूपे व्याकरवाणि’ (छां उप ६.३.२.) - ’त्या देवतेने ,परमात्म्याने संकल्प केला की मी या जीवात्म्यासह या तेज आदि तिन्ही देवतांमध्ये, अर्थात् ह्याच्या कार्यरूप शरीरात प्रविष्ट होऊन नाम आणि रूप प्रकट करीन’ यायोगे हेही सिद्ध होत आहे की उपरोक्त कठोपनिषदाच्या मंत्रात सांगितलेल्या छाया आणि ऊन सदृश दोन भोक्ते जीवात्मा आणि परमात्माच आहेत. येथे जे जीवात्म्याच्या बरोबर परमात्म्यास सत्य अर्थात् श्रेष्ठ कर्माचे फल भोगणारा म्हटले आहे. त्याचा हा भाव आहे की परब्रह्म परमेश्वरच समस्त देवता आदिंच्या रूपात प्रकारान्तराने समस्त यज्ञ आणि तपरूप शुभ कर्मांचा भोक्ता आहे.**परंतु त्याचे भोक्तेपण सर्वथा निर्दोष आहे म्हणून ते भोक्ता असूनही अभोक्ताच आहेत.++


** भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोक महेश्वरम् । सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ (गीता ५.२९) ; अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च । (गीता ९.२३)


++ सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रिय विवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृच ॥ (गीता १३.१४)
संबंध - उपरोक्त कथनाच्या सिद्धीसाठी आणखी एक प्रमाण -


विशेषणाच्च ॥ १.२.१२ ॥


अर्थ - विशेषणात् = पुढील मंत्रात दोघांसाठी वेगवेगळी विशेषणे दिली गेली आहेत, म्हणून; च = ही - उपरोक्त दोन्ही भोक्त्यांना जीवात्मा आणि परमात्मा मानणेच योग्य आहे.


व्याख्या - याच अध्यायाच्या दुसर्‍या मंत्रात त्या परम अक्षर ब्रह्मास संसारातून पार होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी ’अभयप्रद’ म्हटले गेले आहे. तथा त्यानंतर रथाच्या दृष्टांतात जीवात्म्याला सांगितले गेले आहे. या प्रकारे त्या दोघांच्यासाठी पृथक् पृथक् विशेषणे असल्यानेही हेच सिद्ध होत आहे की येथे ज्यांना गुहेत प्रविष्ट म्हटले गेले आहे, ते जीवात्मा आणि परमात्माच आहेत.
संबंध - येथे अशी जिज्ञासा उत्पन्न होते की परमात्म्याची उपलब्धि हृदयात होत असते म्हणून त्याला हृदयांत स्थित म्हणणे तर ठीक आहे. परंतु छांदोग्योपनिषद ४.१५.१ मध्ये असे म्हटले आहे की हा जो नेत्रात पुरुष दिसतो. तो आत्मा आहे, हेच अमृत आहे की, हा जो नेत्रात पुरुष दिसतो, तो आत्मा आहे, हेच अमृत आहे, हेच अभय आणि ब्रह्म आहे. म्हणून येथे नेत्रात स्थित पुरुष कोण आहे ? याचा निर्णय करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


अन्तर उपपत्ते ॥ १.२.१३ ॥


अर्थ - अन्तरे = ’जे नेत्रात दिसून येते’ असे जे म्हटले आहे ते ब्रह्मच आहे; उपपत्तेः = कारण असे मानल्यानेच पूर्व प्रसंगाची संगति लागते.


व्याख्या - हा प्रसंग छांदोग्योपनिषदात चवथ्या अध्यायाच्या दशम खण्डापासून आरंभ होऊन पंधराव्या खण्डात समाप्त झाला आहे. प्रसंग असा आहे की, उपकोसल नावाचा ब्रह्मचारी ’सत्यकाम’ नामक ऋषीच्या आश्रमात राहून ब्रह्मचर्याचे पालन करीत गुरु आणि अग्निची सेवा करीत होता. सेवा करता करता त्याची बारा वर्षे निघून गेली. परंतु गुरुंनी त्याला उपदेशही दिला नाही किंवा त्याचे स्नातकही केले नाही. उलट त्याच्या बरोबर आश्रमात प्रविष्ठ झालेल्या इतर शिष्यांना स्नातक बनवून त्यांची घरी पाठवण केली. एकदा आचार्यांच्या पत्‍नीने म्हटले, "भगवन् ! या ब्रह्मचार्याने अग्नीची उत्तम प्रकारे सेवा केली आहे. याने तपस्याही केली आहे. तेव्हा आता याला उपदेश देण्याची कृपा करावी.’ परंतु आपल्या भार्येच्या बोलण्याकडे लक्ष न देता सत्यकाम ऋषी उपकोसलला उपदेश न देताच बाहेर (परगावी) निघून गेले. तेव्हा मनांत दुःखी होऊन उपकोसलने अनशन व्रत करण्याचा निश्चय केला. हे पाहून आचार्य पत्‍नीने विचारले. ’ब्रह्मचारी ! तू भोजन का करीत नाहीस ?’ त्याने म्हटले, ’मनुष्याच्या मनांत अनेक कामना असतात. माझ्या मनांतही एक दुःख आहे, म्हणून मी भोजन करणार नाही.’ तेव्हां सर्व अग्नींनी एकत्र येऊन विचार केला की ’याने आमची उत्तम प्रकारे सेवा केली आहे, म्हणून आपण त्याला उपदेश करावा हे उचित आहे.’ असा विचार करून अग्नीने म्हटले - ’प्राण ब्रह्म आहे, कं ब्रह्म आहे, ख ब्रह्म आहे.’ उपकोसल म्हणाला ’प्राण ब्रह्म आहे हे मी जाणतो, पण ’क’ आणि ’ख’ यांना जाणत नाही. अग्नी म्हणाले, ’यद्वाव कं तदेव खं, यदैव खं तदेव कमिति प्राण च’ (छां उप ४.१०.५) अर्थात् - निस्संदेह, जो ’क’ आहे तोच ’ख’ आहे तोच ’क’ आहे, तथापि प्राणही तोच आहे.’ याप्रकारे त्यांनी ब्रह्माला ’क’ सुखस्वरूप आणि ’ख’ आकाशाप्रमाणे सूक्ष्म आणि व्यापक म्हटले. तसेच तोच प्राणरूपाने सर्वांना सत्ता-स्फूर्ति देणारा आहे असे सांगून त्याला संकेताने ब्रह्माचा परिचय करून घडवला.
त्यानंतर गार्हपत्य अग्निने प्रकट होऊन म्हटले, ’सूर्यात जो हा पुरुष दिसत आहे तो मीच आहे. जो उपासक याप्रकारे जाणून उपासना करतो त्याच्या पापांचा नाश होऊन तो उत्तम लोकांचा अधिकारी होतो तथा पूर्ण आयुष्मान आणि उज्ज्वल जीवनाने युक्त होतो. त्याचा वंश कधीही नष्ट होत नाही.’ त्यानंतर अन्वाहार्यपचन अग्निने प्रकट होऊन म्हटले, ’चंद्रम्यामध्ये जो हा पुरुष दिसून येत आहे तो मी आहे. जो मनुष्य हे रहस्य जाणून उपासना करतो, तो उत्तम लोकांचा अधिकारी होतो’ इत्यादि.
त्यानंतर आहवनीय अग्निने प्रकट होऊन सांगितले, ’विजेत जो हा पुरुष दिसत आहे तो मी आहे.’ असे जाणून उपासना करणार्‍यास तो वरील प्रमाणे फलाचा अधिकारी होतो असे सांगितले. त्यानंतर सर्व अग्निंनी एकाचवेळी सांगितले, ’हे उपकोसल ! आम्ही तुला आमची विद्या (अग्नि-विद्या) आणि आत्मविद्या दोन्ही सांगितल्या आहेत. आचार्य तुला यांचा मार्ग दाखवतील.’ इतक्यात त्याचे गुरु सत्यकाम आले. आचार्य त्याला पाहून म्हणाले, ’सौम्य ! तुझे मुख ब्रह्मवेत्त्याप्रमाणे चमकत आहे, तुला कुणी उपदेश दिला आहे.’ उपकोसलने केवळ अग्निंकडे संकेत केला. आचार्यांनी विचारले, ’यांनी तुला काय सांगितले ?’ तेव्हा उपकोसलने अग्निंकडून ऐकलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. त्यानंतर आचार्य म्हणाले, ’हे सौम्य ! त्यांनी तुला केवळ उत्तम लोकप्राप्तीच्या साधनाचा उपदेश केला आहे. आता मी तुला असा उपदेश देतो की तो जाणणार्‍यास ज्याप्रमाणे कमळाच्या पानास जल स्पर्श करू शकत नाही त्याप्रमाणे पाप स्पर्श करू शकणार नाही.’ उपकोसल म्हणाला, ’भगवन् ! आपण कृपा करावी.’ त्याच्या उत्तरार्थ आचार्य म्हणाले, ’य एषोऽक्षिणि पुरुषो दृश्यत, एष आत्मेति होवाच, एतद् अमृतं, अभयं, एतद् ब्रह्मेति’ अर्थात् - ’नेत्रात जो हा पुरुष दिसून येतो, तोच आत्मा आहे, तोच अमृत आहे, तोच अभय आहे आणि ब्रह्मही तोच आहे.’ त्यानंतर त्यासच ’संयद्वाम्’ ’वामनी’ आणि ’भामनी’ सांगून, अंती या विद्यांचे फल अर्चिरामार्गाने ब्रह्मास प्राप्त होणे सांगितले आहे.
हे प्रकरण पाहिले की कळून येते की डोळ्यात दिसणारा पुरुष परब्रह्मच आहे, जीवात्मा अथवा प्रतिबिंबाला उद्देशून हे कथन नाही. कारण ब्रह्मविद्येच्या प्रसंगात त्याचे वर्णन करून त्याला आत्मा, अमृत, अभय आणि ब्रह्म म्हटले आहे. या विशेषणांची उपपत्ति ब्रह्मातच लागून शकते, अन्य कशात नाही.
संबंध - आता ही जिज्ञासा उत्पन्न होते की येथे ब्रह्मास डोळ्यात दिसणारा पुरुष का म्हटले गेले आहे ? तो काय एखाद्या स्थान विशेषात राहणारा थोडाच आहे ? यावर सांगतात -


स्थानादिव्यपदेशाच्च ॥ १.२.१४ ॥


अर्थ - स्थानादिव्यपदेशात् = श्रुतिमध्ये अनेक स्थलांवर ब्रह्मासाठी स्थान आदिंचा निर्देश केला आहे म्हणून; च = ही (नेत्रान्तर्वर्ती पुरुष येथे ब्रह्मच आहे)


व्याख्या - श्रुतिमध्ये ठिकठिकाणी ब्रह्माचा संकेत करण्यासाठी त्याचे स्थान, तसेच नाम, रूप आदिंचे वर्णन केले आहे. जसे अन्तर्यामि ब्राह्मण (बृह. उप ३.७.३.२३) या ठिकाणी ब्रह्मास पृथ्वी आदि अनेक स्थानात स्थित सांगितले आहे. याचप्रकारे अन्य श्रुतिंमध्येही वर्णन आले आहे. म्हणून येथे ब्रह्मास नेत्रास दिसणारा पुरुषही डोळ्याच्या दोषांपासून सर्वथा निर्लिप्त राहात असतो. या समान उदाहरणावरून ब्रह्माचे तत्त्व समजावून देण्यासाठी असे म्हणणे उचितच आहे. म्हणून येथे असेही म्हटले आहे की ’डोळ्यात तूप अथवा पाणी आदि जी काही वस्तू घातली जाते, ती डोळ्यांच्या पापण्यांतच राहते, द्रष्ट्या पुरुषास स्पर्श करू शकत नाही.’
संबंध - उक्त सिद्धान्तास दृढ करण्यासाठी आणखी एक युक्ति -


सुखविशिष्टाभिधानादेव च ॥ १.२.१५ ॥


अर्थ - च = तथा; सुखविशिष्टाभिधानात् = नेत्रान्तर्वर्ती पुरुषास आनंदयुक्त बनविले गेले आहे म्हणून; एव = ही (हेच सिद्ध होते की ते ब्रह्मच आहे.)


व्याख्या - उक्त प्रसंगात असे म्हटले आहे की ’हा नेत्रात दिसणारा पुरुषच अमृत, अभय आणि ब्रह्म आहे.’ येथे निर्भयता आणि अमृतत्त्व ही दोन्ही सुखाची सूचक आहेत. तथा जेव्हा अग्निंनी एकत्र येऊन उपदेश केला तेव्हा म्हटले होते की जे ’क’ म्हणजे सुख आहे तेच ’ख’ म्हणजे आकाश आहे. भाव हा आहे की ते ब्रह्म आकाशाप्रमाणे अत्यंत सूक्ष्म, सर्वव्यापी आणि आनंदस्वरूप आहे. याप्रकारे त्यास आनंदयुक्त दाखवल्याने ते ब्रह्मही आहे.
संबंध - याशिवाय -


श्रुतोपनिषत्कगत्यभिधानाच्च ॥ १.२.१६ ॥


अर्थ - श्रुतोपनिषत्कगत्यभिधानात् = उपनिषद, अर्थात रहस्य विज्ञानाचे श्रवण करणारास ब्रह्मवेत्त्याची जी गति सांगितली गेली आहे, तीच गति या पुरुषास जाणणार्‍याचीही सांगितली आहे म्हणून च = ही (हेच दर्शविले आहे की नेत्रात दिसणारा पुरुष येथे ब्रह्मच आहे)


व्याख्या - या प्रसंगाच्या शेवटी या नेत्रान्तर्वर्ती पुरुषास जाणणार्‍याची तीच पुनरावृत्तिरहित गति अर्थात् देवयान मार्गाने जाऊन ब्रह्मलोकात ब्रह्मास प्राप्त होणे आणि तेथून पुन्हा या संसारात परत न येण्याची गोष्ट सांगितले आहे.** यावरून हेच सिद्ध होत आहे की येथे नेत्रात दिसणारा पुरुष ब्रह्मच आहे.


** अथोत्तरेण तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते । एतद् वै प्राणानां आयतनं एतद् अमृतं अभयं, एतद् परायणं, तस्मात् न पुनरावर्तन्ते, इत्येष निरोधः । (प्रश्न उप १.१०) अर्थात् - जे तपस्येसह ब्रह्मचर्यपूर्वक आणि श्रद्धेने युक्त होऊन अध्यात्मविद्येद्वारा परमात्म्याचा शोध घेऊन जीवन सार्थक करतात, ते उत्तरायण मार्गाने सूर्यलोकास जिंकतात (प्राप्त करतात.) हेच प्राणांचे केंद्र आहे, हेच अमृत आणि निर्भय पद आहे. ही परम गति आहे. म्हणून पुन्हा परतून येत नाही. या प्रकारे हा निरोघ - पुनरावर्ति निवारक - आहे.
संबंध - जर या प्रकरणात नेत्रात दिसणारे प्रतिबिंब, नेत्रेंद्रियाची अधिष्ठात्री देवता अथवा जीवात्मा - यांपैकी कुणा एकाला नेत्रान्तर्वर्ती पुरुष का मानू नये ? यावर सांगतात -


अनवस्थितेरसम्भवाच्च नेतरः ॥ १.२.१७ ॥


अर्थ - अनवस्थितेः = अन्य कुणाची नेत्रात निरंतर स्थिति नसल्याने; च = तथा; असंभवात् = श्रुतीत सांगितलेले अमृतत्त्व आदि गुण इतर कोणात संभवनीय नसल्याने; इतरः = ब्रह्माशिवाय दुसरे कोणीही; न - नेत्रान्तर्वर्ती पुरुष नाही.


व्याख्या - छाया पुरुष अथवा प्रतिबिंब नेत्रेन्द्रियात सदैव राहात नाही. जेव्हा कोणी पुरुष समोर येतो तेव्हा त्याचे प्रतिबिंब नेत्रात दिसून येते आणि तो दूर गेला की अदृश्य होते. इंद्रियानुग्राहक देवतेचे स्थितीही नेत्रात सदैव राहात नाही. ज्यावेळी ते इंद्रिय आपल्या विषयाला ग्रहण करते त्या समयी ती त्याच्या सहाय्यकाच्या रूपाने त्याच्या ठिकाणी स्थित मानली जाते. याचप्रकारे जीवात्माही मनाच्या द्वारा एका वेळी कोण्त्यातरी एका इंद्रियाच्या विषयास ग्रहण करतो तर इतर वेळी इतर इंद्रियाच्या विषयाला, आणि सुषुप्तिमध्ये तो कोणत्याही विषयास ग्रहण करीत नाही. म्हणून निरंतर एकच स्थिति डोळ्यात राहात नसल्याने या तिन्हींपैकी कोणालाही नेत्रान्तर्वर्ती पुरुष म्हणता येत नाही. याशिवाय, नेत्रात दिसणार्‍या पुरुषाचे जे अमृतत्त्व आणि निर्भयता आदि गुण श्रुतिने सांगितले आहेत, ते ब्रह्माशिवाय इतर कोणात संभवत नाहीत. यामुळेच उपरोक्त तिन्हींपैकी कोणालाच नेत्रान्तर्वर्ती पुरुष मानता येत नाही. म्हणून परब्रह्म परमेश्वरच येथे नेत्रात दिसून येणारा पुरुष म्हटले गेले आहे, हेच मानणे योग्य आहे.
संबंध - पूर्वप्रकरणात ही गोष्ट सांगितली गेली आहे, की श्रुतीत ठिकठिकाणी ब्रह्मासाठी भिन्न भिन्न स्थान आदिंचा निर्देश केला आहे. आता पुन्हा अधिदैव, अधिभूत आदिमध्ये त्या ब्रह्माची व्याप्ति सांगून या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


अन्तर्याम्यधिदैवादिषु तद्धर्मव्यपदेशात् ॥ १.२.१८ ॥


अर्थ - अधिदैवादिषु = आधिदैविक आणि आध्यात्मिक आदि समस्त वस्तुंमध्ये; अन्तर्यामी = ज्यास अंतर्यामी म्हटले आहे (ते परब्रह्मच आहे); तद्धर्मव्यपदेशात् = कारण तेथे त्याच्याच धर्मांचे वर्णन आहे.


व्याख्या - बृहदारण्यक उपनिषदात (३.७) एक प्रसंग आला आहे. तेथे उद्दालक ऋषीने याज्ञवल्क्य मुनींना प्रथम तर सूत्रात्म्याविषयी प्रश्न केला आहे. नंतर त्या अंतर्यामीच्या संबंधी विचारले आहे. जो या लोकात आणि परलोकात, तसेच समस्त भूत-प्राण्यांना त्यांच्या आत राहून नियंत्रणात ठेवतो, त्यासंबंधात. उत्तरात याज्ञवल्यांनी सूत्रात्मा तर ’वायुको’ म्हटले आहे आणि अंतर्यामीचे विस्तारपूर्वक वर्णन करताना त्याला जड-चेतनात्मक समस्त भूते, सर्व इंद्रिये आणि संपूर्ण जीवांचा नियंता म्हणून शेवटी याप्रकारे म्हटले आहे. - ’एष त आत्मान्तर्याममृतोऽदृष्टो द्रष्टाऽश्रुतः श्रोतामतो मन्ताविज्ञातो विज्ञाता नान्योऽतोऽस्ति द्रष्टा नान्योऽतोऽस्ति श्रोता नान्योऽतोऽस्ति मन्ता नान्योऽतोऽस्ति विज्ञातैष त आत्मान्तर्याम्यमृतोऽतोऽन्यदार्तम्’ अर्थात् - हा तुमचा अन्तर्यामी अमृतस्वरूप आत्मा दिसून येत नाही परंतु स्वतः सर्वांना पहाणारा आहे. ऐकता न येणारा परंतु स्वतः सर्वांचे मनन करणारा आहे. त्यास विशेषरूपाने उत्तम प्रकारे जाणतो. असा हा तुमचा आत्मा अन्तर्यामी आहे. याच्याहून भिन्न सर्व काही विनाशशील आहे. या वर्णनात आलेली महत्त्वसूचक विशेषणे परब्रह्माशीच संगत होऊ शकतात. जीवात्म्याच्या अंतर्यामी आत्मा ब्रह्माशिवाय दुसरा कोणी होऊ शकत नाही. म्हणून या प्रसंगात ब्रह्मालाच अन्तर्यामी म्हटले आहे. हेच मानणे योग्य आहे. **


** हा प्रसंग सूत्र ३.३.३५ पासून ३.३.४१ पर्यंतच्या व्याख्येतही आला आहे. तेथे पाहिले पाहिजे.
संबंध - पूर्वसूत्रात विधिमुखाने ही गोष्ट सिद्ध केली आहे, की अन्तर्यामी ’ब्रह्मच’ आहे. आता निषेधमुखाने हे सिद्ध करतात की अव्यक्त जड प्रकृति अन्तर्यामी होऊ शकत नाही -


न च स्मार्तमतद्धर्माभिलापात् ॥ १.२.१९ ॥


अर्थ - स्मार्तम् = सांख्यस्मृतिद्वारा प्रतिपादित प्रधान (जड प्रकृति); च = ही; न = अन्तर्यामी नाही; अतद्धर्माभिलापात् = कारण या प्रकरणात सांगितलेले द्रष्टापण आदि धर्म प्रकृतीचे नाहीत.


व्याख्या - सांख्य-स्मृतिद्वारा प्रतिपादित जड प्रकृतिच्या धर्मांचे वर्णन तेथे अन्तर्यामीसाठी आलेले नाही, तर चेतन परब्रह्माच्या धर्मांचेच विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. यावरून तेथे सांगितलेला अन्तर्यामी प्रकृति होऊ शकत नाही. म्हणून हेच सिद्ध होत आहे की या प्रकरणात ’अन्तर्यामी’ नावाने परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आले आहे.
संबंध - हे ठीक आहे की जड असल्याने प्रकृतिला अन्तर्यामी म्हणणे शक्य नाही, परंतु जीवात्मा तर चेतन आहे, तथा तो शरीर आणि इंद्रिये यांच्या आंत राहणारा आणि त्यांचे नियमन करणाराही प्रत्यक्ष आहे; म्हणून त्याला अन्तर्यामी का मानूं नये ? यावर सांगतात -


शारीरश्चोभयेऽपि हि भेदेनैनमधीयते ॥ १.२.२० ॥


अर्थ - शारीरः = शरीरात राहणारा जीवात्मा’ च = ही; न = अन्तर्यामी नाही; हि = कारण की; उभयेऽपि = माध्यंदिनी तथा काण्व दोन्ही शाखांचे; एनम् = या जीवात्म्यास; भेदेन = अन्तर्यामीहून भिन्न मानून; अधीयते = अध्ययन करतात.


व्याख्या - माध्यंदिनी आणि काण्व या दोन्ही शाखांचे विद्वान अन्तर्यामीला पृथ्वी आदिंच्या प्रमाणे जीवात्म्याच्या आत राहून त्याचे नियमन करणारा मानतात. तेथे जीवात्म्यास नियम्य आणि अन्तर्यामीला नियन्ता म्हटले आहे. या प्रकारे जीवात्मा आणि परमात्मा या दोहोंचे पृथक् पृथक् वर्णन असल्याने तेथे ’अन्तर्यामी’ पद परब्रह्म परमात्म्याचेच वाचक आहे, जीवात्म्याचे नाही.


१ - ’य आत्मनि तिष्ठन्नात्मनोऽन्तरो यमात्मा न वेद यस्यात्मा शरीरं य आत्मानमन्तरो यमयति स त आत्मान्तर्याम्यमृतः ।’ (शतपथ ब्रा० १४.५.३०)


२ - ’यो विज्ञाने तिष्ठन् विज्ञानादन्तरो यं विज्ञानं न वेद यस्य विज्ञानँ शरीरं यो विज्ञानमन्तरो यमयत्येष त आत्मान्तर्याम्यमृतः ।’ (बृह. उ. ३.७.२२)
एकोणीसाव्या सूत्रात सांगितले आहे की द्रष्टापण आदि चेतनाचे धर्म जड प्रकृतिमध्ये असू शकत नाही; म्हणून ती अन्तर्यामी असू शकत नाही. यावर अशी जिज्ञासा उत्पन्न होते की मुण्डकोपनिषदात ज्यास अदृश्यता, अग्राह्यता आदि धर्मांनी दाखवून अंती त्यास भूतांचे कारण म्हटले आहे ते तर प्रकृति होऊन शकते; कारण त्या ठिकाणी सांगितलेले सर्व धर्म प्रकृतीत आढळून येतात. यावर सांगतात -


अदृश्यत्वादिगुणको धर्मोक्तेः ॥ १.२.२१ ॥


अर्थ - अदृश्यत्वादिगुणकः = अदृश्यता आदि गुण असणारे परब्रह्म परमेश्वर आहेत; धर्मोक्तेः = कारण त्या जागी त्याच्या सर्वज्ञता आदि धर्मांचे वर्णन आहे.


व्याख्या - मुण्डकोपनिषदात एक प्रसंग आहे. महर्षि शौनक विधिपूर्वक अङ्‌गिरा ऋषींना शरण गेले आणि विचारले, ’भगवन् ! काय जाणले असता सर्व काही जाणले असे होते ?’ यावर अंगिरांनी सांगितले - ’जाणण्यायोग्य दोन विद्या आहेत. एक अपरा आणि दुसरी परा. त्यातील अपरा विद्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद तथा ज्योतिष आहे. आणि परा विद्या ती आहे जिच्यायोगे त्या अक्षर ब्रह्मास जाणले जाते.’ असे म्हणून त्यांनी अक्षरास समजून घेण्यासाठी त्यचे गुण आणि धर्मांचे वर्णन (मुंडक १.१.६) करताना म्हटले - यत्तद् अद्रेश्यं अग्राह्यं अगोत्रं अवर्णं अचक्षुःश्रोत्रं तदपाणिपादम् । नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः ॥ - अर्थात् जे इंद्रियांच्या द्वारा अगोचर आहे, पकडता येऊ शकणारे नाही, ज्याचे काही गोत्र नाही, वर्ण नाही, जे डोळे, कान तसेच हातपाय विरहित आहे, नित्य, व्यापक, सर्वत्र परिपूर्ण अत्यंत सूक्ष्म आणि सर्वथा अविनाशी आहे, त्याला धीर पुरुष म्हणतात, ते समस्त भूतांचे परम कारण आहे.
पुढे नवम मंत्रात म्हटले आहे - यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः । तस्मादेतद् ब्रह्म नाम रूपमन्नं च जायते ॥ - जो सर्वज्ञ, सर्वांना जाणणारा, ज्ञान हेच ज्याचे तप आहे, त्याच्या पासूनच हे विराटरूप समस्त जगत् तथा नाम, रूप आणि अन्न उत्पन्न होते.
येथे ज्या सर्वज्ञता आदि धर्मांचे वर्णन आहे ते परब्रह्म परमेश्वराचेच आहे. तथा एका ब्रह्मास जाणल्यावरच सर्व काही जाणल्यासारखे होऊ शकते. अन्य काही जाणल्याने नाही. म्हणून त्या प्रकरणात ज्यास अदृश्यता आदि गुणांनी युक्त म्हटले गेले आहे. तो परब्रह्म परमात्माच आहे, जीवात्मा किंवा प्रकृति नाही.
संबंध - या गोष्टीच्या पुष्टिसाठी दुसरी युक्ति देतात -


विशेषणभेदव्यपदेशाभ्यां च नेतरौ ॥ १.२.२२ ॥


अर्थ - विशेषणभेदव्यपदेशाभ्याम् = परमेश्वरसूचक विशेषणांचे वर्णनानुसार तसेच प्रकृति आणि जीवात्म्याहून त्यास भिन्न दाखविण्यासाठी; = ही; इतरौ = दुसरे दोन्ही जीवात्मा आणि प्रकृति; = अदृश्यता आदि गुणांनी युक्त जगताचे कारण म्हटले जाऊ शकत नाही.


व्याख्या - या प्रकरणात ज्यास अदृश्यता आदि गुणांनी युक्त आणि सर्व भूतांचे कारण म्हटले आहे. त्याच्यासाठी ’सर्वज्ञ’ आदि विशेषणे दिली गेली आहेत, जी प्रधान (जड प्रकृति) साठी उपयुक्त होऊ शकत नाहीत आणि अल्पज्ञ जीवात्म्यासाठीही उपयुक्त नाहीत. या शिवाय या दोहोंना ब्रह्माहून भिन्न म्हटले गेले आहे. मुण्डकोपनिषद ३.१.७ मध्ये म्हटले आहे - ’पश्यत्स्विहैव निहितं गुहायाम् ।’ म्हणजे तो पाहणार्‍यांच्या शरीरात म्हणजेच हृदयात लपलेला आहे. यास अनुसरून जीवात्म्याहून परमात्म्याची भिन्नता स्वतः स्पष्ट होत आहे. परत मुण्डक ३.१.२. म्हटले आहे - ’समाने वृक्षे पुरुषो निमग्नि ऽनीशयाशोचति मुह्यमानः । जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशं अस्य महिमानमिति वीतशोकः ॥ - शरीररूपी वृक्षावर राहणारा हा जीवात्मा शरीरात आसक्त होऊन बुडून गेला आहे. आपल्याला असमर्थ समजून, मोहित होऊन शोक करीत राहतो. परंतु तो जेव्हा तेथेच स्थित असलेल्या भक्तजनांच्याद्वारा सेवित आपल्याहून भिन्न परमेश्वरास पाहतो आणि त्याचा महिमा जाणतो, तेव्हा सर्वथा शोकरहित होतो. याप्रकारे या मंत्रात स्पष्ट शब्दात परमेश्वरास जीवात्म्याहून तसेच शरीररूपी वृक्षाहूनही भिन्न सांगितले आहे. म्हणून येथे जीव आणि प्रकृति दोन्हींपैकी कोणीही अदृश्यता आदि गुणांनी युक्त जगत् कारण होऊ शकत नाही.
संबंध - या प्रकरणात ज्यास समस्त भूतांचे कारण म्हटले आहे तो परब्रह्म परमेश्वरच आहे. याच्या पुष्टिसाठी आणखी एक प्रमाण उपस्थित करतात -


रूपोपन्यासाच्च ॥ १.२.२३ ॥


अर्थ - रूपोपन्यासात् = श्रुतिमध्ये त्याच्या निखिल लोकमय विराटस्वरूपाचे वर्ण केले आहे, त्यामुळे; = ही (तो परमेश्वरच सर्व भूतांचे कारण सिद्ध होत आहे.)


व्याख्या - मुण्डक. २.१.४ येथे परब्रह्म परमेश्वराच्या सर्वलोकमय विराटस्वरूपाचे वर्णन अशाप्रकारे केले आहे - ’अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यौ दिशः श्रोत्रे वाग् विवृताश्च वेदाः । वायु प्राणो हृदयं विश्वमस्य पद्‌भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरामा ॥ - अग्नि या परमेश्वराचे मस्तक आहे, चंद्र आणि सूर्य हे दोन नेत्र आहेत, सर्व दिशा म्हणजे दोन कान आणि प्रकट झालेले वेद त्याची वाणी आहे. वायु त्याचा प्राण तर संपूर्ण विश्व हे त्याचे हृदय आहे. त्याच्या पायापासून पृथ्वी उत्पन्न झाली आहे. हा समस्त प्राण्यांचा अंतरात्मा आहे. याप्रकारे परमेश्वराच्या विराट् स्वरूपाचा उल्लेख करून त्याला सर्वांचा अंतरात्मा म्हटले आहे. म्हणून उक्त प्रकरणात ’भूतयोनि’ नावाने परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आहे हा निश्चय होत आहे.
संबंध - आता अशी जिज्ञासा उत्पन्न होते की छान्दोग्योपनिषदात ५.१८.२ मध्ये वैश्वानराच्या स्वरूपाचे वर्णन करताना ’द्युलोकास’ त्याचे मस्तक म्हटले आहे. ’वैश्वानर’ शब्द जठराग्निचा वाचक आहे. म्हणून हे वर्णन जठरानलासंबंधी आहे किंवा अन्य कोणाच्या ? या शंकेचे निवारण करण्यासाठी पुढील प्रकरणाचा आरंभ केला जात आहे -


वैश्वानरः साधारणशब्दविशेषात् ॥ १.२.२४ ॥


अर्थ - वैश्वानरः = तेथे वैश्वानर नावाने परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन आहे; साधारणशब्दविशेषात् = कारण त्या वर्णनात ’वैश्वानर’ आणि ’आत्मा’ या साधारण शब्दांच्या अपेक्षेने परब्रह्माच्या बोधक विशेष शब्दांचा प्रयोग झाला आहे.


व्याख्या - छान्दोग्योपनिषद पाचव्या अध्यायाच्या अकराव्या खण्डापासून ज्या प्रसंगाचा आरंभ झाला आहे तो असा आहे - प्राचीनशाल, सत्ययज्ञ, इन्द्रद्युम्न, जन आणि बुडिल - हे पाच ऋषि श्रेष्ठ गृहस्थ आणि महान् वेदवेत्ते होते. त्यांनी एकत्र येऊन परस्परात विचार केला की ’आमचा आत्मा कोण आहे आणि ब्रह्माचे स्वरूप कसे आहे ? जेव्हां ते कोणत्याही निर्णयावर पोहोचू शकले नाहीत तेव्हा त्यांनी निश्चय केला की ’या समयी महर्षि उद्दालक ’वैश्वानर’ आत्म्याचे ज्ञाता आहेत, आपण त्यांच्याजवळ जावे.’ या निश्चयानुसार ते पाचही ऋषि उद्दालक मुनिंकडे गेले. त्यांना पाहूनच मुनिंनी असे अनुमान केले की, ’हे लोक मला काहीतरी विचारतील, परंतु मी त्यांचे समाधान करू शकणार नाही. म्हणून मी यांना आधीच अन्य कोणी उपदेष्टा सुचवला तर ते बरे होईल.’ असा विचार करून उद्दालक त्यांना म्हणाले - "आदरणीय महर्षींनो ! या समयी केवळ राजा अश्वपतिच वैश्वानर आत्म्याचा ज्ञाता आहे. चला तर आपण सर्वजण त्याच्याकडे जाऊ या." असे म्हणून त्या सर्वांबरोबर उद्दालक मुनि तेथे गेले. राजाने त्या सर्वांचा यथोचित सत्कार केला आणि त्यांना दुसर्‍या दिवशी यज्ञात सहभागी होण्याची प्रार्थना करीत त्यांना पर्याप्त धन देण्याचे आश्वासनही दिले. यावर महर्षींनी सांगितले की, ’आम्हाला धनाची अपेक्षा नाही. आम्ही ज्या हेतूने आपल्याजवळ आलो आहोत, तोच द्या. आम्हाला असे कळले आहे की आपण वैश्वानर अत्म्यास जाणता. त्याचाच उपदेश तुम्ही आम्हाला करा.’ राजाने दुसर्‍या दिवशी त्यांना जवळ बोलावून घेतले आणि एकेकास क्रमशः विचारले - "या विषयात आपण काय जाणता ?" त्यांच्यापैकी उपमन्युपुत्र प्राचीनशाने उत्तर दिले, ’मी द्युलोकास आत्मा समजून त्याची उपासना करतो.’ सत्ययज्ञ म्हणाला, ’मी सूर्याची उपासना करतो.’ इन्द्रद्युम्न म्हणाला, ’मी वायूची उपासना करतो.’ जनाने आपण आकाशाची आणि बुडिलाने आपण जलाची उपासना करत असल्याचे सांगितले. या सर्वांचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, "आपण सर्वजण त्या विश्वाचा आत्मा वैश्वानराची उपासना तर करीत आहात, परंतु त्याच्या एकेका अंगाचीच उपासना आपल्याद्वारे होत आहे. म्हणून ही सर्वांगपूर्ण नाही. कारण - ’तस्य ह वा एतस्यात्मनो वैश्वानरस्य मूर्धैव सुतेजाश्चक्षुर्विश्वरूपः प्राणः पृथग्वर्त्मात्मा संदेहो बहुलि बस्तिरेव रयिः पृथिव्येव पावुर एव वेदिर्लोमानि नर्हिर्हृदयं गार्हपत्यो मनोऽन्वाहार्यपचन आस्यं आहवनीय’ - म्हणजे या विश्वाचा आत्मा जो वैश्वानर, त्याचे द्युलोक हे मस्तक आहे, सूर्य नेत्र आहे, वायु प्राण आहे, आकाश शरीराचा मध्यभाग आहे, जल बस्तिस्थान आहे, पृथ्वी दोन्ही चरण आहेत, वेदी वक्षःस्थल आहे, दर्भ लोम आहे, गार्हपत्य अग्नि हृदय आहे, अन्वाहार्यपचन अग्नि मन आहे आणि आहवनीय अग्नि मुख आहे.’
या वर्णनावरून कळून येते की येथे विश्वाच्या आत्मरूप विराट पुरुषालाच वैश्वानर म्हटले आहे, कारण या प्रकरणात जठराग्नि आदिचा वाचक, साधारण शब्दांपेक्षा परब्रह्माचा वाचक विशेष श्ब्दांचा ठिकठिकाणी प्रयोग केला गेला आहे.
संबंध - आणखी एक वचन प्रस्तुत करतात -


स्मर्यमाणमनुमानं स्यादिति ॥ १.२.२५ ॥


अर्थ - स्मर्यमाणम् = स्मृतिमध्ये जे विराट् स्वरूपाचे वर्णन आहे, ते; अनुमानम् = मूलभूत श्रुतीच्या वचनाचे अनुमान करवून वैश्वानरचे ’परमेश्वर’ असण्याचा निश्चय करणारे आहे; इति स्यात् = म्हणून या प्रकरणात वैश्वानर परमात्माच आहे.


व्याख्या - महाभारत, शान्तिपर्व ४७.७० येथे म्हटले आहे - ’यस्याग्निरास्यं द्यौर्मूर्धा खं नाभिश्चरणौ क्षितिः । सूर्यश्चक्षुः दिशः श्रोत्रं तस्मै लोकात्मने नमः ॥’ - अग्नि ज्याचे मुख आहे, द्युलोक मस्तक, आकाश नाभि, पृथ्वी दोन्ही चरण, सूर्य नेत्र तथा दिशा कान आहेत, त्या सर्वलोकस्वरूप परमात्म्यास नमस्कार असो. या प्रकारे या ठिकाणी परमेश्वराचे अखिल विश्वरूपाने वर्णन आहे. स्मृतिच्या वचनाने त्याच्या कुठल्या तरी मूलभूत श्रुतिचे अस्तित्व सिद्ध होत आहे. उपरोक्त छांदोग्य श्रुतित जे वैश्वानर रूपाचे वर्णन आहे तेच पूर्वोक्त स्मृतिवचनाचा मूळ आधार आहे. म्हणून येथे त्या परब्रह्माच्या विराट रूपालाच वैश्वानर म्हटले आहे, ही गोष्ट स्मृतिच्या योगे सिद्ध होत आहे. म्हणून जेथे जेथे आत्मा अथवा परमात्मा यांच्या वर्णनात ’वैश्वानर’ शब्दाचा प्रयोग येतो तेथे त्यास परब्रह्माच्या विराट स्वरूपाचाच वाचक मानला पाहिजे. जठरानल किंवा जीवात्म्याचा वाचक नाही. मांडूक्योपनिषद ब्रह्माच्या चार पादांचे वर्णन करते. तेथे ब्रह्माचा पहिला पाद वैश्वानर म्हटले आहे, तेथेही ते परमेश्वराच्या विराट् स्वरूपाचेच वाचक आहे, जठराग्नि किंवा जीवात्म्याचे नाही.
संबंध - उपरोक्त गोष्टीच्या सिद्धीसाठी सूत्रकार स्वतःच शंका उपस्थित करून तिचे समाधान करतात -


शब्दादिभ्योऽन्तः प्रतिष्ठानाच्च नेति चेन्न तथा दृष्ट्युपदेशाद् असंभवात् पुरुषमपि चैनमधीयते ॥ १.२.२६ ॥


अर्थ - चेत् = जर म्हणाल; शब्दादिभ्यः = शब्दादि हेतुने अर्थात् अन्य श्रुतिमध्ये वैश्वानर शब्द अग्निच्या अर्थांत विशेषरूपात प्रयुक्त झाला आहे आणि या मंत्रात गार्हपत्य आदि अग्निंना वैश्वानराचे अंग म्हटले गेले आहे, म्हणून; = तथा; अन्तःप्रतिष्ठानात् = श्रुतिमध्ये वैश्वानरास शरीरार प्रतिष्ठित म्हटले गेले आहे, म्हणूनही; = येथे वैश्वानर शब्द परब्रह्म परमात्म्याचा वाचक नाही; इति न = पण हे म्हणणे योग्य नाही; तथा दृष्ट्युपदेशात् = कारण तेथे वैश्वानरात ब्रह्मदृष्टि करण्याचा उपदेश आहे; असंभवात् = याशिवाय केवळ जठरानलाचे विराट्‌रूपात् वर्णन होणे असंभव नाही, म्हणून; = तथा; एनम् = या वैश्वानरास; पुरुष = ’पुरुष’ नाव देऊन; अपि=ही, अधीयते = वाचतात (म्हणून उक्त प्रकरणात वैश्वानर शब्द परब्रह्माचाच वाचक आहे.)


व्याख्या - जर म्हणाल की अन्य श्रुतिमध्ये ’स यो हैतमेवमग्निं वैश्वानरं पुरूषविधं पुरुषेऽन्तः प्रतिष्ठितं वेद ।’ (शतपथ ब्रा. १०.६.१.११) - म्हणजे जो या वैश्वानर अग्निला पुरुषाच्या आकाराचा तथा पुरुषाच्या अंतरात प्रतिष्ठित जाणतो. याप्रकारे वैश्वानर शब्द अग्निच्या विशेषण रूपाने प्रयुक्त झाला आहे. तथा ज्या श्रुतिवर विचार चालला आहे, तिच्यातही गार्हपत्य आदि तिन्ही अग्निंना वैश्वानराचे अंग म्हटले आहे. या प्रकारे भगवद्‌गीतेतही म्हटले आहे की, ’मीच वैश्वानररूपाने प्राण्यांच्या शरीरात स्थित राहून चार प्रकारच्या अन्नाचे पचन करतो. (१५.१४) या सर्व कारणांनी येथे वैश्वानर नावाने जठराग्निचेच वर्णन आले आहे. परमात्म्याचे नाही. तर हे म्हणणे योग्य नाही. कारण शतपथ ब्राह्मणाच्या श्रुतित जी वैश्वानर अग्निला जाणण्यची गोष्ट आली आहे, ती जठराग्नीत ब्रह्मदृष्टि करविण्याच्या उद्देशानेच आली आहे. जर असे नसेल तर त्याला पुरुष म्हटले गेले नसते. तसेच भगवद्‌गीतेतही जे वैश्वानर अग्निला सर्व प्राण्यांच्या शरीरात स्थित म्हटले आहे, तेथे ही त्याच्यात परमात्मबुद्धि करविण्यासाठी भगवंतांनी आपल्या विभूतिच्या रूपात सांगितली आहे. याशिवाय ज्यावर विचार चालला आहे, त्या श्रुतीत समस्त ब्रह्माण्डास वैश्वानराचे शरीत म्हटले आहे. मस्तकापासून पायांपर्यंत त्याच्या अंगात समस्त लोकांची कल्पना केली गेली आहे. हे जठराग्निसाठी असंभवच आहे. एवं शतपथब्राह्मणात तसेच येथेही त्या या वैश्वानरास पुरुषाच्या आकाराचा आणि पुरुष म्हटले गेले आहे, जे जठराग्निसाठी योग्य नाही. या सर्व कारणांनी या प्रकरणात सांगितलेला वैश्वानर परब्रह्म परमेश्वरच आहे. जठराग्नि अथवा अन्य कोणी नाही.
संबंध - या प्रसंगात पृथक् पृथक् उपास्यरूपाने आलेले ’दिव’, ’आदित्य’, ’वायु’, ’आकाश’, ’जल’ तसेच पृथ्वीही वैश्वानर नाही, हे सिद्ध करण्यासाठी सांगतात -


अत एव न देवता भूतं च ॥ १.२.२७ ॥


अर्थ - अत = उपरोक्त कारणांनी; एव = हेही सिद्ध होत आहे की, तसेच; देवता = द्यौ, सूर्य आदि लोकांचे अधिष्ठाता देवगण; = आणि; भूतम् = आकाश आदि भूतसमुदायही; = वैश्वानर नाही.


व्याख्या - उपरोक्त प्रकरणात ’द्यौ’, ’सूर्य’ आदि लोकांची तसेच आकाश, वायु आदि भूतसमुदायाची आपल्या आत्म्याच्या रूपात उपासना करण्याचा प्रसंग आला आहे. म्हणून सूत्रकार स्पष्ट करतात, की पूर्वसूत्रात सांगितलेल्या कारणांनी हेही समजून घेतले पाहिजे की त्या त्या लोकांच्या अभिमानी देवता तसेच आकाश आदि भूतांनाही ’वैश्वानर’ शब्दाने ग्रहण केले जात नाही. म्हणून हेच मानले पाहिजे की, ’जो विश्वरूपही आहे आणि पुरुषही, तो वैश्वानर आहे.’ या व्युत्पत्तिनुसार परब्रह्म परमेश्वरासच वैश्वानर म्हटले गेले आहे.
संबंध - मागे २६ व्या सूत्रात सांगितले आहे की शतपथ ब्राह्मणाच्या मंत्रात जी वैश्वानर अग्निला जाणण्याची गोष्ट सांगितली, ती जठराग्नित ब्रह्मदृष्टि करविण्यासाठीच आहे. यायोगे असे प्रतीत होते की शाळिग्राम शिलेत विष्णुच्या उपासनेसदृश येथे वैश्वानर नामक जठराग्नित परमेश्वराचे प्रतीक म्हणून उपासना सांगण्यासाठी ’वैश्वानर’ नामाने ब्रह्माचे वर्णन आहे. म्हणून सूत्रकार आचार्य जैमिनिचे मत सांगतात -


साक्षादप्यविरोधं जैमिनिः ॥ १.२.२८ ॥


अर्थ - साक्षात् = ’वैश्वानर’ शब्दास साक्षात परब्रह्माचे वाचक मानण्यात; अपि = ही; अविरोधम् = काही विरोध नाही असे; जैमिनिः (आह) = आचार्य जैमिनी सांगतात -


व्याख्या - आचार्य जैमिनिंचे कथन आहे की वैश्वानर शब्दाला साक्षात् विश्वरूप परमात्म्याचा वाचक मानण्यात काही विरोध नाही. म्हणून येथे जठराग्निला प्रतीक मानून त्याच्या रूपात परमात्म्याची उपासना मानण्याची काही आवश्यकता नाही.
संबंध - उपरोक्त सूत्रांद्वारे हे सिद्ध होते की ’वैश्वानर’ नावाने या प्रकरणात परब्रह्म परमात्म्याचेच वर्णन केले आहे, परंतु निर्विकार, निराकार, अव्यक्त परब्रह्म परमात्म्यास या प्रकारे साकार विराट्‌रूपात देश-विशेषाशी संबंध म्हणणे कोणत्या अभिप्रायाने आहे ? निर्गुण-निराकारास सगुण-साकार म्हणणे परस्पर विरोधी वाटते. यावर २९ व्या सूत्रापासून ३१ व्या सूत्रापर्यंत विभिन्न आचार्यांचे मत सांगून अंती ३२ वे सूत्रात आपला सिद्धान्त सांगून सूत्रकार या दुसर्‍या पादास समाप्त करतात -


अभिव्यक्तेरित्याश्मरथ्यः ॥ १.२.२९ ॥


अर्थ - अभिव्यक्ते = भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देश विशेषात ब्रह्माचे प्राकट्य होत असते, म्हणून; अविरोधः = यात काही विरोध नाही; इति = असे; आश्मरथ्यः = आश्मरथ्य आचार्य म्हणतात.


व्याख्या - आश्मरथ्य आचार्यांचे म्हणणे आहे की भक्तजनांवर अनुग्रह करून त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान वेळोवेळी त्यांच्या श्रद्धेच्या अनुसार नाना रूपात प्रकट होतात. तसेच आपल्या भक्तांना दर्शन, स्पर्श आणि प्रेमपूर्वक संवाद आदिंच्या रूपाने आनंद वाटणे, त्यांचा उद्धार करणे आणि जगतात आपली कीर्ति पसरून तिच्या कथन, मनन द्वारा साधकांना परम-लाभ (मोक्ष) प्राप्त व्हावा म्हणून भगवान् मनुष्य आदिंच्या रूपात वेळोवेळी प्रकट होतात. केनोपनिषद ३.२ व गीता ४.६-९ तसेच इतर सद्‌ग्रंथातूनही प्रमाणित आहे. यामुळे विराट् रूपात त्या परब्रह्म परमात्म्यास सगुण साकार तथा देश-विशेषाशी संबंधित मानण्यात काही विरोध नाही, कारण ते सर्वसमर्थ भगवान देश-कालातीत आणि देश कालाशी संबंध ठेवणाराही आहे, तो ज्याप्रमाणे निर्गुण-निराकार आहे त्याचप्रमाणे सगुण साकार देखील आहे. हेच मांडूक्य उपनिषदात परब्रह्म परमात्म्याच्या चार पादांचे वर्णन फारच उत्तम प्रकारे वर्णन केले आहे.
संबंध - आता बादरि आचार्यांचे मत -


अनुस्मृतेर्बादरिः ॥ १.२.३० ॥


अर्थ - अनुस्मृतेः = विराट् रूपात परमेश्वराचे निरंतर स्मरण करण्यासाठी त्यास देश विशेषाशी संबंध सांगण्यात; (अविरोधः इति) बादरिः = (काहीही विरोध नाही असे) बादरि नामक आचार्य मानतात.


व्याख्या - परब्रह्म परमेश्व जरी देशकालातीत आहे, तरीही त्याचे निरंतर भजन, ध्यान आणि स्मरण करण्यासाठी, त्यास देश विशेषात स्थित विराट्‌स्वरूप मानणे, सांगणे आणि समजण्यात कसलाच विरोध नाही. कारण भगवान सर्वसमर्थ आहेत. त्यांचे भक्त ज्या ज्या रूपात चिंतन करतात, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी ते त्या त्या रूपात त्यांना भेटतात.++

++श्रीमद् भागवत ३.९.११ येथे म्हटले आहे - यद्यद्धिया ते उरुगाय विभावयन्ति तत्तद् वपुः प्रणयसे सदनुग्रहाय । - महान् यशश्वी परमेश्वरा ! तुझे भक्त आपल्या हृदयात तुझे ज्या ज्या रूपाने चिंतन करतात, त्या तुझ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी तू ते ते रूप धारण करतोस.
संबंध - या विषयात आचार्य जैमिनिंचे मत सांगतात -


संपत्तेरिति जैमिनिस्तथा हि दर्शयति ॥ ३१ ॥


अर्थ - संपत्तेः = परब्रह्म परमेश्वर अनंत ऐश्वर्याने संपन्न आहे (त्यास देशविशेषाशी संबंध ठेवणारे मानण्यात काही विरोध नाही) म्हणून; इति = असे; जैमिनिः = जैमिनि आचार्य मानतात; हि = कारण; तथा = असाच भाव; दर्शयति = इतर श्रुतिही प्रकट करतात.


व्याख्या - आचार्य जैमिनिंचे म्हणणे आहे की परब्रह्म परमेश्वर अनंत ऐश्वयाने संपन्न आहे म्हणून त्या निर्विकार, निराकार व देशकालातीत परमात्म्यास सगुण, साकार वा काही देश विशेषाने संबंधीत असणारा मानण्यात कसलाच विरोध असण्याचे कारण नाही. कारण इतर श्रुतिही हाच भाव प्रकट करतात. जसे मुण्डक २.१.४ (याच्या स्पष्टिकरणासाठी याच पादातील सूत्र २३ पहावे)
संबंध - आता सूत्रकार आपले मत सांगून या पादाचा उपसंहार करतात -


आमनन्ति चैनमस्मिन् ॥ १.२.३२ ॥


अर्थ - अस्मिन् = या वैदिक सिद्धान्तात; एनम् = या परमेश्वरास; (एवं) = असे; = ही; आमनन्ति = प्रतिपादन करतात.


व्याख्या - या वैदिक सिद्धान्तात सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वांचे निवासस्थान, सर्वसमर्थ परब्रह्म परमेश्वराचे ज्ञानीजन असेच वर्णन करतात++. या संबंधी शास्त्रच प्रमाण आहे. युक्ति प्रमाण येथे चालत नाही. कारण परमात्मा तर्काचा विषय नाही. तो सगुण-निर्गुण, साकार-निराकार, सविशेष-निर्विशेष आदि सर्व काही आहे. हा विश्वास ठेऊन साधकाने त्याच्या स्तवन, चिंतनात लागणे आवश्यक आहे. तो व्यापक भगवान सर्वत्र सदा विद्यमान आहे. म्हणून त्यास देश विशेषाने संयुक्त मानणे यात विरोध नाही. तसेच तो कोणत्याही स्थान विशेषापासून सदा निर्लिप्त आहे म्हणून त्यास देशकालातीत मानणेच योग्य आहे. सर्व आचार्यही हेच मानतात.

++ अनाद्यनन्तं कलिलस्य मध्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपम् । विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशैः ॥ (श्वेता. उप ५.१३) - संसारात अंतर्बाह्य व्याप्त, आदि-अंत रहित, जगताची सृष्टि करणारे, अनेक रूपधारी, आणि संपूर्ण जगताला सर्व बाजूंनी व्यापलेल्या एका अद्वितीय परमेश्वरस जाणून मनुष्य सर्व बंधनांतून सर्वथा मुक्त होतो.
येथे पहिल्या अध्यायातील दुसरा पाद पूर्ण झाला.

GO TOP